ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध
१ मे २०११ रोजी (आपल्या २ मे रोजी) अखेरीस ओसामा बिन लादेनला ठार करण्यात अमेरिकेला यश मिळाले. पण या घटनेमुळे पाकिस्तानच्या अमेरिकेबरोबरच्या दगाबाज वागणुकीवरील, अविश्वासार्हतेवरील (खोट्या-खोट्या) रहस्यावरचा ’बुरखा’ शेवटी उचलला गेला ही एक चांगली घटना घडली!
मागे एका लेखात लिहिल्याप्रमाणे अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध कधीच परस्पर-विश्वासाच्या किंवा परस्परांबद्दलच्या आदरभावनेच्या पायावर कधीच आधारलेले नव्हते. तर तो फक्त 'सोयीसाठी लावलेला म्होतूर'च होता! पाकिस्तानी दुतोंडीपणा केवळ अमेरिका किंवा भारताबरोबरच्या संबंधाबाबतच होता असे नाहीं तर तो त्यांच्या स्वतःच्या प्रजेबरोबरच्या बाबतीतही होता. याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे पाकच्या पंतप्रधान युसुफ राजा गिलानींचे ’ड्रोन’ विमानांच्या वझीरिस्तानमधील हल्ल्यांबाबतचे अलीकडील विधान. पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत सभासदांनी उठवलेल्या गदारोळाला उत्तर देताना त्यांनी 'आम्ही अमेरिकेला हे हल्ले बंद करायला ठणकावून सांगितले आहे' असे विधान केले पण दुसर्या बाजूला अमेरिकेच्या राजकीय नेत्यांना व मुत्सद्द्यांना सांगितले कीं ती फक्त 'बोलाचीच कढी' असून प्रत्यक्षात ते अशी बंदी घालणार नाहींत व द्रोणाचार्यांचे (’ड्रोन’ला मी तर ’द्रोणाचार्य’च म्हणतो) हल्ले त्यांनी चालूच ठेवावे.
पाकिस्तानचा हा दुटप्पीपणा कित्येक वर्षांपासून सुरू आहे. "न्यूक्लियर डिसेप्शन" या पुस्तकात लेखकद्वय लेव्ही आणि स्कॉट-क्लार्क यांनी याची अनेक उदाहरणे दिलेली आहेत. (हे पुस्तक प्रत्येक अमेरिकन, पाकिस्तानी आणि भारतीय नागरिकाने जरूर वाचावे.) अगदी अयूब खान हे राष्ट्राध्यक्ष आणि जुल्फिकार अली भुत्तो परराष्ट्रमंत्री असताना (ते पुढे पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षही झाले) पाकिस्तानने अमेरिकेची दोस्ती चालू असतानाच चीनशीही चुंबा-चुंबी चालू केली होती. पाकिस्तानने त्यावेळी सीटो (SEATO) आणि सेंटो (CENTO) या लष्करी संघटनांचे सभासदत्व स्वीकारलेले होते. असे असूनही अमेरिकेची पाकिस्तानशी असलेली मैत्री ’जिवश्च-कंठश्च’ कधीच नव्हती. त्याचे कारणही पाकच्या दुटप्पीपणाबद्दल अमेरिकेला असलेला संशय हेच होते. भारताने सुरुवातीपासूनच कुणाच्याही लष्करी संघटनेचे सभासदत्व न घ्यायचे ठरविलेले होते-ना अमेरिकेचे व ना सोवियेत संघराज्याचे. त्यामुळे भारताबरोबरच्या संबंधाबाबत अमेरिका नेहमीच बुचकळ्यात पडलेली असायची.कारण भारत धड त्यांच्या कळपातही जात नव्हता आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याइतका नगण्यही नव्हता! याचा परिणाम अमेरिकेच्या पाकिस्तानच्या मैत्रीवर होणे स्वाभाविकच होते व तसेच झाले. भारताविरुद्धच्या युद्धात वापरण्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रे व दारूगोळा मिळविण्यासाठी पाकिस्तानला अमेरिकेशी मैत्री हवी होती. पण अमेरिका पाकिस्तानला लष्करी आणि आर्थिक मदत देत होती ती साम्यवादींशी (communism शी) लढण्यासाठी. त्यामुळे ही शस्त्रास्त्रे भारताविरुद्ध वापरायला अमेरिकेची बंदी असायची. अशा तर्हेने या मैत्रीत सुरुवातीपासूनच दोघांची तोंडे दोन दिशांना होती! आणि काळाबरोबर या दोन देशांमधील तणाव वाढतच गेला होता.
१९७१ सालचा बांगलादेशच्या निर्मितीच्या युद्धातील शर्मनाक पराभव पाकिस्तानला जिव्हारी लागला होता. आणि या युद्धात झालेल्या पराभवाबद्दल पाकिस्तानने अमेरिकेला योग्य वेळी मदत न केल्यावरून जबाबदार धरले. (तसे पहाता या युद्धात चीननेही पाकिस्तानला मदत केली नव्हती.) इंदिराजींच्या नेतृत्वाखाली भारताने हे युद्ध इतक्या झटपट आणि निर्णायपणे संपविले कीं कुणालाही विचार किंवा कृती करायला वेळच मिळाला नाहीं. पण या पराभवामुळे अमेरिका व पाकिस्तान यांच्यातल्या मैत्रीत एक पाचर ठोकली गेली व ती पाचर आजही या दोन देशांतील संबंधांना एका ठरावीक पातळीपेक्षा जास्त जवळ येऊ देत नाहीं!
भारताने १९७४ साली "पोखरण-१"ची अण्वस्त्रचांचणी केली त्यामुळे पाकिस्तानला-व विशेषत: भुत्तोंना-धक्काच बसला! त्यांनी लगेच अमेरिकेकडे धाव घेतली आणि भारतीय अण्वस्त्रांपासून संरक्षण मिळावे अशी गळ घातली. पण आपल्या शत्रुत्वाला भिऊन म्हणा किंवा आपल्याशी त्यावेळी शत्रुत्व पत्करायची अमेरिकेची तयारी नव्हती म्हणून् म्हणा, पण अमेरिकेने पाकिस्तानची ही विनंती मान्य केली नाहीं. हेन्री किसिंजर यांनी "भारताने अण्वस्त्र चांचणी केली ही वस्तुस्थिती पाकिस्तानने "fait accompli" म्हणून स्वीकारावी असा मानभावी सल्ला दिला. त्यावर भुत्तोंनी सांगितले कीं भारताने अणूबॉम्ब बनविला तर आम्ही (पाकिस्तानी जनता) पाने-गवत खाऊ, भुकेले राहू पण आम्हीही आमचा अणूबाँब बनवूच. आमच्यापुढे दुसरा कुठलाही पर्यायच नाहीं. भारताच्या अण्वस्त्राला आमचेही अण्वस्त्रानेच उत्तर असेल" ("If India builds the bomb, we will eat grass or leaves, even go hungry, but we will get one of our own. We have no alternative ... atom bomb for atom bomb.") यापुढे अमेरिकेवर विसंबणे बरोबर नाहीं म्हणून भुत्तोंनी चीनशी दृढ संबंध प्रस्थापित केले आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीत चीनचा सहभाग मोठाच होता! डॉ. खान यांनी विघटनशील अतिशुद्धीकृत युरेनियम युरोप व अमेरिकेच्या सहाय्याने बनविण्यात यश मिळविले असले तरी अणूबॉम्बची संरचना (design) त्यांना चीनकडूनच मिळाली होती! भुत्तोंनी आपल्या मृत्युपूर्व शेवटच्या निवेदनात म्हटले आहे कीं चीनशी संबंध जोडण्याचे त्यांनी केलेले कार्य त्यांच्या कारकीर्दीतील मोठे कार्य होते!
भुत्तोना फाशी दिल्यावर झियांना सर्व पाश्चात्य राष्ट्रांनी वाळीतच टाकले होते, पण सर्वच पाकिस्तानी हुकुमशहा सुदैवी आहेत. ते अतीशय अडचणीत असतांना अशी एकादी घटना घडते कीं या हुकुमशहांना वाळीत टाकणे तर सोडाच पण उलट पाकिस्तानला मस्का लावायची पाळी पाश्चात्यांवर येत आलेली आहे. सोवियेत महासंघाने अफ़गाणिस्तानवर आक्रमण केल्यावर झियांचे ’सुगी’चे दिवस आले. रेगननी पैसा आणि शस्त्रास्त्रे पाकिस्तानात ओतली आणि रातोरात वाळीत टाकलेले हुकुमशहा झिया हे रेगन यांच्या मांडीला मांडी लावून व्हाईट हाऊसमध्ये पुख्खा झोडून आले. पण दुटप्पीपणा चालू ठेवून झियांनी चीनबरोबरचे पाकिस्तानचे संबंध मात्र वाढवून आणखी दृढ केले. चीनच्या ’संयुक्त राष्ट्र संघटने’तल्या प्रवेशाच्या वेळी पाकिस्तानने तैवान ऐवजी चीनला अमेरिकेच्या मनाविरुद्ध समर्थन देणारी मध्यपूर्वेतील राष्ट्रांची फळी उभारून अमेरिकेविरुद्ध चीनला उघडपणे मोठीच मदत केली होती व ते उपकार चीनने आजपर्यंत लक्षात ठेवले आहेत. याचेच पारितोषिक म्हणून पाकिस्तानच्या अणूबॉम्ब निर्मितीत चीनने खूपच मदत केली.
धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत पुन्हा एकदा वाळीत टाकल्या गेलेल्या मुशर्रफना अल कायदाने केलेल्या ९/११ हल्ल्यानंतर जीवदान मिळाले आणि ते "दहशतवादाविरुद्धच्या युद्धा"चा खंदा पुरस्कर्ता व त्या युद्धातला अमेरिकेचे सच्चा साथीदार आणि बिनीचा शिलेदार म्हणून समजले जाऊ लागले. पण इथेही दुटप्पीपणा चालूच होता. मुशर्रफच्या "कुदेता"नंतरच्या खूपशा अत्युच्च नेमणुकीत अल कायदा व कडव्या इस्लामी लोकांचा सुळसुळाट होता. मुशर्रफ यांच्या काळात अण्वस्त्र तंत्रज्ञानाच्या विक्रीला जणू एकाद्या "मॉल"चे, 'वॉल-मार्ट'चे स्वरूप आले व विक्रीचे काम जोरात सुरू झाले व ते तंत्रज्ञानही इराण, उ. कोरिया, लिबिया व इराक या अमेरिकेच्या कट्टर शत्रूंना देण्यात आले. पण अखेरीस ते अमेरिकेच्या लक्षात आले व त्यांनी जाब विचारताच मुशर्रफने डॉ. खानना 'बळीचा बकरा' बनविले व आपल्या पापांचा कबूली जबाब द्यायला लावले व देशाची माफी मागायला लावली.
ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर बर्याच प्रमाणात या संबंधांत अंतराय येऊ लागला. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या काळातच "जगातील सर्वात धोकादायक जागा" असा पाकिस्तानचा उल्लेख ओबामांनी खूप वेळा केला व पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मुशर्रफ यांनी मारले नाहीं तर "अमेरिका आपली फौज पाठवून त्यांना मारेल" असेही वचन दिले होते. (अलीकडेच ओसामांना मारून त्यांनी ते खरेही करून दाखविले.) निवडून आल्यानंतरच्या पहिल्याच १०० दिवसांनंतरच्या वृत्तपत्रपरिषदेतही त्यांना एका वार्ताहाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते कीं पाकिस्तानच्या हातातील अण्वस्त्रे सध्या तरी सुरक्षित असून नजीकच्या भविष्यकाळात पाकिस्तानचे सरकार कोसळून तालीबानचे किंवा अल कायदाचे सरकार राज्यावर बसेल अशी शक्यता अजीबात नाहीं. पण तिथले मुलकी सरकार फारच ठिसूळ (very fragile) असून त्या सरकारकडे शाळा, आरोग्य, कायद्याचे राज्य न्यायसंस्था यासारख्या मूलभूत गरजाही भागविण्याची क्षमता नाहीं म्हणून! (पूर्ण मुलाखत http://blogs.wsj.com/washwire/2009/04/30/transcript-of-obamas-100th-day-... किंवा http://www.huffingtonpost.com/2009/04/29/obama-100-days-press-conf_n_193... या दुव्यांवर वाचता येईल)
ओबामांना सुरुवातीला पाकिस्तानची मदत नाइलाजास्तव चालू ठेवावी लागली असली तरी एक तर्हेचे audit करण्याची पद्धत त्यांनी सुरू केली होती. (हे audit 'सार्वभौमित्वा'सारख्या 'उदात्त' कारणांसाठी पाकिस्तानला नको होते!) त्याच वेळी ही मदत देत असताना पाकिस्तानला "दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत जोर हावा" असा तगादाही ओबामांनी लावला होता. त्यानुसार पाकिस्तानला 'स्वात' खोर्यात लष्कर पाठवून मोहीम आखावी लागली त्यात अनेक दहशतवादी (व प्रजाजनही) मारले गेले. पण हा जाच पाकिस्तानला पसंत नव्हता.
पाकिस्तानात पूर आल्यावरही अमेरिकेची मदत भरघोस नव्हती, याबद्दल पाकिस्तानने तक्रार केल्यावर "तुमचे श्रीमंत नागरिक कर देत नाहींत ते आधी वसूल करा" असा दबावही आणला.
ड्रोन हल्ल्यात मरण पावलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाने त्याबद्दल पाकिस्तानातल्या CIA च्या Station Chief चे (जोनाथन बँक्स) नाव गेल्या डिसेंबरमध्ये फोडून एक नवा पेच निर्माण केला व त्यामुळे बँक्सना परत जावे लागले. त्यांच्या जागी आलेल्या नव्या Station Chief चे नावही फोडण्यात आल्याचे वृत्त आहे.
पकिस्तानबरोबरचे अमेरिकेचे संबंध बिघडत चालले आहेत. व या देशांच्या गुप्तहेर व लष्करी संघटना कशा दूर जात आहेत व एकमेकांचे कसे वाभाडे काढत आहेत याचे वर्णन करणारा एक सुरेख लेख पाकिस्तानच्या डॉन मध्ये छापून आलेला आहे तो http://tinyurl.com/4ydkwfl या दुव्यावर वाचायला मिळेल. रेमंड डेव्हिस प्रकरणापासून तर हे संबंध आणखीच बिघडले व लगेच ज. कयानींनी अमेरिकेला आपले "सल्लागार" (हेर) २५-४०% टक्के कमी करायला सांगितले आहे.
आता बिन लादेन पाकिस्तानात अगदी राजधानीपासून ५०-६० किमी अंतरावरील एका गढीवजा घरातच सापडला. जगातल्या दहा सर्वोत्कृष्ठ गुप्तहेरखात्यातल्या १ नंबरच्या गुप्तहेरखात्याला आपल्या नाकाखाली काय चालले आहे हे माहीत नव्हते यावर कुणाचाच विश्वास नाहीं. त्यामुळे बिन लादेन हे लष्कर व ISI च्या 'संरक्षणा'खाली त्यांच्याच एका सुरक्षित घरात रहात होता असे आरोप पाकिस्तानातल्या वृत्तपत्रांतही होत आहेत! या अविश्वासामुळे ओसामांना ठार करण्याच्या मोहिमेची कांहींच माहिती पाकिस्तान सरकारला अमेरिकेकडून दिली गेली नव्हती. नौदलाच्या "सील"च्या या तुकडीने हेलीकॉप्टर्समधून येऊन ओसामांना ठार केले. ही हेलीकॉप्टर्स पाकिस्तानच्या राडारलाही न दिसता आत आली, चाळीस मिनिटे कार्यरत होती व बिन लादेन यांना व बरोबरच्या इतर कांहीं पुरुषांना ठार करून, स्त्रियांना व मुलांना तसेच सोडून तिथले सर्व दस्तावेज, संगणक, संगणकाच्या हार्ड डिस्क्स, फ्लॅश डिस्क्स वगैरे पुरावेवजा सर्व साहित्य घेऊन परत पाकिस्तानबाहेर गेल्यानंतर पाकिस्तानी सरकारला त्याबद्दल सांगण्यात आले. याच्या मिरच्याही सरकार, लषकर व ISI च्या नाकाला चांगल्याच झोंबल्या आहेत!.
पाकिस्तानातील डॉन एक्सप्रेस ट्रिब्यून सारख्या वृत्तपत्रांत खूप टीकात्मक लेख प्रसिद्ध झाले. नुसती संपादकीयच नव्हेत तर अनेक स्तंभलेखकांनीही पाकिस्ता सरकारची आणि लष्कर/ISIचीही रेवडी उडविली आहे. त्यापैकी कांहीं दुवे शेवटी दिलेले आहेत.
आता अमेरिकेचे सांसद उघड-उघड पाकिस्तानची मदत थांबविण्याबद्दल आग्रह धरू लागले आहेत. त्यावर कुरघोडी करण्यासाठी लगेच काल पाकिस्तानी संसदेपुढे भाषण करताना गिलानींनी चीनची "Pakistan's All-Weather Friend" अशी भलावण करून अमेरिकेला चीनचे बुजगावणे दाखविण्याचा प्रयत्नही केलेला आहे. त्यामुळे यापुढे काय होणार याकडे सर्व जगाचे डोळे लागले आहेत.
अन्य दुवे:
The Emperors’ Clothes हा Cyril Almeida यांनी लिहिलेला लेख सर्वोत्तम आहे!
http://tinyurl.com/6zrwq2b (The curious case of Osama bin Laden-Hoodbhoy)
http://tinyurl.com/3ghxu8g (Imran Khan in “The Independent”)
http://www.smashinglists.com/10-best-intelligence-agencies-in-the-world/ (10 best intelligence agencies in the world)
http://www.pakalertpress.com/2010/07/31/10-best-intelligence-agencies-in... (10 best intelligence agencies in the world)
http://www.dirjournal.com/info/the-worlds-best-intelligence-agencies/ (10 best intelligence agencies in the world)
http://tinyurl.com/3yvtzq6 (David Cameron in Bangalore 28th July 2010)
http://tinyurl.com/3d5gj4u (Davis Miliband in Washington DC 30th April 2011)
Abbottabad Raid-Pakistan upset about being kept in the dark (by Kamran Yousaf-Express Tribune-4th May 2011)
http://tribune.com.pk/story/161452/abbottabad-raid-pakistan-upset-about-...
Pakistan’s military and elite are holding it back: US analyst -The Express Tribune
http://tribune.com.pk/story/34519/pakistans-military-and-elite-are-holdi...
The best intelligence agency in the world ‘ISI’ (Siasi Pakistan-4 Aug 2010)
http://siyasipakistan.wordpress.com/2010/08/04/the-best-intelligence-age...
The Emperors’ Clothes A must-read article by Cyril Almeida in DAWN dt. 6th May 2011
http://www.dawn.com/2011/05/06/the-emperors-clothes.html
DAWN editorial "Osama bin Laden" 3rd May 2011
http://www.dawn.com/2011/05/03/osama-bin-laden.html
जकार्ता पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेले माझे पत्रः
http://www.thejakartapost.com/news/2011/05/09/letter-pakistan-and-us-ope...
http://www.thejakartapost.com/news/2011/05/06/letter-abbottabad-pakistan...
Comments
खूप स६शोधन करून लिहिलेला लेख पण
लेख खरोखर फारच अभ्यासपूर्ण व पूर्ण संशोधन करून लिहिलेला आहे. अभिनंदन! काळेसाहेब लेखात म्हणतात ते जरी खरे असले तरी अफगाणिस्तानची राजकीय व भौगोलिक परिस्थिती अशी आहे की या दोन राष्ट्रांना पटो वा न पटो, त्यांना एकत्र नांदल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे पहिले पाढे पंचावन्न हेच पुढे चालू रहाणार असे मला वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
+१
चंद्रशेखर ह्यांच्याशी सहमत.
भुत्तोना फाशी दिल्यावर झियांना सर्व पाश्चात्य राष्ट्रांनी वाळीतच टाकले होते, पण सर्वच पाकिस्तानी हुकुमशहा सुदैवी आहेत. ते अतीशय अडचणीत असतांना अशी एकादी घटना घडते कीं या हुकुमशहांना वाळीत टाकणे तर सोडाच पण उलट पाकिस्तानला मस्का लावायची पाळी पाश्चात्यांवर येत आलेली आहे. सोवियेत महासंघाने अफ़गाणिस्तानवर आक्रमण केल्यावर झियांचे ’सुगी’चे दिवस आले. रेगननी पैसा आणि शस्त्रास्त्रे पाकिस्तानात ओतली आणि रातोरात वाळीत टाकलेले हुकुमशहा झिया हे रेगन यांच्या मांडीला मांडी लावून व्हाईट हाऊसमध्ये पुख्खा झोडून आले. पण दुटप्पीपणा चालू ठेवून झियांनी चीनबरोबरचे पाकिस्तानचे संबंध मात्र वाढवून आणखी दृढ केले.
ह्यात काय दुटाप्पीपणा? साठ आणि सत्तरच्या दशकात भारताविरोधात कधी उघड तर कधी छुपी आघाडी होतीच की चीन-पाक-अमेरिका ह्यांची ! पाक चीनकडे जाण्यात तार्किक दोष कुठला? चीनचा सर्वेसर्वा माओ स्वतःच् थेट अमेरिकेत जाउन तिथल्या अध्यक्षांच्या मांडिला मांडी लाउन बसला. शेजारच्या रशियाला धडा शिकवायला कम्युनिस्ट चीनने थेट अमेरिकेच्या गळ्यात गळे घातले. चीन-अमेरिका संबंध सुधरले , ते तेव्हापासुनच, सावकाश गतीने. म्हणुनच आज चीन आणि अमेरिकेची एकमेकांत अगणित आर्थिक गुंतवणुक होउ शकली.(ती सुरु करायची डेंगला संधी मिळाली.) थोडक्यात, चीन व अमेरिकेशी एकाच वेळी दोस्ती ठेवणं शक्य होतं. (रशिया आणि अमेरिकेशी ठेवण अशक्य होतं, तसं नाही.)
जगातल्या दहा सर्वोत्कृष्ठ गुप्तहेरखात्यातल्या १ नंबरच्या गुप्तहेरखात्याला आपल्या नाकाखाली काय चालले आहे हे माहीत नव्हते यावर कुणाचाच विश्वास नाहीं.
आय एस आय ला प्रथम क्रमांक देणे विनोदी वाटले, तेही सीआयए, केजीबी, मोस्साद ह्यांना सोडुन.
एक लक्षात घ्या, गुप्तहेर संघटनेचं खरं यश हेच की त्यांचं थेट अस्तित्व कुणाला जाणवत नाही. आय एस आय ची न्युसन्स वॅल्यु (दक्षिण आशिया पुरती)अफाट असली, तरी त्यांचे पुष्कळ पुरावे सापडतात. युरोपात त्यांना पुरेसा शिरकाव करता आलेला नाही.(युरोपाने त्यांच्याकडे केलाय तितकाही नाही.) भारतीयांच्या "रॉ"चं तसं नाही. असो.
प्रथम क्रमांक आय् एस आय ला देणं खटकलं, इतकच म्हणतो.
लेख महत्वपूर्ण् आणि माहितीपूर्ण् आहेच. पण इतक्यातच अमेरिका-पाक(पाक सरकार, पाक जनता नव्हे ) अगदि हाडवैरी होतील असं वाटत नाही.
--मनोबा
आय एस आय ला प्रथम क्रमांक देणे विनोदी वाटले
http://www.smashinglists.com/10-best-intelligence-agencies-in-the-world/
गुगलून पाहील, पहीला हा दुवा मिळाला.
प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.
ओह्. नवीनच
दिसतय. इथुन मर्यादित जाल प्रवेश असल्याने दुवा बघता येत् नाहिये.(गुगलुन पाहिल्यावर सुरुवातीच्या काही ओळी दिसल्या.)
"विनोदी" हा शब्द परत घेतोय. पण आश्चर्य नक्कीच वाटलं.
प्रथम क्रमांक देण्यासाठी नक्की कुठले निकष लावलेत हे पाहणं रोचक ठरेल.
--मनोबा
टॉप १०
आपण दिलेल्या दुव्याच्या संकेतस्थळावर सगळेच टॉप १० आहे! त्यात हे देखील आहे: Top 10 Nostradamus Predictions that Have Come True. त्याने करमणूक झाली पण त्या संकेतस्थळाबद्दल विश्वासार्हता वाटली नाही.
संकेतस्थळाबद्दल विश्वासार्हता
त्याने करमणूक झाली पण त्या संकेतस्थळाबद्दल विश्वासार्हता वाटली नाही.
>> मलाही ती माहीती विश्वसार्ह् वाटली नाही. अर्थात गुप्तचर संस्थाच्या कारवाईबद्दल् पुर्ण माहीती कोणत्याही संकेतस्थळांना असेल असे वाटत नाही.
आवडो वा न आवडो, क्षक्षक्ष ही कार्यक्षम संघटना आहे हे नक्कीच
विकास-जी,
मी ही बातमी एका विश्वसनीय वृत्तपत्रात वर्षापूर्वीच वाचली होती. पण जर संदर्भ दिला नसता तर "कशावरून"चा ओरडा झाला असता! म्हणून मी गूगलवर शोध घेतला असता मी दिलेले दुवे सापडले व मी ते दिले.
पण ISI ने 'मोसाद'लाही मागे टाकले अशाच मथळ्याखाली ती बातमी आली होती. आता अशा पराक्रमांचे मूल्यमापन करणे सोपे नाहीं हे नक्की (आणि मान्य)!
प्रथम क्रमांकावर नसली तरी ISI ही नक्कीच 'पुरेशी' उपद्रवी संघटना आहे. व तरीही त्या संघटनेला ओसामा PMA च्या इतक्या जवळ रहात होते हे माहीत नव्हते यावर नक्कीच कुणीही विश्वास ठेवणार नाहीं. 'एक्सप्रेस ट्रिब्यून' या पाकिस्तानहून प्रकाशित होणार्या वृत्तपत्रातील http://tinyurl.com/4yynerw हा दुवा उघडल्यास मुशर्रफनेही आता ओसामांच्या अबताबाद येथील मुक्कामाची माहिती ISI मधील कांहीं 'rogue' कनिष्ठ अधिकार्यांना नक्कीच असावी असा कबूलीजबाब दिला आहे. (सगळ्यात मोठे महा-rogue 'वरिष्ठ' अधिकारी मुशर्रफच आहेत!).
आपल्याला आवडो अथवा न आवडो, ISI ही कार्यक्षम संघटना आहे हे नक्कीच.
"विषय लिहिताना रोमन अक्षरे वापरू नयेत" अशी हास्यास्पद (!) आज्ञा झाल्यामुळे ISI ऐवजी क्षक्षक्ष असे लिहिले आहे!
___________
जकार्तावाले काळे
खरे आहे!
पण जर संदर्भ दिला नसता तर "कशावरून"चा ओरडा झाला असता!
खरे आहे!
मात्र माझा प्रतिसाद हा तुमच्यावर अथवा पुणेकर यांच्यावर कॉमेंट करणारा नव्हता. गैरसमज नसावा.
आय-एस-आय ने इतर गुप्तहेरसंघटनांच्या तुलनेत नक्की काय दिवे लावले आहेत याचा जर विचार केला तर मला त्यांना एक भारताच्या विरोधी यशस्वी गुप्तहेरसंघटना इतकेच म्हणता येईल असे वाटले/वाटते. भारतीय गुप्तहेर संघटना नक्की काय करते हे माहीत नाही. :( असो.
तुमच्या मूळ लेखासंदर्भात:
ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर बिघडू लागलेले अमेरिका-पाकिस्तान संबंध
त्यांचे संबंध मी आधी देखील इतरत्र म्हणल्याप्रमाणे मैत्रीचे नाहीतच कारण ते समान् पातळीवर नाहीत. १०-१२ बिलियन डॉलर्स राईट ऑफ करणे हे अमेरिकन खिशास माहीत नाही पण वृतीस सहज शक्य आहे आणि तेच घडते, अजून काही काळ घडत राहील. पण असे का घडते याची अनेक कारणे आहेत.
इतरत्र "आउट ऑफ बॉक्स" विचार करणारे अमेरिकन्स येथे याला पर्याय नाही असाच सोपा विचार करत आहेत. त्याची अनेक कारणे आहेतः चीनला शह, द. अशियात एक स्थान, कराची बंदर, पाकाण्वस्त्रांवर आणि एकंदरीतच पाकवर नियंत्रण वगैरे...
दुसरा भाग म्हणजे पाकीस्तानने या संदर्भात केलेली अनेक वर्षांची इन्वेस्टमेंट - आधी कम्युनिझमला आणि पर्यायाने सोव्हिएट रशियास शह देण्यासाठी स्वतःचा करून दिलेला वापर, मग अतिरेक्यांच्या विरुद्ध. सोव्हीएट काळात भारताचे अमेरिकेशी असलेले वरवरच्या राजकीय संबंधांमुळे अमेरिकेस भारताविरुद्ध रहाणे अधिक पसंद होतेच. चीन देखील त्याकाळात वेगळाच होता. (तरी देखील चीनशी निक्सनने मैत्रीस सुरवात केली, भारताशी गरज वाटली नाही). अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे पाकीस्तानने अनेक वर्षे अमेरिकन पद्धत (आणि त्यांचेच पैसे) वापरत लॉबिंग एजन्सीज वापरल्या. असे अनेक देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करतात. भारताने मला वाटते त्याची सुरवात राव सरकारच्या वेळेस थोडी केली. नंतर/आत्ता काय आहे ते माहीत नाही. त्याहूनही महत्वाचे म्हणजे पाकीस्तानी अधिकारी आणि सामाजीक धुरीणांचे पाकीस्तानच्या बाजूने पाकीस्तानच्या बाहेर ठाम आणि प्रभावी बोलणे. त्याचा फायदा पाकीस्तानी जनतेस आणि अनिवासी पाकीस्तान्यांना होतो. अजून एक महत्वाचे म्हणजे कधिही ते apologetic नसतात. आजतागायत मी एक निरूपमा राव सोडल्या तर असे कोणी बघितलेले नाही. आपले समाजधुरीण तर आपल्याकडचे कसे वाईट हे सुधारण्याऐवजी जगाला सांगण्यात जास्त वेळ घालवतात. केवळ एक उदाहरण म्हणून - १० मे १९९९ ला बॉस्टनमधे आपले लोकं पोखरण २ चे वर्षश्राद्ध घालायला बसलेले पाहीले, पाकीस्तान्यांनी ना धड तसे त्यावेळेस केले ना इतर अनेक वेळेस, जेंव्हा त्यांचे अतिरेक्यांशी संबंध जाहीर झाले....
अजून एक भाग होता तो म्हणजे भारतीय संस्कृती - रहाणीमान वेगळी असण्यामुळे इथे अमेरिकन्सना गेल्या शतकापर्यंत असलेला दुरावा. त्याचे अजून एक कारण म्हणजे आपण त्यांच्या तोडीचे आहोत ही भिती. आपण कितीही तोडीचे आहोत असे म्हणले, आणि जरी मला मान्य होत असले तरी माझ्या लेखी, जो पर्यंत इनोवेशन नाही तो पर्यंत कमीअधिक फरकाने आपण टेक्नीकल क्लर्क आणि सरशी तेथे देशी इतकेच रहात आलो आहोत. फरक पडला आहे तो आता पैशाचा. भारतीयांकडे आज जास्त पैसा आहे, प्रमुख ठिकाणांमध्ये भारतीय दिसू लागला आहे. इथल्या पैशाच्या अफरातफरीत तर लेटेस्ट उदाहरणात भारतीयाने आपण इतरांच्या पुढे असल्याचे सिद्ध केले. ते निगेटीव्ह उदाहरण आहे. पण चांगले उदाहरण म्हणजे अनेक भारतीयांचे उद्योग आणि व्हाईट हाऊस मधे विविध प्रकाराने आलेले महत्व. (त्यावर नंतर कधीतरी...). इतकेच नाहीतर एका भारतीयाने अमेरीकन म्हणून गेल्या ऑलिंपिक्समधे चक्क मेडलही मिळवले होते... थोडक्यात आता अमेरिकन्स भारताबद्दल आणि भारतीय अमेरिकेत नॅचरलाइझ्ड होत आहेत. त्याचा अप्रत्यक्ष परीणाम हा पाकीस्तान्यांच्या जनसामान्यांशी असलेल्या संबंधांवर होऊ लागला आहे. आज, भारतातील अनेक चुकांना कितीही नावे ठेवली तरी कलेक्टीव्हली आपण पुढेच जात आहोत आणि तसेच जात राहू अशी आशा/प्रार्थना. दुर्दैवाने पाकीस्तानच्या बाबतीत तसे घडत नाही. बुडीत खात्यातील देश. त्यामुळे त्यांच्या इथल्या नागरीकांना आता अजून किती काळ उसने अवसान आणता येणार हा प्रश्न आहे.
या सर्वाचा परीणाम म्हणून जे आडात नव्हतेच ते आता पोहर्यात खोटे खोटे दाखवण्याची अमेरीकेस गरज पडणार नाही, गरज कमी होत जाईल. ओसामा तेथे मिळणे हे त्यातील केवळ ओबामाच्या दृषीने एक इष्टापत्ती ठरली: निवडणूकीच्या काळात जनतेला दिलेले वचन खरे केले, लीडरशिप दाखवली, पाकीस्तानला उघडे पाडले, वगैरे.... त्याचा कदाचीत पाकच्या स्लोकिलींगसारखा हे फायदा घेऊ शकतीलही/करत असतीलही... पण आता ओबामाच्या दृष्टीने त्याचा खरा फायदा हा अमेरिका-पाक संबंध कसे असावेत यासाठी नसणार आहे, (वरकरणी काही बोंबाबोंब झाली तरी ते त्यांच्या फॉरीन-पॉलीसीप्रमाणे होत राहील). तर त्याचा खरा फायदा हा ओबामा-अमेरिकन्स संबंध कसे सुधारतील याच्याशीच असणार आहे. :-)
सहमत
प्रतिसाद आवडला
बाकी, "भारतीय गुप्तहेर संघटना नक्की काय करते हे माहीत नाही" म्हणजे ती अधिक चांगली नाही का? :)
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
होपफुली...
बाकी, "भारतीय गुप्तहेर संघटना नक्की काय करते हे माहीत नाही" म्हणजे ती अधिक चांगली नाही का? :)
होपफुली :-) पण एकंदरीत इतिहास बघितला तर आपण पंचनामा/पोस्ट मार्टेम करण्यात जास्त तज्ञ आहोत असे वाटते. :(
सहमत
प्रतिसाद आवडला. एक दोन मुद्द्यांची भर. हेन्री किसिंजरने 'पिंग् पाँग् डिप्लोमसी' सुरू करताना पाकिस्तानमधून चीनमधे गुप्तपणे थेट उड्डाण केले होते असे आठवते.तेव्हापासूनच अमेरिकेचे चीनशी गुफ्तगू सुरू आहे.
भारतापेक्षा पाकिस्तानमधेच बाँब् स्फोट,आत्मघाती हल्ले वगैरे होत असतात.मनुष्यहानीही आपल्यापेक्षा जास्त असते.कदाचित शिया-सुन्नीचे झगडे, मुस्लिम क्लर्जीचा वाढता प्रभाव,वाढता मूलतत्त्ववाद,एम्.क्यू.एम् ची असंतुष्टता वगैरे कारणे असू शकतील.पण रॉ कधीच लाइम्-लाइट् मधे नसते. हे यश मानता येईल.
अफ्गानिस्तान् सकट मध्य आशियातून फार मोठ्या प्रमाणात निर्माण/निर्यात होणार्या अमली पदार्थांचे मोठे मार्केट् अमेरिका हे आहे आणि अमेरिकेतल्या भल्यामोठ्या शस्त्रास्त्र उद्योगाचे,ज्यांची जबरदस्त लॉबी आणि प्रभाव अमेरिकन सरकारवर आहे, मोठे खरेदीदार हे ठीकठिकाणचे दहशतवादी आहेत.
भस्मासूर
भारतापेक्षा पाकिस्तानमधेच बाँब् स्फोट,आत्मघाती हल्ले वगैरे होत असतात.
कधीपासून? ते गेल्या काहीवर्षात चालू झाले आहे. धर्माच्या नावाखाली दहशतवादाचा वापर केला. पण दहशतवादाला धर्म नसल्याने तो भस्मासूर नंतरत्यांच्यावरच उलटला.
अफ्गानिस्तान् सकट मध्य आशियातून फार मोठ्या प्रमाणात निर्माण/निर्यात होणार्या अमली पदार्थांचे मोठे मार्केट् अमेरिका हे आहे आणि अमेरिकेतल्या भल्यामोठ्या शस्त्रास्त्र उद्योगाचे,ज्यांची जबरदस्त लॉबी आणि प्रभाव अमेरिकन सरकारवर आहे, मोठे खरेदीदार हे ठीकठिकाणचे दहशतवादी आहेत.
सहमत. या संदर्भात भारताचा पण (कराची बंदरावरून मुंबई बंदर) कसा कॉरीडॉर केला जात आहे, कोण करत आहे वगैरे,यावर एकदा ऐकले होते. त्यातले खरे किती आणि नुसतेच वाटणारे षड्यंत्र किती माहीत नाही. अफगाणिस्तानात आता अफूचे पिक वाढू लागले आहे.त्यावर अमेरीकन सैन्य/सरकार, अफगाणसरकारला बरोबर घेऊन मदत करायचा प्रयत्न करत आहे. तरी देखील एकूणच ड्रग्ज सहज मिळणे आणि त्याचा वापर या संदर्भात अमेरीकेत एकूणच प्रकार भयावह आहे. एकीकडे विनोद करत त्याचे नकळत उदात्तीकरण होताना दिसते तर दुसरीकडे कडक कायदे ज्यांचा उपयोग हा या व्यापाराचे कंबरडे मोडायला होत नाही...
कधीकाळी कोणिही कम्युनिझमच्या विरोधात म्हणताक्षणी अमेरीकेने मदत करत दहशतवादाचे भूत पोसलेहे खरे आहे. पण नंतरच्या काळात त्यावरील बंधने वाढत गेली असे वाटते. तरी देखील शस्त्रास्त्रांचा व्यापार हे एक मोठे जाळे आहेषाअणि त्यात या कंपन्या या ना त्या रूपाने सहभागी असतील यात नवल नाही.
पाकिस्तान् मधले बॉम्ब् स्फोट
साधारणपणे नव्वदीच्या दशकात पाकिस्तानात हिंसाचार टिपेला पोचला होता. १९८६ मध्ये मुहाजिर् कौमी मूव्मेंट् (नंतरच्या काळात मुत्तहिदा कौमी मूव्मेंट्)ची स्थापना झाली. पाकिस्तानची माध्यमे या बाबतीत कायम रॉ च्या नावाने शंख करत आलेली आहेत. एम्.क्यू.एम् आणि पोलिस यांचे उघड युद्ध कराचीच्या रस्त्यांवर चालत असे. १९९५ पर्यंत सुमारे १८०० लोक यात मेले असावेत. शेवटी मिलिटरीने ऑपरेशन् क्लीन्-अप् करून ही चळवळ मोडून काढण्याचा प्रयत्न केला. एकदा तर कराची आणि सिंध मध्ये इतकी अंदाधुंदी माजली की संसद बरखास्त करावी लागली. त्यांचा नेता अल्ताफ् हुसैन् याच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागल्यामुळे त्याने इंग्लंडमध्ये आश्रय घेतला.
आपल्याकडे बाबरी मशिद विध्वंसाआधी रामरथयात्रेमुळे वातावरण अत्यंत कलुषित झाले आणि विध्वंसानंतर तर कित्येक वर्षे थोडे थंड पडलेले जातीय उद्रेक पुन्हा उफाळून आले.तेव्हापासून सूड प्रतिशोधाचे चक्र अव्याहत सुरू आहे. मुद्दा हा की आपल्याप्रमाणेच तिथेही राजकीय/सामाजिक असंतोष व त्यातून उद्भवणारी हिंसा ही अलीकडची नाही.
गेल्या दहा वर्षांतले प्रकार
साधारणपणे नव्वदच्या दशकात पाकिस्तानात हिंसाचार टिपेला पोचला होता. १९८६ मध्ये मुहाजिर् कौमी मूव्मेंट् (नंतरच्या काळात मुत्तहिदा कौमी मूव्मेंट्)ची स्थापना झाली. पाकिस्तानची माध्यमे या बाबतीत कायम रॉ च्या नावाने शंख करत आलेली आहेत. एम्.क्यू.एम् आणि पोलिस यांचे उघड युद्ध कराचीच्या रस्त्यांवर चालत असे. १९९५ पर्यंत सुमारे १८०० लोक यात मेले असावेत. शेवटी मिलिटरीने ऑपरेशन् क्लीन्-अप् करून ही चळवळ मोडून काढण्याचा प्रयत्न केला. एकदा तर कराची आणि सिंध मध्ये इतकी अंदाधुंदी माजली की संसद बरखास्त करावी लागली. त्यांचा नेता अल्ताफ् हुसैन् याच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागल्यामुळे त्याने इंग्लंडमध्ये आश्रय घेतला.
एमक्यूएमला अनेक पाकिस्तानी, विशेषतः पंजाबी आणि पठाणी, दहशतवादी मानतात. पण टार्गेट किलिंगचे प्रकार कराचीत दोन्हीकडून होतात. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की अल कायदा व तालिबान्यांना एमक्यूएमने उघडपणे विरोध केला आहे.
मुद्दा हा की आपल्याप्रमाणेच तिथेही राजकीय/सामाजिक असंतोष व त्यातून उद्भवणारी हिंसा ही अलीकडची नाही.
सध्या पाकिस्तानात जे हिंसेचे तांडव चालू आहे ते २००१ नंतरचे आहे. पाकिस्तानी तालिबान, पंजाबी तालिबान हे प्रकार गेल्या दहा वर्षांतले आहेत. चूभूद्याघ्या.
अवांतर:
पाकिस्तान पीपल्ज़ पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग हे पक्ष मोठमोठ्या जमीनदारांचे (भुट्टो, ज़रदारी, जतोई, खर, लघारी वगैरे वगैरे) पक्ष आहेत. एमक्यूएमचे तसे नाही.
हा अलताफ़ हुसैन ह्यांची भाषणे, मुलाखती फार मनोरंजक असतात.
दुवा १
दुवा २
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
भुत्तोंनी चीनशी "चोरी-चोरी" दोस्ती जॉन्सन यांच्या काळात केली
निक्सन यांच्या कारकीर्दीत अमेरिकेने चीनशी दोस्ती करायला सुरुवात केली. तोपर्यंत अमेरिका चीनला रशियापेक्षा कट्टर शत्रू मानत असे. भुत्तोंनी मात्र चीनशी दोस्ती "चोरी-चोरी" जॉन्सन यांच्या कारकीर्दीत केली व या संशयामुळे अमेरिकेचे पाकिस्तानशी १०० टक्के सूत कधीच जमले नाहीं. बांग्लादेशच्या युद्धानंतर मात्र ही मैत्री उघडपणे करायला सुरुवात झाली.
अगदी हाडवैरी होतील असं वाटत नाही मान्य! यासाठी अमेरिकेने बॉस्फोरसची सामुद्रधुनी-आर्मेनिया-अझरबाईजान-तुर्कमेनिस्तान हा नवा मार्ग रसद पोचविण्यासाठी खुला केला पाहिजे. तोपर्यंत कराची-पाकिस्तान-खैबर खिंड हा एकमेव मार्ग त्यांना आवश्यकच आहे!
___________
जकार्तावाले काळे
'पाक सरकार, पाक जनता नव्हे' हे वाक्य लिहिल्याने आदर वाढला!
"पाक सरकार, पाक जनता नव्हे" हे फारच अव्वल वाक्य आहे. हे वाक्य लिहिल्याने आपल्याबद्दलचा आदर वाढला!
मी स्वत:सुद्धा पाक आणि अमेरिकन 'जनता' व पाक आणि अमेरिकन 'सरकार' यात कधीही गल्लत करत नाहीं!
___________
जकार्तावाले काळे
सखोल माहिती
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.जाकार्तावाले काळे यांचा हा लेख, त्यावरील श्री.चंद्रशेखर यांचा प्रतिसाद (तसेच त्यांचे ह्यू एनत्सांग विषयींचे लेख वाचून मी अवाक् होतो.केवढी ही सखोल माहिती! केवढे वाचन! आश्चर्य वाटते.(या दोघांच्या पंक्तीत बसणारे श्री. नितीन थत्ते हेही आहेत.) खरोखर यांना शतशः प्रणाम !!
टी.व्ही.वाहिन्यांवर राजकीय घटनांच्या चर्चा झडतात.त्यांत भाग घेण्यासाठी ज्या तज्ज्ञांना निमंत्रित करतात त्यांत या तिघांचा समावेश केल्यास उत्तम बिंदुगामी आणि विश्वासार्ह माहितीने परिपूर्ण अशा चर्चा होतील यात संदेह नाही.
असेच म्हणतो...
पूर्णपणे सहमत...
==================
डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!
मधेच ..
http://goo.gl/ हे वापरा. किती वेळेस ह्या लिंक ला क्लिक केले आहे वगैरे माहिती मिळते...
बाकी लेख मस्तच.
---------------------
-धनंजय कुलकर्णी
माझे जकार्ता पोस्ट'मधील पत्र या खालील नव्या दुव्यावर वाचू शकाल
माझे 'जकार्ता पोस्ट'मधील पत्र या खालील नव्या दुव्यावर वाचू शकाल. पत्राखाली असलेला Mark Ulyseas या बालीची राजधानी 'देनपासार' येथे रहाणार्या गृहस्थांचा प्रतिसादही जरूर वाचा!
http://tinyurl.com/6axbcfg
___________
जकार्तावाले काळे
माझे जकार्तातील मित्र श्री राम बहुखंडी यांचे पत्रही जरूर वाचा
http://tinyurl.com/69n7exb या दुव्यावर माझे जकार्तातील मित्र श्री राम बहुखंडी यांचे पत्रही जरूर वाचा.
___________
जकार्तावाले काळे
छान
माहितीपूर्ण लेख - धांदोळा आवडला.
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?
धांदोळा म्हणजे काय?
ऋषिकेश-जी,
धन्यवाद!
धांदोळा म्हणजे काय?
___________
जकार्तावाले काळे
आढावा
धांदोळा की धांडोळा (मी दोन्ही शब्द पाहिले आहेत) ते माहित नाही पण शब्दाचा अर्थ आढावा.
धांडोळा
धांडोळा म्हणजे मुख्यत्वेकरून शोध. आढावा ही अर्थच्छटा त्यात असू शकते, थोडीशी दुरून. धांडुळणे,धांडोळणे म्हणजे धुंडाळणे,बारकाईने शोधणे.
आपल्या प्रोत्साहन देणार्या प्रतिसादाबद्दल यनावालेंना धन्यवाद
यनावालेसाहेब,
माझी एवढी लायकी कुठली? वाचायला आवडते हे खरे. आधी 'जकार्ता पोस्ट'मध्ये लिहायला सुरुवात केली. तिथे खूप वाचक मिळाले. इथे कुणाशी पहिल्यांदाच माझी ओळख कुणी करून दिली कीं "ते 'जकार्ता पोस्ट'मध्ये लिहितात ते तुम्हीच काय?" अशी हमखास विचारणा होते.
'माय-मराठी'त लिहायला सुरुवात मात्र देवनागरी टंकनसोय उपलब्ध झाल्यानंतरची अगदी अलीकडचीच आहे.
आपल्या प्रोत्साहन देणार्या प्रतिसादाने मी खरंच भारवून गेलो. मनःपूर्वक धन्यवाद.
___________
जकार्तावाले काळे
माहितीपूर्ण लेख
खूपच माहितीपूर्ण लेख, आणि संदर्भ देखील उत्तम.
पण मला त्यांच्या 'बिघडणाऱ्या' संबंधाबद्दल शंका आहे, मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर असेच ते वाटते. जोपर्यंत पाकिस्तानला अमेरिकेच्या उपदव्यापांचा त्रास होऊन ते त्याविरोधात(जाहीरपणे) जात नाहीत तोपर्यंत तरी सगळे मिळून-मिसळून चालले असणार असे वाटते. जेव्हा जाहीर विरोध होईल तेव्हा त्यांना पण चिरडले जाईल. पण एकूणच अमेरिकेला त्यांना त्रास देण्यात काही स्वारस्य नसावे, त्यांना दक्षिण-आशियामध्ये एक हक्काची जागा हवी आहे, ती मिळाली आहे. लादेन वगैरे गोष्टी असे संबंध बिघडवू शकतील असे वाटत नाही.
वेळ कसा मिळतो?
जकार्तावाले काळेसाहेब, लेख खूप वेल खर्ची करुन लिहिला आहे. चांगला आहे, तद्न्यांची मतेही वाचायला मिळाली.
मजकूर संपादित. उपक्रमावर वैयक्तिक स्वरूपांच्या प्रश्नांसाठी खरडवही किंवा निरोपसुविधेचा वापर करावा. सतत वैयक्तिक रोखाचे लिहिल्यास कडक कार्यवाही होऊ शकते याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.
कार्यवाही की कारवाई?
येथे आणि 'तिथे' अनेक संपादक शिक्षा या शब्दाचा प्रशासकीय पर्याय म्हणून 'कार्यवाही' हा शब्द वापरताना दिसतात. माझ्या मते हे चुकीचे आहे. कार्यवाही म्हणजे implementation किंवा execution (येथे या शब्दाची शिक्षा या अर्थाची छटा अपेक्षित नाही. )
कडक कार्यवाही म्हणजे काय? strict implementation? पण ती कशाची हे इथे स्पष्ट होत नाही. शिक्षेची कार्यवाही होऊ शकते वगैरे शब्दप्रयोग केल्यास तो योग्य मानता येईल असे वाटते.
मात्र सोपा आणि सुलभ शब्द कारवाई वापरण्यास हरकत नसावी.
चू.भू.द्या.घ्या.
दुटप्पी
चांगला लेख. सुधीरकाकांचा राजकारणाचा अभ्यास चांगला आहेच. अशाप्रकारचे वाचनीय लेख लिहून ते सिद्धही करतात पण एक गोष्ट पटत नाही.
दुटप्पी कोण आहे? फक्त पाकिस्तान? तसे वाटत नाही. पाकिस्तान आपला फायदा बघते तसा अमेरिकाही बघतेच की. जोपर्यंत मध्य आशियात तेलाचे साठे सुखरुप आहेत तोपर्यंत अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या मैत्रीत नवनवे अध्याय जोडले जातील मग पाकिस्तानला अचानक भाव देण्याची पाळी येवो किंवा न येवो. अमेरिकन प्रेसिडेंट हे सर्वेसर्वा वगैरे नसून व्यावसायिकांच्या हातातील एक मोहरे आहेत असे वाटू लागले आहे. असो.
असेच
लेखातील बरेच मुद्दे पटण्यासारखे आहेत. अभ्यासही आहे.
परंतु वरीलसारखेच माझेही मत आहे.
सर्वच देशांची दुटप्पी वक्तव्यांची आणि गुप्त-धोरण विरुद्ध उघड-धोरण यांत फरक करतात. देशाच्या अंतर्गतची अधिकृत वक्तव्ये आणि देशाबाहेरची अधिकृत वक्तव्ये यांच्यात कुठल्याही देशात प्रचंड तफावत असते. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यावेगळा व्यवहार करावा, असे आपल्यापैकी कोणाला वाटते काय?
हे सर्व असतानासुद्धा चौफेर माहिती गोळा केली, तर गुप्त धोरणाबद्दल काही कल्पना येऊ शकते. भारत सरकारच्या गुप्त धोरणाबद्दलही कल्पना येते. पाकिस्तान सरकारच्या गुप्त धोरणाबद्दल कल्पना येते. यू.एस. सरकारच्या गुप्त धोरणाबद्दल कल्पना येते. (माहिती जमवतानाच्या "दे पुट युवर मनी व्हेअर देअर रियल माउथ इज" या ढोबळ तत्त्वानुसार गुप्त धोरणाबद्दल थोडीफार कल्पना येते.) त्याच प्रमाणे अधिकृत वक्तव्यांतून काही माहिती मिळते.
आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषण करताना "अमुक दुटप्पी, तमुक दुटप्पी" अशा प्रकारची वाक्ये म्हणजे केवळ टंकनाचा अपव्यय होय. यू.एस राजदूत यू.एस. परराष्ट्रमंत्रालयाशी गुप्त चर्चांचे खलिते पाठवते, त्यांत पाकिस्तान सरकारच्या विविध सत्ताकेंद्रांबद्दल दाट शंका सांगितल्या जातात (विकिलीक्स दस्तऐवज). मात्र त्याच काळात उघडपणे मैत्रीच्या घोषणा, पैसे पुरवणे वगैरे चालू होतेच. गोपनीय मत आणि उघड वक्तव्ये यांच्यामधील तफावत बघता "या बाबतीत यू.एस. सरकारची काही बाबतीत अगतिकता आहे" हा निष्कर्ष काढता येतो.
उघड वक्तव्ये आणि गोपनीय व्यवहार, त्या दोहोंतली तफावत... वगैरे, हे विश्लेषण करण्यासाठी "देशाचे सरकार" हेच एकक असावे, असे नव्हे. पाकिस्तानात सत्तेची अनेक केंद्रे आहेत. मुलकी राजकारणी नेते, आणि सैन्य हे दोन ठळक कधी-हात-मिळवतात-कधी-भांडतात अशी सत्ताकेंद्रे तर सुस्पष्ट आहेतच. पण सैन्यामध्ये आयएसआय आणि करियर सेनाधिकारी ही दोन
वेगवेगळी सत्ताकेंद्रे आहेत. मुलकी राजकारण्यांमध्ये नागर आणि उलेमा ही दोन सत्ताकेंद्रे आहेत. या सर्व केंद्रांपैकी कोणी कोणाचे सदासर्वकाळसाठी मित्र नाही, की शत्रू नाही. (वरील विश्लेषणात हे तपशील येणे महत्त्वाचे आहे.)
(यू.एस. परराष्ट्र मंत्रालय हे सत्ताकेंद्र आणि यू.एस. युद्ध मंत्रालय ही वेगळी सत्ताकेंद्रे आहेत. अमेरिकेचा राष्ट्रपती आयझेनहावर याने निर्देश केलेले मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आणि यू.एस.चे मुलकी राजकारण ही वेगवेगळी सत्ताकेंद्रे आहेत. मात्र वरील विश्लेषणाकरिता या सर्वांचे हेवेदावे बहुधा चर्चिण्यालायक नाहीत.)
यू.एस.च्या वेगवेगळ्या सत्ताकेंद्रांचे या बाबतीत थोडे फार एकत्रित धोरण आहे : पाकिस्तानातील मुलकी राजकारण्यांचा बिगर-उलेमा भाग, आणि पाकिस्तान सैन्यातील अमेरिकन शस्त्रास्त्रे विकत घेणारा भाग यांना खुश ठेवून, समर्थन देऊन तरी उलेमा आणि अमेरिकाविरोधी कारवाया करणार्या सैन्यातील भागाशी दुष्मनी कशी करता येईल? १९८९नंतरपासून अमेरिकेला पडलेले हे कोडे आहे. (अशी कोडी कधीच सुटत नसतात. फक्त दशकां-शतकांनी कालबाह्य होत असतात.)
त्याच प्रकारे भारत सरकारचे पाकिस्तानविषयी वरीलसारखेच धोरण आहे. परंतु त्यातही पाकिस्तान सैन्यातील कश्मीर-अतिरेकी विभागाचा जोर कमी व्हावा, असा प्रयत्न भारत सरकार अधिक नेटाने करेल; यू. एस. तटस्थ राहील. वगैरे.
"दुटप्पी"पणा हा अपेक्षित परराष्ट्र-व्यवहार न-मानल्यामुळे, दुटप्पीपणा "सिद्ध" करून त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात श्री. काळे यांच्या लेखाची बौद्धिक ऊर्जा काही प्रमाणात वाया जाते. दुटप्पीपणा हा अपेक्षितच असला, तर तो "सिद्ध" करण्यात श्रम खर्च करावे लागत नाहीत. "दुटप्पी" वर्तनाला आत्त म्हणून घेता येते. त्याच्या विश्लेषणातून "वेगवेगळ्या सत्ताकेंद्रांचे हेवेदावे, खरे धोरण, खरी अगतिकता..." हे सगळे समजून घेता येते.
पाकिस्तान करत आहे तो दुटप्पीपणा नव्हे तर विश्वासघात
सर्वसाधारणपणे जेंव्हा एकाद्या देशाबरोबर मैत्री केल्याचा उघड उल्लेख दोन्ही राष्ट्रे करतात तेंव्हा हा दुटप्पीपणा अगदी कमीत कमी असतो. उदा: अमेरिका व इंग्लंड व कांहीं अंशी नाटो संघटना. नाटोत मतभेद झाल्यास ते उघडपणे व्यक्त होतात व बर्याचदा सगळी नाटो राष्ट्रे एकाद्या मोहिमेत भाग घेत नाहींत उदा: इराकची मोहीम.
पण पाकिस्तानचे चीनबरोनबरचे प्रेमाचे चाळे ६० च्या दशकापासून चालू आहेत. तिकडे अमेरिकेने (माझ्या मते) अतीशय अदूरदृष्टीने दुर्लक्ष केले. त्याची पापे ते भोगत आहेत. आज पाकिस्तान अमेरिकेचा "War on Terror"मधील मित्र म्हणून मिरवतो पण अमेरिकाविरोधी कारवाया करतो. हा दुटप्पीपणाच नव्हे तर उघड-उघड विश्वासघात! नुकतेच पाकिस्तानी सरकारने एक बिल पास केले (किंवा करण्याचे योजले आहे) कीं पुन्हा जर अशी मोहीम अमेरिकेने केली तर ते खैबरखिंड बंद करतील. हा दुटप्पीपण नव्हे. हे चक्क अमेरिकेला सांगणे आहे कीं ही मर्यादा ओलांडल्यास आम्ही "जय रामजीकी" म्हणू!
आजवर अनेक पाकिस्तानी वृत्तपत्रांनीच लिहिल्यानुसार "पाठलाग करणारा शिकारी कुत्रा आणि घाबरून पळणारा ससा" या दोन्ही भूमिका पाकिस्तान वठवत होते.
इमरान खान यांची ही मुलाखत वाचा. तेही अमेरिकेची मदत नाकारायचा व पाकिस्तानने स्वतःच्या पायावर उभे रहावे आअ सल्ला देत आहेत http://tinyurl.com/3h4ckao
माझ्या प्रकाशित झालेल्या कित्येक पत्रात मीही असेच लिहिले आहे.
___________
जकार्तावाले काळे
रनिंग विथ द हेअर
"पाठलाग करणारा शिकारी कुत्रा आणि घाबरून पळणारा ससा"
"पाकिस्तान एकाचवेळी सशांबरोबर धावतो आहे आणि कुत्र्यांच्या सोबतीने शिकारही करतो आहे" असे तुम्हाला कदाचित म्हणायचे असावे. (पाकिस्तान इज़ रनिंग विथ द हेअर अँड हंटिग विथ द हाउन्ड्स)
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
होय. धन्यवाद!
होय. धन्यवाद! मूळ इंग्रजी म्हण मला वेळेवर आठवली नाहीं.
कृपया ही चूक माझ्या मूळ प्रतिसादातच दुरुस्त केल्यास मी आपला ऋणी राहीन!
___________
जकार्तावाले काळे
आनंदाच्या उकळ्या
लेख अभ्यासपूर्ण आहे. डॉन वर्तमानपत्र पाकिस्तानातला एक 'सेन वॉइस' आहे. असे 'सेन वॉईस' बळकट व्हायला हवे.
ड्रोन हल्ल्यात मरण पावलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाने....
हे
ड्रोन हल्ल्यात मरण पावलेल्यांच्या एका पाकिस्तानी नागरिकाने...
असे हवे बहुधा.
बाकी धनंजय ह्यांच्या प्रतिसादाशी बहुतांशी सहमत.
अवांतर:
पाकिस्तानचे जे काही झाले आहे, जे काही होते आहे ते अत्यंत भयावह आहे. कट्टरपंथीयांचा सर्व सत्ताकेंद्रामध्ये खोलवर झालेला शिरकाव आणि त्यांना घाबरणारे सरकार आणि उदारमतवादी हा अतिशय चिंताजनक विषय आहे. पाकिस्तानच्या जुलमी कायद्यात बदल व्हायला हवे असे सुचविणारा पंजाबचा राज्यपाल सलमान तासीरला त्याच्या सुरक्षारक्षकानेच गोळ्या घालून ठार मारले. ब्लासफेमी कायद्याचा विरोध करणारा ख्रिश्चन मंत्री शाहबाझ भट्टी ह्याचीही तीच गत झाली. पण ह्या वेडाचाराला, हिंसाचाराला परदेशात सेफ असणारे पाकिस्तानी सोडल्यास कुणीही खुलेआम विरोध करताना दिसत नाही. असो. असहिष्णूपणा (लेन, ब्रिगेड, दादोजी) महाराष्ट्रातही वाढतो आहे.
आणि पाकिस्तानात हे सगळे होताना बघून, विशेषतः शेजाऱ्याच्या मनात, आनंदाच्या उकळ्या फुटायला नको.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"
हा माझा लेख आज ई-सकाळवर प्रसिद्ध झाला आहे
हा माझा लेख आज ई-सकाळवर प्रसिद्ध झाला आहे. दुवा आहे:
http://www.esakal.com/esakal/20110516/4987159795665148201.htm
___________
जकार्तावाले काळे