संस्कृत ही मृत भाषा समजावी काय?

राम राम मंडळी,

कुठल्याही जिवंत भाषेची आपल्याला सर्वसाधारणपणे खालील लक्षणे सांगता येतील..

१) व्यवहारात तिचा नित्यनियमित वापर.
२) बोलीभाषेतील तिचे स्वरूप. जसे मराठीबाबत सांगायचे तर कोकणी, मालवणी, आगरी, खास कोल्हापुरी ढंगाची, माणदेशी इत्यादी.
३) त्या भाषेत होणारी नवनिर्मिती. जसे कथा, कांदंबर्‍या, कविता, नाटके, चित्रपट, इत्यादी..

या पार्श्वभूमीवर आजच्या घडीला संस्कृत भाषा मला कुठेच दिसत नाही... या बाबतीत वरील मुद्द्यांचा खालीलप्रमाणे उहापोह करता येईल..

१) आज व्यवहारात संस्कृत भाषेचा मला कुठेच वापर होतांना दिसत नाही.. संस्कृत ही भारतीय भाषा आहे. परंतु भारतातल्या मुंबई, दिल्ली, कलकत्ता, लखनऊ, हैद्राबाद, जयपूर, कोल्हापूर, इत्यादी अनेक शहरातून मी वावरलो आहे परंतु आजतागायत मला यापैकी कुठल्याही ठिकाणी संस्कृत भाषेचा रोजच्या दैनंदिन व्यवहारात उपयोग होतांना आढळला नाही. असे का बरे?

२) बोलीभाषा हे माझ्या मते कुठल्याही भाषेचे एक वेगळेच सौंदर्य आहे. तिचा स्वत:चा असा एक खास ढंग आहे, गोडवा आहे. सर्वसाधारण, सामान्य माणसाला भाषेचा बोलीभाषा हा प्रकार वापरायला खूप बरा पडतो. कारण तिथे भाषेचे नियम, व्याकरणाचे नियम आपोआपच थोडे शिथिल झालेले असतात. जसा प्रान्त असतो तशी बोलीभाषा असते. एवढेच नव्हे, तर मुख्य भाषेप्रमाणेच बोलीभाषेतही खूप चांगली निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळेल! जसे एखाद्या चित्रपटातले बोलीभाषेतील गावरान संवाद, गं साजणी..कुन्न्या गावाची.. या सारखी काही फक्कड गाणी इत्यादी..

संस्कृतमध्ये बोलीभाषा हा प्रकार आहे का? असल्यास सर्रास आहे का? नसल्यास बोलीभाषा या भाषेचे सौंदर्य वाढवणार्‍या प्रकाराला संस्कृत भाषा पारखी कशी राहिली? काय कारणे असावीत?

३) आपल्या मायमराठीचे उदाहरण घ्यायचे झाले तर अगदी आजच्या घडीलाही मराठीमध्ये उत्तमोत्तम साहित्य निर्मिती होत आहे. मराठी भाषेत, किंवा हिंदी भाषेत अनेक मंडळी उत्तमोत्तम कथा, कादंबर्‍या, काव्य, गाणी, नाटके, चित्रपट इत्यादींची निर्मिती करत आहेत. आजच्या घडीला संस्कृत भाषेत मला एकही चित्रपट अथवा नाटक पाहायला मिळत नाही. 'तिन्ही सांजा सखे मिळाल्या..' सारखे एखादे तरल गाणे आजतागायत मला संस्कृत भाषेत ऐकायला मिळाले नाही..

का बरे असे?

आजच्या घडीला मला मराठी, हिंदी, इंग्रजी, तमिळ, गुजराथी, तेलूगू, कन्नड, उर्दू, इत्यादी वर्तमानपत्रे अगदी सर्रास पाहायला मिळतात, जी समाजाचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आरसा समजली जातात. अगदी सामान्यातला सामान्य माणूस ही वर्तमानपत्रे वाचत असतो व त्याद्वारे तो स्वत:ला जगाशी जोडून ठेवतो. परंतु एखादे बर्‍यापैकी खप असलेले संस्कृत वृत्तपत्र आहे आणि जे समाजात वाचले जात आहे असे चित्र मला तरी आजतागायत कुठेही दिसले नाही! का बरे असे?

आणि मग या सर्व पार्श्वभूमीवर संस्कृत ही आजच्या घडीला केवळ एक मृतभाषा आहे असे म्हटले तर ते माझ्या मते वावगे ठरू नये! आपले मत काय? वर उल्लेख केलेल्या मुद्द्यांची कुणी मुद्देसूद कारणमिमांसा करेल का?

बहोत बहोत मेहेरबानी..

कळावे,

आपला,
-- तात्या अभ्यंकर.

लेखनविषय: दुवे:

Comments

विरोधाभास

चर्चा परत वाचताना एक प्रचंड विरोधाभास जाणवला. मराठी संकेतस्थळांवर 'मराठी असे आमुची मायबोली' वगैरे शब्दांमध्ये रोज मराठीसाठी अलका कुबल, आशा काळे आणि निरूपा रॉय तिघि मिळून जितके ढाळणार नाहीत तितके अश्रू ढाळले जातात. मराठी जर आई मानली तर संस्कृत तिची आई म्हणजे आजी झाली. आजीचं आता वय झालय, तिची उठबस जरा कमीच असते. पण तिने कितीतरी जास्त पावसाळे पाहिले आहेत. तिच्याकडे अनुभवांचा मोठ्ठा खजिना आहे आणि विचारले तर ती प्रेमाने छान छान गोष्टीदेखील सांगते. अशी आजी जर घरात असेल तर केवळ रोजच्या व्यवहारात तिचा उपयोग नाही म्हणून लगेच दर दिवशी 'गेली का हो आजी' म्हणून तिचे थडगे बांधायच्या तयारीला लागायचे की मायेने तिची जपणूक करायची?

संस्कृतप्रमाणेच लॅटीनही तितकीच जुनी आहे आणि ही फ्रेंच, इटालियन, स्पॅनिश, रोमानियन आणि पोर्तुगिझ या रोमान्स भाषांची जननी आहे. ती संस्कृतपेक्षाही कमी वापरली जाते आणि तिचे व्याकरण संस्कृतपेक्षा कितीतरी कठीण आहे. तरीही आजतागायत मला एकही फ्रेंच किंवा इटालियन माणूस लॅटीनविषयी अनुद्गार काढताना आढळला नाही. उलट लॅटीन शिकणार्‍यांचे प्रमाण वाढते आहे. हा करंटेपणा आपल्यामध्येच का आला हे तो दयाघन प्रभूच जाणे. इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया. आणि मग आपण भारतीय संस्कृती बुडाली वगैरेच्या गप्पा का माराव्यात? संस्कृती म्हणजे वेगळे काय असते? आपल्या पूर्वजांचे साहित्य, त्यांचे ग्रंथ, त्यांची भाषा ही आपली संस्कृती आहे. आपल्याकडे काय चांगले आहे हे ओळखायचीसुद्धा आपली कुवत नाही याचा खेद वाटतो.
----

लॅटीन भाषा

तरीही आजतागायत मला एकही फ्रेंच किंवा इटालियन माणूस लॅटीनविषयी अनुद्गार काढताना आढळला नाही. उलट लॅटीन शिकणार्‍यांचे प्रमाण वाढते आहे. हा करंटेपणा आपल्यामध्येच का आला हे तो दयाघन प्रभूच जाणे. इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया.

माझा प्रश्न विषयाला धरून नसेल पण मला माहिती हवीशी वाटली म्हणून विचारतो. इतरांनाही माहिती उपयोगाची ठरेल - फ्रेंचांनी इटालियनांना किंवा जर्मनांनी स्पॅनिशांना लॅटीन भाषा शिकायला मज्जाव केला होता का कधी? स्पॅनिश किंवा फ्रेंच लोकांत समाजाचे वर्ग आहेत का? असल्यास काही लोकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं होतं का? तसं झालं असल्यास युरोपीयन लोकांना लॅटीनचा दुस्वास का वाटत नाही हा अभ्यासाचा विषय आहे. आपण सर्वांनी त्यांच्याकडून शिकायला हवं.

- राजीव.

समाधान...

चला! या निमित्ताने एक चांगला वैचारिक उहापोह वाचायला मिळाला याचे मला समाधान आहे! :)

आपला,
(संस्कृतप्रेमी) तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

अवांतर - दया..!

संस्कृत भाषा जगासि कळेना
म्हणोनी नारायणा दया आली हो,
देवाजीने परि घेतला अवतार
म्हणती ज्ञानेश्वर तयालागी हो!

असे एक गाणे पूर्वी मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता सुरू व्हायचे तेव्हा सुरवातीला दाखवत/ऐकवत असत. पडद्यावर वरील अक्षरे दाखवायचे आणि कुणी एक भला गायक हे पार्श्वगायन करायचा, याची या निमित्ताने आठवण झाली..

असो,

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

संस्कृत आणि विशिष्ट वर्ग

संस्कृत भाषेला विशिष्ट वर्गाने आपल्या ताब्यात ठेवल्यामुळे तिच्या र्‍हासाला सुरुवात झाली असावी हे खरे असले तर हे ही खरेच आहे की विशिष्ट वर्गाने फक्त संस्कृतच नाही तर सगळेच शिक्षण / विद्या / ज्ञान आपल्या ताब्यात ठेवले होते - यात वैद्यकशास्त्र / गणित / भाषा / व्याकरण / राज्यशास्त्र वगैरे सगळेच येते (या विशिष्ट वर्गातून लोकमान्य टिळक / विष्णुशास्त्री चिपळूणकर / महर्षी कर्वे / आगरकर / साने गुरुजी वगैरे फुटकळ अपवाद सोडून द्यावेत).
पण फक्त संस्कॄतबद्दलच घृणा निर्माण का झाली असावी ? कदाचित या भाषेचे क्लिष्ट व्याकरण हे एकमेव कारण असावे.
आज (गेल्या कित्येक दशकांपासून - किमान) शिक्षण ही तरी विशिष्ट वर्गाची मक्तेदारी राहिलेली नाही, म्हणजे कोणीही व्यक्ती स्वतःला हव्या त्या विषयाचा अभ्यास करू शकते. त्यासाठी हवी असलेली साधने अगदी सहजपणे उपलब्ध नसली तरी अप्राप्यही नाहीत (सन्माननीय उदाहरण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती शंकरराव जगताप हे जगन्नाथ शंकरशेठ शिष्यवृत्ती विजेते होते. आणखी अनेक उदाहरणे मला जवळून माहीत आहेत - पण ते शंकररावांइतके प्रसिद्ध नसल्याने इथे देत नाही ).
इतर विषय शिकण्याबद्दल जशी सर्वांना आवड असते तशी संस्कृतबद्दल नाही इतकेच. (बाकी विषय) शिकण्यापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून आरक्षणाची सोयही घटनेने दिलेली आहेच.
सारांश - संस्कृतविषयीचा तिटकार्‍याचा विशिष्ट वर्गाच्या मक्तेदारीशी संबंध जोडला जाऊ नये.

अवांतर - भविष्यात जर आयुर्वेद हा ऍलोपथीसारखा जगन्मान्य झाला तर त्याच्या अभ्यासासाठीतरी किमान सर्वजण त्यांना संस्कृतविषयी वाटणारी किळस टाकून देतील असे वाटते. (किंबहुना त्या कॉलेजमध्ये प्रवेशासाठी आरक्षणाची मागणीही होऊ शकेल). अशीच दुसरी (जवळजवळ अशक्य असलेली) गोष्ट म्हणजे संस्कृतचा संगणक प्रणालींसाठी वापर होऊ लागला तर तिथेही :)

आणखी एक म्हणजे "संस्कृत भाषा जगासि कळेना" हेही खरेच होते. आणि त्यावर उपायही केला होता तो संत ज्ञानेश्वरांनी. (आता सध्याच्या फॅशनप्रमाणे हा इतिहासही बदलला जाणार असेल तर बोलणेच खुंटले.)

अमित

सहमत..

अमितराव,

आम्ही आपल्याशी बरेचसे सहमत आहोत...

तात्या.

न लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा!

संस्कृत भाषा

अवकाशमित्र
संस्कृत भाषा अत्यंत लवचिक असल्याने पाणिनिय सूत्रांवरून स्फुर्ति घेऊन सिंगापुरमध्ये तमिळ भाषिक भारतीय गेली १०-१२ वर्षे संगणक आज्ञावली संस्कृत भाषा वापरून कशी लिहीता येइल याचा अभ्यास आणि प्रयत्न करीत आहेत. आवाज ओळखून काम करणार्‍या संगणकाला वापरून संस्कृत ऋचांच्या स्वरूपात आज्ञावली लिहिण्याचा प्रयत्न चालू आहे. वेळ लागेल पण होउ शकेल.

 
^ वर