सुवर्ण मध्य!

नैतिकतेचा अती बडेजाव न करता जितके जमेल व जेथे जमेल तेवढीच नैतिकता पाळायचे असे दीपालीने ठरविले होते. 'त्या जागी मी असते तर काय केले असते' हा प्रश्न विचारून समस्येला (नैतिक) उत्तर शोधण्याचा प्रयत्न ती नेहमी करत असे. 'विशिष्ट प्रसंगात तुझ्याशी त्याने/तिने कसे वर्तन करायला हवे होते, तसेच वर्तन मी त्याच्याशी/तिच्याशी करायला हवे' या वैश्विक नियमाचा तिच्यावर फार मोठा पगडा होता. अलेक्झांडर व पोरस राजाच्या भेटीच्या वेळचा संवाद तिला नेहमीच आठवत असे.

परंतु काही विशिष्ट प्रसंगात तिला स्वत:वर घालून (लादून!) घेतलेल्या या नियमाबद्दल फार चीड येत असे. तिचे इतर मित्र - मैत्रिणी अशा नैतिकतेच्या फंदात पडत नसल्यामुळे ते बिनधास्त होते. जीवघेण्या छेडछाडीत वा क्रूरचेष्टेत ते अत्यंत निर्दयपणाने वागत असतं. या गोष्टी enjoy करताना त्यांना काहीही वाटत नसे. दुसर्‍यांचा अजिबात विचार न करता मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा ते उठवत असतं. अशा वेळी त्यांचा तिला हेवा वाटत असे.

आताच तिला एक चांगली संधी चालून आली होती. नवर्‍याची सर्व संपत्ती हडपून स्वत:च्या खास मैत्रिणीच्या नवर्‍याबरोबर दूर कुठेतरी पळून जाण्याची ती आयती संधी होती. असले प्रकार तिच्या अवती भोवती नेहमीच घडत होते. त्यामुळे तिच्या मित्र -मैत्रिणींनासुद्धा यात काही आश्चर्य वा वावगे वाटले नसते. कदाचित नवर्‍यालाही यामुळे धक्का बसला नसता. (तोही नंतर आणखीन कुणाला तरी पळवून आणून त्याची भरपाई करून घेतली असती.) वरवर पाहता तिच्या नैतिकतेत ही गोष्ट कधीच बसली नसती.

परंतु आयुष्य फार गुंतागुंतीचे आहे, याची तिला पूर्ण कल्पना होती. गुन्हेगाराला कोंडून ठेवताना आम्हालाही कोंडून ठेवा असा आग्रह कुणी धरत नाही. फार फार तर गुन्हेगारावर आलेल्या प्रसंगातून आम्हीही जात असल्यास आम्हालाही कोंडून ठेवा असे आपण म्हणू शकतो. संदर्भ तोच असला तरी काही वेळा अपवादात्मक परिस्थिती असतेच. (शिवाय कायद्याच्या पळवाटाही असतातच!).

त्यामुळे दीपाली स्वत:लाच प्रश्न विचारत होती: तिचे हे वर्तन सर्वसामान्य नीतीमध्ये बसू शकेल का? तिला मिळत असलेल्या संधीसारखीच इतरांना संधी मिळाल्यास नवर्‍याच्या मित्राबरोबर वा मैत्रिणीच्या नवर्‍याबरोबर तेसुद्धा पळून गेले असते का? (याला कदाचित बहुतेक जण होकार देतील.)

तिला स्वत:लाच अशा प्रकारचा उथळपणा, व्यभिचार वा स्वत:च्या नवर्‍याच्या संपत्तीची लूट या नैतिक आहेत, असे कधीच वाटले नाही. परंतु विशिष्ट परिस्थितीत त्यासुद्धा नैतिक ठरतात. (वा ठरविता येतात.) जर हेच खरे असल्यास दीपाली स्वत:ला अपराधी असे समजून घेण्यात काही कारण नाही. ती बिनधास्तपणे मैत्रिणीच्या नवर्‍याबरोबर पळून जायला काहीच हरकत नसावी.

Source: The Analects of Confucius (5th Century BC)
Groundwork for the Metaphysics of Morals by Immanuel Kant (1785)

कन्फ्युशियसचा हा 'सुवर्णमध्य नियम' माणसांच्या नैतिक व्यवहारात क्षणोक्षणी सापडेल. गंमत म्हणजे या सुवर्णमध्याच्या तरतुदीमुळेच नैतिक नियमांचे पालन करणे सुलभ झाले असे म्हणता येईल. किचकट असलेले नैतिकतेचे नियम सर्व सामान्यांच्या आवाक्यात आले, असेही आपण म्हणू शकू.

दीपालीची मानसिक अवस्था म्हणजे कदाचित नैतिकतेची क्रूरचेष्टा आहे, असे वाटण्याचा संभव आहे. परंतु मुळातच नैतिक वर्तनाचा तोच गाभा आहे. अशा प्रकारच्या नैतिक नियमाबद्दल टोकाची भूमिका घेतल्यास नैतिकता हास्यास्पद ठरेल. किंवा त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही.

जी गोष्ट केल्यामुळे आपल्याला (अतीव!) वेदना होतील ती गोष्ट आपण कुठल्याही परिस्थितीत करू नये हीच जर आपली नैतिकतेची व्याख्या असल्यास आपण कधीच काहीही करू शकणार नाही. कारण आपण केलेल्या कृत्यामुळे कुणी ना कुणी तरी दुखावले जाणारच व त्यामुळे आपल्याला वेदना जाणवणारच. याचे परिणाम म्हणजे आपण कुणालाही उणे दुणे बोलू शकणार नाही, कुणालाही शिक्षा देऊ शकणार नाही, कुणाच्याही कामात आडकाठी आणू शकणार नाही. कारण यात कुणी ना कुणी तरी दुखावले जाण्याची शक्यता असते व त्यापासून आपल्याला दु:ख होवू शकते. आपल्याला कुणीतरी तुरुंगात टाकलेले आवडत नसल्यास आपण कुणालाही - त्यानी अनेक निष्पापांचे हकनाक बळी घेतले असले तरी - तुरुंगात टाकू शकणार नाही. कारण आपण केलेल्या नैतिकतेची व्याख्याच तसे करू देणार नाही. परंतु हे अव्यवहार्य आहे व तसे काही करायचे ठरविल्यास ते अत्यंत मूर्खपणाचे ठरेल.

म्हणूनच परिस्थितीनुसार वर्तनाची भाषा करणार्‍या दीपालीचे वर्तन यावेळी योग्य वाटू लागेल. प्रत्येक परिस्थिती एकमेवाद्वितीय असल्यामुळे त्या त्या परिस्थितीनुसार केलेले वर्तन सर्वस्वी वेगवेगळे असू शकते. आपण काहीही केले तरी ते समर्पक, नैतिकरित्या योग्यच वाटू लागेल. त्यामुळे सुवर्णमध्याच्या नैतिकसिद्धांताला काही अर्थच राहणार नाही. त्या नियमाला वासनात गुंडाळून ठेवावे लागेल.

मग यासाठी दुसरा कुठलातरी मध्यम मार्ग शोधावा की काय? समर्पक साधर्म्य असलेल्या परिस्थितीचा शोध हा एक मार्ग असू शकेल. तंतोतंत जुळत नसले तरी थोड्या फार फरकाने परिस्थिती तशीच असल्यास आपले वर्तनही एकाच प्रकारची असावी, असे ढोबळपणाने म्हणता येईल. उदाहरणार्थ, कायद्याच्या कक्षेत न बसणारे खून विविध प्रकारचे असतील; परंतु त्यामागील नैतिकतेच्या कारणामध्ये समान धागा सापडेल. नैतिकदृष्ट्या त्या एकाच प्रकारात मोडतील. परंतु हे विधान करताना आपण प्रश्नांचे सुलभीकरण तर करत नाही ना? एक म्हणजे समर्पक साधर्म्य शोधणे फारच जिकिरीचे असते. आणि दुसरे, प्रत्येक खुनी आपल्या कृतीचे समर्थन करण्यासाठी पळवाट शोधतच असतो. व आपण असे काही तरी विधान करून त्याची अपराधी मानसिकतेतून सुटका करतो. मानवी व्यवहार हे नेहमीच अत्यंत गुंतागुंतीचे असून प्रत्येक प्रसंग वैशिष्ट्यपूर्ण असतात व याची जाण नसल्यास संबंधितावर आपल्याकडून अन्याय होण्याचा धोका असतो.

दीपालीचेच उदाहरण घेतल्यास ती आपल्या स्वार्थासाठी समर्थन शोधत आहे असे वाटते. दीपालीचा हा मित्र स्त्रीलंपट व दुसर्‍याचे पैसे हडपणारा लबाड असल्यास काय होईल? दीपालीचा नवराच विकृत मनस्थितीचा असून तिचा मानसिक व शारीरिक छळ करणारा असल्यास दीपालीने काय करावे? अशा परिस्थितीत दीपाली स्वार्थी नसून धाडसी ठरेल.

दीपालीची ही घालमेल नैतिक तत्वांच्या पुरस्कर्त्यांना आव्हानात्मक ठरेल. नैतिकतेचे सर्वसामान्य नियमांचे पालन करत असतानाच विशिष्ट परिस्थितीचे भान ठेऊन वर्तन करणे, वाटते तितके सोपे नाही या निष्कर्षाप्रती आपल्याला पोचावे लागेल.

Comments

सुवर्ण मध्य नियम

कन्फ्युशियसच्या सुवर्ण मध्य नियमाबद्दलची अधिक माहिती येथे मिळेल.

नैतिकता म्हणजे काय?

हा लेख गोंधळलेला वाटला. नक्की काय प्रश्न आहे हेच समजले नाही.
नैतिकता म्हणजे 'जी गोष्ट केल्यामुळे आपल्याला (अतीव!) वेदना होतील ती गोष्ट आपण कुठल्याही परिस्थितीत करू नये' असा कोणी विचार करीत असेल हेच पटले नाही.
नैतिकता ही इतरांच्या बाबतीत केलेल्या कृतीचे परिक्षण. स्वतःच्याच बाबतीत असणार्‍या गोष्टी नैतिक किंवा अनैतिक कशा ठरतात? उदा. मला वेदना होतात म्हणून मी इंजेक्शन घेणार नाही. त्यापेक्षा मोठ्या वेदना मी सहन करीन. हा निर्णय नैतिक-अनैतिक असू शकत नाही. त्यामुळे दुसर्‍यावर परिणाम होणार असेल तरच त्यात नैतिकता शोधायची.

कन्फ्युशियसचे काय म्हणणे आहे हे नीट कळले नाही. कशास सुवर्णमध्य म्हणायचे वा मध्यममार्ग म्हणायचे याचाही उलगडा झाला नाही. अधिक विषद करून सांगितले तर बरे होईल.

प्रमोद

+१

गेम थिअरीतील 'जशास तसे' हा नियमच कन्फ्युशियसने सांगितला होता. या लेखात उगीचच गुंता झाला आहे.
मात्र, अनंत काळासाठी व्यवहार करण्याच्या प्रसंगीच (प्रिझनर्स डायलेमाचा आवर्ती प्रकार) सुवर्णमध्य हा नियम उपयुक्त असतो. त्यानुसार असे दिसते की नेहमी येणार्‍या गिर्‍हाईकाला फसवू नये. परंतु, एकच व्यवहार करणे अपेक्षित असून त्यात अनैतिक वागल्यामुळे कायमचा मोक्ष मिळणार असेल (आणि तो हवा असेल) तर विश्वासघात करणे योग्य असल्याचे (प्रिझनर्स डायलेमाचा सुटा प्रकार) दिसते.

सुवर्ण (व रजत) नियम

  • इतरांकडून ज्या प्रकारे आपल्याला वागविण्याची अपेक्षा केली जाते त्यानुसार आपले वर्तन असावे; (सुवर्ण नियम)
  • आपल्याला ज्या वर्तनामुळे दु:ख/वेदना होऊ शकतात त्याप्रमाणे आपले वर्तन इतरांशी वागताना असू नये. (रजत नियम)

हे सुवर्ण (व रजत) नियम अधोरेखित करण्याच्या उद्देशाने लेख लिहिला होता. परंतु हा उद्देश साध्य झाला नाही हे प्रतिसादावरून स्पष्ट होते.
मानवी हक्क वा अधिकार यासंबंधी विचार करताना या सुवर्ण नियमाचा आधार घेतला जातो. या मानवी हक्कात आपापले नातेसंबंध, आपली जातपात व जमात, आपले धर्म, राष्ट्र, भाषा, इत्यादींचा विचार न करता हे हक्क सर्वांना बहाल करावे अशी अपेक्षा ठेवलेली आहे (त्यांचे तंतोतंत पालन होते की नाही हा वेगळा प्रश्न!). परंतु या लेखात व्यक्तिगत पातळीवर या नियमांचे पालन करताना होत असलेल्या मनस्थितीबद्दल थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
मुळात हे नियम "जशास तसे" या सदरात मोडत नसून न्याय्य वर्तनाच्या अपेक्षेतून केलेले आहेत. या नियमांचे पालन सरधोपटपणे न करता विवेकीपणाने (अपवादात्मक परिस्थितीचे भान ठेऊन) निर्णय घ्यावे या मर्यादित अर्थाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नैतिकतेचे अनेक आयाम असून हे नियमसुद्धा त्यापैकी आहेत. विवेकी विचारातून होणार्‍या कृतीत हे नियम subconsciously नक्कीच लक्षात घेतले जात असावेत.

?

मुळात हे नियम "जशास तसे" या सदरात मोडत नसून न्याय्य वर्तनाच्या अपेक्षेतून केलेले आहेत.

आँ! रेसिप्रॉसिटी म्हंजेच 'ठोशास ठोसे' ना?

योग्य की अयोग्य

नीतीमत्ता हे नेहमीच स्थळकाळसापेक्ष असल्याचे दिसून येते. पति आणि पत्नी यांनी आजन्म (की जन्मोजन्मी) एकत्रच रहावे, विशेषतः पत्नीने परपुरुषाचा विचार करता कामा नये यालाच नैतिकता म्हणायचे असे कोणी ठरवले? समाजाच्या स्थैर्याच्या दृष्टीने पाहता हे हितकर म्हणून अनेक समाजांमध्ये तसे समजले गेले.
दुसरी गोष्ट पत्नीने पतीला लुबाडून दूर पळून जाण्याची. त्यात किमान तीन गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. पहिली म्हणजे दीपालीचा पती आपली संपती सांभाळण्याला समर्थ नाही . दुसरी म्हणजे दीपालीला त्याच्याबरोबर रहाण्याची इच्छा नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तिच्या मैत्रिणीचा नवरा आपल्या पत्नीला सोडून देऊन दीपालीबरोबर दूर निघून जायला तयार आहे. त्यानंतर तो तिला नीटपणे वागवेल की फसवेल वगैरे पुढच्या गोष्टी झाल्या. हा सारासार विचार करणे हे योग्य की अयोग्य हे ठरवणे झाले.
नैतिक की अनैतिक याचा विचार करता करता योग्य की अयोग्य या विषयावर गाडी आलेली दिसते. ते ठरवण्याची देणगी माणसाला बहुधा उपजत मिळालेली असते.

 
^ वर