को$हम्? मी कोण?

कोSहम् ?....(मी कोSण?)
----------------------------
"तुम्ही कोण आहात?"
.
"मी भारतीय आहे.महाराष्ट्रातील पुणे शहराचा नागरिक आहे."
.
"बस? एव्हढाच तुमचा परिचय? हीच खरी ओळख?"
.
"माझे नाव माधव वसंत देसाई.मी पुण्यातील समर्थ विद्यालयात शिक्षक आहे.कोथरूडला मयूर कॉलनीत राहातो"
.
"मोठमोठ्या तत्त्ववेत्यांनासुद्धा पडतो तो मी कोण ? हा प्रश्न तुम्हाला कधी पडत नाही? मनात सुद्धा येत नाही?"
.
"नाही. कारण माझ्याजवळ निवडणूक ओळखपत्र आहे.शिधावाटपपत्रिका आहे.पॅनकार्ड आहे. पासपोर्ट आहे.बॅंकबुक आहे.त्यावर माझे नाव,पत्ता,फोटो आहे.अल्झायमर सारखा स्मृतिभ्रंशाचा आजार मला अद्यापि झालेला नाही.तसेच मी आध्यात्मिक तत्त्ववेत्ता नसल्याने मला कसला भ्रम झालेला नाही.त्यामुळे मी कोSण? असला प्रश्न मला कधी पडत नाही.पडण्याचे कारण नाही."
.
"पण तुम्ही खरे कोण आहात? तुमचे मूळ स्वरूप काय? याचा कधी विचार केला आहे का? नुसती कार्डे आणि फोटो असले म्हणजे झाले?"
.
"डार्विनच्या उत्क्रांतिवादाविषयी थोडे काही वाचन केले आहे.पृथ्वी अस्तित्वात आल्यानंतर तिच्यावरील विविध रासायनिक द्रव्यांचे क्रमपर्यायी संयोग (पर्म्यूटेशन कॉम्बिनेशन्स) सुरू झाले.या सततच्या प्रक्रियेतून कांही अब्ज वर्षांनी समुद्राच्या पाण्यात सजीव पेशी अगदी प्राथमिक स्वरूपात यदृच्छया निर्माण झाल्या.तेच पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचे आदिस्वरूप होय.म्हणजे तुमचे,माझे आणि त्या तत्त्ववेत्यांचे मूळ स्वरूप तेच, असे म्हणता येईल.या मूळ सजीव स्वरूपाची निर्मिती साधारणपणे तीनशे ऐशी कोटी वर्षांपूर्वी घडली.पुढे हळू हळू उत्क्रांती झाली हे तुम्ही जाणतच असाल."
.
"मला असले काही कळत नाही.मला हे अभिप्रेत नव्हते."
.
"समजायला थोडे किचकट आहे खरे.पण तेच वैज्ञानिक सत्य आहे.
बरे, तुम्हाला काय अपेक्षित होते?"
.
"तत्त्वमसि म्हणजे ते ब्रह्म तूच आहेस हे कधी ऐकले नाही का?"
.
"होs. तत् त्वम् असि। तत् त्वमेव,त्वमेवतत्।(ते तूच आहेस, तूच ते आहेस.)अहम् ब्रह्मास्मि।सोsहम् अहम् स:। ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापर:।(ब्रह्म हेच सत्य आहे.जग हे खोटे,भासमय आहे) हे सगळे वाचले आहे. मुखोद्गत आहे."
.
"मग त्यावर विश्वास नाही काय?"
.
"ते विश्वासार्ह नाही.तसेच उपयोगीही नाही."
.
"अहं ब्रह्मास्मि।" हे निरुपयोगी आहे असे कसे म्हणता येईल"
.
"मागे पारपत्रासाठी (पासपोर्ट) अर्ज केला होता.तो चौकशीसाठी पोलीसखात्याकडे गेला.त्यांच्याकडून बोलावणे आल्यावर चौकीत गेलो.त्यांनी ओळखीसाठी तसेच अधिवास सिद्ध करण्यासाठी दाखले मागितले.तिथे जर ,"चिदानन्दरूप: शिवोSहम् शिवोSहम्।"असे म्हटले असते आणि "हे विश्वचि माझे घर।" असे अधिवासाविषयी सांगितले असते तर,"अर्जदाराचे मानसिक संतुलन बिघडले आहे.पासपोर्ट देणे योग्य नाही"असा शेरा मारून अर्ज परत पाठवला असता.योग्य ती कागदपत्रे दिली म्हणून पारपत्र मिळाले.काय उपयोग त्या अहं ब्रह्मास्मि चा? चर्चासंवादाच्या प्रारंभी सांगितली तीच खरी ओळख ."
.
"निघतो मी.तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही.तुम्हाला ते पाश्चिमात्य विज्ञान खरे वाटणार आणि तुम्ही भारतीय अध्यात्माला खोटे म्हणणार!"
.
"विज्ञान पाश्चिमात्य,पौर्वात्य,दाक्षिणात्य,औतरात्य असे काही नसते. ते जागतिक असते.सार्वत्रिक असते.वस्तुनिष्ठ असते.ते अखिल मानवजातीसाठी असते.एखादी गोष्ट पाश्चिमात्य म्हणून खरी,अधिक चांगली असे मुळीच मानत नाही.
बायबल अथवा अन्य धर्मग्रंथात सृष्टीच्या निर्मितीविषयी जे काही लिहिले आहे, त्यापेक्षा भारतीय ब्रह्मसिद्धान्त नि:संशय सरस आणि अधिक कल्पकतापूर्ण आहे.सुदीर्घ आणि सखोल चिंतन मनन करून मांडला आहे."
.
"ब्रह्मसिद्धान्ताविषयी तुम्हाला सगळे ठाऊक आहे?"
.
"सगळे नाही पण थोडे फार वाचले आहे."
.
"अरे वा! कधीतरी यायला हवे ऐकायला."
.
"चर्चा करायला अवश्य यावे.स्वागत आहे."
************
मी कोण? माझ्या जन्माचा हेतू काय? माझ्या जीवनाचा अर्थ काय?माझे जीवितकार्य कोणते? असले प्रश्न निरर्थक वाटतात.जनुकसातत्य राखण्याची जी प्रत्येक सजीवाची नैसर्गिक ऊर्मी असते तिची परिणती म्हणून प्रत्येक प्राण्याचा जन्म होतो.त्यामागे कोणाचा काही हेतू असतो असे वाटत नाही.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा।ज्याचा तिही लोकी झेंडा। असे सर्वच मातापित्यांना वाटते.(कन्येविषयी असे काही वाचनात नाही.)आपल्या पोटी सर्वगुणसंपन्न,सर्वशुभलक्षणयुक्त,बुद्धिमतांवरिष्ठ असा पुत्र जन्माला येणार असे हल्ली अनेक जोडप्यांना वाटते ते गर्भसंस्कारांविषयींच्या अवास्तव कल्पनांमुळे.पण अपत्याला जन्म देण्याचा तो हेतू नसतो.
कांही जण आपल्या अनन्यसाधारण अंगभूत गुणवत्तेमुळे विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवतात.मरावे परी कीर्तीरूपे उरावे। हे प्रत्यक्षात आणतात.
सर्वसामान्यपणे समज आल्यावर माणसाला आपल्यातील गुण-दोषांची, क्षमता-मर्यादांची,आवडी-निवडींची कल्पना येते.तदनुसार कार्यक्षेत्र निवडण्याचा प्रयत्‍न होतो. बरेचदा मिळेल ते स्वीकारावे लागते.पर्याय नसतो.मग सर्वसामान्य आयुष्य जगावे लागते.त्यात खेद मानण्याचे कारण नाही.आपल्याला लाभलेले हे एकमेव जीवन आहे.ते इथे आनंदाने सुखासमाधानाने व्यतीत करावे.जमेल तेवढे सत्कार्य करावे.
एकूण काय तर कोSहम्? मी कोण? असा प्रश्न पडू नये.
पारपत्रावर असतात ती वडील,आई,जन्मगाव यांची नांवे हींच
"कस्य त्वं? त्वं कुत आयात:?।
ध्यानं देही त्वमिह भ्रात:।"
या आदिशंकरांच्या प्रश्नांची खरी उत्तरे आहेत.
*****************************************************

लेखनविषय: दुवे:

Comments

:)

गुंडोपंत नाहीत आता.

नितिन थत्ते

:-)

मुळ स्वरुप!! टोनी लोपेझ उवाच

ले.आ.हे.वे.सां.न.ल.

पुत्र व्हावा ऐसा गुंडा|

गेले ते गुंडोपंत नाही दिन गेले. ;-)

जान है जहाँ है

अहं ब्रह्मास्मि या वाक्याच्या बाजूने वा विरुद्ध फारसे बोलता येत नाही.
त्याच्या आगेमागेच्या तत्वज्ञानाबद्दल म्हणजे मुक्तिच्या तत्वज्ञानाबद्दल मात्र विरुद्धार्थाने बोलता येते. मुक्तिच्या तत्वज्ञानाशी बहुदा या वाक्याचा फारसा संबंध नसावा.

हिंदी/उर्दूतील 'जान है तो जहाँ (जग) है' या वाक्यात किंवा देकार्तवरचे 'मी विचार करतो म्हणून मी आहे' या दोन्ही वाक्यात असेच काहीसे आहे. वास्तववाद -रियलिज्म(?) आणि कल्पनावाद-आयडीयालिज्म (?) या दोन्हीना खोडून टाकता येत नाही. या जगातील पदार्थांपासून आपण बनले आहोत का हे जग फक्त आपल्या जाणीवांचाच (मॅट्रिक्स) एक भाग आहे. हे जाणून घेण्याची युक्ति आपल्याकडे नाही.

मी स्वतः मात्र रियलिस्ट पक्षाचा आहे. मला कल्पनाविश्वातील भासमान जग असण्याची शक्यता कमी वाटते. स्वतः शंकराचार्यांच्या नावावर याबाबतीत गमतीदार किस्से आहेत.

शंकराचार्य वा त्यासारख्या तत्वज्ञानात पुनर्जन्माला, स्वर्ग-नरकाला भासमान जगाचा एक भाग समजला जातो. याबद्दल विवेकानंदांच्या 'सायन्स ऑफ रिलिजन' या पुस्तकात वाचल्याचे आठवते. हे भासमान जग संपवून आपण ईश्वररूपी तेजात विलिन व्हायचे म्हणजे मुक्ति अशी काहीशी मुक्तिची व्याख्या होते. यासाठी शंकराचार्य भक्तिची कास धरायला सांगत असावेत. त्यांच्या भज-गोविंदं काव्यावरून मला तसे वाटते. या मार्गावर ते अहं ब्रह्मास्मी वरून कसे येतात हे मला कळले नाही.

बाकी 'तू कोण' हा प्रश्न सोडवता येत नाही म्हणून निरर्थक हे मान्य. उत्तर 'अहं ब्रह्मास्मी वा सोहं' ठरवल्यावरही काहीच वेगळे वागता येत नाही म्हणूनही हे निरर्थकच. पण त्याकडे विरंगुळा म्हणून पहायला माझी हरकत नसते.

प्रमोद

नटसम्राट

पण अपत्याला जन्म देण्याचा तो हेतू नसतो

आपण फक्त वासनेचे जिने असतो...

अहं ब्रह्मास्मि.

छे आम्ही ..प्रज्ञानं ब्रह्म म्हणतो. :) ह्याचा विचार करा.

थोडे गंभीर पणे -

१. लेख लिहिण्याची शैली उत्तम आहे ह्यात वाद नाही, लेख वाचण्यात मजा आली.
२. पारपत्राचे उदाहरण जरा गडबड आहे मात्र, अधिवास सांगण्यासाठी 'मी मिल्की वे मध्ये राहतो' हे वाक्य देखील संदर्भहीनतेमुळे निरर्थक वाटते, त्यामुळे अशी वाक्ये विनोद निर्माण करत असली तरी उपयोगाची नाहीत.
३. जनुकसातत्याच्या उर्मी मुळे अपत्याला जन्म दिला जातो, पण हेतू ठरवणे म्हणजे उगाच येशू/हिटलर/शिवाजी ठरवून होणे नव्हे पण "मी कोण?" ह्या चिंतनातून आणि त्यानंतर आलेल्या कृतीतून निर्माण झालेले व्यक्तित्व आहे. प्रश्न न पडताच कृती कोण करते बरे?
४. बरेचदा मिळाले ते स्वीकारावे, पर्याय नसतो!!!!!!!! - अरे अरे कुठे गेली ती नास्तीकी चिकित्सक वृत्ती? कि शिट हॅपन्स? कि तर्कच चालत नाही?
५. आनंदाने व्यतीत करावे ह्याबद्दल तर पूर्ण सहमत.

..प्रज्ञानं ?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*आम्ही ..प्रज्ञानं ब्रह्म म्हणतो. :) .श्री.आजूनकोणमी यांच्या या वाक्याचा अर्थच समजला नाही.मग त्यावर विचार काय करणार?
* आपल्या गुण दोषांची,क्षमता मर्यादांची समज आल्यावर ती व्यक्ती आपण कोण होणार हे ठरवू शकते. मंगेश पाडगावकर यांनी आपण कवी होणार हे १४व्या वर्षी ठरवले होते.अनेक जण(भीमसेन जोशी,सचिन तेंडुलकर आदि) आपली कार्यक्षेत्रे कुमारवयात ठरवतात.पण त्यांच्या जन्मापूर्वी देवाचा अथवा त्यांच्या माता पित्यांचा तसा हेतू नसतो.
* बरेचदा मिळाले ते स्वीकारावे लागते पर्याय नसतो!!!!!!!! - अरे अरे कुठे गेली ती नास्तीकी चिकित्सक वृत्ती?
विवेकवाद वास्तवावर आधारित असतो.सर्व प्रयत्न करून,तर्क चालवून,चिकित्सा करून आपल्या आवडीचे कार्यक्षेत्र मिळाले नाही तर मिळेल ते स्वीकारणे भाग आहे.वास्तवात जगाचये आहे.
* लेख लिहिण्याची शैली उत्तम आहे ह्यात वाद नाही, लेख वाचण्यात मजा आली.
.पभिप्रायाप्रीत्यर्थ आभारी आहे.

प्रज्ञानम्

प्रज्ञानम् ब्रम्ह असे म्हणायचे होते, पण कदाचित चुकीचे लिहिल्यामुळे कदाचित श्री यानावालानी प्रतिसाद दिला असावा. हे बरे झाले.
प्रज्ञा म्हणजे Consciousness. ती प्रज्ञाच सर्वव्यापी आहे म्हणजे ब्रम्ह, हे मी मला समजलेली प्रज्ञानम् ब्रम्ह ची व्याख्या सांगितली. दुव्यावर त्याबद्दल अधिक माहिती आढळेल.

.पण त्यांच्या जन्मापूर्वी देवाचा अथवा त्यांच्या माता पित्यांचा तसा हेतू नसतो.

हेतू असू शकतो किंवा नसू शकतो, तरीदेखील त्यामागे "मी कोण?" ह्यासम चिंतन नसते ह्यास काही आधार नाही.

विवेकवाद वास्तवावर आधारित असतो.सर्व प्रयत्न करून,तर्क चालवून,चिकित्सा करून आपल्या आवडीचे कार्यक्षेत्र मिळाले नाही तर मिळेल ते स्वीकारणे भाग आहे.वास्तवात जगाचये आहे.

मिळेल ते स्वीकारणे हि सहज-क्रिया आहे, जास्त प्रयत्न करण्यासाठी सांगावे लागते. बहुतांश लोक मिळेल ते स्वीकारतात पण स्वीकारून खुश असतात कि नाही हा मुद्दा वेगळा. पण प्रयत्न करण्याइतपत दुखी नक्कीच नसतात हे हि खरे.

आळस आणि अज्ञान

पारलौकिक जगत् , आपले पारलौकिक अस्तित्व याच्याशी मला काहीही देणेघेणे नाही हे विधान जेव्हा मी करतो तेव्हा ते करण्यामागे बहुदा माझा आळस आणि अज्ञान हेच कारण असावे. हे ब्रह्म आणि तो सुरलोक आणि देवदेवता आणि मोक्ष आणि पाताळ आणि नरक आणि यम या सगळ्या गोष्टी म्हणजे या गोष्टी आधी एक तर अस्तित्त्वात नाहीत आणि असल्याच तर "लंकेत सोन्याच्या विटा" आहेत असं मला वाटतं. पु ल देशपांड्यांच्या शब्दांत सांगायचे तर "माझ्या डोक्याच्या मजल्यापर्यंत पर्यंत चढेल इतपत प्रेशर ब्रह्मज्ञानात नव्हते."

हमको मालूम है जन्नतकी हकी़क़त लेकिन
दिलको खू़ष रखनेको , गा़लिब ये ख्याल अच्छा है.

ओळख

लेख आवडला, चर्चाविषयही आवडला, पण कोsहम् हा प्रश्न फक्त तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातूनच पडतो असे काही नसते. "तू कोण आहेस" हे जेंव्हा समोरची व्यक्ती ठरवते आणि त्या विशिष्ठ चष्म्यातून बोलू लागते, तेंव्हा "मी कोण आहे?" हा प्रश्न अधिक प्रश्न पडतो. त्या निमित्ताने मला माझ्याच इथल्या "ओळख" या तीनएक वर्षांपुर्वीच्या लेखाची आठवण झाली. त्याचा संदर्भ जरी थोडा वेगळा होता तरी मूळ मुद्दा हाच होता की, मी स्वतःला केवळ एक माणूस समजून दुसर्‍या माणसाच्या आणि त्याच्या प्रथांचा आदर केला तरी, समोरचा मला नुसता माणूस समजत नाही तर वेगळाच समजत असतो...

मागे पारपत्रासाठी (पासपोर्ट) अर्ज केला होता...."चिदानन्दरूप: शिवोSहम् शिवोSहम्।"असे म्हटले असते आणि "हे विश्वचि माझे घर।" असे अधिवासाविषयी सांगितले असते तर,...म्हणून पारपत्र मिळाले.काय उपयोग त्या अहं ब्रह्मास्मि चा? चर्चासंवादाच्या प्रारंभी सांगितली तीच खरी ओळख ."

हा श्री. यनावालांचा श्रद्धावंतांसंबंधीचा आवडीचा मुद्दा आहे आणि त्या मुद्याशी मी असहमत आहे. असे कोणता श्रद्धाळू उठसुठ कोहम् म्हणत हिंडत असतो? किंबहूना हेच श्रद्धाळू (आणि बर्‍याचदा एरव्ही अश्रद्ध/बुद्धीवादी असलेले देखील) जातीभेद पाळताना कुठे चिदानन्दरूप: शिवोSहम् शिवोSहम्। म्हणतात, तेंव्हा पारपत्राच्या अर्जात म्हणणार? थोडक्यात टिका करायची असली तर ती योग्य ठिकाणी करावी असे वाटते... उद्या कोणी विज्ञाननिष्ठ आहे म्हणून स्वतःची ओळख काय " ऍन ऑब्जेक्ट कंपाईल्ड विथ् व्हरायटी ऑफ ऑर्गॅनिक मोलीक्यूल्स इन व्हेरीअस फॉर्मस" अशी करून देणार का? का तहान लागल्यावर, मला हायड्रोजनचा एक आणि ऑक्सिजनचे दोन अणू एकत्रीत असलेले द्रवरूप हवे असे काही म्हणणार आहे? मला एकदम हे वाक्य आठवले:

"Instrument that record, analyse, summarise, organise, debate and explain information that are illustrative, non illustrative,hard bound paper bag jacketed, non jacketed, with forward introduction table of contents, index that are intended for the enlightenment, understanding, enrichment, enhancment and education of the human brain through sensory route of vision... some times touched"

अर्थात थ्री ईडीयट्स मध्ये अमीर खान त्याच्या इंजिनियरींगच्या प्राध्यापकास अशी पुस्तकाची व्याख्या करून सांगतो, तो प्रसंग! तात्पर्य: वेगळ्या शब्दात जगातील सगळेच बायनरीमध्ये भाषांतरीत लिहीता आले तरी ते केवळ तत्वतःच असते...

मी कोण? माझ्या जन्माचा हेतू काय? माझ्या जीवनाचा अर्थ काय?माझे जीवितकार्य कोणते? असले प्रश्न निरर्थक वाटतात.

शिवाजी आपले जीवितकार्य कोणते असा विचार न करता तीन तपे आजच्या पानावरून पुढच्या पानावर, जे काही होत गेले तसा नुसता प्रतिक्रीया देत बसला का? इतकेच काय, एकूणच जन्माचा हेतू काय हा प्रश्न डार्विनला पडला नसता तर तो "ऑन दी ओरीजीन ऑफ स्पिसिज्" हे पुस्तक लिहू शकला असता का?

असा हेतू नसलेले जीवन जेंव्हा कुठलाही समाज जगायला लागतो तेंव्हा विजिगिषू वृत्ती हरवून बसतो. मग राहीले फक्त पाठांतर! ते धर्म-तत्वज्ञानाचे असोत अथवा इंजिनियरींग/मेडीसीन आदीचे... म्हणूनच प्रश्न, मग ते कितीही विचित्र वाटले तरी विचारले पाहीजेत अगदी कोहम् सकट, सामान्यातील सामान्याने पण अजून पुढे जायचे स्वप्न ठेवलेच पाहीजे असे मला वाटते.

विवेकानंदांचे एक चांगले वाक्य आहे: "get up, and set your shoulder to the wheel-how long is this life for? as you have come into this world, leave some mark behind. otherwise where is the difference between you and the trees and stones? - they too come into existence, decay and die..." यात त्यांनी स्वर्गप्राप्ती, मोक्ष, अथवा पुनर्जन्म, काहीच म्हणलेले नाही. अर्थात ते धर्मिक तत्वज्ञच होते. पण या उलट पूर्ण निरिश्वरवादी असलेला भगतसिंग देखील फाशीच्या आधी काही दिवस साम्यवादाचा अभ्यास करत होता. त्याचे शेवटच्या दिवसातील विचार खूप वाचनीय आहेत. जरी एकदा मेल्यावर काही नाही हे माहीत असले तरी तो "त्याच्याबाबतीत ठरवला गेलेला" क्षण येई पर्यंत त्याने जीवन हे हेतू ठेवूनच जगायचे ठरवले होते...


बरेचदा मिळेल ते स्वीकारावे लागते.पर्याय नसतो.मग सर्वसामान्य आयुष्य जगावे लागते.त्यात खेद मानण्याचे कारण नाही.आपल्याला लाभलेले हे एकमेव जीवन आहे.ते इथे आनंदाने सुखासमाधानाने व्यतीत करावे.जमेल तेवढे सत्कार्य करावे.

यातील शेवटचे वाक्य सोडल्यास सहमत. "जमेल तेवढे सत्कार्य करावे." या वाक्याशी असहमत नाही, पण जेंव्हा स्वतःच्या बाहेर जाऊन कार्य (अर्थात सत्कार्यच!) करायची वेळ येते तेंव्हा जर त्याआधी "जमेल तेव्हढे" असे शब्द असतील तर बहुतांशी मानवी मन कधी मनापासून प्रयत्नच करणार नाही... "आपल्याला काय करायचे आहे?" अथवा "ये मेरे बस की बात नही" असे म्हणत काहीच होत नाही. अर्थात हे सामान्यांच्या बाबतीत झाले. तसे जो विचार करत नाहीत, ते लहान-थोर, यशस्वी-अपयशी, प्रसिद्ध-अप्रसिद्ध, सगळ्याच वर्गवारीतील असमान्य असतात असे वाटते.

असो.

विचारवंत आणि बूटपॉलिशवाला

प्रेरणा - सांगालयाच हवी का?

प्रख्यात पुरोगामी विचारवंत माधवराव देसाई आपल्याच तंद्रीत रस्त्याने झपझप चालले होते. इतक्यात रस्त्यावरच्या पॉलिशवाल्याने ब्रश पॉलिशच्या स्टँडवर वाजवून त्यांचे लक्ष वेधले.
"साहेब. पॉलिश?"
माधवरावांनी बुटांकडे पाहिले. खरेच पॉलिश करायला झालेच होते. त्यांनी डावा पाय स्टँडवर ठेवला. पॉलिशवाल्याने आपले काम सुरू केले. काहीतरी संभाषण सुरू करायचे म्हणून माधवरावांनी त्याला विचारले
"कोण रे तू? नाव काय तुझे? "
"साहेब हाच तर विचार मी रोज करतो. अजून उत्तर मिळाले नाही. "
माधवरावांना या उत्तराची अपेक्षा नव्हती. ते म्हणाले "अरे सोपे आहे ते. मी सांगतो तुला तू कोण आहेस ते? मला एक सांग तुझे नाव काय"
"वडापाव"
"आँ? असले कसले नाव ठेवले आईवडिलांनी? त्यांची नावे काय? आता माझे नाव माधव, वडिलांचे वसंत, आडनाव देसाई तसे तुझे काय? "
"आईवडिलांचा पत्ता नाही. मी दुपट्यात गुंडाळलेलो या वस्तीतल्या लोकांना कचराकुंडीत मिळालो. त्यांनी प्रेमाने सांभाळ केला. मिळेल ते खाऊन आणि पडतील ती कामे करत मोठा झालो. "
"तुझ्याजवळ शिधावाटपपत्रिका आहे? "
"हे काय असते? "
"रेशन कार्ड"
"असे मराठीत बोला ना? माझ्याकडे नाही. मला कशाला लागते ते?"
"निवडणूक ओळखपत्र? "
"साहेब माझे वय १३. मतदान करायला १८ वर्षांचे असावे लागते ना? "
"तुझ्याकडे बँकबुक, पासपोर्ट, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र नसेलच ना? जाऊ दे. गेलाबाजार शाळेत कधी गेला असलास तर शाळा सोडल्याचा दाखला तरी असेलच ना?
"मी शाळेचे तोंडही बघितले नाही, त्यामुळे दाखलाही नाही. साहेब मला सांगा ही सर्व कार्डे आणि फोटो एखाद्याकडे नसतील तर त्याला मी कोण हे कसे कळणार?"
"साधारण असाच प्रश्न अध्यात्मिक मित्राने केला होता, त्याला दिले ते उत्तर दुलाही देतो.
पृथ्वी अस्तित्वात आल्यानंतर तिच्यावरील विविध रासायनिक द्रव्यांचे क्रमपर्यायी संयोग (पर्म्यूटेशन कॉंबिनेशन्स) सुरू झाले. या सततच्या प्रक्रियेतून कांही अब्ज वर्षांनी समुद्राच्या पाण्यात सजीव पेशी अगदी प्राथमिक स्वरूपात यदृच्छया निर्माण झाल्या. तेच पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचे आदिस्वरूप होय. म्हणजे तुमचे, माझे आणि त्या तत्त्ववेत्यांचे मूळ स्वरूप तेच, असे म्हणता येईल. या मूळ सजीव स्वरूपाची निर्मिती साधारणपणे तीनशे ऐशी कोटी वर्षांपूर्वी घडली. पुढे हळू हळू उत्क्रांती झाली हे तुम्ही जाणतच असाल. "

"आता लक्षात येते आहे साहेब थोडे थोडे. "
साहेब अचंबित. इतके सगळे या अडाण्याला समजले? आश्चर्यच आहे.
"छान छान. माझा युक्तिवाद समजला म्हणजे खरेच हुशार आहेस. "
"साहेब तुम्ही रत्नाबाईला ओळखता? "
"आँ, तुला कसे माहिती? "
"साहेब तुमचे बोलणे मला अजिबात समजले नाही. फक्त माझ्या चेहऱ्याकडे एकदा नीट निरखून पाहा तुमच्या आणि माझ्यामध्ये किती साम्य आहे ते. माझ्या आईचे नाव रत्नाबाई होते असे वस्तीतले जुने लोक सांगतात. मी कचराकुंडीत मिळायच्या आठ दिवस आधीपर्यंत गर्भवती रत्नाबाई वस्तीत रहायची. नंतर तिचा पत्ता नाही. वडील कोण याही प्रश्नाचे उत्तर आत्ता मिळाले, म्हणून म्हटले हळूहळू लक्षात येते आहे मी कोण ते. "
"ओ साहेब, असे एकदम कुठे चाललात? अजून उजव्या बुटाला पॉलिश व्हायचे आहे, आणि माझ्याकडे ५०० चे सुट्टे नाहीत. "
"अचानक एक काम आठवले. आत्ता घाईत आहे. दुसऱ्याकडून घेईन पॉलिश करून आणि सुट्टे ठेव तुझ्याजवळच. मी निघतो."

-----------

लेखाचा उद्देश स्पष्ट होत नसल्याने, प्रस्तावनेमार्फत किंवा लेखाखाली तो स्पष्ट न केल्याने हे लेखन केवळ ललित लेखन असल्याचा आभास निर्माण करते. सदर लेखनप्रकार उपक्रमाच्या धोरणात बसत नसल्याने तो मूळ चर्चेत विलिन केला आहे याची नोंद घ्यावी. शक्य असल्यास लेखकाने वरील उदाहरणातून लेखाचा नेमका उद्देश स्पष्ट करून लेख पुनर्प्रकाशित करावा.

मस्त हं

बाकी,प्रेरणा काही कळली नाही. :(

-दिलीप बिरुटे

मजकूर संपादित.

खास नाही

स्वतःच विवाहबाह्य संतती असणे लाजिरवाणे समजले जाते, विवाहबाह्य संतती निर्मिण्यास तसे लाजिरवाणे समजले जात नाही असे वाटते. त्यामुळे, लेख पुरेसा अपमानास्पद वाटला नाही.
त्याऐवजी, पॉलिशवाला विचारवंतांपेक्षा काही वर्षांनी वयस्कर चितारला असता आणि त्यांच्या आईंचा पाय त्याच झोपडपट्टीत घसरल्याची (किंवा, वसंत देसाई 'असमर्थ' असल्याची) एखादी नेमकी खात्रीलायक खूण त्याने पटविली असती तर चांगला अपमान करता आला असता. (कायदेशीर पित्यापेक्षा जीवशास्त्रीय पिता अधिक गुणवान/श्रीमंत/अधिक उच्च समजल्या जातीतील असल्याच्या आरोपातूनसुद्धा काहींच्या भावना दुखावू शकतील असे वाटते. परंतु येथे तर, कायदेशीर पित्यापेक्षा जीवशास्त्रीय पिता कमी गुणवान/श्रीमंत/हीन समजल्या जातीतील असल्याचा आरोप करता आला असता.)
--
अर्थात, विडंबनाचे विपर्यास आणि विसंगत्योद्घाटन हे दोन प्रकार करता येतील. या लेखामध्ये को$हम्? या चर्चाप्रस्तावाचा विपर्यास आहे, विसंगत्योद्घाटन नव्हे.
--
बाकी, देसाई हे पदजन्य आडनाव असले तरी ब्राह्मणांमध्येसुद्धा प्रचलित आहे, माधव आणि वसंत या नावांविषयीही (क्षीण) कोरिलेशन (म्हणजे मराठीत 'अन्योन्य संबंध' काय?) सापडेल असे वाटते. धाग्याचे लेखक ब्राह्मणद्वेष्टे आहेत की काय?

प्र. लॉक करतो.

आईंचा पाय त्याच झोपडपट्टीत घसरल्याची (किंवा, वसंत देसाई 'असमर्थ' असल्याची) एखादी नेमकी खात्रीलायक खूण त्याने पटविली असती तर चांगला अपमान करता आला असता.

सहमत आहे.

धाग्याचे लेखक ब्राह्मणद्वेष्टे आहेत की काय?
आता चर्चा वेग घेईल असे वाटत आहे.

-दिलीप बिरुटे

:)

बुचाची (कधी ना कधी) सव्याज परतफेड केल्या जाईल ;)

आता चर्चा वेग घेईल असे वाटत आहे.

तुम्ही काय फक्त खोबरे खायला येणार का? लाकडेसुद्धा घाला की!

दुय्यम

(कायदेशीर पित्यापेक्षा जीवशास्त्रीय पिता अधिक गुणवान/श्रीमंत/अधिक उच्च समजल्या जातीतील असल्याच्या आरोपातूनसुद्धा काहींच्या भावना दुखावू शकतील असे वाटते

बहुदा अपमान करण्यापेक्षा "दिसणारी" हुशारी हि केवळ त्या समाजाची मक्तेदारी आहे हे शल्य कुठे तरी टोचत असावे. देसाइंचा अपमान दुय्यम बाब वाटते.

हेहेहे!

धाग्याचे लेखक ब्राह्मणद्वेष्टे आहेत की काय?

आधी ब्राह्मण म्हणजे कोण ते तरी स्पष्ट होऊ द्या. ;-)

-१

अजिबात जमलेले नाही.

बाकी ओळखपत्र पासपोर्ट वगैरे वरून एक ज्योग आठवला. पण जौंद्या.

नितिन थत्ते

प्लीज सांगा

>>>बाकी ओळखपत्र पासपोर्ट वगैरे वरून एक ज्योग आठवला. पण जौंद्या.
लवकर ज्योग सांगा. धाग्यावर 'शिमगा' होऊ नये फक्त. ;)

-दिलीप बिरुटे

मस्त लेख

रामोश्याचा पक्या गोरा कसा? याचे उत्तर शोधत गावाकडे काही पोर चर्चा करीत त्याची आठवण झाली.
प्रकाश घाटपांडे

उद्देश

यनावालांच्या अनेक लेखांवर मी गंभीर आक्षेप घेतले आहेत. ते प्रतिवाद करतच नाहीत. त्यामुळे यावेळी गद्य विडंबनातून हे आक्षेप नोंदवावेत उद्देशाने हा लेख लिहिला होता. लेखन ललित असले तरीही आक्षेप पुरेसे स्पष्ट आहेत असे मला वाटते. समजले नसतील तर सोडून द्या. मी स्वतः "त्या" लोकांमध्ये जमा असल्याने "आपल्या" लोकांच्या प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणेच आल्याचे आश्चर्य वाटले नाही. "आपल्या" लोकांनी कितीही निर्बुद्ध लेखन केले तरी सावरूनच घ्यायला हवे ना?

विनंती

माझा असा अंदाज आहे की आक्षेप घेतलेले लेख एका वर्षापेक्षा अधिक जुने असावेत.
ज्या प्रतिसादांतील आक्षेप अनुत्तरित असल्याचे तुमचे मत असेल त्यांचे दुवे नव्या सदस्यांच्या सोयीसाठी कृपया येथेच द्यावेत.

+१

माझा असा अंदाज आहे की आक्षेप घेतलेले लेख एका वर्षापेक्षा अधिक जुने असावेत.

आक्षेप घेतले आहेत असे वाटते. एकावर्षापेक्षा जुने आहेत का ते तपासले नाही पण आक्षेप आहेत. आता ते गंभीर आहेत का नाही हे कसे ठरवायचे?

या लेखावरील आक्षेप: वडापाव -देसाई (यनावाला) संवाद

माझ्या ललित लेखनावरून स्पष्ट व्हावेत ही माझी अपेक्षा जरा जास्तीच होती असे दिसते. तेव्हा ते सोप्या मराठीत सांगतो.

माधव देसाई:
"माझे नाव माधव वसंत देसाई.मी पुण्यातील समर्थ विद्यालयात शिक्षक आहे.कोथरूडला मयूर कॉलनीत राहातो"

वडापाव:
माझे नाव वडापाव. बूटपॉलिश करतो. बाकी सटरफटर कामे करतो. जिथे पडायला मिळेल तिथे झोपतो.

माधव देसाई:
नाही. कारण माझ्याजवळ निवडणूक ओळखपत्र आहे.शिधावाटपपत्रिका आहे.पॅनकार्ड आहे. पासपोर्ट आहे.बॅंकबुक आहे.त्यावर माझे नाव,पत्ता,फोटो आहे.अल्झायमर सारखा स्मृतिभ्रंशाचा आजार मला अद्यापि झालेला नाही.तसेच मी आध्यात्मिक तत्त्ववेत्ता नसल्याने मला कसला भ्रम झालेला नाही.त्यामुळे मी कोSण? असला प्रश्न मला कधी पडत नाही.पडण्याचे कारण नाही."
.

वडापाव:
माझ्याजवळ निवडणूक ओळखपत्र नाही. शिधावाटपपत्रिका नाही. पॅनकार्ड, बँकबुक काय असते माहितीच नाही. वडील कोण ते माहिती नाही. आईचीही नावापलिकडे माहिती नाही. त्यामुळे मी कोण असा प्रश्न पडतो.

माधव देसाई:
मागे पारपत्रासाठी (पासपोर्ट) अर्ज केला होता.तो चौकशीसाठी पोलीसखात्याकडे गेला.त्यांच्याकडून बोलावणे आल्यावर चौकीत गेलो.त्यांनी ओळखीसाठी तसेच अधिवास सिद्ध करण्यासाठी दाखले मागितले.तिथे जर ,"चिदानन्दरूप: शिवोSहम् शिवोSहम्।"असे म्हटले असते आणि "हे विश्वचि माझे घर।" असे अधिवासाविषयी सांगितले असते तर,"अर्जदाराचे मानसिक संतुलन बिघडले आहे.पासपोर्ट देणे योग्य नाही"असा शेरा मारून अर्ज परत पाठवला असता.योग्य ती कागदपत्रे दिली म्हणून पारपत्र मिळाले.काय उपयोग त्या अहं ब्रह्मास्मि चा? चर्चासंवादाच्या प्रारंभी सांगितली तीच खरी ओळख

वडापाव:
मला पारपत्र नकोच आहे. देशच काय मुंबई सोडूनही कधी जाईन असे वाटत नाही. असेही जागा मिळेल तिथे राहतो असे म्हटले तर पारपत्र मिळाले नसतेच.

असे सर्व असताना, म्हणजे माधव देसाईंच्या सर्वस्वी विरुद्ध परिस्थिती असताना, माझ्या अस्तित्त्वाची कोणतीही लेखी नोंद नसताना, माझ्या आईवडिलांचा पत्ता नसताना, मी कोण, माझ्या आयुष्याचे प्रयोजन काय, असा प्रश्नच मला पडू नये? पडल्यास उत्तर काय असावे? रेशनकार्ड काढ, पासपोर्ट काढ, निवडणूक कार्ड काढ, बँकबुक काढ? असे केल्याने मला मी कोण हे खरोखर मला कळेल?

यनावाला:
मी कोण? माझ्या जन्माचा हेतू काय? माझ्या जीवनाचा अर्थ काय?माझे जीवितकार्य कोणते? असले प्रश्न निरर्थक वाटतात.जनुकसातत्य राखण्याची जी प्रत्येक सजीवाची नैसर्गिक ऊर्मी असते तिची परिणती म्हणून प्रत्येक प्राण्याचा जन्म होतो.त्यामागे कोणाचा काही हेतू असतो असे वाटत नाही.

वडापाव:
हे प्रश्न मला निरर्थक वाटत नाहीत. तुमच्याजवळ उत्तर नाही म्हणून प्रश्नच निरर्थक कसा? माझा जन्म जनुकसातत्य राखण्याच्या उर्मीतूनच झाला हे यनावाला नेमके कसे जाणतात?

यनावाला:
सर्वसामान्यपणे समज आल्यावर माणसाला आपल्यातील गुण-दोषांची, क्षमता-मर्यादांची,आवडी-निवडींची कल्पना येते.तदनुसार कार्यक्षेत्र निवडण्याचा प्रयत्‍न होतो. बरेचदा मिळेल ते स्वीकारावे लागते.पर्याय नसतो.मग सर्वसामान्य आयुष्य जगावे लागते.त्यात खेद मानण्याचे कारण नाही.आपल्याला लाभलेले हे एकमेव जीवन आहे.ते इथे आनंदाने सुखासमाधानाने व्यतीत करावे.जमेल तेवढे सत्कार्य करावे.

वडापाव:
अडाणी असलो तरी यामध्ये विशेष ते काय सांगितलेत हो? मुख्य म्हणजे या सर्व प्रवचनाचा मी कोण याच्याशी काय संबंध? मूळ प्रश्नाला तुमच्याकडे उत्तर नाही हे कबूल करायच्या ऐवजी उगीच काहीतरी असंबद्ध बडबड करायची?

यनावाला:
एकूण काय तर कोSहम्? मी कोण? असा प्रश्न पडू नये.
पारपत्रावर असतात ती वडील,आई,जन्मगाव यांची नांवे हींच
"कस्य त्वं? त्वं कुत आयात:?।
ध्यानं देही त्वमिह भ्रात:।"
या आदिशंकरांच्या प्रश्नांची खरी उत्तरे आहेत.

अरे देवा. पुन्हा पारपत्र. अजूनही भारतात कोट्यवधी लोकांकडे पारपत्र नसतील. ती सर्व काय अनौरस संतती? या मनुष्याला काही अक्कल आहे की नाही? की हा सर्वांनाच आपल्यासारखे बिनडोक समजतो?

ठीक

या विषयावर प्रतिसाद देणे सोपे करण्यासाठी हा धागा पूर्ववत वेगळा करावा ही संपादकांना विनंती.

+१ सहमत.

:) अहो ह्या लेखाची संदर्भ चौकट हि "पुण्यातील मध्यमवर्गीय ब्राह्मण" आहे, वडा-पाव साठी वेगळा लेख येऊ घातला असेल, थोडी वाट पाहू.

तुमच्या आक्षेपावर यनावाला प्रतिसाद देतील असे वाटत नाही (उगाच).

मी कोण

सिनेमात स्मृतीभ्रंश झालेल्यांसाठी 'मी कोण' हा प्रश्न योग्यच आहे.
'वडापाव' साठी फारसा गंभीर नसावा.
तुम्ही कोण? या प्रश्नाचे उत्तर अमुक अमुकचे संतान वा इथे राहणारा वा इथे काम करणारा, इथे पर्यटक म्हणून आलेला इत्यादी असणे सयुक्तिक आहे.
पण 'मी कोण' या प्रश्नात हे सगळे माझे मला माहित आहे तरी प्रश्न विचारतो आहे. म्हणजे या सर्व ओळखी व्यतिरिक्त ओळख गृहित्द धरली आहे.
ती ओळख कुठली हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत हा प्रश्न निरर्थक असतो. कोण? यात माझी कुठली ओळख हवी आहे? असे गृहित असते.
माझे खापरपणजबांचे आजोबा, आईच्या आईची आई यावरून माझी ओळख ठरू शकते. ती मला माहित नाही. तेव्हा मी कोण हा प्रश्न माझ्या साठी जेवढा गंभीर आहे त्यापेक्षा थोडासाच जास्त 'वडापाव' साठी आहे.
वडापाव साठी 'माझा व्यवसाय अमुक, माझा पत्ता अमुक अशा ओळखी आहेतच.

प्रमोद

प्रमोद सहस्रबुद्धे यांच्यासाठी

संस्कृत जिवंत की मृत अश्या चर्चेतला एक संवाद खाली मुद्दाम देत आहे.

विसोबा खेचर -
मी एखाद्या पानवल्याकडे जाऊन बनारसी १२०, कच्ची सुपारी, वेलची सोलून.." अशी ऑर्डर आज संस्कृतमध्ये दिली तर तो आणि आजुबाजूचे माझ्याकडे चमत्कारिक नजरेने पाहतील याची मला खात्री आहे.


शंतनु भट -
मुद्दा पटवण्याकरिता तुम्ही जे उदाहरण दिले आहे, ते अप्रस्तुत वाटते. पानवाल्याला "बनारसी १२०, कच्ची सुपारी, वेलची सोलून.." हे संस्कृतच काय, फ्रेंच/स्पॅनिश भाषांमध्ये सांगितले, तरी तुमच्याकडे आजुबाजूचे चमत्कारिक नजरेनेच बघतील. मुळात ज्याला जी भाषा येते, त्याच्याशी त्याच भाषेत बोलावे हा सर्वसाधारण प्रघात आहे. त्यामुळे संस्कृत उपयोगी नाही हे सिद्ध होत नाही.

यातले बोल्ड अक्षरातले वाक्य इथे चपखल लागू होते. ज्याला जी भाषा येते, त्याच्याशी त्याच भाषेत बोलावे हा सर्वसाधारण प्रघात आहे. यनावालांच्या सुरूवातीला प्रा. देसाई आणि त्यांचे मित्र यांच्यामधला संवाद दिला आहे. दोघेही मराठीत संवाद साधतात त्यामुळे मी हे वाक्य का उद्धृत केले असा प्रश्न तुम्हाला पडेल. इथे मुद्दा वेगळा आहे. मित्र "तुम्ही कोण" हा प्रश्न तत्त्वज्ञानात्मक उत्तराच्या अपेक्षेने विचारतो आहे आणि प्रा. देसाई त्याला व्यावहारिक पातळीवरचे उत्तर देत आहेत हा मोठाच विनोद आहे. इथे "मी म्हणजे आत्मा" असे तत्त्वज्ञानात्मक उत्तर पटणारे नसेल तर "मी चार्वाकवादी आहे. मी आत्मा मानत नाही. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनाय कुतः" असे तत्त्वज्ञानात्मक उत्तर प्रा. देसाईंनी दिले असते तर माझा यनावालांबद्दलचा आदर वाढला असता.

बहुतेक वेळा "मी कोण?" या प्रश्नाचे उत्तर "मी अमुक तुमक, अमक्याचा मुलगा..." असले व्यावहारिक उत्तर दुय्यम (ट्रिविअल) असले तरी कधीकधी तेही महत्त्वाचे असते. इरावती कर्व्यांची ओळख महाराष्ट्राला जरी विदुषी म्हणून असली तरी एकदा त्या रस्त्याने चालल्या असताना काही लहान मुले त्यांच्याकडे बोट दाखवून म्हणाली "ही बघ आपल्या नंदूची आई" आणि ते ऐकल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख असे त्यांनी म्हटले.

दुसरे म्हणजे देसाई वारंवार बोलण्यात रेशनकार्ड, पारपत्र, बँकबुक, निवडणूक ओळखपत्र, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र वगैरेचे महत्त्व ठासून सांगताना दिसतात (जणू काही ते न समजण्याइतके त्यांचे मित्र आणि लेखाचे वाचक मूर्ख आहेत) म्हणून मी वडापाव हे पात्र निर्माण केले ज्याच्याकडे यापैकी काहीही नाही. मग अश्या व्यावहारिक माणसाची ओळख काय? त्याचा व्यवसाय, त्याच्या ओळखीची माणसे ही ओळख पुरेशी आहे काय?

आयुष्याचे प्रयोजन हा वरकरणी निरर्थक वाटणारा प्रश्न असला तितका साधा नाही. आयुष्याची प्रेरणा अमुक एक आहे अश्या भावनेने पछाडलेली माणसे अचाट कामे करून दाखवतात. न्यूटनचा जन्म ख्रिसमसच्या दिवसाचा. त्यामुळे आपला जन्म विशेष काही करून दाखवण्यासाठी आहे या प्रेरणेने तो पछाडला होता आणि अर्थातच आज विज्ञानाच्या इतिहासात त्याचे नाव अजरामर झाले. गणिती केपलर याचीही परमेश्वराने विश्वाचे गूढ आकड्यांमध्ये सांगितले आहे आणि ते उकलण्यासाठी आपले आयुष्य आहे अशी भावना होती. या प्रेरणेतून त्रिमिती गणिती आकृत्या आणि ग्रहांच्या कक्षा यांचा संबंध दाखवणारे एक पुस्तक त्याने लिहिले. ते चुकीचे असल्याचे त्याला समजले तरी एक फायदा झाला. ते पुस्तक वाचून टैको ब्राहीने त्याला आपला असिस्टंट नेमले, पुढे ब्राहीच्या मृत्यूनंतर त्याच्या तीसेक वर्षांच्या आकाशनिरीक्षणाचा संग्रह केपलरकडे आला. त्याने त्यावर वीस वर्षे विचार करून तीन नियम शोधले आणि त्याचे नाव इतिहासात अजरामर झाले.

ठीक

प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमचे म्हणणे कळले. बरेचसे मान्यही.
तत्वज्ञानात्मक प्रश्नाला वास्तववादी बनवणे मात्र अशक्य आहे. तुमचे उदाहरण वास्तववादी असल्याने त्याला तत्वज्ञानाचे रूपक नीटसे लागत नाही.

मूळ लेखात 'पारपत्र' ओळखीबद्दल लिहिले गेले त्यातूनही एक संदेश जातो. 'लौकिक ओळखीपेक्षा वेगळी ओळख नसते' असा तो संदेश आहे. यनावालांच्या लेखात असा संदेश अनेक शब्दात दिला आहे. त्यामुळे विचारणार्‍याला दुसरी ओळख असते असे पटवून द्यावे लागणार, आणि ते जमणार नाही हा लेखाचा मतितार्थ आहे. हे म्हणणे मला पटते.

'आयुष्याचे प्रयोजन' या प्रश्नाचे उत्तर तुम्ही परत वास्तवात जाऊन देण्याचा प्रयत्न करत आहात. न्युटन वा केप्लर या दोन्ही उदाहरणातून ते स्पष्ट होत नाही. 'आयुष्याचे प्रयोजन' यात एक गर्भितार्थ आहे. तो या उदाहरणातून स्पष्ट होत नाही. पण हा मुद्दा या चर्चेस थोडा अवांतरच.

प्रमोद

उत्तर

तुमचे उदाहरण वास्तववादी असल्याने त्याला तत्वज्ञानाचे रूपक नीटसे लागत नाही.

माझ्या इतक्या सर्व प्रतिसादांमागचा उद्देश यनावालांचे लेखन वास्तववादी पातळीवरसुद्धा व्यवस्थित लागू नाही हे दाखवण्याचाच आहे. यनावालांची "पासपोर्ट थिअरी" ज्यांना लागू होत नाही अश्या हजारो लाखोंची व्यावहारिक ओळख काय हा आक्षेप तुम्ही बरोबर ओळखलात आणि त्याचा व्यवसाय, त्याच्या ओळखीचे लोक ही त्याची ओळख असे सांगितलेत.

मूळ लेखात 'पारपत्र' ओळखीबद्दल लिहिले गेले त्यातूनही एक संदेश जातो. 'लौकिक ओळखीपेक्षा वेगळी ओळख नसते' असा तो संदेश आहे. यनावालांच्या लेखात असा संदेश अनेक शब्दात दिला आहे. त्यामुळे विचारणार्‍याला दुसरी ओळख असते असे पटवून द्यावे लागणार, आणि ते जमणार नाही हा लेखाचा मतितार्थ आहे. हे म्हणणे मला पटते.

"लौकिक अर्थापेक्षा वेगळी ओळख नसते"हा संदेश यनावालांच्या लेखावरून सहस्रबुद्ध्यांनी काढलेला निष्कर्ष आहे. निष्कर्षाशी मी बर्‍यापैकी सहमत आहे. फक्त "रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, पारपत्र, बँकबुक, पॅनकार्ड" म्हणजेच लौकिक ओळख का? आणि ज्यांच्याजवळ ही कार्डे नाहीत त्यांची लौकिक ओळख काय याचे उत्तरही यनावालांनी दिलेले नाही. जे उत्तर तुम्ही दिले त्याच्याशी सहमत आहे.

असहमत

रिटे यांनी धागा वेगळा काढावा असे लिहिले असले तरी माझ्या नव्या प्रतिसादात मूळ लेखातली वाक्ये वापरली असल्याने धागा वेगळा काढल्यास वाचकांना मूळ लेख आणि नवा लेख यांच्यात बॅक ऍन्ड फोर्थ करावे लागेल त्यापेक्षा इथेच चर्चा सुरू राहू दे.

ठीक

तुमचा आक्षेप असा सांगता येईल असे वाटते:

मी कोण, माझ्या आयुष्याचे प्रयोजन काय, असा प्रश्नच मला पडू नये? पडल्यास उत्तर काय असावे? ... हे प्रश्न मला निरर्थक वाटत नाहीत. तुमच्याजवळ उत्तर नाही म्हणून प्रश्नच निरर्थक कसा?

"काहीतरी अशारीर असा 'मी' आहे" असे गृहित धरल्याशिवाय "मी कोण?" या प्रश्नाला अर्थ नाही.
प्रायोजक गृहित धरल्याशिवाय आयुष्याचे प्रयोजन विचारता येणार नाही.

एखाद्या यंत्रातून "मी कोण?" असा ध्वनी निर्माण झाला तर त्याला निरर्थक म्हणावे असे तुम्हालाही वाटत असावे असे मी गृहित धरतो आहे.

The 'why' question is just a silly question. - पीटर ऍटकिन्स

उत्खनन.

'डिस्क्लेमर' : मी येथे नवा आहे, जुने धागे वाचतो आहे. फार् जुने नसतील अशांना वा जिथे राहवत नाही तिथेच प्रतिसाद देतो आहे. या धाग्यास् प्रतिसाद देण्याची सोय अजूनही आहे, म्हणजे प्रतिसाद देणे संस्थळाच्या 'पॉलिसीमध्ये' बसते असे गृहित धरतो.

>>
वडापाव:
हे प्रश्न मला निरर्थक वाटत नाहीत. तुमच्याजवळ उत्तर नाही म्हणून प्रश्नच निरर्थक कसा? माझा जन्म जनुकसातत्य राखण्याच्या उर्मीतूनच झाला हे यनावाला नेमके कसे जाणतात?
<<

वाद घालण्याच्या उर्मित इथे देसाईंऐवजी यनावाला कुठून आले असावेत?

>>
मुळात ज्याला जी भाषा येते, त्याच्याशी त्याच भाषेत बोलावे हा सर्वसाधारण प्रघात आहे.
>>
अध्यात्म हे जर् तत्वद्न्यान असेल तर वास्तववाद हे तत्वद्न्यान नाही काय?

 
^ वर