आता गरज पाचव्या स्तंभाची

आता गरज पाचव्या स्तंभाची

सन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही. बुद्धिप्रामाण्यवादी अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर या देशाची अर्थव्यवस्था कोलमडणार होती किंवा कोसळणार होती, नाहीतर ढासळणार तर नक्कीच होती. पण अर्थव्यवस्था कोसळून त्याखाली गुदमरून काही जीवितहानी किंवा कोणी दगावल्याची खबर निदान माझ्यापर्यंत तरी अजून पोचलेली नाही.

खरं तर एकदा काहीतरी कोसळायलाच हवे. काहीच कोसळायला तयार नसेल तर निदान अर्थव्यवस्था तरी कोसळायला हवी आणि त्या ओझ्याखाली दबून व चेंगरून या देशातले भ्रष्टाचारी शासनकर्ते, संवेदनाहीन प्रशासनकर्ते व त्यांचे सल्लागार अर्थतज्ज्ञ नियोजनकर्ते नाहीच दगावले तरी हरकत नाही; पण निदान काही काळ तरी यांचे श्वास नक्कीच गुदमरायला हवे, असे आता मला मनोमन वाटायला लागले आहे. कारण अर्थव्यवस्था बळकट असल्याचा नियोजनकर्त्यांनी कितीही आव आणला तरी आवश्यक त्या बिंदूवर ही अर्थव्यवस्था अत्यंत दुर्बल आहे, याची आता माझ्यासारख्या अर्थशास्त्र विषयाचा लवलेशही नसलेल्यांना खात्री पटू लागली आहे. देशाच्या आरोग्याच्या सुदृढ आणि निकोप वाढीसाठी ही अर्थव्यवस्था कुचकामी व अत्यंत निरुपयोगी आहे. सर्वांना मोफत शिक्षण पुरविण्याची, सर्वांना आरोग्य पुरविण्याची, बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्याची, हाताला काम मिळण्यासाठी नवनवे पर्याय उपलब्ध करून देण्याची, दारिद्र्यरेषेखालील जनतेला दारिद्र्यरेषेच्यावर आणण्याची, शेतीची दुर्दशा घालविण्याची या अर्थव्यवस्थेत अजिबात इच्छाशक्ती उरलेली नाही. यापैकी एकही प्रश्न मार्गी लावायचा म्हटले तर त्यासाठी या अर्थव्यवस्थेच्या तिजोरीत ठणठणाट आहे आणि तसा प्रयत्न करायची भाषा केल्याबरोबरच अर्थव्यवस्था कोसळायची भिती उत्पन्न व्हायला लागते, हेही नित्याचेच झाले आहे.

मात्र ही अर्थव्यवस्था नको तिथे आणि चुकीच्या बिंदूवर अत्यंत बळकट आहे. शासनाचे आणि प्रशासनाचे ऐषोआराम पूर्ण करायचे म्हटले की ही अर्थव्यवस्था अत्यंत दणकट वाटायला लागते. आमदार-खासदार-मंत्र्यांची पगारवाढ किंवा भत्तेवाढ करताना किंवा सहावा-सातवा-आठवा वेतन आयोग लागू करताना अर्थव्यवस्था कोसळायचे बुजगावणेही कधीच उभे केले जात नाही आणि ते खरेही आहे कारण अर्थव्यवस्था बळकट केवळ याच बिंदूवर आहे. शिवाय सरकारी तिजोरीच्या चाब्याही नेमक्या अर्थव्यवस्थेच्या ह्याच बळकट बिंदूवर ज्यांची वर्दळ आहे, त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे साहजिकच आर्थिक भ्रष्टाचाराच्या गंगोत्रीचा उगमही याच बिंदूपासून होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. बहुतांश बुद्धिजीवी, विचारवंत, अर्थतज्ज्ञ, शासक आणि प्रशासक हे या गंगोत्रीचे लाभधारक असल्याने ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असतात. यांचे चालणे, बोलणे, वागणे आणि लिहिणे प्रस्थापित व्यवस्थेला पूरक असेच असते. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यामुळे सत्य कधीच बाहेर येत नाही. याचा अर्थ एवढाच की शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी ७० हजार करोड खर्च केल्याने देश बुडला नाही, अर्थव्यवस्था कोसळली नाही किंवा याच कारणामुळे महागाईही वाढली नाही. पण खरेखुरे वास्तव जाणिवपूर्वक ददवून ठेवले जाते.

स्वातंत्र्यानंतरच्या संपूर्ण काळात केंद्रशासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी खर्च केलेल्या एकत्रित रकमांची बेरीज केली आणि या रकमेला शेतीवर जगणार्‍या लोकसंख्येच्या संख्येने भागीतले तर ही रक्कम काही केल्या दरडोई हजार-दीड हजार रुपयाच्यावर जात नाही. याचा स्पष्ट अर्थ एवढाच होतो की स्वातंत्र्यानंतरच्या प्रदीर्घ काळात शेतकर्‍यांना कर्जमाफ़ म्हणून केवळ दरडोई हजार-दीड हजार रुपयेच मिळालेत. मग प्रश्न उरतो हजार-दीड हजार रुपयाचे मोल किती? ही रक्कम आमदार, खासदार यांच्या एका दिवसाच्या दरडोई भत्त्यापेक्षा कमी आहे. प्रथमश्रेणी कर्मचार्‍याच्या एका दिवसाच्या दरडोई पगारापेक्षा कमी आहे, चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याच्या दरडोई दिवाळी बोनसपेक्षा कमी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे वाममार्गाने सरकारी तिजोरीतून पैसे उकळून एक मंत्री दोन तासामध्ये पिण्यासाठी जेवढी रक्कम खर्च करतो, त्यापेक्षातर फारच कमी आहे. म्हणजे दरडोई मंत्र्याच्या पिण्यावर दोन तासासाठी सरकारी तिजोरीतून जेवढा खर्च होतो, त्यापेक्षाही कमी दरडोई खर्च शेतकर्‍यांच्या कर्जमाफी साठी गेल्या साठ वर्षातही झालेला नाही. पण हे कोणी विचारात घ्यायलाच तयार नाही.

शेतकर्‍याला सरकारकडून अनुदान किंवा कर्जमाफीच्या स्वरूपात खूपच काही दिले जाते, असा एक भारतीय जनमानसात गैरसमज पोसला गेला आहे. काय दिले जाते? असा जर उलट सवाल केला तर वारंवार रासायनिक खतावर भरमसाठ सबसिडी दिली जाते, याचाच उद्घोष जाणकारांकडून केला जातो. एवढ्या एका उदाहरणाच्यापुढे त्यांच्याही मेंदूला पंख फुटत नाहीत आणि बुद्धीही फारशी फडफड करीत नाही. ही रक्कम पन्नास हजार कोटीच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. पण ही रक्कम थेट शेतकर्‍यांना दिली जात नाही, खते उत्पादक कंपन्यांना दिली जाते. संधी मिळेल तेथे-तेथे पार मुळासकट खाऊन टाकणार्‍यांच्या देशात पन्नास हजार कोटीपैकी बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर किती रक्कम हडप केली जाते आणि शेतीतल्या मातीपर्यंत किती रक्कम पोचते, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. शिवाय ही रक्कमही शेतकर्‍यासाठी दरडोई शे-पाचशे पेक्षा अधिक दिसत नाही. शिवाय ही रक्कम म्हणजे निलंबित केलेल्या कर्मचार्‍याला काहीच काम न करता निलंबन काळात फक्त रजिस्टरवर सही करण्यासाठी एक दिवसाच्या पगारावर शासकीय तिजोरीतून जेवढी रक्कम खर्च होते त्यापेक्षा कमीच आहे.

या प्रचलित अर्थव्यवस्थेचे खेळच न्यारे आहेत. रासायनिक खतांच्या सबसिडीच्या नावाखाली कंपन्या आणि संबंधित शासक-प्रशासकांचे उखळ पांढरे होते. कर्जमाफीच्या नावाखाली बॅंकाची बुद्धीत निघालेली कर्जे वसूल होतात. शेतीविषयक वेगवेगळ्या अनुदानावर राजकारणी डल्ला मारून जातात. नाव शेतकर्‍यांचे आणि चंगळ करतात इतरच. शेतकर्‍याची ओंजळ रिकामीच्या रिकामीच राहते.

हे खरे आहे की, स्वातंत्र्यपूर्व काळातही शेतकर्‍याला काहीच मिळत नव्हते. पण शेतकर्‍याचे नाव घेऊन हजारो कोटी रुपये शासकीय तिजोरीतून उकळून त्यावर अवांतर बांडगुळे नक्कीच पोसली जात नव्हती. स्वातंत्र्य असो की पारतंत्र्य, राजेशाही असो की लोकशाही, व्यवस्था कोणतीही असो शेतकरी उपेक्षितच राहिला आहे. स्वातंत्र्य मिळूनही आणि लोकशाही शासनव्यवस्था येऊनही शेतकरी दुर्लक्षितच का राहिला, याची काही कारणे आहेत.

विधिमंडळ, न्यायपालिका, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. पण शेतकर्‍यावाचून या चारही आधारस्तंभांचे काहीच अडत नाही. शेतकर्‍यांकडे अशी कोणतीच शक्ती वा अधिकार नाहीत की या चारही स्तंभांना शेतकर्‍यांची काही ना काही गरज पडावी आणि ज्याची कुठेच, काहीच गरज पडत नाही, तो अडगळीत जाणार हे उघड आहे. नाही म्हणायला शेतकर्‍याकडे काही अस्त्रे आहेत, पण ती त्याला वापरण्याइतपत पक्वता आलेली नाही.

विधिमंडळ : लोकशाहीमध्ये मतपेटीच्या माध्यमातून विधिमंडळ अस्तित्वात येते. तेथे मताचा योग्य तर्‍हेने वापर करणे गरजेचे असते. पण दुर्दैवाने आपल्या देशात उमेदवाराच्या योग्य-अयोग्यतेच्या आधारावर, विकासकामांच्या आधारावर, अर्थविषयक धोरणांच्या आधारावर, प्रश्न सोडविण्याच्या पात्रतेच्या आधारावर मतदान करायचे असते, ही भावनाच अजूनपर्यंत रुजलेली नाही किंवा तसा कोणी प्रयत्नही करत नाही. या देशातला किमान सत्तर-अंशी टक्के मतदार तरी निव्वळ जाती-पाती, धर्म-पंथाच्या आधारावरच मतदान करतो, ही वास्तविकता आहे. जेथे सुसंस्कृत-असंस्कृत, सुशिक्षित-अशिक्षित, सुजाण-अजाण झाडून सर्वच वर्गातील माणसे मतदान करताना धर्मासाठी कर्म विकतात आणि जातीसाठी माती खातात, तेथे शेतकरी आपला हक्क मिळविण्यासाठी मतदानाच्या अधिकाराचा शस्त्रासारखा वापर करतील, हे कदापि घडणे शक्य नाही. कारण समाज हा नेहमीच अनुकरणप्रिय असतो. एकमेकांचे अनुकरण करीतच वाटचाल करीत असतो. त्यामुळे शेतकरी जात-पात-धर्म-पंथ सोडून न्याय्य हक्क मिळविण्याच्या आधारावर योग्य त्या व्यक्तीलाच मतदान करेल, अशी शक्यता निर्माण होण्याचीही शक्यता नाही आणि त्यामुळे शेतकरी वर्गाची मते गमावण्याच्या भितीने विधिमंडळ धोरणात्मक निर्णय घेताना शेतकरीहीत प्रथमस्थानी ठेवतील, अशी दुरवरपर्यंत संभाव्यता दिसत नाही.

विधिमंडळात जायचे असेल तर निवडून यावे लागते आणि निवडून यायला प्रचंड प्रमाणावर पैसा लागतो, पक्षाचा आशीर्वाद लागतो. ज्याचा खर्च जास्त तो उमेदवार स्पर्धेत टिकतो. निवडणुका जिंकण्यासाठी वापरला जाणारा पैसा उमेदवाराने किंवा त्याच्या पक्षाने कुदळ-फावडे हातात घेऊन रोजगार हमीची कामे करून मिळवलेला नसतोच त्यामुळे सढळ हस्ते दान करणार्‍या दानशुरांची सर्व उमेदवारांना व राजकीय पक्षांना गरज भासते. परिणामत: जिंकून येणार्‍या उमेदवारावर आणि पक्षावर निधी पुरविणार्‍यांचाच दरारा असतो. शेतकरी मात्र मुळातच कंगालपती असल्याने उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना आर्थिकदान देऊन त्यांच्यावर वचक ठेवण्याची संधी गमावून बसतो.
शेतकरी म्हणून शेतकरी या लोकशाहीच्या पहिल्या “स्तंभाला” काहीच देऊ शकत नसल्याने, त्याच्या पदरातही मग काहीच पडत नाही.

न्यायपालिका : स्वमर्जीने किंवा सत्य-असत्याच्या बळावर न्यायपालिका न्याय देऊ शकत नाही. विधिमंडळाने केलेले कायदे हाच न्यायपालिकेच्या न्यायदानाचा प्रमुख आधार असतो. संविधानातील परिशिष्ट नऊ हे शेतकर्‍यांचे मूलभूत हक्क पायदळी तुडविणारे कलम आहे, अशी न्यायपालिकेची खात्री झाली तरी काहीच उपयोग नाही. न्यायपालिका संविधानाशी बांधील असल्याने शेतकरी हीत जोपासण्यात हतबल आणि असमर्थ ठरत आहेत. शेतकर्‍यांना चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करू नये किंवा मुद्दलाच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम अधिक असू नये, असा दामदुपटीविषयीचा आदेश असूनही, कोणत्याही बॅंकेने आजपर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही. तरीही असा आदेश पायदळी तुडविणार्‍या बॅंकाना न्यायपालिका वठणीवर आणू शकल्या नाहीत.
शिवाय आता न्याय मिळविणे अतिमहागडे झाले असून न्याय मिळविण्यासाठी येणारा खर्च शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

प्रशासन : शेतकर्‍याविषयी प्रशासनाची भूमिका काय असते याविषयी न बोललेच बरे. शेतकर्‍याच्या मदतीसाठी प्रशासन कुठेच दिसत नाही. शेतीच्या भल्यासाठी प्रशासन राबताना कधीच दिसत नाही. खालच्या स्तरावरून वरच्यास्तरापर्यंत कोणत्याही कर्मचार्‍याला भेटायला जायचे असेल तर खिशात पैसे टाकल्याशिवाय घरून निघताच येत नाही, अशी परिस्थिती आहे. ही मंडळी सर्व सरकारी योजना खाऊन टाकतात. आत्महत्याग्रस्त भागासाठी दिलेले पॅकेजही या मंडळींनी पार गिळंकृत करून टाकले.
अशा परिस्थितीत प्रशासनाकडून शेतीच्या समस्या सुटतील असा आशावाद बाळगणे म्हणजे उंदराच्या विकासासाठी मांजरीची नेमणूक करण्यासारखेच ठरते.

प्रसारमाध्यमे : शेतीच्या दुर्दशेला थोडीफार वाचा फोडण्याचे नित्यनेमाने प्रयत्न प्रसारमाध्यमाकडूनच होत असतात. पण प्रसारमाध्यमांच्याही काही मर्यादा आहेच. माध्यम चालवायला आर्थिकस्त्रोत लागतात. जाहिरात आणि अंकविक्री किंवा सबस्क्रिप्शन हे माध्यमांचे प्रमुख आर्थिकस्त्रोत बनलेले आहेत. जाहिराती देणार्‍यांमध्ये खुद्द शासन, खाजगी कंपन्या, वेगवेगळ्या संस्था असतात. शेतकर्‍याला जाहिरात द्यायची गरजच नसते किंवा तसे आर्थिक पाठबळही नसते. अंक विकत घेण्यामध्ये किंवा पेड टीव्ही चॅनेल पाहण्यामध्येही शेतकरी फ़ारफ़ार मागे आहेत. स्वाभाविकपणे पेपर विकत घेऊन वाचणारा वृत्तपत्राचा वाचकवर्गही बिगरशेतकरीच असल्याने वृत्तपत्रातले शेतीचे स्थानही नगण्य होत जाते. मग कृषिप्रधान देशातल्या महत्त्वाच्या कृषिविषयक बातम्या आगपेटीच्या आकारात शेवटच्या पानावरील शेवटच्या रकान्यात आणि ऐश्वर्यारायच्या गर्भारशीपणाच्या बातम्या पहिल्या पानावर पहिल्या रकान्यात इस्टमनकलरमध्ये झळकायला लागतात.

शेवटी हा सारा पैशाचा खेळ आहे. शेतकर्‍याकडे पैसा नाही म्हणून त्याची कोणी दखल घेत नाही. दखल घेत नाही म्हणून शेतीची दशा पालटत नाही आणि शेतीची दशा पालटत नाही म्हणून पुन्हा शेतीमध्ये पैसा येत नाही, असे दृष्टचक्र तयार होते आणि हे दृष्टचक्र एकदातरी खंडीत करून शेतीमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याची ऐपत लोकशाहीच्या चारही आधारस्तंभात किंचितही उरलेली नाही, हे पचायला जड असले तरी निर्विवाद सत्य आहे.
त्यामुळे शेतीमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आता पाचव्या स्तंभाची नितांत आवश्यकता आहे, असे म्हणावे लागते.
गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Comments

दुरुस्ती

कृपया हे वाक्य असे वाचावे.

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या नावाखाली बॅंकाची बुडीत निघालेली कर्जे वसूल होतात.

पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

शेवट थोडा सकारात्मक हवा, अशी विनंती

विश्लेषणाचा काही भाग, आणि कळकळ पटण्यासारखी आहे. पण शेवटी पाचव्या स्तंभाविषयी थोड्या कल्पना तरी सांगायला हव्या होत्या.

शेतकरी स्वतःच्या आर्थिक भल्याकरिता संघटितरीत्या मतदान करणार नाहीत, याबद्दल तुमचे म्हणणे चटका लावून जाते.

शेतकर्‍यांच्या दृष्टीने कुठली आर्थिक धोरणे वा कायदे गरजेचे आहेत, त्यांच्याबाबतही तुम्ही सांगावे. या लेखातून असे वाटते (पण थेट सांगितलेले नाही), की कर्जमाफीच्या गरज आहे. त्याबाबत अधिक विस्ताराने सांगावे. (म्हणजे ही कर्जमाफी सार्वत्रिक असावी, की विशेष प्रकारच्या कर्जांची असावी, की दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांवरील कर्जांची असावी... वगैरे.)

लोकशाहीत पुष्कळदा अन्य घटकांशी मुत्सद्दी रीतीने तह करून बहुमत प्राप्त करावे लागते. शेतकर्‍यांच्या गरजेचे धोरण ज्या बिगर-शेतकर्‍यांच्या स्वार्थासाठी उपकारक असेल, त्यांचा शोध घेतला पाहिजे. कदाचित अशा तर्‍हेने तुम्ही बहुमत मिळवू शकाल. अजून "विधिमंडळ" या स्तंभाबाबत तुम्ही पूर्णपणे उदासीन होऊ नये, असे मला वाटते.

ही अंधश्रद्धा

शेवट थोडा सकारात्मक हवा
"विधिमंडळ" या स्तंभाबाबत तुम्ही पूर्णपणे उदासीन होऊ नये, असे मला वाटते.

सकारात्मक नसलेली परिस्थिती जाणूनबुजून सकारात्मक रेखाटण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःची आणि त्यासोबतच इतरांचीही फसगत करून घेण्यासारखे आहे.
सकारात्मक लिहायला समोरचे दृष्यही सकारात्मकच असायला हवे.
शिवाय शासकीय धोरणे जर शेतीविषयी सकारात्मक झाली तर माझी काय बिशाद आहे नकारात्मक लिहिण्याची?

"विधिमंडळ" या स्तंभाबाबत मी किंवा माझ्यासारखी आम जनता पूर्णपणे उदासीन होऊ नये याची काळजी घेणे ही जबाबदारी "विधिमंडळ" या स्तंभाची आहे.
हा स्तंभच जर मुळ उद्दिष्ठांपासून भटकला असेल तर मी या स्तंभावर निष्कारण विश्वास दर्शवणे, ही अंधश्रद्धा ठरेल.

...................................................................................
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

छान लेखन मात्र...

लेखन भावनाप्रधान आहे. त्यातील अभिनिवेष मनाला स्पर्शुन गेला. चुटपुट लागली.
मात्र ठोस योजना/ पाचव्या स्तंभाची कल्पना समजली नाही

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

पाचव्या स्तंभाची कल्पना

पाचव्या स्तंभाची कल्पना समजली नाही

पाचव्या स्तंभाची निर्मिती सध्यातरी दृष्टीपथात नाही.

पण येऊ घातलेल्या नव्या संगणकीय/इंटरनेट तंत्रज्ञानात पाचव्यास्तंभाची उणिव भरून काढण्याची थोडीशी धूसर शक्यता मला दिसत आहे. पण आजच तसे बेधडक भाकीत करणे शक्य नाही.
मात्र आता पाचव्या स्तंभाची नितांत आवश्यकता आहे, याविषयी दुमत नाही.

पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

कळकळ

लेखकाची कळकळ समजली तरीही शेतकर्‍यांच्या प्रश्नाचे मूळ हे शेतीमालाला मिळणारे बेभरवशाचे भाव, दलालांचा वारेमाप फायदा, शेतीमाल साठवून ठेवण्याच्या आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या योग्य सुविधांचा अभाव, शेतकरी सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार आणि त्यांत होणारा राजकारण्यांचा हस्तक्षेप, सरकारची वारंवार बदलणारी शेतीविषयक आणि शेतीमाल निर्यातविषयक धोरणे, सामुहिक शेतीपद्धतीची उणीव, दिवसेंदिवस कमी होणारा शेतमजूरांचा पुरवठा यांमध्ये पुरलेले आहे. एका वेळच्या कर्जमाफीमुळे हे प्रश्न सुटणार नाहीत. आणि जोवर हे प्रश्न सुटणार नाहीत (म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार नाही) तोवर शेतकर्‍याची कर्जबाजारीपणातून सुटका होणार नाही. जोवर खासगी व्यापार्‍यांच्या हातात शेतीची दशा आणि दिशा ठरवण्याचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नियंत्रण आहे तोवर हे असेच चालेल. त्यासाठी शेतकर्‍यांच्या नव्या, सुशिक्षित नेतृत्वाने केवळ सरकारशी भांडण करण्याचे सोडून स्वतःच काही करायला हवे ज्यामुळे हे नियंत्रण त्यांच्याकडे येईल.असे करणे शक्य आहे हे काही उदाहरणांवरून दिसते.(अमुल, रयथू बझार इ.)

समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न आज उभे आहेत.(तसे ते असतातच.पण मुक्त अर्थव्यवस्थेमुळे वर्गभेद भीषण बनत आहे.) त्यात शेतकरी, कामकरी, बुद्धीजीवी या सर्वांचे प्रश्न आहेत. शेतकर्‍यांना कर्जमाफी, सरकारी नोकरांना पगारवाढ अशा उपायांनी मूळ समस्या सुटत नाही. उलट चलनवाढ होऊन सर्वांनाच त्याचा समान फटका बसतो.म्हणून शेतकर्‍यांनी कर्जमाफी न मागता आपले मूळ प्रश्न धसाला लावले पाहिजेत. अन्यथा भारतातील शेतकरी शेती करण्यास नालायक आहे असे सांगत सत्ताधारी कार्पोरेट शेतीला मान्यता देतील. सध्या भारतातील अनेक स्रोतांचे वैश्विकीकरण (= कार्पोरेटायझेशन) सुरू आहे. त्यात शेतीची भर पडेल हा धोका शेतकरी बांधवांनी ओळखला पाहिजे.

शेतकर्‍यांच्या प्रश्नाचे मूळ

शेतकर्‍यांच्या प्रश्नाचे मूळ हे शेतीमालाला मिळणारे बेभरवशाचे भाव, दलालांचा वारेमाप फायदा, शेतीमाल साठवून ठेवण्याच्या आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या योग्य सुविधांचा अभाव, शेतकरी सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार आणि त्यांत होणारा राजकारण्यांचा हस्तक्षेप, सरकारची वारंवार बदलणारी शेतीविषयक आणि शेतीमाल निर्यातविषयक धोरणे, सामुहिक शेतीपद्धतीची उणीव, दिवसेंदिवस कमी होणारा शेतमजूरांचा पुरवठा यांमध्ये पुरलेले आहे.

माझ्यामते

शेतीमालाला मिळणारे बेभरवशाचे भाव,
राजकारण्यांचा हस्तक्षेप,
सरकारची वारंवार बदलणारी शेतीविषयक आणि शेतीमाल निर्यातविषयक धोरणे

ही शेतीतल्या गरिबीची मुख्य कारणे आहेत.

दलालांचा वारेमाप फायदा,
शेतीमाल साठवून ठेवण्याच्या आणि त्यावर प्रक्रिया करण्याच्या योग्य सुविधांचा अभाव,
शेतकरी सहकारी संस्थांमधील भ्रष्टाचार
सामुहिक शेतीपद्धतीची उणीव,
दिवसेंदिवस कमी होणारा शेतमजूरांचा पुरवठा

ही दुय्यम कारणे आहेत.

एका वेळच्या कर्जमाफीमुळे हे प्रश्न सुटणार नाहीत. आणि जोवर हे प्रश्न सुटणार नाहीत (म्हणजे केंद्र आणि राज्य सरकार ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार नाही) तोवर शेतकर्‍याची कर्जबाजारीपणातून सुटका होणार नाही.

शतप्रतिशत सहमत.

जोवर खासगी व्यापार्‍यांच्या हातात शेतीची दशा आणि दिशा ठरवण्याचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नियंत्रण आहे तोवर हे असेच चालेल. त्यासाठी शेतकर्‍यांच्या नव्या, सुशिक्षित नेतृत्वाने केवळ सरकारशी भांडण करण्याचे सोडून स्वतःच काही करायला हवे ज्यामुळे हे नियंत्रण त्यांच्याकडे येईल.असे करणे शक्य आहे हे काही उदाहरणांवरून दिसते.(अमुल, रयथू बझार इ.)

असहमत.
शेतीची दशा आणि दिशा ठरवण्याचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नियंत्रण व्यापार्‍यांच्या नव्हे तर सरकारच्या हातात आहे.
शासन हेच दोषी असल्याने शासन सोडून व्यापार्‍यांना दोष देणे म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी देण्यासारखे आहे.

अमुल, रयथू बझार इ.

ही उदाहरणे शेती केल्याची नसून उद्योग/व्यापाराची आहेत.
एखादा सामान्य माणूस जरी शेती सोडून उद्योग/व्यापार करायला लागला तर त्याची भरभराट होतेच.

कार्पोरेट शेती मध्ये गहू, तांदूळ, डाळ, चना, कापूस किंवा उडिद पिकवायची शेती होणार नाहीये. त्यामुळे ती शेती नसून चक्क व्यापार / उद्योग आहे, असे समजावे लागेल.
कदाचित ते शेती करायचे भासवून जमीनी बळकावतील मग जमीन कसून नव्हे तर जमिन विकून पैसे कमावतील.
------------------------------------------------------
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

शेती हा उद्योग माना, व्यापार बनवा

शेतीची दशा आणि दिशा ठरवण्याचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष नियंत्रण व्यापार्‍यांच्या नव्हे तर सरकारच्या हातात आहे.
शासन हेच दोषी असल्याने शासन सोडून व्यापार्‍यांना दोष देणे म्हणजे चोर सोडून सन्याशाला फाशी देण्यासारखे आहे.

- तुम्हीच लेखात म्हटल्याप्रमाणे शेतकर्‍याकडे पैसा नाही म्हणून त्याचे कोणी ऐकत नाही. पैसा ज्याच्या हाती तो शासनावरही नियंत्रण ठेऊन असतो हे तुम्हालाही मान्य आहे. भारतीय शासनच नव्हे तर सर्व जगाचे अर्थकारण (पर्यायाने राजकारण) अप्रत्यक्षपणे व्यापार्‍यांच्या हातात आहे. (केवळ उद्योजक असणे म्हणजे व्यापारी असणे नव्हे हे लक्षात घ्या.)

अमुल, रयथु बझार ही उदाहरणे शेती केल्याची नसून उद्योग/व्यापाराची आहेत.
एखादा सामान्य माणूस जरी शेती सोडून उद्योग/व्यापार करायला लागला तर त्याची भरभराट होतेच.

-बरोबर.पण त्यासाठी शेती कशाला सोडायची? शेती करणे म्हणजेच व्यापार+उद्योग झाला पाहिजे. रयथु बझारमध्ये शेतकरीच थेट आपला माल ग्राहकाला विकतो. ही (कच्चा माल - पक्का माल - घाऊक विक्री - पॅकेजिंग - किरकोळ विक्री - बाजाराचा अंदाज - मालाचा दर्जा) पुरवठासाखळी शेतकर्‍यांनीच निर्माण केली पाहिजे. ही काळाची गरज आहे. एनजीओना हाताशी धरून एक अखिल भारतीय लिमिटेड कंपनी जर शेतकर्‍यांनी काढली तर तिला स्लोन/हॉवर्डमधून एम्बीए झालेले सीईओ नेमता येतील. वॉलमार्टही मागे पडेल अशी यंत्रणा निर्माण करता येईल. अशी स्वप्ने पाहून त्यामागे लागले पाहिजे.तसे झाले तर शेतकरी कशाला आपली जमिन विकेल आणि शहराकडे जाईल?
सरकार काहीही करणार नाही असे गृहित धरून हातपाय हालवले तरच तरणोपाय आहे. नाहीतर वर नमूद सर्वकाही करायला देशी परदेशी कंपन्या टपून बसलेल्या आहेत. आजही रिलायन्स शेतकर्‍यांच्या मालाची खरेदी करून थेट किरकोळ बाजारापर्यंत माल पोचवत आहेच. शेतीचे खासगीकरण झाले तर त्या कंपन्या यांत्रिक शेतीने जमिनीतून धान्य काढायलाही मागेपुढे पाहणार नाहीत. मग आपला अन्नधान्याचा स्रोतही सरकारने कंपन्यांच्या घशात घातला असा शंख करून काही उपयोग होणार नाही.
हे सर्व बोलायला सोपे आहे याची जाणीव आहे. :(

जगाचे अर्थकारण

सर्व जगाचे अर्थकारण (पर्यायाने राजकारण) अप्रत्यक्षपणे व्यापार्‍यांच्या हातात आहे.

असे जर तुम्हाला म्हणायचे असेल तर व्यापारी हा शब्द वापरल्याने वाचकाला (निदान मला तरी) तसा बोध होणार नाही.
त्याऐवजी बहूराष्ट्रीय कंपन्या वगैरे म्हटले तर मी तुमच्याशी सहमत आहे.

मात्र,

शेती करणे म्हणजेच व्यापार+उद्योग झाला पाहिजे.

याचाशी असहमत आहे. कारण शेती हाच पूर्णवेळ व्यवसाय आहे.
प्रामाणिकपणे शेती करायचे म्हटले तर व्यापार-उद्योग करण्यासाठी शिलकी वेळ वाचत नाही.
शिवाय
शेती करणे हे घाट्याचे असेल आणि व्यापार उद्योग करणे फायद्याचे असेल तर व्यापार उद्योगच का करू नये, असाच कोणिही विचार करतो आणि शेती करणे सोडून देतो.
कारण व्यापार उद्योग करून कमवायचे आणि ती कमाई शेतीचा तोटा भरून काढायला वापरायची, हा कोणालाही शुद्ध मुर्खपणा वाटतो. मग त्यांचे काय चुकते?

पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

पूर्णवेळ व्यवसाय

कोणत्याही कंपनीत उत्पादन करणे हा एकमेव पूर्णवेळ व्यवसाय असू शकत नाही. निर्मित वस्तूंचा व्यापार(बाजारपेठेचा अंदाज आणि विक्री) करणे हे कंपनीचे अविभाज्य अंग असते. अन्यथा ती कंपनी तोट्यात जाऊन बंद पडते.
हा सर्वसामान्य नियम शेतीलाही लागू आहे. सध्या शेतकरी केवळ कच्च्या मालाच्या उत्पादनावरच लक्ष केंद्रित करतात.त्यामुळे बाजारपेठ त्यांच्या ताब्यात रहात नाही आणि ते तोट्यात जातात.

उदा. भारतातल्या गव्हाच्या वाढत्या किंमतींबाबत हा अहवाल पहा. या अहवालात गहू उत्पादनाच्या संबंधी समस्यांना गौण स्थान दिलेले आहे. (म्हणजे त्या बाबी वाढत्या किंमतींसाठी जबाबदार नाहीत.) असे लक्षात येईल की गव्हाच्या विक्रीचे दर जागतिक अन्नधान्य दरांवर प्रामुख्याने अवलंबून आहेत. हे दर ठरवणे पूर्णपणे व्यापार्‍यांच्या हातात गेलेले आहे. (असे व्यापारी की ज्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन गव्हाच्या ओंब्या पूर्ण आयुष्यात पाहिल्या नसतील.) भारतात शेतकरी गहू ११.७० रु. किलोला विकतात. तोच गहू प्रत्यक्ष ग्राहकाला मात्र २८ रु. किलोला मिळतो. मधले सर्व खर्च वगळले तरी या व्यापारात किंमती १०० टक्क्यांनी वाढतात.मग हा फायदा कुठे जातो? शेतकरी मात्र तिथेच राहतो.

व्यापार्‍यांवर दोषारोपन करणे वस्तुस्थितीला धरून नाही.

कंपनीमध्ये सुद्धा उत्पादन आणि विपणण असे स्वतंत्र विभाग असतात. एकच चमू दोन्ही कामे सांभाळत नाहीत.
आणि शेतकरी म्हणजे काही कंपनीसारखा शेकडो लोकांचा समुच्चय नसतो.
.....
गव्हाचे शासनाने आधारभूत किंमत म्हणून प्रति क्विंटल रू ११००/- भाव ठरवले असताना व्यापार्‍यांनी जर रू ११७०/- दिले तर व्यापार्‍यांनी सरकारपेक्षा ७०/- रुपये जास्त दिले आहे. जर सरकारने गव्हाची खरेदी केली तर रू. ११००/- याच भावाने केली असती म्हणून व्यापार्‍यांना धन्यवाद द्यायला हवेत.

याही स्थितीमध्ये सरकार सोडून व्यापार्‍यांवर दोषारोपन करणे वस्तुस्थितीला धरून नाही.
..................................................................................
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

तेच तर पण उलट अर्थाने

शेतकरी म्हणजे काही कंपनीसारखा शेकडो लोकांचा समुच्चय नसतो.

-शेतकरी संघटना तर लाखो शेतकर्‍यांचा समुच्चय असतो ना? त्यांना योग्य दिशा देणे हेच संघटनेच्या नेत्यांचे काम आहे ना?

कंपनीमध्ये सुद्धा उत्पादन आणि विपणण असे स्वतंत्र विभाग असतात. एकच चमू दोन्ही कामे सांभाळत नाहीत.

-तेच तर. शेतकरी संघटनेने असा विपणन विभाग निर्माण करून त्यात शेतकर्‍याचे हित पहाणारे अधिकारी नेमावेत आणि त्यांच्याकरवी शेतीमालाची थेट बाजारपेठ निर्माण करावी. (करोडो रुपयांची जमिन विकून दोन वर्षात परत कफल्लक होण्यापेक्षा अशा माजी शेतकर्‍यांनी या कंपनीत पैसे गुंतवावेत. जसे मगरपट्टाने केले वगैरे...)

सरकार सोडून व्यापार्‍यांवर दोषारोपन करणे वस्तुस्थितीला धरून नाही.

- व्यापार्‍यांनी दिलेला भाव सरकारपेक्षा ७० पैसे जास्त असला तरी सरकार तो गहू १५ रु. किलोने गरीबांसाठी रेशनला विकते आणि व्यापारी २८ रु. किलोने दुकानातून विकतो हा फायद्यातला फरक पाहिला की ७० पैसे जास्त देऊन व्यापारी १३ रुपये जास्त कमावतो आहे हे कुणाच्याही लक्षात येईल. सरकार व्यापार्‍यांसाठी विक्रीदर नियंत्रित करत नाही - खरेदीदर नियंत्रित करते. कारण त्यात व्यापार्‍यांचे हितसंबंध गुंतलेले असतात. सरकारला त्याबाबत दोषी धरणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला सुळावर चढवणे आहे. मध्यस्थ दलालांचा अफाट फायदा हाच मुळात आद्य निर्माता आणि अंतिम ग्राहक या दोघांनाही महागात पडतो आहे. (तुम्ही व्यापार्‍यांना दोषी मानत नाही याचे आश्चर्य वाटते.)

ता.क. : वर दुव्यात दिलेला अहवाल वाचलात का? नसेल तर जरूर वाचा.

व्यापारी नव्हे तर सरकारच दोषी

तुम्ही व्यापार्‍यांना दोषी मानत नाही याचे आश्चर्य वाटते.

मला मुळ दोष व्यापार्‍यांचा दिसत नाही. इतर लोक व्यापार्‍यांना दोष म्हणून मीही देणे अंधानुकरण ठरेल.

शेतकर्‍याच्या मालाला "आधारभूत किंमत" ठरवून देणारे सरकार व्यापार्‍यांना विक्रीची कमाल किंमत का ठरवून देत नाही.
गव्हाची शेतकर्‍याकडून खरेदीची किंमत जर ११ रू असे ज्या सरकारला ठरवता येते त्याच सरकारला तोच गहू व्यापार्‍यांनी ग्राहकाला विकण्याची किंमत रू १५ वगैरे ठरवून का देता येत नाही?
एवढेच सरकारला कळत नाही काय? सरकारी यंत्रना "बाळबोध" किंवा "दुधपीती" असते काय?
सरकारने फक्त शेतकर्‍यासाठी भाव बांधून ठेवले आहे.
गहू ११ रूपये भावाने खरेदी करून व्यापार्‍यांनी २८ रुपयेच काय चक्क २८० रुपये प्रती किलो भावाने सुद्धा विकले तर तो कोणत्याही कायद्याने गुन्हा होत नाही.
व्यापार्‍यांना/कारखानदारांना कोणताही माल कोणत्याही भावाने विकण्याची मुक्तमुभा सरकारनेच दिली आहे. (कदाचित काही अपवाद वगळता)

त्यामुळे येथेही व्यापारी नव्हे तर सरकारच दोषी आढळते.
आता यात चोर कोण आणि संन्याशी कोण?
...............................................................
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

+१

विसुनानांशी सहमत आहे.

पण शेती चालू राहणे ही अ-शेतकर्‍यांची ही गरज आहे हे विसरून चालणार नाही.

नितिन थत्ते

रडक्या मानसिकतेचा लेख

लेखातून विचार मांडले गेले नाहीत, उलट लेखातून एक रडगाणे गायले गेले आहे.

या जगात कोण सुखी आहे? ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे, त्यांना क्शणा-क्श्णाने बदल असलेल्या जगाची काय भीती वाटत असेल हे आपण जाणू शकतो कां? पैसा कसा कुठे गुंतवायचा?, आपल्याला त्या कामात कोण-कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल? दुसर्‍यांवर किती विश्वास ठेवायचा?, ह्या गोश्टींचा विचार करताना त्यांना रात्री गाढ झोप तरी येत असेल कां?

प्रत्येकाला काहीना काही ताण, अडचणी असतातच.

शहरातील लोकं कशी जगतात? हे ग्रामिण मंडळींना माहित आहे कां? कि फक्त दुचिवा, चित्रपटात जे जसे दिसते त्याला खरे मानून आपणच दु:खी आहोत असे मानून गळे काढणे ह्याला काय म्हणावे? मुंबईतील मिल बंद पडल्या/ पाडल्या (मिलसाठी मिळालेल्या लिझवरच्या जमिनी मिलमालकाने विकल्या ), त्यानंतर कमीत-कमी कॉंपनसेशन मिळालेल्या मीलकामगारांचे, त्यांच्या परीवारांचे काय हाल झाले? हे विदर्भ-मराठवाड्यातील लोकांना माहित आहे कां?

दलित कुटुंबात मागसलेल्या वस्तीत वाढलेली व्यक्ती दुचिवा, चित्रपट पाहून, भडक-अतिरंजित पुस्तके वाचून आपल्या मागासलेपणाला 'हे सवर्ण लोकच जबाबदार आहेत', असे मानून स्वत:ची मानसिकता घडवत असतील, तर त्याला काय म्हणावे?

मुस्लिम मुहल्ल्यात वाढलेला मुस्लिम तरुण दुचिवा, चित्रपट पाहून हेच मानू लागला कि, 'ह्या हिंदुस्थानात मुस्लिमांना दुय्यम जिणे जगावे लागते, हा आपल्या जमातीवर अन्याय आहे.' तर त्याला काय म्हणावे?

'शेतकरी हा सगळ्यांचे पोट भरतो.' हे भावनाप्रधान विधान आहे. मुळात तो स्वत:चे पोट भरण्यासाठीच तो शेतीउद्योग करत असतो. तो कोणावरही उपकार करत नाही.

'भारत हा (अर्थव्यवस्थेच्या दृश्टीने) कृशीप्रधान देश आहे.' हे वाक्य आता खूप जुने व टाकावू झाले आहे. सध्यातरी भारत हा 'स्वअस्तित्व टिकवा, विकास करा' हेच सांगणारा देश आहे.

रडगाणे

शहरातील लोकं , ग्रामिण मंडळीं, मुंबई, विदर्भ-मराठवाडा, दलित, मुस्लिम

असा जाती-पाती, धर्म-पंथ, प्रांत-निहाय भेदाभेद माझ्या लेखात मी केलेला नाही.

मी आर्थीकभेदाभेद चव्हाट्यावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यात जाती-पाती, धर्म-पंथ निहाय भेदाभेदाला फारसे स्थान आहे, असे मला तरी वाटत नाही.
-------------------------------

या जगात कोण सुखी आहे?

हे मात्र खरे आहे. कारण निव्वळ आर्थीक कारणामुळे फक्त शेतकरीच आत्महत्त्या करीत नाहीत.

कर्जबाजारीपणापायी गेल्या दहा वर्षात

१० हजार शेतकरी
९ हजार व्यापारी
८ हजार उद्योजक
७ हजार राजकारणी
६ हजार कर्मचारी
५ हजार कलेक्टर
४ हजार मंत्री
३ हजार प्राध्यापक
२ हजार तहसिलदार
आणि
१ हजार पत्रकारांनी

निव्वळ कर्जबाजारीपणापायी गळ्याला दोर लटकवून किंवा विष प्राशन करून आत्महत्त्या केलेल्या आहेत.
.
.
.
हे खरे ना?

---------------------------------------------------
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

काही चांगल्या गोष्टीही होत असतील

चर्चा चांगली होते आहे. माझ्यामते सकारात्मकता हवीच चर्चेत असेही नाही. पण काही चांगल्या गोष्टीही होत असतील. त्यांच्याबद्दल बोलल्यास हरकत नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मुख्य रोग सोडून

चर्चा चांगली होते आहे. माझ्यामते सकारात्मकता हवीच चर्चेत असेही नाही. पण काही चांगल्या गोष्टीही होत असतील. त्यांच्याबद्दल बोलल्यास हरकत नाही.

सहमत.

पण रोग्याला जर कॅंसर झाला असेल तर त्याच्या कॅंसरवर औषधोपचार करायचे सोडून त्याच्या निव्वळ गुडघेदुखी, सांधेदुखी, पोटदुखीवर प्राथमिकतेने उपचार करण्यात काही अर्थ आहे असे मला वाटत नाही. आणि निव्वळ सकारात्मक विचार असावेत एवढ्या सबबीखाली अशा डॉक्टरचे निष्कारण कौतुक करत बसण्याचेही कारण नाही.

प्रथम औषधोपचार कॅंसरवर व नंतर गुडघेदुखी, सांधेदुखी, पोटदुखीवर असा क्रम चालू शकतो.

पण या देशात शेतीविषयीचे धोरणे आखताना दुर्दैवाने मुख्य रोग सोडून अवांतर गोष्टीच जास्त बोलल्या जातात.
* * *
तुमच्या स्वाक्षरीवरून मला माझी एक कविता आठवली.

नागपुरी तडका - नाकानं कांदे सोलतोस किती?
...........................................................
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

दोन पैसे

आपल्या देशात साधारणत: २३ ते २४ कोटी लोक शेतीव्यवसायात आहेत. शेतीवर अवलंबून असणार्‍यांची संख्या ५८%वगैरे सांगितली जाते. म्हणजे प्रत्येक शेतीत काम करणार्‍या व्यक्तिवर १-२ व्यक्ति अवलंबून असतात. सरासरी प्रत्येक शेतीव्यवसायात असलेली व्यक्ति एक ते दीड एकर शेती करते. सरासरी प्रति एकर सातशे ते आठशे किलो धान्य उत्पादकता आहे. या धान्यावर दोन किंवा तीन व्यक्तिंना त्यांचा वर्षभराचा खर्च भागवावा लागतो. अशी परिस्थिती असतांना शेतमालाला सरासरी १००रु/किलो भाव (सध्या सरासरी भाव १० रुपयांपेक्षा जास्त नसावा) मिळाला तरी शेतकर्‍याचे वार्षिक उत्पादन फारतर ७० ते ८० हजारापर्यंत जाते. त्यावर शेतीसाठीचा खर्च वजा जाता दोन-तीन लोकांचे घर चालवायचे म्हटल्यास महिन्याला फारतर तीन-चार हजार रुपये मिळतात. हे गणित अतिशय ढोबळ आहे. आकडे येथून घेतले आहेत. लोकसंख्येचे आकडे २००१च्या जनगणनेनुसार आहेत.

या ढोबळ गणितावरून शेतमालाला योग्य भाव मिळणे यापेक्षाही शेतीची दरडोई उत्पादकता कमी असणे ही मोठी समस्या आहे असे मला वाटते. म्हणजेच शेतीवर अवलंबून असलेल्या लोकसंख्येचा भार कमी करणे तसेच शेतीची उत्पादकता जलसिंचन, तंत्रज्ञान यांचा वापर करून वाढवणे हे दोन उपाय सूचतात. २००१च्या आधीच्या जनगणना पाहील्यास शेतीव्यवसायात रोजगार मिळवणार्‍यांची संख्या १९५१मध्ये साधारणत: १० कोटीवरून २००१पर्यंत २३ कोटींपर्यंत पोचली आहे. प्रत्येक जनगणनेत या संख्येचा आकडा चढा राहिलेला आहे. या परिस्थितीमुळे शेतकर्‍यांची अवस्था बिकट होत असल्याचे ध्यानात येते.

श्री गंगाधार यांनी समस्या जोरकसपणे मांडली आहे. शेतकर्‍यांची अवस्था सुधारायला हवी यासाठी मी त्यांच्या बरोबर आहे. खर्‍या अर्थाने काही संरचनात्मक बदलांची (शेतीव्यवसायात असलेल्या लोकांची संख्या कमी करणे वगैरे) गरज आहे असे मला वाटते. कर्ज सुलभपणे उपलब्ध होणे, करात सवलत किंवा बाजारभावात वाढ हे जुजबी उपाय आहेत असे वाटते.

शेवटच्या परिच्छेदाशी सहमत

शेवटच्या परिच्छेदाशी सहमत आहे.

श्री गंगाधार यांनी समस्या जोरकसपणे मांडली आहे. शेतकर्‍यांची अवस्था सुधारायला हवी यासाठी मी त्यांच्या बरोबर आहे. खर्‍या अर्थाने काही संरचनात्मक बदलांची (शेतीव्यवसायात असलेल्या लोकांची संख्या कमी करणे वगैरे) गरज आहे असे मला वाटते. कर्ज सुलभपणे उपलब्ध होणे, करात सवलत किंवा बाजारभावात वाढ हे जुजबी उपाय आहेत असे वाटते.

पण ज्या शेतकर्‍यांना आणि त्यांच्या अपत्यांना पारंपरिक व्यवसाय सोडून जाणे भाग पडते आहे, त्यांच्याबाबत कळकळही समजून येते. शेतीत जी "आपण स्वतंत्र उत्पादक आहोत" ही भावना आहे, ती अन्य आधुनिक "परावलंबी/नोकरीच्या" व्यवसायांत क्वचितच मिळते.

+१

+१ सहमत आहे
(खरोखर गरजु) शेतकर्‍यांना मदत होईल असे आम्ही (जे शेतीशी संबंधित नाहित) काय करू शकतो?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

शेतकर्‍याबद्दल सदभावना बाळगाव्यात

(खरोखर गरजु) शेतकर्‍यांना मदत होईल असे आम्ही (जे शेतीशी संबंधित नाहित) काय करू शकतो?

शेतकर्‍याबद्दल सदभावना बाळगाव्यात. त्यानेही मोठा फरक पडेल. त्याला मानसिक आधार मिळेल.
आपण दुर्लक्षित नाही, ही भावना वाढीस लागेल.

शासनाने जिवघेणे शेतकरीविरोधी धोरणे राबविने बंद करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करावेत.
हे काम सनदशिर मार्गानेही होऊ शकेल.
त्यासाठी शासनाशी सर्वांनीच पंगा घ्यायची गरज आहे, असे मला वाटत नाही.

मात्र
त्याला व्यक्तीशः आर्थिक आधार द्यायचा प्रयत्न करू नये. कारण त्याचे आभाळ एवढे फाटले आहे की, ठीगळ लावणारा त्रासून जाईल आणि एकदिवस तोही प्रयत्न थांबवेल.
.................................................................
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

प्रयोग

एका खेड्यात काही शेतीविषयक प्रयोग करण्यासाठी किती पैशांची आवश्यकता लागू शकते ? अनेक समविचारी उपक्रमींकडून तो पैसा उपलब्ध होऊ शकेल. प्रयोगात पैसा देणारे उपक्रमी इन्टरफिअर करणार नाहीत* असे वाटते. जसा हवा तसा प्रयोग करता येईल.

प्रयोग यशस्वी झाल्यास त्याचा ताळेबंद नंतर मांडता येईल आणि त्याचा एक संदर्भ बनेल आणि म्हणून वापर करून शासन दरबारी पाठपुरावा करता येईल.

* १. मदत नको म्हणताय म्हणून अन्यथा मदतही करायची तयारी असेल.
२. मदत करायला तयार आहेत हे काही मार्गाने जाणून घेतले आहे.

नितिन थत्ते

वांगे अमर रहे...!

ज्ञान

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

आपल्या "शेती फायद्याची नसते" या एकूण म्हणण्याशी आधीपासून सहमतच आहे. त्यामुळे लेख वाचून माझ्या ज्ञानात नवी भर पडली नाही.

नितिन थत्ते

इस्त्रायलचे वारंवार उदाहरण

यापुर्वीच चिक्कार प्रयोग झालेत.
व्यक्तिशः शेतकर्‍यांनीही केलेत.
सामुहिकपणेही झालेत.
.
त्यांचे अनुभव चांगले नाहीत. सर्वच कर्जबजारी झालेत. काही चक्क भूमिहीन झाले. काहींना शेवटी मोक्षप्राप्तीचे मार्ग स्विकारावे लागले.
..
..
ज्या इस्त्रायलचे वारंवार उदाहरण दिले जाते. त्या इस्त्रायलनेही विद्यापिठांच्या मदतीने भारतात शेतीक्रांती करण्यासाठी प्रयोग आरंभले होते.
दोन वर्षातच त्यांना गाशा गूंडाळून मायदेशी पळावे लागले होते.

शेतीतले वास्तव लई कडवट आहे. तुमच्यापर्यंत ते पोचतच नाही म्हणून तुम्हाला त्याची काहीही कल्पना नसते.
....................................................
पिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.

 
^ वर