संस्कार

नमस्कार,

लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार व्हावे अशी पालकांची धडपड असते. त्यामागचा हेतू चांगला असला तरी तो संपूर्णतः सफल होत नाही असे दिसून येते. मोठ्यांनी जाणून संस्कार केले नसले तरीही आसपासच्या समाजातून मुलांवर नकळत संस्कार होत असतात. विचार करताना पुढील प्रश्न पडले -

 1. संस्कार हा अस्सल भारतीय शब्द आणि उपचार असावा का की इंग्लिशमधील upbringing म्हणजेच संस्कार? दोहोंमध्ये फरक असल्यास कोणता फरक दिसतो ते स्पष्ट करावे.
 2. काही विशिष्ट संस्कार देताना आपण मुलांना इतरांपेक्षा वेगळे पाडण्याचे प्रशिक्षण देतो का? चांगल्या मार्गावर नेताना न कळत संस्काराची गाडी घसरते का?
 3. भारतीय संस्कारांतून खास जातीयवादी प्रशिक्षण मिळत असावे काय? संस्कारांद्वारे आपल्या जातीच्या कुंपणातून आपण बाहेर पडत नाही असे आपल्याला वाटते काय?
 4. आर्थिक प्राप्तीनुसार, सामाजिक वर्गांनुसार म्हणजेच, उच्चभ्रू, मध्यम, निम्नवर्ग वगैरेंनुसार संस्कारांची व्याप्ती बदलते का?
 5. खाद्यसंस्कृतीमुळे विचारसरणीवर फरक पडतो का?
 6. मुलांवर संस्कार कुठपर्यंत करावेत? संस्कारांच्या जोखडातून मुक्त होऊन मुलांना स्वतंत्र विचार करायला द्यावे का?
 7. बाल संस्कार शिबिरांतून मुक्त आणि स्वतंत्र विचार करण्याचे शिक्षण देतात का? चांगले वागावे, मोठ्यांचा आदर करावा, मिळून मिसळून राहावे वगैरें सहसा घरात शिकवल्या जाणार्‍या गोष्टींखेरीज दुसरे कोणते संस्कार त्यांच्यावर केले जातात?

तुम्हाला काय वाटते हे इथे विशद करा.

आपला,
पाळलेला राक्षस.

Comments

6.मुलांवर संस्कार कुठपर्यंत करावेत?

>> 6.मुलांवर संस्कार कुठपर्यंत करावेत? संस्कारांच्या जोखडातून मुक्त होऊन मुलांना स्वतंत्र विचार करायला द्यावे का?>>

मुलांवर सुसंस्कार आपण मरेपर्यंत करावेत. लहानपणी तर जेव्हा मुलांची मने मातीच्या गोळ्यासारखी असतात तेव्हा त्या गोळ्याला आकार देण्यासाठी करावेतच करावेत परंतु पुढेदेखील वेळोवेळी त्यांना आठवण करून द्यावी.
स्वतंत्र विचार वगैरे अपरिहार्य असतात. जगाचे टक्के-टोणपे खाल्ले की मुले आपोअप स्वतंत्र विचार करून "सरव्हायव्हल टॅक्टीक्स" अंमलात आणतात.

EVERY CHILD NEEDS ROOTS (संस्कार) & WINGS.

काही अपवाद - काही आया अशा पाहील्या आहेत ज्या मुलींच्या लग्नानंतर तिच्या जीवनात अतोनात हस्तक्षेप करतात. आणि तिच्या वैवाहीक जीवनाचा बोजवारा उडवतात. मी अशा प्रकारच्या हस्तक्षेपाला संस्कार म्हणत नाही. तर मुलं पुढे मोठी झाल्यावरदेखील जर त्यांचे कोठे चुकत असेल तर व्यवस्थित जजमेंट (अंदाज) घेऊन त्यांना योग्य मार्गावर आणणे.

पण एकंदर मला प्रकर्षाने वाटते - आपण मरेपर्यंत आपले कर्तव्य असते की मुलांचे भले चिंतणे, करणे आणि त्यांच्यावर चांगले संस्कार करणे.

कोरा कागज

काही आया अशा पाहील्या आहेत ज्या मुलींच्या लग्नानंतर तिच्या जीवनात अतोनात हस्तक्षेप करतात. आणि तिच्या वैवाहीक जीवनाचा बोजवारा उडवतात

कोरा कागज सिनेमा आठवला

जटील विषय

संस्कार हा विषय मोठा जटील वाटतो. विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे कठीण वाटते.
माणुसकी, भूतदया, खोटे बोलू नये, इतरांना मान द्यावा वगैरे सारखे संस्कार जात-धर्म-देश या रुढींमध्ये अडकलेले नसावे; हे सर्वव्यापी सार्वत्रिक संस्कार वाटतात परंतु समाजानुरूप संस्कार दिले जातात तेव्हा त्यात गुंतागुंत वाढत जाते. काही संस्कार निश्चितच हानीकारक ठरू शकतात असे वाटते.

उदा. मुलींना घरकाम आलेच पाहिजे किंवा मुलींनी मुलांपेक्षा वेगळी वळणे अंगी लावून घ्यावीत यापासून बुरखा बाळगणे किंवा डोईवरून पदर ओढून घेणे हे घरंदाज स्त्रीचे लक्षण आहे इ.

एका समाजाला पटणारे संस्कार दुसर्‍या समाजाला मान्य असतीलच असे नाही. उदा. आपल्याकडे लोकांसमोर मोठ्याने नाक शिंकरू नये असे शिकवले जाते तर पाश्चात्यांमध्ये सर्वांसमोर ढेकर देऊ नये असे शिकवले जाते.

खाद्यसंस्कारांमुळे माणसाच्या विचारसरणीवर परिणाम होतोच असे वाटते परंतु हा परिणाम काही बाबी सोडता फारसा हानिकारक वाटत नाही.

उदा.

 • शाकाहारी व्यक्तींकडून किंवा काही ब्राह्मणांकडून "आपल्यात मांसाहार करत नाहीत." असे खाद्यसंस्कार मुलांना देणे.
 • भारतीय किंवा हिंदू व्यक्तींकडून "आपल्यात बीफ किंवा गाय खात नाहीत." असे खाद्यसंस्कार मुलांना देणे.
 • आणि बहुधा,

 • बीफ आणि पोर्क खाणार्‍या व्यक्तींकडून "आपण कुत्रा किंवा इतर प्राणी मारून खात नाही." असे संस्कार मुलांना देणे. कच्चे सुशी खाण्याबद्दल अनेक अमेरिकन लोकांची अनिच्छा मी अनुभवली आहे.

वरील प्रकार सर्रास होत असावेत असे वाटते. तसे होण्यात वरवर काही गैर असल्याचे दिसत नाही परंतु खोलवर विचार करता "आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत." हा संस्कार दिला जातो. पुढे असे वाटते की हा संस्कार दिला जाण्यातही गैर नाही कारण प्रत्येकाची अशी आपली खाद्यसंस्कृती असते परंतु हा संस्कार लादला जाणे धोक्याचे वाटते.

असो. वर काय म्हणायचे आहे की नाही हे स्पष्टपणे सांगता आले नसल्यास क्षमस्व! विषय चांगला आहे. अधिक प्रतिक्रिया वाचायला आवडतील.

काही उत्तरे.

1. संस्कार हा अस्सल भारतीय शब्द आणि उपचार असावा का की इंग्लिशमधील upbringing म्हणजेच संस्कार? दोहोंमध्ये फरक असल्यास कोणता फरक दिसतो ते स्पष्ट करावे.

पास.

2. काही विशिष्ट संस्कार देताना आपण मुलांना इतरांपेक्षा वेगळे पाडण्याचे प्रशिक्षण देतो का? चांगल्या मार्गावर नेताना न कळत संस्काराची गाडी घसरते का?

काही विशिष्ट संस्कार देताना.... हो. संस्काराची गाडी घसरते असे म्हणता येणार नाही. कारण त्या सांगितल्या जाणार्‍या गोष्टीच "सर्वोत्तम" आहेत असा सांगणार्‍याचा समज/भाव असतो.

3. भारतीय संस्कारांतून खास जातीयवादी प्रशिक्षण मिळत असावे काय? संस्कारांद्वारे आपल्या जातीच्या कुंपणातून आपण बाहेर पडत नाही असे आपल्याला वाटते काय?

मुद्दाम संस्कारांतून मिळत नसावे. पण येताजाता वापरल्या जाणार्‍या भाषेतून ते मिळते. "त्या खलाश्याला* काय कळतंय?" किंवा "___ जातीसारखे भडक रंगाचे कपडे काय घालतोस?" वगैरे. "भटांसारखं गोड गोड जेवण असतं त्यांच्याकडे". शेजारच्या घरातून मच्छीचा वास आल्यावर "डोकं उठलंय अगदी" असे दरवेळी न चुकता म्हणणे.

माझा एक मामा लहानपणी (भिवंडीत) हरवला असता आजुबाजूच्या लोकांमध्ये त्याला बाटवायला मुसलमानांनी नेला असेल असे बोलणे चालू होते. असे बोलणे ऐकणार्‍या मुलांवर संस्कार होत असणारच. नंतर एका मुसलमानानेच त्याला घरी आणून पोचवला. ही घटना कळलेल्यांवरचे थोड्या वेळापूर्वीचे ते संस्कार बहुधा पुसले गेले असतील.

*सदरची खलाशी असा उल्लेख केलेली व्यक्ती जातीने ब्राह्मणही असू शकते.

4. आर्थिक प्राप्तीनुसार, सामाजिक वर्गांनुसार म्हणजेच, उच्चभ्रू, मध्यम, निम्नवर्ग वगैरेंनुसार संस्कारांची व्याप्ती बदलते का?

अर्थातच बदलते. इतकेच कशाला, एकाच कुटुंबाची आर्थिक स्थिती बदलल्यावर सुद्धा संस्कार बदलतात.
निम्नवर्गात वस्तू कमी किंमतीत मिळावी म्हणून चार दुकाने फिरणे, घासाघीस करणे असे संस्कार आपोआप होतात. उच्च वर्गात होत नाहीत.

5. खाद्यसंस्कृतीमुळे विचारसरणीवर फरक पडतो का?

कल्पना नाही. वर उल्लेखलेलं "डोकं उठलं" आणि "भटांसारखं गोड" दोम्ही कडून आहे. म्हणजे आपलं ते उत्तम आणि दुसर्‍याचं हीन ही विचारसरणी सेमच आहे.

6. मुलांवर संस्कार कुठपर्यंत करावेत? संस्कारांच्या जोखडातून मुक्त होऊन मुलांना स्वतंत्र विचार करायला द्यावे का?

सार्वत्रिक नीतिमूल्ये सोडली तर इतर संस्कार हे मुळातच रेजिमेंटेशन साठी केले जातात. स्वतंत्र विचार करण्याचा संस्कार करता येईल का याबाबत साशंक आहे. स्वतःचे निर्णय घेण्याचा संस्कार करता येऊ शकतो.

7. बाल संस्कार शिबिरांतून मुक्त आणि स्वतंत्र विचार करण्याचे शिक्षण देतात का? चांगले वागावे, मोठ्यांचा आदर करावा, मिळून मिसळून राहावे वगैरें सहसा घरात शिकवल्या जाणार्‍या गोष्टींखेरीज दुसरे कोणते संस्कार त्यांच्यावर केले जातात?

बहुतेक बालसंस्कार शिबिरांची संस्कार या शब्दाबाबतची संकल्पना वीस पंचवीस श्लोक , अथर्वशीर्ष, रामरक्षा इत्यादि. तिथे कसलेच संस्कार होत नाहीत.

बाकी प्रियाली यांच्याशी सहमत आहे.

नितिन थत्ते

व्याप्ती

चर्चेची व्याप्ती खूपच मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यापेक्षा मला काय वाटतं ते थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतो.

संस्कार हा शब्द संस्कृतीशी नातं सांगतो (त्यांची नक्की व्युत्पत्ती माहीत नाही, फारशी महत्त्वाची नाही). सुसंस्कृत समाजात एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे, ज्या सवयी असणं आवश्यक आहे त्या मुलांना शिकवणे म्हणजे संस्कार करणे असं मी मानतो. त्यातले काही समाजनिरपेक्ष असतात (दुसऱ्यांना मदत करणे, मान देणे, विनयाने वागणे), तर काही समाजसापेक्ष असतात (शुभंकरोति म्हणणे, बुरखा घालणे इ). या समाजसापेक्ष गोष्टींच्या खाली दडलेल्या समाजनिरपेक्ष गोष्टी अंगिकारणे हे खरं सुसंस्कृतपणाचं लक्षणं.

संस्कारांमध्ये मुलांच्या वागणुकीला वळण देणं, शिस्त लावणं अपेक्षित असतं. त्या अर्थाने स्वातंत्र्य आणि संस्कार या वरवर पहाता भिन्न गोष्टी आहेत. पण स्वातंत्र्याची सवय लावता येते. अशी सवय लावणं हा एक प्रकारचा संस्कारच आहे. बोनसाय करून झाडाला आकार देता येतं. तसंच विशिष्ट दिशेची वाढ मर्यादित करून व काही इतर दिशांची वाढ जोमाने करूनही आकार देता येतो. असा आकार देणं म्हणजेदेखील संस्कार.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

पिंक

खरंतर या विषयावर लिहिण्याचा माझा हक्क + अनुभव नाही..
पण प्रत्येकाला असते तसे 'मत' मलाही असल्याने इथे पिंक टाकत आहे:

सर्वप्रथम या चर्चेआधी तुम्हाला 'संस्कार' म्हणजे काय अभिप्रेत आहे? हे स्पष्ट करणे गरजेचे होते. मात्र संस्कारचा 'ज्या गोष्टी पालकांचा संबंध येणार्‍या समाजात स्वीकारार्ह असतात त्या मुलांना करायला व ज्या स्वीकारल्या जात नाहीत त्या टाळायला शिकवणे' हा सामान्य अर्थ घेत आहे.

1.संस्कार हा अस्सल भारतीय शब्द आणि उपचार असावा का की इंग्लिशमधील upbringing म्हणजेच संस्कार? दोहोंमध्ये फरक असल्यास कोणता फरक दिसतो ते स्पष्ट करावे.

माहित नाही

2.काही विशिष्ट संस्कार देताना आपण मुलांना इतरांपेक्षा वेगळे पाडण्याचे प्रशिक्षण देतो का? चांगल्या मार्गावर नेताना न कळत संस्काराची गाडी घसरते का?

मागे अमर्त्यसेन यांचे एक पुस्तक वाचले होते. त्यात पहिल्याच प्रकरणात म्हटले होते की आपण जेव्हा एका समाजाला किंवा एका प्रकारच्या लोकांना एकत्र आणतो तेव्हा त्याहून कितीतरी मोठ्या लोकांना वेगळे काढत असतो. आणि हे पटण्याजोगे आहे.
लहान मुलांना आपण कोण आहोत याची ओळख आपण कोण नाही यातून अधिक करून दिली जाते.
तेव्हा होय, काही विषिष्टच का तर बहुतांश संस्कार देताना मुलांना इतरांपेक्षा वेगळे पाडण्याचे प्रशिक्षण पेक्षा वेगळे असल्याची जाणीव करून दिली जाते.

3.भारतीय संस्कारांतून खास जातीयवादी प्रशिक्षण मिळत असावे काय? संस्कारांद्वारे आपल्या जातीच्या कुंपणातून आपण बाहेर पडत नाही असे आपल्याला वाटते काय?

होय. मात्र हे भारतीय संस्कारांमधेच आहे असे वाटत नाही. ही सवय जागतिक आहे.(जगात जातीची जागा भाषा, पंथ वगैरे घेते इतकंच)

4.आर्थिक प्राप्तीनुसार, सामाजिक वर्गांनुसार म्हणजेच, उच्चभ्रू, मध्यम, निम्नवर्ग वगैरेंनुसार संस्कारांची व्याप्ती बदलते का?

अर्थातच!आर्थिक प्राप्तीबरोबरच, प्रदेश, शिक्षण, अनुभव/प्रवास वगैरेंतील फरकानेही संस्कारांची व्याप्ती बदलते

5.खाद्यसंस्कृतीमुळे विचारसरणीवर फरक पडतो का?

बहुदा नाही मात्र वर म्हटल्याप्रमाणे वेगळे असल्याची जाणीव करून देण्यासाठी अनेक गोष्टींप्रमाणे खाद्यसंस्कृती हा महत्त्वाचा आधार असतो

6.मुलांवर संस्कार कुठपर्यंत करावेत? संस्कारांच्या जोखडातून मुक्त होऊन मुलांना स्वतंत्र विचार करायला द्यावे का?

केस बाय केस उत्तर वेगळे असावे.
यालाच एक उपप्रश्न असा विचारता येईल की 'मुलांवर कोणते संस्कार जाणीवपूर्वक करावेत?'

7.बाल संस्कार शिबिरांतून मुक्त आणि स्वतंत्र विचार करण्याचे शिक्षण देतात का? चांगले वागावे, मोठ्यांचा आदर करावा, मिळून मिसळून राहावे वगैरें सहसा घरात शिकवल्या जाणार्‍या गोष्टींखेरीज दुसरे कोणते संस्कार त्यांच्यावर केले जातात?

माहीत नाही.

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

का बरे?

खरंतर या विषयावर लिहिण्याचा माझा हक्क + अनुभव नाही..

का बरे? तुम्ही कोणावर संस्कार केले नसतील पण अद्याप तुमच्यावर संस्कार झालेच नाहीत का? नसल्यास हे असे जगावेगळे कसे झाले ते ऐकायला आवडेल.


पण प्रत्येकाला असते तसे 'मत' मलाही असल्याने इथे पिंक टाकत आहे:

बाकी काही नाही तरी दिसली भिंत की टाकली पिंक ;-) हा भारतीय संस्कार(?) बदलणे आवश्यक वाटते. ;-) ह. घ्या.

संस्कार

विषय चांगला आहे व माझ्या जिव्हाळ्याचा आहे.
नितिन साहेबांचा प्रतिसाद खुप चांगला आहे व त्याला अनुमोदन समर्थन व सहमत. काही माझी मत देत आहे.

1.संस्कार हा अस्सल भारतीय शब्द आणि उपचार असावा का की इंग्लिशमधील upbringing म्हणजेच संस्कार? दोहोंमध्ये फरक असल्यास कोणता फरक दिसतो ते स्पष्ट करावे.

दोन्ही मध्ये उद्दिष्टांचा काही फरक आहे असे वाटत नाही, पण तरी सुद्धा निरनीराळ्या राहणी माना प्रमाणे थोडा बदल आहे. आपल्या कडे व्यक्ति घडवणारे संस्कार जास्त आहेत असे माझे मत आहे. सिविक सेन्स कमी शिकवला जातो. त्याची उणिव आहे.

2.काही विशिष्ट संस्कार देताना आपण मुलांना इतरांपेक्षा वेगळे पाडण्याचे प्रशिक्षण देतो का? चांगल्या मार्गावर नेताना न कळत संस्काराची गाडी घसरते का?

ब-यात आई वडिलांना असे वाटते की आपले अपत्य स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे एखादा राष्ट्रनेता बनण्यालायक व्हावे. त्या मुळे संस्काराची अशी होड उठवतात (त्यातल्या त्यात पहिल्या अपत्यावर तर फार संस्काराचे पाढे म्हटले जातात) की कधी कधी त्याची तिडिक बसते व गाडी घसरते. पण हेही खरच आहे की ब-याच वेळेला ही गाडी लवकर रुळावर येते व तेथेच संस्कारांचे महत्व.

3.भारतीय संस्कारांतून खास जातीयवादी प्रशिक्षण मिळत असावे काय? संस्कारांद्वारे आपल्या जातीच्या कुंपणातून आपण बाहेर पडत नाही असे आपल्याला वाटते काय?

मला वाटते हो काही प्रमाणात आहे. मराठीत तर जास्त. हिंदू मुस्लिम तेढ आहे. त्याला कारणे देखिल आहेत पण आत्ता त्यावर मला वाद घालायचे नाहीत.

4.आर्थिक प्राप्तीनुसार, सामाजिक वर्गांनुसार म्हणजेच, उच्चभ्रू, मध्यम, निम्नवर्ग वगैरेंनुसार संस्कारांची व्याप्ती बदलते का?

हो नक्कीच. पण काही मुलभुत संस्कार तेच राहतात (अन ते रहात नसतील तर संस्कार म्हणता येणार नाहीत त्यांना).

5.खाद्यसंस्कृतीमुळे विचारसरणीवर फरक पडतो का?

मला हा प्रश्न समजला नाही. आपल्याला शाकाहारी व मांसाहारी असे म्हणायचे आहे का. मला नाही वाटत असे काही असते.

6.मुलांवर संस्कार कुठपर्यंत करावेत? संस्कारांच्या जोखडातून मुक्त होऊन मुलांना स्वतंत्र विचार करायला द्यावे का?

मला वाटते

लालयेत् पञ्चवर्षाणि दश वर्षाणि ताडतेत।
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रवदाचरेत्।।

पाच वर्षा पर्यन्त लाड करावेत, पुढच्या दहा वर्षात कठोर राहून संस्कार करावेत, सोळाव्या वर्षापासून मित्रासारखे मदत व उपदेश करावेत. असे चाणक्य निती मध्ये लिहिले आहे.
7.बाल संस्कार शिबिरांतून मुक्त आणि स्वतंत्र विचार करण्याचे शिक्षण देतात का? चांगले वागावे, मोठ्यांचा आदर करावा, मिळून मिसळून राहावे वगैरें सहसा घरात शिकवल्या जाणार्‍या गोष्टींखेरीज दुसरे कोणते संस्कार त्यांच्यावर केले जातात?

काही शिबिरातून देतात. सगळ्याच नाही.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)
http://rashtravrat.blogspot.com
http://rashtrarpan.blogspot.com

मुंज संस्कार

>> भारतीय संस्कारांतून खास जातीयवादी प्रशिक्षण मिळत असावे काय? संस्कारांद्वारे आपल्या जातीच्या कुंपणातून आपण बाहेर पडत नाही असे आपल्याला वाटते काय?
मुंज या संस्काराविषयी पडलेले काही प्रश्नः
काही दिवसापूर्वी एका अत्यंत प्रयोगशील शाळेतल्या दुसरीच्या वर्गातील मुलांनी सुट्टी संपवून आल्यानंतर आपल्या दोन तीन मित्रांनी केसांचा गोटा व शेंडी ठेवलेली पाहिली. ताबडतोब त्यातील काहींनी आपल्या पालकांना विचारले की माझी मुंज कधी करणार? तसेच काही मुले गोटा केलेल्या मुलांना चिडवूही लागली. तोपर्यंत त्यांना माहितही नव्हते की आपल्यापैकी कोण ब्राम्हण आहेत किंवा आपली जात काय आहे. या एका घटनेने त्यांना 'जात' कळली असेल का? आता ती मुले सगळ विसरलीही असतील, पण त्या सर्वांना जातीची ओळख मिळाली.
काहींना मुंज या 'संस्कारा'बद्दल विचारले असता, तो किती पवित्र आहे व त्यापाठीमागचा विचार कसा उदात्त आहे अशी माहिती मिळाली. मग तो संस्कार खालच्या जातीतल्या लोकांकरता का सांगितलेला नाही, याचे उत्तर मिळाले नाही. आज एखाद्या भटजीला एखाद्या खालच्या जातीतील व्यक्तीने आपल्या मुलाची मुंज करण्याचे कार्य दिले तर ते केले जाईल का?
काहिंना यातून जात ठळक होते हे पटले. तुंम्ही आता तुमच्या मुलाची मुंज करणार का? असे विचारल्यावर 'त्यावर फार विश्वास नाही, पण घरच्यांना त्यातून आनंद मिळत असेल तर काय हरकत आहे?' अशा प्रकारचे उत्तरही मिळाले. आपल्याला काय वाटते?
-स्वधर्म

खालची वरची जात?

असे लिहिणे हे वाईट संस्कारामुळे झाले असावे.
मला असे वाटते की मुलाला न समजता त्याच्या मनात भरवले जाते ते संस्कार.
शहाणा झाल्यानंतर केला जाणारा उपदेश किंवा दिला जाणारा सल्ला.

मूळ मुद्दा घ्या

खालची वरची सोडा. मूळ मुद्दा संस्कारांमुळे भेद निर्माण होतो का हा आहे.
बाकी उदाहरण आवडले नसल्यास नाईलाज आहे.

संस्कार एक फोडणी

लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार व्हावे अशी पालकांची धडपड असते. त्यामागचा हेतू चांगला असला तरी तो संपूर्णतः सफल होत नाही असे दिसून येते.

चर्चा प्रस्ताव योग्यपणे ठेवलेला नाही. त्यामुळे चर्चा योग्य दिशेने होईल असे वाटत नाही.

संस्कार आणि अपब्रिंगीग यामध्ये मला अपब्रिगिंग जास्त चांगले असते असे वाटते.
(चर्चेच्या प्रस्तावात संस्कारावर जास्त भर दिला व मागितला आहे.)
उदाहरणच घ्यायचे झाले तर... रणबीर कपूर चे घेवूया!
हा एक श्रीमंत, खानदानी कुटुंबातील तरूण आहे. त्याच्या आई-वडीलांनी त्याला चित्रपटात काम मिळावे म्हणून, संजल लिला भन्सालीला आपल्या घरी आदराने बोलवून आपल्या मुलासोबत बसवून जेवू घातले. आणि अखेरीस मागणी केली, कि आमच्या मुलाला तुझ्या चित्रपटात नायकाचा रोल दे. अशा पद्धतीने गळ घातल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला नकार देता येईल कां?
रणबीर कपूरला चित्रपटात काम मिळाले, नव्हे! रणबीर कपूरला लॉंच करण्यात आले. परीणाम हा झाला कि हा एक तरूण रातोरात स्टार झाला. त्याचे आत्तापर्यंत किती चित्रपट चांगले चालले आहेत? पण त्याच्यामध्ये किती आत्मविश्वास त्याच्या अपब्रिंगींगमुळे त्यात आला आहे. आज तो बारा कोटी रुपये चित्रपटासाठी मागतो. तो ज्या चित्रपटात काम करतो, त्याच्या प्रमोशनचे देखील वेगळे पैसे हक्काने मागतो. तो अनेक जाहिराती करतो, त्याचे ही तो हक्काने भरपूर पैसे घेतो. अरे बाबा, इतक्यातच एवढे पैसे तू लोकांकडे मागतोस पण तुझे आऊटपूट काय आहे? असा प्रश्न त्याचे आईवडील त्याच्याकडे त्याला विचारत नाहीत. नव्हे! उलट त्याला 'इतरांकडून आपल्याला हवे ते कसे मिळवायचे?' ह्याचे बाळकडू त्याच्या पालकांकडून देण्यात आलेले आहे.

आर्थिकदृश्ट्या सामान्य कुटुंबातील पालक त्यांना त्यांच्या आयुश्यात यश-अपयश कसे मिळाले? कोणत्या कारणामुळे मिळाले? ह्याचे आपाआपल्यापरीने गणीत घालून आपल्या मुलांना घडवतात.
जे पालक त्यांना यश कसे मिळाले? हे ध्यानात घेवून मुलांचे अपब्रिंगींग करतात, त्यांची मुले वेगळी घडतात, फुलतात.
जे अपयश कसे मिळाले? हे ध्यानात घेवून संस्काराची झणझणीत फोडणी आपल्या पाल्यांना देतात, त्यांची मुले त्याप्रमाणे घडतात, होरपळतात.

पालक

खरेतर संस्कार नाहीत म्हणून जातीभेद, शिवाशीव, अस्पृश्यता, माज, टेंभा इ. आहेत. असो.

बाकी संस्कार याचा अर्थ शुभंकरोति इ. म्हणता येणे, मुंज होणे असा घेतला जातो हे खरे आहे. अशापैकी काही संस्कार हे काही जातींसाठी राहिलेले असले तरी ते मुळात वाईट आहेत असे म्हणवत नाही. मुंज करू नये, कारण ती काही जातींमध्ये केली जात नाही हे म्हणणे पटत नाही. शिक्षणाचा आरंभ कोणत्याही जातीतील लोकांना एकाच पद्धतीने करता यावा अशी आदर्श समाजस्थिती निर्माण व्हायला जे संस्कार लागतात त्याची गरज आहे.

संस्कारांसारख्या रूढ व्याख्यांचा अर्थ योग्य प्रकारे लावणे हे ज्यांच्या हातात आहे ते त्यांना योग्य वाटतात तसे संस्कारवर्ग काढत नाहीत हे दुर्दैव नाही का? असो.

बव्हंशीं सहमत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
चित्रा यांच्या प्रतिसादाशी बव्हंशीं सहमत.त्यांच्या प्रतिसादातील पहिले वाक्य मर्मग्राही आहे.
"खरेतर संस्कार नाहीत म्हणून जातीभेद, शिवाशीव, अस्पृश्यता, माज, टेंभा इ. आहेत. "
हे वाक्य,रचनेत काही सुधारणा केल्यास, सुभाषितसमान होऊ शकेल.(त्यापुढे 'असो.' शब्द का टाकला आहे ते समजत नाही.)
शुभंकरोति,स्तोत्रे-स्तवने इ.मुखोद्गत करून घेणे,रांगोळ्या काढायला शिकवणे,व्रतकथा,सण,उत्सव यांची माहिती देणे," परंपरा,रूढी हा आपल्या महान संस्कृतीचा वारसा आहे.तो जपला पाहिजे.जगात सर्वश्रेष्ठ असलेला आपला धर्म आणि देव यांवर श्रद्धा ठेवावी" हे बालपणी मनावर बिंबवणे, म्हणजे चांगले संस्कार असा सार्वत्रिक समज दिसतो.
हे खरे.
चित्रा यांच्या प्रतिसादातील शेवटचे वाक्यः"संस्कारांसारख्या रूढ व्याख्यांचा (?) अर्थ योग्य प्रकारे लावणे हे ज्यांच्या हातात आहे ते त्यांना योग्य वाटतात तसे संस्कारवर्ग काढत नाहीत हे दुर्दैव नाही का?"

हे पहिल्या वाक्याला पूरक असे आहे.(मात्र अंती 'असो' आहेच!)

संस्कार ही एक अमूर्त संकल्पना

संस्कार ही एक अमूर्त संकल्पना असून ते नेमके काय आहे हे सांगता येत नाही. काही संस्कार काही विशिष्ट गटापुरते वा धर्मापुरतेच मर्यादित असले तरी इतर अनेक संस्कार असे आहेत की त्याना universal असेच म्हणता येईल. काळाच्या ओघात अनेक संस्कार निरुपयोगी वाटू लागतात. काही नवीन संस्कार घडविण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे सर्व जुने संस्कार टाकाऊ आहेत असे होत नाही. प्रश्न असा आहे की विज्ञानाच्या या युगात नव्या ज्ञानाचे - नव्या दृष्टीचे - म्हणजे विज्ञानाचे असे काही खास संस्कार असतात की नाही?

आजच्या झपाट्याने बदलणार्‍या युगात बदलांना सामोरे जायला कोणते संस्कार हवेत? ते कुणी, कसे, व कुठं घडवायचे? संस्कार घडविण्यामध्ये कुटुंब, शाळा, प्रसार माध्यमं यांची कितपत जबाबदारी आहे? यात विज्ञान - तंत्रज्ञानाचा वाटा किती? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात.

तरीसुद्धा समाजातील एक व्यक्ती म्हणून काही संस्कार प्रत्येकानी आत्मसात करणे गरजेचे आहे. अशा गोष्टींची यादी केल्यास ती खालीलप्रमाणे असू शकेल:

●सार्वजनिक मालमत्तेची काळजी, ●शिक्षण, ●नेतृत्वगुण, ●शब्दांचा नेमका उपयोग, ●गुणवत्तेचा आदर व संधी, ●दुसर्‍याना शिक्षित करणे, ●विज्ञान व तंत्रज्ञान सुविधांचा दैनंदिन वापरातील तारतम्य ●वैज्ञानिक दृष्टिकोन, ●विज्ञानाचा ठसा व धोके, ●वैयक्तिक व सार्वजनिक आरोग्याची काळजी ●व्यक्तिपेक्षा संस्था मोठी याचे भान, ●भाषाविषयक आस्था व बहुभाषिकतेचे महत्व, ●कार्यकारणभाव, ●वैचारिक प्रगल्भता, ●अंधश्रद्धेपासून दूर, ●लोक काय म्हणतील याची भीती, ●परीक्षेचा बागुलबुवा, ●वाद - संवाद, ●लिखित कायदा व अलिखित संकेत, ●स्वयं अनुभव, ●जीवघेण्या स्पर्धेपासून दूर, ●हार - जीत याबद्दलची निरपेक्षता, ●समस्येवर मात करण्याचा आनंद, ●छंदाची जोपासना, ●माहिती ज्ञान, ●बहुश्रुतता, ●काळे पांढरे यातील मधल्या छटांची पारख, ●ज्ञानलक्षी साहित्याचे वाचन, ●पूरक वाचन, ●इतरात ज्ञान वाटून घेणे, ●मोजमाप - संदर्भांचा उल्लेख व जाणीव, ●दुसर्‍यांच्या भूमिकेत जाऊन जगणे, ●गुरुजनांपासून स्फूर्ती, ●विचारांती निर्णय, ●प्रेम - आपुलकी, ●संस्कार केंद्र म्हणून घर व शाळांचे महत्व, ●सत्य हे मूल्य मानणे व त्याची जपणूक, ●सौंदर्यदृष्टी, ●प्रश्नांचे सुलभीकरण, वेगळेपण जपणे, ●उधळपट्टी रोखणे ●दैनंदिन व्यवहारातील लढ्यांना सामोरे जाणे इ.इ.

या यादीत आणखी भर घालता येईल वा कमी करता येईल. फक्त शब्दांचा वा शब्दार्थांचा जास्त कीस न काढता ढोबळमानाने या गोष्टीविषयी जाणीव असल्यास जीवन जगणे सुसह्य होईल असे वाटते.

चर्चेचा दुसरा टप्पा

मी आधीच्या प्रतिसादात, चर्चा योग्य दिशेने होईल असे वाटत नाही. असे म्हणालो. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. यास कारण, हा विशय माझ्या उपयोगाचाच आहे, असे मला नंतर जाणवले. कारण मागच्या महिन्यात मला मुलगी झाली. मला झाली म्हणजे माझ्या बायकोला झाली. मी माझ्या मुलीशी कसे वागावे? हा प्रश्न पडला होता. कारण मनात मला मुलगा व्हावा अशी माझी इच्छा होती. पण मुलगी झाली. मी आत्तापर्यंत लौकिक अर्थाने अयशस्वी आहे असे मला वाटत होते. मी माझ्या मुलीला यापुढे कसे वाढवायचे? याचे उत्तर या चर्चेतून मला मिळेल अशी आशा मला आत्ता वाटते.
आत्तापर्यंच्या प्रतिसादावरून एवढे समोर स्पश्ट झाले आहे की, हि एक हेतुपूर:सर केलेली कृती आहे.
हेतु कोणता आहे त्या अनुशंगाने त्याचे दोन विभाग होतात.
1) रुढ अर्थाने – म्हणजे धर्म / जात / भाशा /प्रांत या विशयांमधील विधी
• बाप्तिस्मा करणे, सुंता करणे,
• मुंज करणे
• ‘वदनी कवळ’, 'शुभं करोती' इ. म्हणणे
• वाईट हेतूने म्हणायचे झाले तर..जातीभेद, शिवाशीव, अस्पृश्यता, माज, टेंभा इ.

2) दुसरा अपब्रिंगिंग ह्या अर्थाने –
• मानवी नाते-संबंध जोडणे, हाताळणे, टिकवणे व तोडणे
• सुख कसे उपभोगावे? / दु:ख कसे हाताळावे?
• सामाजिक जबाबदारी / सोशल रीसपॉन्सबिलिटी
• यश वा अपयश कसे मिळवावे/ कसे टाळावे ?
• नागरीक कर्तव्ये / सिविक सेंस
• सर्वायव्हल टॅक्टीस

अजून काही मुद्दे आखणीबद्ध करता येताहेत कां?

काय द्यायचे हे कळले. आता ते कसे द्यायचे? याकडे पाहुया.

मित्रांनो खरतरं, संस्कार म्हणजे - ‘कोणत्याही देवघेवीत आपल्या मनाचा संयम/तोल ढळू न देण्याची लपवाछपवीच’ असते, नाही कां?

आता ही ‘अत्यंत नाजूक’ गोश्ट दुसर्‍याला द्यायचीच झाली तर मग ती कशी द्यायची बरें?

संस्कार हि ‘काहितरी, आपल्या जवळील लहान बालकास’ देण्याची प्रक्रीया असेल तर,-
‘देताना आडवळणाने द्यावे!’ हा नियम पाळावा लागेल,
कारण ‘आडवळणाने दिले नाही तर...
तर ते आदेशात्मक, उपदेशात्मक दिल्यासारखे होते.
तसे झाले कि, त्यानंतर, देणार्‍याचा वा घेणार्‍याचा किंवा दोघांचा अपमान होण्याचा संभव असतो.
इतपत आपल्याला पटले कां?
याच कारणाने ‘आडवळणाने कसे द्यावे?’ हे आधी ‘देणार्‍याला’ शिकावे लागेल.
देणार्‍याला हि कला आली की मगच, ‘देण्या-घेण्याची क्रिया झाल्यानंतर’,
घेणार्‍याला, ‘मागताना आडवळणाने कसे मागावे?’ हे आपोआप कळू शकते.’

धम्मक लाडू तुमची इच्छा मी इथे पूर्ण करू कां?
संस्कार हे 'अमुकतमुक' कसे देण्याची? व कसे घेण्याची प्रक्रिया असेल, तर...
'प्रणय' हि प्रेम देण्याचा व घेण्याचा विधी होईल.
‘प्रेमाच्या ह्या देवघेवीत आपल्या मनाचा संयम/तोल ढळू न देता, लपवाछपवी करीत’ प्रेम करणे हेच उच्च प्रतीच्या प्रेमाचे लक्शण होवू शकते.
पण साला असे होत नाही, सुरवातीस त्या नाजूक व निर्णायक, पुन्हा न येणार्‍या क्शणी दोघापैकी एक जण उताविळपणाने धुसमुसळेपणा करू पाहतो, व दुसरा त्यास बुजरेपणमुळे नको त्या गोश्टीची भारी कुरबुर करत बसतो. जिथे तोल ढळतो, तिथे मग कोणाचा तरी अपमान होतोच. त्यानंतरच्या काळात दोघापैकी कुणीतरी एक उदासिन होतो, व दुसरा जोडीदार ‘प्रत्येक बाबतीत कुरबूरच करीत राहतो.’ जिथे तोल ढळत नाही तिथे.....हि स्थिती कशी असेल ते मला माहित नाही.

शाब्दिक उपदेश

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
आचरण क्षेत्रातील संस्कारांसाठी केवळ शाब्दिक उपदेश प्रभावी ठरणार नाही असे मला वाटते.हे संस्कार पालकांनी आचरणाने मुलांच्या मनावर बिंबवायला हवेत.
एक व्यक्तिगत उदाहरण सांगतो.(खरे तर यात सांगण्यासारखे काही नाही.)
*मी आणि माझा मुलगा ,वय दहा वर्षे, दुकानात कापड खरेदीला गेलो.खरेदी झाली दुकानदाराने बिल केले.मी पैसे दिले.उरलेले घेतले.निघालो.मुलगा गप्पपणे चालत होता.काही वेळाने म्हणाला,"बाबा,दुकानदाराने आपल्याला चाळीस रुपये जास्त दिले."
बिल पाहून हिशोब केला.त्याचे बरोबर होते. म्हणालो,"चल. ते पैसे परत करायला हवे.समजा त्याने आपल्याकडून अधिक पैसे घेतले असते तर लक्षात आल्यावर आपण मागायला गेलो असतो ना? मग जास्त आलेले पैसे परत करायलाही जायला हवे.अर्धा अधिक कि.मी.अंतर पुन्हा चालत गेलो.पैसे परत केले.
* एकदा मुलाला स्टॉलवरून दै.लोकसत्ताचा अंक आणण्यासाठी पाठविले.घेऊन आला.पाहातो तर दोन अंक.लोकसत्ता आणि म.टा."तू दोन अंक आणलेस का?" विचारले.
"मी एकच मागितला.तीन रु.दिले. त्याने चुकून दोन अंक दिले."
मटाचा अंक परत करण्यासाठी त्याला ताबडतोब पाठवले.

सहमत

सहमत आहे. संस्कारात स्वतःच्या आचरणाने मुलांसमोर चांगले उदाहरण देणे हा संस्काराचाच भाग आहे.

http://bolghevda.blogspot.com (मराठी ब्लॉग)

:)

दुकानदार नेहमीचा असेल आणि नंतर हिशोबात त्याला चुकीची जाणीव होणार असेल आणि ती जाणीव तुम्हालाही झालीच असल्याचा कयास बांधणार असेल तरच पैसे परत करणे रॅशनल ठरेल आणि तशी शक्यता नसल्यास मात्र, तसा संस्कार मुलावर न करता 'इतरांवर' करणेच योग्य ठरेल असे मला वाटते.
पैसे परत केल्याचा दावा मात्र नक्कीच रॅशनल वाटतो.

छोटीशी भर.

अपब्रिंगिंग् म्हणजे हिंदीतले 'परवरीश' मानावे का? अथवा/म्हणजे आपले पालन-पोषण? ह्यातल्या 'पोषणात' मनाला पुष्ट करणे हेही येत असावे.
संस्कार आणि संस्करण हे शब्द साधारणपणे समानार्थी मानले तर त्यामध्ये रीफाइनिंग् असा अर्थ दिसतो असे वाटते.

धन्यवाद

प्रतिसादांसाठी सर्वांचे धन्यवाद मानतो. उपक्रमींनी चर्चा चांगली चालवली. नानावटी यांचा प्रतिसाद सर्वोत्तम वाटला.
माझ्यासकट अनेकांना या चर्चेचा उपयोग होईल अशी आशा करतो.

 
^ वर