बोलणारे आणि करणारे
बोलणारे एक आणि करणारे भलतेच याला आपल्याकडे राजकीय नेते असा सुटसुटीत शब्द आहे. परंतु केवळ राजकीय नेतेच या उक्तीला समर्पक नसावेत याचा प्रत्यय खालील अनुभवातून येईल.
माझा एक भारतातील मित्र. त्याला अजय म्हणू. दुसरा अमेरिकेतील मित्र. त्याला विजय म्हणू आणि तिसरा मीही या दोघांचा परदेशी मित्र, धूमकेतू. मी आणि अजय, विजय हे गेली बरीच वर्षे एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. फेसबुकमुळे आम्ही पुन्हा जवळ आलो.
आमच्यापैकी विजय हा सतत आम्हाला प्रेरणादायी इमेल्सने जागे ठेवत असे. कधी भारतातील राजकीय परिस्थितीवर घणघाती टीका, कधी अनाथाश्रमांना केलेली मदत आणि मदतीचे आवाहन, कधी अबला स्त्रियांबाबत दाखवलेली जागरुकता, सामाजिक परिस्थितीबद्दल कळकळ यांतून तो आपल्या मुक्त भावना व्यक्त करत असे. त्याचे म्हणणे कधीही बेगडी किंवा अवास्तव असल्याचे जाणवले नाही. मित्रमंडळात त्याच्या या कळकळीची नेहमीच वाहवा होत असे परंतु अजय त्याच्या या म्हणण्याला फारसा पाठींबा देताना दिसत नसे. एकदा दोनदा विजयने मदतीचे आवाहन केले असता त्याने 'मला सामाजिक कार्यात रुची नाही. मी मुलंबाळं आणि माझे आई-वडिल, पत्नी यांना सांभाळणारा कुटुंबवत्सल मनुष्य आहे.' असे म्हणून अंग काढून घेतले.
मला अजयचे वागणे पटत नसे आणि अजयच्या अशा वागण्याबद्दल किंचित नाराजीही वाटत असे. म्हणून एकदा मी त्याला फोन करून त्याबाबत विचारले की 'तू असा फटकून का वागतोस? तू जबाबदार नागरिक आहेस याची कल्पना आहे पण आपल्या समाजासाठी किंवा गरीबांसाठी विजय मदतीचे आवाहन करत असतो तेव्हा तू असा का वागतोस?'
त्याचे उत्तर पुढे देतो - '१२ वर्षांपूर्वी शिकण्यासाठी विजय अमेरिकेला गेला. तेथेच रमला. आज तिथला नागरिक आहे. या काळात लग्नासाठी म्हणून एकदा भारतात आला. मध्यंतरी त्याचे बाबा वारले तेव्हाही तो आला नाही. त्याच्या विसाचा काहीतरी प्रॉब्लेम असेल म्हणून आम्ही सोडून दिले. त्याचा मोठा भाऊ थोडा पंगू आहे. आपले पोट तो कसेबसे भरतो. इतर कोणाचीही जबाबदारी घेण्याची क्षमता त्यात नाही. त्याची आई, बाबा गेल्यापासून थोडीशी मनाने भरकटली आहे. भणंगासारखी रस्त्यावर फिरताना दिसते. कधीतरी खाणावळीत जाऊन अन्न मागते. एकदा दोनदा तर मीच तिला घरी आणून जेवायला घातलं होतं. या परिस्थितीची जाणीव मी विजयला करून दिली आहे पण तो तिथे काणाडोळा करतो आणि इथे मित्रमंडळात उंटावरून शेळ्या हाकून हा आपल्याला देशाची, समाजाची खूप कळकळ आहे असे दाखवतो ते मला आवडत नाही.'
१. स्वतःच्या घरात प्रश्न उद्भवले असताना त्याकडे दुर्लक्ष करून बढाया मारणारे किंवा नाव कमावण्यास उत्सुक लोक तुम्ही पाहिले आहे काय?
२. तुम्हाला येथे विजयचे चुकते असे वाटते की अजयचे चुकते असे वाटते?
३. आपण काही चुकीचे करतो अशी जाणीव लोकांना नसते की त्या जाणीवेपेक्षा प्रसिद्धी आणि स्वार्थ मोठा वाटतो?
४. जेव्हा एखादा तुमचे काहीतरी चुकते आहे अशी जाणीव करून देतो तेव्हा त्याच्याकडे दुर्लक्ष करून मित्रमंडळात बढाई मारणार्या या मित्राला इतरांनीही समजावण्याची आवश्यकता तुम्हाला वाटते काय?
Comments
वेगळी
हे कथन सत्य मानले तरी याला काही वेगळी बाजू असू शकते!
प्रकाश घाटपांडे
वेगळी बाजू
हे कथन सत्य मानले तरी याला काही वेगळी बाजू असू शकते!
वेगळी बाजू कोणती ते विशद करा. म्हणजे आम्हालाही तो पैलू कळेल.
आई-मुलाचे आणि आई-सुनेचे संबंध येथे चांगले आहेत असे आम्हा मित्रांना वाटते परंतु ते चांगले संबंध फोनवरून ख्यालीखुशाली एवढेच दिसतात. प्रत्यक्ष जबाबदारी दिसत नाही. ती जबाबदारी न उचलण्याची वेगळी बाजू कृपया समजावून सांगा.
अज्ञात
कौटुंबिक इतिहास आपल्याला काय माहीत? तो अज्ञात असलेला भाग वेगळी बाजू असू शकेल असा फक्त अंदाज आहे. तुम्हालाही कदाचित माहित नसेल.
प्रकाश घाटपांडे
अज्ञात नाही
कौटुंबिक इतिहास आपल्याला काय माहीत?
आम्ही माँटेसरीपासून मित्र आहोत. घरादाराची चांगली माहिती आहे. अजय हा विजयच्या जवळपास राहतो म्हणून आईला सोबत घेऊन जातो. इथे कटु कौटुंबिक इतिहास नाही असे आम्हाला वाटते.
??
तुम्हाला कौटुंबिक इतिहास माहित असेल तर तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडेच आहेत, इथे तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे कुठलाही निष्कर्ष काढणे अयोग्य आहे, उगाच करण जोहर च्या सिनेमाची स्टोरी वाटते.
स्वतःच्या आईशी असे वागणारे महाभाग असू देखील शकतील किंवा त्याची दुसरी बाजू देखील असू शकेल, पण जोपर्यंत दुसरी बाजू मांडली जात नाही तोपर्यंत उत्तरे देणे अयोग्य आहे.
उत्तरे
हो पाहिले आहेत मात्र ते जाणूनबुजून दुर्लक्ष करत असतात की जबाबदारीची जाणीवच त्यांना नसते, आपण दुर्लक्ष करत आहोते हे गावीच नसते हे कळलेले नाही. कदाचित जाणूनबुजून दुर्लक्ष करणे पथ्यावर पडते आहे असेही असेल.
विजयची आई आणि विजय यांत अजय त्रयस्थ आहे. होणारा प्रकार पाहून त्याची धूसफूस होत आहे एवढेच. चूक कोणाचीही असली किंवा नसली तरी अजयची नसावी.
उत्तर क्र. १ प्रमाणे. त्यांना आपण चूक करत आहोत असे वाटतच नसेल तर? :-)
हो वाटते. पीअर प्रेशर हा चांगला प्रकार येथे वापरता येईल. आरसा दाखवणे हा प्रकार करता येईल परंतु अशा प्रकारात हा खाजगी आणि घरातला मामला आहे, त्यात आपण तोंड का खुपसा असे म्हणून अनेक लोक डोळे, तोंड आणि कान मिटून घेतात. अशा रितीने अगदी गुन्हा घडला तरी त्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केले जाते.
विजयच्या आईला रस्त्यावर भटकताना पाहून अजयला मानसिक त्रास होणे स्वाभाविक वाटते, त्यामुळे ही चार भिंतींच्या आतील घटना नाही. अजयने आणखी काही मित्रांना सोबत घेऊन तोडगा काढावा.
---------------
आपले चुकते आहे हे मान्यच करायचे नसेल तर झोपेचे सोंग घेणार्याला कोणतीही गोष्ट पटवून देणे कठीण असते. अशावेळी मी त्या व्यक्तीच्या बढाया ऐकून न घेण्याचा, शक्य असल्यास वेळीच त्याला सुनावण्याचा किंवा त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्याचा शहाणपणा करू शकते.
माणसाच्या दुटप्पीपणाचा राग येणे स्वाभाविक आहे. जर रागावून, अपमान करून, निषेध व्यक्त करून विजयच्या आईचा प्रॉब्लेम सुटणार असेल तर अजयने त्या मार्गांचा अवलंब करावा.
---------------
ही गोष्ट मला अजिबात करण जोहरच्या चित्रपटाप्रमाणे वाटली नाही. असे प्रकार पाहिलेले आहेत. त्यासाठी मुलगा अमेरिकेला राहण्याची गरजही नसते.
तुमचा अनुभव?
तुम्ही तुमच्या अनुभवांवर आधारित उत्तरे दिली आहेत असा माझा कयास आहे, इथे दिलेला प्रसंग असे निष्कर्ष काढण्यास अयोग्य आहे हे माझे मत आहे, प्रत्येक गोष्टीला अनेक पैलू असतात, अब्सोल्युट नैतिकतेच्या निकषांवर हे वागणे कायमच अयोग्य असेल, प्रश्न विचारण्यासारखे काहीच नाही, केस चा विचार करण्यासाठी पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे.
निष्कर्ष कसले?
मला वाटत नाही की येथून कसले निष्कर्ष काढा असे सांगितले आहे. निष्कर्षांपर्यंत तुम्ही पोहोचताय. इथे एक केस दिलेली आहे. दिलेल्या डेटातून उपाय सुचवायला सांगितले आहेत आणि मते विचारली आहेत. दिलेली केस मला खोटी वाटत नाही. फिल्मी तर अजिबात वाटली नाही. परदेशांत खुशीने पाठवलेल्या आणि गेलेल्या अनेक मुलांच्या आईबापांची ओढाताण मी पाहिलेली आहे. तिथे कोणतेही भांडण वगैरे नसते.
मुख्य म्हणजे इथे आईची मानसिक स्थिती बरोबर नाही असे म्हटले आहे. डिप्रेशनपासून अल्झायमरपर्यंत काहीही होणे या वयात तिला शक्य आहे. असे असू शकते की परदेशात आईवडिलांना कायमचे बोलवून त्यांचा खर्च परवडत नाही पण मग भारतात पैसे पाठवून किंवा त्यांची व्यवस्था लावून तरी तो करता येतो. तसे केल्याने भावावर पडणारा बोजाही कमी होईल असे वाटते.
येथे मूळ प्रश्न मला दुटप्पीपणाचा वाटतो. जगाची चिंता असलेल्या विजयला आपल्या आईची काळजी वाटत नाही याचा अजयला होणारा त्रासही मला खरा वाटतो. जर अजयला विजय दुटप्पी वाटत असेल तर त्याने त्याला ते जाणवून द्यावे. त्यात काहीही गैर नाही.
ठिक
>>दिलेल्या डेटातून उपाय सुचवायला सांगितले आहे.
ठिक.
>>जगाची चिंता असलेल्या विजयला आपल्या आईची काळजी वाटत नाही याचा अजयला होणारा त्रासही मला खरा वाटतो. जर अजयला विजय दुटप्पी वाटत असेल तर त्याने त्याला ते जाणवून द्यावे. त्यात काहीही गैर नाही.
हे खरे असेलच असे नाही, हायपोथेटीकल प्रश्न सोडवायचे असतील तर ठीक आहे, अन्यथा उत्तरे देणे मला गैर वाटते, स्टोरी वाटते, असो.
शीर्षक बघा
चर्चेचे शीर्षक बघा स्पष्टपणे "बोलणारे आणि करणारे" असे आहे. पहिल्या परिच्छेदातच बोलायचे एक आणि करायचे भलतेच असे म्हटले आहे. यावरून चर्चा ही माणसाच्या दुटप्पीपणावर आहे असे मला वाटले.
तसे नसल्यास धूमकेतूंनी स्पष्टीकरण द्यावे.
दुटप्पीपणाला विरोध करावा आणि दुटप्पीपणाचा निषेध करावा का - मला वाटतं अवश्य करावा.
वेगळी बाजू
गोष्टीतील (का सत्यकथेतील?) विजयची बाजू कुणालाच पटणार नाही. पण विविध प्रकारे ती त्याचा दोष नसताना घडू शकते. (थोडा मनोविहार).
पहिली गोष्ट म्हणजे लेखकाला याबद्दलची माहिती सांगोवांगीची आहे (अजय) त्याची पडताळणी नाही. अजय कडून ही गोष्ट थोडी जास्त करून सांगितली जाण्याची शक्यता आहे.
दुसरी म्हणजे विजय आणि त्याचे भारतातील कुटुंबीय यांच्यात कसले तरी भांडण आहे. कारण कसेही असू शकते. उदा. हा आमच्या मनाविरुद्ध परदेशी गेला आम्हाला मेला. भांडणामुळे त्याचे कुटुंबीय त्याचाशी संपर्क करायला त्याचा आधार घ्यायला तयार नसू शकतात. असा आधार न घेतल्यास मुलगा परत भारतात येईल असे वाटू शकते.
याशिवाय इतर प्रकारच्या भांडणे असू शकतात (उदा. घरातील इतर व्यक्तिंशी न पटणे.) या भांडणातील विजयची बाजू समजून घेतली पाहिजे.
समाजाने (मित्रमंडळींनी) यात पडावे का? माझ्या मते हो. अगदी कायदा देखिल आपल्याला कुटुंबातील (आणि विस्तारित कुटुंबातील) गरजु व्यक्तिंची काळजी घेण्यास बाध्य करणारा आहे. तेव्हा विजय जर हे जाणून बुजून करत असल्यास समाजाने त्यास टोकायला हवे, जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी.
भांडण असल्यास सोबत विसंवाद हा असतोच. चांगल्या मित्रांनी आपल्या मित्रांच्या बाबतीतला विसंवाद दूर करायला हवा असे मला वाटते.
इतिउपर विजयचे म्हणणे पटले नाही तर अजयसारखा मार्ग मोकळा आहेच.
प्रमोद
करडे क्षेत्र खोडून काळे-पांढरे केले असावेसे वाटते
वरील कथानक म्हणजे करडे क्षेत्र खोडून काळे-पांढरे केले असावेसे वाटते.
सर्वच लोक स्खलनशील असतात. म्हणजे काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि काही गोष्टींकडे अधिक लक्ष देतात. आणि लोकांनी कुठल्या गोष्टीकडे दिलेल्या लक्षाचे प्रमाण बदलावे, याबाबत त्यांच्या मित्रां-शेजार्यांचे काही-ना-काही मत असतेच. हे काही चूक नाही.
ज्या प्रकारे कथानक लिहिले आहे, त्या प्रकारे चूक आणि बरोबर हे सुस्पष्ट आहे. "उंटावरून शेळ्या हाकणारा" खोटारडा आहे, असे कथानकात स्पष्टच आहे. मग प्रश्न काय राहिला? आता तो "विजय" प्रामाणिक असता, आईकडे दुर्लक्ष करूनही खरोखर समाजकार्य करत असता, किंवा समाजसेवा करणार्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करत असता, तर प्रश्न वेगळा असता. "एखाद्या समाजप्रिय व्यक्तीचे आपल्या आई-वडलांशी संबंध कमालीचे फाटलेले-कडू असू शकतात काय?" अर्थात असू शकतात. हे दु:खद असले, तरी शक्य आहे. कित्येक प्रसिद्ध समाजप्रिय व्यक्तींनी आपल्या कुटुंबांकडे दुर्लक्ष केले होते. तुकारामापासून मो. क. गांधी वगैरे कितीतरी उदाहरणे दिसतात (पत्नी, मुलांकडे दुर्लक्ष केलेले). असे काही कथानक असते, तर म्हटले असते - "विजयचे कुटुंबाबाबत दु:खद/चूक वर्तन आणि समाजाबाबत चांगले वर्तन". आणि अजयने कौटुंबिक भांडणावरून सामाजिक कार्याची हेटाळणी केल्याचे "वडाचे तेल वांग्याला" प्रमाणे चूक ठरले असते.
हा प्रश्न अजयबाबत आहे की विजयबाबत? काही का असेना. हे काळेपांढरे कथानक आहे, तर याचे उत्तरही काळेपांढरेच असणार. तुमचे कथानक आहे, तर १००% बरोबर उत्तर तुमच्यापाशी आहेच. (या कथानकाप्रमाणे) काळ्याकुट्ट विजयला आपण चूक करतो ही माहिती नसेल तर ते त्याच्या दुष्ट स्वभावामुळे - त्याला सदसद्विवेकबुद्धीच नाही. जर त्याला चूक माहीत आहे, तर त्यानेसुद्धा त्याच्या दुष्ट स्वभावाचेच अधोरेखन होते. त्या भीक मागत्या माऊलीने सदसद्विवेकबुद्धी दिली, पण दुष्ट विजयने त्या बुद्धीस दाबून टाकले आहे. विजयला प्रसिद्धी आणि स्वार्थाची हाव आहे, हे कथानकात स्पष्टच आहे.
गोंधळात पडलो आहे. "तुमचे चुकले आहे..." या प्रश्नातील "तुम्ही" "बढाई मारणारा" आणि "इतर मित्र" हे "अजय, विजय धूमकेतू" यांच्यापैकी कोणकोण आहेत? समजा हा प्रश्न माझ्याबाबत (चर्चा-वाचकाबाबत) विचरला आहे, तरी गोंधळ होतो आहे.
"तुम्ही=वाचक=[माझ्याबाबतीत] "धनंजय" असे ठरवून कथानक मांडून बघू :
तुमचे काहीतरी चुकते आहे=धनंजयचे चुकते आहे, असे समजूया. धनंजयचे मित्र धूमकेतू धनंजयला चुकीची जाणीव करून देतो=एखादा अशी जाणीव करून देतो. बढाई मारणार्या या मित्राला=हाच मित्र (धूमकेतू) मित्रमंडळात बढाई मारत असतो??? (की या उदाहरणात चूक करणारा धनंजय बढाया मारतो?) तर मग कोणीतरी कोणालातरी समजवावे, असे धनंजयला वाटते की नाही=तुम्हाला वाटते काय???
दोन पैसे
विजयच्या परिस्थितीची पूर्ण माहिती नसल्याने त्याच्या वागण्याबद्दल चूक की बरोबर निवड करता येणे कठीण आहे. स्वतःच्या कुटूंबातल्या परिस्थितीमूळे येणारी हतबलता/ असहाय्यता बाहेरच्या परिस्थितीवर टिप्पणी करून कमी झाल्यासारखी वाटत असेल. कुटूंबाकडे दुर्लक्ष करून विजय सामाजिक कामांना आर्थिक/ शारिरीक मदत करत असावा. यातले काहीही असू शकेल. विजय पूर्ण दूष्ट असावा असे वाटत नाही.
अवांतर: या अनुभवकथनावरून काही व्यापक भाष्य करायचे असल्यास माझ्या ते पूर्ण डोक्यावरून गेलेले आहे.
____________
वाचण्यासारखे काही
बरेय..
प्रथमतः प्रियाली यांच्या उत्तर १ आणि ४ शी सहमत, आणि धनंजय यांनी दिलेल्या तुकाराम वगैरे उदाहरणेही योग्य.. पण जरी वर्णन काळे पांढरे असले तरी तितकेसे नाही..
अजय, विजय यांची हि केस फक्त चर्चा म्हणून घ्यावी असे वाटते... मग बाकी कौटुंबिक कारणे आणि इतर फाट्याना थोडा वेळ बाजूला ठेऊन फक्त काही मुद्द्यांकडे पाहू..
विजय घराकडे पूर्ण लक्ष देत नाही पण समाजकार्याला मदत करतो.. तशा भावनापण मांडतो.. अजय मात्र "सामाजिक कार्यात रुची नाही. मी कुटुंबवत्सल मनुष्य आहे" या सबबीवर अंग काढून घेतो..
जर वादाकरता विजयचे कौटुंबिक दुर्लक्ष बाजूला ठेवले तरी अजयची वृत्ती बरोबर कशी म्हणावी.. म्हणजे उदाहरणार्थ हा जर सरकारी अधिकारी असेल तर (आणि भ्रष्टाचार करत असेल तर) गरीबास लुटून पोरांना पिझ्झा खाऊ घालणार आणि वर विजयसारख्यानी केलेल्या अनाथाश्रम वगैरे सामाजिक मदतीना तकलादू कारणांनी कमी लेखणार (इथे विजय हा सढळ हस्ते मदत करणारा मानला आहे..)..
मग तर महर्षी कर्व्यांनी आयुष्यभर करंटेपणा केला म्हणायचा... स्वतः करायचे नाही आणि 'त्याला घर तरी सांभाळता येते का? समाजकार्य करतोय.. ' अशा सबबी फेकायच्या.. या वृत्तीला काय म्हणणार...
विजयचे म्हणावे तर त्याचे काम आणि विचार बेगडी वाटत नाहीत असे म्हणताय मग झाले तर... व्यक्तिगत जीवनात चुकत असेल तर वाटल्यास त्याच्या मित्रांनी दोन्ही बाजू समजून घेऊन प्रश्न सोडवायला मदत करावी हवी तर.. पण त्यामुळे त्याच्या चांगल्या कामाला कमी लेखण्याचे काय कारण.. चांगल्याला चांगले म्हणा की...
---
पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या..
रोचक
उपक्रमींचे प्रतिसाद रोचक वाटले. विशेषतः, करड्या छटा असतात हे प्रत्येकाला माहित असते परंतु ते खोडून काळे पांढरे केले आहे म्हणणे म्हणजे... :-) अजय आणि विजय हे दोन्ही मित्रच आहेत. त्यांना काळे आणि पांढरे दाखवून मला काही साध्य करायचे नाही. माणसाची प्रवृत्ती विचारात घ्यायची आहे.
प्रियाली, क्रेमर, सहस्रबुद्धे, धनंजय आणि अस्वस्थामा यांच्या सुचवण्या आवडल्या.
@ प्रियाली - चर्चा माणसांच्या दुटप्पीपणावरच आहे. एकीकडे एक बोलायचे आणि दुसरेच करायचे यावर आहे.
@ धनंजय
उंटावरून शेळ्या हाकणारा" खोटारडा आहे, असे कथानकात स्पष्टच आहे. मग प्रश्न काय राहिला?
उंटावरून शेळ्या हाकणारा असे अजयने म्हटले आहे. ती कथानकातली एक बाजू आहे. ती माझ्यापर्यंत पोहोचली कारण मला अजयचे वागणे खटकत होते. विजयची पार्श्वभूमी माहित नसल्याने त्याचे वागणे खटकत नव्हते म्हणून त्याच्याकडे विचारणा केली नव्हती.
"तुमचे" या शब्दावर किती विचार करायचा? इतका विचार करण्यापेक्षा तो टायपो आहे असा विचार केला असता तर प्रश्न लवकर सुटला असता.
@ क्रेमरः
या अनुभवकथनावरून काही व्यापक भाष्य करायचे असल्यास माझ्या ते पूर्ण डोक्यावरून गेलेले आहे.
व्यापक भाष्य करण्यासाठी करणारे आणि बोलणारे यांचे अनेक अनुभव लागतील. तसे न आल्यास या एका कथानकातून व्यापक भाष्य करायचे नाही असे समजावे.
---------
वर दिलेल्या सल्ल्यांनुसार या प्रकरणात काही मित्रांनी एकत्र येऊन विजयकडे विचारणा करावी हे मलाही योग्य वाटले होते. प्रश्न आहे तो "एकत्र येण्याचा."
बोलणारे आणि करणारे
धुमकेतू,
आपण 'बोलणारे आणि करणारे' शीर्षकाचा धागा काढून अनेकांच्या मतांना बोलके केलेत. ते छान झाले. शेवटी
असा इथल्या अनेकांचा सल्ला मिळवलात.
आता प्रश्न आहे की आपण 'करणारे' आहात की 'बोलणारे' किंवा इथल्या धाग्याच्या संदर्भात लिहून, सल्लामागून हा विषय वाऱ्यावर सोडणारे?
अशी अपेक्षा करतो की काही सुयोग्य संधी साधून आपण विजय नामक आपल्या मित्राला 'मित्रांना काय वाटते' याची जाणीव करून देऊन त्यावर 'त्याने आपल्या वर्तनात सुधारणा करुन आपले समाजकार्याचे वर्तन बेगडी नाही असे आपल्या कृत्यातून प्रत्ययाला आणावे.' असा सल्ला दिलात. त्यानंतर त्याने काय व्यक्तव्य केले याचा तपशील सादर कराल. आपल्या विचारणेतून ही सामाजिक जबाबदारी आपणावर आली आहे असे विनम्रपणे सुचवावेसे वाटते.
शशि ओक.
मो.क्र.९८८१९०१०४९