इंग्लिश, हिंग्लिश आणि मन्गलिश

आंतरजालावर सध्या गाजत असलेल्या 'कोलवेरी डी' या गाण्याबद्दल बोलताना या गाण्याचे गायक धानुष यांनी हे गाणे टंग्लिश या भाषेत असल्याचे सांगितले आहे. टंग्लिश ही कोणती भाषा? याचा खुलासा करताना, तमिळ ढंगाने उच्चारलेले इंग्रजी शब्द या गाण्यात असल्याने या गाण्याची भाषा टंग्लिश आहे असे आपण म्हणतो आहोत असे त्यांनी सांगितले आहे. तसे बघायला गेले तर जगातल्या ज्या ज्या देशात इंग्रजी भाषा बोलली जाते त्या सर्व देशात (अर्थातच इंग्लंड हा देश सोडून) त्या देशाची खास इंग्लिश भाषा तयार झालेली आहे. अगदी अमेरिकेतील अमेरिकन इंग्लिश पासून सिंगापूर मधील सिंग्लिश, चिनी लोक बोलतात किंवा ज्या भाषेत ते इंग्रजीचे खून पाडतात ती चिंग्लिश अशा अनेक इंग्रजी आहेत. इंग्लंडचे घट्ट शेजारी असलेले आयर्लंड किंवा स्कॉटलंड हे देशही त्यांची स्वत:ची इंग्रजी भाषा बोलत असतात.
असे असताना भारतात बोलली जाणारी इंग्रजी भाषा साहेबाच्या मूळ भाषेसारखी असेल हे संभवनीयच नाही. त्यामुळे भारतात सुद्धा हिंग्लिश, मराठी- इंग्लिश, गुज्जु- इंग्लिश, कन्नड-इंग्लिश वगैरे उप भाषा आहेतच. त्यात ही टंग्लिश पण आली आहे. परंतु साहेबाच्या मूळ भाषेतील शब्द देशी ढंगाने म्हणत इंग्रजीत बोलणे( उदा.इंग्रजीतील स्नॅक हा शब्द गुज्जु श्टाइलने स्नेक असा उच्चारणे.) आणि ते मूळ इंग्रजी शब्द खुशाल आपल्या देशी भाषेत घुसडून देऊन एका धेडगुजरी भारतीय भाषेत संभाषण करणे किंवा लेखन करणे यात बराच फरक आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर थोड्याच वर्षांत दिल्लीच्या राज्यकर्त्यांना आपला देश स्वतंत्र झाला आहे तरी आपण इंग्रजीचे भूत डोक्यावर घेऊन वावरतो आहोत असा साक्षात्कार झाला व प्रोफेसर रघुवीर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सरकारने स्थापन केली व राज्य कारभारात इंग्रजीच्या ऐवजी हिंदीचा वापर सुरू करण्यासाठी एक शब्द कोश निर्माण करण्याचे ठरवण्यात आले. प्रोफेसर. रघुवीर यांनी अत्यंत परिश्रमाने असा एक शब्द कोश बनवण्यात यश मिळवले या शब्द कोशातील अनेक शब्द अतिशय जडबंबाल व विनोदी होते असे मला आठवते. रेल्वे इंजिनला अग्निरथ सारखे शब्द या समितीनेच सुचवले होते. या शब्दांचा वापर सुरू झाल्यावर हिंदी शुद्ध झाली खरी पण ती बहुतेक लोकांना आणि विशेषत: परप्रांतीयांना तर समजेनाशीच झाली. त्यामुळे इंग्रजीची हकालपट्टी होण्याची प्रक्रिया जी थांबली ती थांबलीच.
जी गोष्ट इंग्रजीची, तीच मराठीची आहे. काही मंडळींना मराठीवर इंग्रजीचे आक्रमण होत आहे असा साक्षात्कार मधून मधून होत असतो. आंतरजालावर सुद्धा अशी मंडळी बरीच आहेत. कॉम्प्युटर या शब्दाला संगणक हा शब्द रूढ आहे व तो वापरला तरी फारसे बिघडत नाही. पण कीबोर्डला कळफलक , माऊसला, उंदीर किंवा क्लिक या शब्दाला टिचकी हे प्रतिशब्द वापरले की वाचणार्‍याचा गोंधळ हा होतोच. इंग्रजी भाषा ही जगात सर्वात जास्त लिहिली व वाचली जाणारी भाषा आहे. ब्रिटिश साम्राज्य हे जरी याचे ऐतिहासिक कारण असले तरी इतर भाषांतील शब्द शोषून घेऊन त्यांना आपलेसे करण्याचे या भाषेचे जे एक वैशिष्ट्य आहे त्यामुळेच ही भाषा या स्थानाला जाऊन पोचली आहे. गुरू, बझार या सारखे भारतीय शब्द आता इंग्रजी बनले आहेत ही याची सहज आठवणारी उदाहरणे आहेत. दर वर्षी ऑक्सफर्ड हे पुस्तक प्रकाशक या वर्षी कोणकोणते नवीन शब्द इंग्रजीत आले आहेत याची मुळी एक यादीच प्रसिद्ध करते.
इंग्रजी भाषा जर नव्या नव्या शब्दांचा अंतर्भाव इतक्या सहज रित्या करू शकते तर मराठीमध्ये निदान प्रचलित तांत्रिक शब्दांना प्रतिशब्द शोधत बसण्यापेक्षा आहेत तेच शब्द आपण मराठीमध्ये ओढून घेऊन त्यांचा वापर का अधिकृत का करत नाही हे मला समजत नाही. भाषा सोपी ठेवा. लोकांना समजेल अशी ठेवा. म्हणजे ती वापरली जाईल हे अगदी साधे सूत्र आहे.
दिल्लीच्या केन्द्र सरकारने नुकताच एक आदेश काढून क्लिष्ट हिंदी शब्दांचा वापर करण्याऐवजी प्रचलित इंग्रजी शब्दांचा वापर सरकारी पत्रव्यवहारात करण्यास परवानगी दिली आहे. या संबंधी काढलेल्या परिपत्रकात गृहखात्याने स्पष्ट कबूली दिली आहे की "सरकारी कामकाजामध्ये भाषांतरासाठी हिंदीचा वापर करणे कठीण आणि गुंतागुंतीचे ठरते आहे. भाषांतरात पर्यायी इंग्रजी शब्दांचा वापर तातडीने सुरू करण्याची आवश्‍यकता आहे. भाषांतरातून मूळ मुद्यांचा नेमका अर्थ लोकांपर्यंत पोचणे आवश्‍यक आहे. प्रत्येक इंग्रजी शब्दाला हिंदी प्रतिशब्द वापरणे म्हणजे भाषांतर नव्हे. " याची काही उदाहरणे या परिपत्रकात दिली आहेत. "प्रत्याभूती" सारख्या क्‍लिष्ट शब्दाला "गॅरंटी”, "कुंजीपटल" या शब्दाला "कीबोर्ड”, "संगणक" ऐवजी "कॉम्प्युटर" हे शब्द वापरावे असे हे परिपत्रक म्हणते आहे.
मध्यवर्ती सरकारने इंग्लिश ऐवजी "हिंग्लिश" वापरा अशी दिलेली ही सूचना कार्यालयीन पत्रव्यवहार समजण्यास सुलभ करेल याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही.
याच धर्तीवर निदान आंतरजालावर उपयोगात आणल्या जाणार्‍या मराठी लेखनात तरी, शुद्धतेचा अवास्तव बडेजाव न मांडला जाता, रोजच्या व्यवहारातील प्रचलित इंग्रजी शब्द त्यात वापरले जातील अशी मला आशा वाटते. निदान माझ्या लेखनात तरी मी हे करतोच आहे व करत राहीनच.

Comments

अनुमोदन

लेख नुसता आवडलाच नाहि तर अगदी पटला.. फुल्ल् अनुमोदन!

याच धर्तीवर निदान आंतरजालावर उपयोगात आणल्या जाणार्‍या मराठी लेखनात तरी, शुद्धतेचा अवास्तव बडेजाव न मांडला जाता, रोजच्या व्यवहारातील प्रचलित इंग्रजी शब्द त्यात वापरले जातील अशी मला आशा वाटते.

अशी आशा मराठी आंतरजालाचा सभासद झालो तेव्हापासून बाळगून आहे ;)

मूळ इंग्रजी शब्द खुशाल आपल्या देशी भाषेत घुसडून देऊन एका धेडगुजरी भारतीय भाषेत संभाषण करणे किंवा लेखन करणे यात बराच फरक आहे.

इथे मात्र धेडगुजरी हा शब्द खटकला.. त्यापेक्ष्याच नव्याच / संकरीत भाषेत असा शब्दप्रयोग हवा होता असे वाटते

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

माझे विचार

या लेखात मांडलेल्या भूमिकेशी मी सहमत आहे. माझे विचार मी खाली दिलेल्या लेखांमध्ये मांडले आहेत. ते काहीशा ललित स्वरूपाचे असल्यामुळे उपक्रमवर देता येणार नाहीत. ज्यांना त्याची आवड असेल त्यांनी मूळ स्थळावर जाऊन वाचावेत अशी विनंती आहे.
मराठी बाणा
मराठी भाषेची शुद्धता

नको.

पेट्रोल्, पेन्,बटन हे शब्द रुळलेले आहेत, काही अजून् रुळत आहेत हे ठिकच आहे.नवीन पण् जो येइल् तो शब्द जसाच्या तसा उचलणे पटत नाही.
पूर्वी "मेयर" ला प्रतिशब्द् सुचत नसताना "महापौर" हा शब्द सावरकरांनी दिलाच ना.
जमेल तितपत इथलेच शब्द् वापरावेत. अनुज्ञप्ती व् प्रशासन पेक्षा परवाना व सरकार हे रुळलेले शब्द ठिक वाटतात.
असेच शब्द् वापरावेत, "कुंजीपटल" वाटला नाही.दुसर्या एका स्थळावर शीच सचर्चा सुरु असताना, हिंग्लिशचा भडिमार करण्याचे उदाहरण म्हणून हा प्रतिसाद दिला होता:-

फ्रेश सब्जेक्ट आणि सिम्पल प्रेझेंटेशन बद्दल आणखी काय कमेंट देणार?
केवळ आयडियाशीर स्टाइलने केलेले रायटिंग फंटास्टिक म्याच झालय.
ही वरची दोन सेंटंन्स इंटरप्रीट करीत बसल्याने तुमच्या ब्रेनचे भुसभुशीत बर्गर बनल्यास प्रस्तुत रायटर (म्हंजे मी)
कलप्रिट नसुन वाचणारे रीडर्सच स्टुपिडिटी प्रदर्शन करताहेत असे प्रूव होते.

ह.घ्या् हे.वे.सां . न.ल.

रूटला हँड घालुन थिंक केलं तर माइंडमध्ये येइल की आपल्या लँग्वेजमधुन कम्युनिकेट करण्यासाठी एखाद्या अदर लँग्वेजचा सपोर्ट घेणं किती शेमास्पद आहे ते.

अरे तुम्हाला काय आयडेंटिटी आहे का नाय?

तुम्हा ऑलचा थ्री वार
प्रोस्टेट
प्रोटेस्ट
प्रोटेस्ट

युवर्सचाच,
माइंडोबा
(मनोबा)

--मनोबा

तुम्ही दिलेली उदाहरणे

मन
तुम्ही दिलेली उदाहरणे मराठी भाषेतील आहेत असे म्हणणे कठिणच आहे. माझा लेख या प्रकारच्या मराठी बद्दल नक्कीच नाही.

लेखात रोजच्या व्यवहारातील आणि मुख्यत्वे तांत्रिक विषयांसंबंधी जे शब्द रूढ आहेत ते बदलून दुसरे अप्रचलित शब्द वापरण्याची आवश्यकता नाही असे मला म्हणायचे आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

गरज आहे/नाही

जे शब्द रुळले आहेत ते नेटाने काढून टाकायची गरज वाटत नाही. वर म्हटल्याप्रमाणे पेन, फाइल, बटण, बूट हे शब्द मराठीत व्यवस्थित चालून जातात. किंबहुना, त्यांतील काही शब्दांचे मराठीकरणही करता येईल/ झाले आहे. जसे, तिकिट, कॉम्प्युटर इ. ;-)

मराठीवर (महाराष्ट्रावर) मुसलमानी सत्ता राज्य गाजवत असताना ज्या अरबी/फारसी शब्दांची भरणा मराठीत झाली ती देखील मुद्दाम बाजूला करून नवे अप्रचलित शब्द तेथे घालण्याची आवश्यकता वाटत नाही.

परंतु, जे शब्द मराठीत आधीच प्रचलित आहेत ते सोडून इंग्रजीचा आधार घेण्याची आवश्यकता नाही. तसेच, नवे सुटसुटीत आणि आधीच प्रचलित असणार्‍या शब्दांशी साधर्म्य साधणारे शब्द मिळाले तर त्यांचा वापर करायला हरकत नाही. कम्प्युटरला संगणक हा शब्द खटकत नाही कारण गणक, गणना हे शब्द ओळखीचे आहेत पण माऊसला उंदिर हा शब्द मजेशीर वाटतो. ;-) (अर्थातच हे व्यक्तीसापेक्ष असावे.)

अति सर्वत्र...

इंग्रजी शब्दांची मराठीत सरमिसळ करणे कितपत योग्य यावर ढोबळ मानाने काही सांगणे योग्य नाही. पण काहीही अती करणे टाळले तर बरेचसे प्रश्न सुटू शकतील असे वाटते. 'ऐसी अक्षरे' या संकेतस्थळावर अशा प्रकारच्या चर्चेत 'तो प्रेमभराने तिचे ओठ किसु लागला', 'तो प्रेमाने तिला हगला' अशी उदाहरणे दिली आहेत. 'मिसळपाव' वर एका लेखात 'हाय टी' ची 'उच्च चहा' असे आग्रहाने केलेले भाषांतर आहे. हे असले टाळता आले की झाले. बाकी भाषा प्रवाही असतेच.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

सबऑर्डर ...दिज् लेटर्स्

भाषांतरे करण्याचा हट्ट असेलच तर काही मराठी नावे इंग्लिश मधुन वापरावित काय?
जसे उपक्रमला - सबऑर्डर...दिज् लेटर्स् वगैरे.

प्रतिशब्द

कुंजीपटलासारखे शब्द लोकांना समजत नसतील तर सरसकट इंग्रजी शब्द वापरण्याऐवजी हिंदी/मराठी शब्द लिहून त्यापुढे कंसात इंग्रजी शब्द लिहावा, असे माझे मत आहे. त्याने दोन गोष्टी साध्य होतील. कंसातील इंग्रजी शब्द वाचून अर्थ कळण्यास मदत होईल आणि त्याचवेळी त्या इंग्रजी शब्दासाठी शासनमान्य हिंदी/मराठी शब्द कोणता हेही वाचकास समजेल. अर्थात शंभर टक्के शब्द हिंदी/मराठी असावेत असे माझेही मत नाही. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन, आयन, बॅंक, पेन, बस ह्या सारखे शब्द तसेच वापरावेत. मात्र "रुळलेले इंग्रजी शब्द" हा फारच ढोबळ शब्दप्रयोग झाला. कोणाला कॉम्प्रमाईज हा शब्द रुळलेला इंग्रजी शब्द वाटेल, पण तरी मी तडजोड हा शब्द वापरण्यालाच प्राधान्य देईन.

हल्ली इंग्रजीचा मराठी वाक्यांमधला वापर इतका बेसुमार वाढला आहे की मिंग्लिश ऐकताना कानांना त्रास होतो. परवा माझ्या मामेभावाला मी नुकतीच बायपास शस्त्रक्रिया झालेल्या मामांच्या तब्येतीविषयी विचारत असता त्याने "ऑपरेशन करण्याचा डिसिजन राईट ठरला." असे उत्तर मला दिले. जोवर अशी वाक्ये आपण चालवून घेऊ, ऐकून घेऊ, वापरू, लिहू, तोवर सर्वच इंग्रजी शब्द हे मराठीत रुळलेले शब्द ठरतील.

भाषांतर क्लिष्ट वाटण्यामागे हिंदी/मराठी प्रतिशब्दांच्या वापराबरोबरच अयोग्य वाक्यरचनाही महत्त्वाची ठरते. ती योग्य प्रकारे केली तर शुद्ध हिंदी/मराठी शब्दांचा वापर (आणि योग्य तेथे कंसात इंग्रजी शब्द लिहून) केलेले भाषांतर क्लिष्ट वाटू नये.

-------------------------------
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान

थोडासा प्रवाहपतित आणि थोडासा इडियोसिन्क्रेटिक

या बाबतीत मी थोडासा प्रवाहपतित आणि थोडासा इडियोसिन्क्रॅटिक आहे.

ज्या समाजात मला संवाद साधत राहायचे आहे, तो कोणता? (त्या समाजात संवाद साधणे माझ्या फायद्याचे असते. आर्थिक किंवा भावनिक.) त्या समाजात भाषेचा प्रवाह ज्या सरासरी वेगाने वाहात असेल त्या वेगापेक्षा थोड्याच कमी-अधिक वेगाने भाषा-संकर करतो. मात्र सरासरी प्रवाहात बारीकसारीक वैयक्तिक फरक करतो. अमुक संकरित शब्द आवडतो, तमुक संकरित शब्द आवडत नाही, अशा गोष्टी आहेतच. त्यामुळे एखाद्या नवीन संकरित शब्दाचा सरासरी प्रवाहाआधी स्वीकार करतो, तर दुसर्‍या एखाद्या संकरित शब्दाला खूप दिवस टाळत राहातो.

आता या परिच्छेदाबद्दल :

कॉम्प्युटर या शब्दाला संगणक हा शब्द रूढ आहे व तो वापरला तरी फारसे बिघडत नाही. पण कीबोर्डला कळफलक , माऊसला, उंदीर किंवा क्लिक या शब्दाला टिचकी हे प्रतिशब्द वापरले की वाचणार्‍याचा गोंधळ हा होतोच.

बहुतेक अतिशय-तांत्रिक संज्ञा इंग्रजीत-मराठीत सारख्या असल्या, (फक्त मराठीमध्ये मराठी हेलात उच्चारल्या) तर बरे. कित्येक तांत्रिक संज्ञांचे मूळ इंग्रजी अर्थ आता फारसे संदर्भाचे राहिलेले नाहीत. उदाहरणार्थ "मॉनिटर" -> मूळ अर्थ "यंत्रावर लक्ष ठेवण्याचे उपकरण" हा निरर्थक झालेला आहे. त्याचे मराठी भाषांतर करणे योग्य नाहीच. तसेच "माऊस". उंदरासारखे दिसणारे, वायरची शेपटी असलेले माऊस अजूनही दिसतात, खरे. पण कित्येक यंत्रांवर टचपॅड, ट्रॅकबॉल, जॉयस्टिक, वगैरे असतात. कोणी "माऊस वापरा" म्हटले, तर "तुमच्या यंत्रावर याच्यापैकी जे काय आहे, ते वापरा" असा अर्थ होतो. म्हणून "माऊस"चे भाषांतर करणे ठीक नाही.

वेगळी परिस्थिती अशी - इंग्रजीतच नवीन असलेल्या "पॉइंटिग डिव्हाइस"चे मराठी भाषांतर वापरावे, असे वाटते. इंग्रजी शब्द रुळलेला नाही. त्याचा अर्थ अजून लागू आहे. त्याचे घटक भाषांतरासाठी सोपे आहेत... वगैरे.
(बोट दाखवणे, अंगुली, तर्जन, निर्देशक... असा काहीतरी शब्द चालेल. "सिलेक्ट द पॅरॅग्राफ यूझिंग द पॉइंटिंग डिव्हाइस. " -> "निर्देशक वापरून परिच्छेद निवडा." हे अधिक आवडते. "पॉइंटिंग डिव्हाइस वापरून परिच्छेद सिलेक्ट करा" हे तितकेसे आवडत नाही.)

- - -

अशा प्रकारे हा प्रकार माझ्याकरिता काळापांढरा नसून करडा आहे. म्हणून मी प्रवाहपतितपणाचे धोरण बनवले आहे. ते धोरणही पुरत नाही.

पण या परिस्थितीत काय बरे करावे : एखादा शब्द पुष्कळ प्रतिष्ठित लोक वापरताना दिसतात, पण पुष्कळ प्रतिष्ठित लोक तो शब्द वापरताना दिसत नाहीत. (उदाहरणार्थ "विदा".) ५०%पेक्षा जास्त कोण? प्रत्येक वेळी सर्वेक्षण शक्यही नाही. मग "सरासरी" "प्रवाहपतित" धोरणाप्रमाणे स्पष्ट निर्देश मिळत नाही. तेव्हा वैयक्तिक आवडीनिवडीनुसार शब्द वापरायला घेतो. परंतु अशी उदाहरणे कमी आहेत.
- - -

सरासरी बदल समाजाशी जुळवण्याचे माझे धोरण आहे. त्यात कितपत यशस्वी आहे ते ठाऊक नाही.

मराठी लँग्वेज सेव करा!

मराठी लँग्वेज सेव करा!

वामन देशमुख

केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार
मनुजा अंगी चातुर्य येतसे फार.

इंग्रजी शब्द मराठीत

कोणतेही इंग्रजी नाम मराठीत जसेच्यातसे वापरण्याआधी त्याचे लिंग, अनेककवचन आणि प्रत्ययापूर्वीचे सामान्यरूप निश्चित करावे, आणि मगच तो शब्द मराठी आहे असे समजून खुशाल वापरावा. नाहीपेक्षा शब्दाचे मराठीकरण करून नंतरच स्वीकारावा. उदाहरणार्थ माउस हा शब्द मराठीत आणल्यावर `माऊस' असा दीर्घोपान्त्य करून, तो अकारान्त पुल्लिंगी असल्याने, अनेकवचन माऊस, सामान्य रूप मावसा- असे करणार असाल तरच मराठीत चालू शकेल. (पाऊस, अ.व.पाऊस, सामान्य रूप पावसा-/पावसां-).

जुने उदाहरणः Police इंग्रजीत पलिस् , मराठीत पोलीस(पुल्लिंग), अव. पोलीस, सारू. पोलिसा-/पोलिसां- वगैरे.
(स्त्रीलिंगी शब्द गिफ्ट, अव.गिफ्टा/गिफ्टी, सारू. गिफ्टे-/गिफ्टां- वगैरे.) असे करणे भाग आहे, नाही तर आयात शब्दांसाठी नवे व्याकरण लिहावे लागेल.---वाचक्नवी

शुद्ध मराठी कोणासाठी?

मराठी भाषेच्या शुध्दीकरणाचा मुद्दा तसा खूप जुना आहे. "कशायपेयपात्रपतित मक्षिकेप्रत" हे आचार्य अत्रे यांनी केलेले विडंबन मला वाटते माझ्या जन्मापूर्वीचे आहे.
मला असे वाटते की अलीकडच्या काळात मनोगतवरील काही मंडळींनी हा मुद्दा उपस्थित केला आणि नेटाने लढवला होता. तेथील काही मंडळी उपक्रम, मिसळपाव, मराठी माती, ऐसी अक्षरे इत्यादी संकेत स्थळांवर आहेत आणि या मुद्द्यावर चर्चा करीत आहेत. या सर्वांची एकंदर संख्या शंभरावर जाईल असे वाटत नाही. त्यांनी आठवण करून दिल्यामुळे किंवा त्यांचे अनुकरण करून माझ्यासारखे आणखी शंभरजण मराठी शब्दांचा उपयोग लिहिण्यातून अंशतः करू लागले आहेत. फार फार तर आणखी चार पाच हजार लोक हे लेखन कधी तरी वाचत असतील. पण याचा परिणाम दहा कोटी मराठी भाषिक बांधवांवर कितपत होणार आहे? अमूक इंग्रजी शब्द जसाच्या तसा वापरावा, तमूक शब्दाला पर्याय शोधावा अशा सूचना आपण या स्थळावर केल्याने त्या अंमलात कशा येणार? शालेय शिक्षणाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये जर नवे शब्द येऊ लागले तर ते रूढ होण्यास मदत होईल. पण आजकाल मराठी भाषिकांची मुले इंग्रजी माध्यम असलेल्या शाळांमध्ये जाऊ लागलेली असल्यामुळे तो मार्गसुध्दा बंद व्हायच्या मार्गावर आहे. त्यामुळे आपण जी चर्चा करतो ती नेमक्या कोणासाठी? असा प्रश्न मनात येतो.

 
^ वर