पाकिस्तानची आक्रमक खेळी; द ग्रेट गेम

अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात युरोपमधील सर्वात प्रबळ दोन राष्ट्रे, इंग्लंड व रशिया यांच्यात, भारतावर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी जबरदस्त स्पर्धा होती. भारतात पाय रोवलेल्या इंग्रजांना तेथून हुसकावून लावून तेथे आपले वर्चस्व स्थापन करावे अशी रशियाच्या राज्यकर्त्यांची मनीषा होती. हा हेतू साध्य करण्यासाठी या देशाने अनेक डावपेच वापरून व युद्धे लढून मध्य एशिया पादाक्रांत केला होता व आपले नियंत्रण पार अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत नेले होते. इंग्रजांना रशियन डावपेचांची चांगलीच कल्पना असल्याने ते अफगाणिस्तानमधे पाय घट्ट रोवून होते. त्या परिस्थितीत अफगाणिस्तानवरचे नियंत्रण ही या सर्व डावपेचांची किल्ली होती. शेवटी रशियन राज्यकर्त्यांच्या हे लक्षात आले की ब्रिटिशांचा विरोध मोडून काढून आपल्याला अफगाणिस्तानवर नियंत्रण करणे शक्य नाही व पर्यायाने भारतीय उपखंडही आपल्या हातात येणे शक्य नाही; तेंव्हा त्यांनी ब्रिटिशांबरोबर एक तह केला व अफगाणिस्तान हे या दोन प्रबळ शक्तीमधील एक निपक्ष व Buffer असे राज्य असावे याला मान्यता दिली. ब्रिटन व रशिया यांच्यामध्ये दोन शतकांहून अधिक काल चाललेल्या या डावपेचांना ‘द ग्रेट गेम’(The Great Game) असे नाव इतिहासकारांनी दिले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर, ब्रिटिशांच्या अफगाणिस्तान बरोबरच्या उत्तम संबंधाचा वारसा भारताला मिळाला होता. भारताने तो 1979 पर्यंत चांगला संभाळला होता. नंतरच्या कालात भारताने अनेक व्ह्यूहात्मक चुका केल्या व अफगाण लोकांच्या मनात असलेल्या भारताबद्दलच्या प्रेमाला ओहोटी लागते की काय असे वाटू लागले.

या सर्व कालात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध सुधारण्याचा पाकिस्तानने अखंड प्रयत्न केला. परंतु अफगाणी लोकांच्या मनात असलेले पाकिस्तान बद्दलचे संशयाचे जाळे काही दूर झाले नाही.

2001 मधे नॉर्दर्न अलायन्सच्या फौजांनी अमेरिकेच्या मदतीने तालिबानचे उच्चाटन केले व भारताला अफगाणिस्तानमधे परत प्रवेश करण्याची संधी मिळाली. या वेळी मात्र कोणतीही व्ह्युहात्मक चूक न करता व वेळकाढूपणा न करता अतिशय धोरणीपणाने भारताने आपले महत्व अफगाणिस्तानमधे वाढवण्यास सुरवात केली.या सर्व गोष्टींमागचे भारताचे धोरण अगदी स्पष्ट आहे. प्रत्येक क्षेत्रात अफगाणिस्तानला मदत देऊन अफगाणी लोकांच्यात आपली प्रतिमा उजळ करणे, लोकांच्या मनात भारताबद्दल आपुलकी निर्माण करणे व पाकिस्तानचा त्या देशातील प्रभाव कमी करणे हे हेतू या धोरणामागे होते. पाकिस्तान सरकार अर्थातच यामुळे अतिशय नाखुष आहे. पाकिस्तान सरकारची गुप्तचर संघटना व त्यांचे पित्ते तालिबान हे अतिरेकी कारवाया करून भारताच्या या प्रयत्नांत खीळ घालण्याचा सतत प्रयत्न करीत आहेत. भारतीय दूतावासांपुढे बॉम्बस्फोट करणे, निरनिराळ्या प्रकल्पातील भारतीय अभियंत्यांचे अपहरण व खून या सारख्या कारवाया त्यांनी सतत चालू ठेवल्या आहेत. पाकिस्तानमधील राजकारणी आता असे मानू लागले आहेत की भारत पाकिस्तानच्या हातातून, अफगाणिस्तान हिसकावून घेत आहे. अफगाणिस्तानमध्ये चालू असलेले भारत आणि पाकिस्तान यांच्यातील डावपेच, जुन्या ग्रेट गेमची आठवण करून देत असल्याने ग्रेट गेम भाग 2, परत चालू झाली आहे असे म्हटले जाते. या वेळेस पूर्वीप्रमाणेच अफगाणिस्तान हेच या गेमचे बक्षीस आहे यात शंकाच नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या गेममधे आणखी बरेच नवे खेळाडू भाग घेण्यास इच्छूक आहेत असे आता वाटू लागले आहे. बहुतांशी अमेरिकन सैन्य, 2014 सालापर्यंत अफगाणिस्तान सोडून जाणे अपेक्षित आहे. यामुळे जी पोकळी निर्माण होणार आहे त्याचा फायदा करून घेऊन अफगाणिस्तानमध्ये चंचू प्रवेश करण्याला आता चांगली संधी आहे असे बर्‍याच राष्ट्रांना आता वाटते आहे.

16 एप्रिल 2011 या दिवशी, काबूल शहरात, पाकिस्तानचे पंतप्रधान युसूफ रझा गिलानी व अफगाणिस्तानचे राष्ट्रपती हमीद करझाई यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तान सरकारने असा प्रस्ताव ठेवला आहे की अफगाणिस्तानने भविष्यकालामध्ये, अमेरिकेवरचे परावलंबित्व सोडून देऊन पाकिस्तान व त्याचा सच्चा दोस्त चीन यांच्याबरोबर एक करार करून दीर्घ कालीन मैत्री संबंध दृढ करावेत. या करारामुळे अफगाण सरकार व तालिबान यांच्यामध्ये पाकिस्तान सरकारला समेट घडवून आणता येईल व युद्धग्रस्त अफगाण अर्थव्यवस्था पाकिस्तानी मदतीने सुदृढ होऊ शकेल.

या बैठकीत पाकिस्तानी पंतप्रधानांनी अफगाण सरकारला सांगितले की अमेरिकन सरकारने दुटप्पी वर्तन करून त्या दोन्ही देशांचा विश्वासघात केला आहे. अमेरिकेचे तालिबानशी युद्ध चालू आहे व त्याच वेळी ते तालिबानशी बोलणी करण्यासाठीही उत्सूक आहेत. पाकिस्तानच्या मते अमेरिकेला असलेल्या आर्थिक अडचणींमुळे तो देश मोठ्या कालासाठी अफगाणिस्तानला मदत करू शकणार नाही व या कारणासाठी अफगाणिस्तानने अमेरिकेची मदत नाकारून अतिशय विश्वासू अशा चीनची मदत घेतली पाहिजे. मिया गिलानी यांनी अफगाण अध्यक्षांना असेही सांगितले की अमेरिकेची साम्राज्यवादी धोरणे या मागे असून अफगाणिस्तानने शांतीसाठी चालू असलेल्या वाटाघाटींवर स्वत:चे स्वामित्व प्रस्थापित केले पाहिजे.

पाकिस्तानच्या अफगाणिस्तानमधे अमेरिकेच्या ऐवजी चीनला स्थान देण्याच्या या प्रयत्नांमागे अर्थातच मोठे राजकारण आहे.

या बैठकीच्या काही दिवस आधी एक अमेरिकन अधिकारी माइक म्यूलेन याने पाकिस्तान हे अतिरेक्यांचे राष्ट्र असल्याचा आरोप केला होता तर विकिलीक्सच्या नवीन गौप्यस्फोटाप्रमाणे अमेरिकेत पाकिस्तान बद्दल अतिशय संशयाचे वातावरण असल्याचे सांगितले गेले होते. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान गिलानी व त्यांच्या सोबत गेलेले सैन्यप्रमुख कियानी व आयएसआय प्रमुख शुजा पाशा यांनी अमेरिकेविरुद्ध एक सरळ खेळी खेळावी हे मोठे रोचक वाटते आहे.

या सर्वांच्या मागे, अमेरिका व अफगाणिस्तान यांच्या मध्ये, दीर्घ कालावधी साठी अफगाणिस्तानची सुरक्षा व्यवस्था काय असावी या संबंधीची जी बोलणी चालू आहेत ती कारणीभूत असावीत असा काही तज्ञांचा अंदाज आहे. 2014 नंतर अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैनिकी तळ असावेत किंवा नाही हा खरा वादाचा मुद्दा आहे. अमेरिकन मुत्सद्यांना असे वाटते की असे तळ प्रथापित केले नाहीत तर अफगाणिस्तान पूर्वीप्रमाणे पाश्चिमात्य जगाच्या विरूद्ध कारवाया करणार्‍या अतिरेक्यांचे परत एकदा केंद्र बनेल. स्वाभाविकपणे रशिया व इराण या देशांचा असे अमेरिकन तळ अफगाणिस्तानमधे स्थापन होण्यास विरोध आहे.

वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तसंस्थेने मियां गिलानी यांच्या या बैठकीचे वृत्त प्रथम प्रसृत केले आहे. या वृत्तामुळे साहजिकच अमेरिकेतील पाकिस्तान तज्ञांमध्ये अत्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही जणांना पाकिस्तानने विश्वासघात केला आहे असे वाटते. अमेरिकन अध्यक्ष निवडणुकीच्या मोहिमेवर आहेत. त्यांच्या शासनात पुढे मोठे बदल अपेक्षित आहेत व अर्थ व्यवस्था एकूण डळमळीतच आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या या आक्रमक खेळीला वॉशिंग्टनकडून काय प्रतिसाद मिळेल हे बघणे मोठे रोचक ठरावे.
अफगाणिस्तानमध्ये आता एका बाजूला पाकिस्तान, चीन व सौदी अरेबिया ही राष्ट्रे आहेत तर दुसर्‍या बाजूला अमेरिका, भारत, इराण आणि रशिया ही राष्ट्रे आहेत. यापैकी पाकिस्तान,चीन व सौदी अरेबिया हे एकत्र आले आहेत तर इराण व रशिया यांचे अमेरिकेबरोबर फारसे सख्य नसल्याने यांना गट म्हणणेही योग्य नाही. अशा परिस्थितीत ग्रेट गेमचा तिसरा अध्याय सुरू झाला आहे असे म्हटले तरी फारसे अयोग्य ठरू नये.

पाकिस्तानचे अर्थ मंत्री सध्या अमेरिकेची आर्थिक मदत मिळवणे व आयएमएफ कडून पुढचा कर्जाचा हप्ता मिळवणे या कामांसाठी अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत याच वेळी पाकिस्तानने ही आक्रमक खेळी का खेळली असावी? याचे काही अंदाज करणे शक्य आहे. एकतर पुढच्या काळात स्वत:ची उपद्रव किंमत वाढवून, त्याच्या बदलात अमेरिकेकडून जास्त पैसे उकळणे हा हेतू असू शकतो. अफगाणिस्तानमध्ये भारताला मिळणारे महत्व वाढत आहे व पाकिस्तानच्या दृष्टीने ही खरी डोकेदुखी आहे. यावर उपाय म्हणून चीनला मधे आणून अमेरिकेवर दबाव वाढवण्यासाठी पाकिस्तानने हे उद्योग सुरू केले असण्याची शक्यता आहे.

कारणमीमांसा काहीही असो अफगाणिस्तान मधील ग्रेट गेमचा तिसरा अध्याय आता सुरू झाला आहे व यात चीन हे नवे राष्ट्र प्रवेश घेण्यास इच्छूक आहे हे स्पष्ट आहे. भारताची पुढची खेळी आता काय असेल? ही एक विचार करण्यासारखी गोष्ट ठरावी. राजकारणाच्या अभ्यासकांसाठी ही एक मोठी रोचक संधी उपलब्ध झाली आहे हे मात्र नक्की.

28 एप्रिल 2011

या विषयावरचे माझे आणखी काही लेख

ही वाट दूर जाते

ग्रेट गेम भाग 2

Comments

भारतीय मुत्सद्दी

लेख सुंदरच ! आंतरराष्ट्रीय राजकारणात वर-वर दिसणा-या खुणा खूप खोलवर जातात हे नेहमीच दिसते.

एक मात्र नेहमीच जाणवत राहते ते म्हणजे भारतीय मुत्सद्द्यांना अशा खेळी - डावपेच करणे जमते की नाही? जेणे करुन पाकीस्तानमधील लोक त्यांच्या उपक्रमावर असे लेख भारताबद्दल लिहितील?

भारताचे परराष्ट्र धोरण

नेहरू आणि त्यांची परंपरा या काळातील परराष्ट्र धोरण हे सर्व दृष्ट्या फसलेले डिझास्टर होते असे म्हणले तरी चालेल. नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणात आमुलाग्र सुधारणा झाली. त्यानंतर भारताने घेतलेली बहुतेक पाऊले अतिशय योग्य ठरली आहेत. माझ्या सॅन्डप्रिन्टस या ब्लॉगवर या संबंधातील बरेच लेख आहेत. ज्यांना रुची असेल ते वाचू शकतात.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

छान लेख

लेखात एका महत्वाच्या पश्नाला येथे वाचा फोडली आहे. वाचनीय झालाच आहे एवढेच नाही तर उत्सुकता वाढवणारा आहे.
या निमित्ताने एक्स्प्रेस चा आजचा राजा मोहन यांचा लेख पाहिला (अमेरिकन ईगल इन् अफगान केज).

लेखाला जी रशियाच्या साम्राज्याची पार्श्वभूमी दिली आहे ती मात्र फारशी पटणारी वाटली नाही. म्हणजे रशियाचा या भागातील उतरता प्रभाव पाहिल्यावर. मध्य अशियात चीनला रस असणे स्वाभाविक आहे. विशेषतः त्यांचा सध्याचा अशांत भूभाग या सर्वाला जवळ असल्याने. कदाचित रशिया ऐवजी चीन यावेळी खेळी द ग्रेट गेमची खेळी खेळते आहे असे तुम्हाला म्हणायचे असेल.

पाकिस्तान-अमेरिका संबंधांसाठी अफगाणिस्तान हे सध्या (गेले कित्येक वर्षांपासून) एक महत्वाचे पान आहे. अमेरिकन सरकारने तालिबान्यांबरोबर बोलणी केल्यास पाकिस्तानची रणनिती कमजोर ठरू शकते.
अफगाणिस्तानातील अंतर्गत विरोध (टोळ्यांमधील भांडणे) आणि पाकिस्तानातील अंतर्गत विरोध (लष़्कर-पीपीपी) या दोन्हीच्या पार्श्वभूमीवर अशी चर्चा महत्वाची ठरते.

पाकिस्तान-चीन याबरोबर हमीद कर्झाई अशी पाकिस्तानची युतीची खेळी अनपेक्षित वाटली. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिचा भाग पाकिस्तानच्या असुरुक्षित भावनेत असू शकेल किंवा चीनच्या स्वाभाविक हितसंबंधांचा भाग असू शकतील. यावर अजून प्रकाश पुढील घडामोडींनींच पडणार आहे.

भारत अफगाणिस्तान यांच्या बद्दलच्या चांगल्या संबंधांना पाकिस्तान-भारत संबंध आणि सोवियत युनियनचा प्रभाव देखिल जबाबदार होते. भारताने नेहमीच अफगाणिस्तान बरोबर विशेष हितसंबध ठेवले आहेत. (जसे भारताने इराण बरोबर सौहार्दाचे संबंध ठेवण्याचे नेहमीच ठेवले आहेत.) याशिवाय या भागातील लोकांबरोबर भारताची सांस्कृतिक जवळीक आहे हे वेगळे.

अजून वाचण्याची इच्छा झाली आहे. पुढलेही प्रकरण येऊ द्या.

प्रमोद

रशियन साम्राज्याची पार्श्वभूमी

लेखाला जी रशियाच्या साम्राज्याची पार्श्वभूमी दिली आहे ती मात्र फारशी पटणारी वाटली नाही.
द ग्रेट गेम या नावाचे वैशिष्ट्य आणि महत्व (सिग्निफिकन्स) वाचकांच्या लक्षात यावे म्हणून रशियन साम्राज्याची पार्श्वभूमी दिली आहे. हा लेख पाकिस्तानच्या एका खेळीबद्दल आहे. अफगाणिस्तान त्यांच्या या आमिषाला बळी पडण्याची शक्यता कमीच आहे. आता उत्सुकता आहे ती भारताच्या पुढच्या खेळीची.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

कोणती?

--आता उत्सुकता आहे ती भारताच्या पुढच्या खेळीची.

काय असु शकेल? असावी?

आवडला

हा लेख आवडला. ग्रेट गेमची शक्यता आणि चीनचा प्रवेश हे समजू शकत असलो, तरी पाकीस्तान-अफगाणिस्तान ह्यांच्या संबंधांबद्दल शंका वाटते. विशेष करून अफगाण हे पाकीस्तानचे शब्द मान्य करतील असे वाटत नाही. एकतर भारताची अफगाणिस्तानात, मनुष्यबळापासून ते अगदी शिक्षणसंस्था बांधण्यापर्यंत बरीच गुंतवणूक आहे. शिवाय आज पाकीस्तानच्या राजकारण्यांवर कुणाचा विश्वास असेल असे वाटत नाही. त्याला जशी त्यांची आजची स्थिती कारण आहे तशीच ऐतिहासीक कारणे देखील आहेतच. रशियाचे वर्चस्व कमी होण्यासाठी अमेरिकेने पाकीस्तानचा लाँचपॅड सारखा वापर केला आणि पाकीस्तानने पण राजकीय महत्वाकांक्षेपोटी त्यात मदत करत, अफगाणमधे जे काही नागरी सरकार होते ते उध्वस्त केले...

एक गंमतशीर अनुभव एकदा वॉशिंग्टनला आला होता. एका टॅक्सीतून दुतावासांच्या भागात जात होतो. (उत्तर भारतीय/पाकीस्तानी वाटणारा) ड्रायवर गप्पा मारत होता. माझे बोलताना लक्ष फक्त तो लांबून नेत नाहीना याकडेच होते. पण तेव्हढ्यात त्याचे अडकवलेले आयडी दिसले. नाव मुसलमानी होते आणि कदाचीत त्याला दुतावासाशी संबंधीत असल्यामुळे असेल, पण भारताबद्दल जास्तच आणि आस्थेने प्रश्न विचारत होता. म्हणून उलट विचारले की तुम्ही पाकीस्तानातले का? तात्काळ उत्तर मिळाले, "छे छे! मी तुमचा मित्र आहे! मी अफगाण आहे." मग पाकीस्तानवर तोंडसुख घेतले, मी केवळ ऐकण्याचे काम करत होतो. असो.

अमेरिका पाकीस्तानला एकटे सोडणार नाही आणि अफगाणच्या जवळ येऊन देणार नाही हे वास्तव आहे. म्हणूनच एकी़कडे शिव्या देत दुसरीकडे मदत चालते. (आत्ताच ५० द्रोण क्षेपणास्त्रे पाकीस्तानला दिली). १०-१२ वर्षांपुर्वी सीआयएच्या फॅक्टबूकमधे वाचल्याप्रमाणे पाकीस्तान हे त्यांच्या दृष्टीने २०१५ पर्यंत बुडीतखात्याचे राष्ट्र होणार आहे. त्यात एक काळजी म्हणजे अण्वस्त्रे आणि दहशतवाद्यांसाठी असलेली सुपिक जमीन. जो पर्यंत भारतावर हल्ले होत होते तो पर्यंत चालले. पण आता अमेरिका आणि युरोप पण वेठीस धरला गेला आहे. थोडक्यात समिकरण एकदम सोपे नाही. वरकरणी कसेही चित्र दिसले तरी. फक्त भारत त्यात स्वतःचा (राष्ट्र म्हणून) स्वार्थ कसा बघतो आहे हे आपल्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.

लेख आवडला

नंतर वेळ काढून प्रतिसाद देईन.

छान लेख !

उत्तम माहिती मिळाली.
पुढे वाचण्यास उत्सुक आहे.

रोचक, रंजक

गेल्याच आथवड्यात डॉन या पाकिस्तानी वृत्तपत्रातील एका नेखा नुसार यंदा फक्त करपात्र लोकांपैकी फक्त १०-२०% लोकांनीच कर भरला आहे. हे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. सध्या पाकिस्तानी अर्थव्यवस्था ही चीन व त्याच बरोबर अमेरिकेच्या मदतीवरच अवलंबून आहे. सरकार नामधारी आहे. तेव्हा अश्या दुबळ्या पाकिस्तानच्या प्रस्तावाचे स्वागत करण्यात अफगानिस्तान तयार होईलसे वाटत नाही.

बाकी चीनला इथे इंटरेस्ट असला तरी आर्थिक दृष्ट्या अधिक फायदेशीर भारताच्या विरोधात जाऊन दुबळ्या पाकिस्तानला त्याचा किती फायदा चीन मिळवून देईल हा बघण्यासारखा मुद्दा आहे

बाकी लेख् रोचक, रंजक तर आहेच शिवाय (खास चंद्रशेखर फेम) अभ्यासपूर्ण आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर