उदकीं अभंग रक्षिले |
उदकीं अभंग रक्षिले
.................
"गाथेत एक अभंग आहे:
..........निषेधाचा काही पडिला आघात
..........तेणे माझे चित्त दुखावले
..........बुडविल्या वह्या बैसलो धरणे
..........केले नारायणे समाधान
हा प्रसंग खरा असेल का ? तुमचे काय मत आहे?"
.
"मागे एकदा तुम्हाला म्हणालो होतो की तुकाराम महाराजांना जे वैयक्तिक अनुभव आले
ते त्यांनी अभंगांत मांडले.त्यात खोटेपणा नाही.ते व्यक्तिनिष्ठ आहेत.पण खरे आहेत असे माझे मत आहे."
.
"वरील अभंगात उल्लेख आहे तो निषेध कोणी केला ? वह्या कोणी बुडवल्या? देवाने समाधान
कसे केले?"
.
"तुकारामकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती.समाजावर धर्माची सत्ता होती.धर्माविषयी काही सांगण्याचा,लिहिण्याचा अधिकार उच्चवर्णीयांनाच होता.तुकाराम कुणबी जातीचे वाणी होते.त्यांना
धर्माविषयी काही लिहिण्याचा अधिकार नव्हता.त्यांच्या अभंगांतील:
..........वर्ण अभिमाने कोण हो पावन,ऐसे दाखवून द्यावे आम्हा॥
..........वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा,येरांनी वहावा भार माथां।
..........महारासी शिवे, कोपे, ब्राह्मण तो नोहे।
असली वचने धर्मप्रमुखांना रुचणारी नव्हती.त्याकाळच्या धर्ममार्तंडांनी तुकाराम गाथा
इंद्रयणीत बुडवण्याचा ठराव केला आणि अंमलात आणला.हे संभवनीय आहे.पटण्यासारखे आहे म्हणून ते खरे मानतो."
.
"देवाने गाथा तारली.इंद्रायणीतून उद्धरून दिली ती भिजली नाही.हा चमत्कार खरा मानायचा का?"
.
"गाथा आज उपलब्ध आहे.देवाने ती आणून दिली असे वरील अभंगात तुकारामांनी सूचित केले आहे.त्यांचा अनुभव खरा मानायला हवा.मात्र चमत्कार झाला हे खरे नव्हे.चमत्कार घडूच शकत नाहीत"
.
"मग गाथा परत मिळण्याचे स्पष्टीकरण कसे देता येईल?"
.
"*गाथा नदीत बुडवली.
*गाथा परत मिळाली.
*चमत्कार घडू शकत नाहीत.
ही तीन विधाने सत्य मानून त्याकाळी काय घडले असेल? कसे घडले असेल? यावर विचार
करायला हवा.वास्तववादी कल्पना लढवायला हवी.त्याकरिता गाथेतील या संदर्भातील सर्व अभंग वाचायला हवेत."
.
"चमत्कार घडूच शकत नाहीत असे का मानायचे? देवाचे अस्तित्व मानले तर चमत्कार घडू शकतात."
.
"असे म्हणता? ठीक आहे.सर्वसमर्थ,सर्वज्ञ असा देव अस्तित्वात आहे.तो कोणताही चमत्कार करू शकतो असे आपण घटकाभर गृहीत धरू आणि विचार करू.
गाथा नष्ट होता नये.टिकली पाहिजे हे देवाला मान्य आहे.कारण अंतत: त्याने ती परत आणून दिली.देव सर्वज्ञ असल्याने देहूतील धर्ममार्तंडांचा गाथा बुडवण्याचा विचार आहे हेही त्याला ठाऊक आहे.अशावेळी त्यांचे विचारपरिवर्तन घडवून एक अविचारी कृत्य करण्यापासून देव त्यांना परावृत्त करू शकला असता.
...पण देवाने तसे केले नाही.
ते ब्राह्मण इंद्रायणी काठच्या देवळात आले.तुकारामांकडे गाथा मागितली.बासनात बांधलेली गाथा तुकारामांनी दिली.भटांनी त्या पोथीवर एक वीट बांधली.
आता ती पोथी इतकी जड झाली की ब्राह्मणांना उचलताच येईना.असा चमत्कार देव सहज करू शकला असता.मग तुकाराम महाराजांच्या पायांवर लोटांगण घालून ब्राह्मण परत गेले असते.
...पण देवाने हा चमत्कार दाखवला नाही.
वीट बांधलेली पोथी घेऊन ब्राह्मण ती नदीत बुडवायला निघाले.तुकारामांचे काही अनुयायी,समर्थ,भक्त तिथे होते.तेही भटांबरोबर निघाले. तुकाराम महाराज देवाकडे धरणे धरून देवळातच बसले.
आता ब्राह्मणांचे टोळके नदीकाठी आले.त्यांनी गाथा नदीत भिरकावली.तेव्हढ्यात:
........नदीचे पाणी आटून पात्र कोरडे पडले.
किंवा, पाण्यातून दोन हात वर आले आणि त्यांनी पोथी अलगद झेलली.
किंवा, पोथी पाण्यात न पडता वर हवेत तरंगत राहिली.
किंवा, पोथी हवेतून तरंगत तरंगत परत देवळात तुकारा महाराजांकडे गेली.
..असा कोणताही चमत्कार घडवणे शक्य असताना देवाने यांतील काहीच केले नाही.
गाथा नदीत बुडली.धर्ममार्तंडांचे काम झाले. ते आपापल्या घरी गेले."
.
"तुम्ही म्हणता तसे देवाने काही केले असते तर खरा चमत्कार घडला असे म्हणता आले असते.लोकांनाही ते आवडले असते."
.
"खरा चमत्कार असे काही नसतेच. चमत्कार केवळ काल्पनिकच असतात. पुराणांतील कथांत त्यांची रेलचेल असते."
.
"मग इथे खरे काय घडले असेल?"
.
"त्यासंबंधी काही अभंग गाथेत आहेत.गाथा परत मिळावी म्हणून तुकाराम धरणे धरून देवळात बसले.त्यांनी तेरा दिवस निश्चक्र उपोषण केले.
अभंग असे:
..........तेरा दिवस झाले निश्चक्र करिता
..........न पवसी अनंता मायबापा
..........पाषाणाची खोळ घेऊनी बैसलासी
..........काय हृषीकेशी तुज झाले.
.
.........तुजवरी आता प्राण मी त्यजीन
..........हत्या मी घालीन पांडुरंगा
..........तुका म्हणे आता मांडिले निर्वाण
..........प्राण मी सांडीन तुजवरी.
.
तेराव्या दिवशी गाथा परत मिळाली.त्या संदर्भातील अभंग:--
..........तू कृपाळू माऊली।आम्हां दीनांची साऊली
..........न संवरीत आली।बाळवेषे जवळी
..........माझे केले समाधान। रूप गोजिरे सगुण।
..........निवविले मन। आलिंगन देऊनी
..........तुका म्हणे मी अन्यायी। क्षमा करी ओ माझे आई
..........आता पुढे काई । तुज न घालू साकडे
..........थोर अन्याय मी केला। तुझा अंत म्या पाहिला
..........जनाचिया बोला--|साठी चित्त क्षोभविले
..........भागविलासी केला शीण । अधम मी यातीहीन
..........झाकुनी लोचन। दिवस तेरा राहिलो
..........उदकी राखिले कागद । चुकविला जनवाद
..........तुका म्हणे ब्रीद । साच केले आपुले
..........कापो कोणी मान । सुखे पिडोत दुर्जन
..........तुज होय शीण । ते मी न करी सर्वथा
..........चुकी झाली एके वेळा । मज पासोनी चांडाळा
..........उभे करोनिया जळा-- |माजीं वह्या राखिल्या
..........नव्हती आले सिसां सुरी । अथवा घाव पाठीवरी
..........तो म्यां केला हरी । एवढा तुम्हा आकांत
..........वाटिलासी दोही ठाय़ीं । मजपाशी आणि डोही
..........लागो दिला नाही । येथे तेथे आघात
..........तुका म्हणे कृपावंता । तुज ऐसा नाही दाता
..........काय वर्णू आता । वाणी माझी खुंटली
.
"या अभंगांतून काय निष्पन्न होते?"
.
"पुन्हा आपली ती विधाने पाहू
....१.गाथा इंद्रायणीत बुडाली.
....२.गाथा परत मिळाली
....३.चमत्कार घडू शकत नाहीत.
यांतील पहिल्या दोन विधानांना वरील अभंगांत आधार आहे.तिसरे विधान वैज्ञानिक
सत्य आहे.इथे चमत्कार या शब्दाचा अर्थ निसर्ग नियमाविरुद्ध, निसर्ग नियम धुडकावून
होणारी आणि म्हणून आश्चर्यकारक वाटणारी घटना, असा घ्यायचा.
चमत्कार न घडता गाथा परत कशी मिळाली हे वास्तवाशी प्रामाणिक राहून कल्पनाशक्तीने
शोधायचे आहे.गाथेतील संबंधित अभंग हीच आपल्याला उपलब्ध असलेली सामग्री आहे.
अभंगांवरून दिसते की देव बाळवेषात,बाळरूपात आला.मला वाटते सहा/सात वर्षांचा मुलगा किंवा बहुधा मुलगीच बालकृष्णाच्या रूपात आली असावी.लहान मुलीला बालकृष्णाचे रूप देणे तुलनेने सोपे."
.
"म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? एका सहा वर्षांच्या मुलीला कोणीतरी कृष्णाचा मेकप करून तिच्या हस्ते तुकारामांना गाथा दिली ? त्यांनी ओळखले नाही? आणि गाथा कुठली आणली?"
.
"अगदी असेच घडले नसेल.पण आपणे जी चौकट आखून घेतली आहे तिचा विचार करता याहून
अगदीच वेगळा असा अन्य पर्याय सुचत नाही.तुकाराम महाराज कसे ओळखणार? देव आपल्या भक्ताला सगुण रूपात भेटतो यावर त्यांची श्रद्धा होती.शिवाय तेरा दिवसांच्या उपोषणानंतर ते जवळ जवळ ग्लानीत असणार."न संवरीत आली.." ती मुलगी असे वाटते.नेसूचे वस्त्र पिवळे,वर उघडी(असंवृत),गळ्यात फुलांच्या माळा,मूर्तीतील कृष्णासारखे केस.असे काहीसे रूप असावे.तसेच हा बालरूपातील देव तुकारामांपुढे एकदम प्रकट झाला नाही.जमलेल्या लोकांतून चालत आला असावा."
.
"पण हे सगळे कुणी घडवून आणले असेल?"
.
आपण परत घटनेचा मागोवा घेऊया.निषेध ठरावानुसार धर्ममार्तंडांनी गाथा नदीत फेकली.त्यांचे
काम झाले.ते परत गेले.
तुकाराम महाराजांचे अनुयायी,समर्थक तिथे होतेच.एकाने लगेच डोहात बुडी मारून गाथा वर काढली.अज्ञात स्थळी नेऊन भिजलेले कागद वाळत घातले.अनेक अभंग पाणी लागल्याने पुसट झाले.ते पाहून,अभंग आठवून,परत लिहिले.या सगळ्या प्रकाराला दहा बारा दिवस लागले.
तुकाराम महाराजांचे काही निष्ठावंत,व्यवहारज्ञानी भक्त होते.त्यांनी हे सगळे घडवून आणले असावे.
आपली तीन विधाने आणि गाथेतील या विषयासंबंधीचे अभंग ही चौकट न मोडता वास्तवाशी जुळणारी अशी ही एक कल्पना मांडता येते.खरे काय घडले ते नेमके सांगता येणे अशक्य आहे.पण आपली चौकट जर मोडायची नसेल तर जे इथे मांडले आहे त्याच्याशी थोडे फार मिळते जुळते असेच काहीसे घडले असावे असे वाटते.तुम्हाला काही वेगळे सुचत असेल तर ते सांगा."
.
"मला नाही काही सुचत.तुम्ही म्हणता तसे घडले असणे शक्य आहे."
*****************************************************
.
"
Comments
सत्य आणि कथा
तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांच्यातूनच सांगितले असल्याने
....२.गाथा परत मिळाली
या घटनेबद्दल शंका उपस्थित करण्याचे काहीच कारण दिसत नाही. एक शास्त्रीय सत्य म्हणून खालील विधानही योग्य वाटते.
....३.चमत्कार घडू शकत नाहीत.
आता प्रश्न राहिला गाथा हरवली कशी? या बद्दलचा.
यनांनी दिलेला या बद्दलचा संदर्भ
..........निषेधाचा काही पडिला आघात
..........तेणे माझे चित्त दुखावले
..........बुडविल्या वह्या बैसलो धरणे
..........केले नारायणे समाधान
काळजीपूर्वक वाचला तर यात काही गोष्टी मनाविरूद्ध घडल्याने तुकाराम महाराज अतिशय उद्विग्न मनस्थितीत असल्याने त्यांनी वैतागून आपल्या अभंगांच्या वह्या नष्ट करण्याचे ठरवले असे दिसते. गावातील ब्रम्हवृंदाने त्यांच्याकडून वह्या जबरदस्तीने काढून घेतल्या असा या अभंगाचा अर्थ यना कोणत्या आधारावर घेतात हे समजले नाही.
वह्या नष्ट करण्यासाठी तुकाराम महाराज स्वत: इंद्रायणीवर गेल्याचे अभंगांत कुठेही म्हटलेले नाही. याचाच अर्थ मी असा घेईन की त्यांनी या वह्या बुडवण्याची आज्ञा कोणा भक्ताला किंवा शिष्याला केली असावी. शिष्य वह्या घेऊन गेल्यावर साहजिकपणे तुकाराम महाराजांना आपल्या या निर्णयाबद्दल अत्यंत दुख: व पश्चाताप झाला आहे. तो त्यांच्या अभंगात दिसतो. व आपल्या अविचारीपणाचे प्रायश्चित म्हणून त्यांनी 13 दिवसाचे उपोषण केलेले दिसते.
यानंतर त्यांच्या शिष्याने एकंदर रागरंग बघून पोथ्या परत आणून दिल्या असाव्यात. त्या परत मिळाल्यामुळे महाराजही खुष व भक्तजनही खुष.
काही नतद्रष्ट मंडळी कदाचित हा सगळा पब्लिशिटी स्टंट होता असे म्हणू शकतात पण ते काही मनाला पटत नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
सिनेमामध्ये दाखवलेली गोष्ट
संत तुकारामांच्या जीवनावरील एका चित्रपटात मी असे पाहिले आहे की संत तुकारामांनी लिहिलेले अभंग त्यांच्या असंख्य चाहत्यांना तोंडपाठ होते आणि ती सर्व मंडळी ते अभंग आळवत देहूला गोळा झाले. त्या काळात कागदाच्या पोथ्यांपेक्षा मौखिक प्रसारच जास्त असणार हे अपेक्षित आहे. शेकडो लोकांच्या मुखातून प्रकट झालेल्या अभंगवाणीला कदाचित कोणीतरी पुन्हा लिपीबद्ध केले असावे. अर्थातच याला खूप वेळ लागला असता. त्या मानाने यनावालांचा तर्क जास्त वास्तव वाटतो.
नदीच्या पाण्यामधून बाहेर काढलेली अथवा नव्याने लिहिलेली गाथा उघडपणे तुकारामांना नेऊन द्यायला मोठे लोक कचरत असावेत. त्यामुळे ती बाळकृष्णाच्या रूपातल्या लहान मुलाच्या हाते पाठवली गेली असावी.
तर्कच करायचा झाल्यास अशी कल्पनाही करता येईल की संत तुकारामांचे अभंग आपल्या नावाने खपवण्याची सवय असलेल्या सालोमालोनेच लबाडी करून ती गाथा नदीत न बुडवता किंवा नदीमधून काढून आपल्याकडे लपवून ठेवली असेल आणि जनक्षोभाची तीव्रता पाहिल्यानंतर हळूच तिला नदीच्या पात्रामधून बाहेर काढल्याचे नाटक घडवून आणले असेल.
किंवा कदाचित चंद्रशेखर यांच्या तर्कानुसार हे काम संत तुकारामांच्या अनुयायानेही केले असेल.
त्या काळामध्ये कशा प्रकारचे कागद आणि शाई वापरली जात होती आणि त्या वस्तू किती वॉटरप्रूफ होत्या यावर संशोधन झाले असेलच. त्यातून काही प्रकाश पडू शकेल.
यना आणि पु ल
ह्यांच्या विचारात बरच साम्य दिसतय.
पु लं नी ६-७ दशकांपूर्वी त्यांच्या कारकिर्दितील पहिलं नाटक ह्याच विचारांचं लिहिलं.
त्यात त्यांनी काहिसं असं मांडलं की "बुडालेली गाथा लोकगंगेनं तारली" किंवा मौखिक परंपरेमुळे मुळातच प्रभावी विचार, जनमानसाची पकड असणारे गेय अभंग जनतेच्या/अनुयायांच्या/भक्तांच्या/श्रद्धावानांच्या/समव्यसनी लोकांच्या मुखावर न नाचते तरच नवल!
थोडक्यात, गाथा/प्रत्यक्ष ग्रंथ बुडाले/बुडवले हे सत्य.
पण ते परत आले हे रूपक. ग्रंथ बुडतात, संपतात. विचार, कथा,भावना कधीच नाहित.
त्या जराशा रुपांतरित तून तशाच प्रसृत होत राहतात. व्यक्तिला मारुन व्यक्तिमत्वही संपत नाही, व्यक्तिमत्वाचा प्रभावही नाही.
ग्रंथाला संपवुन विचार "दबतात"/दबु शकतात; संपत नाहित.
मला स्वतःला म्हणाल तर आपला चमत्कारांवर विश्वास आहे. खरोखर असे चम्त्कार व्हावेत, सर्वशक्तिमान कुणीतरी जगाची घडी बसवण्यास सज्ज असावा अशी इच्छा आहे.
कारण मग पुढील प्रत्येक कथेची सांगड कशी घालाल साहेब्?
१.ज्ञानेश्वरांनी खरीखरी भिंत चालवणे.
२.१४०० वर्षांचा आणि वाघावर बसणारा चांगदेव
३.नामदेवानं विट्ठलाला खाउ घालणं.
.....
अशी यादी शेकडो गोष्टींची होइल.
मुळात विठ्ठल वगैरे सब झूट असेल तर त्याच्या नादी लागुन जन्म घालवणारे आणि तो स्वतःला दिसला असे सांगणारे लोक् कोण समजावेत. (ज्ञानेश्वर, तुकाराम,नामदेव, एकनाथ,चोखामेळा,नरहरी सोनार, (खरेखुरे संत ) विसोबा खेचर , निवृत्ती,सोपान,मुक्ताबाई.
हे सगळे येडपट होते काय? नसतील तर लबाड होते काय? तेही नसतील तर लोकांनी त्यांच्या नावानी कै च्या कै च पसरवलं काय? )
--मनोबा
माझे मत
कशाशी सांगड घालायची आहे तेही सांगा? ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली नाही. चांगदेव १४०० वर्षांचा नव्हता. आणि वाघावर बसला असण्याची शक्यता त्यापेक्षा किंचित जास्त आहे. आणि नामदेवाने विठ्ठलाला खाऊ घातले म्हणजे देवाला नक्कीच खाऊ घातले नसावे. विठ्ठल नावाच्या इसमाला खाऊ घातले असण्याची शक्यत खूपच जास्त आहे.
येडपट म्हणजे क्रॅक किंवा मानसिक रुग्ण असे तुम्हाला सुचवायचे आहे का? लबाडी आणि येडपटपणा ह्यापैकी काहीच खात्रीलायकरीत्या सांगता येत नाही. पण उपलब्ध साहित्यानुसार ही भली माणसे होती आणि चांगली कवने त्यांनी रचली असे म्हणता येईल. लोकांनी कैच्याकैच पसरवले असण्याची किती शक्यता आहे ह्याबाबत घासगीवाले अधिक सांगू शकतील.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
भ्रमसेन की ठकसेन
कदाचित भ्रमसेन की ठकसेन असे असेल. ;-) माझ्यामते मन यांच्याप्रमाणेच यनांनाही तसेच काहीसे वाटत असण्याची शक्यता आहे. तसे यनांनी या चर्चेत तरी त्यांना संतांपैकी भ्रमसेन कोण आणि ठकसेन कोण वाटते यांचा उहापोह केला तर वाचायला आवडेल.
प्रस्तराचा देव
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"नामदेवाने विठ्ठलाला खाऊ घातले म्हणजे देवाला नक्कीच खाऊ घातले नसावे. विठ्ठल नावाच्या इसमाला खाऊ घातले असण्याची शक्यत खूपच जास्त आहे."
असे श्री.धम्मकलाडू म्हणतात ते पटण्यासारखे आहे. कारण स्वतः नामदेवांनीच लिहिले आहे:
सांगते,ऐकते मूर्ख दोघे |"...(नामदेव गाथा अभंग क्र.१३६९)
भाबड्यांच्या श्रद्धा
प्रस्तराचा देव बोलत भक्तांते |
यालाच भाबड्यांच्या श्रद्धा म्हणता येइल काय??
विठ्ठल, चैतन्य आणि ऍ न्टी एन्ट्रॉपी
मनोबांच्या प्रतिसादाला उत्तर द्यायचे तर एक मोठा लेख लिहावा लागेल. पण थोडक्यात माझे विचार सांगतो. ज्ञानेश्वर, जिचे परिणाम आपल्याला ठायी ठायी जाणवत राहतात अशा ज्या एका अज्ञात संकल्पनेला चैतन्य म्हणतात, रिचर्ड फेनमन याच अज्ञात संकल्पनेला नेचर म्हणतो, इतर शास्त्रज्ञ ऍ न्टी ए न्ट्रॉपी म्हणतात त्याच संकल्पनेला ही संत मंडळी विठोबा म्हणतात. ज्या अज्ञात संकल्पनेची जाणीव आपल्याला क्षणोक्षणी होत राहते त्या संकल्पनेच्या नादी लागणारी ही संत मंडळी जर वेडपट मानायची असली तर फेनमनलाही येडपट मानावे लागेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
फरक
अज्ञाताला प्लेसहोल्डर नाव म्हणून नेचर म्हटले तर ठीक आहे, ते उत्तर नसते तर आव्हान असते. विठोबा हे आव्हान नसून उत्तर आहे.
महत्त्वाचे काय?
चंद्रशेखर यांचा तर्क पटणारा आहेच पण यनांच्या तर्काने विचार करता त्यातील महत्त्वाचा मुद्दा गाळून श्रद्धा अंधश्रद्धेचे नेहमीचेच भारूड लावलेले दिसले. अर्थातच ते अपेक्षित होते.
गाथा नदीत बुडवल्या - समजू की धर्ममार्तंडांनीच बुडवल्या. काही दिवसांनी त्या परत मिळाल्या. समजू की भक्तांनी पुनश्च लिहिल्या, नदीतून बाहेर काढून वाळवल्या (बॉलपेनने लिहिल्या होत्या काय? ;-)) वगैरे. त्या परत प्राप्त झाल्यावर पुन्हा नष्ट करणे अशक्य होते काय? वीट लावूनही एक-दोनजणांनी उचलून नदीत भिरकावून द्याव्या इतकेच वजन असावे. ज्या धर्ममार्तंडांना उपद्रव करायचा होता ते पुन्हा येऊन गाथा बुडवून टाकण्याची शक्यता मोठी होती. परंतु, बुडलेल्या गाथा ईश्वरी करणीने परत मिळाल्या असे सांगितल्याने खुद्द ईश्वराचा या कार्याला पाठिंबा असून तो कोणत्याही प्रकारचा उपद्रव थांबवू शकतो ही भीती धर्ममार्तंडांना पडून पुढील उपद्रव थांबला असावा.
आता काय करावे? ते श्रद्धाळू धर्ममार्तंड होते, वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे होते म्हणून उपद्रव झाला म्हणून वाईट वाटून घ्यायचे की ते धर्ममार्तंड नास्तिक नव्हते (आता धर्ममार्तंड असतील तर नास्तिक कसे असतील म्हणा! ;-)) देवाला भीत होते म्हणून चमत्काराला भुलले आणि आणखी उपद्रव टळला म्हणून हायसे वाटून घ्यायचे. देवाला भीत नसते तर गाथांचा नायनाट करणे सहजशक्य होते असे यनांना वाटते का?
संशोधन करायचे असल्यास
चमत्कारिक गोष्टींचे समजतील असे अर्थ लावण्यासाठी रूढ श्रद्धेतून, ऐकीव माहितीतून आलेल्या चौकटींकडे दुसर्या कोनातून बघण्याची कल्पना नवीन नाही. मात्र हा गृहपाठ म्हणून देण्याची कल्पना मात्र अभिनव आहे, ह. घ्या. :)
>>आपली तीन विधाने आणि गाथेतील या विषयासंबंधीचे अभंग ही चौकट न मोडता वास्तवाशी जुळणारी अशी ही एक कल्पना मांडता येते.खरे >>काय घडले ते नेमके सांगता येणे अशक्य आहे.पण आपली चौकट जर मोडायची नसेल तर जे इथे मांडले आहे त्याच्याशी थोडे फार मिळते >>जुळते असेच काहीसे घडले असावे असे वाटते.तुम्हाला काही वेगळे सुचत असेल तर ते सांगा."
यावरून चौकटी मोडाव्यात हा लेखकाचा आग्रह असला पाहिजे असे वाटते.
म्हणून, माझ्या मते, संशोधन करायचे असल्यास कागद, वह्या हे शब्द फारसी भाषेतून आले का ते पहावे. ते तेव्हाच्या किती लेखनात नेहमी वापरले जात होते हेही पहावे. तुकारामांनी कागद या शब्दाचा वापर स्वतः कितीवेळा केला आहे हे तपासता येईल. तसे नसल्यास हे अभंग कोणी इतरांनी त्यांच्या नावावर ठोकून दिल्याचे म्हणता येईल. हे लोक कोण असतील त्याबद्दल तर्कही करता येतील. त्यांना ह्या चमत्कारांपासून काही फायदा झालेला असू शकतो. तो काय? तुकोबा तेरा दिवस का डोळे झाकून राहिले? तेरा दिवस म्हणजे त्यांनी वह्यांचे श्राद्ध घातले का? इ. इ. बरेच प्रश्न विचारता येतील.
अर्थात हे सर्व करून अभंग भ्रामक आहेत हेच स्पष्ट होणार जे काही नवीन नाही. मात्र या गृहपाठाने पोरांचा अभ्यास पक्का होणार,यात शंका नाही :)
कागद
हा लेख वाचताना माझ्याही मनात कागदाचा विचार आला. थोडे धुंडाळल्यावर हे मिळाले.
यावरून तरी असे वाटते की कागद त्यावेळी उपलब्ध होता.
प्रमोद
कागद होताच की
शिवाजी महाराजांची पत्रे कागदावर लिहिलेली आहेत. मुघलांचीही कागदावरची पत्रे आहेत ते सर्व तुकाराममहाराजांना समकालीन की. कागद त्यापेक्षा फार जुना आहे.
जुनरी कागद
दुवे कशाला हवेत. कागद होताच त्या काळात. जुनरी कागद प्रसिद्ध होताच की. मोगल लोक अतिशय़ पांढरा शुभ्र आणि चांगल्या प्रतीचा कागद शाही फर्मानांसाठी वापरीत असत.
चूभूद्याघ्या.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
उपलब्ध
कागद उपलब्ध होताच, याबद्दल शंका नाही. पण हे शब्द कागद आणि वही या प्रकारे वापरले जात होते का, किती प्रमाणात हे पहाण्यासारखे असेल.
चोपडी, बाड, नामावळी असे शब्द मी ऐकले आहेत. वहीदेखील असेल, पण इ. स. १७०० पूर्वी वही हा शब्द शिवाजी महाराजांच्या पत्रव्यवहारात इ. ठिकाणी मिळतो का हे तज्ञच सांगू शकतील.
(बाकी, आम्ही ब्याकबेंचर, नावडते, ढ विद्यार्थी असल्याने बहुदा सर आमच्या प्रश्नांकडे/उत्तरांकडेही दुर्लक्ष करणार हे ठरूनच गेले आहे, त्यांचे "साधु, साधु" हे उद्गार कधी आमच्यासाठीही उच्चारले जातील त्याची वाट बघते आहे, बहुदा पुढचा जन्म घ्यावा लागेल किंवा क्लास रीपीट करावा लागेल असे दिसते आहे. :)
"कागद" थेट अरबी भाषेमधून
"कागद" शब्द मराठीत थेट अरबी भाषेतून आला, तर हिंदी मध्ये अरबी->फारसी->उर्दू/हिंदी असा टप्प्यांचा प्रवास करत आला.
काही शतकांपूर्वी कागद फार महाग असत, असे कुठेसे वाचले होते. लेखनापेक्षा पठन-पाठन परंपरेतून ग्रंथांचे रक्षण करण्याची प्रथा होती.
कागद
'दासबोध' या ग्रंथात शेवटी शेवटी कागद कसा घोटून घोटून गुळगुळाट करावा, त्यावर कसे लिहावे,लिहिताना समास कसा सोडावा,मोत्यासारखे अक्षर कसे लिहावे याचे सुंदर वर्णन आहे .हे वर्णन मराठी साहित्यात अनेक वेळा उद्धृत झालेले आहे. (अवांतर : 'घोटाळें' हा शब्द तिथे घोटून गुळगुळीत करण्याचे हत्यार या अर्थी वापरलेला आहे. म्हणजे सद्ध्या प्लास्टरिंग् करताना ते समपातळीत येण्यासाठी त्यावर फिरविल्या जाणार्या आणि स्वतःच्या आसाभोवती फिरणार्या वृत्तचिती ला त्या काळी घोटाळें म्हणत असावेत.) रामदास हे तुकारामांचे समकालीन. तेव्हा त्या काळी कागद ओबडधोबड स्वरूपात उपलब्ध असावा, आणि लिहिण्यासाठी वापरताना त्यावर प्रक्रिया करावी लागत असावी. कागद तर आधीपासून होताच. प्रक्रियेचे तंत्रज्ञानही काही थोड्या लोकांना ठाऊक होते.
सोळाव्या शतकातले 'अक्बर् नामा' हे मॅन्युस्क्रिप्ट् कागदावरचेच आहे की कसे यावर कोणी खुलासा करेल का?
ऐने अकबरी
सोळाव्या शतकातले 'अक्बर् नामा' हे मॅन्युस्क्रिप्ट् कागदावरचेच आहे की कसे यावर कोणी खुलासा करेल का?
तुम्हाला बहुदा ऐने अकबरी (लेखक अबुल फजल) म्हणायचे असावे. 'बाबरनामा' बाबराने लिहिलेले पुस्तक आहे ते वेगळे.
अल बिरुनी लेखनाचे अनेक प्रकार मांडतो. त्यात कागदाचा व्यवस्थित उल्लेख आहे. भारतीय त्यावेळी लोक मात्र भुर्जपत्रे आणि ताडपत्रे यावर लिहित असत. (या शिवाय शेळीच्या आतड्यावर लिहिण्य्याची अरब/ग्रीक पद्धत होती.)
कागद घोटून कसा करावा याबद्दल नेमका कुठे उल्लेख आहे मिळेल का? दासबोध इथे मिळेल.
प्रमोद
उल्लेख
पान ४४४.
ऐन्-इ-अक्बरी
अक्बर् नामा हा अक्बराचे दरबारी पंडित अबुल् फझ्ल् यांनी अक्बराच्या आज्ञे/विनंतीनुसार लिहिलेला चरित्रात्मक ग्रंथ त्रिखंडात्मक आहे आणि त्यातल्या तिसर्या खंडाला ऐन्-इ-अक्बरी म्हणतात असे विकीवर आहे.
मुघलनामे
मुघल राजांचे जीवनचरित्र लिहिण्यासाठी जे दरबारी लेखक नेमले जात त्यांच्या लेखनाला (जीवनचरित्राला) नामा म्हटले जात होते असे वाटते. यानुसार, बाबरनामा आणि अ'बुल फज़लचा अकबरनामा आहेच पण गुलबदन बेगम या हुमायुंच्या बहीणीने अकबराच्या आग्रहावरून लिहिलेला हुमायूंनामाही आहे. याचप्रमाणे औरंगजेबावरला आलमगिरनामा, शहाजहानवरील बादशहानामा वगैरे प्रसिद्ध आहेत.
चांगली माहिती
तुम्ही व इतरांनी या प्रतिसादावर दिलेल्या माहितीमुळे बरेच नवीन कळले. धन्यवाद.
ऐने अकबरी हा ग्रंथ मला खूप आवडला होता. आता अकबरनामाचा शोध घेईन.
प्रमोद
कागद
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
" तुकारामांनी कागद या शब्दाचा वापर स्वतः कितीवेळा केला आहे हे तपासता येईल."
..चित्रा यांच्या प्रतिसादातून.
कागद हा शब्द त्याकाळी रूढ होता.तुकारामांनी तो अभंगांत वापरला आहे हे नि:संशय. तो किती वेळां वापरला आहे याची गणना करून काही साध्य होईल असे वाटत नाही. त्यांच्या एका अभंगात आहे:
चाटितां मधुर गोडी नेदी|"
आता चित्रा म्हणतील:" त्याकाळी साखरकारखाने होते का? साखर शब्द गाथेत किती वेळा आला आहे ते मोजा."
असे मोजणे म्हणजे संशोधन करणे का?
मोजणे म्हणजे संशोधन करणे
मोजणे हाही संशोधन करण्याचा एक प्रकार आहे हे बहुधा यनांना माहित नसावे.
एक उदाहरण द्यायचे तर -
महाभारतात रेशमाचा उल्लेख मोजल्यास तो फार कमी वेळा येतो, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतका परंतु क्षौम या अळशीच्या तंतूपासून बनलेल्या वस्त्राचा उल्लेख सातत्याने येतो. यावरून महाभारत काळी रेशीम फारसे प्रचलीत नव्हते किंवा रेशीम हे फक्त थोडक्या लोकांत (जसे श्रीमंतांत) वापरले जाई किंवा महाभारतात रेशमाचे उल्लेख नंतर घुसडले गेले आहेत असे अनुमान काढले जाते.
त्यामुळे चित्रा यांचा प्रश्न अस्थानी वाटत नाही.
रेशमाबद्दल +१
अगदी हेच मनात आले.
सातवेळा 'कागद', एकतीसवेळा 'साकर', दोनवेळा 'साबण'
तुकारामांच्या अभंगगाथ्यात कागद हा शब्द ७ वेळा अलेला आहे असे दिसते. :)
उदकी राखिले कागद(अभंग २२३१), राजा कागदातें देखे(अभंग २९०६)कागदीं लिहिता नामाची साकर (अभंग ३८५७),आशा माया रांडा नांव हें कागदीं (अभंग ३९०६),कागद हा मही न पुरेचि(अभंग ४११०),कागद पाहतां तलब केली(अभंग ४३३३),कागदीं लिहिली नामाची साकर (अभंग ४३७०) - देहू गाथा प्रतीवरून
तर साकर (साखर) हा शब्द ३१ वेळा आलेला आहे. साबण २ वेळा आलेला आहे.
त्यामुळे साबण आणि कागदापेक्षा साखर त्याकाळी जास्त प्रचलित होती असा एक अर्थ निघू शकतो का? ;)
ह.घ्या.
साबण
असा अर्थ नक्कीच निघू शकतो. तुकारामांच्या काळी शर्करा सर्वसामान्यांच्या वापरात असावी, तसेच कागदही असावा. साबणाचे मात्र नेमके माहित नाही, कदाचित तुकारामांच्यावेळी साबण वापरणे हे श्रीमंतांचे चाळे असू शकतात. ;-) पण साबणाचा उल्लेख प्रक्षिप्त नसावा. तुकारामांना साबण माहित असावा. सापोवरून साबु - साबुन - साबण हा शब्द पर्शियातून प्रवास करत तुकारामांच्या पूर्वीच आला असावा असे वाटते.
साबण
साबण फारच पूर्वीपासून मानवाला माहिती असावा असे दिसते.
नितिन थत्ते
भारतीय साबण
साबण हा फार पूर्वीपासून मानवाला माहित असला तरी साबण या वस्तूपेक्षा "साबण" हा शब्द भारतात कसा आला असावा हे पाहायला हवे. :-) आपल्याकडे प्राचीन काळापासून स्नानाच्या वेळी वस्त्रगाळ माती, समुद्रफेस, शिकेकाई, रिठे, हळद, पीठे, सुवासिक वनस्पतींच्या साली, फळांच्या साली वगैरे वाळवून केलेली भुकटी, उटणी, तेले, सुगंधी अत्तरे, फुलांच्या पाकळ्या वगैरे वगैरे वापरायची पद्धत होती परंतु "साबण" हा शब्द त्यांत दिसत नाही. त्यामुळे शब्दाचा प्रवास सापो - साबु - साबुन -साबण असा झाला असणे शक्य आहे.
पोर्तुगीज मूळ
साबणाला जपानी भाषेत 'शाबोन" म्हणतात आनि तो शब्द पोर्तुगीज "साबाओ" या शब्दापासून आला आहे असे खालील दुव्यावर म्हतले आहे. म्हणजेच मराठीतला "साबण" शब्दही त्यावरूनच आला असावा. (मूळ श्रेय - मनोगतावर श्री. टग्या यांनी साबण शब्दाचे मूळ पोर्तुगीज आहे असे लिहिले होते).
साबण
साबणाचे माहीत नाही
एवढे माहीत आहे की पगार हा शब्द पोर्तुगीज आहे.
साबणाचे माहीत नाही पण :)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
साबणाला धुवून काढले
हॅहॅहॅ! साबणालाच धुवून काढलं तुम्ही सगळ्यांनी. आता माझेही दोन बुडबुडे -
तुमच्या दुव्यात स्वाहिलीत साबणाला साबुनी म्हटले आहे. मला हाच शब्द साबणाशी जवळचा वाटतो.
खुश्कीच्या मार्गानेही आला असेल
शब्द
(लॅटिन) सापो->सापोन/साबोन->साबून->साबुन (हिंदीत)
किंवा
(लॅटिन) सापो->सापोन/साबोन->साबण (मराठीत)
आला असावा असे वाटते खरे.
पण मधली कडी अरबी/फारसी अशी आहे, का पोर्तुगीज आहे? हा प्रश्न आहे.
खुश्कीच्या मार्गाने शब्द आला असण्याची शक्यता मोठी आहे. ८व्या ईसवी शतकात अरब अल्-केमिस्ट लोक साबणाबद्दल लिहितात. त्यांचा शब्द "साबोन" असेल, तर शब्द खुश्कीच्या मार्गाने भारतात आला, असेच मानायला पाहिजे.
हिटाइट
हिटाइट शब्दमूळ आहे असे ह्या दुव्यावरून वाटते आहे.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
:)
तुकारामांनी तो अभंगांत वापरला आहे हे नि:संशय.
धन्यवाद. एवढेच लिहीले असते तरी चालले असते असे वाटते.
तो किती वेळां वापरला आहे याची गणना करून काही साध्य होईल असे वाटत नाही.
असे कसे?
रेशीम हा शब्द जर प्राचीन भारतातील लेखनात आढळत नसला तर तेव्हा भारतात रेशीम वापरात नव्हते असे म्हणता येते.
वही हा शब्द एवढा जुना आहे हे मला माहिती नव्हते. चोपडी, बाड, नामावळ असे मला माहिती असलेले शब्द मी वर दिलेले आहेत. वही जर रीलेटिवली अर्वाचीन शब्द असला तर हा अभंग तुकोबांनी न लिहीता इतर कोणी नंतर घुसडला असण्याची शक्यता असू शकते. जेव्हा चौकट मोडली तेव्हा सगळेच प्रश्न विचाराधीन झाले, नाही का?
आता चित्रा म्हणतील:" त्याकाळी साखरकारखाने होते का? साखर शब्द गाथेत किती वेळा आला आहे ते मोजा."
हाहा. असे मी म्हटले नसते असे वाटते. साखर- शर्करा इ. शब्द हे प्रचलित असावेत एवढी कल्पना आहे.
कागदाला मात्र वर म्हटल्याप्रमाणे भूर्जपत्र इ. नावे माहिती होती. कागद हा शब्द मुसलमान राजवटीत आला असेल एवढे म्हणू शकतो. रामदासांच्या लेखनातील उल्लेख खाली राही यांनी दिला आहे. त्यावरून कागद हा शब्द तत्कालिन काळी प्रचलित होता याला दुजोरा मिळतो हे मला मान्य आहे. आता मला हे माहिती नसले तर ते माहिती करून द्यावे.
असे मोजणे म्हणजे संशोधन करणे का?
असे मोजणे म्हणजे संशोधन करणे का बरे समजले जात नाही?
मला संशोधन कशाशी खातात तेही माहिती नाही असे धरून उत्तर द्यावे ही विनंती.
केवळ मोजणे
असे मोजणे म्हणजे संशोधन करणे का?
केवळ मोजणे म्हणजे संशोधन नव्हेच. पण एखाद्या वस्तूचे, स्थानाचे, नदीचे नाव प्राचीन वाङ्मयात, साहित्यात कितीदा आले आहे ह्यावरून सर्वमान्य असे निष्कर्ष काढले जाऊ शकतात. उदा. ऋग्वेदात गंगा नदीचा उल्लेख दोनदाच झाला आहे. तर सरस्वतीसाठी ३ संपूर्ण सूक्ते आहेत. (दुवा १, दुवा २, दुवा ३) ह्यावरून बरेच काही कळते. सरस्वतीचे त्याकाळातले महत्त्व कळते. ऋग्वेदाच्या भूगोलाबद्दल काही आडाखे बांधता येतात.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
साखर
साखर तयार करण्याची एक पारंपारिक कृती मी ऐकली आहे. काकवीला बरणीमध्ये बंद करून ठेवले तर तिच्या तळाशी साखरेचे कण जमा होतात म्हणे. शर्करा हा शब्द प्राचीन काळापासून प्रचलित असल्यामुळे अशा प्रकारचा ग्रामोद्योग त्या काळापासून चालत असावा.
हे थोडेसे अवांतरच आहे, पण हा प्रतिसाद अवांतर विषयावर आहे.
गमतीदार विचारशृंखला
गमतीदार विचारशृंखला
बॅकअप
कदाचीत गाथांचा बॅकअप करुन ठेवला असेल असे देखील उत्तर काही वर्षांनी मिळेल :-)
बाकी सध्या तुकारामांच्या गाथा बुडण्या आणि नंतर तरण्यावरून समाजात किती चर्चा चालते, त्या भावविश्वात राहून कितीजण काय निर्णय घेतात?
श्री. यनावाला हे प्रकरण अंधश्रद्धा म्हणून सांगत असतील पण माझ्या दृष्टीने ही दंतकथा आहे. दोन्हीतील फरक इतकाच की अंधश्रद्धेवर आधारीत आजचा मनुष्य स्वतःच्या आयुष्यातील निर्णय घेतो तर दंतकथा या स्वतःच्या भक्ती/प्रेमापोटी आळवतो. पण आळवून झाल्यावर परत कामाला लागतो.
बाकी, कीस पाडायचाच असेल तर अजून एक प्रश्न विचारता येईल: की जर तुकारामाची परीस्थिती एकंदरीत हलाखीची होती तर त्याला कागद आणि शाईचे फंडींग कोण करायचे? ती शाई देखील स्पेशल जी पाण्यात गेल्यावर फुटणार नाही! मग यापुढे जाऊन असेही म्हणता येईल की जसे तत्कालीन शिवाजीच्या हस्ताक्षरातील पत्रे जशी उपलब्ध आहेत तशी जर तुकोबाच्या हस्ताक्षरातील गाथा आपण पाहीली नाही , तर मग "अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची" असे मानणे ही देखील अंधश्रद्धाच का? कारण नक्की पुरावा काय आहे?
अर्थात हा प्रश्न केवळ वादासाठी पडला आहे. मला व्यक्तीगत पडलेला नाही. माझ्या लेखी गाथा आणि अभंगवाणी तुकोबाचीच आहे.
काव्य आणि सत्य
काव्यातून सत्य शोधून काढायचं हे महा जिकिरीचं काम आहे. कवितांमध्ये वर्णन केलेल्या घटना सकृतदर्शनी सत्य म्हणून मानायच्या आणि मग त्यांची स्पष्टिकरणं शोधायची हा कठीण प्रकार आहे. ते काव्य शतकांच्या संस्करणांतून गेलेलं असेल तर आणखीनच कठीण. तुकारामाची गाथा पाण्यातून वर आली, हा प्रवाद नक्की कुठच्या कारणाने आला याचा तपास करायला हरकत नाही, पण त्यासाठीचे किती पुरावे आपल्याला शोधता येतील याबद्दल शंका आहे. तुकारामाने डोहातून गाथा वर येणं हे रूपक म्हणून देखील वापरलं असेल.
तुकारामाला खरोखरच ग्लानीत कोणी लहान मूल भेटलं हेही पटत नाही. एकदा ग्लानी म्हटली की प्रत्यक्ष मूल असण्याचीही गरज नाही. त्यानेच लिहिलेलं आहे की देवा तू एकाच वेळी दोन ठिकाणी वाटला गेलास, माझ्याकडे आणि डोहात. (दोन्ही ठिकाणी वाटलं जाणं याचा दोन कॉप्या असण्याशी संबंध लावता येईल काय?)
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
संस्करण?
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.राजेश घासकडवी लिहितातः
"ते काव्य शतकांच्या संस्करणांतून गेलेलं असेल तर आणखीनच कठीण. "
..
तुकाराम गाथा साडेतीन शतकांपूर्वी लिहिली हे खरे. पण तिच्यावर संस्करण कधी झाले? कुणी केले? कसे होईल?
एखाद्या साहित्यकृतीवर कालपरत्वे संस्करण होत नसावे. असे संस्करण त्या साहित्यकृतीचा मूळ निर्माता करू शकतो.जुन्या लोकप्रिय साहित्यकृतीत प्रक्षेप होऊ शकतात.
भगवद्गीता किमान आठ नऊ शतकांपूर्वी रचली.तिच्यावर संस्करण झाले असे वाटत नाही.
कदाचित शब्द चुकला असेल
संस्करण हा शब्द मी सर्वसामान्यपणे 'कॉपिइंग एरर्स, उघड प्रक्षेप, भाषा बदलामुळे अर्थाछटेत बदल, काही वाङमयाचा नाश वगैरे' बदलांसाठी वापरला होता. कदाचित तो योग्य नसेल.
कुणी केलं, कसं होईल - काळ हे करतो असं सर्वसाधारण निरीक्षण आहे.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
निषेध ठराव
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.चन्द्रशेखर लिहितात"गावातील ब्रम्हवृंदाने त्यांच्याकडून वह्या जबरदस्तीने काढून घेतल्या असा या अभंगाचा अर्थ यना कोणत्या आधारावर घेतात हे समजले नाही."
..
ब्राह्मणांनी वह्या मागून घेतल्या हे सूचित करणारे अभंग नाहीत हे खरे. पण त्याकाळी समाजावर धर्माची सत्ता होती.धर्ममंडळाने केलेले निर्णय समाजातील प्रत्येकावर बंधनकारक असत.पूर्वी ज्ञानदेवांदिकांना बहिष्कृत केले, त्यांच्या वडिलांना देहदंडाचे प्रायश्चित्त घ्यायला लावले.हे सर्वश्रुत आहे.
देहूतील धर्ममंडळाने तुकारामांच्या उपदेशाचा निषेध करून त्यांच्या अभंगवह्या नदीत बुडवण्याचा निर्णय का केला असेल त्याचे विवरण लेखात केले आहे.
*श्री. चन्द्रशेखर यांचा तर्क खरा मानला तर "तू कृपेची माऊली|आम्हा दीनांची साऊली|
न संवरीत आली|बाळरूपे जवळी....या अभंगाचा संदर्भ लागत नाही.
जलदिव्य : एक किंचित शोध
देहूतील कै. श्री. श्रीधर मोरे यांनी लिहिलेले तुकारामचरित्र अधिकृत मानता येईल. "अण्णा, म्हणजे श्रीधर महाराज मोरे , हे तुकोबांचे मधले पुत्र विठ्ठल महाराज यांचे थेट वंशज.", असे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी लिहिले असल्याने त्याबद्दल कोणताही किंतु बाळगता येत नाही.
या चरित्राप्रमाणे -
देहूतील तत्कालीन विद्वान ब्राहमण रामेश्वरभट्टाने (बहुलकर!) तुकारामांना आपले अभंग लिहीणे (कवित्व) ही श्रींची (ईश्वराची) आज्ञा आहे हे सप्रमाण सिद्ध करण्यासाठी जलदिव्य करण्यास सांगितले.
विप्र म्हणे आज्ञा कारण । श्रीची कैसे जाणेल जन ।
यालागी कवित्व बुडवून । टाकी नेऊन उदकात ॥१॥
तेथे साक्षात नारायण । आपे रक्षील जरी आपण ।
तरी सहजचि वेदाहून । मान्य होईल सर्वाशीं ॥१६॥
"तुकोबांनी अभंगाच्या सर्व वह्या घेतल्या. दगड बांधून त्या इंद्रायणीच्या डोहात स्वहस्ते बुडविल्या. पूर्वी खत-पत्रे प्रपंच बुडविला, आता अभंगाच्या वह्या-परमार्थ बुडविला."असे त्यांच्या या
अधिकृत चरित्रात लिहिले आहे.
निषेधाचा काही पडिला आघात
तेणे माझे चित्त दुखावले
बुडविल्या वह्या बैसलो धरणे
केले नारायणे समाधान
या अभंगातील शब्दरचना पाहिली असता ग्रामवासीयांनी केलेल्या अपमानामुळे/निषेधामुळे चित्त दुखावलेल्या तुकाराम महाराजांनीच स्वतःहून अभंगांच्या वह्या नदीत बुडवल्या आणि नारायणासमोर धरणे धरले असा स्पष्ट अर्थ निघतो. त्यात ब्रह्मवृदाने तुकारामांच्या वह्या हिसकावून घेतल्या आणि त्या इंद्रायणीत बुडवल्या असा उल्लेख कुठेही नाही.
उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हेच रामेश्वरभट्ट पुढे तुकारामांचे टाळकरी झाले आणि त्यांनी तुकारामांची महती गाणारी अभंगरचनाही केली.
या ग्रामवासीयांत जसा त्याकाळाचा ब्रह्मवृंद होता तसाच जातपात-वर्णाश्रम भेदाभेद मानणारा इतर सवर्ण वर्गही होता.
काय खावे आता कोणीकडे जावे । गावांत राहावे कोण्या बळे ॥१॥
कोपला पाटील गांवचे हे लोक । आता घाली भीक कोण मज ॥धृ॥
आता येणे चवी साडिली म्हणती । निवाडा करिती दिवाणात ॥२॥
भल्या लोकीं यास सागितली मात । केला माझा घात दुर्बळाचा ॥३॥
तुका म्हणे याचा संग नव्हे भला । शोधीत विठ्ठ्ला जाऊ आता ॥४॥
यात 'पाटील' आणि गावचे इतर लोक यांच्या कोपाचा उल्लेख आहे.
अवांतर :
याच चरित्रातील दादोजी कोंडदेवांचा उल्लेख पाहता दादोजी एक उदारमतवादी होते असे दिसते. (अजून तुकोबांच्या 'या' चरित्रातील दादोजींकडे लोकांचे लक्ष गेलेले दिसत नाही.)
अधिकृत चरित्र?
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विसुनाना यांच्या प्रतिसादात आहे:
"देहूतील कै. श्री. श्रीधर मोरे यांनी लिहिलेले तुकारामचरित्र अधिकृत मानता येईल. "अण्णा, म्हणजे श्रीधर महाराज मोरे , हे तुकोबांचे मधले पुत्र विठ्ठल महाराज यांचे थेट वंशज.", असे दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी लिहिले असल्याने त्याबद्दल कोणताही किंतु बाळगता येत नाही."
..
यात त्याबद्दल म्हणजे कशाबद्द्ल? आणि किंत्तु बाळगता का येत नाही? या चरित्राला अधिकृतता कोणी प्रदान केली? चरित्रलेखक तुकारामंचे वंशज आहेत म्हणून चरित्र अधिकृत ठरते का? चरित्रलेखक वंशज असणे हे चरित्राच्या अधिकृततेचे प्रमाण ठरते का?
श्री.विसुनाना यांचा हा युक्तिवाद पटण्यासारखा नाही.
...
२/ श्री.विसुनाना पुढे लिहितातः---
"बुडविल्या वह्या बैसलो धरणे
केले नारायणे समाधान"
"तुकाराम महाराजांनीच स्वतःहून अभंगांच्या वह्या नदीत बुडवल्या आणि नारायणासमोर धरणे धरले असा स्पष्ट अर्थ निघतो"
..
तर असे नाही.
बुडविल्या आणि बैसलो अशी दोन क्रियापदे जवळ जवळ आहेत्.त्यांची कर्तृपदे अध्याहृत आहेत.बैसलो या रूपावरून त्याचा मी हा कर्ता स्पष्ट होतो. तोच दुसर्या क्रियापदाचा मानणे हा साहचर्य विचार दोष आहे.इथे "त्यांनी" हे कर्तृपद अधिक सयुक्तिक वाटते. (त्यानी म्हणजे निषेधाचा आघात करणार्यांनी) वह्या बुडविल्या. (मी) धरणे बैसलो.हा अन्वय अधिक योग्य आहे.
प्रतिसाद दिला आहे.
वेगळा प्रतिसाद खाली दिला आहे.
सावरकरांचा तर्क
याच विषयावर सावरकरांनी लिहिलेले विज्ञाननिष्ट निबंध आठवले. पान ६३ वर त्यांचा तर्क दिला आहे.
इंडिया इंक नावाच्या शाईच्या लिखाणावर पाण्याचा फारसा परिणाम होत नसावा. (मला वाटते पूर्वी आम्ही ट्रेसिंग वर ड्रॉइंग्ज काढण्यासाठी हीच वापरायचो.) अशाच पद्धतीची शाई पूर्वी वापरत असावेत. कागदपत्रे टिकावीत असे वाटल्यास अशाच शाईचा वापर जास्त योग्य ठरतो.
प्रमोद
वाचनीय दुवा
दुव्यावरील निबंध वाचनीय आहेत.
अचानक लाभ
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रमोद सहस्रबुद्धे यांनी स्वा.सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ निबंधांचा जो संदर्भ दिला आहे
त्यांतील यज्ञसंस्थेवरील निबंध लागलीच वाचला. उत्कृष्ट आहे. सर्वच निबंध वाचनीय असणार यांत शंका नाही. मला तर हा अनपेक्षित लाभच वाटतो.
यावरून किंचित आठवले...
नॅशनल ट्रेजर-१ मध्ये अमेरिकन डॉलर बिलवरची शाई ही पक्की असून ती भारतात तयार केलेली असते असे वाक्य आहे. (त्यातला खरेखोटेपणा माहित नाही.) चू. भू. दे. घे.