सुसंस्कृत

'सुसंस्कृत' या शब्दाचा अर्थ 'ज्याच्यावर चांगले संस्कार झाले आहेत' असा मानला जातो. लहान मुलांची वाढ होत असतांना सर्व मार्गांनी अधिकाधिक शिकण्याचा प्रयत्न ती मुले करत असतातच, शिवाय त्यांचे पालक, शिक्षक आणि इतर वडीलधारी मंडळी त्यांना काही गोष्टी समजावून सांगतात, शिकवतात, त्यांच्याकडून करवून घेतात, त्यांना वळण लावतात. या सगळ्यांमधून त्यांच्यात जो चांगला फरक पडत असतो त्याला 'संस्कार' असे नाव दिले गेले आहे. पहायला गेल्यास जीवंत असेपर्यंत आपल्यावर संस्कार होतच असतात, पण लहान वयातले मूल संस्कारक्षम असल्यामुळे त्याच्या मनावर संस्कार होणे सोपे आणि अधिक टिकाऊ असते. माणसाच्या मनावर झालेल्या संस्कारातून त्याचा स्वभाव, त्याची वागणूक वगैरेवर प्रभाव पडतो. विशेषतः ज्या गोष्टी त्याच्या नकळत तो करत असतो त्यांच्या मुळाशी त्याच्या अंगातले उपजत गुण असतात, तसेच त्याच्या मनावर झालेले संस्कार असतात. लहानपणी मनावर झालेले संस्कार इतके खोलवर रुजलेले असतात की ते त्या माणसाच्या व्यक्तीमत्वाचा भाग बनून जन्मभर त्याच्या सोबत राहतात. ते पुसायचे असल्यास त्यासाठी त्याला नंतर खूप प्रयत्न करावे लागतात.

'संस्कार' हा शब्द सर्वसाधारणपणे चांगल्या अर्थाने वापरला जातो. कोणतेही पालक किंवा शिक्षक सहसा मुद्दामहून मुलांना वाईट मार्गाला लावणार नाहीत. पण ती लागली तर बहुतेक वेळी त्यालासुध्दा वाईट संगतीमुळे झालेले चुकीचे संस्कार हे कारण दाखवले जाते. 'चांगले' आणि 'वाईट' या शब्दांचे अर्थ मात्र निरनिराळ्या परिस्थितींमध्ये वेगळे निघतात. खूप श्रीमंत कुटुंबांकडे स्वयंपाकपाणी करण्यासाठी नोकरचाकर असतात. घरातल्या प्रत्येक माणसाने त्याला आवडेल तो पदार्थ यथेच्छ खावा आणि कोणाला तो कमी पडता कामा नये असा हुकूम असल्यामुळे ढीगभर अन्न शिजवले जाते आणि घरातल्या माणसांची जेवणे झाल्यानंतर उरलेल्या अन्नाचे काय होत असेल याची फिकीर कोणीही करत नाही. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांच्या मनावर तसेच वागण्याचे संस्कार होतात, त्यांना तशाच संवयी लागतात. याउलट दरिद्री माणसांच्या घरात अन्नाचा प्रत्येक कण मोलाचा समजला जातो आणि वाया जाऊ दिला जात नाही. मध्यमवर्गीयांची अन्नान्नदशा नसली तरी ती होऊ नये म्हणून "पानात वाढलेले अन्न संपवलेच पाहिजे", "शिजवलेले सारे अन्न खाल्ले गेले पाहिजे" वगैरे शिकवण दिली जाते. शरीराला आवश्यकता नसतांना खाल्ले गेलेले जास्तीचे अन्न अपायकारक असते आणि तेसुध्दा एक प्रकारे वायाच जाते हे अनेक लोकांना शरीरशास्त्राच्या अभ्यासातून कळले तरी वळत नाही. याला कारण लहानपणी मनावर झालेले संस्कार ! कोणते संस्कार चांगले आणि कोणते वाईट याबद्दल वेगवेगळी मते असू शकतात हे वरील उदाहरणावरून दिसून येते.

पूर्वीच्या काळी रूढ असलेल्या एकत्र कुटुंबांमध्ये आजोबापणजोबा आणि आज्यापणज्यांपासून नातवंडा पणतवंडांपर्यंत खूप माणसे एकत्र रहात असत. त्यांनी आपापसात कलह न करता सामंजस्याने रहावे यासाठी घराघरात एक प्रकारची शिस्त पाळली जात असे. घरातील प्रत्येक सदस्याने ती शिस्त लहानपणापासूनच अंगात भिनवावी या दृष्टीने मुलांच्या व मुलींच्या मनावर विशिष्ट प्रकारचे संस्कार प्रयत्नपूर्वक केले जात असत. रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणकोणत्या वेळी काय काय करायचे आणि ते कसे करायचे याचे नियम ठरलेले असत. ते पाळण्याची सवय मुलांना जबरदस्ती करून लावली जात असे. त्यांच्याकडून परवचे आणि श्लोक वगैरेचे पाठांतर करून घेतले जात असे. प्रामाणिकपणा, विनम्रता, आज्ञाधारकपणा वगैरेंसारखे गुण शिकवले जात असत. त्यात आज्ञाधारकपणा हा सर्वात मोठा गुण समजला जात असे. मोठ्या माणसांनी सांगितलेले सर्व काही निमूटपणे ऐकून घ्यायचे, वर तोंड करून त्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत, त्यांची चूक काढायची नाहीच, त्यांच्या सांगण्याबद्दल शंकासुध्दा व्यक्त करायची नाही वगैरे बाबींचा त्या काळात थोडा अतिरेक होत असावा असे मला आता वाटते. सुमार वकूब असलेल्या मुलांसाठी हे पढवणे ठीक असेलही, पण स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेण्याची क्षमता आणि कल्पकता यांच्या वाढीमध्ये त्या प्रकारच्या संस्कारांचा अडथळा येत असे. संयुक्त कुटुंब पध्दतीच आता मोडीत निघाली आहे आणि टेलिव्हिजनच्या व इंटरनेट यांच्या प्रसारामुळे मुलांना लहानपणापासूनच बाहेरच्या जगात काय चालले आहे हे समजू लागले आहे. त्यामुळे कळत नकळत त्यांच्या मनावर होणारे संस्कार आता बदलले आहेत.

माणसाचा आचार, विचार आणि उच्चार या तीन्हीवर संस्काराचा प्रभाव पडतो. लहान मुलांना विचार करण्याएवढी समज नसते म्हणून विचारांवर जास्त भर न देता त्यांना चांगले वागणे आणि बोलणे यांचे वळण लावले जाते. ते सुधारले तर त्याच्या मागील विचार समजला नाही तरी त्या संस्कारांचा फायदाच होईल असे ही कदाचित वाटत असावे. पिढ्या न् पिढ्या असेच चालत राहिल्यास त्या उक्ती किंवा कृतींच्या मागे असलेले विचार हरवूनही जात असतील असे कधीकधी वाटते. अनेक रूढी, रीतीरिवाज वगैरे कधी आणि कशासाठी सुरू झाले ते आता नक्की सांगता येत नाही. त्याबद्दल तर्क करावे लागतात. शिस्त लावणे या उद्देशातून सहनशक्ती, संयम, चिकाटी यासारखे गुण वाढीला लागतात. स्वच्छता आणि नियमित व्यायाम व आहार यामुळे आरोग्य चांगले राहते. दुस-या व्यक्तीला विनाकारण त्रास देऊ नये, तिचा अपमान करू नये असे वागणे सगळ्यांनी ठेवले तर आपसात संघर्ष होत नाहीत, समाज सुसंघटित आणि बलवान होण्यास मदत होते. विनयशीलता बाळगल्यामुळेही चांगले संबंध राहतात, तसेच आत्मवंचना होत नाही. अशा अनेक प्रकारे संस्कारांचा लाभ व्यक्ती आणि समाजाला मिळतो.

काही विचित्र रूढी मात्र विशिष्ट स्थानिक किंवा तात्कालिक परिस्थितीतून केंव्हातरी सुरू झालेल्या असतात. ती परिस्थिती बदलल्यानंतरसुध्दा त्या तशाच पुढे चालत जातात किंवा अनिष्ट असे विकृत रूप धारण करतात. बहुतेक चालीरीती या विशिष्ट धर्म, पंथ, जात वगैरेंशी जोडल्या असतात आणि त्या समूहाला एकत्र ठेवण्यासाठी किंवा त्याची ओळख म्हणून त्या पाळल्या जातात. कोणालाही त्यांचा उपद्रव होत नसेल तर ठीक आहे, पण त्यांच्यामुळे कोणाला कष्ट होत असतील किंवा त्यातून वैमनस्य निर्माण होत असेल तर त्यांचा त्याग करणेच शहाणपणाचे ठरते.

संस्कार हा प्रकार वैश्विक आहे. स्थळकाळानुसार त्यांचा तपशील वेगळा असतो. चांगले संस्कार लाभलेला भारतीय मुलगा आल्यागेल्या मोठ्या माणसाला वाकून नमस्कार करेल, इंग्रज मुलगा हस्तांदोलन करून त्याची विचारपूस करेल किंवा "त्याची सकाळ, संध्याकाळ, किंवा रात्र चांगली जावो" अशी लांबण न लावता फक्त "गुड मॉर्निंग, गुड ईव्हनिंग, गुड नाईट" असे काही तरी उच्चारेल. जाता येता सारखे "थँक्यू, सॉरी" वगैरे म्हणणे हा देखील संस्कारांचाच भाग आहे. आधुनिक काळात हे संस्कारसुध्दा आपल्याकडील मुलांवर केले जात आहेत. कधी कधी ज्या स्वरांमध्ये ते शब्द म्हंटले जातात त्यात तो भाव मुळीसुध्दा दिसत नाही. कारण ते शब्द केवळ संवयीने उच्चारलेले असतात. त्यांचा अर्थ त्यात अपेक्षित नसतो आणि कोणी तो लावायचा प्रयत्नसुध्दा करत नाही.

माझ्या बालपणी आमच्या पिढीमधल्या मुख्यतः ग्रामीण भागातील मुलांवर जे संस्कार झाले होते, त्यातले काही रिवाज शहरामधील राहणीत चुकीचे, निरुपयोगी किंवा कालबाह्य वाटल्यामुळे आमच्या पिढीने ते आचरणात आणले नाहीत. जे चांगले वाटत राहिले ते आमच्या पिढीने पुढील पिढीमधील मुलांना दिले. शिवाय शेजारी व शाळांमध्ये वेगळ्या प्रदेशातून आलेल्या लोकांच्या आणि मुलांच्या संपर्कात आल्यामुळे आमच्या पिढीमधील लोकांच्या मुलांनी काही वेगळ्या चालीरीती पाहिल्या आणि उचलल्या. ती मुले मोठी झाल्यावर आता जगभर पसरली आहेत आणि त्यांच्या जीवनशैली आमच्यापेक्षा वेगळ्या झाल्या आहेत. त्यांच्या पुढील पिढीमधील मुलांवर वेगळे संस्कार होत आहेत हे उघड आहे. आमच्या आईवडिलांची पिढी आणि त्यांच्या पूर्वीच्या अनेक पिढ्या कदाचित एकाच प्रकारच्या चाकोतीत जगत आल्या असतील, त्यांच्यावरील संस्कारसुध्दा साधारणपणे तसेच राहिले असतील, पण त्यांची आणि आमची पिढी यात सर्वच बाबतीत खूप मोठा फरक होता. त्यामुळे मागील पिढीमधील लोकांना आमचे वागणे कधीकधी पसंत पडत नसे. त्या मानाने आमची पिढी व पुढील पिढी यांच्यातला फरक कमी झालेला असला तरी अजून तो जाणवण्याइतपत आहे. त्यामुळे आमच्या पिढीने पुढच्या पिढीवर केलेले संस्कार तसेच्या तसेच त्यांच्या पुढील पिढीला मिळण्याची शक्यता कमी आहे, निदान त्यांचे प्रमाण तर नक्कीच कमी होणार आहे.

आमच्या आधीच्या पिढीमधले खेड्यात राहणारे लोक शेणाने सारवलेल्या जमीनीवर फतकल मारून बसत असत, जेवायला बसण्यापूर्वी अंगातला सदरा काढून उघड्याने पाटावर बसत असत, टेबल मॅनर्स हा शब्द त्यांनी ऐकलेला नसे, ते लोक नैसर्गिक विधी उघड्यावर करत असत. परमुलुखात राहणार्‍या पुढच्या पिढीमधल्या काही लोकांना साधे श्लोक ठाऊक नसतात, त्यांच्या बायका चार चौघांसमक्ष नव-याला त्याच्या नावाने हाका मारतात, त्याच्याशी उरेतुरेमध्ये बोलतात, रोज अंघोळ करणे काहीजणांना आवश्यक वाटत नाही, सकाळीच ती करण्याची घाई नसते. आम्हाला सवय नसल्यामुळे अशा काही गोष्टी जराशा खटकतात. पण त्यामुळे त्यांच्या सुसंस्कृतपणाला बाधा येण्याचे कारण नाही. मी तर असे म्हणेन की आमच्या मागील पिढ्या, आमची पिढी आणि पुढील पिढ्या यातील लोकांच्या मनावर लहानपणी भिन्न प्रकारचे संस्कार झालेले दिसले तरी त्या सर्वांना सुसंस्कृतच म्हणायला पाहिजे. पूर्वीच्या पिढीप्रमाणे नवी पिढी वागली नाही तर तिला संस्कारहीन म्हणता येणार नाही.

स्वतःवर ताबा ठेवणे आणि दुस-यांचा विचार करणे अशा काही मूलभूत गोष्टी अंगी बाणवणे हे माझ्या मते एकाद्या माणसाला सुसंस्कृत होण्यासाठी पुरेशा असाव्यात. त्याने इतिहास, भूगोल, संस्कृत, गणित किंवा खगोलशास्त्राचा अभ्यास केला असणे वा नसणे हे गौण आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

झंटलमनची व्याख्या

चांगला चर्चाविषय. मांडलाही चांगला आहे.

दुस-यांचा विचार करणे अशा काही मूलभूत गोष्टी अंगी बाणवणे हे माझ्या मते एकाद्या माणसाला सुसंस्कृत होण्यासाठी पुरेशा असाव्यात. त्याने इतिहास, भूगोल, संस्कृत, गणित किंवा खगोलशास्त्राचा अभ्यास केला असणे वा नसणे हे गौण आहे

.

सहमत. आपल्यामुळे इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून जो प्रयत्नशील असतो तो झंटलमन, अशी काहीशी एक व्याख्या एकेकाळी वाचली होती आणि प्रचंड पटली होती. ती आठवली. तूर्तास आठवले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असे जरा कठीणच, नाही का?

>आपल्यामुळे इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून जो प्रयत्नशील असतो तो झंटलमन,

हे जरा कठीणच नाही का? त्यापेक्षा "दुसर्‍यांचा विचार करणे अशा मूलभूत गोष्टी अंगी बाणवणे" करता येण्यासारखे आहे असे वाटते. हा विचार एका मर्यादेपलिकडे करता येत नाही ही अनेकांची मर्यादा असावी :)

लेख आवडला. भावनांशी बहुतांशी सहमत. दुर्दैवाने सभ्यता, संस्कृती ठरवण्यातही विवक्षित गटांची मक्तेदारी सुरू होते असे आपण पाहतो.
अर्थात याला काही पर्याय आहे असेही मला वाटत नाही.

म्हणजेच

'बिहेविंग टुवर्ड्स अदर्स ऍज यू वुड लाईक देम टु बिहेव टुवर्डस यू' असेच का?
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

लेखन आवडले

लेखन आवडले.. विचार करायला लावणारे आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

समाज व संस्कार

या संबंधी अधिक विश्लेषण या दुव्यावर वाचता येईल.

आमचं बालपण नासलं

त्यात आज्ञाधारकपणा हा सर्वात मोठा गुण समजला जात असे. मोठ्या माणसांनी सांगितलेले सर्व काही निमूटपणे ऐकून घ्यायचे, वर तोंड करून त्यांना उलट उत्तरे द्यायची नाहीत, त्यांची चूक काढायची नाहीच, त्यांच्या सांगण्याबद्दल शंकासुध्दा व्यक्त करायची नाही वगैरे बाबींचा त्या काळात थोडा अतिरेक होत असावा असे मला आता वाटते.

नक्किच, आज्ञाधारकपणा ह्या संस्काराने आमचं बालपण नासलं (अनेकांचं नासलं असणार ह्यात शंका नाही).

अं...

नक्किच, आज्ञाधारकपणा ह्या संस्काराने आमचं बालपण नासलं (अनेकांचं नासलं असणार ह्यात शंका नाही).

हे जरा अती आहे.
तुमचं बालपण नासलं म्हणजे नक्की काय झालं हो?
अन तुमच्या मुलांचं ते होऊ नये म्हणून तुम्ही काय करणार/करता आहात?
एका विशिष्ट वयापर्यंत तात्काळ आज्ञापालन होणे महत्वाचे - किंबहुना आवश्यकच्- आहे. धूम पळत सुटलेल्या लहानग्यास आईने ओरडून 'थांब!' अशी आज्ञा दिली तर ती का दिली वै. चर्चा होण्याआधी पाळलीच गेली पाहिजे. बाकी 'शिंगे फुटल्यानंतर' तुमचा अन् आमचाही आज्ञाधारकपणा कुठे जातो हे वेसांनल.

प्रति:

माझा प्रतिसाद थोडा अतिशयोक्ती स्वरुपाचा होता, तरीदेखिल त्याचे समर्थन असे -

अज्ञाधारकपणाची व्याख्या थोडी संदिग्ध आहे, तरिदेखिल रुढ अर्थी - "(फार??) विचार न करता सांगितलेले काम सांगितलेल्या पध्दतिने करणे", ह्यात "विचार" न केल्यामुळे, नुसतेच सांगकाम्या वर्तन केल्याने जे तोटे अपेक्षित आहेत त्याबद्दल मी "बालपण नासले" हा शब्दप्रयोग केला होता, आजकालच्या मुलांच्या मानाने पुर्वीच्या कुटुंबात वडिलधार्‍यांना (फार) उलट प्रश्न विचारायची मुभा नव्हती (हे सरसकटीकरण नव्हे), त्यामुळे विचारांना फार चालना मिळत नसे.

आजकालची मुले जे वागतात तेच योग्य वगैरे असे मला म्हणावयाचे नाही.

ठीक वाटला

लेख ठीक वाटला.

लेखाचे सार - स्वतःवर ताबा ठेवणे आणि दुस-यांचा विचार करणे अशा काही मूलभूत गोष्टी अंगी बाणवणे हे माझ्या मते एकाद्या माणसाला सुसंस्कृत होण्यासाठी पुरेशा असाव्यात. त्याने इतिहास, भूगोल, संस्कृत, गणित किंवा खगोलशास्त्राचा अभ्यास केला असणे वा नसणे हे गौण आहे.
हे असेल तर त्यासाठी इतिहास, भूगोल, संस्कृत, गणित किंवा खगोलशास्त्राचा अभ्यास केला असणे वा नसणे हे गौण आहे हे पटवण्यासाठी ओढून ताणून लेख लिहिल्यासारखे वाटले.

पानातले अन्न संपवणे ही एक गोष्ट झाली. श्रीमंतांनी किंवा सुखवस्तुंनी भरपूर जेवण करून ते वायाच घालवावे असा काही प्रचलित प्रवाद नाही. असे होत असावे आणि कित्येक घरांत असे होत नसावेही. जेथे असे होत नाही तेथे असेही सांगितलेले ऐकले आहे की "आपल्या देशात अनेकांना पोटभर खायला अन्न मिळत नाही. अन्नाची नासाडी करू नका. उरलं असेल तर ते कोणाला तरी खायला द्या." यात आपल्या देशात काय चालले आहे किंवा परिस्थिती कशी आहे हे माहित असणे आवश्यक असते.

चंद्रग्रहणाने कोणताही अपशकुन होत नाही तेव्हा त्याचे पूर्वजांनी अवडंबर माजवले तसे करण्याची आता गरज नाही हे पटवून देताना खगोलशास्त्राची जुजबी ओळख हवी.

जेव्हा माणसे संस्कार शिकवतात उदा. खोटे बोलू नये किंवा इतरांशी प्रेमाने वागावे किंवा न्याय बुद्धी ठेवावी. हे शिकवताना उदाहरणे देणे आवश्यक असते. शिवाजीला घडवताना जिजाबाई राम-कृष्णाच्या गोष्टी सांगत असा प्रवाद आहे. आज मुलांना शिवाजीच्या गोष्टी सांगितल्या जातात. पंचतंत्र, इसापनीती इ. गेली अनेक शतके चालत आल्या आहेत. उदाहरणे, दृष्टांत, दाखले दिल्याशिवाय कोणतीही गोष्ट पचनी पडणे कठीण असते.

अमुक शब्द असभ्य आहे तो बोलू नकोस असे सांगताना त्या शब्दासाठी योग्य शब्द कसा हे देखील सांगणे आवश्यक असते. म्हणजेच भाषेचे जुजबी ज्ञान संस्कार करणार्‍याला हवे.

माणसे कळत आणि नकळत इतिहास, भूगोल (मग तो परिसरातले ओळखीचे रस्ते असा का असेना), भाषा यांच्या नोंदी मनात टिपत असतात. त्या नोंदींचा वापर इतरांना शहाणे करण्यात करणे हा इतरांना सुसंस्कृत करण्याचाच भाग आहे.

एखादा गट हा स्वतःला इतरांपेक्षा सुसंस्कृत मानणे अगदी शक्य आहे. कारण सुसंस्कृतीची व्याख्या पिढी दरपिढी बदलत जाते. भारत बहुधा स्वतःला सद्य अफगाणिस्तानापेक्षा अधिक सुसंस्कृत समजत असावा. भारतापेक्षा युरोपिय राष्ट्रे स्वतःला सुसंस्कृत समजत असावी. हे नेहमीच चाललेले असते.

खुलासा

'इतिहासाचे संरक्षण' हा प्रियालीताईंनी लिहिलेला लेख "जो समाज आपला इतिहास सांभाळतो तोच सुसंस्कृत आणि समृद्ध समजला जातो." या वाक्यासभोवती होता.
त्यावर प्रतिसाद देतांना मी असे लिहिले होते. "या वाक्यातील 'इतिहास', 'सुसंस्कृत' आणि 'समृध्द' या शब्दांचे बदलत जाणारे अनेक अर्थ पाहिले असल्यामुळे त्यावर वेगळे धागे काढता येतील." यावरूनच त्यापैकी 'सुसंस्कृत' या शब्दावर प्रस्तुत लेख लिहिण्याची प्रेरणा मला मिळाली हे खरे आहे, पण तो 'ओढून ताणून' लिहिला आहे की त्यातील विचारांची मांडणी सुसंगत आहे हे प्रिय वाचकांनी ठरवावे. 'सुसंस्कृत' या शब्दाचे अर्थ स्थलकालानुसार कसे बदलत गेले आहेत आणि त्यातला एक बरोबर व दुसरा चूक असे करता येत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न मी केला आहे.

योग्य ते संस्कार घडवण्यासाठी विविध विषयांचे ज्ञान असणे हे महत्वाचे आहे, ते अभ्यासातून मिळवलेले असल्यास अधिक चांगले संस्कार केले जातात हा प्रियाताईंचा मुद्दा निर्विवाद आहे. पण 'काय असावे' हा माझ्या लेखाचा विषय नसून 'प्रत्यक्षात काय होते आणि आहे' हा आहे. लहानपणी मिळालेले काही संस्कार नंतर चुकीचे, निरुपयोगी किंवा कालबाह्य ठरल्यामुळे पाळले जात नाहीत हे सुध्दा ठीकच आहे असे प्रतिपादन मी केले आहे.

एक उदाहरण देतांना "श्रीमंत लोक अन्नाची नासाडी करतातच" असे म्हणण्याचा माझा उद्देश नव्हता. तसे असणे शक्य आहे हे दाखवून "पानातील अन्न संपवण्याचे संस्कार मध्यमवर्गातील मुलांवर केले जातात" हे लिहिले होते. जेवणावळींमध्ये नको असतांना सुध्दा आग्रहाने पानात पक्वान्ने वाढली जातात आणि पानात वाढलेले संपवायलाच पाहिजे असे म्हणत ती खाल्ली जातात हे माझ्या आताच्या मते चूक आहे असे मला सुचवायचे होते. "अन्न वाया घालवू नये" या कारणासाठी केलेल्या संस्कारामुळे जास्तीचे खाल्लेले अन्न अखेर वायाच जाते हे मला दाखवायचे होते.

'इतिहासाचे जुजबी ज्ञान असणे' आणि 'इतिहास सांभाळणे' यात माझ्या मते बराच फरक आहे. जो समाज इतिहास सांभाळतो तो सुसंस्कृत असतो यात शंका नाही, पण जो समाज हे (इतिहास सांभाळण्याचे) काम करत नाही त्याची गणना सुसंस्कृत म्हणून केली जात नाही असे म्हणणे जरा शिष्टपणाचे वाटते.

लेख आवडला.

श्री. घारे यांच्या लेखनावरून त्यांच्या वयाचा अंदाज येतो. या वयाचे "आम्ही म्हणतो तेच संस्कार" असं म्हणणारेच लोकं जास्त भेटतात; पण खटकणार्‍या गोष्टी नेहेमी करणारे लोकंही सुसंस्कृत आहेत, असं म्हणणार्‍या श्री. घारे यांची संस्कृती आणि संस्कारांची व्याख्या पटली आणि आवडली.

 
^ वर