संस्कृत ही मृत भाषा समजावी काय?

राम राम मंडळी,

कुठल्याही जिवंत भाषेची आपल्याला सर्वसाधारणपणे खालील लक्षणे सांगता येतील..

१) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर.
२) बोलीभाषेतील तिचे स्वरूप. जसे मराठीबाबत सांगायचे तर कोकणी, मालवणी, आगरी, खास कोल्हापुरी ढंगाची, माणदेशी इत्यादी.
३) त्या भाषेत होणारी नवनिर्मिती. जसे कथा, कांदंबर्‍या, कविता, नाटके, चित्रपट, इत्यादी..

या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला संस्कृत भाषा मला कुठेच दिसत नाही... या बाबतीत वरील मुद्द्यांचा खालीलप्रमाणे उहापोह करता येईल..

१) आज व्यवहारात संस्कृत भाषेचा मला कुठेच वापर होतांना दिसत नाही.. संस्कृत ही भारतीय भाषा आहे. परंतु भारतातल्या मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनऊ, हैद्राबाद, जयपूर, कोल्हापूर, इत्यादी अनेक शहरातून मी वावरलो आहे परंतु आजतागायत मला यापैकी कुठल्याही ठिकाणी संस्कृत भाषेचा रोजच्या दैनंदिन व्यवहारात उपयोग होतांना आढळला नाही. असे का बरे?

२) बोलीभाषा हे माझ्या मते कुठल्याही भाषेचे एक वेगळेच सौंदर्य आहे. तिचा स्वत:चा असा एक खास ढंग आहे, गोडवा आहे. सर्वसाधारण, सामान्य माणसाला भाषेचा बोलीभाषा हा प्रकार वापरायला खूप बरा पडतो. कारण तिथे भाषेचे नियम, व्याकरणाचे नियम आपोआपच थोडे शिथिल झालेले असतात. जसा प्रान्त असतो तशी बोलीभाषा असते. एवढेच नव्हे, तर मुख्य भाषेप्रमाणेच बोलीभाषेतही खूप चांगली निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळेल! जसे एखाद्या चित्रपटातले बोलीभाषेतील गावरान संवाद, गं साजणी..कुन्न्या गावाची.. या सारखी काही फक्कड गाणी इत्यादी..

संस्कृतमध्ये बोलीभाषा हा प्रकार आहे का? असल्यास सर्रास आहे का? नसल्यास बोलीभाषा या भाषेचे सौंदर्य वाढवणार्‍या प्रकाराला संस्कृत भाषा पारखी कशी राहिली? काय कारणे असावीत?

३) आपल्या मायमराठीचे उदाहरण घ्यायचे झाले तर अगदी आजच्या घडीलाही मराठीमध्ये उत्तमोत्तम साहित्य निर्मिती होत आहे. मराठी भाषेत, किंवा हिंदी भाषेत अनेक मंडळी उत्तमोत्तम कथा, कादंबर्‍या, काव्य, गाणी, नाटके, चित्रपट इत्यादींची निर्मिती करत आहेत. आजच्या घडीला संस्कृत भाषेत मला एकही चित्रपट अथवा नाटक पाहायला मिळत नाही. 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या..' सारखे एखादे तरल गाणे आजतागायत मला संस्कृत भाषेत ऐकायला मिळाले नाही..

का बरे असे?

आजच्या घडीला मला मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, गुजराथी, तेलूगू, कन्नड, उर्दू, इत्यादी वर्तमानपत्रे अगदी सर्रास पाहायला मिळतात, जी समाजाचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आरसा समजली जातात. अगदी सामान्यातला सामान्य माणूस ही वर्तमानपत्रे वाचत असतो व त्याद्वारे तो स्वत:ला जगाशी जोडून ठेवतो. परंतु एखादे बर्‍यापैकी खप असलेले संस्कृत वृत्तपत्र आहे आणि जे समाजात वाचले जात आहे असे चित्र मला तरी आजतागायत कुठेही दिसले नाही! का बरे असे?

आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर संस्कृत ही आजच्या घडीला केवळ एक मृतभाषा आहे असे म्हटले तर ते माझ्या मते वावगे ठरू नये! आपले मत काय? वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांची कुणी मुद्देसूद कारणमिमांसा करेल का?

बहोत बहोत मेहेरबानी..

कळावे,

आपला,
-- तात्या अभ्यंकर.

लेखनविषय: दुवे:

Comments

ऊबग

कोणा विशिष्ट व्यक्तीचा लेख आहे म्हणून नकारात्मक प्रतिसाद द्यावा या हेतूने नव्हे, तर गेल्या काही दिवसांत परत त्याच त्याच लोकांतली तीच तीच भांडणे वाचून अक्षरशः ऊबग आला आहे, त्यामुळे या विषयावर काहीही लिहायचे नाही हा माझा निश्चय मोडून इथे लिहिते आहे.

भाषा मृत की जिवंत हे ठरवण्यासाठी आपण वर दिलेल्या निकषांच्या खेरीजही काही निकष आहेत. पहिला निकष म्हणजे, ती भाषा एका पिढीकडून पुढच्या पिढीला दिली जात आहे का. या कसोटीवर तांत्रिकदृष्ट्या संस्कृत मृत ठरवता येणार नाही, कारण शैक्षणिक माध्यमातून का होईना, संस्कृत ही भाषा एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला दिली जाते. आता ज्या प्रमाणे मराठी भाषा पुढची पिढी अवगत करून घेते, त्याचप्रकारे संस्कृत भाषा अवगत करून घेत नाही हा एक भाग झाला.

दुसरे म्हणजे जेव्हा एखाद्या भाषेचा एकही भाषिक जिवंत राहत नाही, तेव्हा ती भाषा पूर्णपणे मृत होते. परंतू जोवर तिचे काही भाषिक जिवंत आहेत, तोवर ती भाषा मृत मानता येत नाही. आपल्या माहितीसाठी २००१ च्या जनगणनेनुसार १४१३५ इतके लोक संस्कृत भाषा बोलतात, इतकेच नव्हे, तर हे सर्व लोक संस्कृत ही आपली मातृभाषा आहे असे सांगतात. लोकांनी सांगितले, जनगणना अधिकार्‍यांनी मानले ही परिस्थिती खरी असली, तरीही आजूबाजूला पाहिल्यास एकमेकांशी अस्खलित संस्कृतमधे संवाद साधणारे लोक दिसून येतात. माझ्या अनेक मित्रमैत्रिणींना संस्कृतमधे बोलता येते एवढेच नव्हे, तर ते एकमेकांशी फक्त संस्कृतमधेच बोलतात. (मी त्यांच्यातली एक नाही.)

तुम्ही नमूद केलेल्या इतर निकषांबद्दल बोलायचं झालं, तर संस्कृतभाषेत कोणते वृत्तपत्र निघते की नाही, याची मला कल्पना नाही, परंतू काही मासिके, त्रैमासिके मात्र निघतात. व ज्या अर्थी ही मासिके गेली अनेक वर्षे अखंडित रीत्या प्रकाशित होत आहेत, त्या अर्थी त्यांचा पुरेसा वाचकवर्गही असला पाहिजे. बोलीभाषेतील स्वरूपाबद्दल बोलायचे झाले, तर आपण एखाद्या सर्वसामान्यपणे जिवंत समजल्या जाणार्‍या भाषेचे उदाहरण घेऊ, जशी जर्मन. जर तुम्हाला जर्मन भाषाच येत नसेल, तर तुम्हाला प्रमाणित जर्मन काय, जर्मनची एखादी वेगळी बोलीभाषा काय, काहीही ऐकवले तरी ती बोलीभाषा आहे की नाही, हे सांगता येणार नाही. त्याचप्रमाणे संस्कृतला बोलीभाषेचे 'स्वरूप' नाही आहे, असे कोणीच ठामपणे म्हणू शकत नाही. आधी एकदा सांगितल्याप्रमाणे संस्कृत भाषेत शिव्याही आहेत, संस्कृत भाषेत ओव्याही (सुवचने या अर्थाने) आहेत. त्यामुळे संस्कृतचे 'स्वरूप' हे बोलीभाषेचे नाही, हे मान्य करणे कठीण जाते. प्रत्येक भाषेची वेगवेगळी 'रजिस्टर्स' असतात. जसे मी घरात जसे मराठी बोलते ते एका 'रजिस्टर'चे झाले, मी उपक्रमावर लेखन करताना ज्या मराठीत करते, ते मराठीचे वेगळे 'रजिस्टर' झाले, मी निविदा सूचनांचा इंग्रजीमधून मराठीत अनुवाद करताना जे मराठी वापरते, ते तिसरे 'रजिस्टर' झाले, शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकात जे मराठी आपण वाचले, ते चौथे रजिस्टर. थोडक्यात जी भाषा अधिक 'काँटेक्स्ट्स'मधे वापरली जाते, तिची अधिक 'रजिस्टर्स' असतात, व अधिक उपयोगही. संस्कृतच्या बाबतीतही हे खरे आहे. संस्कृतमधे देवाच्या प्रार्थनेसाठी एक 'रजिस्टर' वापरले जाते, विज्ञानसंबंधी चर्चा करण्यासाठी दुसरे, अध्यात्मासंबंधी चर्चा करण्यासाठी तिसरे, नाटकांत पात्रांच्या तोंडी असते, ते चौथे, याज्ञवल्क्य स्मृतींमधे वगैरे वडिलांच्या संपत्तीची विभागणी मुलांत कोणत्या पद्धतीने करावी हे सांगण्यासाठी वापरलेले पाचवे अशी अनेक रजिस्टर्स आहेत. ते पाहता संस्कृतभाषा कोणत्या ना कोणत्या काळी अनेक 'डोमेन्स'मधे वापरली जात होती हे दिसते.

आता सध्यापुरते बोलायचे झाले, तर संस्कृतभाषेतही नवनिर्मिती होते आहे. काही वर्षांपूर्वी साहित्य अकादमीने संस्कृतमधे लिहिल्या गेलेल्या एका पुस्तकाला पुरस्कारही दिला होता. मी स्वतः महाविद्यालयात असताना संस्कृतमधे आजच्या काळातले विषय घेऊन लिहिली गेलेली नाटके केली आहेत. आपल्या माहितीसाठी, त्यातले एक नाटक मुंबईत लोकल ट्रेनमधे झालेल्या एका घटनेवर होते, दुसरे नाटक जुगाराचे आजच्या काळातले स्वरूप यावर होते तर तिसरे नाटक भांडारकर संस्थेवर झालेला हल्ला, त्यामागील राजकीय हेतू यांवर होते. आणि महत्त्वाची गोष्ट ही की या नाटकांचा बहुतांश भाग कोणा संस्कृत पंडिताने नव्हे तर आम्ही १८-१९ वर्षांच्या मुलांनी मिळून लिहिलेला असे. अशी नाटके करणारे आमचे महाविद्यालय एकमेव नव्हे, पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय (मराठी/ इंग्रजी कथा / एकांकिका घेऊन त्यांचे संस्कृत रुपांतरण करणे ही फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांची स्पेशॅलिटी आहे), स. प. महाविद्यालय, रेणुकास्वरूप इत्यादि शाळा, रत्नागिरीतले एक महाविद्यालय हे सर्व गेली काही वर्षे स्वतः नवीन संस्कृत एकांकिका लिहीत आहेत व सादर करत आहेत. इतकेच नव्हे तर राज्यपातळी वर या एकांकिकांच्या स्पर्धा होतात, राज्यनाट्य स्पर्धांमधे तर संस्कृत एकांकिकांची एक स्वतंत्र स्पर्धा होते. मराठीइतक्या मोठ्या प्रमाणावर नवनिर्मिती होत नसेल कदाचित, पण म्हणून 'मी पाहिले नाही या अर्थी संस्कृतमधे नवनिर्मिती होत नाही', असे म्हणणे योग्य नव्हे. आपण 'पाहिले' नाही, तर आपल्याला 'दिसणार' कसे?

थोडक्यात सांगायचा मुद्दा हा की संस्कृतभाषा ही तांत्रिकदृष्ट्या मृत नाही. ती एक पुनरुज्जिवीत केलेली भाषा आहे.

हा मुद्दा संस्कृतप्रेमींनी लक्षात घ्यायला हवा आहे. संस्कृत कशी महान आहे, संस्कृत कशी बोलीभाषा आहे, संस्कृतात कशी नवनिर्मिती होते, ज्यांना संस्कृत येत नाही किंवा संस्कृत आवडत नाही ते कसे असंस्कृत आहेत, हे दहावेळा ओरडून सांगितल्याने चित्रपटांत दाखवतात तसे लोकांचे अचानक हृदयपरिवर्त होऊन ते एका क्षणात संस्कृतद्वेष्ट्यांचे संस्कृतप्रेमी होणार नाहीत. शिवाय काय आवडावे, काय नाही, कशावर विश्वास ठेवावा, कशावर नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो, त्यामागे ज्याची त्याची एक स्वतंत्र वैचारिक भूमिका असते. तिचा प्रत्येकाने आदर केला पाहिजे. एखाद्याला संस्कृत आवडत नाही म्हणून त्याच्या ऊरावर बसून वाच संस्कृत,शिक संस्कृत, संस्कृत आवडून घे असे प्रकार करण्यात किंवा वैयक्तिक टीका करण्यात काहीच हशील नाही. अर्थातच हे संस्कृतप्रेमींप्रमाणेच इतरांनाही लागू होते. एखादी व्यक्ती संस्कृतबद्दल अत्यंत प्रेमाने काहीतरी बोलते आहे, म्हणून मराठीच्या प्रत्येक शब्दाला शेवटी 'म्' लावून एक प्रतिसाद लिहून तिची खिल्ली उडवणे योग्य नाही.

उपक्रमावर गेले काही दिवस जे वाद चालले आहेत, ते अत्यंत निंदनीय आहेत, त्याबद्दल वेगवेगळ्या सदस्यांना 'आता पुरे' अशा अर्थाचे निरोप पाठवले असता, 'सुरुवात त्याने केली', 'त्याने थांबवलं तर मी थांबवेन' अशा प्रकारची उत्तरे आलेली आहेत. कृपया एवढे लक्षात घ्या की अशा वादांमुळे उपक्रमाची व संस्कृतची निंदा होते, ते लिहिणार्‍यांची नव्हे.

वरील वाक्य उपक्रमाच्या धोरणाप्रमाणे उडवले जाण्यायोग्य आहे हे माहित आहे, परंतू कृपया ते २ दिवस तरी ठेवावे.

आता माझा स्वतःचा पुढचा मुद्दा असा की, ठीक आहे आपण मान्य करुया की संस्कृत ही फक्त तांत्रिकदृष्ट्याच जिवंत भाषा आहे, मराठी, इंग्रजी च्या प्रकारे 'जिवंत' भाषा म्हणता येतील, त्याप्रकारे संस्कृतभाषा जिवंत नाही. सो व्हॉट? त्यामुळे संस्कृतमधे एकेकाळी प्रचंड ग्रंथनिर्मिती झाली आहे हे सत्य बदलत नाही. या सर्व ग्रंथांचा मोठ्या प्रमाणावर बारकाईने अभ्यास केला जाण्याची आवश्यकता आहे, हेही तितकेच खरे आहे. संस्कृत ग्रंथांमधे विज्ञान आहे की नाही या वादात मला पडायचे नाही. परंतू माझ्या विषयापुरते बोलायचे झाल्यास, संस्कृतमधे व्याकरणविषयक जे ग्रंथ आहेत, ते फक्त व्याकरणाच्याच नाही तर भाषाविषयक तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे आहेत. पाश्चिमात्त्य भाषाशास्त्रज्ञांना पाणिनी, पतंजली नंतर आता कुठे भर्तृहरी, दिङ्नाग, कात्यायन, कौंडभट्ट यांचे 'शोध' लागत आहेत. या क्षेत्रात किती संशोधन करता येईल याला सीमा नाही. (बर्‍याच लोकांचा असा ठाम गैरसमज असलेला मी पाहिलेला आहे की पाणिनीनंतर कोणी वैयाकरणी झालाच नाही म्हणजे पाणिनीनंतरच्या काळात संस्कृत भाषेत काही बदल झालाच नाही, त्यांना मी यानिमित्ताने सांगू इच्छिते की पाणिनीनंतर किमान १० वैयाकरणी होऊन गेले आहेत. कात्यायनाने तर पाणिनीच्या सूत्रांना पुरवण्या जोडून कात्यायनाच्या काळात संस्कृत भाषा कोणकोणत्या वाक्यप्रयोगांच्या बाबतीत बदलली होती, ते सांगितले आहे. संस्कृत भाषा प्रवाही होती व इतर 'जिवंत' भाषांप्रमाणे एकेकाळी बदलत होती याचा हा पुरावा आहे) मगाशी संस्कृत घेणार्‍या लोकांना अर्थार्जनाच्या संधी नाहीत असे कोणीतरी म्हटलेले वाचले. काही अंशी हे खरे आहे. परंतू संस्कृत शिकवल्या जाणार्‍या शाळा, महाविद्यालये, विश्वविद्यालये, सरकारपुरस्कृत इतर संस्था यांची संख्या खूप मोठी आहे. या सर्वांत अध्यापन व संशोधन यांसाठी सतत संस्कृततज्ञांची मागणी असते. परंतू जर्मन/ हिंदी भाषा शिकल्यावर भाषांतर करून जितक्या मोठ्या प्रमाणात अर्थार्जन करता येईल, तितक्या मोठ्या प्रमाणात संस्कृतच्या बळावर करता येत नाही, हे खरे आहे,पण म्हणून संस्कृतभाषेला उपयोगमूल्यच मुळी राहिलेले नाही, असे अजिबात नाही.

संस्कृत भाषेतच बोलण्याचा आग्रह धरणारे (उपक्रमावरचे व बाहेरचेही) माझे स्नेहीच आहेत, त्यांच्याशी माझी अत्यंत चांगली मैत्री आहे, परंतू तरीही थोडी नकारात्मकता स्वतःकडे घेऊन त्यांना सुचवावेसे वाटते, की संस्कृत ही भाषा आहे म्हणून ती बोलली पाहिजे हे जरी खरे असले, तरी आजच्या काळात संस्कृतमधे बोलल्याने काय उपयोग होणार आहे, याचा साकल्याने विचार करावा. संस्कृतचा प्रसार व्हावा म्हणून सरकारने वेगवेगळ्या संस्कृत संस्थांना अनुदान देऊन, प्रसंगी नव्या संस्था निर्माण करून संस्कृत बोलणे शिकवण्याचे वर्ग सुरू करवले. उद्देश हा की,संस्कृत भाषा समजायला लागली, की लोक संस्कृत ग्रंथांच्या वाचनाकडे वळतील, मग त्यातून पुढे काही त्या क्षेत्रात संशोधन करण्यास प्रेरित होतील. परंतू आजची स्थिती पाहिल्यास, संस्कृतप्रेमींमधे सरळ सरळ दोन तट पडले आहेत. एक जे संस्कृतविषयक संशोधन करतात पण संस्कृतचा वापर बोलण्यासाठी करत नाहीत, व दोन जे फक्त संस्कृतमधे बोलतात व ते इतरांना शिकवतात, त्या संस्कृतचा वापर सुवचनांपलिकडे जाऊन अभिजात साहित्य वाचणे, संशोधन करणे यासाठी करत नाहीत. संस्कृत बोलणारे व त्याचा पुढे अभ्यासही करणारे लोक फार म्हणजे फारच कमी आहेत. यामुळे होते काय, की संस्कृतभाषिकांची एक परंपरा निर्माण होत आहे. हे संस्कृतभाषिक स्वतः संस्कृत शिकतात, संस्कृतमधे बोलतात व इतरांना संस्कृत बोलायला शिकवतात, त्यांचे विद्यार्थीही तेच करतात. परंतू संस्कृत भाषा 'तगवणे' या पलिकडे याचा काय उपयोग होतो? आणि यातून पुढचा प्रश्न असा उद्भवतो की संस्कृत भाषेला 'तगवल्याने' संस्कृतचं काय भलं होतं?

संस्कृत भाषा बोलणारे लोक आज अस्तित्त्वात आहेत हे खरे. पण सो व्हॉट, त्यांनी संस्कृतच्या संशोधनामधे नक्की किती योगदान दिले? संस्कृत बोलणे, सुवचने वाचणे ऐकवणे इथे संस्कृत संपत नाही, ती केवळ सुरुवात आहे. फक्त सुरुवातीवरच अडून बसणे आणि पुढे न जाणे, यांत फारसे काही हशील नाही.

या आख्यानाची तात्पर्ये पुढील प्रमाणे (ती संस्कृतप्रेमी व इतर दोघांसाठीही सारखीच लागू होतात)-
१-जशी आपली एक वैचारिक भूमिका असते तशी विरुद्ध मताच्या व्यक्तीचीही असते, तिचा आदर करावा.
२- आपण ज्या तत्त्वांना मानतो, व त्या तत्त्वांप्रमाणे चालतो, त्यांना काही अर्थ आहे का, त्यांचा काही उपयोग आहे का हे सतत तपासून पहावे. मुद्दाम संस्कृतच्या विरुद्ध नारेबाजी केल्याने व संस्कृतच्या बद्दल आपले प्रेम व्यक्त केल्याने खरेच कुणाचे भले होते का याचा विचार करावा.

राधिका
राधिका

उबगाशी सहमत आहे

राधिकाचा विस्तृत प्रतिसाद आवडला, या चर्चेत आता अधिक लिहावे असे काही नाही. तरी माझे दोन पैशे (सवय हो! ;-)) सावकाश टाकेनच.

असेच म्हणतो

वादासाठी वाद घालण्यात काय उपयोग? महाजालीय समाज जीवनात, काही अतिरेकी अथवा संकेतस्थळ कंटक (संकंटक) असतात. त्यांना किती महत्व द्यायचे जे ज्याचे त्याने ठरवायचे. कोणत्याही गोष्टीचे अति झाले की त्याची माती होईल.

सहमत..

महाजालीय समाज जीवनात, काही अतिरेकी अथवा संकेतस्थळ कंटक (संकंटक) असतात. त्यांना किती महत्व द्यायचे जे ज्याचे त्याने ठरवायचे. कोणत्याही गोष्टीचे अति झाले की त्याची माती होईल.

अगदी सहमत आहे...!

आपला,
(एक संस्केतस्थळ चालक) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

प्रतिसाद

येथील काही प्रतिसाद काढून टाकण्यात येत आहेत.

सदस्यांनी आपले व्यक्तिगत हेवेदावे आणि संवादासाठी कृपया खरडवही किंवा व्य. नि. यांचा वापर करावा. - संपादन मंडळ

वाट..

तरी माझे दोन पैशे (सवय हो! ;-)) सावकाश टाकेनच.

वाट पाहतो आहे. :)

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

उत्तम

उत्तम प्रतिसाद. संतुलित प्रतिसाद कसा असावा याचे उदाहरण.
----

धन्यवाद,

आपल्या विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद...

आता माझा स्वतःचा पुढचा मुद्दा असा की, ठीक आहे आपण मान्य करुया की संस्कृत ही फक्त तांत्रिकदृष्ट्याच जिवंत भाषा आहे, मराठी, इंग्रजी च्या प्रकारे 'जिवंत' भाषा म्हणता येतील, त्याप्रकारे संस्कृतभाषा जिवंत नाही.

हम्म..! प्रतिसाद वाचून संस्कृत भाषा तांत्रिकदृष्ट्या जिवंत आहे असे मानायला वाव आहे असे वाटते...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

मस्त

टाळ्या... शिट्या... फेटे उडले..
मस्त आणि संतुलित प्रतिसाद :)

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

जगातील सर्वात मोठा शब्दकोश

पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये १९४८पासून संस्कृत डिक्शनरी प्रोजेक्ट या नावाखाली एक प्रचंड प्रकल्प सुरू आहे. हा सुरू करण्यात डेक्कन कॉलेजचे तेव्हाचे संचालक आणि भाषाशास्त्रज्ञ सुमित्र कत्रे यांचा महत्वाचा वाटा होता. यामध्ये १९४८ ते १९७५ या कालावधीत ९० लाख शब्द घालण्यात आले. यासाठी वेदांपासून ते १८व्या शतकातील साहित्यापर्यंत उपलब्ध ग्रंथांचा आधार घेण्यात आला. हे काम अजूनही जोरात सुरू आहे. पूर्ण झाल्यावर हा शब्दकोश संस्कृतचा जगातील सर्वात मोठा शब्दकोश होईल असा अंदाज आहे.

हे इथे सांगण्याचा उद्देश हा की अजूनही संस्कृतमध्ये रस असणारी बरीच मंडळी आहेत. आणि त्याच्या संशोधनासाठी सरकार अनुदानही देत आहे. (या वर्षीच्या बजेटमध्ये पी चिदंबरम यांनी पाच कोटीची देणगी जाहीर केली. यासाठी बजेट मांडताना लोकसभेत डेक्कन कॉलेजचा विशेष उल्लेख करण्यात आला.)

संदर्भ :
दुवा क्र. १
दुवा क्र. २
याहून अधिक माहिती हवी असल्यास डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतची बरीच तज्ञ मंडळी आहेत. त्यांना विचारल्यास सर्व शंकांचे निरसन होऊ शकेल. :-)

----

संस्कृत वर्तमावतपत्र

संस्कृतमध्ये १९७० पासून सुधर्मा हे वर्तमानपत्र प्रकाशित होते. याच वर्तमानपत्राची वेब आवृत्ती अलिकडेच सुरू झाली आहे. बंगळूरू येथून प्रकाशित होणारे संभाषण संदेश हे मासिकही गेली कित्येक वर्षे प्रकाशित होत आहे.

माझे दोन पैशे

संस्कृतही मरणप्राय भाषा होईल ही भीती खरी असावी. तांत्रिक दृष्ट्या तिला मृत म्हणता येणार नाही आणि ती मृत होऊही नये असे मला वाटते.

याचे एकमेव कारण हे की कोणी काही म्हटले तरी संस्कृत ही आपण आपली भाषा मानलेली आहे. (कालांतराने इंग्रजीही आपलीच भाषा समजली जावी) संस्कृतात विपुल साहित्य, काव्य, आयुर्वेद इ. आहेत जे निष्काळजीपणे तिलांजली देण्यायोग्य नाही, उलट जिव्हाळ्याने जपून ठेवण्यायोग्य आहे. आपल्या संस्कृतीत इतिहास लिहिण्याची परंपरा नसल्याने हे साहित्यच इतिहासाची पाठपुरावा करण्यास कामी येते. अशी भाषा मृत होता कामा नये असे मला वाटते.

परंतु, या भाषेची महती सांगताना काही तथाकथित तज्ज्ञांचा सूर पूर्वापार आपले सर्वजातीय पूर्वज ही भाषा बोलत आले, ज्याला संस्कृत येते तो सुसंस्कृत वगैरे अपप्रचार करत असतात तो निंदनीयही वाटतो. कदाचित, हे कारण अनेकांना या भाषेबद्दल घृणा वाटण्यास कारणीभूत ठरावे.

या भाषेला एका विशिष्ट वर्गाने ताब्यात घेतले तेव्हापासूनच या भाषेची पडझड सुरु झाली असावी. त्यातून तिला राजभाषा आणि ज्ञानभाषेचा दर्जा न राहणे हे ही तिच्या पडझडीचे कारण प्रबळ वाटते आणि हेच कारण मायमराठीलाही लागू आहे. संस्कृताप्रमाणे मायमराठीही मृत न होवो ही सदिच्छा!

हेच,

परंतु, या भाषेची महती सांगताना काही तथाकथित तज्ज्ञांचा सूर पूर्वापार आपले सर्वजातीय पूर्वज ही भाषा बोलत आले, ज्याला संस्कृत येते तो सुसंस्कृत वगैरे अपप्रचार करत असतात तो निंदनीयही वाटतो. कदाचित, हे कारण अनेकांना या भाषेबद्दल घृणा वाटण्यास कारणीभूत ठरावे.

हेच म्हणतो..!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

पडझड

वर म्हटल्याप्रमाणे संस्कृतच्या पडझडीचे कारण विशिष्ट समाजाची मक्तेदारी किंवा इतर काहींच्या मताप्रमाणे भारतावरील आक्रमणे असावे असे संस्कृत साहित्याचा इतिहास लक्षात घेतल्यास वाटत नाही. भारताचा इतिहास वाचून तोच संस्कृत साहित्याचा इतिहास असे मानल्यास बरेच गैरसमज होऊ शकतात. नुकताच मी शेल्डन पोलॉक यांचा 'डेथ ऑफ संस्कृत' हा लेख वाचला. त्या लेखात मांडलेले सर्वच विचार जरी पटले नसले, तरी तो उद्बोधक वाटला. इच्छुकांनी आपला इ.मेल आय डी. सांगवावा , त्यांना त्या लेखाची सॉफ्ट कॉपी पाठवता येईल.
राधिका

डेथ ऑफ संस्कृत - दुवा

सदर लेख वाचला. लेखाची सुरूवात तद्दन राजकीय असून त्यामध्ये भाजप, विश्व हिंदु परिषद यांची निंदा करण्यात आली आहे. शुद्ध भाषाशास्त्रविषयक लेखाची सुरूवात अशा राजकीय अंगाने होणे हे मी लेखकाच्या नि:पक्षपातीपणाचे लक्षण अजिबात समजत नाही. लेख एक प्रकारचा राजकीय अजेंडा पुढे ठेवून लिहिल्याचे माझे मत झाले आहे.त्यामुळे सदर लेखाला माझ्या लेखी फारशी किंमत नाही.

डेथ ऑफ संस्कृत

धन्यवाद

श्री विनायक, दुव्याबद्दल धन्यवाद.

मुद्दे मान्य

मुद्दे मान्य. पण एक गोष्ट मान्य करायलाच हवी की वर लिहिल्या प्रमाणे संस्कृत भाषे मध्ये जे काही लेखन उपलब्ध आहे त्याचा अभ्यास करुन बरेच जुने शास्त्रीय संदर्भ नव्याने समजण्यासारखे आहेत. पण मराठी मध्ये असे काही शास्त्रीय आहे का? मराठीला मुठभर लोकांची बोली भाषा या शिवाय काही अस्तित्व आहे का? तुम्ही म्हणता प्रमाणे निंदनीय मुद्दे मला पटतात. पण फक्त आपल्याला संस्कृत येत नाही/समजत नाही अथवा त्यातल्या गोष्टी समजून घेण्याची आपली बौद्धिक पातळी नाही या एक न्युनगंडा पायी एकदम मृत भाषा वगैरे हास्यास्पद वाटते.

अवाण तर (म्हणजे आपले अवांतर हो): आम्ही इंग्रजीला सुद्धा आपलीच भाषा समजतो. जावी हा आशावाद जरा कोड्यात टाकतो. अहो मराठी मुद्दा म्हणून भांडणारा राज सुद्धा आपल्या पाल्यांना इंग्रजी मध्येच शिकवतो. ठाकर्‍यांची पुढची पीढी जगावर राज्य करणार आहे बहुतेक म्हणून जगाची भाषा घेउन शिक्षण घेत आहेत.

हेच म्हणतो

तांत्रिक दृष्ट्या तिला मृत म्हणता येणार नाही आणि ती मृत होऊही नये असे मला वाटते.

हेच म्हणतो

ऋषिकेश
------------------
जगात १० प्रकारचे लोक असतात द्विमान पद्धती समजणारे आणि न समजणारे

सहमत

(कालांतराने इंग्रजीही आपलीच भाषा समजली जावी) संस्कृतात विपुल साहित्य, काव्य, आयुर्वेद इ. आहेत जे निष्काळजीपणे तिलांजली देण्यायोग्य नाही, उलट जिव्हाळ्याने जपून ठेवण्यायोग्य आहे.

सहमत आहे.

----

भाषा

"या भाषेला एका विशिष्ट वर्गाने ताब्यात घेतले तेव्हापासूनच या भाषेची पडझड सुरु झाली असावी" असा प्रचार करणे हे सुद्धा निंदनीयच आहे.शिक्षण या भाषेमधुन असणे व एका विशिष्ट वर्गाने शिकणे ही त्या काळची समाजव्यवस्था आहे. त्यावरुन् 'भाषेला ताब्यात घेतले' वगैरे बोलणे म्हणजे निरर्थकच. आणि ताब्यात घेतले तेंव्हापासुनच पडझड चालु झाली असे म्हणणे म्हणजे खुपच हास्यास्पद आहे. असो. काही लोकाना संस्कृत मृत झाली आहे असे म्ह्टल्यानंतर खुप आसुरी आनंद होतोय तो त्याना घेउद्यात. परंतु, स्वतःची भाषा जगवण्यात ते कितपत यशस्वी ठरतायत हे बघायचे.

- राजस

अटकळ आणि प्रचार

या भाषेला एका विशिष्ट वर्गाने ताब्यात घेतले तेव्हापासूनच या भाषेची पडझड सुरु झाली असावी

असावी हा शब्द अटकळ दर्शवतो. आहे हा शब्द ठाम मत. मी यावर जेव्हा आहे असे क्रियापद वापरून संस्कृत कशी विशिष्ट वर्गातच बोलली जात होती असे लेख वगैरे टाकेन तेव्हा आपण मी अपप्रचार करते असे सांगणारे प्रतिसाद जरूर लिहावे.

शिक्षण या भाषेमधुन असणे व एका विशिष्ट वर्गाने शिकणे ही त्या काळची समाजव्यवस्था आहे. त्यावरुन् 'भाषेला ताब्यात घेतले' वगैरे बोलणे म्हणजे निरर्थकच. आणि ताब्यात घेतले तेंव्हापासुनच पडझड चालु झाली असे म्हणणे म्हणजे खुपच हास्यास्पद आहे.

समाजव्यवस्था असणे कोणी नाकारत नाहीच पण जेव्हा व्यवस्था कट्टर आणि कर्मठ होत जाते तेव्हा ताब्यात घेणे हा शब्दप्रयोग करण्याची गरज पडते. कदाचित तसे म्हणणे आपल्या लेखी हास्यास्पद असावे (इतरांना तसे वाटल्याचे जाणवत नाही) पण ते हास्यास्पद कसे हे आपण स्वतंत्र लेखातून आम्हाला पटवून उपकृत केलेत तर सर्व धन्य होतील.

अटकळ

अच्छा, अटकळ आहे. अशी अटकळ का बरे आहे या बद्दल एखादा लेख तुम्ही लिहालच.

समाजव्यवस्था असणे कोणी नाकारत नाहीच पण जेव्हा व्यवस्था कट्टर आणि कर्मठ होत जाते तेव्हा ताब्यात घेणे हा शब्दप्रयोग करण्याची गरज पडते.

जरुर लिहा. परंतु सारखे विशीष्ट वर्गाला उद्देशुन लिहीत राहणे आम्हाला तर हास्यास्पद वाटु लागले आहे.

- राजस.

समाजव्यवस्थेतील कोणते कारण ?

>>"या भाषेला एका विशिष्ट वर्गाने ताब्यात घेतले तेव्हापासूनच या भाषेची पडझड सुरु झाली असावी" असा प्रचार करणे हे सुद्धा निंदनीयच आहे.

बरं समजा ! तसे नसेल तर ती भाषा सर्वांची का होऊ शकली नाही याची, या पेक्षा दुसरी पटणारी कोणती कारणे असावीत ?

असे म्हणतात की, वैदिक काळात भारतात अनेक बोली बोलल्या जात होत्या, वैदिक संस्कृत ही त्यापैकी च एक होय. त्याही अगोदर प्राकृतच्याच बोलीपासून भाषेच्या नैसर्गीक विकासानुसार पाली,पैशाची, इ. बोली निर्माण झाल्या असे म्हणतात. आर्यभारती शाखेप्रमाणे प्राचीन भाषा म्हणजे संस्कृत. संस्कृतचे वैदिक संस्कृत आणि पाणिनी उत्तरकालीन अथवा अभिजात संस्कृत असे भेद केल्या जातात. हे सर्व सांगायचे कारण असे की भाषाभ्यासक असे मानतात की, प्राकृत भाषेतील व्याकरण संरचनेनुसार तिचा थेट उत्तरकालीन भाषेशी संबंध जोडतात. मग मधल्या काळात संस्कृत ही सामान्य माणसाची बोली नव्हती का ? का होऊ शकली नाही ? याचे काय कारण असावे ?

समाजव्यवस्था असणे कोणी नाकारत नाहीच पण जेव्हा व्यवस्था कट्टर आणि कर्मठ होत जाते तेव्हा ताब्यात घेणे हा शब्दप्रयोग करण्याची गरज पडते.

सहमत आहे.

ताबा

भाषा ताब्यात घेणे म्हणजे काय् हे जरा समजावुन सांगु शकाल काय ? विशीष्ट लोकांनी ताब्यात घेतली भाषा म्हणजे काय इतरांना बोलु दिले नाही की काय् त्या भाषेत.

तसे नसेल तर ती भाषा सर्वांची का होऊ शकली नाही याची, या पेक्षा दुसरी पटणारी कोणती कारणे असावीत ?

काही मजकूर संपादित.

- राजस

आणखी एक दुवा

'तिन्ही सांजा सखे मिळाल्या..' सारखे एखादे तरल गाणे आजतागायत मला संस्कृत भाषेत ऐकायला मिळाले नाही..

या संदर्भात आणखी एक रोचक दुवा मिळाला :)
"वास्तविक मला संस्कृत काहीच समजत नाही, पण चाली लावतांना एक गोष्ट मात्र मला वारंवार जाणवत होती की कालिदास हा मनुष्य विलक्षण रसाळ आहे आणि सांगितिकदृष्ट्या विचार केल्यास त्याचं मेघदूत हे काव्य अतिशय गेय आहे!"

----

हम्म्..

हम्म! संस्कृत गाणी बांधणारी अशी काही मोजकी व अपवादात्मक उदाहरणे आहेत, नाही असे नाही! :)

परंतु भाषा जिवंत राहण्याच्या दृष्टीने तिच्यातील गाण्यांचे हे प्रमाण बरेच वाढायला हवे असे मला वाटते..!

आपला,
(कलिदासाचा संगीतकार) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

त्यासाठी

त्यासाठी भाषेची जाण हवी हो. नुसतेच संगीत, ते ही अर्ध शास्त्रीय माहित असुन कसे चालेल? निदान गाणी समजून चाली लावण्या करता तरी. तशी तमीळ गाणी अनेक जण ऐकतातच. ऐकायला काय? संगीततलं काही ही माहित नसलं तरी चालतं.

सहमत..

त्यासाठी भाषेची जाण हवी हो. नुसतेच संगीत, ते ही अर्ध शास्त्रीय माहित असुन कसे चालेल? निदान गाणी समजून चाली लावण्या करता तरी.

सहमत आहे. ज्या मंडळींनी मला मेघदूताला चाली लावण्यास सांगितले होते त्यांच्याकडून मेघदूताच्या ओळींचा अर्थ मला मराठीत समजून घ्यायला लागला होता..!

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

नाहीच----

संस्कृत ही मृत भाषा असूच शकत नाही. ज्या भाषेत एवढे विपुल साहित्य आहे,तिला मृत कसे म्हणता ? आपल्याच दुर्दैवाने ती आज उपेक्षित झाली आहे.बनारसमध्ये आजही तिचा बोलीभाषा म्हणून वापर करणारी मंडळी आहेत.आपल्यासारख्या मातब्बर लोकांनी तिला मानाचे स्थान मिळवून देण्याचा जरूर प्रयत्न केला पाहिजे.

काही मजकूर संपादित. सदस्यांनी आपापसातील संवादासाठी खरडवहीचा वापर करावा - संपादन मंडळ.

नाहीच

वैशाली ताई,
एकदम आवडले. थोर लोकांना भांडु द्यात,[यावर काट कशी मारावयाची हो ? ] मतभेद व्यक्त करू द्यात. तुम्ही सुन्दर
सुभाषितांची रसाळ रसग्रहणे लिहावयास सुरवात करा. जमेल तसे मीही मेघदूत, रघुवंश यातील एकेका पद्यावर
लिहावयाचा प्रयत्न करीन. ध्यानात घ्या, मी रसग्रहण म्हणतो, नुसते भाषांतर नाही. तर कराच सुरवात.
[संस्कृत व्याकरण नाही पण भाषा आवडणारा]
शरद

गेयता

या ओळींमध्ये गेयता आहे का? कृपया जाणकारांनी खुलासा करावा. :)

----

हा हा हा :))

राजेंद्रराव,

व्हिडिओ आवडला. :)

मात्र जयोस्तुतेची भाषा संस्कृत नसून संस्कृतप्रचुर मराठी आहे असे वाटते. जगजीतसिंग, सुरेश वाडकर किंवा अनुराधा पौडवालने गायलेला गायत्रीमंत्र ऐकला आहे का? मस्त आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

ओह

असे आहे होय. बाकी मला गणपतीच्या आरतीनंतरची मंत्रपुष्पांजली ऐकायलाही आवडते. :)

----

सनातनी मत..

जगजीतसिंग, सुरेश वाडकर किंवा अनुराधा पौडवालने गायलेला गायत्रीमंत्र ऐकला आहे का? मस्त आहे.

नक्कीच छान आहे..

नावे घेणे उचित होणार नाही परंतु,

"संस्कृत मंत्रांना चाली वगैरे लावू नयेत, त्यामुळे ते भ्रष्ट होतात व त्यातले पावित्र्य नाहीसे होते..!"

असे सनातनी मत वाडकर, पौडवाल आदींच्या गायत्रीमंत्र गायनावर काही संस्कृत तज्ञांनी केलेले आहे..

आता यावर काय बोलायचं?

असो,

आपला,
(संगीतप्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

चाल म्हणजे काय?

चाल म्हणजे म्हणण्याची पद्धत. कोठे थांबावे, कोठे उच्चार लांबवावा याची माहिती.

"संस्कृत मंत्रांना चाली वगैरे लावू नयेत, त्यामुळे ते भ्रष्ट होतात व त्यातले पावित्र्य नाहीसे होते..!"
असे सनातनी मत वाडकर, पौडवाल आदींच्या गायत्रीमंत्र गायनावर काही संस्कृत तज्ञांनी केलेले आहे..

मंत्र भ्रष्ट होणे म्हणजे काय आणि हे संस्कृत तज्ज्ञ कोण आहेत?

अवांतर-
आमची आगामी स्वाक्षरी:
एखाद्या गाण्याचे रिमिक्स केल्याने मूळ गाणे भ्रष्ट होते असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सनातनी आहात.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

चांगला विषय :)

तात्या,
चर्चा प्रस्तावातील मुद्दे पटणारे आहेत.

संस्कृत ही मृत भाषा समजावी काय? याचे उत्तर होय असेच दिले पाहिजे.
सदरील भाषेत जीवंतपणाचे कोणतेही लक्षण दिसत नाही, हे पटवून सांगतांना आम्ही थकून गेलो आहोत :)

अवांतर : आम्ही वरील विषयाचे प्रातेनिधीक चित्र इथे डकवले आहे. :)

सहमत/ विनंती

आपले मत कळले. खरे म्हणजे मीही आपल्याशी सहमत आहे. कोणतीही भाषा तांत्रिकदृष्ट्या मृत नसली म्हणजे जिवंत आहे असे नाही. पण म्हणून अशा प्रकारचे चित्र टाकून त्याची विटंबना केलीच पाहिजे का, व इतरांच्या भावना दुखावल्याच पाहिजेत का? आपल्या मुद्द्यांचा आदर आहे पण अशा विटंबक चित्रांचा नाही. हे चित्र आपण खरडवहीत डकवले असल्याने ते काढून टाका अशी विनंती करण्याचा खरे म्हणजे अधिकार नाही, पण तरीही विनंती करते.

राधिका

विटंबना

राधिकाताईंशी सहमत आहे.


बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥

सहमत

सहमत आहे. कुठलीही भाषा, तिला तिचे स्वतःचे एक स्वरूप असते, गोडवा असतो. आपल्याला आवडत नाही किंवा रूचत नाही म्हणून तिची विटंबना केलेली पाहून खेद वाटतो. आणि यातून आनंद कसा मिळू शकतो याबद्दल सखेद आश्चर्य वाटते.

----

खेद

मी आताच चित्र पाहिले. एका आदरणीय सदस्याने असले चित्र चिकटवावे याचा मला खेद वाटला. "संस्कृत"च्या जागी मराठी किंवा आपल्याला प्रिय असे दुसरे काही कल्पून पहावे. त्यावेळी आपल्याला होणार्‍या यातना दुसर्‍याना होत असतील याची कल्पना करा. कदाचित चित्र तुम्हालाही काढून टाकावेसे वाटेल.

निषेध

अशा प्रकारचे हिडीस चित्र हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे असे मी मानतो. यावर संपादक मंडळाने योग्य ती कारवाई करावी अशी मी त्यांना विनंती करतो.

----

सहमत

संबंधित व्यक्तीने स्वतःहून ते चित्र काढायला नकार दिला असल्याने, आता संपादक मंडळच काहीतरी करू शकेल अशी आशा आहे
राधिका

हम्म

वरचा राधिकेचा प्रतिसाद बहुतांशी पटला आणि आवडला. पुढे काही लिहीण्याआधी एक गोष्ट कबूल करते - मला संस्कृत येत नाही. काही अंशी समजते पण बोलता किंवा लिहीता येण्याची सवय नाही. (शिकता येणार नाही असे मात्र नव्हे, फक्त त्यासाठी द्यावा लागणारा वेळ आणि उत्साह सध्या माझ्याकडे नाही, एवढेच). ही अशी गत का झाली, तर पुरेसे मार्गदर्शन मिळाले नाही, आणि प्रयत्नांती मिळू शकले असते तरी त्याची गांभीर्याने जाणीव झाली नाही. मला संस्कृत न येत असल्याचा अभिमान बाळगावा असे वाटत नाही. कोणी ती येत असल्याचा गर्व बाळगत असल्यास मला त्याचे आश्चर्य/खंत वाटेल.

भाषा ही विचारांच्या देवाणघेवाणीचे एक साधन आहे. जर का एखादी भाषा शिकण्याची जाणीव तयार करण्यासाठी कोणी प्रयत्न करीत असतील तर ते प्रयत्न व्यर्थ आहेत असे म्हणू नये असे मला वाटते.

मी माझ्या एका प्रोफेसरांच्या पत्नीला मोडी लिपी शिकण्याचे प्रयत्न करतानाही पाहिले आहे. मोडीचा वापर हल्ली आपण कुठे करतो? मग ती का शिकायची? पण काही जुन्या लिखितांसाठी ती शिकणे भाग असावे. आता जाऊ देत ना त्या बासनात गुंडाळून ठेवलेल्या पोथ्या आणि बाडे असे सहज म्हणता येऊ शकते. तसे असले तर संपलेच मग.

मुळात कुठचीही गोष्ट का शिकावी हे समजावे लागते. आणि मला असे वाटते की जे काही वाचले पाहिले आहे त्यावरून संस्कॄत भाषेमध्ये अनेक विषयांवरील विचार झाले असावेत. एखादी स्पॅनिश कविता कोणाला आवडते, ती ते भाषांतरित करतात, आणि आपण ती वाचतो. पण त्यात त्या मूळ भाषेतील सर्वच गोडी जशीच्या तशी असेल असे नाही. तसेच संस्कृतबद्दल वाटते - की मला जर संस्कृत येत असते तर इंग्रजी अनुवादांवर अवलंबून न राहता मला त्या भाषेत मला रस असलेले साहित्य किंवा माहिती वाचता आली असती.

ब्राह्मणी वर्गाने संस्कृत कोणी किंवा कशी शिकावी याचे असह्य नियम करून बाकीच्यांना वंचित केले, जातीपातींमधील भेद वाढवण्यासाठी उपयोग केला असे ऐकले आहे. पण आजही ही उदाहरणे प्रगत समाजात वेगळ्या पद्धतींनी पहायला मिळतात. जेव्हा प्रगत समाजातील काही गटांना स्वतःच्या भविष्याची काळजी वाटते, किंवा फारशी स्पर्धा नको असते तेव्हा ते अशा ज्ञानाच्या नाड्या आवळून ठेवतात किंवा गटबाजी करतात असे दिसून येते. पण त्याचा परिणाम म्हणून ते गटच पुढे नाश पावतात किंवा ज्ञानाची वाढ होत नाही असे दिसते. त्यामुळेच संस्कृत भाषा मृतप्राय झाली असावी. पण आता जेव्हा जाती आणि इतर बंधनांच्या जाचकपणाची जाणीव झालेली आहे अशा काळात भाषेसाठी म्हणून भाषा शिकली तर ती भाषा म्हणून परत उदयाला येऊ शकते. त्याबरोबर समाजातील विशिष्ट वर्गच पुन्हा इतरांवर कुरघोडी करेल असे समजणे हे योग्य नाही. याचा अर्थ सर्वजण मुळात अविश्वासानेच एकमेकांकडे पाहत आहेत असा आहे. इतकेच नव्हे तर या विशिष्ट वर्गाखेरीज इतरांच्या बुद्धीचीही अवहेलना, त्यांच्या ह्या भाषा शिकण्याच्या सामर्थ्याची अवहेलना करीत आहोत असा आहे. भाषेच्या "शुद्धत्वामुळे" या वर्गाची मक्तेदारी संस्कृतवर आणि इतर वर्गांवर पुन्हा प्रस्थापित होईल अशी भिती बाळगण्याचे कारण नाही. ती भानगड इंग्लिशने सध्यातरी मोडीत काढली आहे. आणि संस्कृत ही अनेकांची मुख्य भाषा होईल असे मला तरी वाटत नाही.

अवांतर -मी कॉलेजात असताना इंग्रजी गाणी ऐकणार्‍यांचा एक खास वर्ग म्हणून होता. ते त्या गाण्यांवरून आपापसात चर्चा करीत, बाकीचे सर्व किशोरकुमार आणि लता -आशांवर जगणारे! इंग्रजी /पाश्चिमात्य गाणी ऐकणार्‍यांच्या गटातील अर्धे गायक आणि गायिका दुसर्‍या गटातील मुलांच्या गावीही नसत. आणि यामुळे एक प्रकारचा विशिष्ट न्यूनगंड तयार होई! यातून मी काही गाणी ऐकली, शिकले इत्यादी. आज मला दोन्ही प्रकारची गाणी आवडतात, आणि मी त्यांचा आनंद घेऊ शकते हा माझा फायदाच झाला आहे, तोटा नाही. ते हे लोक काय भिकार ऐकतात, असे म्हटले असते तर मी एका वेगळ्या आनंदाला मुकले असते. त्याचबरोबर ज्या मुलांचा रस हा गाण्यापेक्षा त्या बाबतीत असलेल्या अहंगंडाकडे झुकणारा, गटबाजी करणारा होता ते हिंदी गाण्यांतील कितीतरी सुरेख गाण्यांचा आस्वाद घेण्यापासून मुकले. असो.

क्या बात है !!!


ब्राह्मणी वर्गाने संस्कृत कोणी किंवा कशी शिकावी याचे असह्य नियम करून बाकीच्यांना वंचित केले, जातीपातींमधील भेद वाढवण्यासाठी उपयोग केला असे ऐकले आहे. पण आजही ही उदाहरणे प्रगत समाजात वेगळ्या पद्धतींनी पहायला मिळतात. जेव्हा प्रगत समाजातील काही गटांना स्वतःच्या भविष्याची काळजी वाटते, किंवा फारशी स्पर्धा नको असते तेव्हा ते अशा ज्ञानाच्या नाड्या आवळून ठेवतात किंवा गटबाजी करतात असे दिसून येते. पण त्याचा परिणाम म्हणून ते गटच पुढे नाश पावतात किंवा ज्ञानाची वाढ होत नाही असे दिसते. त्यामुळेच संस्कृत भाषा मृतप्राय झाली असावी.


शब्दाशब्दाशी सहमत आहे. प्रतिसाद आवडला.

सहमती

राधिका, प्रियाली, चित्रा यांच्याशी सहमत.

काही बाबतीत तात्यांशीही सहमती असल्यामुळे अन्यत्र लिहिलेला प्रतिसाद येथे चिकटवत आहे:

१) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर.

(येथे व्यवहार म्हणजे माणसा-माणसांतला व्यवहार असे गृहीत धरले आहे.) बहुतेक होत नसावा. कर्नाटकात मठूर नावाचे अग्रहार आहे (खेडे), तिथे दैनंदिन बोलचालीसाठी संस्कृतचा व्यवहार होतो, असे ऐकून आहे.

२) बोलीभाषेतील तिचे स्वरूप. जसे मराठीबाबत सांगायचे तर कोकणी, मालवणी, आगरी, खास कोल्हापुरी ढंगाची, माणदेशी इत्यादी.
संस्कृतच्या अनेक प्रादेशिक बोलीभाषा होत्या - पूर्वेकडची आणि पश्चिमेकडची या महत्त्वाच्या. (त्या आज त्या प्रदेशांत प्रचलित नाहीत - पण तसे म्हणणे म्हणजे प्रश्न-उत्तर १ची पुनरावृत्ती होय. येथे तात्यांना पुनरावृत्ती अपेक्षित नसावी, म्हणून वेगळे उत्तर दिलेले आहे.)

३) त्या भाषेत होणारी नवनिर्मिती. जसे कथा, कांदंबर्‍या, कविता, नाटके, चित्रपट, इत्यादी..

फारशी होत नाही. पण काही थोडे लोक नवनिर्मिती करत असावेत. उदाहरणार्थ मिसळपावावरचे अशोक गोडबोले सर.

हा प्रश्न भाकड आहे असे मला का वाटते :
१.अ. व्यवहार हा माणसा-माणसांतच असतो, याबाबत काही लोकांचे मत माझ्यावेगळे असू शकते. काही लोकांच्या मते मनुष्य आणि त्यांचे आराध्यदैवत यांच्यातही दैनंदिन व्यवहार होत असतो. (माझ्या बाबतीत असा होत नाही, आणि संस्कृतात कुठलाच व्यवहार होत नाही.) पण दुसर्‍या कोणी म्हटले की त्यांचा आराध्य दैवताशी दैनंदिन व्यवहार होतो, आणि तो संस्कृतात होतो, तर त्यांचे आंतरिक मत मी मानलेच पाहिजे. तात्यांनी अन्यत्र लोकांच्या श्रद्धेला मनापासून पाठिंबा दिला आहे. ज्या लोकांची श्रद्धा आहे की ते त्यांच्या आराध्य दैवताशी संस्कृतात दैनंदिन व्यवहार करतात, त्यांच्या श्रद्धेला खोटे म्हणून नेमके काय साध्य होणार आहे. म्हणून मला हा प्रश्न भाकड वाटतो.
१.आ. समजा मठूर खेड्यात पोरे-सोरे-बाप्ये-बाया सर्वच दररोज संस्कृतात बोलत असतील - असतील शे-पन्नास लोक. भाषा "जिवंत" ठरवण्यासाठी असा कुठला आकड्याचा निकष आहे काय - म्हणजे कमीत कमी १ लाख बोलणारे हवेत... असा कुठला निकष नसला तर हा प्रश्न भाकड आहे.

२. बोलीभाषेतले तिचे स्वरूप आहे की नाही ते ठरवायला मला वेळ आहे का? मठूरमधले म्हातारे-कोतारे कदाचित पोरा-सोरांपेक्षा वेगळे बोलत असतील. मला तो शोध करायला वेळ नाही. मिसळपावावर बहुतेक लोकांना तितका वेळ नसणार. म्हणून हा प्रश्न भाकड आहे.

३. नवनिर्मिती.
समजा मिसळपावावरचे एक गोडबोले सर संस्कृतात नवनिर्मिती करतात. भाषा "जिवंत" ठरवण्यासाठी असा कुठला आकड्याचा निकष आहे काय - म्हणजे कमीत कमी १ हजार नवनिर्मिती करणारे हवेत... असा कुठला निकष नसला तर हा प्रश्न भाकड आहे.
»

धार्मिक भाषा

चांगला मुद्दा आहे. मुंजीपासून श्राद्ध आणि लग्नापर्यंत सर्व धार्मिक कार्यांमध्ये भटजीबोवा संस्कृत वापरतात. प्रश्न भाकड आहे याच्याशी सहमत आहे.

----

शंका..

मुंजीपासून श्राद्ध आणि लग्नापर्यंत सर्व धार्मिक कार्यांमध्ये भटजीबोवा संस्कृत वापरतात.

ते संस्कृत खुद्द त्या भटजींना तरी कळतं किंवा नाही, याबाबत माझ्या मनात शंका आहे! :)
त्या त्या समारंभाला उपस्थितांची तर ते कळण्याबाबत बातच सोडा..!

एनीवेज, भटजीमंडळी मुंजी, श्राद्ध आदींचे विधी संस्कृतमध्येच करतात हेच जर संस्कृतच्या जिवंतपणाचे समर्थन असेल तर मग प्रश्नच मिटला!

असो,

आपला,
(घोकंपट्टी करून दशग्रंथी झालेला, टॅक्स भरण्याची विवंचना नसलेला, एक मोबाईलधारी भिक्षूक!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

समर्थन

भटजीमंडळी मुंजी, श्राद्ध आदींचे विधी संस्कृतमध्येच करतात हेच जर संस्कृतच्या जिवंतपणाचे समर्थन असेल तर मग प्रश्नच मिटला!

असे समर्थन माझ्या प्रतिसादात मला तरी आढळले नाही. संस्कृत कुठे वापरतात या प्रश्नाचे ते साधे उत्तर आहे. :)

----

ठीक..

संस्कृत कुठे वापरतात या प्रश्नाचे ते साधे उत्तर आहे.

हम्म! या प्रश्नाचे 'भटजी लोक संस्कृत वापरतात..!' हेच जर उत्तर असेल तर ठीक! मी आपल्याशी सहमत आहे..

आपला,
(आठ आठ दिवस धोतर न धुतलेला कळकट्ट भटजी!) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

प्रतिसाद

संस्कृत मृत आहे अथवा मृत होणार आहे हा मुद्दा माझ्या मते कमी महत्त्वाचा आहे. ग्रीक , ल्याटीन , संस्कृत या भाषांमधे उत्तमोत्तम ग्रंथ, ज्ञानाची भांडारे , काव्ये, नाटके रचलेली आहेत. शतकानुशतके ज्या संस्कृती नांदल्या त्यांनी एकवटलेले ज्ञान हे सर्व जतन करून ठेवण्याजोगे आहे. संस्कृत भाषा भारती यासारख्या संस्था , संस्कृत दिनासारखे उपक्रम हे सगळे त्यामुळे महत्त्वाचे आहे असे मला वाटते.

भाषा मृत आहे , आउटडेटेड आहे (मराठी शब्द ? ) हे सगळे मुद्दे ठीक आहेत. प्रश्न शिल्लक रहातो (आणि जो माझ्या मते जास्त महत्त्वाचा आहे ) तो असा की, जे आहे ते जतन करण्याच्या दृष्टीने, जास्त जास्त लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवावे का ? अशा चळवळी चालू ठेवाव्यात की नाही ? कुणी अशा चळवळी चालू ठेवत असेल तर त्याला आपण होता होईल तितपत मदत करावी की नाही ? माझ्या मते या सगळ्याची उत्तरे "होय" अशीच आहेत.

या बाबतीतला अजून एक मुद्दा भाषांतराचा. ग्रीक काव्य आणि नाटकांचे उदाहरण घेऊ. सोफोक्लिस ची नाटके, प्लेटोचे तत्वज्ञान, होमरची काव्ये या सार्‍या गोष्टी प्रयत्न आणि कष्ट घेऊन अनेकानेक विद्वानांनी इंग्रजीत आणल्या. म्हणूनच आजही त्याचा अभ्यास होतो, हे सारे जिवंत राहिले. असे संस्कृतच्या बाबतीत कितपत झाले आहे याची मला माहिती नाही. पण ही प्रक्रिया चालू रहायला हवी.

 
^ वर