बदलाचा इतिहास_धर्म

जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म ही धर्म या संकल्पनेची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या.जगण्याची पद्धत समुहाप्रमाणे बदलत गेली आणि मग त्या प्रत्येक पद्धतीला एक एक विशिष्टं नामाभिधान चिकटवलं गेलं.मोकळं जगणं एका अर्थानं बंदिस्त झाल.धर्म संकल्पना राबवणारय़ांचा दावा असा की सामान्यातल्या सामान्याला धर्म म्हणजे नक्की काय पाळायचं हे बंदिस्त नियमावलीमुळेच स्पष्टं झालं.
या लेखाच्या निमित्ताने विचारमंथन व्हावं अशी एक इच्छा आहे.इथे काही उदाहरणं मांडली आहेत आणि त्यावर अनेक वाचक आपली मतं मांडू शकतील.परस्परांमधल्या मतमतांतर प्रक्रियेला चालना मिळून विषयाचा आवाका नजरेसमोर येत रहावा असा एक उद्देश.
एखादा धर्म सोडून दुसरा धर्म स्विकारावा हा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात का येत असावा? त्यानंतर कृतीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष कृती कशी घडत असावी? त्यानंतरचे पडसाद काय स्वरूपाचे? हा या लेखाचा बीजविषय आहे.या संबंधातली केवळ उदाहरणं समोर ठेवणं हे या लेखाचं स्वरूप आहे.लेखावर वाचकतज्ज्ञांकडून उहापोह व्हावा ही सदिच्छा!
सुरवातीचं उदाहरण प्रत्यक्ष धर्मांतराचं नाही.कालानुक्रमानंही ते पहिलं नाही.जगण्याची पद्धत एवढाच शब्दश: आवाका या उदाहरणापुरता लक्षात घेऊया.
आपेगावच्या विठ्ठ्लपंत कुलकर्ण्यांना संसारात पडून मुरल्यानंतर, चार अपत्य झाल्यानंतर, गृहस्थधर्म सोडून संन्यस्तधर्म स्विकारावा असं का वाटलं असेल? एकाएकी, एका झटक्याच्या अंमलाखाली एखादी पुरूष व्यक्ती सर्वसंगपरित्याग करणं, तरुण वयात करणं हे त्या काळात कदाचित सहज असेल.मग काशीला जाणं.तिथे गेल्यावर विठ्ठलपंतांच्या गुरूंनी त्याना ’तू गृहस्थधर्म सोडणं ही चूक आहे.पुनश्च गृहस्थधर्म स्विकार!’ अशी आज्ञा करणं.ही आज्ञा शिरसावंद्य मानणं विठ्ठलपंतांना सोप्पं गेलं असेल? गुरूची आज्ञा तडकाफडकी शिरोधार्य मानण्याचा तो काळ.व्यक्तीच्या मनात आपल्या पुढच्या प्रवासांसंबंधात काही आलं नसेल? चलबिचल झाली नसेल? हे असं दोन टोकात गर्रकन् फिरणं या कृतीचा अर्थ एका व्यक्तीच्या अनुषंगातून कसा लावायचा? पुढे काय?
वाळीत टाकलं जाणं हा सर्रास भयानक अनुभव होता.त्याचा अंदाज विठ्ठलपंतांना नव्हता? असूनही ते त्यात पडले.मुलांचं काय? हा यक्षप्रश्न होता.या प्रवासाचा शेवट उभयता पतीपत्नींनी नदीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवण्यात होणं तसं अपरिहार्यच नाही का? पत्नी तर केवळ पतीबरोबर जायचं म्हणून आत्मसमर्पणाला तयार झाली असेल.तिला तिच्या लहानग्या चार-चार मुलांबद्दल काहीच वाटलं नसेल? विठ्ठलपंतांचा हा तीन टोकांवरचा प्रवास मग चमत्कारिक वाटू लागतो.तीन टोकाच्या कृती करणं या मागची मानसिकता काय असेल? विशेषत: हे वास्तवातलं उदाहरण आहे म्हटल्यावर उत्सुकता जास्तच ताणली जाते.

सरतेशेवटी मुलांचं काय? त्या मुलांचा या सगळ्यात काय दोष? त्याना तर अग्निदिव्यातून जावं लागल्याचं स्पष्टं होतं.पुढचे, पाठीवर मांडे भाजणं, भिंत चालवणं, रेड्याच्या तोंडून वेद वदवणं हा झाला चमत्काराचा भाग.चमत्काराचा भाग तर्कात बसत नाही म्हणून तो सोडून देऊ पण भोगावं तर लागलं असेलच.वाळीत टाकलं जाणं, जिथे तिथे अवमान होणं आणि त्यातून तावून, सुलाखून निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई अशी चार-चार अध्यात्मिक रत्नं निर्माण होणं हा पुन्हा एक आश्चर्यकारक प्रवास. विठ्ठलपंतांकडून निर्माण झालेल्या त्या पार्श्वभूमीमुळेच केवळ ही अशी फळं जन्माला आली? मराठी भाषेचा एक आद्यकवी जन्मला.त्यानं ज्ञानेश्वरी सांगितली, पसायदान मांडलं, ते ही इतक्या लहान वयात!- आणि नंतर, आता काही करायला उरलं नाही म्हणून त्यानं समाधीही घेतली!
वर म्हटल्याप्रमाणे विठ्ठलपंतांचा धर्मबदल हा केवळ वाच्यार्थानं घेतला जातो तसं धर्मांतर नव्हे.ते एकाच धर्मातल्या एका पद्धतीतून दुसरय़ा पद्धतीत जाणं (गृहस्थाश्रमातून संन्यासाश्रमात) आणि परत फिरणं या स्वरूपाचा प्रवास आहे.ह्या प्रवासातली व्यक्तीव्यक्तींच्या मानसिकतेतली, जगण्यातली, त्याना तत्कालिन समाजानं दिलेल्या वागणुकीतली आणि त्यामुळे एकूणच होणारी घुसळण अस्वस्थ करते, विचार करायला लावते, नाही? या उदाहरणाचा विशेष म्हणजे अतोनात सहनशक्ती अनुसरून ह्यातल्या अंतिम टप्प्यातल्या सर्वच व्यक्तींनी एक सकारात्मक कार्य उभं करणं, जगाला एक उदाहरण घालून देणं हा सगळ्यावरचा कळस म्हणता येईल.सकारात्मक असणं म्हणजे आणखी काय असतं?..
कवि नारायण वामन टिळक अर्थात रेव्हरंड टिळक हे पुढचं उदाहरण.ते संस्कृत शिकले.इंग्रजी आणि इतर विषय शिकून झाल्यावर शिक्षण सोडून देऊन ते चरितार्थासाठी आणि गृहस्थधर्म निभावण्यासाठी शिक्षक झाले.लक्ष्मीबाई टिळकांपाशी अधिकृत शालेय शिक्षण नव्हतं.टिळकांनी प्रोत्साहन देऊन त्याना मराठी लिहावाचायला शिकवलं.स्मृतिचित्रे हे लक्ष्मीबाईंचं आत्मचरित्र मराठी साहित्यातला एक मैलाचा दगड मानला जातो.

महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमधे ना.वा.टिळकांनी नोकरया केल्या.शिक्षक, पुरोहित आणि छापखान्यातला खिळे जुळवणारा अशा त्या होत्या.नागपुरात त्याना संस्कृत साहित्याचा भाषांतरकार म्हणून नोकरी मिळाली.संस्कृतात कविता केल्या.’ऋषी’ ह्या हिंदू धर्मविषयक उहापोह करणारय़ा नियतकालिकाचे ते संपादक होते.
नागपूरहून राजनंदगाव ह्या त्या वेळच्या एका संस्थानाकडे आगगाडीने प्रवास करत असताना, प्रवासात त्यांची भेट अर्नेस्ट वॉर्ड ह्या ख्रिश्चन धर्मगुरूशी झाली.वॉर्ड हे फ्री मेथॉडिस्ट चर्च या संप्रदायाचे होते.त्यानी स्वधर्माविषयी टिळकांशी बातचीत सुरू केली.टिळकांना त्यानी बायबलची एक प्रत भेट म्हणून दिली.त्याचवेळी वॉर्ड हे टिळकांच्या कानात कुजबुजल्याचं सांगण्यात येतं.’तुम्ही दोन वर्षांच्या आत सर्वरक्षक येशूच्या प्रेमळ पंखांखाली याल!’ हे ते वाक्यं.
त्याचवेळी हिंदू धर्मातली कर्मकांडं आणि जातीव्यवस्था यावर हा तरल मनाचा कवी आणि अभ्यासक नाराज होता.आजही हिंदू धर्मातल्या प्रमुख बोट ठेवल्या जाणारय़ा गोष्टी, इतक्या काळानंतरही, त्याच राहिल्या आहेत.जाणते आजही ह्या गोष्टींवर नाराज आहेत आणि त्याचवेळी कर्मकांडांनी पुन्हा भयावह रूप घेतलंय.जगण्यातली टोकाची अनिश्चितता हे त्याचं कारण सांगितलं जातं.राजकारणी त्याचा वापर करून घेताएत.जातीव्यवस्था एकीकडे जाळपोळ, बलात्कार, अजून वाळीत टाकणं अशा त्याच त्या मध्ययुगीन मानसिकतेत दिसते तर दुसरीकडे आरक्षण हा विषय दिवसेंदिवस समाजात दुफळी निर्माण करू लागलाय.राजकारणी इथेही अग्रक्रमाने धुडगूस घालू लागले आहेत.जातीव्यवस्थेचं धृवीकरण इत्यादी होतं आहे काय?.. असो! हिंदूधर्मातल्या कर्मकांडं आणि जातीव्यवस्था ह्या गोष्टी संवेदनशील मनाला बोचणारय़ा होत्या त्या तशाच राहिल्या आहेत असं दिसतं.
टिळकांनी धर्मांतर केलं.त्यातलीही विशेष गोष्टं म्हणजे तसं करत असताना त्यानी आपल्या पत्नीला, जिचा हिंदूधर्मावर गाढ विश्वास होता तिला तसं केल्याचं कळवलंच नाही! या धार्मिक मतांतरामुळे पतीपत्नींमधे वेगळं रहाण्याइतपत दुरावा आला.या काळात लक्ष्मीबाईंनी ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला.त्या ख्रिश्चन धर्माकडे ओढल्या गेल्या आणि शेवटी त्यांनीही धर्मांतर केलं.दोघांचं सहजीवन आणखी प्रेममय झालं.हिंदू विवाहसंस्था भक्कम झाली ती पतिव्रताव्रत आणि एकपत्नीव्रत यांमुळे असं म्हटलं जातं.विवाहानंतर, इतक्या उशीरा पतीपत्नीनं एकत्र येणं आणि एकरूपही होणं हे अगम्य असल्याचं म्हटलं जातं.परदेशात अचानक गायब होणारे नवरे, घटस्फोटित स्त्रीपुरूषांची संख्या एकूण लोकसंख्येच्या निम्मी होणं, एकपालकी कुटुंबांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढणं या पार्श्वभूमीवर लेखक भालचंद्र नेमाडे एके ठिकाणी असं म्हणतात की आपल्या देशातल्या अफाट जनसमूहाचं सामाजिक स्थैर्य अबाधित राखणारय़ा हिंदू विवाहसंस्था या गोष्टीचा संबंध एकूण मानवी समाजाच्या मानसिक आरोग्याशी जोडला पाहिजे.
अहमदनगरला रहात असताना आलेल्या प्लेगच्या साथीत उभयता पतीपत्नींनी केलेलं सेवाकार्य, सफाई कामगारांनी त्याचवेळेला केलेला संप मोडून काढणं, ते शरण आल्यावर त्यांचं उद्बोधन करणं, डॉक्टरांकडून प्लेगरूग्णांच्या सेवेबद्दल मिळालेलं मानपत्रं नाकारणं आणि केवळ सेवाधर्माचा धडा घालून देणं हे सकारात्मक कार्य केवळ वाखाणण्याजोगं.ख्रिस्तावरील अपार श्रद्धेमुळे करुणा, दया, सत्य, मानवता आणि सहृदयतेने केलेला सर्व विश्वाचा विचार ही मूल्यं त्यांच्या ठायी प्रकट झाली? की हा या दोघांचा स्थायीभाव होता? धर्मांतर केलं असतं आणि नसतं तरीही त्यांनी या प्रकारचं कार्य केलं असतं की नसतं?
धर्मांतरांमुळे टिळक पतीपत्नीला सामाजिक जाचाला तोंड द्यावंच लागलं होतं.समाजानं वाळीत टाकणं म्हणजे काय? याची कल्पनाच आपण फक्त करू शकतो.त्या कल्पनेनेही आपल्यासारख्याच्या अंगावर काटा येतो.
अस्पृश्यांवर होत असलेल्या युगानुगाच्या अन्यायाचं काय? सवर्णांनी त्याना जनावरासारखी वागणूक दिली म्हणजे काय काय केलं हे नुसतं वाचून, ऐकून आज संवेदनशील माणूस अस्वस्थ होतो.हिंदू धर्मातल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेचं हे फलित.अशी व्यवस्था समाजात सुसूत्रता यावी म्हणून आल्याचं सांगतात पण त्यानं विषमतेचा भला मोठा डोंगर उभा केला.जो आजतागायत मिटता मिटलेला नाही.महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज यांनी तळमळीने यासंबंधात कार्य केलं.डॉ.भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर यांनी याच समाजात जन्म घेतला.आपली आणि आपल्या ज्ञातीबांधवांची दारूण अवस्था जवळून पाहिली.बडोदे संस्थानाचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीवर ते जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा त्यांना तिथे अस्पृश्यतेचा काहीच त्रास झाला नाही.दोन देशातल्या या परस्पर अनुभवांमुळे आपल्या देशाला, समाजबांधवांना या सामाजिक विषमतेच्या विळख्यातून बाहेर काढायचंच हे त्यांनी पक्कं ठरवलं.अमेरिका, लंडन इथे उच्च शिक्षण घेऊन परत आल्यानंतर त्यानी विविध वृत्तपत्रे चालवून अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजाची कैफियत आपल्याच हिंदू बांधवांसमोर सतत मांडली.नाशिकच्या काळाराम मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशासाठी सत्त्याग्रह केला.त्यात ते यशस्वीही झाले.

हिंदू धर्मात राहूनच त्यानी अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला.केवळ महाडचे चवदार तळे किंवा नाशिकचे काळाराम मंदिर एवढ्यापुरतं काम त्याना करायचं नव्हतं तर अस्पृश्य मानले गेलेल्यांना सन्मानाने जगता यावं हे त्यांच्या लढ्याचं उद्दिष्ट होतं.मनुस्मृतीचं जाहीर दहनही त्यानी केलं.त्यानंतरही तथाकथित उच्चवर्णीय आपल्या वर्तनात आणि मानसिकतेत बदल करत नाहीत हे त्यांच्या पुरेपूर लक्षात आल्यावर त्यानी ’मी हिंदू धर्मात जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही!’ अशी प्रतिज्ञाच केली.सरतेशेवटी पाच लाख अपृश्य बांधवांसह त्यानी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.धर्मपरिवर्तन केलं.जेव्हा त्यांनी धर्मांतर करायचं ठरवलं तेव्हा सखोल अभ्यास आणि चिंतन करून त्यांनी अहिंसा, सत्य, मानवता यांना प्राधान्य देणारा बौद्ध धर्म निवडला.
यानंतर थोडसं, जबरदस्तीनं धर्मांतर या विषयाकडे वळूया.हे खरं तर आपण इथे विचारात घेत असलेल्या विषयाचं दुसरं टोक.पण काही वेळा असं अगदी दुसरं टोक गाठल्यावर आपण विचार करत असलेल्या विषयातले आणखी काही दुवे आपल्याला मिळून विचार सर्वंकष होण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.
हे जबरदस्तीचं धर्मांतर ठळकपणे दिसतं पाच पाच मुघल पातशहा हिंदूस्थानात धुमाकूळ घालत होते त्या काळात.हिंदू स्त्रिया, पुरूष, बालकांवर अत्त्याचारांची परिसीमा गाठली जात होती आणि श्री रामदासस्वामींच्या मार्गदर्शनाखाली एकमेव हिंदवी स्वराज्य उभारण्याचं कठीण काम शिवाजीराजानी केलं.हे करत असताना जबरदस्तीनं धर्मांतर करवल्या गेलेल्यांना अस्पृश्याची वागणूक मिळू नये म्हणून राजांनी शुद्धिकरणं करवून घेतली.नेताजी पालकरांचं शुद्धिकरण हे ठळक उदाहरण.

मुख्यत्वे मुस्लिम धर्म आणि त्यानंतर ख्रिश्चन धर्म यांनी भारतात कालांतराने पाय पसरले.मुस्लिम राज्यकर्त्यांची जुलमी धर्मांतरं आणि ख्रिश्चन मिशनरय़ांचा धर्मप्रसार (शर्कराअवगुंठीत औषधासारखा?) उल्लेखनीय आहे.विहीरीत पाव टाकणं आणि त्या विहीरीचं पाणी नकळत किंवा नाईलाज झाल्यामुळं वापरावं लागल्यामुळे धर्मांतर होणं ही गोष्टही नोंदली गेली.समाजानं अस्पृश्य म्हणून वाळीत टाकण्यासाठी आणखी एक नवा वर्ग त्यामुळे तयार केला झाला.शुद्धिकरण हा पर्याय या समस्येवर वापरला गेल्याचं दिसतं.या इतर धर्मांनी असे प्रकार राबवले पण हिंदू धर्माच्या प्रसारकांनी असे मार्ग अवलंबल्याचे दिसत नाही.अद्वैत तत्वज्ञानाचा प्रसार करणारय़ा आदि शंकराचार्यांनी भारतभर फिरून विविध विचारसरणी आणि धर्मांचा पुरस्कार करणारय़ा विद्वानांशी वादविवाद करून आपली मतं सिद्ध केली असं सांगितलं जातं.हिंदू धर्माकडे आकर्षित झाल्यामुळेच हिंदू म्हणून धर्मांतर करून घेतल्याचं जगभर दिसतं.हिंदू म्हणून धर्मांतर करून घेतलेल्या जगभरातल्या व्यक्तींची यादी आंतरजालावर इथे बघायला मिळते.

धर्मांतराविषयी जालावर शोध घेत असताना या जालनिशीवर भारतातल्या विविध प्रांतातली सद्यकाळातली ख्रिश्चन धर्मांतरं मांडलेली दिसली.यातलं पहिलंच उदाहरण वाचताना पुन्हा चमत्कार इत्यादीचा प्रभाव जाणवला.दोन दोन राष्ट्रपती सुवर्णपदक मिळालेला आणि परदेशात उच्च शिक्षण घेऊन आलेला मूळ हिंदू, दक्षिणेतल्या एका मंदिराच्या मुख्य पुजारी घराण्यातला मुलगा हा अनुभव सांगतो आहे.त्यात तो बनारस-तामिळनाडू आगगाडीच्या प्रवासात मधेच मध्यप्रदेशात उतरला तो कुणी आवाज (?) त्याला तशा सूचना देतोय म्हणून.मग त्याला पूर्वी ८०० किमी दूर भेटलेला एक संन्यासी तिथल्या रेल्वेस्टेशनवर अचानक भेटतो.तो त्याला नर्मदाकिनारी बाप्तिस्मा होईपर्यंत मार्गदर्शन करतो.एका अर्थाने अतिपरिचयात अवज्ञा असं आपण वर्षानुवर्षं बघत असलेल्या किंवा पाळत असलेल्या धर्माबद्दल होत असावं काय?

नंतरच्या काळातली काही उदाहरणं त्रोटक स्वरूपात:

मोहम्मद अली जिना या पाकीस्तान निर्मितीपुरुषाचे पूर्वज हिंदू राजपूत होते.त्यांचे आजोबा पूंजा गोकुळदास मेघजी हे हिंदू भाटीया रजपूत होते ज्यानी नंतर इस्लाम धर्म स्विकारला.जिनांच्या जन्माआधी काही काळ त्यांचे वडील जिन्हाभाई पूंजा कराची इथे व्यवसायासाठी स्थलांतरीत झाले.कराची तेव्हा बॉम्बे प्रेसिडेन्सीमधे येत असे.जिन्हाभाई पूंजा हे एक भरभराट झालेले गुजराती व्यापारी होते.काठियावाडमधलं गोंडल हे त्यांचं मूळ स्थान.जिना स्वत: एक हुशार वकिल म्हणून फाळणीपूर्व भारतात सुप्रसिद्ध होते.मलबार हिल इथे आजही अस्तित्वात असलेलं जिना हाऊस महम्मद अली जिना यांचंच.जिना यांचा दुसरा विवाह रत्नाबाई पेटिट यांच्याशी झाला.त्या जिनांपेक्षा चोवीस वर्षांनी लहान होत्या.सर दिनशॉ पेटिट या जिनांच्या मुंबईतल्या पारसी मित्राच्या त्या कन्या.पेटिट ग्रंथालय, पेटिट स्कूल ह्या संस्था मुंबईत आजही अस्तित्वात आहेत.त्या दोघांच्या विवाहाला दोन्हीबाजूनी प्रचंड विरोध झाला.दिना जिना अर्थात दिना वाडिया हे जिना पतीपत्नीचं एकमेव अपत्य.दिनांचं शिक्षण इंग्लंड आणि भारतात झालं.त्यानी नेविल वाडिया या इंग्लिश उद्योजकाशी लग्न केलं.नेविल वाडियांचे वडील सर नेस वाडिया ह्यांनी भारतात बॉम्बे डाईंग ही प्रसिद्ध कंपनी स्थापली.मुंबईला कापड उद्योग म्हणून जगन्मान्यता देण्यात त्यांचा हात होता.नेविल वाडिया पारसी म्हणून जन्मले असले तरी सर नेस वाडियांनी दरम्यान झोराष्ट्रियन धर्म सोडून ख्रिश्चन धर्माचा स्विकार केला होता.नेविल वाडिया नंतरच्या आयुष्यात पुन्हा झोराष्ट्रियन झाले! अशी ही धर्मांतराची गुंतागुंत!
(वाडिया कुटुंबाची मुंबईत भरपूर जमिन आहे.टाटा कुटुंबाशी त्यांचं नातं आहे.मुंबईतल्या जिना हाऊसच्या मालकीचं प्रकरण हे भारत पाकिस्तान संबंधातलं आणखी एक परिमाण.हा संक्षिप्त अवांतर तपशील.)

सुप्रसिद्ध ऑस्कर विजेता संगीतकार अल्ला रख्खा रेहेमान अर्थात ए.आर.रेहेमान हा ए.एस्.दिलीपकुमार म्हणून एका मुदलियार कुटुंबात जन्माला आला.त्याचे वडील आर.ए.शेखर हे मल्ल्याळम चित्रपटसृष्टीत नावाजलेले संगीतकार होते.अवस्था हालाखीची होती.आर ए शेखर त्यांच्या वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी वारले.लहान बहिण गंभीर आजारी असताना १९८४ मधे ए.एस्.दिलीपकुमार आणि त्याच्या कुटुंबियांची काद्री इस्लाम या पंथाशी ओळख झाली.जवळीक झाली आणि १९८९ मधे वयाच्या २३ व्या वर्षी आजच्या ए.आर.रेहेमाननं कुटुंबियांसकट इस्लाम धर्म स्विकारला.

पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ म्हणजेच पूर्वाश्रमीचा युसूफ योहाना हा अत्यंत गरीब परिस्थितीत जन्मला.राजस्थान, उत्तरप्रदेश, हरियाणा आणि पाकिस्तानात आढळलेल्या वाल्मिकी या दलित जातीतला त्याचा जन्म.हे कुटुंब नंतर ख्रिश्चन झालं.२००५ मधे इस्लाम धर्म स्विकारून युसूफ योहाना, मोहम्मद युसूफ झाला.त्या आधी तो पाकिस्तान क्रिकेट टीमचा पहिला परधर्मी (ख्रिश्चन) कर्णधार म्हणून नोंदला गेला होता.तब्लिघी जमात या संप्रदायाच्या शिकवणीकडे तो ओढला गेला त्यावेळी त्याची लहान मुलगी कॅन्सरसारख्या दुर्धर रोगाने आजारी होती असं वाचल्याचं आठवतं.

स्टीव्ह जॉब्स हा अलिकडेच दिवंगत झालेला ऍपल या कंपनीचा प्रणेता.अनौरस म्हणून जन्मलेला, दत्तक मात्यापित्यांकडे सुपुर्द झालेला आणि स्वत:हून घर सोडून बाहेर पडलेला.सुरवातीच्या हालाखीच्या दिवसात पोट भरून जेवण मोफत मिळतं म्हणून दर रविवारी सात किलोमीटर चालत हरेकृष्ण मंदिरात जावं लागत असे.प्रचंड प्रतिभाशाली आणि सर्जनशील अशी ही युगप्रवर्तक म्हणावी अशी महान व्यक्ती नंतरच्या काळात बुद्धधर्माच्या तत्वज्ञानाने आकर्षित होऊन बुद्धधर्मीय झाली होती...

लेखनविषय: दुवे:

Comments

धर्म म्हणजे काय?

विषय उत्तम मांडला आहे.

या विषयावर चर्चा करताना त्या परिस्थितीचा आणि त्यापूर्वीच्या पूर्व-पश्चिम जीवनमानाचा अढावा न घेतल्यास कदाचित विषयावर अन्याय होण्याची शक्यता असते. म्हणून हे काही मुद्दे...

ख्रिस्ती-मुस्लीम "रिलिजनस्" भारतात येण्यापूर्वी खरे तर कुठलाही "रिलिजन" असा भारतात नव्हता हे आपण सगळे जाणतोच. एक समाज पद्धती होती जिच्यावर वैदिक पगडा असल्यामुळे त्यास वैदिक समाज म्हटले जाऊ शकते. त्यातही सतत बदल होत होते - जसे अशोकाच्या पर्वादरम्यान बुद्ध संप्रदायाचा प्रभाव, वगैरे. या संस्कृतीत अनेक पंथ, ऋषी, महात्मे, असे प्रवाह सतत बदलत होते. आणी या वेगवेगळ्या प्रवाहांनी समाजाला त्या त्या वेळी चांगली दिशा देऊन समाजमान उंचावणार्‍या प्रत्येकाच्या प्रत्येक वागण्याला धर्माप्रमाणे वागणे समजले जायचे. म्हणजे "जे जे चांगले ते म्हणजे धर्म", मग तुम्ही कोणत्या विचार प्रवाहाला मानायचे ते माना अशी पद्धत होती. यात नवीन विचारसारणीवाले/प्रवाहावाले समाजापासून स्वतःला वेगळे न समजत अन त्यामुळे त्यात मिसळून जात. हे अंतर्गत प्रहाव तर सोडाच परंतू बाहेरुन आलेले शक, कुशाण, हन, ग्रीक, ज्यू, झोराष्ट्रीयन सगळेच मूळ प्रवाहात मिसळले गेले. त्यातील काहींचे रितीरिवाज त्यांनी वेगळे चालू ठेवले (ज्यू व झोराष्ट्रीयन) तर बाकीचे पूर्णपणे मूळ प्रवाहात मिसळून गेले. अर्थात असे होताना त्यांच्या काही प्रथा/चलिरिती मुख्य प्रवाहाने घेतल्या.

हे सर्व बदलले ते ख्रिस्ती-मुस्लीम "रिलिजनस्" भारतात आल्यावर कारणा या दोन्हींनी आपण सांगतो तेच खरे बाकी सर्व झूठ असा सूर धरला जे या समाजाला नवीन होते. तसेच भाषांतरानेही गडबड केली. "रिलिजन"चा समानार्थी शब्द "धर्म" असा लावला आणी गोंधळ सुरु झाला. खरे तर "रिलिजन" हा धर्माचा "सबसेट" (उपकोष?) कारण "रिलिजन" मध्ये एक विशिष्ट विचारसारणी असते जी एखाद्या धर्मगुरुने सुरु केलेली असते (भगवान महावीर, गैतम बुद्ध, येशू, मोहम्मद, हे सुद्धा आलेच) आणि ज्याला मार्गदर्शक असा एक सर्वश्रेष्ठ ग्रंथ असतो. तेव्हा या सगळ्या विचार प्रवाहांना मानणार्‍या आणि जगाचे भले करणार्‍यांना मूळ भारतीय पद्धतीने म्हणायचे झाल्यास धार्मिक असेच म्हणता येईल.

गॅलिलिओच्या मारेकर्‍यांना, क्रुसेड्सच्या नावाखाली वा अल्लाच्या फतव्याने हजारो निरपराध्यांना मारणार्‍यांना तसेच दलितांनावर अत्याचार करणार्‍या तथाकथित सवर्णांना रिलिजिअस मानता येईल परंतू धार्मिक नव्हे. रिलिजनला मी तरी एक पंथ माणतो जो की कर्मकांडात बर्‍यापैकी बुडालेला असतो.

रिलिजन बदलणार्‍या लोकांबद्दल बोलाल तर मला सर्वांत कमालीचे आश्चर्य वाटते ते त्या लोकांपैकी एक म्हणजे ना.वा. टिळक. ते असोत वा तुम्ही दिलेल्या दुव्यावरील टेस्टीमोनी मधील विद्वान असोत - हे असा एकांगी विचार कसा करू शकतात? ज्या हिंदू "रिलिजन"ला त्यांनी सोडचिठ्ठी दिली त्यातील एक ना एक अवगूण त्यांच्या नव्या "रिलिजन"मध्ये सुद्धा आहेतच की. सर्वांत जास्त जातीभेद (डिनॉमिनेशनस्) ख्रिश्चनांमध्ये आहेत, त्यांनीच रिलिजनच्या नावावर अत्तापर्यंत सर्वांत जास्त जीव घेतलेत आणि ते इथे येऊन सांगतात की या सगळ्या गोष्टींतून सुटका करण्यासाठी आमच्या रिलिजनला फॉलो करा. यापेक्षा खोटारडेपणा तो अजून काय असावा? आणि या तद्दन खोटारडेपणाला ही उच्चशिक्षित मंडळी दुर्लक्षित कशी काय ठेऊ शकतात? की लेखात म्हटल्या प्रमाणे "अतिपरिचयात अवज्ञा" होत असावी? या धाग्यावर या विषयांवर उहापोह होईल ही अपेक्षा.

--
जाता जाता - अशातच अगोरा हा चित्रपट पाहण्यात आला. या विषयात रस असणार्‍यांना नक्की आवडेल.

आभार!

विस्तृत प्रतिक्रिया दिलीत.धन्यवाद भास्कर! जगण्याची पद्धत, धर्म, रिलीजन, रिलिजिअस याबद्दल नेमकेपणाने लिहिले आहे.अतिपरिचयात अवज्ञावर मतं खरंच हवी आहेत.अगोरा या चित्रपटाच्या दुव्याबद्दल आभार.मला या विषयाबद्दल आणखी जाणून घ्यायचे आहे म्हणून हा धागा इथे टाकलाय.आपल्यासारख्या अभिप्रायांचं अगदी मनापासून स्वागत!
http://vinayak-pandit.blogspot.com

एक ठोस नियम नसावा

मानवी मनाच्या चढ-उताराला एक ठोस नियम नसावा. धर्मांतर करण्याची उर्मी आंतरिक असावी आणि त्याची कारणे - पाळत असलेल्या धर्माबद्दल आस्था नष्ट होणे, ज्या धर्मात जन्म झाला किंवा जो धर्म लादला गेला त्याच्यात रूची नसणे; त्यामुळे वेगळा धर्म स्वीकारण्यात नवल न वाटणे, वेगळ्या धर्मातील आचरण आवडणे, राजकीय संदर्भ आणि गणिते बदलणे, प्रिय जनांनी धर्म बदलणे, अमिषे आणि स्वार्थ, ब्रेन वॉशिंग वगैरे अनेक कारणांनी स्वखुशीने धर्म बदल होऊ शकतो.

कदाचित त्यासोबत येणारा त्रास अपेक्षित नसेलही किंवा त्याची तीव्रता धर्मबदल करताना जाणवत नसेल. नंतर जाणवली तरी परत जाणे अवघड झाल्याने जे होते ते भोगावे लागत असेल.

------------

वरील उदाहरणांबरोबरच धर्मासाठी प्राण देणार्‍यांची मला कमाल वाटते. यांत

१. संभाजी महाराज
२. जोन ऑफ आर्क
३. धर्माच्या नावाखाली प्राण देणारे सुसाइड बॉम्बर्स
वगैरेंचा समावेश होतो.

धर्माने बांधून ठेवण्यासारखे यांना काय मिळालेले असते किंवा इतका कडवेपणा का येतो?
------------

नेविल वाडिया नंतरच्या आयुष्यात पुन्हा झोराष्ट्रियन झाले!

असे भारतात करता येत नाही असे मला वाटत होते पण बहुधा मूळच्या पारशी लोकांना मूळ धर्मात परत येण्याची मुभा असेलही. :-)

धर्मबदलाची कारणे

धन्यवाद प्रियाली! मानवी चढ उतारांबद्दल एक ललित ले़खक म्हणून उत्सुकता आहे.धर्मबदलासंबंधातली कारणं आपण नेमकेपणाने दिलीत.लेखाची तयारी करत असताना संभाजी महाराजांचं धर्मांतर आणि त्यांचा झालेला छळ याबद्दल वाचायला मिळाले.भयानकता यापेक्षा वेगळी काय असू शकते? धर्माबद्दलच्या कडवटपणाची कल्पना करता येत नाही.
http://vinayak-pandit.blogspot.com

स्वागत!

विनायक, उपक्रमावर आपले स्वागत आहे. आपल्या ब्लॉगवर एक धावती नजर टाकली. उपक्रमावरही आपल्याकडून रोचक लिखाण होईल अशी अपेक्षा करते.

संभाजीमहाराजांचे हालहाल करून त्यांचा छळ करणारा कडवटपणा आणि मेलो तरी बेहत्तर पण धर्मबदल करणार नाही हा ठामपणा कसा येतो/ निर्माण होतो/ जोपासला जातो याची कारणमीमांसा खरेच रोचक असावी.

+

>>संभाजीमहाराजांचे हालहाल करून त्यांचा छळ करणारा कडवटपणा आणि मेलो तरी बेहत्तर पण धर्मबदल करणार नाही हा ठामपणा कसा येतो/ निर्माण होतो/ जोपासला जातो याची कारणमीमांसा खरेच रोचक असावी.

अगदी. तेही दोन्ही पार्ट्यांना त्यांचा-त्यांचा धर्म अपघाताने प्राप्त झाला असताना.

नितिन थत्ते

धर्मांतर

विचारमूल्य असलेला आणि त्यावर मंथन करण्यास अतिशय चांगला असा विषय आणि तो धागाकर्त्याने सोदाहरण मांडला असल्याने त्यातील विधानांना साहजिकच व्यावहारिकताही आली आहे.
असे असले तरी ~
एखादा धर्म सोडून दुसरा धर्म स्विकारावा हा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात का येत असावा?
या मुद्द्यावर लक्ष केन्द्रीत करणे आवश्यक असता विठ्ठलपंतांचे उदाहरण [निदान इथे] अप्रस्तुत ठरते. धर्म म्हणजे 'रिलिजन' मानायचे असेल तर विठ्ठलपंतानी तसे केलेले नव्हते हे तर उघडच आहे. पण असो, तो मुद्दा बाजूला ठेवून चर्चा पुढे नेत आहे.

बाकीच्या उदाहरणातील तीन तर थेट मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या व्यक्तीसंबंधी असल्याने एखाद्याचा असा समज होण्याची शक्यता आहे त्या धर्मात वर्णभेद नसल्याने त्याच्या शिकवणीत समतेचे राज्य आहे. असा समज करून घेणेही अज्ञानाचे लक्षण आहे. मुस्लिम जातीत उच्चनीचतेचे प्रमाणही तितकेच अगाध आणि कट्टर आहेच. खलिफा हा जन्मजात उच्च ठरलेल्या 'कुरेशी जातीतीलच असावा लागतो. उच्चनीच भेदाभेदावरूनच पवित्र क्षेत्र करबला येथे प्रत्यक्ष मुसलमानानीच मुसलमानांची नृशंस हत्या केल्याचा प्रखर इतिहास आहे. प्रत्यक्ष महंमद पैगंबरांच्या नातूलादेखील याच जात्यंध मुसलमानानी हालहाल करून मारले होते. त्यामुळे एखादा धर्म सोडून दुसरा स्वीकारण्यामागे पहिल्या धर्माने "हद्दपार" च केले असेल असे न मानता अजूनही छुपे हेतू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. [या संदर्भातील अगदी हास्यास्पदच उदाहरण द्यायचे झाल्यास हिंदी चित्रपटसृष्टीतील काही नामवंत अभिनेते/नेत्र्यांनी हेतूसाठी चोखाळलेला हा 'मुस्लिम' मार्ग.]

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराबाबत श्री.पंडित म्हणतात "जेव्हा त्यांनी धर्मांतर करायचं ठरवलं तेव्हा सखोल अभ्यास आणि चिंतन करून त्यांनी अहिंसा, सत्य, मानवता यांना प्राधान्य देणारा बौद्ध धर्म निवडला" हे त्यांचे मत असेल तर तसे मांडण्याचे त्याना स्वातंत्र्य असल्याने त्याविषयी आक्षेप घेता येत नाही. पण वाक्यातील भाव असा दर्शवितो की, 'बौद्ध धर्म [च] अहिंसा, सत्य, मानवता याना प्राधान्य देतो"; मग ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम धर्म यापेक्षा काय वेगळे सांगतात असाही मनी प्रश्न उमटतो. हिंदू धर्मात भाकडकथा आणि अनाचाराचे वर्णन येते पण म्हणून बौद्ध धर्म त्यापासून् अलिप्त आहे असे मानणे शुद्ध वेडेपणा आहे. बौद्ध पुराणातील आणि पीटिकांतील कित्येक बाबी जर उघडपणे चर्चेला घेतल्या तर अगदी गौतमाच्या जन्माची कथाही देखील एक भाकडकथाच सिद्ध होईल. सर्वसामान्य भिक्कूला माहीत असलेल्या धार्मिक कथा जर त्यांच्यात विश्वासपूर्ण मानल्या जातात तर त्या गोष्टी बाबासाहेबांसारख्या प्रकांड पंडितापासून दूर होत्या आणि तीवर त्यानी रॅशनली विचार केला नसेल असे म्हणण्यात भोळेपणा सिद्ध होतो. 'सखोल अभ्यास आणि चिंतन' याचा अर्थ पहिल्या धर्माला लाथ मारून दुसरा स्वीकारणे हेच असेल तर मग तुम्ही केलेला अभ्यास सखोल आणि चिंतनीय असा होता हे कशाच्या आधारे म्हटले जाते असे जर विचारले तर त्याला तो धर्म स्वीकारण्याकडे उत्तर नसते.

जबरदस्तीने आणि केलेले धर्मांतर या विषयावर न लिहिलेले बरे. कारण तशा धर्मांतराला कसलीही अभ्यासू बाजू नाही आणि मग जुलमाचा रामराम ठरलेल्या गोष्टींची कारणमीमांसाही शून्य किंमतीची असते.

म.गांधीं "यंग इंडिया" च्या एका अंकात लिहितात, "धर्मांतरांच्या प्रवृत्तीमुळे जगात कधीही शांतता लाभणार नाही. धर्म ही अतिशय खाजगी बाब आहे. माझे मत असे आहे की जगातले सर्व धर्म हे मूलतः समान आहेत. स्वधर्माविषयी जसा आदर तसाच् इतरांच्या धर्माबद्दल आदरभाव ठेवला तरी पुष्कळ झाले." महात्मा गांधींची राजकीय मते कुणाला पटोत वा ना पटो पण त्यांची "सर्वधर्म समभाव ठेवावा" ही शिकवण या विषयाशी सुसंगत वाटते.

अशोक पाटील

अशोकरावांचे विधान पटले नाही...

<<जबरदस्तीने आणि केलेले धर्मांतर या विषयावर न लिहिलेले बरे. कारण तशा धर्मांतराला कसलीही अभ्यासू बाजू नाही आणि मग जुलमाचा रामराम ठरलेल्या गोष्टींची कारणमीमांसाही शून्य किंमतीची असते.>>

अशोकराव,
तुमचे वरील विधान फारच उच्च आणि गूढ पातळीवरुन केलेले असेल तर मला माफ करा. माझ्यासारख्या साधारण बुद्धीच्या वाचकाला झेपले नाही. कोणत्याही विषयाला अनेक पैलू असतात आणि अभ्यासक/चर्चा करणारे ते सर्व पैलू तपासून बघत व चिकित्सा करत पुढे जात असतात. धर्मांतर हा विषय येतो तेव्हा त्याला सक्तीने (जीवाची भीती घालून) केलेले धर्मांतर/ प्रलोभने दाखवून केलेले धर्मांतर/ बुद्धिभेद करुन केलेले धर्मांतर/लाभाच्या आशेने केलेले धर्मांतर/ जाणीवपूर्वक केलेले धर्मांतर असे अनेक पैलू आहेत. यातील सक्तीने केलेले धर्मांतर हा सर्वाधिक प्रभावी पैलू आहे कारण मुघल सत्ता भारतात दृढमूल होण्यात (यादव काळ व त्यापुढील इतिहास) हाच मुद्दा महत्त्वाचा ठरला आहे. त्यातून प्रलोभने दाखवून आणि राजीखुशीने केलेल्या धर्मांतरितांची संख्या ही सक्तीने बाटवलेल्यांपेक्षा कमीच आढळून येईल. असो. मग आपण एकदम अशा धर्मांतराला कसलीही अभ्यासू बाजू नाही आणि जुलमाचा रामराम ठरलेल्या गोष्टींची कारणीमीमांसा शून्य किंमतीची असते, हे ठरवून कसे मोकळे झालात?

कारणमीमांसा

धन्यवाद योगप्रभु ~

~ नो चान्स ! माझे ते विधान उच्च आणि गूढ पातळीवरून केले असल्यासारखे मानू नये, कारण तितका माझा अधिकार तर नाही आणि पात्रता तर नाहीच नाही. ते एक सर्वसामान्य विधान आहे ते अशासाठी की धागाकर्ते श्री.विनायक पंडित यानी धाग्यात प्रकटलेला मुख्य विषय जो लाल रंगाने ढळढळीत केला आहे; त्यातील हा (त्यांचा) विचार : "एखादा धर्म सोडून दुसरा धर्म स्विकारावा हा विचार एखाद्या व्यक्तीच्या मनात का येत असावा? त्यानंतर कृतीची पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष कृती कशी घडत असावी? त्यानंतरचे पडसाद काय स्वरूपाचे? हा या लेखाचा बीजविषय आहे." ~

लेखाचा बीजविषय स्वयंस्पष्ट आहे की, 'अ' या व्यक्तीने जन्माने प्राप्त झालेला धर्म पुढे 'मॅच्युरिटी' आल्यानंतर सोडायचे ठरविले आणि 'ब' धर्मातील तत्त्वज्ञान, शिकवण, आचारसरणी त्याला भावली आणि त्यामुळे तो दुसर्‍या धर्मात जाऊ इच्छित असेल तर तसा निर्णय घेण्यापूर्वी तो त्या कृतीची पूर्वतयारी करतो म्हणजे नेमका त्याच्या मनातील कल्लोळ, त्याचे कुटुंबातील अन्य सदस्यांवर होणारे संभाव्य [सामाजिक] परिणाम यांचा सखोल विचार 'अ' करीत असेल काय, तसेच त्या बिंदूपासून प्रत्यक्ष कृतीचा (कन्व्हर्ट होणे) पर्यंतचा प्रवास इथे चर्चेला घ्यावा असे निश्चितच सूचीत होते. थोडक्यात चर्चाविषय "इंडिव्हिज्युल कॉन्फ्लिक्ट" चा आहे तिथे 'मास अपील' अभिप्रेत नाही. मास मध्ये 'जबरदस्तीचे लॉजिक' येते.

जबरदस्तीचे धर्मांतर आणि त्याचे दोन्ही समाजावर झालेले/होऊ घातलेले सु आणि दु दोन्ही परिमाण चर्चेला घ्यावेसे वाटले तर तो स्वतंत्र धाग्याचा विषय करावा लागेल कारण अशा धर्मांतरामागे 'धर्मभूके' पेक्षा 'साम्राज्यव्याप्तीभूक' प्रखर असते. करणारा तलवारीच्या जोरावर करत असतो, करून घेणार्‍यांनीही तो जुलमाचा रामराम म्हणून आणि प्राप्त परिस्थितीमुळे आलेली हतबलता याना सामोरे जाऊन देवळातील आरती सोडून चर्चमधील बेल वा मशिदीतील बांगेकडे कान लावून बसल्याचे इतिहास सांगतो. यामध्ये कसली आली आहे अन्य धर्माविषयी आतड्याची ओढ ? आणि जिथे तशी आस नाही त्यामुळे होऊ घातलेल्या कथीत सामाजिक परिणामाची क्षिती मूळ धर्माच्या रक्षकांवर तसेच अनुयायांवर पडत नाही, वा पडत असल्यास त्याची टक्केवारी एकूण धर्मीयांच्या आकडेवारीत क्षुल्लकच दिसेल. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे सक्तीच्या धर्मांतराचे अनेकविध पैलू आहेत पण त्यामुळे त्या त्या धर्माच्या मुख्य धारेत प्रचंड फरक पडला याची व्यावहारिक पातळीवर तपासणी केल्यास हाती पडणार्‍या फलिताचे कर्ममूल्य चिंतनीय दिसणार नाही.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून लाखो दलित बांधवांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पण म्हणून या देशातून ना हिंदू धर्माचे उच्चाटन झाले ना या क्षणी असलेले सर्वच दलित 'बौद्ध' झाले. आजही दलितांमधीलच भेदाभेद तितकाच प्रखर आहे.

(माझ्या शासकीय नोकरीतील अनुभवाच्या आणि कामाचे स्वरूप आधारे सांगू शकतो की या ना त्या निमित्ताने माझ्यासमोर विविध जिल्ह्यातील महाविद्यालयांतील विद्यार्थी आणि शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अधिकृत याद्या पडताळणीसाठी येत असतात त्याच्या आधारे मी या विषयसंदर्भात अभ्यासही केला आहे; आकडेवारीही नोंदविली आहे, जी शासकीय दरबारी रेकॉर्डेड आहे. पण धागा भरकटत नसेल तर या 'नवबौद्धां' च्या सद्यस्थितीविषयी रोखठोक लिहायला मला आवडेल. त्यावरूनही अशा 'मास कन्व्हर्शन' वर जादाचा प्रकाश पडेल.)

अशोक पाटील

स्वतंत्र लेख येऊ द्या

पण धागा भरकटत नसेल तर या 'नवबौद्धां' च्या सद्यस्थितीविषयी रोखठोक लिहायला मला आवडेल. त्यावरूनही अशा 'मास कन्व्हर्शन' वर जादाचा प्रकाश पडेल.

अवश्य लिहा. किंबहुना, या लेखा-प्रतिसादांच्या संदर्भाने स्वतंत्र लेख लिहा; मग धागा भरकटण्याची भीती नाही आणि सर्वांना स्वतंत्र लेख वाचून चर्चा वगैरे करता येईल.

लेखनाची प्रतिक्षा आहे...

अशोकराव,
नवबौद्धांसंदर्भातील तुमच्या निरीक्षणांबाबत वाचायला आवडेल. खरे तर एकूणच धर्मांतरितांची नंतरची मानसिकता यावर अधिक प्रकाश पडायला हवा.

अनुमोदन

योगप्रभूना अनुमोदन! प्रतिक्रियेबद्दल आभार!

धर्मांतर आणि प्रस्तुत/अप्रस्तुत

आभार अशोक! आपणासारख्यांकडून काही अधिक जाणून घेणं हा लेख लिहिण्याचा एक उद्देश आहे.लेखाच्या सुरवातीलाच विठ्ठलपंतांच्या उदाहरणासंबंधात स्पष्टं केलंय की हे थेट धर्मांतराचं उदाहरण नाही.धर्म ही जगण्याची पद्धत आणि एक जगण्याची केवळ पद्धत बदलून आलेलं उदाहरण म्हणून ले़खाची सुरवात केली.व्यक्तीच्या अंगाने जायचं हेही मनात स्पष्टं होतं.प्रस्तुत/अप्रस्तुत वगैरेनी फारसा फरक पडत नाही असं वाटतं.
एका सरळ रेषेत जाऊनच उहापोह करायचा हा झाला एक मार्ग.आजूबाजूचे संदर्भही तपासले तर विचारात न येतील असे मुद्दे सापडतात असा अनुभव आहे.जुलमी धर्मांतराच्या उदाहरणांचा विचार विषयासंबंधात निश्चित उपयोगी आहे.
तीन उदाहरणे अमुक आणि इतर अमुक असं होऊ नये.सर्व प्रकारची उदाहरणं स्पष्टंपणे मांडली आहेत.
धर्माचे वेगवेगळे पैलू आहेत.धर्मांतर करणार्‍याचा उद्देश काय होता याला महत्व आहे.बाबासाहेबांनी आपल्या जातिबांधवांना स्वतःच्या हिंदू धर्मात योग्य स्थान मिळावं म्हणून हरप्रकारे प्रयत्न केले.धर्मात स्थानच नाही असा निष्कर्ष त्याना सापडल्यावर त्यानी दुसर्‍या धर्माचा विचार केला.इथे बांधवाना आधी योग्य स्थान मिळावं हा मुख्य हेतू आहे.भाकडकथा इत्यादी भाग नंतरचा.एकूणच कुठल्याही धर्मात भाकडकथा आहेतच हे बाबासाहेबांच्या लक्षात आले नसेल असं मानता येत नाही.सखोल विचार, चिंतन हे मुख्य उद्देशाला धरूनच होतं.पुन्हा तेच सांगतो की कुठलाही एक धर्म (च) उत्तम असं लेखात मांडण्याचा प्रश्नंच येत नाही.आपणच तसा समज करून घेऊ नये.
सर्वधर्मसमभाव हा मुद्दा अगदी पटण्याजोगाच!
http://vinayak-pandit.blogspot.com

चांगला लेख....

अधिक भर घालण्यापूर्वी काहीआजून् उदाहरणे सापडली ती देतोय.
(आपण दिलेली वैयक्तिक आहेत, मी देत् असलेली राजकिय प्रभावाच्या दृष्टीने महत्वाची वाटली.)

१.पाचव्या शतकात रोमन सम्राट कॉन्स्टंटाइन ह्याने ख्रिश्चन धर्माचा केलेला स्वीकार. तोवर रोमन सत्ता बहुतांशी ख्रिश्चन विरोधी आणि पेगन(रोमन मूर्तीपूजन)समर्थक होती. नंतर स्थिती पार उलट झाली.

२.सम्राट अशोकाचे झालेले मत/मन परिवर्तन व त्याने बौद्धमताला पाठबळ देणे.

३.दहाव्या शतकाच्या प्रारंभी आजच्या पाकिस्तानातील पेशावर(तत्कालीन पुरुषपूर) इथे बहुसंख्य हे बौद्ध किंवा हिंदुधर्मीय होते. सततच्या प्रकीय स्वार्‍यांत एकदा तिथला हिंदु राजा जयपाल(व पुत्र अनंगपाल) ह्याचा निर्णायक पराभव झाला. ह्यांना सक्तीने मुस्लिम बनवण्यात आले. काही काळाने ह्यांनी पुनश्च हिंदु असल्याची द्वाही फिरवली व सक्तीने झालेले धर्मांतर झुगारून लावले. असाच किस्सा खिल्जिंनंतर सत्तेवर आलेल्या खुश्रु खान्(खुसरो खान) ह्या पूर्वाश्रमीच्या हिंदुबद्दल हिंदुत्ववाद्यांकडून ऐकला आहे. ह्याने दिल्लीची सत्ता अल्पकाळ मिळवून हिंदु धर्मात पुनः प्रवेश केला होता.

४.तशीच गोष्ट दोन दाक्षिणात्त्य सैनिक बंधूंची. चौदाव्या शतकात खिल्जी,मलिक काफूर,खुश्रूखान ह्यांच्या तूफानी आक्रमणाने आख्खा भारत हादरला. दक्षिण भारतात प्रथमच इस्लामी सत्ता स्थापित झाली. तिथे एका सेनानायकाच्या दोन मुलांना बळज्बरीने बाटवण्यात आले. लगोलग सैन्याधिकारी म्हणून नेमण्यात आले. ह्यांनी काही काळाने पुनश्च हिंदु धर्मात प्रवेश केला. त्यांना परतण्यासाठी मार्गदर्शन केले विद्यारण्य्स्वामी ह्यांनी. ह्या बंधूंची नावे हरिहर् आणि बुक्क राय. ह्यांनीच मग सुप्रसिद्ध, वैभवशाली असे विजयनगर साम्राज्य उभे केले.

५.तेराव्या शतकाच्या प्रारंभी तोवर झपाट्याने पसरत असलेल्या, मध्य भारतापासून ते मध्य पूर्व आशिया, उत्तर आफ्रिका, स्पेन ,पोर्तुगाल इतका प्रचंड भूभागावर वर्चस्व असलेल्या इस्लामी घोडदौडीस अचानक खीळ बसली ती चंगेझ खान व त्याच्या पुत्रपौत्रांनी उभारलेल्या मंगोल स्वार्‍यांमुळे.त्याच वेळी ख्रिश्चन सतांबरोबर crusades सुरु असल्याने इस्लामचा प्रभाव एकाएकी आटत चालला्. चंगीझ खानाचा नातू हुलागु खान ह्या गैर इस्लामी सम्राटाने निम्म्याच्यावर अरब जगत ताब्यात घेउन इस्लामी सत्तेचे कंबरडे मोडले.१२२० ते १२९४ असा राज्श्रय खुद्द मध्यपूर्वेतच इस्लामने गमवला. पण काय आश्चर्य! १२९५ मध्ये "गझन" ह्या चंगीझच्या वंशजाने इस्लाम स्वीकारला आणि पुन्हा एकदा जगभर त्या धर्माची घोडदौड जोरात सुरु झाली.

६.भारताचे राष्ट्रिय कवी अल्लामा इक्बाल ह्यांनी सुरुवातीला "सारे जहाँ से अच्छा" लिहिले(१९०६ मध्ये) तरी १९३० च्या आसपास अचानक बाजू पलटवत स्वतंत्र/कट्टर मुस्लिम राष्ट्राच्या समर्थनार्थ अचानक आघाडी उघडली. तोवर अत्यंत दुर्लक्षित असलेल्या "पाकिस्तान" ह्या कल्पनेला त्यांनी उचलून धरले. कधी नव्हे ते प्रथमच ही कल्पना एवढी प्रकशात आली. कल्पनेला नैतिक अधिष्ठान मिळाल्यासारखे झाले. अभिजनांमध्ये (elite class मध्ये) ह्याची चर्चा सुरु झाली. पण अजूनही लोक समर्थन मिळत नव्हते. लोक प्रबहव असू शकणारे प्रभावी नेतृत्व नव्हते. तेव्हाच इक्बाल आणि जीना ह्यांची गाठ पडली. आणि इक्बालांच्या प्रभावामुळे म्हणा, सातत्याने पाठपुरावा केल्याने म्हणा मोहम्मद जिना हे कट्टर पाकिस्तानवादी बनले.(तोवर ते ह्या कल्पनेचे कट्टर विरोधक,एकत्रित भारताचे समर्थक होते. टिळकांचे वकिलपत्रही त्यांनी १९१६ मध्ये घेतले होते. )
पाकिस्तानी इतिहासाच्या पुस्तकात इक्बाल-जीना ह्यांचे वर्णन अगदि आपल्याकडे समर्थ रामदास- छत्रपती शिवाजी(किंवा चाणक्य-चंद्रगुप्त) ह्या जोडीच्या लायनीवरच केले जाते.
तर सांगायचे म्हणजे ह्या नंतरच्या काळात कट्टर मुस्लिम बनलेल्या इक्बालांचे आजोबा रामसरण सप्रू हे अफगाण राजाच्या दरबारातील् प्रसिद्ध विद्वान् म्हणून् नावारूपास होते!
फक्त दोनेक पिढ्यापूर्वी हे घराणे मुस्लिम नव्हते! ह्या घराण्याच्या धर्मांतराचा झालेला प्रभाव आता वेगळा सांगण्याची गरज् नाही.

ह्यापैकी तिसर्या क्रमांकाचे उदाहरण् सोडले, तर इतर सर्व घटनांनी आख्ख्या मानवी इतिहासाला एक महत्वपूर्ण कलाटणी मिळाली आहे.
कदाचित ह्या घटना त्यावेळेस त्या इतक्या मोठ्या नसतील, पण त्याने भविष्यात आख्ख्या जगाच्या इतिहासावर दूरगामी परिणाम झाला.

--मनोबा

मनोबा आभार!

या माहितीबद्दल मनःपूर्वक आभार मनोबा!

धर्म परिवर्तन

प्रमोद

लेख छान नटलेला आहे. विचार करण्याचा मुद्दा त्यात आहे. धर्मांतराची उदाहरणेही छान दिली आहेत. पण पुरेशी अंगे त्यात नाही असे वाटले.

पहिले उदाहरण विठ्ठलपंतांचे. हे उदाहरण या चर्चेस अप्रस्तुत ठरते. गोष्टही बहुदा थोडी चुकीची आहे. विठ्ठलपंत (लहान असताना) गुरु समवेत रुक्मिणीबाईंच्या वडिलांकडे अतिथी म्हणून आले होते. तेव्हा ते सन्यासी होते. त्यांच्या सासर्‍यांनी लग्नाबाबत गळ घातली आणि ती गुरु आणि विठ्ठलपंत यांनी मानली. झालेल्या मुलांना समाजाची मान्यता नव्हती. (कदाचित हा वारसाहक्काचा वाद असावा असे मला वाटते.) विठ्ठलपंत हे तरुण वयात सन्यासी झाले मग उपरती झाली, किंवा त्यावेळेला अजाण होते अशा रितीने हा प्रश्न सोडवता येतो.

रे. टिळक, आंबेडकर, मोहमद अली जीनांचे आजोबा (ही गोष्ट माहित नव्हती.), वाडिया, ए.आर.रेहमान, युसुफ योहाना आणि स्टीव जॉब यांची उदाहरणे मात्र बरोबर आहेत.

लेखात हिंदू आणि इतर धर्म असा भेद केलेला दिसतो. तो फारसा बरोबर नाही. हिंदू धर्माचे प्रचारक झाले नाहीत हे म्हणणे चुकीचे ठरेल. पहिले उदाहरण म्हणजे दक्षिणपूर्व देशात हिंदू प्रचारकांनी भरपूर प्रचार केला. धर्मपरिवर्तन ही केले. याच बरोबर आदीवासी समाजात काम करणारे हल्लीचे धर्म प्रसारक याच पद्धतीत गणता येतील. (उत्तरपूर्वेतील हालचाली, आठवले).

काय कारणाने धर्मांतर केले आणि नाकारले. यातील कारणे ही साक्षात्कार/चमत्काराची, भावनिक जवळिकेतून आलेली, तार्किक विचारांमुळे (?), आर्थिक/राजकीय हितसंबंधांमुळे आलेली, सामाजिक गरजेतून आलेली, प्रेम प्रकरणामुळे झालेली, फसवून झालेली अशी एक उतरंड मानता येईल. वेगवेगळ्या उदाहरणातील ही वेगवेगळी कारणे नीटशी मांडलेली दिसत नाहीत.

प्रमोद

आभार प्रमोद्!

आवाका मोठा आहे हे लिहिताना जाणवत होतेच.लेख विस्तृत उदाहरणांनी नको तेवढा लांबला असता.उदाहरणांमधे वैविध्य आहे.जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न आहे.वाचकांचा सहभाग अपेक्षित आहे आणि त्यायोगे मला विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे.आपल्या अभिप्रायाबद्दल आभार!
विठ्ठलपंतांबद्दलची आपण सांगितलेली गोष्टं माहित नव्हती.तसं असेल तर आपला निष्कर्षं बरोबर आहे.
हिंदू धर्माचे आद्य प्रचारक आदि शंकराचार्य याबद्दल हा लेख लिहित असताना नेमकी माहिती मिळाली.प्रचारक झाले नाहीत असं म्हणायचं नाहीच.
http://vinayak-pandit.blogspot.com

जिना आणि वाडिया

"मोहमद अली जीनांचे आजोबा (ही गोष्ट माहित नव्हती.)"

~ श्री.प्रमोद जी यांच्या प्रतिसादासंदर्भातील हीच गोष्ट थोडी पुढे घेतली तर 'धर्मांतर आणि त्याविषयी संबंधिताचे विचार' यालाही एक प्रकारची सोदाहरण पुष्टी मिळेल.

जिना आणि रतनबाई यांची कन्या दिना (एक योगायोग : दिना हिचा जन्म नेमक्या १५ ऑगस्ट याच दिवशी झाला होता) यानी 'नेविल वाडिया' यांच्याशी - जिनांचा विरोध डावलून - लग्न केले होते. दिना आणि नेविल मुंबईकर झाले होते आणि त्यांचे पुत्र नस्ली वाडिया ख्रिश्चन धर्माचा त्याग करून झोराष्ट्रीयन झाले. मुंबईतील "वाडिया उद्योग" साम्राज्याविषयी लिहिण्याचे इथे कारण नाही, त्यामुळे तो भाग वगळून कौटुंबिक घटनेविषयी पुढे लिहायचे झाल्यास नस्ली यानी पुढे 'मॉरिन' या हवाई सुंदरीशी विवाह केला आणि त्याना 'नेस' आणि 'जहांगिर' अशी दोन मुले झाली.

यातील नेस वाडिया पुढे 'बॉम्बे डाईंग' चे एम्.डी.ही झाले. ह्याच नेस वाडिया आणि प्रीती झिंटा यांच्या प्रणयराधनाच्या सुरस कथांनी काही वर्षे टॅब्लॉइड मॅगेझिन्सची पाने भरून गेली होती. प्रीती ही हिंदू-राजपूत घराण्यातील आणि झिंटा फॅमिलीचा लष्कराशी असलेला संबंध या बाबीमुळे प्रीतीने 'जिना' नावाशी संबंधित असलेल्या व्यक्तीसमवेत विवाहाचा विचार करू नये यावर सिमला झोनमध्ये काही कट्टर् राजपुतांनी तिच्या दोन्ही भावांवर 'धर्म' दडपणही आणल्याचे कथले गेले. प्रीती झिंटाचे 'धर्म आणि धर्मांतर' याविषयीचे विचार अत्यंत पुढारलेले आहेत. "टाईम्स ऑफ इंडिया" च्या वार्ताहराने नेस आणि राजपूत विरोध या प्रश्नावर तिला छेडल्यावर तिने दिलेले उत्तर तिची 'धर्म' विषयातील भूमिका स्पष्ट करते ~ "मी कर्म मानते. मी कधीही देवळात गेलेले नाही. शिवाय धर्म ही संकल्पना आणि त्याबाबतचे विचार हे अतिशय व्यक्तिगत मानले पाहिजे. एखाद्या धर्मावर विश्वास म्हणजे अन्य धर्म खुजे असे मी मानत नाही. कित्येक साधुसंतांची सर्वधर्मसमभाव ही शिकवण आहे आणि माझा त्यावर विश्वास आहे."

(धर्म आणि धर्मांतर या विषयी धाग्याची चर्चा चालू असल्याने वरील उदाहरण अवांतर मानले जाणार नाही अशी आशा आहे.)

अशोक पाटील

चांगली चर्चा.

वाचतो आहे, समजावून घेतो आहे.

अमेरिकेचा जगप्रसिद्ध पॉपस्टार मायकल जॅक्सनही अखेरच्या दिवसात इस्लामची दीक्षा घेऊन 'मिखाईल' झाला होता, हे असेच एक उदाहरण. त्यावेळी त्याच्या या निर्णयाचे आश्चर्य / कुतूहल वाटले होते.
असो.

सुयोग्य मांडणी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विनायक पंडित यांनी चर्चा प्रस्तावाची मांडणी उत्तम केली आहे. या संदर्भात भास्कर केंडे आणि प्रमोद सहस्रबुद्धे यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.श्री.पंडित यांची लेखनशैली,शब्दयोजना,वाक्यरचना या सर्वदृष्टीनी प्रस्ताव उच्च दर्जाचा आहे.
पण माझ्यामते प्रस्तावाचा परिप्रेक्ष्य(आवाका) फार मोठा आहे. एका वेळी एकच प्रकरण(केस) विचारात घेतले असते तर प्रतिसाद लिहिणे सोपे झाले असते.

आभार यनावाला!

यनावाला मनःपूर्वक आभार! विषय सुचतानाच अनेक उदाहरणांसहित सुचला.

भावनिक कृत्य.

धर्म बदलून नशीब बदलेल ही तूर्तास तरी अंधश्रद्धा वाटते, पण खायचे(जीवन मरण) प्रश्न सुटत असतील तर धर्माचा आयडी बदलून वावरायला हरकत नाही, पण मान्य विचारवंतांच्या पण श्रद्धा असतात हे ह्या लेखातील उदाहरणांवरून सिद्ध होते.

विठ्ठलपंतांचे उदाहरण अप्रस्तुत, प्रमोद ह्यांशी सहमत.

छान चर्चा

माणूस बदलतो. माणसाचे आचारविचार बदलतात. बरेच काही बदलते. कधी कधी धर्मही बदलतो. एकाच वेळी अनेक पंथांचे संस्कार झालेला एक राजा म्हणजे अशोक. दुसरा अकबर. अशोकाचा आजा चंद्रगुप्त हा जैन होता. बौद्ध अशोकाची आई सुभद्रांगी ही अजीवकपंथी होती.

बाकी ए. आर. रहमान ह्यांच्या मातोश्री मुसलमान आहेत हे नमूद करायला हवे.

छान चर्चा. बाकी अखिल हिंदुस्तान मुसलमान झाला असता तर काय फरक पडला असता? ह्यावर महात्मा फुल्यांची मते फार रोचक आहेत. (किंवा अकबराचा दीने इलाही बहुसंख्य भारतीयांनी स्वीकारला असता तर?) अशा मुद्द्यांवर जाणकारांनी मते मांडावीत.

तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

दीन-ए-इलाही

अकबराचा दीन-ए-इलाही अनेक भारतीयांनी स्वीकारण्याजोगी राजकीय किंवा सामाजिक परिस्थिती निर्माण झालेली नव्हती. खुद्द अकबर हा बादशहाच होता (त्याने संन्यास किंवा संपूर्ण वेळ प्रचार वगैरे अवलंबिले नव्हते. हा धर्म स्वीकारण्याची सक्ती नव्हती. मानसिंगाचे उदाहरण मी अनेकदा दिले आहे म्हणून रिपिट करत नाही.) आणि त्याचा दीन-ए-इलाही इतर धर्मांतील सार घेऊन उत्पन्न झाला होता. त्यामुळे मूळ धर्माशी बांधिलकी राखणार्‍यांना फार काही फरक पडला नव्हता. ते आधीच ते रितीरिवाज पाळत होते.

इजिप्शियन फॅरो अखनेतनने आपल्या प्रजाजनांना त्यांच्या जुन्या दैवतांना बाजूला सारून नव्या दैवतांची पूजा करणे आणि नवा धर्म स्वीकारण्याची सक्ती केली होती पण अशी सक्ती करूनही प्रजाजन आपला मूळ धर्म विसरले नाहीत. लपून छपून का होईना पण ते मूळ धर्मातील रितीरिवाज पाळत राहिले.

अखनेतनच्या मृत्यूनंतर अर्थातच पुढील शासकांनी (उदा. तुतनखामुन) प्रजेवर सक्ती न केल्याने पुन्हा जुन्या धर्माचे आचरण लोकांनी सुरू केले.

बाकी अखिल हिंदुस्तान मुसलमान झाला असता तर काय फरक पडला असता? ह्यावर महात्मा फुल्यांची मते फार रोचक आहेत.

ही मते इंटरनेटवर वाचनास उपलब्ध आहेत का?

चांगला लेख, शैली

चांगला लेख, लेखनशैली आवडली.

लेखात सांगितल्याप्रमाणे फक्त उदाहरणेच आहेत. चर्चेचा समारोप करताना काही विश्लेषण सांगितले जाईल, अशी उत्सुकता आहे.

चांगला लेख

चांगला लेख.
सर्व धर्मांपैकी आपला मुळ धर्म सारून ख्रिश्चन धर्म स्वीकारावा यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी जगभर वापरलेल्या क्लृप्त्या अतिशय रोचक आहेत.
एक उदा. द्यायचे तर दक्षिण अमेरिकेतील इंका, माया वगैरे घट्ट रुजलेल्या संस्कृतींना उखडण्यासाठी त्यांनी चक्क घोडा वापरला. घोडा हे जनावर या खंदात नव्हते. तेथील संस्कृतीत देवाचा पुढचा जन्म एका नव्या वाहनवरून येणार आहे अशी बातमी पेरली व स्पॅनिशांनी घोड्यावरून प्रवेश केल्यावर समाज ख्रिश्चनांमागे सहज गेला :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

माझ्या माहितीप्रमाणे ......

आपेगावच्या विठ्ठ्लपंत कुलकर्ण्यांना संसारात पडून मुरल्यानंतर, चार अपत्य झाल्यानंतर, गृहस्थधर्म सोडून संन्यस्तधर्म स्विकारावा असं का वाटलं असेल?

माझ्या माहितीप्रमाणे विठ्ठलपंतांनी चार अपत्यं झाल्यानंतर गृहस्थधर्म सोडून संन्यस्तधर्म स्वीकारला असं नसून संन्यस्तधर्मातून परत गृहस्थाश्रमात आल्यावर त्यांना चार अपत्ये झाली. आणि म्हणूनच 'संन्याशाची मुलं' अशी त्यांची हेटाळणी झाली. एकदा संन्यास घेतलेल्यानी मुलं जन्माला घालणं हे संसारसुखाच्या मोहाला बळी पडून भ्रष्ट होण्यासारखं (निदान त्यावेळी तरी) समजलं गेलं. जर लेखक म्हणतात त्याप्रमाणे अपत्यं झाल्यानंतर विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला असता तर मुलांना कोणी संन्याशाची मुलं म्हणून हिणवलं नसतं.

आभार शरद!

आपले मनःपूर्वक आभार! अपत्य झाल्यानंतर संन्यास घेतला आणि पुन्हा गृहस्थाश्रम स्विकारून संसार करायला लागले.पुन्हा संसार करायला लागलेल्या संन्याशाची मुले? असो! विषयाच्या इतर पैलूंकडे वळूया.

निधर्मांध!

सर्वप्रथम, पंडीत साहेब, तुमचं अभिनंदन.
खरा विचारप्रवर्तक लेख आहे. अन विचारमंथनही गहन आहे. वाचून समजून घ्यायला बराच वेळ लागला.

माझा प्रश्नः
गेल्या ५० वर्षांत धर्म सोडून वेगळा धर्म स्वीकारणारे किती, कोण? याचा काही विदा आहे काय?
आजकाल लोक फक्त धर्म सोडून जातात, अन् निधर्मांध होतात. दुसरा कोणताही धर्म स्वीकारत नाहीत. असे माझे निरिक्षण आहे. तुम्हाला काय वाटते?

माझ्यापुरतं बोलतो. मी निधर्मांध आहे. माझा धर्म माझ्या निधर्मांध तीर्थरूपांनी मला सांगितला, म्हणजे, आईने इच्छा व्यक्त केली ते सर्व विधी केले, करवून घेतले. मौंजी सुद्धा. हा तुझा "धर्म" हे तुझे ग्रंथ. वाच. मी ते वाचले. इतरही वाचले. अगदी एका मित्राची 'लाईन्' शाळेत असतांना एका चर्चच्या पाद्र्याच्या मुलीवर होती म्हणून् त्या चर्चच्या लायब्ररी मधे जाऊन बायबल अन् ते ग्रंथही वाचायचा प्रयत्न केला. बरेच दिवस गळ्यात क्रूस घालून वावरलो. मधे गझलांचा छंद जडला. मग एका मुल्ला कडून थोडी उर्दू शिकलो. मग् थोडा इस्लाम वाचला. थोडा बुद्धीझम, विपष्यना वगैरे.. शेवटी निधर्मांध झालो बर्‍याच नेटिझन्स् च्या भाषेत.

ज्यू, ख्रिश्चन अन् मुस्लीम हा इतिहास इथे रोचक ठरावा. इजिप्तच्या गुलामांना मोझेसने धर्म सांगितला. १० कमांडमेन्ट्स्. त्याचे अनुयायी ज्यू धर्म बनवून सुखी झाले. तो धर्म अती कर्मठ अन् पुरोहितप्रधान झाला तेंव्हा त्यातून नवा धर्म सांगणारा जीझस नाझारेथ, किंग् ऑफ ज्यूज् जन्मला. तो ख्रिश्चन धर्म् त्याच स्थितीत् पोहोचला तेंव्हा तिथे पैगंबर आला.

हे असलेच आपल्याकडेही झाले. जैन् धर्म सांगितला गेला, मग बौद्ध. मग पुन्हा वैदिक. तोपर्यंत धर्म प्रवाही होता. विचार करणारे लोक धर्मांतर करीत नसत. नवा धर्म सांगत असत. जो त्या दिवशीच्या समाजास 'धारण करण्यास' सक्षम असे. अन् लोकही तितक्याच खुल्या दिलाने नवा धर्म स्वीकारत असत.

तुम्ही सांगितलेल्या काळी नवा धर्म सांगण्यासारखा उरला नव्हता, किंवा 'ताजा' धर्म सांगणार्‍यांनी त्याचा प्रसार फारच आक्रमक पातळीवर नेऊन् ठेवला होता. मग उरले होते फक्त धर्मांतर. (मुस्लिम आक्रमण अन् विजय फक्त भारतावर नाही, पूर्ण जगावर होते. त्यातही भरपूर चांगल्या गोष्टी आहेत अतिरेक सोडून).

मग तुम्ही दिलेल्या उदाहरणांच्या काळात लोकांनी नवा धर्म स्वीकारला. प्रियाली यांनी सांगितलेल्या लोकांनी वेगळ्या कॉन्टेक्स्टने 'धर्म' सोडायला विरोध म्हणून जीव दिला. (संभाजी बाटला असता तर???)

मोठी धर्मांतरे झालीत (शेवटचे बल्क् धर्मांतर आंबेडकरांचे) तोवर धर्म बदलणे हाच् ऑप्शन होता असे वाटते. माझ्या मते, "धर्म" सोडून देणे हा एक वेगळा धर्म आजचा समाज पाळतो आहे. अन् हे (नि)धर्मांतर आजच्या सर्व धर्मांधांच्या नाकावर टिच्चून्, त्यांच्या नकळत सुरू आहे, अन् ते भयंकर (एक्स्ट्रीमली या अर्थी) मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. हा नवा निधर्मांध पणा फक्त हिंदूच नाही तर जगातले सर्वच धर्मीय स्विकारीत आहेत.

उपक्रमी हो, तुम्हाला काय वाटते या विचाराबद्दल?

निधर्मी हाच आजचा धर्म !!!

एकदा एक माणूस सभोवतालच्या परिस्थितीबद्दल विचार करू लागतो :
"नितीमत्ता, सद्भाव, सहिष्णुता झपाट्याने खालावत असून, किरकोळ कारणासाठी मनुष्यहत्या होत आहेत, सबळ आणखी सबळ होत असून दुर्बल आणखी नागवले जात आहेत. दांभिकता, ढोंगीपणा यांना प्रचंड महत्व मिळत असून सर्व समाजच सत्यापासून दूर जात आहे इ. इ."
तो मनुष्य या सगळ्याचे मूळ जेव्हा शोधतो तेव्हा त्याला ते या लोकांच्या विचारसरणीत दिसते, आणि अर्थातच ती विचारसरणी त्यांना त्यांच्या धर्माने दिलेली असते.

आता तो मनुष्य एक तर धर्मांतर करतो किंवा नवीन धर्माची स्थापना करून समूळ परिवर्तनाची आशा करतो.
मध्ये काही वर्षे ( किंवा काहीशे वा काही हजारही) जातात आणि तो नवीन धर्म आता जुन्या धर्माच्या जागी येवून सभोवतालचे चित्र मात्र तेच असते!

याचे कारण असे की कुठलाही धर्म हे विसरतो की मनुष्य हा सर्वसाधारणपणे स्खलनशील असतोच, त्याचे वा समाजाचे अध:पतन धर्म कधीच थांबवू शकत नाही उलट धर्माच्या समजुतीखाली ते अजून वाढते.

आणि कालचक्राने हे वारंवार सिद्ध करूनही लोक अजूनहि आपल्या समस्यांवर, विचारपद्धतीवर धर्मांतर हाच उपाय आहे असे समजतात आणि एका जात्यातून उठून दुसर्या जात्यात भरडले जातात.

" धर्म सोडून देणे हा एक वेगळा धर्म आजचा समाज पाळतो आहे. अन् हे (नि)धर्मांतर आजच्या सर्व धर्मांधांच्या नाकावर टिच्चून्, त्यांच्या नकळत सुरू आहे "
अगदी बरोबर !!!

पण असे लोक अत्यंत अल्पसंख्य असून एकूण लोकसंख्येच्या मानाने नगण्य आहेत.

-----------------------------------------------------------------------------------------------
ता. क. माझे उपक्रम वरील हे पहिलेच लेखन असून, लेखनासंदर्भात चूकभूल द्यावी घ्यावी.

जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म..

जो कोणत्याच धर्मात नाही तो हिंदू, तोच हिंदू धर्म हा जगातील एकमेव विज्ञान-निष्ठ धर्म आहे, काय वाटते चुक की बरोबर ?

 
^ वर