ऑस्ट्रेलियात शेती

दलजीतचं लग्न झालं आणि ती भारतातून ऑस्ट्रेलियात आली. नवर्‍याबरोबर समाधानाने संसार चालला होता. नवर्‍याला शेतीची आवड असल्याने अनेक वर्षे शहरात नोकरी केली आणि पैसे जमवले. ऑस्ट्रेलियात संत्री आणि द्राक्षांची शेती घेतली. काही काळ स्थिर होण्यात गेला. दलजीतचा सारा वेळ मुलांचे संगोपन आणि घरकाम यातच जात असे. तीन मुले पदरी असतांना चाळिसाव्या वर्षी अचानकपणे नवरा गेला!

नवर्‍याच्या आधाराने दलजीतचे आयुष्य चाललेलं असल्याने इंग्रजीचा संबंध जेमतेमच आला होता. इंग्रजीची माहिती नाही. पदरात तीन मुले आणि अंगावर आलेली शेती. नवर्‍याच्या बोलण्यातून झालेली अतिशय जुजबी शेतीची माहीती दलजीतला होती. ऑस्ट्रेलियात शेतीसाठी मजूर मिळण्याची शक्यता जवळपास नाहीच. पण दलजीत ने धीर सोडला नाही.

इतर कोणताही उत्पन्नाचा पर्याय नसल्याने शेतीची सुरुवात केली. ट्रॅक्टर चालवण्या पासून ते फवारणी करण्यापर्यंत सारी कामे तीने शिकून घेतली. वेळप्रसंगी मोडलेले ट्रॅक्टर घरच्याघरी दुरुस्तीही करण्याची तयारी ठेवली. दिवस बदलत गेले. कधी भरभराट तर कधी दुष्काळ यांना तोंड देत मोठ्या धीराने दलजीतने आयुष्य सावरून धरले.
तीची मुले आज मोठी झाली आहेत. एक मुलगी फार्मासीस्ट आहे. मुलगा आता युनि च्या शेवटच्या वर्षाला आहे. आणि लहान मुलगी दहावीला गेली आहे.

या असामान्य महिलेची दखल नुकतीच ऑस्ट्रेलियाच्या एबीसी रेडियोने घेतली. ३६० डॉक्युमेंटरी मालिके अंतर्गत तीच्या या आयुष्याचा मागोवा घेणारा रेझिलियन्स नावाचा एक कार्यक्रम प्रसारित झाला. एबीसी रेडियोच्या दुव्यावर ही छोटीशी डॉक्युमेंटरी तुम्हाला ऐकता येईल. ही डॉक्युमेंटरी डाऊनलोड करून नंतर ऐकता येईल अशी सुविधाही तेथे आहे.

* ऑस्ट्रेलियामध्ये कुणालाही शेती घेता येते, नागरिकत्वाची अट येथे नाही.

*या कार्यक्रमा नंतर लगेचच वॉटर्स ऑफ लाईफ नावाचा एक सुरेख छोटासा कार्यक्रमही ऐकण्याजोगा आहे.

Comments

सलाम

सलाम त्या रेसिलिअन्स् ला.

अभिनंदन आणि सलाम!

चांगली, प्रेरणादायी माहिती.
दलजीत कौर यांचे अभिनंदन आणि सलाम!
(पतीनिधनानंतरही कौर लावण्यास हरकत नसावी असा माझा समज आहे)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कौर

(पतीनिधनानंतरही कौर लावण्यास हरकत नसावी असा माझा समज आहे) कल्पना नाही. पण कार्यक्रमात मात्र उल्लेख दलजीत असाच आला आहे. काही ऑस्ट्रेलियन त्यांना डेल्ही असेही संबोधत आहेत असे ऐकू येते.
-निनाद

कौर आणि सिंग

This comment has been moved here.

छान

दलजीतचे अभिनंदन.

नावांच्या चर्चेने धाग्यावर अतिक्रमण केले असले तरी चर्चा मजेदार आहे.

कणखर दलजीत

रेडियो-ध्वनिफीत ऐकली.

दलजीत यांच्या कणखरपणाबाबत आदर वाटतो.

आदर वाटला.

दुर्दैवी परिस्थितीतही मोडून न पडता परिस्थितीला धैर्याने तोंड दिल्यामुळे दलजीत यांच्याबद्दल आदर वाटतो.

सरदारांच्या बायका

मी अद्याप कार्यक्रम ऐकलेला नाही पण कल्पना करू शकते. दलजीत यांचे कौतुक वाटते. याचबरोबर मी अमेरिकेत असे पाहिले आहे की सरदारांच्या बायका वेळ पडेल तेव्हा कसलीही कामे करायला तयार असतात. लोकांकडे पोळ्या करणे, मुले सांभाळणे, इतरांची घरे साफ करून देणे, सब-वेमध्ये सँडविच बनवून देणे, ढाब्यावर मदत करणे इ. कामे करताना मी सरदार* बायकांना पाहिले आहे. (अर्थात एखादा म्हणेल की त्यांचे नवरेही ट्रक ड्रायव्हर वगैरेची कामे करत असल्याने तसे असेल, तसेच त्या कोणत्या विसावर कामे करतात ते तपासले जात नसावे.) असो.

अंगावर पडलेले कुठलेही काम करायची तयारी असेल तर मार्गही मिळत असावा असे वाटते.

* इतर भारतीय समाजांमध्ये मी सहसा असे होताना पाहिलेले नाही. (हा माझा व्यक्तिगत अनुभव झाला) काही बायका आपल्या घरांतून डबे वगैरे पुरवतात आणि काही आय-ब्रॉव इ. करून देताना पाहिले आहे.

उल्लेख

या कार्यक्रमात मला काही गोष्टींचे नवल वाटले. उदा. दलजीत यांची मुलगी तीच्या आईचा उल्लेख 'ती' असा करते. माझी आई असा नाही. हा कसला परिणाम असावा असा प्रश्न मला पडला.
कदाचित परिस्थितीच्या रेट्यामध्ये मुलांची जवळीक साधणे काहीसे कमी पडले असेल का?
कदाचित इतर सर्व तीचा उल्लेख 'ती' म्हणून करतात म्हणून कार्यक्रमापुरते मुलीने तसे संबोधले असेल का?

प्रियाली यांचे निरिक्षण मलाही जवळचे वाटते. मीही सर्वसाधारणपणे शिख संप्रदायात कोणतेही काम करण्याला कमी किंवा जास्त मानलेले पाहिले नाहीये. हा गुण विशेष सर्वांनीच घ्यावा असा आहे.
महाराष्ट्र मंडळात मात्र 'काय काम करता?' या प्रश्नानंतर अपेक्षित उत्तर न आल्याने लोकं संभाषण सोडून निघून गेल्याचे अनेकदा अनुभवले आहे. :)

-निनाद

एक शक्यता

दलजीत यांची मुलगी तीच्या आईचा उल्लेख 'ती' असा करते. माझी आई असा नाही. हा कसला परिणाम असावा असा प्रश्न मला पडला.

कार्यक्रम संपादित असावा. संपादनातली गडबड असं म्हणणार नाही, पण परिच्छेदातली काहीच वाक्य उचलली असल्यास पहा:
"वडील गेल्यावर माझ्या आईने परिस्थितीला धीराने तोंड देण्याचे ठरवले. तेव्हा तिला इंग्लिशही नीट येत नव्हते. ती बोलायची आणि अडायचं, चुकायचं तिथे तिला मी मदत करायचे. ..."
यातली फक्त अधोरेखित वाक्यच कार्यक्रमात प्रसारित झालेली असण्याची शक्यता आहे.

कदाचित परिस्थितीच्या रेट्यामध्ये मुलांची जवळीक साधणे काहीसे कमी पडले असेल का?

साधारणतः उपस्थित असलेल्या व्यक्तीचा उल्लेख व्यक्तीच्या नावाने (किंवा आई, मामा, आजी असा) न करता तो, ती अशा सर्वनामांनी करणं, इंग्रजी*त अपमानास्पद समजलं जातं. मुलीच्या मुलाखतीच्या वेळेस दलजित समोर नसतील तरीही मुलीने आईचा एकदा उल्लेख करून नंतर तिच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली असेल.

*मुद्दाम इंग्रजी म्हटलं आहे, ऑस्ट्रेलियनमधे काय नियम आहेत हे मला माहित नाही. त्यांचे काही उच्चार समजायला मला थोडा त्रास झाला. अमेरिकन उच्चार समजले तरी अनेकदा अर्थबोध होत नाही.

अवांतराबाबतः वाण नाही लागला म्हणजे मिळवलं.
अलिकडच्याच काळात अमेरिकेत आलेला अनुभव. एका दारूच्या दुकानात काऊंटरवर एक पंजाबी स्त्री पाहून मला खूपच आनंदयुक्त आश्चर्य वाटलं. माझ्या बरोबर असणार्‍या मित्राचा भारतीय चेहेरा पाहून तुम्ही कोण, कुठचे अशी काउंटरपलिकडून चौकशी झाली. "अपने लोग समझ आतें ही है।" वगैरे संभाषण माझ्या कानावरून गेलं. पण मला ऐकू येणार नाही अशा आवाजात, "आप के साथ जो लडकी है वो तो अपनी नहीं लगती!" हे वाक्य दुकानातून बाहेर पडल्यावर मित्राने सांगितलं तेव्हा मी पुन्हा जमिनीवर आले.

सलाम

दलजितच्या कर्तृत्वाला सलाम.

*दलजितच्या कर्तृत्वाखेरीज या धाग्यावरची प्रचंड अवांतर चर्चा इतरत्र हलवता येईल का?*

नितिन थत्ते

नवीन धाग्याची गरज

This comment has been moved here.

 
^ वर