विचारा वेळ द्या जरा

तुम्हाला सर्वांना ती प्रसिद्ध गोष्ट माहीतच असेल. एकदा एक माणूस आपला कोट घालून चाललेला असतो. त्याला पाहून सूर्य व वारा यांच्यात पैज लागते, आपल्यापैकी कोण या माणसाच्या अंगावरून कोट काढून दाखवू शकेल याबाबत. वारा म्हणतो, हाः त्यात काय आहे, मी एका क्षणात तो कोट उडवून लावतो. पण जसा वारा घोंघावायला लागतो तसतसा तो माणूस कोट घट्ट धरून ठेवतो. आणि वाऱ्याला काही तो कोट उडवता येत नाही. मग सूर्य आपली किरणं हळुवार पसरवतो, आणि तो माणूस आनंदाने कोट काढतो.

ही गोष्ट आठवण्याचं कारण म्हणजे नुकताच नरेंद्र गोळेंनी लिहिलेला 'विहारा वेळ द्या जरा' हा लेख वाचला. शहरीकरणापायी, सामाजिक प्रगतीपायी सर्वसामान्य माणूस शरीराची हेळसांड करतो. व्यायाम न केल्यामुळे अनेक शारीरिक व्याधी जडतात. आपल्या शरीराची जी क्षमता असते तिचा पूर्णपणे वापर करता येत नाही. त्यांनी हे सिद्ध करण्यासाठी काही छोट्या कर्तबांचं उदाहरण दिलेलं आहे. पुढे ते म्हणतात

हे काही तुमची चेष्टा करण्यासाठी सांगत नाही आहे. खरे तर हे सगळे आपल्याला सहज साधायला हवे. प्रत्येक आसन (म्हणजे त्याच्या अंतिम अवस्थेत २ ते ६ मिनिटे टिकाव धरणे) जमायला हवे. कधी एके काळी आपल्या शरीरास प्राप्त असलेली ती स्वायत्तता आज आपण गमावून बसलो आहोत.

तो लेख वाचताना मी बौद्धिक शक्तीचा विचार करायला लागलो. गोळेंनी जे शरीराविषयी सांगितलं आहे ते बुद्धीलादेखील तंतोतंत लागू पडतं. लवचिक शरीराचा आपल्याला जगायला जितका फायदा होतो तितकाच लवचिक बुद्धीचा, विचारशक्तीचा होतो. शरीर मजबूत ठेवण्यासाठी जसा आपल्याला व्यायाम आवश्यक असतो तसाच बौद्धिक व्यायाम आपल्याला मेंदू तल्लख ठेवण्यासाठी जरूरीचा असतो.

आता तुम्ही म्हणाल की उपक्रमावर लेखन करणं, प्रतिसाद देणं, चर्चा करणं हा पुरेसा व्यायाम नाही का? कदाचित असेलही. पण मला राहूनराहून वाटतं की इथे लेखन करणाऱ्यांचा प्रत्येकाचा एक कंफर्ट झोन आहे. त्या ठरलेल्या विचारचक्रांच्या सुरक्षित आवर्तनांत प्रत्येकच गुंतलेला असतो. तेवढ्या मर्यादित क्षेत्रात आपली वैचारिक बैठक पक्की करून आपण राहातो. सोसाट्याचा वारा सुटलेला असताना आपला उबदार कोट घट्ट लपेटून ठेवतो. स्वतःला आपल्या ठराविक विचारांच्या खुर्चीत बसवून ठेवतो.

याला उपाय काय? मला आत्ता एक सुचतो आहे. शरीराला व्यायाम देण्यासाठी आपण जशी स्वतःच्या मर्यादा ताणणारी आसनं करतो तशी वैचारिक आसनं केली तर? आपली वैचारिक बैठक बदलली तर? म्हणजे आपण रोज उठून जे विचार मांडतो त्याऐवजी वेगळे विचार मांडायचे. या लेखावर प्रतिसाद देण्यापुरतं हे करावं असं मी आवाहन करतो.

- या लेखा/चर्चेपुरतं तरी स्वतःला वेगळा विचार करण्याचं स्वातंत्र्य द्यायचं
- आपण ज्या गोष्टींवर ठाम विश्वास ठेवतो त्याच्या बरोब्बर विरुद्ध विचार मांडायचे
- ते विचार मांडताना आपला नेहेमीचा घिसापिटा दृष्टिकोन बदलून खरोखर मनापासून विरुद्ध दृष्टीकोनातून मतं मांडायची
- आपले स्वतःचे विचार कोणी मांडलेले दिसले तर त्यांचं शक्य तितक्या समर्थपणे खंडन करायचं

गोळ्यांचे विचार शरीराच्या बाबतीत सर्वांनाच पटलेले दिसले. तेच बुद्धी हा शब्द वापरून लिहिले तर असे दिसतात.

हे काही तुमची चेष्टा करण्यासाठी सांगत नाही आहे. खरे तर हे सगळे आपल्याला सहज साधायला हवे. प्रत्येक बौद्धिक आसन, वैचारिक भूमिका (म्हणजे काही प्रतिसादांपुरता टिकाव धरणे) जमायला हवी. कधी एके काळी आपल्या बुद्धीला प्राप्त असलेली ती स्वायत्तता आज आपण गमावून बसलो आहोत.

काही क्षणांपुरता आपण आपल्या ठाशीव विचारांचा कोट काढून टाकून आपल्या कंफर्ट झोनबाहेर मुक्त फिरून पहावं. बाहेर फार सुंदर सूर्यप्रकाश आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

दुरुस्ती

वरील लेखात 'याला उपाय काय.... मी आवाहन करतो' हा परिच्छेद चुकून अवतरणात पडलेला आहे. तो अवतरणाशिवाय वाचावा.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

विचार आवडला..

माझ्या खालील तीन वाक्यांपैकी दोन खरी आहेत आणि एक खोटे..

१. उपक्रमवरचे लेख वाचल्याने बुद्धीचा व्यायाम होण्याऐवजी थकवा येतो. पण प्रतिसाद वाचून तो जातो.
२. कोटामागे छुपे अजेंडे दडवता येत असल्याने काही सदस्य कडक सूर्यप्रकाशातही कोट घालतात.(किंवा स्वतः कोट न काढता, कोट नसलेला नवीन आयडी काढतात)
३. यनावाला तर्कक्रीडामाला पुन्हा सुरु करणार आहेत.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

तिसरा??

तिसरा कळला नाही.

________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

विचार आवडला पण कृती कशी करायची?

मला स्वतःला गोळ्यांचे शरीराच्या बाबतीतील विचार पटलेले नव्हते. कारण ते बुद्धीच्या दृश्टीने पटण्यासारखे असले तरी ते मला आचरणात आणता येत नाहीत. (तेवढा वेळ नसतो यामुळेच)
'विहारास किंवा विहरण्यास वेळ द्या जरा!' त्या लेखाचं असं नाव असावयास हवं होतं. आणी म्हणून ह्या चर्चेचे नाव - 'विचारास वेळ द्या जरा!' असे असावयास हवे होते.

शरीराला व्यायाम देण्यासाठी आपण जशी स्वतःच्या मर्यादा ताणणारी आसनं करतो तशी वैचारिक आसनं केली तर?

- नाही बुवा! आम्हाला नाही जमायचं! आयुश्याशी अनेक तडजोडी करीत जगताना आधीच बरीच वैचारीक, भावनीक आसनं होत असतात, होत आली आहेत, परत हि भर?

आपली वैचारिक बैठक बदलली तर? म्हणजे आपण रोज उठून जे विचार मांडतो त्याऐवजी वेगळे विचार मांडायचे.

- आमच्या विचारांचा कोट आमच्या अंगाला अगदी चिकटला आहे. तो नाही हो काढू शकत आपणहून!

शंका

किमान या धाग्यात तरी कंफर्ट झोनच्या बाहेर पडून ष वापरा की!

हे घ्या!

- आमच्या विचारांचा कोट आमच्या अंगाला अगदी चिकटला आहे. तो नाही हो काढू शकत आपणहून!

ठिक आहे. केवळ या धाग्यापूरते, तुमच्या आग्रहाखातर,
'दृष्टीने', 'आयुष्याशी'
ओ.के. कां!

असहमत

पण मला राहूनराहून वाटतं की इथे लेखन करणाऱ्यांचा प्रत्येकाचा एक कंफर्ट झोन आहे. त्या ठरलेल्या विचारचक्रांच्या सुरक्षित आवर्तनांत प्रत्येकच गुंतलेला असतो. तेवढ्या मर्यादित क्षेत्रात आपली वैचारिक बैठक पक्की करून आपण राहातो. सोसाट्याचा वारा सुटलेला असताना आपला उबदार कोट घट्ट लपेटून ठेवतो. स्वतःला आपल्या ठराविक विचारांच्या खुर्चीत बसवून ठेवतो.

-असे लेखकाच्या बाबतीत होत असेल. आमच्या बाबतीत मुळीच होत नाही. आम्ही एखाद्या गोष्टीच्या सर्व बाजू नि:पक्षपातीपणे विचारात घेऊन, त्यावर सखोल अभ्यास करून, त्यावर चिंतन आणि मनन करून, इतरांचे विचार लक्षात घेऊन मगच आपले मत पक्के करतो. असे असल्याने आमचे क्षेत्र अमर्याद आहे. आम्ही कोणताही वैचारीक कोटच काय पण शर्टही घालत नाही. आमचे सगळे कसे मोकळे-ढाकळे आहे (अगदी सखाराम बाईंडरसारखे). ;)

हुश्श! आपल्या कंफर्ट झोनबाहेर मुक्त फिरून पाहिले. बाहेर फार उकडते आहे. चला परत आता.

एकंदर प्रस्ताव मजेदार आहे. इतरांच्या प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक.

प्रयत्न

राजेश घासकडवी हे गंभीर स्वभावाचे गृहस्थ आहेत. कुणाची थट्टा करणे, टोपी उडवणे हे त्यांच्या स्वभावात नाही. त्यांचे लिखाण गंभीरपणे घ्यावे अशी त्यांची व इतरांचीही अपेक्षा असते - आणि ते स्वाभाविकच आहे. गोळेसाहेबांच्या ज्या लेखावरुन घासकडवींना हे लिहिण्याची स्फूर्ती आली आहे तो बाकी 'टंग इन चीक' अशा स्वरुपाचा लेख आहे. विसुनाना असे म्हणतात खरे, पण त्यांना स्वतःला त्यांच्या पूर्वगृहदोषांपलिकडे जाता येत नाही. हे त्यांना स्वतःला माहिती आहे, पण ते जाहीरपणे स्वीकारु शकत नाहीत. त्यांचा कोट इतका घट्ट झाला आहे, की आता तो त्यांच्या त्वचेचाच भाग झाल्यासारखा वाटतो.
घासकडवी, पुरे की आणखी लिहू?
सन्जोप राव
तुमचा स्वभाव कसा आहे? गिरण्या बंद पडण्यापूर्वी कसा होता?

मजकूर संपादित. उपक्रमावर लिहिताना इतर सदस्यांवर वैयक्तिक रोखाची अनावश्यक वक्तव्ये होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे.

जाहीर स्वीकार

पूर्वगृहदोषांपलिकडे

- पूर्वग्रह की पूर्वगृह? तुम्ही म्हणाल तसे!

(फक्त या धाग्यापुरता प्रतिसाद म्हणून हे धारिष्ट्य.;))(-की धार्ष्ट्य? :))

तुमचा प्रयत्न फसला!

श्री. संजोप राव,
तुम्ही नेहमी 'फळ खावून बिया ताटात ठेवणारा' प्रतिसाद देता.
तो तुमचा कंफर्ट झोन आहे.
इथे त्याच्या अगदी उलट किंवा वेगळे करणे प्राप्त परीस्थिती होती.
इथे सकारात्मक पर्याय होता-

'फळाची साल काढून, फळ कापून, त्याच्या बिया वेगळ्या करून ताटात प्रतिसादातून मांडणे'
पण हा पर्याय 'आस्वाद घेण्याची क्रिया' पूर्ण झाल्यानंतर करता येत नाही.

आणि म्हणूनच नकारात्मक पर्याय निवडून प्रतिसाद देणे गरजेचे होते.

माझ्या प्रतिसादात, माझ्याकडून तलवार म्यान झाली होती.
तुम्हाला तुमच्या 'आस्वाद घेण्याच्या पद्धतीत' फरक न करता आल्यामुळे तुम्ही अगदी उलट....

काही मजकूर संपादित.

---------------------------
हुश्श! आता बरे वाटले. या प्रतिसादाच्या निमित्ताने मी येथे माझ्या 'अनकंफर्ट झोन'बाहेर येवून माझी म्यान केलेली तलवार पुन्हा बाहेर काढू शकलो.

एक मुद्दा

>> लवचिक शरीराचा आपल्याला जगायला जितका फायदा होतो तितकाच लवचिक बुद्धीचा, विचारशक्तीचा होतो. >>
वरील मुद्द्याशी मी असहमत आहे
अतिसंवेदनशीलता हा शापच आहे.
बुद्धीमत्ता जर सरासरीपेक्षा थोडी जास्त असली तर त्रासच त्रास होतो कारण इतर लोक मठ्ठ् वाटतात. आपल्याला ज्या गोष्टींची आवड असते त्यात त्यांना गम्य नसते आणि त्यांच्या आवडी आपल्याला रुचत नाहीत. सहनजीवनात काही वेगळ्याच समस्या उभ्या रहातात. जसे जोडीदार अपेक्षा करतो की आपण् नंदीबैलासारखी प्रत्येक गोष्टीला मान डोलवावी आणि आपण वाद घालतो. आपल्याला व्यवसाय म्हणून एक क्षेत्र निवडायचे असते तर त्याला दुसरे आपल्या डोक्यावर थापायचे असते. आणि आपला शिरकाव दोन्हीकडे शक्य असतो म्हणजे परत कलहास कारण. वगैरे अनेक गोष्टी.
समाजातील दुटप्पीपणा आपल्याला खुपतो जो अन्य लोकांना खुपत नाही जसे कुंकू, मंगळसूत्र आदि फक्त विवाहीत स्त्रियांनी घालणे, विधवांना बंदी असणे वगैरे.
हम्म आता जर बुद्धीमत्ता सरासरीपेक्षा खूपच जास्त असेल तर व्यक्ती ह्या सर्व समस्या ओलांडून जाऊ शकत असेल. कल्पना नाही.

टीप - कंफर्ट झोनमधून बाहेर पडून लिहीलेले वक्तव्य तिरपे केले आहे. (आभार - प्रमोद सहस्त्रबुद्धे)

माफ करा

या धाग्यातील अटींचा आदर करणे मला शक्य नाही. हा प्रतिसाद त्या अटींना धरून लिहिलेला नाही.
कारणे:


इसापनीतीतील रूपककथेच्या तात्पर्याचे पालन करणे माझ्या व्यक्तिमत्वाला शक्य नाही, मी वाराच बरा.


मुळातच, निरपेक्ष (ऍब्सोल्यूट) असे काहीच विधान नसते, प्रत्येक विधानाला काहीतरी संदर्भ लागतातच. उदा., त्रिकोणाच्या कोनांची बेरीज १८०° असते हे विधानही काहीएक गृहितकांवरच आधारित आहे.
केवळ या धाग्यापुरते काहीतरी 'नवे करणे' शक्य नाही असे मला वाटते. स्वतःचे हात बांधून पोहोण्यात एक गंमत मिळू शकेल हे मान्य आहे. परंतु अनिर्बंध असे काहीच नसते. "विचारप्रक्रियेला अमुकएक मर्यादा घालूनच कल्पनाविलास करा" अशी अट सर्वच चर्चाप्रस्तावांमध्ये असते.

विचारच न करणे

प्रस्तुत लेखाशी मी असहमत आहे. विचार किंवा अविचार करणे ही मानवी मनाची सहज प्रवृत्ती आहे. त्याला फारशी बुद्धी लागत नाही किंवा वेळ. हाताने दुसरे काहीही काम चालू असले तरी मन वार्‍यावर धावतच रहाते. कम्फर्ट झोन मधले विचार असोत किंवा बाहेरचे ते करणे फारसे अवघड नाही.

माझ्या मताने विचार न करता काही काल तरी घालवता येणे हे बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी जास्त उपयोगी पडू शकेल. माझ्या या प्रतिसादाबद्दल ज्यांना अविश्वास वाटत असेल त्यांना मनात कोणताही विचार न येऊ देता फक्त 5 मिनिटे बसून दाखवावे. शुचि ताई म्हणतात की सह जीवनात जोडीदाराची अपेक्षा असते की आपण नंदीबैलासारखी मान डोलवावी. त्यांनी ते दिवसभर करून दाखवावे. कधीच जमणार नाही. विचार न करता काही काल घालवण्यानेच बौद्धिक सामर्थ्य वाढू शकते. विचार करून नाही.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

काही तरी भलतीच अपेक्षा!

आपण सर्व आपापली 'खिंड' लढवत असतो. म्हणूनच सर्व काही नीट चालले आहे, असे आपल्याला वाटत असते. आपण भलत्याच ठिकाणी जाऊन आपली मतं मांडू लागल्यास आपला 'मामा' होईल. परंतु राजेशघासकडबींना अपेक्षित असलेले, आपल्या मनाच्या विरोधातील विचारांची भलावण करायचे ठरविल्यास आपण आपल्याशीच प्रतारणा केल्यासारखे होईल. गंमत म्हणून तिरकसपणे लिहिणे वेगळे व अशा विचारांचा पाठिंबादर्शक लेख लिहिणे वेगळे. (यात मी किती आग्रहपूर्वक वाद घालून जिंकूही शकतो हा अहंभाव असतो.)

कदाचित तिरकस म्हणून खाली उल्लेख केलेले आयडी त्यांच्या समोर दिलेल्या विषयाबद्दल लिहितीलही. परंतु असे लिहिल्यामुळे ते सुंदर सूर्यप्रकाशात न्हाऊन निघतील की नाही याबद्दल मला शंका आहे.
(चुकीचे विषय दिलेले असल्यास मोठ्या मनाने माफ करावे. यात कुणालाही दुखवायचा उद्देश नाही!)

माझ्यापासून सुरुवात
प्रभाकर नानावटी - आध्यात्मिक अनुभूतीतूनच या देशाचे कल्याण
रिकामटेकडा - बाबा, बुवा, (गुरु)माँ... इत्यादींच्या सत्संग प्रवचनातूनच या जगाच्या समस्या सुटू शकतील किंवा इंटेलिजेंट डिझाइनमधूनच विश्वाची उत्पत्ती
शुची - बालाजी तांबे हा एक भंपक माणूस!
निनाद - दादा कोंडके यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके अवार्ड दिले पाहिजे
नरेंद्र गोळे - नियमित दोन वेळच्या मांसाहारातूनच सर्व व्याधींचे निवारण होईल
प्रियाली - हिंदू भारताचा इतिहास हा काळाकुट्ट इतिहास आहे!
चंद्रशेखर - न्यूयार्क शहरातील भारतीय प्राचीन शिल्पकला
प्रमोद सहस्रबुद्धे - भारतीय 'वास्तुशास्त्रा'त उल्लेख केल्याप्रमाणेच जगभरातील इमारती बांधायला हव्यात
नुस्तीच लुडबुड- आइन्स्टाइन व स्टीफन हॉकिंग यांच्या सिद्धांतातील बारीक सारीक चुका व त्या सिद्धांताची आता बदललेली व्याख्या
प्रकाश घाटपांडे - शरद उपाध्ये, जकातदार, भट इत्यादींच्या फलजोतिषीय सल्ल्यानुसार आर्थिक व सामाजिक नियोजन केल्यास या देशाची भरभराटी होईल
अजय भागवत - कुत्रा: एक अत्यंत हिंस्र पाळीव प्राणी
ऱणजित चितळे - समांतर अर्थव्यवस्था (Black Market) ही काळाची गरज
विशाल.तेलंग्रे - गण गण गणात बोते या मंत्राचे वैज्ञानिक (भौतिकीय, रासायनिक व जैविक) विश्लेषण

यादी वाढवता येईल. तुर्तास इतके पुरे!

अरेरे! ;-)

प्रियाली - हिंदू भारताचा इतिहास हा काळाकुट्ट इतिहास आहे!

हे वाक्य तसे बरोबर आहे. हिंदू भारताचा इतिहास जेथे काळाकुट्ट झाला आहे तेथे काळाकुट्ट आहे असेच म्हणेन पण वरील वाक्य म्हणण्याचे फारसे प्रयोजन नाही हेही खरे. मात्र याच्या उलट वाक्य माझी भरती सनातन धर्मीयांत करेल का काय? ;-)

चुकीचे विषय दिलेले असल्यास मोठ्या मनाने माफ करावे. यात कुणालाही दुखवायचा उद्देश नाही!

नानावटी माझे लेख वाचत नाहीत हे यावरून सिद्ध झाले त्यामुळे राग किंवा दुखावण्याचा प्रश्न नाही. :-)

प्रियाली - आमचे पूर्वज महान आहेत. असे वाक्य हवे होते.

असो.

मूळ चर्चाप्रस्ताव अर्थातच पटला नाही. विशेषतः १/३ अमेरिका बर्फाच्या वादळातून जात असता, दक्षिणेतील आपल्या उबदार गावात बसून इतरांना कोट काढून गेले दोन आठवडे दर्शन न देणार्‍या सूर्याचे किरण अंगावर घेण्याचे सल्ले देणे म्हणजे जरा अतिच झाले. - ह. घ्या.

अंमळ सुखावलो

राजेश, आपली सूर्य, वारा व कोट ही गोष्ट वाचून अंमळ सुखावलो. जयंत नारळीकरांनी लोकसत्तेत केलेल्या आमच्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.. प्रश्नोत्तरातुन सुसंवाद या पुस्तकाच्या परिक्षणात याचा उल्लेख केला आहे.
विहार आणि आसने यांचा खुप जवळचा संबंध आहे.तसेच पुजा अर्चा, ध्यान धारणा देखील विशिष्ट आसनांमधे केली तर उपयुक्त ठरते. शरीराचा व मनाचा ताठरपणा वा लवचिकपणा हा गुणधर्म तुमची प्रकृती ठरवतो. आता त्याला काही लोक विकृती म्हणतीलही. म्हणोत बापडे. काही लोक कोट चढवुन कंफर्ट झोन मधे जातात तर काहींचा कंफर्ट हा कोटाशिवाय असतो. असो
प्रकाश घाटपांडे

विचार जरासा भरकटू द्या

प्रस्ताव कैच्याकै! (तिरकसपणा तिरक्या ठशात लिहावा का?)
ठाशीव विचाराचा रोग आणि मला! काहीतरीच.

प्रभाकर नानावटींनी माझ्या नावे लिहिलेल्या मुद्याशी मी पूर्वीपासून सहमत आहे.
प्रत्येक इमारत ही वास्तुशास्त्राप्रमाणे बांधली पाहिजे. म्हणजे अमुकदिशेला अमुक वगैरे.
त्याचे काय आहे की आम्ही बांधलेल्या इमारती खूप टिकतात. (६० वर्षेतरी बघायला नको.) आता वास्तुशास्त्राने बांधायचे म्हटले की जुन्या त्या तोडाव्या लागतील आणि नवीन बांधाव्या लागतील. त्यांची रचनाही मोठी चातुर्यपूर्वक करायला लागणार. (म्हणजे प्रत्येक सदनिकेचे/कार्यालयाचे दार समजा पूर्वेला असणे श्रेयस्कर असेल तर सर्वांचे पूर्वेलाच ठेवायचे.) म्हणजे काय होणार आमच्या सारख्या अभियंतांची कामे वाढणार. एकंदरीत भरपूर फायदा.

देशाला मोठ्या प्रमाणात काम निर्माण करायची गरज आहे. बांधकाम व्यवसाय जवळपास १० टक्के लोकांना काम देत असे. आमच्या व्यवसायात वाढ म्हणजे देशभरातल्या रोजगारात भरपूर वाढ. किमान रोजगाराचा प्रश्न मिटणार. ज्याप्रमाणे पर्यावरण मंत्रालय आहे त्याप्रमाणे वास्तुशास्त्र मंत्रालय असायला हवे. त्याला कुठलीही इमारत तोडायचा पूर्ण अधिकार दिला पाहिजे. एवढेच नाहीतर जसे पर्यावरणात इमारतींना जसे ग्रेडिंग दिले जाते तसे इथेही ग्रेडिंग दिले पाहिजे. म्हणजे प्लॅटीनम ग्रेड मधे नुसतेच देशी वास्तुशास्त्र नाही तर चिनी (फेंगशुई) आणि उर्जामापन शास्त्र या तिन्हीची मान्यता असणे आवश्यक ठरायला हवे.

वास्तुशास्त्र हा विषय बहुतेकांनी न अभ्यासताच त्यावर टिका केली आहे. त्यात वारा कुठून येतो कुठे जातो याचा पूर्ण विचार आहे. सूर्य कुठून उगवतो आणी मावळतो त्यानुसार वास्तुवर काय परिणाम होतात हे सर्व आहे. एकदा तरी याची चव चाखावी. आपले घर पूर्ण पणे वास्तुशास्त्रानुसार करून घ्यावे. परिणाम तात्काळ ध्यानात येईल. असे करून तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतल्याखेरीज वास्तुशास्त्रावर टीका करू नये. महर्षींनी लिहिलेल्या विचारप्रवाहाला चाखल्याशिवाय त्याच्या चवीवर बोलणे म्हणजे शुद्ध भोंदूपणा. हा उपाय एकदा करा आयुष्यभर आठवण ठेवाल आणि दुसर्‍याप्रकारच्या घरात राहण्याचे धारिष्ट्य दाखवणार नाहीत.

प्रत्येकाने या विचार प्रवाहात सामिल होणे राष्ट्राच्या हितासाठी गरजेचे आहे. वास्तुशास्त्र विषयाचा अभ्यासकरून त्याप्रकारच्या घरात न राहणार्‍य लोकांना या विषयाचा परिचय करून दिला पाहिजे. म्हणजे त्यांनाही आपल्या उत्थानाचा मार्ग सापडेल. महिन्याभरातून निदान एका वास्तुचे निरिक्षण करून त्यातील वास्तुशास्त्र उणीवा त्यातील रहिवाशांना सांगायचा आपण उपक्रम करू या. हा उपक्रम करताना विहारही होईलच. म्हणजे तिकडे अधिक लक्ष द्यायची गरज नाही. विहारात वायुविजन का काय म्हणतात तसे न करता अगदी सावकाश अवलोकन करत जावे म्हणजे अधिकाधिक दोष सापडतील.

मग गड्यांनो पहिले पाऊल पुढे टाकणार ना?

(टीपः या लेखावर टीका करण्याचा अधिकार सीमित केला आहे. लेखावर निराधार आणि तर्कदुष्ट टीका केली तर प्रतिसाद दिला जाणार नाही. वर वैयक्तिक प्रतिसाद दिला म्हणून संपादकांकडे तक्रार होईल ती वेगळी.)

श्रेयअव्हेर : लेखातील माहिती तिरकसपणे वा उपरोधाने दिली नाही. या लेखात जे दिले आहे ते लेखकाचे फुल आणि फायनल मत आहे. यातील मुद्दे हे सत्य म्हणजे जे गरीबांचा छळ करीत नाही या व्याख्येवर आधारित आहेत. (बांधकाम क्षेत्रात फार गरिबी आहे.) यातील सर्व सल्ले सर्वांनी बिनदिक्कत पणे कुठलीही शहानिशा करता घ्यावेत. या सल्यांसाठी कुठलीही फी आकारली जाणार नाही.

प्रमोद

वैचारिक चपळपणा, लवचिकपणा हवा

(या चर्चेपुरतेही माझ्या मताच्या ठाम विरुद्ध मत या प्रतिसादात मांडलेले नाही, क्षमस्व. वरील चर्चाप्रस्ताव गांभीर्य आणि विरंगुळा यांच्या मिश्रणाने बनलेला आहे. विरंगुळ्यासाठीचा प्रतिसाद जमला तर नंतर देईन.)

वैचारिक चपळपणा आणि लवचिकपणा हवा. सहमत.
यासाठी व्यायाम करता यावा. सहमत.

परंतु, त्यासाठी "आपले समाधान झाले आहे त्या मताच्या विरुद्ध आपले मत आहे" हा व्यायाम जसाच्यातसा ठीक वाटत नाही.
"आपले समाधान झाले आहे त्या मताच्या विरुद्ध आपले मत आहे" हे तर शुद्ध खोटे बोलणे होय.

मात्र यात थोडाच फरक करून खोटेपणा काढून टाकून व्यायाम सुचवता येतो.
"माझ्याशी असहमत असलेल्यांचा युक्तिवाद अमुक प्रकारचा आहे..." अशी सुरुवात करून लेखन करावे. आणि त्या विरोधी युक्तिवादातले सर्वात ठोस मुद्दे सांगावेत. त्या विरुद्ध मतप्रवाहात असलेल्या क्षुल्लक चुका (टंकनदोष, अनावश्यक विधाने) बाजूला सारून कुठले ठोस मुद्दे उरतात, त्यांचे प्रतिपादन करावे. हे अशा प्रकारे करावे, की त्या मतपरंपरेतील लोक त्या मतांबद्दल दृढ का असावेत, याबद्दल वाचकांना काही अंतर्दृष्टी मिळावी.

संस्कृतातील वादविवादात्मक ग्रंथांत अशा प्रकारचे परिच्छेद "केचित्तु..." अशा प्रकारे पुष्कळदा लिहिलेले आढळतात. ("केचित्तु"चा भावानुवाद "पण कोणी लोक असेही म्हणतात की...")

मग जमल्यास त्या (त्यातल्यात्यात) ठोस मुद्द्यांचा प्रतिवाद करून आपले वेगळे मत का आहे, त्याचे स्पष्टीकरण वाचकाला पटवावे.

उदाहरणार्थ, शंकराचार्यांनी केलेल्या वैशेषिक-अणुवादाच्या खंडनाबद्दल मला असे वाटते :

सुरुवातीला शंकराचार्य थोडक्यात कणादांचे मत थोडेफार पटेल अशा पद्धतीने देतात, आणि मगच त्याचे खंडन करतात. दुसर्‍याचे म्हणणे निरर्थक आहे, अशा रीतीने चर्चा सुरू करत नाहीत. (तसा शेवट करतात ते महत्त्वाचे नाही, कारण त्यांच्या मते त्यांनी उत्तम वाद मांडला आहे, पूर्ण खंडन झाले आहे.) दुसर्‍याचे म्हणणे जवळजवळ पटेल असे सुरुवातीला मांडण्याची ही स्तुत्य पद्धत अंगीकारली तर आजचेही अनेक वादविवाद अधिक प्रगतिशील होऊ शकतील.

टोपी

सहा वैचारिक टोप्यांप्रमाणे हि श्री राजेशघासकडवी ह्यांची हि एक टोपी आहे (काळी असावी), टोपी उत्तम आहे, सगळ्यांना ती टोपी घालता देखील येईल पण बहुदा आपल्या सद्य आयडी -रुपात टोपी घालण्याचे धारिष्ट्य कोणी करू जाईल असे मला वाटत नाही.

स्वतः श्री राजेशघासकडवी ह्यांनी त्याप्रकारचे उदाहरण सादर केलेले नाही, त्यामुळे आपल्या नेहमीच्या मताविरुद्ध मत म्हणजे काय हा संदर्भ व्यक्ती-सापेक्ष होतो म्हणूनच कोणी गमतीशीर/उपरोधिक/गंभीर प्रतिसाद दिले आहेत.

देव/धर्म/शाकाहार/सावरकर/हिंदू/गांधी/ब्राह्मण/पेशवे असे काही मुद्दे आपण नमुना दाखल दिले असते तर खरी पारख झाली असती, आपण मांडलेल्या विषयावर उलट/सुलट मत देणे कठीण आहे हो उपक्रमींना. बाकी सर्व विषयांवर त्यांचे एकमत असते, काही उपरे सोडल्यास.

बाकी मी देखील त्यातलाच एक, कोट टोपी आहेच, तुमची टोपी नको मला.

जाने भी दो यारो

मला एकदम जाने भी दो यारो चित्रपटातील शेवटच्या भागाची आठवण झाली... :-)

सुसंगत प्रतिसाद

अरे हे तर आहेच की :
हस्तलिखित साखळीपत्रांतील लिपी आणि आकड्यांची कूट-नोंद
तरी त्या धाग्यातील पुढील प्रतिसादात विरोधी नव्हे तर माझे ठाम असलेले मतच मांडलेले आहे (दुवा).

दुवा

आमचे पूर्वज महान होतेचा दुवा द्यायला विसरलेच की.

कंफर्ट् झोन

या धाग्याच्या निमित्ताने सुचलेले काही विचार. धागाकर्त्याला हेच अभिप्रेत होते की नाही; कल्पना नाही.

वाचनाच्या संदर्भात बोलायचे तर बर्‍याचदा दुसर्‍या भाषांमधले साहित्य वाचताना, आपल्या परिचित अशा वैचारिक व्यूहाबाहेरचे वाचन करताना कंफर्ट् झोन मधून बाहेर पडावे लागण्याचा अनुभव येतो. अनेक पुस्तके वाचण्याकडे आपला मूळ कल नसतानाही "हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे" या भूमिकेपोटी वाचन होते.

बाकी चर्चा-वाद-विवादाच्या संदर्भातल्या कंफर्ट् झोनबद्दल बोलताना मराठी आंतरजालीय संदर्भ लोकांनी दिलेले आहेतच. अमुक चर्चांना येथे अमुक ठिकाणी सपोर्ट् मिळतोच; तिकडे त्याच्या विरुद्ध मतप्रदर्शन करणे हे कंफर्ट् झोनच्या बाहेर पडण्यासारखेच.

अडचण

तिकडे त्याच्या विरुद्ध मतप्रदर्शन करणे हे कंफर्ट् झोनच्या बाहेर पडण्यासारखेच.

'तिकडचे' मालक हाकलून देतात.

मी नेहमीच करतो

>>अमुक चर्चांना येथे अमुक ठिकाणी सपोर्ट् मिळतोच; तिकडे त्याच्या विरुद्ध मतप्रदर्शन करणे हे कंफर्ट् झोनच्या बाहेर पडण्यासारखेच.

मी नेहमीच करतो हे.

अवांतरः मालक हाकलून देतातच असे नाही. (किंवा मालकच हाकलून देतात असे नाही).

नितिन थत्ते

+१

अवांतरः मालक हाकलून देतातच असे नाही. (किंवा मालकच हाकलून देतात असे नाही).

हेहेहे...अगदी मुद्द्याचे बोललात.

-१

तिकडे त्याच्या विरुद्ध मतप्रदर्शन करणे हे कंफर्ट् झोनच्या बाहेर पडण्यासारखेच.

»

काहीही अवघड नाही. आम्ही रोज गाढवांसमोर गीता वाचायचो, समोरचा गोंधळ पाहून मजाच यायची.

बेंडिंग ओव्हर बॅकवर्ड्स

सर्वांनी हा चर्चाप्रस्ताव खूपच ह. घेतला हे पाहून माझ्या काळजाला घरं पडली. अर्थात थोडासा ह. घ्यावा अशी अपेक्षा होतीच. पण इथे बहुतेक सर्व जण आपल्या कोटांची बटणं घट्ट आहेत ना याची खात्री करण्यापुरतंच हलकेच त्यांवरून हात फिरवताना दिसले. याउलट एखादं बटण उघडण्याचा हलकेपणा कोणी केला असता तर अधिक आवडलं असतं. कदाचित दोष लेखाच्या मांडणीत असेल. धनंजय म्हणतात

"आपले समाधान झाले आहे त्या मताच्या विरुद्ध आपले मत आहे" हे तर शुद्ध खोटे बोलणे होय.

मला वाटतं विरुद्ध हा थोडा संदिग्ध शब्द आहे. उदाहरणच द्यायचं तर आपल्या शरीराचं घेऊ. आपला हात कोपरात वाकतो. तो उलटा वाकवायला गेलो तर प्रचंड वेदना होतील. मला त्या अर्थाने विरुद्ध म्हणायचं नव्हतं. आपली पाठ नैसर्गिकरीत्या पुढे वाकते. तशीच थोडे कष्ट करून मागेही वाकते. सतत पुढे वाकत राहिलं तर पोक येऊ शकतं. म्हणून व्यायामापुरती ती कधी कधी मागे वाकवणं चांगलं. या अर्थाने मी 'विरुद्ध' हा शब्द वापरला होता. शरीराप्रमाणेच बुद्धीसाठी, विचारांसाठी असं बेंडिंग ओव्हर बॅकवर्ड्स करणं बरं असतं.

नानावटींनी काही सदस्यांसाठी सूचना दिल्या आहेत. मला त्या अनुषंगाने प्रतिक्रिया अपेक्षित होत्या.

स्वतः श्री राजेशघासकडवी ह्यांनी त्याप्रकारचे उदाहरण सादर केलेले नाही, त्यामुळे आपल्या नेहमीच्या मताविरुद्ध मत म्हणजे काय हा संदर्भ व्यक्ती-सापेक्ष होतो म्हणूनच कोणी गमतीशीर/उपरोधिक/गंभीर प्रतिसाद दिले आहेत.

हा आक्षेपही बरोबर आहे. मी प्रयत्न करतो.

"सत्य म्हणजे काय याचा मक्ता विज्ञानवाद्यांनी घेतल्याप्रमाणे ते वागत असतात. प्रयोगांती जे सिद्ध होईल तेच म्हणे सत्य. पण प्रयोगांती म्हणजे काय, किंवा सिद्ध म्हणजे काय याच्या व्याख्या जणू स्वयंसिद्धच आहेत असा त्यांचा आव असतो. काल सूर्य पूर्वेला उगवला, आज सूर्य पूर्वेला उगवला म्हणून तो उद्याही पूर्वेलाच उगवेल ही यांची इंडक्टिव्ह विचारसरणी. आता याच विचारपद्धतीचा एका बकऱ्याच्या दृष्टीकोनातून विचार करू. एखादा बकरा म्हणेल, 'वा, ही मनुष्यजात किती चांगली आहे. मला त्यांनी काल खायला घातलं. आज खायला घातलं. मला खात्री आहे उद्याही खायला घालतील. खाऊन खाऊन मी चांगला पुष्ट होतो आहे. मनुष्यजात चांगली आहे.' आणि त्याची ही निरीक्षणं व त्यावरून काढलेले निष्कर्ष ३६४ दिवस लागू होतील. पण कधीतरी ईदेचा चांद उगवेल आणि खाटकाची सुरी फिरेल गळ्यावरून तेव्हा टांगलेल्या अवस्थेत त्याचे निष्कर्षं, विचारपद्धती थेंबाथेंबाने हलाल पद्धतीने गळून जातीलच नाही का?"

यनावाला, रिकामटेकडा वगैरेंनी यात भर घालावी, आरागॉर्न वगैरेंनी ती मतं खोडून काढावी, प्रियालींनी 'मांसाहाराचे तोटे' या विषयावर लिहावं... वगैरे माझी अपेक्षा आहे.

बघा जमलं तर.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

?

मला वाटतं विरुद्ध हा थोडा संदिग्ध शब्द आहे. उदाहरणच द्यायचं तर आपल्या शरीराचं घेऊ. आपला हात कोपरात वाकतो. तो उलटा वाकवायला गेलो तर प्रचंड वेदना होतील. मला त्या अर्थाने विरुद्ध म्हणायचं नव्हतं. आपली पाठ नैसर्गिकरीत्या पुढे वाकते. तशीच थोडे कष्ट करून मागेही वाकते. सतत पुढे वाकत राहिलं तर पोक येऊ शकतं. म्हणून व्यायामापुरती ती कधी कधी मागे वाकवणं चांगलं. या अर्थाने मी 'विरुद्ध' हा शब्द वापरला होता. शरीराप्रमाणेच बुद्धीसाठी, विचारांसाठी असं बेंडिंग ओव्हर बॅकवर्ड्स करणं बरं असतं.

व्हॉट इफ अशा प्रकारचे अनेक कल्पनाविलास केले जातात. परंतु, कोणत्या मर्यादेत कल्पनाविलास करणे अपेक्षित आहे ते सांगणार्‍या नियमांची चौकट नसेल तर व्यायामाचा मॅसोकिजम होईल.

लवचिकता

परंतु, कोणत्या मर्यादेत कल्पनाविलास करणे अपेक्षित आहे ते सांगणार्‍या नियमांची चौकट नसेल तर व्यायामाचा मॅसोकिजम होईल.

आपल्या मर्यादा आपण ठरवाव्यात. पण काही मर्यादा सवयीने स्वतःला घालून घेतलेल्या असतात. त्या मोडताना खरं तर दुखापतीचा प्रश्न येऊ नये. पाठीचं उदाहरण दिलेलंच आहे. 'आपली पाठ इतकी कमी लवचिक आहे का की जर मागे झुकण्याचा प्रयत्न केल्यास अनन्वित वेदना होतील?' या प्रश्नाचं उत्तर हो असं असेल तर त्या पाठीत दोष आहे असं मला वाटेल. लवचिकता म्हणजे रबराचं शरीर नव्हे, तर योग्य प्रमाणात हालचाली करण्याची क्षमता. पुन्हा 'योग्य' म्हणजे काय यावर वाद घालता येईलच - पण तो वाद पाठ मागे वाकवणं टाळण्यासाठी होतो आहे का, हे प्रत्येकाने आपलं आपणच ठरवावं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हा व्याप कशाला?

आम्ही कुठलेही मत हे दोन्ही* बाजुचा विचार करुनच देतो पण मग उगाचच* सर्वंकश विचार करुन* त्यागलेल्या मताबद्दल लिहुन आमचा मुल्यवान* वेळ वाया* का घालावा? आमच्या मते चुकीच्या विचाराचा आम्ही आदर करतोच* पण म्हणजे ते मत, व्यायाम म्हणुन का असेना, आम्ही मांडायला कशाला हवे?

*खरंच?

बाकी आम्ही जर कथेतील् वारा असतो, तर सोसाट्याने माणसाला गार केले असते, बेट्याने कोटाच्या खिशात हात घालुन कोट घट्ट आवळला असता. ;-) (वार्‍याने पार हाल् केलेत सद्ध्या ;-) )

-Nile

मांसाहाराचे तोटे

प्रियालींनी 'मांसाहाराचे तोटे' या विषयावर लिहावं... वगैरे माझी अपेक्षा आहे.

वा! घासकडवींच्या शब्दांतील "कळकळ" पाहून ड्वाळे पाणावले. ;-) त्यांचा अपेक्षाभंग नको या कारणास्तव विचाराला वेळ देऊन खालील प्रतिसाद टंकत आहे.

मांसाहाराचे तोटे विशद करून सांगेल तर एखादा अट्टल मांसाहारीच. आता मला अट्टल मांसाहारी म्हणावे का या शब्दाचे उत्तर नाही असे येईल पण मांसाहाराचे तोटे सांगता येतीलच. ते खालीलप्रमाणे -

१. मी स्वतः चिकन, मासे आणि अंडी सोडून इतर मांसाहार चाखत नाही. पोर्क, बीफ, वगैरे अशा अनेक मांसाहाराचा आस्वाद मी घेत नाही. खाण्यातील दर्दी जेव्हा विशिष्ट मांसाहाराची चव बघणे नाकारतात तेव्हा तो त्या त्या मांसाहाराचा तोटा समजावा.

२. अमेरिकेत आल्यावर मला सॅलड खाण्याची सवय लागली. तुम्ही वेंडीजचे नवे ऍपल-पिकान सॅलड खाल्ले आहे का? ते खाल्ले नसल्या फजो़लीजचे क्रॅनबेरी-वॉलनट सॅलड खाऊन बघा. आहाहा! क्रिस्प लेट्युस, त्यात ड्रायफ्रूट्स, फळे, सोबत पोमोग्रेनेट नाहीतर रास्पबेरी ड्रेसिंग वगैरे प्रकारांमुळे चिकनचे तुकडे असले काय आणि नसले काय जाम फरक पडत नाही. म्हणजे चिकन असून चिकनला फारसे महत्त्व न मिळणे हा चिकनचा तोटा झाला. :-(

३. तर आपण सॅलडबद्दल बोलत होतो. सॅलड हे चिकन, बेकन फारतर ट्यूनाचे असते असा माझा गैरसमज होता जो एका सीफूड रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर संपला. मॅकॉर्मिक अँड श्मिकमध्ये मी खालचे "क्रॅब टॉवर" सॅलड खाल्ले आणि त्याचक्षणी जगातील सर्व चिकनसॅलडचा तोटा झाला.

Thanks to McCormick & Schmicks

४. पौर्वात्य देशांत मांसाहाराला करी किंवा ग्रेवीमध्ये टाकले जाते. मसाल्यांनीयुक्त या ग्रेवी इतक्या चविष्ट असतात की मांसाहाराकडे चक्क दुर्लक्ष व्हावे. आहाहा! थाय रेस्टॉरंटची ग्रीनकरी आठवली, साउथ इंडियन रेस्टॉरंटातील चिकन चेट्टीनाड आणि घरातले आईच्या हातचे बोंबलाचे आंबटतिखट. झक मारतो मांसाहार या करींपुढे.

असो.

+

मांसाहाराचे तोटे यावरचा श्लेष आवडला.

नितिन थत्ते

क्रॅब टॉवर

क्रॅब टॉवर पाहिल्याने आता बर्‍याच बाकी मांसाहाराचा तोटा होणार आहे.

थाई रेडकरी खाल्याने पिझ्झा, सब वगैरेंचा पत्ता कट झाला.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

क्रॅब टॉवर

मी नेहमीप्रमाणे माझा प्रतिसाद संपादित करत होते आणि तेवढ्यात थत्त्यांच्या उपप्रतिसाद आल्याने ते राहून गेले. त्यामुळे इथे देते -

क्रॅब टॉवरमध्ये ब्लू क्रॅब, आंबा आणि ऍवॅकॅडो यांचे थर असतात. त्यावर कोलंबी दिसते आहेच. सोबत संत्र्याचे ड्रेसिंग असते. हा प्रकार इतका चविष्ट आणि नेत्रसुखद (विविध रंगांमुळे) की गेल्यावेळी मी काही सहकार्‍यांबरोबर तिथे गेले होते आणि हे मागवले तेव्हा अक्षरशः इतरांचे डोळे त्यावर खिळले होते आणि वर मला एकदोघांनी सुनावले की "तुला जर हा पदार्थ माहित होता तर आधीच आम्हाला नाही का सांगायचे, आम्हीही मागवला असता." हा झाला त्या क्रॅब सॅलडचा तोटा. अन्यथा त्याला आणखी गिर्‍हाईके मिळाली असती. ;-)

असो. पण कधीतरी खाण्यास चांगला आहे. रेस्टॉरंट महागडे आहे आणि पोर्शन खूप लहान असतो. ४-५ घासांत संपणार्‍या या सॅलडला पंधरा डॉ. मोजावे लागतात आणि पोटात कुठे गडप होते त्याचा अंदाजही येत नाही. :-(

एक नंबर प्रतिसाद

एक नंबर प्रतिसाद. :) बहुदा श्री घासकडवी ह्यांच्या लेखाप्रमाणे तंतोतंत वैचारिक व्यायाम करणाऱ्या त्या आपणच :) असेही लेखन उपक्रमवर करण्यास हरकत नाही. उत्तम :)

डिस्क्लेमर - वरील विधान उपरोधिक नाही.

वैचारिक नृत्य

वा. मांसाहाराचे तोटे इतक्या रसभरितपणे सांगणाऱ्या या लेखनाला वैचारिक नृत्य म्हणावे का अशा संभ्रमात पडलो आहे. चालेल, कुठून का होईना व्यायाम झाल्याशी कारण.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

 
^ वर