दारिद्र्य
नुकताच विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या "तुम्ही दिवसाला ३२ रु खर्च करता? मग तुम्ही गरीब नाही" अश्या स्वरूपाच्या बातम्यांवरून गदारोळ उठला आहे. बातम्यांनुसार सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे ज्यानुसार ज्यांचा दैनंदिन खर्च माणशी ३२ रुपयांपेक्षा जास्त आहे अश्या व्यक्तीला सरकार गरीब समजत नाही आणि त्याला गरीबांसाथी असलेल्या योजनांचा लाभ मिळणार नाही. या ३२ रुपयांची थोडीफार फोड या बातम्यांमध्ये केलेली आहे.
एका व्यक्तीस जगण्यासाठी लागणार्या किमान कॅलरीज किती आणि बाजारात वस्तूंचा किमान भाव याचा हिशोब मांडून बहुधा सरकारने हा ३२ रुपयांचा आकडा काढला असावा.
३२ रु हा आकडा फार कमी वाटल्याने मी त्याचे थोडे विश्लेषण केले. म्हणजे सध्याच्या बाजारभावानुसार सरकारच्या मते प्रत्येक वस्तूची किती क्वांटिटी माणसाला मिळायला हवी हे मी गणित मांडून पाहिले. ते गणित खालीलप्रमाणे दिसले.
चार्ट न दिसल्यास येथे पाहता येईल.
या चार्टमध्ये डाळी सोडल्या तर बहुतेक क्वांटिटी ठीक वाटतात. म्हणजे तेवढ्या क्वांटिटीमध्ये जिवंत राहणे शक्य आहे.
त्याखेरीज कपडे, चपला वगैरेंचा खर्च सुद्धा ठीकच (म्हणजे निकृष्ट कपडे/चपला मिळणे शक्य आहे).
बहुतेकांनी या प्रतिज्ञापत्रातील रकमा हास्यास्पदरीत्या कमी असल्याचे मत व्यक्त केले. वृत्तपत्रांतील बातम्यांचा टोनदेखील असाच होता.
हे खरे असले तरी एक धक्कादायक वास्तव दिसते ते हे की भारतातल्या मोठ्या समूहाला या "हास्यास्पदरीत्या कमी" रकमेपेक्षाही बरेच कमी वेतन मिळते.
कुटुंबाला जगण्यापुरेसे लागणारे वेतनदेखील मिळत नसल्याने बालमजुरी आदि सामाजिक दुष्परिणाम होतात.
चर्चाप्रस्तावाचा विषय असा आहे.
या प्रतिज्ञापत्रानुसार किमान लागणारे वेतन शासकीय पातळीवर एन्फोर्स करावे काय?
की
बाजारव्यवस्थेत कामगारांची उपलब्धता आणि गरज यानुसार जे वेतन ठरते तेच दिले जावे आणि येणारी तफावत भरून काढण्यासाठी होणारे बालमजुरीसारखे किंवा इतर गुन्हेगारी, लुतालूट आदि सामाजिक दुष्परिणाम अटळ म्हणून स्वीकारावे?
उपक्रमींच्या मतांच्या प्रतीक्षेत.
नितिन थत्ते
Comments
फारशी माहिती नाही.
आमच्याकडे येणार्या मावशी धुणीभांडी,घरसफाई(झाडने, ओल्या फडक्याने पुसून घेणे) ह्या सगळ्या कामासाठी महिन्याला १२०० रुपये घेतात. त्या चार-पाच ठिकाणी काम करतात असे पकडुन त्यांचे उत्पन्न महिन्याला पाचेक हजाराच्या घरात जाते. तरीही आम्हाला त्यांच्या दारिद्र्याबद्दल् वाइटच वाटते. आपण् इतरत्र ह्यासंदर्भात प्रश्न विचारला होतात "स्वतः एक employer/client म्हणून तुम्ही काम करवून घेणार्याबद्दल् काय् दृष्टिकोन ठेवता(त्यांना दारिद्र्यरेषेपेक्षा अधिक रक्कम् देता का) " ह्या अर्थाचा.
आम्ही दिलेली रक्कम त्याकामापुरती ठिक वाटली तरीही त्यांच्या परिस्थितीबद्दल् वाइट वाटते. जमेल तेव्हा ऐनजिनसी मदत त्यांच्या कुटुंबास करतो.(त्यांचे यजमान हे आमचे वॉचमन् आहेत्. त्यांच्या उत्पनाची स्पष्ट् कल्पना नाही.) त्यांच्या दोन्ही मुलांचा शालेय खर्च् करावा म्हटले, क्रमिक पुस्तक् द्यावे असे वाटले होते, पण् ती त्यांना आधीच् शाळेत मिळाली म्हणे. म्हणून मग पाटी-पेन्सिल दिली. ह्याशिवाय चिमुरड्यांना जमेल तेव्हा बुद्धी-चालक(उदा:- ब्रेन्-व्हिटा, आकार जोडणी,सचित्र्- पझल्स्) अशी शे-सव्वशे रुपयापर्यंतची खेळणीही कधीमधी देतो. जमल्यास मावशींना आजारातील सामान्य औषधेही त्यांच्या डॉकटरच्या प्रिस्क्रिप्शन नुसार घेवून् देतो. प्रोटिनेक्स् वगैरे घरि घ्यायला व व्यायामाला सोबत म्हणून स्वतःसाठी आणले होते. पण वाढत्या अंगाच्या पोरांना उपयुक्त होइल म्हणून मावशींना देउन टाकले. दुधासोबत घ्या म्हणून सांगितले.शिवाय स्वस्तातले पण अत्यंत पौष्टिक्, कमी जणांना ठावूक असणारे नाचणीसत्वही आणोन देत असतो त्या सर्वांसाठी, वैयक्तिक खिशातून. ह्याचा एक परिणाम झाला.
मावशी आता काम सोडून देताहेत. नवर्याने तरण्याताठ्या पोरांकडे कामाला जायला मनाई केली आहे ह्या कारणाने. आम्ही कपाळावर हात मारुन घेतलाय. माझ्या माणूसकी वगैरेंच्या विचारावर एक चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
हे सर्व मी का सांगतोय? तुमच्या प्रश्नाशी सुसंगत वाटले म्हणून्. शिवाय ह्यातून काही जाणवून इतरही कोणी इतर गरजवंतास मदत करण्याचा अधिक योग्य मार्गाने प्रयत्न करेल म्हणून.(थेट रकमेपेक्षा मला ऐनजिनसी मदत अधिक उपयुक्त् वाटते.) अवांतर वाटले तरी राहू द्यावे ही विनंती; काही चांगले घडण्याची त्यातून आशा आहे.
या प्रतिज्ञापत्रानुसार किमान लागणारे वेतन शासकीय पातळीवर एन्फोर्स करावे काय?
शासकीय नियम करुन काही फार साध्य होते वाटत् नाही. मी अत्यंत निराशा वादी आहे त्याबाबत्. समाज सुधारणा केली तरच काही सकारात्मक होइल् असे वाटते. कित्येकदा indirect उपायच अधिक प्रभावशाली,चिरंतन ठरतात असे दिसून आले आहे. भुकेल्या माणसाला थेट अन्न देण्यापेक्षा काम द्यावे, रोजगार द्यावा, त्याप्रमाणेच.
गर्भलिंग निदान वगैरे बाबत कायदे आहेत. भ्रष्टाचाराविरुद्धही गुन्हेगारी कलमे आहेत पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. नवीन कायद्याची होइल अशी लोकांना का कुणास ठावुक आशा वाटते.
म्हणून नवीन कायदे बनवून एनफोर्समेंट करण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीत दूरगामी परिणाम करणारी उपाययोजना/मोहिम् उपयुक्त आहे.
अशी अर्थव्यवस्था बनवावी जिथे आपोआअपच श्रममूल्य वाढावे. किमान मानवी गरजा भागवण्यास पुरेसे पडावे. मी लंडनमध्ये असताना आमच्या कडे संडास-बाथरूम साफ करणारी पोरे-पोरी येत. त्यांचे ते काम करुन वेतन जवळपास आमच्या ८०% वगैरे होते.
--मनोबा
चांगला चर्चाप्रस्ताव
प्रस्तावित चर्चाप्रस्तावाबद्दल माझे ठोस असे मत बनलेले नाही. या चर्चेच्या माध्यमातून ते बनायला मदत होईल अशी अपेक्षा करतो.
समांतर लाऊड थिंकींग.. यावरही नीटसा विचार केलेला नाहि- अर्थात प्राथमिक मत-
माझ्यामते अशी सरसकट गरीबी रेषा आखण्यापेक्षा सरकारने भारतातील वसतिस्थानांचे गट अ, ब, क, ड, ई, फ असे वर्गीकरण केले पाहिजे.
गट अ: महानगरे
गट ब: मोठी शहरे
गट कः लहान शहरे
गट डः ठराविक सुविधा असलेली गावे
गट ई: उर्वरीत गावे, खेडी
गट फः कायमचे निवासस्थान नसलेल्या व्यक्ती, आदिवासी, वनवासी, सैनिक वगैरे.
या प्रत्येक गटासाठी त्या त्या स्तरावरील दारिद्र्यरेषेची डेफिनिशन असावी. त्याच बरोबर ही रेषा कायम मालकी निवास अथवा ठराविक कालावधीपेक्षा अधिक निवास असल्यासच ग्राह्य धरावी. म्हणजे उदा. महानगरात कायदेशीर कायम निवास असणार्यांना दिवसाला रु.१०० ही रेषा धरली. गावातुन एखादी व्यक्ती मायग्रेट झाली व तीची मिळकत रु. ८० असेल तर महानगरात कायम - मालकी निवास असे पर्यंत किंवा ठराविक कालावधीपेक्षा अधिक वास्तव्य होईपर्यंत ती व्यक्ती दारिद्र्यरेषे खाली येणार नाही.अश्यामुळे जे शहरे, महानगरे उथे लोंढे येतात त्यांनाही आळा बसु शकेल(!?)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
माझे मत
३२ रुपये खर्च करणारा गरीब नाही हे कदाचित दिलेल्या विदा नुसार बरोबरही असेल, पण कालानुरूप (३२ रुपये(+-)महागाई) खर्च करण्याची क्षमता-सातत्य असणे आवघड वाटते, अगदीच काळे-पांढरे असे वर्गीकरण केल्यास एखादा माणूस एक दिवस गरीब नसेल तर दुसरे दिवशी गरीब असेल.
प्रत्येक गरिबाने वर्षाचे प्लानिंग केले आणि त्यानुसार त्याचा दिवसाचा खर्च ठरवला, तर तो त्या वर्षासाठी गरीब वगैरे ठरवणे सोपे जाईल, पण तसे करणे जमेल असे दिसत नाही.
या प्रतिज्ञापत्रानुसार किमान लागणारे वेतन शासकीय पातळीवर एन्फोर्स करावे काय?
सर्वच वेतन मिळणाऱ्या कामांचे ऑडीटिंग शक्य नसल्याने धोरण राबिविले तरी त्याचा फायदा अपेक्षित घटकांना मिळेल का ही शंका वाटते. त्यामुळे असे धोरण राबविण्यापेक्षा प्रत्येक वेतन मिळविणाऱ्या माणसाला वेतनाचे विवरण भरण्यास सांगितले आणि त्याचाबद्ल्यात त्याला दारिद्र्य रेषेखालील सवलती दिल्यास ते थोडे योग्य राहील, विवरण भरताना त्याची सत्यता पडताळणी शक्य आहे आणि त्याचे रेकोर्ड देखील राहू शकते, त्या विदावर आधारित इतर धोरणे किंवा गोष्टी राबविता येणे शक्य होईल.
थाळी
कुठल्याही हाटेलात ३२ रु पेक्षा कमीने थाळी(३पो., १-२भाज्या, भात-वरण) मिळत असेल असे वाटत नाही. आजकाल ४० रू लागतातच.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
अन्न, वस्त्र, निवारा
३२ रु. अन्नाची गरज भरून निघत असावी हे मला पटते. मला वाटतं अद्यापही भारतात दोन वेळचे अन्न मिळण्यास ३२ रु. कसेबसे पुरेसे आहेत परंतु माणसाच्या दैनंदिन गरजेत वस्त्र आणि निवारा आणि त्यासोबत प्रवासखर्च या गोष्टीही असतात हे सरकारला माहित नसावे. ;-)
३२ रु. मधील अन्न सोडून बाकीच्या गरजांवर किती खर्च होतो याचे काही गणित मिळाले तर पुढील चर्चा करता येईल.
आर्थिक गरीबी जनतेची, वैचारीक गरीबी सरकारची!
गरीबीत जगणे ह्यात ही वेगवेगळ्या तर्हा असू शकतात. 'सन्मानाने गरीबीत जगणे' व 'लाचार होवून, लाज सोडून, आत्मसन्मान गमावलेल्या स्थितीत जीवन जगणे' हे ढोबळ मानाने गरीबीचे दोन प्रकार होवू शकतात.
दुसर्या पद्धतीने जगण्यासाठी ३२ रुपयापेक्शा कमी रुपये एका दिवसासाठी लागू शकतात. पण पहिल्या प्रकारात, प्रतिकूल परिस्थितीमुळे गरीबी आल्यामुळे सन्मानाने प्रत्येक दिवस ३२ रुपयात गरीबीत जगणे हे मला तरी खूप 'जाचक अपेक्शा' वाटते.
सरकारने वरील विधान प्रसवण्याआधी गरीबांकडे घरे आहेत कां? हे विचारात घेतले होते कां?
फक्त पोटापूरतं खाल्लं म्हणजे माणूस जगला असे होत नाही. खाल्ल्यानंतर त्याला/तीला हगायला देखील पूरेशी जागा, पाणी मिळायला हवे. शहरात आता तेवढी जागा नाही. पाणी सहज मिळत नाही. सार्वजनिक शौचालयात एका वापरासाठी ३ रुपये व न्हाणीघरासाठी ५ रुपये द्यावे लागतात. दिवसातून कमीत कमी दोनदा तरी सार्वजनिक शौचालयात माणसाला मग तो गरीब असला तरी जावेच लागते/ लागेल. स्त्रीची कुचंबणा त्याहून जास्त. झोपायचं कुठे? भूक मारून दर दिवशी १ रुपया जरी गरीबाने वाचवला तर तो कसा व कुठे सुरक्शित ठेवायचा?
इथंच थांबतो. जास्त विचार करवत नाही.
द्वैत
माझ्या मते हे दोन प्रश्न एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सरकार व बाजार अशा दोन वेगळ्या संस्था कल्पिल्या जातात. मग त्या एकमेकांविरुद्ध आहेत, एकमेकांना साह्य करणाऱ्या आहेत, एकाचं दुसऱ्यावर नियंत्रण असावं वगैरे विचार येतात.
सरकारकडे एक जंगी कॉर्पोरेशन म्हणून बघावं. या कॉर्पोरेशनचं उत्पादन हे तत्वतः सामाजिक उत्कर्ष, समाधान (वेल्फेअर) हे आहे. वस्तु व सेवा उत्पन्न करणारा बाजार या विस्तृत बाजाराचा एक भाग आहे. सगळी जनता ही सरकार कॉर्पोरेशनमध्ये तत्वतः समसमान भागधारक आहे.
असा विचार केल्यावर हे द्वैत नष्ट होतं. आत्यंतिक गरीबांनी उद्रेक करून सुव्यवस्थेत घट करू नये म्हणून त्यांना दिलेली मदत हे लॉंग टर्म कर्ज म्हणून बघता येतं. त्यावरचं व्याज हे टक्क्यांमध्ये मिळत नाही. किंवा बघण्याची दुसरी पद्धत म्हणजे, पावसावाऱ्यापासून माल सुखरूप ठेवण्यासाठी गोदामाचं भाडं द्यावं लागतं. त्यावर काही व्याज मिळत नाही. हा खर्च एकंदरीत किती आहे त्यावर मालाचं नुकसान सहन करायचं की गोदामाचं भाडं द्यायचं हे ठरवावं लागतं. हा निर्णय सरकार या कंपनीच्या हाती असतो. एका भूभागात एकच सरकार असल्याने अर्थातच मोनोपॉली आहे. पण टोकाच्या बाजारवाद्यांना मोनोपॉलीबद्दल काहीच हरकत नसते.
सध्या तरी आपण किमान वेतनाचं व्यवस्थित गोदाम बांधण्याऐवजी फुटकळ मदतींची तात्पुरती शेल्टर्स बांधतो आहोत. जेव्हा इतर सगळे श्रीमंत होतील, सरकारकडे अधिक पैसा येईल, आणि गरीबांची संख्या ३० ऐवजी १५ टक्क्यांच्या आसपास येईल तेव्हा कदाचित हा निर्णय घेतला जाईल.
पण जो काही निर्णय असेल तो बाजाराचा असेल.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
प्रश्न वेगळ्या स्वरूपात
सरकारने काही एन्फोर्स करायचे म्हटले की बाजारवाद्यांची पोटदुखी सुरू होते त्यामुळे आपण वेगळ्या प्रकारे हा आर्थिक/नैतिक प्रश्न मांडून पाहू.
जर ३२ रु रोज हा जगण्यासाठी किमान खर्च असे मानले तर आपण स्वतः जेव्हा एम्प्लॉयर असतो आणि तेवढा किमान खर्च भागेल इतके वेतन आपण देत नाही तेव्हा आपण सामाजिक/नैतिक गुन्हा करत असतो असे आपल्याला वाटते का? येथे प्रश्न आपल्याला स्वतःला केला आहे कारण "कोणीतरी दुसरे कमी वेतन देऊन एम्प्लॉईजचे शोषण करतात" असे म्हणण्यास येथे वाव नाही.
या प्रश्नाचा दुसरा भाग "बाजारात जे योग्य वेतन आहे ते आम्ही देतो, ते त्याच्या जगण्यास पुरेसे आहे की नाही याच्याशी आम्हाला घेणेदेणे नाही" असे आपल्याला वाटते का? हे आकडे समोर असताना तसेच वाटत राहील का?
नितिन थत्ते
विपर्यास
चर्चेत असलेले प्रतिज्ञापत्र आणि त्याच्यावरुन आलेल्या बातम्या, त्यांतून काढले गेलेले निष्कर्ष, हे सगळेच विपर्यासाचे उत्तम उदाहरण आहे.
सुप्रीम कोर्टाने नेमके काय सरकारला विचारले होते, आणि त्यावर सरकारने नेमके काय उत्तर दिलेले आहे, त्या प्रतिज्ञापत्राचा मजकूर काय आहे, हे तपशील मला (अजून तरी) मिळालेले नाहीत. परंतु, या बत्तीस रुपयांचा "गरीब ओळखण्याच्या प्रक्रियेशी" काहीही संबंध नाही. गरीब कसा ओळखावा याची ही बत्तीस रुपये ही थियरी आहे. प्रॅक्टिकल नाही. कॅलरी नॉर्म ला रिप्लेस करुन तेंडूलकर कमिटीने शास्त्रशुद्ध अभ्यासाने हा निष्कर्ष काढला आहे. त्याविषयी इथे वाचता येईल. आणि हे बत्तीस रुपये असे माणशी वेगळे काढण्याचे कारण नाही. पाच जणांचे एक कुटुंब नागरी भागात दरमहा रु. ४८२४/- आणि ग्रामीण भागात रु. ३९०५/- उत्पन्न मिळवत असेल तर - असा त्या बत्तीस रुपयांचा अर्थ आहे. यात रोज केले जाणारे खर्च आणि क्वचित केले जाणारे खर्च धरलेले आहेत. (चाळीस रुपये थाळी आणि सार्वजनीक शौचालयात द्यावे लागणारे तीन रुपये हे उल्लेख मनोरंजक आहेत. हॉटेलात चाळीस रुपयांत मिळणारे जेवण घरी बनवायला चाळीस रुपये लागत नाहीत. आणि सर्व शौचालयांत जाण्यासाठी पैसे पडतात असेही नाही.) तेंडुलकर कमिटीने पूर्वीचा कॅलरी निकष मोडीत काढून त्याजागी विविध खर्चाचा आढावा घेऊन हा नवीन निकष बनवलेला आहे. हे आकडे वाढत्या महागाईबरोबर बदलत जाणारे आहेत. पूर्वीचा कॅलरीचा निकष हा या तुलनेत करुणास्पद रीत्या तोकडा वाटतो. माणूस फक्त अन्न खात नसतो, त्याच्या अन्यही गरजा असतात, हे सत्य या निकषामध्ये गणले गेलेले आहे. अर्थात हा ऍकॅडेमिक एक्झरसाइझ झाला.
वास्तविक गरीब ओळखण्याची प्रक्रिया अशी नाही. त्यासाठी काही निकष आहेत. व्यक्तीने स्वतःच माहिती द्यायची आहे. ग्रामसभेने ती मंजूर करायची आहे. त्यात होणार्या वादविवादांवर सुनवाईची व्यवस्था आहे. काही मंडळी ही बीपीएल असलीच पाहिजेत, आणि काही मंडळी ही बीपीएल आजिबात असता कामा नयेत, असे इन्क्लुजन आणि एक्सक्लुजन क्रायटेरिया आहेत. त्याविषयी थोडे इथे वाचायला मिळेल.
बाकी प्रस्तावकांनी शेवटी दोन प्रश्न विचारले आहेत.
तर माझ्या माहितीप्रमाणे किमान वेतन शासकीय पातळीवर एन्फोर्स केलेले आहेच. त्यासाठी कायदा आहे. अकुशल, निमकुशल, आणि कुशल कामगारांसाठी नागरी भागात आणि ग्रामीण भागात ते किती असावे हे सरकार वेळोवेळी रिव्हाइज करत असते. (अकुशल कामगारांची बार्गेनिंग पॉवर वाढावी या उद्देशाने सरकारने एन आर इ जी एस मध्ये अकुशल कामगाराचे किमान वेतन १२५ रु दर दिवशी ठरवले आहे.) आणि हे किमान वेतन हे निर्धारित दारिद्र्य रेषेला ध्यानात घेऊनच ठरवलेले असते. त्यामुळे प्रश्न समजला नाही. (कायदा नीट राबवला जात नाही असे म्हणणे असेल तर भाग निराळा आहे.)
धन्यवाद
दुव्यांबद्दल धन्यवाद. त्यातला शास्त्रशुद्ध अभ्यासाचा दुवा बहुतांश वाचला. नवीन पद्धत ही जुन्या पद्धतीपेक्षा निश्चितच चांगली आहे. नियोजन आयोग अशी पद्धत वापरते, समर्थ स्टॅटिस्टिअन्सची टीम या प्रश्नावर काम करून, विदा गोळा करून, त्यातून काहीतरी सार्थ इंडेक्स काढण्याचा सच्चा प्रयत्न करत आहे हे पाहून बरं वाटलं. कधीकधी असं वाटतं की मतं मांडणाऱ्यांना पुरेसा अभ्यास करण्याची सक्ती करावी. पण अपुरी माहिती असतानाही आपलं मत मांडण्याचा अधिकार असणं हा एकंदरीतच मत मांडण्याच्या अधिकाराचा अपरिहार्य भाग आहे. यातूनच व्यक्ती व माध्यमं अधिक शहाणी होतील ही आशा करणंच आपल्या हाती असतं.
३२ रुपयांना गरीबांचा अपमान वगैरे म्हणणं हे विपर्यासाचं उत्कृष्ट उदाहरण आहे याबाबतीत सहमत. तुम्हाला जेव्हा प्रतिज्ञापत्राविषयी अधिक माहिती मिळेल तेव्हा कळवा, ही विनंती.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
सहमत, तरीही
सहमत, तरीही नियोजन समितीवरील सदस्य नरेंद्र जाधव ह्यांनी हे आकडे सद्य सामाजिक-आर्थिक परिस्थितीला धरून नसल्याचे सांगितले, तशी बातमी वाचण्यात आली.
ह्या आकडेवारीचा किंवा निर्णयाचा नक्की फायदा काय हे लक्षात येत नाही, त्यांच्या किंवा तुमच्या मते देखील हे निकष 'कोण दरिद्री' आहे हे ठरवत नाही तर दारिद्र्य रेषेखाली किती लोक आहेत हे ठरवते, हे विधान थोडे परस्परविरोधी वाटते, आणि तुम्ही दिलेल्या संदर्भ प्रमाणे जो वेगळा सर्व्हे चालू आहे त्यानुसार नियोजन आयोगाने हि आकडेवारी काढल्यास ती अधिक योग्य असण्याची शक्यता आहे, त्यामुळे २००९-२०१० च्या सर्व्हेनुसार निर्णय देण्याचे प्रयोजन समजत नाही, आणि नक्की कोणते धोरण ह्या निर्णयाला अनुसरून राबविले जाणार आहे हेही लक्षात येत नाही.
सांख्यिकी
असे काही त्या बातमीत दिसत नाही. बातमीदाराने आपलेच घोडे पुढे दामटण्यासाठी नरेन्द्र जाधवांनी "सारवासारव" केली इत्यादि शब्दसृष्टी रचली आहे. असो. आणि समजा नसेल जाधवांना हे पटले, तरी ते त्यांना का पटलेले नाही हेही त्या बातमीत स्पष्ट होत नाही. त्याहीपुढे, समजा असे स्पष्ट झाले, तरी ते एक मत असू शकतेच. डॉ जाधवही विद्वान आहेत. तेंडुलकरही आहेत. दोघांची भिन्न मते असू शकतात, आणि दोन्हीही बरोबर असू शकतात. (अर्थात, इथे जाधव हे तेंडुलकरांशी सहमत असल्याचेच दिसते.) अरुणा रॉय, वाय के अलग यासारखी मंडळीही तेंडुलकरांशी सहमत नाहीत. त्यांची अजून वेगळी मते आहेत. असू शकतात. अशा वादां-वादांतूनच काहीतरी सापडण्याची शक्यता आहे.
आकडेवारीचा नक्की फायदा.
देशात किती गरीब लोक आहेत हे समजले तर त्यासाठी, म्हणजे त्यांना काही विशेष सवलती देता येण्यासाठी अर्थसंकल्पात काही ठोस तरतूद करता येते. त्यासाठी नेमका किती पैसा बाजूला काढायचा हे ठरवता येते. असे किती गरीब देशाच्या नेमक्या कोणत्या भागात राहतात हे समजले, तर त्या भागाच्या विकासासाठी काही नियोजन करता येते. हे शोधण्यासाठी प्रत्यक्ष सर्व्हे, आणि सांख्यिकी या दोन्हीची मदत घ्यावी लागते. केवळ सांख्यिकीच्या मदतीने तेंडुलकरांनी, आपल्या अशा अभ्यासाच्या बळावर, भारतातील दरिद्री जनता ही एकूण लोकसंख्येच्या ३७.२% असल्याचा निष्कर्ष काढला. (२००४-०५ ची अंदाजे लोकसंख्या). यावरुन मग सर्व्हे केला जातो, की हे ३७.२% नेमके कोण.
सर्व्हे करताना, किंवा सांख्यिकी वापरताना, "गरीब कोण किंवा गरीब कोणाला म्हणावे" हे ठरवण्यासाठी गरिबीची व्याख्या अगोदर व्हायला हवी. ३२ रु माणशी वगैरे ही ती व्याख्या. याला समांतर/ याच्या जागी जी व्याख्या पूर्वी होती ती म्हणजे, अमुक अमुक कॅलरीज दिवसाला जो मिळवू शकतो, तो गरीब. पूर्वीची व्याख्या तोकडी होती यात काही वादच नाही. म्हणून ही नवीन व्याख्या. ही व्याख्या अशीच का ठरवली, कशी ठरवली याचा दुवा मी वरती दिलेला आहे.
प्रत्यक्षात गरीब शोधण्यासाठी थेट या व्याख्येलाच हात घालणे व्यावहारिक दृष्ट्या शक्य नाही. म्हणून, या व्याख्येवरून डिराइव्ह केलेले काही निकष आहेत. सोपे निकष आहेत. एक प्रश्नावली असते. सर्व्हे करणार्याने फार डोके चालवायचे काम नाही. प्रश्न विचारायचे. पर्यायांवर बटनं दाबायची. दररोज संध्याकाळी हा डाटा सर्व्हरवर अपलोड करायचा. झालं काम. अजून सोपं करण्यासाठी काही एक्स्लुजन आणि काही इन्क्लुजन निकष आहेत. म्हणजे, एखाद्याकडं पन्नास सीसी पेक्षा अधिक क्षमतेची दुचाकी/ चारचाकी आहे? मग त्याला प्रश्न विचारायला जायचंच नाही. त्याला दारिद्र्यरेषेच्या वरच गृहीत धरायचा. समजा एखाद्या घरात सोळा ते एकूणसाठ या वयाचा एकही पुरुष नाही, आणि त्या घरात एक्स्लुजनवाली एकही गोष्ट नाही, तर त्या घरातही काही प्रश्न विचारायचे नाहीत; त्या कुटुंबाला दारिद्र्यरेषेच्या खालीच गृहीत धरायचे.
अशा सर्व्हेने मिळणारी गरीबांची लोकसंख्या ही संख्यिकीने काढलेल्या निष्कर्षाशी मिळावी अशी अपेक्षा असते. त्यामुळे सहसा काही राज्ये याला विरोध करतात - विशेष करुन ज्या राज्यांमध्ये केंद्रातील सत्ताधारी पक्षांचे सरकार नाही, अशी राज्ये. त्यांना जास्त लोकसंख्या गरीब दाखवायची असते. म्हणजे केंद्राकडून जास्त पैसे मिळतात. मग ते म्हणतात, ३७% च का? आमच्याकडे तर ७०% गरीब आहेत, तुमची पद्धतच चुकीची आहे, इत्यादि.
आशा आहे, की शंकासमाधान झाले असेल. (ते लोकमत वगैरे वाचून मत बनवू नका. त्या बातमीदारांना यातलं काही कळत असेल असं वाटत नाही. आणि कळत असलं, तरी तसं दाखवणं त्यांच्या धंद्याला मारक आहे.)
अधिक माहितीसाठी - सोप्या शब्दांमध्ये - हे प्रेझेंटेशन पहा.
Presentation on Socio-economic and caste Census 2011 हे गुगल करा. rural.nic.in वर सापडेल.
अनेक आभार
आळश्यांच्या राजाने (आळस झटकून ;) [ह. घेणे]) इतकी चांगली माहिती मुद्देसुदपणे दिल्याबद्दल अनेक आभार.
बरीच नवी माहिती मिळाली.
rural.nic.in वरचे प्रेझेंटेशन विषयाच्या माहितीसाठी बरेच उपयुक्त आहे. या व्यतिरिक्त जनगणनेबद्दलचे FAQ बुकलेट 'द हिंदू' या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर इथे पीडीएफ् फॉर्मॅटमधे वाचता यावे. (विषेशतः प्रश्न क्र. ८ या दारिद्र्यरेषेशी संबंधित आहे)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
थँक्स
ही पुस्तिका छान आहे. नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या सर्व्हेत वापरला जाणारा टॅबलेट पीसी. भारताच्या कानाकोपर्यात पोहोचायला आधुनिक तंत्रज्ञान कशी मदत करत आहे हे पाहणे मोठे रंजक आहे. रोज संध्याकाळी उपग्रहाच्या मार्फत हा टॅबलेट पीसी सर्व डाटा राजधानीत पाठवणार आहे. एखाद्या शहरात अशा तंत्रज्ञानाची नवलाई नसेल, पण ज्या गावात/ वस्तीत चालत जायलाही रस्ता नाही; वीज आणि अन्य सुविधा सोडा, अशा ठिकाणी अशा प्रकारे हा उपक्रम राबवला जाणे ही एक कौतुकास्पद बाब आहे.
धन्यवाद
माहिती बद्दल धन्यवाद.
मग केवळ सांख्यिकीच्या आधारे हे आकडे काढून तरतूद करणे ह्यापेक्षा प्रत्यक्ष सर्व्हे नंतर तरतूद करणे जास्त योग्य वाटते. सर्व्हेचा पर्याय उपलब्ध असताना संख्याकीच्या आधारे निष्कर्ष काढणे थोडे विचित्र वाटते. सर्व्हेचा निकाल येत्या ६ महिन्यात लागणार असल्याचे कळते.
सर्व्हेचा फायदा नक्की कळतो पण सर्व्हे च्या पार्श्वभूमीवर नियोजन आयोगाचा कटऑफ नक्की कसा उपयोगी ठरू शकतो हे लक्षात येत नाही.
पत्रकारांना काही कळते का नाही हे मला माहित नाही, पण अशा आशयाच्या बातम्या हिंदू मध्ये देखील आहेत, तेही पत्रकारच आहेत, शेवटी सारीच मते आहेत.
पत्रकार
प्रतिसादाची दखल घेऊन पोच दिल्याबद्दल धन्यवाद - आपल्याला, राजेश, आणि ऋषिकेश यांनाही.
पत्रकारांचे आकलन मी काढले आहे असा गैरसमज झाला असल्यास दूर करतो. मी बातमीदार हा शब्द वापरला आहे. जाणीवपूर्वक. आणि तो विषय कळण्याबद्दलचा उल्लेख हा लोकमतमधील आपण दुवा दिलेल्या बातमीसंदर्भातच होता. कळणारे आणि न कळणारे लोक सगळीकडेच आहेत. सामान्यीकरण नाही. असो.
तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न महत्वाचा आहे - मी तो वेगळ्या शब्दांत मांडतो - सर्व्हे व्हायच्या अगोदर नियोजन आयोगाने आगावू भविष्य वर्तवणे - की इतके इतकेच लोक गरीब आहेत, आणि सरकारने त्यानुसार "कॅप" लावणे योग्य आहे का? हा तो प्रश्न. आता हा प्रश्न वेगळा आहे, आणि तेंडुलकर समितीने लावलेले निकष योग्य की अयोग्य हा प्रश्न वेगळा आहे, हे आपण लक्षात घेतले तर बर्याच गोष्टी समजायला सोप्या होतात.
धन्यवाद
खुलाश्याबद्दल धन्यवाद.
तेंडूलकर समिती आणि नियोजन आयोग हे जरी वेगळे असले तरी नियोजन आयोगाने समितीने काढलेल्या निष्कर्षाला दुजोरा दिला आहे, पण एकूण परिस्थिती पाहता असे दिसते कि, न्यायालयाच्या आदेशावरून समितीने उपलब्ध विदाच्या अनुसार निष्कर्ष काढला, पण गरिबीची रेषा ठरविताना हा निष्कर्ष आणि सर्व्हे-विदा दोन्हींचा वापर होणार असल्याने नुकसान असे विशेष काही नाहीच.
ह्या समितीवर काम करणारे सुरेश तेंडूलकर जुनमधेच निवर्तल्याचे कळले.
बुलशीट
आळश्यांचा राजा ह्यांनी बातमीदाराच्या बातमीदेण्याच्या पद्धतीवरवर खापर फोडत जी विचारपद्धती कुचकामी आहे, अशा वेडगळ विचारपद्धतीवर आधारलेल्या डोलार्याचे जे समर्थन केले आहे, व इतरांनी जी वास्तवाला धरून जी मते मांडली त्याला त्यांनी 'विपर्यास' म्हणून मोडीत काढले त्याचा मी निशेध करतो.
गरीबी वा दारिद्र्यापेशा नेमके कशामुळे येते? ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर कळू शकते कि गरीब ते असतात जे स्वत:च्या दैनंदिन प्राथमिक गरजा देखील ज्यांना व्यवस्थित पूर्या करता येत नाही असे ते.'
ह्यात येतात
1) सदृढ स्त्री-पुरुश
2) लहान निराधार मुले
3) निराधार वृद्ध
4) अत्यंत आजारी माणसे
सरकार वा प्रशासन व्यवस्था ह्या वेगवेगळ्या गटातील लोकांना त्यांच्या समस्यांची वर्गवारी करून त्यानूसार मदतकार्य करू शकते. हि आहे साधी सोपी विचारपद्धती. माणसाला मदत त्याच्या वयानुसार, त्याच्या शरीराधर्मानुसार, त्याच्या शरीराच्या कार्यक्शमतेनुसार मिळायला हवी. कुणाला वेतन किती असावं? हे ठरविण्याच्या फंदात सरकार नावाच्या अजस्त्र यंत्रणेने पडू नये.
तरुण वयातील स्त्री-पुरुशाला रोजगार कसा मिळेल? हे पाहणे.
वयात आलेल्या स्त्री-पुरुशांना आरोग्य स्वच्छ व सदृढ कसे ठेवायचे?,गर्भनिरोधकांचा वापर कां? व कसा करायचा असतो? कमीत कमी मुलं जन्माला घातली तर त्याचा काय फायदा होतो?ह्याबाबत मार्गदर्शन करणे. तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी कमी मुल्य असणार्या गोश्टींना प्रोत्साहन करणे.
लहान निराधार मुलांसाठी आश्रमशाळा उघडणे, व त्या व्यवस्थित चालवणे. अपत्य नसलेल्यांना येथील मुले दत्तक घेण्यासाठी प्रयत्न करणे.
निराधार वृद्धांसाठी अनाथालय उघडणे व चालवणे.
अत्यंत आजारी मंडळींसाठी मोफत उपचार व सेवासुविधा उपलब्ध करून देणे.
हि आहेत, सामांन्यांच्या मनातील आदर्श सरकारची कर्तव्ये. सामांन्याना अभिप्रेत असलेली कर्तव्ये टाळून जर सरकार कारकूनासारखे सर्वोच्च न्यायालयापुढे आकडेवारी मांडण्यासाठी काहि मंडळींचा बोजड व कुचकामी अभ्यास सादर करीत असेल तर ते मुर्खपणाचेच आहे. वरील बातमीचा बातमीदार हा अनेक सामांन्य जनतेचाच प्रतिनिधी होता, आहे, असतो.
'शहाण्यांचा राजा'
सतीश रावले
विसंगत वाक्ये
>>कुणाला वेतन किती असावं? हे ठरविण्याच्या फंदात सरकार नावाच्या अजस्त्र यंत्रणेने पडू नये.
>>सामांन्यांच्या मनातील आदर्श सरकारची कर्तव्ये. सामांन्याना अभिप्रेत असलेली कर्तव्ये टाळून
प्रतिसादातील ही दोन वाक्ये एकमेकांशी विसंगत वाटली.
नितिन थत्ते
विसंगती कुठे आहे ते सांगता कां?
कोणाला एखाद्या कामाचा, कश्टाचा कधी? व किती मोबदला मिळेल? ह्या गोश्टी 'नियतीच्या अखत्यारीतील' आहेत, असे मी मानतो. जे मी मानले होते त्यापैकी हा दुसरा भाग मी शब्दात लिहीला नव्हता. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून तो उघड केला.
ह्या संदर्भात सरकारचे काम केवळ एक रोजगाराची संधी उपलब्ध करणे, जे मानधन आप-आपसातील स्तरावर ठरले गेले आहे त्यानुसार दिले जात नसेल तर इतर यंत्रणा ते पहाण्यासाठी आहेतच. त्या यंत्रणेचे काम चोखपणे पार पडले जातेय कि नाही हे सरकारचेच काम आहे.
सामान्यांच्या मनात सरकार एक मदतनीस म्हणून असावा, प्रत्येक गोश्ट डिक्टेट करणारा 'एक डिक्टेटर' असू नये, असे मी गृहित धरले आहे.
तुम्हाला दुसर्या वाक्यात काय विसंगत वाटले? ते तुम्ही सांगितले नाही.
नियती?
>>ह्या संदर्भात सरकारचे काम केवळ एक रोजगाराची संधी उपलब्ध करणे, जे मानधन आप-आपसातील स्तरावर ठरले गेले आहे त्यानुसार दिले जात नसेल तर इतर यंत्रणा ते पहाण्यासाठी आहेतच. त्या यंत्रणेचे काम चोखपणे पार पडले जातेय कि नाही हे सरकारचेच काम आहे.
हे जरा खुलासेवार सांगता का?
१. रोजगाराची संधी वॉचमनला उपलब्ध झाली आहे.
२. आप-आपसातील स्तरावर मासिक १८०० रु ठरले गेले आहे कारण बाजारव्यवस्थेत या कामाचे एवढेच वेतन द्यायला ग्राहक तयार आहेत. ते वेतन (१८०० रु) ग्राहक चोखपणे देत आहेत आणि संबंधित यंत्रणा ते चोखपणे पहात आहेत. (तिथे कसली अडचण नाही).
३. सरकारचे (किंवा समाजातील जाणत्या लोकांचे) असे मत आहे की सध्याच्या परिस्थितीत माणसाला जगण्यासाठी दरडोई कमीत कमी १००० रु महिन्याला लागतात. म्हणजे वॉचमनच्या कुटुंबाला (३ माणसांचे धरून) ३००० रु मिळणे "जगण्यासाठी गरजेचे" आहे.
अश्यावेळी ग्राहकाने किमान ३००० रु वेतन त्या वॉचमनला दिले पाहिजे हे "ठरवणे आणि ते पाहणे" हे सरकारचे कर्तव्य नाही आपणाला वाटते. का तर किती मिळेल हे नियतीच्या अखत्यारीत आहे?
ते "ठरवण्याचे" योग्य कर्तव्य सरकार पार पाडते असे आ_रा यांनी म्हटले आहे. पण तसे ठरवू नये असे तुमचे म्हणणे आहे.
आमचे म्हणणे ही बाब "नियतीच्या अखत्यारीतून" काढून "स्वतःच्या अखत्यारीत" घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
नितिन थत्ते
आपल्या हातात काय आहे तेवढेच काम सरकारने करावे.
घरखर्चाबाबत पगार खूपच कमी पडत असेल तर तो वॉचमन दुसर्या कामाचा शोध करू लागेल. त्याच्या कुटुंबाला चांगले आयुश्य जगण्याची मनिशा असेल तर त्याची पत्नी देखील फावल्या वेळेत काहितरी घरातच करता येईल असे वा इतर कोणतातरी जोडधंदा स्विकारेल.
सरकार आपली नित्य कर्मेच ठिक-ठाकपणे करीत नसताना कोणाला किती? कधी पगार ठरवण्याचे काम वेळच्या-वेळेत करेल, असे तुम्हाला वाटतेच कसे?
इथे शिक्शकांचे पगार होत नाहीत, तिथे वॉचमनला किती पगार असावा? हे सरकारने कां ठरवावे?
'आमचे म्हणणे' ही बाब "नियतीच्या अखत्यारीतून" काढून "स्वतःच्या अखत्यारीत" घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
इथे 'आमचे म्हणणे' म्हणजे 'नितीन थत्ते यांचे म्हणणे' असे मी समजतो. जेंव्हा नियतीच्या अखत्यारातून 'तुम्ही काही काढून घेवू' इच्छिता, तेंव्हा तिच्या दुसर्या रिकाम्या हातात तुम्ही 'काय देवू इच्छिता?' सरकारी यंत्रणेला जर नियती मानले तर सरकारी खुर्चीत बसलेल्या मंडळींना देवी-देवता मानायची तुमची तयारी आहे कां?
रेल्वे सरकारच्या मालकीची आहे. रेल्वेच्या माध्यमातून धान्यांची आवक-जावक करण्याहेतू नवनवीन रेल्वे लाईंस धान्यकोठार-धान्य मंडई-बाजरपेठा ह्यांना जोडल्यास धान्यांच्या ने-आणीतील पेट्रोल-डिझेल चा खर्च, हताळणीचा खर्च कमी होईल. कापूस-धान्यांच्या किंमतीमधील चढउतार कमी होईल. शेतीवर आधारलेल्या गोश्टींच्या किमतीवर अशाप्रकारे नियंत्रण मिळवले तसेच पाणी, घर इत्यादी गोश्टींच्या किंमतीवर नियंत्रण मिळवले तर महागाई आटोक्यात आणता येवू शकते. महागाई वाढती ठेवून कोणाला किती वेतन द्यायचे? हे ठरवत बसण्याचे काम वेडेपणाचेच आहे.
नियती
>>घरखर्चाबाबत पगार खूपच कमी पडत असेल तर तो वॉचमन दुसर्या कामाचा शोध करू लागेल.
बाजारात ग्राहक इतकेच वेतन द्यायला तयार आहेत म्हटल्यावर दुसरे काम शोधले तरी तेवढेच वेतन मिळणार. दुसरे काम म्हणजे जोडधंदा असे अपेक्षित असेल तर ते शक्य नाही कारण वॉचमनचे काम हे पूर्ण वेळ (१२ तास) असते. [मोलकरणीचे उदाहरण न घेता वॉचमनचे उदाहरंण याचसाठी घेतले].
>>आमचे म्हणणे' ही बाब "नियतीच्या अखत्यारीतून" काढून "स्वतःच्या अखत्यारीत" घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे.
इथे 'आमचे म्हणणे' म्हणजे 'नितीन थत्ते यांचे म्हणणे' असे मी समजतो. जेंव्हा नियतीच्या अखत्यारातून 'तुम्ही काही काढून घेवू' इच्छिता, तेंव्हा तिच्या दुसर्या रिकाम्या हातात तुम्ही 'काय देवू इच्छिता?' सरकारी यंत्रणेला जर नियती मानले तर सरकारी खुर्चीत बसलेल्या मंडळींना देवी-देवता मानायची तुमची तयारी आहे कां?
१. आमचे म्हणणे म्हणजे माझ्यासारखा विचार करणार्यांचे
२. नियतीच्या अखत्यारीतून काढून घेऊन नियतीला रिटायर करू इच्चितो. ;-) सरकारी यंत्रणेला नियती मानायचा मुळीच विचार नाही. तसे मानायला लागू नये म्हणूनच लोकशाहीचा डोलारा 'आम्ही' (भारताच्या नागरिकांनी) उभा केला आहे.
>>सरकार आपली नित्य कर्मेच ठिक-ठाकपणे करीत नसताना कोणाला किती? कधी पगार ठरवण्याचे काम वेळच्या-वेळेत करेल, असे तुम्हाला वाटतेच कसे?
इथे शिक्शकांचे पगार होत नाहीत, तिथे वॉचमनला किती पगार असावा? हे सरकारने कां ठरवावे?
The State shall aim for securing right to an adequate means of livelihood for all citizens, असे मार्गदर्शक तत्त्व आम्ही आमच्या सरकारला घालून दिले आहे.
हे काम सरकारने आधीच (काही गटांच्या बाबतीत उदा- औद्योगिक कामगार) केले आहे. पगार किती असावा हे ठरवणे आणि पगार होणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे शिक्षकांचे पगार वेळेवर होत नाहीत म्हणून सरकारने सीमेचे संरक्षण करू नये या म्हणण्याला काही अर्थ नाही.
असो. धाग्याचा मूळ उद्देश साध्य झाला नव्हता. आणि धाग्यावरची चर्चा ३२ रु बरोबर की चूक या दिशेने चालली होती. तुमच्या प्रतिसादाने (नियतीने तुमच्याकडून प्रतिसाद लिहवून घेतल्यामुळे) ती पुन्हा मूळ उद्देशाकडे वळणे शक्य झाले आहे. त्याबद्दल धन्यवाद.
नितिन थत्ते
माझ्याकडूनही नियतीला धन्यवाद!
नियतीला माझेही धन्यवाद. रावलेसाहेबांच्या नियतीने काही गोष्टी माझ्याही लक्षात आणून दिल्या आहेत.
रावलेंचा प्रॉब्लेम
रावलेंनी आपल्या बोलण्यात विसंगती काय ते विचारले आहे. थत्त्ते त्यांना समजाऊ शकत नाही आहेत असे दिसते. प्रॉब्लेम असा आहे की सरकारने "किमान" वेतन ठरवावे असे थत्ते म्हणत आहेत, आणि रावले तो "किमान" शब्द काही वाचायला तयार नाहीत. असो.
बैलाचे शेण आणि गोंधळ
श्री रावले,
हा प्रतिसाद वाचून खरे तर मला हसू आले. प्रतिसाद द्यावा की नाही या संभ्रमात थोडा वेळ पडलो. पण देतो. थोडक्यात देतो. काही एक कळवळ्याने लिहिले आहे असे वाटले म्हणून लिहितो.
नियोजन मंडळाचा/ तेंडुलकर कमिटीचा अभ्यास हा बोजड, कुचकामी, कारकुनी आहे असे म्हणण्यापूर्वी तो तसा कशावरुन आहे, याविषयी दोन शब्द लिहिले तर तुम्ही लावलेली विशेषणे सार्थ होतील. नाहीतर ते एक अडाणी विधान आहे.
सामान्यांच्या (म्हणजे काय कुणास ठाऊक. मला वाटले लोकशाहीमध्ये सामान्य आणि असामान्य असे कुणी नसते. असो. सरकारबाहेरील लोक या अर्थाने तुम्ही हा शब्द वापरत असाल असे वाटते) मनातील आदर्श सरकारची कर्तव्ये तुम्ही दिलेली आहेत. ती सरकार टाळत असते हे तुम्हाला कुणी सांगीतले?
असो. संदर्भातील बातमीदाराविषयी तुम्हाला जी सहानुभूती आहे, त्याबद्दल मलाही आपल्याविषयी सहानुभूती वाटते.
आणि हो, मी सरकारचे इथे काही समर्थन वगैरे केलेले आहे , कुठल्याच प्रतिसादात, असे मला तरी वाटत नाही. अनाठायी टीकेच्या संदर्भात काही तथ्ये मी उघडकीला आणली, एवढेच. एवढे मनाला लावून घेऊ नका.
संभ्रम दूर व्हावा!
हसू आले तर हसावे. पण तुमचा प्रतिसाद वाचून मला राग आला होता.
नियोजन मंडळाने आत्तापर्यंत देशाची लोकसंख्या वाढण्याबाबत, अन्नसाठा साठवून त्याचा पुरवठा लोकांपर्यंत होण्यासाठी कोणती कामे केली आहेत कां? अन्नधान्य पावसात सडते, उंदिर खातात, गोदामे कमी आहेत. त्यामुळे भाव वाढतात, गरीबी वाढते. अशा नियोजन मंडळाच्या अभ्यासाला कोणते विशेशण लावावे?
हे तेंडुलकर व त्यांची कमिटी कोण? सामान्य कि असामान्य? पाच माणसांचे कुटुंब गृहित धरून त्यांचा खर्चाचा हिशेब करणारे स्वप्नातच वावरत नाहित कां?
मी ह्या देशातच राहतो. सरकार काय कामे करते, काय करीत नाही हे मला इतर कोणी सांगायला नको. मला आज घर घेता येत नाही, खर्चापुढे माझा पगार कमी पडतो. हे सांगण्यासाठी इतर कोणाची गरजच काय?
असो. संदर्भातील बातमीदाराविषयी तुम्हाला जी सहानुभूती आहे, त्याबद्दल मलाही आपल्याविषयी सहानुभूती वाटते.
मला बातमीदाराविशयी सहानभूती वाटत नाही. त्याने ज्या दृश्टीने बातमी जगापुढे आणली त्या दृश्टीशी मी सहमत आहे. तुम्हाला त्या बातमीदाराविशयी सहानभूती वाटते, हे वाचून आश्चर्य (क्वाईट स्ट्रेंज) वाटले.
आणि हो, मी सरकारचे इथे काही समर्थन वगैरे केलेले आहे , कुठल्याच प्रतिसादात, असे मला तरी वाटत नाही. अनाठायी टीकेच्या संदर्भात काही तथ्ये मी उघडकीला आणली, एवढेच. एवढे मनाला लावून घेऊ नका.
'इतरांची मते हि विपर्यास आहेत', हे विधान तुम्ही तुम्हाला त्याविशयाची थोडीफार माहिती आहे ह्या आधारावर केलेले होते आणी म्हणूनच आक्शेप घेण्यासारखेच होते. तुम्हाला जर थोडीफार माहिती होती तर तुम्ही वेगळा लेख लिहून ती सादर करायला हवी होती. शंभर टक्के द्न्यान या जगात कोणालाच नसते, मला हि नाही.
शहाण्यांचा राजा
सतीश रावले
तर्कदुष्ट प्रतिसाद
आपल्या प्रतिसादात अनेक मुद्दे चुकीचे/अतार्कीक/गैर आहेत. वानगीदाखल केवळ एकाचे खंडन करतो:
नियोजन मंडळाचे काम लोकसंख्या नियंत्रण, अन्न वितरण व सुरक्षा इ. विषयांची 'अंमलबजावणी' करण्याचे काम नाहीच आहे. ते त्यांनी करावे असा विचित्र आग्रह करून काय फायदा?
'अन्नधान्य पावसात सडते, उंदिर खातात, गोदामे कमी आहेत. त्यामुळे भाव वाढतात, गरीबी वाढते' या त असत्या काहिच नाही. फक्त यामुळेच गरीबी वाढते असा दावा नियोजन मंडळाने केलेला नाही!
तेव्हा उगाच भावनेच्या भरात तर्कदुष्ट प्रतिसाद देण्यात काय हशील?
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
हा कोणता प्रतिसाद?
तुमचा प्रतिसाद मला कळला नाही. फक्त मी लिहीलेले तुम्हाला आवडले नाही एवढेच कळले.
--------------------------------
होय! मी हुशार आहे. बोला काय म्हणता?
धन्यवाद!
:)
धन्यवाद!
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
शहाण्यांचा राजा
हे पहा रावलेसाहेब, मला तुमच्या इमोशनल अत्याचारांमध्ये रस नाही. प्लॅनिंग कमिशनमध्ये, सरकारमध्ये अशी माणसे आहेत की ज्यांना अर्थशास्त्राचे काही ज्ञान नाही, गरीबांविषयी काही आस्था नाही असले आरोप तुमच्या प्रतिसादांमधून ध्वनित होतात. त्याच्या आधारासाठी काही ठोस मुद्दा मांडण्याऐवजी आपण पुन्हा आरोपच करत सुटला आहात. तर आता यावर बोलण्यासारखे काही नाही. आपण ज्या सरकारी कर्तव्यांची यादी दिलेली आहे ती कर्तव्ये सरकार करत असतेच. तर आपल्याला ते मान्य नाही, वर म्हणता, मी याच देशात राहतो, मला कुणी काही सांगू नका. आता यावर कुणी काय बोलावे! किमान वेतन ठरवण्याचे सरकारी कर्तव्यही आपल्याला मान्य नाही म्हणता. तर यावर काहीही बोलण्यासारखे नाही.
(मला शंका येतेय आपण माझी मस्करी तर करत नाही?)
काही ठोस मुद्दा मांडलात तर बोलूच.
ठोस व भरीव मुद्दे
चर्चेचा आढावा वादासंबंधितः
'फक्त पोटापूरतं खाल्लं म्हणजे माणूस जगला असे होत नाही. खाल्ल्यानंतर त्याला/तीला हगायला देखील पूरेशी जागा, पाणी मिळायला हवे. शहरात आता तेवढी जागा नाही. पाणी सहज मिळत नाही. सार्वजनिक शौचालयात एका वापरासाठी ३ रुपये व न्हाणीघरासाठी ५ रुपये द्यावे लागतात. '
असे मत मांडले.
चर्चा प्रस्तावकाने 'तुम्ही दिवसाला ३२ रु खर्च करता? मग तुम्ही गरीब नाही" ह्या बातमीचा त्यांना उमजलेल्या अर्थानुसार चर्चा प्रस्ताव ठेवला होता. प्रस्तावकाने 'एका व्यक्तीच्या आहारात एका दिवसात लागणार्या कॅलरीज' ह्या अंगाने प्रस्ताव सादर केला होता. मला वरील बातमीतून तसा अर्थ जाणवला नव्हता. उलट आयुश्य हे फक्त 'खाणं' नसतं, हे सांगण्यासाठी मी -
तुम्ही त्यानंतर तुमच्या प्रतिसादातून काहि माहिती समोर आणली. त्या माहितीत काहि बाबी सत्याजवळ जाणारी माहिती होती, तर काहि भाग तुमचा गैरसमज, संभ्रम होता. पण अर्धी खरी व अर्धी समजावर आधारलेली मते मांडताना तुम्ही इतरांच्या मतांना कमी लेखत 'बातमीचा विपर्यास' म्हटले होते. मला त्यावेळी ह्या विशयाची कमी माहिती होती त्यामुळे चटकन प्रतिसाद देणे शक्य नव्हते.
अशोक पाटील ह्यांच्या प्रतिसादानंतर अजून थोडी माहिती मिळाली. त्याबद्दल त्यांचे आभार!
पण तुम्ही तुमच्या गैरसमजूतीवर आधारलेल्या मतांनाच पुढे रेटत होता. तेंव्हा मी तुमच्या मतांमधल्या काही बाबींना 'खरे' समजून तुम्हाला प्रतिवाद केला.
अशोक पाटील ह्यांच्या दुसर्या प्रतिसादातून खरी माहिती अजून थोडी स्पश्ट झाली, ती होती
प्लॅनिंग कमिशनच्या कार्यक्षेत्रात 'पीडीएस' [पब्लिक डिस्ट्रिब्यूशन सिस्टीम] ची व्याख्या करणे ही एक बाब आणि त्या अनुषंगाने 'सब्सिडाईज्ड फूड सप्लाय' अधोरेखीत करणेही येतात. एक मुद्दा इथे लक्षात घेणे फार गरजेचे आहे [विशेषतः वरील अनेक प्रतिसाद वाचल्यावर] की, प्लॅनिंग कमिशनने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या आपल्या निवेदनात 'वेतन' वा 'रोजगारी' अशा शब्दाचे कुठेच प्रयोजन केलेले नाही. कमिशनचे प्रतिज्ञापत्र म्हणते, "जी व्यक्ती शहरी भागात रुपये ९६५/- आणि ग्रामीण भागात रुपये ७८१/- प्रतिमाह खर्च करू शकते, तिला 'दारिद्र्य रेषेखाली येण्यासाठी तसेच त्या अनुषंगाने पीडीएसद्वारे मिळू शकणार्या स्वस्त धान्य योजनांचे लाभ घेण्यास अपात्र मानले जावे."
संबंधित सरकारी उपदव्याप 'किमान वेतन ठरवण्याबाबत' नसून (जी माहिती तुम्ही इथे प्रसवली व त्याला खरे समजले गेले होते.) पीडीएस बाबत आहे. तुमचा बातमीच्या या मुद्द्याबाबत संभ्रम आहे. माझा आधीचा त्याबाबतचा समज योग्यच होता. पण माझ्या तुम्हाला दिलेल्या दुसर्या प्रतिसादात तुमची ह्या बाबतची माहिती खरी असावी असे मानून दुसरा प्रतिसाद दिला होता.( पण त्यातील उदाहरणे योग्यच होती.)
ह्या देशाचा पंतप्रधान 'अर्थतद्न्य' आहे, तरी देखील या देशात महागाई वाढतेय, आर्थिक भ्रश्टाचार वाढतोय. ह्याहून ठोस कोणता मुद्धा मांडू?
-----------------------------------
'शहाण्यांचा राजा' - हो! आहेच मुळी
यात काय ठोस मांडलेत
माझ्या माहितीचा कोणता भाग गैरसमजावर आणि संभ्रमावर आधारलेला आहे तेवढा उद्धृत करावा.
किमान वेतनाचा मुद्दा प्रस्तावकांच्या प्रश्नाला धरुनच आहे. आणि संबंधित सरकारी उपद्व्याप, अर्थात ज्याला सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हटले जाते, तो उपद्व्याप किमान वेतन ठरवण्यासाठी आहे असे मी म्हटलेले मला दाखवून द्या.
महागाईला आणि आर्थिक भ्रष्टाचाराला पंतप्रधानांनाच जबाबदार धरण्याच्या आपल्या ठोस मुद्द्याला मात्र माझ्याकडे काही उत्तर नाही.
आणि हे "माझे", "तुझे" असले भावनिक गोंधळ घालण्यापेक्षा मुद्दे मांडा.
माझ्या दृश्टीने हि चर्चा संपलीय!
१) माझ्या माहितीचा कोणता भाग गैरसमजावर आणि संभ्रमावर आधारलेला आहे तेवढा उद्धृत करावा.
उत्तरः -
चर्चेत असलेले प्रतिज्ञापत्र आणि त्याच्यावरुन आलेल्या बातम्या, त्यांतून काढले गेलेले निष्कर्ष, हे सगळेच विपर्यासाचे उत्तम उदाहरण आहे. तुमच्या पहिल्या प्रतिसादातले पहिले वाक्य.
हे वाक्य मला सगळे कळलेले आहे, तुम्ही सगळे चू......किचे आहात, असा अर्थ व्यक्त करतात.
या ऐवजी -
'वरील चर्चाप्रस्ताव चूकीच्या समजावर आधारलेला आहे. ' असे विधान करून तुम्ही तुमच्या पहिल्या प्रतिसादाला सुरवात केली असती. तसेच तुम्ही प्रस्तावातून व्यक्त होणार्या गैरसमज वा संभ्रमाला दूर करीत इतरांच्या मताला कमी न लेखता, स्वतःच्या विचारांची व्यवस्थित जुळवणूक करीत प्रतिसाद दिला असता, तर गैरसमज, संभ्रम पसरला नसता. संभ्रम कोणता? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर पुढे आहे.
२)किमान वेतनाचा मुद्दा प्रस्तावकांच्या प्रश्नाला धरुनच आहे. आणि संबंधित सरकारी उपद्व्याप, अर्थात ज्याला सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हटले जाते, तो उपद्व्याप किमान वेतन ठरवण्यासाठी आहे असे मी म्हटलेले मला दाखवून द्या.
तुमचा जो प्रतिसाद (बुध, 09/28/2011 - 19:05) श्री. अशोक पाटील यांना दिलेला आहे, त्यातील हि दुसरी ओळ आहे.-
'आणि स्वस्त धान्य मिळण्यासाठी पात्रता ठरवण्यासाठी हे निकष नाहीच आहेत मुळी.'
हे विधान तुम्हाला 'नसलेल्या ह्या विशयाच्या माहितीबाबत' आहेत. मात्र 'माहित नसून देखील ठणकावून हे निकश त्यासाठी नाहिच आहेत' असे सांगणे, कशाचे निदर्शक आहे?
हे सरकारी उपद्व्याप हे स्वस्त धान्य मिळवण्याबाबतच्या पीडीएस संदर्भातच आहेत. हि माहिती इथून कळू शकते.बातमी
-
'शहाण्यांचा राजा'
धन्यवाद
आपल्या दृष्टीने ही चर्चा संपल्याचे जाहीर केलेत ते एक बरे केलेत. काही एक डोक्यात ठेऊन जे सिलेक्टिव्ह रीडींग करत आहात, त्याने काही मुद्दे मांडायच्या परिस्थितीत रहात नाही आहात. मी प्रतिसाद कसा द्यायला हवा होता वगैरे कोचिंग मला आपण या चर्चेतच दिले पाहिजे असे काही नाही, खरडवही आहे, व्यनि आहे. नाही, मला काही तुमच्या सल्ल्याची ऍलर्जी नाही, पण इथे मुद्दे बोला. नसते भावनिक प्रश्न काढू नका. मी विपर्यास म्हटले तर तो विपर्यास कसा नाही हे दाखवून द्या, विषय संपला. विपर्यास हा शब्द कुणाला कमी लेखणारा नाही, आणि अपशब्द तर नाहीच नाही. उलट तुमच्याच प्रतिसादात "शहाण्यांचा राजा" असा म्हटले तर औपरोधिक, म्हटले तर खरेच दुसर्याला मूर्ख म्हणणारा उल्लेख, तसेच आपल्यालाच सर्व समजले आहे, बाकीची सर्व "वैचारीक गरीबी" (सरकारची) आहे असे उल्लेख आहेत. वर म्हणता की तुम्हाला या विषयाची फारशी माहिती नसल्याने चटकन प्रतिसाद देता आला नाही, तर मग लगेच ही शेलकी विशेषणे कशी काय चटकन देता आली? सरकारच्या शहाणपणाविषयी मला काही म्हणायचे नाही, पण तुम्हाला त्या शहाणपणावर काही भाष्य करायचे असेल तर माहिती घेऊन त्याआधारे करा, उगाच भावनेच्या भरात आरोप कसले करत बसलाय?
तुम्हाला एकतर नीट वाचता येत नाही किंवा नीट विचार करता येत नाही. किंवा तसे येत असूनही तसे करत नाही आहात. तुमचा गोंधळ दूर करण्याचा शेवटचा प्रयत्न करतो. स्वस्त धान्य मिळण्यासाठी पात्रता ठरवण्यासाठी "हे" निकष नाहीच आहेत मुळी असे मी जे म्हटले, ते आजिबात चुकीचे नाही. कोण किती खर्च करतो हे सर्व्हे करुन मोजणे अशक्य आहेत. त्यामुळे त्यासाठी "हे" निकष नसून "वेगळे" निकष आहेत हे मी इतर प्रतिसादांमध्येही म्हटले आहे. हे तुमच्या लक्षात येण्यासाठी त्या "हे" ला मी अधोरेखीत करायची मला आवश्यकता वाटत नाही.
आणि हा या सेन्ससचा उपद्व्याप पीडीएस संदर्भातच आहेत असे जे म्हणता त्यातील "च" हा तुमचे अज्ञान (पुन्हा एकदा) उघडे पाडतो. पीडीएस शिवायही अन्य लाभ या अशा प्रकारे ओळखल्या गेलेल्या गरीब मंडळींना मिळणार आहेत, उदा. घरे, सोशल सिक्युरिटी पेन्शन, इत्यादि.
असो. चर्चा संपवल्याबद्दल धन्यवाद.
(आणि हो, मी निकश म्हटलेले नसून निकष म्हटले आहे. उगाच भलते शब्द माझ्या तोंडी घालू नका. मी निकष ला निकष च म्हणतो. निकश नाही.)
चांगला प्रस्ताव
ताजा विषय आणि चांगली चर्चा.
फेसबुकवरती ३२ पेक्षा कमी मित्र असणे ही नवी 'सोशल-लाईफ दारिद्र्यरेषा' भारत सरकार अंमलात आणणार आहे म्हणे. :)
प्लॅनिंग् कमिशनचा तक्ता
श्री.थत्ते यानी 'विविध वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले' अशा वाक्याचे प्रयोजन करताना सुसंदर्भासाठी "टाईम्स ऑफ इंडिया" जी लिंक दिली आहे तिच्या वाचनानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की, प्लॅनिंग कमिशनला रुपये ३२/- शहरी आणि रुपये २६/- ग्रामीण भागात प्रतिदिन, पोटासाठी, खर्च करण्याची क्षमता अभिप्रेत आहे. मात्र पुढे श्री.थत्ते यानी जो तक्ता दिला आहे त्यात "कॅलरीज" चे सूत्र त्यानी मांडून ३२ रुपयांचा हिशोब केल्याचे दिसते. त्यातील फक्त दोन घटक सोडून [इंधन+साबण] बाकी सर्व 'पोटा'चेच आहेत.
मात्र प्लॅनिंग कमिशनने रुपये ३२/- ची जी फोड दिली आहे ती काहीशी वेगळी आहे : [कंसात व्याख्या करताना 'आणि' अथवा 'किंवा' चा मी केलेला वापर हे पी.सी.च्या 'and' आणि 'or' चेच भाषांतर आहे.]
रु. ५/- = तांदूळ आणि गहू [१३६ ग्राम तांदूळ आणि १६६ ग्राम गहू]
रु. १.८० = भाजीपाला [१६० ग्राम बटाटे किंवा ५० ग्राम कांदे किंवा ५९ ग्राम टोमॅटो किंवा १८० ग्राम भोपळा]
रु. १/- = डाळी [२० ग्राम.... विशिष्ट अशा 'पल्सेस्' चा आग्रह नाही]
रु. २.३ = दूध [८५ मिली]
रु. १.५५ = खाद्यतेल
आणि
रु. ११२/- = इंधन ( = १.६ केजी एलपीजी प्रतिमाह)
इतके एका व्यक्तीसाठी पुरेसे आहे असा पीसीच्या लेखा दावा/खुलासा आहे. 'कॅलरीज्' चा जरी थेट उल्लेख नसला तरी वरील् धान्य आणि भाजी, दुधातून आवश्यक संतुलित आहार त्या व्यक्तीला मिळेल असे त्यांचे गणित सांगते. त्यामुळे या गटाला स्वस्त धान्य दुकानातील धान्य मिळण्यास अपात्र ठरविण्यात येईल अशी साधार भीती वाटते.
निराधार
म्हणजे कुठल्या गटाला? समजले नाही. स्पष्ट केलेत तर बरे होईल.
आणि स्वस्त धान्य मिळण्यासाठी पात्रता ठरवण्यासाठी हे निकष नाहीच आहेत मुळी. त्यामुळे ही भीती निराधार आहे. वर ऋषिकेश यांनी एका पुस्तिकेचा दुवा दिलेला आहे. तो याबाबत उपयुक्त आहे. येस्स, भीती असलीच तर ती ही आहे, की या थियरीचे इम्प्लिकेशन आहे, की गरीबांचे प्रमाण सर्व्हेअगोदरच निर्धारीत करणे. त्यामुळे, अशा कॅपमुळे, साहजिकच काही लोक फायद्यांपासून वंचित होतील. पण मग हे कोणत्याही परिस्थितीत होणारच. रेषा - कट ऑफ - कुठेही काढली तरी त्या रेषेच्या "जस्ट वर" असणारे लोक "अन्याय अन्याय" असे म्हणणारच. (कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतेवेळी कट ऑफ मार्क कितीही असले, तरी एकाच मार्काने संधी हुकणारे नेहेमीच असणार.)
'कटऑफ' चा
प्लॅनिंग कमिशनच्या कार्यक्षेत्रात 'पीडीएस' [पब्लिक डिस्ट्रिब्यूशन सिस्टीम] ची व्याख्या करणे ही एक बाब आणि त्या अनुषंगाने 'सब्सिडाईज्ड फूड सप्लाय' अधोरेखीत करणेही येतात. एक मुद्दा इथे लक्षात घेणे फार गरजेचे आहे [विशेषतः वरील अनेक प्रतिसाद वाचल्यावर] की, प्लॅनिंग कमिशनने सुप्रीम कोर्टात सादर केलेल्या आपल्या निवेदनात 'वेतन' वा 'रोजगारी' अशा शब्दाचे कुठेच प्रयोजन केलेले नाही. कमिशनचे प्रतिज्ञापत्र म्हणते, "जी व्यक्ती शहरी भागात रुपये ९६५/- आणि ग्रामीण भागात रुपये ७८१/- प्रतिमाह खर्च करू शकते, तिला 'दारिद्र्य रेषेखाली येण्यासाठी तसेच त्या अनुषंगाने पीडीएसद्वारे मिळू शकणार्या स्वस्त धान्य योजनांचे लाभ घेण्यास अपात्र मानले जावे."
मला अभिप्रेत आहे/होता तो हा गट जो प्रतिदिनी रुपये ३२/- व्याख्येत बसणारा आणि त्यामुळे पीसीने तांत्रिक कारण पुढे करून त्याला पीडीएसमधून बाहेर बसविले जाण्याच्या शक्यतेला. श्री.आ.रा. म्हणतात त्याप्रमाणे "स्वस्त धान्य मिळण्यासाठी पात्रता ठरवण्यासाठी हे निकष नाहीच आहेत मुळी" असे असेल तर मग वाद आहे तरी कोणत्या मुद्यावर ?
जागतिक पातळीवर दिवस दोन डॉलर उत्पन्न हे 'दारिद्र्य रेषेखालील जीवन' व्याख्येस पुरेसे होते. या देशातही हाच आकडा प्रमाणभूत मानला आणि डॉलरच्या तुलनेत भारताचा रुपया हा साधारणत: ४५ = १ डॉलर अशा आजच्या भावाने स्वीकारला तर ३२ च्या ऐवजी किमान ९० रुपये प्रतिदिन क्षमता धरावी असा जनमानसाचा कल दिसतो.
कोणतीही सिस्टीम फुलप्रूफ कधीच असू शकणार नाही. ज्याला दोन मिळाले त्याच्याबद्दल एक मिळालेला कोकलणार तर दोन घेतलेला तीन का मिळाले नाही म्हणून हळहळत बसणार. 'कट-ऑफ' चा 'क्राय' ही एक नैसर्गिक आणि प्रतिक्षिप्त प्रक्रीयाच मानावी लागेल, नव्हे तो मानवी स्वभावाचाच एक भाग आहे. माझ्या एका परिचिताने घेतलेल्या राज्य लॉटरी तिकिटाचा पहिल्या क्रमांकाच्या बक्षिसाचा नंबर शेवटच्या फक्त एका आकड्याने हुकला होता, त्यावेळी बसलेल्या मानसिक धक्क्याने त्याला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. उद्या रुपये ३२/- हीच 'बीलो पॉव्हर्टी लाईन' तय झाली तर ३३/- वाला 'कटऑफ' चा फटका म्हणून पीसीच्या नावे बोटे मोडणार, हे नक्कीच.
कटऑफ
ही कटऑफची आयडिया जरा सर्क्युलर रेफरन्ससारखी वाटते. म्हणजे एखादा माणूस ३३ रु खर्च करू लागला म्हणून त्याला पीडीएस मधून बाहेर काढले तर सगळे मूळ गणित कोलमडून त्याचा खर्च एकदम ४५ रु वर जाण्याची शक्यता वाटते.
नितिन थत्ते
सर्क्युलर रेफरन्स
तसे थोडेसे आहे खरे. पण तरीही या संदर्भात अगदीच तसेही वाटत नाही. पीडीएस मध्ये आहे, म्हणून त्याचा खर्च ३२ रु आहे, आणि मग त्याचा खर्च थोडासा वाढला तर तो अपात्र ठरुन त्याच्यासाठी पीडीएस बंद होईल आणि त्याचा तोही आधार सुटून तो अधिकच गरीबीत अडकेल असे थिऑरेटिकली समजायला हरकत नाही.
पण प्रत्यक्षात मात्र या ३२ रु चा गरीब ओळखण्याशी संबंध नाही. सर्व्हे करताना सोपे व्यावहारिक प्रश्न विचारले जातात. 'तुम्ही दिवसाला भाजीसाठी दर माणशी अमुक रुपये अमुक पैसे खर्च करता का' असे प्रश्न विचारणे शक्य नाही. सांख्यिकी अभ्यासाच्या सोयीचे ते एक गणित आहे, एवढाच त्या बत्तीस रुपयांचा अर्थ आहे.
आता हे बत्तीस रुपयांचे जे गणित तेंडुलकर कमिटीने मांडलेले आहे, (आणि जे प्लॅनिंग कमिशनने स्वीकारले आहे, आणि जे पुढे सरकारनेही स्वीकारलेले आहे, त्यावरुन सर्व्हेची पद्धती निश्चित केलेली आहे) ते जर मान्य नसेल, ३२ रु ऐवजी, से वर पाटील् म्हणतात तसे दोन डॉलर असायला हवे, असे असेल, तर त्यानुसार तेंडुलकर कमिटीचे मुद्दे समोर ठेऊन चर्चा व्हायला हरकत नसावी.
मंडळाचा खुलासा
'एका माणसाला दिवसासाठी किती रुपये आवश्यक आहेत ?' या प्रश्नावरून देशभर उडालेल्या गदारोळावर अखेर काल [३.१०.११] रोजी डॉ.मॉन्टेकसिंग अहलुवालिया आणि ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यानी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन '३२ रुपये आणि दारिद्र्य रेषेखाली दिल्या जाणार्या लाभांचा संबंध नाही' असे जाहीर केले. किंबहुना आता सरकारी योजनांचा लाभ सरसकट जनतेला देण्यासाठी सरकारचा प्रयत्न राहील असे जरी सांगण्यात आले तरीही त्यासाठी जानेवारी २०१२ मध्ये जाहीर केल्या जाणार्या सामाजिक-आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेच्या [जी जुलै ते डिसेंबर २०११ या कालावधीत पूर्ण केली जाणार आहे, जात आहे] आधारावर लाभार्थींची व्याख्या ठरविली जाईल; अशीही दोन्ही विभागांनी पुस्ती जोडली आहे.
इतक्या वेळाने केलेल्या खुलाशाचे कारण म्हणजे 'डॉ.अहलुवालिया परदेशात होते' असे सांगण्यात आले. याचा अर्थ सर्वसामान्य जनतेने असा घ्यायचा की, योजना आयोगाच्या कार्यालयाची चावी उपाध्यक्ष यांच्याकडे असते आणि त्यांच्या गैरहजेरीत सांप्रत देशभूमीवर कार्यालयीन कामकाजाबाबत होत असलेल्या गरम चर्चेचा अहवाल त्याना मोबाईलवरून देता येत नसतो. त्यामुळे ते सशरीर इकडे आल्यावरच आणि पंतप्रधानांची प्रत्यक्ष भेट घेऊन, त्यांच्याशी खलबत करून, मगच मतमतान्तराची धूळ खाली बसविली जाते.
असो. आता थोडक्यात जानेवारी २०१२ च्या अहवालाची वाट पाहणे आले.
गदारोळ
उपक्रमावरील हा माझा पहिलाच प्रतिसाद.
३२ रू. माणशी अन्नासाठी (घरी शिजविलेले व रेशनच्या धान्यातून बनविलेले जेवण, दोन्ही वेळचे) खर्च करू शकणारा गरीब किंवा कसे हा या चर्चे चा विषय नाही. माझ्या मते वर दाखवलेली रक्कम पुरेशी होऊ शकते.
१ .या प्रतिज्ञापत्रानुसार किमान लागणारे वेतन शासकीय पातळीवर एन्फोर्स करावे काय?
चर्चाप्रस्तावानुसार नक्की काय म्हणायचे आहे? या बेसिसवर शासकीय कर्मचार्यांचे वेतन ठरवावे व तितकेच द्यावे असे म्हणायचे आहे काय? तसे असल्यास माझे या प्रस्तावास् १०००% अनुमोदन!
२. बाजारव्यवस्थेत कामगारांची उपलब्धता आणि गरज यानुसार जे वेतन ठरते तेच दिले जावे आणि येणारी तफावत भरून काढण्यासाठी होणारे बालमजुरीसारखे किंवा इतर गुन्हेगारी, लुतालूट आदि सामाजिक दुष्परिणाम अटळ म्हणून स्वीकारावे?
हे सामाजिक दुष्परिणाम किमानवेतन कायदा नसल्याने होत नाहीत तर अधिक नफ्याच्या हावरटपणातून कामगारांचे शोषण करण्याच्या मानसिकतेतून निर्माण होतात.
बालमजूरी विषयास दोन्ही आयाम आहेत.
कुणीही गळ घातलेली नसतांना मुले (१३-१४ पासूनची) बांधकाम व्यवसायात, शेतांत इ. वगैरे कामे करण्यास जाऊन कुटुंबाचे उत्पन्न वाढविण्यात हातभार लावित असतात. शोषण म्हणजे पोर म्हणून कमी मजूरी देणे. जी महिलांना सुद्धा कमीच दिली जाते, बहुधा या युक्तिवादातून, की ही अंगमेहनतीची कामे आहेत. तेंव्हा शारिरिक क्षमतेनुसार वेतन दिले जाईल.
इतर गुन्हेगारी, लुटालूट ही किमन वेतन कायद्याची अंमलबजावणी नसल्याने कशी होते ? हे समजले नाही. उदा. भरपूर पगार घेणारा सरकारी गोडाऊनकीपरच तिथले धान्य 'सडले' 'उंदरांनी खाल्ले' इ. साम्गून चोरबाजारात विकतो, अन् आपण इथे बसून 'पेपर' वाचून टाईप करतो, कि सडवण्यापेक्षा गरिबांना फुकट वाटा!
ता. क.
शीलेश शर्मा। दि. ३ (नवी दिल्ली)
काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर दारिद्रय़ रेषेच्या व्याख्येत बदल करण्याचा निर्णय योजना आयोगाने घेतला आहे.
योजना आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया आणि ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांच्यात झालेल्या चर्चेनुसार शहरातील दररोज ३२ रुपयांपेक्षा जास्त आणि ग्रामीण भागातील दररोज २६ रुपयांपेक्षा जास्त खर्च करणार्यांना दारिद्रय़ रेषेवरील श्रेणीत ठेवण्याचा निर्णय बदलण्यात यावा. त्याऐवजी आता नव्याने जातीनिहाय आधारावर गरिबांची गणना केली जावी, असे ठरले आहे.
--दै. लोकमत वरून साभार (बोल्ड मी केलेले आहे.)
काहितरी चूकतेय, पण कोणताही पक्श बोंब मारीत नाही आहे.
'दारीद्र्य देशाचे, देशातील लोकांचे' खरं तर हा विशय थट्टेचा, मनोरंजनाचा, टाइम पासचा नक्कीच नाही.
काँग्रेस पक्शाच्या (वैचारीक) नेतृत्वाखालील सरकारची वैचारीक बैठक योग्य नाही. त्यामुळे त्याचा वाईट परीणाम देशातील बांधवांना होत आहे.
'सरकारी योजनांचा लाभ जनतेला देण्यासाठी जी 'चाळणी' सरकार निर्माण करू पहात आहे त्या चाळणी मागे जी मानसिकता आहे ती काँग्रसची वर्शानुवर्शे चालत असलेली मानसिकता आहे.
'सामाजिक-आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेच्या आधारावर लाभार्थींची व्याख्या ठरविली जाईल.' हे जे वृत्त सांगत आहे ते काही धोका सुचवत नाही आहे कां?
कायद्याच्या माध्यमातून मागासवर्गीयांना या देशात काहि वर्शासाठी नोकरीत आरक्शण देण्यात आले होते. पण आज आर्थिकदृश्ट्या मागास नसलेले तरीही केवळ जातीचे प्रमाणपत्र केवळ त्याच कामासाठी वापरणारे बीसी, ओबीसी मंडळी काही कमी आहेत कां या देशात?
निवडणूकीतही आता या जातीच्या नेत्यांना आपल्या युती केलेल्या अन्य पक्शांकडून आरक्शण हवे असते.
निवडून आल्यानंतरही ह्या मागासवर्गीयांना 'मंत्रीपदाचे' आरक्शण असावे अशी त्यांची मागणी असते.
'कायदा बाबासाहेबांनी बनवला' म्हणून त्याला कोणी बदलण्याची भाशा बोलू नये, असे हि मागासवर्गीय मंडळी म्हणतात. आणी काँग्रेस ह्या विचाराला खतपाणी घालत आलीय, घालतेय.
दारीद्र्य दूर होण्यासाठी पीडीएसला जो नैतीकतेचा आधार असायला हवा तो न देता त्याला 'समाजात वैचारीक मागासलेपण कयम ठेवत, डिव्हाईड अँड रूल' हि खेळी काँग्रेस खेळतेय ते चूकीचे आहे.
या व्यतिरीक्त एक बातमी चांगली मिळाली आहे. ज्या भूभगात जे धान्य पिकते ते खाल्ले जात नसल्यामुळे त्याला मागणी नसे ह्या कारणामुळे तेथील शेतकर्याला त्या धान्याचे रास्त भाव मिळत नसत. याचीच दुसरी बाजू हि की पीडीएस मुळे पंजाबातील गहू सर्व देशात सहज उपलब्ध झाला आणी लोकांचा आहार विशेशत: शहरी भागातील लोकांचा आहार देखील बदलला. चाणाक्श असलेल्या श्री. शरद पवांरांच्या हातून ह्या बाबतीत चांगले काम झाले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद! पण यापुढे, महराश्ट्रातील शहरी मंडळींचा आहार महारश्ट्रधार्जिणा (नाचणी, ज्वारी,बाजरी यांवर आधारलेला) कसा काय होईल बरे?
ज्वारी बाजरी अन् श्रीमंती खाद्य
पण यापुढे, महराश्ट्रातील शहरी मंडळींचा आहार महारश्ट्रधार्जिणा (नाचणी, ज्वारी,बाजरी यांवर आधारलेला) कसा काय होईल बरे <<
महोदय,
आपणास हे ठाऊक आहे काय कि आजच्या घडीला चांगल्या प्रतिच्या गव्हापेक्षा ज्वारी जास्त महाग मिळते बाजारात?
आपण हे वाचले कां?
आ. कित्ता,
वरील प्रतिसादात मी ज्या बातमीचा दुवा दिला होता. तो आपणाकडून वाचण्याचा राहून गेला असावा. त्या बातमीनुसार - 'ज्वारी व बाजरी १ रुपये, गहू २ रुपये व तांदूळ ३ रुपये किलो दराने देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज दिली.'
सरकारी सबसीडी मिळून 'ज्वारी' सामान्य जनतेच्या नेहमीच्या आहारात येवू शकते.
रेशन
अहो सतिश रावळे दादा,
आपण स्वतःचा कॉम्प्यूटर वापरतो की नाही? ५० सीसी वरची गाडी पण असेलच? आदर्शतः आपल्याला ते रेशनचे धान्य घेण्याचा काहीएक अधिकार नाहिये. तशी माझ्या शेतात होते शाळू अन् दादर, पण फक्त घरच्या पुरती. बा़की सगळं नगदी पीक.. कपाशी अन् ऊस.