अधुनिक लोकशाहीची आई...

ब्रिटन या राष्ट्रास बर्‍याचदा "mother of all democracies" अर्थात "अधुनिक लोकशाहीची आई" असे सार्थपणे संबोधिले जाते. ब्रिटनच्या लोकशाही मुल्यांविषयी कधी कोणाला शंका आल्याचे सहसा दिसत नाही. अर्थात येथे ध्यानात घेतले पाहीजे की "लोकशाही" ही आपल्या (स्वतंत्र) देशातील लोकांसाठी असते...तरी देखील असे म्हणावे लागेल की या "आईने" भारत-अमेरीकेसहीत अनेक राष्ट्रांमध्ये जरी पारतंत्र्य आणले असले तरी अनेक देशांनी तीच्या पावलावरपाऊल ठेवत नव्याने स्वतंत्र झालेल्या देशांमध्ये लोकशाही आणली आणि स्वतःच्या जनतेला/सत्ताधार्‍यांना पचेल अशी रुजवली. असो. तो आता इतिहास झाला.

पण व्यक्तीप्रमाणेच राष्ट्राच्या आयुष्यात ही परीक्षेचा काळ येतो, ज्यामध्ये हरीश्चंद्राप्रमाणे अशा व्यक्ती/राष्ट्राची मुल्ये तपासली जातात. आज असाच काळ ब्रिटनमधे आला आहे असे वाटते. आज संपलेल्या आठवड्यात ब्रिटनमधे जी काही एरवी फुटकळ वाटू शकेल अशा कारणाने दंगल चालू झाली आणि पसरली, ती बघता, साहेबाच्या राज्यात देखील जनता जर भुकेली असेल, आर्थिक दरीने गांजलेली असेल तर रस्त्यावर येऊ शकते आणि सौंदर्यप्रसाधनांपासून ते चित्रवाणी-संचा पर्यंत कशाचीही लुबाडणूक करू शकते हे दिसले. तशी लुबाडणूक चालू असताना, जे सुरतेच्या वखारीत ब्रिटीश करू शकले ते राणीच्या राज्यात करू शकले नाहीत असे दृश्य जगासमोर आले.

अर्थात आता ४-५ दिवसात सगळे काबूत आले खरे... पण २०००+ लोकांना अटकेत देखील टाकले गेले आहे. त्यात काही गैर नाही, कायदा-सुव्यवस्था पाळताना हे करावे लागले तर समजण्यासारखेच आहे. पण ते होत असताना स्वतः पंतप्रधान कॅमेरॉनच म्हणू लागले की, "Picture by picture, these criminals are being identified and arrested, and we will not let any phony concerns about human rights get in the way of the publication of these pictures and the arrest of these individuals." थोडक्यात आधीच्य त्यांनी मानवी हक्क संघटनांना अप्रत्यक्ष दम दिला की आमच्या मधे येऊ नका म्हणून. आता अजून एक पायरी खाली उतरत पंतप्रधान कॅमेरॉन यांनी ट्वीटर, फेसबूक या सार्वजनिक वापराच्या सामाजीक संस्थळांच्या वापरावर देखील मर्यादा आणायचा विचार चालू केला आहे. (David Cameron has told parliament that in the wake of this week's riots the government is looking at banning people from using social networking sites such as Twitter and Facebook if they are thought to be plotting criminal activity. - गार्डीयन).

असे मध्यपुर्वेतच काय अगदी भारतासारख्या लोकशाही देशात सुद्धा खुट्ट झाले की ही विकसीत राष्ट्रे लगेच ट्वीट नाही तर कावकाव करतात. जे काही इजिप्तपासून मध्यपुर्वेत सुरू झाले ते योग्यच होते. त्यामधले सोशल नेटवर्कींगचे योगदान सगळ्यांनी कौतुकाने चघळले गेले. पण आता तेच बुमरँग होऊ लागले तेंव्हा तात्काळ बंदीची भाषा...

हे असे का होत असावे? ब्रिटनच्या दंगलींना अनेक रंग देत विश्लेषण होत आहे. त्यात वर्णांपासून ते वर्गांपर्यंत मुद्दे आले आहेत. आता जे काही दिसत आहे त्याप्रमाणे सामाजीक विषमता हे एक प्रमुख कारण दिसत आहे. सामान्य माणसे पिचली जात आहेत. आणि बदलणार्‍या आर्थिक घडामोडींप्रमाणे राज्ये कशी चालवावी या कल्पनेने हे सत्ताधीश पण पिचले जात आहेत.

पण म्हणून ज्या पायावर हे राष्ट्र उभे आहे त्यावरच घाला घालावा का? जर अशीच सत्ताधिशांच्या मताप्रमाणे लोकशाहची मुल्ये बदलणार असतील तर, या "सर्व लोकशाहींच्या आईस", "माता न तू वैरीणी" असे म्हणावे का?

अजून एक प्रश्न पडतो, याचे तरंग भारतात पण उठू शकतात का? मग भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करणारे देशद्रोही नाही, पण त्यांना सामाजीक असंतोषास कारणीभूत ठरवत असेच मानवी हक्कांपासून वंचीत करणे अथवा त्यांचे सोशल नेटवर्कींग अथवा अधुनिक टेलीकम्युनिकेशनचे हक्क गोठवायाला लागले तर योग्य ठरेल का? असे होऊ शकेल का?

एकीकडे रक्षाबंधन म्हणजे फक्त भाऊ-बहीणच कशाला, एकमेकांना सांभाळण्याचे वचन देण्याचा हा दिवस, तर दुसरी कडे भारतीय स्वातंत्र्याची पूर्वसंध्या... शुभेच्छा देण्याऐवजी केवळ प्रश्नांनी भेडसावले आहे... तुम्हाला काय वाटते?

Comments

त्रागा अनाठायी वाटला

डेवीड कॅमरन हा उजव्या पक्षाचा (कंजर्वेटीव) नेता आहे. उजव्या पक्षांच्या विचारसरणीच्या लोकांची मते लोकशाहीला वेसण घालणारी असतात असतात असे बरेचदा दिसुन येते. व्यक्तिस्वातंत्र्याचे स्तोम माजवलेले त्यांना आवडत नाही. अति-स्वातंत्र्य हा स्वैराचार- लोकशाहीचा कच्चा दुवा आहे असे त्यांचे मत दिसुन येते. त्यामुळे कॅमरन ह्यांची वरील घोषणा फार आश्चर्यकारक नाही.

आधुनिक लोकशाहीचा बाप असलेल्या अमेरिकेतही उजव्या पक्षाचे जॉर्ज बुश विराजमान असताना 'पेट्रियट ऍक्ट' खाली लोकशाहीची (ह्यापेक्षा अधिक) अवहेलना केली असे बर्‍याच लोकांचे मत आहे.

दुसरा मुद्दा म्हणजे, 'गुन्हेगारी प्रवृत्ती दिसल्यास' सोशल नेटवर्कवरील खाते गोठवणार असे कॅमरन ह्यांनी स्पष्ट केले आहे, ज्यात लोकशाहीला इजा पोहचवणारे काय आहे? गुन्ह्याचे कारस्थान करताना सापडल्यास सरकार अटकही करू शकते, मग सोशल साईट्सवरुन खाते उडवणे ह्यात काय विशेष?

त्यापेक्षा आधुनिक लोकशाहीची आई वगैरे असललेल्या देशातील ही बातमी मात्र नक्कीच लेकरांसमोर आदर्श ठेवणारी आहे.

अवांतर :

जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या देशातही सरकार फेसबुकवरचे खाजगी संदेश वाचणार आहे.

उजवे-डावे

उजव्या पक्षांच्या विचारसरणीच्या लोकांची मते लोकशाहीला वेसण घालणारी असतात असतात असे बरेचदा दिसुन येते. व्यक्तिस्वातंत्र्याचे स्तोम माजवलेले त्यांना आवडत नाही. अति-स्वातंत्र्य हा स्वैराचार- लोकशाहीचा कच्चा दुवा आहे असे त्यांचे मत दिसुन येते. त्यामुळे कॅमरन ह्यांची वरील घोषणा फार आश्चर्यकारक नाही.

आणि गंमत म्हणजे विकास हे ही कट्टर उजव्या विचारसरणीचे, संघ समर्थक, हिंदुत्ववादी वगैरे आहेत.
तरीही त्यांचे मत असे का बरे असावे?

भारतात हिंदुत्ववादी,संघसमर्थक वगैर असणारे बरेच एनाराय लोक अमेरिकेत मात्र स्वतःला लिबरल/प्रोग्रेसीव्ह गटात समजतात. असे का होत असावे बरे?.....तुम्हाला काय वाटते?

काही कारणे

उजव्या पक्षांच्या विचारसरणीच्या लोकांची मते लोकशाहीला वेसण घालणारी असतात असतात असे बरेचदा दिसुन येते.

यात डावे-उजवे करण्याचा प्रश्न नाही असे वाटते. डावे पक्ष हे भारतीय आणि इतरत्र जगात हे कम्युनिस्ट विचारसरणींच्या लोकांना आणि राजकारण्यांना वापरले जातात. त्यांना तर त्यांच्या तत्वाप्रमाणे लोकशाहीच मान्य नसते. ते अगदी आपल्याकडील गलीतगात्र कम्युनिस्टांपासून, तसेच ते समर्थन करत असलेल्या नक्षलवाद्यांपर्यंत दिसून येते. पण तो अवांतर मुद्दा आहे. परत कधीतरी वेगळी चर्चा करूया.

आधुनिक लोकशाहीचा बाप असलेल्या अमेरिकेतही उजव्या पक्षाचे जॉर्ज बुश विराजमान असताना 'पेट्रियट ऍक्ट' खाली लोकशाहीची (ह्यापेक्षा अधिक) अवहेलना केली असे बर्‍याच लोकांचे मत आहे.

अगदी सहमतच, म्हणूनच इतरत्र चाललेल्या चर्चेत मी म्हणले होते, "अमेरीकेने नागरी हक्क गोठवण्याचा प्रकार मला वाटते केवळ ९/११ नंतर केला, ज्यात अनेक मुस्लीमांना आणि कदाचीत इतरही कुणाला त्रास झाला असेल."

दुसरा मुद्दा म्हणजे, 'गुन्हेगारी प्रवृत्ती दिसल्यास' सोशल नेटवर्कवरील खाते गोठवणार असे कॅमरन ह्यांनी स्पष्ट केले आहे, ज्यात लोकशाहीला इजा पोहचवणारे काय आहे? गुन्ह्याचे कारस्थान करताना सापडल्यास सरकार अटकही करू शकते, मग सोशल साईट्सवरुन खाते उडवणे ह्यात काय विशेष?

अटक करणे समजू शकतो आणि ते प्रस्थापित कायद्यात देखील येत असावे अशी खात्री आहे. सोशल नेटवर्कींग साईट्स या सार्वजनीक असल्याने त्यात (वॉल्स वर) कोण काय लिहीते हे सर्वांनाच दिसते आणि त्यावर नजर ठेवणे सोपे आहे. पण सोशल नेटवर्कींग साईट (फेसबूक) ही खाजगी आहे आणि त्यातील खाती गोठवणे हे त्या खाजगी उद्योगावर घाला घालण्यासारखे आहे. ते देखील गुन्हा सिद्ध होण्याआधी शिक्षा देण्यासारखे - व्यक्तीस आणि (फेसबूक) कंपनीस. त्याव्यतिरीक्त माझा मुद्दा हा जेंव्हा इजिप्त वगैरे राष्ट्रांनी (माझ्या लेखी चुकीच्याच पद्धतीने) अशी बंदी घातली / प्रयत्न केला तेंव्हा जिथे लोकशाहीच नाही अशा "सत्ताधार्‍यांनी लोकांची मुस्कटदाबी केली," म्हणून ओरडणारी माध्यमे आत्ता का जास्त बोलत नाहीत, ह्या दुटप्पीपणा बद्दल आहे. माझ्या लेखी जेंव्हा स्वतःवर आले आणि ते देखील सामाजिक-आर्थिक विषमतेविरुद्ध आले तेंव्हा त्यावर बोलणे म्हणजे मुक्त-अर्थव्यवस्थेला (पक्षी: भांडवलशाहीस) पर्याय मागणे असा अर्थ होतो. म्हणून माध्यमे-विचारवंत जास्त बोलत नाहीत, जे बोलतात त्यांना प्रसिद्धी मिळत नाही, आणि कॅमेरॉन सारखे राजकारणी देखील दडपून टाकण्यासाठी कडक भाषा आणि कृती वापरत आहेत. हे असले दडपणे देखील बुमरँग होऊ शकेल अशी काळजी वाटते...

जगातील सगळ्यात मोठी लोकशाही असलेल्या देशातही सरकार फेसबुकवरचे खाजगी संदेश वाचणार आहे.

त्याच काळजी करण्यासारख्या मुद्यावर तर चर्चा करायची आहे. ब्रिटीश करतात तर आम्ही देखील करू शकू असे म्हणत दडपशाही चालू होऊ शकेल. अण्णांशी कसे वागले जात आहे - जाणार आहे, ही एक लिटमस टेस्ट ठरेल. असो.

खाजगी उद्योगावर घाला

पण सोशल नेटवर्कींग साईट (फेसबूक) ही खाजगी आहे आणि त्यातील खाती गोठवणे हे त्या खाजगी उद्योगावर घाला घालण्यासारखे आहे. ते देखील गुन्हा सिद्ध होण्याआधी शिक्षा देण्यासारखे

फेसबुकच्या (सोशल साइट्सच्या) माध्यमातुन एखादी व्यक्ती लोकांना चिथावु लागली, द्वेषमुलक भावना भडकावु लागली तर अश्या व्यक्तिचे खाते गोठण्याचा अधिकार कायदा सुव्यवस्था संस्थांना नसतो का?

खाजगी कंपनीने दिलेल्या सोयी (फोन/इमेल/मेसेजेस) समाजविघातक कृत्य करण्यासाठी वापरण्यात येत असतील तर त्या काढून घेणे हे कसे काय अयोग्य? समजा एखाद्याचा बंदुक खरेदी करण्यामागचा उद्देश खून करणे/दरोडा घालणे हा आहे हे माहित असेल तर त्या व्यक्तिस बंदुक खरेदीपासुन प्रतिबंधीत केले जावे किंवा बंदुकिची खरेदी झाली असल्यास ती काढून घेणे हे योग्य नाही काय? ह्यामधे बंदुक विक्रेत्याचे नुकसान होते आहे हे कसे म्हणता येइल?

तुम्हाला काय वाटते?

विद्वान उपक्रमी ह्यावर चर्चा करतीलच पण ह्या चर्चेनिमित्त मला एक प्रश्न पडला. ही चर्चा जशीच्या तशी प्रस्तावक विकास ह्यांनी 'तिकडे' आणि 'इकडे' टाकली आहे.

पण ही चर्चा मात्र त्यांनी फक्त 'तिकडेच' टाकली.

ह्याचे कारण काय असावे बरे?...तुम्हाला काय वाटते?

बदल

पण म्हणून ज्या पायावर हे राष्ट्र उभे आहे त्यावरच घाला घालावा का? जर अशीच सत्ताधिशांच्या मताप्रमाणे लोकशाहची मुल्ये बदलणार असतील तर, या "सर्व लोकशाहींच्या आईस", "माता न तू वैरीणी" असे म्हणावे का?

ज्या पायावर ते राष्ट्र उभे आहे त्या राष्ट्रात गेल्या अनेक वर्षात अनेक सामाजिक/आर्थिक बदल घडले, अशा बदलांच्या पार्श्वभूमीवर पाया अजून चांगला करण्यासाठी काही मुलभूत बदल करावे लागतील असे वाटते, लिबर्टी आणि फ्रीडम ह्यातला फरक अधिक स्पष्ट होणे गरजेचे आहे, युज आणि अब्युज ह्यातला फरक स्पष्ट होणे गरजेचे आहे. ब्रिटन हे सर्व योग्य पद्धतीने करत आहे असे अजिबात म्हणणे नाही, पण बदल हा दोन्ही कडे घडणे साहजिक आहे असे वाटते.

अजून एक प्रश्न पडतो, याचे तरंग भारतात पण उठू शकतात का? मग भ्रष्टाचार विरोधात आंदोलन करणारे देशद्रोही नाही, पण त्यांना सामाजीक असंतोषास कारणीभूत ठरवत असेच मानवी हक्कांपासून वंचीत करणे अथवा त्यांचे सोशल नेटवर्कींग अथवा अधुनिक टेलीकम्युनिकेशनचे हक्क गोठवायाला लागले तर योग्य ठरेल का? असे होऊ शकेल का?

नक्कीच योग्य होणार नाही, पण असे होऊ शकते का? तर हो होऊ शकते पण असे झाल्यास प्रजा सत्ता उलथवून टाकेल, बदल घडण्यास योग्य परिस्थिती निर्माण झाली की तो होतोच. अपयशी हेल्मेट सक्ती हे योग्य उदाहरण आहे.

कॅमेरॉनने जे केले त्याला मिटीगेशन प्लान म्हणता येईल, अशी परिस्थिती उदभवू नये म्हणून घेतेली जाणारी एक खबरदारी आहे, ती गोष्ट माणसाच्या व्यक्तिगत आयुष्यावर अमाप नियंत्रण सरकारला देईल हि शंका रास्त आहे, पण वेळो-वेळी कायद्यात बदल सुव्यवस्था राखण्यास मदत करू शकतात, त्या नियंत्रणाचा अब्युज झाल्यावर त्यातदेखील बदल केलेच जातील किंवा ते नियंत्रण नाकारले जाईल असे वाटते.

प्रायव्हसी

कालच टाटास्कायची जाहिरात टीव्हीवर पाहिली. त्यात टाटास्कायमुळे तुमचा मित्र कोणता चॅनेल पहात आहे हे तुम्हाला कळू शकेल असे एक फीचर सांगत होते.

तेव्हा "आपले आणि नीरा राडिया यांचे टेलिफोनवरील खाजगी बोलणे सार्वजनिक करू नये" या मागणीसाठी त्याच कंपनीचे मालक प्रायव्हसीचा मुद्दा घेऊन कोर्टात गेल्याचे आठवले.

नितिन थत्ते

 
^ वर