"रोश विरुद्ध अॅडम्स"च्या निमित्ताने - २: रोश आणि अॅडम्स
स्टॅन्ले अॅडम्स:
स्टॅन्ले अॅडम्स हा तसा सुखवस्तू घरातील, माल्टा (जो आज स्वतंत्र देश आहे) सारख्या छोट्या ब्रिटिश कॉलनीमधे जन्मलेला. तरुण वयातच विविध भाषांमध्ये प्रवीण झालेला हा तरुण मुळातच सुखवस्तू घरचा नि त्यात सुरवातीच्या काळात जहाज-विमा कंपनीचा एजंट, ब्रिटिश वकिलातीचा प्रतिनिधी, हौशी शेतकरी वगैरे बराच काही होता. पण सुखवस्तूपणाला साजेलशी लठ्ठ पगाराची नोकरी मिळावी म्हणून मग तो औषध व्यवसायाकडे वळला. वेगवेगळ्या देशात नि वेगवेगळ्या कंपन्यांसाठी काम तीन वर्षे काम केल्यावर एका बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनीत दाखल झाला. इथून दोन वर्षातच त्याला प्रसिद्ध स्विस कंपनी 'हॉफमन-ला रोश' या कंपनीने उचलला. (एकमेकांचे एम्प्लॉई पळवण्यालाही परंपरा आहे पहा, आपल्या आय टी कंपन्यांनी लाज वाटून घ्यायचं कारण नाही.) मुळात स्विस कंपन्या या वरिष्ठ जागांवर फक्त स्विस नागरिकांचीच नेमणूक करत असत. असे असूनही एका माल्ट्न-ब्रिटिश व्यक्तीसाठी रोशने स्वतः गळ टाकावा यावरूनच या पाच वर्षात अॅडम्सने केलेल्या कामाची पावती मिळते.आधीच्या नोकरीतील अनुभवाचा वापर करून अॅडम्सने सुचवलेल्या अनेक सुधारणा रोशने मान्य केल्या नि त्याच्या ज्ञानाचा नि पुढाकार घेण्याच्या वृत्तीचा उपयोग करून घेण्यासाठी त्याला आपल्या विविध ठिकाणी असलेल्या शाखांमधे प्रशिक्षणाला पाठवायला सुरवात केली. त्याचा पगारही अतिशय वेगाने वाढत गेला.आता अॅडम्सला त्याला हवी तशी लठ्ठ पगाराची नोकरी मिळाली होती, तीही स्वर्गसमान स्वित्झर्लंडमधे. अशातच महाराज आपल्या सर्वार्थाने गुणी सेक्रेटरीच्या प्रेमात पडले नी चतुर्भुज झाले. अॅडम्सला स्वर्ग दोन बोटे उरला होता.
हाफमन-ला रोश:
एका धनाढ्य टेक्स्टाईल व्यावसायिकाच्या कुटुंबात जन्मलेल्या नि व्यवसायाने बँकर असलेल्या फ्रिट्ज हॉफमान-ला रोश (Fritz Hoffmann-La Roche) याने १८९४ मध्ये मॅक्स कार्ल ट्रॉब (Max Carl Traub) याच्याबरोबर भागीदारी करून स्वित्झर्लंडमधील बाझल्-स्थित एक लहानशी औषधनिर्माण कंपनी ताब्यात घेतली. व्यावसायिक दृष्ट्या खडतर अशा दोन वर्षांनंतर रोशने आपल्या भागीदाराचा हिस्सा विकत घेतला नि कंपनी पूर्णपणे आपल्या कब्जात घेतली आणि हॉफमन-ला रोश कंपनीचा जन्म झाला. कंपनीला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी एखाद्या हुकमी उत्पादनाच्या शोधात असतानाच ब्रँडेड उत्पादनाच्या स्वरूपात विविध औषधांचे प्रमाणित डोसेस बाजारात आणण्याची कल्पना सुचली. याचबरोबर हे ब्रँड्स आंतराष्ट्रीय बाजारातही विकता येतील असा त्याचा होरा होता. शक्यतो स्थानिक नैसर्गिक उत्पादनांपासून औषधांना आवश्यक ती रसायने वेगळी करून ती औषधनिर्मितीसाठी वापरावीत असे त्याचे धोरण होते. त्यामुळे विविध देशातील बाजारांसाठी स्थानिक पातळीवर उत्पादन केंद्रे स्थापन करणे आवश्यक ठरले. त्यामुळे रोशचे पहिले ब्रँडेड उत्पादन (Sirolin हे कफ सिरप जे कंपनीच्या Thiocol नावाच्या क्षयरोगविरोधी (antitubercular) रसायनापासून बनवले होते) बाजारात येण्यापूर्वीच (१८९८) इटली आणि जर्मनी या दोन देशात रोशच्या स्थानिक शाखा काम करू लागल्या होत्या. १९१२ पर्यंत रोशच्या तीन खंडातील नऊ देशात स्थानिक शाखा निर्माण करण्यात आल्या. रशिया हे फ्रिटझच्या दृष्टीने मोठे मार्केट होते नि त्याने तिथे बर्यापैकी बस्तान बसवले होते. परंतु १९१७ मधे डाव्या क्रांतीचा त्याच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला. १९१९ पर्यंत रोश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन पोचली होती. अखेर बाझल्-स्थित हेन्डेल्स बँकेकडून अर्थसहाय्य घेतले आणि खाजगी मालकीची रोश ही लिमिटेड - भागीदारीतील - कंपनी झाली.
त्या काळापासून आजपर्यंत रोशचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे. यात अंतर्गत वाढ (Organic growth) तर आहेच पण त्याहूनही मोठा वाटा हा ताब्यात घेतलेल्या अन्य कंपन्यांचा (Inorganic growth) आहे. अॅडम्सने रोशची नोकरी स्वीकारली त्यावेळी स्वित्झर्लंड, अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली आणि जपान या देशांमधे रोशची उत्पादन यंत्रणा कार्यान्वित होती. याशिवाय जगभर तिच्या विक्री-शाखा पसरलेल्या होत्या. अॅडम्स रोशचा नोकर झाला नि लगेचच त्याची नेमणूक व्हेनेझुएलामधील रोशच्या नव्या कंपनीचा प्रमुख म्हणून झाली. तेथील अनुभवाबाबत अॅडम्सने थोडक्यात पण मार्मिक विवेचन केले आहे. तो म्हणतो 'प्रचंड आकार नि केवळ एक कोटी लोकसंख्या असलेल्या देशात सुमारे ९० टक्के लोक एवढे दरिद्री होते की त्यांना रोजचे जेवण मिळण्याची मारामार होती. असे असून देखील रोशची येथील वार्षिक सहा लाख स्विस फ्रँक (सुमारे सहा कोटी भारतीय रुपये) इतकी होती.'
हे आकडे १९६९-७० मधील आहे हे ध्यानात घेतले तर एका दरिद्री देशात अन्नाची ददात असताना जीवनसत्त्वांचा व्यापार मात्र तेजीत होता असे म्हणावे लागेल. यातूनच नव्या व्यावसायिक नीतीमधील एक मुख्य तत्त्व अधोरेखित होते, ते म्हणजे 'जिथे गरज नाही तिथे ती व्यवसायाच्या वाढीच्या उद्देशाने निर्माण करावी.' आणि ही गरजेची निर्मिती कशी केली जाते हे उघड गुपित आहे. यासाठी वापरलेले काही उपाय तर या लेखमालेत पुढे येतीलच.
व्हेनेझुएलातील शाखा अतिशय उत्तम तर्हेने प्रस्थापित केल्यानंतर त्याला त्यानेच निवडलेले मेक्सिकोमधे पोस्टिंग देऊ करण्यात आले. अर्थात यापूर्वी त्याला त्याची मनपसंत लक्झरी कार नि तीन महिन्याची भरपगारी सुटी देण्यात आली होती. पण सुटीवरून परतलेल्या अॅडम्सला सांगण्यात आले की त्याचे मेक्सिकोतील पोस्टिंग रद्द करण्यात आले आहे. काही काळातच त्याच्या लक्षात आले की ज्या व्यक्तीला हटवून त्याची नेमणूक झाली ती अतिशय पोचलेली असामी होती. कंपनी नि स्विस सरकार यांच्या बड्या बड्या धेंडांपर्यंत त्याचे हात पोहोचलेले होते. यावर अॅडम्स मार्मिक टिपण्णी करतो. तो म्हणतो 'तुम्हाला (कामाविषयी) काय माहिती आहे यापेक्षा कोणकोण माहिती आहेत हे स्वित्झर्लंडमधे अधिक महत्त्वाचे ठरत असे, रोशदेखील याला अपवाद नव्हती.' यानंतर अॅडम्सला कॅनडा नि लॅटिन अमेरिकेच्या डिविजनल मॅनेजरची जागा बहाल करण्यात आली. यानंतरच रोशचे अवाढव्य साम्राज्य नि त्यांची ’व्यवसायाभिमुख’ कार्यपद्धती, नैतिकतेची केलेली ऐशीतैशी इ. गोष्टी अॅडम्सला जवळून पाहता आल्या, नि इथून त्याच्या मनात स्वार्थ नि नैतिकता यातील द्वंद्व सुरू झाले.
रोशच्या व्यावसायिक नीतीमत्तेची पहिली चुणूक अॅडम्सला त्यांच्या वेतनपद्धतीत दिसली होती.रोशची वेतन देण्याची पद्धत अतिशय वैशिष्ट्यपूर्ण होती. यात प्रत्येक पोस्ट साठी निश्चित मासिक वेतन असे जो सर्वांना माहित असे. परंतु या मासिक वेतनाचे वर्षाला बाराच हप्ते मिळत असे नाही. उत्तम काम करणार्या वा मर्जीतल्या व्यक्तीला तेरा किंवा त्याहून अधिक हप्ते दिले जात. यामुळे इतर सेवकांना सदर व्यक्तीचे नेमके वेतन किती हे समजणे अवघड जाई. याच वेतनपद्धतीची एक काळी बाजू ही होती (जी आजही आपले अस्तित्व राखून आहे. एवढेच नव्हे तर चांगले हातपाय पसरून ऐसपैस बसली आहे नि आपल्या देशासारख्या अनेक देशांची निर्याताभिमुख अर्थव्यवस्थाच यावर अवलंबून आहे.) ती म्हणजे तिच्या दुसर्या नि तिसर्या जगात असलेल्या कर्मचार्यांच्या नि युरपमधील कर्मचार्यांच्या वेतनात असलेली प्रचंड तफावत. (आउट्सोर्सिंगची सुरवात आपण समजतो तशी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यानी सुरू केलेली नसून रोशसारख्या औषध कंपन्यांनी एकोणीसाव्या शतकाच्या पूर्वार्धातच याचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे.) अशा वेळी अॅडम्ससारखा एखादा युरपियन अधिकारी जेव्हा व्हेनेझुएलासारख्या लॅटिन अमेरिकन देशात शाखा उभारणीसाठी/व्यवसायवृद्धीसाठी जाई तेव्हा त्याचे मूळ वेतन तर त्याला मिळावे पण ते किती याची माहिती स्थानिक समकक्ष अथवा एक दर्जा खाली असलेल्या कर्मचार्यांना मिळू नये यासाठी हे वेतन दोन भागात दिले जाई. पहिला भाग हा स्थानिक वेतनाच्या प्रमाणात त्या त्या देशी अदा केला जाई तर उरलेला भाग हा स्विस बँकेतील त्याच्या खात्यात जमा केला जाई. यामुळे त्या कर्मचार्याला या दुसर्या भागावर त्या देशातील स्थानिक करही द्यावा लागत नसे. आजही अशा विभाजित वेतनाची पद्धत रूढ आहे. हा दुसरा भाग आता पर्क्स, स्टॉक ऑप्शन्स, पेड हॉलिडे अशा स्वरूपात दिला जातो इतकेच.
खुद्द रोश आणि अॅडम्स यांच्याशिवाय आणखी काही व्यवस्था पुढील घटनाक्रमात सहभागी होत्या. यात ई.ई.सी. या संक्षिप्त नावाने ओळखली जाणारी युरपियन इकनॉमिक कमिटी (European Economic Community), युरपियन आयोग (European Commission), युरपियन संसद (European Parliament), स्विस सरकार नि स्विस न्यायव्यवस्था यांचा प्रामुख्याने सहभाग होता. (विस्तारभयास्तव याबाबत अधिक माहिती लिहिणे टाळले आहे, दिलेल्या दुव्यांवरून अधिक माहिती मिळवता येईल.)
_________________________________________________________________________________________________________
या भागातील लिखाणासाठी खालील लेखनाची मदत घेतली आहे.
१. Traditionally Ahead of Our Times (Roche official release, 2008)
२. रोश विरुद्ध अॅडम्स (१९८६) - अनुवादः डॉ. सदानंद बोरसे (मूळ इंग्रजी लेखकः स्टॅन्ले अॅडम्स), राजहंस प्रकाशन, पुणे.
(पुढील भागातः रोशची कार्यपद्धती)
Comments
काळजीपूर्वक वाचावे लागेल
काळजीपूर्वक वाचावे लागेल.
धन्यवाद.
असेच
असेच
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"