संपादनेथॉन: मराठी दिनानिमित्त विकिपीडियाचा उपक्रम

नमस्कार मंडळी,
औचित्य आहे दरवर्षी २७ फेब्रुवारीला जगभर पाळल्या जाणार्‍या मराठी भाषा दिवसाचं. त्या निमित्त येत्या २७ फेब्रुवारीस मराठी विकिपीडियावर संपादनांची मॅरेथॉन - अर्थात संपादनेथॉन - आयोजित केली आहे. या दिवशी अधिकाधिक संपादने करून आपला सक्रीय सहभाग नोंदवण्यासाठी विकिपीडियाकडून सर्व मराठी भाषिकांना यात सामील होण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे.

विकिपीडियाच्या १०व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणं सर्व भारतीय भाषांमध्ये मराठीतील लेखांचा तिसरा क्रमांक आहे. (उडीया आणि हिंदी आपल्यापेक्षा पुढे आहेत.) तरीही जर मराठी विकि पाने चाळली असतील, तर ही लेखसंख्या पुरेशी नाही हे लगेच कळून येतं. तेव्हा त्यात भर घालणं हे काम आपणा सर्वांनी पुढे येऊन करणं गरजेचं आहे. त्यासाठी छोटे लेख संपादित करणं(यांचीही यादी खूप मोठी आहे), नवीन लेख तयार करणं किंवा त्या त्या लेखाला पूरक अशी चित्रे/फोटोग्राफ्स अपलोड करणं असे खारीचे आणि सिंहाचे दोन्ही वाटे आपण सहजच उचलू शकू..

अधिक माहिती विकिपीडियावरून उचलून मी इथे डकवण्यापेक्षा सरळ या दुव्यावरच पहा:
http://mr.wikipedia.org/wiki/विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन_१
इथे सहभागासाठी नोंदणी करता येऊ शकेल तसेच नोंदणी न करताही आपला हातभार लावता येऊ शकेल. पानाच्या शेवटी साहाय्यासाठी मदतकेंद्राचाही दुवा दिलेला आहे, तेव्हा लेखांत भर घालताना जास्त अडचणी येऊ नयेत.

एक रविवार असाही सत्कारणी/कारणी लावूयात.. :-)
धन्यवाद,
-मस्त कलंदर

Comments

चांगला उपक्रम

चांगला उपक्रम आहे. वेळ मिळाला तर नक्कीच हातभार लावेन. माझ्या जुन्या लेखांतील काही भाग विकीवर टाकायचाही राहून गेला आहे. निदान ते तरी करता येईल.

अवांतरः लहान लेखांच्या यादीत सुसंस्कृत, असंस्कृत, व्यक्ती, तमाशा, वटवट्या असे अनेक दुवे संपादनासाठी उपलब्ध दिसले.

उत्तम

उत्तम उपक्रम. माहितीबद्दल आभार. जमेल तितकी मदत करेन.

--
दृष्टीआडची सृष्टी
http://rbk137.blogspot.com/

+१

हेच म्हणतो.

 
^ वर