पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत!

पूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतील कडू-गोड आठवणी-३: ’सेंच्यूरियन’वर झालेले पाकिस्तानचे पानीपत!
भारताच्या विश्वचषक स्पर्धा जिंकल्याच्या १९८३ च्या सामन्यानंतर जर आणखी कुठल्या विश्वचषक स्पर्धेतील सामना अविस्मरणीय झाला असेल तर तो आहे १ मार्च २००३ ला झालेला एक ’जागतिक महायुद्धा’चा सामना. तब्बल तीन वर्षांनंतर हे दोन पिढीजाद शत्रू एकमेकांसमोर प्रथमच येत होते म्हणून तो दोन्ही देशांच्या सन्मानाचा सामनाच बनला होता आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडूत एका बाजूला प्रचंड ईर्षा तर दुसर्‍या बाजूला तितकाच प्रचंड दबाव असे वातावरण होते. सेंच्यूरियन मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते.

मीडियाशी बोलतानासुद्धा सांभाळून बोलणे जरूरीचे होते. सरावाच्या वेळी राहुल द्रवीडने संयमाने मीडियाला माहिती दिली. "आम्ही या सामन्याकडे विश्वचषक स्पर्धेतील महत्वाचा सामना म्हणून पहात आहोत, पण इतर सामन्यांप्रमाणेच हा एक क्रिकेटचा सामना आहे हे लक्षात ठेवले पाहिजे." खेळाडूंच्या मनावर दबाव होताच कारण प्रत्येक खेळाडूला आपल्या नेहमीच्या पातळीच्याही वरचा खेळ करायला हवा होता. शिवाय आपल्या भावनांवर वचक ठेवायला हवा होता कारण भडक वागणूक मैदानावर तसेच भारतात टीकेचा विषय बनली असती.
सामन्याच्या आदल्या दिवशीच्या भोजनाच्या वेळी युवराजने आणि वीरूने सौरव गांगुलीची फिरकी घेतली आणि एकच हंशा पिकला. सौरवनेही नाटकीपणाने सर्वांना सांगितले "पहा ही आजकालची तरुण पोरे मोठ्यांना मान देईनाशी झाली आहेत". अशी चेष्टा-मस्करी अझारुद्दीन कप्तान असताना कधीच झाली नव्हती. पाकिस्तानशी अनेक सामने खेळून मुरलेला सौरव म्हणाला कीं या सामन्याचा मानसिक दबाव इतका जास्त असतो की एकाद्याला-प्रेक्षक काय किंवा खेळाडू काय-हृदयविकाराचा झटकासुद्धा यायचा! एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यात ५०० पेक्षा जास्त बळी घेतलेल्या वासीमला सांगितले गेले कीं त्याने १००० बळींचे लक्ष्य ठेवावे! गमतीने वासीम उत्तरला, "केवळ अशक्य! आधीच मला वाटतंय कीं मला अँब्युलन्समधून आणि स्ट्रेचरवरून मैदानात यावे लागणार!"
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचा नागरिक नसलेला जॉन राईटही दबावाखाली होता कारण या सामन्याच्या निकालाचा विश्वचषक स्पर्धेच्या निकालावर परिणाम होणार होता! सामन्यावर लक्ष केंद्रित न करता अंतःस्फूर्तीवर जास्त अवलंबून असणार्‍या पाकिस्तानचा पराभव करण्यासाठी शिस्तबद्ध क्रिकेट खेळले पाहिजे असे तो म्हणे! नियंत्रित खेळ केल्यास पाकिस्तान स्वतःचा पराभव स्वतःच घडवून आणेल असे त्याला वाटे.
मैदानावर जायच्या आधी खेळाडूंनी न्याहारी केली आणि ते टेबल टेनिसही खेळले. महंमद कैफला सचिनशी दोन हात करायचे होते, पण तो तर न्याहरी करण्यातच गुंग होता. खेळाडू आपापली बॅट घेऊन बसमध्ये चढले. सैनिक ज्याप्रमाणे आपली शस्त्रे हातातून खाली ठेवत नाहींत तसेच फलंदाजही आपली बॅट नेहमी बरोबरच घेतात!
दोन्ही संघ मैदानात उतरले व क्षेत्ररक्षणाचा सराव करण्यात गुंतले.
नाणेफेकीनंतर दोन्ही संघांनी मैदानात उतरून एकमेकांशी हस्तांदोलन करण्याची प्रथा आहे. आधी जराशी कांकू झाली पण शेवटी वकार आणि सौरवने हस्तांदोलन केल्यावर सर्वांनी ते केले. सेंच्यूरियनवरील सार्‍या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दोन्ही संघांचे मैदानावर स्वागत केले.

सामन्याची सुरुवात पहाता यावेळी पाकिस्तानने चांगली फलंदाजी केली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सईद अन्वर आणि तौफीक उमर फलंदाजीला आले. सईद तर ’फेरारी’ या ’रेसिंग कार’सारखा वेगात धावा करत होता. ते पाहून भारतीय तंबूत जरा निराशेचे सूर निघू लागले! राजसिंग डुंगरपूरना (राजभाई) आपले खेळाडू दमलेले आणि धीमे वाटले. "खेळाडूंना सामन्याआधी विश्रांती द्यायला हवी होती. त्यांना ऑलिंपिकमध्ये भाग घेणारे धावपटू बनवू नये" असे जॉन राईटला सांगायला ते ’ड्रेसिंगरूम’कडे गेले.
या आधीही एक शतक ठोकणार्‍या सईदने इथेही शतकी खेळी केली आणि ८० च्या धावगतीने ७ चौकारांसह १२६ चेंडूंत १०१ धावा ठोकल्या. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली व पहिला बळी ११व्या षटकात ५८ धावांवर पडला. (५८-१) पण त्यानंतर मात्र फलंदाज बाद होत गेले. एकूण २७३ धावात त्याच्या एकट्याच्याच १०१ धावा होत्या तर बाकीच्यांनी केवळ १६२ धावाच केल्या. ठरावीक गतीने फलंदाज बाद होत गेल्याने धावांची गतीसुद्धा कमीच होती (षटकामागे ५.५ धावा). अन्वरने मात्र खंबीरपणे एक बाजू लढवली व तो १९५ धावसंख्या असताना तो बाद झाला (१९५-५). विश्वचषक स्पर्धेतील हे त्याचे तिसरे तर एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यांतील वीसावे शतक होते. भारताविरुद्ध एकदिवशीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने तोपर्यंत २००० धावा केलेल्या होत्या! शतकानंतर त्याची एकाग्रता कांहींशी भंग पावली व तो नेहराच्या गोलंदाजीवर त्रिपळाचित झाला. सईदच्या १०१ धावांनंतर पाकिस्तानच्या त्यानंतरच्या उच्चतम धावा होत्या ३२ (युनीस खान), २९ (रशीद लतीफ) आणि अवांतर (२७)! भारतातर्फे जहीर-नेहराने प्रत्येकी २-२ आणि श्रीनाथ-दिनेश मोंगिया यांनी १-१ बळी घेतले. इंजमाम उल हक धावबाद झाला.
पाकिस्तानचा आपल्या तोफखान्यावर (शोएब अख्तर, वकार युनूस, वासिम अक्रमआणि अब्दुल रझ्झाक) आणि शाहिद अफ्रीदीच्या फिरकी गोलंदाजीवर जबरदस्त विश्वास होता व २७३ ही धावसंख्या भारताला बाद करण्यास पुरेशी आहे असेच त्यांना वाटले होते.
पण जेंव्हां विरुद्ध बाजूला सचिन उभा असतो तेंव्हां कशाचीच खात्री देता येत नाहीं. या सामन्यातही ’सामनावीर’ हा किताब पटकावणार्‍या सचिनने हे दाखवून दिले कीं त्याला क्रिकेटच्या जगातला सर्वश्रेष्ठ फलंदाज कां समजण्यात येते!
२७३ धावा झालेल्या पाहून सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले कारण विश्वचषक स्पर्धांत या आधी भारताने प्रतिस्पर्ध्याची ओलांडलेली मोठ्यात मोठी धावसंख्या २२२ होती. "आपला पराजय पहाण्यापेक्षा आधीच्या विमानाने परत जावे हे बरे" असे सामना पहायला आलेला एक पाहुणा पुटपुटला तर दुसर्‍या एकाने "आपल्या सर्व खेळाडूंना विजय मल्ल्यांच्या विमानात घालून खूप उंचीवरून पॅरॅशूटशिवाय खाली ढकलून द्यायला हवे" आणखी एकाने तारे तोडले! विजय मल्ल्याही प्रेक्षकांत होते पण चुप होते.
सचिनच्या डाव्या पायातून कळा येत होत्या. तरीही त्या सहन करत सचिनने चमकदार फलंदाजी करत झंजावाती ९८ धावा केल्या आणि त्याच्या जोरावर भारताने ४६ व्या षटकातच पाकिस्तानने केलेल्या २७४ धावां ओलांडत दैदिप्यमान विजय मिळविला होता. सचिन एक मॅच-विनर ठरला होता आणि त्यायोगे भारताचा ’सुपर सिक्स’मध्ये प्रवेश झाला होता.
भारत-पाकिस्तानमधील सामना म्हणजे हमरीतुमरीवर येऊन घातलेले वादविवाद, कट्टर अनुयायांमधील तेढ आणि अतीशय तंग वातावरणात होणारा सामन हे ओघानेच आले! हा सामना पहाता यावा म्हणून भारतातील कित्येक शहरांत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली होती. ज्या शहरांनी अशी सुटी जाहीर केली नव्हती तिथे "जनता कर्फ्यू" लागला होता कारण मुले शाळेला गेली नव्हती आणि सामना सुरू व्हायच्या वेळेपासून कार्यालये ओस पडली होती आणि रस्तेही रिकामे होते. घड्याळाचा काटाच जणू फिरायचा थांबला होता आणि शंभर कोटी लोकांनी श्वास रोखून धरले होते.
यापूर्वी कधीही सर न केलेली २७४ धावांची संख्या आता सर करायची होती आणि त्यासाठी कांहीं तरी असामान्य प्रयत्नांची गरज होती. पाकिस्तानी संघात वासीम अक्रम, शोएब अख्तर आणि वकार यूनिस यांचा ’तोफखाना’ होता. सचिन फलंदाजी करायला उतरला तेंव्हा कांहींसे अनोखे वातावरण निर्माण झाले होते. साधारणपणे फलंदाजीची सुरुवात सहवाग करतो पण आज सचिनने सुरूवात केली. सहवाग खुष होता कारण फक्त २२ यार्डावरून तो फलंदाजीचे एक असामान्य आणि चित्तथरारक तांडवनृत्य पहाणार होता.
आपल्या पदलालित्याच उपयोग करून सचिनने अक्रमचा एक चेंडू ऑनसाईडला वळवून त्याचा पहिला चौकार मारला. त्यानंतर विजेच्या लोळासारखी गोलंदाजी करणार्‍या अख्तरचा आखूड टप्प्याचा चेंडू त्याने वेळेवरच ओळखला आणि ’कट’चा कांहींसा वरून जाणारा फटका (uppish cut) निवडून त्याने तो कव्हर पॉइंटवरून प्रेक्षकांत पाठवून एक सणसणीत षट्कार मारला. सचिनचे तांडवनृत्य सुरू झाले होते.

त्या दिवशी सेंच्यूरियनवरील ’सुपरस्पोर्ट पार्क’च्या मैदानावरील प्रेक्षकांना सचिनच्या भात्यातील वेगवेगळे फटके पहायची सुवर्णसंधी लाभली होती. त्याच्या पायाच्या दिशेने टाकलेल्या चेंडूला यष्टी ओलांडून तो अतीशय अचूक टाइमिंगच्या सहाय्यने मिडविकेटच्या दिशेने सुंदर फटके मारत होता. पाठोपाठ एक ऑनड्राईव्हचा अप्रतिम फटका त्याने सीमापार केला आणि आपण आज एकदम फॉर्मात आहोत हे जाहीर करून टाकले.
गुरुस्थानी असलेल्या सचिनची फलंदाजी पाहून सहवागलाही चेव आला असल्यास नवल नाहीं. त्याने ’कव्हर पॉइंट’वरून एक षट्कार ठोकला आणि कांही सुरेख ’ड्राइव्ह’चे फटके मारले. षटकामागे ९ पेक्षा जास्त वेगाने धावा करत भारताने पहिल्या साडेपाच षटकात ५३ धावा धावफलकावर लावल्या होत्या. वकारच्या एका ’स्विंग’ होणार्‍या चेंडूवर ’ड्राइव्ह’ मारणाच्या प्रयत्नात सहवाग कव्हरमधे अफ्रीदीच्या हातात झेल देऊन बाद झाला. त्याने १३ चेंडूंत तीन चौकारांच्या आणि एक षटकारांच्या सहाय्याने २१ धावा केल्या होत्या. (५३-१)
वकारच्या पुढच्याच चेंडूवर सौरव गांगुली पायचित झाला आणि पाकिस्तानी खेळाडूंना चेव आला. वकार स्वतःवरच इतका खूष झाला कीं तो एक-एक करत सगळ्या खेळाडूंकडे पळत गेला. पाकिस्तानी खेळाडूंनी एकमेकांच्या पाठीवर शाबासक्या दिल्या-घेतल्या! (५३-२)
आता महंमद कैफ मैदानावर आला. आणि त्याने कुठलेही धोके न पत्करता सचिनला सुंदर साथ दिली. पण सचिनने आपली झंजावाती फटकेबाजी चालूच ठेवली. पहिली ’पॉवर-प्ले’ची पंधरा षटकें संपल्यावर क्षेत्ररक्षक मैदानभर दूर-दूर पसरले पण त्याचा सचिनच्या फटकेबाजीवर फारसा परिणाम झालेला दिसला नाहीं. ८३ वर पोचल्यावर त्याने १२,००० धावांचा पल्ला पार केला आणि ही बातमी पडद्यावर झळकताच भारतीय समर्थकांनी जल्लोष करून मैदान डोक्यावर घेतले.
सचिनबरोबर शतकी भागीदारी (१०२) केल्यावर आणि ६० चेंडूंत ३५ केल्यावर कैफने अफ्रीदीचा चेंडू आपल्या यष्टीवर ओढून घेतला व तो त्रिफळाचित झाला. (१५५-३)
त्याच्या जागी भारताचा "भिंत" म्हणून नावाजला गेलेला राहुल द्रविड फलंदाजीला उतरला त्यावेळी सगळ्या प्रेक्षकात एक उत्कंठेचे वातावरण निर्माण झाले होते. द्रविडने सेट व्हायला पुरेसा वेळ घेतला पण त्याचे लक्ष धावफलकावर आणि धावांची गती पाकिस्तानला हरविण्यासाठी पुरेशी आहे याकडे तो लक्ष देऊन पण काळजीपूर्वक खेळत होता.
पण दुसरीकडे सचिनचे तांडवनृत्य सुरूच होते व त्यामुळे धावगती खाली येण्याची कांहींच शक्यता नव्हती. या सुमाराल सचिनचा पाय जास्त दुखू लागला. आपल्या फिजियोने-लायपसने-हॅमस्ट्रिंगचा दुखावलेला स्नायू खेचून त्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा उपयोग झाला नाहीं. त्याने रनरही घेतला, पण ९८ च्या वैयक्तिक धावसंख्येवर शोएबने योग्य पल्ल्यावर (Good length) टाकलेला एक चेंडू उसळला व सचिनच्या बॅटला चाटून उंच उडाला तो थेट युनूस खानच्या हातात.
घामाघूम झालेला सचिन दुखरा पाय घेऊन हळू हळू चालत तंबूत परतला आणि ड्रेसिंग रूममध्ये आल्यावर तो खुर्चीत कोसळलाच. तो मनाने आणि शरीराने पूर्ण थकला होता. कुणीही त्याच्या जवळही गेले नाहीं. साधारणपणे अशा विजयी खेळीनंतर जेंव्हां खेळाडू तंबूत परततो तेंव्हां जल्लोष होतो, सहकारी आनंदाने त्याचे अभिनंदन करतात. पण सचिनला कुणीही कांहींही बोलले नाहीं. सचिन आपण कसे बाद झालो याचा ’रीप्ले’ पहात बसला होता. वर्‍याच वेळानंतर जॉन राईट त्याच्याजवळ आला आणि त्याने सचिनला पाठीवर हात ठेवून शाबासकी दिली. कुणीतरी सचिनचे पॅड्स सोडली. सौरवनेही दुरूनच आवाज न करता टाळ्या वाजवल्या.
शतक पूर्ण व्हायला दोनच धावा कमी पडल्या. सचिनची एक अतीसुंदर खेळी संपुष्टात आली. हे शतक एरवी त्याच्या सर्व शतकांतील ’कोहिनूर’च ठरले असते. पण १३० च्या धावगतीने (strike rate) बारा चौकार आणि एक षट्कार यांच्या सहाय्याने ७५ चेंडूत ९८ धावा काढून आणि सुमारे २२ षटकात उरलेल्या ९७ धावा काढायचे आव्हान राहुल आणि युवराजवर सोपवून सचिन २८ व्या षटकात तंबूत परतला (१७७-४).
सचिनच्या या खेळीत एकच गालबोट होते. तो ३२ धावांवर असताना वासिम अक्रमच्या गोलंदाजीला तोंड देत होता. वासिमने अब्दुल रझाकला जिथे उभे केले होते तिथे उभे न रहात तो स्वतः होऊन दुसरीकडे हलला. रझ्झाकचे दुर्दैव असे कीं पुढच्याच चेंडूवर सचिनचा फटका उंच उडाला आणि वासिमने जिथे रझ्झाकला उभे केले होते नेमका तिथेच गेला व तो झेल रझ्झाकला घेता आला नाहीं. त्यामुळे वासिम अक्रम संतापून रझ्झाकला म्हणाला "तुझे पता है तूने किसका कॅच छोडा है?" रझ्झाक ओशाळून गप्प बसला!
कव्हर्समधून सुरेख कव्हर ड्राइव्ज मारत युवराजने ५३ चेंडूंत आपले नाबाद अर्धशतक झळकवून आपली उपयुक्तता सिद्ध केली. त्याचे हे अर्धशतक अनमोल होते कारण त्यामुळे भारताला विजय प्राप्त करून दिला. युवराजच्या बॅटीतून धावा जलद गतीने बनत होत्या त्यामुळे राहुलने कुठलीही अनिष्ट पडझड होणार नाहीं याची काळजी घेत ७६ चेंडूंत ४४ धावा केल्या (धावगती ५८) व तो नाबाद राहिला.
शेवटी भारताचा विजय झाल आणि त्या नंतरच भारताच्या तंबूतली शांतता संपली. सगळ्यांनी एकमेकाना ’हाय-फाइव्हज’ दिले आणि खेळाडूंनी हस्तांदोलने करत एकमेकांना मिठ्या मारल्या. सौरव धावत मैदानावर गेला व त्याने नाबाद परतलेल्या फलंदाजांचे अभिनंदन केले. पाकिस्तानी खेळाडू हळू-हळू आपल्या ड्रेसिंगरूमकडे परतले व त्यांनी भारतीय खेळाडूंचे अभिनंदन केले. रझ्झाक आणि सईद अन्वर तर भारतीय तंबूत आले. एरवी उत्साहित न होणारा जॉन राईटसुद्धा उत्साहात होता. सचिनने घरी फोन केला आणि तो त्याच्या पत्नीशी-अंजलीशी-बोलला. तिने अभिनंदन करण्याबरोबरच फोन बाहेर नेऊन सचिनला मुंबईतील दिवाळीपेक्षा जास्त उत्साहात वाजणार्‍या फटाक्याचे आवाज ऐकविले. भारताच्या कानाकोपर्‍यातून आनंदाच्या आणि जयजयकाराच्या घोषणा सुरू झाल्या होत्या आणि फटाके फुटू लागले होते. भारताने आपल्या क्रिकेटमधल्या(ही) कट्टर शत्रूला "चारी मुंड्या चीत" करून चौथांदा खडे चारले होते! (विश्वचषक स्पर्धांत हे दोन संघ एकूण चार वेळा समोरासमोर आले आहेत आणि चारही स्पर्धांत भारताने पाकिस्तानला हरविले आहे.)
सौरवने सार्‍या संघाला बक्षिस समारंभाला बोलावले. सचिन दुखावलेल्या पायामुळे लंगडत तिथे गेला. त्याला पाहिल्याबरोबर मैदानातील सर्व प्रेक्षकांनी प्रचंड जल्लोष केला. सचिनला सामना-वीर ठरविण्यात आले.
त्या दिवशी लाहोर आणि कराची या शहरांत दुखवट्याचे वातावरण होते. पाकिस्तानमधल्या सगळ्या प्रांतांमध्ये शोककळा पसरली होती. लवकरच कप्तान आणि प्रशिक्षकांना बदलण्याची मागणी यायची शक्यता होती. सगळीकडे क्रोधाचे, निराशेचे आणि धक्का बसल्याचे वातावरण होते. पण क्रिकेट्च्या खर्‍याखुर्‍या पाकिस्तानी चाहत्यांच्या हृदयात कांहींसा आनंदही होता. कारण पुन्हा एकदा एका क्रिकेटवीराने चांगल्यात चांगली फलंदाजी जेवढी करता येऊ शकते तेवढी करून दाखविली होती आणि त्या दिवशी जो संघ जास्त चांगला खेळला होता त्याचा विजय झाला होता. आता क्रिकेटकडून आणखी काय अपेक्षा ठेवता येतील.
ऋणनिर्देश: माझे सहकारी श्री. नाफडे यांनी या लेखासाठी बरेच लेख पुरवले. त्यात श्री अमृत माथुर (विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघाचे व्यवस्थापक) यांचाही लेख अंतर्भूत आहे. तंबूतील गप्पागोष्टी त्यांच्याच लेखावरून घेतल्या आहेत. बाकीची माहितीसुद्धा बर्‍याच ठिकाणाहून जमविली. जितकी माहिती वापरू शकलो तितकीच माहिती अजूनही शिल्लक आहे!

Comments

ऐतिहासिक सामना

बरीच न माहीत असलेली माहीती समजली. सचिनचे गुणगान कितीही ऐकले आणि केले तरी कमीच आहे. उरलेली माहिती लेखात टाकता आली नाही तरी मला व्यनीतून पाठवावी ही विनंती.

९६ च्या वर्ल्डकपमधल्या इडन गार्डन वरच्या भारत श्रीलंका सामन्याची इतर धावा, निकाल आणि विनोद कांबळीचे रडणे वगळता इतर माहीती असल्यास त्यावरही लेख लिहावा.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

पुढचा लेख ईडन गार्डनवरील 'आपल्या' पानिपताबद्दलच आहे.

पुढचा लेख ईडन गार्डनवरील 'आपल्या' पानिपताबद्दलच आहे.
___________
जकार्तावाले काळे

छान

वा छान वाटले वाचून :)

सुंदर.

मी पाहिलेल्या अविस्मरणीय सामन्यांपैकी एक ! या सामन्यात सचिनने शोएबला भिरकावले तो सिक्स निव्वळ अप्रतिम होता. त्याचे कितीतरी व्हिडीओज यू ट्युबवर आहेत. त्यानंतर शोएबची गोलंदाजी थोडा वेळ बंद केली होती.

"महंमद कैफला सचिनशी दोन हात करायचे होते,"

तुम्हाला हस्तांदोलन म्हणायचे आहे का? :-)

'टेबलटेनिस'च्या मॅचमध्ये 'दोन हात' करायचे होते

नाहीं. त्याला 'टेबलटेनिस'च्या मॅचमध्ये 'दोन हात' करायचे होते.
___________
जकार्तावाले काळे

लेखांची जातकुळी

ह्या अशा लेखांची जातकुळी कोणती? उपक्रमावर असे लेखन चालते?

शंका का वाटावी?

या लेखात क्रिडा क्षेत्रातील ऐतिहासिक घटना वर्णन केली आहे. उपक्रमासाठी अतिशय योग्य लेख आहे. अशाप्रकारे लेखांविषयी शंका उत्पन्न करत राहण्यापेक्षा लेख वाचून लेखावर प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल.

-----

काळेकाका, लेख आवडला. अशाप्रकारच्या रोचक सामन्यांचे आणखीही वर्णन येऊ द्यात.

जातकुळी

आंतरराष्ट्रीय क्रीडा मनोरंजन विरंगुळा आस्वाद माहिती

काळे यांनी जातकुळी दिली असताना पुन्हा हा प्रश्न विचारण्याचे प्रयोजन काय? सामन्याशी निगडीत बर्‍याच नवीन गोष्टीही समजत आहेत. पुढच्या वेळी कट्ट्यावर गप्पा मारताना किंवा मुलांना सचिनची महती सांगताना नक्कीच उपयोगी पडतील ;-)

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

छान माहिती

परवाच क्रिकइन्फोवर श्री अमृत माथुर यांचा लेख वाचला. मराठीत वाचताना अजून चांगला वाटला.
लंकेविरुद्धातील 'पानिपत'विषयी वेगळी माहिती येण्याची वाट पाहतो आहे.

||वाछितो विजयी होईबा||

८ किंवा ९ तारीख उजाडेल असे वाटते

तुषारजी,
८ किंवा ९ तारीख उजाडेल असे वाटते, कारण मी उद्या आणि परवा प्रवासात आहे!
___________
जकार्तावाले काळे

चालेल...

१९९६ च्या विश्वचषकातील ९ मार्चला बंगलोरच्या चिन्नास्वामीवर झालेल्या भारत-पाकिस्तानमधील उपांत्यपूर्व सामन्याची गोष्ट ऐकायला आवडेल....अजय जडेजाची आतिषबाजी व व्यंकटेश प्रसादचा बदला.... एकदा येउद्याच!!

उद्या ईडन गार्डनवरील आपले पानीपत

उद्या ईडन गार्डनवरील आपले पानीपत. नंतर बेंगलोरच्या सामन्याबद्दलची आपली फर्माइश.
___________
जकार्तावाले काळे, सध्या मुक्काम (१ आठवड्यासाठी) वॉशिंग्टन डीसी

 
^ वर