विज्ञाननिष्ठा आणि निरीश्वरवाद
विज्ञानाच्या मार्गावर चालणा-या लोकांनी निरीश्वरवादी असावे अशी काही लोकांची अपेक्षा असते. त्यांनी (विज्ञाननिष्ठांनी) देवाला नमस्कार करणे ही विज्ञानाशी प्रतारणा आहे असा सूर या (टीकाकार) लोकांच्या बोलण्यातून किंवा लिहिण्यातून निघतो. उलटपक्षी सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, विश्वाचा कर्ताधर्ताहर्ता अशा ईश्वराचे अस्तित्व निर्विवाद आहे अशी गाढ श्रध्दा अधिक लोक बाळगतात. त्यांच्यातील काही जण अधून मधून उगाच विज्ञानाच्या नावाने खडे फोडत असतात. "देवदानवा नरे निर्मिले हे मत लोकां कवळू द्या।" अशी तुतारी फुंकणारे केशवसुत किंवा "धर्म ही अफूची गोळी आहे." असे सांगून देवासकट धर्माचे उच्चाटन करायला निघालेला माओझेदोंग (माओत्सेतुंग) यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात काम केले असल्याचे ऐकिवात नाही. नास्तिक विचारसरणी बाळगणारे लोक इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, भाषा अशा इतर विषयांचे विद्यार्थी किंवा निरक्षरसुध्दा असू शकतात. अमेझॉनच्या अरण्यामध्ये झाडावर झोपणारे किंवा उत्तर ध्रुवावरील बर्फात इग्लू बांधून राहणारे काही लोक अद्याप शिल्लक असतील तर ते नास्तिक असण्याचीच शक्यता मला जास्त वाटते.
विज्ञानाचा आणि परमेश्वरावरील अविश्वासाचा थेट संबंध दिसत नाही. पण विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसारामुळे लोकांच्या सामान्यज्ञानाच्या कक्षा विस्तारल्या. अज्ञानाचा अंधार काही प्रमाणात नाहीसा झाल्यामुळे अज्ञाताची भीती कमी झाली, लोकांचा आत्मविश्वास वाढला. देवाच्या नावावर आणि त्याच्या कोपाच्या धाकामुळे चालत आलेल्या अनिष्ट प्रथांचे पालन न करण्याचे धारिष्ट्य ते दाखवू लागले. "हे लोक मुजोर झाले आहेत, देवालासुध्दा ते जुमानत नाहीत" अशा त्यावरील प्रतिक्रिया परंपराग्रस्त मंडळींकडून आल्या. यामुळे विज्ञानाचा ईश्वराला विरोध आहे असा समज प्रचलित झाला आणि तो टिकून आहे. माझ्या लहानशा जगात आलेला त्यासंबंधीचा माझा अनुभव आणि माझे निरीक्षण यांच्या आधारे या समजाबद्दल मी या लेखात लिहिणार आहे. देवधर्म, श्रध्दा, अंधश्रध्दा वगैरेंवर पूर्वीही अनेक वेळा चर्चा होऊन गेल्या आहेत. दोन्ही पक्ष आपापल्या मुद्यांवर ठाम असल्यामुळे त्यात स्टेलमेट होते. दुसरा कसा चूक आहे हे दाखवण्याच्या नादात कधीकधी याचे पर्यवसान परस्परावर आरोप-प्रत्यारोप, एकमेकांच्या लिखाणाचा विपर्यास, एकमेकांना शब्दात पकडणे वगैरेमध्ये होऊ लागल्यावर ते (आणि वाचक) त्याला कंटाळतात. या सगळ्याची पुनरावृत्ती करणे हे या लेखाचे प्रयोजन नाही. वैचारिक, तात्विक किंवा सैध्दांतिक पातळीवरून खाली येऊन जमीनीवरील प्रत्यक्ष परिस्थिती (ग्राउंड रिअॅलिटी) काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न मी या लेखात करणार आहे.
अणुशक्ती विभागातील वैज्ञानिक, तंत्रज्ञ आणि त्यांना सहाय्य करणारे इतर कर्मचारी यांच्या वसाहतीचे नाव 'अणुशक्तीनगर' असे आहे. या वसाहतीत वास्तव्याला राहिलेल्या लोकांमधून काही जण या क्षेत्रामधील सर्वोच्च पातळीपर्यंत पोचलेले आहेत. अनेक लोकांना त्यांच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. अशा बुध्दीमान लोकाच्या सहवासात तीन दशके राहण्याची संधी मला मिळाली, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करणा-या अनेक विद्वानांबरोबर व्यक्तीगत परिचय झाला, अनेक विषयांवर त्यांच्याशी संवाद साधता आला, त्यांच्या सहवासात दीर्घकाल राहिल्यामुळे त्यांच्या विचारांचा पगडा माझ्या मनावर उमटला असणे साहजीक आहे. त्या सर्वांमध्ये पूर्ण मतैक्य होते अशातला भाग नाही. पण सर्वांच्या मतांचा ढोबळ विचार करता त्यातून मला जे जाणवले आणि समजले ते लिहिण्याचा हा प्रयत्न आहे.
आपण 'निधर्मी' आहोत असे त्यांच्यापैकी कोणीही अधिकृतरीत्या कागदोपत्री नमूद केले असल्याचे मी तरी ऐकले नाही. माझ्या माहितीमधील प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या धर्माची होती. त्याचा वृथा अभिमान ते एरवी मिरवत नसले तरी त्याचे एकादे तरी चिन्ह त्यांच्या घरात किंवा वागण्यात दिसत असे. गणेशोत्सव, दुर्गापूजा, कृष्णजन्माष्टमी, अय्यप्पापूजा यासारखे उत्सव सार्वजनिकरीत्या आणि दिवाळी, पोंगल, ओणम, लोहडी वगैरे सण वैयक्तिक पण मोठ्या प्रमाणावर इथे साजरे केले जात. अर्थातच त्या निमित्याने विवक्षित देवतांच्या प्रतिमांचे पूजन आणि त्यांची आराधना होतच असे. मूर्तीपूजा न करणारे धर्मीय त्यांच्या सणांच्या काळात त्यांच्या परंपरागत पध्दतीने ईश्वराची प्रार्थना करीत. बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या परिसरात मी अनेक वेळा गेलो आहे. त्या ठिकाणी देखील मला असेच दृष्य दिसले. एका वर्षी मी ख्रिसमसच्या काळात इंग्लंडमध्ये आणि एकदा अमेरिकेत होतो. दोन्ही वेळी मी कुतूहलापोटी स्थानिक चर्चला भेट दिली होती. त्या वेळी तिथे अलोट गर्दी होत होती. वैज्ञानिक, तंत्रज्ञ, डॉक्टर वगैरे मंडळी या उत्सवात सहभाग घेत नसल्याचे मी कुठेच ऐकले नाही. विज्ञानाकडे वळल्यामुळे जर माणसे सरसकट नास्तिक होत असली तर त्यांच्या वसाहती हे अंधश्रध्दा निर्मूलन संघटनांचे भक्कम किल्ले (गढ) व्हायला पाहिजे होते, पण आमच्या वसाहतीत मला त्यांचे अस्तित्व फारसे जाणवले नाही.
कार्यालये, कार्यशाळा आणि प्रयोगशाळांमध्ये काम करतांना हीच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ मंडळी त्यात मग्न होऊन जात असत. काही लोकांना आपला प्रपंचच नव्हे तर तहानभूकसुध्दा विसरून तास न् तास संशोधनकार्यात गढून गेलेले मी अनेक वेळा पाहिले आहे. त्यातील आव्हाने पेलण्यासाठी आणि अडचणींचे डोंगर पार करण्यासाठी ते स्वतःच कसून मेहनत करीत, त्यासाठी कोणी देवाचा धावा केलेला मला दिसला नाही. संशोधन किंवा निर्मितीमधील प्रत्येक काम त्या ठिकाणी वैज्ञानिक आणि शास्त्रशुध्द पध्दतीने केले जात असे. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयी त्यांच्या ठायी असलेल्या निष्ठेबद्दल शंका घेता येणार नाही. परिसंवाद, चर्चासत्रे वगैरेंमध्ये विषयाला धरून विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील सिध्दांतांच्या आधारेच वाद, विवाद, संवाद वगैरे होत असत. देवाचे असणे किंवा नसणे यापैकी कशाचाच उल्लेख त्यात येत नसे. त्या ठिकाणी ही बाब पूर्णपणे अप्रस्तुत असे.
वसाहतीमध्ये होणारे उत्सव आणि समारंभ यात भाग घेतांना मात्र देवाचा उल्लेख करतांना कोणाला संकोच वाटत नसे किंवा त्यात आपले काही चुकते आहे अशी अपराधीपणाची भावनाही वाटत नसे. अर्थातच 'विज्ञान' आणि 'ईश्वर' या एकमेकांच्या विरोधी 'म्यूच्युअली एक्स्क्ल्यूझिव्ह' संकल्पना आहेत असे मानले जात नसे. अणुशक्ती आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष असलेले एक ज्येष्ठ वैज्ञानिक आमच्या वसाहतीत खूप वर्षांपूर्वी झालेल्या एका समारंभात प्रमुख पाहुणे होते. त्यांनी केलेल्या भाषणाचा काही भाग मला अजून आठवतो. त्या वेळी त्यांनी असे सांगितले, "आमची कार्यालये, प्रयोगशाळा वगैरेंमध्ये काम करण्यासाठी काही नियम असतात, पोलिस अधिकारी वाहतुकीचे नियम करतात, तसेच नागरिकांसाठी सरकार कायदे कानून करते. यांचे पालन कशा प्रकारे केले जाते हे पाहण्यासाठी खास यंत्रणा उभ्या कराव्या लागतात, तरीसुध्दा त्यांचे उल्लंघन होण्याचे प्रकार घडतच असतात, हे नियम वेळोवेळी बदलले जातात किंवा ते बदलावे लागतात. पण विज्ञानातले नियम मात्र कधीही कोणीही तोडू किंवा बदलू शकत नाही. अमेरिकेला किंवा चीनला जाल तर तिथले काही कायदे वेगळे दिसतील, पण विज्ञानविषयामधील नियम तेच्या तेच असतात. विज्ञानामधील कोणत्याही समीकरणातला 'कांन्स्टंट' हा काँन्स्टंटच राहतो. अशा ज्या अगणित नियमांच्या आधारावर या विश्वाचे व्यवहार अचूकपणे आणि अव्याहतपणे चालत राहिलेले आहेत त्यामधील सातत्य कशामुळे किंवा कोणामुळे आले? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात परमेश्वर या संकल्पनेचा आधार मिळतो. वगैरे वगैरे ..." थोडक्यात म्हणजे अगम्य आणि अतर्क्य अशा गोष्टींची जबाबदारी अखेरीस देवावर सोपवणे वैज्ञानिकांनाही भाग पडते किंवा सोयिस्कर वाटते.
माझ्या कामापुरता विचार करतांना असे जाणवते की कित्येक बुध्दीमान आणि तज्ज्ञ लोकांचे ज्ञान, विचार, कल्पना, अनुभव आणि कौशल्य यांचा उपयोग करून आणि अनेक प्रकारची किचकट आकडेमोड व विश्लेषणे करून आम्ही नवनवी स्वयंचालित यंत्रसामुग्री बनवून घेत असू. पण आम्ही कागदावर ओढलेल्या रेघोट्यांवरून त्याचे सर्व भाग कारखान्यांमध्ये तयार झाले, ते एकमेकांशी नीटपणे जुळले, त्यातून तयार झालेले नवे यंत्र पहिल्याच प्रयत्नात सुरू झाले आणि अपेक्षेप्रमाणे सुरळीतपणे काम करायला लागले असे कधीच झाले नाही. आधुनिक तंत्रज्ञानाच्या इतर क्षेत्रात काम करणा-या लोकांचा अनुभवसुध्दा असाच असतो असे त्यांच्याकडून कळत असे. यामागील कारणे किंवा त्यावरील उपाययोजना हा या लेखाचा विषय नाही. याच्या उलट एका लहानशा मुंगीच्या शरीरातील श्वसन, पचन, रक्ताभिसरण वगैरे गुंतागुंतीच्या संस्था, तिच्या ठायी असलेली दृष्टी व घ्राणेंद्रियांसारखी ज्ञानेंद्रिये, पाय व तोंडासारखी कर्मेंद्रिये आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवणारा, आकलनशक्ती आणि स्मरणशक्ती बाळगणारा निर्णयक्षम असा मेंदू हे सगळे किती सूक्ष्म असतात, त्यांची रचना कशा प्रकारची असते आणि त्यांचे कार्य कसे चालते यावर खूप संशोधन केले गेले आहे. पण अजूनपर्यंत ते पूर्णपणे समजलेले असावे असे मला वाटत नाही. हे सगळे आपल्या आपण होत असते असे मान्य करणे जड जातेच. विचारपूर्वक आणि योजनापूर्वक रीतीने करूनसुध्दा आपली तुलनेने सोपी असलेली कामे पूर्णपणे मनासारखी होत नाहीत आणि असंख्य प्राणीमात्रांच्या शरीरातल्या इतक्या गुंतागुंतीच्या क्रिया आपोआप कशा चालत रहातात याचे आश्चर्य वाटते.
आपल्या शरीरातील बाह्य आणि अंतर्गत अवयवांच्या रचना आणि कार्यप्रणाली थक्क करतातच, त्या शिवाय त्यात किती प्रकारच्या ग्रंथी असतात आणि त्या ठराविक वेळी ठरलेली निरनिराळी द्रव्ये योग्य त्याच प्रमाणात निर्माण करून त्यांचा पुरवठा आपल्या शरीराला करत असतात यांचा अंत लागत नाही. आपण खाल्लेल्या अन्नाचा एकत्रित रस रक्तामधून शरीरभर फिरत असतो. त्यातला काही भाग त्या ग्रंथींपर्यंत जाऊन पोचतो आणि त्यातील नेमकी द्रव्ये शोषून घेऊन या ग्रंथी विशिष्ट प्रकारचे रस तयार करून ते विशिष्ट अवयवांकडे पाठवतात आणि ते रस योग्य त्या जागेपर्यंत जाऊन पोचतात. या गोष्टी कशा घडतात हे आपल्या आकलनाच्या पलीकडेच नव्हे तर कल्पनेच्या पलीकडे असल्याचे जाणवते. आपल्याच शरीरात हे काम अविरतपणे बिनबोभाट चाललेले असते, पण आपल्याला त्याची जाणीवसुध्दा नसते आणि काही कारणाने त्यात खंड पडला तरच त्याचे परिणाम आपल्याला समजतात. कदाचित यामधील गुंतागुंत, विविधता आणि अनिश्चितता यामुळेच काही डॉक्टर मंडळी "मी इलाज करतो, 'तो' बरे करतो (आय ट्रीट, 'ही' क्युअर्स)" असे सांगणारे फलक दवाखान्यात लावत असावेत. प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ आणि शल्यक्रियाविशारद स्व.डॉ.नितू मांडके यांची टीव्हीवरील एक मुलाखत मला चांगली आठवते. त्यात त्यांनी सांगितले होते, "कोणत्या क्षणी कोणत्या व्यक्तीला कोणता आजार होईल, त्या वेळी त्याला कोणता डॉक्टर भेटेल, त्याने दिलेल्या औषधोपचाराला त्या रुग्णाचे शरीर कसा प्रतिसाद देईल या सगळ्याबद्दल काहीही निश्चितपणे सांगता येत नाही." आभाळाकडे बोट दाखवत ते म्हणाले होते, "हे सगळे 'तो' ठरवतो." त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या बाबतीतच धक्कादायक असे काही अघटित घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही त्या वेळी कोणाच्या मनाच आली नसेल.
गेल्या आठवड्यात मला आलेल्या एका लहानशा अनुभवाचे कथन मी एका लेखात केले होते. ध्यानीमनी नसतांना अचानक एकादे संकट ओढवावे किंवा खूप मोठ्या संकटाची चाहूल लागावी आणि त्यातून सुटका व्हावी असे अनेक अनुभव बहुतेक लोकांच्या आयुष्यात घडत असतात. एकादा अपघात होऊन गेल्यानंतर त्यातून (योगायोगाने की सुदैवाने की ईश्वरी कृपेने?) बचावलेल्या लोकांच्या (मिरॅक्युलर एस्केपच्या) अनेक गोष्टी बाहेर येतात. प्रत्यक्ष अॅक्सिडेंट्सच्या तुलनेत थोडक्यात वाचण्याची ('नियर मिस'ची) संख्या मोठी असते असा निदान माझा अनुभव आहे. त्यामुळे कोणी अदृष्यपणे हे घडवून आणत असावे की काय? असा विचार मनात येणे स्वाभाविक असते. हा निव्वळ योगायोगाचा भाग असणार हे बुध्दीला पटले तरी त्याने मनाचे पूर्ण समाधान होत नाही. शिवाय आपला कोणी अज्ञात आणि अदृष्य पाठीराखा (किंवा कर्ता करविता) आहे ही सुखद कल्पना मनाला धीर देते, मनाचा समतोल सांभाळायला मदत करते. मनामधील घालमेलींचा शरीरावर परिणाम होतो असे डॉक्टरही सांगतात. त्यामुळे याचा प्रत्यक्ष लाभ होऊ शकतो. हे सारे खूप किचकट आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीतले धागेदोरे आणि त्यांची गुंतागुंत निराळी असते. पण बहुतेक वेळा शेवटी त्याचा परिणाम देवावरील विश्वासाकडे झुकण्यात होतो. 'त्या'चे कार्यक्षेत्र 'संकटमोचन' एवढेच न राहता विश्वाचा सारा पसारा सांभाळण्यापर्यंत विस्तारते. तसेच अनपेक्षित असे विपरीत काही घडले आणि त्याची कारणे समजली नाहीत तर त्याची जबाबदारी 'त्या'च्यावर टाकणे हे त्या विषयावर जास्त विचार करण्यापेक्षा कमी कष्टप्रद असते. घरातील आणि समाजातील वातावरणामुळे ही गोष्ट अंतर्मनात ठसलेली असते हे बहुधा त्याचे मुख्य कारण असावे.
मला आश्चर्यकारक वाटणारी आणखी एक गोष्ट आहे. स्वार्थ हा सर्व प्राणीमात्रांचा मूळ स्वभाव असावा असे मला तरी दिसते. मुंग्या, झुरळे, उंदीर, चिमण्या वगैरे जीव बेधडक आपल्या घरात शिरतात आणि त्यांना मिळेल त्यातले हवे असेल ते भक्षण करतात किंवा घेऊन जातात. जंगलामधील हिंस्र पशू मिळेल त्या अन्य पशूंची शिकार करून त्यांना खातात, तसेच शाकाहारी पशू त्यांना सापडलेल्या वनस्पतींच्या पानाफुलाफळांना खाऊन फस्त करतात. "हे आपले नाही, परक्याचे आहे" असा विचार ते करत नसणार. मनुष्यप्राण्याची मूळ वृत्ती याहून निराळी असण्याचे शास्त्रीय कारण मला दिसत नाही. तरीसुध्दा दुस-यांचा विचार, परोपकार, त्याग, बलिदान वगैरे करावे असे माणसांना का वाटते? तात्कालिक विचार करता माणसामधील चांगुलकीचा त्याला प्रत्यक्ष लाभ होण्यापेक्षा थोडीशी हानी होण्याची अधिक शक्यता दिसत असते, दुस-याला मदत करणे याचा अर्थ आपल्या मालकीचे काही तरी त्याला देणे किंवा त्याच्या भल्यासाठी स्वतःला कष्ट देणे असा होतो, तरीसुध्दा माणसे इतरांच्या मदतीला का धावतात? काही दुष्ट आणि लबाड लोक यशस्वी होऊन मजेत राहतात आणि त्यांच्या तुलनेत प्रामाणिक सरळमार्गी लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो असे दिसत असतांना माणसे चांगली का वागतात? या प्रश्नांचे तर्कशुध्द उत्तर मला मिळत नाही, त्यामुळे अशा सत्प्रेरणा त्यांच्या मनात उत्पन्न करणारी एकादी अगम्य अशी (ईश्वरी) शक्ती त्यामागे असावी असे कोणी सांगितले तर ते थोडेसे पटते. या सत्प्रेरणा दुष्टांच्या मनात का निर्माण होत नाहीत या प्रश्नाचे उत्तर मात्र माझ्याकडे नाही.
शेवटी देवालाच शरण जाणार असलात तर तुमच्या विज्ञानाच्या अभ्यासाचा उपयोग काय? असा प्रश्न उपस्थित होणे साहजीक आहे. हा प्रश्न स्वतःलासुध्दा पडतो आणि त्याचे उत्तर सुचते. ते सर्वांना मान्य होईल अशी माझी अपेक्षा नाही. विज्ञानाच्या अभ्यासातून मला जेवढे समजले त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कोणताही मानव शून्यामधून धुळीचा एक कणसुध्दा तयार करू शकत नाही किंवा त्याला नष्ट करू शकत नाही (काँझर्वेशन ऑफ मॅटर). त्यामुळे असे चमत्कार करून दाखवणा-या बाबांच्या हातचलाखीवर मी विश्वास ठेवत नाही. सूर्य, चंद्र, शनी, मंगळ वगैरे आकाशात फिरत राहणा-या (निर्जीव) गोलांची शास्त्रीय माहिती उपलब्ध झालेली असल्यामुळे राग, लोभ, प्रेम, द्वेष, दया, इच्छा, अपेक्षा यासारख्या मानवी भावना त्यांना असण्याची कणभर शक्यता मला दिसत नाही आणि माणसांच्या वैयक्तिक जीवनात ते उगाच लुडबूड करत नाहीत याची मला खात्री आहे. 'पॉझिटिव्ह' किंवा 'निगेटिव्ह व्हायब्रेशन्स', 'आत्मिक' किंवा 'प्राणिक' प्रकारची 'कॉस्मिक एनर्जी' असल्या भंपक शब्दांनी मी फसत नाही. मला आजारपण आले तर मी त्याच्या निवारणासाठी डॉक्टरकडेच जातो. 'सिध्दीं'द्वारे तो 'छूमंतर' करणा-यांकडे जात नाही. पुराणातील 'सुरस आणि चमत्कृतीपूर्ण कथां'ना मी त्यापेक्षा वेगळे समजत नाही. देवाने मला ढीगभर दिले तर त्यातले चिमूटभर मी त्याला (म्हणजे त्याचे प्रतिनिधित्व करणा-याला) परत देईन असली सौदेबाजी मी करत नाही. उपाशी राहून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने मी स्वतःला कष्ट करून घेण्यामुळे देवाला आनंद होत असेल आणि तो माझ्यावर अधिक कृपावंत होईल असे मला वाटत नाही. विज्ञानाच्या अभ्यासामुळे मिळालेल्या चिकित्सक वृत्तीची आणि त्यानुसार करत असलेल्या आचरणाची अशी असंख्य उदाहरणे देता येतील.
पण कधी कधी अनाकलनीय, विलक्षण असे अनुभव येतात आणि त्यांचे समर्पक स्पष्टीकरण मिळत नाही. शरीरात त्राण नसते, मनामध्ये अगतिकता आलेली असते, विचारशक्ती बधिर झालेली असते, स्मरणशक्ती क्षीण झालेली असते, अशा वेळी देवाची आठवण कशी होते हे सुध्दा पहायला गेल्यास एक गूढ आहे. पण हा अनुभव नाकारता येत नाही. तसेच त्यातून मनाला दिलासा मिळत असला तर तो नाकारण्याचा हट्ट तरी कशाला? बालपणापासून अंतर्मनात नकळत साठवला गेलेला आस्तिकतेचा विचार त्या वेळी समोर येतो आणि मनाला पटतो. हा सोपा मार्ग असेलही, पण तो सोयीचा असेल आणि दुस-या कोणाला त्याचा उपसर्ग होत नसेल तर तो चोखाळायला काय हरकत आहे? आजूबाजूच्या बहुतेक लोकांच्या बाबतीत असेच होत असावे. अखेर विज्ञानाची उपासना हा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, संपूर्ण जीवन नव्हे, हे सत्य आहे. जीवनाच्या सर्व पैलूंनी एकमेकांशी सुसंगत असायलाच पाहिजे असे प्रत्यक्षात झालेले दिसत नाही, त्यामुळे असा आग्रह धरण्यात अर्थ नाही. त्यातले विविध रंग हेच कदाचित त्याचे वैशिष्ट्य असेल ! कुंपणावर बसणे किंवा दोन्ही दगडावर हात ठेवणे असे त्यातून वाटले तरी आजूबाजूला सगळे तेच करतांना दिसतात.
थोडक्यात सांगायचे तर विज्ञानावरील निष्ठा आणि आस्तिकपणा यामधील फक्त एकाचीच निवड करण्याची गरज नाही. बुध्दीच्या आवाक्यापर्यंत विज्ञानावर निष्ठा आणि त्याच्या पलीकडे अंतर्मनात वसलेला परमेश्वरावरील विश्वास असे दुहेरी धोरण अवलंबणारे मोठ्या संख्येने दिसतात. विज्ञानाच्या क्षेत्रामधील संशोधनातून जगापुढे मांडले गेलेले निसर्गाचे नियम हे त्या जगन्नियंत्या परमेश्वराने बनवले आहेत असा विचार केल्यास त्याबद्दल असलेली निष्ठा हा देवावरील श्रध्देचा एक भाग (सबसेट) होतो असेही म्हणता येईल आणि त्यात विसंगती वाटणार नाही. या उलट पाहता परमेश्वराचे अस्तित्व प्रयोगातून सिध्द करता येत नाही आणि त्याबद्दल केलेली विधाने पुरेशी तर्कशुध्द वाटत नाहीत म्हणून ते नाकारणे विज्ञानावरील निष्ठेशी सुसंगत आहे असे म्हणता येईल. मन आणि बुध्दी यांचे कार्य नेमके कसे चालते हे जेंव्हा (आणि जर) विज्ञानाद्वारे स्पष्टपणे कळेल तेंव्हाच याचा अधिक उलगडा होईल.
(या लेखनाचा विषय निवडतांना मला कोणता पर्याय निवडायचा हे समजले नाही. त्यामुळे विरंगुळा निवडला. )
Comments
रोष
आपण विज्ञाननीऽष्ठ् लोकांच्या रोषास पात्र होत आहात.
अगम्य व अतर्क्य गोष्टींची उकल करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातुन विज्ञान पुढे पुढे सरकत जाते
सहमत आहे. पण या दुहेरी धोरणाला काही कडवे विज्ञाननिष्ठ दुतोंडीपणा असे म्हणतात.
प्रकाश घाटपांडे
वाचला...
विचार करण्यासारखा वाटला.
इंटलिजन्ट डिझाइन?
आपली विज्ञानाची पार्श्वभूमी बघता हा लेख अतिशय महत्वाचा आहे, पण आपण लेखात मांडलेले मत हे विचारातून न येता भावनेतून अधिक आले आहे असे माझे मत आहे. मागे ह्या विषयावर उपक्रमवर अनेक चर्चा घडल्या आहेत (रिटेंची आठवण झाली), त्यामुळे इथे कितपत चर्चा होइल ह्याबबत मी साशंक आहे, तरी मी माझे मत खाली देत आहे.
सहमत.
ह्याला देव म्हणण्यास असहमत.
तुमच्या मते अस्तिकता ही इंटलिजन्ट डिझाइन आहे, कारण ते तुमच्या तर्कापलिकडे आहे, सर्वसाधारण शिक्षित समाज ह्याला श्रध्दा असे म्हणतो, पण ह्या गणिताने जसा जसा तर्क सापडत जाणार तसा तसा देव अधिक दुर होत जाणार, तुम्ही वर नमूद केलेली गुंतागुंत ही तुमच्या तर्काची मर्यादा असू शकते, त्याला देवाचे नाव देणे हे ही ठीकच आहे, इथे असलेला हा देव एक व्हेरीएबल-सारखा आहे, तो कायम बदलत जाणार आहे.
तुमच्या ह्या अस्तिकतेचा एक कंगोरा नास्तिकता आहे, तुम्ही तुमच्या सोयीने नास्तिक आहात,आस्तिकतेचे अनेक पैलू/नियम ऑर्थोडॉक्स म्हणून तूम्ही कदाचित नाकाराल, पण एक निअर-डेथ अनुभव आणि त्याचा तुम्हाला न सापडलेला तर्क तुम्हाला त्याकडे सोयिस्कर रित्या देव म्हणून पहावयास लावतो.
नास्तिकांच्या(कट्टर?) मते विज्ञानवादी विचारसरणी ही जिवन जगण्याची एक पध्दत आहे, अनपेक्षित, अतार्किक घटनांकडे ते यदृच्छा/अज्ञात घटना म्हणून बघतात.
माझ्या मते एकूणच अस्तिकता हा फार गुंतागुंतीचा विषय आहे, त्याविषयीचे अनेक अनुभव विचारांना दिशा देतात, ती दिशा ज्ञानापासून दूर जाणारी नाही नं? हे सतत तपासत रहावे. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निरुपद्रवी अस्तिकतेला विरोध करणे गैर वाटते.
लेख
लेख वाचल्यावर एक प्रश्न पडला, तुम्हाला जमेल तेव्हा/तर उत्तर द्या.
तुम्हाला आज इतकी वर्षे ज्या विचारांनी साथ दिली आहे ती साथ या अनुभवानंतर सोडण्याचा विचार तुमच्या मनात का आला आहे?
अधिक काही वेळाने लिहीन.
तरी थोडेफार सुसंगत असलेले बरे
(एरव्ही पूजा-अर्चा न करणार्या कित्येक लोकांचा उत्सवांत हसतखेळत सहभाग असतो - तुमच्याप्रमाणे माझेही असे निरीक्षण आहे.)
जोवर आयुष्याचे वेगवेगळे पैलू एकाच प्रसंगी वेगवेगळे निर्णय सांगत नाहीत, तोवर पैलू सुसंगत नसले, तरी चालेल. मात्र एकाच प्रसंगात दोन वेगवेगळे पैलू लागू झाले तर? काय क्रिया करावी? अशी द्विधा उत्पन्न झाली, मनस्ताप झाला, तर थोडीफार सुसंगती बरी.
प्रतिसाद
सर्व प्रतिसाद कर्त्यांचे आभार. त्यांनी मांडलेले मुद्दे आणि त्यावरील माझ्या प्रतिक्रिया खाली दिल्या आहेत.
आपण विज्ञाननीऽष्ठ् लोकांच्या रोषास पात्र होत आहात... दुहेरी धोरणाला काही कडवे विज्ञाननिष्ठ दुतोंडीपणा असे म्हणतात.
मला याची कल्पना आहे. विज्ञाननिष्ठ लोक काय म्हणतील यापेक्षा विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे बहुसंख्य लोक काय म्हणतात हे मी या लेखात मांडले आहे. माझ्या नावाने लिहिले असले तरी हे प्रातिनिधिक विचार आहेत.
अगम्य व अतर्क्य गोष्टींची उकल करण्यासाठी केलेल्या प्रयत्नातुन विज्ञान पुढे पुढे सरकत जाते
खरे आहे. पण आपल्या क्षेत्रातील अगम्य गोष्टींची उकल करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. माझ्या कामातील मला न समजलेल्या गोष्टी मी अभ्यास, चर्चा, मनन, विचार, प्रयोग वगैरेंमधून समजून घेण्याचा प्रयत्न करतच आलो आहे आणि त्यात कधीही देवाला मध्ये आणले नाही. पण जीवनामधील अगम्य प्रश्न वैद्यकशास्त्रासारख्या अनोळखी विषयातसुध्दा येतात. त्यांची उत्तरे मी कोठून आणि कशी आणणार?
आपण लेखात मांडलेले मत हे विचारातून न येता भावनेतून अधिक आले आहे असे माझे मत आहे
शक्य आहे. यात बुध्दीपेक्षा मनाचा अधिक वाटा आहे हे मी नमूद केलेले आहेच. पण मनसुध्दा आपल्याच व्यक्तीत्वाचा भाग असतो. त्याला नाकारता येत नाही. हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न मी लेखात केला आहे.
इथे कितपत चर्चा होइल ह्याबबत मी साशंक आहे
ती घडावी हे या लेखाचे प्रयोजन नाही हे मी स्पष्ट केले आहेच. काय बरोबर आणि काय चूक याची तात्विक चर्चा करणे हा या लेखाचा उद्देश नसून विज्ञानाच्या क्षेत्रामधील लोक कसा विचार करतात याचा प्रत्यक्ष अनुभव सांगणे हा आहे. इतर कोणाचा अनुभव यापेक्षा वेगळा असू शकेल. ते लोक असा विचार का करत असावेत किंवा त्यात बदल आणणे आवश्यक असल्यास तो कसा आणता येईल यावर चर्चा होऊ शकते.
ह्याला देव म्हणण्यास असहमत.
देव या शब्दाच्या असंख्य व्याख्या आहेत. सर्वसामान्य लोक याला देवाची करणी किंवा लीला असे म्हणतात.
देव एक व्हेरीएबल-सारखा आहे, तो कायम बदलत जाणार आहे.
देव कसा आहे याबद्दल मी काही सांगू शकत नाही. देवाची व्याख्या एक व्हेरीएबल-सारखी आहे, ती कायम बदलत गेली आहे आणि जाणार आहे.
तुमच्या ह्या अस्तिकतेचा एक कंगोरा नास्तिकता आहे,
कशाला कशाचा कंगोरा आहे हे सांगता येणार नाही. या दोन्हींचे सहअस्तित्व मी अनेक लोकांच्या विचारसरणीमध्ये असलेले पाहिले आहे. हे महत्वाचे आहे.
तुम्हाला आज इतकी वर्षे ज्या विचारांनी साथ दिली आहे ती साथ या अनुभवानंतर सोडण्याचा विचार तुमच्या मनात का आला आहे?
मुळीच नाही. अलीकडचा अनुभव मला अगदी नवा नाही. याहून अधिक बिकट प्रसंग यापूर्वी माझ्यावर येऊन गेलेले आहेत. इतर वेळी जो विचार आपण शांतपणे बुध्दीच्या व तर्काच्या जोरावर करत असतो, त्यापेक्षा निराळे विचार अशा आणीबाणीच्या वेळी मनात येतात आणि नंतर ते फारसे चुकीचे वाटत नाहीत. तसेच हे बहुसंख्य लोकांच्या बाबतीत घडत असलेले दिसते. ही वस्तुस्थिती प्रामाणिकपणे मान्य करणे हा या लेखाचा गाभा आहे.
या व्यतिरिक्त आणखी एक मुद्दा मी मांडला आहे. कोठलीही आणीबाणी, संकट अडचण वगैरे नसतांना उत्सव, समारंभ अशा प्रसंगी कित्येक वैज्ञानिक लोकसुद्धा देवाची पूजा, आरती, भजन वगैरेमध्ये उत्साहाने सामील होतात. त्या वेळी त्यांच्या चेहेर्याबरील भाव पाहता त्यांना त्यात नक्कीच आनंद मिळत आहे असे दिसते. त्याचा उगम कशातून होत असेल? याचे उत्तर मनोवैज्ञानिकच देऊ शकतील.
समजले
>ही वस्तुस्थिती प्रामाणिकपणे मान्य करणे हा या लेखाचा गाभा आहे.
समजले, आणि गैरसमज दूर केल्याबद्दल आभार.
>इतर वेळी जो विचार आपण शांतपणे बुध्दीच्या व तर्काच्या जोरावर करत असतो, त्यापेक्षा निराळे विचार अशा आणीबाणीच्या वेळी मनात येतात >आणि नंतर ते फारसे चुकीचे वाटत नाहीत.
पटण्यासारखे आहे.
देवाचा उगम बहुदा आपल्या मनात आहे. आस्तिकतेचा वापर रोजच्या आयुष्यातील गोष्टींचा त्रास कमी करण्यासाठी होतो असे वाटते. माझ्या ओळखीची एक सुविद्य अमेरिकन स्त्री विमानप्रवासात असताना अपघात होऊन मरण्याची प्रचंड भिती वाटते म्हणून विमानात गुंगी आणणार्या औषधाचा डोस घेऊन झोपून जाते. तिला विमानप्रवासातील मृत्यूंच्या संभवनीयतेची आणि रस्त्यावर अपघाती मृत्यू होण्याच्या शक्यतेची गणिते माहिती नाहीत असे नाही. तरी या प्रवासात असताना तिला काही काळ तार्किक विचार न करणे सोपे वाटते असे दिसते.
जसे काही लोक मन रिझवण्यासाठी/त्रासांचा विसर पाडण्यासाठी संगीत ऐकतात, काही थोडे मद्य पितात, तसेच काहीजण देवाचे नाव घेतात असे समजावे. जर मद्याशिवाय जगणे अशक्य झाले तर असे अतिरिक्त मद्यप्राशन वाईट. जर नुसतीच श्रवणभक्ती वाढत गेली, आणि बाकी काहीच सुचेनासे झाले तर ते जसे अतिरेकी तसेच देवाशिवाय जगणे अशक्य झाले तर तेही अतिरेकी. तसे जोवर होत नाही, तोवर कोणी देवळात गेले, किंवा प्रवचन ऐकले तर त्यात काय विशेष? (तत्वांना चिकटून जगावे हा आग्रह उत्तम आहे, पण बर्याचदा माणसे तत्वे स्वतःला सोयीची असेपर्यंतच पाळताना दिसतात ही देखील वस्तुस्थितीच आहे.)
तुम्ही वर जे उदाहरण दिले आहे, (कोठलीही आणीबाणी, .. वैज्ञानिक लोकसुद्धा ..नक्कीच आनंद मिळत आहे असे दिसते. त्याचा उगम कशातून होत असेल?) त्यावरून असे वाटते की ते माणूसच आहेत. आजूबाजूच्या समाजाबरोबर कर्मकांडात कधीतरी आनंदाने सहभागी होण्यासारखे त्यांनाही वाटू शकते.
प्रशंसनीय
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आनंद घारे यांनी उत्तम लेख लिहिला आहे.त्यांचे विचार अनुभवाधिष्ठित आहेत.या विषयावर चिंतन करता जे मनात आले ते त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केले आहे असे दिसते.त्यामुळे लेख वाचताना त्यातील अभिव्यक्तीचा प्रामाणिकपणा पदोपदी जाणवतो."माझे विचार हे असे आहेत.काही न लपविता ते मी मांडले.कोणी काही म्हणो." असा आत्मविश्वासही त्यांतून प्रतीत होतो.एवढ्या दीर्घ लेखात अथ ते इति सुसंगत,बिंदुगामी(टु द पॉइंट) विचार मांडणे,विषय सोडून जराही न भरकटणे हे अवधड काम श्री.आनंद घारे यांना चांगले साध्य झाले आहे.त्यामुळे वाचताना लेखाची पकड सतत धरून ठेवते. चांगल्या वाचनीय आणि विचारणीय लेखनाप्रीत्यर्थ धन्यवाद !
देव जाणे
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.आनंद घारे यांनी लिहिले आहे"..त्यांची रचना कशा प्रकारची असते,त्यांचे कार्य कसे चालते यावर खूप संशोधन झाले आहे.पण अजूपर्यंत तरी पूर्ण समजले असे वाटत नाही.हे सगळे आपोआप होत असते असे मान्य् करणे जड जाते."....."कोणाला, कुठला आजार कधी होईल आणि त्याला कोणता डॉक्टर भेटेल हे सांगता येत नाही.ते सगळे 'तो' (वर आकाशाकडे निर्देश करून) ठरवतो...डॉ.मांडके..." इ. त्या संदर्भातः
..
अ) प्र."सौम्य कुठे गेला?" ...उ."देव जाणे"
ब) प्र."सौम्य कुठे गेला?"....उ.मला ठाऊक नाही."
..या दोन भिन्न उत्तरांमुळे सौम्याच्या गमनागमनाविषयींच्या अ आणि ब प्रश्नकर्त्यांच्या ज्ञानप्राप्तीत काही भेद(फरक) दिसतो का?
..
अ: देवाची करणी आणि नारळात पाणी.
ब :--सर्व बाजूंनी बंद असलेल्या नारळात पाणी कसे जात असावे हे मला काही कळत नाही.
...या विधानांवरून दिसते की अ ला प्रश्नाचे उत्तर सापडले आहे.तो समाधानी आहे.त्याला विचार करण्याची आवश्यकता नाही.
ब ला उत्तर ठाऊक नाही. तो अस्वस्थ आहे.तो उत्तर शोधण्याचा प्रयत्न करील.
समाजाची प्रगती आणि मनाची शांती
ब या उत्तरानेच माणूस संशोधन करण्यास प्रवृत्त होतो आणि त्यातून मिळालेल्या माहितीने त्याला उच्च दर्जाचे समाधान लाभते यात संशय नाही. त्यामुळे ब हे उत्तर नक्कीच अधिक चांगले आहे. आजवर झालेली समाजाची बहुतेक सर्व प्रगती ब या उत्तरामुळेच झाली आहे असे म्हणता येईल
पण ही गोष्ट सर्वांनाच किंवा सर्व बाबतीत जमत नाही. जे बदलणे शक्य नसते ते सहन करावे लागते. मनाची अस्वस्थता सहन करत बसण्याऐवजी अशा वेळी अ या उत्तराने मन शांत व्हायला मदत मिळते.
पिंड
अ च्या उत्तराने ब च्या पिंडाला शांत व्हायला मदत होईल? पिंडे पिंडे मतिर्भिन्नः
प्रकाश घाटपांडे
अनेक शक्यता
पिंडे पिंडे मतिर्भिन्नः
हे आहेच. आपल्याला समाधानकारक आणि विश्वसनीय असे उत्तर मिळालेच पाहिजे असा आग्रह असेल तर तो माणूस शांत बसणार नाही. चांभारचौकशा (हा मराठी भाषेतील प्रचलित शब्द जातीवाचक अर्थाने वापरलेला नाही) करण्याची आवड असलेला माणूससुद्धा निव्वळ कुतूहलापोटी किंवा सवयीनुसार चौकशी करत राहील.
सौम्य कुठे गेला असेल हे समजणे त्या प्रश्नकर्त्याच्या दृष्टीने किती महत्वाचे आहे हा दुसरा मुद्दा आहे . सौम्यशिवाय त्याचे काम अडत असेल किंवा त्याची काळजी वाटत असेल तर तो माणूस "देवाला ठाऊक" म्हणून स्वस्थ बसणार नाहीच. सौम्य कुठे गेला याची माहिती मिळवण्याचायाअटोकाट तो प्रयत्न करत राहील.
पण सौम्यच्या कुठेही जाण्याने त्याला काही फरकच पडत नसेल तर अ किंवा ब यातले कोणतेही उत्तर मिळाले तरी तो स्वस्थच बसेल. त्याच्या मनाला अस्वस्थता येणार नाही. त्याचे उत्तर शोधण्यात तो आपला वेळ दवडणार नाही.
मिरॅकल्स
लेख आणि लेखावरील उलटसुलट प्रतिसाद वाचल्यानंतरही हेच मनात येते की, या विषयावर (तसेच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावरही) अखंडपणे मतेमतातंराचा प्रवाह वाहताच राहणार आहे. पण काही वेळा काही तरी असे अकल्पित घडते तेव्हा त्या घटीतामागे एखादी अदृश्य अशी शक्ती असून ती या चराचरात वास करून राहिली आहे. याची प्रचिती ज्याला वैयक्तिक पातळीवर येते त्याच्या त्या मताला खोडून न काढणे इष्ट वाटते. एखादी व्यक्ती विज्ञाननिष्ठा प्रमाण मानणारी असली तरीही तिच्यावर असा प्रसंग येणार नाहीच अशी खात्री देऊ शकत नाही.
इस्त्रायलचे पहिले पंतप्रधान डेव्हिड बेन्-गुरियन यांचे या संदर्भातील एक वाक्य आठवते : “In order to be a realist, you must believe in miracles.”
अशोक पाटील
कम्पार्टमेंटस्
माणसाच्या मनात वॉटरटाईट कम्पार्टमेंट्स असतात असे वाटते. एका कंपार्टमेंटमध्ये (स्वतःच्या व्यावसायिक क्षेत्रातील) अत्यंत तर्कनिष्ट असलेला मनुष्य दुसर्या कंपार्टमध्ये श्रद्धांना सहज स्वीकृती देताना दिसतो.
*यासाठी माझ्या परिचितांचे उदाहरण देता येईल. ते सोने या विषयातले तज्ञ म्हणून कित्येक वर्षे कार्यरत आहेत. त्यांना कोणी "सोन्याच्या ताटात जेवल्याने अमुक फायदे होतात" अशी समजूत सांगितली तर ते कधीही मान्य करणार नाहीत. कारण तो त्यांच्या कार्यक्षेत्रातला ज्ञानाचा विषय आहे. परंतु दुसर्या कुठल्याही विषयातल्या श्रद्धा ते लीलया स्वीकारतात. *
नितिन थत्ते
निरिश्वरवाद
विज्ञानाच्या मार्गावर असणार्यांनी निरीश्वर असावे का? आणि ते आहेत का? हे दोन प्रश्न लेखातून मांडले गेले आहेत.
निरीश्वरता हा विषय विरंगुळ्याचा आहे हे मला पटते.
लेखात काही गुंतागुंतीच्या संकल्पनांची सरमिसळ झाल्यासारखी वाटली. उदा. धर्म आणि आस्तिकता यांचा मानलेला संबंध. पूर्णपणे धर्मनिष्ठ असलेल्यांना हा संबंध आवश्यक वाटला (बुद्धधर्म सोडून) तरी तो तेवढा खरा असण्याची गरज नाही. धर्माचे एक सामाजिक अंग असते. धर्माची चिन्हे बाळगणे, सण साजरे करणे, समारंभ धार्मिक पद्धतीने करणे यात आस्तिकता दिसतेच असे नाही. तेव्हा कित्येक अणुप्रकल्पाशी काम करणार्यांनी या सामाजिक अंगात भाग घेतला तरी त्यांची आस्तिकता त्यातून कळतेच असे नाही. तेव्हा लेखाच्या शीर्षकातल्या निरीश्वरवादाशी त्याचा संबंध जुळणे बरेचसे कठीण जाते.
याच बरोबर निधार्मिक असणारे कित्येक आस्तिक असू शकतात. (असलेले माहित आहे.) हा त्यांच्यापुरता त्यांचा एक धर्म असतो असे म्हणता येईल.
लेखातील अनुभव कथन अणुशक्ति विभागातील अनुभवास अनुसरून आहे. हे अनुभव जमीनीवरची सार्वत्रिक परिस्थिती सांगण्यास पुरेसे नाही. फक्त अणुशक्ति विभागात काम करणार्यांपुरती मर्यादित मानली पाहिजे. याच बरोबर याचे ही भान ठेवले पाहिजे की अणुशक्ति विभागात काम करणारे बहुतांश वरिष्ट लोक हे 'तंत्रज्ञ' या सदरात मोडले जातात. वैज्ञानिक या कामात फारसे नसतात. (खरे ना?). मी स्वतः तंत्रज्ञ असल्याने विज्ञानाचे तंत्र चालवणे या कक्षेत बसतो. या क्षेत्रात विज्ञानाचे प्रश्न सोडवणे बहुतांशी नाही. तंत्रशिक्षणातही मूलभूत विचार करणे साधारणत: नसते. त्यामुळे तंत्रज्ञांना वैज्ञानिकांच्या गादीवर बसवणे मला फारसे रुचत नाही. तंत्रज्ञ जसे अणुशक्तिविभागात सापडतात, तसेच ते एखाद्या इंजिनियरिंग कंपनीत, पीडब्ल्युडी, हॉस्पिटल वा संगणकक्षेत्रात सापडतात. या सर्वांना कित्येकदा कठीण आकडेमोड करावी लागते. या सर्वांना विज्ञानाच्या वाटेवरचे मानले तर साधारण समाजाचे जे चित्र दिसते त्यापेक्षा या तंत्रज्ञांच्या वसाहतीत दिसेल.
वेगवेगळ्या समाजात नास्तिकांचे प्रमाण कमी जास्त दिसते. (या पूर्वी या प्रमाणावर येथे काही लिखाण आले होते.) या दुव्यावर याबद्दल नीट माहिती आहे. एक सर्वेक्षण मी आजच्या सुधारकसाठी केले होते. त्यात मुंबई आसपास मधे देवविषयक भावनांचा आढावा घेतला होता. नास्तिक विचारसरणीचे लोक साधारणपणे १०-२० टक्के आढळले होते. त्याच बरोबर नास्तिक विचारसरणीत शिक्षण आणि संपत्तीमुळे काय फरक पडतो याचा आढावा घेण्यात आला होता. असा आढावा जमीनीवरचे चित्र जास्त स्पष्ट करतो. (धार्मिक खुणा नाही.)
वैज्ञानिकांनी निरीश्वरवादी असावे का? माझ्या मते नाही. पण ऐहिक जीवनातील घटना/अनुभवांच्या मागे ईश्वर कारणीभूत असावा असे कोणी म्हणत असेल तर त्यास टोकावेसे वाटते. याचे कारण हीच व्यक्ति इथे विज्ञानाची मर्यादा संपते आता पुढे जाण्यात काही अर्थ नाही असे मानते. या उलट यामागचे कारण शोधणारी बुद्धी ही खरी विज्ञानवादी. मेंदू एवढ्या गुंतागुंतीचा आहे की अजून त्याचा नीटसा थांग लागलेला नाही. हे खरेच पण त्याचा थांग लागणारच नाही तर संशोधन थांबते. मेंदू ही ईश्वरी अगम्य करणी आहे असे कोणी मेंदूवर काम करणारा शास्त्रज्ञ मानत असेल तर त्याची विज्ञाननिष्ठा नक्कीच संशयास्पद आहे. पण हेच मत जर इतर क्षेत्रातील वैज्ञानिकाचे असेल तर ते खपून जाऊ शकते. प्रत्येक क्षेत्रात मग ते सूक्ष्मकणांचे असो, उत्क्रांतीचे असो, पुरातत्वशास्त्र असो, वा मेंदूशास्त्र असो, वैज्ञानिकांना देव या संकल्पनेशिवाय विचार करावा लागतो.
लोक चांगले का वागतात? यावरील उत्तर मागील चर्चांमधून गेम थियरी असे मिळाले होते. त्या मताशी माझी सहमती आहे. यात ईश्वरी शक्तिचा हातभार असल्यास तो इतर प्राणीमात्रांना का नाही? (माझ्या मते तो त्यांनाही आहे. पण लेखकाच्या म्हणण्यानुसार त्यांना नाही.) हा विचार फक्त माणसाला आत्मा असतो या ख्रिश्चन विचारसरणीशी मिळता जुळता आहे.
प्रमोद
अभ्यासपूर्ण प्रतिसाद
छान अभ्यासपूर्ण प्रतिसाद, विचार करायला लावणारा. यातील काही मुद्द्यांवर माझे विचार असे आहेत.
समारंभ धार्मिक पद्धतीने करणे यात आस्तिकता दिसतेच असे नाही.
देवाच्या प्रतिमेची पूजा करण्यात किंवा इन्शाल्ला म्हणण्यात देवाचे अस्तित्व मान्य करणे दिसते.
तंत्रज्ञान म्हणजे उपयोजित विज्ञान (अप्लाइड सायन्स) समजले जाते. डॉक्टर, फार्मासिस्ट, विज्ञानाचे शिक्षक, प्राध्यापक वगैरे मंडळींनी विज्ञानाचा रीतसर अभ्यास केलेला असल्यामुळे या सर्वांचा समावेश विज्ञानाच्या मार्गावरील व्यक्तींमध्ये करावा असे माझे मत आहे.
हे अनुभव जमीनीवरची सार्वत्रिक परिस्थिती सांगण्यास पुरेसे नाही. फक्त अणुशक्ति विभागात काम करणार्यांपुरती मर्यादित मानली पाहिजे.
या मर्यादा माझ्या लेखात नमूद केलेल्या आहेतच. माझे निरीक्षण वैश्विक असल्याचा आव मी आणलेला नाही. चीन किंवा रशियासारख्या देशात वेगळी परिस्थिती असण्याची मोठी शक्यता आहे. तेथील विज्ञानाचे पाईक पूर्णपणे नास्तिक आहेत का आणि सामान्य जनतेमध्ये आस्तिक विचार करणारे आहेत का या निकषांवर तिथले निष्कर्ष काढता येतील.
आपण दिलेला दुवा माहितीपूर्वक आणि इंटरेस्टिंग (चपखल असा मराठी प्रतिशब्द?) आहे. पण त्यात भारत कुठे सापडत नाही.
इन्शाल्लाह
वरील प्रतिसादावरून काही आठवणी आल्या.
माझे एक जवळचे नातेवाईक बरेचदा देवपूजा करायचे. देव्हार्यातले देव जास्त झाल्यामुळे त्यांना काम जास्त पडायचे. यावर उपाय म्हणून निर्माल्यातून त्यांनी कित्येक मूर्तिंना गुपचुप जलसमाधी दिली. त्यांना मी तुम्ही देव मानता की नाही हे कधीच विचारू शकलो नाही. (आता ते हयात नाहीत.) पण बहुदा ते नास्तिक होते आणि देवपूजा ही करायचे.
कित्येक जण गंभीर बातमी प्रसंग आला की अरे देवा!, हाय राम! म्हणतात. (इंग्रजीत ओह् गाड! वा जिजस! असे काहीसे.) पण बरेचदा तो सवयची परिणाम असतो.
इन्शाल्लाहची गोष्ट अशीच काहीशी आहे. देवेच्छा असे त्याचे भाषांतर करता येईल. बरेचदा मी तुझे काम करणार नाही असे सांगायचे असल्यास इन्शाल्लाह शब्द वापरला जातो. म्हणजे मला पगारवाढ मिळेल का असे बॉसला विचारले तर तो म्हणतो की इन्शाल्लाह तसेच होईल. (देवाच्या करणीने ते होईल, मी देणार नाही.)
'आजचा सुधारक' अंक येथे मिळेल. त्यात मी उल्लेखिलेले सर्वेक्षण आहे.
प्रमोद
तात्पुरता आणि सोयिस्कर क्ष
देव हा 'तात्पुरत्या क्ष' सारखा आहे. ज्या ज्या गोष्टींचे आकलन होत नाहि त्याला गणित सोडविण्यासाठी या क्ष ची किंमत म्हणून धरतात. त्या-त्या प्रश्नाची उकल झाली की तो क्ष मधुन कमी होतो. एखादी गोष्ट देवाला माहित म्हणजे माणसाला माहित नाहि. तो अज्ञात क्ष आहे. कधि ना कधी त्याचेही ज्ञान होईलच. तो पर्यंत आपले आयुष्य त्या प्रश्नाच्या चिंतेत कशाला घालवा.. तेव्हा हा सोयीस्कर तात्पुरता क्ष बराय :)
तेव्हा जोपर्यंत माणसाला न उकलेले प्रश्न पडत असतील तेव्हा तेव्हा आयुष्यात पुढे सरकण्यासाठी हा तात्पुरता सोयीस्कर 'क्ष' धाऊन येतो. काहि जण हा 'तात्पुरता क्ष' च आपले कल्याण करेल-आयुष्यात बदल घडवेल असे जेव्हा समजू लागतो, आणि नुसते समजत नाहि तर त्यावर श्रद्धा ठेउन त्याच्या मागे जीवाचे रान करतो, पैसा-वेळ खर्च करतो तेव्हा मात्र त्याची कीव येते.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
देव आणि क्ष
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.ऋषिकेश म्हणतात ते पटण्यासारखे आहे."देवाला ठाऊक "म्हटले काय किंवा"क्ष ला ठाऊक म्हटले काय अर्थ एकच. मात्र क्ष ची किंमत काढण्यासाठी कोणतेही समीकरण नाही.
बालपणीचे संस्कार
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रस्तुत लेखात श्री.घारे लिहितात,"पण कधी अनाकलनीय, असे अनुभव येतात. त्यांचे समर्पक स्पष्टीकरण मिळत नाही. शरीरात त्राण नसत. विचारशक्ती बधिर झालेली असते. अशा वेळी देवाची आठवण कशी होते हे सुध्दा एक गूढ आहे. पण हा अनुभव नाकारता येत नाही. तसेच त्यातून मनाला दिलासा मिळत असला तर तो नाकारण्याचा हट्ट कशाला?..."
..
देवाची आठवण होण्याचे गूढ त्यांनीच उलगडले आहे.ते असे:--"बालपणापासून अंतर्मनात नकळत साठवला गेलेला आस्तिकतेचा विचार त्या वेळी समोर येतो आणि मनाला पटतो."
..
पूर्वी निसर्गनियमांविषयीं अनभिज्ञ असल्याने भूकंप,वणवे,वादळे,महापूर अशा आपत्तींनी भेदरून गेलेल्या माणसाला आधारासाठी सर्वशक्तिमान देवाची कल्पना सुचली.त्याला विनवले तर तो आपले रक्षण करील असे मानले.ही देवकल्पना मागच्या पिढीतून पुढच्या पिढीकडे संक्रमित होत गेली.आजही बालपणापासून,"देवाला नमो कर. तो आपले रक्षण करतो.बुद्धी देतो"असे मनावर बिंबवले जाते.बालवयातील हे संस्कार दृढ असतात.ते सहसा पुसले जात नाहीत.आई-वडील, आजूबाजूची मोठी माणसे,काय बोलतात,काय करतात, टीव्ही कार्यक्रमात काय असते ते बालक पाहाते,ऐकते.त्याच्या डोक्यावर चढवलेले हे संस्काराचे गाठोडे फेकून देणे त्याला अवघड जाते.रिचर्ड डॉकिन्स म्हणतो " बालकाची आई त्याला देवा-धर्माचे विष आपल्या मुखाने पाजते.या भिनलेल्या विषाचा दुष्परिणाम आयुष्यभर टिकू शकतो."
.
**गंगाधर गोरे यांचा पुत्र जन्मतःमराठी नसतो.हिंदू नसतो,ब्रह्मण नसतो.आस्तिकही नसतो.पुढे संस्कारांमुळ हे सर्व धडते.
...समजा पुण्यातील सूतिकागृहात यमुनाबाई गोरे आणि अमीनाबी घौरी एकाच दिवशी प्रसूत झाल्या.दोघींना एक एक मुलगा झाला.समजा या नवजात बालकांची चुकून अदला बदल झाली.(हे असंभवनीय नाही).तर अमीनाबीच्या पोटीं जन्माला आलेला सत्यजित गोरे भविष्यकाळी विश्व हिंदू परिषदेचा निष्ठावंत कार्यकर्ता होऊ शकेल.तर यमुनाबाईंच्या उदरीं जन्मलेला साजिद घौरी पुढे पॅन-इस्लामिक संघटनेचा सक्रिय सदस्य असू शकेल.
विष की अमृत?
**गंगाधर गोरे यांचा पुत्र जन्मतःमराठी नसतो.हिंदू नसतो,ब्रह्मण नसतो.आस्तिकही नसतो.पुढे संस्कारांमुळ हे सर्व धडते.
मला पूर्णपणे मान्य आहे. पूर्वजन्मातल्या आठवणी , पुण्याई वगैरेवर माझा विश्वास बसत नाही
बालकाची आई त्याला देवा-धर्माचे विष आपल्या मुखाने पाजते.या भिनलेल्या विषाचा दुष्परिणाम आयुष्यभर टिकू शकतो."
या संस्कारांमुळे काही वेळा मनाला दिलासा मिळतो, नैराश्यावर मात करता येते. हा त्यांचा फायदा लक्षात घेता ते तत्वतः पटले नाहीत तरी त्यांना विष म्हणावे की अमृत म्हणावे असा विचार पडतो. लहान मुलांना आपण इसापनीती किंवा पंचतंत्रातल्या बोधप्रद गोष्टी सांगतो तेंव्हा त्या घडलेल्या नाहीत हे आपल्याला चांगले माहीत असते (बहुतेक मुलांनासुद्धा ते ठाऊक असते). लहान मुलांना देवाधर्माची ओळखसुद्धा बहुधा अशा मनोरंजक गोष्टींमधूनच होत असते. मोठ्या लोकांच्या पाया पडण्याची सवय मुलाला विनयशील बनवते आणि त्याला ती लावावी म्हणून त्याची आई देवाला नमस्कार करते. (यात तिच्या लहानपणी तिच्यावर झालेले संस्कारसुद्धा कारणीभूत असतातच.) आपल्याला मिळालेले सर्वच संस्कार आपण पुढील पिढीला देत नाही. त्यातले थोडे सेन्सॉर करतो. पण काहीच केले नाहीत तर मुले बिघडतील अशी शक्यता वाटते. प्रत्येक क्षणी त्याबद्दल विचार करणे शक्य नसल्यामुळे बरेचसे संस्कार आपोआप होतात. मातेशिवाय शेजारी, शाळा, पुस्तके, दूरचित्रवाणी वगैरे माध्यमांमधून मुले शिकत असतातच.
थोडासा विरंगुळा-
घारेसाहेबांचा लेख आवडला, चर्चाही वाचतो आहे.
(थोडासा विरंगुळा-
"आस्तिकाला 'देव नाही' म्हणू नये कोणी,
एवढेही ठार नास्तिक असू नये कोणी "
-संदीप खरे.
"I believe that those who believe that they don't believe in what others believe, should not be allowed to believe what they believe about what others believe."
(Uncyclopedia on Atheism.) )