आध्यात्मिकता

आध्यात्मिकतेची (spiritualism) खरोखरच गरज आहे का?

आज काल 'माझा कुठल्याही धार्मिक कर्मकांडावर विश्वास नाही; मी धार्मिक नाही; परंतु मला आध्यात्मिकतेत(spiritualism) रुची आहे' असे सार्वजनिकरित्या विधान करणार्‍यांची संख्या दिवसे न दिवस वाढत आहे. जणू काही आध्यात्मिकता म्हणजे एक फॅशन असल्यासारखे त्याकडे बघितले जात आहे. इंटरनॅशनल म्हणून स्वत:च शिक्का मारून घेतलेल्या महागड्या इंग्रजी माध्यमाच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये तर याचे पेवच फुटले आहे. त्यांच्या मते प्रत्येकाला आपले समृद्ध आयुष्य जगण्यासाठी आध्यात्मिक शहाणपणाची (spiritual intelligence) गरज असून विद्यार्थ्यांना अगदी लहानपणापासूनच ते शिकवायला हवे. काही वर्षापूर्वी emotional intelligence ची हवा होती व आता त्याची जागा आध्यात्मिक शहाणपण घेवू पाहत आहे.

मुळात आध्यात्मिकता ही एक अत्यंत ढोबऴ, तकलादू अशी संकल्पना आहे. त्याची शाब्दिक फोड केल्यास ऐहिकतेच्या विरोधातील ही संकल्पना आहे, हे लक्षात येईल. त्याचप्रमाणे आध्यात्मिकता ही वास्तवातील भौतिकतेपेक्षा वेगळे काही तरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे, हेही लक्षात येईल. विज्ञानातील नियम, तत्व, सिद्धांत याव्यतिरिक्त या जगात इंद्रियजन्य अनुभवाच्या पलिकडे कित्येक - आत्मा, चेतना, अलौकिकशक्ती, अतिंद्रीय शक्ती, इ.इ .- गोष्टी असून त्यांची जाणीव ठेवल्यामुळे आपले आयुष्य समृद्ध होत राहील असा तर्क त्यामागे असण्याची शक्यता आहे. ध्यान, योग, एकांत, प्राणायाम इत्यादीद्वारे मानसिक समाधान मिळू शकते, माणूस चिंतामुक्त होवू शकतो यावर येथे भर दिला जातो. आधुनिक तत्वज्ञ व वैज्ञानिक यांना मात्र आध्यात्मिकता ही एक ऐतिहासिककालीन कालबाह्य व निरुपयोगी अशी एक संकल्पना आहे, असे वाटते.

आपल्यातील काही जणांना आध्यात्मिकतेच्या रूढ अन्वयार्थाऐवजी आयुष्याला आकार देणारे जीवनमूल्य म्हणून त्याकडे पाहावे असे वाटते. आपल्या सुखी व समाधानी आयुष्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य व त्यासाठी पैसा-संपत्तीची ओढ असावी लागते. त्याच बरोबर सौंदर्य, प्रेम, सहानुभूती यांची अनुभूती घेणेसुद्दा गरजेचे असते. निसर्गातील विविधतेकडे, चमत्कारसदृश घटनेकडे विस्मित दृष्टीने बघण्याचीही गरज असते. याप्रकारच्या गोष्टींचे स्पष्टीकरण विज्ञानाच्या आवाक्याबाहेरच्या असल्यामुळे व यासाठीच्या ऐहिक दृष्टिकोनात हिशोबीपणा असल्यामुळे आध्यात्मिकतेला जीवनमूल्य म्हणून स्वीकारायला हवे, असे त्यांना वाटते. परंतु सौंदर्य, प्रेम, आश्चर्य, इत्यादीसाठी आध्यात्मिकता हा शब्दप्रयोग योग्य ठरेल का? मुळात अध्यात्माची भलावण करणारे कुठल्या हेतूने हा शब्द वापरतात याचा नेमका अंदाज येत नाही. या भौतिक जगाच्या पलिकडे काही अज्ञात गोष्टी असून त्यांचा मागोवा घेणे हेच त्यांना अपेक्षित असल्यास आध्यात्मिकता धर्मव्यवहाराच्या जवळ जाणारी संकल्पना ठरेल. धर्म म्हटले की श्रद्धा. ग्रंथ प्रामाण्य, शब्द प्रामाण्य. चिकित्सा न करण्याची अट. त्यामुळे आध्यात्मिकतेसाठीसुद्धा श्रद्धेची गरज आहे, असा निष्कर्ष काढावा लागेल. हेच जर खरे असल्यास अशा प्रकारे आडवळणाने सांगण्याची गरज नाही. शब्दांचा घोळ घेलण्यात अर्थ नाही. सरमिसळ करणारर्‍या कसरतीची गरज नाही.

म्हणूनच हा शब्दप्रयोग धार्मिकांच्याच शब्दकोशातच राहू दे, असे म्हणावे लागेल. या प्रकारचा धूसर शब्द प्रेम, आश्चर्य, सौंदर्य इत्यादी जीवनमूल्यांसाठी न वापरता यासाठी वेगळाच कुठलातरी योग्य शब्द रचना शोधण्याची गरज आहे. या ऐहिक जगातच आपण समृद्ध जीवन जगू शकतो, याला पुष्टी न देणारे कुठलेही विधान स्वीकारार्ह नाही हे लक्षात घ्यायला हवे.

आपल्या आयुष्यात कमतरता असून ही कमतरता भरून काढण्यासाठी आध्यात्मिकतेला शरण जायला हवे अशी समजूत असल्यास त्यासाठी कुठून सुरुवात करावी व नेमके काय काय करायला हवे या प्रश्नांची उत्तरं सापडत नाहीत. एके काळी आध्यात्मिक व ऐहिक या संकल्पना स्पष्ट होत्या. त्यांना समजून घेण्यासाठी कष्ट पडत नव्हते. त्या एकमेकाच्या विरोधात आहेत याची पूर्ण कल्पना होती. आध्यात्मिकतेकडे ओढा असणार्‍यांनी अंतर्मनाचा वेध घेत घेत, सर्वसंगपरित्याग करून परमेश्वरापाशी पोचण्याची अनुभूती प्राप्त करून घेणे व परब्रह्माशी विलीन होणे यावर भर दिला जात असे. स्वत:चे अस्तित्व आणि ऐहिक सुखाना नाकारणे म्हणजेच आध्यात्मिकता असे समजले जात असे.

परंतु आता हे सर्व बदलत आहे. आध्यात्मिक बुवाबाजीचे प्रस्त वाढत आहे. पूर्वीच्या आध्यात्मिकतेला नवीन साज चढवून विकृत स्वरूपात त्याची मांडणी केली जात आहे. सुखोपभोगाशी हात मिळवणी करत आध्यात्मिकता पुढे जात आहे. एकांतासाठी आता जंगलात जाण्याची गरज नाही. पंचतारांकित सोई - सुविधा असलेल्या एखाद्या थंड हवेच्या ठिकाणच्या रिसॉर्टमध्ये वास्तव्य करण्यात काही गैर नाही, असे या आधुनिक आध्यात्मिक बुवा, महाराज, बाबाना वाटत आहे. आध्यात्मिकता म्हणजे ध्यान व योग. या व्यतिरिक्त काहीही नाही, ही मानसिकता रूढ होत आहे. योगाचा वापर आरोग्य व विश्रांतीसाठी मुख्यत्वे होत आहे.

एका दृष्टीने आध्यात्मिकतेतील अशा प्रकारचा बदल व त्याची ऐहिकतेच्या जवळ जाणारी लवचिकता स्वागतार्ह आहे. आपण हाडामांसाची माणसं आहोत. त्यामुळे या गोष्टी आध्यात्मिक सदरात येतात की नाही याची चर्चा करत बसण्यापेक्षा आध्यात्मिकता मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी हातभार लावते, ही गोष्ट खरोखरच स्पृहणीय ठरेल. फक्त ऐहिकतेचाच विचार करत राहणे हा माणसाचा आदिम स्वभाव असून त्यात सौंदर्यानुभवासारख्या गोष्टी नसल्यास त्या आक्षेपार्ह आहेत, असे अनेकांचा आक्षेप आहे. ऐहिक गरजा पूर्ण झाल्या तरी माणसात कुठे तरी असमाधानाची, अपूर्णतेची भावना असते. पूर्वीच्या काळची अध्यात्मिक संकल्पना त्यासाठी व त्याकाळी नक्किच उपयोगी पडली असावी. पारलौकिकतेचे गाजर पुढे करून माणसावर भुरळ पाडली असावी.

सुखोपभोगाच्या पलिकडे जाण्यासाठी पारलौकिकतेला शरण जायला हवे, यात तथ्य नाही. त्याऐवजी आपल्या अंतर्मनाला समाधान देवू शकणार्‍या गोष्टीत मन गुंतवून ठेवणे हाही एक (सोपा) मार्ग असू शकेल. आपल्या संवेदनांना अत्युच्च पातळीवर नेवू शकणार्‍या कला, साहित्य, संगीत, निसर्गाशी जवळीक वा इतर तत्सम प्रकारात मन गुंतवल्यामुळे आपले जीवन नक्कीच समृद्ध होऊ शकेल. ही समृद्धी, आध्यात्मिकवादी सांगतात त्याप्रमाणे, केवळ ध्यानधारणा वा योग-प्राणायाम यातूनच येऊ शकते याला कुठलाही आधार नाही. त्यामुळे अंतर्मनाला समाधान देऊ शकणारे विचार व कल्पना यासाठी जास्त वेळ देत असल्यास या तथाकथित आध्यात्मिकतेची गरजच भासणार नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

आक्षेप नेमका कशाला?

आपला लेख वाचून आपला आक्षेप नेमका कशाला आहे, हे नीटसे कळले नाही. 'आध्यात्मिकता' या शब्दाचा अर्थ नक्की नाही, याला आपला आक्षेप आहे, की आध्यात्मिकतेची गरजच नाही, आणि त्या टोपलीखालचं सगळंच बनवाबनवीचं आहे असं आपल्याला म्हणायचं आहे?

आक्षेप

'आध्यात्मिकते'च्या नावाखाली आजकाल जे काही खपवले जात आहे त्याबद्दल माझा आक्षेप आहे. अशा प्रकारच्या आध्यात्मिकतेची खरोखरच गरज नाही. ही आध्यात्मिकता एका प्रकारचे थोतांड आहे. त्यापेक्षा निखळ सौंदर्य दृष्टी, कलास्वाद, यावर भर दिल्यास आपले जीवन समृद्ध होऊ शकेल असे वाटते.

फक्त आध्यात्मिकताच का?

आपलं म्हणणं खरं आहे, पण अशी फसवाफसवी तर सर्वच क्षेत्रात आहे. वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय तर बोलायलाच नको. तेही सगळं थोतांडच नाही का? पण तिथेही चांगले काही लोक प्रामाणिकपणे काम करत आहेत. म्हणूनच आपण या व्यवस्था आपल्या गरजेप्रमाणे स्विकारतो आहोत ना? त्यांची गरज काय? त्या सगळ्या आता बंद करून टाका, असं तर नाही ना म्हणत?

म्हणून विचारतो की आपल्याला फक्त आध्यात्मिकतेतील फसवणूकीवरच का प्रहार करावेसे वाटले?

फसवाफसवी

आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात फसवाफसवी व आर्थिक शोषण होत आहे हे आपल्याही लक्षात आले असेलच. हे क्षेत्र असे आहे की वैयक्तिकरित्या येथे निर्णय घेता येते. इतर क्षेत्रात मात्र आपल्या वैयक्तिक निर्णयामुळे इतरांना त्रास होण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, शैक्षणिक क्षेत्रात बळावलेल्या डोनेशनच्या प्रस्तामुळे जर आपण वैतागून डोनेशन देणार नाही असे ठरविल्यास आपल्य़ा पाल्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कट प्रॅक्टिसचा वैताग येत असल्यास आपण डाक्टरांच्याकडे जायचेच नाही असे ठरवू शकता व अंगावर आजार काढू शकता. आपल्या या हट्टापायी कुटुंबातील इतरांवर ताण पडू शकतो. त्यामुळे आपल्याला आवडो वा न आवडो आपण येथे टोकाची भूमिका घेऊ शकत नाही.

परंतु आध्यात्मिकतेत स्वत:चा निर्णय अंतिम असल्यामुळे त्याचा स्वीकार करणे वा न करणे यामुळे कुटुंबातील इतरामध्ये तसा काही फरक पडत नाही. (फक्त काही वेळा बुवा - बाबांच्या नादी लागून तुम्ही भलते सलते काही करू लागल्यास मात्र संपूर्ण कुटुंबाची नाराजी पत्करावी लागते.) आध्यात्मिकता स्वीकारल्यास मात्र भरपूर नुकसान होऊ शकते हे मात्र मान्य करायला हवे. य़ा क्षेत्रातील आताची बजबजपुरी पाहिल्यास येथे कुणीतरी चांगली माणसं आहेत व त्यांच्या 'सत्संगा'तून (वा उपदेशामृतामुळे!) तुमचा तथाकथित 'आत्मोद्धार' होऊ शकतो यावर विश्वास ठेवणे जवळजवळ अशक्य ठरेल.

यामुळे एक पहिले पाऊल म्हणून आध्यात्मिकतेचे थोतांड नाकारण्यापासून सुरुवात करावी या उद्देशाने हा लेखन प्रपंच केला होता

'ब्रँड'

लेखाच्या तपशीलात न शिरता अध्यात्मिकता या 'ब्रँड' खाली जो व्यापार व फसवणूक चालली आहे त्याचा निषेध करत आहे.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

हे असे जपून जपून का लिहायचे?

म्हणजे अगदि मूळ लेखात सुद्धा आणि प्रतिसादातही. मला काय समजले ते इथे लिहितो:-
हा लेख काही आध्यात्मिक व अधार्मिक किंवा निधर्मी संघटनांबद्दल आहे. ह्यातले सर्वात जोरात चालणारे माझ्या माहितीतले पुण्यात दिसणारे ब्रँड सांगतो:-
१.श्री श्री १००८ रविशंकर --Art of Living
२.इगतपुरीचे विपश्यनावाले गोयंकाजी
३.सद्गुरु परिवाराचे आपले सद्गुरु वामनराव पै.
४.स्व पांडुरंगशास्त्री आठवल्यांचा स्वाध्याय परिवार
५.एका नामांकित वर्तमानपत्रात आयुर्वेदाच्या नावाने धुमाकूळ घालणारे एक महाराज आता अध्यात्मावर अन् गीतेवर भाषणे,चेहर्‍यावर अष्टसात्विक भाव आणून व्याख्याने,कथने व नर्तने करताना दिसतात.

ह्यापैकी क्र.१ वाल्याकडे जाउन आलेली माणसे उगीच "हमारे गुरुदेव्,जय गुरुदेव" म्हणत झीट येइस्तोवर त्यांच्या पंथात सामील व्हायचा आग्रह करत आर्जवी स्वरात पैसे मागत सुटतात(शिबिरत ये म्हणून).बरे, एकदा काहीतरी रौप्यमहोत्सवी वर्ष का काहितरी म्हणून शिबीर फुकट होते म्हणून तिकडे गेलो तर डोक्याल इतका शॉट्ट बसला की फुकटातलेही पूर्ण करवले नाही. बुद्धीवाद्यांचे असणार नाही तितके त्यांचे बकणे वैतागवाणे होते.

क्रमांक दोनवाले पैसे मागत नाहित. पण गेल्यावर मानगुटीला धरुन १० दिवस १००% टक्के मौन करायला लावतात.हे झेपणेबल न वाटल्याने गेलो नाही.(तिथल्या सूतकी कळा घेउन वावरणार्‍यांशी बोलायचं नाही हे ठिक आहे हो, पण एखादा फोनही कधीमधी कुणाला करायचा नाही, गरज पडल्यास पानटपरीवरही अजिब्बात जायचं नाही, हे भयंकर क्रूर,अमानवी वगैरे वाटले.) जायला बिचकलो.

क्रमांक तीनवाल्यांचे भक्त त्यांच्यकडे हरिपाठ वगैरे ठेउन जेवायला बोलावतात म्हणून जाम आवडतात.बाकी कर्मकांड वगैरे फारसे वाटले नाही, पण सतत उपदेशा देण्याच्या पवित्र्यात उभ्या असलेल्या मंडळींकडे जाणे म्हणजे डोक्यावर आधीच विरळ झालेले केस स्वतःच्या हाताने संपवून घेणे, म्हणून त्यांच्या नादी लागलो नाही.
(प्रामाणिक् रहा, मेहनत् करा, स्त्रीचा आदर करा, क्रोध व व्यसनाच्या आहारी जाउ नका,लोकांशी चांगले वागा ह्या आणि अशा "जगावेगळ्या शहाणपणाच्या",अद्भुत,असामान्य व "जीवनाचे सार" ह्या गोष्टी मीही सांगायला तयार् आहे हो. पण मला ह्यांच्यासारखे कुणी पैसे का देत् नाही ह्या विचाराने नेहमीच उदास् होतो :-( )

क्रमांक चार वाल्यांनी समाजोपयोगी बरीच कामे केल्याचे ऐकले आहे.(तळी खोदणे, श्रमदान वगैरे) पेप्रात त्यांच्या स्वाध्याय परिवाराच्या इस्टेटीवरुन काही वाद झाल्याचे वाचल्याचेही आठवते आहे. पण अजून त्यांचे कुणी बोलवायला अले नाही.

क्रमांक पाच हे पेप्रातूनच इतके भंडावून सोडतात की त्यांच्याकडच्या थंड हवेच्या ठिकाणी जायची हिम्मत होत नाही.(कधी हिम्मत झालीच तरी त्यांच्या पंचतारांकित सुविधा परवडणार नाहित हेही खरेच.)

मूळ लेखाबद्द्ल :- जे जसं जेवढं अपेक्षित होतं, ते तसच आणि तेव्हढच वाचायला मिळाले.अपेक्षित. माहितीपूर्ण नसल्याने नवीन काहिच माहिती मिळाली नाही असे म्हणता येत नाही. वैचारिक म्हणावे तर हेच विचार ह्याआधी जशाला तसे टंकूनही झालेत.

--मनोबा

हे असे जपून जपून का लिहायचे?

असे म्हणत परत जपूनच लिहिलंय.

क्र. ४ वाले जास्तकरून गाडीला अपघात झाला अन् अमुक इतके मेले अशा बातम्यांनीच माझ्या ऐकण्यात जास्त आहेत.

क्र. ५ वाले कोण? ते बाता मारणारे वैद बालाजी तांबे काय?

(प्रामाणिक् रहा, मेहनत् करा, स्त्रीचा आदर करा, क्रोध व व्यसनाच्या आहारी जाउ नका,लोकांशी चांगले वागा ह्या आणि अशा "जगावेगळ्या शहाणपणाच्या",अद्भुत,असामान्य व "जीवनाचे सार" ह्या गोष्टी मीही सांगायला तयार् आहे हो. पण मला ह्यांच्यासारखे कुणी पैसे का देत् नाही ह्या विचाराने नेहमीच उदास् होतो :-( )

-सहमत.

क्र ५

हो.
तेच ते. गीतेचे सार्. गीता, आध्यात्म ह्यावर ते आयुर्वेदाकडून् अचानकच् आलेत. त्यांचा प्रचंड उदोउदो वर्तमानप्त्रातून काळजीपूर्वक् होतोय्.
"जीवन ह्यांना कळले हो" नावाने त्यांचा कुठलासा मुलाखतीचा का कसलातरी कार्यक्रम् होता.
आता काही दिवसात ते योगाचीही (आतडी) फाडून ठेवणार असा डौट येतो.
(म्हणजे, योगाचे अंतरंग् उघडे करणार, योगाच्या पोटात शिरून आपणास ज्ञान वगैरे देणार असे म्हणायचे आहे.)

--मनोबा

आध्यात्मिक गुरू

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*श्री. नानावटी यांनी नोंदवलेली निरीक्षणे यथायोग्य आहेत.सध्या आध्यात्मिकतेचे स्तोम वाढते आहे असे दिसते.त्यामुळे आध्यात्मिक गुरूंचे पेव फुटले आहे. गुरुपौर्णिमा आणि गुरुपूजन यांचे प्रस्थही माजले आहे.अनेकांना निर्जीव देवमूर्तीपेक्षा माणसाच्या रूपातील गुरू अधिक भावतो आहे असे दिसते.अध्यात्माची संकल्पना परब्रह्म,परमात्मा,जीवात्मा,जन्म-मरणाचे फेरे,मुक्ती,मोक्ष यांवरच आधारित, म्हणजे भ्रामक आहे.बहुसंख्य माणसांना वास्तवापेक्षा भ्रामकाचे आकर्षण अधिक वाटते.
* श्री.मन यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.त्यांनी दिलेल्या यादीतील वामनराव पै यांचे विचार वास्तववादी आणि धादान्तवादाला धरून असतात.संचित,प्रारब्ध,क्रियमाण आदि गोष्टींवर त्यांची श्रद्धा आहे.मात्र व्रतवैकल्ये,कर्मकांडे अशा गोष्टीवर नाही असे ऐकतो.
आसाराम बापू,नित्यानंद,अनिरुद्ध बापू, नरेन्द्र महाराज यांचा समावेशही आध्यात्मिक गुरूंत होतो.किंबहुना सध्या जो तो बुवा स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेतो आहे असे दिसते.
*उंचावलेल्या उजव्या हाताची वरदमुद्रा करून आशीर्वाद देणारे कफनीवाले-छाटीवाले,दाढीवाले मिशीवाले,जटावाले-गोटावाले,टिळावाले-माळावाले सगळे ढोंगी ठकसेन असतात हे वारंवार सिद्ध झाले आहे.

बहुसंख्य माणसांना वास्तवापेक्षा भ्रामकाचे आकर्षण अधिक वाटते.

अध्यात्माची संकल्पना परब्रह्म,परमात्मा,जीवात्मा,जन्म-मरणाचे फेरे,मुक्ती,मोक्ष यांवरच आधारित, म्हणजे भ्रामक आहे.बहुसंख्य माणसांना वास्तवापेक्षा भ्रामकाचे आकर्षण अधिक वाटते.
ह्याबाबत माझे निरिक्षण वेगळे आहे. असे खरोखर किती जण आहेत ज्यांना मुक्ती अन् मोक्ष हवाय? अजूनही बहुसंख्य भाविक(श्रद्धावंत व अंधश्रद्धावंत ;-) धरून ) हे नवस, उपास ,तापास , मनोभावे नमस्कार,लोटांगण वगैरे घालतात मूर्त्यांपुढे ते काही केवळ मृत्युनंतर स्वर्ग मिळावा म्हणून नव्हे ,तर, "माझा पेपर निघू दे","मुलगा होउ दे","प्रमोशन् होउ दे","इलेक्शन जिंकू दे", "सरकार पडू दे","घबाड पचू दे" अशा इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून. ह्या इच्छा शुद्ध ऐहिक रुपाच्याच तर् आहेत की. म्हणजे बाबा लोकांच्या मागे जाणार्‍यांचे विवेकाचे नसले तरी उलट ऐहिकाचे भान पक्के असते असे म्हणावे लागेल. उलट् विवेकी व्यक्ती कधीकधी भलेपनाने
मीही घरी "देवदेव का करायचा?" असे विचारल्यावर् केवळ " आयुष्य सुखी समाधानी होइल म्हणून" इतकेच उत्तर प्रामुख्याने मिळाले. मीही आज्ञाधारक विद्यार्थ्याने प्रमाणे सगळे ऐकले/ऐकतो, तो भाग वेगळा.

आता काही जण ह्या इच्छा मनात न ठेवताही जातात, ते प्रामुख्याने "मनाला उभारी यावी", "आत्मबळ मिळते" वगैरे कल्पना घेउन.(हे विपश्यना ,आर्ट् ऑफ लिव्हिंग गँगवाले).
हे जरा साय-फाय्, तात्विक् व आध्यात्मिक पॉलिशचे आवरण असलेली ठिकाणे पसंत करतात.शिक्षित व् त्यातही मध्यमवर्ग, उच्चमध्यमवर्ग ह्यात् अधिक. विशेषतः शहरी.
ह्यांच्याकडे अफाट शाब्दिक ताकत असते. समोरच्याला अजिबात् कळणार् नाही असे बोलण्याची एक अद्भुत सिद्धी ह्यांच्याकडे असते. "चित्तमात्रेतून समष्टी निर्माण होते. नासिकाग्रे ध्यान् करत त्राटक केल्याने मनोर्जा जागृतीने अष्टचक्रे फिरु लागतात" असे काहिसे हे बोलू लागले, की मराठीच बोलताहेत् असा भास होतो, पण् तासंतास ऐकूनही अजिब्बात समजत् नाही.

मरणोत्तर काही मागणारे ते वेगळे . ते "अलौकिक् दर्शन" वगैरे घेउन् कृतकृत्य होतात. कुणी बापूंच्या अन् त्यांच्या पत्नी व् भावाच्या दर्शनाने होतो, कुणी अम्मा भगवानच्या अनुग्रहाने फलित होतो. आमच्यकडे काही लोक् आधीच अशा प्रकारे सातही जन्माची पापे धुवून् बसली आहेत. पुन्हा करणयसही तयार् आहेत्,आध्यात्मिक धोबी ती त्यांना धुवून देतीलच.एकाने तर निव्वळ दर्शनाने स्वतःची कुंडली व पर्यायाने नियती आख्खीच बदलून् मिळू शकते व तसे बदलायची त्यांच्या केंद्रात एक्स्चेंज ऑफर अजूनही सुरु असल्याचे सांगितले आहे.

जबरदस्त पैसा असल्यावर्/मिळाल्यावर मनुष्य् असा धास्तावल्यासारखा का करतो व ह्यांच्या कच्छपी का लागतो ते न कळे.

शिवाय ह्या वेगवेगळ्या लोकांच्याकडे गेल्यावर त्यांना फारसे समजावताही येत नाही. "आम्हाला अनुभव आलाय्." हेच एक स्टिरिओअटाइप् सतत ऐकावे लागते.
प्रामाणीक पणे मी वेगवेगळ्या मंडळींना भेटूनही मलाच कसा कधी कुठला "अनुभव" आला नाही हे कळत नाही. अजूनही जाण्यास तयार आहे. पण कुणी असे खरोखरीचे पावरफुल सापडतच नाहित. ते नेहमीच "कोणे एके काळी होउन गेले" , "आमच्या ह्याच्या त्याला भेटले" असेच किस्से असतात.
भाविकांच्या गराड्यात राहणे म्हणजे म्हटले तर गंमम्तीशीर म्हटले तर् गोंधळवणारा व् म्हटले तर वैतागवाडी/क्रूर अनुभव असतो.
ढोंगी,बिनडोक,प्रामाणिक,लबाड,समजूतदार ह्या सर्वच प्रकारचे श्रद्धावंत भेटलेत. पण बुद्धीवाद्यांत इतकी व्हरायटी नाही.

असो. खूप काही मनातून स्क्रीनवर सांडाते आहे. आवरते घेतो.

--मनोबा

+१

या 'ब्रँड' खाली जो व्यापार व फसवणूक चालली आहे त्याचा निषेध करत आहे

हॅहॅहॅ. सहमत.

अंहं !

मजा नाही आली.

"प्रामाणिक रहा, मेहनत करा, क्रोध व व्यसनाच्या आहारी जाउ नका" वगैरे सांगायला गुरूमाऊलींची गरज नाही, त्याच धर्तीवर "निखळ सौंदर्य दृष्टी, कलास्वाद, छंद-जोपासना वगैरेंनी जीवन समृद्ध करा" हे सांगायला नानावटी कशाला पाहिजेत? असे वाटून गेले. ;)
(कृ. हलकेच घेंणे)

काहीतरी रिटेष्टाईल गरमागरम हौन्जौन्द्या.

लै भारी...

"निखळ सौंदर्य दृष्टी, कलास्वाद, छंद-जोपासना वगैरेंनी जीवन समृद्ध करा" हे सांगायला नानावटी कशाला पाहिजेत
मस्तच.

--मनोबा

शिर्षक

शिर्षक अध्यात्मिकता एक थोतांड असे असते तर?
प्रकाश घाटपांडे

चिंतन आवडले.

लेखातील चिंतन आवडले.

जो पूर्वी अमिबा होता, सूक्श्म जीव होता, तो आज हत्ती झालेला आहे. त्यामुळे अमिबा असताना किंवा तो एक सूक्श्म जीव असताना त्याची शरीररचना जशी होती तशी आत्ता नाही. त्या विकसित जीवाचे रूप-अवयव बदलल्याने त्या नव्या 'जीवाच्या शरीररचनेचा' उर्फ ह्या 'अध्यात्मिकता' ह्या नव्या विकसित संकल्पनेचा आभ्यास करण्यासाठी वेगवेगळ्या पैलूंचे रेखाटन, त्या पैलूंचे आप-आपसातील गटानुरूप विलगीकरण व त्या सगळ्यांच्या व्याख्या करणं गरजेचे आहे असे वाटते. असे झाले तर ती एक वेगळी शास्त्रशाखा पारीभाशेसकट पुढे येऊ शकेल.

तुम्ही इथपर्यंत विचार केलात तर अजून थोडे चिंतन करून 'अध्यात्मिकतेच्या' विविध पैलूंचे रेखाटन करून ते शब्दबद्ध करीत त्यातील भेद व्यक्त करू शकाल असे वाटते.

अजून थोडे पुढे जाऊया!

'अध्यात्मिकता' ह्या शब्दाच्या परीघात केवळ धर्म-पारंपारीक विधी व त्यावर आधारलेल्या गोश्टीच येतात असे नसावे/ नाही. संमोहन शास्त्र, स्वसंमोहन, रेकी, एन्.एल्.पी., शाररीक आसनातून ब्रह्मविद्या, 'संभोगातील समाधीकडे' ह्या सोबत काळी जादू इत्यदी गोश्टी देखील येतात/ येवू शकतात. नेमके म्हणायचे झाले तर कुंडलिनी जागृत करून आपल्याकडे येणार्‍या वा आपल्याकडून वहन होणार्‍या उर्जेपासून लाभ प्राप्त करणे हा प्रमुख उद्देश बहुतेक मार्गांमध्ये असतो/ असू शकतो. पण अतिंम स्थानकापर्यंत पोहचण्यापेक्शा बर्‍याच प्रवाशांना प्रवासात लागणार्‍या स्थानकांवर उतरून तिथेच कुठेतरी भटकायला आवडते. असे तरी असावे किंवा वाटेतील स्थानकच हे आपले अंतिम स्थानक आहे असे ती मंडळी मानत असावीत.

'अमूक एक थोतांड आहे!', असा विचार करून आपण आपल्या कल्पनाशक्तीला व आकलनशक्तीला बंदिस्त करून घेऊ शकतो. परंतु 'जे जसे आहे तसे' असे स्विकारले कि मगच 'सत','असत','सद','असद' हे भेदाभेद कळून येवू शकतात, सत्य आकळता येवू शकते.

अध्यात्म

चर्चा तर्ककर्कश होण्याच्या दिशेने चालली आहे असे वाटते.
आजवर अध्यात्माच्या वाटेला चुकूनही गेलेलो नाही. त्यामुळे आयुष्यात काहीही उणीव राहिली असे वाटत नाही. उर्वरित आयुष्य असेच जावे अशी इच्छा आहे.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

मॅन प्रपोजेस गॉड डिस्पोजेस

चर्चा तर्ककर्कश होण्याच्या दिशेने चालली आहे असे वाटते.

कमाल आहे? चर्चेत कोणीही मुळ लेखातील मतांविरुद्ध मत मांडलेले नाही. मग चर्चा 'तर्कककर्श' कशी काय होवू शकते. तुमचा प्रतिसाद आल्यानंतर 'ती नक्की होईल!' असे तुम्हाला वाटते कां?

आजवर अध्यात्माच्या वाटेला चुकूनही गेलेलो नाही. त्यामुळे आयुष्यात काहीही उणीव राहिली असे वाटत नाही. उर्वरित आयुष्य असेच जावे अशी इच्छा आहे

उणीव आहे. वैचारीकतेची रग जिरवण्यासाठी प्रत्येकजण संकेतस्थळांवर लेख लिहीत असतो. आत्तापर्यंतचे आपणाकडून जे लेख लिहीले आहेत ते कोणतेतरी पुस्तक, लेख वाचून तसेच कोणतातरी सिनेमा पाहून त्यावर आपली टिका-टिप्पणी याच ढंगात लिहीले गेलेले आहे. (किंवा जून्या आठवणी एखाद्या लेखातून मांडल्या गेल्या आहेत.) 'वैचारीक इनपूट' बाबत आपण मर्यादित आहात, कमी पडत आहात. ती आपली उणीव आहे. ती उणीव ठेवूनच उर्वरीत आयुश्य आपण जगावे असे जगनियंत्याला वाटेल असे वाटत नाही.

'वैचारीक इनपूट' चा सगळ्यात निम्न स्तर इथं वर उल्लेखलेला आहे. त्याच्या वरचा स्तर 'एखादा विशय वा विचार घेवून त्यावरील चिंतन' हा आहे.
नानावटींचा हा लेख ह्या स्तरावरचा आहे.

ह्यावरचा स्तर, आपल्या अंतर्मनीच्या संगणकाचा 'वैश्विकमनाच्या' महाआंतरजालाशी संपर्कात येवून तिथून मिळवलेली माहिती व त्या माहितीवर वर उल्लेखलेल्या 'चिंतन' स्तरावर केली गेलेली प्रोसेसिंग व त्याअखेरीस तयार झालेला एखादा लेख - हा एक स्तर आहे.

'हे विविध स्तर व त्यांचे तंत्र' हे देखील अजून तरी मराठी भाशेनुसार 'अध्यात्म'- आध्यात्मिक या शब्दाच्या परीघात येतात. ह्या शब्दर्थाच्या परिघातील विविध अंगे व त्यांच्या कक्शा डिफाईन होवून त्यांचे सुस्पश्ट आकलन मराठी जनतेला व्हावे व त्यायोगे मराठी भाशा वृद्धीगंत व्हावी ह्या हेतूने मी माझ्या वरील प्रतिसादात प्रस्तुत लेखकाला प्रोत्साहन म्हणून काहि सुचना केल्या, मग एवढे असूनही चर्चा 'तर्कककर्श' होतेय हे आपले विधान चूकीचे नाही कां?

ते चूकीचेच आहे म्हणूनच तो शब्द आत्ता इथल्याच एका नव्या लेखात आपल्या प्रतिसादाच्या खाली ('आक्शेप' म्हणून) दुसर्‍या एका प्रतिसादकाकडून वापरला गेला आहे.

प्रतिसाद

सदर प्रतिसाद वैयक्तिक स्वरुपाचा, अतिदीर्घ, अगम्य आणि त्रास होईल अशा मराठीत लिहिलेला (प्रतिसाददात्याची तीच इच्छा दिसते!) त्यावर उत्तर/ उपप्रतिसाद/स्पष्टीकरण देणे नाकारत आहे. श्री. रावले याला माझे 'हरणे' वगैरे समजत असतील तर ते मला मान्य आहे.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

तर्ककर्कश?

माझे बरेच प्रतिसाद ह्या धाग्यावर आहेत. म्हणून् आपण मलाही समोर ठेवून लिहिलेत असे गृहित् धरून प्रतिसाद देत आहे. माजह संबंध नसल्यास पुढील भाग सोडून दिलात तरी चालेल.
तर्कशास्त्र व तार्किक गोष्टी ह्यात माझा कधीही हातखंडा वगैरे नव्हता, नाही. माझ्या प्रतिसादातूनही तर्क,वाद वगैरे आढळणार नाहित. हो, अनुभव्, उदाहरणे आहेत्, घडलेल्या गोष्टींनी आलेला वैतागसुद्धा आहे. पण वाद घालणे अजून नीट शिकलेलो नाही.
तस्मात् तो आरोप माझ्यावर असेल तर नम्रपणे व ठामपणे नाकारत आहे.

--मनोबा

सहमत्

आडकित्ता,मनोबा
याला म्हणतात जबरा फटकेबाजी....!! एकदमच फिदा !!!.आणि सहमत तुमच्या मतांशी अगदी १००%....!!!! कीट आणला हो या पाखंडी टवालांनी......!!!!!

 
^ वर