प्राचीन भारतात हिर्‍याचा वापर.

प्राचीन काळातला भारत देश हा त्या काळातला एक समृद्ध देश होता. त्या समृद्धीची अनेक वर्णने जुन्या संस्कृत वाङ्मयामधून आपणास वाचावयास मिळतात. सोने, चांदी आणि नाना प्रकारची रत्ने ह्यांचे अनेक उल्लेख त्या वाङ्मयामध्ये असतात. Calendar Art च्या रूपाने जे जुन्या भारताचे, त्यातील देवादिकांचे आणि अन्य क्षत्रिय राजांचे दर्शन आपणास आजच्या काळात घडते त्यात त्यांचे सोन्याचे मुकुट, सोन्याची अनेकविध आभूषणे आणि त्यांवर जडवलेली नाना रंगांची रत्ने ह्यांचे मुक्त चित्रण असते. प्राचीन भारत असाच होती अशी आपली धारणा ह्यामागे आहे.

आजच्या काळात रत्नांमध्ये हिर्‍याला सर्वात पहिले स्थान दिले जाते. प्राचीन भारतातील रत्नांचा विचार करता मला असे जाणवले की आपल्या जुन्या वाङ्मयात हिर्‍याचा उल्लेख क्वचितच आढळतो. ’हीरक’ आणि ’वज्र’ अशा नावाचे एक रत्न प्राचीन भारतीयांना माहीत होते हे निश्चित पण धनवान् व्यक्तींच्या वापरात हिरे फारसे नसावेत असा तर्क हिर्‍यांच्या उल्लेखाच्या दुर्मिळतेवरून करता येतो. हा तर्क आपल्या सर्वसाधारण समजुतीच्या विरुद्ध आहे. असे का असावे ह्याचा विचार करता मला जे जाणवले ते पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

आज ज्यांना precious and semi-precious stones असे संबोधले जाते आणि ज्यांना आपल्याकडे ’रत्न’ अथवा ’मणि’ असे म्हणत असत त्यांची जुनी संस्कृत नावे काय आहेत हे शोधण्याचा मी प्रयत्न केला.

१) अमरकोषामध्ये काण्ड २, वैश्यवर्गात वेगवेगळया समानार्थी शब्दांनी मरकत म्हणजे पाचू, माणिक्य, मौक्तिक आणि प्रवाल ह्यांचा उल्लेख आहे. पैकी पहिले दोन अश्मवर्ग म्हणजे खाणीमध्ये मिळणारे असे सुचविले आहे आणि ह्या चारहि प्रकारांना रत्न असे म्हटले आहे.
२) कौटिल्याच्या अर्थशास्त्रात (अध्याय २.११) येथे मौक्तिक,वैदूर्य, इन्द्रनील, स्फटिक, वज्र, प्रवालक अशा काही नावांचा उल्लेख असून त्यांचे पुन: रंग, श्रेणि इत्यादींवरून अन्य नावांनी भेद केले आहेत.
३) http://www.sdstate.edu/projectsouthasia/upload/Pliny-Indian-Minerals.pdf येथे उपलब्ध माहितीनुसार प्लिनीला भारतातील हिरे, प्रवाल, मोती, गोमेद (Beryl), आनील (Amethyst), Onyx, Jasper, Sardonyx (ह्यांना मराठीत काय म्हणतात?) अशी रत्ने ठाऊक होती असे दिसते.

ह्यानंतर मी शब्दकोषांकडे वळलो आणि अ) मोनिअर-विल्यम्स (संस्कृत-इंग्लिश), ब) आपटे (संस्कृत-इंग्लिश), क) आपटे (इंग्लिश-संस्कृत), ड) वैद्य (संस्कृत-इंग्लिश), इ) आनंदराम बरुआ (भाग १, इंग्लिश-संस्कृत A to Falseness) (टीप क्र. १ पहा) अशांचा शोध घेतल्यावर पुढील शब्द बाहेर पडले.

०१) Amber - तैलमणि, तृणमणि (इ). [(ब) च्या अनुसार ’तैलमणि’ म्हणजे ’एक प्रकारचे रत्न.]
०२) Amethyst - आनील (इ). [(अ), (ब) आणि (ड) ह्यांच्या अनुसार ’आनील’ म्हणजे किंचित् निळे.]
०३) Beryl - गोमेद (इ). [(अ), (ब) आणि (ड) ह्यांच्या अनुसार ’गोमेद’ हिमालयातून येतो आणि चार रंगांमध्ये असतो.]
०४) Cat's Eye - वैदूर्य (अ) आणि (इ).
०५) Coral - प्रवाल, विद्रुम (इ)
०६) Diamond - वज्र, हीर, हीरक.
०७) Emerald - मरकत (अ), (ब), (ड).
०८) Garnet - गोमेद (websites)
०९) Jade - अश्वक (क).
१०) Lapis Lazuli - वैदूर्य (ब).
११) Opal - पुलक, विमलक (क).
१२) Supphire - इन्द्रनील (अ).
१३) Topaz - पुष्कराग, पीताश्मन्.
१४) Ruby - माणिक्य [(अ), (ब), (ड)], कुरुविन्द [(ब), (ड), (इ)] (टीप क्र.२ पहा).

वरील यादीवरून असे दिसते की वेगवेगळया रत्नांच्या नावांबाबत वेगवेगळया अधिकारी ग्रन्थांमधून सुसूत्रता नाही, यद्यपि सर्व सुपरिचित नावे प्रत्येकात उपलब्ध आहेत

सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे ह्या सर्व अधिकृत ग्रन्थामधून हिर्‍याला आजच्यासारखे काही वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे असे जाणवत नाही. संस्कृत वाङ्मयामध्ये हिर्‍याचे उल्लेख क्वचितच दिसतात. त्यामानाने मरकत, माणिक्य, प्रवाल इत्यादि खूप ठिकाणी भेटतात. अमरकोष त्याचा उल्लेखहि करत नाही. मेघदूतामध्ये मरकत, प्रवाल, चन्द्रमणि ह्यांचे उल्लेख आहेत पण हिर्‍याचे कोठेच नाव नाही. अशा रीतीने प्राचीन भारतीयांना हिरा जरी माहीत होता तरी इतर रत्नांच्या तुलनेने त्याचे महत्त्व कमी होते असे जाणवते.

गूगलच्या साहाय्याने थोडा शोध घेतल्यावर Geological Survey of India मधील एक अधिकारी डॉ. नारायण अय्यर ह्यांनी १९४७त लिहिलेल्या 'A Handbook of Precious Stones' ह्या पुस्तकाचा शोध लागला आणि थोडा उलगडा झाला. (टीप क्र. ३ पहा.) हे पुस्तक http://www.farlang.com/gemstones/bahadur_handbook_of_precious_stones/pag... ह्या संस्थळावर उपलब्ध आहे. पुस्तकाचा भाग ११ हा हिर्‍यांविषयी आहे. त्यानुसार इसवीसनपूर्व काळापासून भारतात हिरे सापडत होते आणि ते भारतीयांना एक रत्न म्हणून ठाऊकहि होते. त्या दिवसात हिर्‍यांचा भारत हा जगातील एकुलता स्रोत होता. हिर्‍याच्या चूर्णाचा उपयोग करून त्याला पैलू पाडण्याची कलाहि भारतात विकसित झाली होती. परंतु भारतीय जवाहिर्‍यांच्या पद्धतीने पाडलेल्या पैलूंनी हिर्‍याचे पूर्ण तेज बाहेर पडू शकत नव्हते. ही कला १५व्या शतकाच्या सुमारास युरोपात पोहोचली आणि युरॊपीय पैलूकारांनी हिर्‍याचे नव्या प्रकारचे पैलू शोधून काढले, जेणेकरून हिर्‍याचे तेज आणखी वाढू शकले. (पुस्तकाचा भाग ७ पहा.) (ह्या कलेच्यामुळेच टॅवर्निअरसारखे जवाहिरे १६व्या शतकात हिर्‍यांच्या व्यापारासाठी भारतात येऊ लागले.)

परंतु त्या वेळेपर्यंत भारतातील हिर्‍याचे साठे पुष्कळसे वापरून झाले होते. पोर्तुगीज ब्राझीलमध्ये पोहोचल्यावर तेथे हिर्‍याचे नवे साठे सापडले आणि हिरा उत्पादनात ब्राझीलने भारताला मागे टाकले. कलान्तराने तेथीलहि साठे वापरून झाल्यावर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया इकडे हिरा उत्पादनाचा गुरुत्वमध्य ढळला आणि भारत आता हिरे उत्पादनात खूपच मागे राहिला आहे. Diamond cutting हे श्रमबहुल कामच आता भारतात जास्त होते. (कॅनडा हा देशहि हिरे उत्पादनात आपले स्थान निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.)

(टीप क्र. १ - आनन्दराम बरुआ हे नाव संस्कृतच्या अभ्यासकांना विशेष माहितीचे नाही. मलाहि हे नाव केवळ अपघातानेच सापडले. आनन्दराम बरुआ (Anundoram Borooah) ह्यांचे एकूण आयुष्य केवळ १८५०-१८८९ एव्हढेच होते. http://www.amtron.in/htmls/Biography-of-ARB.html येथील माहितीनुसार १८७२ साली त्यांनी ICS प्रवेश मिळवला. असा प्रवेश मिळवणार्‍यांमध्ये ते पाचवे हिंदुस्तानी आणि पहिले आसामी होते. बंगालमध्ये वेगवेगळया अधिकाराच्या जागांवर काम करतांना त्यांनी आपला संस्कृतचा व्यासंगहि चालू ठेवला होता आणि इंग्लिश-संस्कृत शब्दकोष ३ भागात निर्माण करण्यास त्यांनी प्रारंभ केला होता. पैकी दोन पूर्णहि झाले असे दिसते आणि पहिला भाग archive.org येथे मला सापडला. दुर्दैवाने तिसरा भाग निर्माण होण्याआधीच वयाच्या ३९व्या वर्षी त्यांना मृत्यूने गाठले. इतकया जुन्या काळात आधुनिक पद्धतीने संस्कृत शिकलेला आणि अधिकाराच्या जागेवर असलेला असा मनुष्य जर अधिक काळ जगला असता तर प्राच्यविद्यानिर्मितीत भारताच्या बाजूने मोलाचे योगदान तो करू शकला असता असे वाटते कारण त्या काळात आधुनिक पद्धतीची प्राच्यविद्यानिर्मिति बहुतांशी पाश्चात्य विद्वानच करत होते.

टीप क्र. २ - ’कुरुविन्द’ ह्यावरूनच मराठी ’करवंद’ हा शब्द निर्माण झाला असण्याची दाट शक्यता वाटते. कुरुविंदाप्रमाणेच करवंद दाट तांबडया रंगाचे आणि मण्याच्या आकाराचे असते ह्यावरून असा तर्क करणे उचित वाटते.

टीप क्र. ३ - 'A Handbook of Precious Stones' ह्या पुस्तकाच्या लेखकाचे नाव http://www.farlang.com/gemstones/bahadur_handbook_of_precious_stones/pag... येथे ’Bahadur' असे नोंदविण्यात आले आहे ते चुकीचे आहे. पुस्तकाचे लेखक Rao Bahadur Dr. L.A.N. Iyer हे आहेत. संस्थळाच्या प्रवर्तकांच्या चुकीच्या समजुतीमुळे Rao Bahadur मधील Bahadur ला उचलून तेच लेखकाचे नाव आहे असे मानले आहे.)

लेखनविषय: दुवे:

Comments

चित्रा यांचा लेख

चित्रा यांनी मागे उपक्रमावर लिहिलेला हा लेख आणि त्याखालील प्रतिसाद तुम्हाला आवडतील असे वाटते.

अनेक मोठे प्रसिद्ध हिरे भारतात सापडलेले आहेत. हिर्‍याला महत्त्व नसण्याचे कारण त्याला पाडलेले पैलू हेच असावे. बरेचसे हिरे (कोहिनूर, ऑर्लॉव वगैरे) यांना पुनश्च पैलू पाडले गेले. चू. भू. द्या. घ्या

छान लेख.....

माझ्या तीन पिंका:-
.हीरा शुक्र ग्रहाचे प्रतीक् म्हणून ज्योतिषात वापरतात. मग निदान ज्योतिषाकलेइतका तरी हीरा नक्कीच जुना असावा.
.शिवाय हिर्‍याचे चूर्ण विष म्हणून वापरल्याचे तर कधी हीरा हा संमोहनविद्येतला लोलक् म्हणून वापरल्याचे वेगवेगळ्या लोककथांत(सिंदबादच्या सात सफरी वगैरे) ऐकले आहे.

३.

>>....amond cutting हे श्रमबहुल कामच आता भारतात जास्त होते.
हे तर चांगलेच आहे की. नैसर्गिक स्त्रोत किती उपलब्ध असावेत हे आपल्या हातात नसते. ह्या श्रमबहुल कामाला मी कुशल कारागीरी(skilled work) म्हणेन.जपान हा देश फारसा नैसर्गिक साधनांनी समृद्ध नाही. पण अशाच कार्य कुशलतेवर्, औद्योगिक क्षमतेवर तो पुढे गेला आहे. तसेच भारतातल्या ह्या व्यवसायाचे होत असेल तर चांगलेच आहे. (भारतात ब्रिटिश राज असताना ते कच्चा माल-कापूस् घेउन जात व processed कापड बनवीत्/विकत. तशीच त्यांनी समृद्धी मिळवली.) माझ्या (ऐकीव) माहितीप्रमाणे आख्ख्या जगभरात जेव्हढे हीर्‍यांना पैलु पाडले जातात, त्यातले ९०% काम एकट्या सूरत शहरात होते.

--मनोबा

वज्र

हिर्‍याचे एक संस्कृत नाव वज्र आहे आणि अजूनही कोंकणी प्रदेशात म्हणजे रेडी तेरेखोल पासून कासरगोड पर्यंतच्या पश्चिम किनारपट्टीत हिर्‍याला वज्रच म्हटले जाते. हिरा हा अतिशय कठिण पदार्थ आहे. यावरून एक विचार मनात येतो की इंद्राच्या वज्र या हत्यारात हिर्‍यांचा वापर केलेला असावा.‍
आपल्याकडे ऐतिहासिक कागदपत्रात आदरणीय थोर स्त्रीला 'वज्रचुडेमंडित सौ. .....बाईसाहेब' असे आदरार्थी विशेषण लावलेले आढळते.त्याचाही अर्थ 'अक्षय्य,वज्र-हत्यारासारखी कठिण, कधीही न वाढवणारी कांकणे घालणारी', पर्यायाने 'जिचे सौभाग्य अखंड राहाणार आहे अशी' असा असण्यापेक्षा 'हिर्‍यांच्या कांकणांनी मढलेली' असा असावा.

चांगली माहिती

चांगली माहिती. प्रतिसादातून चित्रा यांच्या धाग्याची आठवणही.

 
^ वर