विकिपिडियासमोरील पेच!

जगातील सर्वात मोठा ज्ञानकोश म्हणून नावलौकिक कमावलेल्या विकिपिडियाला एका मोठ्या पेचप्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. विकिपिडिया हा एक इंटरनेटवर उपलब्ध असलेला संदर्भग्रंथ आहे. इतर पारंपरिक ज्ञानकोशाप्रमाणे याची रचना त्या त्या विषयातील तज्ञ मंडळींच्या देखरेखीखाली झालेली नसून इंटरनेटवरील वाचकांचा उत्स्फूर्त सहभाग व सहकारातून उत्क्रांत होत गेलेला एक अत्याधुनिक व अभिनव असा हा एकमेव संदर्भग्रंथ आहे. यात सहभागी झालेले करोडो वाचक सुमारे २५० वेगवेगळी भाषा बोलणारे असून त्या त्या भाषासंस्कृतीची देणगी या ज्ञानकोशाला लाभली आहे. आतापर्यंत सुमारे एक कोटी नोंदी विकिपिडियात झालेले असून या सर्व नोंदी पूर्णपणे ऑन लाइन सुविधा वापरूनच विकिपिडियाच्या वाढीला हातभार लावलेले आहेत. परंतु या ज्ञानकोशाला एका विचित्र पेचप्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे. या संदर्भग्रंथाच्या नोंदीवर नियंत्रण ठेवणार्‍या नियामक समितीसमोर दोन प्रश्न 'आ' वासून उभे आहेतः

कितीही क्षुल्लक वाटणारी नोंद असली तरी या ज्ञानकोशात तिची नमूद करावी का?
किंवा
संपादकीय संस्कार करून अशा क्षुल्लक नोंदी येणार नाहीत अशी काळजी घ्यावी का?

या संदर्भात समितीमध्ये उभे दोन गट पडलेले आहेत. संपादकीय नियंत्रण असल्यास विकिपिडिया हे एक अद्यावत माहिती देणारे विश्वासार्ह संदर्भग्रंथ म्हणून वापरता योग्य राहील. परंतु दुसर्‍या गटाला संपादकीय नियंत्रणामुळे विकिपिडियाच्या मूळ उद्देशालाच तडा जाईल अशी भीती वाटत आहे. सामान्यातील अतिसामान्य कुवतीचा लेखकसुद्धा यात सहभाग घेऊ शकतो. वाचकांच्या सहभागातून रचित झालेल्या या संदर्भग्रंथात कुठल्याही विषयावर लिहिण्याची मुभा असल्यामुळे कुठल्या अंतःस्थ हेतूने लेखक लिहित आहे याचा थांगपत्ता लागत नाही. त्यामुळे ही एक माहितींची कचरापेटी होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ जपानी दंतकथेतील पोकेमॉन या काल्पनिक व्यक्तीचे जगभर करोडो चाहते आहेत. त्यामुळे पोकेमॉनचे सुमारे ५०० चरित्रकथा विकिपिडियात आहेत. लाखो वाचक नित्यनियमाने या चरित्रकथा वाचतात. निव्वळ मनोरंजनासाठीच लिहिलेल्या हॅरी पॉटर कथानकासंबंधी ३११०० नोंदी आहेत. परंतु या तुलनेने पोलंडमधील सॉलिडॅरिटी चळवळीतील क्रांतिकारकांच्यासंबंधी अगदीच तुरळक म्हणजे ८-१० नोंदी आहेत. आपल्या येथील उदाहरण द्यावयाचे ठरवल्यास रामायण-महाभारताच्या युद्ध प्रसंगातील एखाद्या क्षुल्लक सैनिकाविषयी शेकडो नोंदी व दलित चळवळीविषयी १०-१२ नोंदी असलेला ज्ञानकोश असल्यास तो सर्व समावेशक संदर्भग्रंथ म्हणून मान्यता मिळवू शकेल का?

क्षुल्लक माहितीसुद्धा हवीच असे म्हणणार्‍या गटाच्या मते विकिपिडियाने उदार धोरण स्वीकारून नोंदी करण्यास आडकाठी न घातल्यास काही काळानंतर पोकेमॉन व सॉलिडॅरिटी चळवळीतील नोंदीसंबंधातील ही असमानता आपोआपच नाहिशी होईल. विकिपिडिया हे ऑनलाइन संदर्भग्रंथ असल्यामुळे नोंदीसाठी फार काही करावे लागत नाही. एखाद्या नोंदीची कुणीही दखल घेतली नाही तरी फार बिघडत नाही. नोंदीसाठी मुद्रित पान लागत नाही. इंटरनेटवरील पानासाठी काही विशेष तरतूद करण्याची गरज नाही. 'विकिपिडिया इज नॉट पेपर' हीच तर त्याची खासियत आहे. त्यामुळे कुठलिही गोष्ट नोंद करण्यास मज्जाव नसावा. त्याचप्रमाणे भिकार टीव्ही मालिकेतील एखादी गौण भूमिका (तेही फक्त एकदाच!) वठवणार्‍याबद्दलची माहिती विकिपिडियात आली तर बिघडते कोठे? शेवटी विकिपिडियातील नोंदी 'सर्च' इंजिन्समधूनच केली जात असल्यामुळे अगदी क्षुल्लक व त्रोटक माहिती असली तरी त्यात वावगे काय आहे? त्यामुळे एखाद्याच्या जास्त नोंदी व इतरांच्या कमी नोंदी यामुळे असा काय आभाळ कोसळून पडणार आहे? पोकेमॉनच्या नोंदींची संख्या ५०० वरून २०० झाल्यास सॉलिडॅरिटीच्या नोंदीत फरक पडणार आहे का? कदाचित नाही. कारण सॉलिडॅरिटीच्या नोंदी वाढवण्यासाठी वाचकानीच प्रयत्न करायला हवे. ते काम नियंत्रकांचे नाही. एखाद्या नोंदीसाठी एकापेक्षा जास्त वाचक लाभण्याची शक्यता असल्यास जास्तीत जास्त विषयासंबंधी जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देण्यास हरकत नसावी, हे धोरण राबवावे असे या गटाचा आग्रह आहे.

परंतु याला विरोध करणार्‍या गटाच्या मते विकिपिडिया माहितीचा उकिरडा होता कामा नये. विकिपिडियाच्या यशाचे रहस्य माहितीची संदर्भसूचकता, त्याची गुणवत्ता, व नेमकेपणा यात आहे. आदर्श विकिपिडियामध्ये पोकेमॉनविषयीच्या पाच नोंदी व सॉलिडॅरिटीच्याही पाच नोदी असतील. यावरून त्याविषयीचा नेमका अंदाज येऊ शकेल. एकाविषयी भरमसाठ (व नको असलेली व नकोइतकी) माहिती व दुसर्‍याविषयी मात्र एक दोन ओळीची त्रोटक माहिती ही वाचकावर अन्याय करणारी ठरेल. माहितीच्या संदर्भात अशा प्रकारे काहीही नोंदी करण्याचे उदार धोरण स्वीकारल्यास ज्ञानकोश म्हणून आपण त्याकडे गंभीरपणे बघत नाही असा अर्थ निघू शकेल. क्षुल्लक विषयावरच्या भरमसाठ नोंदीमुळे विकिपिडियाची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकेल. त्यामुळे क्षुल्लक विषयावरच्या नोंदी शक्यतो टाळावेत असे त्याना वाटते.

परंतु कुठली माहिती किरकोळ आहे व कुठली माहिती गुणवत्तायुक्त आहे हे ठरवण्याचे निकष कोणते आहेत? व्यावहारिकरित्या हे ठरवणे फार जिकिरीचे ठरू शकेल. जॉर्ज बुशला वाहिलेल्या शिव्यांची लाखोली आणि खून करूनही उघडकीस न आलेल्या उपराष्ट्राध्यक्षांची यादी यात काही फरक करणार आहोत की नाही? 'माझ्या शरीरातून विद्युतप्रवाह वाहतो ' असे खोटा दावा करणारा सांगलीतील तरुण किंवा 'मी हस्तस्पर्ष केलेल्या वस्तूंची चव घेतल्यास साखरेसारखे गोड लागते' असा दावा करणारा गोडबाबा अशांच्याबद्दलच्या नोंदी विकिपिडियात येऊ लागल्यास विनाकारण या खोटारड्यांना प्रसिद्धी मिळेल. अशा नोंदींची पूर्वतपासणी न करता विकिपिडियात नमूद केल्यास या ज्ञानकोशाच्या विश्वासार्हतेला तडा जाईल. विकिपिडियाच्या भाषेतच बोलायचे झाल्यास 'नोंदीस योग्य' (notability) विषयांची निवड करण्यासाठी काही नियम ठरलेले आहेत. सामान्यपणे आंतरराष्ट्रीय स्तराचा वाचकवर्ग असलेल्या नियतकालिकामधील लेख/विषय हा स्थानिक वृत्तपत्रात आलेल्या लेखापेक्षा जास्त स्वीकारार्ह असेल. कुठल्यातरी लैंगिक (porno) चित्रपटात काम करणार्‍याबद्दलच्या नोंदीपेक्षा प्लेबॉय मासिकातील लेखाला अग्रक्रम दिला जाईल. परदेशातील स्थायी कार्यदूतापेक्षा (charges d'affaires) राजदूता(High Commissinor /Diplomat)संबंधीच्या लेखाला महत्व दिले जाईल.

'नोंदीस योग्य' निकषाचा फटका विकिपिडियाच्या कल्पनेचा शोध घेणार्‍या जिम्मी वेल्सलाच बसला. सुट्टीच्या काळात दक्षिण आफ्रिकेतील एका खेडेगावातील हॉटेलमधील जेवण त्याला खूप आवडल्यामुळे त्यासंबंधीची नोंद विकिपिडियात असावी असे त्याला वाटले. परंतु गूगलच्या रूपरेषेच्या नियमामध्ये ती नोंद बसत नसल्यामुळे नाकारण्यात आली. त्यामुळे हे सर्व निकष पुनः एकदा चर्चाविषय झाले. भरपूर वादावादी झाल्यानंतर व प्रसारमाध्यमांनी अमाप प्रसिद्धी दिल्यानंतर (व त्यामुळेच त्या छोट्या हॉटेलला भरपूर प्रसिद्धी मिळाली!) शेवटी विकिपिडियाला ती नोंद नाईलाजानी स्वीकारावी लागली. परंतु या सर्व गदारोळामुळे संपादकीय प्रक्रिया काय असावी याचा पुनर्विचार करावा लागला. वाचकाकडून आलेली एखादी नोंद विकिपिडियात नमूद करावयाचे की साभार परतीचा शिक्का मारून परत पाठवायचे याबद्दल नियंत्रक समितीत भरपूर चर्चा होत असते. या समितीत नित्यनियमाने नोंदी पाठवणार्‍या वाचकांपैकी १००० वाचकांना संपादक व प्रशासन कार्यासाठी निवडलेले आहे. ही समिती यासंबंधीचे निर्णय घेत असते. नको असलेल्या नोंदींची 'स्पीडी डिलेशन' व 'रेग्युलर डिलेशन' अशी वर्गवारी केले जाते. स्पीडी डिलेशनच्या नोंदी ताबडतोब पुसल्या जातात. रेग्युलर डिलेशनच्या नोंदी मात्र कुणाचीही तक्रार न आल्यास पाच दिवसानंतर पुसल्या जातात. परंतु दहशतवाद, इस्लाम धर्म,निर्वंशीकरण, बुशची राजनीती अशा प्रकारच्या वादग्रस्त विषयावरील नोंदी संपादित करणे किंवा पुसून टाकण्याऐवजी बंदिस्त (locked) म्हणून ठेवल्या जातात.

वाचकाच्या एखाद्या लेखाला डिलेशनचा शेरा मिळाल्यास वाचक याविरुद्ध तक्रार नोंदवू शकतो. त्यासाठी लेखासंबंधीची आणखी पुरावे उपलब्ध करून द्यावे लागतात. वादग्रस्त विषयासंबंधी एक विशेष समिती नेमलेली असून त्याचा निर्णय अंतिम समजला जातो. लेखासंबंधीची ही चर्चा दीर्घकाळ चालत असल्यामुळे व मूळ लेखापेक्षा ही चर्चाच जास्त संगणक-जागा व्यापत असल्यामुळे वाचक व इतर हळू हळू निरुत्साही होतात. अशा लालफितीच्या कारभारामुळे नवा वाचक नोंदी पाठवण्याच्या भानगडीत सहसा पडत नाही. एक मात्र खरे की विकिपिडियातील नोंदी संपादक व विमर्शकांच्या तीक्ष्ण नजरेखालून गेलेले असल्यामुळे, काही अपवाद वगळता, नोंदी विश्वासार्ह वाटतात. या ज्ञानकोशातील संपादकीय प्रक्रिया प्रगल्भ होत आहे. परंतु आपण पाठवलेल्या नोंदीवर कुणीतरी करडी नजर ठेवत आहे ही कल्पनाच काहीना रुचणार नाही. त्यामुळेच कदाचित विकिपिडियासाठी येणार्‍या नोंदींचा ओघ कमी होत चालला आहे. मुळात 'डिलेशन प्रूफ' नोंदी लिहिण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात. अगदी सुरुवातीला आपल्या आवडीच्या विषयावर लेख लिहून विकिपिडियाकडे पाठवण्यासाठी भरपूर उत्साह असतो. परंतु केवळ 'सर्च' वा 'कट्‌ व पेस्ट' मधून लेख तयार होत नसतात, हे लक्षात आल्यानंतर आपला उत्साहही सर्‌कन ओसरतो. काही चित्रविचित्र विषयासंबंधी कुठलीच माहिती उपलब्ध नसल्यामुळे घोडा अडून बसतो. हे येरा गबाळाचे काम नाही, हे काही असफल प्रयत्नानंतर लक्षात येऊ लागते. त्यामुळेच फार कमी वाचक या प्रकल्पामध्ये भाग घेतात. लेखासाठी फार चिकाटी लागते, हे मान्य करायलाच हवे.

म्हणूनच चितळेंची बाखरवडी, सामंत डेअरीचे दुधाचे पदार्थ, कोल्हापूरच्या मटणाचा पांढरा रस्सा, जोशी वडेवाल्यांचा वडा-पाव, बेळगावचा कुंदा, कोकणचा कोकम सरबत, विकिपिडियापर्यंत पोचू शकले नसतील. विकिपिडियासारखा एखादा ऑन लाइन मराठी ज्ञानकोश प्रकल्पच या अस्सल मराठी गोष्ठींना योग्य न्याय देवू शकेल. मुद्रित मराठी ज्ञानकोशाचीच वणवा असताना ऑन लाइन मराठी ज्ञानकोशाची कल्पना न केलेली बरी. मुद्रित व तज्ञांच्या संस्करणातून संपादित झालेल्या इतर कुठल्याही ज्ञानकोशापेक्षा विकिपिडियाची सरशी असली तरी पुढील कालखंडात विकिपिडियाचे संपादकीय प्रक्रियेतील दोषांची दखल घेऊन व सर्व प्रकारच्या विषयांची अद्यावत माहिती देणारा आणखी एखादा ऑन लाइन ज्ञानकोश वाचकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तोपर्यंत विकिपिडियासमोरील पेचप्रसंगाला नेमके उत्तर मिळालेले असेल!

Comments

केवळ इतकेच नसावे

अगदी सुरुवातीला आपल्या आवडीच्या विषयावर लेख लिहून विकिपिडियाकडे पाठवण्यासाठी भरपूर उत्साह असतो. परंतु केवळ 'सर्च' वा 'कट्‌ व पेस्ट' मधून लेख तयार होत नसतात, हे लक्षात आल्यानंतर आपला उत्साहही सर्‌कन ओसरतो. काही चित्रविचित्र विषयासंबंधी कुठलीच माहिती उपलब्ध नसल्यामुळे घोडा अडून बसतो. हे येरा गबाळाचे काम नाही, हे काही असफल प्रयत्नानंतर लक्षात येऊ लागते. त्यामुळेच फार कमी वाचक या प्रकल्पामध्ये भाग घेतात.

केवळ इतकेच नसावे. येथे खरा मुद्दा अधोरेखित झालेला नाही. विकीपिडियावर लिहिणार्‍या लेखकाला त्याचे श्रेय मिळत नाही. तो लेख त्याच्या नावाने प्रसिद्ध होत नाही. अर्थातच, त्या लेखामुळे लेखकाची प्रशंसा होत नाही. तसेच तो लेख त्याच्या मालकीचा नसतो. लेखकाने लेख टाकला की तो सुधारणारे किंवा त्यात बदल करणारे इतर सदस्यही असतात. त्या लेखाला सर्वांना मुक्त ऍक्सेस असतो. लेखकाचा अहं सुखावत नाही, हा विकीपिडीयाकडे लेखक कमी असल्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वार्थ सोडून लिहिणे कठीण असते. म्हणून उपक्रमावरील एखादा चांगला लेख विकीवर टाका असे सदस्य सुचवतात ते कौतुकास्पद आहे. त्यामुळे लेखक सुखावतो आणि विकीलाही लेख मिळतो.

मी स्वतः विकीवर अनेक लेख टाकले आहेत. सुमारे १००० पेक्षा जास्त संपादने आहेत. ते करताना मला आनंदच वाटत असे कारण एखाद्या गोष्टीची नोंद ठेवायची झाली तर टाइप करून डेस्कटॉपवर किंवा लॅपटॉपवर साठवण्यापेक्षा विकीवर लिहिलेले काय वाईट असा सरळ साधा विचार होता. आता वेळ मिळत नसल्याने ते शक्य होत नाही.

असो.

लेखांमध्ये काही बदल केले तर त्याचा ट्रेल विकीपिडीया ठेवते. लेखाची जुनी वर्जन्स पुन्हा बोलवता येतात. नानावटींच्या म्हणण्याप्रमाणे डिटेल्स देताना किती खोलवर जायचे हा प्रश्न विकिवर नाही तर इतरत्रही लोकांना पडतो. शेवटी किती खोल जायचे त्याची पातळी ठरवली जाते. तसे करणे आवश्यक असते.

कोकम सरबत इंग्रजी विकीवर नसेल पण मराठी विकीवर आढळेल की. हे घ्या. बेळगावच्या दुव्यावर कुंदाही आढळतो आणि पुण्याच्या दुव्यावर चितळ्यांच्या बाकरवडीचा उल्लेखही आहे. हे लेख भविष्यात वाढतील अशी आशा करूया.

त्रोटक माहिती

कोकम सरबत इंग्रजी विकीवर नसेल पण मराठी विकीवर आढळेल की. हे घ्या. बेळगावच्या दुव्यावर कुंदाही आढळतो आणि पुण्याच्या दुव्यावर चितळ्यांच्या बाकरवडीचा उल्लेखही आहे. हे लेख भविष्यात वाढतील अशी आशा करूया.

याबद्दलची मराठी विकिपिडियातील माहिती अगदीच त्रोटक स्वरूपात आहे. विषयाला न्याय देऊ शकत नाही. केवळ उल्लेख देवून चालणार नाही. अधिक व सविस्तर माहिती हवी.

न्याय देणे

याबद्दलची मराठी विकिपिडियातील माहिती अगदीच त्रोटक स्वरूपात आहे. विषयाला न्याय देऊ शकत नाही. केवळ उल्लेख देवून चालणार नाही. अधिक व सविस्तर माहिती हवी.

बरोबर नानावटी. आता असे करा. इथे उपक्रमावर पुढला लेख लिहिण्यापेक्षा कुंदा आणि सामंत डेअरीची माहिती विकीवर टाका. ती माहिती तुम्ही आम्हीच टाकायची आहे हो. त्यासाठी याच्यात्याच्यावर बोट दाखवता येत नाही. :-)

मलाही असेच वाटले होते

विकीपिडियावर लिहिणार्‍या लेखकाला त्याचे श्रेय मिळत नाही. तो लेख त्याच्या नावाने प्रसिद्ध होत नाही. अर्थातच, त्या लेखामुळे लेखकाची प्रशंसा होत नाही. तसेच तो लेख त्याच्या मालकीचा नसतो. लेखकाने लेख टाकला की तो सुधारणारे किंवा त्यात बदल करणारे इतर सदस्यही असतात. त्या लेखाला सर्वांना मुक्त ऍक्सेस असतो. लेखकाचा अहं सुखावत नाही, हा विकीपिडीयाकडे लेखक कमी असल्याचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
माझे काही लेख विकीपिडियवर टाकावेत अशा सूचना / आग्रह झाला होता. पण माझ्या मनात नेमके हेच विचार आल्यामुळे मी त्यावर विचार केला नाही. प्रशंसा किंवा कौतुक करवून घेण्याची मला हाव नसली तरी माझ्या कष्टाची कुठे तरी नोंद व्हावी असे वाटते तसेच त्यावर दुसर्‍या कोणीतरी आपला बोळा फिरवलेले मला आवडणार नाही.

उपाय आहे ना!

प्रशंसा किंवा कौतुक करवून घेण्याची मला हाव नसली तरी माझ्या कष्टाची कुठे तरी नोंद व्हावी असे वाटते तसेच त्यावर दुसर्‍या कोणीतरी आपला बोळा फिरवलेले मला आवडणार नाही.

उपक्रमावर लेख टाकल्यावर प्रशंसा आणि कौतुक होतेच. मग लेखाची दुसरी प्रत विकीवर चिकटवण्यात काय हरकत आहे?

काही लेखक तर एकच लेख चार संकेतस्थळांवर टाकतात. त्यांना आणखी एके ठिकाणी कॉपीपेस्ट करण्यास काय हरकत असते ते कळत नाही.

कॉपी पेस्ट्...

कॉपी पेस्ट् नाही पण स्वतःच्या माहितीला संदर्भमूल्य असण्याबद्दल् साशंक असतील तर लेख संस्थळांवर टाकला जाइल, पण विकीवर नाही.
--मनोबा

लेखन

असेच म्हणतो.

आपले एक सदस्य सर्वांना विकीवर लिहिण्याचे आमंत्रण देतात. परंतु ऑथेण्टिसिटी हा एक प्रश्न राहतो. जे संकेतस्थळ मी स्वतः संदर्भ म्हणून वापरतो त्यावर मी तरी अपुरी, चुकीची आणि वरवरची माहिती लिहू धजत नाही.
(विकीवरच्याच इंग्रजी लेखांचे भाषांतर करून लेख लिहू शकतो. पण तसे करावेसे वाटत नाही.)

नितिन थत्ते

का बरे?

संदर्भ नसणारे लेख कुठेच लिहू नयेत. उपक्रमावरही नाहीत आणि विकीवरही नाहीत. परंतु माहिती अपुरी असल्यास लेख टाकण्यात काय गैर आहे? विकीवर दुसरा कोणी माहिती पूर्ण करणारा भेटेल की.

आपले एक सदस्य सर्वांना विकीवर लिहिण्याचे आमंत्रण देतात. परंतु ऑथेण्टिसिटी हा एक प्रश्न राहतो.

त्यांचे काही चुकते असे मला वाटत नाही. दिगम्भा म्हणून येथील जुने सदस्य आहेत. त्यांचे वाक्य सदैव स्मरणात राहते (शब्दशः नाही) - जेव्हा चार चांगले लोक, चांगल्या हेतूने विकीचे कार्य करण्याचे ठरवत असतील तेव्हा चुकीची माहिती पुरवावी असा त्यांचा हेतू नसतो. तरीही, जर चुकीची माहिती जात असेल तर पाचवा चांगला माणूस येऊन ती सुधारण्याची शक्यता असते.

उद्या तुम्हाला ठाणा रेल्वे स्टेशनवर दोन प्लॅटफॉर्म आहेत अशी माहिती विकीवर दिसली आणि तुम्हाला ती चुकीची असून, तुमच्याकडे नक्की आकडा असेल आणि तरीही तुम्हाला दुरुस्त करावीशी वाटली नाही तर चूक विकीची किंवा चुकीची माहिती पुरवणार्‍याची नसेल असे मला वाटते. :-)

अपुरी माहिती चुकीची असेलच असे नाही. उदा. बेळगावचा कुंदा प्रसिद्ध आहे ही अपुरी माहिती आहे. कुंद्याविषयी आणखी चार खात्रीशीर वाक्ये जी विकीवर जाण्यास लायक* आहेत अशी तुम्हाला माहित असतील आणि तुम्ही ती घातलीत तर गैर नाही.

* कुंदा खूप गोडगोड लागतो. जास्त खाल्ला तर डायबिटीस होईल इ. वाक्ये विकीवर जाण्यास लायक नाहीत. परंतु, कुंदा ही दुधापासून बनवलेली मिठाई आहे असे टाकण्यास काय भीती असते?

कचरा व कला

काहीही येऊ द्यावं की चांगलं तेवढंच यावं? चांगलं म्हणजे नक्की काय, आणि ते कोणी कसं ठरवायचं? लोकप्रिय व अभिजात असा भेदभाव करावा का?

विकीपुढे आलेले हे प्रश्न संस्थळांपुढेही येतात. मराठी संस्थळांवर या बाबतीत वेगवेगळ्या भूमिका स्वीकारल्या गेलेल्या दिसतात. व्यवस्थापनाच्या परवानगीनेच ओळन् ओळ प्रसिद्ध व्हावी, ते काहीही लिहा, अत्यंत आक्षेपार्ह असल्यासच काढून टाकले जाईल - या दोन टोकांमधलं जे ते संस्थळ आपल्याला योग्य वाटेल ते स्वीकारतात. मला स्वतःला कोणालाही काहीही लिहू द्यावं ही भूमिका आवडते. आकाराची मर्यादा नसल्यामुळे जोपर्यंत ज्यांना जे चांगलं वाटेल ते साहित्य शोधून काढण्याची पद्धत उपलब्ध आहे तोपर्यंत कशालाच हरकत नसावी.

विकिपेडिया हे लोकांनी, लोकांसाठी, लोकांचं असल्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही आहे. ही लोकशाही टिकलेली आवडेल. अर्थात लोकशाही म्हणजे बेबंदशाही नव्हे. प्रत्येकाने काही नियम पाळलेच पाहिजेत. मालकांनाच नियम पाळण्याची आठवण करून द्यावी लागली हे दुर्दैव वाटलं.

विकीपेडिया हे हळुहळू बदलणारं माध्यम आहे. त्यामुळे आत्ता काही बाबतीत अपुरी माहिती असणं स्वाभाविकच आहे. उत्तरोत्तर ते विकसित होत जावो ही शुभेच्छा.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

दुर्दैव नाही

मालकांनाच नियम पाळण्याची आठवण करून द्यावी लागली हे दुर्दैव वाटलं.

To err is human हे खरे आहे यावर विश्वास असेल तर विकीचे मालक किंवा इतर कोणतेही मालक चुकले तर त्यात दुर्दैव नाही पण त्यांची चूक दाखवून देणारे कोणी आहे आणि ते दाखवून देणार्‍याला महत्त्व दिलेले आहे ही बाब मला महत्त्वाची वाटते. अन्यथा, मालकांच्या विरोधात बोलणे निषिद्ध असल्याची उदाहरणेही दिसतातच की.

विकीपेडिया हे हळुहळू बदलणारं माध्यम आहे. त्यामुळे आत्ता काही बाबतीत अपुरी माहिती असणं स्वाभाविकच आहे. उत्तरोत्तर ते विकसित होत जावो ही शुभेच्छा.

+१.

नवीन माहिती

विकिपिडियावर बोंबील ला बोली भाषेत काड्या म्हणतात ही माहीती मजेशीर वाटली. यात जाणकार माहिती अधिक माहिती ओतू शकतात.
विकीचा प्राथमिक माहिती म्हणून तरी नक्कीच उपयोग होतो. आमच्या बेल्हे गावची माहिती पण विकिवर मिळाली याचही आश्चर्य वाटल.
प्रकाश घाटपांडे

काड्या

विकिपिडियावर बोंबील ला बोली भाषेत काड्या म्हणतात ही माहीती मजेशीर वाटली. यात जाणकार माहिती अधिक माहिती ओतू शकतात.

सुक्या बोंबीलांना काड्या असे म्हणतात ही विकीवरील माहिती योग्य आहे. ज्यांना बोंबील खाण्यातला आनंद कळत नाही त्यांना ती मजेशीर वाटणे शक्य आहे. किंबहुना, बोंबीलांबद्दल लिहिलेली माहिती विकीपिडीयाला साजेशी आहे. एखाद्याला बोंबील पाहून ओकारी आल्यासारखे वाटते ही माहिती विकीवर जाण्यास साजेशी नाही. तशा ओकार्‍या काढण्यासाठी आहेच उपक्रम. ;-)

सहमत..निषेध

तशा ओकार्‍या काढण्यासाठी आहेच उपक्रम. ;-)

सहमत.

उपक्रमावर ओकार्‍या काढण्याचे खास विषय.
१. ब्राह्मण २. स्वामी विवेकानंद ३. शंकराचार्य (दोन्ही, आद्य आणि वैदिक गणितवाले) ४. संस्कृत प्रचारक ५. दारूबंदी प्रचारक ६. पेशवे (नाना फडणीसासह) ७. लोकमान्य टिळक ८. श्रद्धाळू आणि धार्मिक हिंदू खासकरून क्र. १, ९. ज्योतिषी आणि ज्योतिष

थोडक्यात, कुठलेही "ब्राह्मणी" गोष्ट.

असे असताना फक्त बोंबलांवरून ओकार्‍या काढणार्‍या घाटपांड्यांचा निषेध

शंका

विवेकानंद कायस्थ होते ना?
आदि शंकराचार्यांविरुद्ध फारशी माहिती नाही परंतु वैदिक गणितवाले शंकराचार्य, शिल्पा दातार यांची लेखनशैली, बालविवाह, श्रद्धाळू, ज्योतिषी आणि ज्योतिष टीका/टवाळ्‌यार्ह नाहीत? खासकरून हिंदू/ब्राह्मणांची टवाळी करण्यात येत असल्याचा आरोप अमान्य आहे.

ब्राह्मण

रिटेशी +१.

स्वतःला ब्राह्मण समजून जातीपातीचे राजकारण चालवणार्‍यांचीही कीव येते.

ज्यांना ओकार्‍या काढायच्या आहेत त्यांनी वेगळा धागा सुरू करून ओकार्‍या काढाव्या असे वाटते. चांगली चर्चा होईल. बरेच मुद्दे दिसतात.

क्याटेगरी

>>विवेकानंद कायस्थ होते ना?

पण ते क्याटेगरी ८ मध्ये बसतात ना?

नितिन थत्ते

जमखंडी

आमच्या बेल्हे गावची माहिती पण विकिवर मिळाली
आमच्या जमखंडीचे नाव मिळाले, पण गावची माहिती विकिवर मराठीत मिळाली नाही. आता मलाच काही तरी लिहावे लागेल.

काडी

बोंबील ला बोली भाषेत काड्या म्हणतात ही माहीती मजेशीर वाटली. यात जाणकार माहिती अधिक माहिती ओतू शकतात.

अत्यंत कृश माणसाला 'काडी पैलवान' म्हणण्याची पद्धत आहे. बोंबलामध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे सुकवल्यानंतर तो असाच (म्हणजे कृश प्रकृतीचा) दिसतो, हे कदाचित यामागचं कारण असू शकेल. अत्यंत कृश माणसाला 'सुका बोंबील' म्हटल्याचंही कोंकणात ऐकलं आहे. अर्थात कारण कोणतं आणि परिणाम कोणता हे उलटही असू शकेलः म्हणजे सुक्या बोंबलाच्या काटक्यांसारख्या दिसण्यावरून त्याला (काड्यांसारखा म्हणून) असा शब्द पडला असेल आणि मग कृश माणसाला उद्देशूनही तो शब्द वापरला जाऊ लागला असेल.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

सोपा उपाय आहे ..

सोपा उपाय आहे ..

Open Wiki....
.
Edited Wiki....

असे २ (किवा अनेक) प्रकार करावेत आणि पुढील पायरीवर जाण्यासाठी प्रोत्साहन द्यावे

नेमका कोण

रामायण-महाभारताच्या युद्ध प्रसंगातील एखाद्या क्षुल्लक सैनिकाविषयी
नेमका कोण ?

 
^ वर