वर्ल्ड कप आणि नंतरचा गोंधळ

अखेरीस वर्ल्ड कपचा चकवा काल रात्री एकदाचा संपला. गेले काही दिवस माध्यमांनी नुसता उच्छाद आणला होता. बातम्यांच्या मधे वर्ल्ड कप, चर्चा सत्रे सुद्धा फक्त वर्ल्ड कप बद्दलची. एका क्रीडास्पर्धेला किती महत्व द्यायचे? टीव्ही वाहिन्यांनी तर ताळ तंत्र सोडूनच दिले होते. ही स्पर्धा खूप रंगली बीसीसीआय (BCCI) या संस्थेकडून पगार घेत असलेल्या व अंगावरच्या कपड्यांवर सहारा असे नाव छापून घेऊन खेळणार्‍या संघाने, शेवटच्या तीन सामन्यात उत्कृष्ट खेळ केला व ही स्पर्धा जिंकली. हे सामने बघायला खूप मजा आली. वगैरे बाबतीत दुमत असण्याचे काहीच कारण नाही. आज सकाळी सहज बीसीसीआय हा खरोखर काय प्रकार आहे हे बघावे म्हणून जालावर जरा शोध घेतला. जी माहिती कळली ती मोठी रोचक निघाली.

The Board of Control for Cricket in India (BCCI), headquartered at Mumbai, is the national governing body for all cricket in India. It's not the apex governing body in India. The board was formed in December 1928 as BCCI replaced Calcutta Cricket Club. BCCI is a society, registered under the Tamil Nadu Societies Registration Act. It often uses government-owned stadiums across the country at a nominal annual rent. It is a "private club consortium". Basically to become a member of a state-level association, one needs to be introduced by another member and also pay an annual fee. The state-level clubs select their representatives (secretaries) who in turn select the BCCI officials. BCCI are not required to make their balance sheets public. In the past, tax exemptions were granted to BCCI on the grounds as promoting cricket was a charitable activity but for the last three years the IPL has questioned this.
As a member of the International Cricket Council (ICC), it has the authority to select players, umpires and officials to participate in international events and exercises total control over them. Without its recognition, no competitive cricket involving BCCI-contracted Indian players can be hosted within or outside the country.

कलकत्ता क्रिकेट क्लबचा उत्तराधिकारी असलेले हे बोर्ड म्हणजे तामिळ नाडू सोसायटीज रजिस्ट्रेशन कायद्याच्या अंतर्गत पंजीकरण झालेली एक सोसायटी आहे. नाममात्र भाड्याने ही सोसायटी सरकारी मैदाने भाड्याने घेऊन त्यावर सामने भरवत असते. प्रत्यक्षात ही सोसायटी अनेक खाजगी क्लबांनी मिळून बनवलेली आहे. आपला जमाखर्चाचा अहवाल सार्वजनिक करण्याचे कोणतेही बंधन या सोसायटीवर नाही, ही संस्था धर्मादाय संस्था आहे या कारणासाठी. या संस्थेला आयकर भरावा लागत नाही. परंतु गेली 3 वर्षे चालू असलेली आयपील स्पर्धा ही संस्था धर्मादाय असून कशी भरवते? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

ही सर्व माहिती येथे बारकाईने देण्याचे कारण म्हणजे वरील सर्व माहितीनुसार बीसीसीआय ही संस्था भारत सरकारने पुरस्कृत केलेली किंवा शासकीय संस्था असल्याचे दिसत नाही. आता साहजिकच असा प्रश्न पडतो की बीसीसीआय च्या संघाला भारताचा अधिकृत संघ या नावाने का ओळखले जाते? मला तरी उत्तर सापडले नाही.
अर्थात हा वरील मुद्दा हा माझ्या लेखाचा विषय नाही. मला सांगायचे आहे हे कालचा सामना संपल्यावर जे काय घडले त्या बद्दल. रात्री 10-45 च्या सुमारास सामना संपला. काल दिवसभर रस्त्यावर सामसूमच होती. संध्याकाळी रस्त्यवरून चारचाकी चालवताना आपण 1950 किंवा 1960 सालच्या पुण्यात वाहन चालवतो आहोत की काय असा भास होण्यासारखी एकूण परिस्थिती होती. नंतर सुद्धा वाहनांचे, त्यांच्या भोंग्यांचे, कसलेच आवाज येते नव्हते. एकूण संध्याकाळ मोठी शांत व आल्हादकारक होती यात शंकाच नाही.
बीसीसीआय च्या संघाने रात्री 10.45 च्या सुमारास सामना जिंकला व काही मिनिटात परिस्थिती पालटली. रस्ते अचानक तुडूंब भरून वाहू लागले. दुचाक्या, चारचाक्या यामधून प्रामुख्याने तरूण वर्ग बाहेर पडू लागला व चित्र विचित्र आवाज, शिट्या यांनी आसमंत दुमदुमून गेले. हजारो फटाके वाजू लागले. वर आकाशात आतशबाजी सुरू झाली. मधून मधून काही घोषणा ऐकू येत होत्या. जरा लक्ष देऊन ऐकल्यावर या घोषणा " जय शिवाजी! जय भवानी!" किंवा " शिवाजी महाराज की जय!" या आहेत हे लक्षात आले. मला जरा गोंधळ्यासारखे झाले. क्रिकेट सामना व शिवाजी महाराज किंवा भवानी देवी यांचा काय बरे संबंध असावा! असा विचार केला. परंतु तसे काही कारण दिसले नाही.
अर्धा तास हा गोंधळ कमी होईल म्हणून वाट बघितली. गोंधळ कमी होण्याचे काही नामनिशाण दिसले नाही. वरच्या मजल्यावर जाऊन खिडकीतून डोकावून बघितले. दुचाकी, चारचाकी मधली मंडळी, नुसती ओरडाआरड करत गोल गोल फिरत होती. हा प्रकार रात्री एक दीड पर्यंत बहुदा चालू असावा. मला नक्की कळले नाही कारण सुदैवाने मला झोप लागली.

सकाळी जाग आल्यावरही, "ही मंडळी असे का करत होती?” हा विचार काही मनातून जाईना. माणसाच्या भावना जेंव्हा पराकोटीच्या होतात त्याच वेळी तो असे वर्तन करतो. मग एका क्रीडा सामन्याने भावना अशा टोकाला कशा जाऊ शकतात? हे कोडे मोठे अभ्यास करण्याजोगे आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे टीव्ही आणि माध्यमे आहेत याबद्दल शंकाच नाही. या माध्यमांनी गेला महिना दीड महिना ताळतंत्र सोडून जे महत्व या सामन्यांना दिले आहे त्या मुळेच दर्शकांच्या भावना एवढ्या टोकाला जाऊ शकत असल्या पाहिजेत. जो संघ देशाचा अधिकृत संघ सुद्धा नाही त्या संघाच्या चांगल्या प्रदर्शनाचा आणि देशाबद्दलच्या अभिमानाचा खरे म्हणजे संबंध सुद्धा येऊ नये. परंतु प्रत्यक्षात मात्र हा क्रिकेटचा सामना म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्या सारखे तरूण वर्गाला का वाटावे? कालच्या सामन्यात हा सामना मुंबईला म्हणजे महाराष्ट्रात खेळला गेला व इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू असे ज्याच्याबद्दल म्हटले जाते तो सचिन तेंडुलकर, महाराष्ट्रीय आहे एवढाच खरे म्हणजे महाराष्ट्राचा संबंध होता. तरी सुद्धा, तरूण वर्ग शिवाजी आणि भवानी संबंधित घोषणा का बरे करत असावा? बीसीसीआय संघाचा सामना व देशप्रेम यांचा कसा संबंध जोडता येतो? प्रश्नच प्रश्न! उत्तरे मला तरी न मिळणारी! न सापडणारी!
3 एप्रिल 2011

लेखकांना सूचना - कृपया दोन परिच्छेदांमध्ये एक ओळीचे अंतर सोडावे त्यामुळे वाचन सुलभ होते. सध्या अशी सोय करून दिली आहे. हीच सूचना इतर सर्व लेखकांसाठीही येथेच देण्यात येत आहे. - संपादक मंडळ.

लेखनविषय: दुवे:

Comments

गोंधळाचा बराच त्रास झालेला दिसतोय.

आम्हालाही झाला. विशेषतः आम्ही बाहेरुन फिरुन आल्यावर् जास्तच जाणवला.
पण असाच जल्लोष १९९८ ला का कधीतरी फ्रांस ने फिफा विश्वचषक(फुट् बॉल) जिंकल्यावर आख्ख्या फ्रांस मध्ये झाला. आख्खा फ्रांस रस्त्यावर आल्याचं टीव्हीवर पाहिलय.
म्ह़णजेच केवळ भारतातच हे होतं असं नाही. प्रगत राष्ट्रातही रस्त्यावर उतरुन जल्लोष होतो.
भावना (खूप् चांगल्या किंवा खूप् वाइट) मांडायला लोक् रस्त्यावर् उतरतात हे खरच. कधी इजिप्त - ट्युनिशियाच्या , कधी भारत,फ्रान्स किंवा ब्राझिलच्या. भावनावेगात उत्सुर्तपणे जनता एकत्र होते.
संघ बीसीसीआयचा आहे हे खरच. पण इतका अफाट, अभूतपूर्व लोकाश्रय - लोकप्रियता मिळाल्यावर सरकारी/खाजगी टीम असणं ही औपचारिकता असते.
सरकारची कुणीही व्यक्ती बी सी सी आय ची पदसिद्ध अधिकारी नसेलही, पण् विविध राज्य सरकारांनी आणि खुद्द केंद्र शासनानी जर ह्याचा विजय्-पराभव इतका प्रचंड महत्वाचा बनवलाय् तर "ही भारताची टीम नाही" हे विधान तांत्रिकदृष्ट्या बरोबर ठरतं .

त्यांचा कारभार, नियम कायदे कानू ह्याबद्दल अधिक चर्चा वाचायला आवडेल.
आपल्या उत्साहानी उगाच दुसर्‍याच्या डोक्याला ताप होउ नये हे सर्वांच्याच मनावर बिंबवता आलं तर् उत्तम.

एक निरिक्षण्;- इतक्या रात्री भरपूर लोक फिरताना पाहिले होते, पण् ह्यावेळेस तरुणांची आणि त्यातही महिलांची/तरुणींची लक्षणीय उपस्थिती, त्यांचा रात्री उशिरापर्यंत जोरदार दिलेल्या (म, भ ह्यांच्या बाराखडीतल्या )शिव्या-घोषणांमधील् आक्रमक सहभाग आणि त्यांना रस्त्यावर दणक्यात (उंची /महागडे) मद्य प्राशन करताना बघुन आश्चर्य वाटलं आणि काहीतरी सामाजिक बदल घडतोय हे जाणवलं.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत शिव्यांसाठी चक्क उत्तर भारतीय भाषेचा आसरा घ्यावा लागावा ह्याचाही खेद् वाटला ;-)

बहुदा अर्ध शहरी आणि मागास वातावरणात आणि पारंपरिक मूल्यव्यवस्था असणार्‍या कुटुंबात गत आयुष्य गेल्यानं ह्या गोष्टींचं नवल वाटत असावं.

--मनोबा

स्वाभाविक

पण् विविध राज्य सरकारांनी आणि खुद्द केंद्र शासनानी जर ह्याचा विजय्-पराभव इतका प्रचंड महत्वाचा बनवलाय्

त्यांना स्वस्त आणि मस्त अफू सापडली!

कारण

जरा लक्ष देऊन ऐकल्यावर या घोषणा " जय शिवाजी! जय भवानी!" किंवा " शिवाजी महाराज की जय!" या आहेत हे लक्षात आले. मला जरा गोंधळ्यासारखे झाले. क्रिकेट सामना व शिवाजी महाराज किंवा भवानी देवी यांचा काय बरे संबंध असावा! असा विचार केला. परंतु तसे काही कारण दिसले नाही.

समूह उन्माद व्यक्त करताना अशी घोषणा वजा ओवी हासडली की वातावरणात चैतन्य सळसळते असा अनुभव आहे. कुठलाही भावनातिरेघ झाला की विवेक काबुत रहात नाही. त्याला वाट मोकळी करुन द्यावी लागते.

या संस्थेला आयकर भरावा लागत नाही. परंतु गेली 3 वर्षे चालू असलेली आयपील स्पर्धा ही संस्था धर्मादाय असून कशी भरवते?

क्रिकेट हा केवळ खेळ नसून धर्म आहे. इंग्लंडवासीयांचा जिथे जिथे संबंध आला तिथे तिथे हा धर्म प्रसार झाला.
धर्म व राजकारण तसेच धर्म व अर्थकारण याचा संबंध जुनाच आहे.

प्रकाश घाटपांडे

खेळातील विजय व घोषणा

या अशा प्रकारच्या घोषणा देणे ही भारतीय खासियत असावी. इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरूद्ध ऍशेस जिंकल्या तेंव्हा कोणी "जय एलिझाबेथ" म्हणून घोषणा दिल्याचे ऐकिवात नाही. तसेच युरोपियन देशात एखादी स्पर्धा जिंकली तर मंडळी पब मधे जाऊन बेहोश होतात. गावभर दुचाकी व चौचाकी मधून आरडा ओरडा करत फिरत असल्याचे ऐकिवात नाही. हे आपलेच वैशिष्ट्य असावे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

असे नाही

तसेच युरोपियन देशात एखादी स्पर्धा जिंकली तर मंडळी पब मधे जाऊन बेहोश होतात. गावभर दुचाकी व चौचाकी मधून आरडा ओरडा करत फिरत असल्याचे ऐकिवात नाही. हे आपलेच वैशिष्ट्य असावे.

असे नाही. इटली, फ्रान्स, स्पेन अगदी इंग्लंडमध्येही आवडती टीम जिंकली तर गावभर जल्लोषात मिरवणुका निघतात. आपला संघ जिंकल्यावर जल्लोष करणे ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे असे वाटते.

२०१०चा फिफा वर्ल्डकप स्पेनने जिंकल्यावर माद्रिदमध्ये झालेला हा जल्लोष बघावा. अशा मॅचसाठी युरोपातील शहरांमध्ये मुख्य चौकात मोठ्या स्क्रीनवर शेकडो लोक मॅच बघतात. नंतर जिंकल्यावर ते शांतपणे घरी जाणे कसे शक्य आहे?

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

मँचेस्टर का कुठल्याशा ब्रिटिश

फुटबॉल टीमचे कट्टर समर्थक "हूलिगन्स" नावाने (कु) प्रसिद्ध आहेत. हे धिंगाणा घालायला पब अन् बार मध्ये जायची वाट बघत नाहित. माझ्या तिथल्या वास्तव्यात ह्यांची टीम(युरोपिअन् क्लब् फुट्बॉल् लीग का कशात तरी) दारूण हरल्यामुळं आम्ही (लंडन बघायला गेलेले हौशे नवशे आनि गवशे)नाहक गोत्यात आलो होतो. दिसेल त्याला चोपित किंवा शिवीगाळ करत ही साहेबाच्या देशातली माणसे चालली होती.

आख्य्ख्या लंडनमध्ये ह्यांनी वाट्टेल तिथं बाटल्या ओतल्या,फोडल्या आणि घुसडल्या. विशेषतः भुयारी पादचारी मार्गात(सब् वे) मध्ये तर कहरच होता.
(म्हणजे भारतीयांनीही असच करावं असं नाही. पण ही गचाळ सवय तिथेही आहे. तिथले उच्च्चभ्रू क्रिकेट् खेळतात, आणि जन सामान्य क्रिकेट. त्यामुळं क्रिकेट हरल्यावर जनता फक्त् नाराज होते.फुट्बॉल् मध्ये मात्र जोरदार् तोड्फोड्.)

--मनोबा

अस्मिता

मन यांच्याशी सहमत.

याचे प्रमुख कारण म्हणजे टीव्ही आणि माध्यमे आहेत याबद्दल शंकाच नाही. या माध्यमांनी गेला महिना दीड महिना ताळतंत्र सोडून जे महत्व या सामन्यांना दिले आहे त्या मुळेच दर्शकांच्या भावना एवढ्या टोकाला जाऊ शकत असल्या पाहिजेत.

यात कार्यकारणाची गल्लत वाटते. भारतीय जनतेच्या इतक्या मोठ्या हिश्श्याला क्रिकेटविषयी आत्मीयता वाटते म्हणून माध्यमांनी ते उचलून धरलं होतं.

जो संघ देशाचा अधिकृत संघ सुद्धा नाही त्या संघाच्या चांगल्या प्रदर्शनाचा आणि देशाबद्दलच्या अभिमानाचा खरे म्हणजे संबंध सुद्धा येऊ नये. परंतु प्रत्यक्षात मात्र हा क्रिकेटचा सामना म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असल्या सारखे तरूण वर्गाला का वाटावे?

काही विशिष्ट विचार, प्रथा, खेळ, व्यक्ती यांच्याशी समाजाच्या अस्मिता जुळलेल्या असतात. त्या तशा का बनतात हे त्या तांत्रिकदृष्ट्या कोणाच्या मालकीच्या आहेत, अधिकृत आहेत की नाहीत यावर फारसं अवलंबून नसतं. हा क्रिकेटचा संघ राष्ट्रीय अस्मितेचा भाग आहे. ते नुसतंच तरुण वर्गाला वाटतं (व ते काहीसं चुकीचं आहे) असं नसून जे प्रदर्शन झालं त्यावरून ते सिद्ध होतं. अस्मिता बाळगण्याचं स्वातंत्र्य आणि त्याबरोबरच जल्लोष करताना इतरांना त्रास होऊ न देण्याची जबाबदारी या दोन्ही एकाच वेळी साधता आल्या तर उत्तम. दर वेळी ते जमतंच असं नाही. सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतही हेच म्हणता येतं. तसं म्हटलं तर गणपती हे तर भारताचं अधिकृत दैवत वगैरे कुठे आहे?

टीव्हीला दोष देऊन, हा त्रास कमी होणार असेल असं वाटत असेल तर आपल्या लोकप्रतिनिधींतर्फे लोकशाही प्रक्रियेने 'टीव्हीवर क्रिकेट दाखवायला बंदी करावी' असा कायदा करून घेण्याचा प्रयत्न करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. ही कल्पना हास्यास्पद वाटत असेल तर का वाटते याचा विचार करावा.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

दुष्टचक्र

यात कार्यकारणाची गल्लत वाटते. भारतीय जनतेच्या इतक्या मोठ्या हिश्श्याला क्रिकेटविषयी आत्मीयता वाटते म्हणून माध्यमांनी ते उचलून धरलं होतं.

या पॉझिटिव फीडबॅकला प्रस्तुत उदाहरणात व्हिशस सायकलच म्हणता येईल. गटेनबर्गनंतर एक नवी क्रांती झाली आहे. कोणत्याही गोल्ड रश मध्ये 'खालचे' लोकच पुढे घुसतात. त्यामुळे, काही काळ माध्यमे फालतूच राहतील (जालावरील शुद्धलेखन समस्येचेही असेच स्पष्टीकरण देता येईल). कुठलेसे कार्टे खड्ड्यात पडले तरी तीन दिवस प्रक्षेपण करणार्‍या माध्यमांना क्लीन चिट देऊ नये.

त्या तशा का बनतात हे त्या तांत्रिकदृष्ट्या कोणाच्या मालकीच्या आहेत, अधिकृत आहेत की नाहीत यावर फारसं अवलंबून नसतं. हा क्रिकेटचा संघ राष्ट्रीय अस्मितेचा भाग आहे. ते नुसतंच तरुण वर्गाला वाटतं (व ते काहीसं चुकीचं आहे) असं नसून जे प्रदर्शन झालं त्यावरून ते सिद्ध होतं.

तिला भारतीयत्वाशी जोडू नये इतकीच मागणी आहे. तिला भारतीयत्वाशी जोडणे हे इतरांवर जिझिया कर लावण्यासारखे आहे. 'मोर' हा राष्ट्रीय पक्षी आहे, गिधाडांच्या संवर्धनासाठी निधी आवश्यक असल्याचे आणि गिधाडे पर्यावरणासाठी महत्वाची असल्याचे वैज्ञानिक पुरावे मिळाले तरीही मोरांच्या संरक्षणासाठी अधिक निधी देता येईल ना? (राष्ट्रीय पक्षी म्हणजे काहीतरी विशेष वागणूक द्यावीच लागत असावी.) तसे क्रिकेटचे होऊ नये असे मला वाटते.

सार्वजनिक गणेशोत्सवाबाबतही हेच म्हणता येतं. तसं म्हटलं तर गणपती हे तर भारताचं अधिकृत दैवत वगैरे कुठे आहे?

माय पॉईंट एक्झॅक्टली! "तुला गणपतीविषयी आत्मीयता नसेल तर तू आमचा मित्र नाहीस" असे विधान करण्याचा इतरांचा हक्क मला मान्य आहे परंतु "तुला गणपतीविषयी आत्मीयता नसेल तर तू गणशत्रू देशद्रोही आहेस" असा आरोप मी ऐकून घेणार नाही.

तरुणाईचा जल्लोश

तरुणाईचा जल्लोश इतके मोठे यश संपादन केल्यानंतर व्हायलाच पाहिजे. तो आपल्याकडे ज्या घोषणा देऊन व्यक्त केला जातो, त्या क्रिकेटशी संबंधीत नसतीलही, पण मग तुम्हीच सुचवा बुवा कोणत्या घोषणा द्यायल्या हव्यात.

बाकी तुम्ही मांडलेल्या मुद्द्यात पटलेला मुद्दा म्हणजे मेडीयाचे क्रिकेट स्पर्धेला दिलेले कव्हरेज. शेवटी मेडीया काय इतर कोणत्याही बिझीनेस मधे तो बिझीनेस सातत्याने चालू ठेवण्यासाठी डावं-उजवं होतच.

सरकारी खेळ

लोकांनी गोंधळ घालणे चूकच असते त्यात आपण जर अडकलो तर जास्तच त्रास होतो. त्या संदर्भात पूर्ण सहमत आहे. माध्यमांना तर काय कसाही करून टिआरपी वाढवायचा असतो. त्यात पब्लीसिटी मॅनेजर्स हे चॅनलवाल्यांचे "मित्र" असतात, जाहीरातदारांना तेच हवे असते, वगैरे अनेक मुद्दे यात येतात. तरी बरं आता काय बघावे/वाचावे याचे भरपूर पर्याय उपलब्ध असतात... असे बरेचसे आक्षेपार्ह वाटले तरी बाकी चर्चेतील काही मुद्दे हे पटत नाहीत. त्यातील काही बाबतीत इतरत्र दिलेले उत्तर परत येथे चिकटवतो:

इतर कुठल्या (भारतसदृश अथवा त्याहून मोठ्या - लोकशाही आणि प्रगत) देशात क्रिडासंस्था ह्या सरकारी असतात? कदाचीत नसाव्यात. अमेरिकेत तर नक्कीच नाहीत. संस्थात्मकदृष्ट्या विनानफा तत्वावरील असल्या तरी सगळ्याच खाजगी आहेत. अगदी युएस ऑलिंपिक कमिटी देखील. तरी देखील ऑलिंपिक्समधे मिळणारी मेडल्स ही त्या संस्थेशी निगडीत होत नाहीत तर राष्ट्राशीच होतात. भारतीय हॉकीसाठी पण "हॉकी इंडीया" नामक नवीन संस्था चालू केली गेली आहे. ज्याला सरकारी मदत आहे पण असे दिसते की ती स्वतंत्र आहे. (त्यात कदाचीत जास्त पैसे नसल्याने, राजकारणी घुसलेले दिसले नाहीत!)

मला वाटते आपल्याकडे स्वातंत्र्यानंतरच्या काळात एकूणच समाजवादी राज्यपद्धती असल्याने आपसुक हे सरकारीच असणार/असले पाहीजे असे गृहीत तर धरत नाही आहोत ना?

बाकी बिसीसीआयचा भ्रष्टाचार, त्यांना जर फुकाची करसवलत मिळत असेल तर वगैरे मुद्दे चर्चिणे महत्वाचे. किंबहूना जनरल पब्लीकने माध्यमांच्या द्वारे आवाज करणे महत्वाचे. तसा आवाज करायला खेळाडूंकडे करता येत असला तर करावा इत्यादी इत्यादी...

आता साहजिकच असा प्रश्न पडतो की बीसीसीआय च्या संघाला भारताचा अधिकृत संघ या नावाने का ओळखले जाते?

मला वाटते खेळासंदर्भात अधिकृत हे राजकारणी अथवा कोणी बाबू त्यांच्या त्या खुर्चीतून प्रत्यक्ष ठरवत नाहीत तर ते अशा संस्थांच ठरवतात. याचे दुसरे उदाहरण म्हणजे "विश्वनाथ आनंद". आता आनंद जेंव्हा चेस मधे जिंकतो तेंव्हा भारताचे प्रतिनिधित्व करतो का ऑल इंडीया चेस फेडरेशनचे? ज्याचा सध्याचा अध्यक्ष, "एन श्रीनिवासन" नामक इंडीया सिमेंट कंपनीचा मालक आहे आणि ज्या संस्थेची मुख्य कचेरी ही चेन्नईतच आहे. हॉकीसंदर्भात वर आधी लिहून झाले आहेच...

तीच कथा नोबेल पारीतोषिकांची. रविन्द्रनाथांपासून ते अमर्त्यसेनांपर्यंत नोबेल मिळालेल्यांचा आनंद कशाला करायचा? ते भारताचे अधिकृत उमेदवार थोडेच होते? आणि भरतात जन्मलेल्या सुब्रम्हण्यम् चंद्रशेखर यांना केवळ नागरिकत्व असल्याने, अमेरिकेने स्वतःचे का समजावे? हे सगळे एकतर प्रकाशकांकडून पैसे मिळवून पुढे आले अथवा त्यांच्या विद्यापिठाशी आणि कार्यशाखेशीच संबंधीत होते, देशाशी थोडेच? असे म्हणावे का?

जरा लक्ष देऊन ऐकल्यावर या घोषणा " जय शिवाजी! जय भवानी!" किंवा " शिवाजी महाराज की जय!" या आहेत हे लक्षात आले.
प्रकाशरावांनी उत्तर दिले आहेच आणि सहमत आहेच. थोडे अधिकः शिवाजीचे सैन्य देखील मोघलांशी लढताना "हर हर महादेव" असे का म्हणायचे? महादेवाचा आणि त्यांचा काय संबंध? पण तो मुद्दा दूर जाउंदेत. "पाकड्यांनो खबरदार, रावणांनो चालते व्हा" वगैरे म्हणण्यापेक्षा "जय भवानी, जय शिवाजी" म्हणले म्हणून बिघडते कोठे? मी स्वतः करत नाही, पण इतरांनी स्टेडीयमवर केल्या तर करूंदेत.

बीसीसीआय संघाचा सामना व देशप्रेम यांचा कसा संबंध जोडता येतो?

केवळ सरकारच देशाचे प्रतिनिधित्व करते हा यातील जो मुद्दा आहे तो मला पटत नाही. प्रत्येक व्यक्ती ही घराबाहेर घराचे, गावाबाहेर गावाचे, देशाबाहेर देशाचे अर्थात सर्वच चांगल्या-वाईट गोष्टींचे प्रतिनिधित्व करत असते, त्या व्यक्तीस-स्वतःला ते मान्य होवोत अथवा न होवोत. सरकार हा देशाचा फक्त एक घटक आहे. देश नाही. आणि प्रत्येक गोष्टीवर सरकारचेच प्रत्यक्ष वर्चस्व राहणे अथवा असावे असे वाटणे, हे काही चांगले लक्षण नाही.

त्यामुळे जेंव्हा क्रिकेट वर्ल्डकप मध्ये भारत जिंकतो, आनंद ग्रँडमास्टर होतो, धिंग्राला ऑलिंपिक्सचे मेडल मिळते, मित्तल युरोपिअन कंपन्या विकत घेतो तेंव्हा भारतीय म्हणूनच आनंद होतो... आणि बॉस्टनचे सुप्रसिद्ध रिट्झ कार्ल्टन हॉटेल हे जेंव्हा "ताज" होते आणि भारताचा झेंडा दिसतो तेंव्हा ते कुठलेतरी सरकारमान्य हॉटेल कसे नाही अशी शंका मनात येत नाही.

फरक

अमेरिकेत तर नक्कीच नाहीत. संस्थात्मकदृष्ट्या विनानफा तत्वावरील असल्या तरी सगळ्याच खाजगी आहेत. अगदी युएस ऑलिंपिक कमिटी देखील.

Committee is chartered under Title 36 of the United States Code ... Congress provided a special charter ... as due process rights for athletes in the Amateur Sports Act of 1978.

केवळ सरकारच देशाचे प्रतिनिधित्व करते हा यातील जो मुद्दा आहे तो मला पटत नाही. प्रत्येक व्यक्ती ही घराबाहेर घराचे, गावाबाहेर गावाचे, देशाबाहेर देशाचे अर्थात सर्वच चांगल्या-वाईट गोष्टींचे प्रतिनिधित्व करत असते

सरकार उत्तरदायी (अकाऊंटेबल) असते, व्यक्तींना उत्तरदायित्व नसते. त्यामुळे त्यांना विशेष स्थानही नाही.

एक पत्थर तो तबियत से उछालो यारो.

या देशात फक्त शासकीय सामुग्री आपली असते. बाकी सगळे खाजगी असे काहीसे मत वाचतो आहे.

बीसीसीआय आपली का दुसर्‍याची खाजगी मालमत्ता हा त्यातलाच वाद. जो पर्यंत शासकीय क्रिकेट संस्था येत नाही आणि दुसरी कुठलीही संस्था तसा दावा करित नाही तोपर्यंत तरी बीसीसीआयच्या टीम ला आपली टीम म्हणणे गैर नाही. आता ती अगदी तुंबडीभरू लोकांची बनली असेल. पण शासकीय संस्थांचे काय त्यात काय कमी तुंबडीभरू लोक आहेत?

कित्येक गोष्टी या बिगरशासकीय असाव्यात. शासनाने क्रिडा, कला इत्यादी क्षेत्रापासून दूर असावे. अगदी शिक्षणक्षेत्रातही शासन नसावे. याचा अर्थ शासनाने मदत देऊ नये असे नाही. पण त्या त्या क्षेत्रातील लोकांनी ती ती संस्था चालवाव्यात. उद्या क्रिकेटसाठी कोणी नोकरशहा येऊन बसला तर काय होईल हे कळणे कठीण. बीसीसीआय मधे जसे राजकारणी आहेत तसे माजी क्रिकेटपटू असतात. कित्येक महत्वाची पदे ते भूषवित असतात.
अशा संस्थांमधून ज्याला सिविल सोसायटी म्हणतात ती तयार होत असते. अगदी व्यावसायिकांच्या संस्था या शासनसंचालित नसाव्यात. डॉक्टरांच्या, आर्किटेक्ट, चार्टर्ड अकाऊंटंट, इंजिनियर या सर्वांच्या संस्था त्या त्या व्यवसायातले लोक चालवत असतात. काही ठिकाणी अशाच संस्था वागणुकीचे नियम करतात आणि सभासद ते पाळतात.

दुसरा मुद्दा उन्मादाचा. 'एक पत्थर तो तबियतसे उछालो यारो' या मुद्यातील तो पत्थर कुठे टाकायचा हे फारसे महत्वाचे नाही. तसेच कुठली घोषणा देतात यापेक्षा काहितरी एकत्रित पणे घडत असते. स्टेडियम वर एकत्रित पणे बघणे आणि त्याच स्टेडियमवर एकट्याने बघणे यात भरपूर फरक असतो. एकमेकांच्या प्रतिसादाने आपले प्रतिसाद बदलत जातात. हीच बाब एकट्याने टीव्ही बघणे आणि एकत्रित पणे अधिकाधिक लोकांनी बघणे यात होते. या वेळेला लोकांनी मेगॅस्क्रीन लाऊन सगळ्यांनी एकत्रित बघण्याचे आयोजन केले होते.

या सर्वाचा त्रास होऊ शकतो. जोपर्यंत हा त्रास ध्वनिवर्धकाने तुमच्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत क्षम्य असावा असे वाटते.

प्रमोद

सहमत

हा प्रतिसाद सर्वात जास्त आवडला.

  • भारताची टीम ही बिसीसीआयची टीम आहे भारताची नाही.
  • ह्याला वर्ल्डकप का म्हणायचे? (जगातले आठ देश; तेही बुहुतांश इंग्रजांच्या कॉलन्या, म्हणजे वर्ल्ड नव्हे)
  • 'जितेगा धोनी का इंडिया' असल्या गाण्यांना काय अर्थ आहे, इंडिया हा धोनीचा आहे का?

असे म्हणून ज्यांना ह्या आनंदापासून वंचित राहायचे असेल त्यांनी खुशाल राहावे. आम्ही मात्र हा विजय साजरा केला आणि भन्नाट मजा केली. हा धागा पाहून मनसोक्त हसलो.

--
आनंदावर थोडेसे विरजण घालणार्‍या गोष्टी :

१. सेहवागने स्वार्थीपणाने वाया घालवलेले च्यालेंज
२. अमिरखानच्या माजुरड्या चेहर्‍याला दिलेले नको इतके कवरेज
३. तिरंग्यात रंगलेला आणि डोक्यावर कप बांधलेला तो कुपोषीत प्राणी ज्यावर सतत फोकस होता

सर्वत्र

कोणत्याही खेळातील वर्ल्ड कप जिंकल्यावर प्रेक्षकांची प्रतिक्रिया जवळपास सारखीच असते*. इटलीने फिफा कप जिंकला तेव्हा तिथल्या रस्त्यावरही अशाच मिरवणुका निघाल्या. नंतर स्पेनने जिंकल्यावर त्यांच्याकडे आठवडाभर जल्लोष चालला होता. यात भावनांचा भाग अधिक असतो त्यामुळे प्रत्येक वर्तनाला तर्कसंगत कारण असेलच नाही. मुळात माणूस हे का करतो हा प्रश्न अधिक जटिल आहे, पण करतो हे निश्चित. (याचप्रमाणे उत्क्रांतीच्या दृष्टीने काहीही दर्शनीय फायदा नसताना इतकी माणसे वाचन का करतात असा प्रश्नही विचारला जातो.)

क्रिकेटच्या बाबतीत हे आज होते आहे अशातला भाग नाही. अजित वाडेकरच्या संघाने १९७२मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदा विजय मिळवल्यावर परत आल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली होती.

*याला अपवाद म्हणजे गोल्फ. झिलियन डॉलरची टूर्नामेंट जिंकल्यावरही टायगर वुड्सची प्रतिक्रिया म्हणजे टोपी काढून अभिवादन, बस्स. यावर जेरी साइनफेल्डने एकदा कॉमेंट केली होती.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

आणि नंतर...

अजित वाडेकरच्या संघाने १९७२मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदा विजय मिळवल्यावर परत आल्यानंतर त्यांची मिरवणूक काढली होती.

आणि नंतर १९७४ साली जेंव्हा त्याच्या नेतृत्वाखाली पाचही मॅचेसा इंग्लंडविरोधात हरलो तेंव्हा मुंबई विमानतळावर चपलांचा हार देखील दिला होता... तात्पर्य, काल जिंकलो म्हणून ठीक होते. जर हरलो असतो तर रिस्की निर्णय घेणार्‍या कप्तान धोणीचे आत्ताच्या पद्धतीने पब्लीकने धुणं केल असते.

डायलॉक

नंतर १९७४ साली जेंव्हा त्याच्या नेतृत्वाखाली पाचही मॅचेसा इंग्लंडविरोधात हरलो तेंव्हा मुंबई विमानतळावर चपलांचा हार देखील दिला होता...

हे माहीत नव्हते. हिंदी पिच्चरमध्ये नेहेमी असणारा "तुमने मेरी दोस्ती देखी है, अब दुश्मनी देखो" हा डायलॉक आपल्या पब्लिकला फिट्ट बसावा. :)

नंतर धोणी बोलताना हेच म्हणाला. बर्‍याच निर्णयांबद्दल प्रश्न विचारले जाउ शकतात पण सुदैवाने आम्ही जिंकल्यामुळे आता ते कुणी विचारणार नाही.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

तुम्ही तुमचा आनंद कसा व्यक्त करता?

काल बोरीवली-दहिसर विभागात (मुंबईमध्ये) रात्री बरेचजण हायवेवर आपली गाडी थांबवून चक्क नाचत होते. फटाकेही खूप फोडण्यात आले होते. आज सकाळी आमच्या येथील रस्त्यांवर बीयरच्या बाटल्यांचा खच देखील पहायला मिळाला.

हो! काल रात्री मला भारतासाठी खेळणार्‍या संघाचा विजय पाहून आनंद झाला. माझ्या गरोदर पत्नीचा अलगदपणे मुका घेवून तो आनंद व्यक्तही केला. टीव्ही नंतर बंद करावासा वाटला. टेन्शनमुळे डोकं खूप दुखत होतं. शेवटी अंथरूण घालायला घेतले, कारण झोपायला खूप उशीर झाला होता. पण, आज मला त्या आनंदाचे हँगओव्हर नाही.

एक गोंधळ संपला पण येत्या काही दिवसात आयपीएलचा गोंधळ सुरू होईल.

आनंदाचे डोही...!

आनंदाचे डोही...!

आम्ही आमच्या कार्यालयातील कनिष्ठ अधिवक्त्यांस, आंग्ल/यूनिकोड् टंकनिकांस तथा शिपायांस स्वानंदाने विशेष बक्षीसी वाटली. कनिष्ठ अधिवक्ते डोळे मारित विजय साजरा करण्यास निघून गेले. टंकनिक-शिपायांनी जागेवरच शिवाजी-भवानी नामघोष केला. त्या सार्‍यांचा आनंद पाहून आम्हांसही आनंद झाला. नंतर CCI मधील आमच्या मित्रांस दूरध्वनी करून त्यांचेही अभिनंदन केले. छान वाटले. असो.

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

छान वाटले

धोनी वगैरेंच्या नाड्या वाचून तुम्हला असं घडणार हे आधी माहितच असणार, त्यामूळे तितकी मजा आली नसेल खरं :)

मिड् डे

मिड् डे

२ एप्रील २०११ च्या मिड् डे मध्ये भविष्यवाणी वर्तविली होती, त्यामुळे कोणाचे नाडिग्रंथवाचन करावयाची आवश्यकता भासली नाही. ;-) ह.घ्या. =-))

--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले

हैयो हैयैयो!

उन्माद

राजेश घासकडवी/प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांचाशी अधिक सहमत.

पुण्यातील विजयोन्माद मी देखील काल अनुभवला, तो तसा अपेक्षित नव्हता(अगदी पाक विजयाच्या वेळेस देखील) (निदान पुणेकरांकडून ;)), असो पण ह्या उल्हासाचा नुसता विचार करून नाही तर त्यात प्रत्यक्ष भाग घेतल्यावर मला असे जाणवले कि अशा प्रकारच्या उत्सवात एकप्रकारचा युफोरिया(नशा/किक) असतो, गणपती उत्सवात देखील मिरवणुकीत सहभागी झाल्यास जाणवतो तो हाच आनंद असतो, प्रमोद सहस्रबुद्धे ह्यांच्या मताशी अगदी सहमत, मॉब ची मजा मॉब मधेच जाणवते, मॉब मध्ये भयंकर सकारात्मक किंवा नकारात्मक उर्जा जाणवते.

ह्या उन्मादावर विवेकाचा ताबा हवा हे खरे, पण सकारात्मक उन्मादावर तो तसा साधारणपणे सुटल्याची आठवण नाही (चू. भू. दे. घे.).

मग हि टीम किंवा हे कारण तांत्रिक दृष्ट्या खासगी असले तरी त्याचा आनंद उपभोगण्याशी संबंध कसा जोडता येईल, ती खासगी असून देखील सर्वांनी आनंद घेतला ह्यातूनच ते सिद्ध होते. गेले अनेक वर्ष अमिताभ बच्चन गारुड घालून बसला आहे हे त्याच मानसिकतेचे एक लक्षण आहे(तो जे करतो त्यात तर सगळीच बाब खासगी आहे आणि नाटकी आहे ,खरी सुद्धा नाही).

वर इतरांनी सांगितल्याप्रमाणे युरोपात देखील हा युफोरिया अनुभवला आहे, तिथे तर लोक दारूच्या बाटल्या घेऊन रेल्वे मधून आरडाओरडा करत जातात :), अगदी (आपल्याकडील)काहीना ते भीतीदायक सुद्धा वाटते पण असे करणारी माणसे अगदी तेथील मध्यमवर्गीय सुद्धा असतात. :)

खालील वाक्य उपरोधाने नाही, कृपया तसे घेऊ नये -

वयाप्रमाणे तुम्हाला त्याचा त्रास होणे किंवा अतिशयोक्ती वाटणे साहजिक आहे, भोवरा खेळणारा लहान मुलगा आनंदाने भोवरा खेळत असतो, तोच मोठा झाला कि भोवरयातील फोलपणा त्याला जाणवतो किंवा भोवरयापेक्षा अधिक आनंद देणारे असे काही त्याला गवसते तसे काही असेल. तुम्ही भोवरा खेळलाच नसेल असेही असू शकेल, पण त्यात मजा नाही असे म्हणू शकत नाही.

+१

सगळा देश आनंदात असतांना असे आंबट चेहरा करून युक्तिवाद करणारे पाहिले की आता रागही येत नाही.
जिथे तिथे बुद्धीवाद-विवेकी वागणूक वगैरे वगैरे करत पाल्हाळ लावणारे स्वतः विदेशात असले आणि तिथल्या देशाने फुटबॉल किंवा तत्सम खेळाचा सर्वोच्च किताब मिळवल्यावर केलेला जल्लोष पाहण्यात आला तर लगेच त्यांच्या राष्ट्रभावनेचे गोडवे गात आपला समाज कसा मुर्दाड किंवा दुभंगलेला किंवा दुर्मुखलेला आहे असे दाखवणारे लेख पाडतील- याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.
चार हसरे चेहरे दिसल्यावर असे विचारकुंथन करण्यापेक्षा आपण स्वतःभोवती विणलेल्या कोषामुळे आपली समाजाशी असलेली नाळ तुटली आहे किंवा आपले वय झाले आहे असे खुशाल समजावे. लोकांच्या आनंदावर विरजण पाडू नये.

विरजण म्हणू नये

चंद्रशेखर यांचा आवाजांवरून मुद्दा समजू शकतो (पण भारतात असते तर बहुदा मीही एवढा आरडाओरडा केला नसता तरी सगळ्यांमध्ये आवडीने मुद्दाम थांबले असते असे वाटते).
दुचाकी, चारचाकी मधली मंडळी, नुसती ओरडाआरड करत गोल गोल फिरत होती. हा प्रकार रात्री एक दीड पर्यंत बहुदा चालू असावा.

ह्या वाक्याचा संदर्भ याला असावा. गणपतीला हेच, दुर्गापूजेला हेच, कोणाच्या लग्नाला तेच आणि वर्ल्डकपलाही तेच. असे झाल्याने अशी प्रतिक्रिया आली असावी.

अर्थात बीसीसीआयची टीम याच्याशी मी अजिबात सहमत नाही. तांत्रिकी दृष्टीने हे बरोबर असेल कदाचित पण जिंकलेली टीम भारताचीच होती... :)
खेळाडूही याच्याशी सहमत आहेत/असावेत.
http://calcuttatube.com/india-win-the-world-cup-cricket-after-28-years/1...

विरजण?

जिथे तिथे बुद्धीवाद-विवेकी वागणूक वगैरे वगैरे करत पाल्हाळ लावणारे स्वतः विदेशात असले आणि तिथल्या देशाने फुटबॉल किंवा तत्सम खेळाचा सर्वोच्च किताब मिळवल्यावर केलेला जल्लोष पाहण्यात आला तर लगेच त्यांच्या राष्ट्रभावनेचे गोडवे गात आपला समाज कसा मुर्दाड किंवा दुभंगलेला किंवा दुर्मुखलेला आहे असे दाखवणारे लेख पाडतील- याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.

असे तुम्हाला का वाटावे? तुमची शंका चुकीच्या बुनियादीवर (लोकसत्तास्टाइल), पायावर आधारित आहे. बुद्धिवादी आणि विवेकवादी विचारसरणीला राष्ट्रवाद बहुधा मंजूरच नसावा. मी जगात कुठेही राहात असलो तरी ह्या अखिल जगावर माझा हक्क आहे अशी विचारसरणी का बरे स्वीकारू नये.

चार हसरे चेहरे दिसल्यावर असे विचारकुंथन करण्यापेक्षा आपण स्वतःभोवती विणलेल्या कोषामुळे आपली समाजाशी असलेली नाळ तुटली आहे किंवा आपले वय झाले आहे असे खुशाल समजावे. लोकांच्या आनंदावर विरजण पाडू नये.

विचारकुंथन हा शब्दप्रयोग आणि विरजण पाडण्याचा आरोप करणे काही पटले नाही. वयावरून टिप्पणी करणे एजिझममध्ये मोडते. हा प्रकार आवडण्यासारखा नसतो. आणि ह्यात कसले आले विरजण पाडणे? बहुमताच्या विरोधात जाणारी मते कुणी मांडायचीच नाहीत का?

असो. भारत जिंकल्यावर जोरदार जल्लोष करणे काही गैर नाहीच. पण भगवे झेंडे घेऊन हिंडणे, 'जय भवानी, जय शिवाजी' देणे मात्र विचित्रच वाटले.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

असहमत

सगळा देश आनंदात असतांना असे आंबट चेहरा करून युक्तिवाद करणारे...

ह्या वाक्याशी असहमत आहे. जरी बिसिसिआयच्या विश्लेषणासंदर्भात श्री. चंद्रशेखर आणि माझ्या म्हणण्यात फरक असला तरी त्यांचा उद्देश अथवा रोख तसा अजिबात वाटला नाही.

चार हसरे चेहरे दिसल्यावर असे विचारकुंथन करण्यापेक्षा आपण स्वतःभोवती विणलेल्या कोषामुळे आपली समाजाशी असलेली नाळ तुटली आहे

असे काही नाही. समाजाशी नाळ तुटली असती तर यासंदर्भात चर्चाच टाकली नसती. जे वागणे त्यांना चुकीचे वाटले ते बोलून दाखवले... ते देखील रस्त्यावर जे काही चालू होते त्यासंदर्भात्, कुणाच्या घरातील नाही... जसा एखाद्याला सार्वजनीक पद्धतीने आनंद व्यक्त करायचा अधिकार आहे तसाच दुसर्‍याला त्यात काही गैर वाटले तर टिपण्णी करायचा देखील हे विसरता कामा नये. त्यात जर माझ्या कानाशी कोणी आरडाओरड करत असेल, तर अगदी मला कितीही जिंकल्याचा आनंद झाला तरी या "आनंद लुटण्याचा" त्रास वाटू शकतो.

लोकांच्या आनंदावर विरजण पाडू नये.
तसे पाडले असे वाटत नाही आणि कोणी पाडून घ्यावे असे देखील वाटत नाही.

असहमतीशी सहमत, तरीही-

@धम्मकलाडू-

मी जगात कुठेही राहात असलो तरी ह्या अखिल जगावर माझा हक्क आहे अशी विचारसरणी का बरे स्वीकारू नये.

अशीच विचारसरणी लोकांनी स्वीकारल्याने तर प्रस्तुत लेखकाची अडचण झालीये. ;)

बुद्धिवादी आणि विवेकवादी विचारसरणीला राष्ट्रवाद बहुधा मंजूरच नसावा.

मग बोलणेच खुंटले.

----------------------------------------------------

@विकास

तरी त्यांचा उद्देश अथवा रोख तसा अजिबात वाटला नाही.

’वाटणे’ हे सापेक्ष असते. त्यामुळे तुमच्या असहमतीशी सहमत असलो, तरी मला तो तसा वाटला. चंद्रशेखर यांचा आक्षेप केवळ गोंधळासंदर्भात नाही. "वर्ल्डकपनंतरचा गोंधळ" हा त्यांचा लेखविषय नसून "वर्ल्ड कप आणि नंतरचा गोंधळ" असा आहे. त्यांचा दोहोंना आक्षेप आहे.
अन्यथा खालील वाक्यांचे काय प्रयोजन आहे, सांगा बरे-

अखेरीस वर्ल्ड कपचा चकवा काल रात्री एकदाचा संपला.
एका क्रीडास्पर्धेला किती महत्व द्यायचे?
बीसीसीआय (BCCI) या संस्थेकडून पगार घेत असलेल्या व अंगावरच्या कपड्यांवर सहारा असे नाव छापून घेऊन खेळणार्‍या संघाने

BCCI बद्दल अनेकांनी लिहिलेले आहेच, त्यामुळे पुनरुक्ति करत नाही. पण यांचा अंगावरच्या कपड्यावर प्रायोजकाचे नाव छापण्याचाही उपहास ! फुटबॉलपासून एफ वन रेसिंगपर्यंत सगळ्या खेळाडूंच्या अंगाखांद्यावर- अगदी पार्श्वभागावरही झळकत असलेल्या जाहिराती यांना कधी दिसल्या नसाव्यात काय? प्रायोजकांशिवाय अशा क्रीडा स्पर्धा यशस्वी झाल्याचे कुणी ऐकले आहे काय?
हा नुसता त्रागा नाही. ही भाषा हेटाळणीची आहे. कुत्सित आहे. छद्मी आहे. आणि म्हणूनच निषेधार्ह आहे.

पुढे लेखक मानभावीपणे "अर्थात हा वरील मुद्दा हा माझ्या लेखाचा विषय नाही. मला सांगायचे आहे हे कालचा सामना संपल्यावर जे काय घडले त्या बद्दल" असे म्हणत विषयाला बगल देतो- आणि मध्यरात्रीच्या गोंधळावर टिप्पणी करतो. "मध्यरात्री लोकांनी केलेला गोंधळ" हा प्रस्तुत लेखकाचा हातखंडा विषय असल्याचे दिसते. मागेही एकदा मध्यरात्री कुठल्याश्या मिरवणूकीने त्यांना कसा त्रास झाला याचे रसभरित वर्णन करणारा एक लेख उपक्रमावर वाचला होता. (ज्यातली वर्णने इतकी रंगवलेली होती की तो लेख चक्क ललित होता- मात्र तरीही उपक्रमावर टिकला. असो.)

तर एखाद्याच्या प्रकृतीला आवाजाचा असा एकूणच त्रास असल्याचे समजू शकते. पण तुम्ही भारतात राहत असाल तर कधीतरी तुम्हाला मिरवणूक आडवी जाणार, कुठेतरी बॅन्ड वाजणार, कुणीतरी फटाके फोडणार- हे गृहीत धरावे लागते. अंतु बर्व्याच्या भाषेत सांगायचे तर- "गोठ्यात निजणाराला बैलाच्या मुताची घाण येते, असे म्हणून कसे चालेल?"
हे या सगळ्या प्रकाराचे समर्थन नाही, पण अशा प्रत्येक अनुभवावर लेख पाडून उसासे सोडण्याने काय साधते हे मला कळत नाही.

त्यातून कालचा प्रसंग गणपती किंवा दिवाळीप्रमाणे ’नेमेचि येतो मग पावसाळा’ या प्रकारचा नव्हता. खरोखरच नव्हता.
परवा आपण क्रिकेटच्या (चिमुकल्या का असेना, पण) विश्वाचे राजे बनलो होतो. असे क्षण भारताच्या वाट्याला विश्वचषकाच्या ३६ वर्षाच्या इतिहासात फक्त २ वेळा आले आहेत. फक्त दोन ! त्याचे अप्रूप का वाटू नये? भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय खेळाचे जेतेपद लोकांनी का उत्साहाने साजरे करू नये? परवा रस्त्यावर नाचत-गात फिरणारी पोरे पाहिली? फक्त विशी-पंचविशीची मुले असावीत ती. त्यांना असे किती आनंदाचे क्षण या देशाने दिले आहेत, सांगाल मला? त्यांनी हा आनंद कसा साजरा करायला हवा होता असे तुम्हाला वाटते? मूक मोर्चे काढून??

आणखीन एक विनोदी आक्षेप आहे घोषणांबद्दल.
आता ’जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा इथे अप्रस्तुत/संबंध नसलेली आहे, हे मान्य. मग विश्वकप जिंकल्यावर देता येण्यासारखी अन्य घोषणा कोणती हे चंद्रशेखर यांनीच सुचवावे. तसेच त्यांनी हेही सुचवावे की ’जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा नेमकी कोणत्या प्रसंगी दिली म्हणजे संदर्भहीन वाटणार नाही. कारण महाराष्ट्र नामक प्रांतात राहणारे लोक वेळीअवेळी ही घोषणा देत असतात. ही घोषणा महाराष्ट्रात एक राजकीय पक्ष वारंवार वापरतांना दिसतो. ग्रेट वॉल ऑफ चायनावर उभे राहिलेले काही मराठी पर्यटक उत्स्फुर्तपणे असेच काहीबाही ओरडतात. शिवाय सैन्यात काही मराठा रेजिमेंट्स युद्धासारख्या प्रसंगात ही घोषणा किंवा ’हर हर महादेव’ वगैरे म्हणत असतात. खरं तर युद्धाचा आणि महादेवाचा तरी काय संबंध? त्यांना हे कोणीतरी जाऊन सांगायला पाहिजे खरे ! ;)

चंद्रशेखर यांच्या लिखाणाबद्दल आणि ज्ञानाबद्दल मला प्रचंड आदर आहे. (असाच अनेक उपक्रमींच्याबद्दल आहे.) वरच्या प्रतिसादात मी वयाची टिप्पणी करायला नको होती असे जे धम्मकलाडू यांनी म्हटले आहे ते मला मान्य आहे. त्राग्यापोटी तसे लिहिले गेले. त्याबद्दल मी मनापासून क्षमा मागतो.
अशा अनेक विद्वानांचे लेख मी आवर्जून वाचत असतो. अनेकांना खरड/व्यनि करून माझ्या शंकाही विचारत असतो. पण कधी कधी तुम्ही लोक अति करता असेही वाटते. बाहेर असलेली "समाज नावाची गुंतागुंतीची गोष्ट" तुम्ही साफ विसरून जाता. समाजाला जसा नुसता उन्माद पोसत नाही तसाच नुसता विवेकही पोसत नाही. जिवंत राहण्याला काहीतरी कारण लागते. युद्धाला पर्याय म्हणून खेळ तयार झाले असे म्हणतात. पुलंच्या कथेतले ’ते चौकोनी कुटुंब’ राहते तसे सर्वजण राहू शकत नाहीत. कधीतरी भिंतीला पाय लावून पालथे पडण्यातही मजा असते. जमल्यास ती अनुभवा. अगदीच जमत नसेल तर दुर्लक्ष करा. अनुल्लेखाने मारा.
कृपा करून असे लेख पाडून एका फार फार दुर्मीळ आनंदात बुडालेल्या लोकांना डिवचू/ हिणवू नका, एवढीच विनंती आहे.
बघा, जमल्यास.

खूप आवडला प्रतिसाद

योग्य भावना योग्यप्रकारे आणि वस्तुस्थिती नेमकेपणाने पोहोचवल्या आहेत.

चांगला प्रतिसाद

बहुतांश मजकुराशी सहमत आहे.

प्रति

हा नुसता त्रागा नाही. ही भाषा हेटाळणीची आहे. कुत्सित आहे. छद्मी आहे. आणि म्हणूनच निषेधार्ह आहे.

आम्हाला निषेधार्ह वाटणार्‍या मनोवृत्तीची आम्ही हेटाळणी केल्यास ती हेटाळणीच निषेधार्ह का ठरावी?

भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय खेळाचे जेतेपद लोकांनी का उत्साहाने साजरे करू नये?

ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही. ते नादी लागलेले आहेत आणि त्यांचे शोषण होते आहे. आम्हाला होणारे, 'झुंड' वगैरेंचे त्रास, हे कोलॅटरल डॅमेज आहेत.

बाहेर असलेली "समाज नावाची गुंतागुंतीची गोष्ट" तुम्ही साफ विसरून जाता.

बाकी सारा प्रतिसाद गांभीर्याने लिहिला आहे असे वाटत असतानाच, या खोडसाळ संदर्भाने तुमच्या प्रतिसादाच्या प्रामाणिकपणाविषयी संदिग्धता वाटली.

एका फार फार दुर्मीळ आनंदात बुडालेल्या लोकांना डिवचू/ हिणवू नका, एवढीच विनंती आहे.

डिवचण्याचा आनंद मिळत असेल तर? ;)

सापळा

तुमचा सापळा फारच कमजोर आहे. ;) जमल्यास मुद्दे घेऊन या.
शब्दच्छल करणे हलक्या प्रतीचे काम आहे. आणि फार सोपेसुद्धा.

जाता जाता तुमच्या या प्रतिसादाची आठवण करून देतो- http://www.mr.upakram.org/node/2818#comment-45901

?

काय शब्दच्छल केला? झुंडीने, इतरांच्या हक्कांची काळजी न घेता केलेल्या जल्लोषाला मी त्याही प्रतिसादात विरोधच केला आहे.

सहमत

कृपा करून असे लेख पाडून एका फार फार दुर्मीळ आनंदात बुडालेल्या लोकांना डिवचू/ हिणवू नका, एवढीच विनंती आहे.

सहमत आहे. २८ वर्षांनी आलेल्या विजयाचे स्वागत जोशात व्हावे हे नैसर्गिक आहे.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

सहमत आहे.

>>>>कृपा करून असे लेख पाडून एका फार फार दुर्मीळ आनंदात बुडालेल्या लोकांना डिवचू/ हिणवू नका, एवढीच विनंती आहे.
सहमत आहे.

बाकी, त्राग्याच्या बाबतीत वयाचाही भाग महत्त्वाचा वाटतो. जेष्ठ लोकांना असा जल्लोष आवडत नसावा, असे वाटते. हे काही चर्चा प्रस्तावकाला उद्देशून लिहित नाही. क्रिकेटच्या अंतिम सामन्याच्या दिवशी तुम्हाला म्हणून सांगतो. आम्ही म्याच लैच इंजॉय केला. धोनीने जेव्हा षटकार मारला तेव्हा आम्ही घरात माझ्यासहीत सर्वच 'ह्हे'......... असे करुन जोरात ओरडलो. माझे वडीलही म्याच पाहात होते पण असे खवळले आमच्यावर की विचारु नका. मग मला नाईलाजानेच जिथे लोक रस्त्यावर डोलीबाजाच्या आवाजासहित आनंदोत्सव साजरा करत
होते तिकडे जावे लागले. असो, राहिला आनंदोत्सव साजरा करण्याचा प्रश्न तर जगभर आनंदोत्सव असाच धमाकेदार साजरा करत असावे.माणसांची वृत्ती आनंद आणि दु:खाच्या प्रसंगी सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात सारखीच असावी असे वाटते. काल का परवा डिस्कव्हरी च्यानलवर अशाच कोणत्या तरी विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेले कार्यक्रमात मी पाहिले तो जमाव तर इतका बेकाबू झाला होता की पुछो मत. रस्यावरच्या गाड्या काय उलट्या करत होते काय नी काय दाखवत होते. त्या मानाने भारतीय आनंदाचा जल्लोष करतांना जरा संयम दाखवतात असे वाटते. असो, चुभुदेघे.

-दिलीप बिरुटे

नक्की प्रोब्लेम काय आहे ???

नक्की प्रोब्लेम काय आहे ??? क्रिकेट आवडत नाही म्हणून राग आहे ? रस्त्यावर लोक नाचत होते म्हणून आक्षेप आहे ???
जे जे सांघिक खेळ खेळतात . त्यात हे सगळे असतेच.. त्यातच त्याची मजा असते ...
आपला तर् घोषणांनाही विरोध दिसत आहे... आम आदमी विजयी होवो, धर्मनिरपेक्ष भारत की जय, बि सि सि आय जिन्दाबाद् ह्या घोषणा आपल्याला चालल्या असत्या काय ???

आ चलके तुम्हे मै लेके चलू

अशा चर्चा वाचून मला किशोरकुमारने गायलेले गाणे आठवते- आ चलके तुम्हे मै लेके चलू...एक दूर गगन के तले....

भारताचा संघ

मला वाटते, बीसीसीआय ही खाजगी संस्था आहे या कोणे एके काळी केल्या गेलेल्या तांत्रिक युक्तिवादाला वाजवीपेक्षा जास्त ताणले जात आहे. माझ्या स्मरणात, त्यावेळी झी टीव्ही, दूरदर्शन आणि बीसीसीआय यांच्यात प्रसारण हक्कावरून वाद झाला होता. दूरदर्शन हे राष्ट्रीय माध्यम असल्याने देशात होणार्‍या सामन्यांच्या प्रसारणावर त्यांचा 'आपोआप' हक्क आहे आणि बीसीसीआयने/झी ने त्या प्रसारणाचा फीड दूरदर्शनला विनामूल्य पुरवावा असा दूरदर्शनचा आग्रह होता. म्हणून बीसीसीआयने आम्ही काही सरकारी संस्था नाही त्यामुळे प्रसारणाचे हक्क दूरदर्शनला देण्यास आम्ही बांधील नाही असा काहीसा तो दावा असावा.

बाकी हा संघ भारतीय होता का आणि कप "भारताने" "श्रीलंकेच्या" संघाला हरवून जिंकला का असे प्रश्न विचारले तर सर्वजण हो असेच उत्तर देतील. भारतीय खेळाडू आणि श्रीलंकेचे खेळाडूही असेच उत्तर देतील.

जल्लोष सर्वत्र असाच होतो हे बहुतेकांनी वर लिहिलेच आहे.

भारंभार न्यूज चॅनेल नसतानाही १९८३ मधली पुण्यातली आणि बहुधा इतरत्रही परिस्थिती अशीच जल्लोषाची होती. त्यावेळी सदाशिव पेठेत हत्तीवरून साखर वाटली गेली होती असे नक्की आठवते.

उन्मादाच्या अतिरेकाचे

नितिन थत्ते

एकच चित्र...

...हजार शब्दांपेक्षा मोलाचे असते. ;)

हम्म!

हल्ली नवे चित्रपट यायचे असले की बॉलिवूड स्टार्स जिथे तिथे आपली वर्णी लावतात. बच्चनपुत्रही म्हणूनच जल्लोष करत असावा का काय अशी शंका उगीचच येऊन गेली. ;-) सोनियांचे काय? त्याही चित्रपटात एखादी भूमिका नाही ना करणारेत? ;-) - ह. घ्या.

सोनियांना गाडीवर उभे राहून भारतातला दहशतवाद निदान त्या क्षणासाठी संपला का काय असा ही प्रश्न पडला.

एकंदरीत करमणूक झाली.

बर्‍याच गोश्टी विधीलिखीत असतात!

मिड्-डे मधील बातमी २ तारखेला सकाळी आली होती. मला १ तारखेलाच माझ्या भावाकडून एक एस्.एम्.एस्. मिळाला होता, तो त्याला कोणीतरी पाठवला होता.-
भारत-श्रीलंका मॅच फिक्स!
१) श्रीलंका अगोदर फलंदाजी स्विकारेल!
२) श्रीलंकेचा स्कोअर अगोदर ७५ ला ४ विकेट आणी नंतर तिथून २७० ते २७३ धावा होतील.
३) सेहवाग पहिल्या शटकात बाद होईल.
४) सचिन ९५-९८ वर बाद होईल.
५) शेवटच्या दोन चेंडूत भारत १ विकेट राखून विजयी होईल.
.
.
.
.
धक्का बसला? केलं ना तुम्हाला एप्रिल फूल!
-- हा मॅसेज दुपारी दोन वाजता १ तारखेला मिळाला होता.
पण गंमत म्हणजे त्या विधानांमधील बरीच विधाने खरी ठरली.
दुसर्‍या दिवशी - २ तारखेला...
१) श्रीलंकेने नाणेफेक जिंकून अगोदर फलंदाजी स्विकारली!
२) श्रीलंकेच्या २७० ते २७३ च्या आसपास धावा झाल्या.
३) सेहवाग पहिल्या शटकात बाद झाला.
४) सचिन १४ वर बाद झाला. व गौतम गंभीर ९५-९८ च्या आसपास बाद झाला.
५) सामना रोमांचक होवून भारत विजयी झाला.

लाल रंगातील शब्द हे नियतीने झाकलेले गुपित होते जे नंतर उलगडले!
-----हा प्रतिसाद हैययैयो यांच्या प्रतिसादाला होता चूकून खाली दिला गेला.

मला पण

मला पण सेम संदेश आला होता.

>> ३) सेहवाग पहिल्या शटकात बाद झाला.....
हे माझ्या साठी शॉकींग होते. हे कसं काय शक्य झालं ह्यावर विचार नक्कीच करणे आवश्यक आहे.

१. सेहवाग किती वेळेस १ ल्या शटकात आउट झाला आहे ?
२. पहिल्या शटकात ओपनर किती वेळेस आउट झाले आहेत ? (सर्वच टीमस् आणि सर्व म्याचेस धरून)
३. सेहवाग म्याच फिक्सींग मधे सामील होउ शकतो का ?
४. मानाच्या शिरोबिंदू असलेल्या अशा म्याच मधे श्रीलंका म्याच फिक्स करू शकते का ?

ह्या प्रश्नांची उत्तरे कदाचीत हे ठरवू शकतील की हा फक्त एक "योगायोग" होता की म्याच फिक्स झाली होती.

---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी

उत्स्फूर्त प्रतिक्रीया

असा जल्लोष मला गैर वाटला नाही. लोकांची ती उत्स्फूर्त प्रतिक्रीया होती.
अर्थात, काहि काळ जमावासोबत एकत्रितपणे आनंद व्यक्त करणे, त्याचे उत्सवात रुपांतर करणे, आनंदाला वाट करून देताना सामुहिक जल्लोष करणे आणि दारू पिऊन(अथवा न पिताही) भर रस्त्यात रात्रभर गोंधळ घालून सार्वजनिक आरोग्य बिघडवणे यातील फरक सगळ्यांनाच उमजतो किंवा त्या उन्मादात / झिंगेत उमजू शकतो असे नाही.

तेव्हा अश्या एखाद्या सामुदायिक आनंदाच्या क्षणी अश्या घटनांना जगभरात सुट दिली जात असावी. :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

?

असा जल्लोष मला गैर वाटला नाही. लोकांची ती उत्स्फूर्त प्रतिक्रीया होती.

उस्फूर्ततेवरून वैधता ठरते?

असे का वाटले?

मला गैर वाटले नाही म्हणजे देखील वैध आहे असे नव्हे! तेव्हा हे वैध आहे असे मी म्हटल्याचे तुम्हाला का वाटले?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

सहमत!

--तेव्हा हे वैध आहे असे मी म्हटल्याचे तुम्हाला का वाटले?
सहमत!

शंका

गैर वाटत नाही ते वैधच वाटते ना?

एक उदा.

एक उदाहरणः
दारू पिणे हे माझ्या दृष्टीने (समजा) गैर असले तरी ते वैध आहे. किंवा उलटे एखाद्याला सिग्नल न पाळणे गैर वाटत नसले तरी ते वैध नाही.
तसेच माझ्या गैर वाटण्या-न वाटण्याने वैधता ठरत नाही / ठरू नये.
ठिक?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

ठीक

गैरकानूनी किंवा बेकायदेशीर या अर्थांनी तुम्ही 'गैर' हा शब्द वापरला असावा असे मला वाटते.
'गैर' हा शब्द कोणत्या अर्थाने वापरल्यास उस्फूर्ततेसोबत गैरत्व नष्ट होते?

प्रतिसाद

माझ्या लेखावर झालेली चर्चा व त्यावर आलेले प्रतिसाद याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो.
हे प्रतिसाद माझ्या अपेक्षेप्रमाणेच आले आहेत. काही जणांनी मी आंबट तोंडाचा आहे असे ठरवले आहे. काही लोकांनी मी इतरांच्या आनंदावर विरजण घालण्याचा प्रयत्न घालतो आहे असे सांगितले आहे. माझ्या दृष्टीने महत्वाचे असलेले मुद्दे मी परत एकदा मांडतो.

1. मला खेळ आवडतात. क्रिकेट हा खेळ जरी माझ्या सर्वात आवडीचा नसला तरी क्रिकेटच्या सामन्याचे प्रक्षेपण मी बघतो. त्या वेळेचा लोकांचा जल्लोश मला समजू शकतो. त्याच प्रमाणे अटीतटीने लढली गेलेली एखादी स्पर्धा भारतीय खेळाडू जेंव्हा जिंकतात तेंव्हा मला एक भारतीय या नात्याने आनंद होतो. एक भारतीय नागरिक म्हणून या देशाच्या इतिहासाचा , एक मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासाचा व इथल्या माणसांच्या कर्तुत्वाचा मला सार्थ अभिमान आहे. तरीही मी या लेखातील मुद्दे का उपस्थित केले आहेत? असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर त्याचा खुलासा असा आहे.
2. बीसीसीआय़ चा मुद्दा मी अशासाठी उपस्थित केला आहे की तांत्रिक दृष्ट्या भारतीय नागरिकांनाच या संघात घेतले पाहिजे असा नियम कोठेही मला दिसला नाही. बीसीसीआय परदेशी खेळाडूंना नोकरीवर ठेवू शकते. असे जर त्यांनी केले तर त्या संघाला भारताचा अधिकृत संघ म्हणणे कितपत योग्य ठरेल. माझ्या मताने भारतातील पार्लमेंटने ठराव करून जर एखादी क्रीडा किंवा क्रीडा प्रकार नियंत्रण करणारी स्वायत्त संस्था निर्माण केली तर त्या संस्थेने पुरस्कृत केलेला संघच फक्त अधिकृत भारतीय संघ हो ऊ शकतो. मी मान्य करतो की मी कायदेपटू नाही. ज्यांना यातल्या कायदेशीर बाबी समजतात त्यांचे स्पष्टीकरण वाचायला आवडेल.
3. जेंव्हा आपण समाजात राहतो तेंव्हा समाजाचा एक घटक किंवा नागरिक म्हणून आपले हे प्रथम कर्तव्य असते की आपल्या कोणत्याही वागणूकीने समाजातील इतर घटकांना उपद्रव होणार नाही. कितीही आनंद झाला, उन्माद वाटला तरी रात्री अडीच किंवा साडेतीन वाजेपर्यंत रस्त्यावर मोठमोठ्याने आरडाओरडा करणे कोणच्या नागरिक शास्त्रात बसते? हे मला कोणी समजावून सांगितले तर बरे होईल. अनेक घरात दुर्धर रोगांनी आजारी असलेले वृद्ध असतात. अशा लोकांना या आरडाओरडीचा किती उपद्रव होत असेल याची या मंडळींना कल्पना बहुतेक नसावी.
4. झुंडशाहीने आम्ही म्हणतो तेच खरे! अशी एक प्रवृत्ती महाराष्ट्रात बोकाळत चालली आहे. भांडारकर संस्थेवरील हल्ला, लाल महाल पुतळा प्रकरण किंवा परवा गांधींबद्दलच्या पुस्तकावर आणलेली बंदी ही याची उदाहरणे आहेत. आम्हाला आनंद झाला आहे मग आम्ही काहीही करू. रस्त्यावर ओरडू नाहीतर मोडतोड करू! आम्हाला कोणी विचारता कामा नये. दुर्दैवाने काही प्रतिसादातून ही वृत्ती डोकावताना मला स्पष्टपणे दिसते आहे. ही वृत्ती फोफावत राहिली तर महाराष्ट्राचे ते दुर्दैव ठरेल असे माझे स्पष्ट मत आहे.
परत एकदा सर्वांचे आभार.
चंद्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

काही अंशी सहमत

काही अंशी सहमत.

झुंडशाहीने आम्ही म्हणतो तेच खरे! अशी एक प्रवृत्ती महाराष्ट्रात बोकाळत चालली आहे. भांडारकर संस्थेवरील हल्ला, लाल महाल पुतळा प्रकरण किंवा परवा गांधींबद्दलच्या पुस्तकावर आणलेली बंदी ही याची उदाहरणे आहेत. आम्हाला आनंद झाला आहे मग आम्ही काहीही करू. रस्त्यावर ओरडू नाहीतर मोडतोड करू! आम्हाला कोणी विचारता कामा नये. दुर्दैवाने काही प्रतिसादातून ही वृत्ती डोकावताना मला स्पष्टपणे दिसते आहे. ही वृत्ती फोफावत राहिली तर महाराष्ट्राचे ते दुर्दैव ठरेल असे माझे स्पष्ट मत आहे.

तरी जेम्स लेन/पुतळा हलविणे ह्या गोष्टींचे समर्थन करत असाल तर त्याला आक्षेप आहे, विना-जबाबदारी प्रक्षोभक मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हवे असल्यास, त्यावर विना-जबाबदारी क्षोभयुक्त कृती करण्याचे स्वातंत्र्य देखील असावे.

 
^ वर