उदकीं अभंग रक्षिले |

उदकीं अभंग रक्षिले
.................
"गाथेत एक अभंग आहे:
..........निषेधाचा काही पडिला आघात
..........तेणे माझे चित्त दुखावले
..........बुडविल्या वह्या बैसलो धरणे
..........केले नारायणे समाधान
हा प्रसंग खरा असेल का ? तुमचे काय मत आहे?"
.
"मागे एकदा तुम्हाला म्हणालो होतो की तुकाराम महाराजांना जे वैयक्तिक अनुभव आले
ते त्यांनी अभंगांत मांडले.त्यात खोटेपणा नाही.ते व्यक्तिनिष्ठ आहेत.पण खरे आहेत असे माझे मत आहे."
.
"वरील अभंगात उल्लेख आहे तो निषेध कोणी केला ? वह्या कोणी बुडवल्या? देवाने समाधान
कसे केले?"
.
"तुकारामकाळी चातुर्वर्ण्य समाजव्यवस्था होती.समाजावर धर्माची सत्ता होती.धर्माविषयी काही सांगण्याचा,लिहिण्याचा अधिकार उच्चवर्णीयांनाच होता.तुकाराम कुणबी जातीचे वाणी होते.त्यांना
धर्माविषयी काही लिहिण्याचा अधिकार नव्हता.त्यांच्या अभंगांतील:
..........वर्ण अभिमाने कोण हो पावन,ऐसे दाखवून द्यावे आम्हा॥
..........वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा,येरांनी वहावा भार माथां।
..........महारासी शिवे, कोपे, ब्राह्मण तो नोहे।
असली वचने धर्मप्रमुखांना रुचणारी नव्हती.त्याकाळच्या धर्ममार्तंडांनी तुकाराम गाथा
इंद्रयणीत बुडवण्याचा ठराव केला आणि अंमलात आणला.हे संभवनीय आहे.पटण्यासारखे आहे म्हणून ते खरे मानतो."
.
"देवाने गाथा तारली.इंद्रायणीतून उद्धरून दिली ती भिजली नाही.हा चमत्कार खरा मानायचा का?"
.
"गाथा आज उपलब्ध आहे.देवाने ती आणून दिली असे वरील अभंगात तुकारामांनी सूचित केले आहे.त्यांचा अनुभव खरा मानायला हवा.मात्र चमत्कार झाला हे खरे नव्हे.चमत्कार घडूच शकत नाहीत"
.
"मग गाथा परत मिळण्याचे स्पष्टीकरण कसे देता येईल?"
.
"*गाथा नदीत बुडवली.
*गाथा परत मिळाली.
*चमत्कार घडू शकत नाहीत.
ही तीन विधाने सत्य मानून त्याकाळी काय घडले असेल? कसे घडले असेल? यावर विचार
करायला हवा.वास्तववादी कल्पना लढवायला हवी.त्याकरिता गाथेतील या संदर्भातील सर्व अभंग वाचायला हवेत."
.
"चमत्कार घडूच शकत नाहीत असे का मानायचे? देवाचे अस्तित्व मानले तर चमत्कार घडू शकतात."
.

"असे म्हणता? ठीक आहे.सर्वसमर्थ,सर्वज्ञ असा देव अस्तित्वात आहे.तो कोणताही चमत्कार करू शकतो असे आपण घटकाभर गृहीत धरू आणि विचार करू.
गाथा नष्ट होता नये.टिकली पाहिजे हे देवाला मान्य आहे.कारण अंतत: त्याने ती परत आणून दिली.देव सर्वज्ञ असल्याने देहूतील धर्ममार्तंडांचा गाथा बुडवण्याचा विचार आहे हेही त्याला ठाऊक आहे.अशावेळी त्यांचे विचारपरिवर्तन घडवून एक अविचारी कृत्य करण्यापासून देव त्यांना परावृत्त करू शकला असता.
...पण देवाने तसे केले नाही.
ते ब्राह्मण इंद्रायणी काठच्या देवळात आले.तुकारामांकडे गाथा मागितली.बासनात बांधलेली गाथा तुकारामांनी दिली.भटांनी त्या पोथीवर एक वीट बांधली.
आता ती पोथी इतकी जड झाली की ब्राह्मणांना उचलताच येईना.असा चमत्कार देव सहज करू शकला असता.मग तुकाराम महाराजांच्या पायांवर लोटांगण घालून ब्राह्मण परत गेले असते.
...पण देवाने हा चमत्कार दाखवला नाही.
वीट बांधलेली पोथी घेऊन ब्राह्मण ती नदीत बुडवायला निघाले.तुकारामांचे काही अनुयायी,समर्थ,भक्त तिथे होते.तेही भटांबरोबर निघाले. तुकाराम महाराज देवाकडे धरणे धरून देवळातच बसले.
आता ब्राह्मणांचे टोळके नदीकाठी आले.त्यांनी गाथा नदीत भिरकावली.तेव्हढ्यात:
........नदीचे पाणी आटून पात्र कोरडे पडले.
किंवा, पाण्यातून दोन हात वर आले आणि त्यांनी पोथी अलगद झेलली.
किंवा, पोथी पाण्यात न पडता वर हवेत तरंगत राहिली.
किंवा, पोथी हवेतून तरंगत तरंगत परत देवळात तुकारा महाराजांकडे गेली.
..असा कोणताही चमत्कार घडवणे शक्य असताना देवाने यांतील काहीच केले नाही.
गाथा नदीत बुडली.धर्ममार्तंडांचे काम झाले. ते आपापल्या घरी गेले."
.
"तुम्ही म्हणता तसे देवाने काही केले असते तर खरा चमत्कार घडला असे म्हणता आले असते.लोकांनाही ते आवडले असते."
.
"खरा चमत्कार असे काही नसतेच. चमत्कार केवळ काल्पनिकच असतात. पुराणांतील कथांत त्यांची रेलचेल असते."
.
"मग इथे खरे काय घडले असेल?"
.
"त्यासंबंधी काही अभंग गाथेत आहेत.गाथा परत मिळावी म्हणून तुकाराम धरणे धरून देवळात बसले.त्यांनी तेरा दिवस निश्चक्र उपोषण केले.
अभंग असे:
..........तेरा दिवस झाले निश्चक्र करिता
..........न पवसी अनंता मायबापा
..........पाषाणाची खोळ घेऊनी बैसलासी
..........काय हृषीकेशी तुज झाले.
.
.........तुजवरी आता प्राण मी त्यजीन
..........हत्या मी घालीन पांडुरंगा
..........तुका म्हणे आता मांडिले निर्वाण
..........प्राण मी सांडीन तुजवरी.
.
तेराव्या दिवशी गाथा परत मिळाली.त्या संदर्भातील अभंग:--
..........तू कृपाळू माऊली।आम्हां दीनांची साऊली
..........न संवरीत आली।बाळवेषे जवळी
..........माझे केले समाधान। रूप गोजिरे सगुण।
..........निवविले मन। आलिंगन देऊनी
..........तुका म्हणे मी अन्यायी। क्षमा करी ओ माझे आई
..........आता पुढे काई । तुज न घालू साकडे
..........थोर अन्याय मी केला। तुझा अंत म्या पाहिला
..........जनाचिया बोला--|साठी चित्त क्षोभविले
..........भागविलासी केला शीण । अधम मी यातीहीन
..........झाकुनी लोचन। दिवस तेरा राहिलो
..........उदकी राखिले कागद । चुकविला जनवाद
..........तुका म्हणे ब्रीद । साच केले आपुले
..........कापो कोणी मान । सुखे पिडोत दुर्जन
..........तुज होय शीण । ते मी न करी सर्वथा
..........चुकी झाली एके वेळा । मज पासोनी चांडाळा
..........उभे करोनिया जळा-- |माजीं वह्या राखिल्या
..........नव्हती आले सिसां सुरी । अथवा घाव पाठीवरी
..........तो म्यां केला हरी । एवढा तुम्हा आकांत
..........वाटिलासी दोही ठाय़ीं । मजपाशी आणि डोही
..........लागो दिला नाही । येथे तेथे आघात
..........तुका म्हणे कृपावंता । तुज ऐसा नाही दाता
..........काय वर्णू आता । वाणी माझी खुंटली
.
"या अभंगांतून काय निष्पन्न होते?"
.
"पुन्हा आपली ती विधाने पाहू
....१.गाथा इंद्रायणीत बुडाली.
....२.गाथा परत मिळाली
....३.चमत्कार घडू शकत नाहीत.
यांतील पहिल्या दोन विधानांना वरील अभंगांत आधार आहे.तिसरे विधान वैज्ञानिक
सत्य आहे.इथे चमत्कार या शब्दाचा अर्थ निसर्ग नियमाविरुद्ध, निसर्ग नियम धुडकावून
होणारी आणि म्हणून आश्चर्यकारक वाटणारी घटना, असा घ्यायचा.
चमत्कार न घडता गाथा परत कशी मिळाली हे वास्तवाशी प्रामाणिक राहून कल्पनाशक्तीने
शोधायचे आहे.गाथेतील संबंधित अभंग हीच आपल्याला उपलब्ध असलेली सामग्री आहे.
अभंगांवरून दिसते की देव बाळवेषात,बाळरूपात आला.मला वाटते सहा/सात वर्षांचा मुलगा किंवा बहुधा मुलगीच बालकृष्णाच्या रूपात आली असावी.लहान मुलीला बालकृष्णाचे रूप देणे तुलनेने सोपे."
.
"म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? एका सहा वर्षांच्या मुलीला कोणीतरी कृष्णाचा मेकप करून तिच्या हस्ते तुकारामांना गाथा दिली ? त्यांनी ओळखले नाही? आणि गाथा कुठली आणली?"
.
"अगदी असेच घडले नसेल.पण आपणे जी चौकट आखून घेतली आहे तिचा विचार करता याहून
अगदीच वेगळा असा अन्य पर्याय सुचत नाही.तुकाराम महाराज कसे ओळखणार? देव आपल्या भक्ताला सगुण रूपात भेटतो यावर त्यांची श्रद्धा होती.शिवाय तेरा दिवसांच्या उपोषणानंतर ते जवळ जवळ ग्लानीत असणार."न संवरीत आली.." ती मुलगी असे वाटते.नेसूचे वस्त्र पिवळे,वर उघडी(असंवृत),गळ्यात फुलांच्या माळा,मूर्तीतील कृष्णासारखे केस.असे काहीसे रूप असावे.तसेच हा बालरूपातील देव तुकारामांपुढे एकदम प्रकट झाला नाही.जमलेल्या लोकांतून चालत आला असावा."
.
"पण हे सगळे कुणी घडवून आणले असेल?"
.
आपण परत घटनेचा मागोवा घेऊया.निषेध ठरावानुसार धर्ममार्तंडांनी गाथा नदीत फेकली.त्यांचे
काम झाले.ते परत गेले.
तुकाराम महाराजांचे अनुयायी,समर्थक तिथे होतेच.एकाने लगेच डोहात बुडी मारून गाथा वर काढली.अज्ञात स्थळी नेऊन भिजलेले कागद वाळत घातले.अनेक अभंग पाणी लागल्याने पुसट झाले.ते पाहून,अभंग आठवून,परत लिहिले.या सगळ्या प्रकाराला दहा बारा दिवस लागले.
तुकाराम महाराजांचे काही निष्ठावंत,व्यवहारज्ञानी भक्त होते.त्यांनी हे सगळे घडवून आणले असावे.
आपली तीन विधाने आणि गाथेतील या विषयासंबंधीचे अभंग ही चौकट न मोडता वास्तवाशी जुळणारी अशी ही एक कल्पना मांडता येते.खरे काय घडले ते नेमके सांगता येणे अशक्य आहे.पण आपली चौकट जर मोडायची नसेल तर जे इथे मांडले आहे त्याच्याशी थोडे फार मिळते जुळते असेच काहीसे घडले असावे असे वाटते.तुम्हाला काही वेगळे सुचत असेल तर ते सांगा."
.
"मला नाही काही सुचत.तुम्ही म्हणता तसे घडले असणे शक्य आहे."
*****************************************************

.
"

Comments

वाचनीय दुवा

वाचनीय दुवा. धन्यवाद.

("इंडिया इंक" हा प्रकार चिनी आहे असे पूर्वी ऐकले होते. पण कदाचित मुळात भारतीयही असेल. ही काजळीची शाई होय. काजळीची शाई एकदा का वाळली, त्यानंतर कागद ओला केला तरी ओघळत नाही की निघत नाही.)

असेच म्हणतो

वाचनीय दुवा.
सावरकरांचे विचार 'कम्युनिस्ट' होते काय? पान क्र. ११४ विज्ञाननिष्ठ निबंध

कैच्याकै

पटले नाही.

दंतकथा नव्हे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
या चर्चाप्रस्तावाच्या संदर्भात श्री.विकास लिहितात."माझ्या दृष्टीने ही दंतकथा आहे.
..
ही दंतकथा नव्हे. थोर व्यक्तींच्या चरित्राशी दंतकथा जोडल्या जातात हे ख्ररे.पण त्या आख्यायिका,ते चमत्कार बहुधा त्या थोर व्यक्तीच्या पश्चात प्रसृत होतात.
ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली.म्हैसामुखी वेद वदवले. या दंतकथा आहेत.आपण हे चमत्कार केल्याचे स्वतः ज्ञानेश्वरांनी कुठेही,कुठल्याही रचनेत म्हटलेले नाही.
धर्ममंडळाने आपला निषेध करून गाथा नदीत बुडवली. देवाने ती परत आणून दिली.या घटनांच्यासंदर्भात स्वतः तुकारामांनी लिहिलेले अभंग गाथेत आहेत.म्हणजे कुणाच्याही दृष्टीने ही दंतकथा असू शकत नाही.

कागदाबाबत थोडेसे...

कागद ही चीनची जगाला देणगी आहे. भारतात पूर्वी लिखाणासाठी भूर्जपत्र आणि कापडाचा वापर केला जाई. चीनचा कागद सिल्क रुटवरील व्यापार्‍यांनी भारतात आणला व तो अरब देशांत पोचवला. तोपर्यंत अरब देशांत हुकूमनामे लिहिण्यासाठी बकर्‍याचे मुलायम कमावलेले कातडे वापरले जाई.

दिल्लीला कागदाचा परिचय १३ व्या शतकात झाला. नंतर या कागदाचे महत्त्व व उपयुक्तता पटल्यावर भारतातही ठिकठिकाणी कागद निर्मिती केंद्रे सुरु झाली. हा कौशल्याचा व्यवसाय होता आणि प्रामुख्याने शहरांतच चालत होता. १७व्या शतकापर्यंत भारतात सियालकोट, आग्रा, दिल्ली, शहाजादपूर, काल्पी व लाहोर ही शहरे कागदासाठी प्रसिद्ध होती. कागदाचा टिकाऊपणा, गुळगुळीतपणा व उत्कृष्ट दर्जा याबाबत मात्र दौलताबाद, अहमदाबाद आणि महाराष्ट्रातील जुन्नर या बाजारपेठांनी आपली ख्याती अखेरपर्यंत टिकवली. येथील कागद परदेशातही निर्यात होत होता.

कागद हा प्रामुख्याने कापसाचा लगदा आणि झाडाच्या सालीचा लगदा यापासून बनवला जाई. कागद बनवण्यासाठी रद्दी कागदाचाच कच्चा माल म्हणून वापर करण्याचे तंत्र अठराव्या शतकात रुढ झाले. त्या काळी हरीरी, शामी, मानसिंघी, जर्द, वस्ली, अरवली, बिलोरी असे कागदाचे विविध प्रकार रुढ होते. महाराष्ट्रातील कागद दौलताबादी व जुनरी म्हणून प्रसिद्ध होता. कागद बनवणे हे वेळखाऊ व लक्षपूर्वक करायचे काम होते आणि या निर्मितीत शुद्ध पाणी महत्त्वाची भूमिका बजावत असे. उत्तम दर्जाचा कागद बनवण्यासाठी पाण्यात लोह असून चालत नाही. अरवली नावाने प्रसिद्ध असलेला कागद, तसेच रद्दी कागदापासून बनवलेला कागद (वस्ली) लखनौ येथे बनत असे.

टाकी नेऊन उदकात

"तुकयाचे कवित्व ऐकून कानी । अर्थ शोधूनि पाहाता मनी ।
म्हणे प्रत्यक्ष हे वेदवाणी । त्याचे मुखे कानी न ऐकावी ॥
तरी यासी निषेधावे । सर्वथा भय न धरावे ॥"

प्रत्यक्ष वेदवाणी एका शूद्राच्या मुखातून कीर्तनाच्या रूपाने बाहेर पडते आहे हे ऐकल्यावर
रामेश्वरभटाने त्याचा निषेध केला. त्याकालात धर्माचे नियम फारच कठोर होते हे सर्वमान्य सत्य आहे.

त्यावर तुकाराम म्हणतात -
"करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥
माझियें युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥धृ॥"

यावर -

विप्र म्हणे,"आज्ञा कारण श्रीची, कैसे जाणेल जन?
यालागी कवित्व बुडवून टाकी नेऊन उदकात!
तेथे साक्षात नारायण आपे रक्षील जरी आपण
तरी सहजचि वेदाहून मान्य होईल सर्वाशीं." ॥१६॥
हा अभंग विसरून चालत नाही. ब्राह्मण म्हणाला, " (या काव्याला) श्रींची आज्ञा कारण आहे हे जन कसे जाणतील? त्यासाठी तू तुझे कवित्व पाण्यात बुडवून टाक.तेथे साक्षात नारायणाने स्वतः त्यांचे पाण्यापासून रक्षण (आपे रक्षील) केले तर ते (काव्य) सहजच सर्वांना वेदांहूनही मान्य होईल." येथे "टाकी नेऊन उदकात" हे वाक्य स्पष्टपणे आज्ञार्थी आहे. म्हणजे विप्राने तुकारामांना तशी आज्ञा केलेली आहे. (-"विप्र म्हणे" )
त्यानंतर "बुडविल्या वह्या| बैसलो धरणे|" या वाक्याचा योग्य अर्थ लागतो.
अर्थात् 'तुकारामांचे अधिकृत चरित्र कोणते?' हा प्रश्न 'शिवाजी महाराजांचे अधिकृत चरित्र कोणते?' या प्रश्नाइतकाच अनिर्णित आहे. म्हणूनच त्यांच्या वंशातील लेखकाने लिहिलेले चरित्र त्यातल्या त्यात अधिकृत आहे असे म्हणावे लागते.
अभ्यास करून जास्तीत जास्त पुराव्यांच्या आधारे इतर कोणीही हे चरित्र लिहील्यास त्याला अधिकृत मानण्यास माझा प्रत्यवाय नाही. तोवर स्वतः तुकारामांनी लिहीलेल्या ओळी, त्यांच्या संदर्भासह घेतल्यास -
रामेश्वरभट्टाने तुकारामांना आज्ञा केली की जर तू म्हणतोस की मला होणारी (वेदवाक्यांची) काव्यस्फूर्ती ही प्रत्यक्ष ईश्वराची आज्ञा आहे तर तू ते कवित्त्व पाण्यात बुडवून दाखव. या जलदिव्यातून ते काव्य तरले तर ते वेदवाक्याहूनही प्रमाण आहे असे सहजपणे सर्वांना मान्य होईल.
त्याप्रमाणे तुकारामांनी स्वतःहून त्या अभंगांच्या वह्या इंद्रायणीत बुडवल्या आणि ईश्वराला साकडे घातले, ईश्वराकडे धरणे धरले की जर तू असशील तर या वह्या तारून दाखव. त्यांनी निश्चक्र उपोषण केले त्याचे कारण लोकांनी त्यांच्या वह्या बुडवल्या हे नसून ईश्वराने त्या वह्या परत केल्या नाहीत हे होते. म्हणूनच -
तेरा दिवस जाले निश्चक्र करिता । न पवसी अनंता मायबापा ॥१॥
पाषाणाची खोळ घेऊनि बैसलासी । काय हृषिकेशी जाले तूज ॥धृ॥
तुजवरी आता प्राण मी तजीन । हत्त्या मी घालीन पांडुरंगा ॥२॥
फार विठाबाई धरिली तुझी आस । करीन जीवा नास पांडुरंगा ॥३॥
तुका म्हणे आता मांडिले निर्वाण । प्राण हा साडिन तुजवरी ॥४॥

या नंतर ईश्वराने वह्या परत दिल्या त्यावर ते म्हणतात -
अवघें घालुनिया कोडे तानभुकेचे साकडे । योग क्षेम पुढे तुज करणे लागेल ॥२॥
उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद । तुका म्हणे ब्रीद साच केले आपुले ॥३॥

'तुकाराम हा भोंदू आहे' हा जनवाद चुकवल्याचे श्रेय ते ईश्वराला देतात.याचाच अर्थ असा की स्वतःची जातीपरती प्रतिभा आणि ब्रह्मज्ञान हे प्रत्यक्ष ईश्वराचेच देणे आहे हे सिद्ध करण्यासाठी ते स्वतःहून या जलदिव्याला सामोरे गेले.

या विषयावर इतकेच.
याउप्पर योग्य अर्थ सूज्ञांना लागेलच. चू.भू.द्या.घ्या.

ग्रेट!

विसुनाना, खूप आवडला प्रतिसाद !

मजकूर संपादित.

विश्वंभर

"करितो कवित्व म्हणाल हे कोणी । नव्हे माझी वाणी पदरीची ॥१॥
माझियें युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥धृ॥"

हे जर खरे असेल, तर असा कोण हा विश्वंभर (अज्ञात शक्ती) कशाप्रकारने तुकारामांकडून अभंग लिहवू शकला.... याचे संशोधन झाले पाहिजे.

महीपतीच्या ओव्या

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.विसुनानांनी लिहिले आहे:
"विप्र म्हणे,"आज्ञा कारण श्रीची, कैसे जाणेल जन?
यालागी कवित्व बुडवून टाकी नेऊन उदकात!
तेथे साक्षात नारायण आपे रक्षील जरी आपण
तरी सहजचि वेदाहून मान्य होईल सर्वाशीं." ॥१६॥
हा अभंग विसरून चालत नाही. ब्राह्मण म्हणाला, " (या काव्याला) श्रींची आज्ञा कारण आहे हे जन कसे जाणतील? त्यासाठी तू तुझे कवित्व पाण्यात बुडवून टाक.
...
श्री.विसुनानांनी दिलेल्या ओव्या या महिपतीबाबाने लिहिलेल्या तुकाराम चरित्रातील आहेत.
हा तुकाराम महाराजांचा अभंग नव्हे.

..त्यांनी ज्या चरित्राचा संदर्भ दिला आहे त्यांत आलेले गाथेतील सर्व अभंग परिशिष्ट १ मध्ये संपूर्ण दिले आहेत.त्या ७२ अभंगांत वरील ओव्यांचा समावेश नाही. कसा असणार? त्या तुकारामांनी लिहिलेल्याच नाहीत.गाथा बुडवण्याच्या संदर्भात रामेश्वरभट्टाच्या सहभागाविषयी जे या चरित्रात लिहिले आहे ती केवळ महीपतीची कल्पना आहे.गाथेत त्याला कुठलाही आधार नाही.

चूक मान्य आहे.

महिपतीच्या तुकारामचरित्रात आलेल्या ओव्या कै. श्री. मोरे यांनी वापरल्याने गैरसमज झाला. चूक मान्य आहे.

अर्थात् महिपतींनी लिहिलेले चरित्र तुकारामांच्या कालानंतर शेदिडशे वर्षांनी लिहील्याने रामेश्वरभट्ट या विप्राचा उल्लेख केवळ कपोलकल्पित आहे असे म्हणावे लागेल.असे असेल तर मग त्याचे उपनाम, गावाचा (वाघोली) उल्लेख इतकेच कशाला त्याने केलेल्या तुकारामांच्या निंदा नालस्तीलाही नाकारावे लागेल.
मंबाजी, आवली या पात्रांनाही नाकारावे लागेल. शिवाजी महाराज तुकारामांच्या भेटीला आले होते हेही केवळ महिपतीच्या कल्पनेत घडले असे म्हणावे लागेल.
सरतेशेवटी तुकारामांनी स्वतः ब्राह्मणांच्या त्रासाचा उल्लेख न करता फक्त पाटील आणि इतर यांचा उल्लेख केल्याने त्यांना ब्राह्मणांचा उपद्रव झालेला नव्हता असे म्हणावे लागेल.

कपोलकल्पित

तुकारामांनंतर दीडशे वर्षांनी त्यांचे (किंवा असे कुणाचेही) चरित्र लिहिले गेले एव्ह्ढ्यावरून ते कपोलकल्पित ठरण्याचे कारण नाही.कदाचित तेव्हा उपलब्ध असलेले काही पुरावे, तीन-चार पिढ्यांची मौखिक परंपरा इ. विचारात घेतली गेली असेल. शिवाय चरित्रातला/ग्रंथातला एखाददुसरा मुद्दा शंकास्पद/विवादास्पद/चुकीचा आहे म्हणून संपूर्ण ग्रंथ तसा ठरत नाही.

 
^ वर