आषाढस्य प्रथम दिवसे..

II स्वरभास्कर पं भीमसेन जोशी प्रसन्न II

राम राम मडळी,

ठाण्यातील 'संस्कृत स्थानम्' या संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार करणार्‍या संस्थेने रविवार दि १५ जुलै, २००७ रोजी संध्याकाळी ८.३० वाजता कालिदास दिनाचा मुहूर्त साधून 'आषाढस्य प्रथम दिवसे' हा कार्यक्रम आयोजित केला आहे.

महाकवी कालिदासाच्या 'मेघदूत' या साहित्यकृतीवर आधारित हा कार्यक्रम असून त्या अंतर्गत मेघदुतातील काही श्लोकांचे निरुपण आणि गायन होणार आहे. तसेच नृत्यातील काही भावमुद्रांचेही सादरीकरण होणार आहे. याबद्दलची अधिक माहिती खालीलप्रमाणे -


आषाढस्य प्रथम दिवसे..

१) मेघदुतातील काही निवडक श्लोकांचे निरुपण - संस्कृत विदुषी सौ धनश्री लेले.

२) गायन - अभिजात संगीत गायिका सौ वरदा गोडबोले.

३) श्लोकानुरुप भरतनाट्यममधील भावमुद्रा - नृत्यांगना निलिमा कढे.

४) संगीत - तात्या अभ्यंकर

५) संपूर्ण कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि सूत्रधार - तात्या अभ्यंकर.

कार्यक्रम स्थळ - गडकरी रंगायतन, ठाणे.
दिनांक व वेळ - १५ जुलै २००७, रात्रौ ८.३० वा.
प्रायोजक - पितांबरी प्रॉडक्टस प्रा लि

१५ जुलै रोजी कालिदास दिनही आहे आणि योगायोगाने आषाढाचा पहिला दिवसही आहे!

सर्व इच्छुक उपक्रमींनी सदर कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे ही विनंती.

कालिदसमहाराजांच्या ओळींना हिंदुस्थानी रागसंगीतावर आधारित स्वरसाज चढवायला मिळाला, ही मी माझ्या भाग्याची गोष्ट समजतो.

धन्यवाद!

आपला,
तात्या अभ्यंकर,
प्रसारक व प्रचारक,
हिंदुस्थानी रागदारी संगीत.

लेखनविषय: दुवे:

Comments

हार्दिक शुभेच्छा

तात्या,
कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा.

- योगेश

हार्दिक शुभेच्छा

कार्यक्रम यशस्वी होवो हीच शुभेच्छा!
सन्जोप राव

हार्दिक शुभेच्छा

तात्या,
कार्यक्रमासाठी माझ्याही हार्दिक शुभेच्छा !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या, एक जबाबदारी टाकतोय..

आम्हाला तर काय यायला जमणार नाय. कार्यक्रमाचे चित्र-ध्वनीमुद्रण करून सीडी बनवा. एम्.पी.४ करून जालावर द्या. तुमची जबाबदारी हां. बघा बुवा.

असेच...

तात्या - वाचून आनंद झाला. शुभेच्छा!

शुभेच्छा

तात्या, कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा.

[अवांतर - "१५ जुलै रोजी कालिदास दिनही आहे आणि योगायोगाने आषाढाचा पहिला दिवसही आहे!". हे वाक्य गंमतीत लिहिले नाही, असे धरून चालतो. पण 'आषाढस्य प्रथम दिवसे...' या ओळीमुळेच आषाढाचा पहिला दिवस 'कालिदास दिन' म्हणून साजरा करतात. असो, छिद्रान्वेषीपणाबद्दल क्षमस्व.]

धत तेरेकी..:)

आषाढाचा पहिला दिवस 'कालिदास दिन' म्हणून साजरा करतात.

धत तेरीकी, ही गोष्ट तर मला माहितीच नव्हती! :)

मला एकंदरीतच संस्कृत भाषा आणि तिच्याशी निगडीत इतर गोष्टींची फार कमी माहिती आहे नंदनशेठ. त्या संस्थेतली मंडळी मला ऍप्रोच झाली आणि मी चाली लावायचं कबूल केलं इतकंच.

मला 'संगीत' ह्या सातच अक्षरं असलेल्या भाषेबद्दल थोडीफार माहिती आहे एवढंच फक्त अभिमानाने सांगू इच्छितो! :)

तेव्हा नंदनशेठ, "Music is the Universal Language" आणि आम्हाला तरी तीच भाषा बरी वाटते. बोलीभाषेत वापरा, प्रमाणभाषेत वापरा, शुद्धलेखनाचे नियम पाळा, किंवा पाळू नका, तरीही ती भाषा गोडच वाटते, हृदयाला हात घालते आणि कुठल्याही संवेदनशील आणि सहृदय माणसाला आवडते. एवढंच काय तर झाडाफुलांना, वृक्षवेलींनाही आवडते!

काय, खरं की नाही नदनशेठ? :)

बाय द वे नंदनशेठ,

कवी : कालिदास
संगीत : तात्या!

ही जोडी मस्त वाटते की नाही! :)

छ्या बुवा, कठीण आहे त्या कालिदासाचं! त्याला जर आधी माहिती असतं की तात्या आपल्या मेघदूताला चाली लावणार आहे तर त्याने मेघदूत लिहायची आइडियाच कॅन्सल केली असती! :))

असो! नंदन, तुला मी या कार्यक्रमाची सीडी इथे आलास की नक्की देईन. यमन, बागेश्री, कौशीकानडा, गौडमल्हार, नंद, भीमपलास, शुद्धसारंग, हमीर इत्यादी रागांनी तुझ्या कालिदासाला सजवायचा, नटवायचा प्रयत्न मी माझ्याकडून केला आहे! कितपत जमलंय ते तूच ठरव! ;)

नंदनशेठ, वास्तविक मला संस्कृत काहीच समजत नाही, पण चाली लावतांना एक गोष्ट मात्र मला वारंवार जाणवत होती की कालिदास हा मनुष्य विलक्षण रसाळ आहे आणि सांगितिकदृष्ट्या विचार केल्यास त्याचं मेघदूत हे काव्य अतिशय गेय आहे!

असो, जय कालिदास!

आपला,
(कालिदासाचा आणि अण्णांचा!) तात्या.

कार्यक्रम चांगला होवू देत!

तात्या,
कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा!

आशा आहे कार्यक्रम तबकडीवर आणण्यासाठीची सर्व सोय आपण आधीच केली असेल!
आपला
गुंडोपंत

छान

कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा

माझ्याही

वेळ मिळाला तर टाकतो चक्कर.

- राजीव.

अवश्य!

वेळ मिळाला तर टाकतो चक्कर.

अवश्य टाका..

तात्या.

कालीदास महोत्सव

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

श्री.तात्या यांसी सप्रेम नमस्कार.
कवी : कालिदास
संगीत : तात्या
या कर्यक्रमाला उपस्थित राहून श्रवणसुख अनुभवता आले असते तर मला अतीव आनंद झाला असता. तात्या, आपल्या या कार्यक्रमाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा ! संगीत तुमचे आहेच. पण कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि सूत्र संचलन सुद्धा तुमचेच आहे. नि:संशय तात्या ग्रेटच आहेत!

शुभेच्छा

तात्या

कार्यक्रमाला शुभेच्छा!

जाता जाता - कालिदासाची रास कन्या असावी. १५ जुलैला शनि सिंहेत प्रवेश करतो आहे आणि कन्या राशीची साडेसाती सुरू होते आहे म्हणून विचारले.

विनायक

क्लासिक वन! :)

जाता जाता - कालिदासाची रास कन्या असावी. १५ जुलैला शनि सिंहेत प्रवेश करतो आहे आणि कन्या राशीची साडेसाती सुरू होते आहे म्हणून विचारले.

दॅट वॉज क्लासिक वन! :)

शुभेच्छांबद्दल धन्यवाद विनायकराव. आपण उभयता कार्यक्रमाला उपस्थित राहू शकला असतात तर मला अतिशय आनंद वाटला असता..

तात्या.

किंवा शालजोडीतला

:-)
अभिजित..

आभार../वालावलकरशेठ,

शुभेच्छांकरता सर्वांचे आभार..

जे कार्यक्रमाला येऊ शकणार नाहीत त्यांच्याकरता काही चाली मी जालावर चढवून इथे त्यावर लिहीनच.

वालावलकरशेठ,

तात्या, आपल्या या कार्यक्रमाला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा ! संगीत तुमचे आहेच. पण कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि सूत्र संचलन सुद्धा तुमचेच आहे. नि:संशय तात्या ग्रेटच आहेत!

शुभेच्छांबद्दल मनापासून आभार. कार्यक्रमाचे दिग्दर्शन माझे असेल परंतु सूत्रसंचालन मात्र धनश्रीच करणार आहे. कार्यक्रमाची निर्मिती मात्र संपूर्णतः माझी आहे.

नि:संशय तात्या ग्रेटच आहेत!

हे आपण उपहासाने लिहिले नसावे असे मी मानतो! :),

किंवा कदाचित आपण दोघे एकाच जिल्ह्यातले असल्यामुळे आपण माझे जरा जास्तच कौतुक केले आहे असेही म्हणता येईल! :)

असो, परंतु आपल्यासारख्या भाषाप्रभू, आणि व्यासांगी व्यक्तिमत्वाने मला ग्रेट म्हणावे हा मी माझा सन्मान समजतो!

धन्यवाद...

तात्या अभ्यंकर.

शुभेच्छा

अरे वा, कार्यक्रम एकूण चांगलाच रंगणार असं दिसतंय. पण रात्री ८.३० ला ठेवलात. :( मला कसं यायला जमेल? :( असो, इथूनच तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा!
राधिका

धन्यवाद..

आपण आला असतात तर नक्कीच जास्त आनंद झाला असता कारण आपणही एक संस्कृतविदुषी आहात. परंतु रात्रीची वेळ असल्यामुळे जास्त आग्रह करत नाही. आपण कधी प्रत्यक्ष भेटलो तर सदर कार्यक्रमाची तबकडी आपल्याला जरूर देईन..

आपला,
(कालिदासाचा संगीतकार) तात्या.

वावा..

तात्या,
कार्यक्रमासाठी शुभेच्छा!
स्वाती

शुभेच्छा!

उशीर झाला, पण तरीही - कार्यक्रमासाठी शुभेच्छा

- दिगम्भा

धन्यवाद,

स्वाती आणि दिगम्भा,

धन्यवाद..

तात्या.

पराडकर साहेब,

संस्कृत पंडित पराडकर साहेब कार्यक्रमाला येणार आहेत. अर्थात, वयपरत्वे त्यांना कितपत जमेल ही शंकाच आहे.

पं भाई गायतोंडे, पद्मश्री डॉ एन राजम आणि ठाण्या-मुंबईतले संस्कृत व संगीत क्षेत्रातील इतरही काही मान्यवर सदर कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

वरील मान्यवरांनी कार्यक्रमाला आवर्जून येण्याचे मान्य केले आहे हा मी माझा सन्मान समजतो!

सर्व उपक्रमींना कार्यक्रमाचे पुन्हा एकदा आमंत्रण!

आपला
तात्या अभ्यंकर.

मेघदूत : कालिदास

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आषाढाचा पहिला दिवस. आज तात्यांचा कर्यक्रम. ते संगीत दिग्दर्शक तसेच सूत्रधारही आहेत्. आपण त्यांना शुभेच्छा देऊन सुयश चिंतिलेच आहे.
मेघदूताचा परिचय बहुतेकांना आहे.एका यक्षाकडून अपराध घडला. त्याचा स्वामी कुबेर याने त्याला रामगिरी आश्रमात वर्षभर एकटे रहाण्याची शिक्षा दिली.प्रिय पत्नीचा असा दीर्घकाळ विरह यक्षाला असह्य.आषाढाच्या पहिल्या दिवशी त्याला पर्वत शिखरावर उतरलेला मेघ दिसला.त्या मेघाकरवी पत्नीला निरोप. रामगिरी ते कैलास कोणत्या मार्गे जायचे, वाटेत काय दिसेल याचे कथन म्हणजे मेघदूत काव्य.
मेघदूताची मराठीत अनेक भाषांतरे झाली. चिंतामणराव देशमुख (सी.डी) यांचेही समवृत्त भाषांतर आहे. त्यातील पहिली दोन कडवी आणि मूळ मेघदूतातील दुसरे कडवे पुढील प्रमाणे.:

................................................................................................................................

एका यक्षाकडुनि घडला आत्मकार्यात दोष |
वर्षान्त-स्त्री-विरह-जड दे शाप त्याला धनेश|
त्याने लुप्तप्रभ वसत तो रामगिर्याश्रमात |
सीतास्नाने उदक जिथले पूत, झाडी निवान्त |१|
*
प्रेमी कान्ताविरहि अचलीं घालवी मास काही|
गेले खाली सरुनि वलय स्वर्ण हस्तीं न राही|
आषाढाच्या प्रथम दिनि तो मेघ शैलाग्रिं पाहे|
दन्ताघातें तटिं गज कुणी भव्यसा खेळताहे|२|

*
तस्मिन् अद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी|
नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः|
आषाढस्य प्रथमदिवसे मेघम् आश्लिष्टसानुम्|
वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श |२|
*********

ठळक ओळींचा अन्वय आणि अर्थः
आषाढस्य प्रथमदिवसे............आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी
(सः कामी यक्षः).................. त्या (कामविव्हल यक्षाने)
आश्लिष्टसानुम्...................पर्वत शिखराला बिलगलेल्या (आणि)
वप्रक्रीडा--...............नदीतटावरील वाळूच्या उंचवट्याला धडक मारण्याचा खेळ करण्यासाठी--
परिणतगजप्रेक्षणीयम्........खाली वाकलेल्या हत्ती प्रमाणे प्रेक्षणीय दिसणार्-या
मेघम् ददर्श................मेघाला पाहिले.
(मराठी अर्था साठी उजवीकडच्या ओळी क्रमाने वाचव्या)

वालावलकरशेठ, आपल्या हिंदुस्थानी रागसंगीताची कृपा!

राम राम वालावलकरशेठ,

आषाढाचा पहिला दिवस. आज तात्यांचा कर्यक्रम. ते संगीत दिग्दर्शक तसेच सूत्रधारही आहेत्. आपण त्यांना शुभेच्छा देऊन सुयश चिंतिलेच आहे.

आपल्या सर्वांच्या शुभेच्छांमुळे कालचा कार्यक्रम अतिशय सुरेख झाला असं बर्‍याच मंडळींनी सांगितलं.
धनश्री लेलेचं खिळवून ठेवणारं निवेदन, वरदाचा कसदार स्वर, निलिमाच्या भरतनाट्यम मधील सुंदर भावमुद्रा,
आणि मज पामराच्या मोडक्यातोडक्या चाली, यामुळे कालचा कार्यक्रम अतिशय रंगतदार झाला. आम्ही मंडळीं
त्याकरता गेले बरेच दिवस मेहनत घेत होतो त्याचं कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटलं.

सदर कार्यक्रमात गायल्या गेलेल्या काही श्लोकांची मी मप३ करून, जालावर चढवून त्याबद्दल इथे लिहीन. संस्कृत
काव्याला चाल लावायला मला जरा कठीणच गेलं, कारण संधी, विसर्ग वगैरे जरा त्रासच देतात! :) परंतु अण्णांच्या आणि बाबुजींच्या कृपेमुळे सप्तस्वरांच्या भाषेशी थोडीफार ओळख असल्यामुळे ते जमून गेलं इतकंच! या चाली लावण्याकरता मला यमन, मधुवंती, केदार, बसंत, कौशीकानडा, गावती, अडाणा, शुद्धसारंग, देस, इत्यादी रागांचा उपयोग झाला. वालावलकरशेठ, कालिदासाचं मेघदूत हे काव्य तर लय भारी आहे यात काहीच वाद नाही, परंतु आपलं हिंदुस्थानी रागदारी संगीतही तेवढंच समृद्ध आणि श्रीमंत आहे, ज्यात कुठल्याही उत्तम काव्याला, महाकाव्याला सुशोभित करण्याचे सामर्थ्य आहे!

कालचा कार्यक्रम झाल्यावर रिलायन्स उद्योगसमुहाने आम्हाला हाच कार्यक्रम पुण्यातही करायला सांगितले आहे. तेव्हा मात्र आपण अवश्य या ही आग्रहाची विनंती. कालच्या कार्यक्रमाला रिलायन्सचेही अर्थसहाय्य होते. रिलायन्सचे श्री रविंद्र अवटी यांनी आम्हाला ते मिळवून देण्यात मोलाची मदत केली आहे, त्यांचेही आभार..

वालावलकरशेठ, आपण वर दिलेल्या आषाढस्य प्रथम दिवसे हा श्लोक मी लवकरच मप३ च्या रुपात जालावर चढवून त्याची माहिती इथे देईन.

मूळ श्लोक आणि देशमुखशेठनी केलेला त्याचा मराठी अनुवाद इथे देण्याचा आपला उपक्रम अतिशय चांगला असून आपण संपूर्ण मेघदूत इथे द्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो. देशमुखशेठच्या अनुवादाबरोबरच त्या त्या श्लोकावरील आपलीही काही मोलाची टिप्पणी आम्हाला वाचायला मिळावी अशी इच्छा आहे. आपल्याही व्यासंगाबद्दल खात्री असल्यामुळे आपण फार उत्तम रितीने मेघदूतावर टिप्पणी करू शकाल अशी खात्री आहे. मेघदूत ही उपक्रमावरील एक उतम लेखमाला ठरावी असे वाटते.

आपला,
(गाववाला) तात्या.

एकंदरीत कालिदासशेठचं आणि तात्याचं जमलं म्हणायचं! जय कालिदास!! :) :)

अभिनंदन तात्या...

मप३ ची वाट बघत आहे.

"तात्या ग्रेटच आहेत "

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

श्री.तात्या यांस सप्रेम नमस्कार.
अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य युद्धाला १५० वर्षे झाली त्यानित्त आयोजित एका कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे श्री. निनाद बेडेकर यांचे भाषण झाले.भाषणाच्या ओघात तात्या टोपे, तात्याराव सावरकर यांची नांवे आली. त्यावेळी श्री. बेडेकर म्हणाले "तात्या या नावाची मराठी माणसे ग्रेटच असतात, असे माझे निरीक्षण आहे." (मला साहित्यसम्राट तात्यासाहेब केळकर यांचेही नाव आठवले).त्या इतिहास संशोधकाचे शब्द माझ्या स्मरणात राहिले.तेच मी लिहिले. उपहास किंवा गंमत करता येते. पण हा वेळ प्रसंग त्यासाठी नव्हता. त्यामुळे तसे लिहिण्याचा प्रश्नच नाही.
आपला,
यनावाला.

तात्या विंचू

तात्या या नावाची मराठी माणसे ग्रेटच असतात, असे माझे निरीक्षण आहे.

सहमत... दिलीप प्रभावळकरांनी अजरामर केलेले पात्र तात्या विंचू यांचाही यादीत समावेश व्हावा. ;)

नारायणरावांचा आशीर्वाद..

कालचा 'आषाढस्य प्रथम दिवसे..' हा कार्यक्रम उत्तम झाला हे खरे तर मराठी संगीत रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट नारायणराव बालगंधर्व यांच्याच आशीर्वादाचे फळ आहे असे मानले पाहिजे! कारण कालच नारायणरावांचा स्मृतिदिन होता हा आमच्याकरता आम्ही एक चांगला योगायोगच मानतो. १५ जुलै १९६७ रोजी नारायणराव हे जग सोडून गेले.

'नाथ हा माझा', 'सुजन कसा मन चोरी', 'मधुकर वन वन', 'रूपबली तो नरशार्दुल', 'स्वकुल तारक सुता', 'जोहार मायबाप जोहार', 'नयने लाजवीत', 'दया छाया', इत्यादी एकाहून एक सरस शिल्प घडवणार्‍या नारायणरावांना मानाचा मुजरा! त्यांची लडिवाळ गायकी, स्वरलयावरील हुकुमत माणसाला आयुष्यभराकरता बांधून ठेवते, मोहवून टाकते!

'आषाढस्य प्रथम दिवसे..' ही एक फुलांची लहानशी ओंजळ मी नारायणराव बालगंधर्वांना समर्पित करत आहे.

'असा बालगंधर्व आता न होणे...'

आपला,
(बालगंधर्वप्रेमी) तात्या.

दै. लोकसत्तेतील बातमी

या कार्यक्रमाबद्दल दै. लोकसत्ताच्या ठाणे वृत्तांतात आलेली माहिती येथे वाचता येईल.

धन्यवाद

बातमीच्या दुव्याबद्दल दुवा!

अवांतर,
शेखर म्हणजे तात्या का?

 
^ वर