दादागिरी
भारतीय नौदलाच्या, आयएनएस ऐरावत या युद्धनौकेने, या वर्षीच्या जुलै महिन्याच्या दुसर्या पंधरवड्यात, दक्षिण मध्य व्हिएटनाम मधल्या न्हा ट्रॉन्ग या बंदराला भेट दिली होती. या भेटीनंतर ही युद्धनौका उत्तर व्हिएटनाम मधील है फॉन्ग या बंदराकडे निघाली होती. 22 जुलै 2011 या दिवशी ही नौका न्हा ट्रॉन्ग बंदराजवळच्या व्हिएटनामच्या किनार्यापासून सुमारे 45 नॉटिकल मैल अंतरावर दक्षिण चिनी समुद्रात असताना, या नौकेला खुल्या रेडियो चॅनेल वरून एक संदेश मिळाला. हा संदेश देणारी व्यक्ती स्वत:ला चिनी नौदल या नावाने संबोधत होती. हा संदेश देणारी व्यक्ती या युद्धनौकेला दमात सांगत होती की ” तुम्ही चिनी सार्वभौमत्व असलेल्या समुद्राच्या भागात आहात. येथून ताबडतोब निघून जा.”
लंडनच्या फायनान्शियल टाईम्स या वृत्तपत्राने या घटनेचा वृतान्त देताना असे म्हटले आहे की एका अज्ञात चिनी युद्धनौकेने या भारतीय युद्धनौकेला स्वत:ची ओळख पटवून देण्यास व ही भारतीय नौका दक्षिण चिनी समुद्रात कशासाठी आली आहे? याचा खुलासा देण्याची मागणी केली होती. मात्र भारत सरकारचे परराष्ट्र खाते व भारतीय नौदल यांच्या खुलाशाप्रमाणे, आयएनएस ऐरावत या युद्धनौकेला वर निर्देश केलेला संदेश मिळाला होता हे सत्य आहे. परंतु या भारतीय नौकेला आसमंतात कोणतीही नौका किंवा विमान दिसून आले नाही. 5650 टन वजनाच्या व 206 नौसैनिक सज्ज असलेल्या या नौकेने या अज्ञात संदेशाकडे पूर्ण दुर्लक्ष केले व स्वत:ची ओळख पटवणे किंवा इतर काहीही माहिती कोणालाही न देता, है फांग या व्हिएटनामी बंदराच्या दिशेने आपला प्रवास चालूच ठेवला. व्हिएटनामच्या परराष्ट्रखात्याच्या प्रवक्त्याने, आपल्या सरकारला या घटनेची काहीही माहिती नाही असे सांगितले तर चिनी परराष्ट्र खात्याने आपण या घटनेबाबत चिनी संरक्षण मंत्रालयाकडून खुलासा मागवला होता मात्र अद्याप या बाबत आपल्याला कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचे सांगितले.
या घटनेनंतर, अपेक्षेप्रमाणे व्हिएटनामने भारताला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. भारतातील व्हिएटनामी राजदूत न्युएन थान टान यांनी या चिनी कुरापतीला टोला लगावत घोषणाच करून टाकली की ” भारतीय नौकांचे, व्हिएटनामी सार्वभौमत्व असलेल्या सागरामधे, स्वागतच आहे.”
चिनी सरकारने अधिकृत रित्या असा दावा केला आहे की “संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर त्यांचेच सार्वभौमत्व आहे.” व्हिएटनाम व फिलीपाईन्स या देशांना अर्थातच हा दावा अमान्य आहे. उत्तर पॅरासेल्स या द्वीप समुहावर चीनने दावा सांगितलेला आहे. हा दावा व्हिएटनामला अजिबात मान्य नाही. त्याचप्रमाणे भरपूर तेलसाठे असलेल्या स्पार्टली द्वीप समुहांवरचा चिनी दावा, फिलिपाईन्स आणि त्या शिवाय तैवान, ब्रुनेई आणि मलेशिया या देशांच्या सरकारांना सुद्धा पूर्णपणे अमान्य आहे. भारतीय नौदलाच्या नौकांचे व्हिएटनाम स्वागत का करतो आहे याचे कारण या पार्श्वभूमीवर बघणे आवश्यक आहे.
न्हा ट्रॉन्ग बंदर
भारतीय युद्धनौकेला पाठवलेला अज्ञात संदेश हे कोणत्याही एखाद्या आंतर्राष्ट्रीय संघर्षात, चिनी सरकार नेहमीच कशा रितीने पावले उचलते याचे एक उत्तम उदाहरण आहे. प्रथम कोणत्याही भूप्रदेशावर किंवा सागरावर आपलीच मालकी असल्याचा दावा करायचा. मग तेथे आलेल्या लोकांना किंवा समुद्र असल्यास नौकांना, हा चिनी प्रदेश असल्याचे सांगून बाहेर जायला सांगायचे, हे चिनी सरकार नेहमीच करत आलेले आहे. लडाख व अरूणाचल प्रदेशामध्ये त्यांनी 1955-60 या काळात हेच केले होते. दक्षिण चिनी समुद्रात या वर्षी घडलेल्या या प्रकारच्या घटनांमध्ये, आयएनएस ऐरावत या नौकेबरोबरची घटना ही सर्वात ताजी अशी घटना आहे. मागच्या काही महिन्यात व्हिएटनामी तेलशोधक जहाजांच्या केबल्स चिनी नौकांनी कापल्या होत्या किंवा फिलिपाईन्सच्या मच्छीमार नौकांवरील मच्छीमारांना चिनी बोटींनी अडवून या भागातून बाहेर जाण्यास सांगितले होते. या दोन्ही देशांनी या प्रकारच्या चिनी वर्तणुकीला असलेला आपला स्पष्ट विरोध दर्शवला होता. या भागातील सर्वच देशांना, चिनी सरकारची ही वर्तणूक एखाद्या गल्लीतील दादाने गुंडगिरी करावी त्याच पद्धतीची वाटते आहे.
या चिनी दादागिरीला तोंड देण्यासाठी, भारतीय नौदलाचा वापर व्हिएटनाम मोठ्या कौशल्याने करत आहे. आयएनएस ऐरावत या नौकेने न्हा ट्रॉन्ग बंदराला दिलेल्या भेटीचा बराच गाजावाजा केला गेला. या नौकेचे कप्तान व इतर अधिकारी यांची कान्ह होआ प्रांताचे अधिकारी व सरकार यांच्याशी एक बैठक आयोजित केली गेली. इ.स.1288 मधे युआन राजघराणे चीनवर राज्य करत होते. या राजाच्या नौदलाच्या संपूर्ण धुव्वा याच वर्षी, बाख डान्ग येथील युद्धात, एक व्हिएटनामी दर्यासारंग ट्रान हुन्ग डाओ उडवून व्हिएटनामला विजय मिळवून दिला होता. या ट्रान हुन्ग डाओ याच्या पुतळ्याला व युद्धाच्या स्मारकाला आयएनएस ऐरावत या नौकेचे कप्तान व अधिकारी यांनी पुष्पचक्रे प्रदान केली. 2011 या वर्षाच्या सुरूवातीला, भारतीय नौदलाची डिस्ट्रॉयर नौका आयएनएस दिल्ली व क्षेपणात्र वाहक नौका आयएनएस किर्च या दोन्ही नौकांनी व्हिएटनाम मधील हो चि मिन्ह सिटी जवळील न्हा रॉन्ग बंदराला अधिकृत भेट दिली होती. आयएनएस ऐरावत या नौकेची न्हा ट्रॉन्ग बंदराची भेट या दोन नौकांच्या भेटीनंतर थोड्याच कालानंतर ठरवली गेली होती.
भारत सरकारने आता एक अधिकृत घोषणा केली आहे. या घोषणेनुसार “आंतर्राष्ट्रीय समुद्रांच्यात, ज्यात दक्षिण चिनी समुद्राचा सुद्धा अंतर्भाव आहे, आंतर्राष्ट्रीय कायद्यामधील सर्वमान्य तत्वांनुसार, कोणालाही जाण्याची मुभा असली पाहिजे या धोरणाला भारताचा संपूर्ण पाठिंबा आहे. ”या घोषणेवरून असे म्हणता येईल की भविष्यात सुद्धा भारतीय युद्धनौकांच्या व्हिएटनामी बंदरांच्या भेटी अशाच प्रकारे चालू राहतील. व्हिएटनामी नौदल व भारतीय नौदल यांच्यामधील या परस्पर संबंधांमुळे, या दोन्ही देशातील मित्रत्व आणि व्ह्युहात्मक सहकार्य (strategic partnership) यांच्यामध्ये भरीव वाढ होत असल्याने दिसल्याने, व्हिएटनाम या भेटींना बरेच महत्व देतो आहे.
भारत सरकार मागची आठ ते दहा वर्षे, व्हिएटनाम बरोबर एक व्यापक स्वरूपातले संरक्षण सहकार्य करते आहे. या योजनेच्या अंतर्गत, भारताने व्हिएटनामला अद्यावत शस्त्रास्त्रे, नौका विरोधी क्षेपणास्त्रे दिली आहेत व नौदल आणि वायूदलाच्या सैनिकांना शिक्षण दिले जात आहे. ऑस्ट्रेलियन वृत्त वाहिन्यांच्या माहितीनुसार, या परस्पर सहकार्याच्या अंतर्गत, व्हिएटनामने भारतीय नौदलाच्या नौकांना न्हा ट्रान्ग बंदरातील सुविधांचा वापर करण्याची मुभा दिली आहे व त्यामुळे हे परस्पर सहकार्य आता आणखी वरच्या पातळीला पोचले आहे असे म्हणता येते. या नव्या कराराप्रमाणे, न्हा ट्रा न्ग सुविधा वापरणारी, आयएनएस ऐरावत ही पहिलीच भारतीय युद्धनौका आहे. दक्षिण चिनी समुद्रामधील या भागात, भारताला एवढा रस का आहे? याची दोन प्रमुख कारणे आहेत असे वाटते. निकोबार बेटावर भारतीय नौदलाचा एक मोठा तळ उभारण्यात येणार आहे. या तळामुळे मलाका सामुद्रधुनीवर बारीक लक्ष ठेवणे भारताला शक्य होणार आहे. हा तळ व मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्या नौदलांबरोबरचे सहकार्य, यामुळे मलाका सामुद्रधुनीतील समुद्री मार्ग हा भारतीय जहाजांसाठी सुरक्षित झाला आहे. ही सुरक्षा व्यवस्था, थेट दक्षिण चिनी समुद्रापर्यंत नेण्याला व्हिएटनाम बरोबरचे सहकार्य उपयुक्त ठरणार असल्याने त्यात भारताला रस असणे साहजिकच आहे. या शिवाय सर्वात महत्वाचे कारण म्हणजे व्हिएटनाम बरोबरच्या सहकार्याने, भारताला आपल्या नौदलाची, छोट्या प्रमाणातली का होईना!, उपस्थिती चीनच्या अगदी परसात ठेवता येणार आहे. ही उपस्थिती, चीन पाकिस्तानच्या मदतीने भारताच्या उत्तर सीमांवर ज्या कटकटी निर्माण करतो आहे त्यासाठी एक प्रभावी उपाय आहे.
भारत आणि व्हिएटनाम यांच्यातील वाढत जाणार्या या सहकार्यावर, चीन बारीक नजर ठेवून आहे असे लक्षात येते. चिनी वृत्त माध्यमांनी नुकत्याच केलेल्या एका विश्लेषणात म्हटले आहे की ” भारतीय नौदलाच्या नौकेने, व्हिएटनामला दिलेल्या भेटीवरून, दक्षिण चिनी समुद्रातील तंट्यामध्ये, व्हिएटनाम तिसर्या शक्तीचा शिरकाव करून घेण्याच्या प्रयत्नात आहे हे स्पष्ट दिसते आहे. त्याचप्रमाणे भारताला दक्षिण प्रशान्त महासागरात उपस्थिती हवी आहे हेही त्याच्या या खेळीवरून स्पष्ट दिसते आहे.”
भारताच्या “पूर्वेकडे लक्ष’ या धोरणाला, व्हिएटनाम व भारतीय नौदलांचे हे सहकार्य चांगलेच पाठबळ देणार आहे. मात्र पुढील कालात बरीच अनिश्चितता या भागात राहणार आहे हे नक्की. मात्र भारताने जर योग्य अशा खेळ्या केल्या तर त्याला दक्षिण चिनी समुद्रात आपली उपस्थिती कायम स्वरूपाची करता येईल आणि याचा फायदा, भारत व व्हिएटनाम यांना तर होणारच आहे; परंतु चीनच्या दादागिरीलाही थोडा वचक बसल्याने, सर्व एसिआन गटाच्या राष्ट्रांनाही याचा लाभ होईल असे वाटते.
Comments
मस्त् बांगडा/सुरमई !
सध्या वेगवेगळी नियतकालिके व इतर् प्रकाशने ह्यातून प्रकाशित होणार्या माहितीतून् हेच दिसते की आर्थिक्, राजकिय आणि सामरिक अशा तीन्ही क्षेत्रात चीन खरोखरीच दादागिरी करत आहे. त्याच बरोबर हेही स्पष्ट आहे की चीनने भारताला कधीचेच घेरून् ठेवले आहें. नेपाळ, म्यानमार आणि पाकिस्तानमधील सरकारे किंवा प्रमुख राजकिय प्रवाहात चीनचा हस्तक्षेप चिंताजनक् आहे. शिवाय आफ्रिकन् देशांतही आपल्यापेक्षा खूपच जास्त पकड चीनने मिळवली आहे.(कच्च्या मालासाठी)
भारत एकट्याच्या जीवावर एकहाती चीनशी जिंकेल हे एखादा चमत्कार झाल्याशिवाय शक्य वाटत नाही.
बहुतांश गोष्टींत आपण् त्यांच्या जवळपासही फिरकत नाही.
सध्या तरी चांगला पर्याय म्हणजे आपल्याप्रमाणेच जे इतर चीनचे शेजारी त्यांच्या आक्रमक धोरणाने परेशान आहेत, त्यांनी एक व्यूहात्मक् आघाडी उघडून ह्या अजस्त्र प्रतिस्पर्ध्याला काबूत ठेवावे. सध्या आहेत त्यापेक्षा खूपच अधिक घनिष्ठ संबंध आपल्याला त्यासाठी जपान्, मलेशिया, लाओस्, कंबोदिया ,दक्षिण् कोरिया व् इतर् देशांसोबत बनवावे लागतील्. तैवानशी बनवणे ऐतिहासिक कारणांमुळे शक्य होणार नाही. शिवाय पश्चिमेलाही चीनला आटोक्यात ठेवण्यासाठी एक बलदंड प्रतिस्पर्धी हवाच आहे. NATO वगैरेच्या मर्यादित सहाय्याने भारत तो होउ शकतो.
पण एकहाती लढण्याची स्वप्ने बघण्यापूर्वी आपले बाहूबळ एकदा तपासून् पाहिलेले बरे.
--मनोबा
मस्त
लेख आवडला :)
मात्र नेहमीप्रमाणे नवी / उजेडात न आलेली माहिती समजली नाहि (जसे मागे तुमच्या इराण-भारत-पाकिस्तान संबंधी लेखाच्यावेळी आली होती)
म्हणजे भारत ज्या आंतरराष्ट्रीय पाण्यावर स्वामित्त्व सांगतो त्यामधेही कोणालाही जाण्याची मुभा भारताला द्यावी लागली (की तसे आधीच होते?)
बाकी, भारताने केलेल्या या चालीवर चीन कोणतीही प्रतिचाल खेळणार नाहि हे अशक्य आहे. (अर्थात तशी अपेक्षा नाही) मात्तांतरराष्ट्रीय राजकारणात अचूक चालींबरोबरच 'प्रथम' चाल खेळण्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. निदान त्याबाबतीत व्हिएतनामशी संबंध वाढवून भारताने नव्या खेळाला सुरूवात केली आहे. आता बघायचं की खेळ कसा रंगात येतो ते
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
आंतर्राष्ट्रीय सागरी सीमा व राष्ट्रांचे सार्वभौमत्व
संयुक्त राष्ट्र संघटनेने समुद्राचे कोणते भाग आंतर्राष्ट्रीय समजले जावेत व कोणत्या भागावर किनार्यापलीकडील राष्ट्राचे सार्वबौमत्व असते या संबंधी एक चार्टर सर्व राष्ट्रांचा संमतीने प्रसिद्ध केलेला आहे. आंतर्राष्ट्रीय समुद्राचा व्यापारी उपयोग करण्याची कोणत्याही राष्ट्राला मुभा नसते. व्हिएटनामच्या किनार्याजवळील ज्या भागाबद्दल ही चर्चा आहे तो भाग व्हिएटनामच्या सार्वभौमत्वाखाली या चार्टरप्रमाणे येतो.
मला वाटते की सार्वभौमत्व व स्फिअर ऑफ इनफ्ल्युअन्स या बद्दल ऋषिकेश यांची गल्लत होत असावी.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
नकाशा
हे तितकेसे खरे नसले :) तरी आंतराष्ट्रीय जलसाठा (International waters) नक्की कसे ठरवतात याबद्दल अज्ञान होते.
यानिमित्ताने गुगलून बघितल्यावर बरीच नवी माहिती कळली. असो. ते फारच अवांतर होईल तेव्हा त्याबद्द्दल इथे लिहित नाही.
या विषयाशी संबंधीत (चायना ची क्लेम लाईन वगैरे) एक चांगला नकाशा विकीपिडीयावर मिळाला तो देतोय. विषय अधिक स्पष्ट होईल (मुद्दाम मोठा नकाशा देतोय नाहितर ती बारकावे लक्षात येणार नाहीत)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
शह - काटशह
चीनने बांग्लादेश-पाकिस्तानमध्ये आपले नौदल स्थळ प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलून आणि श्रीलंकेतली हबान्तोता(?) - कोलंबो बंदरे विकसित करून भारताच्या समुद्र सरहद्दीत चांगलीच पाचर मारली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने व्हिएटनामकडून त्यांचे न्हा-ट्रांग बंदर वापरण्याची परवानगी मिळवली.
अर्थात् या राजकारणात व्हिएतनाम भारताला वापरत आहे की भारत व्हिएतनामला? ते काळच ठरवेल.
वापरले जाणे ,वापरून घेणे
वापरले जाणे ,वापरून घेणे हे काळे-पांढरे असे नसते.
ती एक धोरणात्मक आघाडी असते.(strategic alliance) ह्यात जो तो आपला (वैयक्तिक् आणि देशाचा) फायदा पाहतो(पहायला हवा.)
अशीच आघाडी रशियाविरुद्ध पाचेक दशके होती. ह्यादरम्यान खुली अर्थव्यवस्था स्वीकारून जर्मनी,जपान्, दक्षिण् कोरिया ह्यांची महायुद्धकालीन हानीनंतरही भरभराट झाली.
ह्या आघाडीत् फायदा फक्त अमेरिकेचा झाला किम्वा फक्त जपान , जर्मनी ह्यांचा झाला असे कसे म्हणता येइल.सगळेच जण सहकार्याने पुढे गेले.
--मनोबा
ऐरावत
एक भारतीय नागरिक या नात्याने मला देशाच्या तिन्ही दळाचे सामर्थ्य आणि क्षमतेविषयी कसलीही शंका नसली, तसेच आपल्या जवानांची कसल्याही स्थितीत शत्रूशी कडवी झुंज देण्याची मानसिकता पाहूनही असे म्हणावे लागेल की सद्यस्थितीत कोणत्याही कारणास्तव 'लाल ड्रॅगन' ला न डिवचणे आपल्या होत असलेल्या आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने एक आवश्यक बाब आहे. खुद्द केन्द्र सरकारही "सुसरीणबाई तुझी पाठ मऊ" असेच त्या ऐरावतच्या सो-कॉल्ड हालचालीबद्दल म्हणते यातच शहाणपणा दिसतो. लाल अस्वल कितीही आपल्याशी मैत्रीपूर्ण वागत असले तरी सध्या त्यांच्याच अंतर्गत बाबीमुळे मऊ पडले असल्याने आणि अंकल सॅमला (भले ओव्हल चेम्बरमध्ये हत्ती बसो वा गाढव) आशिया खंडात चीन आणि भारत कधी एकत्र आल्याचे पाहवत नाही. अगदी केनेडी ते ओबामाचा प्रवास पाहिला तरीही वॉशिंग्टनमधील कोणत्याच एक्झिक्युटीव्हला दिल्ली आणि बिजिंगची गळाभेट आवडणार नाही. चीनला लष्करीदृष्ट्या भारत सामर्थ्यवान कधी व्हावा असे न वाटणे नैसर्गिक आहेच (आम्ही तितके समर्थ बनलो असतो तर आम्हीही चीनबद्दल असेच उदगार काढले असते, ही एक आंतरराष्ट्रीय राजकारणाचीच चाल असते) त्यामुळे 'ऐरावत' सारख्या घटनाद्वारे 'इथल्या विहीरीचा मालक मीच आहे' अशा थाटातील मोटेवरची पाटीलकी बिजिंगने सातत्याने करीत राहणे हे नवीन नाहीच.
श्री.चन्द्रशेखर यांच्या वृत्तांतात ” तुम्ही चिनी सार्वभौमत्व असलेल्या समुद्राच्या भागात आहात. येथून ताबडतोब निघून जा.” असे जे वाक्य आले आहे, त्यातील पूर्वार्धाची पुष्ठी भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने केली आहेच. मात्र 'येथून् ताबडतोब निघून जा' हे त्यानी [श्री.चन्द्रशेखर] कोणत्या अनुवादाच्या आधारे केले आहे याचा उलगडा होत नाही. कारण शेवटी सरकारी अधिकृत पत्रक काय म्हणते हे आंतरराष्ट्रीय संबंधाच्यादृष्टीने महत्वाचे ठरते. भारत सरकारने 'ऐरावत' च्या सफरीला दुजोरा दिला पण त्याचबरोबर चीन गस्तीसमवेत कोणत्याही प्रकारच्या 'तू तू मै मै' झाल्याचाही इन्कार केला आहे. खात्याचे प्रवक्ते यानी तर लेखी पत्रकात 'ऐरावत मैत्रीपूर्ण भेटीसाठी १९ ते २८ जुलै दरम्यान व्हिएतनाममध्ये होते आणि कसल्याही प्रकारचे झगड्याचे प्रसंग आलेले नाहीत असाच सूर लावला आहे. "....there was no confrontation involving the INS Airavat." हे त्या पत्रकातील सरकारी वाक्य.
चीन, फिलिपाईन्स आणि व्हीएतनाम यांच्यात असलेल्या समुद्रीसाम्राज्याच्या हक्काबाबतचा वाद वर्षानुवर्षे चालूच असल्याने त्यात भारत पडावा असे कधीच चीनला वाटणार नाही यात तथ्य आहेच. त्यातही फिलिपाईनी राष्ट्राध्यक्ष अक्विनो यानी परवाच चीन प्रधानमंत्री वेन् जियाबाअसमवेत या प्रश्नावर केलेले सकारात्मक हस्तांदोलन चीनच्या वरचष्म्याची ग्वाही देतेच.
थोडक्यात आहे त्या स्थितीत भारताने आपल्या सागरी सामर्थ्याविषयी जादाचा भ्रम मनी न ठेवता 'ऐरावत' ला साखळबंद करून ठेवणे हिताचेच ठरणार आहे. अगोदरच 'घरचे झाले थोडे...' असे असताना त्यात आता 'व्याह्याने धाडले घोडे' असे म्हणायची वेळ यायला नको.
पुरेसे संशोधन
मी कोणताही लेख लिहिण्यापूर्वी अनेक उगमांवरून पुरेसे संशोधन केल्याशिवाय सहसा विधाने करत नसतो. प्रस्तुत लेखातील एका वाक्याबद्दल श्री. अशोक पाटील यांना संशय़ येत असून मी ते वाक्य माझ्या मनाने लिहिले आहे असे त्याना वाटते आहे असे दिसते. हे वाक्य मूळ इंग्रजीमधील आहे व ते "You are entering Chinese waters, move out of here" the radio caller said असे आहे. या वाक्याचे मी केलेले भाषांतर माझ्या मताने योग्य आहे असे वाटते. भारत सरकारच्या अधिकृत वक्तव्यांवर फक्त जर आपण अवलंबून रहाण्यास सुरवात केली तर कोणत्याही बातमीतील खरे अंतर्गत प्रवाह काय आहेत हे आपल्याला कधीच समजणार नाहीत.
लेखातील मूळ मुद्दा सोडून असले फालतू मुद्दे उपस्थित करून श्री. पाटील यांना काय सिद्ध करावयाचे आहे ते कळले नाही. या शिवाय चीनने काहीही कुरापत काढली तरी आपण शेपूट घालून स्वस्थ रहावे हा त्यांचा मुद्दा निदान मला तरी पटण्यासारखा नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
भाषेचा तोल
तुमच्या पुरेश्या संशोधनाबद्दल माझ्या मनी अल्पमात्रही शंका नाही, श्री. चंद्रशेखर. आणि तुमच्यासारखी अभ्यासू व्यक्ती अशा गंभीर विषयावर स्वतःच्या मनाने काही लिहिणार नाही याचीही तितकीच खात्री आहे मला. फक्त तो रेडिओ कॉलर 'मूव्ह आऊट ऑफ हेअर्' हे जे म्हणाला त्याची पुष्ठी भारत सरकारच्या परराष्ट्र खात्याने करणे गरजेचे होते आणि तशी ती गरज आहेच आहे....असे मी मानतो, आणि माझ्या दृष्टीने दिल्ली/मुंबईतील कुठल्याही दैनिकातील अतिरंजीत आणि भडखाऊ बातम्यापेक्षा अधिकृत सूत्रांचा हवाला मान्य करणे योग्य असते.
आंतरराष्ट्रीय धोरणाबाबत वा त्याबाबत होत असलेल्या घडामोडीबाबत मिडीयावर पूर्णपणे विश्वास टाकणे कोणत्याच सरकारला परवडणारे नसते. तणावाचे प्रसंग टाळायचे असतील तर धोरणाचा एक भाग म्हणून परराष्ट्र मंत्रालय योग्य त्या अधिकारी व्यक्तीमार्फत (ह्या केसमध्ये श्री.विष्णू प्रकाश) योग्य त्या टिपणीचा उल्लेख करून जे पत्रक प्रसृत करते तेच अगदी यूनो नाटो संघटना स्वीकृत करतात.
राहता राहिला तुम्ही अकारण 'फालतू' असे लिहून झटकून टाकल्यासारखे माझे म्हणणे. तुम्ही इथे धागा काढलात म्हणजे त्यावर सर्वानीच तुमच्या मनी असलेले आऊटपुट जसेच्यातसे मान्य करून 'होय् बा' म्हणावे असे बिलकुल नसते. किंबहुना जालीय विश्वात ज्यावेळी चर्चेसाठी आपण एक मुद्दा पटलावर ठेवतो त्याच्या बाजूने, विरूद्ध वा तटस्थ असे प्रतिसाद अपेक्षितच असतात. तुमच्या म्हणण्याच्या बाजूने दान टाकले म्हणजे ते लिखाण 'ऑफ् एक्सलंट् काईंड्' आणि विरूद्ध/वेगळे असले की 'ट्रॅश' असे जर तुम्ही मानत असाल तर तो तुमच्या बुद्धीचाच अवमान आहे असे मी म्हणेन.
चीनने कुरापत काढली तर आपण शेपूट घालून रहायचे असे मी एका अक्षरानेही सुचविलेले नाही. ऐरावतच्या प्रवेशाबाबत चीनने दिलेला पुकारा ही 'कुरापत' मी मानत नाही. त्यानी फक्त आपण ओशन प्रोटोकॉलचे उल्लंघन करीत आहोत अशी रितसर जाणीव करून दिली जी आपल्या सरकारने मानली.
("फालतू" शब्द वापरून तुम्ही एकप्रकारे माझ्या लिखाणाचा अधिक्षेप केला आहे हे या निमित्ताने सांगत आहे. शब्दांचा जपून वापर करत जाणे, ही आग्रहाची नव्हे तर माझ्या हक्काची मागणी आहे हे मी इथे ठामपणे सांगत आहे. मराठी भाषा जितकी चांगली मला वापरता येते तितकीच ती "जशास तसे" या न्यायानेही मी सहज वापरू शकतो हे तुम्ही ध्यानात घ्याल अशी आशा आहे.)
चांगला लेख
आता चंद्रशेखर यांचे पुनरागमन झाल्यासारखे वाटू लागले आहे. :-) शीर्षकही मस्त!
चीनची अर्थव्यवस्था बळकट नसतानाही चीन दादागिरी करत असल्याची उदाहरणे दिसून आली आहेत. वर म्हटल्याप्रमाणे अरुणाचल आणि लडाखसोबत मंगोलियाचा प्रदेश घशाखाली घालण्याचा त्यांचा डावही आंतरराष्ट्रिय राजकारणात माहितीचा आहे.
व्हिएटनामच्या नौदल किंवा आरमारी सामर्थ्याची क्षमता कितपत आहे? भारताला त्याचा नक्की कसा फायदा घेता येईल यावर थोडा प्रकाश पाडावा.
आरमारी सामर्थ्य...
आरमारी सामर्थ्य काय् ते साहेब देतीलच.पण् केवळ् सामर्थ्याशिवाय मोक्याची ठिकाणे असणे हेच ह्या देशाचे भांडवल् आहे.
पाकिस्तानचे नौदल् काही बलवान, सामर्थ्यवान नाही. पण् पाकिस्तानी किनार्यावर् ग्वादार बंदर उभारून चीन भारताची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहे.
थोडक्यात, नौदल/सैन्य/उभारणी आपल्याकडे असणार व जागा त्यांची. सध्या भारत अफगाणिस्तानची लष्करी व नागरी उभारणी करतोय्, थोडेफार तसेच.
--मनोबा
नाविक तळ
छोट्या निकोबार बेटावर भारत एक मोठा नाविक तळ उभारतो आहे. तो ग्वादार बंदर उभारणीला काटशह म्हणून मलाकाच्या सामुद्रधुनीतील चिनी जहाजांवर लक्ष ठेवण्यास चांगलाच उपयोगी पडणार आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
पूर्वेकडे लक्ष
पूर्वेकडे लक्ष या शब्दांतून मोक्याची जागा पाहणे हे स्वाभाविक आहे पण माझा प्रश्न स्पेसिफिक आहे. व्हिएटनामच का? इतर कारणे कोणती? :-)
पूर्वेकडे लक्ष
भारताच्या पूर्वेकडे लक्ष या धोरणात फक्त व्हिएटनाम नाही. या धोरणाच्या अंतर्गत भारताने घेतलेले काही महत्वाचे निर्णय. यादी अर्थातच सर्व समावेशक नाही.
1. बांगला देशाला 1 बिलियन य़ूएस डॉलर्सची लाईन ऑफ क्रेडिट.
2. मियानमार मध्ये चालू केलेले अनेक प्रकल्प. यात सिटावे बंदर विकास हा सर्वात प्रमुख प्रकल्प आहे. ३/४ दिवसापूर्वी 500 मिलियन अमेरिकन डॉलर्सची लाईन ऑफ क्रेडिट.
3. मलेशिया, इंडोनेशिया व सिंगापूर्र या देशांबरोबर नाविक व वायू दलांचे सहकार्याचे करार. इंडोनेशिया व मलेशिया यासाठी भारत स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगला मदत करत आहे. (संगणक प्रणाली विकास या स्वरूपात) या शिवाय मलाका सामुद्रधुनी मध्ये गस्त घालण्याबाबत सहकार्य.
4. सिंगापूर बरोबर एफ.टी.ए. करार
5. एसिआन बरोबर याच स्वरूपाचा करार.
6. थायलंड व भारत यांच्या मध्ये एफ. टी.ए. पूर्णपणे कार्यान्वित.
7. कंबोडिया मधील पर्यटन विकासाला मदत
8 व्हिएटनाम बरोबर अनेक करार. व्हिएटनामची चीन बद्दलची भूमिका साधारण भारतासारखीच असल्याने मोठ्या सहकार्याची भावी शक्यता
9. जपान बरोबर एफ.टी,ए वाटाघाटी.
भारताच्या परराष्ट्र धोरणांपैकी पूर्वेकडे लक्ष हे अतिशय महत्वाचे आहे व त्याची उत्तम फळे आता मिळू लागली आहेत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
ओशन प्रोटोकॉल
ऐरावतच्या प्रवेशाबाबत चीनने दिलेला पुकारा ही 'कुरापत' मी मानत नाही. त्यानी फक्त आपण ओशन प्रोटोकॉलचे उल्लंघन करीत आहोत अशी रितसर जाणीव करून दिली जी आपल्या सरकारने मानली.
यू.एन चार्टरप्रमाणे व्हिएतनामचे व्यापारी स्वामित्व असलेल्या असलेल्या समुद्राच्या भागात भारतीय नौदलाची नौका असतांना त्यांना तुम्ही आमच्या मालकीच्या समुद्रात आला आहात, चालते व्हा असे सांगणे याला जर कुरापत काढणे असे म्हणता येत नसले तर कशाला म्हणायचे? हे समजू शकले नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
विश्वासर्हता
"...तुम्ही आमच्या मालकीच्या समुद्रात आला आहात, चालते व्हा"
~ तुमच्या वाक्यातील वरील भाव ज्या इंग्रजी तर्जुम्याचे भाषांतर आहे ते तुम्ही कुठून घेतले त्याच्या विश्वासार्हतेवर अवलंबून आहे. मी पीटीआयकडे आंतरराष्ट्रीय प्रश्नाबाबत गांभीर्य आहे असे मानतो. तिथून ते वृत्त आले असेल तर मगच पुढील दादागिरीचे प्रयोजन. कशाला आपण "लंडन फिनान्शिअल टाईम्स" तसे सांगते म्हणून हकनाक रान उठवावे ? काय लायकी आहे इंग्लंडच्या त्या पेपरची की ज्याच्यामुळे आम्ही आमच्या परराष्ट्र खात्याच्या संबंधित अहवालाकडे दुर्लक्ष करावे ? आजही गोर्या पेपरने सांगितले म्हणजे ते 'ऑथेन्टिक'च असणार असे मानत बसावे का ?
पीटीआयवर विश्वास नसेल तर निदान खाजगी पातळीवरील 'इंडिया टुडे' तर ग्राह्य मानू या थोडाफार. १ सप्टेंबर २०११ च्या इंडिया टुडे मध्ये वृत्तांत आहे, "a caller identifying himself as the 'Chinese Navy' stating that 'you are entering Chinese waters'. ~ म्हणजेच एक नेहमीचा नेव्ही सिग्नल की 'ऐरावत, तुम्ही चिनी मालकीच्या हद्दीत प्रवेश करीत आहात.' अजून केलेला नाही, असाही एक छुपा इशारा समजू शकू. इथे खुद्द इंडिया टुडेही त्या कॉलरने [जो अधिकृत होता की नाही हेही कोडे उघड झालेले नाही] "चालते व्हा इथून" म्हटल्याचा उल्लेख करीत नाही.
त्या भागावर यू.एन्.चार्टरप्रमाणे व्हीएतनामचा अधिकार असला तरी तो चीनने खाली मान घालून स्वीकारला असे होत नाही. परवाच फिलिपाईन्सने चीनसमवेत या प्रश्नावर हातमिळवणी केल्यानंतर त्यांच्या दाव्याला अधिकच बळकटी आणण्यासाठी ते त्या भागात आपला संचार ठेवणार हे ओघानेच आले.
दोन्ही सरकारांच्या (भारत आणि चीन) परराष्ट्र खात्याकडून या कथीत घटनेबद्दल एकमेकाविरूद्ध 'प्रोटेस्ट' ही रजिस्टर केलेला नाही असे त्याच वृत्तात म्हटले आहे.
बाकी चालू द्या.
भारतीय वृत्तपत्रांनी देखील
काहि भारतीय वृत्तपत्रांनी देखील 'move out of here' म्हटल्याची बातमी दिली आहे.
भारतातील अग्रणी टाईम्स समुहाची बातमी इथे बघा
बाकी या बाबतीत भारतीय वृत्तपत्रातील बातमीसोबत भारताबाहेरील बातमी बघणे मला योग्य वाटते. त्याचे कारण 'त्यांच्या' बातम्या अधिक अचूक-सत्य (ऑथेंटिक) असतात असे नव्हे तर भारतीय वृत्तपत्रे भारताशी संबंधीत बातम्यांच्या बाबतीत ही प्रसंगी भडकाऊ वार्तांकन करू शकतात तर प्रसंगी माहिती लपवू शकतात. भारताला 'ऑफीशियल' माहिती देताना-टिप्पणी करताना तर परराष्ट्रीय धोरण, अंतर्गत सामाजिक भान वगैरे गोष्टीही बघाव्या लागतात. मात्र, परदेशस्थ (किंबहुना कोणत्याही) वृत्तपत्रांना इतर देशांच्या बातम्या देताना पूर्ण तटस्थता दाखवता येते.
भारतात घडणार्या घटनांचे भारतातील वृत्तपत्रांत, डॉन सारख्या पाकिस्तानी वृत्तपत्रांत, न्यू यॉर्क टाईम्स सारख्या अमेरिकन वृत्तपत्रांत आणि माली-गार्डियन यांच्यासारख्या साऊथ आफ्रीकन वृत्तपत्रांत होणारे वार्तांकन तपशील, सत्यता, तटस्थता या अनेक गोष्टीत बर्याचदा वेगळी माहिती-पैलू समोर आणते. त्यातील कोणी कोणती मानावी, की केवळ सरकारी माहितीच खरी असे मानावे की 'रीड बिट्विन द लाईन' करावे की करू नये ही ज्याची त्याची मर्जी. (माझे मत सरकारी माहिती ही खरी असली तरी तितकेच खरे आहे असे मानणे डोळे-कान बंद करून घेण्यासारखे आहे. जर सरकारे 'संपूर्ण' माहिती देत असती तर जगभर शोधपत्रकारीता वगैरे कुचकामी ठरली नसती का? )
हा प्रतिसाद लिहिला कारण "गोर्या पेपरने सांगितले म्हणजे ते 'ऑथेन्टिक'च असणार असे मानत बसावे का ?" असा भावनात्मक (आणि तर्कदुष्ट) सूर पटला नाही
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
विवेक
"माझे मत सरकारी माहिती ही खरी असली तरी तितकेच खरे आहे असे मानणे डोळे-कान बंद करून घेण्यासारखे आहे."
~ हे तुम्ही कोणत्या संदर्भात वा परिस्थितीत तशी बातमी वाचता/ऐकता/पाहता यावर अवलंबून असते. ज्या बातमीच्या विकृतीकरणामुळे दोन देशात युद्धसम परिस्थिती उदभवू शकते अशा बातम्या फिल्टर होणे नीतांत गरजेचे असते. दिल्लीतील फॉरेन मिनिस्ट्रीच्या ब्लॉकमध्ये आय.ए.एस.टॉपर्स कार्यरत असतात. ते काही इतके उल्लू असत नाहीत की आली बातमी एखाद्या पेपरमध्ये म्हणजे बडवा कळफलक आणि पाठवा निषेधाचा खलिता संबंधित राजदूताच्या कचेरीत. त्यानाही अशा परिस्थितीत कशाप्रकारचे वर्तन केले पाहिजे याचे शिक्षण मिळालेले असतेच. गोर्याच काय पण काळ्याच्या पेपरमध्ये जरी असली तणावाचे वातावरण निर्माण करणारी बातमी आली म्हणजे तिचे सरकारी पातळीवरून खंडन (वा दुजोरा असला तर तसे) प्रसरण होणे हा तर आंतरराष्ट्रीय धोरणाचा एक भाग असतो. युद्धस्थितीतील बातम्यासंदर्भात सर्वसामान्य जनतेने प्रथम सरकारवर विश्वास ठेवला पाहिजे असे मी म्हटले तर त्यात काय गैर आहे असे मला वाटत नाही. इथे तर दोन्ही सरकारच्या प्रवक्त्यांनी 'समुद्राच्या एका विशिष्ठ ठिकाणी एक जहाज येणे आणि मग सूचना मिळाल्यानंतर त्याने तिथून निघून जाणे' हा इश्यू अगदी नॉर्मल घडामोडीवर घेतला आहे, हे तर अधिकृत सरकारी पत्रकांतून स्पष्ट झाल्यानंतरही त्या अनआयडेन्टीफाईड रेडिओ कॉलरच्या वक्तव्याची आपल्याला सोयीची तशी मोडतोड करून मिडियाने रान उठवणे म्हणजे विझत आलेल्या धुनीला फुंकर घालत बसण्यासारखे आहे.
टाईम्स समूहाच्या त्या पेपरमध्ये 'move out of here' आले आहे ते चला वादाकरीता मान्य करू [जरी सरकारी पत्रकात याचा उल्लेख नाही तरीही]. पण म्हणून त्याचा अनुवाद 'ताबडतोब' असा धमकीवजा करणे कितपत योग्य आहे यावर तुम्ही विचार केल्यास वृत्तपत्राच्या आणि शासनाच्या खुलाशाचे महत्व अधोरेखित होईल्. 'move out of here' चा तुम्ही अनुवाद केला तर जसा "इथून चालते व्हा !" असा कराल तर या घटनेकडे तुम्ही सौम्य स्वभावाने पाहात असाल तर "इथून तुम्ही जावे" असाही कराल. 'गेट आऊट' चा फोर्स 'मूव्ह आऊट' मध्ये आणणे वा न आणणे शेवटी तुमच्या विवेकावर अवलंबून असते आणि नेमके खाजगी मिडीयाने हे करणे अभिप्रेत आहे.
२. "जर सरकारे 'संपूर्ण' माहिती देत असती तर जगभर शोधपत्रकारीता वगैरे कुचकामी ठरली नसती का?"
~ पण शोधपत्रकारीता म्हणजेच सर्वकाही सत्य असेही मानू नये. "भारतात डेंग्यूने थैमान मांडले आहे" आणि सरकार 'तसे काही नाही' असे म्हणत असेल तेव्हा शोधपत्रकाराने ती बातमी आकडेवारीसह प्रसिद्ध केली तर मग ती कुचकामी कधीच मानली जाणार नाही. तिच गोष्ट नर्मदा सरोवर प्रकल्पाची. विस्थापीतांबाबत सरकार देत असलेली माहिती आणि शोध पत्रकार पुढे मांडत असलेली सत्यस्थिती यात जनतेला डावेउजवे करणे जरूरीचे असते हे कुणीही मान्य करेल. पण ह्या झाल्या अंतर्गत बाबी ज्याबद्दल मतदार सरकारला योग्यवेळी जाब विचारू शकतो. पण आंतरराष्ट्रीय नाजूक संबंधाच्या प्रश्नावर सामंजस्याचा तोल राखणे अपेक्षित असल्याने झटदिशी आपल्याला हव्या त्या पटावर येण्याअगोदर सरकारी भूमिकेला प्रथम प्राधान्य देणे अगत्याचे असते.
चीन आज महासत्ता आहे म्हणून उठसूट भारतावर डोळे वटारूनच बसला आहे असे असत नाही. आज त्या राष्ट्राला भारताच्या लष्करी सामर्थ्यापेक्षा जास्त भीती (आदरही) आहे ती इथल्या तुमच्यासारख्या युवापिढीच्या विज्ञाननिष्ठ बुद्धिमत्तेची, जिच्या जोरावर आज अमेरिकाच नव्हे तर पूर्ण युरोप आपली अधिकाधिक उन्नती करून घेत आहे असे म्हटले तर अतिशयोक्तीचे होणार नाही.
लघु घटना
चिनी समुद्रात झालेल्या या घटनेवर प्रकाश टाकल्याबद्दल आभार. या निमित्ताने चीन -भारत चढाओढीची ओळख झाली.
लेख चांगला आणि माहितीपूर्ण झाला आहे. दोन बाबी थोड्या खटकल्या. पहिली म्हणजे शीर्षकातली दादागिरी. दुसरे म्हणजे या समुद्र भागाची तुलना अरुणाचलशी (आणि लडाखच्या काही भागाशी) करणे. पहिल्यांदा काही बातम्यांचे दुवे नं १ नं.२. याशिवाय Nha Trang आणि Sanya या दोन भागातील दक्षिण चिनी समुद्राचा गुगलवरचा नकाशा बघण्यासारखा आहे.
या नकाशात असे जाणवते की चीनचे सान्या शहर असलेले बेट आणि विएतनामचा किनारा यात साधारण २०० किमि. अंतर आहे. भारताची बोट विएतनामी किनार्यापासून ४५ नॉटिकल माईल्स वर म्हणजे ८० -८५ किमि वर होती (चीनपासून १००-१२५ किमि.) . सर्वसाधारण पणे किनार्यापासून २० किमि अंतरापर्यंत त्या राष्ट्राचा हक्क असतो तर २०० कि.मि. पर्यंत आर्थिक हक्क असतो.
या समुद्रात खनिज तेल आहे. आणि त्यासाठी विएतनाम हे प्रयत्न करीत आहे. जून मधे विएतनामी तेल काढणार्या रिग्ज ना चीनी बोटींनी इजा पोचवली होती. (संदर्भ पहिला दुवा.) या पार्श्वभूमीवर भारतीय युद्धनौका त्या भागात जाणे यास महत्व येते. (तुमच्या लेखात अशाच गोष्टींचा उल्लेख आहे.) भारतीय नौदल हे चिनी समुद्रात जाणे आणि चिनी नौदलाने पाकिस्तान, कोलंबो इत्यादी ठिकाणी आपले जाणे येणे वाढवणे या दोन्ही गोष्टी एकाच मापाने तोलल्या पाहिजेत.
भारताची पूर्वेकडे बघा ही नीती आणि विशेषतः विएतनाममधील सहभाग (नुकताच भारताने विएतनाममधील तेल संशोधनाचा करार केला आहे.) ही भारतीय विदेश विभागाची एक मोठी जमेची बाजू आहे.
चीनच्या नितीत दक्षिण चीन भागातील काही (उदा. स्प्रॅटली बेटे) बेटांवर हक्क सांगणे आणि त्या योगे आपला समुद्री आर्थिक भूभागावरचा हक्क सांगणे असा आहे. या नीतीमुळे अर्थातच मलेशिया - विएतनाम इत्यादींशी थोडेफार वैमनस्य आहे.
या परिस्थितीची तुलना अरुणाचल आणि लडाखमधील चिनी नीतीशी करता येणार नाही असे मला वाटले.
या घटनेचा उल्लेख भारतीय विदेश विभागाने केलेला पाहिला. यात चीनवर कुठलेही दोषारोपण दिसत नाही. वृत्तपत्रीय बातम्यांपेक्षा सरकारी प्रतिक्रिया महत्वाची ठरते या बद्दल दुमत नसावे. या प्रकाराला म्हणून चीनी दादागिरी म्हणणे फारसे बरोबर दिसत नाही. याचा अर्थ चीनची (वा भारताची) अन्य ठिकाणी दादागिरी नाही असा होत नाही.
प्रमोद
भारत सरकारच्या अधिकृत घोषणा
काही प्रतिसादात मंडळींचा असा रोख दिसतो आहे की आपण भारत सरकारच्या अधिकृत घोषणांवर सर्वात जास्त विश्वास ठेवला पाहिजे. वाचकांच्यापैकी ज्या मंडळींनी 1955 ते 1962 या कालातील चिनी सीमा आक्रमणांबाबतच्या भारत सरकारच्या घोषणा व 1962 च्या युद्धानंतर बाहेर आलेली सत्य परिस्थिती याचा अनुभव घेतला असेल त्या वाचकांना भारत सरकारच्या घोषणा सत्याला किती धरून असतात? याचा उत्तम अनुभव आलेला असणार आहे. माझ्या मताने सरकारी घोषणा या सरकारने लोकांना जी माहिती देण्याचे ठरवलेले असते तेवढेच सांगतात. त्यातून संपूर्ण माहिती कधीच मिळत नाही. त्यामुळे इतर मिडिया काय म्हणतात याचाही उपयोग करून घ्यावा लागतो.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
विषयावर वाचायला आवडेल.
वाचकांच्यापैकी ज्या मंडळींनी 1955 ते 1962 या कालातील चिनी सीमा आक्रमणांबाबतच्या भारत सरकारच्या घोषणा व 1962 च्या युद्धानंतर बाहेर आलेली सत्य परिस्थिती याचा अनुभव घेतला असेल त्या वाचकांना भारत सरकारच्या घोषणा सत्याला किती धरून असतात? याचा उत्तम अनुभव आलेला असणार आहे.
मला या काळाचा अनुभव नाही! पण ससंदर्भ वाचायला आवडेल. या विषयावर इंडियाज चायना वॉर हे पुस्तक वाचले होते. त्यातील मुद्दे खोडेलेले मला दिसले नाहीत. कुठे मिळाल्यास कळवा.
प्रमोद
या इथे
येथे पहा.
भारत चीन युद्ध
या युद्धा संबंधी बरीच माहिती तुम्हाला या संकेत स्थळावर मिळू शकेल. त्याच प्रमाणे माझ्या या व या ब्लॉगपोस्टमध्ये मी मला जेवढी माहिती संकलित करता आली ती मी देण्याचा प्रयत्न केला आहे.ही ब्लॉगपोस्टस तुम्ही बघू शकता. त्या वेळी बरीच पुस्तके लिहिली गेली होती मात्र त्यापैकी आता किती उपलब्ध आहेत हे सांगणे कठिण आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
ससंदर्भ नाही
तुम्ही दिलेले दुवे पाहिले. सर्व दुवे माझ्या परिचयाचे होते. तुमचा ब्लॉगपोस्ट आवडला.
मूळ मुद्दा हा होता.
वाचकांच्यापैकी ज्या मंडळींनी 1955 ते 1962 या कालातील चिनी सीमा आक्रमणांबाबतच्या भारत सरकारच्या घोषणा व 1962 च्या युद्धानंतर बाहेर आलेली सत्य परिस्थिती याचा अनुभव घेतला असेल त्या वाचकांना भारत सरकारच्या घोषणा सत्याला किती धरून असतात? याचा उत्तम अनुभव आलेला असणार आहे.
त्यावर माझा प्रतिसाद असा होता.
तुम्ही दिलेल्या प्रतिसादातील दुव्यात 'भारत सरकारच्या घोषणा सत्याला धरून नसतात' याचा ससंदर्भ उल्लेख नाही. अपेक्षा अशी की १९५५-१९६२ दरम्यान भारत सरकारने काही घोषणा केल्या होत्या आणि त्या सत्याला धरून नव्हत्या. या घोषणा कुठल्या आणि त्यावेळची सत्य परिस्थिती काय होती याचा उहापोह असेल.
याशिवाय मी एका पुस्तकाचा उल्लेख केलेला आहे. त्यात बरेच ससंदर्भ उल्लेख आहेत. (हे पुस्तक एक स्वतंत्र चर्चा विषय होऊ शकते.) आणि त्या उल्लेखांचा प्रतिवादही तुम्ही दिलेल्या दुव्यात नाही. एखाद्या पुस्तकात असेल तरी चालेल. जमल्यास वाचीन.
'भारत सरकारच्या घोषणा सत्याला धरून न्हवत्या' असे मी अन्यत्र वाचले आहे. पण मूळ छिद्रान्वेषी स्वभावामुळे हे सत्य केवळ अशा उल्लेखाने मानायची माझी तयारी नाही. आपल्या मूळ लेखात, भारत सरकारच्या घोषणांची विश्वासार्हता ही चांगल्या (फायनान्शियल टा, टाइम्सऑफ इंडिया) वृत्तपत्रीय बातम्यांपेक्षा खालच्या दर्जाची आहे असे ध्वनित केले आहे. हे म्हणणे तपासून पहाण्यासाठी हा खटाटोप.
प्रमोद
घोषणांची विश्वासार्हता
मी दिलेले दुवे तुम्हाला या काळाशी फक्त परिचित करण्यासाठी दिले होते. त्यात भारत सरकारच्या विश्वासार्हतेबद्दल काहीच उल्लेख तुम्हाला सापडणार नाही. ही विश्वासार्हता तपासण्यासाठी मोठे संशोधन करण्याची आवश्यकता आहे. 1955 ते 1961 या काळात कृष्ण मेनन व पंतप्रधान नेहरूंनी केलेली लोकसभेतील या विषयावरची निवदने, परराष्ट्र खात्याच्या मंत्रालयाची निवेदने ही तपासून बघण्यासाठी टाईम्स सारख्या वृत्तपत्रांचे या संपूर्ण कालातील अंक बघावे लागतील. मी हा सर्व काल जवळून बघितला असल्याने एक सर्व समावेशक असे एक चित्र माझ्या मनात आहे. त्या वरून मी ही विश्वासार्हता अतिशय कमी दर्जाची होती हे खात्रीलायकपणे सांगू शकतो.
नमुन्यादाखल एक उदाहरण देतो. चीनने भारताचा बराच भूभाग बळकावला आहे आणि सरकार या बद्दल काहीही करत नाहीये अशी टीका जेंव्हा सरकारवर होऊ लागली तेंव्हा आपण या बाबत खात्रीदायक पावले उचलली आहेत व आपल्या सीमेच्या आत आलेल्या सर्व चिनी सैनिकांना हुसकावून देण्यात येत आहे. अशी घोषणा लोकसभेत केली गेली. प्रत्यक्षात दोन तीनशे सैनिकांना थोडे पुढे जाऊन ठाणी तयार करण्यास सांगण्यात आले. या ठाण्यांचे संरक्षण करण्यासाठी या सैनिकांपाशी शस्त्रे नव्हती. तिथल्या हिवाळ्याला तोंड देण्यासाठी लोकरी कपडे नव्हते आणि आक्रमण झाले तर मागून आधार देण्यासाठी तोफखाना, रणगाडे काहीही नव्हते. दुसर्या महायुद्ध कालातील एनफिल्ड रायफल्स व मर्यादित दारूगोळा याच्या सहाय्याने या शूर सैनिकांनी स्वयंचलित रायफल्स जवळ असलेल्या चिनी सैनिकांना जे उत्तर दिले त्याला खरोखरच तोड नाही. अर्थात शेवटी या शूर सैनिकांचा दारूण पराभव झाला व सर्वांना मृत्युमुखी पडावे लागले. हे सर्व जेंव्हा उजेडात आले तेंव्हा आधी सरकारने केलेल्या घोषणा फसव्या होत्या व त्यांत अजिबात विश्वासार्हता नव्हती ही गोष्ट सर्वांच्या चांगलीच लक्षात आली.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.