न्याय्य विषमता!
अभय व अनिता दिवाळी सणाच्या निमित्ताने खरेदीसाठी बाहेर पडले. त्या दोघांचे आपल्या तिन्ही मुलांवर भरपूर प्रेम. दिवाळीची भेट म्हणून प्रत्येकासाठी दोन हजार रुपये खर्च करावे असे ठरवून ते एका मॉलमध्ये शिरले. सर्वात मोठ्या मुलाचे वय बारा वर्षे, त्यानंतरच्याचे दहा वर्षे व सर्वात धाकटा आठ वर्षाचा. आदिदासच्या स्पोर्टस शूजची किंमत तीन हजार रुपये होती व नायकेच्या शूजला दोन हजार रुपये मोजावे लागत होते. अभय व अनिताने तिघांसाठी नायकेचे शूज घेतले व बिल देण्यासाठी काउंटरपाशी गेले. तितक्यात त्या दोघांचे लक्ष एका पोस्टरवर गेले. आदिदासच्या दोन शूजच्या जोड्या घेणार्यास नायकेच्या शूजची एक जोडी मोफत!
" जर आपण ही ऑफर स्वीकारल्यास आपल्या मुलातील दोघांना चांगले स्पोर्टस शूज मिळतील व ही खरेदी आपल्या बजेटच्या आवाक्यातच असेल" - अभय.
"परंतु आपल्याला असे करता येणार नाही. आपण आपल्या मुलांपैकी एकट्यावर अन्याय केल्यासारखे होईल. हा भेदभाव आहे" इती अनिता.
" पण अनिता, कसे काय हे अऩ्याय्यकारक ठरेल? आपण घरून निघताना प्रत्येकासाठी दोन हजार रुपये खर्च करण्याचे ठरविले होते व या दोन हजारात नायकेचे शूज येत असल्यामुळे आपण सर्वाना नायकेचे शूज घेण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांच्यापैकी एकाला नायकेचेच शूज मिळणार आहेत. व इतर दोघांना त्यापेक्षा चांगले शूज मिळतील, एवढाच काय तो फरक. परंतु आपण ही ऑफर नाकारल्यास आदिदासचे शूज न मिळाल्यामुळे दोन मुलं आपल्यावर नाराज होतील. त्याचे काय? " अभयचे प्रत्युत्तर.
" मला आपल्या मुलांमध्ये सम वाटणी करायची आहे. एकाला जास्त, दुसर्याला कमी असे नको" अनिताचा ठेका.
" इतर दोन मुलं हिरमुसली तरीसुद्धा! ! "
" ............"
आपल्यातील बहुतेकांना समतेबद्दल आपुलकी वाटत असते. परंतु त्यातील काही जण मात्र कुठल्याही परिस्थितीत समतेचा आग्रह सोडायला तयार होत नाहीत. भेदभाव न करणे म्हणजे सर्वांना एकाच पातळीवर (म्हणजेच खालच्या पातळीवर!) आणून ठेवणे अशा अर्थाने समतेकडे ते पाहतात. या जगातील प्रत्येकाला गरीब करून आपण सहजपणे समता प्रस्थापित करू शकतो. परंतु असे केल्यामुळे कोणाचेच (गरीबांचीसुद्धा!) भले होणार नाही. व असे करणे मूर्खपणाचे ठरेल. गरीबाला कायमचेच गरीबीतच ठेवणे हे त्यांच्यावर अन्याय्य ठरेल व इतरांनाही हानीकारक ठरू शकेल.
आपण खर्या अर्थाने समता आणू शकत नाही म्हणून समाजातील विषमतेकडे (कायमचेच!) दुर्लक्ष करत रहावे हेही योग्य नाही. यासंबंधात कुठल्या परिस्थितीत विषमता स्वीकारार्ह आहे व कुठे नाही याचे काही निकष ठरवावे लागतील. आपल्याच दोन्ही मुलांना त्यांच्या भावापेक्षा चांगले शूज मिळत असल्यास थोडासा भेदभाव खपवून घेण्यास का हरकत असावी? अभयचा हा वादाचा मुद्दा योग्य वाटण्याची शक्यता आहे. यात कुणाचेही नुकसान होत नाही, झाला तर उलट फायदाच होईल. त्यामुळे अशा प्रकारच्या विषमतेला नाकारण्यात काही अर्थ नाही.
जॉन रॉल्स हा राजकीय तत्वज्ञ अशा प्रकारच्या विषमतेला डिफरन्स प्रिन्सिपल असे नाव देतो. तळागाळातील लोकांचाही फायदा होत असल्यास विषमतेला हरकत नसावी, हा या सिद्धांताचा मतितार्थ आहे. अभय व अनिता यांच्या मुलांच्या संदर्भात हा सिद्धांत लागू करता येईल की नाही हा मुद्दा वेगळा आहे. अनिता व अभय यांची तिन्ही मुलं - लहान प्रमाणात का असेना - वर्गविरहित समाजाचे एक घटक आहेत. त्यात सर्वांना एकाच मापात तोलले जात असते. मुळात अनिता - अभय या जोडीने सर्वांसाठी समान खर्च करण्याच्या उद्देशाने दुकानात प्रवेश केला होता. तसे त्यांचे नियोजन होते. परंतु अभयच्या बदललेल्या इच्छेमुळे त्यातील दोघांना अपेक्षेपेक्षा जास्त काही तरी मिळणार आहे व तिसर्याचे यात काहीही नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली आहे. त्यामुळे हे बदललेले नियोजन तिसर्या मुलालासुद्धा न्याय देणारा ठरेल का? एक मात्र खरे की सामाजिक व/वा राजकीय व्यवहाराप्रमाणे कौटुंबिक व्यवहारात वागता येत नाही. सामाजिक व/वा राजकीय व्यवहारात रॉल्सच्या तत्वाचा आग्रह धरणे रास्त ठरेल. परंतु कौटुंबिक व्यवहारातील थोडासा भेदभावसुद्धा कौटुंबिक ताण तणावाला कारणीभूत ठरू शकेल.
राजकीय व्यवहार करताना मात्र या संबंधी जास्त काळजी घ्यावी लागेल. कुठल्याही गरीबाच्या स्वाभिमानाला धक्का पोचवणारा निर्णय-धोरण - कृती सामाजिक स्वास्थ्य बिघडवू शकेल. गरीब वस्तीत एकमेकाच्या शेजारी राहणार्यांपैकी एखादा (बदललेल्या राजकीय ध्येय-धोरणामुळे) अचानकपणे श्रीमंत झाल्यास गरीबांना ते सहन होणार नाही. खरे पाहता त्याची श्रीमंती स्वकष्टार्जित असू शकेल. परंतु आपलाच एक शेजारी श्रीमंती भोगत आहे, हे गरीब शेजार्याला मानसिकरित्या कधीच पटणार नाही. सामाजिक मनोविश्लेषकांच्या मते गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी गरीबांना अस्वस्थ करत असते. गरीबांना गरीब शेजारी चालेल; श्रीमंत शेजारी नको. कारण शेजारच्याची श्रीमंती गरीबाला कायमची टोचणी देत राहते.
राजकीय, सामाजिक वा कौटुंबिक व्यवहारातील समानता व विषमता यांचा फक्त केवळ भौतिकतेच्या दृष्टिकोनातूनच विचार करत राहणे हे कितपत योग्य आहे?
याव्यतिरिक्त इतर दृष्टिकोनातूनसुद्धा (उदा: आध्यात्मिक, पारलौकिक, मानसिक....) या समस्येकडे पाहणे वा मोजमाप करणे याचाही विचार व्हायला हवा असे आपल्याला वाटते का?
Comments
सोपा उपाय
विषमता शब्द खटकायला लागल्यावर विविधता शब्द वापरायचा. विषमतेला शोषणाची छटा आहे तर विविधतेत पोषणाची छटा आहे. आपल्या प्रतिज्ञेत आहेच की विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे
प्रकाश घाटपांडे
मेक्सिकोला
मेक्सिकोला विचारायला हवे की त्यांना अमेरिका नको का? ;-)
उत्तम प्रस्ताव.
प्रस्ताव उत्तम आहे, ह्यावरील चर्चा वाचावयास आवडेल.
उदाहरणातील अभयचा प्राथमिक मुद्दा 'बचत' हा आहे, चांगले स्पोर्टस शूज मिळतील हा नंतर जोडलेला तर्क आहे. इथे सोयीनुसार "चांगले" असे पटकन तो घोषित करतो. त्यामुळे त्याची भूमिका हि स्वार्थी आहे, न्याय्य नाही.
तरीदेखील आपल्या भूमिकेचा विचार केल्यास विचारांशी सहमत. मागास वर्गासाठी "ठीक-ठिकाणी" रिजर्वेशन देखील ह्याच तत्त्वातून मांडले असावे. पण "मागास" कोण आणि किती हे मात्र डोळे/डोके ठिकाणावर ठेऊन मोजायला हवे.
भूमिका काळाप्रमाणे आणि ताकदीनुसार बदलणे गरजेचे आहे, क्षमता असणाऱ्यांनी काही अंशी "डिफरन्स प्रिन्सिपल" तत्व अंगीकारावे व नसणार्यांनी "सरवायवाल ऑफ द फिटेस्ट" हे तत्व बाळगावे, हे झाले तर विषमता कायम राहून समतेसाठी प्रयत्न केल्यासारखे होईल.
तिसऱ्याचे नुकसान होणार नाही हे खरे नाही, नुकसान होणार कि नाही हा तो तिसराच ठरवू शकतो. कारण नुकसान हे सापेक्ष आहे, भावाला नायकेचे शूज मिळाले (नायके आदिदास पेक्षा चांगले हे माझे मत आहे) आणि मला मात्र आदिदास..हे नुकसानकारक वाटते.
मास्लोच्या गरज मांडणी तत्वानुसार सर्वच गरजांचे मोजमाप योग्य वेळी/योग्य ठिकाणी करणे उचित.
स्वार्थ / न्याय्य
>>त्यामुळे त्याची भूमिका हि स्वार्थी आहे, न्याय्य नाही.
स्वार्थी भूमिकेत न्याय्य नसतो अस म्हनायचा आहे काय ?
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
न्याय असतो
>>स्वार्थी भूमिकेत न्याय्य नसतो अस म्हनायचा आहे काय?
न्याय असतो :) पण ज्याचा स्वार्थ साधला जातो त्याचबरोबरच फक्त न्याय होतो, बाकी अन्यायाचे धनी होतात.
समतेला काळाचे परिमाण हवे
अभयची भूमिका न्याय्य व मान्य करता येण्यासारखी आहे. पण काही अटींवरः
तो तिसरा कोण हे मुलांनीच सहमतीने ठरवले पाहिजे. त्यात देणारांचे मत नको. त्यांनी सर्वात जास्त ज्यांना फायदा होईल अशा दोघांची निवड त्यांनीच केली पाहिजे.
उलट मुलांनी विषम वाटणी या प्रसंगात स्विकारली, तर पुढे त्यांची समता पुष्ट होण्याची शक्यता आहे. समता हे केवळ एकाच गोष्टीत एकाच वेळा वापरण्याचे तत्व नसून काळासाठी वापरण्याचे तत्व आहे.
-स्वधर्म
विषमता
विषय चांगलाच आहे. फक्त सुरुवातीच्या उदाहरणाशी त्याचा काही संबध नाही.
विषम परिस्थितीत विषम वाटप (मागासलेल्यांना अधिक) हे योग्यच आहे.
मात्र या संबंधात स्वाभिमानाची गोष्ट येऊ नये असे वाटते. यातील प्रत्येक व्यक्तिस मदत नाकारायचे स्वातंत्र्य असावे (बहुदा ते असते.) त्यामुळे स्वाभिमानावर गदा येत नाही. गरीबातील एक जण श्रीमंत होऊन त्याचा दुस्वास इतर करण्याचा विषम-वाटप व्यवस्थेचा संबंध कळला नाही.
राजकीय, सामाजिक वा कौटुंबिक व्यवहारातील समानता व विषमता यांचा फक्त केवळ भौतिकतेच्या दृष्टिकोनातूनच विचार करत राहणे हे कितपत योग्य आहे?
माझ्या मते हे योग्य आहे.
याव्यतिरिक्त इतर दृष्टिकोनातूनसुद्धा (उदा: आध्यात्मिक, पारलौकिक, मानसिक....) या समस्येकडे पाहणे वा मोजमाप करणे याचाही विचार व्हायला हवा असे आपल्याला वाटते का?
यावर अधिक सांगाल तर अर्थ कळेल.
प्रमोद
विषम वाटपाची समस्या
सुरुवातीचे उदाहरण तितकेसे चपखल नसले तरी विषम वाटपाची समस्या अगदी लहान सहान गोष्टीतूनही व्यक्त होत असते, यासाठीची ती मांडणी होती.
झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीला लॉटरी लागून इतरांपेक्षा त्या कुटुंबाचे राहणीमान उंचावले तरीही इतरांना त्याचा हेवा वाटणार, असे मला वाटते. त्यातूनच त्या कुटुंबाचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दुस्वास होण्याची शक्यता आहे. कदाचित हे निरीक्षण चुकीचे असू शकेल. येथे प्रश्न केवळ स्वाभिमानाचा नसून क्षणा-क्षणाला त्याचे राहणीमान इतरांना टोचत असते. ते कुटुंब तेथून निघून गेल्यास त्याची तीव्रता कमी होते.
"आपलं नशीबच फुटकं" "पाची बोटं सारखी नसतात." असे हताश उद्गार काढत विषम व्यवस्था सहन केली जात असते. नैराश्य लपविण्यासाठी आपण अशा प्रकारे आध्यात्मिकतेची ढाल पुढे करत असतो.
"या जन्मी कष्ट भोगल्यास पुढच्या जन्मी सुख मिळेल वा स्वर्ग मिळेल." "परमेश्वर आपली परीक्षा पाहण्यासाठी कष्ट देत आहे" या प्रकारची विधानं पारलौकिक दृष्टिकोनातून येत असावेत.
मानसिक समाधानासाठी "हेही दिवस जातील" याचा जप करत राहणारे भरपूर जण सापडतील.