स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १
स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १
"येत्या २४ तासात विदर्भ, मराठवाडा आणि प. महाराष्ट्रासह कुठेकुठे मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून त्यापुढील ३६ तासात हवामानामध्ये फ़ारसा बदल संभवत नाही" अशी उद्घोषणा आकाशवाणी किंवा दूरदर्शनवर झाली तरी पावसाचे दर्शन होईलच याची खात्री देता येत नाही. कधीकधी २४ अथवा ३६ तासच काय ४८ अथवा ७२ तास उलटून जातात पण आकाशात कापसाच्या बोंडाएवढाही तुकडा दुर्बिनीने शोधूनही नजरेस पडत नाही. मात्र याउलट पुढील ४८ तासात आकाश निरभ्र राहून स्वच्छ ऊन पडेल, असा आकाशवाणीवर व्यक्त केला गेलेला अंदाज ऐकून जर एखाद्याने आपल्या लहानग्या मुलास शेतात न्याहारी पोचवायला पाठवायचे ठरवले तर त्याला रस्त्यात पावसाने झोडपलेच समजावे. एकदा तर "पावसाने दडी मारली, मान्सूनचे आगमन लांबले - शेतकरी चिंताग्रस्त" असा मुख्यमथळा असलेल्या वृत्तपत्राचे पार्सलच पुरात वाहून गेले होते. बिचारा वृत्तपत्र वाटणारा पोरगा कसाबसा वाहून जाता जाता बचावला होता.
आकाशवाणी, दुरदर्शन किंवा वृत्तपत्र यांचे पाऊसविषयक अंदाज हवामानखात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकावर आधारीत असतात. हवामानखात्याला वारंवार तोंडघशी पाडण्यात त्या वरूणदेवतेला काय समाधान लाभते कुणास ठाऊक पण त्याचे विपरित परिणाम मात्र या माध्यमांना भोगावे लागतात. हवामानखाते आपल्या जागी सुरक्षित असते पण विश्वासाहार्यतेला भेगा जातात या माध्यमांच्या. त्यावर जालिम उपाय म्हणून वृत्तपत्रे पाऊसपाण्याचे अंदाज छापण्याचे टाळतात आणि दुरदर्शन व वेगवेगळे टीव्ही चॅनेल जास्तीतजास्त वेळा हवामानाच्या अंदाजाच्या मथळ्याखाली केवळ कमाल आणि किमान तापमान दर्शवून मोकळे होतात.
कदाचित याच कारणामुळे शेतकरी वर्गात जेवढे स्थान पंचागाचे आहे, त्या तुलनेत हवामानखाते कुठेच नाही. हवामान बदलाच्या संभाव्यतेचे ढोबळमानाने का होईना पण काहीतरी आराखडे मनात गृहित धरल्याशिवाय शेती करताच येत नाही. हवामानशास्त्राचे शेतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. पंचागात पर्जन्यामानाची संभाव्यता व्यक्त केली असते ती फ़ारच मोघम स्वरुपाची असते पण बुडत्याला काडीचा आधार या न्यायाने वर्षानुवर्षे शेतकरी या पंचागातील हवामानाच्या अंदाजावर विश्वास ठेवून आहे. नक्षत्रानुरुप आणि नक्षत्रांच्या वाहनानुसार पाऊस पडत असतो, यावर त्याचा विश्वास आहे. नक्षत्राचे वाहन जर मोर असेल तर पाऊस थुईथुई येतो, वाहन बेडूक असेल तर भारी पाऊस येतो, वाहन गाढव असेल तर पळता पाऊस येतो किंवा वाहन जर म्हैस असेल तर पाऊस ठाण मांडून बसतो वगैरे. पंचागात व्यक्त केलेले अंदाज अचूक किंवा तंतोतंत नसतात पण एकदमच फ़ालतूही नसतात. मोघम असले तरी शेतीमधील उपयुक्ततेचा विचार केला तर हवामान खात्यापेक्षा काहीना काही अंशी अधीक विश्वासाहार्य नक्कीच असतात.
हवामानाचा अंदाज काढणे हे आकाशाला गवसणी घालण्यापेक्षा जिकिरीचे काम आहे, शिवाय हवामानशास्त्र अजून बाल्यावस्थेतच असल्याने हवामानखात्याचे अंदाज चूकत असावे, त्याला बिचारे हवामानशास्त्रज्ञ काय करतील, असेच मला वाटायचे आणि मग या शास्त्रज्ञाबद्दल सहानुभूती वाटायची. हवामान खात्याबद्दल टीकात्मक लेखन वाचून त्यांच्याबद्दल मनात करूणा उत्पन्न व्हायची. दोनवर्षापूर्वीपर्यंत तरी माझी अशीच मनोधारणा होती.
पण मी इंटरनेटवर आलो आणि भारतीय हवामानखाते वगळता वेगवेगळ्या परदेशी संकेतस्थळावरील हवामानाच्या अंदाजाची तपशीलवार माहीती पाहून दंगच झालो. बराच काळ मी या अंदाजाची अचूकता पडताळत राहिलो. या अंदाजावर आधारीत शेतीच्या कामाचे नियोजन करित राहिलो. त्याचा मला खूप फ़ायदा झाला. यावर्षी अगदी जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मला कपाशीची धूळ पेरणी करता आली. अंदाजाप्रमाणे पाऊस आला. माझ्या शेतीपासूनच्या १०० किलोमीटर परिघक्षेत्रात माझी लागवड इतरांपेक्षा दहा दिवस आधी आणि चांगली झाली. आकाशवाणी-टीव्हीवरील हवामानाचे अंदाज ऐकून ज्यांनी लागवडी केल्यात त्यांच्या लागवडी बिघडल्या. दुबार लागवडीचे संकट कोसळण्याची भिती उत्पन्न झाली होती.
मला ज्ञात असलेली हवामानाचे अंदाज वर्तविणारी काही संकेतस्थळे खालील प्रमाणे:
१) भारत मौसम विज्ञान विभाग
(Ministry of Earth Science, Govt of India)
http://www.imd.gov.in/
---------------------
२) भारत मौसम विज्ञान विभाग, पुणे
http://www.imdpune.gov.in/
---------------------
३) foreca
http://www.foreca.com
-------------------
४) weatherbug
http://weather.weatherbug.com
------------------
५) The Weather chanel India
http://in.weather.com/
-----------------------
६) MSN Weather
http://weather.in.msn.com
-----------------------
७) BBC
http://news.bbc.co.uk/weather/
-------------------------------
८) Agricultural Meteorogy Division
http://www.imdagrimet.gov.in
--------------------------------
यामध्ये फ़ोरिका आणि वेदरबग हे संकेतस्थळ मला अधिक विश्वासाहार्य वाटले. येथे पुढील दहा दिवसापर्यंतच्या हवामानबदलाचे अंदाज व्यक्त केलेले असते. अगदी दर तीन तासांनी हवामानात काय बदल घडतील याचा अंदाज व्यक्त केलेला असतो. शिवाय या अंदाजाचे स्वरूपही राज्यनिहाय किंवा प्रांतनिहाय असे मोघम स्वरूपाचे नसून विभागवार असते आणि हे विभाग ५०/१०० किलोमिटर क्षेत्रासाठी असते. तुम्हाला हवे ते तुमचे छोटेमोठे शहर शोधून त्या शहराचे हवामान ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी काय असू शकेल याचा अदमास घेता येतो.
या सर्व संकेतस्थळामध्ये शेतकर्याचा दृष्टीने अत्यंत निरूपयोगी, समजण्यास क्लिष्ठ, काहीही तपशिलवार माहीती उपलब्ध नसलेले संकेतस्थळ म्हणून उल्लेख करायचा झाला तर एकमेव नाव घ्यावे लागते ते भारत मौसम विज्ञान विभागाच्या संकेतस्थळाचे. या संकेतस्थळाचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास "शेतीमधील उपयुक्ततेच्या दृष्टीने अत्यंत फ़डतूस" असेच करावे लागेल. इथे सारे मोघमच मोघम आहे. "पुढील ४८ तासांत विदर्भ, मराठवाडा, गोव्यात कुठेकुठे पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे" हीच यांची हवामानाच्या अंदाजाची संभाव्यता. त्यावरून कशासाच काहीही थांगपत्ता लागत नाही. पाऊस कुठे आणि केव्हा येणार, याचाही बोध होत नाही. असे मोघमच अंदाज व्यक्त करायचे असेल तर त्यासाठी शास्त्रज्ञ कशाला हवेत? एवढे किंवा यापेक्षा अधिक चांगले भाकित तर एखादा शेंबडा पोरगाही वर्तवू शकेल. त्यासाठी हजारो कोटी रूपये या हवामान खात्यावर खर्च करायची गरजच काय? एखाद्या बालवाडीतल्या मुलास पेपरमेंट किंवा कॅटबरी दिल्यास तो सुद्धा एवढं वाक्य सहज बोलून दाखवेल. जे काम पेपरमेंटच्या चार गोळ्यांनी होण्यासारखे आहे तेथे हजारो कोटी खर्च करून पांढरे हत्ती पोसण्याखेरीज आपण दुसरे काय करत आहोत?
मुख्य मुद्दा असा की, जे काम परदेशी शास्त्रज्ञांना जमत आहे ते काम आमच्या भारतीय शास्त्रज्ञांना का जमू नये? फ़ोरिका आणि वेदरबग यासारख्या संकेतस्थळावरील अंदाज अचूक, तंतोतंत किंवा खरेच असतात, असे मला म्हणायचे नाही. ते चुकण्याचीही शक्यता असतेच. शेवटी अंदाज हा केवळ अंदाज आणि शक्यता ही केवळ शक्यताच असते. पण ही संकेतस्थळे सांभाळणारी माणसे जेवढे परिश्रम घेतात, चिकाटी दाखवतात, तपशिलवार अंदाज व्यक्त करण्याचे धाडस आणि आत्मविश्वास बाळगतात, गरजेनुरूप सॉफ़्ट्वेअर निर्माण करण्याचे कौशल्य दाखवतात; तेच आमच्या हवामानखात्याला का जमू नये? हाच मुख्य प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शोधणेही तेवढेच गरजेचे आहे.
क्रमश:
गंगाधर मुटे
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
हवामान अंदाज
हवामान खात्याच्या 'दूतदूरतक कहींकहीं वर्षा होगी" ह्या नेहमी ऐकू येणार्या वाक्याचा अर्थ काय?
अरविंद कोल्हटकर, जुलै २२, २०११.
जमायला पाहिजे खरे
जमायला पाहिजे खरे.
हवामानाचा अंदाजातला जो "मोघमपणा" असतो ; तो संभवनीयतेच्या भाषेत तरी बसवला पाहिजे. म्हणजे : "वर्धा जिल्ह्यात रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत पाउस पडण्याची संभवनीयता ७५% टक्के आहे", वगैरे.
हवामान विभागाच्या या दुव्यावर पूर्ण महाराष्ट्रासाठी दररोजची आठच ठिकाणांची माहिती दिलेली आहे. याहून अधिक असायला हरकत नाही. (तरी आंध्र प्रदेशापेक्षा बरे - तीनच ठिकाणांची माहिती आहे.)
या दुव्यावर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे हवामानाचे अंदाज दिलेले आहेत. परंतु हे अंदाज पीडीएफ फाईल मध्ये दिलेले आहेत, आणि आणि फाईलमध्ये आपला जिल्हा शोधावा लागतो. न देता सुबक संकेतस्थळावरती दिले असते, तर बरे असते. यासाठी संकेतस्थळ बनवणे कठिण नसावे, असे वाटते.
जिल्हानिहाय शेतकीस उपयुक्त हवामानाचे अंदाजही या संकेतस्थळावर दिलेले आहेत. पण तेही पीडीएफ. (मराठीतही अहवाल आहे, हे बरे.) या ठिकाणी सांगली जिल्ह्यासाठीचा अंदाज (पीडीएफ). परंतु सर्व जिल्ह्यांसाठी ताजा अंदाज नाही, हे बरे नव्हे.
जो अंदाज दिला आहे, तो परदेशात उपलब्ध असतो, तशाच प्रकारचा वाटतो आहे. परंतु ही माहिती शेतकर्यांना सहज मिळवता आली पाहिजे, अशी असावी.
(सूर्याच्या नक्षत्रप्रवेशाचे वाहन हे गणितज्योतिषातले नसून फलज्योतिषातले आहे. त्यास फारसा आधार नसावा.)
वेदरबग वि. हवामान खाते, सांगली व पुणे
सांगली
शुक्रवार २२ :
वेदरबग : तापमान २७/२२ डिग्री, पावसाची संभवनीयता ४०% (सरी किंवा पाऊस)
हवामान खाते : तापमान २८/२२, पाऊस पडणार २१ मिमि
शनिवार २३ :
वेदरबग : तापमान २६/२२ डिग्री, पावसाची संभवनीयता ५०% (सरी)
हवामान खाते : तापमान २८/२२, पाऊस पडणार १४ मिमि
रविवार २४ :
वेदरबग : तापमान २८/२३ डिग्री, पावसाची संभवनीयता ५०% (बूंदाबांदी, क्वचित सूर्यप्रकाश)
हवामान खाते : तापमान २७/२१, पाऊस पडणार २० मिमि
सोमवार २५ :
वेदरबग : तापमान ३१/२२ डिग्री, पावसाची संभवनीयता १००% (सरी)
हवामान खाते : तापमान २६/२१, पाऊस पडणार १३ मिमि
मंगळवार २६ :
वेदरबग : तापमान ३१/२२ डिग्री, पावसाची संभवनीयता ४०% (सरी किंवा पाऊस)
हवामान खाते : तापमान २७/२१, पाऊस पडणार ७ मिमि
- - -
पुणे
- - -
शुक्रवार २२ :
वेदरबग : तापमान २५/२२ डिग्री, पावसाची संभवनीयता ३०% (वादळी पाऊस)
हवामान खाते : तापमान २९/२२, पाऊस पडणार २५ मिमि
शनिवार २३ :
वेदरबग : तापमान २६/२२ डिग्री, पावसाची संभवनीयता ५०% (सरी)
हवामान खाते : तापमान २९/२२, पाऊस पडणार १९ मिमि
रविवार २४ :
वेदरबग : तापमान २७/२२ डिग्री, पावसाची संभवनीयता ३०% (वादळी पाऊस)
हवामान खाते : तापमान २७/२१, पाऊस पडणार २७ मिमि
सोमवार २५ :
वेदरबग : तापमान २९/२२ डिग्री, पावसाची संभवनीयता १००% (सरी)
हवामान खाते : तापमान २६/२१, पाऊस पडणार १७ मिमि
मंगळवार २६ :
वेदरबग : तापमान ३०/२२ डिग्री, पावसाची संभवनीयता १००% (सरी)
हवामान खाते : तापमान ३१/२२, पाऊस पडणार ७ मिमि
- - -
थोडेफार फरक दिसतात तर. पण फरक "खूप" आहेत काय? विशेषतः मंगळवारी वेदरबग आणि हवामानखात्याच्या अंदाजात फरक आहे. सांगली किंवा पुण्याचे कोणी उपक्रमी प्रत्यक्ष आणि अंदाजात तुलना करून बघतील काय?
काहि प्रश्न
लेख आवडला.
मी शहरी भागातच लहानाचा मोठा झाल्याने, मला ग्रामिण भागातली व तेथील अनेक विशयांची काहिही माहिती नाही.
लेखातून चांगली माहिती मिळाली. आपण उल्लेखलेल्या http://www.foreca.in/India/ .. ह्या संकेतस्थळावर मराठी सोडून इतर भारतीय भाशांमध्ये देखिल माहिती उपलब्ध आहे.
काहि प्रश्नः
-> ग्रामिण भागात सरपंचाचे कार्यालय किंवा जिल्हाधिकार्याचे कार्यालय असते कां? त्या कार्यालयात इंटरनेटची जोडणी झालेली असते कां? वर्तमान पत्रांमध्ये तरी अनेकवेळा वाचले आहे की आत्ता देशातील बरीच गावे (तेथील कार्यालये.. कोणती ते माहित नाही.) इंटरनेटने जोडली जात आहेत. तुमच्या म्हणण्यानुसार ज्या शेतकर्यांजवळ स्वतःची अशी साधने आहेत, व ज्यांना त्याचा वापर कसा करून घ्यायचा हे माहित आहे असे किती शेतकरी असू शकतील? (मग त्यात केवळ हवामानाचा अंदाज ही एवढीच बाब नसून धान्य बाजारातील भाव व त्यांमधील चढ-उतार, आंतरराश्ट्रीय बाजारातील हालचाली, शेतीतील नव-नवे तंत्र, शोध, नवी अवजारे इत्यादी)
-> सरपंचाचे कार्यालय वा इतर कोणत्याही ठिकाणातून आपण मांडलेली माहिती शेतकर्यांना पूरवण्याचे काही प्रयत्न होत आहेत कां?
कृपया माहिती द्याल कां?
परदेशी संकेतस्थळे
मला वाटतं परदेशी संकेतस्थळे ही काही फार वेगळी नाहीत. कमाल आणि किमान तापमान जवळपास योग्य असते पण पाऊस-पाण्याची वर्तवलेली शक्यता तंतोतंत नसते.
या वर्षी आमच्याकडे उन्हाळ्याने कहर केला आहे. गेले ५ दिवस (म्हणजे गेले तीन दिवस, आज आणि उद्या) आमच्याकडे पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. एक टिप्पूसही पाऊस झालेला नाही. :-(
माझी शेतजमीन नाही पण लॉन जलसिंचनामुळे तग धरून आहे. इतरांची मरायला टेकलेली आहेत. शेतकरी बहुधा इंटरनेट सोडून आकाशाकडेच नजर लावून बसलेले असावेत. असो.