गुटेनबर्ग प्रकल्पाचा जनक माय़केल स्टेर्न हार्ट (1947 - 2011)
ऍपल तंत्रज्ञान सुविधांचा सर्वेसर्वा स्टीव्ह जॉब्सच्या मृत्युनंतर ज्याप्रकारे जगभरातील सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये शोक प्रदर्शन करण्यासाठी चढाओढ दिसत आहे त्याच्या सहस्रांशानेसुद्धा या माध्यमांनी 6 सप्टेंबर, 2011 रोजी, वयाच्या 64 व्या वर्षी, मरण पावलेल्या ई-पुस्तकांचा जनक व गुटेनबर्ग प्रकल्पाचा संस्थापक, मायकेल हार्टची दखल घेतली नाही. विशेषकरून इंग्रजी पुस्तकप्रेमी गुटेनबर्ग प्रकल्पाच्या योगदानाला कधीच विसरणार नाहीत. कारण कुठलेही जुने वा क्लासिक पुस्तक आठवले की पहिल्यांदा gutenberg.org वर गूगल करण्याची सवयच या प्रेमींना जडलेली आहे.
![]() |
मायकेल एस. हार्ट (छायाचित्र फ्लिकरवरून साभार-- संपादक मंडळ.) |
सॅन फ्रॅन्सिस्को येथे आई-भावाबरोबर राहत असलेला हार्ट त्या भागात स्ट्रीट म्युजिशियन म्हणूनच ओळखला जात होता. तरुणपणी तो व्हिएटनाम युद्धात सैनिक म्हणून भाग घेतला होता. त्याच तुटपुंज्या पेन्शनवर त्याचे गुजराण चालत होते. हार्टला इतर कुठलीही कमाईची साधनं नव्हती. मुळात तो कधीच श्रीमंतीच्या मागे लागला नव्हता. गॅरेज सेलमधील टी - शर्ट्स व इतर कपडे आणि जेवण म्हणून डबेबंद बीन्स एवढ्यावर तो समाधानी असे. एखाद्या हिप्पीसारखी त्याची जीवनशैली व स्वरूप होते.
लहानपणापासूनच संगीताचे वेड असलेल्या हार्टला गाण्यासाठी पैसे मोजावे लागतात याची चीड येत असे. हवा, पाणी याप्रमाणे संगीतसुद्धा मुक्तपणे मिळायला हवे असे त्याला वाटत होते. रानावनातील फळांप्रमाणे ज्यांना जे आवडेल ते संगीत एकही पैसा न मोजता ऐकता यायला हवे अशी त्याची इच्छा होती. याच तत्वाचा तो पुस्तकांसाठी म्हणून पाठपुरावा करू लागला. प्रत्येक वाचकाला जगातील ग्रंथ भांडार सहजपणे उपलब्ध असावे यासाठी त्यानी आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. शेक्सपीयर, शेरलॉक होम्स, बर्नार्ड शॉ, बर्ट्रांड रसेल, सॉक्रेटिस, प्लेटो, इत्यादी महान लेखकांचे साहित्य कृती केवळ विकत घेवू शकणार्यानाच नव्हे, तर इतरांनासुद्धा त्या उपलब्ध व्हाव्यात, अक्षर साहित्यातील या प्रभावशाली पुस्तकांचा संग्रह प्रत्येकाकडे असावा यासाठी त्याने प्रयत्न केले. शक्य होत असल्यास Library of Congress मधील सर्व पुस्तकं सहजपणे वाचकांच्या हाती पडावीत याचा तो विचार करत होता. करोडो वाचकांसाठी अब्जावधी पुस्तकं हा त्याचा उद्देश होता. जेम्स किंगचा बायबल वा हेर्मेन हेसचा सिद्धार्थ वा अशाचप्रकारची कुठलेही दुर्मिळ पुस्तक असू दे ते सार्वजनिकपणे व सहजपणे वाचकांना उपलब्ध करून देण्यासाठी काय करायला हवे याचाच तो विचार करत असे. जाडजूड बांधणीतील हजारोंचा ग्रथसंग्रह ठेवायला, हाताळायला (व खिशाला परवडायला!) अडचणीच्या ठरतात याची पूर्ण कल्पना त्याला होती. परंतु संगणक तंत्रज्ञानाचा वापर करत पुस्तकं उपलब्ध करून देणे शक्य आहे, ही एक त्याच्या डोक्यात शिरलेली भन्नाट आयडिया होती.
इलिनॉय विद्यापीठात शिकत असताना गंमत म्हणून तो मेन फ्रेम संगणकावर काम करण्यासाठी काही तास वेळ मागून घेतला. वेळ मिळाल्यानंतर संगणकासमोर बसून काय करावे याचा विचार करत असताना त्याच्याकडे Declaration of Independence या पुस्तकाची प्रत होती. भारतीय घटनेतील जाहीरनामा यासारखे अमेरिकेतील नागरिकांना घटनेने दिलेल्या अधिकाराबद्दलची माहिती त्या पुस्तकात होती. त्यातील एक पान उघडून 50 वर्षे जुने झालेल्या Teletype मशीनवर तो कार्ड पंच करू लागला: when in the course of human events.....
कदाचित याच मजकूराला प्रप्रथम ई-टेक्स्ट म्हणून मान्यता मिळाली असावी. स्वातंत्र्याचे हक्क प्रदान करणाऱे हे टेक्स्ट वाचकांच्या मुक्तस्वातंत्र्याचीसुद्धा नांदी ठरली. हा मजकूर तो टाइप करताना इटरनेट, ई-मेल सुविधा नव्हत्या. अर्पानेटवरून मजकूर पाठवण्याचा प्रयत्न केल्यास संगणक क्रॅश होण्याची शक्यता होती. मायकेलने तोंडीच ई-टेक्स्टबद्दल त्यांच्या मित्रांना सांगितले. सहा जणानी डाउनलोड करून वाचले. शंभरेक जणांनी स्क्रीनवर बघून विसरूनही गेले. हार्ट इतर अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भाषणं हळू हळू टाइप करून अपलोड करू लागला. टंकलेखनात असंख्य चुका असतं. तरीसुद्धा त्यानी आपला प्रयत्न सोडला नाही. इतर वाचकही असल्या चुकांकडे दुर्लक्ष करत. कारण संगणकाच्या स्क्रीनवर मजेशीर असे काहीतरी वाचायला मिळते याचेच त्यांना कौतुक वाटत होते. 1981च्या सुमारास स्कॅनिंगची सुविधा बाजारात आली. अनेक हौशी मित्रमंडळी अभिजात साहित्यकृतींची पानं स्कॅनिंग करून मायकेल हार्टकडे पाठवू लागले. त्याच्यावरील व पुस्तकावरील प्रेमामुळे काही जण जुन्या ASCIIमध्ये पुस्तकातील पानेच्या पाने टाइप करून पाठवत असत. फाँट साइझ व फाँट टाइपसारख्या बाह्यस्वरूपापेक्षा पुस्तकातील आशय, त्यातील विचार महत्वाचे असतात याची जाण त्याला व पुस्तकप्रेमीना होती. ई-पानं व त्यावरून ईं-पुस्तकांची संख्या सातत्याने वाढू लागली. 2011 साली या ई-पुस्तकांची संख्या 33000 पर्यंत पोचली. म्हणजेच दर महिन्याला 200 पुस्तकं! जगभरातल्या 60 प्रमुख भाषेत त्यांचे अनुवाद उपलब्ध झाले. पुस्तक प्रेमी स्वत:हूनच पुढाकार घेत ही कामं करू लागले. यात कुठलाही पैशाचा व्यवहार नव्हता. ज्याना या संस्थळाला देणगी द्यावीशी वाटते त्यांच्यासाठी संस्थंळावर सोय उपलब्ध करून देण्यात आली. 21व्या शतकात पदार्पण करताना गूगल, याहू, अमेझॉन या मोठमोठया कंपन्यां ई-पुस्तकाच्या क्षेत्रात नफा कमवण्यासाठी गुंतवणूक करू लागल्या. आपणच ई-पुस्तकांचे जनक असे बढाया मारू लागल्या. परंतु मायकेल हार्टची या क्षेत्रातील कामगिरी जाणकार जाणून होते.
मायकेल हार्टने आपल्या या प्रयत्नाला गुटेनबर्ग प्रकल्प म्हणून नाव ठेवले. 17व्या शतकातील गुटेनबर्गच्या मुद्रण यंत्राच्या शोधामुळेच जनसामान्यापर्यंत पुस्तकं पोचली. ज्ञानक्षेत्रातील श्रीमंतांच्या मक्तेदारीला ते एक आव्हान होते. निरक्षरांना साक्षर होण्याची संधी मिळाली. सामान्य लोक वाचू लागले, लिहू लागले. साक्षरतेचा प्रसार होवू लागला. ग्रंथ व्यवहारातील मक्तेदारी सत्तेचा मनोरा कोसळू लागला. चर्चच्या मक्तेदारीप्रमाणे ज्ञानसाधनेतील मक्तेदारी संपायला हवी असे हार्टला वाटत होते. ज्याप्रकारे प्रत्येक क्षेत्रातील चर्चच्या लुडबुडीमुळे लोकांचे हाल होत होते त्याचप्रमाणे मुद्रण क्षेत्रातील अवाच्यासव्या किंमतीमुळे गरीब साक्षरांना वाचनसाहित्य मिळत नव्हते. त्यासाठी मायकेल हार्टने केलेले प्रयत्न क्रांतीकारक ठरतील. पुस्तकांच्या किंमतीना वेसण घालण्याची गरज आहे, हे त्याला पटले होते. विनामूल्य वा अल्पमूल्यात लेखन साहित्य उपलब्ध होऊ लागल्यास साक्षरता वाढेल, शिक्षणाचा प्रसार होईल हा उद्धेश त्यामागे होता. वैज्ञानिक क्रांती व औद्योगिक क्रांती प्रमाणे ही एक सायबर क्रांतीच होती.
हार्टला या प्रकल्पाच्या वेळी भरपूर अडचणी आल्या. अनेक अडथळे पार करावे लागले. माहिती व विचार जास्तीत जास्त वाचकापर्यंत पोचावी या मानवी प्रयत्नांना कॉपीराइट कायद्याचा फार मोठा अडसर आहे. गंमत म्हणजे प्रत्येक देशात या कायद्याचे स्वरूप वेगवेगळे आहे. आपल्या येथे लेखकाच्या मृत्युनंतर 50 वर्षानी त्याचे साहित्य कॉपीरीइटमुक्त होते. अमेरिकेत 25 वर्षांनी ब्रिटनमध्ये 30 वर्षानी... अमेरिकेने अलिकडेच 25 वर्षाची कालावधी वाढवून 100 वर्षे केली. मायकेल हार्टला कायद्याच्या जंजाळात पडायचे नव्हते. म्हणूनच ज्या पुस्तकांची कॉपीराइटची अवधी संपलेली असेल त्याच पुस्तकांची ई-आवृत्ती काढून तो अपलोड करत होता. परंतु नवीन पुस्तकं वाचकापर्यंत पोचत नाहीत याचे दु:ख त्याला होत होते. अमर्याद वितरण हा त्याचा मंत्र होता. सगळ्यांना सगळे मिळू दे, अज्ञानाचा काळोख दूर होऊ दे....
राहत्या घरातील तळघरामध्ये त्याचा मुक्काम असे. त्या खोलीत अस्ताव्यस्त पसरलेली पुस्तकं व वायरने वेढलेले संगणक व इतर साधनं दिसायची. न वटलेले धनादेश व कालबाह्य झालेले सॉफ्टवेरच्या डिस्कचा ढीग सापडायचा. तंत्रज्ञानातील अत्याधुनिक गॅड्जेटशी खेळत राहण्याचा त्याचा छंद होता. रेडिओ, हाय फाय स्टिरिओ, व्हिडिओ कॅमेरा इत्यादी साधनांचा वापर करून काही नवीन करता येईल का याची चाचपणी तो करत असे. त्यातून काही शिकण्याचा प्रयत्न तो करत असे. प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीकडे किमान हजार अभिजात पुस्तकांची वैयक्तिक लायब्ररी हवी, हे त्याचे स्वप्न होते. मोबाइल फोन व पोर्टेबल हार्ड डिस्कमुळे हे साध्य होऊ शकेल यावर त्याचा विश्वास होता.
ई पुस्तक म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानातील वा माहिती तंत्रज्ञानातील महत्वाचा टप्पा एवढ्याच संकुचित अर्थाने त्याकडे पाहू नये असे त्याला वाटत होते. कारण या संकल्पनेत ज्ञानसाधनं मुक्तपणे, विनामूल्य सर्वांना उपलब्ध व्हायला हवीत हा गर्भितार्थही त्यात समावलेला आहे, व हीच उपलब्धता मानवी समाजाला सुशिक्षित, विवेकी, विचार करणारी बनवू शकते, यावर त्याचा विश्वास होता. नवीन काही शिकण्यासाठी वेगळे एखादे खास बक्षीस, पारितोषक देण्याची गरज नाही. कारण शिकून घेण्यातील आनंदच शिकण्याचे पारितोषक असते.
आयुष्यभर कफल्लक राहूनच हार्टने जगाला सुशिक्षित करण्याचा विडा उचलला होता. काही प्रमाणात त्याला नक्कीच यश मिळाले यात काही शंका नसावी.
Comments
आदरांजली
विशेषतः अभिजात (क्लासिकल) पुस्तके वाचण्यासाठी प्रोजेक्ट गुटेनेबर्गच्या संकेतस्थळाचा एकेकाळी मी बऱ्यापैकी वापर केला आहे. त्याकाळी अख्खा शेक्सपिअर फ्लॉपीच्या एक एमबीत बसल्यावर जो आनंद झाला होता तो अवर्णनीय होता.
प्रोजेक्ट गुटेनबर्गला ओळखणाऱ्या अनेकांना नानावटी ह्यांच्या लेखामुळेच त्याच्या जाण्याची खबर लागली असण्याची शक्यता आहे. हार्ट गेल्याचा गवगवा फारसा झाला नाही. पण त्याच्या जाण्याने सर्वार्थाने मोठा माणूस गेला. मायकेल हार्टला भावपूर्ण आदरांजली.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
दु:खद वार्ता
मायकेल हार्ट ह्यांचे अकाली निधन ही निश्चितच दु:खदायक वार्ता आहे. येथेच ती समजली.
प्रॉजेक्ट गुटेनबर्गचा मी पूर्वी खूप वापर केला आहे. ५-६ वर्षांपूर्वीपर्यंत संगणकाचा वापर करून जुनी पुस्तके वाचण्याचा तो एक मुख्य स्रोत होता. अलीकडे books.google.com, archive.org ही संस्थळे वापरायला सुकर आणि प्रचंड साठा असलेली उपलब्ध झाल्यामुळे गुटेनबर्गकडे लक्ष कमी जाते. तेथील बरीच पुस्तके archive.org येथेहि उपलब्ध आहेत.
हा साठा संपूर्ण स्वयंसेवी मार्गाने निर्माण केला जातो. काही वर्षांपूर्वी मीहि स्वयंसेवक म्हणून अनेक पुस्तकांच्या टंकनात आणि प्रूफदुरुस्तीमध्ये भाग घेत असे. ही पद्धत फार वेळखाऊ आणि श्रमबहुल आहे. जुन्या काळात साठवणीची जाग कमी असल्याने टेक्स्ट स्वरूपातील मजकूर निर्माण करणे आवश्यक वाटे असे वाटते. नंतर साठवणीक्षमता खूप झाल्याने गूगल वगैरे लोक पुस्तकेच्या पुस्तके चित्रांच्या स्वरूपात उचलून OCR मार्गाने उपलब्ध करतात असे माझे (अतान्त्रिक) ज्ञान आहे. गूगल मोठयामोठया ग्रंथसंग्रहालयातील पुस्तकांचे यान्त्रिक पद्धतीने छायाचित्रण आणि OCR करून प्रतिदिन काही हजारांनी डिजिटल पुस्तके निर्माण करीत आहे असे मला वाटते. (चू.भू.द्या.घ्या.) ह्या कारणाने माझा सहभाग मी बंद केला कारण हाताने टंकन करून एक पुस्तक निर्माण व्हायला स्वयंसेवकांना काही दिवस काम करावे लागत असे. (मध्ये मी असे वाचले होते की एकाने यूटयूबला विचारले की तुमच्या साठवणीक्षमतेवर काही मर्यादा पडेल असे तुम्हाला वाटते काय. त्याला असे उत्तर देण्यात आले की सध्यातरी आम्हाला साठवणी अपुरी पडेल अशी काही शक्यता दिसत नाही, तेव्हा मोकळेपणे जितके अपलोड करावेसे वाटेल तितके करण्यास काही हरकत नाही. सध्या यूटयूबव दर मिनिटाला ३३ तास दिसेल इतके साहित्य अपलोड होत असते असेहि मी वाचलेले आहे.)
गुटेनबर्ग मध्ये मी प्रामुख्याने ज्यात काही गणिती लेखन आहे अशी आणि संस्कृत लेखन आहे अशा पुस्तकांवर काम करीत असे. त्यासाठी LaTeX वापराचे ज्ञान आवश्यक होते आणि काही प्रयत्नाने मी ते मिळविलेहि होते. अलीकडे काही वर्षात वापर न झाल्याने ते थोडे विस्मरणात गेले आहे इतकेच. (अशाच प्रकारची थोडी स्वयंसेवा मी sanskritdocuments.org ह्या संस्थळातहि केली आहे आणि त्याच कारणासाठी अलीकडे ते काम थांबविलेलेहि आहे.)
आदरांजली
मायकेल हार्ट आणि गुटेनबर्ग दोघांचीही माहिती/ओळख आवडली. धन्यवादा नानावटी.
हार्टचे जन्मभर आभारी राहू.