घरः एक स्टुडिओ, सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन

चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या चित्रांचे प्रदर्शन नुकतेच मुंबईतील साक्षी आर्ट गॅलरीला होऊन गेले. हेच प्रदर्शन नंतर दिल्लीत ललित कला ऍकडमीत ५ मार्च ते ११ मार्च ला होणार आहे.

सुधीर पटवर्धनांचा माझा परिचय वर्षभरापूर्वी झाला. पेशाने डॉक्टर (रेडिओलॉजिस्ट) असलेल्या पटवर्धनांना (जन्म १९४९) चित्र काढायची आवड आणि जाण सुरुवाती पासून (महाविद्यालयीन जीवनात) होती. १९७९ साली त्यांचे पहिले एकल प्रदर्शन झाले. त्यानंतर दर दोन ते तीन वर्षांना एक या वेगाने त्यांची चित्रप्रदर्शने होत असतात. सुरुवातीस व्यवसाय करत चित्रे काढीत, हल्ली मात्र ते चित्रांसाठी पूर्णवेळ देतात. त्यांच्यावर 'चित्रकार सुधीर पटवर्धन' नावाचे मराठीत पुस्तक आहे (ले. पद्माकर कुलकर्णी, लोकवाङ्मय). याशिवाय रणजित होस्कोट यांनी लिहिलेली दोन इंग्रजी पुस्तके आहेत. कवि नारायण सूर्वे आणि चित्रकार सुधीर पटवर्धन या दोघांवर एक चित्रपट झाला आहे. जनमानसात कलेविषयी आपुलकी व्हावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू असतात. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ३० नावाजलेल्या चित्रकारांच्या चित्राचे एक प्रदर्शन घेऊन महाराष्ट्रातील आठ प्रमुख शहरात (मुंबई, पुणे सोडून) ते फिरले. यावेळी विविध ठिकाणच्या लोकांचा उत्तम प्रतिसाद त्यांना मिळाला.

मी पाहिलेले हे त्यांचे पहिलेच प्रदर्शन. या पूर्वी त्यांच्या पुस्तकातून, वा त्यांच्या स्टुडिओतील चित्रातून त्यांच्या चित्रांची ओळख झाली होती. प्रत्ययकारी आणि अस्सल भारतीय त्यातल्या त्यात शहरी भारतीय असा त्यांचा चित्रांचा बाज आहे असे मला वाटले. (मी त्यांची फक्त हल्लीची चित्रे पाहिली असल्याने असे मत झाले असेल.) शहरी भूभाग आणि त्यातील इमारतीं असलेले लॅन्डस्केपस, लोकांचे एकमेकाशी असलेले संबंध, गंभीर वळणाची वास्तवाला धरून केलेली चित्रे अशी मला त्यांच्या चित्राची असलेली ओळख. घर आणि घरातली एक खिडकी, खिडकीतून व्यक्त होणारे बाहेरचे जग तर खिडकीच्या आतली घरातली वास्तवता यांचे मिश्रण त्यांच्या चित्रातून सापडते.

'घर: एक स्टुडियो' किंवा 'कुटुंब कल्पित' (फॅमिली फिक्शन) या नावाचे त्यांच्या चित्रप्रदर्शनात चाळीसावर छोट्या मोठ्या आकाराची, रंगीत वा पूर्ण काळी पांढरी (स्केचसारखी) चित्रे लागली होती. फॅमिली फिक्शन या एका मोठ्या आकाराच्या चित्रात एका बाजूला कुटुंबातील सच्चेपणा तर दुसरी कडे सिरियल/फिल्म मधली काल्पनिकता एकत्र चितारली आहे. नोस्टाल्जिया या चित्रात एका उंच इमारततील्या बाल्कनीत उभ्या असलेल्या दोन स्त्रिया (आई मुलगी वाटाव्या अशा) आहेत. दोघीही एकमेकांच्यात गुंतलेल्या आहेत पण स्वतंत्र ही आहेत. आईच्या चेहर्‍यावर काळजी तर मुलीच्या चेहर्‍यावर चिंता दिसते. चित्रकाराच्या म्हणण्यानुसार चित्र विषय ऐंशीच्या दशकातला आहे. त्यांच्या बाल्कनीच्या बाहेरची शहरी वस्ती, झोपडपट्टी आणि त्यापलिकडचे डोंगर तलाव दिसतात. तर दुसर्‍या बाजूने घरात आपण डोकावतो. घरात कुणीतरी (वयस्क व्यक्ति) निजलेले आहे. तर एक तरुण मुलगा बसला आहे. त्याही पलिकडे एक खिडकी आहे. त्यातूनही बाहेर दुसर्‍या इमारतीत छपरावर काम करत असताना दिसत आहे. काही चित्रातून मुंबईतील शहरी छोट्याशा घराचे चित्रण आहे. फुलसर्कल याचित्रात एक आजारी पडलेली वृद्ध व्यक्ति आणि आसपासचे लोक. यात पलंगापासून सैपाकघर दूर नाही अगदी शेजारीच गृहिणीने कुकर लावला आहे तर त्याच खोलीत एक लहान मूल खेळते आहे. (वनरुम किचन असावा).

बरेच चित्रकार स्वतःची व्यक्तिचित्रे करतात (सेल्फ पोर्ट्रेट). तसेच एक चित्र या प्रदर्शनात आहे. हात लांब करून छोट्या कॅमेराने आपले छायाचित्र काढावे असा काहीसा भास त्यातून होतो. स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबियांचे आणि अगदी जवळच्यांची चित्रे यात असावीत असा भास आहे. (हे या चित्रांचे प्रत्ययकारीपण). घरातील पलंग त्यावरील झोपलेली वयस्क माणसे सोबत कुणी बसलेले तर कुणी काम करताहेत हे त्या चित्रांमधील महत्वाचे अंश. रंगसंगती ही सुंदरते कडे न जाता वास्तवता आणि त्यातले गांभीर्य दाखवणारी. त्यांच्या स्केचेस मधून त्यांच्या कामातील वेग जाणवतो. काही चित्रातून मात्र संपन्नता दिसते. फॅमिली चित्रातील कुटुंब हे याच पठडीतले. (जसे फॅमिली फिक्शन मधील). या बरोबर शू करतानाचा वृद्ध गृहस्थ, एक भिंतीवर शू करणारा मुलगा अशी काही चित्रे आहेत. पिळवटून गेलेली गलित गात्र वा थकलेली काही शरीरे एका बेंच वर अस्ताव्यस्त पडली आहेत. तर त्यांच्या वर छपरावर ऑर्जी सम शरीरसमूह आहे. या प्रदर्शनात वेगळे वाटावे असे एक चित्र यात पाहिले. गुस्ताव क्लिम्टच्या एका चित्रावरून (ऑर्जी)प्रभावित होऊन छपरावरचा भाग आल्याचे चित्रकार नमूद करतात.

साक्षी आर्ट गॅलरीला माझी ही पहिली भेट. तिचे व्यवस्थापन आणि जागा चांगली वाटली. कॅटलॉग हा विस्तृत आणि संकल्पना सांगणारा आहे. छपाई एका छानशा पुस्तकाप्रमाणे झाली आहे.

प्रमोद

Comments

चांगली ओळख

नुकतीच या कलाकाराची ओळख चिंतातूर जंतू यांनी आपल्या लेखाद्वारे करुन दिली होतीच.

तसेच "समकालीन भारतीय चित्रकला" या १९८५ साली फिल्म्स् डिव्हीजनने काढलेल्या माहीतीपटातही त्यावेळच्या नव्या चित्रकारांच्या यादीत श्री पटवर्धन यांचा उल्लेख आहे.

दुवा

नुकतीच या कलाकाराची ओळख चिंतातूर जंतू यांनी आपल्या लेखाद्वारे करुन दिली होतीच.

लेख माझ्या बघण्यात आला नाही. दुवा मिळेल का?

प्रमोद

हा घ्या

http://misalpav.com/node/16374 चिंतातुर जंतू यांचा लेख.

पण आपल्या परीक्षणातूनही चित्रांबद्दल आणि चित्रकाराबद्दलही बरीच माहिती मिळाली.

फार चांगला लेख

चिंतातूर जंतूचा लेख नुकताच वाचला. आधी वाचला असता तर कदाचित इथे लिहिला नसता. फार छान लेख.

प्रमोद

धन्यवाद

धन्यवाद. किंचित दुरुस्ती करतो:

या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ३० नावाजलेल्या चित्रकारांच्या चित्राचे एक प्रदर्शन घेऊन महाराष्ट्रातील आठ प्रमुख शहरात (मुंबई, पुणे सोडून) ते फिरले.

हे प्रदर्शन पुण्यातही भरले होते. एस्.एन्.डी.टी. महाविद्यालयात ते सुमारे वर्षभरापूर्वी भरले होते. भारतातल्या समकालीन कलेत खूप वैविध्य आणि सामर्थ्य आहे. त्यातले निवडक वेचून काढणे हे फार कठीण काम आहे. ते पाहता यातली चित्रकारांची निवड ही अतिशय संतुलित आणि समाधानकारक वाटली होती. अनेक दिग्गजांसोबत ताज्या दमाचे कलाविष्कार पाहून आनंद झाला होता.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

हे चुकलेच

पुणे शब्द लिहिताना थोडासा शंकित होतो. तुम्ही शंका दूर केल्याबद्दल धन्यवाद.
प्रमोद

 
^ वर