मराठीतील क्रियापद रूपे - एक संदर्भतक्ता
ज्या सहजतेने आपण मराठीभाषक मराठी भाषा बोलतो-लिहितो, ते बघता पुढील तक्त्यातला कुठलाही तपशील उपक्रमावरील वाचकांना नवीन आणि आश्चर्यकारक वाटणार नाही. तरीसुद्धा असे वाटते, की धातूंची इतकी वेगवेगळी रूपे (क्रियापद-रूपे) आपण इतक्या बारीक अर्थछटांसह लीलया वापरतो, त्यांची ही यादी एका ठिकाणी ग्रथित झालेली आपणांपैकी कितीतरी लोकांनी बघितलेली नसेल. यातील शब्दरूपे यादी वाचण्यापूर्वीच आपण वापरतो, म्हणजे खरे तर बोलण्या-लिहिण्यासाठी या तक्त्याचा उपयोग नाही. तरी एखाद्या परिस्थितीत हा तक्ता संदर्भ म्हणून उपयोगात येऊ शकेल.
यातील रूपे तीन संदर्भग्रंथांवरून घेतलेली आहेत :
१. Language in a Semiotic Perspective: the Architecture of a Marathi Sentence. लेखक - अशोक रा. केळकर; प्रकाशक - शुभदा सारस्वत प्रकाशन, पुणे; प्रकाशनवर्ष - १९९७
२. मराठी व्याकरणाचा अभ्यास. लेखक - प्रकाश परब; प्रकाशक - ओरिएंट लाँगमॅन, हैदराबाद; प्रकाशनवर्ष - २००२
३. Marathi. लेखक - रमेश धोंगडे आणि काशी वली; जॉन बेंजामिन्स पब्लिशिंग कंपनी, ऍम्स्टरडॅम; प्रकाशनवर्ष - २००९
(अ) पैकी केळकर आणि परब यांनी मराठी किंवा संस्कृत पारिभाषिक शब्द (संज्ञा) दिलेल्या आहेत, धोंगडे-वली यांच्या पुस्तकातील संज्ञा इंग्रजीमधील आहेत. त्यांचे मराठी भाषांतर अन्य दोन पुस्तकांशी जुळवून केलेले आहे.
(आ) तक्त्यात जी "कृदंते" म्हणजे धातूपासून उत्पन्न झालेली नामे/विशेषणे/क्रियाविशेषणे दिलेली आहेत, ती सरसकट कुठल्याही धातूची होतात. जी रूपे काही धातूंनाच होतात, पण सर्व धातूंना होत नाहीत ती रूपे तक्त्यात नाहीत (उदाहरणार्थ : जपणे -> जपणूक; पण त्या धर्तीवर बोलणे->? असे रूप प्रचलित नाही. म्हणून "-णूक" हे रूप तक्त्यात दिलेले नाही.)
(इ) मराठीत कित्येक शब्दरूपांत क्रियापद आणि वाक्यातले अन्य पद यांच्यात "अन्वय" असतो. म्हणजे त्या अन्य पदाशी लिंग (स्त्री-पुं-नपुंसकलिंग), वचन (एक-अनेकवचन), पुरुष (बोलणारा, संबोधित किंवा अन्य) क्रियापद जुळते. याचे वेगवेगळे प्रकार दाखवण्यासाठी पाच वेगवेगळ्या धातूंची उदाहरणे दिलेली आहेत. अन्वय कुठल्या पदाशी होतो, ते दाखवण्यासाठी उदाहरणांतल्या वाक्यात जमल्यास वेगळ्या किंग-वचनाची वेगवेगळी पदे घेतलेली आहेत :
१. कोळी-किडे-असणे
२. बाई-बोलणे
३. वाघीण-मांस-खाणे / वाघीण-माणूस-खाणे (येथे अचेतन-किंवा-जनावर, किंवा सचेतन-किंवा-मनुष्य यांत फरक दिसतो)
४. राणी-लाडू-रुचणे
५. मुलगा-मुली-पुस्तके-वाटणे
(ई) यात शिवाय अर्थाच्या दृष्टीने तीन मिती आहेत :
काल (Tense): भूत/वर्तमान/भविष्य
क्रिया-व्याप्ती (Aspect) : सामान्य/रीती/अपूर्ण/पूर्ण/प्रपूर्ण/सामान्य/घटिष्य
अभिवृत्ती (Mood) : तथ्यनिवेदन, संभवनीयता, शक्य-संकेत (=शक्यता असलेले "जर-तर"), क्रियातिपत्ती (न झालेल्या अटीबाबत जर-तर); विध्यर्थ, आज्ञार्थ
(उ) "#" चिह्नाने अप्रचलित रुपे तक्त्यात दिली आहेत. एखाद्या वाक्प्रचारात हे रूप प्रचलित असेलही, पण सध्या मराठी भाषक स्वतःहून असे रूप क्वचित वापरतात. बहुतेक अप्रचलित रूपांची उदाहरणवाक्ये तक्त्यात दिलेली नाहीत.
असणे | बोलणे | खाणे | रुचणे | वाटणे | अन्य पदांत स्थान | काल | क्रियाव्याप्ती | अभिवृत्ती |
कोळी किडे आहेत. | बाई बोलते. | वाघीण मांसाचा-तुकडा खाते. वाघीण माणसाला खाते. | राणीला लाडू रुचतो. | मुलगे मुलींना पुस्तके वाटतात. | क्रियाबीज, लिं-व-पु-भेद | वर्तमान | सामान्य | तथ्यनिवेदन |
कोळी किडे असतात. | बाई बोलते. | वाघीण मांसाचा-तुकडा खाते. वाघीण माणसाला खाते. | राणीला लाडू रुचतो. | मुलगे मुलींना पुस्तके वाटतात. | क्रियाबीज, लिं-व-पु-भेद | वर्तमान | रीती (फरक फक्त "असणे"बाबत) | तथ्यनिवेदन |
कोळी किडे होते. | बाई बोलली. | वाघिणीने मांसाचा-तुकडा खाल्ला. वाघीणीने माणसाला खाल्ले. | राणीला लाडू रुचला. | मुलग्यांनी मुलींना पुस्तके वाटली. | क्रियाबीज, लिं-व-पु-भेद | भूत | सामान्य | तथ्यनिवेदन |
कोळी किडे असत. | बाई बोले. | वाघीण मांसाचा-तुकडा खाई. वाघीण माणसाला खाई. | राणीला लाडू रुचे. | मुलगे मुलींना पुस्तके वाटत. | क्रियाबीज, व-पु-भेद | भूत | रीती | तथ्यनिवेदन |
(जर) कोळी किडे असले, (तर त्यांना दोनापेक्षा अधिक पाय आहेत). | (जर) बाई बोलली, (तर तिचे ऐकूया). | (जर) वाघिणीने मांसाचा-तुकडा खाल्ला, (तर ती पुष्ट होईल). (जर) वाघिणीने माणसाला खाल्ले, (तर ती खतरनाक आहे). | (जर) राणीला लाडू रुचला, (तर ती दुसरा खाईल). | (जर) मुलग्यांनी मुलींना पुस्तके वाटली, (तर मुलींना धडे वाचता येतील). | क्रियाबीज, लिं-व-पु-भेद | कुठलाही काळ, बहुधा भविष्यकालिक | . | शक्य-संकेत |
(जर) कोळी सस्तन असते, (तर ते दुभते असते). | (जर) बाई बोलती#, (तर आम्ही तिचे ऐकते#). प्रचलित रूप : जर बाई बोलली असती, तर आम्ही तिचे ऐकले असते. | (जर) वाघिण मांसाचा-तुकडा खाती#, (तर ती पुष्ट होती#). (जर) वाघिण माणसाला खाती#, (तर ती खतरनाक असती). | (जर) राणीला लाडू रुचता#, (तर ती दुसरा खाती#). | (जर) मुलगे मुलींना पुस्तके वाटते#, (तर मुलींना धडे वाचता येते#). | क्रियाबीज, लिं-व-पु-भेद | कुठलाही काळ, पण अट पूर्ण झालीच नाही, हा संकेत असल्यामुळे बहुधा भूतकालिक | . | क्रियातिपत्ती |
कोळी किडे असतील. | बाई बोलेल. | वाघीण मांसाचा-तुकडा खाईल. वाघीण माणसाला खाईल. | राणीला लाडू रुचेल. | मुलगे मुलींना पुस्तके वाटतील. | क्रियाबीज, व-पु-भेद | भविष्य | सर्व क्रियाव्याप्तिभेदांत वापर | तथ्यनिवेदन |
(बहुधा) कोळी किडे असावेत. | (बहुधा) बाई बोलावी. | (बहुधा) वाघिणीने मांसाचा-तुकडा खावा. (बहुधा) वाघिणीने माणसाला खावे. | (बहुधा) राणीला लाडू रुचावा. | (बहुधा) मुलग्यांनी मुलींना पुस्तके वाटावीत. | क्रियाबीज, लिं-व-पु-भेद | सर्व कालभेदांत वापर | सर्व क्रियाव्याप्तिभेदांत वापर | संभवनीयता |
कोळ्यांनी किडे असावे. | बाईने बोलावे. | वाघिणीने मांसाच्या-तुकड्याला खावे. वाघीणीने माणसाला खावे. | राणीला लाडू रुचावा. (हे वरच्याप्रमाणेच, पण) राणीला राजाने रुचावे. (सचेतनाचे वेगळे रूप आहे, ही नोंद घ्यावी.) | मुलग्यांनी मुलींना पुस्तके वाटवीत. (हे वरच्याप्रमाणेच.) | क्रियाबीज, क्वचित लिं-व-पु-भेद, नाहीतर कुठल्याच पदाशी अन्वय नसलेला नपुंसक-एकवचनी "भावे" प्रयोग | सर्व कालभेदांत वापर | सर्व क्रियाव्याप्तिभेदांत वापर | विध्यर्थ - इच्छार्थक, वगैरे अनेक अर्थ. हे रूप वरील ओळीतील रूपापेक्षा वेगळे आहे, की फक्त वापर-अर्थ वेगळा आहे, याबाबत मतमतांतरे आहेत. |
कोळी किडे असोत. | बाई बोलो. | वाघीण मांसाचा-तुकडा खावो. वाघीण माणसाला खावो. | राणीला लाडू रुचो. | मुलगे मुलींना पुस्तके वाटोत. | क्रियाबीज, व-पु-भेद | सर्व कालभेदांत वापर पण भविष्याशी अधिक संबंध | सर्व क्रियाव्याप्तिभेदांत वापर | आज्ञार्थक. "मी बोलू? आम्ही बोलू/आपण बोलू(या)" असे प्रथमपुरुषात प्रश्नार्थक किंवा निश्चयदर्शक, "तू बोल/तुम्ही बोला" असे द्वितीय पुरुषात आज्ञार्थक, "तो बोलो/ते बोलोत" असे तृतीय पुरुषात आशीर्वादार्थक |
कोळी किडे असायचे. | बाई बोलायची. | वाघीण मांसाचा-तुकडा खायची. वाघीण माणसाला खायची. | राणीला लाडू रुचायचा. | मुलगे मुलींना पुस्तके वाटायचे. | क्रियाबीज, लिं-व-पु-भेद | भूत | रीती-स्मृतिवाचक | तथ्यनिवेदन |
कोळ्यांनी किडे असायचे. | बाईने बोलायचे. | वाघीणीने मांसाचा-तुकडा खायचा. वाघीण माणसाला खायचे. | राणीला लाडू रुचायचा. (हे वरीलप्रमाणेच.) | मुलग्यांनी मुलींना पुस्तके वाटायची. | क्रियाबीज, लिं-व-भेद | सर्व कालभेदांत वापर पण भविष्याशी अधिक संबंध | सर्व क्रियाव्याप्तिभेदांत वापर | विध्यर्थ - इच्छार्थक, वगैरे अनेक अर्थ. हे रूप वरील ओळीतील रूपापेक्षा वेगळे आहे, की फक्त वापर-अर्थ वेगळा आहे, याबाबत मतमतांतरे आहेत. |
कोळी भित्रे असत-(आहेत/होते/असतील). | बाई बोलते/बोलत-(आहे/होती/असेल). | वाघीण मांसाचा-तुकडा खाते/खात-(आहे/होती/असेल). वाघीण माणसाला खाते/खात-(आहे/होती/असेल). | राणीला लाडू रुचतो/रुचत-(आहे/होता/असेल). | मुलगे मुलींना पुस्तके वाटत-(आहेत/होते/असतील)आहेत. | साहाय्यक क्रियेसह क्रियाबीज, लिं-व-पु-भेद, किंवा कुठलाच भेद नाही | साहाय्यक क्रियेचा काल | अपूर्ण | तथ्यनिवेदन |
कोळी भित्रे असले-(आहेत/होते/असतील). (या वापराची उदाहरणे कमीच.) | बाई बोलली-(आहे/होती/असेल). | वाघिणीने मांसाचा-तुकडा खाल्ला-(आहे/होता/असेल). वाघिणीने माणसाला खाल्ले-(आहे/होते/असेल). | राणीला लाडू रुचला-(आहे/होता/असेल). | मुलग्यांनी मुलींना पुस्तके वाटली-(आहेत/होती/असतील)आहेत. | साहाय्यक क्रियेसह क्रियाबीज, लिं-व-पु-भेद | साहाय्यक क्रियेचा काल | पूर्ण | तथ्यनिवेदन |
कोळी भित्रे असलेले-(आहेत/होते/असतील). (या वापराची उदाहरणे कमीच.) | बाई बोललेली-(आहे/होती/असेल). | वाघिणीने मांसाचा-तुकडा खालेल्ला-(आहे/होता/असेल). वाघिणीने माणसाला खाल्लेले-(आहे/होते/असेल). | राणीला लाडू रुचलेला-(आहे/होता/असेल). | मुलग्यांनी मुलींना पुस्तके वाटलेली-(आहेत/होती/असतील)आहेत. | साहाय्यक क्रियेसह क्रियाबीज, लिं-व-पु-भेद | साहाय्यक क्रियेचा काल | प्रपूर्ण | तथ्यनिवेदन |
कोळी किडे असणार-(आहेत/होते/असतील). | बाई बोलणार-(आहे/होती/असेल). | वाघीण मांसाचा-तुकडा खाणार-(आहे/होती/असेल). वाघीण माणसाला खाणार-(आहे/होती/असेल). | राणीला लाडू रुचणार-(आहे/होता/असेल). | मुलगे मुलींना पुस्तके वाटणार-(आहेत/होते/असतील)आहेत. | साहाय्यक क्रियेसह क्रियाबीज, लिं-व-पु-पैकी भेद असला तर साहाय्यक क्रियेलाच | साहाय्यक क्रियेचा काल | घटिष्य - घडू जाणारे | तथ्यनिवेदन |
(बहुधा) कोळ्यांना शूर असायचे-(आहे/होते/असेल). | (बहुधा) बाई बोलायची-(आहे/होती/असेल). | (बहुधा) वाघीण मांसाचा-तुकडा खायची-(आहे/होती/असेल). वाघीण माणसाला खायची-(आहे/होती/असेल). | (बहुधा) राणीला लाडू रुचायचा-(आहे/होता/असेल). | (बहुधा) मुलगे मुलींना पुस्तके वाटायचे-(आहे/होते/असतील). | साहाय्यक क्रियेसह क्रियाबीज, लिं-व-पु-भेद | साहाय्यक क्रियेचा काळ | साहाय्यक क्रियेप्रमाणे | संभवनीयता |
कोळ्यांना शूर असायचे-(आहे/होते/असेल). | बाईला बोलायचे-(आहे/होते/असेल). | वाघिणीला मांसाचा-तुकडा खायचा-(आहे/होता/असेल). वाघिणीला माणसाला खायचे-(आहे/होते/असेल). | राणीला लाडू रुचायचा-(आहे/होता/असेल). (हे वरीलप्रमाणेच.) | मुलग्यांनी मुलींना पुस्तके वाटायची-(आहेत/होती/असतील). | साहाय्यक क्रियेसह क्रियाबीज, लिं-व-पु-भेद | साहाय्यक क्रियेचा काळ | साहाय्यक क्रियेप्रमाणे | इच्छार्थक. हे रूप वरील ओळीतील रूपापेक्षा वेगळे आहे, की फक्त वापर-अर्थ वेगळा आहे, याबाबत मतमतांतरे आहेत. |
कोळ्यांनी/चे किडे असणे (ज्ञात आहे). | बाईने/चे बोलणे (गोड आहे). | वाघिणीने/चे मांसाचा-तुकडा खाणे (अपेक्षित आहे). वाघिणीने/चे माणसाला खाणे (दु:खद आहे). | राणीला लाडू रुचणे (हलवायाला आवडेल). | मुलग्यांनी मुलींना पुस्तके वाटणे (नेहमीचेच आहे). | भाववाचक नामबीज, नपुंसकलिंगी-एकवचनी | सर्व काल | सामान्य | . |
काळेकुळकुळीत असणारे कोळी (भयानक वाटतात). | बोलणारी बाई (ऐटबाज आहे). | मांसाचा-तुकडा खाणारी वाघीण (पिंजर्यात आहे). माणसाला खाणारी वाघीण (हिंस्र आहे). | राणीला रुचणारा लाडू (गोड आहे). | मुलींना पुस्तके वाटणारे मुलगे (द्वाड आहेत). | कर्तावाचक नामबीज, लिंग-वचन-भेद | सर्व काल | सामान्य | . |
काळेकुळकुळीत असलेले कोळी (भयानक वाटतात). | बोललेली/बसलेली बाई (ऐटबाज आहे). ("बोललेली बाई" शब्दरूप थोडे विचित्र आहे.) | वाघिणीने खाल्लेला मांसाचा-तुकडा (फस्त झाला आहे). वाघिणीने खाल्लेला माणूस (सज्जन होता). | राणीला रुचलेला लाडू (गोड होता). | मुलग्यांनी मुलींना वाटलेली पुस्तके (कोरीकरकरीत आहेत). | कर्म असल्यास कर्मवाचक, नाहीतर कर्तावाचक नामबीज, लिंग-वचन-भेद | भूतकाल | पूर्ण | . |
कोळ्यांनी/चे किडे असायचे (आम्हाला ठाऊक आहे). | बाईने बोलायचे (तितके त्यांना हवे/ठाऊक आहे.). | वाघिणीने/चे मांसाचा-तुकडा खायचे (अपेक्षित/हवे आहे). वाघिणीने/चे माणसाला खायचे (अपेक्षित आहे). | राणीला लाडू रुचायचे (अपेक्षित/हवे आहे). | मुलग्यांनी मुलींना पुस्तके वाटायचे (अपेक्षित/हवे आहे). | भाववाचक नामबीज, नपुंसकलिंगी-एकवचनी | सर्व काल | . | संभवनीयता किंवा इच्छार्थक |
कोळी हिंस्र असू (लागावे!). | बाई बोलू (बघते). | वाघीण मांसाचा-तुकडा खाऊ (इच्छिते). वाघीण माणसाला खाऊ (इच्छिते). | राणीला लाडू रुचू (लागला). | मुलगे मुलींना पुस्तके वाटू (जातात). | क्रियाविशेषणबीज, लिंग-वचन-नाही | . | कार्यारंभवाचक | . |
कोळी किडे असून (जाळी विणतात). | बाई बोलून (चूप बसली). | वाघीण मांसाचा-तुकडा खाऊन (तृप्त झाली). वाघीण माणसाला खाऊन (सोकावली). | राणीला लाडू रुचून (गेला). | मुलगे मुलींना पुस्तके वाटून (जागेवर गेले). | क्रियाविशेषणबीज, लिंग-वचन-नाही | . | कार्यसमाप्तीवाचक | . |
(एचटीएमएल चिह्नांच्या गजबजाटामुळे या तक्त्याचे मुद्रितशोधन करणे थोडे कठिण जात आहे. प्रथम प्रतिसादात शुद्धिपत्र दिले जाईल.)
Comments
शुद्धिपत्रासाठी राखीव प्रतिसाद
हा प्रतिसाद शुद्धिपत्र देण्याकरिता आहे. (कृपया याला उपप्रतिसाद देऊ नये.)
माझ्या खरडवहीत, किंवा खालीच अन्य प्रतिसादात वरील तक्त्यातले टंकनदोष आणि अन्य त्रुटी नोंदवाव्या. त्यांचा सुधार या प्रतिसादात देत राहीन.
विस्तृत निरीक्षण. धन्यवाद.
फारच विस्तृत असे निरीक्षण आणि मांडणी आहे, लिहिण्यासाठी उपयोग नक्कीच आहे, निदान उपक्रमवर तरी आहेच आहे. धन्यवाद.
काही गोष्टींमध्ये मात्र मी साशंक आहे अथवा मला तसे कुतूहल तरी आहेच ते असे -
माझे असे निरीक्षण आहे कि मुंबईचे लोक बहुदा "मी तिकडे गेलेलो, तो बोललेला, ती आमच्याकडे आलेली" असे बोलतात, पुण्यात त्याचे "मी तिकडे गेलो होतो, ती आली होती" असे होते.
तसेच सोलापूरकडे "तो तिकडे उभारला आहे" असे बोलले जाते ते "तो तिकडे उभा आहे" असे बरोबर किंवा प्रचलित बरोबर वाटते. किंवा नागपूरचे "काय करून राहिला बे" देखील अशुद्ध वाटते.
पण आपल्या तक्त्यातील ह्या बाई बोललेली उदाहरणाने मात्र मी शंकेत पडलो आहे कि वरील मुंबई/सोलापूर/नागपूर येथील भाषेचे काही भाग हे व्याकरणाच्या दृष्टीने बरोबर कि चूक?
ह्याचप्रमाणे, मुलगा चे अनेक वाचन मुलगे/मुलग्यांनी हे सवयीमुळे वाचावयास नीट वाटत नाही, :) निदान त्याचे प्रचलित रूप तसे नसल्याने ते वाचावयास विचित्र वाटते.
स्थानिक फरक आहेत खरे
तुम्ही म्हणता ते प्रादेशिक फरक आहेत खरे.
कठिण प्रश्न आहे. एक उत्तर असे "मुंबईकर मुंबईकराशी बोलत असेल, आणि एकमेकांच्या लकबी एकमेकांना माहीत असतील, तर "मी तिकडे गेलेलो" असा वापर अर्थातच योग्य आहे. त्यावरून एकमेक मुंबईकर असल्याची भाषिक ओळखही पक्की होते.
परंतु मुंबईकर नागपूरकराशी बोलताना ही जोड-बोली (प्रमाण-बोली) वापरतो, तेव्हा "मी गेलेलो" असे बहुधा वापरणार नाही. किंवा कोकणाकडचा व्यक्ती नागपूरकराशी बोलताना "मी मालवणला जाऊन राहिलो" असे म्हणाला, तर नागपूरकराने काय अर्थ घ्यावा? अर्थात, त्याने अर्थ घ्यावा की "हा सोलापूरकर मित्र मालवणला गेला आणि तिथे वस्ती करून राहिला". नागपूरच्या लकबीप्रमाणे "या क्षणी मित्र जाण्याची क्रिया करत आहे" असा अर्थ नक्कीच घेणार नाही.
म्हणजे बहुतेक सुशिक्षित लोकांना आपल्या गावच्या लकबी माहीत असतात, त्या लकबींचा काही खास अर्थ असतो तो त्या गावाकडे अगदी सुव्यवस्थित असतो, पण तरी महाराष्ट्रातल्या वेगळ्याच गावात राहाणार्या लोकांशी बोलताना ते ती लकब वापरत नाहीत. एकमेकांना समजेल अशी शब्दरूपे वापरतात. त्यावरून असे दिसते, की दूरस्थ लोकांशी संवाद साधताना आपण स्वतःहून अशी शब्दरूपे टाळतो.
गावातल्या गावात "सुव्यवस्थित" अर्थपूर्ण शब्दप्रयोग = "प्रादेशिक लकब म्हणून व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध" ?
की
दुरस्थांची संवाद साधताना दोघांना ही व्यवस्था मान्य अशी ही व्यवस्था नाही = "जोड-बोली/प्रमाणबोली म्हणून व्याकरणाच्या दृष्टीने अग्राह्य"?
या निर्णयातून काय कृती करायची आहे? या विचाराअंती तुमच्या व्याख्येच्या दृष्टीने वरीलपैकी कुठला तो निर्णय निवडा.
- - -
"मुलगे" हे रूप तसे अप्रचलित आहे, पण तरी मी वापरले आहे. अनेक मुलगे असले तर आपण साधारणपणे "मुले" म्हणतो. पण "मुले" हा शब्द नपुंसकलिंगी आहे - "ती मुले आली." मला पुंल्लिंगी अनेकवचनी शब्द हवा होता. म्हणून कमी-प्रचलनाचा "मुलगे" शब्द घेतला. कदाचित "ते पुरुष" हे पद घेऊन वाक्यरचना करायला हवी होती...
धन्यवाद
प्रतिसाद आणि विश्लेषणासाठी धन्यवाद, आपला भाषेचा अभ्यास उत्तम आहे ह्यात वाद नाही.
माझी शंका काही प्रमाणात फिटली पण एक भाग राहिला जो मी माझ्या आधीच्या प्रतिसादात विचारलाच नव्हता, तो म्हणजे - व्याकरण हे बोली किंवा लेखी भाषेसाठी वेगळे असू शकते का? मागे एका लेखात आपण भाषेच्या प्रमाणीकरणाचे मुद्दे सांगितले आहेत पण केवळ प्रादेशिक फरकानुसार/सोयीसाठी मूळ व्याकरण बदलणे किंवा त्यामध्ये ते फरक सामावून घेणे उचित आहे का? आपण दिलेले दोन्ही पर्याय हे संभाषणासाठी वापरलेले जातात जिथे, लिहिले जाते तसे बोलले जातेच असे नाही, पण मग बोली भाषेचे व्याकरण ते काय? किंवा प्रमाणीकरण झाले नसल्याने ती एक सवय म्हणून चालवून घेणे प्राप्त आहे?
आपला तक्ता हा सामान्यतः लेखन किंवा संभाषण करण्यासाठी उपयुक्त आहे कि तो प्रमाणित भाषेचे व्याकरण सांगतो? वर सांगितल्याप्रमाणे तक्त्यातील काही शब्द किंवा रचना मान्यताप्राप्त लेखनात आढळत नाहीत, त्या व्याकरण दृष्ट्या बरोबर असतीलही पण तसे क्वचित वाचल्याचे आढळते.
प्रमाणबोली (प्रमाणबोलीचे लेखी रूप)
वरील क्रियापदरूपे प्रमाणबोलीमध्ये (प्रमाणबोलीच्या लेखी रूपामध्ये) वापरली जाऊ शकतात.
"मुलगे" बद्दल काही अंशी माफी मागितलेली आहे. पण "मुलगे" हे क्रियापदरूप नाही. जमल्यास त्या ठिकाणी "अनेक पुरुष" असे वाचावे.
अन्य कुठली रूपे अप्रचलित असतील तर जरूर नोंद करावी. आणि ज्या ठिकाणी क्रियापदरूप अप्रचलित होत चालले आहे, तिथे "#" चिह्न घातलेले आहे.
मुख्यतः बोलीचे व्याकरण असते. लेखी ही त्यापैकी शैली असते. त्या मानाने कृत्रिम असते. काही लोक लेखी शैलीमधील ठोकताळ्यांना व्याकरण म्हणत असतील असे वाटते. पण त्याने गोंधळ होऊ शकतो, म्हणून तसे म्हणणे टाळलेले बरे.
बोलताना ध्वनींचे जितके वेगवेगळे सूक्ष्म बदल होतात, ते सर्व लेखीमध्ये येत नाहीत. मराठीभाषकाच्या आत्मविश्वासाने नव्हे, तर शिक्षणातील ठरावांनी काही थोडीच सुटीसुटी रूपे लेखीमध्ये दिसतात.
उदाहरणार्थ, वेगवेगळ्या वेगात बोलताना :
मला लिहायचे आहे -> मला लिहाय्चं आय् -> मला लिहाय्चंय् -> ... -> मल्ल्ह्याय्चै
ही सर्व रूपे मराठीच्या प्रमाणबोलीमध्ये "व्याकरणशुद्ध" आहेत. यापैकी कुठलेही रूप नागपूरकर मालवणकराशी बोलताना आत्मविश्वासाने वापरू शकतो, आणि ऐकणाराही आत्मविश्वासाने समजतो. ध्वनिजोडणीचे मराठीतले नियम अतिशय सुव्यवस्थित आणि शिस्तीचे आहेत, त्यांचा अभ्यासही झालेला आहे.
पण लेखीमध्ये त्यातील पहिले सुटे-सुटे रूप तितके वापरले जाते. लेखीबाबत कित्ता-गिरवू "कन्व्हेन्शन"चे बळ फार असते. संस्कृतात मध्यमवेगात बोलताना होतील तितके सर्व ध्वनि-संधी करून तसे लेखी मांडायचा कित्ता गिरवतात आहे. मराठीत सुटे-सुटे मांडायचा कित्ता गिरवतात. आणि शिक्षणाच्या सोयीसाठी अशी कन्व्हेन्शने असणे सोयीचेही आहे. माझे त्यांना समर्थन आहे. पण ते नियम म्हणजे "व्याकरण" नव्हेत.
सामान्यपणे जी-जी सुटी शब्दरूपे मराठीच्या प्रमाणबोलीमध्ये उपलब्ध आहेत, ती-ती सुटी शब्दरूपे लेखीमध्ये वापरण्यास मुभा आहे. असा ढोबळ ठोकताळा...
प्रश्नाचे शब्दशः उत्तर देण्याऐवजी हे उत्तर देतो. एखादा असा समाज घ्यावा की :
- एकमेकांचे बोलणे समजते, आणि एकमेकांचे बोलणे अचूक वाटते,
- समाजातील प्रत्येक घटकाला त्या समाजातल्या अन्य घटकाशी संवाद साधताना आत्मविश्वासाने बोलता येते,
- आणि त्या समाजातील अन्य घटकांनी आपणाशी आत्मविश्वासाने बोललेले आपल्या लकबींशी जुळते असे प्रत्येक घटकाला वाटते ".
हा समाज किती व्यापक घ्यावा (बृहन्महाराष्ट्र+इंदूर-देवास-तंजावर-सनिव्हेल... येथे स्वतःला मराठीभाषक म्हणणारे लोक) की किती मर्यादित घ्यावा (गोव्यातील मराठीभाषक बागायतदारांच्या वयस्कर पिढीच्या स्त्रिया) त्याबद्दल नियम नाही.
पण जो काय समाज गृहीत धरायचा आहे, त्यांच्याबाबतील वरील संवाद-निकष लागू असावेत.
अशा कुठल्याही समाजात असे दिसते, की संवादासाठी काही ठोकताळे अध्याहृत असतात. "अध्याहृत" असूनही ते पुष्कळदा कडक शिस्तीचे असतात. तेच त्या संदर्भचौकटीत व्याकरण.
"मूळ व्याकरण बदलणे" वगैरे म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे, मला कळलेले नाही. जर तुमच्या संदर्भचौकटीत मालवण आणि नागपूर दोन्हीकडील मराठीभाषक येतात, तर एकमेकांशी बोलताना हे दोघे कुठल्या लकबी सहमतीने वापरतात? फक्त त्याच लकबी त्या संदर्भचौकटीत व्याकरणाचे नियम होतात.
संदर्भचौकट वाटेल तशी लहानमोठी करण्याचे स्वातंत्र्य असते, पण एकदा का संदर्भचौकट निवडली, त्यानंतर "नियम सामावून घेणे" याबद्दल स्वातंत्र्य फारसे राहात नाही. काही बारीकसारीक अरक असे राहातात - "त्याच्याकरिता" म्हणावे की "त्याच्याकरता". आणि जर असे दिसले, की काही लोक पैकी एकच उच्चार करतात, पण अन्य लोकांनी दुसरा उच्चार केला तर सहजगत्या समजतात आणि चालवून घेतात, तर दोन्ही उच्चार "सामावून" घ्यावेत.
त्या चौकटीतले लोक (सर्व जोड्या) एकमेकांशी संवाद साधताना ज्या लकबी आत्मविश्वासाने वापरतात किंवा ऐकून घेतात, त्याची नोंद केल्यावर "सामावून घेण्यासाठी" फरक थोडेच राहातात. मग या सामावण्याच्या औचित्याबद्दल प्रश्न गौण होतो.
उत्तर वर इतस्ततः विखरून दिलेले आहे.
जसे लिहिले जाते, पण बोलले जात नाही, अशी तक्त्यातली उदाहरणे येथे जरूर नोंदवावीत. (मात्र केळकर, धोंगडे, परब यांनी मात्र वरील बहुतेक रूपे प्रचलित म्हणून दिलेली आहेत. एखाद्या ठिकाणी "#" चिह्न देण्याचे राहिल्यास माझी नजरचूक झाली असू शकेल.) शुद्धिपत्रात त्या रकान्यांमध्ये "#" चिह्न घालण्याबद्दल सुधारणा देता येईल.
गयेला
तो काल पुण्याला गेलेला यातील गेलेला हे रूप गुजरात्यांच्या सान्निध्यामुळे आलेले असावे. गुजरातीत हुं गयेलो असा उपयोग आढळतो.
(आता हे मराठीतून गुजरात्यांनी घेतले असे का म्हणायचे नाही? तर मुंबईखेरीज इतरत्र हा प्रयोग होत नाही म्हणून).
इतकेच नाही. वो मेरेको बोल रहेला हेही रूप मुंबईच्याच हिंदीत आढळते.
तो काल पुण्याला "गेल्ता". किंवा तुम्ही मला जेव्हा फोन "करताल", ही देखील अधिकृत रूपे समजावी का?
नितिन थत्ते
"अधिकृत" म्हणजे अधिकार्याने मान्य केलेली :-)
"अधिकृत" म्हणजे कोण्या अधिकार्याने मान्य केलेली असे आहे काय? :-)
मला वाटते शासनात वापरण्यायोग्य मराठी रूपे सांगणारी एक अधिकृत समिती आहे. शिवाय राज्यभाषा मंडळ वगैरे. अधिकृत नियमावली ते लोक करू शकतात.
("गेल्ता" या पुणेरी लकबीबद्दल पुणेरी बोलीचा अभ्यास करणार्यानी नोंद घेतलेली आहे, असे वाटते. बहुधा अग्निहोत्र्यांच्या शब्दकोशाच्या प्रस्तावनेत प्रादेशिक बोलींचे वर्णन आहे, त्यात बघितले होते. याला "अधिकृत" म्हणावे काय? पण हे लक्षात ठेवण्यालायक आहे, की नोंद घेण्यापूर्वीही तो शब्दप्रयोग होत असे. आणि कोणी नोंद घेतली आहे, त्याच्याकडे यथेच्छ दुर्लक्ष करून पुणेकर हे शब्दरूप वापरतात.)
तक्ता आवडला
तक्त्यातली मांडणी आवडली. तक्त्यातील 'अन्य पदात स्थान' यात "भेद" याचा अर्थ ते लि. व. पु. यानुसार बदलतात, असे असावे. हे लेखात नीट स्पष्ट व्हायला हवे असे वाटते.
योगायोग असा की अलिकडेच मी Nile यांना असा प्रश्न विचारला होता की - (तू) बोलला हे बरोबर का (तू) बोललास हे बरोबर?
मला ओळखीने (तू) बोललास हे बरोबर वाटते. वर बाई बोलली असा भूतकाळातील उल्लेख आहे, पण तो उल्लेख तृतीय पुरुषी एक वचनी आहे. प्रथम पुरुषी, द्वितीय पुरुषी उल्लेखांत बोललीस असे योग्य आहे का? का गावांप्रमाणे भाषेची रूपे वेगवेगळी होत असतात म्हणून बोलण्यात कुठचेही चालेल असे मत आहे?
असो. बाकी हसवणे>> हसवणूक हा प्रयोग पुलंनी केला त्याआधी अस्तित्वात होता का नव्हता?
तू बोलला/बोललास दोन्ही बरोबर असावे
(पण बोललास हे अधिक प्रचलित आहे ना? बहुतेक तक्त्यांत हेच रूप दिलेले दिसते.)
याबाबत मागच्या शतकात मराठी व्याकरणकारांमध्ये वाद झाला होता. याहून थोडे टोकाचे उदाहरण घेऊया.
रामागड्या! तू पोळ्या केल्या.
की
रामागड्या! तू पोळ्या केल्यास.
आता क्रियापद कुठल्या शब्दाच्या भेदाने लिंग-वचन घेत आहे?
"केल्या" म्हणजे नक्की स्त्रीलिंगी अनेकवचन. म्हणजे "पोळ्या"शी अन्वय साधत असले पाहिजे. मग "स" हे द्वितीयपुरुषी रूप "तू"शी अन्वय कसे काय साधत आहे? "क्रियापद दोन पदांशी वेगवेगळ्या बाबतीत अन्वय साधू शकतच नाही" असा डॉगमा सांगून दुसरे रूप व्याकरणदुष्ट आहे, असे मानणारे काही व्याकरणकार होते.
पण "दोहोंशी अन्वय साधू शकत नाही" हा डॉगमा काय निसर्गनियम आहे? काही भाषांत दुहेरी अन्वय साधणे शक्य असेल (मराठी), तर काही भाषांत फक्त एकेरी अन्वय साधणे शक्य असेल (संस्कृत, इंग्रजी), तर काही भाषांत फक्त शून्य-अन्वय साधणे शक्य असेल (चिनी).
या व्याकरणकारांमधल्या आपापसातल्या कलहाकडे मराठी बोलणारा सभ्यसमाज कशाला लक्ष देईल? "तू पोळ्या केल्यास" हे रूप सभ्य समाजात सर्रास आधीपासून वापरले जायचे, आणि या कलहानंतरही वापरले जात होते. "प्रयोगशरणा वैयाकरणा:" म्हणजे जो काय शब्दप्रयोग लोकांत होतो, त्यांना व्याकरणकार शरण गेल्याशिवाय गत्यंतर नाही!
त्यानंतर सर्व मराठी व्याकरणकारांची सहमती झाली की मराठीत दुहेरी अन्वय साधणारी "संकर-रूपे" असतात.
("हसवणूक" शब्द जुन्या शब्दकोशांत सापडत नाही. पण पु. ल. देशपांडे यांच्या प्रतिभाशाली वापरानंतर तो इतका "नैसर्गिक" वाटतो, की मला वाटते की तो मराठीमध्ये सामान्य शब्द म्हणून रुजू झाला आहे.)
कोल्हापुराकडे
कोल्हापुराकडे "तू पोळ्या केलास/केलीस का?" असे (प्रचलित व्याकरणानुसार अशुद्ध) बोलतात.
वरील विवेचनाप्रमाणे तेच योग्य/शुद्ध आहे असे वाटते. :)
धन्यवाद
स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
कोल्हापुराकरिणीने विचार करावा "नागपूरकराशी मी कसा बोलतो"
(शीर्षकात "बोलतो" असे रूप मुद्दामून ठेवले आहे. अशी शब्दरूपे कोल्हापुरकडच्या बोलीत सुव्यवस्थित वापरली जातात, असे ऐकून आहे - म्हणजे स्वतःच्या कानांनी वापर ऐकून आहे.)
जर कोल्हापूरकडची व्यक्ती नागपूरकडच्या व्यक्तीशी आत्मविश्वासाने - आणि ऐकणारा मान्य करेल या आत्मविश्वासाने - बोलते तेव्हा कुठले शब्दरूप वापरते? कोल्हापूरकडच्या माझ्या ओळखीचे लोक अशा परिस्थितीत
असे रूप वापरत नाहीत. त्या अर्थी त्या संदर्भात ते रूप "अशुद्ध" आहे.
संदर्भचौकटींची सरमिसळ झाली, तर "अशुद्ध" शब्दामुळे नको असा घोटाळा तेवढा होऊ शकतो.
श्री. अजूनकोणीमी यांच्याशी झालेल्या खरडचर्चेतील मी लिहिलेला एक परिच्छेद थोडा बदलून येथे पुन्हा देतो :
"तू पोळ्या केलास का?"/"तू पोळ्या केल्यास का?"
या बाबतीतही शुद्धाशुद्धता जोखताना कुठलाही त्रास होणार नाही. कोल्हापूरच्या बोलीच्या संदर्भात आणि शालेय पाठ्यक्रमात अधिक प्रसिद्ध असलेल्या प्रमाणबोलीच्या संदर्भात "शुद्धाशुद्धता" ही संकल्पना एकाच अर्थाची आहे, हे कळूनही "मग उत्तरे वेगळी कशी?" ही शंका येणार नाही.
उपयुक्त
धन्यवाद. उपयुक्त तक्ता आहे. उपक्रमावर अशा लेखांचे पुस्तक तयार करायला हवे.
पुरवणी
यात नकारार्थी रुपे येतील का? जसे असेना, असेनात,
याशिवाय काहि रुपांची भर घालतो:
उपक्रम चांगला आहे. जमेल तशी भर घालतो.
अर्थात जर बोली भाषा घेतल्या तर अनेक प्रकारची भर पडू शकते
ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?]
हेच अपेक्षित
हेच अपेक्षित आहे.
यातील एक-दोन रूपे वर दिलेली आहेत.
* असं (काय)!
हे समजले नाही. असं (लेखी असे) हे "असणे"चे रूप मानले जात नाही. असं-तसं-जसं-कसं वगैरे बिगरक्रियापदांपैकी रूपे असावीत.
* (काय बरं) खावं / असावं? [प्रश्नार्थक]
खावे/असावे या लेखी चिह्नांची उच्चारित रूपे खावं/असावं अशी आहेत खरी. ९व्या ओळीत ही रूपे दिलेली आहेत. मात्र त्यातील शेवटचा रकाना अतिरेकी लांब होत होता म्हणून अपूर्ण आहे, त्याची तुम्ही येथे पूर्तता केली आहे, हे उत्तम. त्या रकान्यात म्हटले आहे - (विध्यर्थ - इच्छार्थक, वगैरे अनेक अर्थ...) पण हे अनेक अर्थ यादीत घातले पाहिजेत, हे चांगलेच.
* असशील
हे रूप ७व्या ओळीत दिलेले आहे. "कोळी किडे असतील ->(द्वितीयपुरुष-एकवचनात) कोळ्या! तू किडा असशील!
* असताना
छान! हे यादीत घालायला पाहिजे.
व्याकरणाचा आभ्यास कशासाठी करायचा असतो?
हा चर्चा प्रस्ताव वाचून असे वाटले की, ह्या महाराश्ट्रातील जी अशिक्शीत मराठी माणसे स्थानीक
शब्दांच्या सूक्श्म स्तरावरील भेदामुळे महाराश्ट्रातील इतर जिल्ह्यात जावून त्यांची नेहमीची कामे
करूच शकलेली नाहीत, शकत नाहीत, शकतील असे वाटत नाही. पण ते खरे नाही.
आणि म्हणूनच दिलेला तक्ता व्याकरणाच्या आभ्यासासाठी उपयोगाचा नाही. परंतु महाराश्ट्रातील
बोली भाशेचा तौलनिक आभ्यास करण्यासाठी तो अजून विकसित करता येईल.
--------
मुळात भाशेला दोन अंगे असतात एक 'पदार्थ रूप' व दुसरे 'भावार्थ रूप'.
ह्या दोन अंगांचे आकलन वेग-वेगळ्या स्तरावर वेग-वेगळे असते. त्याचे स्तर (माझ्या आभ्यासानुसार)
असे आहेत.-
1) वर्ण बोधन स्तर
2) शब्द बोधन स्तर
3) वाक्य बोधन स्तर
4) संदर्भ-मतितार्थ बोधन स्थर
भाशेच्या वापरात पदार्थ रूप हे वयानुसार, व्यक्तीनुसार, स्थानानूसार, काळानुसार बदलते, बदलत
असते.
भाशेचे 'भावर्थ रूप' बदलत नाही. 'गोल', 'गोड', 'ग्वाड' ह्या तीन शब्दांचे 'पदार्थ रूप' जरी वेगळे असले
तरी त्या शब्दांमधील (एकच संदर्भ असेल तर) भावार्थ एकच आहे.
हा प्रस्तावातील लिखाण मराठी भाशेच्या प्रचलित व्याकरणावर व त्याच एकांगी दृश्टीकोनावर
आधारलेला आहे, त्याच एकांगीपणाची पाठराखण करणारा आहे.
मराठी भाशेचे प्रचलित व्याकरण हे बहुतांशी, भाशेच्या 'पदार्थ रूप' ह्या भागावर बेतलेले आहे. भाशेचा
हा भाग परीवर्तनशील आहे, असतो.
आणि म्हणूनच व्याकरणाच्या (आकलनाच्या दृश्टीने) 'भावार्थ रूपा' कडे बरेचसे दुर्लक्श झाल्याने
'प्रचलित व्याकरण' हे स्वभावाने - 'आदेशात्मक' आणि त्यामुळेच 'रटाळ' असते.
मराठी भाशेच्या 'प्रमाणित व्याकरणा'कडे पर्यायाने 'भाशेच्या व्याकरणा'कडे पहाण्याच्या दृश्टीकोनात
सुधारणा होवून जेंव्हा व्याकरणाच्या 'भावार्थ रूपा' कडे देखील जास्त लक्श दिले जाईल तेव्हा 'भावी
व्याकरण' हे स्वभावाने - 'संदेशात्मक' आणि त्यामुळेच 'मनोरंजक' होवू शकते.
एखाद्या भाशेच्या भाशकांनी भाशेचे 'प्रमाणित व्याकरण' का शिकायचे? ह्या प्रश्नाचे उत्तर
'वैचारीकतेचा विकास होण्यासाठी' असेच उत्तर देता यायला हवे. प्रचलित व्याकरण हे ह्या प्रश्नाचे उत्तर
देत नाही, देवू शकत नाही. उलट, व्याकरणाच्या पदार्थरूपाकडेच 'व्याकरण' म्हणून पाहिल्याने
'जडवादीदृश्टी होवून' ते 'हे शुद्ध ते अशुद्ध, हे अयोग्य ते योग्य!' असे आभ्यास असणार्यांना वदवायला
भाग तरी पाडते किंवा ते सामान्य जनांना गोंधळवते.
काही अंशी सहमत
हे स्तर असतात, पण हि प्रत्यक्ष जाणीव आपण इथे त्याची नोंद केल्यामुळे झाली, पण हे स्तर एकमेकात गुंतलेले आहेत असे आपणास वाटत नाही का? कोणताही एक स्तर वापरून आपण म्हणता तसे मनोरंजन होईल/व्याकरण आपलेसे वाटेल असे मला वाटत नाही. पदार्थ रूपावर नियम निश्चित केले तर त्याचे वापरातले रूप भ्रष्ट होणार आहेच जे भावार्थ असेल. मी धनंजय ह्यानादेखील हाच प्रश्न विचारला कि पानी हि पाणी चे भ्रष्ट रूप आहे किंवा गेल्तो हे गेलो होतो चे भ्रष्ट रूप आहे, हे असे का आहे तर मूळ शब्द उच्चारता येत नाही/किंवा त्रास होतो म्हणून सोयीने पानी आणि गेल्तो हे भावार्थ उच्चार येतात, मग केवळ सोयीसाठी मूळ शब्दाच्या नियमांना मुरड घालणे उचित आहे का? माझ्या मते भाषेचे नियम देखील विज्ञानाच्या नियमाप्रमाणे असावेत, तसेही वापरामध्ये किंवा बोली मध्ये अनेकदा अनेक नियम वापरले जात नाहीच किंवा कालानुरूप काही नियम बदलले जातातच.
आपण भावार्थ रुपाकडे अधिक लक्ष देण्यासंबंधी जे म्हणत आहात त्या संदर्भात एकातऱ्हेने हिंग्लिश किंवा सरमिसळ मराठी हि देखील उदाहरण म्हणून देता येईल का?, कारण हि सरमिसळ भाषा हे भावार्थ रूपाचे एक टोक आहे असे मला वाटते आणि ते सोयीचे आणि रंजक देखील आहे. असा अर्थ आपल्या विधानातून निघतो असे मला वाटते ते योग्य कि अयोग्य?
व्याकरण शिकून वैचारिक विकास होईल ह्याबद्दल मी साशंक आहे, भाषा समजण्यासाठी व्याकरण आहे आणि ते समजून त्या भाषेतील रचना समजल्या/करता आल्या तरच वैचारिक विकास होईल असे मला वाटते. तरीही पदार्थ रुपाकडे बघण्याचा हटवादीपणा देखील करून उपयोग नाही ह्या आपल्या मताशी मी सहमत आहे. आपण वर नमूद केलेल्या सर्व स्तरांचा मेळ घालून व्याकरण समजावून सांगितले तर ते आपण म्हणता तसे संदेशात्मक आणि मनोरंजक होईल असे मला वाटते.
धन्यवाद
पण हि प्रत्यक्ष जाणीव आपण इथे त्याची नोंद केल्यामुळे झाली, पण हे स्तर एकमेकात गुंतलेले आहेत असे आपणास वाटत नाही का?
हि संकल्पना माझ्याकडून साकारली गेली आहे. त्यामुळे माझ्याकडूनच तीची तुम्हाला ओळख होवू शकते. त्याशिवाय ती तुमच्यापर्यंत पोहचूच शकली नसती. केवळ जुजबी ओळख देवून तुम्हाला जाणीव झाली. मग सांगा, त्याविशयीची सुस्पश्ट ओळख झाली तर, इतर गोश्टी देखील स्पश्ट होत जातीलच ना?
कोणताही एक स्तर वापरून आपण म्हणता तसे मनोरंजन होईल/व्याकरण आपलेसे वाटेल असे मला वाटत नाही.
'कोणताही एक स्तर वापरून मनोरंजन होईल.' असे मी कुठे म्हटलेले आहे?
आपण भावार्थ रुपाकडे अधिक लक्ष देण्यासंबंधी जे म्हणत आहात त्या संदर्भात एकातऱ्हेने हिंग्लिश किंवा सरमिसळ मराठी हि देखील उदाहरण म्हणून देता येईल का?,
आणि
व्याकरण शिकून वैचारिक विकास होईल ह्याबद्दल मी साशंक आहे,
मी प्रचलित व्याकरण व प्रमाणित व्याकरण ह्या मर्यादेमध्येच माझा प्रतिसाद दिलेला आहे. भाशेच्या व्याकरणाचा संबंध विद्न्यानाशी घालण्याऐवजी मी तो समाजशास्त्राशी घालेन. शालेय विद्यार्थ्यांना ज्यांची भाशा विशयक जाण कोवळी असते त्यांना जे व्याकरण शिकवले जाते ते 'प्रमाण म्हणून स्विकारलेले व्याकरण' ह्यात त्रूटी आहेत, दोश आहेत. आजचे शालेय विद्यार्थी उद्याचे मराठी भाशक असतात. इंग्रजी व्याकरणचा आभ्यास मुलां/मुलींना वेगळाच भाशाविशयक आत्मविश्वास देतात. तो आत्मविश्वास मराठी भाशेचे सध्याच्या प्रमाणित व्याकरणाचा आभ्यास करून मिळत नाही, उलट ते गोंधळवणारे आहे. असे मी म्हणत आहे. मी हिंग्लिंश किंवा सरमिसळ मराठी ह्या विशयी मी येथे बोलत नव्हतो.
कारण हि सरमिसळ भाषा हे भावार्थ रूपाचे एक टोक आहे असे मला वाटते आणि ते सोयीचे आणि रंजक देखील आहे. असा अर्थ आपल्या विधानातून निघतो असे मला वाटते ते योग्य कि अयोग्य?
आपले हे विधान, 'चौथी-पाचवीचे गणित शिकले की ते शिकणारा विद्यार्थी नक्किच वैद्न्यानिक, गणितद्न्य होतो.' अशाप्रकारचे (संबंध नसलेले) वाटते.
महाराश्ट्रातील सध्याच्या बोलल्या जाणार्या भाशेतील व्याकरणावर जे व्याकरण प्रमाणित व्याकरण म्हणून स्विकारले गेलेल्या गोश्टीचा किती ठसा आहे? माझ्या मते ठसा आहे, पण तो पूसटसा आहे. जर 'सध्या प्रमाणित असलेल्या व्याकरणात' जे शाळांमध्ये शिकवले जाते, त्यात सुधारणा झाली तर भविश्यातील मराठी भाशकांची मराठी जास्त खुलून विकसित होईल. शालेय स्तरावरील व्याकरणाची शिकवणी ही 'एखादे वाहन कसे चालवावे?' याची माहिती देणारी असते असे मी मानतो. वाहन कसे चालवावे हे पुढे त्या विद्यार्थ्यावरच अवलंबून असते. पण सुसंस्कृत समाज तोच असतो, जो आपले सध्याचे दुर्गुण, अपसमज, गैरसमज, तोकडेपणा ओळखून ते पुढच्या पिढीत तसेच्या तसेच झिरपवण्या ऐवजी ते दूर कसे करता येईल हे ध्यानात घेवून 'अनुभवसंपन्न जाण' शिक्शणाच्या माध्यमातून आपल्या पुढच्या पिढीत पोहचवतो.
काही अंशी सहमत झाल्याबद्दल व ते व्यक्त केल्याबद्दल आभारी आहे.
धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
हो म्हणूनच आपल्यास त्याचे श्रेय/धन्यवाद दिले गेले होते. 'इतर गोष्टी' स्पश्ट होत जातीलच ना? ह्या प्रश्नाचे उत्तर इतर गोष्टी कोणच्या हे सांगितल्यावरच देता येईल, आपल्या उर्वरित प्रतिसाद = इतर गोष्टी आहे काय?
आपल्या आधीच्या प्रतिसादातील "सुधारणा होवून जेंव्हा व्याकरणाच्या 'भावार्थ रूपा' कडे देखील जास्त लक्श दिले जाईल" ह्या विधानात "जास्त" कडे मी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला कि अमुक एका स्तराच्या जास्त वापरामुळे जी तक्रार आपण पदार्थ रुपाबद्दल करत आहात तीच तक्रार भावार्थ रुपाबद्दल केली जाऊ शकते. म्हणूनच मी "आपण वर नमूद केलेल्या सर्व स्तरांचा मेळ घालून व्याकरण समजावून सांगितले तर ते आपण म्हणता तसे संदेशात्मक आणि मनोरंजक होईल असे मला वाटते" हे विधान माझ्या प्रतिसादाच्या शेवटी केले होते.
व्याकरण हे भाषेचे नियम आहेत हे आपले देखील मत असावे, नियमांचे पालन करून भाषा शिकता येते आणि भाषेचा वापर करून ज्ञान वाढवता येते, वैचारिक विकास होतो. इंग्रजी शाळेतील मुलांचा अत्माविशास हा इंग्रजी पुरता मर्यादित असतो, तेच मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषातील शाळकरी मुलांबद्दल जाणवते, आता शिकवण्याची सोय आणि उपलब्ध साधनांची सुधारणा ह्या गोष्टींची त्रुटी मराठी बाबत जाणवते ज्यामुळे त्याचा परिणाम होऊन सद्य परिस्थितीतील मराठी मुलांचा भाषा विषयक आत्मविश्वास कमी असल्याचे जाणवू शकते.
"सुधारणा होवून जेंव्हा व्याकरणाच्या 'भावार्थ रूपा' कडे देखील जास्त लक्श दिले जाईल" ह्या विधानाच्या संदर्भ चौकटीमुळे मी तसे विधान केले, सरमिसळ भाषेएवढे सहज आणि सोपे भावार्थ रूप रूढ भाषेत नाही म्हणून अति"जास्त" लक्ष दिल्यास काय होईल ते आपणास मान्य आहे का असे माझ्या विचारण्याचा हेतू होता, तो आपल्या लक्षात आला नसल्यास तसे सांगावे मी पुनः प्रयत्न करेन अथवा आपणास स्वारस्य नसल्यास ह्या प्रतिसादातील हा मुद्दा इथेच थांबवूयात.
माझे तर मत आहे कि आहे ते प्रमाणित व्याकरण देखील नीट पद्धतीने शिकवल्यास बराचसा फरक दिसून येईल, सुधारणा तर नक्कीच सकारात्मक बदल घडवेल ह्यात शंका नाही.
स्पश्टीकरण
मी लिहलं होतं, "केवळ जुजबी ओळख देवून तुम्हाला जाणीव झाली. मग सांगा, त्याविशयीची सुस्पश्ट ओळख झाली तर, इतर गोश्टी देखील स्पश्ट होत जातीलच ना? "
या वाक्यात अर्थ हा होता, - ''त्याविशयीची सविस्तर माहिती तुम्हांला व इतरांना मिळेल तेंव्हा, 'हे स्तर एकमेकात गुंतलेले आहेत' असे जे तुम्हाला आज, आत्ता वाटत आहे, ते उद्या किंवा त्यानंतर वाटणार नाही."
तुम्ही तो 'अधिक जास्त' असा घेतलात. भावार्थ रूपाकडे 'जास्त' ('अधिक जास्त' नव्हे!) लक्श दिले कि जो गोंधळ होईल तो 'हा असा' (जसा आता आपल्यात होत आहे तसा) होईल. तो दूर करण्यासाठी मात्र 'धीर धरवा' लागेल. संयमी लोकांनाच भावार्थ रूप व्यवस्थित जाणता येईल.
व्याकरण हे 'भाशेच्या सुयोग्य आकलन करून देण्या-घेण्यासाठीचे' नियम आहेत. आणि म्हणूनच 'व्याकरण' नव्हे, व्याकरणाची मांडणी बदलली जावू शकते. 'व्याकरणाची मांडणी' ते व्याकरण रेखाटणार्या व्याकरणकारावर व तीचे आकलन करून घेणारा या दोघांवर अवलंबून राहू शकते.
धन्यवाद
धन्यवाद.
ठीक, काही शंका असल्यास आपल्या खरडवहीतून संपर्क साधीन.वाचतोय..!
वाचतोय आणि समजून घेतोय.
-दिलीप बिरुटे