"भारतीय - कसा मी? असा मी" प्रकरण पहिले-भाग ४ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"

"भारतीय - कसा मी? असा मी"
प्रकरण पहिले-भाग ४ - "परिचय: प्रतिमा विरुद्ध सत्यपरिस्थिती"
मूळ लेखक: श्री. पवनकुमार वर्मा अनुवाद: सुधीर काळे
© सुधीर काळे (मूळ लेखकाच्या वतीने)
या लेखातील सर्व मतें मूळ लेखकाची आहेत.

The End of History and the Last Man या विक्रमी खपाच्या पुस्तकाचे लेखक फ्रान्सिस फुकुयामा यांना वाटले कीं शीतयुद्ध संपल्यावर आणि भांडवलशाहीच्या पाश्चात्य विचारसरणीची स्वीकृती झाल्यावर आजच आपण भविष्यकाळाची चुणूक पाहू लागलो आहोत. पण फुकुयामांचा हा सिद्धांत सर्वत्र लागू होतो (Universal) हे मान्य केले तरी भारतासारखी प्राचीन संस्कृती आपले ध्येय कसे गाठेल यावर एक नवा इतिहास लिहिला जाईल. एकमेकांशी पूर्णपणे जोडल्या गेलेल्या या नव्या जागतिक परिस्थितीत अमेरिकन, जपानी, चिनी किंवा जर्मन लोकांपेक्षा भारतीय लोक कुठल्या बाबतीत आणि किती प्रमाणात वेगळे आहेत या बाबीला फार महत्व असणार आहे. फुकुयामांच्याच "Trust; The Social Virtues and the Creation of Prosperity" या नंतरच्या आणि जास्त सखोल अभ्यासासह लिहिलेल्या पुस्तकात फुकुयामांनी स्वतःच हे कबूल केले. वेगवेगळ्या राष्ट्रांची सामाजिक आणि आर्थिक संपन्नता/वैभव निर्माण करण्याची क्षमता किती आहे हे त्या त्या राष्ट्राच्या संस्कृतीवर अवलंबून असते असे ते म्हणतात. संस्कृती म्हणजे "वंशपरंपरागत मिळालेल्या नैतिक संवयी" असून त्या प्रतिमा, संवयी आणि सामाजिक मते या तीन्हींच्या संयोगातून बनते. ही सामाजिक मते बुद्धीला पटणारी आणि ज्यांची सर्वत्र लागू पडणार्‍या नियमानुसार रचना करणे शक्य नाही अशी असतात. आधुनिकतेचा स्पर्श न झालेल्या पण अंगवळणी पडलेल्या कांहीं संवयीनुसार प्रत्येक समाज चालतो. कधीही न बदलणारा आणि सर्वत्र लागू पडू शकेल असा कुठलाच अर्थशास्त्रविषयक नियम अस्तित्वात असू शकत नाहीं कारण फुकुयामांच्या मते अर्थशास्त्र हे सामाजिक जीवनावर आधारित असते आणि आधुनिक समाज स्वतःला कसे संघटित करतात या व्यापक बाबीपासून अलग करून ते समजून घेणे अशक्य आहे. या सिद्धांतावर फुकुयामांनी निष्कर्ष काढला कीं ज्या समाजात परस्परांबद्दल भरपूर विश्वास असेल आणि ज्या समाजात प्रामाणिकपणा आणि परस्परसहाय्य याबाबत आपापसात मान्य असलेले परिमाण असेल असेच समाज मोठ्या आणि परिवर्तनशील व्यावसायिक संस्था (business organisations) उभारू शकतील.

फुकुयामांनी अमेरिकन समाजाचा अभ्यास केला तसेच स्वतःच्याच समाजाला नीट ओळखण्यात अमेरिकन लोकांना आलेल्या अपयशाचाही अभ्यास केला . त्यानी चिनी, फ्रेंच, इटालियन, दक्षिण कोरियन, जपानी आणि जर्मन समाजांचासुद्धा सखोल अभ्यास केला. त्यांनी भारतीय समाजाचा अभ्यास केलेला नाहीं. तसेच The Clash of Civilizations and the Remaking of World Order सारख्या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक सॅम्युएल हंटिंग्टन यांनीही भारतीय समाजाचा अभ्यास केलेला नाहीं. फुकुयामा यांच्याप्रमाणेच हंटिंग्टन यांनीही संस्कृती आणि संस्कृतीवर आधारित व्यक्तित्व यालाच बहुतांश लोक महत्व देतात असे प्रतिपादन केले.

शीतयुद्धानंतरच्या जगात वेगवेगळ्या समाजातला सर्वात मोठा फरक राजकीय, आर्थिक किंवा कुठल्या विचारसरणींऐवजी सांस्कृतिक बाबींवरच आधारित असतो. आणि पूर्वजांपासून चालत आलेले, धार्मिक, भाषिक, ऐतिहासिक, नैतिक अशी मूल्ये, रीतीरिवाज व संस्था या गुणांनीच समाजातील व्यक्ती स्वतःला रेखतात. वेगवेगळ्या संस्कृतींच्या राजकीय आणि आर्थिक प्रगतीतील फरक मुख्यतः त्यांच्या-त्यांच्या संस्कृतीतील फरकामुळेच असतो असे त्यांना वाटते. पाश्चात्यांच्या "सर्वत्र लागू असलेल्या ऐटी"वर टीका करत ते त्यांच्या इतर संस्कृतींशी, मुख्यत्वेकरून मुस्लिम आणि चिनी संस्कृतीशी, होऊ घातलेल्या आणि जागतिक शांततेला गंभीर धोका असलेल्या आगामी संघर्षाबद्दल ताकीतही देतात.

हंटिंग्टन यांची वेगवेगळे लोक आणि त्यांची संस्कृती यांच्याबद्दलची सर्वसामान्य विधाने खूप सखोल संशोधनावर (आणि बर्‍याचदा केवळ संशोधनावरच) आधारित आहेत. पण त्यातली आपणा भारतीयांच्या दृष्टीने महत्वाची बाब म्हणजे त्यांच्या प्रबंधावरील चर्चेने "मला हिंदुसंस्कृतीखेरीज इतर संस्कृतीचा परिचय करून दिला" अशी स्वतःच दिलेली कबूली! फुकुयामा आणि हंटिंग्टन या दोघांनी जगातल्या सार्‍या संस्कृतींचा अभ्यास करून प्रबंध लिहिले पण नेमकी हिंदू संस्कृतीच का वगळली असावी? कदाचित् भारतीय लोक "या सम हा-sui generis" प्रकारचे लोक आहेत म्हणून असेल? कीं त्यांचे गोरे, काळे किंवा पिवळे असे त्यांच्या वर्णाप्रमाणे वर्गीकरण करता येत नाहीं म्हणून असेल? कीं ते ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्माचे नसल्याने असेल? भारतात बहुसंख्यांक असलेले हिंदू अशा मोठ्या प्रमाणात फक्त भारतात आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या एकुलत्या एक हिंदू राजवटीत-नेपाळमध्ये-रहातात. ते कुठल्याही साच्यात सहजा-सहजी बसत नाहींत. ते साम्यवादाच्या नंतरचे नाहींत आणि लोकशाहीच्या आधीचेही नाहींत. ते धर्माधिष्टित राज्यसंस्थेचे पुरस्कर्तेही नाहीत किंवा अधार्मिकसुद्धा नाहींत. त्यांची संख्या इतकी मोठी आहे कीं त्यांना दुर्लक्षिताही येत नाहीं पण ते इतरांपेक्षा इतके निराळे आहेत कीं त्यांचे सरसकट वर्गीकरणही करता येत नाहीं. आणि इतके गुंतागुंतीयुक्त असूनही ते तसे पूर्णपणे अपरिचितही नाहींत! ते सांसदीय लोकशाही राबवितात आणि त्यांच्यातले सुशिक्षित लोक सुरेख इंग्रजी बोलू शकतात.
पण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे भारतीय असणे याचा काय अर्थ आहे आणि ते भारताला एकवीसाव्या शतकात कुठे नेणार आहेत याबाबत उपेक्षा करणे किंवा भारतीयांच्याकडे दुर्लक्ष करणे हे कुणाच्याच हिताचे नाहीं. "The Protestant Ethic and the Spirit of Capitalism" या पुस्तकात त्याचे लेखक मॅक्स वेबर भाडवलशाहीच्या पश्चिम युरोपमधील झपाट्याने झालेल्या वाढीचा संबंध काटकसरी, मितव्ययी आणि ऐहिक सुखात रुची असणार्‍या पण धर्मनिष्ठ, कर्मठ लोकांच्या स्वभावाशी लावतात. भारतीयांत कांहीं स्वत:चे असे वैषिष्ट्य (USP*) आहे कां? असल्यास ते कुठले? फुकुयामांना अभिप्रेत असलेल्या परस्परांबद्दल भरपूर विश्वास असणार्‍या सामाजिक निष्ठेची भारतीयांत कदाचित् उणीव असेल पण या उणीवेमुळे भारतीय आपल्यासाठी कधीच एकादा टिकाऊ आणि भांडवलशाहीवर आधारित उज्ज्वल भविष्यकाळ निर्मूच शकणार नाहींत असा त्याचा अर्थ होतो कां? भारतीयांची स्वाभाविक अनैतिक प्रवृत्ती त्यांना एका खूप खोल अशा कायमच्या भ्रष्ट समाजाच्या गर्तेत खेचेल? कीं भारतीयांचा ऐहिक सुखांविषयी आस्था असलेला व्यवहारीपणा आणि त्यांचे *उपयुक्तता*वादी तत्वज्ञान त्यांच्या दोषांवर मात करून त्यांना आर्थिक सुबत्ता सातत्याने मिळवून देईल? साधनशुचितेचा विचार न करता कुठल्याही मार्गाने अंतिम यश मिळविण्याकडे असलेला त्यांचा स्वाभाविक, नैसर्गिक कल त्यांना नको त्या अनुत्पादक shortcuts च्या दलदलीत पोचवेल? कीं हा कमकुवतपणा, ही उणीवच त्यांना कुठलेही अडथळे पार करून विजय मिळविण्याची क्षमता देईल?
(*USP stands for Unique Selling Proposition. म्हणजे आपल्यात असे काय विशेष किंवा अद्वितीय गुण आहेत कीं ज्यामुळे आपण आपल्या व्यवसायात अतीशय यशस्वी होऊ किंवा आपल्याला खूप मोठे नेतेपद मिळेल, आपल्याला खास चांगली नोकरी मिळेल वगैरे.)
भारतीयांना सत्तेबरोबर मिळणार्‍या *अवांतर* सुखसोयींबद्दल (Perquisites) असलेल्या फाजील आकर्षणाचा परिणाम त्यांच्या राजनैतिक संस्थांच्या, राजनैतिक पद्धतींच्या अवमूल्यनात होईल? कीं त्यांची संवेदनशीलता आपली लोकशाही राज्यव्यवस्था जगविण्यासाठी आवश्यक असलेली नियमनाच्या आणि जुळवून घेण्याच्या प्रवृत्तीला उत्तेजन देईल? भारतीय लोक जाती-उपजातींवर आधारित दहशतवादाचा अवलंब करतील कीं त्यांचे व्यवहारज्ञान आणि अराजकाची नावड त्यांच्यातील (गरजेपोटी) एकत्र रहाण्यासाठी लागणारे व्यवहारचातुर्य बळकट करेल? त्यांच्यातले कांहीं नेते निधर्मीपणावर आधारित समाजरचनेला धोका निर्माण करतील कीं भारतात यशस्वी राजकारणाला निधर्मी राज्यव्यवस्थेशिवाय दुसरा कुठालाच पर्याय नाहीं हे त्यांना उमजेल? प्रादेशिक संवेदनशीलता वाढीला लागून भारताची शकले होतील कीं *सर्व-भारतीय-एक* ही भावना वाढेल? भारतीय उच्चभ्रू समाजाची भारताला एक जागतिक महाशक्ती बनविण्याची तीव्र इच्छा लष्करी साहस करायला प्रवृत्त करेल कीं तडजोडीला आणि स्वरक्षणाला महत्व देण्याकडे असलेला भारतीयांचा स्वाभाविक कल आपल्याला एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवेल? शेवटी माहिती तंत्रज्ञानातील अलीकडील उज्ज्वल यश भारताची प्रतिमा दीर्घकाळपर्यंत टिकेल अशा तर्‍हेने बदलेल कीं हे *स्वप्न* आगामी जागतिक मंदीपर्यंतच टिकेल?
हे पुस्तक या व असल्याच कांहीं प्रश्नांची उत्तरे शोधायचा प्रयत्न करेल. ही उत्तरे स्पष्ट, सडेतोड आणि निर्विवाद असतीलच असे नाहीं. पण ही उत्तरे "भारतीय कसा असतो" याचा आधार घेऊन भारताचे प्रारब्ध, भारताचे भवितव्य काय असेल याबद्दल मार्गदर्शन करतील अशी आशा आहे. वीसावे शतक संपायच्या सहा वर्षे आधी (१९९४ साली) हेन्री किसिंजर यांनी असे भाकित केले होते कीं एकवीसाव्या शतकात अमेरिका, युरोप, रशिया, जपान, चीन आणि कदाचित भारत या सहा महाशक्तींचाच दबदबा असेल. या वर्णनातील ’कदाचित’मुळे आलेली अनिश्चिततेची चुकचुकणारी पालच भारताचे भविष्य सतत ठरवेल? कदाचित् तसे होणार नाहीं पण भारताच्या भविष्याबद्दल कुठलेही मूल्यमापन गंभीरपणे करावयाचे असल्यास केवळ वरवर दिसणारी जमेच्या बाजूची संपत्ती (assets) आणि खर्चाच्या बाजूचे दायित्व (liabilities) यांच्या यांत्रिकपणे केलेल्या बेरीज-वजाबाकीपलीकडे जाऊन भारतीयांचे व्यक्तिमत्व आणि हे व्यक्तिमत्व बनविणारी त्यांची संस्कृती यांचाही अभ्यास व पृथःकरण करावे लागेल.
अशा तर्‍हेच्या अभ्यासानेच भारताच्या गुणदोषांचे अचूक आकलन बाहेरील जगाला होईल आणि त्यांचा भारतीयांशी होणारा विचारविमर्श जास्त परिणामकारक होऊ शकेल. सर्वात महत्वाची गोष्ट अशी कीं अशा अभ्यासावरून भारतीय नेतृत्वाला भारताची धोरणे अशा रीतीने आखता येतील कीं ती भारतीयांच्या मानसिक ठेवणीशी एकरूप असतील. आपल्या नागरिकांची स्वभाववैशिष्ट्ये आणि त्यांचे व्यक्तिमत्व याबाबतच्या चुकीच्या अनुमानांवर आखलेली धोरणे व्यवहारात उलथून पाडली जाऊ शकतील आणि त्यामुळे योजलेली राष्ट्रीय उद्दिष्टे साध्य करण्यात अपयशी ठरतील. भारतीय जनता ध्येयवादी, आदर्शवादी आहे आणि आम जनतेचे भले करण्याची बांधिलकी त्यांच्यात आहे असे समजण्यात भारताची राष्ट्रीय धोरणे आखणार्‍या नेत्यांनी मूलभूत चूक केली. आपल्या लोकप्रतिनिधींनी अलौकिक, अनन्यसाधारण अशी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली आणि ती साध्य करण्यासाठी पावलेही टाकायला सुरुवात केली, पण भारतीयांच्या संकुचित आणि वैयक्तिक हितसंबंधांच्या गुंतागुंतीच्या चक्रव्युहाकडे त्यांनी लक्ष दिले नाहीं. पण हे वैयक्तिक हितसंबंधच भारतीय समाजाला यशस्वीपणे काम करण्यास प्रवृत्त करतात हे ते विसरले. त्याचा परिणाम असा झाला कीं उच्च विचारसरणीवर आधारलेला जगातला सर्वात मोठा कायद्यांचा संग्रह एका बाजूला आणि त्याची कवडीच्या लायकीची कार्यवाही दुसर्‍या बाजूला! या उलट आपण आपल्या जनतेच्या स्वभाववैशिष्ट्यांचे प्रमाणिक मूल्यमापन केले असते तर आपली धोरणे समतेऐवजी कल्पकतेला, दयाभावनेऐवजी पेक्षा हिकमतीला, समाजकल्याणाऐवजी नफ्याला आणि सरकारी उद्योगांऐवजी खाजगी उद्योगांना प्रोत्साहन देणारी अशी आखली गेली असती. उदाहरणार्थ सामाजिक संपत्तीच्या न्याय्य वाटपाच्या दिशेने केलेले प्रयत्न श्रीमंतांकडून यशस्वीपणे हाणून पाडले जाताल तर असे प्रयत्न गरीब लोकांकडून उपयोगातही आणले न गेल्यामुळे वाया जातात हे आपल्याला आता-आताच लक्षात आले आहे. भारतीयांच्या अशा मूळ स्वभावाकडे पहाता संपत्तीच्या विपुल निर्मितीनेच करोडो गरीबांचे कल्याण होऊ शकेल.
या पुस्तकात भारतीयांची आणखी दोन स्वभाववैषिष्ट्यांवरही प्रकाश टाकला जाईल. एक आहे भारतीयांचा सगळ्यांना बुचकळ्यात टाकणारा दुर्दम्य आशावाद, आज मुंबईतील एकाद्या भयानक झोपडपट्टीत रहाणारा भारतीय माणूस एक दिवस खूप मोठा, कमीत कमी आजच्यापेक्षा मोठा, होण्याची आणि आपली मुले आपल्याहून जास्त चांगले आयुष्य जगण्याची आशा ठेवून असतो. श्रीमंतांकडून गरीबांकडे ठिबकत येणारी संपत्ती अपुरीच असते पण ती भारतीयांतील आशा न सोडण्याची नैसर्गिक अंगभूत प्रवृत्ती जिवंत ठेवण्यास पुरेशी ठरलेली आहे. भारतीयांचे दुसरे स्वभाववैशिष्ट्य आहे सातत्याने अडचणीला तोंड द्यावे लागल्यामुळे अंगात बाणलेली चिकाटी! मध्यमवर्गीय भारतीयसुद्धा आज वीज, पाणी, वाहन आणि वैद्यकीय सेवा यासारख्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी धडपडत असतो. अगदी गरीब असतात ते तर या मूलभूत गरजा न भागवताच जगतात. पण अशा तर्‍हेने सदैव प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागल्याने भारतीयांत एक कल्पकतेची, शोध लावण्याची आणि जगायची दुर्दम्य आणि असामान्य इच्छाशक्ती निर्माण झाली आहे.
शेवटी या पुस्तकाची विवेचनपद्धतीबद्दल दोन शब्द! एकाद्या समाजाचे चित्रण केवळ तत्वांवर आधारलेल्या उदाहरणांनी करणे अशक्य आहे. प्रत्येकाचे व्यक्तिमत्व गुंतागुंतीचे असते आणि संस्कृती तर फारच खोल असते त्यामुळे उदाहरणे, घटनांवर आधारित अनुमान आणि लेखकाच्या अनुभवांवर आधारलेले निष्कर्ष यांच्या सहाय्याने त्यावर प्रकाश टाकल्याशिवाय समाजाचे चित्रण कोरड्या आणि अपुर्‍या सिद्धांताच्या सहाय्याने करणे शक्य नाहीं. अर्थशास्त्रज्ञ एकूण एक समाजांना लागू पडतील अशा सर्वत्र लागू पडणार्‍या नियमांवर विसंबतात. पण जे एकाद्या समाजाचा अभ्यास त्या समाजाच्या खास स्वतःच्या संस्कृतीच्या उगमापासून करतात त्यांना एकाद्या ठळक आराखड्य़ापासून सुरुवात करून या समाजातील लोक रोजच्या जीवनात कसे वागतात, त्यांच्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद कसे असतात आणि त्यांचे सर्वसामान्य आचरण कसे असते अशा मुद्द्यांची भर घालत-घालतच करावे लागते. त्यामुळे या पुस्तकाचे स्वरूप एकाद्या व्यवहारशून्य प्रवचनाप्रमाणे नसून त्यात एकादी गोष्ट, एकादा प्रसंग, एकादी घटना, किंवा भारतीयांच्या रोजच्या जीवनातील एकादे सत्य सांगून भारतीयाच्या व्यक्तिमत्वाचे चित्रण करणारे असेल. या पुस्तकातील विद्वत्तेच्या अभावाचा कमीपणा या पुस्तकाच्या अधीक वाचनीयतेमुळे भरून निघेल अशी आशा लेखकाला आहे.
(इथे पहिले प्रकरण संपले!)

Comments

जनरलाइझ

--पण अशा तर्‍हेने सदैव प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागल्याने भारतीयांत एक कल्पकतेची, शोध लावण्याची आणि जगायची दुर्दम्य आणि असामान्य इच्छाशक्ती निर्माण झाली आहे.

ह्यातील भारतीय म्हणजे नक्की कोण?
भारतीय आणि त्यांची कल्पकता हा एक शोधनिबंधाचा विशय आहे.

पुस्तक अनेक गैरसमजुतींवर आधारलेले व खूप जनरलाइझ केलेले दिसत आहे.

'सुपररिच' सोडून सगळ्यांना हे लागू आहे

ज्या प्रतिकूल परिस्थितीत भारतीय रहातात आणि तुटपुंज्या पगारात पोट भरून वर प्रगती करतात, मुलाबाळांना डोनेशन देऊनही व्यावसायिक शिक्षणक्रमाला पाठवतात तिकडे पाहिले कीं मला तरी यात कुठलीच अतिशयोक्ती किंवा जनरलायझेशन वाटत नाहीं. फक्त 'सुपररिच' सोडून सगळ्यांना हे लागू आहे.
___________
जकार्तावाले काळे

प्रश्न

--तुटपुंज्या पगारात पोट भरून वर प्रगती करतात, मुलाबाळांना डोनेशन देऊनही व्यावसायिक शिक्षणक्रमाला पाठवतात

भारतातील किती टक्के लोकांना हे जमते?
किती टक्के लोक "नोकरदार" आहेत?
किती टक्के लोक स्वयंरोजगारातून पैसे कमावतात?

माझ्या आई-वडिलांनी असे केले

माझ्या आई-वडिलांनी असे केले.
मी इतका गरीब राहिलो नव्हतो पण तरीही थोडी-फार तोशीस पडलीच (अजून परदेशी फारसा राहिलो नव्हतो)
अजूनही माझ्या माहितीतले किती तरी लोक असे करतात.
टक्केवारी माहीत नाहीं. तुम्हाला माहीत असल्यास जरूर लिहा.
___________
जकार्तावाले काळे

ऐकीव माहितीच्या आधारे

ऐकीव माहितीच्या आधारे असे म्हणू शकतो की, भारतात ऑर्गनाइज्ड् सेक्टर मधे १५-२०% लोक काम करत असतील, ज्यांना दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पगार मिळतो. इतर सगळी मंडळी सेल्फ एम्प्लॉइड आहेत. त्यात शेतकरी आले, टप-या, ग्यारेज, दुधवाले...सगळे आले.

त्यामुळेच तुमचा "फक्त 'सुपररिच' सोडून सगळ्यांना हे लागू आहे." हा दावा फोल ठरतो.

शिक्षणाचे प्रमाण

भारतात किती लोक ग्र्याजुएट आहेत? शिक्षणाचे प्रमाण किती आहे?

 
^ वर