ईश्वरी कृपा, पूर्वसंचित, सुदैव ...

विश्वामधील सर्व चराचरांचा कर्ता करवता परमेश्वरच असतो. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचे एक पानदेखील हलत नाही. तसेच मनुष्याला आपल्या पापपुण्याचे फळ या किंवा पुढल्या जन्मात मिळतेच. त्याच्या आयुष्यात काय काय घडणार आहे हे आधीच ठरलेले असते आणि त्याच्या कपाळावरील विधीलिखितात लिहून ठेवलेले असते. ते घडल्याशिवाय रहात नाही. वगैरे गोष्टींवर अढळ विश्वास ठेवणा-या लोकांची संख्या प्रचंड आहे.

सर्व सजीव आणि निर्जीवांचे गुणधर्म आणि त्यात होणारे बदल या गोष्टी निसर्गाच्या निश्चित आणि शाश्वत अशा नियमांनुसार होत असतात. प्रत्येक घटनेच्या मागे एक कार्यकारणभाव असतो आणि त्या क्षणी असलेली परिस्थिती आणि ते नियम य़ांच्या अनुसार सर्व घटना घडत असतात असे मला वाटते. विज्ञानामधले शोध, श्रेष्ठ साहित्यकृती व कलाकृती, तंत्रज्ञानातून निर्माण झालेली उत्पादने वगैरे सगळे पुढे घडणार आहे असे आधीच ठरले असेल असे म्हणणे मला पटत नाही. त्याचप्रमाणे आपल्या आय़ुष्यात घडत असलेल्या घटना हा एका मोठ्या गुंतागुंतीच्या योजनेचा लहानसा भाग असतो असे मला वाटत नाही.

असे असले तरी कधी कधी आलेले अनुभव चक्रावून सोडतात. असेच माझ्या बाबतीत नुकतेच घडले. आमच्या नात्यातील एका मुलाच्या लग्नासाठी आम्ही जबलपूरला गेलो होतो. लग्नामधले धार्मिक विधी, सामाजिक रूढीरिवाज, नाचणे, भेडाघाटची सहल वगैरेंमध्ये धमाल आली. लग्न संपल्यानंतर त्या रात्रीच सर्व पाहुण्यांची पांगापांग सुरू झाली. जबलपूरमधीलच एका आप्तांना भेटायला आम्ही गेलो आणि तिथेच राहिलो. तोपर्यंत सारे काही अपेक्षेप्रमाणे सुरळीत चालले होते. पण दुसरे दिवशी पहाटेच पोटात गुरगुरू लागले आणि उठल्याबरोबर एक उलटी आणि जुलाब झाला. आमचे यजमान स्वतःच निष्णात आणि अनुभवी डॉक्टर असल्याने त्यांनी लगेच त्यावर औषध दिले. ते घेऊन आम्ही आपल्या मुक्कामी परत गेलो. त्यानंतर दिवसभर पुन्हा काही झाले नाही. तरीही दुस-या एका स्थानिक डॉक्टराचा सल्ला घेऊन आम्ही मुंबईला परत यायला निघालो.

प्लॅटफॉर्मवर बसून गाडीची वाट पहात असतांना एकाएकी मला डोळ्यापुढे निळाशार समुद्र पसरलेला दिसला, आजूबाजूला चाललेला गोंगाट ऐकू येईना, क्षणभर सगळे शांत शांत वाटले आणि ते वाटणेही थांबले. प्रत्यक्षात मी माझी मान खाली टाकली होती, माझ्या पोटातून बाहेर पडलेल्या द्रावाने माझे कपडे आणि पुढ्यातले सामान भिजले होते आणि मी नखशिखांत घामाने थबथबलो होतो, पण मला त्याची शुध्दच नव्हती. जवळच बसलेल्या पत्नीने मला गदागदा हलवल्यावर मी डोळे किलकिले करून वर पाहिले. तोपर्यंत आमची गाडी प्लॅटफॉर्मवर आली होती, पण त्यात चढण्याचे त्राणसुध्दा माझ्यात नव्हते, तसेच ते करण्यात काही अर्थ नव्हता. आम्हाला पोचवायला आलेल्या नातेवाईकांनी धावपळ करून एक व्हीलचेअर आणली आणि तिच्यावर बसवून तडक एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेले. अतिदक्षता विभागात दाखल करून इंजेक्शन्स, सलाईन वगैरे देत राहिले. तिथून दुसरे दिवशी वॉर्डमध्ये आणि तिसरे दिवशी घरी पाठवले.

जबलपूरच्या हॉस्पिटल्समध्ये रुग्ण दाखल झाला तर त्याच्या सोबतीला सतत कोणीतरी तिथे उपस्थित असणे आवश्यक असते. रुग्णासाठी अन्न, पाणी, औषधे वगैरे गोष्टी त्याने वेळोवेळी आणून द्यायच्या असतात. माझी पत्नी सोबत असली तरी त्या नवख्या गावात ती काय करू शकणार होती? डॉक्टर्स सांगतील ती औषधे केमिस्टकडून आणून देणे एवढेच तिला शक्य होते. बाहेरगावाहून लग्नाला आलेले सर्व पाहुणे परतीच्या वाटेवर होते. आता फक्त नवरदेवाचे आईवडील तिथे राहिले होते. लग्नकार्यातली धावपळ आणि जागरणे यांनी त्यांनाही प्रचंड थकवा आला होता आणि उरलेल्या कामांचे डोंगर समोर दिसत होते. तरीही त्यातल्या एकाने माझ्या पत्नीसोबत तिथे राहून दुस-याने घर व हॉस्पिटल यामध्ये ये जा करायची असा प्रयत्न ते करत होते. या दोन्हीमधले अंतरही खूप असल्यामुळे ते कठीणच होते. त्यांनी आणलेले उसने बळ कुठपर्यंत पुरेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न पुढे उभा होता.

पण माझ्या आजाराबरोबर जसा हा प्रश्न अचानक उद्भवला, तसाच तो सुटलासुध्दा. मला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची वार्ता मोबाईल फोनवरून सगळीकडे पसरली होतीच. बाहेरगावातल्या एका नातेवाईकाने त्याच्या चांगल्या परिचयाच्या जबलपूरमधील एका हिंदी भाषिक व्यक्तीचा फोन नंबर माझ्या पत्नीला कळवला. त्यांना फोन लावताच दहा मिनिटात ते सद्गृहस्थ हॉस्पिटलात येऊन हजर झाले आणि त्यांनी आमच्या कल्पनेच्या पलीकडे मदत केली. डॉक्टरांना विचारून माझ्यासाठी ते सांगतील तसे मऊ आणि सात्विक अन्नपदार्थ त्यांच्या घरी तयार करून आणून दिले, तसेच माझ्या पत्नीला जेवणासाठी त्यांच्या घरी घेऊन गेले आणि परत हॉस्पिटलात आणून सोडले. असे दोन्ही वेळा केले. गावातच राहणारी त्यांची बहीण आणि तिचे पती यांनी दुसरे दिवशी अशाच प्रकारे आमची काळजी घेतली. त्या संध्याकाळी आम्ही आमच्या आप्तांच्या घरी परतलोच. पुण्याहून माझा मुलगा विमानाने जबलपूरला येऊन पोचला आणि त्याने आम्हाला विमानानेच मुंबईला परत आणले.

आजारपण हा सगळ्यांच्याच जीवनाचा एक भाग असतो आणि ते काही सांगून येत नाही. त्यामुळे तसे पाहता यात काहीच विशेष असे नव्हते, पण या वेळचा सारा घटनाक्रम मात्र माझ्या आतापर्यंतच्या अनुभवाहून काही बाबतीत वेगळा होता. आम्ही जबलपूरला गेल्यावेळी तिथे कसलीही साथ आलेली नव्हती आणि लग्नसमारंभ एका चांगल्या दर्जाच्या हॉटेलात होता. शुध्दीकरण केलेले पाणी पिणे आणि भरपूर शिजवलेले किंवा भाजलेले ताजे अन्न खाणे याची सावधगिरी मी कटाक्षाने घेतली होती. तरीसुध्दा कोणत्या रोगजंतूंना माझ्या पोटात प्रवेश मिळाला हे पहिले गूढ. त्यांच्या पराक्रमाचा सुगावा लागताच मी त्यावर औषधोपचार सुरू केला होता आणि दिवसभर त्रास न झाल्यामुळे तो लागू पडला आहे असे मला वाटले होते. तरीसुध्दा माझी प्रकृती क्षणार्धात एकदम का विकोपाला गेली हे दुसरे गूढ आणि या गोष्टींचे परफेक्ट टायमिंग हे सर्वात मोठे तिसरे गूढ.

मला सकाळी दिसलेली आजाराची लक्षणे औषध घेऊनसुध्दा दिसत राहिली असती, तर मी लगेच त्यावर वेगळे उपाय केले असते आणि माझी परिस्थिती कदाचित इतकी विकोपाला गेली नसती, परगावाहून आलेला एकादा धडधाकट नातेवाईक माझ्यासाठी मागे थांबला असता. थोडक्यात सांगायचे तर आम्हा सर्वांना झालेल्या त्रासाची तीव्रता कमी झाली असती. पण तसे झाले नाही. नंतर ज्या वेळी परिस्थिती अगदी असह्य होत चाललेली दिसायला लागली होती तेंव्हा नात्यागोत्यात नसलेल्या एका सद्गृहस्थांनी पुढे येऊन तिचा भार उचलला आणि तिला सुसह्य केले. गाडी सुटून पुढे निघून गेल्यानंतर जर मला हेच दुखणे झाले असते, तर त्यावर तातडीचे उपाय होण्याची शक्यताच नव्हती आणि कदाचित त्यातून भयानक प्रसंग ओढवला असता.

परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!

Comments

हम्म!

परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो.

तुम्ही होकार देता ना, मग झाले तर. त्यावर मागून अधिक उहापोह कशाला? वरील विधाने करणारे लोक तुमचे चांगलेच इच्छित असतात असे वाटते आणि त्यापोटी त्यांची विधाने येतात. त्यांना काही सिद्ध करायचे आहे किंवा दाखवून द्यायचे आहे असे वाटत नाही. तेव्हा त्यातील चांगला भाग घेऊन नको असलेला भाग सोडून देणे उत्तम.

तूर्तास, इतकेच पुरेसे वाटते.

बाकी, तुम्हाला वेळेत मदत मिळून बरे वाटले हे उत्तम झाले.

हम्म

विश्वामधील सर्व चराचरांचा कर्ता करवता परमेश्वरच असतो. त्याच्या आज्ञेशिवाय झाडाचे एक पानदेखील हलत नाही.

अधिक बोलण्यासारखं आपल्याकडे काही नाही. बाकी, घटनेमागील कार्यकारणभाव शोधणार्‍यांनी तो शोधावा
आपल्या शुभेच्छा आहेतच.

-दिलीप बिरुटे

बरे झालात ,

हे चांगलेच.
पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा.

--मनोबा

फार बरे वाटले

तुम्ही सुखरूप आहात हे वाचून फार बरे वाटले. हिंदी भाषक आदरातिथ्य करताना मागेपुढे बघत नाहीत असा माझाही अनुभव आहे.

परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!

परमेश्वराची कृपा, थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदिच्छा, पूर्वपुण्याई मनाला बरे वाटण्यासाठी ठीक आहेत. हलकट, नीच, पापी माणसेही वेळोवेळी मोठ्या संकटातून सहीसलामत बाहेर पडतात. आयुष्यभर बाहेरचे पाणी कधी प्राशन नाही, परान्न कधी ग्रहण केले नाही असे काही पुण्यात्मे यकृताच्या क्षयाने मरतात. ह्याला काय म्हणायचे?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

आरोग्य पुन्हा मिळवले, हे उत्तम झाले

आरोग्य पुन्हा मिळवले, हे उत्तम झाले.

लोकांचे बोलणे आणि तुमचा होकार हा सद्भावनेपोटी होतो, हे बहुधा तुमच्या सांगण्यात स्पष्टच आहे.

शेवटच्या परिच्छेदातला तुमचा ऊहापोह बहुधा अंतर्गत आहे, आणि त्याबाबत चर्चा तुम्हाला घडवायची आहे. सद्भावना असलेल्या लोकांशी वादविवाद घालायचा नाही.

पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!

खरे म्हणजे हा विचार करण्यात वेळ खर्च करण्यात केव्हा हशील आहे? या विचाराच्या निष्पन्नातून पुढील आयुष्यात वागणे बदलण्यास दिशा मिळा तर हशील आहे. वागणे बदलून भविष्यात कठिण प्रसंगी असेच चांगले फलित मिळो - तो विचार चालू ठेवण्याचा हा हेतू.

पैकी :
(१) परमेश्वराची कृपा (२) थोरांचे आशीर्वाद, आणि (३) सर्वांच्या सदिच्छा : या तीन गोष्टी जितक्या या घटनेच्या वेळेला होत्या तितक्याच पुढच्या घटनेच्या वेळेला असतील. जी काय पूर्वीची वागण्याची रीत होती, तीच चालू ठेवण्यास हरकत नाही.
(४) नशीब : हे व्याख्येनुसारच अगम्य आहे, त्यामुळे वागण्यात काही बदल करून फरक पडणार नाही.
(५) पूर्वपुण्याईचे संचित : हे कदाचित वापरून कमी झाले असेल. नाहीतरी तुमचे वागणे सदाचाराचे असेल, तर जितक्या प्रमाणात ते जमवले जाऊ शकते तितक्या प्रमाणात ते जमवतच आहात. म्हणजे पुन्हा वागण्यात फरक करण्यास काही निर्देश नाही.

असे असल्यामुळे या पाचही गोष्टी असून किंवा नसून काही फरक पडत नाही. तुमच्या मनात डोकावणार्‍या विचाराने रंजन होत असेल, तर जरूर डॉकावू द्यावा. विचाराने त्रास होत असेल, तर त्या विचाराला थारा देऊ नका.

आभार

माझ्या (सदाचारी) वर्तनाबद्दल जे लिहिले आहे त्याबद्दल आभारी आहे. माझी आंतर्जालीय प्रतिमा त्यामुळे अधिक चांगली होण्यास मदत होईल.
मला विचारांचा त्रास वगैरे काही होत नाही . एकाद्या अनपेक्षित अनुभवाचे नवल वाटणे, त्यावर इतरांच्या प्रतिक्रिया समजून घेणे, त्यावर स्वतः विचार करणे, अखेरीस पटेल तेवढे ठेऊन घेणे आणि बाकीचे सोडून देणे हा सारा शिकण्याचा भाग आहे आणि ते जन्मभर चालतच असते.
अशा एका घटनेमुळे माझे वागणेही बदलणार नाही

प्रतिसाद

आपली प्रकृती आता ठीक आहे हे वाचून बरे वाटले. आपणांस शुभेच्छा.
वरील काही प्रतिसादांमध्ये 'आता बरे वाटले ना, मग आता त्यावर चर्चा कशाला?' असा एक गुळमुळीत पवारबेरीजसूर लागला आहे. मी याच्याशी असहमत आहे. आपल्याला झालेल्या त्रासाच्या वर्णनावरुन आपल्याला पोटाचे, आतड्यांचे इन्फेक्शन झाले असावे असे दिसते. या विषयाचा मी अभ्यास केला आहे. अशा इन्फेक्शनाला जबाबदार जीवाणू, विषाणू पोटात जाणे हे सर्व लोकांच्या बाबतीत सातत्याने होत असते. त्यामुळे त्यात नवल असे काही नाही.सर्वसामान्य लोकांची प्रतिकारशक्ती अशा इन्फेक्श्न्सचा मुकाबला करण्यास समर्थ असते. पण काही वेळा हे जीवाणू , विषाणू वरचढ ठरतात आणि आपल्याला त्रास होतो. अशा वेळी प्रतिजैविकांचा एक संपूर्ण कोर्स घ्यावा लागतो. हे मी तपशीलवार एवढ्यासाठी लिहितो आहे, की आपल्याबाबतीत काय घडले याचा नेमका अंदाज करता यावा (अंदाजच, पण शक्य तितका नेमका!) या प्रतिजैविकांनी आराम मिळतो, पण तो कोर्स पूर्ण होईपर्यंत त्या इन्फेक्शनचा नायनाट होईलच असे नाही. काही वेळा उलट्या व जुलाब थांबवण्यासाठी आतड्याची व जठराची हालचाल मंद करणारी औषधे दिली जातात. त्यामुळेही उलट्या-जुलाब थांबतात, पण मूळ रोग तसाच राहातो.
त्यामुळे आपल्याला असे इन्फेक्शन होणे, व तात्पुरते बरे वाटून ते परत उफाळून येणे हे पूर्णतः नैसर्गिक आहे. हे सगळे अमुक वेळेलाच का झाले हा प्रश्नच गैरलागू आहे. हे इन्फेक्शन व आपले शरीर यांच्यात एक झगडा सुरु होता, एक चकमक आपल्या शरीराने जिंकली, दुसरी त्या इन्फेक्शनने, इतकाच त्याचा अर्थ. आता राहाता राहिला प्रश्न तो त्या वेळी तुमच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या त्या सद्गृहस्थांचा. घारेसाहेब, जगात जशी हलकट, स्वार्थी, अप्पलपोटी, आत्मकेंद्रित आणसे आहेत, तशीच चांगल्या वृत्तीची, परोपकारी माणसेही आहेत. त्यांतील एक तुमच्या मदतीला धावला एवढाच काय तो अर्थ. असा त्रास तुम्हाला गाडी सुटल्यावर झाला असता तर काय झाले असते, या सगळ्या जर-तर च्या गोष्टी आहेत, म्हणून त्यांना काही अर्थ नाही
परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो असेच उद्गार त्यानंतर मला भेटलेले लोक काढतात आणि मी त्याला लगेच होकार देतो. पण खरेच हे सगळे असते का? असा एक विचार मनातून डोकावतोच!
या विचारांनी तुम्हाला बरे वाटत असेल तर ठीक आहे अशी कुंपणावर बसणारी भूमिका मी तरी घेणार नाही. विज्ञान कारण आणि परिणाम - कॉज ऍन्ड इफेक्ट- यावर विश्वास ठेवते. तुमच्या बाबतीत काय झाले असावे हे त्या त्या वेळी झालेल्या तुमचा तपासण्या, तुमची लक्षणे, चाचण्यांचे निष्कर्ष, औषधे आणि त्यांचे तुमच्या शरीरावर झालेले परिणाम यांवरुन सिद्ध करणे शक्य झाले असते. कृपा, आशीर्वाद, संचित, पुण्याई हे सगळे मनाचे खेळ आहेत.ज्याचा यांवर विश्वास नाही त्याला असले काहीही पटत नाहे. ज्याचा आहे, त्याला अन्य कोणत्या पुराव्याची गरजच भासत नाही. पण 'जो जे वांछील, तो ते लाहो' ही आचार्य भूमिका समाजाला विज्ञानाधिष्ठित होण्यापासून लांब नेते ही काळ सोकावण्याची भीती असल्याने इतके सगळे लिहिण्याचे धाडस केले आहे.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

सहमत

धन्यवाद. तुम्ही जवळ जवळ माझ्या मनातलेच सांगितले आहे. ज्या ज्या घटना घडल्या त्यांचे सुसंगत असे वाटणारे स्पष्टीकरणही दिले आहे. पण ते नेमकेपणे आणि ठामपणे सांगण्याइतकी माहिती माझ्याकडे नाही आणि ती मिळण्याची शक्यताही नाही. या घटना इतक्या वेगाने आणि अनपेक्षितपणे घडत गेल्या याचे आश्चर्य वाटले. त्या मागे आपल्याला न समजलेले आणखी काही असेल काय असण्याची शक्यता त्यामुळे वाढते आणि कुंपणावर बसल्याने फायदा होत असेल तर तो घ्यावा असे वाटते

माझा अनुभव आणि त्यावर मनात आलेले विचार कथन करण्यासाठी मी हा लेख लिहिला आहे. यावर वाद घालण्याचा माझा उद्देश नाही.

मला शुभेच्छा देणार्‍या सर्व मित्रांचा मी आभारी आहे.

पूर्वपुण्याई ?

माझी पूर्वपुण्याई आणि नशीब ......

आपल्या सारख्या विज्ञानाधिष्ठित व्यक्ति कडून अशा विचाराबद्दल आश्चर्य वाटले. बाकी आपल्या प्रकृती साठी सदिच्छा

अनुभव

विज्ञानाधिष्ठित व्यक्ति
जेंव्हा एकादा अनपेक्षित असा वेगळा अनुभव येतो, तेंव्हा त्यावर विचार करावा असे वाटते. याचा सुद्धा विज्ञानातच समावेश होतो. अनेक शोध अशा विचारातून लागले आहेत. विज्ञान म्हणजे फक्त फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स नव्हे. ते डिटर्मिनिस्ट असायलाच हवे असे नाही. इतर शक्यता नाकारल्याच पाहिजेत असे विज्ञानाने मला शिकवले नाही. ज्याला पक्का आधार आहे ते 'आहे' असे म्हणतो, ज्याला पुरेसा आधार मिळत नाही ते 'आहे' असे मी म्हणणार नाही, पण कदाचित ते असूही शकते, किंवा नसूही शकते अशी संदिग्ध भूमिका मी घेईन.

अशा विचाराबद्दल लेखात मांडलेले माझे विचार मी बदललेले नाहीत. इतर लोक काय म्हणतात हे लिहिले आहे आणि त्यावर संदेह व्यक्त केला आहे.

आप्तक्षणी

"माझा अनुभव आणि त्यावर मनात आलेले विचार कथन करण्यासाठी मी हा लेख लिहिला आहे. यावर वाद घालण्याचा माझा उद्देश नाही."

~ हे ठीक आहे. पण लेख लिहिला म्हणजे प्रतिक्रिया ह्या येणारच. त्यामुळे इथे तुमच्या लेखावर व्यक्त झालेल्या उलटसुलट विचाराच्या मागे तुमच्याजवळ असलेली अभिजात विज्ञानवृत्ती हेच आहे असे तुमच्या येथील विविध लेखावरून (विशेषतः अणुशक्ती आणि रीऍक्टरविषयीचे) प्रकटली आहे.

एका विशिष्ट क्षणी का होईना तुम्हाला विज्ञाननिष्ठेपेक्षा परमेश्वराच्या कृपेचे अस्तित्व जाणवले हे नाकारून चालणार नाही. (तसे जाणवणे चांगलेच आहे.)

"भूकेने आतडी वाळत जात असताना बैराग्याला जगातील सार्‍या तत्वज्ञानापेक्षा एक बोर जास्त मोलाचं वाटतं" असे जी.ए.कुलकर्णींच्या एका कथेत सत्य परिस्थितीचे रोखठोक वर्णन आहे. त्याच सूरात म्हणता येईल की, एखाद्या आप्तक्षणी का होईना नास्तिकालादेखील वाटेल की 'आज जे घडले ते परमेश्वराच्याच कृपेने."

अशोक पाटील

नास्तिक

एखाद्या आप्तक्षणी का होईना नास्तिकालादेखील वाटेल की 'आज जे घडले ते परमेश्वराच्याच कृपेने."

हे वाक्य समजले नाही. असे वाटेल तो नास्तिक कसा? डॉ. श्रीराम लागू म्हणतात तसे '' देवाच्या कृपेने' हा वाक्प्रचार कसा जन्माला आला ते कळत नाही कारण देव कधीच कुणावर कृपा करताना दिसत नाही'. आपल्या मुलाच्या अनपेक्षित मृत्यूच्या वेळीही डॉ. लागूंनी नास्तिकतेची कास सोडली नाही. एरवी आपण आधुनिकोत्तर आहोत असे भासवण्यासाठी म्हणून की काय पण नास्तिकतेचा बुरखा घ्यायचा आणि मनातून चोरुन नवस बोलायचा असा ढोंगीपणाच सगळीकडे दिसतो.

सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

मनाचा कणखरपणा

श्रीराम लागू यांच्याएवढा मनाचा खंबीरपणा कदाचित सर्वांकडे नसतो.
अमक्या तमक्या कारणांनी मला वाचवले असे जर दहा लोक म्हणाले आणि मी त्यांना हो म्हंटले तर त्याचा अर्थ मी नवस सायास, उपास तापास करणारा अंधश्रद्धाळू झालो असा होत नाही. माझ्या मते हे जग असे 'ब्लॅक ऍड व्हाईट' नाही. त्यात अनेक छटा आहेत.
माझे व्यक्तीगत मत आणि विश्वास कशावर आहे हे मी माझ्या लेखाच्या दुसर्‍या परिच्छेदात दिलेले आहे, त्यात बदल झाला नाही. मला आलेल्या अनुभवावरून त्याच्या पलीकडे असणार्‍या शक्यतांचा विचार करावासा वाटला, एवढेच .

हरकत नाही

पण लेख लिहिला म्हणजे प्रतिक्रिया ह्या येणारच

येऊ देत. त्यात सहभागी होण्याइतकी शक्ती आज माझ्यात नाही. त्यामुळे माझा उद्देश नव्हता असे लिहिले आहे

आस्तिक-नास्तिक

"असे वाटेल तो नास्तिक कसा?"

~ यावर भाष्य करतो. कारण डॉ. श्रीराम लागू यानी 'देवाला रिटायर करा' असे आवाहन केले म्हणून त्याना कुठली तरी ब्रह्मसिद्धी प्राप्त झाली असून आता ते म्हणतात म्हणून त्यांची आज्ञा प्रमाण मानून माझ्या घरातील देव मी पंचगंगेत नाही सोडू शकत.

"नास्तिक" प्राणी एका रात्रीत तयार होऊ शकत नाही. मूळात मानवप्राणी, जसे कॉम्प्युटरच्या जगात बोलले जाते तसा 'बाय् डिफॉल्ट' जन्मतः आस्तिक असतोच असतो. मी फक्त या देशाचे उदाहरण घेतो, आणि इथली कुठल्याही स्तरावर जीवन जगणारी आई आपल्या मुलाला देवादिकांच्या कथा सांगत सांगतच मोठे करीत असते. त्यामुळे त्या मुलाचे युवकात रूपांतर होईतो तो आस्तिक जीवनच जगत असतो. शक्यता आहे की, युवा दशकात पदार्पण केल्यानंतर कदाचित प्राप्त परिस्थितीनुसार वा आलेल्या काही कटु अनुभवामुळे त्याचा देव संकल्पनेवरील विश्वास हळुहळू कमी होत गेला असेल (एका रात्रीत हे ट्रान्स्फॉर्मेशन घडू शकत नाही) आणि मग आयुष्याच्या कोणत्या तरी एका अवस्थेत ती व्यक्ती आता स्वतःला 'नास्तिक' म्हणवून घेत असेल. जरी ह्या स्टेजला तो आला तरी त्याच्या संपूर्ण जीन्सने तो बदल मान्य केलेलाच असेल याची खात्री देता येत नाही. केव्हातरी कुठेतरी प्रसंगवश त्याला आईच्या त्या दुधाची आठवण येण्याची वेळ येते आणि मग त्यासोबत येतो तो तिच्या शिकवणीच्या त्या भागाचा जिथे तिने त्याच्या मनी 'देव' नावाची कोणतीतरी ताकद या विश्वाचा तोल सांभाळत आहे हे बिंबवलेले असते.

त्यामुळे आजचा 'नास्तिक' कालचा काही प्रमाणात का होईना 'आस्तिक' असतोच. माझे घर महालक्ष्मी अंबाबाईच्या देवळापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. मंगळवारी शुक्रवारी रात्री होणारी देवीची आरती अगदी घरी ऐकू येण्यासारखी परिस्थिती आहे. पण गेली कित्येक वर्षे मी देवळाच्या गाभार्‍यात, दर्शनाच्या पाळीला उभारून देवीचे दर्शन घेतलेले नाही. बाहेरगावाहून कुणी पाहुणे आले तर त्याना घेऊन मी देवळात तर जातोच, पण त्याना आवश्यक त्या सूचना दिल्या की माझे काम संपते व मी तिथूनच बाहेर पडतो. याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की मी नास्तिक आहे. फक्त मला त्या गर्दीत तासनतास उभे राहून देवीचे दर्शन घेणे ही कल्पना सहन होत नाही. २४ तास देवीच्या गाभार्‍यात पडलेला 'आस्तिक' आणि देवळाच्या बाहेरून जाणारा तो नास्तिक अशी व्याख्या करणे बालीशपणाचे होईल. कारण १००% आस्तिक आणि नास्तिक अशी वर्गवारी नसते. म्हणून एखाद्या जीवघेण्या प्रसंगातून सहीसलामत वाचलो की एरव्ही नास्तिक असणारी व्यक्तीदेखील 'वाचलो देवा !' असे उदगार सहजी काढू शकतो.

ज्या डॉ.श्रीराम लागू यांचे तुम्ही उदाहरण दिले आहे त्यांची नास्तिकतेकडे वाटचाल 'तन्वीर' प्रकरणामुळे झाली की त्याला अन्य कारण होते याची मीमांसा करणे अप्रस्तुत होईल. पण हेच डॉक्टर 'रामा' ला मानीत. नथुराम गोडसेची भूमिका डॉक्टर करतील की नाही याबद्दल साशंक असणार्‍या नाटककाराला स्वतः डॉ.लागू यानी उत्तर दिले होते की, "मी 'रामा' च्या बाजूचा असलो तरी 'रावणाची' भूमिका चांगली लिहिलेली असेल तर अवश्य करेन." आता इथे कुणीतरी 'डॉ.लागूनी केवळ उदाहरणासाठी रामाचे नाव घेतले होते. त्याचा आस्तिकतेशी संबंध नाही' असे म्हटले की मग वादच खुंटला. बुद्धिप्रामाण्यवाद् हिरीरीने मांडणार्‍या व्यक्तीने मग उदाहरणासाठीदेखील देवाचे नाव घेणे चुकीचे आहे.

आपल्या आईविषयी लिहिताना डॉ.श्रीराम लागू म्हणतात, "आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. पण ह्या भाड्याच्या घरात राहून मुलांवर चांगले संस्कार होणार नाहीत हे तिला दिसत होते. 'देवांच्या साक्षीने मुलांवर वाईट संस्कार झाले' याचे पाप देवांच्या माथ्यावर पडू नये असे तिला वाटत असे. कारण तिचा देवावर दृढ विश्वास होता." आता जो गृहस्थ आपल्या आईच्या देवावरील विश्वासाबाबत इतके लिहितो, त्याच्या मनावर/विचारावर आस्तिकतेचे सावट कधीच पडले नाही आणि त्याने आयुष्यभर केवळ नास्तिकतेचीच कास धरली होती यावर विश्वास ठेवणे जड जाईल.

अशोक पाटील

राम हा देव?

राम हा देव नसून राजा होता व त्याने आपल्या पत्नीच्या सुटकेसाठी रावण नावाच्या दुसर्‍या राजाशी झालेल्या युद्धात विजय प्राप्त केला होता अशी अख्यायिका आहे.
असो. प्रतिसाद पटला नाही. "नास्तिक" प्राणी एका रात्रीत तयार होऊ शकत नाही तसेच आस्तिकही नाही. आस्तिकही कधीतरी नास्तिकच असतो. किंबहूना, खरतंर माणूस जन्मल्यावर नास्तिकच असतो, त्यावर आस्तिकत्वाचे 'कंडीशनिंग' केले जाते. काही जण ते कुरवाळतात, काही झुगारून देतात.

असो. मी आस्तिक / नास्तिक नाही. ऍग्नोस्टिक आहे. देव असणे/नसण्याने आमच्या रोजच्या जगण्यात, माझ्य आयुष्यातील कोणताही निर्णय घेण्यात काडीमात्र फरक पडत नाही. देव असला तरी उत्तम नसला तरी उत्तमच!

बाकी घारेकाका, तुम्ही सुखरुप आहात याचा आनंद अधिक आहे. वेळप्रसंगी तुम्ही देवळात/मांत्रिकाकडे वगैरे न जाता त्वरीत सुसज्ज अश्या हॉस्पिटलमधे गेलात यातच तुमची (खरं तर तुमच्या घरच्यांचीही) विज्ञाननिष्ठा दिसते. काळजी घ्या!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

राम, शिवाजी, अकबर

१. रामाप्रमाणेच मग शिवाजी आणि अकबर हे देखील राजेच होते आणि या दोघांना मानणारे करोडोंच्या संख्येत आहेत पण म्हणून यांची देवळे/मशिदी उभी करून लोक त्यांच्या मूर्तींच्या दर्शनासाठी पाळीत उभे राहात नाहीत. मात्र 'राम' (आणि कृष्णही) याना विष्णू अवतारामुळे देवपण प्राप्त झाले होते हे न मानण्याचा अट्टाहास असेल तर मग राम अन्य शेकडो राजांप्रमाणेच एक होता असे मानावे लागेल.

आस्तिक-नास्तिक हा वादविषय आदीअनादी काळापासून चालत आलेला असून तो पृथ्वीच्या अंतापर्यंत चालूच राहील हे नि:संशय. पण नास्तिकतेची कास धरणार्‍यांनी त्याच्या पुष्ठ्यर्थ 'दहा लोक ज्या रामाच्या प्रतिमेला देव म्हणून हार घालतात ते खुळे आहेत' अशी टिपणी केली म्हणजे ते विज्ञाननिष्ठ समजले जातात असेही मानू नये. स्वतःला नास्तिक म्हणवून घेणारे आपल्या बहिणीच्या लग्नाच्यावेळी घरात चाललेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना तसेच त्या निमित्ताने होणार्‍या देवदेवतांच्या पूजापठणाला हजेरी लावताना मी पाहिलेले आहे. [लग्नाच्या याद्या आणि शुभमुहूर्तही देवादिकांच्या साक्षीने कुटुंबाचे गुरुजी काढून देतात, ते मात्र मान्य करताना अशांचे 'नास्तिकपण' आडवे पडत नाही. ]

सोयिस्कररित्या आपले विचार बासनात गुंडाळून ठेऊन (बहीण आणि मुलीसाठी का होईना) समाजमनाची काळजी घेणार्‍यांत असे नास्तिकच पुढे असतात हे विसरू नये. एकजात ढोंगी असतात हे नास्तिकराव.

(बाकी माणूस जन्मतः नास्तिक असतो हे तर कुठल्या आधारे ठरविता येते किंवा त्याची काहीतरी स्वतंत्र केमिस्ट्री आहे असल्यास त्याविषयी वाचने आवडेल. अजूनही म्हणतो की 'आई' हीच मुलाची पहिली 'मार्गदर्शिका' असते आणि तिच्या शिकवणीवरून त्याचे कंडिशनिंग होत असते. अशी एखादी "नास्तिक" आई असल्यास तीदेखील आपले अपत्य आपल्यासारख्याच विचाराचे होईल याबाबत प्रयत्न करीत असल्यास त्याला माझ्याकडे उत्तर नाही.)

२. श्री.घारे यानी इस्पितळात जाऊनच आपले इलाज केले हे योग्य झाले या मताला अनुमोदन आहे. नवरात्रीच्या मोसमात अंबाबाईच्या देव्हार्‍यात चोवीस तास सेवेत असलेल्या रघुनाथ जमदग्नी आणि श्रीधर फडणीस या दोन पुजार्‍यांना दगदगीमुळे चक्कर आली, बीपी वाढले, तातडीने बाहेर काढावे लागले. तेव्हा ती त्यांची बिघडलेली तब्येत अंबाबाईने बरी न करता शेजारील डॉ.रांगणेकरांच्या हॉस्पिटलमधील उपचारामुळे ठीक झाली. पण म्हणून् ते ब्राह्मणद्वय नास्तिक नाही होऊ शकत. तिसर्‍या दिवशी परत देवळात येऊन "महालक्ष्मीच्या कृपेने वाचलो" असेच म्हणणार. यात काय जगावेगळे नाही.

अशोक पाटील

गल्लत

रामाप्रमाणेच मग शिवाजी आणि अकबर हे देखील राजेच होते आणि या दोघांना मानणारे करोडोंच्या संख्येत आहेत पण म्हणून यांची देवळे/मशिदी उभी करून लोक त्यांच्या मूर्तींच्या दर्शनासाठी पाळीत उभे राहात नाहीत

देऊळ असणे देवत्त्वाचा अजब क्रायटेरीया आहे. शिवाजी राजांचा मुलगा राजाराम याने बांधलेले शिवाजीचे मंदीर सिंधुदुर्गातच आहे. त्याची पुजाही होते. मग त्यांना देव मानणार का?
बाकी, मुसलमनान धर्मात अल्ला सोडून इतर कोंणालाही मानले जात नाही, मशिदी तर कोणा एकाच्या म्हणून उभारल्या जात नाही. अगदी पैगंबराच्याही नाहित हा अत्यंत साधा तपशील आहे. असो.

मग राम अन्य शेकडो राजांप्रमाणेच एक होता असे मानावे लागेल.

यात सुधारणा, मग राम अन्य शेकडो राजांप्रमाणेच एक (कदाचित) होता असे मानावे लागेल. राम होता/नव्हता की केवळ कवीकल्पनेतील नायक आहे हा वादाचा मुद्दा झाला

पण नास्तिकतेची कास धरणार्‍यांनी त्याच्या पुष्ठ्यर्थ 'दहा लोक ज्या रामाच्या प्रतिमेला देव म्हणून हार घालतात ते खुळे आहेत' अशी टिपणी केली म्हणजे ते विज्ञाननिष्ठ समजले जातात असेही मानू नये.

कोण म्हणाले? कुठे?

स्वतःला नास्तिक म्हणवून घेणारे आपल्या बहिणीच्या लग्नाच्यावेळी घरात चाललेल्या सर्व धार्मिक कार्यक्रमांना तसेच त्या निमित्ताने होणार्‍या देवदेवतांच्या पूजापठणाला हजेरी लावताना मी पाहिलेले आहे.

हे बहिउणीच्या प्रेमापिटी नसेल कशावरून? असो. तपशील माहित नसल्याने सांगता येत नाही.

लग्नाच्या याद्या आणि शुभमुहूर्तही देवादिकांच्या साक्षीने कुटुंबाचे गुरुजी काढून देतात, ते मात्र मान्य करताना अशांचे 'नास्तिकपण' आडवे पडत नाही.

लग्नाच्या याद्या, मुहुर्त वगैरे आणि आस्तिकत्व-नास्तिकत्त्वाचा संबंध समजला नाही (नाहिच आहे). ही असली कर्मकांडे आणि देव आहे किंवा नाही हे मान्य करणे या पूर्णपणे भिन्न गोष्टी आहे.

बाकी माणूस जन्मतः नास्तिक असतो हे तर कुठल्या आधारे ठरविता येते

त्याच आधाराने ज्याने माणूस हा आस्तिक असतो हे ठरविता येते!

'आई' हीच मुलाची पहिली 'मार्गदर्शिका' असते आणि तिच्या शिकवणीवरून त्याचे कंडिशनिंग होत असते

साधारणतः 'आई' हीच मुलाची पहिली 'मार्गदर्शिका' असते आणि तिच्या शिकवणीवरून त्याचे कंडिशनिंग होत असते हे सत्य आहे. मात्र तिचे प्रत्येक शिकवणे हे बरोबर असेल असे नव्हे. आपल्याला कळलेल्या - सांगितलेल्या गोष्टींची सत्यासत्यता पडताळूनच स्वीकाराव्यात याचे कंडीशनिंगही त्या मातेने करावे असे वाटते.

तिसर्‍या दिवशी परत देवळात येऊन "महालक्ष्मीच्या कृपेने वाचलो" असेच म्हणणार

असेलही कारण तो त्यांचा धंदा आहे. त्यांनी जर उद्या सगळे पेशंट अंबाबाईमुळे नव्हेच तर डॉ. रांगणेकरांमुळेच वाचलो म्हणू लागले तर रांगणेकरांचे मंदीर नाहि का बांधणार! ;)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अभंग मतभेद्

शवविच्छेदन करताना वापरण्यायोग्य आणि अयोग्य भाग जसे अलग केले जातात अगदी त्याचरितीने तुम्ही माझ्या प्रतिसादाच्या मुद्द्याबाबत केल्याचे दिसते. त्याला प्रत्युत्तर देणे म्हणजे केवळ कालचेष्टा होईल त्यामुळे जसे वरच म्हटल्यानुसार आस्तिक-नास्तिक या विषयावरील मत-मतांतरे जशी कोणत्याही युगात अभंग राहिलेली दिसतात तशी मग कलियुगातही राहणारच आहेत तर त्यावर इतपत वाद पुरे.

अशोक पाटील

शवविचछेदन?

शवविच्छेदन करताना वापरण्यायोग्य आणि अयोग्य भाग जसे अलग केले जातात
हे वाक्य कळले नाही. शवविच्छेदनात कसले आले आहे वापरण्यायोग्य आणि अयोग्य?
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

सहमत

बाकी घारेकाका, तुम्ही सुखरुप आहात याचा आनंद अधिक आहे. वेळप्रसंगी तुम्ही देवळात/मांत्रिकाकडे वगैरे न जाता त्वरीत सुसज्ज अश्या हॉस्पिटलमधे गेलात यातच तुमची (खरं तर तुमच्या घरच्यांचीही) विज्ञाननिष्ठा दिसते. काळजी घ्या!

असेच म्हणतो.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

बरे वाटले.

तब्येत सुधारली आणि आता सर्वकाही सुरळीत आहे हे वाचून बरे वाटले.

एखाद्या बिकट प्रसंगी घडलेल्या घटनांचा हिशेब न लावता आल्याने "हे घडविणारा तर कोणी नाही ना?" अशी शंका येणे स्वाभाविक आहे. तसा विचार बोलून दाखवणेही साहजीकच.

-Nile

अनिश्चितता

अनिश्चिततेचा जोपर्यंत आपल्याला त्रास होत नाही त्यावेळी आपण जो विचार करतो तो ऑब्जेक्टीव असा असतो. जेव्हा ती अनिश्चितता आपल्या वाट्याला प्रत्यक्ष येते व त्याचा आपल्याला त्रास वाटायला लागतो तेव्हा आपण आत्मचिंतन करतो. ही अनिश्चितता माझ्याच वाट्याला का? असा विचार करतो. मेंदुत केमिकल लोच्या झाला की माणसाचे केवळ भावना नव्हे तर विचार देखील बदलतात. नास्तिक / अस्तिक अशी लेबल हे केवळ आकलनाच्या सोयीसाठी लावली जातात.
जन्मतःच कोणी अस्तिक / नास्तिक नसत. घरातील / समाजातील संस्कारातुन तो घडत जातो. काहींच्या बाबतीत ही संस्काराची पुट गळून पडतात. मनुष्य मृत्युशय्येवर असताना त्याच्या मनात कुठले कुठले विचार तरळत असतील? बी प्रेमानंद हे शेवटच्या काळात ईश्वर मानायला लागले अशी अफवा जोरदार पसरल्याने त्याचे खंडन करण्या करता नास्तिक/ विवेकवादी लोकांनी त्यांच्याकडुन तसे काही नाही असे वदवून / लिहून घेतले व तो पुरावा आंतरजालावर सोडला. अनिश्चिततेशी तोंड देण्याची प्रत्येकाची क्षमता ही परिस्थितीजन्य व कालासापेक्ष आहे. अशावेळी कुठला आधार घ्यावासा वाटला तर ते स्वाभाविकच आहे. विचारांचा/भावनेचा/ विज्ञाननिष्ठेचा / श्रद्धेचा वगैरे आधार आपापल्या सोयीनुसार घेतले जातात. ग प्र प्रधानांचे शेवटच्या काळातील लिखाण हे श्रद्धावंतांना आपलेसे करणारे होते. यावर काही तर्ककर्कश पुरोगाम्यांनी खाजगीत आक्षेप ही घेतल्याचे मला स्मरते. ठाम, अतिठाम, महाठाम, महामहा ठाम, अतिअति ठाम, ठार ठाम मते असणार्‍यांच्या छटेत फरकानुसार ठाम मते असलेला कुंपणावर असू शकतो. अशा वेळी 'हे पण कच्चे मडके निघाले' अशी हिणवणारी भाषा वापरली जाते. अट्टल नास्तिकत्वाच्या फेज मधे भावनेला थारा देणे हे मिळमिळीत, अवैज्ञानिक. बुर्झ्वा लक्षण मानले जाते.
माझा साक्षात्कारी हृदयरोग या डॉ अभय बंग यांच्या पुस्तकात त्यांच्या मनात त्यावेळी काय विचार तरळत होते हे त्यांनी शब्द बद्ध केल्याने त्यांना विज्ञाननिष्ठ म्हणवत नाही असे काहींचे मत आहे. पुरोगाम्यांमधे एक असत की दुसर्‍याचे ( अगदी दुसर्‍या पुरोगाम्याचे) विचार पटले नाही कि बुर्झ्वा बुर्झ्वा अशी हाकाटी पिटावी लागते.
असो घारे साहेब प्रकृतीची शक्य तितकी काळजी घ्या हीच प्रेमापोटी सदिच्छा!
प्रकाश घाटपांडे

आवडला

प्रतिसाद आवडला, प्रकाशराव.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

पटले...

हाही प्रतिसाद आवडला. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रतिसादातले म्हणणे हळूवार पद्धतीने मांडल्यासारखे सांगितल्याने समोरचाही त्यावर विचार करु शकतो. कधी कधी बुद्धीवादी वगैरे असल्याचे दावे करुन आक्रस्ताळेपणाने, आवेशाने झोंबरे प्रतिसाद दिले गेलेले दिसतात. इथे तसे नसल्याने जास्तच भावला.

--मनोबा

+१

चांगला प्रतिसाद आणि एकूण चर्चाही छान.
(या विषयावरच्या चर्चा इथे नेहमीच रंगतात (!) असा अनुभव आहे.)

प्रत्येक माणूस हा जन्मतः आस्तिक असतो, हे श्री. अशोक पाटील यांचे विधान पटले नाही.

घारे साहेब मला नेहमी वाटते पुर्व संचित असते

मी मागे एक धागा काढला होता.... http://www.mr.upakram.org/node/3021

संचित – मनुष्याने आजच्या क्षणा पर्यंत केलेले सर्व कर्म (त्या कर्मांच्या परिणामांचा साठा). त्याचे दोन भाग प्रारब्ध आणि अनारब्धकार्य.

प्रारब्ध (किंवा प्रारब्धकार्य) – संचितापैकी जेवढ्या कर्माची फळे भोगण्यास सुरवात झाली त्याला म्हणतात.

अनारब्धकार्य – ज्या कर्माची फळे भोगायला अद्याप सुरवात झाली नाहीत त्याला म्हणतात.

मला वाटते ते असतेच

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

आपण बरे झालात हे छान झाले.

आपण बरे झालात हे छान झाले.

तुम्ही सुखरूप आहात

तुम्ही सुखरूप आहात हेच सर्वात जास्त महत्त्वाचे.

मागे एकदा मी मरण्याची शक्यता ९०% हून अधिकच होती, तेही आयुष्यभर जवळच्या लोकांच्या लक्षात राहिले असते अशा एका खाजगी महत्त्वाच्या दिवशी. ते पूर्ण वर्षभर माझ्याबाबतीत नको नको त्या गोष्टी होत होत्या. तेव्हा कोणी मला म्हणाले असते की बाई ग, तुझ्या हातून काही चांगले घडावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली, तुला वाचवले बघ, तर त्यावर अविश्वास दाखवत त्या व्यक्तीला मी खोडून काढले नसते, असे वाटते. ती वेळ आपले नास्तिकत्व सिद्ध करण्याची नसते असे मला वाटते. अर्थात असे बोलून आपल्या तत्वाला जागल्याचा, किंवा लोकशिक्षणाचा आनंद मिळत असला तर ते जरूर करावे.

लाईफ

लाईफ इज् अ फेटल डीसीज् विथ १००% मॉर्टॅलिटी असे म्हणतात. जो जन्माला आला त्याची मरण्याची शक्यता नेहेमीच १००% असते. तेंव्हा मागे एकदा तुमची ९०% झाली म्हणजे चिमित्कारच म्हणायचा की! अभिनंदन.

आभारी आहे + स्पष्टीकरण

सुधारल्यासाठी आभारी आहे.
बाकी क्ष माणूस जिवंत आहे ते तो मेला नाही म्हणून हे खरेच आहे. जिवंत असणार्‍या सर्वांचे या क्षणी जिवंत असण्याबद्दल अभिनंदन.

तुमच्याशी संवादाची ही नांदी लक्षात राहण्यासारखीच आहे. पूर्वी कधी बोललो होतो काय आपण? आठवत नाही.
फक्त चमत्कार तुम्ही म्हणत आहात, मी म्हटलेले नाही हे स्पष्ट करते.

बहूतांशी लोकांची हिच अवस्था होते

जीवनात एखादी अनपेक्षीत घटणा घडली कि अनेकांचे मन असेच दोलायमान होते. हे स्वाभावीकच आहे. मात्र देव वगेरे आहे म्हणून सुटका करुन घेणे सोपे होते. सिध्द करावे लागत नाहि समविचारि बरेच असतात. मात्र या जगात जर देव (यात अल्ला, येसू इ. सारेच आले) व धर्म या एवजी जर आपण सारेच फक्त माणूस म्हणुन जगलो असतो, वावरलो व स्विकारले तर एक तर जगात शांती नांदेल दुसरे म्हणजे बराच वेळ वाचेल.

सदानंद ठाकूर
मराठी मधील म्युचल फंडावरिल पहिलेच संकेत स्थळावर मला भेटा
http://www.mutualfundmarathi.com

शांती?

धर्माच्या नावाने वाया जाणारा वेळ वाचेल हे ठीक आहे. पण शांती नांदेल याची मला मुळीच शक्यता दिसत नाही. इतर कोणत्या ना कोणत्या कारणावरून कलह होतच राहतील आणि माणसे एकमेकांच्या जिवावर उठतच राहतील. कारण ते मनुष्यप्राण्याच्या स्वभावधर्मात आहे. वाचलेल्या वेळाचा असा उपयोग केला जाण्याची सुद्धा शक्यता आहे.
चिरकाल शांती प्रस्थापित होण्यासाठी माणसाच्या स्वभावात बदल होण्याची आवश्यकता आहे.

कमाल आहे.

हे मला समजले नाही.

परमेश्वराच्या कृपेने आणि शिवाय थोरांचे आशीर्वाद, सर्वांच्या सदीच्छा, माझी पूर्वपुण्याई आणि नशीब यांच्या जोरावर मी एका मोठ्या संकटातून सहीसलामत वाचलो

हे जर खरे असेल, तर मुळात आपण या आपत्तीत अडकलात त्याला कारण परमेश्वरी कोप, थोरांचे शाप, सर्वांनी तुमचे कुचिंतन करणे, तुमचे पूर्वपाप व नशीब हे होय का??

बूरी नजर

हे जर खरे असेल, तर मुळात आपण या आपत्तीत अडकलात त्याला कारण परमेश्वरी कोप, थोरांचे शाप, सर्वांनी तुमचे कुचिंतन करणे, तुमचे पूर्वपाप व नशीब हे होय का?

ते बूरी नजर चा परिणाम आहे.

हाच प्रश्न

हे जर खरे असेल, तर मुळात आपण या आपत्तीत अडकलात त्याला कारण परमेश्वरी कोप, थोरांचे शाप, सर्वांनी तुमचे कुचिंतन करणे, तुमचे पूर्वपाप व नशीब हे होय का?

हा प्रश्न मनात आल्याखेरीज कसा राहील? शिवाय अनेक वेळा अनेक लोकांची आपत्तीमधून सुटका होत नाहीच. त्यात अत्यंत सुस्वभावी व निष्पाप लोकांचा समावेश देखील असतो. त्यांच्या बाबतीत तसे का व्हावे याची तर्कशुद्ध मीमांसा करणे शक्य नसते, पण माणसाला एक उत्तर मिळाल्याशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या तर्काचा आधार घेतला जातो.
आशी भीती दाखवून माणसाला सत्प्रवृत्त करावे अशी योजना निरनिराळ्या धर्मांमध्ये केली असावी आणि बालवयापासून ते मनात ठसवले असल्यामुळे बरोबर वाटत असावे.

आपणा बद्द्लचा आदर वाढला.

आपण बरे झालात .परमेश्वराचे आभार. या पुर्वीचे आपले लेख व विचार या माध्यमातुन अत्यंत विज्ञाननिष्ठ व आध्यामिकता वै. थोतांड आहे ह्या विचारसरणीचे आपण आहात, अशी माझी विनाकारण धारणा झाली होती. मी दोघात साम्यता शोधतोय. असो. आपण मनातील द्वंद प्रामाणिक पणे आपण मांड्ले, यावर चर्चे एवजी आत्मचिंतन केले तर कदाचीत वेगळे काही समोर येईल व ते आपण आम्हास सांगाल ज्यायोगे आम्हाला मार्गदर्शन मीळेल.

जिवेत् शरद् शतम् !

 
^ वर