झांशीवाले दामोदरपंत

झाशीवाले दामोदरपंत
राणी आणि पाठीवर दामोदर - काल्पनिक चित्र
राणी आणि पाठीवर दामोदर - काल्पनिक चित्र

पाठीवर आपल्या लहान मुलाला बांधून घोड्यावरून भरधाव जाणारी शूर स्त्री हे झाशीच्या राणीचं चित्र आपल्या खूप परिचयाचं आहे. राणी नंतर शत्रूशी झालेल्या धुमश्चक्रीत धारातीर्थी पडली. पाठीवरल्या मुलाचं पुढं काय झालं हे सर्वसाधारणपणें कोणासच ठाऊक नाही. त्याचं नाव होतं दामोदर आणि जवळच्या नेवाळकर नातेवाईकांमधून राणीचे पति गंगाधरपंत ह्यांनी त्याला वयाच्या तिसऱ्या वर्षी दत्तक घेतलं होतं. हा दत्तक मान्य करून गंगाधरपंतांच्या पश्चात् त्याच्याकडे वारसाहक्कानं झाशीचं राज्य सोपविण्यावरून राणी आणि कलकत्तेकर इंग्रजांच्यामध्ये वैतुष्टय आलं आणि राणीनं आपल्या हक्काच्या रक्षणासाठी शस्त्र उचललं. (हे अखेरचं पाऊल उचलण्यापूर्वी सामोपचारानं आणि कायद्याच्या मार्गानं कलकत्त्याला आणि लंडनला दावा दाखल करण्याच्या विचारात राणी होती आणि त्याविषयी लॅंग नावाच्या एका ऑस्ट्रेलियन-इंग्रज वकिलाला सल्लामसलतीसाठी तिनं बोलावलं होतं. ह्या भेटीचा लॅंगनं लिहिलेला मनोरंजक वृत्तान्त उपलब्ध आहे, पण त्याविषयी अन्यत्र केव्हातरी...) ह्या दामोदरपंतांचं पुढं काय झालं अशाविषयीचा एक लेख कै. य. न. केळकर ह्यांनी बरेच वर्षांपूर्वी प्रसिद्ध केला होता. पुढील लेख हा त्याचाच गोषवारा आहे. सारांश दामोदरपंतांच्या शब्दातच आहे.

"नेवाळकर कुटुंबाच्या एका उपशाखेत १५ नोव्हेंबर १८४९ ह्या दिवशी माझा जन्म झाला. माझ्या जन्माच्या वेळी ज्योतिषांनी ह्या मुलाला राजयोग आहे असं भाकित वर्तवलं होतं. हे भाकित पुढं अनपेक्षित आणि दुर्दैवी मार्गानं खरं ठरणार होतं. मी तीन वर्षांचा असताना झाशीचे राजेसाहेब गंगाधरराव ह्यांनी मला दत्तक घेतलं. ईस्ट इंडिया कंपनीच्या बुंदेलखंडातील एजंटाकडं माझं दत्तकविधान मान्य करण्याविषयीचा प्रस्ताव त्यांनी पाठविला होता पण त्याला काही उत्तर यायच्या आधीच त्यांचं निधन झालं. माझ्या दत्तक आई लक्ष्मीबाई ह्यांनी कलकत्त्याला लॉर्ड डलहौसीकडं विनंती पाठवली होती की माझं दत्तकविधान मान्य करावं आणि मला झाशीच्या गादीचा वारस घोषित करावं. पण हे मंजूर झालं नाही. कलकत्तेकरांनी निर्णय केला की डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सच्या अनुसार झाशीचं राज्य खालसा करून ब्रिटिश सत्तेचा भाग व्हावं आणि राणी लक्ष्मीबाईना वार्षिक ६०००० रुपये पेन्शन द्यावं. ह्याखेरीज माझ्या वडिलांची सर्व वैयक्तिक मालमत्ता वाडे जडजवाहिर माझ्या सज्ञान होईपर्यंत त्यांच्या ताब्यात असावेत आणि तदनंतर ते माझ्याकडे यावेत. ह्या वेळेस झाशी राज्याच्या खजिन्यात ७ लाख रुपयांचा ऐवज होता. आईसाहेबांनी जेव्हा ह्या रकमेची मागणी केली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की कंपनी सरकार ही रक्कम विश्वस्त म्हणून सांभाळेल आणि मी सज्ञान झाल्यावर माझ्याकडे सुपूर्द करेल.

झांशीचा किल्ला १८८२
झांशीचा किल्ला १८८२

"१८५७ त माझं नशीबच फिरलं. आईसाहेबांचा झाशीला कंपनी सरकारच्या ताब्यात द्यायला पूर्ण विरोध होता. त्या खुद्द आणि झाशीची प्रजा कंपनी सरकाराविरुद्ध युद्धाच्या मैदानात उतरले. दुर्दैव आणि फितुरी ह्यामुळं आम्ही झाशी गमावली. अखेर ग्वाल्हेरच्या मैदानात आईसाहेबांना वीरमरण मिळालं.

झांशीचा ध्वज
झांशीचा ध्वज

माझ्या सेवकांनी मला असं सांगितलं आहे की मला मागे घोड्यावर बसवूनच त्या युद्धक्षेत्री गेल्या होत्या. मला पक्कं काही आठवत नाही. आईसाहेबांच्या जाण्यानंतर ३ दिवस मी ग्वाल्हेरातच होतो. आईसाहेबांच्या बरोबरच्या लोकांपैकी केवळ सुमारे ६० जण ह्या लढाईतून बचावून जिवंत रहिले. नन्हेखान रिसालदार, गणपतराव नावाचा एक मराठा, रघुनाथसिंग आणि रामचंद्रराव देशमुख ह्यांनी माझं पालकत्व घेतलं. २२ घोडे आणि ६० उंट बरोबर घेऊन आम्ही पेशवे नानासाहेब ह्यांचे बंधु रावसाहेब ह्यांची छावणी सोडली आणि आपला मार्ग धरला. दुर्गम भूप्रदेश, अरण्य आणि बिहडांतून मार्ग काढत आम्ही बुंदेलखंडातल्या चंदेरीच्या किल्ल्याकडं निघालो. इंग्रजांच्या धाकामुळं वाटेत लागलेल्या कोठल्याच खेड्याच्या रहिवाशांना आमच्यावर दया करून आम्हाला मदत करावी असा धीर झाला नाही.

"कोठल्याच गावात थारा न मिळाल्यामुळं आम्ही अखेर दाट अरण्यात एका नदीच्या काठावर मुक्काम केला. छावणी उभी करावी म्हटलं तर आमच्याकडे तसं कोठलंच साहित्य नव्हतं. आम्ही उघड्यावरच राहू लागलो. उन्हाळयात कडक उन्हामुळं आम्ही जंगलाच्या आत झाडांच्या सावलीत झोपायचो. आमची कातडी उन्हामुळं आणि वाऱ्यापावसामुळं अगदी कोळपून गेली. काही शिजवून खायचं म्हटलं तर आम्हापाशी त्याला लागणारी काहीच साधनसामुग्री नव्हती. परिणामतः जंगलात मिळणारी रानटी फळं आणि कंदमुळं खाऊनच आम्ही दिवस काढले. सुदैवानं आमचा जिथं मुक्काम होता तिथं हा वनाहार भरपूर उपलब्ध होता. आमची उपासमार झाली नाही. जवळपासच्या खेडेगावांपासून ब्रिटिशांच्या भीतीनं आम्ही चार हात दूरच राहिलो होतो. अगदी अडल्यावेळी काय ते आमच्यापैकी कोणीतरी जवळपासच्या गावात जीव मुठीत धरून जाई आणि काय हवं ते मिळालं की लगोलग परत येई. असं करता करता १८५८ चा उन्हाळा संपला.

"पावसाळयात आमचे हाल आणखीनच वाढले. सर्वत्र चिखल आणि पाणी भरून गेले आणि आमची हालचाल आणखीनच थंडावली. ते दिवस आठवले की आजही माझ्या अंगावर शहारा येतो. अखेर आमचं नशीब थोडं फिरलं आणि परमेश्वरानं आमच्याकडं आपली कृपादृष्टि वळवली. जवळच्या एका खेडयाच्या मुखियानं सांगितलं की नजीकच ललितपुरमध्ये ब्रिटिशांनी तळ ठोकला आहे. त्यामुळं आमच्या सध्याच्या जागी तो आम्हास मदत करू शकणार नाही पण आम्ही जर आपला मुक्काम त्याच्या सूचनेनुसार दुसऱ्या गुप्त जागी हलवला तर तो त्या जागी शिधासामुग्री पोहोचवू शकेल. नाईक रघुनाथसिंगाच्या सल्ल्यानुसार आम्ही आपली छावणी मोडली आणि १०-१२ जणांचे गट करून आम्ही विखरून राहू लागलो. त्या मुखियाला आम्ही ९ घोडे आणि ४ उंट दिले आणि ह्याशिवाय दर महिन्याला ५०० रुपये त्याला द्यायचं कबूल केलं. त्याच्या मोबदल्यात त्यानं आम्हाला शिधा पोहोचवायचा आणि ब्रिटिशांच्या हालचालीची बातमी पुरवायची असं ठरवलं. एव्हाना आमची संख्या रोडावत जाऊन मूळच्या ६० पैकी आम्ही सर्व मिळून ११ जण काय ते शिल्लक उरलो होतो.

"मुखियाच्या सूचनेप्रमाणं बेटवा नदीपासून जवळच्या एका गुहेत आम्ही राहू लागलो. जवळच एक महादेव मंदिर होतं. बेटवा नदीच्या पाण्याला खूपच जोर होता. थोडया अंतरावर एक प्रेक्षणीय जलप्रपात होता. आसपास छोटेमोठे पाण्याचे साठे होते. ह्या स्थळाच्या प्रेक्षणीयतेनं आमचं दुःख थोडसं हलकं झालं.

कैदेतील तात्या टोपे
कैदेतील तात्या टोपे

"अशा भटक्या आयुष्याची दोन वर्षं आम्ही काढली. हा सर्व वेळ माझी तब्येत खराबच असे. मी ह्या भटकंतीच्या दिव्यातनं बाहेर पडतो की नाही अशी शंका माझ्या जवळच्या लोकांना वाटू लागली. मुखियाला त्यांनी विनंती केली की मला औषधपाणी द्यायला कोणालातरी बोलावणं करावं. मुखियानं माझी दयनीय अवस्था पहिली आणि त्याला धक्काच बसला. त्याचा काकाच गावात वैद होता. आपल्या काकाकडनं माझ्या औषधाची सोय मुखियानं गुपचुप केली. माझी तब्येत सुधारली पण एक नवीनच प्रश्न आमच्यासमोर खडा झाला. आम्ही ग्वाल्हेर सोडलं तेव्हा आमच्याजवळ ६०००० रुपयांचा ऐवज होता. तो आता जवळजवळ संपुष्टात आला होता. मुखियाला द्यायला आमच्यापाशी काही नाही असं पाहिल्यावर त्यानी आम्हाला निघून जायला सांगितलं. आम्हाला तसं करण्याखेरीज गत्यंतर नव्हतं. आम्ही त्याला २०० रुपये दिले आणि आपले घोडे परत मागितले. त्या भामटयानं केवळ तीन घोडे परत केले आणि बाकीचे मेले अशी थाप मारली.

राणीचे पत्र १
राणीचे पत्र १
राणीचे पत्र २
राणीचे पत्र २

"वाटेत पूर्वीच्या लोकांपैकी १२ जणांचा एक गट आम्हाला परत येऊन मिळाला आणि आम्ही ग्वाल्हेरच्या प्रदेशातल्या एका खेडयात पोहोचलो. गावकऱ्यांनी आम्ही बंडवाले असल्याचं ओळखलं आणि आम्हाला अटक केली. तिथल्या कैदखान्यात आम्ही तीन दिवस काढले. नंतर १० घोडेस्वार आणि २५ शिपायांच्या पहार्यात आमची रवानगी झालापाटण इथल्या पोलिटिकल एजंटाकडे झाली. आमचे घोडे जप्त झाले होते. पायी चालून तिथं पोहोचायला आम्हास कित्येक दिवस लागले. माझी स्थिति पाहून माझ्या सहकाऱ्यांनी मला आळीपाळीनं पाठीवरनं वाहून नेलं. आईसाहेबांच्या लोकांपैकी जे बचावले होते त्यापैकी बहुतेकांनी झालापाटणमधेच आश्रय घेतला होता. मि. फ्लिंक नावाचे एक आधिकारी तिथं पोलिटिकल एजंट होते. आईसाहेबांच्या चाकरीतला रिसालदार नन्हेखान पोलिटिकल एजंटाच्या ऑफिसमध्येच नोकरीला लागला होता आणि एजंटाचा विश्वासू होता. तो फ्लिंकसाहेबांना म्हणाला, "झाशीच्या राणीसाहेबांना एक ९-१० वर्षांचा मुलगा होता. त्यांच्या मृत्यूनंतर त्या मुलाला जंगलात एकाद्या वन्य प्राण्यासारखं राहायला लागलं. त्याच्या बरोबरच्यांनी त्याची चांगली काळजी घेतली आहे. त्या बिचाऱ्या मुलानं सरकारचं काय बिघडवलं आहे? त्या मुलाला ह्यातून बाहेर काढा आणि सगळा हिंदुस्तान तुम्हाला दुवा देईल".

इंग्रजी सूड - फेलिस बीटोने घेतलेले छायाचित्र
इंग्रजी सूड - फेलिस बीटोने घेतलेले छायाचित्र

"फ्लिंकसाहेब दयाळू माणूस होता. त्यांनी इंदूरमधले पोलिटिकल एजंट शेक्स्पीअर ह्यांच्याकडे माझ्याबद्दल कळवलं. त्या साहेबांचा जबाब आला की मुलानं आपणहून शरणागति पत्करली तर मी जरूर त्याची योग्य सोय लावून देईन. फ्लिंकसाहेबांनी नन्हेखानाबरोबर मला इंदूरला पाठवलं. वाटेत आम्ही झालावारचे राजेसाहेब पृथ्वीसिंग ह्यांना भेटलो. राजेसाहेबांना आईसाहेबांबद्दल फार आदर होता आणि त्यांनी मला फार चांगली वर्तणूक दिली. माझ्याबद्दल अजमेरच्या एजंटाकडं शब्द टाकण्याचं आश्वासनहि दिलं.

"झालापाटणमध्ये आम्ही सुमारे तीन महिने होतो. आमच्याजवळ अजिबात पैसा उरला नव्हता. माझ्याजवळचे अखेरचे दोन सोन्याचे तोडे मी तिथं विकले. ते मूळचे आईसाहेबांचे होते. माझ्याजवळची त्यांच्या आठवणीची ही शेवटची वस्तु.

"५ मे १८६० ला आम्ही इंदूर छावणीत पोहोचलो. तिथं मला शेक्स्पीअरसाहेब भेटले. मला शिक्षण देण्यासाठी त्यांनी मुन्शी धर्मनारायण ह्या काश्मीरी पंडित गृहस्थांना नेमलं. मला जवळ केवळ ७ जणांना ठेवायची परवानगी मिळाली. बाकी सर्वजण सोडून आपापल्या मार्गानं गेले. मला महिन्याला २०० रुपये पेन्शन मंजूर करण्यात आलं. ते मान्य करण्यापलीकडं माझ्यापाशी अन्य कोठलाच पर्याय नव्हता कारण मी एक अज्ञान मुलगाच होतो."

इथं हा गोषवारा संपतो. दामोदरपंतानी नंतरच्या आयुष्यात काय केलं ह्याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. एवढं निश्चित की विश्वस्त म्हणून इंग्रज सरकारानं ताब्यात घेतलेली ७ लाखाची रक्कम दामोदरपंतांना कधीच परत मिळाली नाही आणि त्याबद्दल ते आयुष्यभर झगडत राहिले. त्यांचं वैयक्तिक आयुष्य म्हणायचं तर त्यांनी सुरुवातीस एक लग्न केलं पण ती पत्नी लवकरच वारली. दुसऱ्या लग्नापासून त्यांना बऱ्याच उशीरा म्हणजे १९०४ साली लक्ष्मणराव नावाचा मुलगा झाला. त्याच्या जन्मानंतर दोनच वर्षात २८ मे १९०६ ह्या दिवशी दामोदरपंत मृत झाले. लक्ष्मणराव १९५९ पर्यंत जगले. त्यांच्या पुढच्या पिढया इंदूर भागातच चारचौघांसारख्या नोकरीधंद्यात आहेत. आपलं नेवाळकर हे आडनाव सोडून ते सर्व आता झाशीवाले म्हणून ओळखले जातात.

(लेखात घातलेली चित्रे जालावर अनेक ठिकाणी उपलब्ध आहेत.)

लेखनविषय: दुवे:

Comments

चांगली माहिती

राणीच्या मृत्यूनंतर दामोदराचे काय झाले याबद्दल कुतुहल होते ते या लेखामुळे शमले. चांगल्या माहितीबद्दल श्री. अरविंद यांना धन्यवाद.

विनायक

छान

छान लेख आणि माहिती.

नितिन थत्ते

सविस्तर् वृत्तांत्

सविस्तर् वृत्तांत् आवडला. इथे उपक्रमावरच बहुदा ह्याच विषयाबद्दल एक चर्चा झाली होती. दामोदरपंतांच्या वारसांना स्वातंत्र्योत्तर भारत सरकारकडुन दुर्लक्षिले जाण्याच्या(आणि फारशा काही सोयी/सुविधा,भत्ते न मिळण्याच्या ) संदर्भातली चर्चा आठवते आहे. त्यांच्या वारसांना राणीने केलेल्या पराक्रमाबद्दल काही आर्थिक मोबदला हवा होता, मात्र तत्कालिन भारत् सरकारने तो दिला नाही वगैरेबद्दल वाद-विवाद झाले होते. दुवा मात्र सापडला नाही.

अवांतरः- मधे एक "तात्या टोपे" नावाचे शोधप्रबंधसदृश् पुस्तक् वाचण्यात आले. त्या पुस्तकात तपशील् असा काहिसा होता की मुळात ब्रिटिशांनी ज्याला १८५८ मध्ये फाशी दिले ती व्य्क्ती तात्या नव्हतीच.(थोडक्यात् एक् conspiracy theory होती.) मग जिवंत असलेले तात्या होते कुठे? एका तर्कानुसार ते दामोदरपंतांचे कुणी आप्त बनुन दुसर्‍याच नावाने राहिले, कधीही पकडले गेले नाहित. त्या संदर्भात दामोदर रावांनी त्यांना दुसरी ओळख देउन् साह्य/सहाय्य केले असावे असे वाटते.

--मनोबा

थिअरी

>>ब्रिटिशांनी ज्याला १८५८ मध्ये फाशी दिले ती व्य्क्ती तात्या नव्हतीच.(थोडक्यात् एक् conspiracy theory होती.)

अशी कॉन्स्पिरसी थिअरी १९७०-७५ च्या आसपास* "सोबत"च्या दिवाळी अंकात वाचली होती. शेगावचे गजानन महाराज म्हणजेच तात्या टोपे होते असा लेख आला होता.

*नक्की वर्ष आठवत नाही. पण सोबत दिवाळी अंक हे नक्की.

नितिन थत्ते

ती अनेक् शक्यतांपैकी एक् आहे.

इतरही बर्‍याच् शक्यता दिल्यात. गजानन् महाराज म्हणजे तात्या टोपे कसे नाहित हे लिहिण्यात त्या पुस्तकात काही पाने त्यात खर्ची घातलेली आहेत. निव्वळ वयाचा जरी विचार् केला तरी ती शक्यता नाकरावी लागते असं दिलय. लेखक:- कृ पं देशपांडे, प्रकाशकः- गंधर्व वेद प्रकाशन.
त्यांनी दिलेल्या शक्यतांची यादी हा उपक्रमावर एक मस्त विषय/धागा होउ शकेल.
असो.

--मनोबा

हा/ असा लेख या पूर्वी उपक्रमावर आला आहे

पब्लिक मेमरी शॉर्ट असते याचे उत्तम उदाहरण म्हणून वरील प्रतिसादांकडे बघता येईल ;-) ह. घेणे; पण हा/ असा लेख या पूर्वी उपक्रमावर आला आहे.

अर्थातच सोबतच्या चित्रांनी आणि जास्त माहितीमुळे वरील लेख अधिक रोचक वाटतो.

पूर्वीचा लेख येथे वाचता येईल.

छान!

लेख आवडला! माहिती अत्यंत व्यवस्थित पद्धतीने दिलेली आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

उत्तम लेख

उत्तम लेख आणि वाचनात न आलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..

- पिंगू

 
^ वर