'भाषा आणि जीवन'चा हिवाळा २०११ अंक

मराठी अभ्यास परिषदेचे त्रैमासिक 'भाषा आणि जीवन'चा हिवाळा २०११ अंक परिषदेच्या संकेतस्थळावरही प्रकाशित झाला असून त्याचा दुवा उपक्रमावर डावीकडे दिलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. 'भाषाभिमान आणि भाषाविवेक' हा अ. रा. यार्दी यांच्या स्वभाषा-व्यवहारासंबंधी लेख, 'खानदेशातील गुर्जर बोली : काही निरीक्षणे' हा फुला बागुल यांचा लेख, 'राज्य मराठीचे... इंग्रजी शाळांचे' हा प्रकाश परब यांचा मातृभाषेतील शिक्षणाविषयीचा प्रतिसादात्मक लेख, मनोहर राईलकरांचा 'भाषेवर वर्चस्व कुणाचं?' हा हलका फुलका लेख, या आणि अशाच अनेक लेखांनी हा अंक सजला आहे.

'मराठीकरण, भाषिक देवघेव, समृद्धी इ.' या सुशान्त देवळेकरांच्या लेखात उपक्रमावरील मागे झालेल्या चर्चेचा संदर्भ आहे.

या अंकावर, त्यातील लेखांवर अधिक चर्चा करण्यासाठी, तसेच अभिप्रायांसाठी उपक्रमावर ही चर्चा सुरू करण्यात येत आहे.

Comments

टंकलेखनातील चुका

अंक उघडला. टंकलेखनाच्या चुकांमुळे थोडा विरस झाला.

उदा. संपादकीयाच्या पहिल्याच ओळीत टंकलेखनाचे दोष आढळले.

अलीकडे महाराष्ट्रात तर्हेभतर्हेंच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे पेव फुटले आहे. सन्माननीय अपवाद वगळता या कार्यक्रमांमध्ये होणार्याभ भाषेच्या वापराविषयी नाराजी व्यक्त करणे गरजेचे वाटते.

र्ङ आणि र्‍ङ या रका/फारांच्या टंकलेखनात अनेक ठिकाणी चुका आहेत.
EPIGRAPHIA INDICA चे मराठी टंकलेखन ‘पिग्राफिया इंद्रिकाए’ असे झालेले आहे.
इ.इ.
कृपया तांत्रिक बाबी सांभाळणार्‍या व्यक्तींनी लक्ष घालावे. असो.
बाकी अंक वाचून प्रतिक्रिया देईनच.

रूपांतरातल्या उणिवा

ह्या टंकलेखनापेक्षा ऍस्की ते यूनिकोड रूपांतरातल्या उणिवा आहेत. उपलब्ध वेळेत लवकरात लवकर एकहाती अंक चढवला आहे. असो.

ह्याबाबतीत मराठी अभ्यास परिषदेला स्वयंसेवकांची गरज आहे. पूर्वी ह्याबाबतीत आवाहनही केले होते. उपक्रमींनी पुढाकार घ्यावा.

पटता तो टेक. नहीं तो रामटेक.

एकेक लेख

आपल्या प्रयत्नांचे स्वागतच आहे. प्रत्येकी एक एक लेख काही उपक्रम सदस्यांना दिला तर या उणिवा नाहीशा होऊ शकतील.
प्रत्येक त्रैमासिकात एक ऍस्की ते युनिकोड रूपांतरीत लेख तपासण्यास आणि गरज लागेल तेथे सुधारण्यास मी तयार आहे.

चुका नाहीत, उणिवा असाव्यात.

भाषा आणि जीवनच्या संपादकीयामध्ये जोडाक्षरासाठी वापरायच्या र्‍ (चंद्रकोरीसारखा अर्धा र) याऐवजी ऱ (नुक्तावाला र) वापरला गेला आहे, एवढाच दोष मला माझ्या संगणकावर दिसतो आहे. हा दोष खरोखरच जर आस्कीचे युनिकोड करताना निर्माण होत असेल तर मुळात आस्की का वापरावे? आणि या बाबतीत उपक्रमाचे सदस्य काय मदत करू शकतील? --वाचक्नवी

वाचत आहे.

प्रथमतः हा अंक प्रकाशित करणार्‍या सर्वांना धन्यवाद.

'मराठी प्रमाणभाषेच्या लेखनाविषयीची माझी संकल्पना' हा दिवाकर मोहनी यांचा लेख अत्यंत आवडला.
लेख माहितीप्रद तर आहेच पण त्यात व्यक्त झालेली मते विचार करण्याजोगी आहेत.
'प्रमाण लेखन' हे कोणत्याही भाषेचे अत्यावश्यक अंग आहे. या लेखनाचे सुलभीकरण करण्याच्या नादात आपण मातृभाषा शिकण्याचे आणि शिकवण्याचे विरलीकरण करत आहोत याचे भान आले. मोहनींच्याच शब्दात -

आम्ही जसे बोलतो तसे लिहितो किंवा तसे लिहावयास पाहिजे ह्या आपल्या समजामुळे ‘‘मातृभाषा काय शिकवायची?’’ असे आम्हांस वाटू लागले. भाषेच्या शिक्षणाच्या नावाने आम्ही थोडे साहित्य शिकविले; परंतु भाषेचे व्याकरण व शब्दांची घडण ह्या दोन गोष्टी शिकविण्याकडे आम्ही पूर्ण दुर्लक्ष केले.

राईलकरांचा उपरोल्लेखित लेख खरेच मजेदार आहे. स्त्रीलिंगी नामांचे पुल्लिंगी नामांवर वर्चस्व लेखकाने खुमासदारपणे दाखवून दिले आहे. समाजाची मानसिकता आणि त्याची भाषा (विशेषतः नामे) यांच्यात सूक्ष्म संबंध असावा. (वृषाली देहाडरायांचा ‘गमती भाषेच्या’ हा 'पावसाळा २००४,भाषा आणि जीवन' मधला लेख वाचायला मिळाला तर बरे होईल.)
एखाद्या भाषेत चमत्कृतीपूर्ण शब्दांची भर कशी पडू शकते ते मंटोंचा लेख सांगतो तर इतर भाषेतील शब्द मुख्य भाषाप्रवाहात कसे सामिल होतात ती प्रक्रिया 'चार अल्पपरिचित शब्द' हा अरविंद कोल्हटकरांचा लेख स्पष्ट करतो.

'यमलार्जुन' हा श्री. आचार्य यांचा लेख एखादा शब्द सुप्रसिद्ध व्यक्तींच्या अज्ञानी वापरामुळे कालौघात कसा बदलत जातो त्याचे सोदाहरण स्पष्टीकरण देतो. इथे 'पुकाचे-फुकाचे'या भेदावर उपक्रमावरील श्री. धनंजय यांनी केलेली चर्चा आठवावी.

अजून काही लेख वाचणे बाकी आहे. सर्वच लेखक उच्चविद्याविभुषित संशोधक आहेत. परंतु जास्तीत-जास्त मराठीप्रेमींना या नियतकालिकाकडे आकृष्ट करण्यासाठी या प्रतिसादात नमूद केलेल्या लेखांसारखे माहितीपूर्ण आणि मनोरंजक लेख जास्त यावेत अशी अपेक्षा आहे.

यापुढेही असेच उत्तमोत्तम लेखन वाचकांना वाचायला मिळो ही अपेक्षा.
बाकी वाचकांच्या मतांच्या प्रतिक्षेत.

लेखावरील माझे मत

'मराठीकरण, भाशिक देवघेव, समृद्धी इ. ' ('इत्यादी' कशाला टाकला?) सुशांत देवळेकर , यांचा लेख वाचला. हा लेख उपक्रम या संकेतस्थळाशी संबंधित आहे, म्हणून केवळ ह्याच लेखावर इथे मत प्रदर्शन करणे उचित वाटते. इतर लेखक ह्या संकेतस्थळावर आपले विचार घेवून आले तरच त्यांच्या विचारांवर मत प्रदर्शन करणे योग्य होईल.

हा लेख त्यांच्या आधिच्या लेखापेक्शा उत्तम झाला आहे. पण त्यांचा हा लेख 'भाशा विशयक वैचारीक अवकाशाच्या निम्न स्तरावरील असून तो त्या स्तरावरील केवळ वर्णनात्मक प्रकटीकरण' आहे. लेखामध्ये भाशासंमृद्धी साठी 'काय नसावे?', 'कां नसावे?' हे सांगण्याचा उत्तम प्रयत्न आहे. 'भाशा विशयक वैचारीक अवकाशाच्या निम्नस्तरावर' ' भाशासंमृद्धीबाबत' सध्या अनेकांच्या मनात असलेल्या गैरसमजांना दूर करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे. सुशांत मित्रा, वेल डन!

'(भविश्यात,) जे असावे ते असे असू शकते वा असावे' असे सांगणारा, दिशा देणारा हा लेख नाही.
पण तरीही भाशासंमृद्धीसाठी जे विचारमंथन आवश्यक आहे ते सुरू होण्यासाठी 'आईस-ब्रेक' म्हणून हा प्रयत्न झ्याक आहे.

भाशासंमृद्धी म्हणजे काय? सुशांत ने हे मुद्दे मांडले आहेत.
1) 'अस्मितेचा आविष्कार' हे उद्दिष्ट असेल तर मराठीकरण केलेच पाहिजे.
2) 'भाषासमृद्धी' हे उद्दिष्ट मानले तर मराठीकरण करणे बरे ठरेल.
3) 'आकलनसुलभता' हेच उद्दिष्ट असेल तर ते साधण्यासाठी मराठीकरण केलेच पाहिजे असे नाही.

यावर माझे मत-
शब्दांचे- वाक्यांचे दोन रुपे असतात.
1) पदार्थरूप - शब्दाचे दिसणारे 'पद' हेच त्याचे रूप
2) भावर्थरूप - शब्दातून त्या-त्या प्रसंगी निघणारा भाव - हेच त्याचे रूप

इंग्रजीत वा इतर भाशेत जसे शब्द व अर्थ असतात तसेच्या तसे मराठीत आणणे म्हणजे पदार्थरूप जसेच्या-तसे आणणे.
काही मंडळी पदार्थरुपाचे भाशांतर करून, एक नवा शब्द घडवतात.
काही मंडळी पदार्थरुपाचे अपभ्रंश करून नवा शब्द चलनात आणतात.
काही मंडळी भावर्थरुपाचे संस्कृतमध्ये भाशांतर करून, संस्कृतच्या व्याकरणाच्या बैठकीवर, त्यांच्या-त्यांच्या समजूतीने नवा शब्द घडवतात.

इथे कोणाचे चूक? वा कोणाचे योग्य म्हणता येईल? त्याने भाशासंमृद्ध कशी होईल?

तुम्ही म्हणाल, काय सांगायचेय ते लवकर सांगा की, राव..ले!
मी इथे टप्प्या-टप्प्याने तुम्हाला भाशेच्या भावर्थरूपाचे जे वैचारीक अवकाश असते त्याचे स्तर उलगडून सांगत आहे.

मराठी भाशा संमृद्ध होण्यासाठी शब्द कसे घडवायचे? हे ठरवण्याचे जे वैचारीक अवकाश आहे, त्यात सुसुत्रता, सुस्पश्टता आणणे गरजेचे आहे. वैचारीकतेच्या जुन्या ऑपरेटींग सिस्टमवर नव-नवे सॉफ्टवेअर कसे बरे चालतील? , किंवा भिन्न-भिन्न ऑपरेटींग सिस्टीमवर वेगवेगळे सॉफ्टवेअर सोशल मिडीया व आयडिया एक्सचेंज साठी कसे बरे उपयोगाचे होतील? इथे ऑपरेटींग सिस्टम म्हणजे 'व्याकरणाची शब्दबद्ध मांडणी'! शब्द कसे घडवावेत? हे सद्ध्याची वापरात असलेली मराठीची 'व्याकरणाची मांडणी' स्पश्टपणे मार्गदर्शन करत नाही.

'इंजेक्शन' हा एक शब्द व ती एक कृती आहे.
पेंट्रेशन हा एक शब्द व ती एक कृती आहे.
ह्या शब्दांचे भावर्थरूप आकळताना त्यांची 'कृती' चित्रबद्ध करावी लागेल, ती संकल्पना शब्दबद्ध करून स्पश्ट झाली की दोन शब्द मराठीतून सुचू शकतील.
सध्यातरी 'मराठीचे व्याकरण' हे (संस्कृतमुळे) पदार्थरुपावरच जोर देणारे आहे. 'भावर्थरूपातून चित्र व चित्रातून नवी संकल्पना, नव्या संकल्पनेला नवा शब्द!', वैचारीकतेचे अवकाश असे विकसित केले तर, अर्थबोधनात बदल ('पॅराडाईम शिफ्ट' ) होवून मराठी भाशा संमृद्ध होईल/होवू शकेल!

रावल्यांना मते मांडताना त्रास कधीपासून?

इतर लेखक ह्या संकेतस्थळावर आपले विचार घेवून आले तरच त्यांच्या विचारांवर मत प्रदर्शन करणे योग्य होईल. रावले तुम्ही ग्रेट आहात.

त्यांनी कशाला यायला पाहिजे. तुम्हाला तशीच मते मांडताना त्रास होतो का? स्त्रीपुरुष संबंध, लैंगिकता आणि मराठी प्रमाणलेखन असा आवाका असणारा एखादा मौलिक प्रतिसाद खरे तर अपेक्षित आहे तुमच्याकडून.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

त्रास कुणाला होतोय?

येथे ज्यांनी मते मांडलीच नाहीत त्यांच्या मतावर मत मांडायचा मला त्रास होतोय. असे मी कुठे लिहीलेय?

इतरांचे लेख तुम्ही वाचलेत कां? ते वाचा मग कळेल. सुशांत यांचा लेख त्यातील अनेक लेखांमध्ये उत्तम आहे. हेच सांगायचे होते.

----------------------------------
"तुझं वाचन किती? तू चिडतोस किती?"

ओह

येथे ज्यांनी मते मांडलीच नाहीत त्यांच्या मतावर मत मांडायचा मला त्रास होतोय. असे मी कुठे लिहीलेय?

अच्छा अच्छा. असे आहे होय. तर मग इतर लेखांमध्ये देवळेकर ह्यांचा लेख उत्तम का आहे ते तर सांगा. म्हणजे तुमचा उगाच रफ्फू केल्यासारखा प्रतिसाद कशाला? बाकी स्त्रीपुरुष संबंध (किंवा लैंगिकता) आणि प्रमाणलेखन ह्यांतला संबंध उलगडून दाखवणार ना? आम्हाला स्तिमित करणार ना?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

लिंका

लिंका गंडल्या आहेत.

दिवाकर मोहनींच्या वर लिहिलेल्या लेखाच्या अनुक्रमणिकेतील दुव्यावर टिचकी मारली तर दुसराच लेख उघडतो.

मोहनींचा लेख कसा उघडायचा कळत नाही.

नितिन थत्ते

मला तर दिसतो आहे लेख

आता दिसतो आहे लेख. इतर गंडलेल्या लिंका कुठल्या बरे? की सहज अनेकवचन वापरले?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सॉरी.

सहजच अनेकवचन वापरले (गेले). सॉरी.

दिवाकर मोहनींचे लेख आजचा सुधारक मध्ये वाचलेले होते म्हणून हा लेख वाचायची इच्छा झाली. त्या लिंकवर वेगळाच लेख दिसल्याने चिडचिड झाली.

नितिन थत्ते

अभिनंदन, धन्यवाद. सोहनी यांचा लेख

"भाषा आणि जीवन"चा अंक येथे देण्याबद्दल श्री. चित्तरंजन यांचे आभार मानतो.

दिवाकर मोहनी यांच्या लेखाचा दुवा सुधारला हे उत्तम झाले. मला सर्वप्रथम तोच लेख वाचायचा होता. (आणि काल लेख मिळाला नाही म्हणून थोडा विरस झाला होता.)

भाषेत कित्येकदा समसमान ध्वनिखंडांचे अर्थ संदर्भाप्रमाणे खूपच वेगळे असू शकतात. हे संदर्भ एक तर भाषेच्या आवाक्यातले असू शकतात : त्या वाक्यातील अन्य शब्द, ध्वनीतील आघात*, वगैरे. (*खरे तर ध्वनीतील आघात वेगवेगळे असल्यास ध्वनी वेगवेगळे मानावेत. परंतु आपल्या भाषेतील नैसर्गिक आघातांबाबत मराठी व्याकरणलेखकांचा अभ्यास हवा तितका सखोल नाही.) दुसर्‍या प्रकारचे संदर्भ भाषेच्या क्षेत्राबाहेरचे असू शकतात : म्हणजे हातवारे, चेहर्‍यावरील चर्या, बोटांनी केलेला निर्देश, वगैरे.

मोहनी म्हणतात की ग्रंथ वाचताना आजूबाजूचे संदर्भ नसतात, आणि लेखकाला शंका विचारून निरसन करण्याची सोयही नसते. म्हणून ध्वनीमध्ये नसलेले काही संदर्भ चिह्नांद्वारे दिले तर त्यांना हवे आहे. त्यातील त्यांना आवडणारे प्रमुख चिह्न म्हणजे अनुच्चारित अनुस्वार होय. समान ध्वनीच्या दोन वेगवेगळ्या अर्थाच्या शब्द-जोड्या असल्या, आणि त्यांपैकी एकाच अर्थसंदर्भात अनुच्चारित टिंब लिहिण्याची रूढी असली, तर असा फायदा होतो : लेखन वाचताना संदर्भाशिवायसुद्धा दोहोंपैकी एकच अर्थ निवडता येतो.

उच्चारापेक्षा वेगळी माहिती देणार्‍या चिह्नांचा फायदा घेण्याची पद्धत अन्य भाषांत आहेत, याबद्दल मोहनी उदाहरणे देतात. उदाहरणार्थ : इंग्रजीमध्ये समान उच्चार पण भिन्न अर्थ असलेली शब्दजोडी "/SON/, /SUN/" ही घ्यावी. वेगवेगळी चिह्ने वापरण्याच्या रूढीमुळे लिखाणात या दोहोंमध्ये संदिग्धता येत नाही. उर्दूमध्ये जे अरबी-उद्भव शब्द आहेत, त्यांच्यात ظ, ز, ض, यांचा उच्चार ज़ असाच होतो. परंतु ते वेगवेगळे अरबी ध्वनी असलेले मूळ शब्द जर वेगवेगळ्या अर्थांचे असतील, तर उच्चार एकच करता संदिग्धता येते. म्हणूनच लेखनात ती चिह्ने वेगवेगळी लिहायची पद्धत आहे.

या संदर्भात मोहनी म्हणतात की २०व्या शतकातल्या आदल्या भागातले शुद्धलेखनाचे नियम सोयीस्कर होते. /नाव/ (अर्थ : होडी) आणि /नांव/ (अर्थ : नाम) यांच्यात फरक करता येत असे. /खाऊ/ (अर्थ : खाण्याचा पदार्थ, व्याकरणातील "नाम" प्रकारचा शब्द) आणि /खाऊं/ (अर्थ : मी खावे काय?, व्याकरणातील "क्रियापद" प्रकारचा शब्द) या दोहोंत फरक करता येत असे.

- - -
माझे मत असे. मोहनी यांचे विचार पटण्यासारखे आहेत. तरी ते पुढील संदर्भात बघावेत :

वस्तुतः लेखनातील चिह्ने कितपत उच्चारभेद दाखवणारी असावी, आणि कितपत अर्थभेद करणारी असावी, ही ओढाताण प्रत्येक भाषेच्या लेखनात होतेच. बहुतेक लिखित भाषांत दोन्ही प्रकार आढळतात. मराठीत देवीचे नाव /अंबा/ आणि फळाचा प्रकार /आंबा/ या दोहोंचा उच्चार बहुतेक मराठीभाषक एकसारखा करतात. पण लेखन वेगवेगळे असल्यामुळे वाचणार्‍याला अर्थभेद कळतो. म्हणजे नव्या नियमांनी लिहिलेल्या मराठीतही चिह्नांचा फरक केला जातो. व्यस्त उदाहरण म्हणजे इंग्रजीत /read/ (उच्चार "रीड्", अर्थ वाचतो, वाचन हे नाम, वगैरे), आणि /read/ (उच्चार "रेड्", अर्थ वाचले). या दोहोंची लिहित चिह्ने एकसारखी आहेत, पण अर्थ वेगवेगळे आहेत.

वरील ओढाताण ही गणितसिद्ध आहे. कुठल्याही भाषेत ध्वनि-वर्णांची संख्या अगदी मोजकी असते. तसेच लिखित अर्थचिह्नांची - "मुळाक्षरे आणि विरामचिह्ने" यांची - संख्या मर्यादित असते. (सगळी मिळून बहुधा शंभराखाली, फारफारतर चिनी भाषेसारखी काही हजार चिह्ने असतात). पण अर्थसंदर्भांची संख्या प्रचंड असते, आणि नवे अर्थसंदर्भ सापडण्याची शक्यता ओळखली, तर अर्थसंदर्भांची संख्या कदाचित अगणित/अगण्य आहे. त्यामुळे प्रत्येक अर्थसंदर्भासाठी वेगवेगळे ध्वनीसुद्धा असू शकत नाही, आणि लिखित चिह्ने असणे अशक्यच आहे. त्यामुळे चिह्नांत संदिग्धता येणार, आणि ती आजूबाजूच्या शब्दांच्या (इतकेच काय दूरदूरपर्यंतच्या परिच्छेदांच्या) संदर्भाने दूर करावी लागणार. याला पर्याय नाही. काही प्रमाणात संदिग्धता त्या चिह्नातल्या चिह्नात जिरवली, तर सोय आहे. शंकाच नाही. पण याकडे सोय म्हणून बघितले पाहिजे, पूर्ण असंग्दिग्धतेचे उद्दिष्ट्यही मानू नये, पूर्ण असंदिग्धता साध्य असल्याचा भ्रमही बाळगू नये.

लिखित चिह्नांतून एखाद्या चिह्नाला आपण कधी ध्वनीसंकेत (टिंब असले तर अनुनासिक उच्चार) आणि कधी अर्थसंकेत ("नाव/नांव" येथे टिंब असले तर नाम, नसले तर होडी) असे दुहेरी काम करायची परंपरा निर्मिली तर फायदा होतो तो सोहनींनी सांगितला आहे, पण तोटाही लक्षात घ्यायला पाहिजे. वाचकाला कसे कळणार आहे, की येथे टिंब देऊन लेखकाने ध्वनिसंकेत सांगितलेला आहे की अर्थभेदाचा संकेत? म्हणजे पुन्हा एका वेगळ्या प्रकारची संदिग्धता आलीच. आता कोणाच्या नोंदवहीत "Read book." येथे अधोरेखित चिह्ने ही "रीड् बुक" (अर्थ : पुस्तक वाच) आणि "रेड् (red) बुक (अर्थ : लाल पुस्तक) या दोहोंत ध्वनिभेद करण्यासाठी आहेत काय? की "रेड् बुक" (अर्थ : पुस्तक वाचले) आणि "रेड् (red) बुक (अर्थ : लाल पुस्तक) या दोहोंत अर्थभेद करण्यासाठी आहेत?

या बाबतीत पायंडा घालून देताना फायद्या-तोट्याची तुलना करावी लागते. आणि प्रत्येक भाषेच्या ऐतिहासिक आणि सामाजिक परिस्थितीमुळे अर्थभेद-चिह्ने आणि ध्वनिभेद-चिह्ने यांची प्रमाणे कमीअधिक निवडली जातील.

इंग्रजीमध्ये २६ चिह्ने आहेत. (कॅपिटल वापरण्याची मुभा फार मर्यादित आहे, म्हणून ती वेगळी मोजली नाहीत.) तीसुद्धा लॅटिन या मावस-मावस-आजीच्या उच्चारांसाठी सोयीस्कर म्हणून फार पूर्वी घडवलेली आहेत. ५००-७०० वर्षांपूर्वी इंग्रजी भाषकांत प्रतिष्ठित समाज कुठला तो बदलू लागला, त्याच काळात प्रतिष्ठित उच्चारांत "ग्रेट व्हावेल शिफ्ट" झाला. आदल्या पिढीतल्या प्रतिष्ठितांनी पुस्तकांत लिहिलेली उच्चारानुसारी स्पेलिंगे ही पुढच्या पिढीतल्या प्रतिष्ठितांच्या उच्चारांसारखी मुळीच नव्हती. इंग्रजीच्या या ऐतिहासिक परिस्थितीमुळे त्या अर्थभेद संगणार्‍या चिह्नांचा सुकाळ झाला, आणि ध्वनिभेद सांगणार्‍या लिखित चिह्नांना थोडेसे अंग चोरून घ्यावे लागले. मराठीची परिस्थिती फारच वेगळी आहे. मराठीसाठी निवडलेली देवनागरी लिपी हीसुद्धा पूर्वीच्या संस्कृत (आणि प्राकृत) यांच्या सोयीसाठी निर्मिली गेली. पण या भाषा मराठीच्या आजी/मावस आजी भाषा आहेत. शिवाय देवनागरीतल्या चिह्नांनी मराठीतले सगळेच उच्चार जरी नीट लिहिता येत नसले, तरी बरेचसे उच्चार ठीकठाक लिहिता येतात. या ऐतिहासिक परिस्थितीमुळे मराठीमध्ये उच्चारभेद सांगणार्‍या चिह्नांचे महत्त्व हे अर्थभेद सांगणार्‍या चिह्नांपेक्षा त्या मानाने अधिक आहे.

- - -

युक्तिवाद सांगण्याचा ओघात मोहनी काही निव्वळ उपमा भाषावैज्ञानिक दाखले असल्यासारखे देतात. उदाहरणार्थ
१. संस्कृताची लेखनपद्धती उच्चारानुसारी नाही, हे सांगताना ते म्हणतात :

बंगालमधले संस्कृत पंडित, केरळमधले आणि पंजाबमधले पंडित संस्कृत ग्रंथांमध्ये लिहिलेल्या शब्दांचा उच्चार आपापल्या पद्धतीने, त्यांच्या मुखाला असलेल्या सवयीप्रमाणे करीत. पण ते उच्चार लेखनात आणण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच केला नाही.

हा दाखला योग्य नव्हे. बंगाली पंडितांच्या प्रमाणे केरळी पंडितांचे उच्चार प्रामादिक होते, आणि केरळी पंडितांच्या मते बंगाली उच्चार प्रामादिक होते. त्यांच्या-त्यांच्या मनात जे योग्य उच्चार होते त्याच प्रमाणे लेखन करण्याचा प्रयत्न हे सर्व पंडित करत. दुसर्‍या कोणाच्या प्रामादिक उच्चारांसाठी चिह्ने निर्मिण्यास कोण उद्युक्त होणार आहे?

अनुस्वारांनी नाम/अव्यय भेद असंदिग्ध होतो, याबद्दल मोहनी उदाहरण देतात :

मुळे हे नाम आणि मुळें अव्यय; साठी हे नाम व साठीं हे अव्यय.

ही उदाहरणे हवी तितकी चांगली नाहीत. पूर्वीच्या शुद्धलेखनांतही मुळा-भाजीचे अनेक नग = /मुळे/, वनस्पतीचा जमिनीतला भाग असलेले मूळ, त्याचे अनेकवचन = /मुळें/ ही दोन्ही नामेच आहेत. ते मूळ किंवा तो मुळा या दोघांचे एकवचनी तृतीयाविभक्तिरूपही अनुस्वारयुक्त /मुळें/ असेच होते. यालासुद्धा "नाम" म्हणण्यास हरकत नाही. हे तृतीयांतरूप शब्दयोगी अव्यय म्हणून वापरायचे प्रचलन आहे, उदाहरणार्थ /यामुळें/, /त्यामुळें/ वगैरे. या उदाहरणात टिंबामुळे मोहनी सांगतात इतकी असंदिग्धता येत नाही.
("साठे" नावाचा एक खाद्यपदार्थ आहे. त्याचे अनेकवचन पूर्वीच्या लेखनपद्धतीत /साठीं/ असेच होते. म्हणजे नामच. टिंब दिले म्हणून अव्यय आहे, असे काही असंदिग्धपणे कळत नाही.)
- - -

युक्तिवादांत बारीकसारीक दोष असले, आणि असंदिग्धतेचे लक्ष्य हे सैद्धांतिक दृष्ट्या अशक्य असले, तरी मोहनी यांचा लेख मननीय आहे. मराठी भाषेतील लिखित चिह्नांचा तोल हा उच्चारानुसाराकडून थोडासा अर्थभेदाकडे सरकवण्याचा त्यांचा प्रस्ताव विचार करण्यालायक आहे. पण निकष "सोय" होय, असंदिग्धता नव्हे.

प्रतिसाद

लेख वाचल्यावर तुमच्या प्रतिक्रियेचीच वाट पाहत होतो. प्रतिसाद पटला आणि आवडला.
मिहिर कुलकर्णी

शुद्धीकरणे

माझ्या वरील प्रतिसादात अनेक शब्द चुकलेले आहेत.
पैकी सर्वात मोठी घोडचूक म्हणजे "मोहनी" हे नाव कित्येक ठिकाणी "सोहनी" असे लिहिलेले आहे. याबाबत दिलगीर आहे.

अर्थानुसारी/उच्चारानुसारी

धनंजय यांचा प्रतिसाद जवळजवळ पटला.

मोहनींचे मत बहुधा

"मराठी लेखन अर्थानुसारी होते पण ते उच्चारानुसारी समजून विसाव्याशतकाच्या उत्तरार्धात अनुच्चारित अनुस्वार गाळण्यात आले जे चुकीचे होते" असे दिसते. बर्‍याच अंशी ते पटते.

कारण 'म' आणि 'न' हे मुळातच अनुनासिक असल्यामुळे नाव आणि नांव किंवा मी आणि मीं यांचा वेगळा उच्चार संभवत नाही. त्या अर्थी नांव हे अर्थभेद म्हणूनच वेगळे लिहिले जात असावे.

या चुकीच्या बदलाचे कारण लेखनाचे सुलभीकरण असे नसावे. ज्यांना 'शुद्ध'लेखनाचा अभिमान होता अशा अभिजनांनी ते 'शुद्ध'लेखन स्वतःला त्रासाचे वाटू लागल्यावर (भाषिक सत्ताधारी असल्यामुळे) सोयिस्करपणे शुद्धलेखनाचे नियमच बदलून घेतले आणि अर्थभेद दाखवणारे लेखन बाद करवले. तसेच भाषिक अभिजन आता ष चा उच्चार वेगळा करत नाहीत - करता येत नाही - म्हणून लवकरच श/ष हा भेद नष्ट केला जाईल असे याच संस्थळावरील काही उदाहरणांवरून वाटते. ;-)

नितिन थत्ते

नांव आणि मीं

नांव हा मराठी शब्द ज्या संस्कृत नामवरून आला त्या नाममध्ये दोन नासिक्य वर्ण आहेत, साहजिकच मराठीतल्या नांवमध्ये दोन अनुनासिके आली. संस्कृतमधल्या नाविक, नाविन्‌, नाव्य वगैरे नौकासंबंधीच्या शब्दांमध्ये अनुस्वार नव्हता, त्यामुळे तशा अर्थाच्या मराठी शब्दातही तो आला नाही.
संस्कृतमध्ये तृतीयेचे प्रत्यय "एन आभ्याम्‌ ऐः" हे आहेत. एकवचनी एन प्रत्ययातल्या न या अनुनासिकामुळे मराठीतल्या मी चे तृतीया विभक्तीचे रूप मीं असे अनुस्वारयुक्त झाले. जरी हा अनुस्वार उच्चारणात उतरला नसला तरी तो व्युत्पत्तिसिद्ध आहे.--वाचक्नवी

मोहनी आणि धनंजय

मोहनींचा लेख आवडला आणि त्यावरच्या धनंजयांच्या प्रतिसादातले बहुतेक मुद्दे पटले.

मोहनी म्हणतात, मराठी ही भाषा संस्कृतपासून आलेली नाही. हे यापूर्वी अनेकांनी म्हटले आहे. काहींच्या मते मराठी आणि इतर देशी भाषांवर संस्कार करून संस्कृत तयार झाली, तर विश्वनाथ खैरे तामीळपासून मराठी झाली असे म्हणतात. या असल्या मतांचे खंडण यापूर्वी अनेक विद्वानांनी केले आहे, तेव्हा मोहनींच्या मताचा विचार करायचे फारसे कारण नाही.

मोहनी असेही म्हणतात की संस्कृत भाषेचे लिखाण उच्चाराधिष्ठित नाही आणि उच्चार लिखाणाप्रमाणे होत नाहीत. याही मताकडे लक्ष देण्याचे कारण नाही. कारण असे असते तर केवळ पाठांतराच्या जोरावर संस्कृत शेकडो वर्षे जिवंत राहूच शकली नसती. प्रांतानुरूप काही थोडेफार उच्चारभेद संभवतात, पण अशांची संभावना अशुद्ध उच्चार म्हणूनच केली जाते.

अनुस्वार दिल्याने अर्थभेद आणि व्याकरणभेद स्पष्ट होतीलच असे नाही हे धनंजयांचे म्हणणे योग्यच आहे. पण जर होण्याची थोडीजरी शक्यता असेल, तर तथाकथित अनुच्चारित किंवा अर्धानुनासिक अनुस्वार जरूर असावेत असे मला वाटते. अगदी प्रत्येक वेळी संदर्भानेच अर्थ लावावा लागू नये. नेहमीचे उदाहरण : "कल्पवृक्ष कन्येसाठीं लावुनियां बाबा गेलां " यातल्या गेलांतला अनुस्वार काढला की कोणीतरी भोंदूबाबा कल्पवृक्ष लावून गेला असा अर्थ काढला गेल्यास आश्चर्य नाही. आशा भोसलेंचे "फिरुनी नवी जन्मेन मी" हे गाणे जर एखाद्या पुरुषाने म्हटले तर त्याला नवी या शब्दाऐवजी नवें ,म्हणजे नव्याने हा शब्द टाकून गाणे यथायोग्य करता येईल. "टपालहंशीलमधल्या ह वरचा अनुस्वार काढण्यात काय हंशील ?"असे पुल एकदा लिहून गेले आहेत.

मुळात अनुस्वार का काढले याची कारणे विचारांत घेतली की ते परत आणावेत की नाहीत हे ठरवता येईल.
महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाल्यावर आता सर्व कारभार मराठी भाषेतून होईल आणि त्यासाठी फायलींवर केवळ मराठी लेखन होईल. अशा वेळी तथाकथित गरज नसलेल्या अनु्च्चारित अनुस्वारांनुळे लेखनाला अडथळा निर्माण होईल, असा विचार यशवंतराव चव्हाणांनी मांडला आणि तत्कालीन मराठी महामंडळाच्या लोकांना शुद्धलेखनाचे नियम तांतडीने सुधारा असा आदेश दिला.

सुधारित नियमांवर पुरेशी चर्चा न झाल्याने द.वा.पोतदार यांनी नियमांच्या शेवटी "हे नियम अंमलात आले तरी जुन्या नियमांनुसार केलेले लिखाण दंडार्ह मानू नये" अशी पुस्ती जोडायला लावली. नपुंसकलिंगी नामे-सर्वनामे आणि त्यांची क्रियापदे यांच्यातल्या शेवटच्या एकारावर अनुस्वार असे, त्याप्रमाणे "(तें) कुत्रें चावलें " या वाक्यावरून ते वाक्य बोलणार्‍याला चावणारा कुत्रा होता की कुत्री हे नक्की माहीत नसल्याचे समजत असे. आता तो अर्थ सांगण्यासाठी "कुत्रं चावलं "असे वाक्य वापरात आले. म्हणजे अनुस्वारित अनुस्वार काढण्यासाठी जो अट्टहास केला होता तो फुकटच गेला. त्यापेक्षा "कुत्रें गेलें" असे एकारान्त अनुस्वारित लिखाण आणि कुत्रं गेलं असा उच्चार केला असता तर काय बिघडले असते?

मराठीत लिहिताना नि, आणि, आणि यथापि-तथापि सारखी अव्यये सोडली तर, इ-उकारान्त समासपूर्व नसलेल्या शब्दांतले इकार-उकार दीर्घ लिहावे, या नियमाने मराठी भाषेतले लिखाण उरलेल्या तमाम भारतीय भाषांपेक्षा वेगळे झाले. गुजराथीनेही ऊंझा सुधारणांन्वये सर्व इकार दीर्घ आणि ऊंझा हा शब्द सोडून इतर सर्व शब्दांतले उकार र्‍हस्व लिहावेत असा अशास्त्रीय नियम स्थापित करण्याचा प्रयत्न केला. तिकडच्या भाषापंडितांच्या मते गुजराथी माणसे तसाच उच्चार करतात. शक्य आहे. पण यासाठी "असे" लिखाण असले तरी "तसा" उच्चार करावा असा साधा नियम करता आला असता. नशीब की गुजराथीतल्या त्या ऊंझा सुधारणांना सरकारी मान्यता मिळाली नाही.

इंग्रजी शिकवताना इट्‌ आणि दे या दोघांना मराठीत ते हाच शब्द वापरायचा हे शिकवताना शिक्षकांची काय तारांबळ उडते ते मला माहीत आहे. छपाई करताना आता खिळे जुळवावे लागत नाहीत, त्यामुळे अनुस्वारांमुळे छपाईचे काम फार जिकिरीचे होते हे कारणही आता उरलेले नाही. संस्कृत, हिंदी, फ़्रेन्च यांसारख्या भाषांत अर्धानुनासिके आहेत. इतरही अनेक भाषांत असावीत. अशा वेळी केवळ सचिवालयांतल्या कारकुनांच्या सोईसाठी मराठीतले तथाकथित अनुच्चारित किंवा अर्धोच्चारित अनुस्वार उडवले ही गोष्ट मराठीसाठी निश्चितच अनैसर्गिक आहे. माणूस बोलताना हं हं सारखे उच्चार करतो, ते त्याला ह ह असे करायला लावणारे, बा.गं टिळक यांच्या नावातल्या ग चा अनुनासिक उच्चार ,जर अनुस्वार दिला नाही तर कसा होईल हा विचारही महामंडळांच्या लोकांनी केला नव्हता.

यावर उपाय म्हणजे (१) उच्चारानुसारी प्रमाण लेखन ही संकल्पना मोडीत काढून शक्य असेल तेव्हा लिखाणानुसार उच्चार हा नियम करावा. अन्त्य इकार र्‍हस्व असला तर दीर्घ उच्चारायला हरकत नसावी. गुण, हित या सारखे शब्द जर कुणी गूण, हीत असे उच्चारले तर ते बोलीभाषेतले उच्चार आहेत असे समजावे. (२)तथाकथित अनुच्चारित आणि अर्धोच्चारित अनुस्वार परत प्रस्थापित करावेत, आणि असे केल्याने तसले शब्द व्याकरणभेद आणि अर्थभेद दाखवतीलच अशी अपेक्षा करू नये. (३) शुद्ध मराठीचा जिकडेतिकडे आग्रह धरणारे मनोहर राईलकर लिहितात तशी बोलीभाषा वैचारिक लेखनात न वापरता संवादात्मक नसलेले सर्व लिखाण प्रमाण भाषेतच असले पाहिजे. इंग्रजी आणि भारतातल्या इतर भाषा जसे करतात तसेच मराठीने वागावे, आपला सवतासुभा निर्माण करू नये.---वाचक्नवी

इट् दे

>>इंग्रजी शिकवताना इट्‌ आणि दे या दोघांना मराठीत ते हाच शब्द वापरायचा हे शिकवताना शिक्षकांची काय तारांबळ उडते ते मला >>माहीत आहे.
मी अनुस्वार काढल्यानंतरच्या मराठीमध्येच शिकलो आहे, पण कधी इट् आणि दे मध्ये घोळ घातल्याचे आठवत नाही. मला बहुतांशी वेळा संदर्भाने समजते.
मिहिर कुलकर्णी

शिक्षकांचा गोंधळ

मी शिक्षकांचा गोंधळ उडतो असे म्हटले होते.
बहुतांशी वेळा संदर्भाने समजते याचाच अर्थ, कधीकधी समजत नाही, यालाच गोंधळ होतो असे म्हणतात.
---वाचक्नवी

चांगला अंक

अंक वरवर चाळला. काही लेख वाचावेसे वाटले. अंक पीडिएफमध्येही उपलब्ध करून दिल्यास सोयीचे होईल.

प्रकाशचित्र आणि छायाचित्र

भाषा आणि जीवनमध्ये मनोहर राईलकर लिहितात, "प्रकाशचित्रं नावावरून आठवलं! वास्तविक `प्रकाश’चित्र' हा शास्त्रशुद्ध शब्द."
मनोहर राईलकरांना `छाया' म्हणजे मुद्रा, चर्या, प्रतिबिंब हे अर्थ बहुधा माहीत नसावेत. पडछाया म्हणजे (पाण्यात वगैरे) पडलेले प्रतिबिंब. येथेही छाया म्हणजे प्रतिबिंब. त्यामुळे प्रकाशचित्रापेक्षा छायाचित्र हा शब्द अधिक योग्य आहे, हे उघड आहे.

हिंदीत छायाचित्र या अर्थाने छबी (खरे तर छवि) हा शब्द सररास वापरला जातो. मराठीत छबीमध्ये थोडीशी कुत्सित छटा असल्याच्या समजुतीने तो शब्द फोटो या अर्थाने प्रचलित नाही. मात्र, रामजोश्यांची 'छबिदार सुरत देखणी, जशी हिरकणी, नार गुलजार'. ही ओळ किंवा खेबुडकरांची 'छबिदार छबी अन्‌ तोर्‍यात उभी ' यांमध्ये वापरलेला फोटोजेनिक या अर्थाचा छबीदार हा शब्द, मनात आणले तर मराठीत रूढ व्हायला काही हरकत नाही.

(मराठीवर अधिकार'वाणी'ने लिहिणारे मनोहर राईलकर वैचारिक लिखाणात साडेतीन टक्क्यांची बोलीभाषा का वापरतात?)
---वाचक्नवी

छायाप्रकाश आणि भाषाशुद्धी

या प्रतिसादावरून 'ची छाया पडणे' म्हणजे 'च्या सारखे दिसणे' हा बोलीभाषेतला अर्थही लक्षात आला. उदा. 'तिच्यावर तिच्या आजीची छाया पडली आहे'.
छायाचित्र हा शब्द चुकीचा नाही. शास्त्रशुद्धतेच्या (भाषाशुद्धीच्या) प्रयत्नात एखादा रूढ शब्द नाकारणे योग्य नाही.

मराठी भाषाशुद्धी म्हणजे शब्दाचे मूळ (संस्कृत/अरबी/फारसी/उर्दु) शोधून तो मूळ शब्द नव्याने रूढ करणे असा अर्थ असेल तर आपण मराठी शब्दकोश संकुचित करत आहोत. बोलीभाषेतील अनेक शब्दांना आपल्याला फाटा द्यावा लागेल.असे झाल्याने मराठीचे नुकसान होईल.

 
^ वर