दु:खाचा बाजार

"न्यूयॉर्कमधील काही गोष्टी मला फार आवडल्या.' अमेरिकेला जाऊन आलेला माझा एक मित्र सांगत होता. "सेंट्रल पार्क मला फार आवडला. टाईम्स स्क्वेअरपण. पण काही गोष्टी अजिबात आवडल्या नाहीत. उदाहरणच द्यायचे तर ग्राउंड झीरोजवळ असलेले ९/११ वरील हल्ल्यासंबंधीचे प्रदर्शन. एक तर हे ९/११ असे म्हणणे मला आवडत नाही. पण असल्या नवनवीन कॅची टर्म्स बनवण्याची या लोकांना फार वाईट खोड आहे. पण ते असो. आणि हे प्रदर्शन. या अतिरेकी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या वस्तू, अर्धवट जळलेले कपडे, कुठे अर्धा फाटलेला राष्ट्रध्वज, कुठे एखादा जळका फोटो.... असलं काहीकाही हिडीस या प्रदर्शनात मांडून ठेवलेलं आहे. या अमेरिकन लोकांना ना, प्रत्येक गोष्टीचे प्रदर्शन करायची फर हौस. जिवंत असताना प्रदर्शन, मेल्यानंतर प्रदर्शन. आणि ती सुवेनिअर्स. तुमचे पुलं म्हणतात ना, कुठे जायचं ते जावं, काय बघायचं ते बघावं, खावं प्यावं आणि परत यावं. खरेदी कशाला? तशीच ही सुवेनिअर्स. सालं प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण. सुबत्तेचा बाजार, दु:खाचाही बाजार.."
या मित्राचे सगळेच म्हणणे मी मनावर घेत नाही. त्याची मते अशीच अतिरेकी असतात. पण त्यानंतरहे वाचण्यात आले.
'पॉवर्टी पोर्न' ही संज्ञा अस्तित्वात आहे की नाही कल्पना नाही, पण आपल्या दु:खांचे, वेदनांचे असले बाजारीकरण करण्यासाठी ती अस्तित्वात असावी असे वाटू लागले. अमेरिकेमधील प्रदर्शनाचे माझ्या मित्राने सांगितलेले हे एक उदाहरण झाले, पण इतरत्रही अशीच उदाहरणे सापडतात. अंदमानमधील काही भागांत आधुनिक जगाशी काहीही संबंध नसलेले अत्यंत मागासलेले, नागडे उघडे राहणारे काही आदिवासी आहेत. अंदमानला जाणारे प्रवासी गाडीच्या काचांना नाके लावून मोठ्या चवीचवीने या आदिवासींची ही दैन्यावस्था 'एन्जॉय' करतात असे वाचले. कदाचित अधूनमधून हातातल्या चीज सँडविचचा तुकडाही तोडत असतील. प्रगत देशांतील काही प्रवाशांना धारावीचे असलेले आकर्षण तर प्रसिद्धच आहे. 'सलाम बॉम्बे' पासून 'स्लमडॉग मिलेनिअर' पर्यंत विविध चित्रपटांवर घेतलेले या संदर्भातले आक्षेपही सर्वश्रुत आहेत. दारिद्र्य, दु:ख, वेदना, मृत्यू यांचे असे बाजारी प्रदर्शन करावे असे लोकांना का वाटत असावे? अशा दुर्दैवी घटनांमध्ये आपले आप्त गमावण्याची वेळ आलेल्यंना अशी प्रदर्शने बघतांना काय वाटत असेल? बाजारीकरण सगळीकडेच आहे असे मान्य केले तरी माणसाचा मृत्यूदेखील विकायला काढणे हे कसाबीकरण जे करतात त्यांना, आणि जे बघतात त्यांना कोणता आनंद (पैशाचा सोडून) देत असेल?

Comments

अवांतर

लिंक हाफिसात उघडत नाहिये. तेव्हा मुळ विषयावर नंतर वाचुन लिहिने.
मात्र आम्रिकेच्या बाजारीकरणावरून 'आमच्या' पुलंचे एक अवतरण आठवले (जावे त्यांच्या देशामधून आठवणीतून देत आहे. चुभुद्याघ्या)
"या देशात सारे काहि विक्रिस ठेवले आहे. बाल्य विका, कौमार्य विका, तारुण्य विका.. विकण्यासारखे उरत नाहि ते फक्त वार्धक्य. ज्या देशाचा विक्री हा मुलमंत्र आहे तिथे वार्धक्याचे निर्माल्य होत नाहि कचरा होतो."

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

हे केवळ अमेरिकेत नाही.

दुसर्‍या महायुद्धाच्या कित्येक् "साइट्स्" आज युरोपात् (विशेषतः मध्य युरोपात) जतन् करुन ठेवल्यात्. पूर्व जर्मनी, पोलंडा, काही बाल्कन् देश इथे त्या आहेत.(संझगिरिंचे त्यावरचे लेख वाचलेत.)
राहता राहिला मुद्दा अंदमान मधील "जरावा" ह्या आदिवासींचा. त्यांची "दैन्यावस्था" शब्दाला आक्षेप. आपण बाहेरच्या जगाच्या चष्म्यातुन दैन्यावस्था म्हणतो. त्या लोकांना तसेच राहणे ठिक वाटत असेल तर इतरांनी नक्की काय करणे अपेक्षित आहे? त्यांना आधुनिक जीवनशैलीच्या आणि समाज रचनेच्या संधी उपलब्ध करुन देणे इतकेच व्यवस्था करु शकते. बळजबरी नाही. तुम्ही "दैन्यावस्था" म्हणत असलेल्या लोकांचे सरासरी आयुर्मान कुठल्याही आधुनिक वैद्यकाचा आधार न घेता ५६ वर्षे, म्हणजे चांगले भरपूर आहे! त्यांनी कुठल्याही वैज्ञानिक उपकरणांशिवाय निव्वळ निसर्गातील घडामोडींचे संकेत समजुन घेउन अफाट, अजस्त्र अशा २००४ च्या त्सुनामीचा धोका वेळीच ओळखुन स्वतःचे रक्षण केले. "नागर/विकसित" संस्कृतीमधील लाखो लोक ज्यात बळी पडले, त्यात "दैन्यावस्थेतील" जरावा सहज तरुन गेले.

काचेला नाक लावुन बघण्याबद्दलः- तसे न केल्यास पर्यटकांच्या जीविताला धोका असू शकतो. आता काचेतुन बघताना कुणी "चवीचवीने" बघत असेल तर त्याला काय् करणार? ह्यावर् एक् उपाय् म्हणजे पर्यटनाला बंदी घालणे. पण तशाने सरकारी महसूल बुडेल, हा महसूल जरावांच्या विकासासाठीही वापरला जाणे अपेक्षित आहे. तो बुडुन उपयोगाचा नाही.

बाकी असा बाजार संवेदनशील मनास बघवला जात नाही हे खरेच.

--मनोबा

बाजार

१. "अमेरिकेला जाऊन आलेला माझा एक मित्र सांगत होता."

~ म्हणजे तुमचा हा मित्र या भारतमातेचा पुत्र आहे हे सिद्ध होते.

२. "तुमचे पुलं म्हणतात ना,"
~ असे तो म्हणतो म्हणजे मनाने /विचाराने तो पक्का अमेरिकन झाला. उद्या त्याच्याकडून "आमचे हेमिंग्वे म्हणतात ना...' असे ऐकायची तयारी ठेवली पाहिजे.

[दु:खाचा बाजार असलाच तर तो खर्‍या अर्थाने हाच]

३. "अंदमानला जाणारे प्रवासी गाडीच्या काचांना नाके लावून मोठ्या चवीचवीने या आदिवासींची ही दैन्यावस्था 'एन्जॉय' करतात असे वाचले."

~ मी दोन वेळेला अंदमानला गेलो आहे. आमच्यापैकी कुणीही गाडीच्या काचांना नाके लावलेली दिसत नव्हते. आणि अंदमानला जाणारे 'आदिवासी' पाहायला जातात हे अगोदर डोक्यातून काढून टाकणे गरजेचे आहे. त्यातही ज्या साईटसींग सफरी झाल्या तेवढ्या वेळेमधून मुळात [श्री.राव म्हणतात तसले "अत्यंत मागासलेले, नागडे उघडे राहणारे"] आदिवासी दिसत नव्हते मग त्यांची ती सो-कॉल्ड दैन्यावस्था 'एन्जॉय' करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही. निकोबारला तर प्रवासी जातही नसतील. आम्हालाही परवानगी मिळाली नाही.

अंदमान तर राहूच दे, पण निकोबार बेटावरही शिक्षणाचे वारे पसरत चालले असून तेथील 'शोमपेन' जमातीतील युवक शिक्षक आणि वर्ग-३ गटातील नोकरीत [अंदमान इथे] नोकरी करताना आढळतात. एकतर अंदमानच्या पोस्टातच भेटला.

बाकी ९/११ च्या अमेरिकन मानसिकतेबाबत आम्हा भारतीयांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तो अमेरिकन जीवनशैलीचा एक भाग आहे. त्यांच्या दृष्टीने तसले प्रदर्शन म्हणजे 'वेदना, मृत्यु' यांचा बाजार होत नाही.

का?

२. "तुमचे पुलं म्हणतात ना,"
~ असे तो म्हणतो म्हणजे मनाने /विचाराने तो पक्का अमेरिकन झाला. उद्या त्याच्याकडून "आमचे हेमिंग्वे म्हणतात ना...' असे ऐकायची तयारी ठेवली पाहिजे.

"तुमचे" हे इतर अर्थी देखील येऊ शकते...नाही का?

बाकी ९/११ च्या अमेरिकन मानसिकतेबाबत आम्हा भारतीयांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. तो अमेरिकन जीवनशैलीचा एक भाग आहे. त्यांच्या दृष्टीने तसले प्रदर्शन म्हणजे 'वेदना, मृत्यु' यांचा बाजार होत नाही.

त्यांच्या जीवनशैली बद्दल बोलायला नैतिक अधिकाराची गरज कशाला हवी?

नैतिक अधिकार

"तुमचे" हे इतर अर्थी देखील येऊ शकते...नाही का?"

~ उदाहरणार्थ ?

त्यांच्या जीवनशैली बद्दल बोलायला नैतिक अधिकाराची गरज कशाला हवी?

~ कारण दिल्लीत इंदिरा गांधी म्युझियम पाहणार्‍या पर्यटकांसाठी आम्हीही 'इंदिरा गांधींची हत्या या वॉक-वे वर झाली होती' असे सांगताना आता क्रिस्टल ग्लासखाली झाकलेले त्यांच्या रक्ताचे डाग दाखवत आहोतच ना ? तसा एक मोठा फलकही हिंदी इंग्रजी भाषेत तिथे रोवला गेला आहे.
त्या दृष्टीकोनातून तो नैतिक अधिकाराचा मुद्दा. इतकेच.

ठीक

"तुमचे" हे इतर अर्थी देखील येऊ शकते...नाही का?"

~ उदाहरणार्थ ?

पुलं विषय तुमचं-आमचं - वपू-वी-पुलं किंवा जयवंत दळवी-वी-पुलं (वाचकांच्या चष्म्यातून) ह्याअर्थी देखील असू शकते, तसेच 'तुमचे ते' सवर्णांचे आणि पांढरपेशांचे लेखक वगैरेही कानी पडतेच कधी तरी.

कारण दिल्लीत इंदिरा गांधी म्युझियम पाहणार्‍या पर्यटकांसाठी आम्हीही 'इंदिरा गांधींची हत्या या वॉक-वे वर झाली होती' असे सांगताना आता क्रिस्टल ग्लासखाली झाकलेले त्यांच्या रक्ताचे डाग दाखवत आहोतच ना ? तसा एक मोठा फलकही हिंदी इंग्रजी भाषेत तिथे रोवला गेला आहे.
त्या दृष्टीकोनातून तो नैतिक अधिकाराचा मुद्दा. इतकेच.

ठीक, पण संजोप राव ह्यांचा आक्षेप एकूणच प्रदर्शनाला आहे, त्यामुळे त्यांना तसा अधिकार असावा.

भावना

"पुलं विषय तुमचं-आमचं - वपू-वी-पुलं किंवा जयवंत दळवी-वी-पुलं (वाचकांच्या चष्म्यातून)"

~ उत्तम. असं असेल तर मग माझ्या त्या मूळ विधानामागील भाष्य चुकीचे मानले जावे. पण श्री.राव यांच्या न्यू यॉर्क रीटर्न मित्रांनेही त्याच अर्थाने ते वापरले होते की अन्य, यावर खुद्द धागाकर्तेच मत मांडतील अशी आशा आहे.

[तरीही 'पु.ल.देशपांडे' सारख्या व्यक्तिमत्वाबाबत कुणी 'तुमचे-आमचे' म्हणत असेल ही भावना पचनी पडत नाही, हेही इथे सांगणे भाग आहे.]

"संजोप राव ह्यांचा आक्षेप एकूणच प्रदर्शनाला आहे, त्यामुळे त्यांना तसा अधिकार असावा."

~ नक्कीच.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की भाऊ (प्रदर्शन भरविण्याचे) :)

दारिद्र्य, दु:ख, वेदना, मृत्यू यांचे असे बाजारी प्रदर्शन करावे असे लोकांना का वाटत असावे?

२ कारणे असू शकतात, १. अप्राप्य गोष्टींचे कुतूहल असणे, त्यासाठी धारावी, आफ्रिकन देशातील गरीब जनता किंवा तत्सम ओंगळवाणे दृश्य बघणे/दाखवणे होत असावे. २. कदाचित एक इतिहास म्हणून त्या घटनेतील गोष्टींचे प्रदर्शन असणे गैर नाही, आज पानिपतचे अवशेष शिल्लक असते तर तो इतिहास म्हणून आपणच उराशी कवटाळला असता नाही?

अशा दुर्दैवी घटनांमध्ये आपले आप्त गमावण्याची वेळ आलेल्यंना अशी प्रदर्शने बघतांना काय वाटत असेल?

दुख: होणे साहजिक आहे पण त्यांना प्रदर्शन बघण्याचा आग्रह नाही, पण तसेही पाहता ग्रेव्ह यार्ड देखील एक प्रकारचे प्रदर्शनच नाही का?

बाजारीकरण सगळीकडेच आहे असे मान्य केले तरी माणसाचा मृत्यूदेखील विकायला काढणे हे कसाबीकरण जे करतात त्यांना, आणि जे बघतात त्यांना कोणता आनंद (पैशाचा सोडून) देत असेल?

हिरोशिमा/नागासाकी मध्ये देखील असेच प्रदर्शन आहे असे वाचले आहे, काही अंशी ते बाजारीकरण आहे खरे पण अम्रिकेत ते अपरिहार्यच आहे, आणि हो आनंद शोधला की सापडतो ह्या तत्वाला ही मंडळी जगत असतील.आणि अभिव्यक्तीच्या नावाखाली भरविल्या गेलेल्या बाजारातून काय सुख मिळते हे इथे काय नवीन सांगणे ;)

We always long for the forbidden things, and desire what is denied us.-Francois Rabelais

साधु

अतिशय संतुलित चर्चाप्रस्ताव.

तुम्ही तुमच्या मित्राचे म्हणणे फारसे मनावर घेत नाही ते योग्यच आहे. नाहीतर 'ऐ मेरे वतन के लोगो' गाणे म्हणण्यावरून झालेली लता-आशा काँट्रोवर्सीही फार मनावर घ्यावी लागली असती.परवाच टीव्हीवर झालेल्या एका मुलाखतीत कोणी माजी लष्करी अधिकारी भारतात 'वॉर मेमोरियल' नाही असे खेदाने सांगत होता.जर्मनीत झालेल्या होलोकॉस्टबद्दल तर बोलायलाच नको.

पण तुमचे म्हणणे मात्र मनावर घेण्याजोगे आहे.
काही लोकांना दु:ख कुरवाळत बसायला आवडत असावे. कधीतरी तीस-चाळीस वर्षांपूर्वी शाळेत झालेला प्रेमभंग कुरवाळत '... नंगे पांव आना याद है' वगैरे दर्दभर्‍या गझला ऐकत स्कॉचपान करायला मजा येत असावी.काही लोकांना आपण 'दरिद्री' नाही हे स्वतःला समजावण्यासाठी दुसर्‍याची फाटकी चप्पल पहात रहाण्याची गरज पडत असावी.काही लोकांना गुवात डुंबणारे मनुष्यप्राणी बघायला मज्जा वाटत असावी- जसे काही लोकांना भयंकर रक्तपात असलेले अथवा ओंगळवाण्या पिशाच्चकथा असलेले चित्रपट आवडतात.काही लोकांना 'आदिवासी पर्यटन' म्हणजे माणसासारख्याच दिसणार्‍या एका जंगली जनावराचे चित्तथरारक दर्शन घ्यायला आवडत असावे. आणि माणसाची गरज आहे म्हटल्यावर दर्दभर्‍या गझला,स्कॉच,धारावीदर्शन,ईव्हील डेड, अंदमान आदिवासी पर्यटन म्हणजे तुमच्या भाषेत 'दु:खाचा बाजार' होणार.
या दिशेने बाकीचे विचार.

हा फोटो

From August 23, 2011

जालावरील हा फोटो मी फेसबुकमध्ये अपलोड केला आहे. पण यामागे दु:खाचा मी बाजार मांडते आहे अशी भावना मला कधीच वाटली नाही. अतिशय हेलावून टाकणारा अशी एक करुण कविता मला या फोटोमध्ये दिसते. आणि ती कविता/ ती भावना इतर लोकांबरोबर वाटून घेण्यात काहीही विकृत असे वाटत नाही.
- ते अनवाणी मूल त्या डांबराच्या , चिखलाच्या रस्त्यावरून, स्वतःच्या मापापेक्षा मोठा शर्ट घलून दुडूदुडू धवत आहे. हातात मारे आपल्या देशाचा झेंडा. काय भवितव्य असेल त्या चिमुरड्याचे, काय अनुभव येतील त्याला आयुष्यात?

मला खरच रडू आले तो फोटो पाहून त्या दिवशी. आता त्या भावनेतून मी पुढे काय मदत करेन वगैरे भाग वेगळा. (तो महत्वाचा आहेच)
________

पण् आता मूळ मुद्द्याकडे - सन्जोप राव दु:ख दुसर्‍यापाशी व्यक्त न करणे, त्याचे प्रकटीकरण न करणे ही पुरुषांना दिली जाणारी टिपीकल शिकवण मला आपल्या या लेखात जाणवते.
दु:ख हा जीवनाचा भाग नाही आहे का? मग त्याच्याकडे पाठ का फिरवायची? त्याचे अस्तित्व असूनही नसल्यासारखे का मानायचे?
______
पुरुषांना नेहमीच ही शिकवण दिली जाते - रडायचे नाही, भावनांचे प्रदर्शन फार मांडायचे नाही, दु:खाचे तर नाहीच नाही. पण ते चूकीचे आहे असे मला वाटते.

संवेदना

सुख, दु:ख, भीती, आश्चर्य, प्रीती, अनुकंपा आदि अनेक संवेदना आपल्या मनात असतात. त्या उत्तेजित होणे आपल्याला आवडते. हो भीती आणि दु:खसुद्धा! तसे नसेल तर 'भुताटकीचे ' आणि 'टीअर जर्कर' सिनेमे आणि मालिका इतक्या यशस्वी झाल्याच नसत्या. या सगळ्यांमध्ये भीती आणि दु:खाचा बाजारच असतो असे आपण म्हणू शकतो. पण जर बहुसंख्य लोक त्या भावना जागृत करून घेण्यासाठी किंमत मोलायला तयार असतील आणि कोणा व्यापार्‍याने पैसे घेऊन त्याची व्यवस्था कोणी केली तर इतरांनी त्याला नाक मुरडण्याचे कारण काय आहे?

याच तर्काचा आधार घेऊन वेश्याव्यवसायाचा पुरस्कारसुद्धा करता येईल असा आक्षेप घेतला जाईल आणि काही प्रमाणात तसे होत असणे शक्य आहे. मनातील भावना किंवा विकारांचा असा बाजार मांडल्यामुळे समाजाचा तोटा किंवा र्‍हास होईल असे वाटल्यास त्या व्यवसायावर समाजाकडून किंवा सरकारकडून बंधन घातले जाते.

अमेरिकेतील ९/११ किंवा दिल्लीमधील ३ मूर्ती बद्दल असे काही होईल असे वाटत नाही.

९/११

एक तर हे ९/११ असे म्हणणे मला आवडत नाही.

अत्यल्प शब्दांमध्ये ह्या जागतिक आणि सार्वकालीन घटनेचा उल्लेख करण्याची अन्य काही संज्ञा मला तरी दिसत नाही.

आता ९/११ का? भारतात आपण जी तारीख ११/०९/२००१ अशी लिहितो ती अमेरिकेत ०९/११/२००१ ह्याच पद्धतीने लिहितात म्हणून.

सर्व जगात - ब्रिटनमध्ये सुद्धा - किलोमीटर आणि लीटर चालतात पण अमेरिकेत मैल आणि गॅलन का? कारण ती अमेरिका आहे.

काही किंचित ...

९/११ हे आता विशेषनाम झाल्यात जमा आहे. त्यामुळे कोणत्या देशात दिनांक लिहीण्याची पद्धत कशी हे मला इथे अस्थानी वाटते.

सर्व जगात - ब्रिटनमध्ये सुद्धा - किलोमीटर आणि लीटर चालतात पण अमेरिकेत मैल आणि गॅलन का? कारण ती अमेरिका आहे.

ब्रिटनमधे (२००७ च्या डिसेंबरपर्यंत स्वतःच अनुभव घेतला आहे) दूध आणि बियर पाईंटमधे मोजतात. आणि रस्त्यावरची अंतरं मैल, यार्डात मोजतात. सर्वसामान्य लोक गाड्यांची इंधन जाळण्याची सरासरी मैल प्रति लिटर या संकरित एककात मोजतात.

मूळ लेखाबद्दल: हिंसेची प्रदर्शनं मांडणं जगमान्यच असावं. वर हॉलोकॉस्ट वगैरेंचा उल्लेख आलेला आहेच. निदान भविष्यात तरी असं काही होऊ नये असा संदेश त्यातून देत असतील तर काय त्यात चूक आणि/किंवा वाईट आहे? परदु:ख शीतल म्हणून आपण फक्त स्फोट झालेल्या लोकलच्या डब्यात आपण नव्हतो याचा आनंद मानायचा.
रहाता राहिला विक्रीचा भागः जिथे ज्या गोष्टी जशा 'विकल्या' जातात तिथे तशाच त्या विकाव्यात. मग तो विचार असेल, प्रकटन असेल नाहीतर वस्तू!

संज्ञा अस्तित्वात आली का नाही हे कसं ठरवायचं हे मला माहित नाही. पण गूगलबाबाने 'poverty porn' असा प्रश्न विचारला असता जी उत्तरं दिली, त्यातलं पहिलंच उत्तर 'द संडे टाईम्स'मधल्या चित्रपट परीक्षणाचं येतं. निदान अडीच वर्षांपूर्वी 'पॉव्हर्टी पॉर्न' हा शब्दसमूह वापरला गेला आहे.

प्रकटन आणि प्रदर्शन

प्रकटन आणि प्रदर्शन यात फरक असावा असे वाटते.
सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है

हा! गूगल!

पण गूगलबाबाने 'poverty porn' असा प्रश्न विचारला असता जी उत्तरं दिली, त्यातलं पहिलंच उत्तर 'द संडे टाईम्स'मधल्या चित्रपट परीक्षणाचं येतं.

हा! गूगल आणि विकिपिडीयाबाहेरही काही जग आहे....
सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है

सुसंगती सदा घडो

प्रकटन आणि प्रदर्शन यात फरक असावा असे वाटते.

उदा: अंगभूत दृष्य कलेचे प्रकटन = चित्र काढणे. अंगभूत लेखन कलेचे प्रकटन = लेख लिहीणे. दोन्हींचं प्रकाशन वेगवेगळ्या प्रकारे होतंच, चित्रांचं प्रदर्शन भरतं, लेखन मुद्रित स्वरूपात किंवा इतर काही स्वरूपात (ब्लॉग, इमेल, पत्र, सोशल नेटवर्किंग इ. प्रकारे) प्रकाशित करतात.
आपलं मत, कला, विचार, संशोधन, इ. इ. लोकांसमोर आणणे = प्रदर्शन. इतर कोणाला ती गोष्ट बघताच नाही आली तर प्र-दर्शन होणार नाही.

हा! गूगल आणि विकिपिडीयाबाहेरही काही जग आहे....

अलबत! उपक्रम आहे, मिसळपाव आहे, आणि आंतरजालाबाहेर वाण्याचं दुकान आहे, पोस्टऑफिस आहे, सुदर्शन कला मंच आहे. पण कालसुसंगत जगण्यासाठी गूगल आणि विकीपिडीयाला सध्यातरी पर्याय नाही. 'द संडे टाईम्स'मधे २००९ साली प्रकाशित झालेल्या लेखात poverty porn हा शब्द वापरलेला आहे हा संदर्भ देणं नाहीतर मला शक्य नाही.
आमच्या विषयातल्या भाषेत तुमचा noise हा (आमच्या माहितीच्या बळामुळे) आमचा signal असेल किंवा आजच्या काळात चलतीत असणार्‍या आयटीच्या भाषेत तुमच्या दृष्टीने असलेला bug (वापरून घेण्याचं कौशल्य असल्यामुळे) आमच्यासाठी feature असेल.

वेदनांचे बाजारीकरण

वेदनेला मूर्त स्वरूप देण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकेल. घरात मृत्यू झाल्यावर पैसे देऊन बोलावलेल्या, छातीवर हात पिटून मोठमोठ्याने रडणार्‍या रुदाली किंवा काळी वस्त्रे घालून, चेहर्‍यावर काळी जाळी ओढून शांतपणे विलाप करणार्‍या स्त्रिया. कोणी कोणाला बाजारू ठरवायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न.

या अतिरेकी हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांच्या वस्तू, अर्धवट जळलेले कपडे, कुठे अर्धा फाटलेला राष्ट्रध्वज, कुठे एखादा जळका फोटो.... असलं काहीकाही हिडीस या प्रदर्शनात मांडून ठेवलेलं आहे.

जिच्या नवर्‍याचा फाटका शर्ट तेथे आहे ती त्याला बहुधा हिडीस म्हणणार नाही आणि माझ्या देशाचा जळलेला राष्ट्रध्वज असता तर मीही त्याला हिडीस नक्कीच म्हटलं नसतं.

जालियावालाबागेत गोळ्यांच्या खुणा असणारी भिंत आजही दाखवली जाते. जिथे लोकांनी जीव दिले ती विहीरही दाखवली जाते. एखाद्याला हे सर्व पाहणे दु:खदायक किंवा क्लेशदायक वाटू शकते परंतु हिडीस वाटू नये असे मनापासून वाटते.

ज्या दुखःदायक घटना इतिहासात घडल्या त्या आपला वारसा आहेत. ती स्थळे, ते प्रसंग जपून ठेवावे, जेणे करून आपल्या पुढील पिढीला त्याची इत्यंभूत माहिती कळेल. त्याचा योग्य परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होईल हे आवश्यक आहे.

राहिला प्रश्न अंदमानातील आदिवासींचा तर त्या विषयी एक लेख नुकताच वाचनात आला. तिथे त्यांना पाहून आंबटशौक पुरा करणार्‍या काही फुटकळ लोकांपेक्षाही मोठा महत्त्वाचा प्रश्न पुढे उभा राहतो -

मागास मनुष्य जातींना पुढे आणण्यासाठी धडपडणार्‍या माणसांनी (जगात सर्वत्र, भारतच असे नव्हे) जारवांना, सेंटिनेलिंना आणि इतर जमातींना माणूस मानून त्यांना प्रगतीपथावर घेऊन यावे, त्यांना इतर माणसांसारखे प्रशिक्षण, आरोग्यसेवा, सुखसोयी आणि सुरक्षित आयुष्य यांचा लाभ घेऊ द्यावा की त्यांना वन्य प्राण्यांप्रमाणे दुष्ट मानव जातीपासून दूर अभयारण्यात निर्धोक ठेवावे?

जारवा जमात लोकांच्या नजरेस पडू नये म्हणून तिथून जाणारा हायवे बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. अर्थातच, हे आदेश पाळलेले नाहीत. काही क्षुल्लक शेंच्या संख्येने असणार्‍या या जमाती त्सुनामीच्या हल्ल्यात नामशेष झाल्या की अस्तित्त्वात आहेत याचीही माहिती बाहेरील जगाला नाही. त्यांना भारताचे नागरिक म्हणून संरक्षणाची, भरपाईची गरज आहे की तशी काही गरज नाही?

हाय वे आदेश

"हायवे बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. अर्थातच, हे आदेश पाळलेले नाहीत."

~ याला कारण बेटावरील रहिवाशांचा ["सेट्लर्स्"] सुप्रीम कोर्टाच्या त्या आदेशाला असलेला विरोध. जारावा, सेंटिनेलीस्, ओन्गे आणि ग्रेट अंदमानीज् या "प्रीमिटिव्ह" मानल्या गेलेल्या जमातीना - साधारणतः ३०० ते ३५० लोक शिल्लक असतील्-नसतील - मुख्य धारामध्ये आणून त्या जमातींचे खर्‍या अर्थाने रक्षण करणे गरजेचे आहे असे मानणारे पर्यावरणवादी आहेत. आज जारावा (आणि तत्सम) जमातीना फार गरज कुठली असेल तर ती आहे 'प्रॉपर मेडिकल् अटेन्शन"ची. २००२-०३ च्या साध्या गोवरच्या विकाराने यात शेकडो दगावले असल्याची नोंद अंदमान दप्तरात मिळते. शिवाय यांच्यासमवेत स्थानिक रहिवाश्यांचे [पर्यटक नव्हेत] होणारे छोटेमोठे देवाणघेवाणीचे व्यवहार पाळताना 'संसर्गजन्य रोग' होण्याची शक्यता असल्याने खबरदारी घ्यावी असे तेथील प्रशासनच पुकारा देत असते. ही बाबदेखील त्यांच्या 'अस्तित्वा'च्या प्रश्नाचा विचार करताना ठळकपणे समोर घेतली जाते.

'जारवा ओन्गे परक्यांना पाहून विषारी बाण मारतात, अंगावर धावून येतात....' आदी सुरस चमत्कारीक कथा आता दुर्मिळ होत चालल्या असून स्थानिकांनी केलेल्या सातत्याच्या प्रयत्नामुळे ही जमातही आता 'मैत्रीपूर्ण' वातावरण निर्मितीच्या प्रयत्नात आहे. अंदमान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दिली जाणारी वस्त्रे घालून ते तिथे उपचार घेत असल्याची नोंद आहे.

खालील व्हिडिओमध्ये 'जारवा' हसतखेळत स्थानिकांसमवेत वर्तन करताना दिसतात, ते या बदलाचेच प्रतिक मानावे लागेल.

http://www.youtube.com/watch?v=ZhfLJhI4AfI

दु:खाचेही प्रदर्शन/चित्रीकरण अपेक्षित असले पाहिजे

महत्त्वाच्या घटना आणि मानवीय भावनांचे सादरीकरण होईल, असे अपेक्षित असले पाहिजे. आपत्ती आणि दु:खाचेही प्रदर्शन/चित्रीकरण अपेक्षित असले पाहिजे.

चित्रीकरणासाठी काही मोबदला मिळेल, हीसुद्धा अपेक्षा आधीच असली पाहिजे.

स्लमडॉग मिलियनेरला इतके आर्थिक यश मिळायला नको होते, म्हणजेच अपेक्षेपेक्षा मोबदला अधिक होता, असे विश्लेषण आहे काय? याबाबत माझे ठाम मत नाही. अशा प्रसंगी रास्त मोबदला किती ते ठरवायचे गणित काय? याबद्दल मी नीट विचार केलेला नाही.

बराचसा असहमत

तुमच्या मित्राचं म्हणणं थोडं एकांगी वाटलं.

एक तर हे ९/११ असे म्हणणे मला आवडत नाही. पण असल्या नवनवीन कॅची टर्म्स बनवण्याची या लोकांना फार वाईट खोड आहे.

काही विशिष्ट प्रसंग त्या तारखेने ओळखण्याची परंपरा आहे.
कोरिअन युद्ध (१९५०) हे कोरिआत त्या तारखेनेच ओळखलं जातं.
In South Korea the war is usually referred to as "625" or the 6–2–5 War (yug-i-o jeonjaeng), reflecting the date of its commencement on 25 June.
तैवानमधल्या नागरिकांच्या हत्याकांडालादेखील त्या तारखेने (२८ फेब्रुवारी) ओळखलं जातं '२२८ दुर्घटना' या नावाने.

२००२ साली मी न्यूयॉर्क शहरात ग्राउंड झीरोला भेट दिली होती. तो भाग पूर्णपणे कुंपणबंद होता. शेकडो मीटरची कुंपणाची भिंत लोकांनी उत्स्फुर्तपणे श्रद्धांजली, कविता, नावं, फोटो, फुलं यांनी भरून टाकली होती. समाजमनाच्या भावनांचा तिथे उद्रेक झालेला होता. ग्राउंड झीरोवर जाऊ दिलं असतं तर कित्येक लोकांनी त्या प्रसंगाशी नातं सांधण्यासाठी तिथल्या वस्तूंना स्पर्श केला असता. फाटक्या कपड्यांकडे बघून हे कोणाचे असतील असं स्वतःलाच विचारलं असतं. अर्थातच ज्यांना तिथे जायला जमणार नाही त्यांच्यासाठी तिथल्या वस्तू पळवून कोणी विकल्याही असत्या. ही घाऊक विक्री होऊ नये, आणि तरीही त्या क्षणाशी असलेलं प्रत्येकाचं नातं टिकवून ठेवायचं असेल तर म्यूझियम उघडण्यावाचून पर्याय नाही. त्याला 'बाजार करणं' म्हणवत नाही.

आपल्यावरच्या अन्यायाचं भांडवल करणं हे वैयक्तिक पातळीवर अनेक ठिकाणी होताना दिसतं. सामाजिक पातळीवरदेखील तुरळक प्रमाणात दिसतं. पण व्यक्तीच्या मनात किंवा समाजमानसात जपलेल्या दुःखद आठवणी या त्यांच्या अस्तित्वाचा भाग असतो. दुःखाची अभिव्यक्ती झाल्याने त्यातून कॅथार्सिस देखील साधला जातो. एका विशिष्ट प्रमाणापलिकडे झाल्याशिवाय त्याला बाजार म्हणणं बरोबर नाही.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसो

+१

मलाही असेच वाटते.
नाहीतर तसं पाहिल्यास 'शहीदो के मझारोंपर हर बरस मेले' लावण्याचं तरी कारण काय?

फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे हे सेरिब्रल पाल्सी या विकलांगतेने ग्रासलेल्या वल्लरी करमरकर हिचा पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम झाला त्यावेळी तिच्या वडिलांनी तुम्ही तुमच्या या दु:खाचे प्रदर्शन कशाला करत फिरताय? असा सल्ला वजा टोमणा मारणारे लोक भेटल्याचे आवर्जुन सांगितले होते. त्यांच्या कुटुंबाला आलेल्या कटु गोड अनुभवांचा लेखा जोखाच कार्यक्रमात घेतला.कार्यक्रम अत्यंत हृद्य झाला. सर्व श्रोत्यांनी सदगदित होउन उभे राहुन सलाम केला इतका उत्कट अनुभव होता तो.
लाईफ इज ब्युटीफुल चे भाग पहा
http://in.youtube.com/watch?v=t3a2BblPILw

http://in.youtube.com/watch?v=Q3B1270rHAs

http://in.youtube.com/watch?v=xqhU-HWq0ug

प्रकाश घाटपांडे

 
^ वर