पृथ्वीभोवती एका चंद्राऐवजी दोन चंद्र फिरत असते तर....
मागच्या शतकातील प्रसिद्ध विज्ञानकथा लेखक, एच जी वेल्सची The Man Who Could Work Miracles या नावाची एक अद्भुत कथा आहे. त्या कथेतील जॉर्ज फोदरिंगे या व्यक्तीकडे अतींद्रिय शक्ती असल्यामुळे तो गंमतीशीर चमत्कार करून लोकांचे मनोरंजन करत असतो. परंतु त्याची ही शक्ती फक्त रात्रीच्या काळातच जागृत होत असते. तरीसुद्धा त्याला आपल्या या अतींद्रिय शक्तीपासून गावाचे भले करावे, गाव सुधारावे असे वाटू लागते. त्याच गावातील पाद्रीच्या मदतीने तो रातोरात गावातील पडकी घरं दुरुस्त करतो. गावातील दारूच्या गुत्त्यातील व्हिस्की, रम यांचे दुधात रूपांतर करून दारुड्यांच्यात सुधारणा घडवतो. अशा प्रकारचे सत्कार्य करण्यासाठी सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या रात्रीची वेळ कमी पडत असल्यामुळे तो एके दिवशी पृथ्वीलाच स्वत:भोवतीचे फिरणे थांबवण्याची आज्ञा देतो.
वेल्सच्या मते फोदरिंगेला आपल्या आज्ञेचे काय विपरीत परिणाम होऊ शकतील याची कल्पना नव्हती. पृथ्वीने परिवलन (rotation) थांबविल्यास पृथ्वीवर हलकल्लोळ माजेल. प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव जंतू, प्राणी-पक्षी विनाशाच्या गर्तेत सापडतील. अशाप्रकारे वेल्सच्या कथेतील पात्र परमेश्वर होण्यामुळे वाचक काही वेळ फँटसीच्या जगाची सफर करून येऊ शकतो. परंतु असे काही खरोखरच घडल्यास नेमके काय होऊ शकेल, याविषयी नेल कोमिन्स या अॅस्ट्रोफिजिसिस्टने What If The Earth Had Two Moons या त्याच्या पुस्तकात विस्तृतपणे चर्चा केली आहे. वास्तव स्थितीची चांगल्या प्रकारे आकलन होण्यासाठी असे काही तरी घडले असते किंवा घडू शकले असते याचा विचार करण्याची अत्यंत गरज आहे, असे लेखकाला वाटते.
अशा प्रकारच्या कल्पनाविलासासाठी पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रापासून सुरुवात करणे सोईस्कर ठरेल. पृथ्वीच्या भोवती फिरणार्या चंद्राचा आपल्या पृथ्वीच्या जडणघडणीवर फार मोठा प्रभाव आहे. 450 कोटी वर्षापूर्वी मंगळ ग्रहाच्या आकाराची एक वस्तू - या वस्तूला ग्रीक पुराणातील थिया या नावाने उल्लेख करता येईल - नवनिर्मित पृथ्वीवर येऊन धडकली. पृथ्वीच्या बाहेरील थरातील हलकी द्रव्ये दूर फेकली गेली.त्याचे वलय पृथ्वीभोवती तयार झाले. या वलयातील भागांचे एकत्रीकरण होऊन चंद्र तयार झाला. हा उपग्रह व पृथ्वी यांच्यातील गुरुत्व शक्तीतील परस्परक्रियेमुळे पृथ्वीच्या परिवलन कालावधीत वाढ होत 8 तासावरून 24 तासावर आता आला आहे.
चंद्रच नसणे
जर पृथ्वीला चंद्रासारखा एकही उपग्रह नसता तर काय झाले असते? कदाचित सूर्य व पृथ्वी यांच्यातील गुरुत्व शक्तीतील परस्परक्रियेमुळे 8 तासाऐवजी 12 तासात पृथ्वी आपले परिवलन पूर्ण केले असते. त्याचप्रमाणे आपले वजनही कमी दाखवले गेले असते. कारण थियाच्या धडकेमुळे पृथ्वीचेच वजन सुमारे 10 टक्क्यानी वाढल्यामुळे गुरुत्वामध्ये फरक पडला आहे.
चंद्र जर नसता तर पृथ्वीवरील जीवोत्पत्तीच उशीराने झाली असती. चंद्राच्या सुरुवातीच्या काळात हा उपग्रह पृथ्वीच्या फार जवळ होता. कदाचित त्याकाळी आताच्यापेक्षा हजार पटीने ओहोटी-भरती झाल्या असतील. पृथ्वीच्या भूभागावर समुद्राच्या प्रचंड लाटा घासल्या असतील. त्यामुळे भूभागावरील खनिजांचे साठे समुद्राच्या तळाशी साठत गेले असतील. त्यातूनच जीवोत्पत्तीला अत्यावश्यक ठरलेला प्रिमॉर्डियल सूप तयार झाला असावा. कदाचित चंद्र नसता तरी इतर काही रासायनिक क्रियाप्रक्रियातून केव्हातरी जीवोत्पत्ती झालीही असती. परंतु समुद्राच्या लाटावर जगणारे जीव जंतु व इतर प्राणी किंवा चांदण्यात शिकार करणारे प्राणी या पृथ्वीवर दिसले नसते. एवढेच नव्हे तर चंद्राच्या गुरुत्वशक्तीतून पृथ्वीच्या परिवलनाला जे स्थैर्य मिळाले आहे, ते मिळाले नसते. आपली पृथ्वीसुद्धा युरेनस ग्रहाप्रमाणे एका बाजूवर फिरत राहिली असती. सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेच्या वर्षाच्या कालावधीत सूर्यप्रकाश एका धृवावरून दुसर्या धृवापर्यंत व पुन्हा पहिल्या धृवापर्यंत अशी अवस्था झाली असती. प्राणीवंशाचे जीवनचक्र पूर्णपणे सूर्यप्रकाशाशी निगडित असल्यामुळे कदाचित प्राणीवंशाचा प्रवासही एका धृवापासून दुसरा धृव व पुन्हा एकदा पहिल्या धृवाकडे असा होत गेला असता.
चंद्र 2
खरे पाहता थियाच्या धक्क्यामुळे एकाऐवजी दोन उपग्रह पृथ्वीला मिळाल्या असत्या तर काही फरक पडला असता का? कदाचित नाही. हे दोन्ही धूळीकणाचे गोळे गुरुत्वशक्तीमुळे पृथ्वीवर जीवोत्पत्ती होण्याअगोदरच एकमेकाशी टक्कर देऊन नष्ट झाल्या असत्या.
दुसर्या उपग्रहाला - आपण त्याला चंद्र 2 असे म्हणू शकतो - पृथ्वीभोवती फिरत राहण्याची संधी फक्त या धूळीच्या गोळ्यानी महाकाय विश्वात भरकटत असलेल्या अशनीच्या एका जोडीला चिकटून राहिल्यास मिळाली असती. चंद्र 2 च्या गतिक ऊर्जेचा (kinetic energy) काही भाग या अशनीत जावून पृथ्वीपासून जवळच्या काही अंतरावरील अक्षावर ते फिरत ठेवले असते. परंतु या चंद्र 2 चा गुरुत्व पृथ्वीवर हलकल्लोळ माजवू शकला असता. समुद्राच्या मोठ-मोठ्या लाटा व ज्वालामुखीमुळे पृथ्वी अस्थिर झाली असती. आकाश धूळिकणाने भरून अंधार झाला असता व ही स्थिती पृथ्वीप्रळयाची नांदी ठरली असती. काही काळानंतर चंद्र 2 त्याचे सहयोगी अशनी निघून गेल्यानंतर जैसै थे परिस्थिती परत आली असती.
चंद्र 2 चा आकारमान हा आताच्या चंद्राएवढा व त्याची कक्षा (orbit)सुद्धा चंद्राच्या प्रतलावरच (plane) व त्याच दिशेने; परंतु पृथ्वीपासून आताच्या चंद्राच्या अर्ध्या अंतरावर चंद्र 2 ची कक्षा असती तर काय घडले असते? अशा स्थितीतसुद्धा पृथ्वीवर जिवंत असलेल्यांना आताच्या चंद्राच्या दुप्पट आकाराचा व चारपट प्रकाशमान असलेला हा चंद्र 2 पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा दर 10 दिवसानी पूर्ण केला असता. दोन्ही चांदण्याच्या प्रकाशात एखादे पुस्तकही आपण वाचू शकलो असतो.
या चांगल्या बातमीबरोबरच आपल्याला वाईट बातमीही पचवावी लागली असती. पृथ्वी व आताचा चंद्र यांची गुरुत्वशक्ती चंद्र 2 च्या अंतर्भागाला घुसळून काढली असती व आतील तप्त लावारस बाहेर पडण्याच्या प्रयत्नात ज्वालामुखींचा उद्रेक व त्यामुळे पृष्ठभागावर भेगा पडल्या असत्या. देदिप्यमान लावाच्या नद्या आपल्याला दिसल्या असत्या. त्यातील काही उसळून, गुरुत्व भेदून पृथ्वीवर आल्या असत्या. हेही दृश्य आपण आकाशात पाहू शकलो असतो.
परंतु हे दोन्ही चंद्र कधीना कधी तरी एकमेकाशी धडक मारल्याच असत्या. आताच आपला चंद्र प्रती वर्षी 3.8 सें मी दूर दूर सरकत आहे. चंद्र 2 या पेक्षा जास्त वेगाने दूर जात राहील व शेवटी 150 कोटी वर्षानी चंद्राशी टक्कर मारेल. या अपघातामुळे उडालेली धूळ पृथ्वीवर आपटून पुन्हा एकदा येथील प्राणी निर्वंश झाल्या असत्या.
विचंद्र
नेल कोमिन्स यांनी याबाबतीत अजून एका शक्यतेचा विचार केला आहे. दोन चंद्राऐवजी आताचा चंद्रच पृथ्वीभोवती 'उलट्या' दिशेने फिरू लागल्यास काय झाले असते? ज्या प्रकारे आपल्या या चंद्राचा जन्म झाला आहे त्यावरून असे काही घडणे अशक्यातली गोष्ट ठरेल. परंतु थियाच्या संवेगाने (momentum) चंद्राला अक्षावर ठेवून विरुद्ध दिशेने त्याचे परिवलन शक्य झाले असते तर ही पृथ्वीच चक्काचूर झाली असती, असे लेखकाला वाटते. फक्त हा उलट्या दिशेने फिरणार्या - याला आपण विचंद्र (noom) म्हणू या - विचंद्राची शक्यता, जर हा धूळीचा गोळा अंतरिक्षात भटकणार्या अशनींच्या जोडीला चिकटल्यास शक्य होईल, अन्यथा नाही. परंतु ही शक्यता नाकारता येणार नाही. या विचंद्राचे वजन, आकार, अक्ष, कक्षा व अंतर चंद्राप्रमाणे - अपवाद फक्त फिरत राहणार्या दिशेचा - असल्यास पृथ्वीची गती वाढत वाढत परिवलनाची अवधी 12 तासावर - म्हणजेच एकही चंद्र नसलेल्या स्थितीत - आली असती. गुंतागुंतीच्या गुरुत्व शक्तीमुळे विचंद्र पृथ्वीच्या दिशेने ओढला गेला असता. त्यामुळे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेचा वेग वाढत जाऊन त्याच्या भ्रमणमार्गाच्या लंबवर्तुळाकारात वाढ झाली असती. याच काळी पृथ्वीचा परिवलन वेग मंदावत जाऊन शून्यावर येऊन पोचली असती.
पृथ्वीचे फिरणेच थांबल्यास आताच्या दिवसाची अवधी वर्षाएवढी झाली असती. पृथ्वीची एक बाजू कायमचीच सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाली असती. एका बाजूला भरपूर सूर्यप्रकाश व प्रखर उष्णता व दुसर्या बाजूला कायमचाच अंधार व थंडपणा जाणवला असता. परंतु ही गती थांबण्यासाठी अनेक कोटी वर्षे लागली असती व प्राण्यांची उत्क्रांती व त्यांचे स्थलांतर अनुकूल असे वातावरण असलेल्या प्रदेशात झाल्या असत्या. क्षितिजावर सूर्य दिसू शकलेल्या काही सीमारेषेवर आताच्यासारखी जीवोत्पत्ती झालीही असती.
यानंतर मात्र पृथ्वी हळू हळू उलट्या दिशेने फिरू लागली असती. पृथ्वीच्या 'उलट्या' फिरण्यामुळे सूर्य पश्चिमेला उगवला असता व पूर्वेला मावळला असता. विचंद्र पृथ्वीच्या अगदी जवळून फिरत असल्यामुळे भरतीच्या वेळी लाटांची उंची 3 कि.मी. एवढी झाली असती. शेवटी शेवटी विचंद्र पृथ्वीच्या इतक्या जवळ आला असता की लाटांच्या बळामुळे त्याचे तुकडे तुकडे होत याच तुकड्यांचा एक कडा होऊन पृथ्वीपासून काही अंतरावर फिरत राहिले असते.
संदर्भ :New Scientist 22 Jan 2011 (page 38-41)
Comments
धन्यवाद
चांगली ओळख. पुस्तक वाचायला हवे.
चांगला कल्पनाविलास आहे.
एकदा का चंद्र वातावरणात आला की हवेच्या विरोधामुळे लवकरच खाली कोसळेल, परंतु रोश मर्यादेमुळे त्याआधीच त्याचे तुकडे होतील ना?
छान विषय
लेख आवडला. हा लेख वाचून त्याबद्दल अधिक वाचायची इच्छा न झाल्यास काय नवल. न्यु सायंटिस्टचा हा अंक जमेल तेव्हा वाचीन.
तत्पूर्वी काही माहिती विकीत मिळाली.
चंद्र पूर्वी जवळ होता, दिवस फार लांब होता, चंद्र लांब जाऊ लागला दिवस मोठा होऊ लागला. चंद्राची स्वतःभोबतीची परिक्रमा लांब होत पृथ्वीप्रदक्षिणे एवढी झाली. या बद्दल वाचले होते. उर्जा वा ऍन्ग्युलर मोमेंटमच्या नियमात हे कसे बसते हे कळले. पण प्रत्यक्षात बले कशी असतात हे कळले नाही. तीन पिंडांचे साधे गणित (सूर्य-पृथ्वी-चंद्र) आकडेमोडीशिवाय सुटत नाही. (दोन पिंडांचे गणिताचे समीकरण मिळते पण तीन पिंडांचे मिळत नाही.) हे माहित होते. आता कंम्प्युटरमुळे जास्त सहज झाले असले तरी त्यात दीर्घकाळानंतर जमा होणारा आकडेमोडीचा एरर भरपूर मोठा होत जाणार.
दोन चंद्र असते तर (समीकरणात अजून घोटाळे), किंवा विचंद्र असता तर या जर तरीच्या संभावना कल्पनेला उधाण भरायला प्रवृत्त करणार्या आहेत. त्यांचे परिणाम काय झाले असते. हे कोणी अधिकारवाणी ने (न्यु सायंटिस्टला कदाचित ती फारशी नसावी. काही वेळा जास्त रम्यपणे सांगितल्याचे मला जाणवते.) सांगितले तर ते वाचायला मजा येईल.
या विषयाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. (अवांतरः कुंडलीत होणार्या भानगडी वा कुठल्या बाबा बुवांना आणलेले दिसत नाही.)
प्रमोद
गमतीदार कल्पनाविलास
गमतीदार कल्पनाविलास. अन्य ग्रहांना अनेक उपग्रह"चंद्र" आहेत ना? म्हणजे अब्जावधी वर्षे अनेक अपग्रह असलेल्या संरचना टिकू शकतात. आता कल्पनेतील चंद्र किती लहानमोठे करायचे यावर अवलंबून कथानक बदलेल.
श्री. प्रमोद सहस्रबुद्धे यांनी दिलेल्या विकी दुव्यावरून पुढे जाऊन लाग्रांजियन बिंदूंबद्दल वाचले. ती माहिती आवडली.
हा हा हा
अब्जावधी वर्षे अनेक अपग्रह असलेल्या संरचना टिकू शकतात.
हु हु हु हु ही ही ही..... हॅ हॅ हॅ... टिकून आहेत खर्या...
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
तुमचं वाचन किती? बोलताय किती?
धनंजय यांच्या शुद्धलेखनाच्या चुका काढण्याऐवजी दुसरे काही तरी केल्यास उत्तम.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
धनंजय यांचे अशुद्धलेखन
असहमत!
धनंजय यांचे अशुद्धलेखन हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यानिमित्ताने उपक्रम आणि मनोगतावर माहितीपूर्ण चर्चा झडल्या आहेत. शाबि या बहुधा त्याची आठवण ठेऊन प्रतिसाद देत असाव्यात.
हा प्रतिसाद फक्त धनंजय यांनीच हलकेच घ्यावा.
अपग्रहांनी ग्रसलेला धनंजय
अशुद्धलेखनाच्या अपग्रहांनी ग्रसलेला आहे धनंजय...
:-)
पुन्हा...!
अशुद्धलेखनाच्या अपग्रहांनी 'ग्रस'लेला आहे धनंजय...
---- ग्रासलेला म्हणायचय का?? पण ग्रह सुर्याला ग्रासतात ना? राहू केतु कोण आहेत?
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
हाहा!
धनंजय यांच्या शुद्धलेखनावर लक्ष ठेवणार्या चिकित्सकांनी ग्रासलेले धनंजय .. :)
बाकी राहू केतू ग्रह नाहीत. अवकाशातील काल्पनिक (चल) बिंदू आहेत. प्रकाश घाटपांडे यांच्या लेखात मला वाटते हे उल्लेख आलेले आहेत पण ते सहज मिळाले नाहीत. धनंजय यांची प्रतिक्रिया इथे. http://www.mr.upakram.org/node/806#comment-13102
"ग्रसलेला" चालेल
"ग्रसलेला" चालेल. ("ग्रसणे" शब्दकोशातला दुवा; "ग्रासणे" शब्दकोशातला दुवा)
(मुळात) ग्रह चंद्राला ग्रासतात => ग्रहाकरवी चंद्र ग्रसतो, ग्रसलेला असतो, (ग्रस्त होतो,) वगैरे.
परंतु "ग्रह चंद्राला ग्रसतात" असेही रूढ आहे.
जसे:
मुलगा मुलीला पाडतो => मुलाकरवी मुलगी पडते, पडलेली असते, वगैरे.
मान्य केले तरी काही हरकत नाही :)
मान्य केले तरी काही हरकत नाही :)
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
ग्रह व त्यांचे चंद्र
श्री. नानवटी यांनी परिचय करून दिलेल्या पुस्तकातील पृथ्वीच्या दोन चंद्रांची कल्पना एक कल्पना विलास म्हणून कितीही रम्य असली तरी प्रत्यक्षात एक अशक्य गोष्ट आहे. कोणताही ग्रह किती चंद्राना आपल्या नियंत्रणाखाली ठेवू शकतो हे केवळ त्याच्या वस्तूमानावर व त्या वस्तूमानामुळे तो ग्रह ज्या गुरुत्वाकर्षणाच्या बलाचा प्रभाव बाह्य वस्तूंवर(चंद्रावर) टाकू शकतो त्यावर अवलंबून असते. गुरू आणि शनी हे सर्वात जास्त वस्तूमान असलेले ग्रह आहेत त्यामुळे ते अनुक्रमे 16 व 18 चंद्रांना पकडून ठेवू शकतात.
अर्थात एका मोठ्या चंद्राला पकडण्याऐवजी मंगळाप्रमाणेच दोन लहान चंद्रांना पृथ्वी पकडून ठेवू शकते. परंतु अशा लहान चंद्रांचे भरती ओहटी सारखे परिणामही कमी प्रमाणात होतील. त्यामुळे आहे ते बरे आहे असेच पृथ्वीवरचा कोणीही रहिवासी म्हणेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.
कल्पनाविलास
चांगला लेख, आवडला. एकदा का चंद्र वातावरणात आला की त्याचा स्फोट होईल आणि शकले उडतील असे वाटते.
गुरु, शनी वगैरे ग्रहांना एकापेक्षा अधिक चंद्र आहेत पण मंगळाला दोन चंद्र आहेत. फोबोस आणि डिमोस. त्यांच्या वर्तनाबद्दल अधिक विकीवर आहेच.
बाकी थोडा अधिक कल्पनाविलास.
कल्पना.......
आत्याबाईला मिशा असत्या तर......मीही काका म्हटलं असतं!
;)
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !
कल्पनाविलास की विचार-प्रयोग?
या लेखातील आशयाला कल्पनाविलास म्हणण्याऐवजी विचार-प्रयोग म्हणणे उचित ठरेल. विचार-प्रयोगाची ही परंपरा अरिस्टॉटलच्या काळापासून आहे. केवळ विचार व काही जुजबी निरीक्षणावरून पृथ्वीवरील भौतिक वस्तू पृथ्वी, आप, तेज, वायू आकाश (earth, air, water and fire) पासून बनल्या आहेत अशी त्या काळातील समजूत होती व संपूर्ण अवकाश ईथरने भरलेला आहे असे त्यांना वाटत होते. या विचार-प्रयोगाच्या आधारे नैसर्गिक घटनांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न ते करत होते. जरी आज आपण त्या गोष्टींना सामान्य ज्ञानाच्या (common sense)च्या सदरात टाकत असलो तरी विचार प्रयोगातून अनेक गोष्टींचा उलगडा होण्याचा संभव असतो.
तेच
विचार-प्रयोग (गेडांकेन एक्स्परिमेंट) याच अर्थाने मी कल्पनाविलास हा शब्द वापरला होता.
काहीही म्हणा
स्वतःच्या समाधानासाठी काहीही म्हणा. शेवटी आपला बाब्या हा आपला असतो.
मला कल्पनाविलास हा शब्द चुकीचा वाटत नाही.
मग तर मुळीच समजला नाही
पंचमहाभूताच्या कल्पनेचा आणि "जर दोन चंद्र असते तर" विचारांत "प्रयोग" असे काय समांतर आहे?
अवकाशात सर्वत्र आकाशतत्त्व (ईथर) भरून आहे, यात विचारप्रयोग असा काय आहे? हे तर निरीक्षणांचे साक्षात् स्पष्टीकरण आहे. (स्पष्टीकरण चुकलेले आहे, हे आलेच.)
आइन्स्टाइनचा प्रचंड वेगाने जाणार्या रेल्वेगाडीचा विचारप्रयोग मला ठाऊक आहे. त्या विचारप्रयोगातून असे दाखवले जाते, की वेगवेगळी गृहीतके त्या परिस्थितीत लावली, तर भाकिते वेगवेगळी होतात. त्यामुळे काही सिद्धता होत नाही, तरी गृहीतकांमधील बेबनावाची जाणीव तीव्र होते. मग ती विवक्षित गृहीतके - आणि ते विवक्षित बेबनाव - कसोटीस लावण्यासाठी खर्याखुर्या प्रयोगांची योजना करता येते.
एच जी वेल्सच्या कथेमध्ये भौतिकशास्त्रातली गृहीतके तपासली जात नाही आहेत, तर मानसशास्त्रीय/समाजशास्त्रीय/नैतिक गृहीतके तपासली जात आहेत. एक नैतिक गृहीतक आहे "काही प्रसंगी निसर्गनियमांचे उल्लंघन करून नैतिक-सामाजिक सुपरिणाम साधला जाऊ शकतो." दुसरे गृहीतक असे आहे "निसर्गातील कार्यकारणभावांचे जाळे सार्वत्रिक-सार्वकालिक विस्ताराचे आहे." त्या दोन गृहीतकांचा विरोध दाखवण्यात येतो, की "सुपरिणाम साधले जाऊ शकतात की दुष्परिणाम याचे पूर्वानुमान अशक्य आहे."
"दोन चंद्र असते तर" हा विचारप्रयोग करून मूलभूत विश्लेषण असे काय साधते? चंद्रांचे आकारमान नेमके काय, आणि पृथ्वीपासून त्यांचे अंतर नेमके किती, यावर अचाट वेगवेगळी गणिते होऊ शकतात. (त्या मानाने बघा आइन्स्टाइनच्या गाडीच्या विचारप्रयोगात "घड्याळे वेगवेगळ्या गतीने चालतात हा विरोधाभास" सुस्पष्ट होतो.)
त्यापेक्षा दोन-किंवा-अधिक चंद्र असलेल्या ग्रहांचे निरीक्षण उजवे.
भविष्यात कधी पृथ्वीला दोन प्रचंड उपग्रह असूही शकतील (किंवा भूतकाळात अनेक उपग्रह होते, असेही असेल). पण त्या संरचनेतल्या पृथ्वीची परिस्थिती काय असेल/होती, हे सर्वथैव "ती परिस्थिती कशी उद्भवली" यावर अवलंबून असेल.
मान्य
विचार-प्रयोग हा शब्द चूकच आहे हे पटले.
मान्य
सहमत
:)
मस्त प्रतिसाद.
दोन्ही एकच प्रकार
पुस्तक ओळख चांगली आहे पण उपक्रमावर अशा प्रकारचे लेखन चालते असे मला वाटत नाही. असा कल्पनाविलास आणि देव नाही / आहे असा कल्पनाविलास हे दोन्ही एकच प्रकार.
व्याख्या
देव म्हणजे काय?
चांगले गुण
तुम्हाला माणसातील चांगले गुण कोणते हे माहिती आहेत का? किंवा चांगल्या गुणांची तुमची व्याख्या काय व त्याची उदाहरणे कोणती?
तुमचा प्रतिप्रश्न अवांतर
माझ्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुमच्या प्रतिप्रश्नाची तुम्हाला काय आवश्यकता आहे?
आहे
आहे!
काय?
"काय आहे?" हा प्रश्न होता, "आहे की नाही" हा नव्हे!
प्रश्न तुमचा
तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे (देव म्हणजे काय?) उत्तर हवे आहे, हो ना?, म्हणून!
तरीही
परंतु, "देव म्हणजे काय?" या प्रश्नाचे उत्तर "मानवांतील चांगले गुण" या विषयावर अवलंबून असल्याचे तुम्ही सिद्ध करणे आवश्यक आहे. ते सिद्ध झाल्यासच "चांगले गुण" हा विषय अनवांतर ठरेल.
ऍज यु विश
ऍज यु विश. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास, माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या.
नाही
तुमचा प्रश्न अवांतर आहे, 'देव' आणि 'चांगले गुण' यांचा संबंध तुम्ही सिद्ध केलेला नाही.
प्रश्नाचे उत्तर
तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्यास मला पुढे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देता येत नाही.
आवश्यकता
तुमच्या प्रश्नाच्या उत्तरावर माझ्या प्रश्नाचे उत्तर अवलंबून असल्याचे सिद्ध करा.
को.दं.
रिटेंच्या पेशन्सला कोपरापासून दंडावत !
---------------------
वाद विवादात "जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला" असा समज is = गैरसमज
-धनंजय कुलकर्णी
ओके?, चला.
सिद्ध्-करतोय- घ्या. तो तुमचा उत्तर टाळण्यासाठी घेतलेला पवित्रा आहे. उत्तर टाळण्याचे कारण असे असावे की, तुम्हाला ते माहिती असणे शक्यच नाही. ज्यापद्धतीने तुम्ही मला रीटार्डो म्हणालात आणि पुर्वी एकदा *** - ऑफ अशी शिवीही हासडली होतील (ज्या कॉमेंटस् संपादीत झाल्या) त्यावरुन तुम्ही तुमच्या युक्तिवाद संपला की कशा पद्धतीचा आकांडतांडव करता ते मला माहिती आहे. ते पाहता तुमच्याकङे माणसाच्या सद्गुणांची ओळख असावी असे मला वाटत नाही. ते माहिती असते तर तुम्हाला नक्कीच मी देव काय आहे ते सांगितले असते. मनाचा पोत ओळखुन उत्तरे देणे योग्य असल्यामुळे मी तुम्हाला प्रतिप्रश्न केला. ओके?, चला.
खीखीखी
*** नाही, **!
असहमत
उपक्रमावर ज्या अनेक प्रकारच्या पुस्तकांची ओळख चालते त्यात हे पुस्तक निश्चितच बसते. (अगदीच कोणी पोथ्या आणि बाबाबुवांच्या चमत्कारिक पुस्तिकांविषयी लिहू लागलं तर समाचार घेता येईल.)
अगदी असहमत! आपल्या सूर्यमालेतच एकापेक्षा अधिक उपग्रह असणारे ग्रह आहेत, त्यामुळे पृथ्वीला दोन किंवा अधिक उपग्रह असणे अशक्य आहे अशी परिस्थिती नाही. पृथ्वी, चंद्र, त्यांच्या परिवलनाचे परिणाम वगैरे सर्व गोष्टी प्रयोगासकट सिद्ध आहेत. देवाचे तसे नाही.
मस्त लेख!
विचार प्रयोग मस्त आहे.
अजून एक :
पृथ्वी आहे त्या स्थानापेक्षा थोडी सुर्याच्य जवळ असती तर पृथ्वीवरचे सगळ्या पाण्याची बाष्प होउन वैराण वाळवंट झाले असते किंवा थोडी दूर असती सगळे पाणी गोठून बर्फमय झाले असते. दोन्हीही शक्यतांमधे आजची जीवसृष्टी निर्माण होणे अशक्य. पाण्याला द्रव अवस्थेत ठेवणारे हे पृथ्वीचे सुर्यापासूनचे स्थान एकमेवद्वीतीय आहे.
बहुदा यामुळेच
इंटेलिजंट डिझाईनच्या अनेक दाव्यांपैकी एक दावा वरील स्पष्टीकरणाप्रमाणेच आहे. उत्क्रांतीला विरोध करणारे क्रिएशनिस्ट लोक 'ह्या जगातील एवढ्या गुंतागुंतीच्या समीकरणांची रचना करणारी कोणती तरी सर्वोच्च शक्ती असावी त्याशिवाय अशी रचना शक्य नाही' असे नेहमीच सांगत असतात.
बोलो जाता बरळ, करिसी ते नीट। नेली लाज धीट, केलो देवा॥
इंटेलिजंट डिझाईन
इंटेलिजंड डिझाईनचा दावा सपशेल चुकिचा आहे. अधिक माहितीसाठी रिचर्ड डॉकीन्स ह्यांचे ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ वाचावे.
हे लोक आणि असे शोध लावणारे लोक ह्यांच्यात फारसा फरक नाही. दुर्लक्ष करणे उत्तम!