इस्लामच्या तत्त्वानुसार चालणरे राज्य - एक आराखडा

http://www.tolueislam.com/Parwez/articles/Parwez_ConstitutionIslamicStat... ह्या संकेतस्थळी जी.ए.परवेझलिखित आणि लाहोरहून प्रकाशित असे 'Quran's Constitution in an Islamic State - The Basis of Legislation and Outlines of the Constitution' अशा शीर्षकाचे एक पुस्तक पाहावयास मिळाले. सविस्तर चर्चेनंतर लेखकाने खालील १३ कलमांची एक घटना अशा राज्यासाठी सुचविली आहे. सर्व चर्चा येथे देता येत नाही पण सर्व १३ कलमे येथे शेवटी जोडली आहेत. (कलमे वाचतांना क्र. ४, ८ आणि १५ येथे थोडे संदर्भाने जुळवून घ्यावे लागेल अशी नम्र सूचना करतो. शेवटचा परिच्छेद समारोपाचा आहे.)

हा घटनेचा मसुदा एका व्यक्तीच्या विचाराचे फळ आहे. दुसर्‍या कोणी तज्ञाने हेच काम केले तर त्याचा मसुदा थोडा निराळा असू शकेल पण राष्ट्राला जर स्वतःला इस्लामी म्हणवून घ्यायचे असेल तर कुराणाची आज्ञा आणि त्याखालोखाल प्रेषिताचा शब्द आणि आचरण ह्यांचे अन्तिमत्व मान्य करावयास लागणार असल्याने तिची मुख्य तत्त्वे सोडून फार फरक करता येईल असे वाटत नाही.

पश्चिम देश, भारत, जपान, ऑस्टेलिया-न्यूझीलंड अशा प्रकारच्या देशात जी लोकशाही सध्या राबविण्यात येत आहे तिच्यात आणि खालील घटनेत काही मूलभूत तफावती आहेत. त्यांचा त्रोटक उल्लेख करतो.

१) ह्या घटनेमध्ये सार्वभौमत्व ईश्वराकडे दिले आहे. (कलम १ पहा.) भारतासारखे देश हे सार्वभौमत्व सर्व प्रजेकडे आहे असे मानतात. उदा. भारतीय घटनेची प्रस्तावना (Preamble) पहा.
२) ह्या घटनेमध्ये सर्व कायद्यांचा मूलाधार कुराण असल्याचे प्रतिपादिले आहे. भारतामध्ये मूलभूत हक्कांच्या चौकटीत बसणारा कोणताहि कायदा निर्माण होऊ शकतो. त्यावर अन्य बंधन नाही.
३) कलम ४ आणि १४ अनुसार बिगरमुस्लिमांना स्पष्ट दुय्यम दर्जा देण्यात आला आहे.
४) राजकीय पक्षांचे अस्तित्व कलम ५ ला मान्य नाही. अशा पक्षांची काही आवश्यकता नाही असे म्हटलेले आहे.
५) कलम ९ आणि ११ अनुसार शिक्षणव्यवस्थेमध्ये कुराणाचे महत्त्वाचे स्थान ठरविण्यात आले आहे. बिगरमुस्लिमांनाहि हे लागू दिसते.
६) कलम अनुसार जी संसदेसारखी व्यवस्था सुचविण्यात आली आहे तिच्यात ठोस असे काहीच दिसत नाही. त्या संस्थांचे सदस्य कसे निवडले जातील ह्यावर कोठेच काहीच प्रकाश टाकलेला नाही. निवडणुका मात्र नसाव्यात कारण सर्व पुस्तकात election असा किंवा तत्सम अर्थाचा एकहि शब्द सापडत नाही.
७) कलम १३ अनुसार उत्पादनसाधने सार्वत्रिक मालकीची म्हणजेच राज्यसंस्थेच्या ताब्यात असणार आहेत.

'अरब वसंता'नंतर तेथे खर्‍या लोकशाहीशी साधर्म्य असलेली काही व्यवस्था येईल अशी आशा काहीजण करतांना दिसतात. मला तरी त्यात काही अर्थ दिसत नाही. ह्या सर्व देशांत शिक्षण कमी आणि इस्लामचा जनमानसावर पगडा अधिक अशी स्थिति आहे. तेथे कुराणाचा आणि पैगंबराचा वरचष्मा थोडा कमी करा अशा 'आधुनिक' संदेशाची घंटा जनतारूपी मांजराच्या गळ्यात कोणी बांधू शकेल हे शक्य दिसत नाही.

ह्यावर कोणी असा प्रतिवाद करू शकेल की पाकिस्तान, मलेशिया,डंडोनेशियासारख्या देशात इस्लामबाहुल्य असूनहि एका प्रकारची लोकशाही चालू आहेच तर अरब देशांमध्ये ती का येऊ शकणार नाही? ह्यावर माझेयुत्तर असे आहे की ह्या देशांना त्यांच्या साम्राज्यकाळातील इतिहासामध्ये अशा राज्यव्यवस्थेचे बाळकडू इस्लामने आजचे आक्रमक रूप धारण करण्यापूर्वीच्या काळातच मिळालेले आहे आणि तो गड त्यांनी आधीच चढलेला आहे. हे घडयाळ उलटे न वळवता तेथे काम चालू राहू शकते पण जेथे पूर्वी लोकशाही विचाराचे काहीच बीज नव्हते अशा अरब देशांना इस्लामच्या वाढत्या हाकेकडे दुर्लक्ष करून तो गड चढणे सोपे नाही. तुर्कस्थानाची परिस्थिति आणखीच वेगळी आहे. अतातुर्कने त्या जुन्या काळात इस्लामचा पगडा सैनिकी सामर्थ्य वापरून कमी केला आणि आज तेथील सैन्यच ह्या धर्मनिरपेक्षतेचे पालकत्व स्वतःकडे बाळगून आहे. त्याची कारणे अगदीच वेगळी आहेत.

प्रस्तावित इस्लामी राज्याची घटना
इस्लामी घटना कलमे १ ते ७
इस्लामी घटना कलमे १ ते ७
इस्लामी घटना कलमे ८ ते १२
इस्लामी घटना कलमे ८ ते १२
इस्लामी घटना कलमे १३ ते १५ आणि समारोप
इस्लामी घटना कलमे १३ ते १५ आणि समारोप

Comments

सध्या कागदोपत्री दिसतय....

मूळ इंग्लिशमधील् मजकूर पूर्ण वाचलेला नाही. पण काही भर घालू इच्छितो :-

>> ३) कलम ४ आणि १४ अनुसार बिगरमुस्लिमांना स्पष्ट दुय्यम दर्जा देण्यात आला आहे.
गैर मुस्लिमातही दोन प्रकार मानले गेलेले आहेत. एक पुस्तकधारी(बहुदा धिम्मी ) आणि दुसरे गैरपुस्तकधारी/मूर्तीपूजक.
पहिल्या प्रकारांत ज्यू, ख्रिश्चन ह्यांचा समावेश आहे. त्यांनी इस्लामी राज्यात जिवंत राहिले तरी वहाबींना चालते. त्यासाठी त्यांनी जिझिया नावाचा कर द्यायला लागतो. इतरांनी जिवंत राहिलेले वहाबींच्या इस्लामी राज्यात चालत नाही. सध्याही माझ्या माहितीप्रमाणे गैरमुस्लिमांना दुय्यम नागरिक ही वागणूक लोकशाही असलेल्या पाकिस्तानात अधिकृतपणे दिली जाते.(द्वारकानाथ संझगिरी पाकच्या दौर्‍यावर् गेले असताना त्यांनी त्याबद्दल् पुस्तक लिहिले, त्यात उल्लेख् आहे.)

>> ५) कलम ९ आणि ११ अनुसार शिक्षणव्यवस्थेमध्ये कुराणाचे महत्त्वाचे स्थान ठरविण्यात आले आहे. बिगरमुस्लिमांनाहि हे लागू दिसते.
होय्. हे तर आहेच्. निव्वळ कुर् आन नव्हे तर हदिथ/हदिस मधील कथा-घटना म्हणजे पैगंबरांच्या जीवनातील प्रत्यक्ष गोष्टी ह्यांचाही त्यात समावेश आहे.

>> ७) कलम १३ अनुसार उत्पादनसाधने सार्वत्रिक मालकीची म्हणजेच राज्यसंस्थेच्या ताब्यात असणार आहेत.
हे काहिसं कम्युनिस्टांसारखं वाटतय.

>> 'अरब वसंता'नंतर तेथे खर्‍या लोकशाहीशी साधर्म्य असलेली काही व्यवस्था येईल अशी आशा काहीजण करतांना दिसतात.मला तरी त्यात काही अर्थ दिसत नाही.
शाम्हालाही दिसत नाही.

ह्या सर्व देशांत शिक्षण कमी आणि इस्लामचा जनमानसावर पगडा अधिक अशी स्थिति आहे. तेथे कुराणाचा आणि पैगंबराचा वरचष्मा थोडा कमी करा अशा 'आधुनिक' संदेशाची घंटा जनतारूपी मांजराच्या गळ्यात कोणी बांधू शकेल हे शक्य दिसत नाही.

घंटा बांधायचा प्रयत्न इराणी विचारवंत,, कलावंत वगैरेंनी केला होता, त्यांची काय गत झाली हे आपणास ठाउक आहेच.

--मनोबा

घंटा बांधणे

>>घंटा बांधायचा प्रयत्न इराणी विचारवंत,, कलावंत वगैरेंनी केला होता, त्यांची काय गत झाली हे आपणास ठाउक आहेच.

भारतात देखील सुरुवातीला घंटा बांधण्याचा प्रयत्न करणार्‍यांना भरपूर त्रास झाला होता. (स्वराज्य नव्हते म्हणून सुधारकांचे फावते अशी खंत विसाव्या शतकाच्या सुरुवातीस व्यक्त झाली होती आणि 'आज पेशवाई असती तर' अशी धमकी सावरकरांना* मिळाली असल्याचा इतिहास आहे). स्वराज्य असते** तर भारतातही त्यांची तीच गत झाली असती का?

*सावरकरांनी पेशवाई असती तर सगळे दुसरे बाजीरावच असते असे कशाला समजायचे? असा प्रश्न विचारून त्या कल्पनेतील हवा काढून घेतली होती.
**आजही समाजसुधारणेचे कार्य करणार्‍यांवर परंपरावाद्यांचा रोख असतोच. आणि त्यांच्याही मनात सध्याचे सरकार 'आपले नाही' अशी भावना असते (उदा.- भारतात बहुसंख्यांक सत्तेवर नाहीत वगैरे कल्पना).

मुद्दा हा की परंपराभिमान्यांनी घटना बनवली तर फार वेगळे अपेक्षित असू शकत नाही.

नितिन थत्ते

परंपरावादी?

ह्यानिमित्ताने भारताशी जोडलेला संबंध् आवडला. भारतात सरकारतर्फे कुणाही कलाकाराला अशी चाबूक, बहिष्कार, देहयातना, देहदंड दिला गेल्याचे आठवत नाही.
भारतात् ज्यांना व्हायला हवे त्यांच्याही शिक्षेची अंमलबजावणी होत नाही अशी जनभावना आहे, तिकडे ज्यांना व्हायला नको अशांनाही शासन होते.

>> भारतात बहुसंख्यांक सत्तेवर नाहीत वगैरे कल्पना.

आँ? कुणाच्या आहेत ह्या कल्पना? इथे तर धागाकर्त्याच्याही नाहित अन् माझ्याही नाहित. जरा प्रकाश टाकलात तर बरं होइल बॉ.

--मनोबा

तुम्हाला उद्देशून नाही

मी फक्त भारतातली परिस्थिती फार वेगळी नाही हे दाखवायचा प्रयत्न केला.

भारतात बहुसंख्यांक सत्तेवर नाहीत अशी भावना याच संस्थळावर नुकतीच एका लेखावरील प्रतिसादात व्यक्त झाली आहे. ती व्यक्त करणारे सदस्य उघडपणे देशाच्या पंतप्रधानपदी आणि सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीच्या धर्मावरून बहुसंख्यांकांचे राज्य नाही असे मत व्यक्त करत आहेत.

असो. माझ्या म्हणण्याचा उद्देश एवढाच की जेव्हा सुधारणांचे वारे भारतात (विशेषतः हिंदू समाजात) वहात होते त्या वेळी परकीय सत्ता** होती. त्या परकीय सत्तेच्या आश्रयाने सुधारकांनी धर्मावर हल्ले केले असे परंपरानिष्ठांचे मत होते. (आणि आजही धर्माधिष्ठित* पक्षांचे सरकार नसल्याने -त्या सरकारच्या उत्तेजनाने- अंनिस वगैरे लोक धर्मावर हल्ले करतात असे परंपरावाद्यांचे मत आहेच).

*भारतात धर्माधिष्ठित आहोत असे उघड म्हणणे सोयीचे नसल्याने 'बहुसंख्यांक' या बुरख्याआडून अशी मते व्यक्त होतात.
**परकीय सत्ता येण्याच्या जस्ट आधी जी स्वकीय सत्ता होती त्यात असे धर्माधिष्ठित देहदंडाचे प्रकार चालत असे वाचले आहे.

नितिन थत्ते

निरीक्षण, मत

निरीक्षण -

१. हि घटना, साधारणपणे ७३ वर्षे जुन्या (नविन!) पाकिस्तानी संघटनेने तयार केली आहे, त्या संघटनेला एकूण मुस्लिम जगतात फार पाठिंबा आहे असे जाणवत नाही.

२. घटनेच्या प्रस्तावनेनुसार इस्लाम=अतिरेकी हे समीकरण बदलण्याचा हा प्रयत्न आहे.

मत-

शोषण करणार्‍याला धर्म/संसद/वर्ण काहीही कारण चालते, पोषण करणार्‍याला काहीही कारण असले तरी फरक पडत नाही.

 
^ वर