भावनियंत्रण आणि बाजारव्यवस्था

सध्या माध्यमांमध्ये चर्चिला जाणारा एक विषय म्हणजे वाढती महागाई हा आहे. बहुतेकांचे असे मत दिसते की भाववाढीवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे आणि त्यासाठी अधिक माल आयात करणे, कररचना बदलणे, कमोडिटी मार्केटमध्ये फ्यूचर/ऑप्शनवर बंदी घालणे वगैरे उपाय सरकारने करायला हवेत.

मला व्यक्तिश: सरकारने भाववाढ आटोक्यात आणावी हे म्हणणे पटले होते. परंतु मी त्यावर अर्थशास्त्राच्या दृष्टीकोनातून विचार केला तेव्हा मला वाटत असलेले भाववाढ आटोक्यात आणावी हे मत चुकीचे असल्याचे वाटू लागले.

इतकेच नव्हे तर भाववाढ नियंत्रण करावे हे माझे मत समाजवादाचे आपल्यावर जे ४० वर्षे संस्कार झाले त्यातूनच आलेले होते हेही लक्षात आले. म्हणून मला जाणवलेले अर्थशास्त्रीय विचार खाली देत आहे.
---------------
सध्याच्या (जागतिक) विचारसरणीनुसार मार्केट हे स्वतःच अशा गोष्टींवर नियंत्रण मिळवते. सध्या भाव वाढत आहेत कारण वाढलेल्या भावाला जिन्नस विकत घेणे ग्राहकांना परवडत आहे. ग्राहकांना नसेल परवडत तर साहजिकच मागणी कमी होऊन भाव उतरतील. किंवा हे भाव टंचाईमुळे वाढलेले असतील तर जेव्हा टंचाई दूर होईल तेव्हा भाव उतरतील. बाजाराच्या इक्विलिब्रियमपेक्षा कृत्रिमपणे भाव कमी करण्याचा सरकारने प्रयत्न करणे म्हणजेच पोथीनिष्ठ समाजवाद. तो तर आपल्याला नको आहे कारण तो विकासाच्या आणि प्रगतीच्या आड येतो. प्रगतीच्या आड येतो हे म्हणणे खरे असल्याचे पूवी समाजवादी धोरणे असतानाची भारताची प्रगती आणि समाजवादाला क्रमशः सोडचिठ्ठी दिल्यानंतरची प्रगती यांची तुलना केल्यास सहज स्पष्ट होते.

-------------

या बाजाराभिमुख धोरणामुळे काही लोकांना कांदा खाणे शक्य होणार नाही. पण बाजारव्यवस्थेत ते आपण अटळ म्हणून स्वीकारले पाहिजे. मलासुद्धा रोज बासमती तांदुळाचा भात खाणे शक्य होत नाही. म्हणून सरकारने बासमती तांदूळ सर्वांना परवडेल असा हस्तक्षेप बाजारात करावा असे म्हणणे योग्य नाही. मला बासमती खाता येत नाही कारण बासमती तांदुळाचा भात खाण्याची माझी लायकी नाही हेच खरे नाही का?

पुढे असेही होईल की मला बासमतीच काय कोणताच तांदूळ परवडेनासा होईल. माझी उपासमार होऊन मी मरून जाईन. माझ्यासारखेच इतर नालायकही मरून जातील. त्यामुळे समाजातल्या नालायकांची संख्या क्रमाने कमी होत जाईल. पुढे शिल्लक राहिलेला समाज अधिक लायक व्यक्तींचा असेल त्याने समाजाचा विकास अधिक वेगाने होईल. भविष्यात समाज बलवान व्हावा म्हणून आज माझ्यासारख्या नालायक व्यक्तींनी हा त्याग करायलाच हवा. नाहीतरी मी नालायक असल्यामुळे समाजावर ओझेच आहे.

--------------

आता काही लोक असा युक्तिवाद करतील की हे चढे भाव खरोखरची टंचाई असल्यामुळे वाढलेले नसून व्यापार्‍यांनी केलेल्या साठेबाजीमुळे वाढले आहेत. त्यावर मी असे म्हणेन की काय हरकत आहे? मागणी आहे म्हणून त्यांनी साठेबाजी केली असेल. त्यांनी मागणी नसताना साठेबाजी केली असेल तर त्याचे प्रायश्चित्त त्यांना लवकरच कोसळलेल्या भावांच्या रूपात मिळेलच.

---------------

कांद्याच्या किंवा इतर वस्तूंच्या वाढलेल्या भावांचा बाजारव्यवस्थेत कोणता फायदा होतो हेही आपण लक्षात घ्यायला हवे. गेल्या काही वर्षांत शेतीचा विकासदर खूप कमी राहिला आहे असे आपण म्हणतो. आता भाजीपाला, धान्ये डाळी वगैरेंचे भाव चढे राहिले तर नफ्याच्या आशेने या जिनसांच्या व्यापारात अधिक लोक उतरतील. पर्यायाने हे व्यापारी शेतकर्‍यांकडे अधिक जिनसांची मागणी नोंदवतील. ती पुरी न होऊ शकल्याने शेतकर्‍यांनाही चांगले भाव मिळू लागतील.

शिवाय व्यापारी अधिक श्रीमंत झाल्यामुळे ते बाजारात अधिक पैसा खर्च करतील त्यामुळे अधिक व्यक्तींना रोजगार मिळू लागेल.

भाव पडेल राहिले तर हे फायदे होणार नाहीत.

---------------

जीडीपी म्हणजे देशात विक्री केल्या गेलेल्या वस्तूंची एकूण किंमत असे असल्याने भाव चढत राहिल्याने जीडीपीची ग्रोथ डबल डिजिट मध्ये जाणे शक्य होईल.
(काही खोडसाळ इकॉनॉमिस्ट 'जीडीपी ग्रोथ इन रिअल टर्म्स' अशी भाववाढीचा दर वजा करून काढतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे).
---------------

लेट द मार्केट फोर्सेस डिसाईड हेच तत्त्व अंगिकारावे हे उत्तम.
---------------
वर लिहिलेल्या माध्यमातील चर्चांमध्ये असाही एक मुद्दा आढळतो की पूर्वी अशी भाववाढ नियंत्रणात न आणता आल्याने तत्कालीन सरकारांना सत्ता गमवावी लागली होती. त्यानुसारच बहुधा भाव नियंत्रणात आणणे हे सरकारचे कर्तव्य आहे असे उगाचच समजून सरकारही काही उपाय करीत आहे असे दिसते. सरकार बहुधा हे गरीब लोकांच्या मतांवर डोळा ठेवून करीत असावे. परंतु खरेतर सरकारने असा मतांसाठी अंतिम हिताचा बळी देणे योग्य नाही. कारण सरकारने भाव नियंत्रणात ठेवले तर हे (नालायक असल्यामुळे गरीब राहिलेले) लोक जिवंत राहतील आणि नालायकांचे प्रमाण समाजात तसेच राहील. म्हणून सरकारने भाव बाजारावरच सोडण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी.

Comments

बाजाराची मुक्तता

विचार पटले (तिरकसपणासकट). मला फक्त एवढंच वाटतं की एकदा बाजाराचा विचार करायला लागलं की सरकार हे काही तरी बाजाराबाहेरचं प्रकरण आहे हे पटत नाही. शेवटी एखाद्या पदार्थाची किंमत जनता (ग्राहक) त्यासाठी किती पैसा मोजायला तयार होते यावरून ठरते. जनतेची इच्छा जर सरकारद्वारे व्यक्त होत असेल तर ती तशी होण्यापासून प्रवृत्त करणे हा बाजाराच्या मुक्ततेवरच घाला आहे. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती मर्यादित करणे हे भाव वाढवण्यासाठी कांदे नष्ट करण्याइतकंच वाईट.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

हिण्डरन्स

>>सरकार हे काही तरी बाजाराबाहेरचं प्रकरण आहे हे पटत नाही.

सरकार हाच तर आदर्श बाजाराची तत्त्वे लागू करण्यातला हिंडरन्स आहे.

सरकारने फक्त लॉ ऍण्ड ऑर्डर सांभाळावी. इथे लॉ ऍण्ड ऑर्डर धोक्यात येऊ नये म्हणून मार्केट इंटरवेन्शन असा अर्थ लावणे योग्य नसावे तर लॉ ऍण्ड ऑर्डर सांभाळणे म्हणजे लोकांमध्ये असंतोष झाला तरी त्यांना आंदोलने करण्यापासून रोखणे, त्यांनी चिडून व्यापाराच्या ठिकाणांची नासधूस करू नये म्हणून बंदोबस्त करणे वगैरे व्यवस्था करणे हे योग्य होय.

लॉ ऍण्ड ऑर्डर धोक्यात येऊ नये म्हणून मार्केट इंटरवेन्शन असा अर्थ लावणे म्हणजे कल्याणकारी राज्याची संकल्पना. ही तर पुन्हा सबसिड्या, नियंत्रणे यांना आमंत्रण देणारी संकल्पना.

नितिन थत्ते

गरज

एकदा खुली बाजारव्यवस्था वैचारिक दृष्ट्या अंगीकारायची म्हटली की सरकार, सबसिड्या वगैरे संकल्पनांच्या अर्धचड्ड्या घालून फिरणं योग्य नाही. सर्वच मुक्त झालं पाहिजे. खर्‍या अर्थाने मुक्त बाजार जनता व सरकार यांना सामावून घेतो. तिथे पब्लिक गूड व प्रायव्हेट गूड असा फरकच नसतो. सगळं काही गूडच असतं. मग ती गुडं प्रोव्हाइड करण्यासाठी माल तयार करणारे कारखानदार, तो विकणारे अधिकृत दुकानदार, रस्त्यावरचे अनधिकृत विक्रेते, त्यांच्याकडून हप्ते घेणारे पोलिस, त्यांना काम मिळावं म्हणून चोर्‍या करणारे चोर, ते पोलिस सांभाळणारं सरकार असे सगळे विशाल मार्केटचेच हिस्से आहेत. खरंच, सरकारला हिंडरन्स म्हणणार्‍यांना गरजा व त्या पुर्‍या करणार्‍या सर्व्हिसेस म्हणजे काय हे नीट कळत नसावं. सरकार ही समाजाची गरज आहे. धार्मिक अफू ही गरज आहे तशीच.

मोकळेपणाचंच उदाहरण द्यायचं झालं तर दीडशे का दोनशे वर्षांपूर्वी मुंबईत स्टॉक मार्केट सुरू झालं ते कुठच्याशा मैदानात वेगवेगळ्या कंपन्यांच्या भागीदार्‍या विकणारे दलाल एकत्र भेटायचे त्यातून. आता ते दलाल स्ट्रीटवरच्या उत्तुंग पण बंद बिल्डिंगमध्ये भेटतात. या बिल्डींगची यंत्रणा व तिच्या भिंतींची बंधनं ही आभासी आहेत. तसंच सरकारचं आहे. मुक्त अर्थव्यवस्थेचं सरकार हे मूलभूत अंग आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

पटले नाही

जनतेची इच्छा जर सरकारद्वारे व्यक्त होत असेल तर ती तशी होण्यापासून प्रवृत्त करणे हा बाजाराच्या मुक्ततेवरच घाला आहे. त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती मर्यादित करणे हे भाव वाढवण्यासाठी कांदे नष्ट करण्याइतकंच वाईट.

'परावृत्त' असा शब्दप्रयोग गृहित धरतो आहे.

  1. तुम्ही दिलेले वर्णन 'प्रचलित' मुक्त बाजाराच्या कल्पनेत बसत नाही. "पलायनपि मिथ्या" हे ठिगळ लावावे लागले तर "जगन्मिथ्या" ही संकल्पना टाकाऊ ठरते.
  2. तुमचा युक्तिवाद अजून पुढे ताणला तर "सरकार बरखास्त करून झुंडीने दुकाने लुटली तरी ते फ्री मार्केटला चालते" असा निष्कर्ष निघतो.

ठिगळ

हा हा, परावृत्तच बरोबर आहे.

१. प्रचलित संकल्पना ठिगळ लावून वावरते असं म्हणायचं आहे मला.
२. अर्थातच. फ्री मार्केटचे अतिरेकी समर्थक 'दुष्काळात पाण्याची साठेबाजी करून पाणी सोन्याच्या भावाने विकायला काही हरकत नाही' असं म्हणतातच ना. तडफडून मरणारे मेले तर त्यांची हरकत नसते. मात्र हेच लोक सरकारने त्यांच्या दुकानाला संरक्षण दिलं पाहिजे म्हणतात तेव्हा गंमत वाटते (ठिगळ कोण लावतंय ते स्पष्ट होतं...) पण कायदा व सुव्यवस्था हे एक प्रॉडक्ट मानलं तर बाजार ते ग्राहकाला (जनतेला) पुरवण्यासाठी कंपन्या (सरकार) तयार करतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

फोल

मात्र हेच लोक सरकारने त्यांच्या दुकानाला संरक्षण दिलं पाहिजे म्हणतात तेव्हा गंमत वाटते

त्यात गंमत काय? ते लॉबी बनवतात, सरकारला विकत घेतात. तोही मुक्त बाजार आहे आणि त्यांना शिक्षा होणे हाही मुक्त बाजार आहे असे म्हटले तर शेवटी मुक्त बाजाराच्या व्याख्येखाली तुम्ही ठिगळे लावून समाजवादच सांगत आहात.

काही अंशी मान्य पण...

काही अंशी मान्य पण -

आता तुम्ही फक्त बासमती तांदळाचे उदाहरण दिले, अशा सगळ्याच जीवनावश्यक(व्याख्या रूढ अर्थाने) गोष्टींचे भाव आवाक्याबाहेर जायला लागल्यास -
१. हीच नालायक माणसे पटकन मारणार नाही, तर ती त्या गोष्टी इतर अनेक नालायक प्रकारे मिळवण्याचे प्रयत्न करतील, चोरी, दरोडे आणि इतर समाजविघातक कारवाया वाढतील आणि ह्या वाढीला तुमचे मार्केट फोर्सेस कारणीभूत असतील.
२. साठेबाजीचे आपण जे समर्थन केले तसेच समर्थन भेसळीचे देखील होऊ शकते, मार्केट फोर्सेस नैतिकतेचे धडे देत नाहीत तर भेसळ देखील चालू शकतेच,आणि मग त्या भेसळीचे परिणाम आपण वाचतो, अनुभवतो आहोतच.

मुळात समाजवादाचा उद्देश आणि मार्केट फोर्सेस चा उद्देश वेगळा आहे, प्रगतीसाठी मार्केट फोर्सेस गरजेचे आहेत तर काही अंशी सामाजिक शांतता टिकवण्यासाठी समाजवादाची गरज आहे, दोहोंचे मिश्रण योग्य प्रमाणात वापरणे हितकारक आहे असे वाटते.

अर्थशास्त्र

एके काळचे राजे रजवाडे आपल्या पदरी सूदसेयर्स (ज्योतिषी हा कदाचित जवळचा शब्द.) ठेवायचे. यांचे मुख्य काम राजा काही करायला लागला की ते भविष्याच्या दृष्टीने योग्य आहे असे सांगणे. अशीच जागा होयबा/भाट लोक घेतात. साम्यवादी राजवटीत 'आयडियोलॉग्ज' (राज्यकर्त्यांचे सर्व कसे अमुक विचारसरणीत बसते हे सिद्ध करणारी जमात.) अशीच भूमिका घ्यायचे. अर्थशास्त्री याच मुशीतले लोक असतात असे गमतीने म्हणता येते. अर्थशास्त्राच्या तत्वानुसार जवळपास कुठलेच भाकित करता येत नाही. (असे मला वाटते.) तेव्हा त्यांचे अर्थशास्त्रिय सल्ले एक म्हणणे म्हणून ऐकायचे. हल्लीची सरकारे बाजारपेठेच्या चांगुलपणात विश्वास ठेवत असल्याने हल्लीचे अर्थशास्त्रज्ञ त्याचीच री ओढताहेत.

अन्नपदार्थांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत/वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ते वाढताहेत, तुम्ही म्हटल्याप्रमाणे शेतीचा विकासदर कमी असल्याने ते वाढत आहेत वा नफेखोरांमुळे ते वाढले आहेत. यावर सरकारकडे काय अस्त्रे आहेत? एक सी आर आर, दोन व्याजदर, तीन धाडी, चार निर्यातबंदी, पाच आयात. यातील पहिली तीन अस्त्रे अन्न भाववाढीबद्दल उपयोगी नाहीत असे माझे मत आहे. पण सरसकट त्यांचा अवलंब करून सरकार काही करते असा आव आणते. निर्यातबंदी ही शेतकर्‍यांच्या हिताची नाही आणि आयात केलेला माल सबसिडीशिवाय विकता येत नसेल तर भाववाढ रोखता येणे अशक्य आहे.

सरकार यावेळी हतबुद्ध नसते. रेशनिंग (हल्ली येऊ घातलेली फुडकुपन्स) मार्फत गरिबांना स्वस्त धान्य पुरवठा सरकारला करता येतो. अर्थात भाव वाढले की सरकारचा बोजा वाढतो. पण याचा ताळमेळ घालून झळ कमी करता येते. जे गरीब नाहीत त्यांना मात्र बाजारभावाला तोंड द्यावे लागते. (कदाचित ते गरिबीत ढकलले जात असतील.)

एकेकाळचा माणूस अन्नधान्याच्या चढउतारामुळे होणार्‍या हानीविरुद्ध उपाययोजना करायचा. सुगीच्या वेळी पूर्ण वर्षाचा धान्यसाठा करून ठेवायचा. गरिबांना हे जमायचे नाही. आणि केवळ गरिबीमुळे जास्त पैसे मोजायला लागायचे. सरकारने असा साठा करून धान्यचढउतारापासून गरिबांचे रक्षण करणे हे फारसे जड नाही. पण त्याहीपलिकडे जाऊन करणे हे जड होऊ शकते.

तुमच्या मतातील तिरकसपणा जास्त आवडला.

प्रमोद

गमतीदार

गमतीदार लेखनशैली.

स्विफ्टच्या "नम्र प्रस्तावा"नंतर असे लेखन करणार्‍यापुढे अडथळा अतिरेकी उंचीचा झालेला आहे.

त्यातही अशी गंमत आहे, की यातील काही उपहासार्थ अतिशयोक्ती ही अंततोगत्वा तथ्यात्मक आहे - काही थोड्या लोकांकडे अन्न असेल, आणि भाडोत्री सरकार असेल, तर :
(१) भाडोत्री सरकार त्या थोड्यांचे रक्षण करण्यात यशस्वी होईल, आणि उपाशी लोक मरतील, किंवा
(२) भाडोत्री सरकार उलथून पाडून उपाशी लोक अन्नाची कोठारे लुटतील.
दोन्ही प्रकार इतिहासात घडलेले आहेत, त्यामुळे अतिशयोक्ती म्हणून हवा तो अलंकारिक परिणाम होत नाही.

- - -

"दुकाने आणि पतपेढ्या लुटू नये इतपत सरकार पुरे" असे मानणारे लोक काही बाबतीत धोरणाबाबत पूर्ण सिद्धांत सांगत नाहीत, हे दाखवण्यासाठी हा लेख चांगला आहे. बाजारसर्वस्ववाद सांगणार्‍या बहुतेक लोकांना सरकारचे त्याहून अधिक कुठलेसे कार्य आहे, असे अध्याहृत असते. ती अध्याहृते उघड सांगितल्याशिवाय "चलनी बाजारसर्वस्व पुरे" हा इतकाच युक्तिवाद धोरणे बनवण्यासाठी अधू पडतो. हे पटवून देण्यात वरील लेख यशस्वी होतो.

गेल्या शतकात कित्येक "फ्री-मार्केट" देशांच्या सरकारांनी अशी धोरणे आखली आहेत, जेणेकरून निम्न/मध्यमवर्ग फार असंतुष्ट होऊ नयेत. जर ही सरकारे भाडोत्री असतील, तर त्या धोरणांचा खर्च "शासनव्यवस्था न-उलथता टिकावी" या बिगरचलनी मालाच्या बदल्यात त्या शासनांनी केलेला आहे. (हे विश्लेषण मागे श्री. घासकडवी यांनी विस्ताराने केलेले आहे.) सध्याच्या (जागतिक) अर्थशास्त्र्यांना हे तत्त्व अध्याहृत आहेच. त्यांचे म्हणणे आहे, की वेगवेगळ्या देशांतल्या शासनाच्या मालकांनी स्थैर्यासाठी ही जी किंमत मोजली, ती गैरवाजवी होती, की किफायतशीर होती? हे अध्याहृत जाणून विश्लेषण करणारे अर्थशास्त्री वरील लेख वाचून काय करतील? श्री. नितिन थत्ते यांच्या अंततः अनर्थ होणार्‍या युक्तिवादाला "अपूर्ण गणित" म्हणून बाजूला सारतील. सर्व अध्याहृते माहीत नसून बाजारसर्वस्वाच्या सिद्धांताबद्दल उगाच श्रद्धा असलेल्या लोकांच्या विचारांना कदाचित चालना मिळेल. हेही नसे थोडके.

 
^ वर