सतीची प्रथा आणि अकबर

नुकताच अकबराचा विषय निघाला होता म्हणून माहितीच्या एका तुकड्याची आठवण झाली. आठवण पुन्हा चाळली आणि उपक्रमावर देत आहे.

--------

मध्यमवयाकडे झुकणार्‍या अकबराला सुफी पंथ, पारशी आणि जैन धर्मांविषयी गोडी लागली होती. हिंदू आणि ख्रिश्चन धर्माकडेही त्याचा ओढा वाढला होता. अनेक धर्मीयांशी होणार्‍या वादविवाद चर्चांतून त्याच्यात हळूहळू बदल होत गेले. त्यातील काही बदल म्हणजे त्याने मांसाहार सोडला. राज्यातील शिकारींवर निर्बंध आणले, जनावरांची कत्तल करण्यावर निर्बंध आणले. ते इतके की वर्षातील अर्धे दिवस पाळीव जनावरांची (गाई-बैल, म्हशी, घोडे इ.) कत्तल होत नसे.

खालील गोष्ट घडली तेव्हा अकबराने चाळीशी पार केलेली होती. एके दिवशी अकबर आपल्या राणीवशात (बहुधा हिंदू राणीच्या) झोपला असता सकाळच्या प्रहरी बायकांची कुजबूज त्याच्या कानी पडली. त्याने उठून चौकशी केली असता कळले की राजा भगवानदासाच्या कुटुंबातील एक स्त्री सती जात आहे. अंबेरचे राजा भगवानदास हे मोठे प्रस्थ होते. त्याच्या बहिणीचा विवाह खुद्द अकबराशी झाला होता आणि त्याचा मुलगा मानसिंग अकबराचा प्रमुख सेनापती होता. त्यांच्या कुटुंबात सती जात आहे असे कळल्यावर राणीवशात चलबिचल होणे साहजिक होते. अधिक चौकशी करता अकबराला कळले की -

जयमल नावाचा राजा भगवानदासाचा एक भाऊ होता. त्याची रवानगी बंगाल, बिहार, ओरिसाच्या क्षेत्रात लढाईसाठी झाली होती परंतु भर उन्हाळ्यात घोडेस्वारी करताना तो बिहारमध्ये उष्माघाताने आजारी पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याची बायको राव उदयसिंग या मारवाडच्या राजाची मुलगी होती. तिच्यावर सती जाण्यासाठी दडपण येत होते. सती जाण्यास तिची तयारी नव्हती परंतु घरच्यांनी तिला तिच्या संमतीशिवायही सती जाण्यास भाग पाडण्याचा निर्णय घेतला होता. यात खुद्द तिच्या मुलाचा समावेश होता.

अकबराच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर तो तिरमिरीने उठला आणि तडक घोड्यावर बसून सतीच्या चितेपाशी पोहोचला. बादशहा असा तिरमिरीने निघाला ही खबर कळताच त्याचे अंगरक्षकही घाईघाईने त्याच्या मागोमाग गेले. सुदैवाने, अकबर वेळेत पोहोचला आणि बादशहा आणि त्याच्यामागे आलेले सैनिक पाहून सतीची मिरवणूक थांबली. जबरदस्तीने त्या बाईला सती जाण्यास भाग पाडणार्‍यांची डोकी उडवावी अशी इच्छा झाल्याचे अकबराने नंतर व्यक्त केले परंतु प्रत्यक्षात तसे केले नाही. मिरवणूकीतील सर्वांना अटक मात्र झाली आणि काही काळ बंदीवास दिल्यानंतर त्यांची सुटका झाली.

या घटनेच्यावेळी राज्यात सती जाऊ नये असा पूर्वीच केलेला कायदा होता की या घटनेनंतर तसा कायदा करण्याचा निर्णय अकबराने घेतला ते नेमके कळत नाही परंतु सतीप्रथेवर बंदी आणण्याचा कडक कायदा करणे त्याला शक्य झाले नसावे. याचे कारण पदरी असणार्‍या प्रमुख राजपूत सरदारांना नाराज करणे त्याला शक्य नसावे. तरीही, 'केवळ त्या बाईची संमती असेल तरच ती सती जाऊ शकते परंतु तिच्या संमतीविना तिला सती जाण्यास प्रवृत्त करू नये आणि तसे करणार्‍यांवर कारवाई केली जाऊ शकते' असा कायदा त्याने केला.

अबु'ल फझलच्या म्हणण्याप्रमाणे अकबराच्या राज्यात कोतवालाची जबाबदारी ही "नागरक" या हिंदुग्रंथातील मौर्यकालीन कोतवालाप्रमाणेच होती. त्यात त्याने ज्या इतर कायद्यांची भर केली त्यात सतीविरोधी कायदाही होता. त्यानुसार, कोतवालाने गावात हेर नेमायचे आणि या हेरांनी गावात काय चालते त्याची इत्यंभूत माहिती परत आणायची. यात एखाद्या बाईला तिच्या संमतीविना सती दिले जात असल्यास ती कृती थांबवायचे आदेश होते. जर स्त्री स्वखुशीने सती जात असेल तर त्या घटनेत विलंब आणण्याचे आणि त्या स्त्रीचे मन वळवायचे आदेश होते. वेळ गेला की त्या स्त्रीचा दु:खावेग आवरून ती मृत्यूपासून परावृत्त होईल असा अंदाज त्यामागे होता.

अकबराचा कायदा किती सफल झाला याची कल्पना नाही पण त्याच्या पश्चात जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब यांनीही या कायदा तसाच ठेवला. किंबहुना, औरंगजेबाच्या राज्यात सती प्रथेवर पूर्णतः बंदी होती. इतर कायद्यांमध्ये अकबराने विधवांना पुर्नविवाह करण्याची संमती दिली होती आणि विवाहानंतर गर्भदानाचे वय किमान १२ असावे अशी सक्तीही केली होती.

सतीच्या प्रथेविरोधी कायदा करणारी अकबर ही बहुधा पहिली व्यक्ती असावी.

याच पार्श्वभूमीवर यापूर्वी १५६८मध्ये अकबराच्या स्वारीत चित्तौडला झालेला ३०० स्त्रियांच्या जौहाराची आठवण होणे साहजिक आहे. तो पाहून अकबराचे मन हेलावल्याचे संदर्भ पाहण्यास मिळत नाहीत. परंतु त्यावेळी अकबराला उपरती आणि साक्षात्कार झालेले नव्हते हे ही खरे.

संदर्भः अकबर द ग्रेट मोगल - विन्सेंट स्मिथ.

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद

चांगली माहिती.
-
शंका: स्त्रियांना मालमत्तेत हक्क असण्याचे दु:खावेग होण्याशी काही कोरिलेशन होते काय? किंवा, सर्वच प्रांतांमध्ये सती प्रथा का नव्हती?

बंगाल, सती आणि मालमत्ता हक्क

शंका: स्त्रियांना मालमत्तेत हक्क असण्याचे दु:खावेग होण्याशी काही कोरिलेशन होते काय? किंवा, सर्वच प्रांतांमध्ये सती प्रथा का नव्हती?

बंगालात कोणत्याशा प्रथेनुसार विधवेला पतीच्या मालमत्तेत हक्क मिळू शकत असे आणि बंगालात सतीची प्रथा रुढ होण्यामागे हेही एक कारण मानले जाते, असे पूर्वी वाचल्याचे स्मरते.

अद्ययावत प्रतिसादः
'मिताक्षरा' ही विज्ञानेश्वराने याज्ञवल्क्य स्मृतीवर अकराव्या शतकात लिहिलेली टीका आहे. तीनुसार विधवेला केवळ चरितार्थापुरत्या खर्चाचा हक्क मिळतो. या पद्धतीला 'मिताक्षर' म्हणून ओळखतात. मराठी ब्राह्मणांत बहुधा ही वापरात होती. पण बंगालमध्ये 'दायभाग' म्हणून पद्धत वापरात होती. ती जीमूतवाहनाने बाराव्या शतकात सर्व स्मृतींमधून केलेल्या टीकेवर आधारित आहे. तीनुसार स्त्रीला नवर्‍याच्या वारसदारांमध्ये मोजतात. याचा बंगालातल्या सतीच्या प्रमाणाशी संबंध असावा. यात गंमत अशी आहे की वरकरणी स्त्रीला अधिक हक्क देणारी पद्धत तिच्या जिवावर उठली.
(पण सतीसाठी प्रसिद्ध राजस्थानात मात्र 'मिताक्षरी' पद्धत होती.)
संदर्भः सती प्रकरण 'अंताजीची बखर' - ले. नंदा खरे.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

मिताक्षरा

आसाम आणि बंगाल सोडून सर्वत्र मिताक्षरा पद्धत आहे.
भारताच्या आयकर कायद्यातही "हिंदू अविभक्त कुटुंब" या एकाच कॅटॅगरीला बंगाल/आसाममध्ये वेगळे नियम आणि इतरत्र वेगळे नियम लागू होतात.

नितिन थत्ते

सनाका?

म्हणजे हिंदू-हिंदूंमध्येदेखिल नागरी कायदा समान नाही तर!

धन्यवाद

माहितीबद्दल धन्यवाद.

गंमत अशी आहे की वरकरणी स्त्रीला अधिक हक्क देणारी पद्धत तिच्या जिवावर उठली.

सहमत.
परंतु, एकूण विधवांच्या आयुष्यांमध्ये होणार्‍या उन्नतीच्या तुलनेत सती (पाठविल्या) जाणार्‍या स्त्रिया कमीच असल्यास समाजाच्या दृष्टीने 'सौदा' परवडण्याजोगा असावा.
अवांतरः असेच अजून एक उदाहरण लाखी डाळीचे आहे: पुरुषांना अग्रक्रमाने अन्न मिळण्याच्या पद्धतीमुळे लाखी डाळीपासून होणार्‍या पक्षाघाताचा त्रासही त्यांनाच अधिक होतो.

मी तर असे ऐकले आहे

स्त्रियांना मालमत्तेत हक्क असण्याचे दु:खावेग होण्याशी काही कोरिलेशन होते काय?

नक्कीच असू शकते. :-) कदाचित, वैधव्याचे जिणे हे मुसलमानांच्या जनानखान्यात भरती होण्यापेक्षाही वाईट असू शकते. :-(

किंवा, सर्वच प्रांतांमध्ये सती प्रथा का नव्हती?

मी तर असे ऐकले आहे की महाराष्ट्रात ब्राह्मणांत सती जाण्याची परंपरा नव्हती. ती मराठ्यांत होती पण तरीही रमाबाई सती गेलेली दिसते. चू. भू. दे. घे.

चांगली माहिती

नक्कीच चांगली माहिती. अकबर कल्याणकारी राजा असल्याचा अजून एक पुरावा, पण खुद्द औरंगजेबानेदेखील सती प्रथेच्या विरोधात कडक कायदा केल्याचे वाचून आश्चर्य वाटले.

@प्रियाली - तुम्ही फारच तपशीलवार आणि सुंदर लेख लिहिला आहे ह्याचे कौतुक वाटते, एवढा तपशील आठवून लिहिणे मला थोडे अवघड वाटते.

अवांतर - बायकोप्रमाणेच नवरादेखील सती जाण्याची सोय असती तर हि प्रथा चालू राहिली असती का? :)

नाही हं!

एवढा तपशील आठवून लिहिणे मला थोडे अवघड वाटते.

तपशील आठवत नाही. मुद्दा आठवतो. म्हणूनच वर लिहिले आहे की आठवण झाल्यावर (पुस्तक) चाळले.

बायकोप्रमाणेच नवरादेखील सती जाण्याची सोय असती तर हि प्रथा चालू राहिली असती का? :)

त्यावेळी एकापेक्षा अधिक बायका करायची प्रथा होती आणि बाळंतपणात वगैरे बर्‍याच बायका मरत. ;-) बाकी, मुघलांत पुनर्विवाह सर्रास होत त्यामुळेही अकबराने विधवा पुनर्विवाहाला संमती दिली असावी.

:)

चांगली माहिती दिल्या गेली आहे. उत्तम !

- (जिल्लेलाही , अझिमोशानषेहेण्षा: , आणि इतर) अखबार

हम्म नविनच माहिती!

बाकी अकबर ह्या व्यक्तिमत्वाविषयी बर्‍याचदा दोन टोकाची मतं सापडतात.
एक आहे ते सामान्य समजुतीप्रमाणे सहिष्णू ,दुसर्‍यांच्या धर्मात ढवळाढवळ न करणारा वगैरे, (सेक्युलर्,गांधी भक्त अकबर ? ;-) ).

आणि दुसरं म्हणजे "सनातन" च्या गोटात असलेली मतं.(स्त्री लंपट,परकीय,खुनशी,विकृत वगैरे )
त्याबद्दल माहिती देताना डॉ रायकरांनी कुरुंदकरांच्या हवाल्यानं दोन्ही बाजूंबद्दल खूपच छान् माहिती एका लेखात (लोकप्रभा दिवाळी अंक ) दिलिये.
http://www.loksatta.com/lokprabha/diwali2009/lp03.htm हा तो लेख.

(लेख आवडला पण शॉर्ट कट मारल्यासारखा वाटला. )
आपलाच
मनोबा.

विकृत नसावा

त्याबद्दल माहिती देताना डॉ रायकरांनी कुरुंदकरांच्या हवाल्यानं दोन्ही बाजूंबद्दल खूपच छान् माहिती एका लेखात (लोकप्रभा दिवाळी अंक ) दिलिये.

ती माझ्या फेवरिट्समध्ये आहेच. रायकर अतिशय उत्तम लिहितात; त्यांचे इतर लेखही मी जपून ठेवले आहेत. त्यांचे बहुतांश संदर्भ अचूक असतात. अकबराविषयी हा लेखही उत्तम आहेच.

अकबर विकृत असल्याबद्दल मात्र माझी असहमती आहे. १३ व्या वर्षी त्याच्या हाती सत्ता आली पण तरीही तो बैरामखानाच्या हातचे बाहुले होता. सत्ता गाजवण्यापेक्षा ऐशोआरामात वेळ घालवत होता. बैरामच्या सल्ल्याने वागत होता. मुंडक्यांचे मनोरे रचण्याचा आदेश काही स्वतः अकबराचा नव्हे. हं! शिक्कामोर्तब त्याने केले असावे. सुमारे २० व्या वर्षापर्यंत अकबर राजकारणात फारसे लक्ष घालत नव्हता.

अकबर चक्रम मात्र होता. ;-) एकदा त्याला घोड्यावरून उतरून पायी चालण्याची इच्छा झाली आणि किती पायी चालावा? ३६ मैल. बादशहा चालतो आहे म्हटल्यावर बरोबरचे सरदारही पायी चालू लागले पण प्रत्यक्षात बादशहासह ३६ मैलाचा पल्ला गाठणारे २-३च शिल्लक राहिले. अशाच एका प्रसंगी अकबर यमुना पोहत पार करून गेला. त्याला थोडीशी स्टंटबाजी करणे आवडत होते असे वाटते. अकबर इतर मंगोल आणि तुर्कांप्रमाणे क्रूरही होता. याबद्दल अनेक कथा सांगता येतील परंतु १५५६ ते १५७० मधला अकबर आणि १५७५ नंतरचा अकबर यांत नक्कीच परिवर्तन घडलेले दिसते.

आणि दुसरं म्हणजे "सनातन" च्या गोटात असलेली मतं.(स्त्री लंपट,परकीय,खुनशी,विकृत वगैरे )

सनातनवर बंदी येत्ये म्हणे. उत्तम झाले. सर्वप्रथम अकबर परकीय अजिबात नाही. स्त्रीलंपट, खुनशी वगैरे व्यक्ती पंधराव्या-सोळाव्या शतकात असणे यात नवल नाहीच. बाकी, ३०० स्त्रियांना जौहारात जाळले. त्यापैकी काही स्त्रियांची संमती नव्हती त्यांना काठ्यांनी ढकलून ढकलून आगीत लोटले. चमत्कारिक रीत्या यातील दोन स्त्रिया जिवंत सापडल्या. त्यांना अकबराने आपल्या जनानखान्यात धाडले. यांत नेमके विकृत कोण आहे? ;-) म्हटले तर कुणीच नाही. म्हटले तर कुणीही.

लेख आवडला पण शॉर्ट कट मारल्यासारखा वाटला.

अबु'ल फझल आणि विन्सेंट स्मिथने अधिक लिहिले असते तर मलाही माहिती मिळाली असती. :-)

सहमत

१००% सहमत आहे.त्याच्या स्टंटबाजीचे (अजून) काही किस्से सांगण्यासाठी जागा ठेवतो.

+१

अकबर चक्रम नक्किच असावा.

आपलाच
मनोबा

दरबारी चरित्रकार

अकबर चक्रम मात्र होता. ;-) एकदा त्याला घोड्यावरून उतरून पायी चालण्याची इच्छा झाली आणि किती पायी चालावा? ३६ मैल.

दरबारी चरित्रकारांना अशा गोष्टी फुगवून सांगणे गरजेचे असावे. तो अकबर बादशहा होता. मामूली गोष्ट आहे का? ३-४ मैल कशाला चालेल.
बाकी लेख उत्तम हेवेसांनल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अतिशयोक्ती

दरबारी चरित्रकारांना अशा गोष्टी फुगवून सांगणे गरजेचे असावे. तो अकबर बादशहा होता. मामूली गोष्ट आहे का? ३-४ मैल कशाला चालेल.

अतिशयोक्ती असण्याची शक्यता आहे खरेच पण या गोष्टी अकबर कसा चक्रम होता (किंबहुना स्टंटबाज होता) हे सांगण्यासाठीच येतात. :-) अबु'ल फज़लच्या मते तारुण्यात अकबराला असे स्टंट करण्यास आवडत होते. त्यामुळे अगदीच ३-४ मैल चालला नसेलही पण ३६ ही चालला नसेल हे आहेच.

सोबत अशी शक्यता वाटते की, अकबराला आपले आप्त फसवतात किंवा सोबत सोडतात हे पटत चालले होते. त्यावरूनही तो चालत राहिला आणि शेवटी केवळ २-३ जण सोबतीला उरले हे ठसवणारी म्हणूनही अबु'ल फज़ल ही गोष्ट देत असेल.

मूळ सतीच्या प्रसंगातही अकबर सकाळी उठला आणि कानावर बातमी पडताच तिरमिरीत एकटाच निघाला आणि मग महालात धावपळ झाली असा उल्लेख आहे, त्यावरूनही तो स्टंटबाज होता असे म्हणायला जागा आहे. :-)

अर्धे अवांतर

सतीचा दगड.

सती गेलेल्या ठिकाणी पूजेसाठी एका विवक्षित प्रकारचा दगड ठेवायची प्रथा होती. भारताच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळी होती. महाराष्ट्रात देशावरती अशा प्रकारचे दगड दिसतात.

लोणार येथील धारतीर्थाजवळील सतीशिला

दगडातील चित्रे अशी काही : घोड्यावर किंवा अन्य कुठल्या प्रकारे सती गेलेली स्त्री आणि तिचा नवरा, कोपरापासून स्त्रीचा हात मोठ्या आकारमानाचा, आणि मनगटात अक्षय सौभाग्याचे लेणे म्हणून बांगड्या. "यावच्चंद्रदिवाकरौ" या अर्थी सूर्य आणि चंद्र. ही रेखाटने थोडी स्पष्ट दिसण्याकरिता :

सतीशिला रेखाटने

लोणारच्या धारतीर्थापाशी दोन तरी सतिशीला आहेत (मी बघितल्या अशा). आणखी असल्यास माहिती नाही.

ओह्

हे असे आहे होय्? मी ही असे दगड पाहिले आहेत पण ते मला कळले नव्हते. मी त्यांना अर्धट कलाकारांची कारागीरी समजत असे! बरे झाले उलगडून सांगितले.
-निनाद

चांगली माहिती

चित्र स्पष्ट करून दाखवल्याबद्दल धन्यवाद. माहिती आवडली.

राजस्थानात अशाप्रकारे सतीच्या हातांचे ठसे ठेवून त्यांची पूजा केली जाते असे वाटते.

धन्यवाद

रोचक माहिती.

उत्तम

उत्तम माहिती.
लेख आवडला, लोकप्रभाची लिंकही उत्तम आहे. धन्यवाद.
-निनाद

+१

असेच.

माहितीपूर्ण लेख

लेख आवडला. बरीच नवीन माहिती वाचायला मिळाली.
अकबराची अशोकासारखी दोन रूपे पहायला मिळाली. मध्य युगातले पहिल्यापासूनचे कल्याणकारी राज्य = शिवराज्य असे तुम्ही का म्हणता ते कळाले.

कल्याणकारी राज्यांच्या छटा असतात. अशोक-अकबर-शिवाजी ही नावे पटकन डोळ्यासमोर येतात. पण इतर अनेक राजांना (भोज, हर्षवर्धन, जहांगीर?, मलिक अंबर?, शालिवाहन इत्यादींना) आपण अनुलेखाने मारतो असे वाटते.

प्रमोद

अकबराचे परिवर्तन

मध्य युगातले पहिल्यापासूनचे कल्याणकारी राज्य = शिवराज्य असे तुम्ही का म्हणता ते कळाले.

अकबर आणि अशोक या दोन्ही राजांनी प्रथमतः क्रूर व्यवहार केलेला आहे. अशोकाच्या परिवर्तनाला कलिंगचे युद्ध कारणीभूत ठरले असे म्हटले जाते. अकबराच्या परिवर्तनाला नेमके काय कारणीभूत ठरले ते कळत नाही. तसा स्पष्ट उल्लेख येत नाही. शिकारीवर असताना एका झाडाखाली आराम करताना झाले असा त्रोटक उल्लेख आहे. त्याचे परिवर्तनही अर्थातच एका रात्रीत वगैरे झालेले नाही ते अनेक वर्षे हळूहळू होत राहिले. माझ्यामते, जवळच्या लोकांनी सतत केलेल्या विश्वासघातातून अकबर बरेच शिकला. इराणच्या शहाचा विषप्रयोगाने झालेला मृत्यू इ. मधून तो शहाणा होत गेला. सूफी आणि पारशी धर्माबद्दल त्याला असणारी आस्था त्याला मवाळ आणि सहिष्णू धोरण राबवण्यात मदत करून गेली असावी.

अकबराची दुसरी एक जमेची बाजू म्हणजे दूरदर्शीपणा आणि तो फक्त धार्मिक बाबींमध्येच नाही. इतिहासात अनेक शासकांचा असा पायंडा दिसतो की पराभूत झालेल्या शासकाची आठवण पुसून नवे शासन निर्माण करायचे. अकबराने मात्र शेरशहा सुरीचे धोरण कायम ठेवून मोहर, रुपया, दाम हे चलन कायम केले. शेतसारा चलनात स्वीकारणे सुरु केले. दळणवळणासाठी महामार्ग बांधून राज्यबांधणी केली. आधी म्हटल्याप्रमाणे मौर्यकालीन व्यवस्थाही त्याच्या कारभारात दिसते. पूर्वीच्या शासकाचे चांगले ते स्वीकारणे हा ही कल्याणकारी राज्याचा एक पैलू आहे.

इतर अनेक राजांना (भोज, हर्षवर्धन, जहांगीर?, मलिक अंबर?, शालिवाहन इत्यादींना) आपण अनुलेखाने मारतो असे वाटते.

खरंय! अशोक, अकबराप्रमाणे किंवा शिवाजीप्रमाणे त्यांचा विस्तृत इतिहास, राज्यविषयक धोरण इ. मिळत नाही म्हणून.

जहांगीरचा इतिहास उपलब्ध आहे पण जहांगीरने अकबराचे राज्य राखले आणि वाढवले. सर्वकाही "सेट" केलेल्या अवस्थेत त्याला मिळाले त्यामुळे शासन व्यवस्था सुधारणे सोपे गेले असावे. तरीही, जहांगीरने न्यायासाठी जनतेशी सरळ संबंध साधला हे खरेच. व्यक्ती म्हणून मात्र जहांगीर अफूबाज आणि अतिशय अंधश्रद्ध होता असे वाटते. चू. भू. द्या घ्या (जहांगीरबद्दलची माझ्याकडील माहिती यथातथा आहे.)

अतिअवांतरः सहजच आठवले म्हणून; रायकरांनीही लेखात त्रोटक उल्लेख केला आहे. सर्वधर्मसमभाव राखण्यासाठी अकबराने राज्यातील इमारतींत हिंदू-मुस्लिम संस्कृतीचा/ कारागिरीचा मिलाफ करवला असे कळते. या पार्श्वभूमीवर पु. ना. ओकांची आठवण होते. ताजमहालात हिंदू संस्कृतींची चिन्हे का असा प्रश्न त्यांना पडतो त्याचे उत्तर हे असू शकते. सोबत शहाजहानची आई राजपूत असल्याने तोही कलेबाबत सहिष्णू होता असे वाटते.

मिलाफ

पु ना ओकांची आठवण करून दिल्यामुळे त्यांचा उल्लेख असलेले उपक्रमवरील जुने धागे शोधले.
आश्चर्य म्हणजे, प्रा. डॉ. दिलिप बिरुटे आणि विनायक गोरे या दोघांची या विषयावरील मते एकाच बाजूस दिसली!

मवाळ आणि सहिष्णु धोरण

सूफी आणि पारशी धर्माबद्दल त्याला असणारी आस्था त्याला मवाळ आणि सहिष्णू धोरण राबवण्यात मदत करून गेली असावी

सहमत आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाचा घटक कारणीभूत होता. राज्याचा भौगोलिक विस्तार आणि त्यात असणारी विविधता - संस्कृतींची, भाषांची, पंथांची, परंपरांची, इतिहासाची. अशा विविधतेने नटलेल्या आणि अस्ताव्यस्त पसरलेल्या भूभागाला एकाच राजकीय व्यवस्थेत बांधायचे असेल तर (थोड्याफार प्रमाणात का होईना) मांडलिक व्यवस्था आणि/ किंवा मवाळ व सहिष्णु धोरण यांना पर्याय नव्हता.

भारताच्या इतिहासात प्रचंड राज्ये ही केवळ अशोक आणि अकबर यांचीच होती असे नाही. चंद्रगुप्त, कुषाण, गुप्त राजे (विशेषकरुन समुद्रगुप्त), हर्षवर्धन, पुलकेशी चालुक्य (हर्षाचा समकालीन) यांचीही होती. राष्ट्रकूट, पाल, प्रतिहार या तीन राजवटींनी दीड दोनशे वर्षे आलटून पालटून जवळजवळ (सध्याच्या) पाऊण भारतावर सत्ता गाजवली आहे. अकबराच्या अगोदर सुलतानी अमदानीत महंमद बिन तुघलकाचे राज्य अशोकाच्या राज्यविस्ताराशी बरोबरी साधण्याइतके पसरले होते. अकबराच्या नंतर मुघलांनी राज्यविस्तार चालूच ठेवला आणि औरंग्या पापीच्या काळात तर हा विस्तार कळसाला पोचला होता. त्यानंतरही पेशवाईमध्ये मराठ्यांची सत्तादेखील फार मोठ्या भूभागावर पसरली होती –( एकाच छत्राखाली नव्हती – राजमंडळ – कॉन्फेडरेशन होते हा भाग वेगळा).

परंतु, अशोक, अकबर (आणि इंग्रजी अंमल तसेच त्यानंतर त्याचाच वारसा घेतलेले आपले सध्याचे प्रजासत्ताक) या तीन विशाल राज्यांमधील राजवटींमध्ये मध्ये आणि इतर राजवटींमध्ये एक फार फार महत्त्वाचा फरक आहे – मवाळ आणि सहिष्णु धोरण. इतर सगळ्या राजवटी एकतर हट्टी होत्या – उदा. महंमद तुघलक, औरंग्या; किंवा सरळ सरळ मांडलिक पद्धत वापरून मोठेपणाचा आभास निर्माण करणाऱ्या होत्या – उदा. गुप्त, हर्ष, राष्ट्रकूट, इ. ज्या ज्या राजवटींनी या विविधतेने भरलेल्या विशाल भूभागाला हट्टाने एकाच परंपरेत बांधायचा प्रयत्न केला, त्या त्या राजवटी अल्पायू ठरलेल्या आहेत. अकबराच्या नंतर औरंग्या पापीपर्यंत राज्य टिकले आणि वाढले त्याचे कारण जहांगीर आणि शाहजहॉं यांनी फार रॅडिकल बदल न करता राज्य केले. (औरंग्याने काही स्ट्रॅटेजिक गंभीर चुका केल्या. बिचाऱ्याची वेळही चुकीची होती. मुघलांच्या दुर्दैवाने शिवाजीला त्याच काळात जन्मायचे होते. त्याचबरोबर औरंग्याच्या चुकीच्या धोरणांमुळे शीख, बुंदेले तसेच इतर प्रादेशिक फोर्सेस यांना स्पेस मिळत गेली. अकबराने ही अशी स्पेस राहू नये याची पुरेपूर खबरदारी घेतली होती.)

थोडक्यात, मवाळ आणि सहिष्णु धोरण हा धार्मिक सिन्सिरिटीचा भाग असेलही, परंतु असे धोरण ही राज्यव्यवस्था टिकवण्याची गरज होती. दूरदृष्टी असणाऱ्या राजांना/ राजवटींना ही गरज समजली, आणि त्यामुळे असे धोरण ठेवणे ही त्यांच्यासाठी अपरिहार्यता ठरली. (भारतीय राज्यघटनेच्या मुळाशी हीच सखोल जाणीव आहे. त्यासाठी आपण घटनाकारांशी कृतज्ञ रहायला हवे.)

वेगळी बाजू

जरा (!) उशीरा प्रतिसाद देतोय.. क्षमस्व
लेख आवडला.. बरीच नवी माहीती मिळाली.

याच विषयावर सहा सोनेरी पाने मधे मात्र सावरकरांनी केलेला अकबराचा पंचनामा याच राजाची वेगळी बाजूही दाखवतो असे आठवते. (सध्या पुस्तक जवळ नाही)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

शिवाजी

>>अकबराचा पंचनामा

:)

सावरकरांना जे मान्य नव्हते ते (ऑलमोस्ट अकबराचे समकालीन असलेल्या) शिवाजीला मात्र मान्य होते असे दिसते.

नितिन थत्ते

तुलनात्मक

ते शिवाजीला तुलनात्मक रित्या मान्य असेल असे वाटते. म्हणजे औरंगजेबाशी तुलना करता अकबर सहिष्णू होता हे तर सावरकरही म्हणतात :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

वैट्ट

अकबर वैट्ट होता असं पु ना ओकांनी लिहिलेलं वाचलं आहे. पण त्यात मला पडलेला प्रश्न म्हणजे पाश्चात्यांची पुस्तके वाचून इतिहास जाणण्याबद्दल कटकटणारे ओक अकबराच्या वैट्टपणाचे संदर्भ व्हिन्सेण्ट स्मिथचेच देतात.

नितिन थत्ते

प्रचारक

याच विषयावर सहा सोनेरी पाने मधे मात्र सावरकरांनी केलेला अकबराचा पंचनामा याच राजाची वेगळी बाजूही दाखवतो असे आठवते. (सध्या पुस्तक जवळ नाही)

माझ्याजवळ आहे पण घरी आहे. संध्याकाळी अधिक संदर्भ देईन. ऑनलाईनही आहे. ५व्या किंवा ६ व्या सोनेरी पानांत कुठेतरी अकबराचे संदर्भ आहेत. असो.

सावरकरांचे सोनेरी पाने आणि प. वि. वर्तकांचे वास्तव रामायण यांत फारसा फरक नाही. दोघांचे संदर्भ बरोबर असतात पण सोबत ते टिप्पणी करू लागले की प्रचारक वाटू लागतात. अकबराविषयी लिहिताना सावरकर त्यांना योग्य वाटणार्‍या टिप्पण्या करू लागतात. जसे, अकबर हा सहिष्णू नव्हताच, तो सहिष्णू असण्याचे नाटक करत होता वगैरे. याला संदर्भ वगैरे ते काहीच देत नाहीत. अकबराने आपले राज्य सुरक्षित राहावे म्हणून जिझिया बंद केला असे म्हणतात. एक तर असे करण्यात अकबराचा शहाणपणाच आहे. तो मात्र ते मान्य करत नाहीत. याचबरोबर, आपल्या व्यक्तिगत जीवनातही अकबर अनेक हिंदू प्रथा पाळत होता हे लिहायला टाळतात.

जसे सावरकर अकबराबद्दल लिहितात तसेच शिवाजीबाबत लिहिणेही शक्य आहे. "शिवाजी कसला सहिष्णू? आधीच शून्यातून राज्य निर्माण करायचे त्यात आणखी मशिदी पाडल्या असत्या तर हिंदवी स्वराज्याला आणखी शत्रू निर्माण झाले असते. ते होऊ नये म्हणून सहिष्णू." पण हे त्या व्यक्तीचे मत झाले. इतिहास नाही हे लक्षात घेणे जरूरीचे आहे.

सावरकरांचे सहा सोनेरी पाने हे एक उद्दिष्ट समोर ठेवून लिहिलेले आहे. १८५७ च्या बंडाला स्वातंत्र्य संग्राम म्हणणे वगैरे. त्यासाठी ऐतिहासिक संदर्भ घेतलेले असले तरी त्याला इतिहास म्हणणे अयोग्य आहे. प्रचार म्हणणे योग्य ठरेल. सावरकर राजकारणी होते, इतिहासकार नाहीत.

+१

सहमत.

सहमत

सावरकरांचे सहा सोनेरी पाने हे एक उद्दिष्ट समोर ठेवून लिहिलेले आहे. १८५७ च्या बंडाला स्वातंत्र्य संग्राम म्हणणे वगैरे. त्यासाठी ऐतिहासिक संदर्भ घेतलेले असले तरी त्याला इतिहास म्हणणे अयोग्य आहे. प्रचार म्हणणे योग्य ठरेल. सावरकर राजकारणी होते, इतिहासकार नाहीत.

या अवतरणाशी व प्रतिसादाच्या रोखाशीही सहमत.

सोनेरी पानांचा उल्लेख यासाठी की सत्य ' एक ग्रेट मोगल' आणि 'एक फसवा मोगल' यांच्यामधे कुठे तरी असावे ही जाणीव मनात जागृत रहावी म्हणून होता. जसं सावरकर म्हणतात तो त्यांच्या भुमिकेचा प्रचार असला (आहेच) तरी पाश्चात्यांच्या व्यवसायाला जागा आणि संरक्षण देणारे मुघल चित्रित करताना त्यांचा इतिहासही संपूर्ण असेल का हे तपासलं पाहिजे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

राजकारण

सोनेरी पानांचा उल्लेख यासाठी की सत्य ' एक ग्रेट मोगल' आणि 'एक फसवा मोगल' यांच्यामधे कुठे तरी असावे ही जाणीव मनात जागृत रहावी म्हणून होता. जसं सावरकर म्हणतात तो त्यांच्या भुमिकेचा प्रचार असला (आहेच) तरी पाश्चात्यांच्या व्यवसायाला जागा आणि संरक्षण देणारे मुघल चित्रित करताना त्यांचा इतिहासही संपूर्ण असेल का हे तपासलं पाहिजे

राजकारणात कोणीही साधू नसतो आणि कोणीही संत नसतो. प्रत्येक राजकारणी मग तो अकबर असो की शिवाजी "फसवा" हा असतोच. फक्त फसवेगिरी अकबराने केली तर त्याला त्याचा दुष्ट कावा म्हटला जातो आणि म्हाराजांनी केली तर त्याला मुत्सद्दीपणा म्हटले जाते एवढाच फरक आहे. :-)

तरीही जेव्हा राज्यकर्ता लोककल्याणासाठी निर्णय घेतो (मग तो भलेही स्वतःचा स्वार्थ पाहत असेल) तर तो माझ्यामते कौतुकास पात्र आहे.

 
^ वर