सुभेदार मल्हारराव होळकर

आज मल्हारराव होळकरांची २४५ वी पुण्यतिथी, मराठी साम्राज्य उत्तरेकडे वाढविण्यात सिंहाचा वाटा असलेल्या या लढवय्या वीराने आपले आयुष्य रणांगणावर खर्ची घातले. उत्तर हिंदुस्थानामध्ये 'आया मल्हार.....' 'आया मल्हार.....' या गर्जनेने नबाब आणि राजे राजवाड्यांची पळता भुई थोडी व्हायची. मराठी साम्राज्यातील गरुड खांबाची भूमिका बजावलेल्या मल्हारबांना www.jejuri.in परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा...........

सुभेदार मल्हारराव होळकर
सुभेदार मल्हारराव होळकर

दुभती जनावरे आणि मेंढी पालन करणा-या भटक्या धनगर समजातील खंडूजी वीरकर चौगुला यांच्या घरात मुलगा जन्माला आला आणि त्याचे नामकरण मल्हार करण्यात आले. त्यावेळी धनगरी तांडा होळ मुक्कामी होता, "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या उक्तीप्रमाणेच छोटा मल्हार तांड्यातील मुलांबरोबर खेळताना आपले गुण दाखवू लागला. मल्हार लहान असतानाच खंडूजीचा मृत्यू झाला आणि मल्हार व त्याच्या आईवर भाऊबंदांचा जाच वाढू लागला, म्हणून दोघांनी सुलतानपूर परगण्यातील तळोदे येथे भोजराज बारगळ मामाकडे आश्रय घेतला. होळ गावातील वास्तव्य संपले परंतु होळचे नाव त्यांच्यामागे चिकटले ते कायमचेच.

दाभाड्यांचा एक सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीतून आपली कारकीर्द सुरु केली. शिपाईगिरी करीत असताना तरुण बाजीराव पेशवे यांच्याबरोबर त्यांची खास मैत्री जुळून आली आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवी सन १७२९ च्या सुमारास माळवा प्रांताची सुभेदारी मिळवली. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये भोजराज मामाची मुलगी गौतमी बरोबर मल्हाररावचा विवाह संपन्न झाला आणि पुत्र झाला त्याचे नाव खंडेराव ठेवण्यात आले. जेजुरीचा खंडेरायाच्या कृपादृष्टीमुळेच आपली प्रगती झाली असल्याची मल्हारबांना धारणा होती, त्यामुळेच त्यांनी सुभेदारी मिळाल्याबरोबर जेजुरीला कुलोपाध्ये नेमले. मंदिराचे बांधकाम करण्याचा घाट घातला.

उत्तरोत्तर मल्हारबाची प्रगती होत होती, राणोजी शिंदे आणि उदाजी पवार यांच्यासोबत माळव्याची सुभेदारी समर्थपणे सांभाळीत होते. गनिमीकावा आणि मुत्सदेगीरीच्या जोरावर, उत्तर हिंदुस्थानातील राजकारणामध्ये मल्हाररावांचा मोठा दबदबा होता, मल्हार आया.. मल्हार आया... गर्जनेने शत्रूची दाणादाण उडत असे. इसवी सन १७३३ मध्ये चौंडीच्या माणकोजी शिंदे यांची कन्या अहिल्याबरोबर पुत्र खंडेरावचा विवाह लावून देण्यात आला. खंडेराव विलासी वृत्तीचा असल्याने मल्हारबांनी अहिल्येवर पुत्रवत प्रेम केले आणि तिच्यावर जबाबदारी सोपविली. १७ मार्च १७५४ मध्ये अघटीत घटना घडली, कुंभेरीच्या किल्ल्याला वेढा दिला असताना भर दुपारी बेधुंद अवस्थेत खंडेराव छावणीतून बाहेर पडला आणि किल्ल्यावरून सोडलेल्या तोफेचा गोळा लागून मृत्यूमुखी पडला. अहिल्याबाई सती जाण्यास निघाली असताना मल्हारबांना तिचा विचार बदलण्यात यश आले, परंतु बाकी आकराजणी सती गेल्या.

सुभेदार मल्हारराव होळकर
सुभेदार मल्हारराव होळकर

पुत्रवियोगाचे दुःख पचवून मल्हारबांनी मोहिमा उघडल्या, इसवी सन १७५८ मध्ये मराठ्यांनी अटकेपार झेंडे फडकाविले. याच सुमारास जेजुरगडावरील नगारखाण्याचे बांधकाम पूर्ण करून घेतले. रांगडे आणि कठोर व्यक्तिमत्व असलेले मल्हारराव, कधी कधी इतके मवाळ होत कि शरण आलेल्या शत्रूला आपल्या बरोबरीने वागवत. त्यांच्या याच स्वभावाने घात झाला आणि मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळा सोडून दिले. पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हारबांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. मल्हारराव आणि त्यांचे साथीदार कसे बसे जीव वाचवून बाहेर पडले.

पराभवाचे शल्य मनामध्ये बोचत असतानाच, आणखी एक दुःखद धक्का बसला, त्यांची पहिली पत्नी गौतमाबाई २९ सप्टेबर १७६१ रोजी मृत्यूमुखी पडल्या त्यामुळे ते आणखीनच खचले. अहिल्येची राजकारणातील समज पाहून मल्हारबा अनेकदा तिच्याशी सल्ला मसलत करीत असत, स्वतः मोहिमेवर असताना दौलतीची आणि खाजगीची दोन्ही जबाबदा-या अहिल्येला पार पाडाव्या लागत होत्या.

पानिपतनंतर मराठे शाहीची बिघडलेली घडी पुन्हा बसविण्यात माधवराव पेशव्यांबरोबर मल्हार रावांनी पुढाकार घेतला आणि सलग मोहिमा आखून स्वतःला व्यस्त ठेवू लागले. अशाच एका मोहिमेवर असताना २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे मल्हारवांना मृत्यूने गाठले. मराठेशाहीतील आधाराचा गरुड खांब कोसळला, मराठे शोकाकुल झाले. आपल्या संपूर्ण हयातीत त्यांनी चार पेशव्यांच्या कारकिर्दी बघितल्या, पेशव्यांच्या घरात त्यांना वडिलकीचा मान होता. अहिल्यादेवींनी त्यांच्या पश्चात आलमपूरचे नाव बदलून मल्हारनगर ठेवले आणि तेथे त्यांची छत्री उभी केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही.
---
www.jejuri.in/historical

लेखनविषय: दुवे:

Comments

मल्हारबांनी

मल्हारबांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. मल्हारराव आणि त्यांचे साथीदार कसे बसे जीव वाचवून बाहेर पडले.
>> ही वाक्ये किती खरी खोटी ?????

सध्या संदर्भ नाहीत

सध्या संदर्भ नाहीत आणि पुढील दोन-तीन दिवसांत फारसा वेळही होणार नाही पण मल्हारराव होळकर काय किंवा शिंदे काय यांच्या गाथा इतक्या सरळसोट नसाव्या असे वाटते. होळकर बर्‍यापैकी स्वतंत्र सरदार होते. मराठेशाही, मराठाराज्य वगैरेंशी बांधीलकी राखण्यापेक्षा आपली तळी भरणे, जहागीर राखणे यासाठी सर्वांशी गोड राहण्याचे धोरण असावे असे वाटते म्हणूनच होळकर मराठ्यांशीही गोड होते आणि नजीबशीही. चू. भू. द्या. घ्या. नंतर संदर्भ तपासून अधिक लिहिन.

माहितीपूर्ण लेख

लेख माहितीपूर्ण झाला आहे. मल्हाररावांचा जन्म साधारण कुठल्या सालातला हे यात असते तर बरे झाले असते. हे होळ गाव आहे कुठे? एका सामान्य परिस्थितीतून आलेला माणूस स्वतंत्र राजा (सुभेदार) होतो हे त्यातले विशेष.

अर्थात पानिपत मधील हकिकत प्रत्येकाच्या कडून वेगळी येणार. पण मल्हाररावांना हे युद्ध नको होते असे शेजवलकरांनी लिहिल्यासारखे वाटते. (मुद्दाम उठून संदर्भ तपासला नाही.) होळकर, शिंदे आणि पेशव्यांमधे बर्‍याच कुरबुरी होत्या. ऐन युद्धात कित्येकांनी पळ काढला (किंवा यशस्वी माघार घेतली) त्यात मल्हारराव एक होते असेही वाचल्याचे आठवते. या युद्धात पराभव झाल्याने आपण नंतरचे लोक भाऊची खेळी चुकली असे म्हणू शकतो. पण ते फारसे अभ्यासपूर्ण नसावे. अभ्यास नसल्याने (वा पुरेशी माहिती नसल्याने) मल्हाररावांचे म्हणणे आणि कृती कुणी समर्थनीय म्हणू शकतो.

अहिल्याबाई होळकरांच्या ११ सवती सती गेल्या ही एक नवीन माहिती कळली.

मल्हाररावांनी जेजुरीसाठी काय केले हे वाचायलाही आवडेल.

प्रमोद

मल्हाररावांनी जेजुरीसाठी काय केले

मल्हाररावांनी जेजुरीसाठी काय केले हे वाचायलाही आवडेल.
>> +१

मल्हाररावांनी जेजुरीसाठी काय केले

मल्हाररावांनी जेजुरीसाठी बरेच काही केले त्यातील सर्वात महत्वाचे म्हंणजे जेजुरगडाचे वैभव वाढविण्याचा घाट घातला. जेजुरगडावरील शिलालेखातून समजते अहिल्याबाई होळकरांची सून होण्यापूर्वीपासून येथे काम चालू होते. परंतु कालौघात मल्हाररावांचा विसर पडला आणि अहिल्यादेवीनी हे काम उभे केल्याचे समजतात. जेजुरी नगरीची रचना आणि व्यवस्था यामध्ये होळकरांचा मोठा सहभाग आहे.

मल्हाररावांचा जन्म साधारण कुठल्या सालातला

मल्हार रावांचा जन्म झाला तो भटक्या धनगर समाजामध्ये त्यामुळे त्यांचा जन्म दिवस किंवा साल याविषयी निश्चित अशी माहिती उपलब्ध नाही.
होळ गाव आहे कुठे?
होळ हे गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामध्ये आहे. जेजुरीपासून साधारण तीस किलोमीटर अंतरावर आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याजवळ आहे.

होळकरांचा इतिहास तितकासा गौरवास्पद नाही...

मल्हाररावांबद्दल काही नवी माहिती वाचायला मिळाली असती तर बरे झाले असते.

अहल्याबाई होळकर (अहिल्या हा उच्चार चुकीचा आहे) वगळता होळकर घराण्यातील सर्वांवरच काही ना काही आरोपाचे/संशयाचे बालंट आहे. होळकरांनी माळव्यात आणि शिंद्यांनी ग्वाल्हेरकडे मराठी राज्याचा विस्तार केला, परंतु एकदा राजवैभवाची चटक लागल्यावर 'कोण छत्रपती आणि कोण पेशवे?' अशी बेदरकार वृत्ती दिसून येते. राजपुतान्यात हल्ले करुन चौथाई आणि खंडणीसाठी छोट्या संस्थांनांना नाडणे, ही या दोन सरदारांचा नित्यनेम. त्यातल्या त्यात मल्हाररावांचा स्वभाव पैशाला लोभी असल्याचा प्रवाद होता आणि याची कुणकुण/अनुभव पेशव्यांनाही आला होता. मराठ्यांच्या या राजवटीला अन्य प्रांतातील लोक इतके कंटाळले होते की पानिपतच्या लढाईत ते मराठ्यांच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत. पेशव्यांना उत्तरेत येऊ देऊ नका. सदाशिवरावभाऊ दिल्लीच्या तख्तावर बसला तर आपल्याला हे भट धोतरे बडवण्याच्या कामावर ठेवतील, असे शिंद्यांचे कान होळकरांनीच भरले होते. पराक्रमाचे एवढेच पवाडे गायचे तर प्रयाग, काशी, मथुरा, अयोध्या ही हिंदूंसाठी पवित्र तीर्थक्षेत्रे शिंदे-होळकरांनी का नाही सोडवून घेतली?

पानिपतच्या लढाईतून स्वतःला राखून हळूच पळ काढणे, शिंद्यांवर कायम कुरघोडी करणे, राजपुतांच्या अंतर्गत भांडणात ढवळाढवळ करणे, नजिबखान रोहिल्यासारख्या सापाला कायम पदराआड घालणे, अशा अनेक आरोपांमुळे मल्हाररावांचे जीवन निष्कलंक नाही. ते शूर होते यात संशय नाही, पण स्वार्थीही तितकेच होते. पेशव्यांच्या काळात पुणे शहर तीनदा जाळून पोळून खणत्या लावून लुटण्यात आले. निजाम, सर्जेराव घाटगे आणि यशवंतराव होळकर यांनी पुणे जाळण्याचे काम केले. त्यातील यशवंतरावाचा हल्ला तत्कालीन पुणेकर कधीही विसरु शकणार नाहीत. 'होळकरी दंगा' नावाने कुप्रसिद्ध असलेल्या या हल्ल्याची दहशत पुणेकरांनी जबरदस्त घेतली होती. इंदूरवर सुदैवाने कधी अशी वेळ आली नाही.

होळकरांची राजवट संपताना आणि ब्रिटीशांनी त्यांचे संस्थान खालसा करताना जे कारण घडले ते फारसे भूषणावह नाही. त्यामुळे साध्वी अहल्याबाई वगळता कुठल्याही होळकरांना गौरवाची विशेषणे लावणे मनाला पटत नाही. म्हणूनच काही नवी माहिती मिळण्याची अपेक्षा होती.

अहिल्याच असावे

(अहिल्या हा उच्चार चुकीचा आहे)

अहिल्या हा उच्चार चुकीचा असला तरी होळकरांच्या सुनेचे नाव अहिल्याच होते असे वाटते; अहल्या नाही. अहल्या रामायणात येते. गौतमी बुद्धकथेत येते पण वरील लेखातील स्त्रीचे नाव गौतमा आहे तसेच अहिल्या हे अपभ्रंशित नाव असू शकेल. चू. भू. दे. घे.

अहिल्याबाईंचे नाव कागदोपत्री कसे लिहिले आहे त्यावरून अहिल्या की अहल्या ते शोधावे लागेल. ते विशेष नाव असल्याने त्याचा उच्चार/ स्पेलिंग वगैरे चूक बरोबर असले तरीही फरक पडत नाही, ते तेव्हा जसे वापरले आहे तसेच वापरायला हवे.

बाकी होळकरांचा इतिहास ग्रेट नाही याच्याशी सहमत आहे पण पेशवे आणि शिंदे यांच्यापेक्षा ते वेगळे नाहीत. स्वार्थाचे राजकारण सर्वच करत होते. होळकर त्यापैकीच एक.

होळकर

अहल्याबाई होळकर (अहिल्या हा उच्चार चुकीचा आहे)
विश्वकोशाततरी अहिल्याबाई असे लिहिले आहे.
होळकरांनी माळव्यात आणि शिंद्यांनी ग्वाल्हेरकडे मराठी राज्याचा विस्तार केला, परंतु एकदा राजवैभवाची चटक लागल्यावर 'कोण छत्रपती आणि कोण पेशवे?' अशी बेदरकार वृत्ती दिसून येते.

हे सर्वांसाठी खरे नाही का? अगदी मराठेशाहीत पेशव्यांनी 'कोण छत्रपती', नाना फडणविसाने 'कोण पेशवे'. अगदी संताजीने 'कोण राजाराम' या पद्धतीची वागणूक उद्गार काढले. जगातील सर्व राजांची हीच स्थिती असावी. नाहीतर इतकी स्वतंत्र राज्ये कशी झाली असती?

मराठ्यांच्या या राजवटीला अन्य प्रांतातील लोक इतके कंटाळले होते की पानिपतच्या लढाईत ते मराठ्यांच्या बाजूने उभे राहिलेले नाहीत.

मराठ्यांच्या राजवटीला (ही खरी राजवट नाही. तर चौथाई सरदेशमुखी वसूल करायची पण राज्यकारभार करायचा नाही.) लोक कंटाळले हे खरेच असावे. बंगाल बिहारातही ते कंटाळले होते असे म्हणतात.

पेशव्यांच्या काळात पुणे शहर तीनदा जाळून पोळून खणत्या लावून लुटण्यात आले. निजाम, सर्जेराव घाटगे आणि यशवंतराव होळकर यांनी पुणे जाळण्याचे काम केले. त्यातील यशवंतरावाचा हल्ला तत्कालीन पुणेकर कधीही विसरु शकणार नाहीत. 'होळकरी दंगा' नावाने कुप्रसिद्ध असलेल्या या हल्ल्याची दहशत पुणेकरांनी जबरदस्त घेतली होती. इंदूरवर सुदैवाने कधी अशी वेळ आली नाही.

मुख्य विषयाशी हा भाग फारसा संबंधित नाही. याच होळकरांवर दगा करून त्यांचा पुण्यात खून केला होता. यशवंतराव परागंदा झाले होते. होळकर संस्थान जवळपास खालसा करण्याचा हा प्रयत्न होता. अशावेळी पुण्यात होळकरांनी दंगा केला यात वेगळे ते काय. कित्येक वर्षे राजधानी म्हणून सुरक्षित असणार्‍या लोकांसाठी हा एक जाच होता हे वेगळे. पण असे दंगे इतरत्र झाले आहेतच ना.

प्रमोद

पुण्याचे दुर्दैव...

इतरत्र असे दंगे झाले आहेत ना?

मला वाटते फार कमी घटना दाखवता येतील. पुण्याने जे दुर्दैव भोगले ते क्वचितच इतर कोणत्या राजधानीच्या वाट्याला आले असेल. पूर्वी मोगलांच्या काळात पराभूत राजाच्या राजधानीला/प्रजेला लुटणे, राण्या/सुंदर स्त्रियांना जनानखान्यात घालणे, सक्तीचे धर्मांतर करणे असे सर्रास चालत असे. उत्तर मराठेशाहीत हे प्रकार बंद झाले. लढाया बाहेर लढल्या जात आणि तहात मुलूख जोडला जाई.

शिवकाळात मुरार जगदेवाने आदिलशहाच्या आज्ञेने पुणे जाळून बेचिराख केले होते. त्यानंतर जिजामाता व शिवाजी या ओसाड गावात राह्यला आले आणि दादोजी कोंडदेवाने डोंगरात परागंदा झालेल्या पाटील व प्रजेला बोलवून अभय देऊन पुणे पुन्हा वसवले. शाहिस्तेखान दीड लाख मोगल फौजेसह पुण्यात तळ देऊन बसला होता, पण त्याने पुण्याचे नुकसान केले नाही. अगदी धर्मवेड्या औरंगजेबानेही महाराष्ट्रातील स्वारीत सर्वसामान्यांना त्रास दिलेला नाही.

असो आपण उत्तर मराठेशाहीबद्दल बोलत होतो. सातारकर व कोल्हापूरकर छत्रपतींमध्ये वारणेची लढाई व तह झाला,पण दोन्ही फौजांनी परस्परांच्या राजधानीवर हल्ला केला नाही. माधवराव पेशव्यांच्या काळात निजामाने पुणे लुटून जाळपोळ केली तेव्हा मराठी फौज भागानगरपर्यंत घुसली होती,पण त्यांनी हैदराबाद जाळले नव्हते. पेशव्यांच्या फौजेने रघुजी भोसल्यांवर चढाई केली,पण नागपूर जाळले नाही. हैदरअली व त्याचा मुलगा टिपू मराठ्यांना कायम त्रास देत,पण मराठ्यांनी श्रीरंगपट्टणम जाळले नाही. (टिपूला मारले तेव्हाही श्रीरंगपट्टणमच्या सर्वसामान्य प्रजेला जाच झाला नाही)

शिंदे-होळकर यांच्याबरोबरचे पेशव्यांचे संबंध 'कधी खुशी कधी गम' असे असत, पण पेशव्यांनी कधीही इंदूर किंवा ग्वाल्हेरच्या प्रजेवर शस्त्र धरले नाही. शिंदे व होळकरांनी मात्र पुणे लुटण्यात कसूर केलेली नाही. होळकरी दंग्यात पेशवे व खासे लोकांना काहीच अपाय झाला नाही. भरडली गेली ती सामान्य जनता. त्यामुळे निजाम-शिंदे व होळकर एकाच पारड्यात तोलावे लागतील. पेशव्यांना दोष देऊन चालणार नाही.

१८१८ मध्ये शनिवार वाड्यावर युनियन जॅक लागल्यानंतर एकेकाळचे शहर गुलजार पुणे कसे ओसाड व भकास पडले होते, याचे वर्णन उपलब्ध आहे.

:-)

पुण्याने जे दुर्दैव भोगले ते क्वचितच इतर कोणत्या राजधानीच्या वाट्याला आले असेल.

वाक्य छान आहे पण मग दिल्लीबद्दल काय म्हणावे?

वाक्य पूर्ण वाचावे,अशी विनंती...

<<मला वाटते फार कमी घटना दाखवता येतील. पुण्याने जे दुर्दैव भोगले ते क्वचितच इतर कोणत्या राजधानीच्या वाट्याला आले असेल. >>

मराठ्यांनी इतरांच्या राजधान्या किती जाळल्या, यासंदर्भात मी वरील वाक्य लिहिले होते.

दिल्ली कायम सत्तांतराचे केंद्र राहिल्याने तेथे आक्रमकांचा उपद्रव समजता येतो. त्यातही दिल्लीचे सर्वाधिक नुकसान अब्दाली,नादीरशहा यासारख्या परकी आक्रमकांच्या काळात झाले आहे. बाजीरावाने अकस्मात दिल्लीवर छापा घातला तेव्हा त्यालाही दिल्ली जाळण्याची उर्मी आली होती, पण सरदार, मुत्सद्दी आणि स्थानिक वाटाड्यांनी तसे करु नये, असे विनवले. भाऊसाहेब पेशव्यांनी दिल्लीचे तख्त फोडण्यासही सूरजमल जाटाचा विरोध होताच. शिवाजी महाराजांच्या काळात सुरतेत श्रीमंतांचे वाडे पेटवण्यात आले होते. सर्वसामान्यांना मात्र मराठा सैन्याने उपद्रव दिलेला नाही. एवढे एक उदाहरण वगळता मराठ्यांनी दुसर्‍यांची शहरे जाळलेली नाहीत. ब्रिटीशांनीही मराठ्यांचे किल्ले जमीनदोस्त केले,पण रयतेचे वास्तव्य असलेल्या शहरांना उपद्रव केलेला नाही.
आता विषयाची व्याप्ती वाढवून मग रोमसुद्धा जळत होतेच की ,असाही वाद आपण घालू शकतो. मूळ विषय होळकरांनी जे केले ते योग्य होते का, यापुरताच होता आणि मी तेवढ्यापुरतेच निरीक्षण नोंदवले होते.

पूर्ण वाचले म्हणूनच...

मराठ्यांनी इतरांच्या राजधान्या किती जाळल्या, यासंदर्भात मी वरील वाक्य लिहिले होते.

मला तसे वाटत नाही. सहस्रबुद्ध्यांचा प्रश्न सरळ आहे इतरत्र असे दंगे झाले आहेत ना? आणि तुमचे उत्तर आहे की - मला वाटते फार कमी घटना दाखवता येतील. पुण्याने जे दुर्दैव भोगले ते क्वचितच इतर कोणत्या राजधानीच्या वाट्याला आले असेल. विषय पुण्याबद्दल आणि राजधानीची शहरे जाळण्याबद्दल आहे, मराठ्यांबद्दल नाही असे वाटते. भाऊसाहेबांच्या आदेशाने दिल्लीचे तख्त फोडले म्हणजेच राजधानीला उपद्रव दिला. लुटालूटही केली म्हणूनच त्यांना उत्तरेत फारसा पाठिंबा मिळाला नाही. एकटा सूरजमल जाट नाराज झाला असे तर नाहीच. सूरतेतही जाळपोळ करण्यात आली. त्यात सर्वसामान्यांचेच नुकसान झाले ना! ब्रिटीशांनीही प्लेगच्या काळात सामान्य लोकांच्या घरात घुसून त्यांना उपद्रव दिल्याचे दिसते. म्हणजेच एखादी शासनपद्धत ही त्या त्या राज्यकर्त्याची असते किंवा त्या त्या वेळच्या युद्धनितीची असते. राजघराण्याची किंवा समाजाची असेलच असे नाही.

त्यातही दिल्लीचे सर्वाधिक नुकसान अब्दाली,नादीरशहा यासारख्या परकी आक्रमकांच्या काळात झाले आहे.

असेच नाही. दिल्लीची राजधानी बदलून लोकांना जबरदस्तीने देवगिरी/ दौलताबादेला हलवण्यातही अनेक सर्वसामान्यांचे अतोनात नुकसान झाले आणि अशाप्रकारची अनेक उदाहरणे दिल्ली या राजधानीच्या शहराबद्दल देता येतील. किंबहुना, राजधानीला उपद्रव देणे म्हणजे राज्यसत्तेला उपद्रव देणे हा हेतू असतो. पेशव्यांच्या मतलबाने होळकरांची गादी घशात घातली जाईल असे राजकारण खेळले गेले होते. यशवंतरावाच्या मल्हारराव या भावाला मारून त्याची बायको आणि मुलगा यांना शिंद्यांनी डांबून ठेवले होते तर दुसरा भाऊ विठोजी याला पेशव्यांनी हत्तीच्या पायी दिले. यशवंतराव होळकरांनी हल्ला केला असता बाजीराव पळून गेला. पुण्याला त्रास देऊ नका असेच यशवंतरावांचे आदेश होते आणि यशवंतरावांनी लपून बसलेल्या पेशव्याला अन्नपुरवठ्याची व्यवस्था केली होती. होळकरांनी जे केले त्यामागे त्यांचा वैयक्तिक राग आणि आत्यंतिक चीड असावी. चौथाई वसूल करणे, दांडगाई करणार्‍यावर वचक बसवणे, बाजारपेठेची लुटालूट करणे असे त्यांचे हेतू नव्हते हे नक्की.

असो. जसे पेशवे म्हटले की फक्त माधवराव पेशवे किंवा दुसरा बाजीराव नाही तसे होळकर म्हटले की फक्त यशवंतराव होळकर नाहीत. तसाही वरचा विषय हा मल्हाररावांविषयी आहे, तेथे मुघलांपासून नादिरशहापर्यंत विषयांतर करून "आम्ही नाही बॉ त्यातले आम्ही ते फक्त योग्य" असे सांगण्याचा भाव दिसतो आहे असे वाटले.

असो.

होळकर म्हटले की फक्त यशवंतराव होळकर नाहीत.

धन्यवाद....
अगदी योग्य, यशवंतराव होळकरांविषयी अनेक गैरसमज आहेत त्यामुळे त्यांना सदैव खलनायक ठरविण्यात आले. मल्हारराव होळकर यांचे सुद्धा कर्तुत्व अफाट होते ज्यांची कुठलीही राजेशाहीची पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या पराक्रमाच्या जोरावर सुभेदारी मिळविणे व उत्तर हिंदुस्थानात जरब बसविणे हे थोडके नव्हे. आणि अहिल्याबाईंचे संपूर्ण भारतभर असलेले सत्कार्य मल्हाररावांनी लावलेले बीज नसेल कशावरून ?
अहिल्यादेवींवर सासू गौतमा आणि सासरे मल्हारराव यांचेच संस्कार झाले होते.

मर्यादेयं विराजिते...

...तसाही वरचा विषय हा मल्हाररावांविषयी आहे, तेथे मुघलांपासून नादिरशहापर्यंत विषयांतर करून "आम्ही नाही बॉ त्यातले आम्ही ते फक्त योग्य" असे सांगण्याचा भाव दिसतो आहे असे वाटले...
----------------------

माझ्यासाठी हे वाक्य/मतप्रदर्शन निश्चितच निराशाजनक आहे. प्रतिसाद देताना मल्हारराव होळकर या मुख्य धाग्याला धरुनच लिहिले आहे. विषय दिल्लीच्या जाळपोळीचा आला तेव्हाच मुघल व नादिरशहाचा उल्लेख झाला आहे. तो अनाठायी वाटल्यास दिलगीर आहे.

आम्ही नाही बॉ त्यातले आम्ही ते फक्त योग्य, असा भाव नाही. मराठे कुठे चुकले, हा विषय असेल तेव्हा तीही माहिती देईन. मला वाईट एकाच गोष्टीचे वाटले,की मी याला चर्चा समजून चाललो आहे. प्रतिक्रिया काय आहे, त्यातील तपशील चूक की बरोबर, हे सांगणे वेगळे आणि प्रतिक्रियेमागील भाव/हेतू शोधत बसणे निराळे. वेगळे वळण देण्याचा हेतूच असता, तर उपाध्ये गुरुजींना पहिलाच प्रश्न 'आपण इथे होळकरांची प्रशस्ती का करत आहात?' हा विचारता आला असता.

असो. आता जाणकारांच्या चर्चेत आमच्यासारख्या आगांतुकांची अधिक लुडबुड योग्य नाही. उपक्रमावर लेखनविश्रांती घ्यावी म्हणतो.

गैरसमज नसावा...

माझ्यासाठी हे वाक्य/मतप्रदर्शन निश्चितच निराशाजनक आहे. प्रतिसाद देताना मल्हारराव होळकर या मुख्य धाग्याला धरुनच लिहिले आहे. विषय दिल्लीच्या जाळपोळीचा आला तेव्हाच मुघल व नादिरशहाचा उल्लेख झाला आहे. तो अनाठायी वाटल्यास दिलगीर आहे.

मीही दिलगीर आहे परंतु आपल्याशी असहमत आहे.

आम्ही नाही बॉ त्यातले आम्ही ते फक्त योग्य, असा भाव नाही. मराठे कुठे चुकले, हा विषय असेल तेव्हा तीही माहिती देईन.

इथे विशेषतः होळकर चुकले सांगताना आपण महत्त्वाची बाजू लपवलीत असे मला आपला प्रतिसाद वाचून वाटले. ते जर अज्ञानापोटी झाले असेल तर ठीक आहे पण अज्ञानापोटी झाले नसेल तर आपल्याबाबत इतरांची "आम्ही ते फक्त योग्य" अशी धारणा होणे शक्य वाटते.

पुणे शहराला वाली होता आणि तो पुण्यात हजर होता. मुरार जगदेवाने पुणे जाळले तशी परिस्थिती नक्कीच नव्हती. फोडीचे राजकारण, हुशार लोकांची पारख नसणारा, आपल्या सरदारांना धरून ठेवण्याची हिम्मत नसणारा, नाकर्ता बाजीराव पुण्यातून पळून गेला. यशवंतराव होळकरांसारख्या निष्णात आणि धाडसी सेनापतीचा आपल्या राज्यासाठी कसा उपयोग करून घ्यावा हा साधा विचार त्याने केला नाही. होळकरांनी पाठवलेल्या वकीलाचे म्हणणे ऐकून न घेता त्याला पळवून लावले.

पुणे शहराचे नुकसान झाल्याचा दोष बाजीरावाला प्रथम द्यायला हवा. होळकरांनी तर बोलूनचालून शत्रुत्व पत्करले होते.

असो.

वरील चर्चा जर माधवराव पेशव्यांवर चालती तर दुसरा बाजीराव नालायक होता म्हणून सर्व पेशवे नालायक होते असे म्हणणेही मला चालले नसते आणि तसे कोणी म्हटले असते तरीही मी आक्षेप घेतला असता. आपला होळकरांसंबंधी प्रतिसाद मला त्यापेक्षा वेगळा दिसत नाही.

आता जाणकारांच्या चर्चेत आमच्यासारख्या आगांतुकांची अधिक लुडबुड योग्य नाही. उपक्रमावर लेखनविश्रांती घ्यावी म्हणतो.

उपक्रमावर लेखन विश्रांती घेण्यापेक्षा योग्य संदर्भांनी आणि विषयाशी सुसंगत लिहावे ही विनंती.

या हल्ल्याची दहशत पुणेकरांनी जबरदस्त घेतली होती. इंदूरवर सुदैवाने कधी अशी वेळ आली नाही.

इतर संकेतस्थळांवर या अशा प्रतिसादांनी टाळ्या पडत असतील तसे उपक्रमावर होणे थोडे कठीण आहे ही वस्तुस्थितीही कृपया लक्षात घ्यावी. पुणे आणि इंदूर ही दोन्ही मला आपली वाटतात त्यामुळे अशा वाक्यांबद्दल नाराजी वाटते. जर पुण्यावर हल्ला झाला तर त्याला ठोस कारण होते, हल्ला होणार हे माहित होते आणि ते माहित असताना जर राज्यकर्ते गाफील राहिले तर तो दोष त्यांचा. इंदूरकरांचा नाही.

बाकी, आपणही जाणकारच आहात. आगंतुक तर अजिबात नाही... गैरसमज नसावा.

तख्त फोडले नाही

भाऊसाहेब पेशव्यांनी दिल्लीचे तख्त फोडण्यासही सूरजमल जाटाचा विरोध होताच
भाऊने दिल्लीचे तख्त फोडले नाही. फक्त छताला लावलेला चांदीचा पत्रा काढला आणि त्यातून सैनिकांचे पगार दिले.

योगप्रभूंना इतिहासाचे बरेच ज्ञान आहे, त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते प्रामाणिक आहेत हे त्यांच्या लेखनातून जाणवते. त्यांचे विचार थोडेसे एकांगी वाटले तरी त्याबद्दल त्यांच्याशी संवाद होऊ शकतो. पण "भाऊने दिल्लीचे तख्त फोडले" अश्या धडधडीत खोट्या माहितीच्या आधारे भाऊवर टीका करणार्‍या अप्रामाणिक लोकांशी संवाद होऊ शकत नाही.

कुतूहल

'तख्त फोडणे' म्हणजे काय? 'घण घालून फोडणे' नसले तरी 'पत्रा काढला' म्हणजे 'तख्त फोडले'च ना?

तख्ताचा नाही

राजवाड्याच्या छताचा पत्रा काढला. तख्ताला अजिबात हात लावला नाही.

धन्यवाद

नवी शंका: छताचा पत्रा काढण्यापेक्षा फरशी फोडण्याला अधिक अपमानास्पद समजले जाते काय? असल्यास का? नसल्यास तपशीलातील तफावतीकडे दुर्लक्ष का करू नये?

सहमत..

१८१८ मध्ये शनिवार वाड्यावर युनियन जॅक लागल्यानंतर एकेकाळचे शहर गुलजार पुणे कसे ओसाड व भकास पडले होते, याचे वर्णन उपलब्ध आहे.

योगप्रभू

आपल्या विवेचनाशी सहमत आहे. मतभेद फक्त वरील एका वाक्याबद्दल आहे. माधवरावाच्या मृत्यूनंतर ते पेशवाई बुडेपर्यंतचे (१७७२ - १८१८) पुणे "गुलजार" नव्हते हे आजानुकर्णाने "दुसर्‍या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका" या चर्चेत सप्रमाण दाखवून दिले आहे.

दुसर्‍या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका

मल्हारराव होळकर..

यांच्याबद्दल संदर्भासह बोलण्याइतपत माहीत नाही. पण लक्षात राहणारी गोष्ट म्हणजे नजीब.

रांगडे आणि कठोर व्यक्तिमत्व असलेले मल्हारराव, कधी कधी इतके मवाळ होत कि शरण आलेल्या शत्रूला आपल्या बरोबरीने वागवत. त्यांच्या याच स्वभावाने घात झाला आणि मोगल सरदार नजीबाने केलेल्या चुका अनेकदा पोटात घातल्या आणि त्याला मोकळा सोडून दिले. पुढे याच नजीबाने अब्दालीला बोलावून पानिपतचे युद्ध घडवून आणले. मल्हारबांनी गनिमी काव्याने युद्ध करण्याचा सल्ला भाऊसाहेब पेशव्यांना देऊनसुद्धा त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि रणांगणात मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. मल्हारराव आणि त्यांचे साथीदार कसे बसे जीव वाचवून बाहेर पडले.

यात गनीमी कावा न वापरणारे भाऊसाहेब चुकले की नजीबखानाला सोडणारे मल्हारराव?

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या.

शिंदे-होळकर वैर मराठेशाहीला हानीकारक नव्हते का? त्याबद्दल लेखक काहीच म्हणत नाही? मराठेशाहीची घडी बसवण्याची संधी आली असता ती जबाबदारी शिंद्यांनीच पार पाडली आहे.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

नजीबाला सोडणारे

यात गनीमी कावा न वापरणारे भाऊसाहेब चुकले की नजीबखानाला सोडणारे मल्हारराव?

मल्हारराव स्वभावाने भाबडे असावेत की काय ते नक्की माहित नाही परंतु नजीब नक्कीच उस्ताद होता. त्याने मल्हाररावांची नस ओळखली होती. पानीपतापूर्वीच राघोबा आणि मल्हाररावांनी नजीबला पेचात पकडला असता नजीबने मल्हाररावांना आपण तुमचा धर्मपुत्र(?) असल्याची गळ घालून राघोबांकडे रदबदली करण्यास भाग पाडले होते. यावेळी हलक्या मनाच्या राघोबांनीसुद्धा मल्हाररावांना खरीखोटी न सुनावता किंवा मल्हाररावांची इतराजी नको म्हणून नजीबला सोडून दिले. नजीबला कैद करणे राघोबांना अशक्य नव्हतेच पण त्यांनी तसे केले नाही. या बदल्यात नजीबने मल्हाररावांनी मोठी रक्कम दिल्याचेही कळते.

इथे एक लक्षात घ्यायला हवे, होळकर हे मोठे सरदार होते. पेशव्यांचा त्यांच्यावर पूर्ण अंमल नव्हता. उलट पेशवे होळकरांना आणि होळकर पेशव्यांना दबून एकमेकांशी स्वार्थाचे राजकारण करत होते. जेथे फायदा नाही तेथून होळकरांनी आपले अंग काढून घेतलेले दिसते. उदा. पेशव्यांनी होळकरांना पंजाबात राहून व्यवस्था राखण्याचे सांगितले होते पण होळकरांनी ते मानले नाही. त्यांना त्यात फायदा दिसत नव्हता. त्याबद्दल त्यांच्यावर सक्ती करण्याचे धाडस पेशव्यांत नव्हते. पानिपताच्या वेळेसही शिंदे-होळकर वैरापायी मल्हारराव वेळ काढत मागे राहिल्याचे दिसते.

नजीबला आश्रय देण्यात मल्हाररावांचा जेवढा भाबडेपणा/ लबाडपणा आहे तेवढाच राघोबांचा नाकर्तेपणा आहे.

शंका

हलक्या मनाच्या राघोबांनीसुद्धा

मनाच्या की कानाच्या?

दोन्ही

ह. म. आणि ह. का. दोन्ही..

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

+१

राघोबा दादा हलक्या कानाचे* आणि हलक्या मनाचेही असावेत.

* हलक्या कानाचे असा वाक्प्रचार असला तरी वरील प्रतिसादात त्यांच्या हलक्या (इममॅच्युअर) मनाविषयीच लिहिले आहे

होळकरांचा स्टेटस

शिंदे, होळकर आणि पेशवे यांचे आणि या तिघांचे दिल्लीच्या बादशहाशी संबंध टेक्निकली कसे होते याबबत संभ्रम आहे.

म्हणजे शिंदे, होळकर खरोखरच पेशव्यांचे* सरदार (पक्षी-पेशव्यांना सबॉर्डिनेट) होते का? सुरुवातीला सरदार असावेत पण नंतर ते केस बाय केस सहकारी असेच असावेत. बाजीरावाने सरदार नेमले असेल पण माधवरावानंतर बहुधा त्यांनी स्वतःला स्वतंत्र समजण्यास सुरुवात केली असावी.
दिल्लीचा बादशहा पेशव्यांचा मांडलिक होता का?

काशी मथुरा सोडवणे ही बहुधा विसाव्या शतकातल्या राजकारणाची प्रायॉरिटी झाली असावी अठराव्या शतकात नसावी. त्यामुळे होळकरांनी त्यात लक्ष घातले नसावे.

*पेशव्यांचे म्हणावे की छत्रपतींचे?

नितिन थत्ते

पानिपताच्या

पानिपताच्या लढाईच्या आधी दिल्लीचा बादशहा पेशव्यांचा मांडलिकच होता दत्ताजी शिंदेकडे तिकडील कारभार सोपवलेला होता. बुराडी घाटाच्या लढाईत अब्दालीने दत्ताजीस ठार केले व दिल्ली लुटली तेव्हा भाउसाहेब पेशवे सैन्य घेउन तिकडे रवाना झाले. दिल्लीचा नामधारी बादशाह पळून गेला होता. भाउसाहेबांनी दिल्ली परत काबीज करून बादशाहाला गादीवर बसवले व सुरजमल जाट व वजीर गाजीउद्दीनचा तख्त सांभाळण्याचा बेत सफल होवून दिला नाही. परीणामी सूरजमल जाटाने पेशव्यांचे सहकार्य काढून घेतले.
शिंदे होळकरांचा दबदबा होताच. खरेतर ते बाजीरावांनी नेमलेले सरदार पण माधवरावांच्या काळात पेशव्यांना होळकरांकडून कर्ज घेण्याची वेळ आली. नंतरच्या काळात म्हणजे पेशव्यांनंतर १८१८ नंतर होळकरांच्या पेंढार्‍यांनी महाराष्ट्रात प्रचंड लुटालूट, जाळपोळ केली.

काशी, मथुरा सोडवणे ही पेशव्यांची प्रायोरीटी होतीच. पहिल्या बाजीरावाने, नंतर नानासाहेबांनी तर कितीतरी प्रयत्न केले होते पण दरवेळी मित्र असलेल्या अयोध्येचा नबाब सुजा व त्याच्या बापामुळे हे शक्य झाले नाही. उगाच शत्रू निर्माण करून तिकडील राजकारण बिघडवण्यात काय हशील?
पण आज जे काशीला घाट, धर्मशाळा दिसतात ते सर्व शिवाय खुद्द जे आजचे काशी विश्वनाथाचे मंदिर आहे ते अहिल्याबाईंनीच बांधलेले आहे. मूळ मंदिरावर आजही ग्यानवापी मशिद दिमाखाने उभी आहे. व विश्वनाथाच्या नंदीचे तोंड त्या दिशेनेच आहे.

सोयीचे राजकारण

शिंदे, होळकर खरोखरच पेशव्यांचे* सरदार (पक्षी-पेशव्यांना सबॉर्डिनेट) होते का? सुरुवातीला सरदार असावेत पण नंतर ते केस बाय केस सहकारी असेच असावेत. बाजीरावाने सरदार नेमले असेल पण माधवरावानंतर बहुधा त्यांनी स्वतःला स्वतंत्र समजण्यास सुरुवात केली असावी.

शिंदे आणि होळकर पेशव्यांचे सरदार असले तरी नंतर त्यांचे रूपांतर जवळपास संस्थानिकांमध्ये झाले होते. त्याअर्थी ते पेशव्यांचे मांडलिक होते असे म्हणता येईल. स्वतःच्या जहागिरी, वसुलीचे हक्क, सैन्य वगैरेंतून प्रबळ झालेल्या सरदारांना किंवा मांडलिक राजांना अंकित ठेवणे हे सोपे काम नसावे. इतिहासात अशाप्रकारे मांडलिक असलेले पण निष्ठावंत नसलेले अनेक राजे वेळप्रसंगी सोयीचे राजकारण बघून फुटलेले दिसतात. शिंदे-होळकरांनी निष्ठा अगदीच सोडल्या होत्या असे दिसत नाही परंतु आपापसातील वैर, संधीसाधूपणा वगैरेमधून ते पेशव्यांना नक्कीच डोईजड होते. परंतु हा काही मला त्यांचा दोष वगैरे वाटत नाही. राजकारणात अशा गोष्टी चालायच्याच.

पेशव्यांचे सरदार की छत्रपतींचे

शिंदे आणि होळकर हे खर्‍या अर्थाने पेशव्यांचेच सरदार होते असे वाटते. राज्य छत्रपतींचे असले तरी "डि फॅक्टो" राज्यकर्ते पेशवेच होते. शिंदे आणि होळकर या दोघांनाही सुभेदारी, सनदा वगैरे पेशव्यांनी दिल्या होत्या पण अर्थातच त्याला छत्रपतींची मान्यता होती.

याबाबत अहिल्याबाईंनी सांगितलेले बोल असे आहेत -

ही दौलत पेशव्यांची आहे त्याणी कृपाकरून चाकरी घेतली तर चाकरी करून दाखवीन नाहीतर हे इतकी ही दौलत त्यांच्या घरात घालीन.

जाहिरातबाज

(अपेक्षेप्रमाणे) मुळ लेख माहितीप्रद असण्यापेक्षा जाहिरातबाज वाटला
मात्र खाली चर्चा छान चालु आहे! वाचतो आहे..
नवी माहिती मिळते आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

+१

मुळ लेख माहितीप्रद असण्यापेक्षा जाहिरातबाज वाटला

सहमत.

होळकरांविषयी

मल्हारराव होळकरांविषयी पानिपताच्या पराभवनंतर उलट-सुलत चर्चा सुरु झाली.याच्या अगोदर त्यांच्या कार्याविषयी कुणाच्या मनात किंतु असण्याचे कोणतेच कारण दिसत नाही.पानिपतचा पराभवाला स्वतः भाऊसाहेबच कारणीभुत आहेत असे सगळ्याच इतिहास लेखकांचे मत आहे.पानिपत १९६१ -लेखक शेजवलकर लिहितात-आमच्या मते मल्हाररावाच्या शहाणपणाचा व सदा सावधानतेचा हा उत्तम पुरावा होय.यात त्याचा कायम स्वभाव व आयुष्यातील निश्चित ठरलेली वागण्याची रीत् दिसून येते.याच त्याच्या गुणांमुळे पानिपता नंतर मराठ्यांची सत्ता मावळा व राजपुताना या भागात् कायम राहिली.उखडली गेली नाही.

 
^ वर