मिशन हस्ताक्षर

सांगायच कारण काय तर आज काल हाताने केलेले लिखाण खूपच वाईट यायला लागलय. काय कारण असेल बर याचं. जरा धांडोळा घेतला तर लगेच कारण उमजले. काय असेल ते तर गेल्या दोन वर्षात मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही. तेव्हा जरा भूतकाळात डोकावण्याची इच्छा झाली.

शाळेतील ते दिवस आठवले. पाचवी-सहावीला असताना माझे अक्षर म्हणजे शाळेत असताना एक अगम्य होतं. शिक्षक म्हणायचे कार्ट्या काय ह्या कोंबडीच्या नख्या काढल्यात. त्यामुळे कधी कधी गृहपाठाची वही डोक्यात पडायची. हा नित्यनेम सातवीत जाईपावेतो असाच होता. सातवीला एका भल्या शिक्षकांनी मला अक्षर सुधारण्यावर भर दिला आणि त्या गुरुंच्या कृपेने माझे अक्षर अगदी दृष्ट लागण्याइतके सुरेख झाले.

तेव्हापासून ते शिक्षण पुर्ण होईपर्यंत माझे अक्षर अतिशय उत्तम राहिले. पण काही म्हणजे तीन-चार वर्षांपूर्वी जेव्हा आयटी क्षेत्रात प्रवेश केला आणि कळफलक बडवायला सुरुवात केली. तेव्हापासून माझे अक्षर लेखन बिघडायला लागले. सुरुवातीला काही लक्ष दिले नाही. पण आता वाटतयं की काहीतरी गमावतोय.

सहज हातात पेन घेउन लिहण्याचा जरी प्रयत्न केला, तरी मी काही शब्द नीट लिहू शकत नाही. म्हणजे काय तर एकंदरीत मी माझी लिहण्याची क्षमताच गमावून बसलोय. मग पुन्हा एकदा अक्षरप्रपंच सुरु करावासा वाटला आणि त्याला सुरुवात करतोय, पुन्हा तीच ती जुनी शाईची लेखणी घेउन..

मग तुम्ही केव्हा सुरु करताय. लिखाण करायला.... शाईची लेखणी घेउन..

लेखनविषय: दुवे:

Comments

मीही!

मी पेन आणि पेन्सिल वापरून काही लिहिलेच नाही.

पेन 'आणि' पेन्सिल वापरून कोण लेखन करते?

हॅ हॅ हॅ

पेन 'आणि' पेन्सिल वापरून कोण लेखन करते?

A wife asks her husband, a software engineer; “Could you please go shopping for me and buy one carton of milk, and if they have eggs, get 6!”

A short time later the husband comes back with 6 cartons of milk.

The wife asks him, “Why the hell did you buy 6 cartons of milk?”

He replied, “They had eggs.”

.

पेन-पेन्सिल?

पेन 'आणि' पेन्सिल वापरून कोण लेखन करते?

कोण जाणे? मी तर गेले कित्येक वर्षे कट-कॉपी-पेस्ट करून जगते आहे. ;-)

शंका

कट-कॉपी-पेस्ट

'कट/कॉपी-पेस्ट' असा शब्दप्रयोग तुम्हाला अपेक्षित असावा.

हो

'कट/कॉपी-पेस्ट' असा शब्दप्रयोग तुम्हाला अपेक्षित असावा.

'कट/कॉपी-पेस्ट' हे योग्य. :-)

जुनं ते सगळंच सोनं नसतं!

माझे हस्ताक्शर शाळेत असतानाही कोंबडीच्या पायांच्या ठश्सारखेच होते. अजून ही आहे. मला ते सुधारावेसे वाटत नाही. उलट मला 'दोनही हातांनी सहजपणे लिहीता आले तर किती छान होईल!' असे विचार आधी मनात होते व अजून ही आहेत. गांधीजी म्हणे दोनही हातांनी लिहीत असत. परीक्शेच्या वेळी एकाच हाताने जलदपणे उत्तरपत्रिका लिहीताना हात खूप दुखायचा. तेंव्हा दोन हातांनी लिहीता आलं असतं तर..! असं खुप वाटायचं. पण लहानपणी पाटीवरची पेन्सिल डाव्या हातात घेतली कि हातावर आईवडील पट्टी मारायचे, म्हणायचे तो हात घाणेरडा आहे. उजवा हात चांगला आहे, शुभ आहे. माझा लहान भाऊ जन्मत:च डावखुरा होता. घरच्यांनी जबरदस्तीने त्याला उजव्या हातानेच कामे करायला भाग पाडले. त्याचं (उजव्या हाताचे) हस्ताक्शर तर माझ्यापेक्शाही खराब आहे.

माझ्या मते, दोनही हातांचा वापर करता यायला हवा. कारण लिहीताना देखिल उजव्या-डाव्या हाताचा संबंध दोन मेंदूशी - चंगुमंगूशी एकसारखाच होवू शकतो.

'जुनं ते सगळंच सोनं नसतं!' आपल्याकडे शुद्धलेखनाचा, हस्ताक्शराचा जूना दृश्टीकोन अगदीच धार्मिक आहे, तो बदलला जायला हवा. (शाळेतील फळ्यांवर लिहीलेले सुविचार देखिल तसेच असायचे.)

शुद्धलेखन आणि धार्मिकता

डाव्या हाताने लिहू नये म्हणून जबरदस्तीने उजव्या हाताने लिहिणे यामुळे हस्ताक्षर आणि धार्मिकतेचा संबंध मान्य आहे पण शुद्धलेखन आणि धार्मिकतेचा संबंध काय?

संबंध अप्रत्यक्श आहे, थेट नाही.

शुद्धलेखनाचा संबंध काही मंडळी अप्रत्यक्शपणे शुद्ध चारीत्र्याशी जोडतात. जे मुळात चूकीचे आहे.
शुद्धलेखन ही गोश्ट धार्मिक नाही. पण धर्माने ज्यांना वरचे स्थान दिले आहे त्यांपैकी कट्टरपंथीयांचीच इतरांचे लेखन 'शुद्धलेखनाच्या' चौकटीत नसले कि भयानक बोंबाबोंब असते. याच कारणामुळे मागासवर्गीय मंडळी आपले आडनाव खुलेपणाने दाखवत अनेक मराठी संकेतस्थळावर लेखन करण्यास धजत नाहीत. धर्म इथे आडवा येतो.

चारित्र्य?

शुद्धलेखनाचा संबंध काही मंडळी अप्रत्यक्शपणे शुद्ध चारीत्र्याशी जोडतात.

चारित्र्य कसे?

धर्माने ज्यांना वरचे स्थान दिले आहे त्यांपैकी कट्टरपंथीयांचीच इतरांचे लेखन 'शुद्धलेखनाच्या' चौकटीत नसले कि भयानक बोंबाबोंब असते. याच कारणामुळे मागासवर्गीय मंडळी आपले आडनाव खुलेपणाने दाखवत अनेक मराठी संकेतस्थळावर लेखन करण्यास धजत नाहीत. धर्म इथे आडवा येतो.

ओक्के. असे प्रवाद पूर्वीही ऐकले आहेत पण त्यात कितपत तथ्य आहे माहित नाही.

सहमत

आपल्याकडे शुद्धलेखनाचा, हस्ताक्शराचा जूना दृश्टीकोन अगदीच धार्मिक आहे, तो बदलला जायला हवा.
सहमत.
माझ्या मते लेखन हे सुवाच्य असले तरी पूरेसे आहे. शुद्धलेखनाच्या बाबतीत म्हणाल तर अर्थाचा अनर्थ करणारे अशुद्ध लेखन टाळायला हवेच.

शाई

शाई वॉलमार्टाच्या कोणत्या आयलात (स्वारी! हा ब्याडवर्ड नाही) मिळते? ;-)

--------

पण पिंगू यांचे म्हणणे खरे आहे. शाळेत असताना माझे हस्ताक्षर चांगले होते. अगदी मोत्याचे दाणे नाहीत पण मक्याचे दाणे नक्की. ;-) त्याची आता पार वाट लागली आहे. हात फक्त सहीसाठी वळतो इतकेच. बाकी, हाताने लिहिणे म्हणजे परमकष्ट वाटतात.

रिट्रो फॅशन

केवळ बोटांनीच (पेन/पेन्सिल इ. न वापरता) लेखन करण्याची सवय स्पर्श्यपटलांमुळे करून घ्यावी लागू शकेल.

हस्ताक्षर

माझे हस्ताक्षर कसे लिहू नये हे दाखवण्यासाठी माझे मास्तर सर्व वर्गाला दाखवीत. त्यावेळी बहुतांश लिखाण फाउंटन पेनने व्हायचे. कॉलेजमधे गेल्यावर बॉलपेन आले. त्याकाळचे बॉलपेन हे फुंकून लिहिते करायला लागायचे. त्यात मला दाबून लिहायची सवय लागली. लवकरच मी टायपिंग शिकलो. त्यानंतर हळूहळू मराठी लिहिण्याचा संबंध तुटत गेला. इतका की काही अक्षरे लिहायची कशी असा प्रश्न पडायला लागला.

लहानपणी एक वाचले होते की लहान मुलांचे विचार कमी वेगाने होतात आणि पेन त्यापेक्षा जास्त वेगाने धावतो म्हणून हस्ताक्षर वाईट होते. मोठेपणी याउलट होते म्हणून अक्षर वाईट होते हा त्याचा व्यत्ययास. दोन्हीचा वेग सिन्क्रोनाइज करून लिहिणारे म्हणून विरळाच असावे.

हस्ताक्षर वाईट असण्याचे कारण माझी बेपर्वाई असावे. पण तेवढेच नसावे. तर माझा मसल रोटोर कंट्रोल का काय म्हणतात कमकुवत असावा. हाताने लिहायची वेळ मला बरेचदा येते. कारण साईटला जायचे आणि त्यांना दिलेल्या सूचना ट्रिप्लिकेट बुक वर लिहून काढायच्या हा आमच्या व्यवसायातील एक भाग. यावेळी माझी दाबून लिहिण्याची सवय कामाला आली.

हल्ली कलाविषयात गोडी आल्यापासून सौंदर्यदृष्टी थोडी वाढली आहे. हस्ताक्षरात काहीच प्रगती नसावी. पण हाताचा उपयोग वाढल्यापासून थोडी सफाई कदाचित आली असावी. चित्रकलाप्रकारात जलरंग कुठले (काय दर्जाचे) कागद कुठला यामुळे फार फरक पडतो. कागद, रंग, ब्रश, पेन्सिली यांचे डावे उजवे कळू लागल्या पासून त्याकडे आदराने बघतो.

हल्ली ठरवून फाउंटनपेन वापरायला लागलो. अर्थात पेन अगदी चांगल्या दर्जाचा, लिखाणाचा कागद देखील चांगला म्हणजे शाई न फुटणारा वापराय्ला लागलो. फाऊंटनपेनची खासियत अशी झाली आहे की वळणे वाटेल तशी घेता येत नाही, जोर कमी ठेवावा लागतो. पेन वापरायचा वेग थोडा मंदावला. या सर्वाचा माझ्या अक्षरावर चांगला परिणाम झाला असावा. तरीही मी काही लिहून दिले की हे काय असे विचारणारे कमी नाहीत.

प्रमोद

सुरुवात केली (पण बहुधा सार्वत्रिक गरज नाही)

गेली काही वर्षे मी छंद म्हणून शाईच्या लेखणीने अधूनमधून लिखाण करतो. गंमत वाटते.

(परंतु अन्य लोकांना गंमत वाटण्यासाठी अन्य छंद असू शकतील. हाच छंद निवडावा असे नाही.)

पिंगू यांनी सुलेखनाबद्दल माहिती, उदाहरणे जरूर द्यावीत, ही विनंती. यातली गंमत लोकांपर्यंत पोचली, तर अन्य छंदांबरोबर हा छंदसुद्धा निवडायला लोकांना उत्साह वाटेल.

(संदर्भासाठी : अन्यत्र या धाग्यात सुलेखनाबद्दल चर्चा झालेली आहे. उपक्रमावरती श्री. ऋषिकेश यांचा बोरूबद्दल धागासुद्धा बघावा.)

 
^ वर