राधा - भक्त का प्रेयसी

घरच्या वास्तुशांतीच्या दिवशी अनेक भेटवस्तू मिळाल्या. त्यात एक राधा-कृष्णाची फ्रेम पण मिळाली होती. त्यामध्ये श्रीकृष्ण राधेपेक्षा उंच दिसत होते, हातात बासरी होती आणि राधेनी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवले होते. फ्रेम बघून माझ्या पाच वर्षांच्या भाच्यानी मला लगेच विचारलं, "राधा ही कृष्णाची 'गर्ल फ्रेंड' होती ना?" मी एकदम दचकले. "नाही रे, राधा ही कृष्णाची खूप मोठी भक्त होती." या माझ्या उत्तरावर शांत न बसता त्यानी पुन्हा एक शंका विचारली - "पण माझ्या वर्गातले मित्र म्हणतात, ते दोघं 'गर्ल फ्रेंड- बॉय फ्रेंड' होते!". "अरे नाही म्हंटलं ना, राधा एक श्रेष्ठ भक्त होती श्रीकृष्णाची" असं सांगून नंतर मी त्याचं लक्ष दुसरीकडे वेधलं.

मला मात्र त्या दिवसापासून चैन पडत नव्हतं. ज्यांनी 'भागवत' ग्रंथ वाचला, ऐकला आहे आणि ज्यांनी श्रीकृष्णाच्या आयुष्यावर अभ्यास केला आहे अशा अनेक जणांना मी एक प्रश्न विचारला - "श्रीकृष्णांनी गोकुळ सोडले तेव्हा त्यांचे वय काय होते आणि रासक्रिडा ही त्याच्या आधीची ना?" यावर सगळ्यांकडून मला असे उत्तर मिळाले की श्रीकृष्णांच आयुष्य साधारण १२० ते १२५ वर्षांचे होते. त्यातील ८ ते १० वर्षांचे असेपर्यंत ते गोकुळ आणि वृंदावन मध्ये होते. साधारण वयाच्या १०व्या वर्षी त्यांनी कंसाचा वध केला. गोप-गोपींबरोबरची रासक्रिडा ही त्याच्या आधीचीच. रासक्रिडेनिमित्त लहान वयातील श्रीकृष्णाच्या सहवासात गेल्याने गोपिकांच्या मनातील विकार नाहीसे होऊन त्यांना आध्यात्मिक आनंद मिळाला. ८व्या वर्षी गोकुळ सोडल्यानंतर श्रीकृष्णांनी रासक्रिडा कधीही केली नाही"यावरून ही गोष्ट तर नक्की की श्रीकृष्ण जेव्हा गोपींबरोबर खेळायचे तेव्हा त्यांचं वय साधारण ८ पेक्षा कमी होतं आणि इतर गोपी या निश्चितच तरूणी होत्या. गोपींचं श्रीकृष्णवर खूप प्रेम होतं हे जे म्हणतात ते प्रेम 'भक्त-देव' या अर्थानी होतं.

आजच्या तरूण पिढीला 'राधा-कृष्ण' किंवा 'कृष्ण आणि गोपी' य नात्यांबद्दल काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी नंतर एक सर्वेक्षण केलं त्यावरून मी खात्रीनी सांगू शकते की आजच्या तरूण पिढीमध्ये या नात्यांबद्दल खूप गैरसमज पसरले आहेत. आजच्या तरूण-तरूणींकडून 'राधा-कृष्ण' या नात्याबद्दल हे विचार आले -

१. राधा गोकुळातील एक गोपी होती. राधा आणि कृष्ण हे 'प्रियकर-प्रेयसी' होते.

२. ते दोघे खूप प्रेमात होते पण, दुर्दैवाने लग्न नाही झाले.

३. दोघांनी लग्नही केलं होतं पण कोणाला सांगितलं नव्हतं!

4. ते दोघं 'लिव्ह इन रिलेशनशीप' मध्ये होते

एवढचं नाही तर जेव्हा 'लिव्ह इन रिलेशनशीप' साठी आपल्या देशात परवानगी मिळाली तेवा कोर्टाकडून याला जी पुष्टी मिळाली ती अशी -

'The court said even Lord Krishna and Radha lived together according to mythology. '

--- http://timesofindia.indiatimes.com/india/Live-in-relationship-pre-marita...

आज अनेक नाटक, चित्रपट, गाणी, मालिका यात सर्रास दाखवलं जातं की श्रीकृष्ण बनलेला पुरूष (मोठ्या वयाचा) इतर गोपींची (त्याच्याच वयाच्या) छेड काढत आहे. वास्तविक पाहता असे दाखविणे पूर्णपणे चूक आहे. रासक्रिडा जर दाखवायचीच असेल तर कृष्ण म्हणून ८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा व गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावे. श्रीकृष्ण यांची प्रत्येक कृती, त्यांचा प्रत्येक निर्णय हे आपल्यासाठी आदर्शांचा मोठा ठेवा आहे. 'त्यांनी अत्यंत लहान वयात त्यांच्या आईच्या वयाच्या गोपींची खोडी काढली' याचा चुकीचा अर्थ घेऊ नये. व आपल्या मुलांनाही ते समजावून सांगावे नाहीतर त्यांचा गैरसमज होऊन 'ही चुकीची गोष्ट जर देव करू शकतो तर आपण का नाही' असा विचार करून युवापिढी उद्या बिघडायला लागली तर तेव्हा त्यांना दोष देण्यात अर्थ राहणार नाही.

लेखनविषय: दुवे:

Comments

असहमत

वास्तविक पाहता असे दाखविणे पूर्णपणे चूक आहे. रासक्रिडा जर दाखवायचीच असेल तर कृष्ण म्हणून ८ पेक्षा कमी वय असलेला मुलगा घ्यावा व गोपी मोठ्या घ्याव्यात आणि त्यांच्यातलं प्रेम वेगळ्या प्रकारे (भक्ती युक्त) सादर करावे.

भागवत पुराणाचे लेखक मरून ६० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. आता कोणीही डेरिवेटिव कला बनवू शकते.

एवढचं नाही तर जेव्हा 'लिव्ह इन रिलेशनशीप' साठी आपल्या देशात परवानगी मिळाली तेवा कोर्टाकडून याला जी पुष्टी मिळाली ती अशी -

'The court said even Lord Krishna and Radha lived together according to mythology. '

--- http://timesofindia.indiatimes.com/india/Live-in-relationship-pre-marita...

अपील टू रिलिजन! (अपील टू नेचर च्या धर्तीवर)

राधा

राधा हे केवळ कल्पित पात्र आहे. तिचा महाभारताशी किंवा कोणत्याही ऐतिहासिक घटनेशी संबंध नाही. भागवतपुराणातील कथाही कल्पित आहेत. त्यात फारसा सत्यांश नाही. अशा ललित लेखनात रासक्रिडा करण्यासाठी व्यक्ती ८ वर्षांची असो किंवा ८० वर्षांची त्यात फारसा फरक पडत नाही. लेखनाचे इंटरप्रिटेशन लोक वेगवेगळ्या काळानुसार वेगवेगळे करतात आणि हे काही आजचेच नाही.

मुघलकालीन राधा-कृष्णाची चित्रकारी तपासून बघावी. त्यात कृष्ण आणि राधा यांच्या वयात विशेष फरक दिसत नाही. त्यांच्या पोजेसही प्रियकर-प्रेयसीप्रमाणेच आहेत.

तेव्हा, जर मुले म्हणत असतील की राधा कृष्णाची गर्लफ्रेंड होती तर विशेष चुकीचे नाही. गर्लफ्रेंड याचे सखी असे इंटरप्रिटेशन तुम्ही समजावून सांगा.

बाकी,

२. ते दोघे खूप प्रेमात होते पण, दुर्दैवाने लग्न नाही झाले.

३. दोघांनी लग्नही केलं होतं पण कोणाला सांगितलं नव्हतं!

4. ते दोघं 'लिव्ह इन रिलेशनशीप' मध्ये होते

हे छान आहे. कर्णावर भाळलेली द्रौपदी हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. माझ्यामते 'नो बिग डील', अशाप्रकारे गोष्टी तयार व्ह्यायच्याच. आपल्याला हवे ते आपण घ्यावे.

राधा कृष्ण

मला असे वाटते की भागवत हे देखील महाभारताएवढे पुरातन आहे. (लेखन काल जवळचा असावा.)
महाभारतात कृष्णलीला नसल्या तरी भागवतात आहेत. कदाचित दोन्ही ऐतिहासिक तथ्यांश असलेल्या कल्पित कथा आहेत.

राधा ही कृष्णाची प्रेयसी आहे असे परंपरा मानते. तिला एक नवरा होता (ही भागवतातली गोष्ट आहे का नाही हे माहित नाही.) या अर्थी त्यांचे विवाहबाह्य संबंध असावेत. (प्लेटॉनिक?)
अशाच प्रकारच्या भक्तिला मधुरा भक्ति म्हणतात (कृष्णाची प्रियकर म्हणून आराधना करणे.) मीरा, चैतन्यमहाप्रभू हल्ली प्रकाशात आलेले उ.प्र.चे एक माजी पोलिस अधिकारी हे सर्व अशा मधुरा भक्तिपंथातले. प्रियकर -प्रेयसी, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड हे कदाचित समानार्थी शब्द असतील.

प्रमोद

लेख आणि प्रतिसाद वाचतो आहे

लेख आणि प्रतिसाद वाचतो आहे.

तेवढ्यात इरावती कर्वे यांचा "(विठ्ठल माझा) बॉयफ्रेंड" हा लेख आठवला. सखोल तरी खेळकर असा लेख आहे.

राधा-कृष्णांबद्दल ज्या लोककथा आहेत, त्यांच्यात कृष्णाचे वय आदमासे किती आणि राधेचे वय आदमासे किती होते?

वय

राधा-कृष्णांबद्दल ज्या लोककथा आहेत, त्यांच्यात कृष्णाचे वय आदमासे किती आणि राधेचे वय आदमासे किती होते?

आपल्या पुराणांत वये नमूद करण्याची फारशी फॅशन नव्हती. ;-) परंतु कृष्ण आणि राधेच्या वयात खूप फरक असावा असे काही वाचनात आलेले नाही. त्यावरून ते समवयस्क असावे असे वाटते.

राधेचे लग्न अनय या गोपाळाशी झाले होते. काही कथांमध्ये अनयला राधेचे कृष्णप्रेम पसंत नसल्याचे वगैरे दाखले येतात परंतु त्या राधेप्रमाणेच कपोलकल्पित असाव्या. भागवत पुराणांत येणारे राधेचे दाखले हे नंतर भरलेले आहेत असे मत वाचले आहे. हे दाखले जयदेवच्या गीतगोविंदनंतर भरले गेले असावे.

एकंदरीतच राधाकृष्ण वगैरे प्रकाराला महाकाव्याचे किंवा भागवत पुराणाचेही खूप अधिष्ठान नाही. भक्तीयोगाचा प्रसार करण्याचा राधा-कृष्ण प्रेम हे एक बळकट मार्ग बनले इतकेच.

----

अवांतरः लहानपणी मला राधा आणि मीरा समकालिन वाटायच्या. कुठलेतरी गाणे होते ना 'राधा का भी श्याम वो तो मीरा का भी श्याम....' त्यावरून.

मलापण ते गाणे

मलापण ते गाणे...
(मूळ चर्चा निवल्यावर या रोचक अवांतराबाबतीत प्रतिसाद-साखळीसाठी जागा राखून ठेवत आहे.)

मलाही वाटते मुलींबद्दल आकर्षण वाटून खोड्या काढाव्या, असे कृष्णाचे वय लोककथांत असावे (म्हणजे १२-१८? - काही पिढ्यांपूर्वी २० वर्षांच्या पुरुषांचे लग्न-नोकरी-मुले वगैरे स्थिरस्थावर झालेले असायचे वाटते.) आणि राधेचे वय कृष्णाशी मैत्री करण्याचे असावे. (म्हणजे ८-१६ दरम्यान असावे, अशी मी कल्पना करतो. अगदी लहान वयाच्या मुलीसुद्धा अतिशय कष्टाची कामे करतात, असे आपल्याला खेडेगावांत दिसते. आणि अगदी हल्लीहल्लीपर्यंत या वयाच्या मुली लैंगिक आकर्षणासाठी योग्य मानल्या जायच्या. मला वाटते याबाबत १२-१३ वर्षे हा आकडा रामजोशाच्या लावण्यांमध्ये येतो. माझ्या आज्या-पणज्यांपैकी काहींची लग्ने १०-१२व्या वर्षी झाली, आणि पैकी एका बाईंना १२-१३व्या वर्षी पहिले मूलही झाले.)

वय पुढे चालू

मलाही वाटते मुलींबद्दल आकर्षण वाटून खोड्या काढाव्या, असे कृष्णाचे वय लोककथांत असावे (म्हणजे १२-१८?

कृष्ण जन्मजात खोडकर. त्याने आईच्या खोड्या काढल्या, गावातल्या लोकांच्या खोड्या काढल्या, कालियाची खोड मोडली तो पोरीसोरींना सोडेल काय? :-) पण वर चर्चाप्रस्ताविका म्हणते की सुमारे ८ वर्षांचा असताना कृष्णाने वृंदावन सोडले असे कृष्णकथा म्हणते. तेथून त्याने कंसाचा वध केला, उग्रसेनाला गादीवर बसवले, त्यानंतर बहुधा कृष्ण-बलरामांच्या मुंजी झाल्या. ते सांदिपानींच्या आश्रमात गेले. तेथे कृष्णाने १४ विद्या-६४ कला अवगत केल्या आणि नंतर जरासंधाच्या भीतीने मथुरा आणि वृंदावन सोडले अशी कथा जाते. तेव्हा टिनेजर कृष्णाने गोपींसोबत रासलीला कधी केली हा प्रश्न पडतो. :-)

राजस्थानी आणि मुघल चित्रकारीमध्ये गोपी आणि कृष्ण किमान टिनेजर्स आहेत असे दिसते. :-)

कृष्णाच्या कथा इतक्यावेळा बदलल्या आहेत की त्याला वयाचे गणित लावत बसणे त्रासदायक आहे. तेव्हा जे आहे ते निमूटपणे स्वीकारावे आणि गोड मानून घ्यावे अशी गत आहे.

असो.

मूळ चर्चा निवल्यावर या रोचक अवांतराबाबतीत प्रतिसाद-साखळीसाठी जागा राखून ठेवत आहे.

उपप्रतिसाद दिल्याने मूळ प्रतिसाद बदलता आला नाही तरी आणखी उपप्रतिसादातून लिहिता येईलच. हे रोचक अवांतर काय असावे असा प्रश्न पडला. :-)

चुकीचे आदर्श

महाभारत कथेच्या अनुसार एकही व्यक्ती(विदुर वगैरे अपवाद वगळता) अशी नाही जिचे वर्तन आदर्श असे मानले जाऊ शकते. हे माझे वयक्तिक मत आहे. त्यामुळे महाभारत किंवा त्यातील कोणच्याही पात्राकडून रूढ नैतिक शिकवण मिळते का असे विचारल्यास त्याचे उत्तर नाही असेच येईल.

त्याहीपलीकडे तथाकथित देवाचा दर्जा (सुपर पावर) असलेल्या माणसाला साधारण माणसाने फॉलो करणे चुकीचेच होय, पण तशी सवय मोठेच लहानांना लावतात त्यामुळे असा आक्षेप घेणे चुकीचे ठरेल.

>>आपल्या मुलांनाही ते समजावून सांगावे नाहीतर त्यांचा गैरसमज होऊन 'ही चुकीची गोष्ट जर देव करू शकतो तर आपण का नाही' असा विचार करून युवापिढी उद्या बिघडायला लागली तर तेव्हा त्यांना दोष देण्यात अर्थ राहणार नाही.

हेच ते कारण आहे, आदर्श, समाजातील व्यक्ती असावी. देव किंवा रंजक कथेतील पात्रे हि केवळ रंजकतेसाठी किंवा त्यातील काव्य-रस-ग्रहण करण्यासाठी वापरावी.

टीप

महाभारत कथेच्या अनुसार एकही व्यक्ती(विदुर वगैरे अपवाद वगळता) अशी नाही जिचे वर्तन आदर्श असे मानले जाऊ शकते.

सहमत आहे पण एक टीप ऍड करते. राधा महाभारतात नाही असे वाटते आणि कृष्णही राजकारणी म्हणूनच अधिक दिसतो. चू. भू. दे. घे.

मान्य

मान्य, मी रिवर्स इन्जिनिअरिन्ग करून कृष्णाच्या राधा-दिवसात गेलो :प एक वाट वाकडी.

हे आवडले!

२. ते दोघे खूप प्रेमात होते पण, दुर्दैवाने लग्न नाही झाले.

आणि
4. ते दोघं 'लिव्ह इन रिलेशनशीप' मध्ये होते

हे फारच आवडले.

असो. लहान मुलांना राधा ही कृष्णाची मैत्रिण होती, लहानपणी कृष्ण तिचा बेस्ट फ्रेंड होता (!), असे काही पुराणांमध्ये/जुन्या गोष्टींमध्ये आहे, असे म्हटले तरी बहुदा कळेल.

राहता राहिला रासक्रीडेचा प्रश्न. याबाबतीत रिटे यांच्याशी सहमत! ज्याला जे उमजेल तसे त्याने करावे. कलेच्या क्षेत्रात वेगवेगळे प्रयोग चालतच असतात ते उत्तमच असते.

वर अवांतर झाले आहे - त्यात एक भर. मला लहानपणी गाणे आवडायचे नाही ते म्हणजे - घन निळे रात निळी कान्हाही निळा.. झुलतो बाई रास झुला. (बहुदा चित्रपट जानकी, त्यात श्रीराम लागू आणि सीमा होते. व्हिलन रमेश देव होता का? आठवत नाही. गाणे सीमाच्या मुलीवर चित्रित आहे. गाणे चांगलेच आहे, पण चित्रपट मला फारच घाबरवून गेला होता, त्यामुळे गाणेही आवडत नसे. नेमके तेच आठवले).

सर्वेक्षण खरच बोल़कं आहे.

'त्यांनी अत्यंत लहान वयात त्यांच्या आईच्या वयाच्या गोपींची खोडी काढली' याचा चुकीचा अर्थ घेऊ नये.

ह्या बद्दल माझ्या मनात शंका आहे की त्यांच्या बरोबर खेळणार्‍या गोपी कदाचित त्यांच्याच वयाच्या असु शकतात कारण त्या काळी ही लहान वयातच लग्न करण्याची प्रथा असु शकेल किंवा नसेलही पण मी एक शंका उपस्थित केली.राधा सुद्धा त्यांच्याच वयाची असेल त्यामुळे त्यांच्या बरोबर ती एक मित्र म्हणुन बघत असेल् खर तर त्यांच्या मैत्री चा अर्थ हा त्यांची मैत्री दाखवणार्‍यांनी खुप वेगळाच दाखवला!

(या विषयामुळे आलो)

राधा कृष्णाची भक्त आहे
गर्लफ्रेंड ही आहे
दोघे समवयस्क असल्याचा उल्लेख कथांमध्ये येतो

भक्तीच्या सर्व प्रकारांमधली सर्वोच्च अशी भक्ती ही गोपींनी केली होती
- इति भागवत
भक्तीमध्ये भगवंतांबरोबर जे ५ वेगवेगळे संबंध प्रस्थापित करता येतात त्यातील सर्वोच्च म्हणजे माधुर्य रस किंवा मधुरा भक्ती
(इतर रस हे वात्सल्य , साख्य , शांत , दास्य हे होत )

कृष्ण ८ वर्षाचे असताना रास क्रीडा केली असे भागवतात (म्हणजे १०व्या स्कंधात, अध्याय २५ ते ३० मध्ये कुठेसे ) सांगितले आहे , या गोपी त्याच वायाच्याआ होत्या

आपल्या नजरेला ते चुकीचेच दिसणार

मन स्वच्छ, निर्मल झाल्यावर नाही (यावर कदाचित सार्वत्रिक असहमती दिसून येईल )

राधे चे लग्न अभिमन्यू नावाच्या गोपालाशी झालेले ही वाचले आहे (भागवतात नाही)
राधेचा उघड उघड उल्लेख भागवतात नाही , गोपींचा मात्र आहे . त्यातील एक गोपी प्रधान असल्याचा ही नामानिराळा उल्लेख आहे
महाभारतात ही राधेचा उल्लेख नाही
सांकेतिक उल्लेख आहेत. भागवतात "आराधितो" हा एकच शब्द तिच्या नाम निर्देशानासाठी वापरला आहे. इतर कुठेही राधा असा उल्लेख नाही
भागवत हे देखील महाभारताएवढे पुरातन आहे. (लेखन काल जवळचा - ५००० वर्षांपूर्वीचा .)

मात्र अगदी भगवद्गीतेमध्ये ही तिचा सांकेतिक उल्लेख असल्याचे दाखले आपल्याला मिळू शकतात (उदा.: केशव हा राधेचा केशसंभार बांधणाऱ्याचा ( कृष्णाचा ) उल्लेख आहे. )
rational thinking नुसार पुराणातल्या गोष्टी ह्या अगम्य किंवा / आणि / म्हणून कल्पित वाटतात

एकंदरीतच राधाकृष्ण वगैरे प्रकाराला महाकाव्याचे किंवा भागवत पुराणाचेही खूप अधिष्ठान नाही असे वर म्हटले आहे
>> कृपया आपले मत पुन्हा तपासून पहा . भागवतानुसार हे सर्वोच्च मानले गेले आहे. आपण भागवताला कल्पित मानत असाल. राधा कृष्ण प्रकाराला ही मानत नसाल. पण "भागवत पुराणाचेही खूप अधिष्ठान नाही. " हे मात्र चुकीचे विधान आहे.

रामाचे जसे चारित्र्य होते (निष्कलंक , एकबाणी , एक वाचनी , एक पत्नी .....) तसे कृष्णाचे नाही , म्हणून
रामाच्या लीलांना अनुकरणीय म्हणतात
तर कृष्णाच्या लीलांना अनुसरणीय
हे आदर्श समजून कसे घ्यायचे / यातून काय शिकायचे यात फरक आहे. रामाने जे केले तसे करायचा प्रयत्न करावा. कृष्णाच्या भक्तांनी जशी भक्ती केली तशी त्याची भक्ती करायचा प्रयत्न करावा असा ढोबळ मानाने फरक म्हणता येईल.
मग महाभारतात विदुराबरोबरच इतर अनेक आदर्श दिसू शकतील
(महाभारता इतके विवादास्पद दुसरे काही नसावे, त्यामुळे हे कठीण हे मान्य )
महाभारत आणि रामायण आणि इतर विषय हे माझ्या आवडीचे असल्याने आज लिहिण्याचा (सफल) प्रयत्न केला ( संगणकावर मराठीत लिहिणे नवीन असल्याने अडचण येते आणि शुद्ध करता करता दमछाक होते ) ((या विषयामुळे आलो) हे उपक्रमींवर उपकार करतो आहे असे बोल नसून मला उपरती झाल्याचे द्योतक आहे. उलट मीच उपकृत झालो आहे. <इतके दिवस मी नुसताच वाचायचा०>

-बोलवित्या धन्याचा बोलका
यश

+१

rational thinking नुसार पुराणातल्या गोष्टी ह्या अगम्य किंवा / आणि / म्हणून कल्पित वाटतात

म्याटर खतम!

+१

म्याटर खतम!

एग्जॅक्टली. ;-)

राधाकृष्ण वगैरे प्रकाराला महाकाव्याचे किंवा भागवत पुराणाचेही खूप अधिष्ठान नाही असे वर म्हटले आहे
>> कृपया आपले मत पुन्हा तपासून पहा

कृपया आपण जे वाचता ते एकदा तपासून पहा. जर महाभारतात आणि भागवतात राधाच फारशी नाही तर राधा-कृष्णाचे अमर प्रेम कुठून येणार?

असो. उपक्रमावर स्वागत आहे. लिहित चला फक्त लिहिताना इतर काय म्हणतात ते समजून घेत चला.

खतम म्याटर वर थोडी मूठ माती

महाभारतात आणि भागवतात राधाच फारशी नाही तर राधा-कृष्णाचे अमर प्रेम कुठून येणार?

अहो, तसे नाही हो. राधेचा नावानिशी उल्लेख नाही. पण

तुम्हाला राधा, कृष्ण, लीला वगेरे काल्पनिक वाटत असेल, तर त्यात आणखीन एका कल्पनेची भर घालतो.
भागवत सांगणारे शुकदेव मुनी हे मूळ स्वरूपी "शुक" म्हणजे पोपट. वृन्दावनातले. राधेचे नाव घेतले तर आपल्याला तिच्या आठवणीने भावनांचे भरते येणार (कथेत व्यत्यय येणार) असे वाटल्याने त्यांनी तिचे नाव घेतले नाही. कथाच ती. त्यात ही गोष्ट ही फिट बसते.
पण गोपींनी जशी कृष्णाची भक्ती केली ती सर्वोत्तम असे पदोपदी म्हटले आहे. उदा. गोपी गीत घ्या, उद्धवाचे गीत घ्या वगेरे वगेरे. गोपींमध्ये राधा ही "सबसे बडी" हे इतर सूत्राद्वारे समजते.
म्हणून त्या "वगेरे प्रकाराला" शास्त्रीय अधिष्ठान आहे असे म्हटले.
जर तुम्ही एखादे फिक्शन इवाल्युएट करत असताल तर ते नको का तर्कसंगत? तसे हे सारे त्या कथांमध्ये फिट बसते. (म्हणजे अधिष्ठानाबद्दल बोलतोय)
असल्या कथा पुष्कळ आहेत. फिक्शन् समजून वाचल्या तरी मनोरंजन होते.

रीलेटीव्ह रॅशनल थिंकिंग

rational thinking नुसार पुराणातल्या गोष्टी ह्या अगम्य किंवा / आणि / म्हणून कल्पित वाटतात

म्याटर खतम!

रीलेटीव्ह रॅशनल थिंकिंग असा शब्द वापरायला हवा होता.

अहो मी "वाटतात" लिहिले आहे ना!

(बचावाला जागा ठेवली आहे हो)

भागवत

भागवताबद्दल अधिक माहिती मिळेल का? (कदाचित स्वतंत्र धागा काढून.)
माझी अशी समजूत होती की भागवत आणि महाभारत हे साधारण एकाच वेळी लिहिले गेले. फक्त तो काळ इसवी सनानंतरच्या पहिल्या काही शतकातला आहे. त्यातील भाषेवरून हे अनुमान केले असणार.

हल्लीच वाचलेल्या पुस्तकात भारतातील लेखन कले विषयी वाचले होते. त्यात त्यांनी त्याचा उगम इ.स.पूर्व ६०० वर्षे असा घातला आहे. (तत्पुर्वीचे शिलालेख सापडत नाहीत यावरून असेल. )
भागवत आणि महाभारत ५००० वर्षांपूर्वी लिहिले गेले आहे असे तुमचे मत वाचले. म्हणजे वेदकाला पूर्वी? का वेद त्याही पूर्वीचे? तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल.

भागवताबद्दल कुठली प्रत अधिकृत म्हणून आहे का? (जशी महाभारतावर भांडारकरी प्रत समजली जाते.) कुठे वाचायला मिळेल का?

'राधेबाबत' केशव नावावरून राधा नावाचा उलगडा होत नाही असे मला वाटले. आराधनेत राधा आहे. याची व्युत्पत्ती जाणून घ्यायला आवडेल. (मूळ कोणी केली वगैरे.) राधेचा उल्लेख महाभारतात वा भागवतात नाही. मग पहिला उल्लेख कुठल्या ग्रंथात मिळतो? कृष्णाचे कंसवधाच्या वेळी काय वय होते? याबाबत भागवतात काय उल्लेख आहे. (का आठच होते.)

प्रश्न जरा जास्त विचारल्याबद्दल माफ करा. पण तुमच्या प्रतिसादामुळे उत्सुकता ताणली गेली आहे.

प्रमोद

धागाच काढावा म्हणतो

गीतेमध्ये वापरलेल्या नावांचे किंवा संबोधनांचे स्पष्टीकरण मागे ऐकले होते
केशव = केशी ला मारणारा हा एक अर्थ आहे, वृन्दावनात राधेची केश रचना करणारा हा दुसरा अर्थ आहे. (का वापरला वगेरे चे स्पष्टीकरण अवांतर हो ई ल )
वार्ष्णेय हा वृष्णी कुलाचा म्हणून उल्लेख
वगेरे वगेरे

वय : ८-१० च होते.

तूर्त: सारे व्यासांनी "लिहिले" किंवा लिहून घेतले. महाभारतातील घटना घडल्या त्या ५००० वर्षांपूर्वी असा उल्लेख आहे त्यात. भागवत हे अभिमन्यु च्या मुलाला सांगितले गेले (म्हणजे तेव्हाच, थोडेसे नंतर).

अधिकृतः श्लोक कुणी बदलले असे ऐकिवात नाही. भागवतावर टीकाच तेवढी विवादास्पद.

शंका

दुर्योधनाच्या दातृत्वाविषयी तुमचे मत जाणण्याची माझी इच्छा आहे.

प्रश्नांची उत्तरे

'केशव' नावावर एक कूटप्रश्नात्मक श्लोक आहे (नक्की श्लोक आठवत नाही.) त्यात केशव म्हणजे कुणाचे तरी शव असा अर्थ लावावा लागतो. केशव हे केशी पासून झालेले रूप आहे. (जसे माधव) त्यात केशसंभार करणारा असेल तरी राधेचा कशावरून? तुमचा असा दावा असूनही माझे त्याविरुद्ध मत पडले.

भागवत हा ग्रंथ कधी लिहिला? (गोष्ट कधी झाली हा वेगळा प्रकार.) तुमचे मत असे दिसते की जनमेजयाला (अभिमन्युचा नातू मुलगा नाही.) सांगितले म्हणून त्याचा काळ हा महाभारत युद्धाच्या काळानंतर काहीच वर्षात लिहिले गेले आहे. त्यातील भाषा ही नंतरची आहे म्हणून त्याचा लेखन काल हा इसवी सनानंतरचा धरला जातो. वेदांची संस्कृत भाषा ही नंतरच्या संस्कृतपेक्षा खूप वेगळी आहे. वेद हे इ.स. पूर्व १५००-१००० (हा काळ मी आठवणीने सांगतो आहे.) बोलले गेले आहेत असा अंदाज आहे. ते पूर्वी मौखिक वाङ्मय होते. नंतर लेखनकलेच्या उदयापासून त्यांचे लिखाण झाले असावे. इथेच प्रियालींनी यावर अधिक लिहिले आहे.

तुम्ही भागवत/वा महाभारत ग्रंथ जसे आहेत तसे पूर्ण सत्य म्हणून स्वीकारायचे या पंथातले वाटता. पण या पंथात भाषेव्यतिरिक्त अनेक अडचणी आहेत. त्यातील एक भेद म्हणजे हे ग्रंथ सर्वत्र सारखे नाहीत. म्हणजे एकाच ग्रंथाच्या जुन्या पोथ्या काढल्या तर त्यात भरपूर पाठभेद दिसतात. यातील कुठली पोथी ग्राह्य धरावी याचे उत्तर तुमच्या सारख्यांना द्यावे लागते. (म्हणजे सक्ति नसते. पण मग तुमचे म्हणणे कुणी मनावर घेणार नाही असे होईल.) याशिवाय गोष्टींच्या अडचणी असतात. म्हणजे महाभारतात एक गोष्ट असेल तर भागवतात दुसरी. त्यातील कुठली खरी मानायची?

महाभारतातील घटना घडल्या त्या ५००० वर्षांपूर्वी असा उल्लेख आहे त्यात.

असा उल्लेख कुठे आहे?

प्रमोद

समस्यापूर्ती

केशवं पतितं दृष्ट्वा पाण्डवा हर्षभारिता:| रुदन्ति कौरवाः सर्वे भो भो केशव केशव||

रुद/भो?

म्हणजे केशव पडला बघुन पाण्डव हसायला आणि कौरव रडायला (का भुंकायाला) लागले. असा अर्थ आहे का याचा. खुलासा अपेक्षित.
आय ऍम डॅम्न सिरीयस अबाऊट धिस क्वेष्चन.
-----------------------------------------------------------------------------------------------
शहाणे उवाच
आप्ल्याला झेपेल तेच करावे। चित्ती नसु द्यावे समाधान।

माहिती

कृपया येथे शेवटचा श्लोक पहा.

?

श्लोक का सुभाषित?

-----------------------------------------------------------------------------------------------
शहाणे उवाच
आप्ल्याला झेपेल तेच करावे। चित्ती नसु द्यावे समाधान।

श्लोकच

सुभाषित हे श्लोक असतेच, श्लोक हा सुभाषित नसू शकतो.
तो श्लोक हे कूटप्रश्नाचे उत्तर आहे, त्यात 'सु' भाषण काही नाही.

लेखनकला

महाभारत, वेद त्यांच्या रचना आणि लेखन यावर यापूर्वी उपक्रमावर अनेकदा लेखन झाले आहे. ते बहुधा प्रतिसादांतून असल्याने सध्या सापडत नाही पण ५००० वर्षे वगैरे काळ हा अयोग्य आहे हे सहस्रबुद्धेही जाणत असावेच. :-)

हल्लीच वाचलेल्या पुस्तकात भारतातील लेखन कले विषयी वाचले होते. त्यात त्यांनी त्याचा उगम इ.स.पूर्व ६०० वर्षे असा घातला आहे. (तत्पुर्वीचे शिलालेख सापडत नाहीत यावरून असेल. )

लेखनकलेचा उगम इ.स.पूर्व ६०० वर्षे हे योग्य. त्या आधीचे शिलालेख सापडत नाहीत हे ही योग्य पण केवळ शिलालेखांमुळे हा निष्कर्ष काढलेला नाही. त्याआधीच्या नाण्यांवर, मुद्रांवर, भांड्यांवरही अक्षरलिपीचे लेखन आढळत नाही. परंतु, सिंधूसंस्कृतीतून चित्रलिपी आढळते. इ.स.पूर्व ६०० वर्षांत बहुधा ब्राह्मी आणि खरोष्टी लिपी वापरात होती. दोन्ही लिपी इतक्या बाळबोध आहेत की त्यांत महाभारतासारख्या क्लिष्ट रचनेचे लेखन होऊ शकत नाही.

सर्व पुराणांचे लेखन गुप्तकाळात झाले. महाकाव्यांचे लेखनही त्याच सुमारास झाले असे मानले जाते. परंतु याचा अर्थ महाभारत आणि भागवत त्यापूर्वी अस्तित्वात नव्हते असा नाही. त्यांची रचना झालेली होती आणि मौखिक प्रसारही होत होता. जनमेजयाने महाभारत ऐकले आणि वैशंपायनांनी ते ऐकवले असे संदर्भ मिळतात. वाचून दाखवले असे नाही.

व्यासांनी गणेशाकडून महाभारत लिहून घेतले वगैरे भाकडकल्पना आहेत. खुद्द महाभारतात कोणत्याही लेखनाचे संदर्भ नाहीत. भांडारकर प्रतीत गणेशाने महाभारत लिहिले वगैरे बंडलबाजी काढून टाकलेली आहे.

तसे, सहस्रबुद्धे यांना याबाबत संदेह नसावा अशी अटकळ आहे तरीही काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ येथे देते.

संदेह

मुद्यांशी सहमत.

व्यासांनी गणेशाकडून महाभारत लिहून घेतले वगैरे भाकडकल्पना आहेत. खुद्द महाभारतात कोणत्याही लेखनाचे संदर्भ नाहीत. भांडारकर प्रतीत गणेशाने महाभारत लिहिले वगैरे बंडलबाजी काढून टाकलेली आहे.

तसे, सहस्रबुद्धे यांना याबाबत संदेह नसावा अशी अटकळ आहे तरीही काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या लेखाचा संदर्भ येथे देते.

मला तर उरलेल्यातही संदेह आहे. :)

प्रमोद

लिपी

या लिपींमध्ये अनेक शिलालेख सापडतात असे वाटते, तेव्हा या लिपी खूप बाळबोध नसाव्यात असे वाटते.

राधा - भक्त का प्रेयसी

शिवाजी सावंत यांची युगंधर हि कादंबरी वाचा त्यामध्ये त्यांनी राधा आणि श्रीकृष्णाचे नातं अचूकपणे सांगितले आहे असं मला वाटतं.

परिचय

संपूर्ण पुस्तक परीचयाच्या प्रतिक्षेत! ते नातेही विषद करुन सांगावे.
________________________________________________
अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला !

 
^ वर