दिवाळी अंक २०११: "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई"

प्रियालींचा "उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई" लेख आवडला. छायाचित्रे बघून ही चर्चा आठवली! किल्ला पर्यटनासाठी "डिवेल्हप" करण्याबाबत मी उत्साही नाही. तसे झाले की प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्स चे पुडके आले. पुतळ्याबरोबरच जयंती, हार, राजकारणी, लाउडस्पीकर आणि इतिहासकारांमध्ये वादही आलेच! सर्वात पहिल्या छायाचित्रामध्ये भव्य दरवाज्यासमोर ते छोटेसे देऊळ (कृ/ध मधे हलकेच रंग भरल्यासारखे) आणि समोर वाळलेल्या फांद्या हेच इतिहासाचे चित्र राहू द्यावे असे वाटत राहते. ते छायाचित्र खरोखर सुंदर आणि बोलके आहे.

लेखात मोजक्या शब्दात वसई किल्ल्याची आणि गावाची छान ओळख मिळाली. एकदा जायलाच हवे. पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळून लोकांनी मुघल प्रदेशात स्थलांतर केले, हे नंतरचा इतिहास पाहता अपवादच म्हणायचे. १८व्या शतकात मराठ्यांच्या आणि इतर सेनांच्या स्वार्‍यांना कंटाळून लोक मुघल प्रदेशातून इंग्रज आणि फ्रेंच वसाहतींच्या किल्ल्यात आश्रयाला जाऊ लागले!

लेखातल्या काही माहितीचे अधिक संदर्भ देता येतील का? उदा. पोर्तुगीज प्रवासवर्णनाचा उल्लेख आहे - ते कोणते? त्याचे इंग्रजी भाषांतर आहे का, हे पहायला आवडेल. अणजूरकर नाईकांचे पत्र कुठल्या संग्रहात छापलेले आहे का?

काही वर्षांपूर्वी दापोली नजीक हर्णे-मुरूड ला गेले असता तिथल्या दुर्गादेवी मंदिरातही चिमाजी आप्पांनी आणलेली वसई चर्चातील घंटा पाहिली होती.

एकूण किती घंटा उतरवून आणल्या होत्या याची माहिती आहे का?

प्रियालींना लेख दिल्याबद्दल धन्यवाद!

Comments

य. न. केळकर

वसईची मोहीम हे पुस्तक भारतात घरी राहिले. माझ्याकडे उपलब्ध नसल्याने बरीचशी माहिती देऊ शकत नाही. :-( आठवणीत होती (अणजूरकर-नाईकांची अचूक वाक्ये नेटावरही मिळाली पण तीही केळकरांच्याच पुस्तकातील असल्याचे माहित होते) तेवढी दिली.

पोर्तुगीज प्रवासवर्णनाचा संदर्भ येणारे पुस्तक लेखाखाली दिले आहे. गूगलबुक्सवरून ते उतरवून घेता येईल.

पोर्तुगीजांच्या छळाला कंटाळून लोकांनी मुघल प्रदेशात स्थलांतर केले, हे नंतरचा इतिहास पाहता अपवादच म्हणायचे. १८व्या शतकात मराठ्यांच्या आणि इतर सेनांच्या स्वार्‍यांना कंटाळून लोक मुघल प्रदेशातून इंग्रज आणि फ्रेंच वसाहतींच्या किल्ल्यात आश्रयाला जाऊ लागले!

:-). राजकारणात आणि समाजकारणात एकच एक शत्रू आणि एकच एक मित्र नसतो याचे उत्तम उदाहरण.

काही वर्षांपूर्वी दापोली नजीक हर्णे-मुरूड ला गेले असता तिथल्या दुर्गादेवी मंदिरातही चिमाजी आप्पांनी आणलेली वसई चर्चातील घंटा पाहिली होती.

हो. मुरूडला तशी घंटा असल्याचे वाचले होते.

अशा घंटा आजही वसईतील रमेदी* व इतर चर्चवर आढळतात. या चर्चेसचे स्थापत्यही जुने, पोर्तुगीज पद्धतीचे आहे. (आता त्यांची डागडुजी वगैरे झाल्याने बदलही झाले आहेत.) नेमक्या किती घंटा होत्या त्याची कल्पना नाही. किल्ला आणि अगदी जवळचा प्रदेश मिळून सात-आठ चर्चेस होती. त्यांच्या घंटा नक्कीच उतरवल्या गेल्या होत्या.

किल्ला पर्यटनासाठी "डिवेल्हप" करण्याबाबत मी उत्साही नाही. तसे झाले की प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्स चे पुडके आले. पुतळ्याबरोबरच जयंती, हार, राजकारणी, लाउडस्पीकर आणि इतिहासकारांमध्ये वादही आलेच!

आपल्या गैरजबाबदार वागण्याची शिक्षा किल्ल्याला देता कामा नये असे वाटते कारण किल्ला राखला नाही आणि उत्पन्न मिळवले नाही तर संवर्धन होणार नाही अशी भीती वाटते. पुरातत्वखात्याकडे तेवढे बजेट नसावे असे वाटते. चिमाजी आप्पांचा पुतळा तिथे आता १५-२० वर्षे आहे. वाद वगैरे होत असावे पण फार मोठे काही झालेले नाही. वसई हे मुंबईच्या जवळ असूनही दंगेधोपे होत असताना शांत असते. असे केले नाही तर प्लास्टिकच्या बाटल्या आणि चिप्सच्या पुडक्यांऐवजी गर्दुल्ल्यांचे थवे किंवा इतर गुन्हे यासाठी ही पडिक वास्तु वापरली जाईल किंबहुना असे होत होते.

मी भारतात असताना अनेक वर्षे या किल्ल्यात आम्ही जात नसू कारण तिथे जायला भीती वाटत असे. पुरातत्व खात्याने थोडे लक्ष देण्यास सुरुवात केल्यावर येथे होणार्‍या गैर प्रकारांना थोडा आळा बसला आहे. किल्ल्यात पाट्या लावाव्या, त्यावर इमारतींची माहिती द्यावी, इमारतींची डागडुजी व्हावी असे मला वाटते.

---

वसईला अवश्य भेट द्या. वसईचं जुनं रुपडं आता बदललं आहे. तरीही नारळी,पोफळीच्या बागा, आंब्याची झाडं, कुठेतरी कानाकोपर्‍यात काही जुने पेशवाई काळातले वाडे दिसतील. वसई जवळ निर्मळ येथे शंकराचार्यांचे मंदिरही पाहण्यासारखे आहे.

---

आणखी काही चित्रे येथे टाकते:

Vasai fort 1

DSC00702

बाकीची चित्रे, लेखात आणि जुन्या चर्चेत आहेतच.

ऐनवेळी माझ्या कॅमेरातील बॅटरी डिसचार्ज झाल्याने चित्रे घेता आली नाहीत पण या चित्रांव्यतिरिक्त अनेक रोचक वास्तु, मंदिरे किल्ल्यात आहेत.

ओह!

सॉरी, मी खाली संदर्भ पाहिले होते, तरी - यह आँखें हैं या बटन... :-)

मित्र आणि शत्रू एकच नसतात हे खरेच. पण पोर्तुगीजांची साम्राज्यवादी शैली देखील वेगळीच होती, आणि इंग्रज आणि फ्रेंच सत्ता उदयास आल्यावर त्यांचा काळ संपत आला होता आणि त्यांच्या साम्राज्यवादाची शैलीही लयास जात होती, हे देखील तुमच्या वर्णनातून दिसते. इंग्रज स्वतःचे किल्ल्यांचे द्वार स्थानिक लोकांसाठी खुले ठेवत आणि त्यांना "कॉस्मोपॉलिटन हेवन" म्हणून जपत, म्हणून व्यापारी गटांकडून पाठिंबा मिळवणे त्यांना नंतर जास्त सोपे गेले. "अंताजीच्या बखरीत" कलकत्तेकर स्थानिक लोक इंग्रजांना आणि इतर युरोपीयांनाच मायबाप कसे समजू लागले याचे मस्त वर्णन आहे.

लिस्बन मध्ये नदीतीरी पोर्तुगीज जलसाम्राज्याला वाहिलेले "शोध" म्हणून प्रचंड शिल्प आहे. जहाजाच्या आकाराचे शिल्प नदीकडे झेप घेताना दिसते, आणि भवताली जमीनीवर पोर्तुगलने एकेकाळी जिंकलेल्या देश-प्रदेशांचे नकाशे आहेत. मी तिथे गेले तेव्हा सूर्यास्ताची वेळ होती. जहाज सोनेरी दिसत होते, पण त्या नकाशावर फिरता फिरता, केवढे प्रचंड पसरलेले साम्राज्य किती लवकर आटले, हे पाहून वेळ तिथे जायची वेळ बरोबरच निवडली होती असे वाटून गेले! अर्थात, गोवे, अँगोला, इ. अनेक वर्षे टिकून राहिले, पण कदाचित प्रवाहाला अपवाद म्हणूनच.

धाग्यात छायाचित्रे आहेतच, म्हणून अजून दोन येथे लावते, होप दॅट इज ओके.

तुम्ही आताच दिलेल्या छायाचित्रातली आर्च (मराठीत कसे म्हणायचे?) पाहून लिस्बन च्या किल्ल्याची अचानक आठवण झाली. किल्ला भलामोठा, शहराच्या मध्यभागी डोंगरावर आहे, आणि वसईच्या क्लॉइस्टरवजा आर्चेस पेक्षा खूप रुंद, बसक्या आर्चेस आहेत. त्याच्या बरोबर पायथ्याशी एका गोवेंकर रेस्टोरंट मध्ये मी जेवले होते!

डागडुजी बद्दल तशी माझी तक्रार नाही. पण शासनाद्वारे एखादे स्थळ पर्यटनाच्या किंवा "ऐतिहासिक महत्त्वाच्या"वर्तुळात आणले म्हणजे त्याला राजकीय, राष्ट्रीय इतिहासाच्या चौकटीत बसवले जाते, आणि तेथील स्थानिक जीवन-स्मृतीशी त्याचे नाते टिकणे कठीण जाते. पण ही चर्चा आधीच्या धाग्यात झालीच आहे, त्यामुळे इथे पुन्हा तेच लिहीत नाही. तुमचा लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या, आणि पुन्हा कोकणात फिरून यायची इच्छा बळावली आहे. त्याबद्दल पुन्हा धन्यवाद!

कमान

आर्च (मराठीत कसे म्हणायचे?)

कमान म्हणतात बहुतेक. :-)

-Nile

:-)

खरंच की!

वाह!

लिस्बन मध्ये नदीतीरी पोर्तुगीज जलसाम्राज्याला वाहिलेले "शोध" म्हणून प्रचंड शिल्प आहे. जहाजाच्या आकाराचे शिल्प नदीकडे झेप घेताना दिसते, आणि भवताली जमीनीवर पोर्तुगलने एकेकाळी जिंकलेल्या देश-प्रदेशांचे नकाशे आहेत.

वाह! फारच सुरेख फोटो आहे. खूप आवडला.

कलकत्तेकर स्थानिक लोक इंग्रजांना आणि इतर युरोपीयांनाच मायबाप कसे समजू लागले याचे मस्त वर्णन आहे.

कलकत्तेकर धनाढ्य व्यापारी आणि स्थानिक मुसलमान शासक यांच्यात फार कुरबुरी होत्या. इंग्रजांच्या मदतीने मुसलमानी सत्तेवर अंकुश ठेवणे सोपे होते आणि मुसलमानांपेक्षा इंग्रजांचे धार्मिक धोरण सैल होते याचा फायदा हिंदूंनी उठवला असे वाचले आहे.

पोर्तुगीज घंटा

महेश तेंडुलकरांच्या 'हिंदू देवालयांतील पोर्तुगीज घंटा' या पुस्तकात याचा सविस्तर उहापोह केला गेला आहे.

ओके

पुन्हा पुण्याच्या भा इ स मंडळात गेले की तेंडुलकरांना विचारते. पुस्तकाच्या संदर्भाबद्दल धन्यवाद. त्यांची गडांबद्दलची पुस्तके माहित होती, हे नवीनच पाहिले.

अणजूरकर नाईक

अणजूरकर नाईक आणि त्यांनी सतत २५ वर्षे केलेला पेशव्यांनी पोर्तुगीजांच्या वसईवर मोहीम आखावी यासाठीचा पाठपुरावा आणि प्रत्यक्ष लढाई याचा सविस्तर वृत्तांत अथवा वर्णन 'साष्टीची बखर' या पुस्तकात आहे. हे पुस्तक सध्या दुर्मीळ आहे पण नामांकित ग्रंथालयांतून ते जपून ठेवलेले असावे. या पुस्तकाच्या दीर्घ प्रस्तावनेत पाठारेप्रभु ज्ञातीविषयी मनोरंजक माहिती असून मुख्य पुस्तकात वसईची मोहीम फत्ते करण्यातला स्थानिकांचा सहभाग व निकड आणि तत्कालीन सामाजिक परिस्थिती याविषयी माहिती आढळते. मूळ मोडी लिपीतल्या नोंदींचे हे बाळबोधीतले लिप्यंतर आहे. मी पाहिलेल्या प्रतीत मूळ मोडीतल्या कागदांची छायाचित्रेही छापलेली होती.
भा.इ.सं.मं. मध्ये १९३४-३५ च्या दरम्यान या विषयीचा लेख सादर केला गेला होता आणि त्यावरील चर्चेमध्ये पुस्तकातील माहितीच्या ऐतिहासिकतेविषयी आणि सत्यतेविषयी आक्षेप घेतले गेले होते जे प्रभू ज्ञातीतील अणजूरकरांच्या वंशजांना,आप्तांना आणि इतर व्यासंगी तज्ञांना पसंत पडले नव्हते. स्थानिकांचे श्रेय अव्हेरण्याचा प्रयत्न सतत होत आला आहे आणि भाइसंमं चे आक्षेप हा त्याच प्रयत्नाची नवी आवृत्ती आहे अशी भावना या मंडळींची झाली होती. हे सर्व प्रस्तावनेत मांडले आहे. प्रस्तावनादेखील थातुरमातुर स्वरूपाची न वाटता त्यातला व्यासंग जाणवला होता.
जर हे पुस्तक पुन्हा हाताशी मिळू शकले तर अधिक ठाशीव काही लिहिता येईल.

पुनर्प्रकाशन

(कामाचे वाचन सोडून जालावर वेळ वाया घालवताना) गूगलून पाहिल्यावर याच वर्षी डिंपल प्रकाशन तर्फे साष्टीची बखर पुन्हा प्रकाशित झाली आहे असे दिसते. पण प्रस्तावना नवीन आहे का हे माहित नाही. मंडळात जुनी प्रत असावी.
गेली काही वर्षे वसई मोहिमेच्या स्मरणार्थ उत्सव सुरू आहे असे दिसते.
आणि शोधता शोधता हा लेख सापडला; तुम्ही उल्लेखिलेली चर्चा चालूच आहे असे दिसते. या सर्व प्रकरणाबद्दल माझे वाचन फारच कमी आहे, पण चर्चा आणि सामग्री रोचक वाटते. बखर वाचायला हवी, तिची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

अणजूरकर नाईक| कम्बख्त इश्क

अणजूरकर नाईकांवर कालांतराने झालेले आरोप वरील उल्लेखलेल्या लोकसत्तेच्या लेखात आणि इतरत्रही वाचले आहेत. रेजीन डि'सिल्व्हांच्या लेखाचा समाचार घेणारे प्रतिसाद त्यापुढील लोकसत्तेच्या आवृत्तीत प्रकाशित झाले होते. तेही मिळाल्यास अवश्य वाचावे. हा लेख थोड्याशा आकसाने लिहिलेला आहे हे स्पष्ट दिसते परंतु 'हे धर्मयुद्ध नव्हते' असे त्यांचे म्हणणे थोडेसे पटणारे आहे कारण जर धर्माची इतकी काळजी असती तर पेशवे इतकी वर्षे दुर्लक्ष करून थांबले नसते आणि युद्धानंतर इतक्या स्वस्त अटी लादल्या नसत्या. पोर्तुगीजांचे उत्तर कोकणावरील वाढते वर्चस्व कमी करणे हाच मूळ उद्देश असावा.

धर्मांतरित स्थानिकांचे असे आक्षेप अनेकदा ऐकू येतात. मागे मुरुडला गेल्यावर अशाच एका स्थानिकाने सिद्दीचा चांगुलपणा आणि मराठ्यांनी त्याच्याशी साधलेला दावा कसा चुकीचा होता त्यावर मला लेक्चर मारले होते. :-)

--------

वसईच्या किल्ल्याचे चांगले दर्शन खालील गाण्यात होईल.
http://youtu.be/VD02gA36Qvo

तो लेख

रेजिन् डी सिल्वा यांचा उपरोल्लेखित लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया दोन्ही वाचले होते. पण साष्टीच्या बखरीचा प्रभाव मनावर अधिक काळ आणि अधिक टिकला आहे. मुख्यत्वेकरून त्यातून मुंबई आणि लगतच्या प्रदेशाचा प्रगट झालेला भूगोल मनोरंजक वाटला होता. तसेच 'पेशव्यांच्या व्यापक अथवा अधिक महत्त्वाच्या(प्राधान्यक्रमाच्या) व्यूहरचनेमधले वसईचे स्थान' हा मुद्दाही मनात बरेच दिवस घोळत राहिला होता.

सुरेख....

मूळ लेख जसा उत्तम, तशीच चर्चाही माहितीपूर्ण. अधिकृत नोंदवण्यासाठी म्हणून माझ्याकडची माहिती इथे पुन्हा देतोय्.

लेखातील उल्लेखः-
"विजयानंतर मराठा सैन्याने पोर्तुगीजांच्या चर्चवरच्या घंटा उतरवल्या आणि त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली. त्यातील एक घंटा नाशिकच्या नारोशंकराच्या मंदिरात असून ती मराठी भाषेत “नारोशंकराची घंटा” या वाक्प्रचाराने प्रसिद्ध आहे. तर दुसरी घंटा अष्टविनायकांतील बल्लाळेश्वराच्या मंदिरात आहे."

एक घंटा माझ्या फेवरिट ठिकाणी आहे, पुण्यापाशी बनेश्वर ह्या पेशवेकालीन मंदिरात.
(नानासाहेबांनी १७५६ च्याआसपास मराठी सत्ता ही त्याकाळात कळसाला पोचली असताना पुणे परिसरातील अनेक मंदीरांचा जीर्णोद्धार् केला हे त्यातलेच एक )तिथे मंदिरात ह्याबद्दल् लिहिलेले आहे.
ठिकाणाची अधिक् माहिती:-
बनेश्वर हे पुणे -सातारा रोट वर पुण्याबाहेर् ३५-४० किमीवर असणारे एक् सुंदर मंदिर आहे.
भारतात क्वचिअतच आढळणारे पर्य्टकांना सुखावह होइल असे infrastructure तिथे आहे. जायला व्यवस्थित रस्ता, गेल्यावर मंदिराच्या भोवती सर्वत्र दाट स्थानिक् प्रजातीची झाडे(वनीकरण विभागाची) आणी त्यामधून् फिरावयास उत्तम असे फूटपाथ, मधे मधे बाकडे असे त्याचे स्वरूप आहे
.

--मनोबा

अजून एक वसईची घंटा

वसईची घंटा
वसईची घंटा

मी काही वर्षांपूर्वी वाईजवळ मेणवलीला गेलो असता नाना फडणिसांच्या वाडयामागील कृष्णेच्या घाटावर ह्या घंटेचे छायाचित्र घेतले. ही घंटा वसईहून आणण्यात आली आहे असे आम्हास सांगण्यात आले.

अशीच अजून एक वसईची घंटा थेऊरच्या देवळात पाहिली आहे.

 
^ वर