कुत्रा

लहानपणी कुत्रा पाळण्याचा हट्ट पालकांकडे करणारे अनेक असतात. अशा हौशीपायी कुत्र्यांबद्द्ल अनेक गमतीजमती माहीती झाल्यात, त्याच येथे मांडल्या आहेत.

कान आणि नखे

पाळलेल्या पहील्या कुत्रीचे नाव लायका ठेवले होते. लायका हे रशियाने मानवाला अंतराळात पाठवण्याआधी ज्या कुत्रीला पाठवले होते तिचे नाव. जिन्याखालील त्रिकोणी जागेत तिचे घर मस्तपैकी सजवले होते. तिला पिल्ले झाली, त्यात प्रत्येकाचे स्वभाव वैशिष्ठ्य समजुन घेता-घेता माहीती साठत गेली.

असे लक्षात आले की, सरळ कानाचा कुत्रा जास्त तिखट असतो, तो अंगावर धावुन येतो, भुंकतो, घाण खात नाही. ह्याउलट खाली कान पडलेले कुत्रे तुलनात्मक सौम्य असतात. कुत्रीला ४-५ पिल्ले झाली की, एखाद-दुसरे सरळ उभ्या कानाचे पिल्लू असते.
नखांच्या संखेवरुनही कुत्र्याचा स्वभाव ओळखता येतो. कुत्र्याला पुढच्या पायाला नेहमी ५-५ नखे असतात- ४ पंजाला व एक थोडे वर-मागील बाजुला (आपल्या पायाच्या घोट्याजवळ येइलसे).

पण मागच्या पायांची नखसंख्या मात्र वेगवेगळी असते. ढोबळमानाने ८०% कुत्र्यांच्या मागील पायाला ४-४ नखे असतात. उरलेल्या २०% कुत्र्यात ५-४, ५-५, ५-६, ६-६ अशी संख्या असु शकते. मी ह्यातील प्रत्येक प्रकारचे कुत्रे पाळलेले आहे. आम्ही अशा कुत्र्यांना त्यांच्या नखांवरुनच ओळखत असु- १८ नखी, १९, २०, २१, २२ नखी. त्यात एखादे कुत्रे सरळ कानी असेल तर डब्बल धमाल. जितकी जास्त नखे, तितके ते कुत्रे हुशार असते.

कुत्र्याचे पिल्लू रस्त्यावरुन उचलूनच आणावे लागे (किंवा एखादा दयाळू हवे तर एखादे पिल्लू घेऊन जा असे सांगे)- दुकानातून विकत आणणे वगैरे प्रकार अलिकडचे. मित्र-मित्र मिळून कुत्रा-शोध मोहीमेला जात असु. कुणाकडे तरी आधीच माहीती आलेली असे की, अमक्या-तमक्या गल्लीत कुत्र्याची पिल्ले बघितली. मग त्या पिल्लांच्या वर्णन करण्यात तो रमुन जाई. त्यात अनेक बाता पण मारल्या जात. "त्याच्या कपाळावर टिळा आहे / ओम आहे", "काळे-पांढरे ठिपक्यावालं पिल्लू सरळ कानावालं आहे". कधी एकदा जाऊन ती पिल्ले डोळे भरुन पाहतोय असे सगळ्यांना होई. पिल्ले शोधतांना सतत मागील पायाकडे लक्ष ठेवुन जास्तीत जास्त नखांचे कुत्रे मिळवण्यासाठी धडपड असे. असे कुत्रे मिळाले की, इतका आनंद होई की बस!

पाळणे व गमावणे

पिल्लू रस्त्यावरुन आणलेले असल्यामुळे ते अगदी घाणेरडे जरी नसले तरी, असेच धरुन न आणता, पोत्यात घालून आणत असु. म्हणजे कुत्रीपण मागे लागायची शक्यता नसे. घरी आणून धाब्यावर नेले जाई व त्यास आंघोळ घालून त्याच्या अंगावरील / कानातील जळवा-सदृश आळ्या काढल्या की, एकदम शांतपणे झोपी जाई. ह्यानंतर नामकरण केले जाई व भरपूर दुध आणि त्यात चपात्या कुस्करुन त्याच्या दिमतीला ते ठेवले जाई. रात्रभर कुई-कुई करत त्यास आईची आठवण येई, आम्हालाही वाईट वाटे पण स्वत:ला समजावत असु की, अरे, आपण तर ह्याची जास्त काळजी घेतोय, वगैरे. कुई-कुई आवजाने शेजारी वैतागुन जात पण शेजारी समंजस असत.
दुस-या दिवशी शाळेत गेलो की, घरी येई पर्यंत त्यास खाऊ-पिऊ घालायची जबाबदारी अर्थातच घरच्यांची असे. असे दोन-चार दिवस गेले की, ते पिल्लू अचानक गायब होई; रात्रीतून, किंवा, दिवसा. कसे ते आजपर्यंत नाही कळले. मग पुन्हा नवा शोध सुरु.

काही प्रसंग

कुत्र्याइतका लोभस पाळीव प्राणी नाही असे माझे ठाम मत आहे. सध्या ताण घालवण्यासाठी अनेक जण कुत्रे पाळतात. दिवसभरचा थकवा / शीण एका मिनीटात घालवण्याची किमया ह्या कुत्र्यात असते. ते तुमच्याशी खेळू लागते, आढून बाहेर घेऊन जाते, कोप-यातील एखादी त्याची नेहमीची वस्तू तोंडात धरुन घेऊन येते व तुमच्या समोर टाकून लांबवर जाऊन उभे राहते व सांगते, की, टाक ती वस्तू, मी घेऊन येतो. बाहेर जायचे असल्यास, गाडीचे दार उघडले की, आधी आत जाऊन बसते. फार मजा येते.

एका स्नेह्यांकडे कुत्रे पाळले होते. ते त्यास कधीच बांधून ठेवत नसत. त्यामुळे ते जितके तास घरी असे त्यापेक्षा जास्त बाहेर असे. कधी-कधी २-३ दिवसांनी परत येई. त्यांच्याकडे घरी दत्ताचे पारायण होत असे व अनेकदा हे कुत्रे त्यावेळेस देवघरासमोर बसलेले असे. ह्या कुत्र्याचा किस्सा असा आहे- ह्याच्या बाहेर जाण्याच्या सवयीमुळे त्याला इतर गल्लीतील कुत्र्यांच्या भांडणास तोंड द्यावे लागे. अशाच एका भांडणातून ह्याला खोल जखमा झाल्या पण हे कुत्रे घरी न येता समोरील इमारतीच्या जिन्याखाली जाऊन बसले. असेच एक-दोन दिवस गेले, येणारे-जाणारे त्यास बाहेर बोलवत पण ते अंगावर येई. मग कुणीतरी त्याच्या मालकाला कळवले. ते तिथे गेले, त्यास बाहेर काढले, व जखमांना उपचार केले. डॉक्टर म्हणाले की, ह्याला आता अजिबात बाहेर जाऊ देऊ नका, नाहीतर.. म्हणून त्यास त्यांनी पहील्यांदा बांधले. ते शांत राहीना; भुंकणे सतत चालू राहील्यामुळे, त्यास त्यांनी नाईलाजाने सोडले. त्याच क्षणी त्याने भिंतीवरुन ऊडी मारली व पसार झाला. जे व्हायचे ते झालेच. परत त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला व पुन्हा त्यास अधिकच जखमी केले. पुन्हा हे महाशय त्याच जिन्याखाली लपले. आता मात्र तो फारच जखमी झाला होता व येणा-या- जाणा-यांवर भुंकतही होता. तेथील लोकांनी ताबडतोब मालकांना सांगितले. ते आले व त्याची अवस्था पाहून म्युनिसीपालटीला फोन केला आणि त्यास घरी घेऊन आले.
थोड्यावेळाने श्वासपथक आले. त्यांच्या पिंजरागाडीत आणखीही काही कुत्रे होती. ह्याला जणू काही पुढचे कळाले. हा अंगणात होता; तो जागचा उठला व घरात गेला. मालकांनी त्यास खास केक आणला होता, जाण्याआधी त्यास खाऊ म्हणून. तो त्याला खाण्यास देऊ लागले पण त्याने तो खाल्ला नाही. देवघरात गेला, काही क्षण तेथे बसला. उठला, घरातील प्रत्येक खोलीत जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जवळ गेला, अंगावरुन हात फिरवुन घेतला व तसाच बाहेर जाऊन स्वतः त्या पिंजरागाडीत बसला. जातांना भुंकलाही नाही. हा प्रसंग त्या गल्लीतील अनेकांनी पाहीला आहे व ते आजही ह्याची आठवण काढतात.

त्यांचे नियम / प्रशिक्षण

कुत्र्याला शिक्षण देऊन त्यास आणखीही काही महत्वाच्या कामासाठी निवडायचे असेल तर त्याची पहीली चाचणी असते. शिक्षक एक चेंडू लांबवर फेकतात. जो कुत्रा तो चेंडू परत आणून देतो तो कुत्रा शिक्षण-योग्य आहे असे मानतात. कुत्रा प्रशिक्षक त्या कुत्र्याच्या मालकाच्या मदतीने त्यास शिक्षण देतो. एका प्रकारात त्यांना एखाद्या पासवर्डची ओळख दिली जाते. उदा, जर कुत्र्याला एखाद्याच्या अंगावर धावुन जायला भाग पाडायचे असेल तर त्या कुत्र्याचा मुड अचानक हिंस्र करावा लागतो. ह्यासाठी ते मालकाला एक पासवर्ड म्हणण्यास सांगतात, त्यांनी तो शब्द उच्चारता क्षणी प्रशिक्षक त्या कुत्र्यास काठीने मारतो. तसे केल्याने तो कुत्रा रागावेल असे बघितले जाते. कालांतराने तो पासवर्ड उच्चारला की, कुत्रा एकदम हिंस्र होतो व मालक सांगेल त्याच्या अंगावर धावुन जातो.

एकाने सांगितले की, कुत्रा एखाद्या गल्लीत, मोकळ्या जागेत स्वतःची मालकी स्थापीत करतं. त्यासाठी ते चार दिशांना जाऊन एकेका जागी लघवी करतं; हीच त्याची सीमाआखणी. दुसरा कुत्रा आला की, त्यास तो वास येतो आणि त्यानुसार त्यास कळतं की, हे राज्य कोणाचंतरी आहे. त्यास ते राज्य बळकावायचं असेल तर अर्थातच त्या दोघांची मारामारी ठरलेलीच. ती होते, बलाढ्य कुत्रे जिंकते व त्यावर कब्जा घेते. नियम असा आहे की, एका ठिकाणी दोन कुत्रे नाही! मात्र ह्याउलट जर ती कुत्री असेल आणि जागा कुत्र्याने आखलेली असेल तर एका भांडणानंतर -जे अगदी लुटूपुटू असते- त्यांच्यात समेट होऊ शकतो; पण एकदा तरी भांडण होतेच. आणि तिस-या प्रकारात जर बाहेरुन आलेली कुत्री असेल तर, आणि जागा कुत्रीनेच आखलेली असेल तर ती, आलेल्या पाहुणीला त्याजागेत राहू देते- भांडणाशिवाय!!

कुत्रा पाळण्याचा एकमेव तोटा असा की, तुम्ही त्यास एकटे ठेवुन जाऊ शकत नाही. सध्या त्यांच्यासाठी पाळणाघरं झालेली आहेत पण ती फार महाग वाटतात. त्यामुळे त्यास बरोबर घेऊन जाणे दरवेळी शक्य होतेच असे नाही. म्हणून मग एखाद्याला घरी रहावे लागते. पण कुत्र्यामुळे मिळणा-या अनंत वात्सल्यपुर्ण क्षणांसमोर तो त्रास फिका पडतो.

खात्री आहे की, इतरांकडेही कुत्र्यांबद्दल सांगण्यासारखे अनेक किस्से असतील; म्हणून ते ऐकण्यासाठी येथेच थांबतो.

[लेखातील चित्रे विकीपेडीयावरुन साभार]

लेखनविषय: दुवे:

Comments

भटकी कुत्री - पनीर

कॉलेजमध्ये एकदा भीत भीत कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरवताना तो कुत्रा संशयाने चावला होता तेव्हापासून कुत्र्याची फार भीती वाटते.
पण या भीतीवरदेखील भूतदया मात करते. एका कुत्रीला बरीच पिल्लं झाली होती, पाऊस मी मी म्हणत होता. नशीबानी रात्री दूध फाटून खूप पनीर तयार झाले होते. ते सगळं पनीर एका प्लास्टीकच्या डब्यात घातलं आणि तिच्यासमोर नेऊन ठेवलं मनात म्हटलं "तुला गरज आहे बाई." पण् एक प्रकारे माझी कृती चूकीची देखील होती कारण ती कुत्री भटकी होती आणि आमच्या सोसायटीत असं खाऊ घालण्यावर बंदी होती. असो. पण त्या दिवसानंतर ती कुत्री मी दिसली की नेहमी शेपूट हलवून कृतद्न्यता व्यक्त करीत असे, या गोष्टीचे मला खूप नवल वाटते.
____________________________________

अरे हो बोक्याची एक गंमत सांगते. मी कॉलेजमध्ये हॉस्टेलवर होते. आम्ही मुली दुपारी चहा-पोहे आदि खाण्यासाठी हिरवळीवर बसायचो तर हा शेफारलेला बोका सरळ येऊन मुलींच्या अंगावर शू करायचा ..... डँबीस आणि महा लाडावलेला बोका होता. मला वाटतं तो हक्क प्रस्थापित करायचा की काय नकळे . हाऊ सिली!!!

नियम-पोटनियम

:-) सोसायट्या आणि त्यांचे पोटनियम! कुत्रा नेहमीच मानवाचा सोबती राहीला आहे असे इतिहास सांगतो. त्यामुळे कदाचित कुत्र्याचे व मानवाचे "ऑन द सेम पेज" असावे.
बोका मात्र - काय बोलावे?

कुत्रा

लेख फारच आवडला.
त्यांच्याकडे घरी दत्ताचे पारायण होत असे व अनेकदा हे कुत्रे त्यावेळेस देवघरासमोर बसलेले असे.
ह्याला जणू काही पुढचे कळाले. हा अंगणात होता; तो जागचा उठला व घरात गेला. मालकांनी त्यास खास केक आणला होता, जाण्याआधी त्यास खाऊ म्हणून. तो त्याला खाण्यास देऊ लागले पण त्याने तो खाल्ला नाही. देवघरात गेला, काही क्षण तेथे बसला. उठला, घरातील प्रत्येक खोलीत जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जवळ गेला, अंगावरुन हात फिरवुन घेतला व तसाच बाहेर जाऊन स्वतः त्या पिंजरागाडीत बसला. जातांना भुंकलाही नाही.

अशी वाक्ये मनाला स्पर्शून गेली. दत्ताच्या आसपास कुत्री असतात. सदर कुत्र्याला हे ठाऊक असेल काय? दत्तगुरु जाणोत!
सन्जोप राव
सीनेमें जलन आंखोंमे तूफानसा क्यों है
इस शहरमें हर शख्स परेशानसा क्यूं है

दत्त आणि कुत्रे

दत्ताच्या आसपास कुत्री असतात. सदर कुत्र्याला हे ठाऊक असेल काय? दत्तगुरु जाणोत!

कुत्र्याला कदाचित दत्ताच्या फोटोमधले बांधव दिसले असतील.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

लेख आवडला

लेख खूप आवडला. तुमच्या या विषयातील ज्ञानाबद्दल आदर वाटला. त्यामुळे खालील प्रश्नांचे उत्तर मिळायला हरकत नाही.

कुत्रीने आखलेल्या जागेत कुत्रा आला तर काय होते?तो कुत्रा कुत्रीच्या क्षेत्रात कायमचा राहतो की थोड्या काळासाठी राहिल्यावर कुत्री त्याला हाकलते? तो तिथे राहिला तर ते क्षेत्र कोणाचे म्हणून ओळखले जाते? कुत्रीला कोणत्या कुत्र्याशी लुटुपुटुचे भांडायचे आणि कोणाशी खरेखुरे असा चॉईस असतो का(म्हणजे थोडक्यात कुत्री कुत्र्याशी खरेखुरे भांडते का)?

कुत्र्याइतका लोभस पाळीव प्राणी दुसरा नाही वगैरे लिहिताना ते तुमचे मत आहे असे लिहिल्याने बरे वाटले. कारण असे मत मांजर किंवा इतर प्राणी पाळणार्‍याचे मांजर किंवा इतर प्राण्यांबद्दल असू शकते.

लहानपणीच कुत्र्याने अंगावर झेप घेऊन लोळवल्याने त्यांच्या भानगडीत पडलो नाही. कदाचित बाहेर सुसु करत असल्याने त्याला मी त्याच्या राज्यक्षेत्रावर अतिक्रमण करत आहे असे वाटले असावे. ;-)

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

उत्तर

माफ करा तुमच्या प्रश्नाचे उत्तर मजजवळ नाही.

जाऊ दे

मी फक्त तुम्ही न लिहिलेली चौथी शक्यता लिहीली. मला वाटते साधारण सर्वच प्राण्यात स्वतःच्या क्षेत्राबाबत असे नियम असावेत. आणि सहसा ते सारखेच असावेत(असे वाटले कारण त्यांची क्षेत्रमापनाची पद्धत. )

कदाचित मारुती चितमपल्लींच्या एखाद्या पुस्तकात हे उत्तर मिळेल.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

शक्य

त्यांच्याकडे घरी दत्ताचे पारायण होत असे व अनेकदा हे कुत्रे त्यावेळेस देवघरासमोर बसलेले असे. ह्या कुत्र्याचा किस्सा असा आहे- ह्याच्या बाहेर जाण्याच्या सवयीमुळे त्याला इतर गल्लीतील कुत्र्यांच्या भांडणास तोंड द्यावे लागे.

गल्लीतील कुत्र्यांचे मालक अंनिसवाले असावेत.
--

कुत्र्याइतका लोभस पाळीव प्राणी नाही असे माझे ठाम मत आहे.

पाळीव प्राण्यांची लोभसपणाची जनुके मानवांच्या अपत्यसंगोपनाच्या जनुकांचे शोषण करतात असे वर्णन कोठेतरी वाचले आहे.
--
भटक्या कुत्र्यांना घुशी ('उंदीर' म्हटले तर अनेकांना प्रेम वाटते असे कार्ल सगानने म्हटले आहे), डास, यांपेक्षा अधिक कायदेशीर संरक्षण मिळू नये असे मला वाटते. मुंबईत काही विजिलांटे गल्ली नि:श्वानमय करतात त्या बातम्या वाचून आश्वस्त वाटते.

माहीती -?!

"गल्लीतील कुत्र्यांचे मालक अंनिसवाले असावेत."- माहीती नाही.
"अपत्यसंगोपनाच्या जनुकांचे शोषण"- माहीती कुठे मिळाली ते आठवले तर कृपया कळवा.

माहिती

"गल्लीतील कुत्र्यांचे मालक अंनिसवाले असावेत."- माहीती नाही.

पीजे होता.

"अपत्यसंगोपनाच्या जनुकांचे शोषण"- माहीती कुठे मिळाली ते आठवले तर कृपया कळवा.

डॉकिन्सच्या पर्पज ऑफ पर्पज या भाषणात Konrad Lorenz च्या संशोधनाचा उल्लेख होता. थोडी अधिक माहिती येथे मिळाली.
कृपया हेही पहा.

पर्पज ऑफ पर्पज

" पर्पज ऑफ पर्पज" हे भाषण आवडले.

छान लेख...

( हल्ली उपक्रमावर चर्चा भरकटण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त झाले आहे का? मध्येच अंनिस, संतपरंपरा, कामवासना, हळदीकुंकू वगैरे माहिती वाचावी लागते. उपक्रमावर खरडवहीची सुविधा अजूनही चालू आहे असे स्मरणपत्र देणे गरजेचे आहे का?)

असो. लेखातून बरीच नवीन माहिती कळाली. नखांबद्दलची माहिती जास्त उपयोगी आहे.

भारतातल्या कुत्र्यांच्या स्थानिक जाती कोणत्या आहेत? बहुतांश पाळलेली कुत्री तर परदेशी बनावटीची ;-) असतात. मग भारतातल्या जातींबद्दल लोकांना माहिती आहे का? अशी कुत्री पाळली जातात का?
धनगर लोक त्यांच्या मेंढ्यांसाठी जी कुत्री पाळतात ती खूपच तिखट असतात असे ऐकून आहे.

-सौरभ.

==================

डुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे!

नाही

( हल्ली उपक्रमावर चर्चा भरकटण्याचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त झाले आहे का?

दोन-तीन वर्षांपूर्वी किती घाण होई ते कृपया पहा, सध्या खूपच शांतता आहे असे वाटते.

मध्येच अंनिस, संतपरंपरा, कामवासना, हळदीकुंकू वगैरे माहिती वाचावी लागते. उपक्रमावर खरडवहीची सुविधा अजूनही चालू आहे असे स्मरणपत्र देणे गरजेचे आहे का?)

ललितपर लेखातील ऍनेक्डोट मध्ये दत्ताचा उल्लेख पाहून गव्हाणीवरच्या सरळ कानवाल्याने काय करावे?

संपादित

लेखाशी संबंधीत नसणार्‍या वैयक्तिक रोखांच्या प्रतिसादांसाठी खरडवहीचा उपयोग करावा.

हा हा हा

मजकूर संपादित.

बाकी, कुत्रा हा माझा आणि श्री घाटपांडे साहेबांचा आवडता विषय.
सवड झाली की कुत्र्यांबद्दल काहीबाही खरडतोच.

-दिलीप बिरुटे

लेख

अजय भागवत यांचे लेख मला आवडतात. साध्या शब्दांत ते रोचक माहिती सादर करतात परंतु हा लेख मला फारसा आवडला नाही. हे लेखन माहितीपूर्ण असले तरी ललित लेखनाच्या अंगाने जाणारे वाटले. नेमके ललित लेखनही म्हणता येऊ नये आणि दत्ताच्या समोर बसणार्‍या कुत्र्याच्या अनुभवामुळे संदर्भासकट माहितीपूर्णही म्हणता येऊ नये अशी गत झाल्याने वाचताना गोंधळ निर्माण झाला. हे लेखन उपक्रमाच्या प्रकृतीस साजेसे वाटले नाही आणि फारसे आवडले नाही.

असो.

माहिती, अनुभव

प्रियाली, उपक्रमाच्या प्रकृतीचे लेखन येथे न देणे ह्या उद्दीष्टाचे पालन करणे प्रत्येक सदस्याचे कर्तव्यच आहे आणि उपक्रमाच्या प्रकृतीला साजेसे लेखन व प्रतिक्रिया देणे हे ही; म्हणूनच तुमच्या "कुत्रा" ह्या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया का आल्या असाव्यात हे जाणून घेणे अगत्याचे ठरते.

लेखन प्रकार निवडतांना तेथे अशी सुचना आहे-
"लेख हा या संकेतस्थळावरचा मुख्य लेखनप्रकार आहे. लेख, अनुभव, अनुवाद, बातमी, माहिती, संदर्भ, विचार, व्यक्तिचित्र या आणि अश्या इतर सर्व गोष्टींसाठी हा लेखनप्रकार वापरावा. "

"कुत्रा" हा लेख माझ्यामते "माहिती, अनुभव" ह्या प्रकारात मोडतो. माझ्या लेखात स्वानुभव व त्यातुन तयार झालेली माहिती आहे. तसेच ऐकीव माहीती आहे. जी माहिती ऐकली आहे, दत्तविषयक, ती एका पुण्यातील मागील पिढीतील एका अत्यंत यशस्वी डॉक्टरांच्या घरी घडलेली आहे व त्यांच्या मुलाने मला सांगितली आहे. दत्ताची पारायणे ते स्वतः करीत. तसेच कुत्र्याचे प्रशिक्षण ह्या विषयक माहिती ऑस्ट्रेलियात पोलिस खात्यात त्यांचे "स्नीफर" कुत्रे सांभाळलेल्या एका भारतीय माणसाने सांगितले आहेत.

"लेखनविषयक मार्गदर्शन" ह्या मार्गदर्शकात पहिल्याच वाक्यात "भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान,..." संस्कृतीचा संदर्भ आहे. संस्कृती म्हणजे नेमके कशावर लेखन अपेक्षित आहे? हा प्रश्न मी दत्ताच्या संदर्भावर आलेली तुमची व रिकामटेकडा ह्यांच्या प्रतिक्रियेमुळे अधिक जाणून घेण्यासाठी केला आहे.

पुढे असे मार्गदर्शन आहे, "या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी हा उद्देश आहे." खरे पाहता, ललित लेख हे ब-याच अंशी माहितीप्रधान असु शकतात. अर्थात ललित लेखन म्हणजे काय हे असे एका वाक्यात व्याख्या दिल्यासारखे होऊ शकत नाही ह्याची जाणीव आहे आणि तुम्हीही तशाच स्वरुपाची प्रतिक्रिया दिलेली आहे, - " हे लेखन माहितीपूर्ण असले तरी ललित लेखनाच्या अंगाने जाणारे वाटले." मला ललित लेखन आणि माहितीपूर्ण लेखन ह्यातील फरक समजुन् घ्यायला आवडेल.

सहमत

लेख बराच माहितीपूर्ण आहे. तसेच असे लेख वाचून हृदयावर ताणही येत नाही.

दत्तविषयक घटना सहज सगळे मान्य करतीलच असे नाही. ते कुत्रे बोलते तरच खरेखोटे कळाले असते. दत्ताऐवजी दुसर्‍या देवतेचे पारायण केल्यास तो कुत्रा पारायणाला आला असता का? किंवा पारायणाचा प्रसाद देण्याची वेळ आणि त्याची भुकेची वेळ सारखीच होती का? कुत्र्याच्या मालकांनी फक्त पॉसिटीव टेस्टींग केले असावे. अन्यथा डॉक्टरमाणसाकडून असल्या गोष्टी ऐकणे म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोनात बसत नाही.

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

माहिती

लेखातून माहिती मिळते आहे याच्याशी सहमत आहे परंतु माहिती विश्वासार्ह नाही हे ही सत्य आहे. जेव्हा आपण सांगता की माहिती ऐकीव आहे तेथेच अनेक प्रश्न निर्माण होतात कारण उपक्रमावरले लेखन हे संदर्भ आणि ठोस निष्कर्षांवर चालते. ज्याप्रमाणे कुत्र्याच्या प्रशिक्षणाबाबत नेटावर शोधले असता सहज माहिती मिळून जाते आणि त्याचप्रमाणे तुम्ही सांगितलेल्या माहितीचा तुकडा त्यात शोधता येतो त्याप्रमाणे दत्ताच्या संदर्भातील कुत्र्याबाबत म्हणता येत नाही. अशी माहिती एक डॉक्टर पुढे करत असतील तर तो आणखीच खेदजनक प्रकार वाटतो. आणखी एक उदाहरण देते - देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 6 हे चंद्रशेखर यांचे अनुभव आहेत आणि प्रवासवर्णन आहे. त्यात एक वाक्य येते; या तलावामुळे हा भाग मोठा रमणीय झाला आहे हे मात्र खरे! त्याच्या काठावर ख्मेर जेवण देणारी बरीच रेस्टॉरंट्स दिसतात. अधोरेखित वाक्य अनेकजणांनी कंबोडिया न पाहताही आणि कदाचित नेटावर शोधून मिळाले नाही तरीही वाचताक्षणीच विश्वासार्ह वाटते. तसे, (तो कुत्रा) देवघरात गेला, काही क्षण तेथे बसला. उठला, घरातील प्रत्येक खोलीत जाऊन घरातील प्रत्येक व्यक्तीच्या जवळ गेला, अंगावरुन हात फिरवुन घेतला व तसाच बाहेर जाऊन स्वतः त्या पिंजरागाडीत बसला. हे वाक्य विश्वासार्ह वाटत नाही.

उपक्रमावरील लेखनविषयक जे मार्गदर्शन आहे त्यातील एका किंवा अनेक बाबींनुसार जर लेखन नसेल तर ते धोरणांनुसार नाही असे म्हणण्यास वाव आहे. दत्ताच्या कथेतील कुत्र्यासंबंधात येणारे लेखन हे कथित आणि कल्पित असण्याचा संभव अधिक वाटल्याने ते ललित* लेखनाच्या अंगाने जाते आहे असे मला वाटले. अशाचप्रकारे जर एखादी कथा उपक्रमावर सांगितली गेली तर ती आख्यायिका किंवा प्रसिद्ध किस्सा आहे अशाप्रकारे डिस्क्लेमर किंवा स्पष्टीकरण दिले जाते.

ललित लेख हे माहितीपूर्ण असू शकतात हा वेगळा मुद्दा आहे आणि त्याच्याशी सहमती आहे परंतु उपक्रमावर ललित लेखन नको हे तूर्तास तरी उपक्रमाचे धोरण आहे. अगदी सुरुवातीला चर्चांचे विषयही ललित लेखनाच्या अंगाने जाणारे नसावे असा काहीसा कल येथे होता परंतु त्यामु़ळे एखाद्याला आपला अनुभव लिहून चर्चा करायची असल्यास त्याला बाधा येईल असा अंदाज व्यक्त झाल्याने चर्चांविषयक नियम थोडे शिथिल आहेत असे वाटते. चू. भू. द्या. घ्या. परंतु लेखांविषयी अद्यापही असे धोरण नाही. लेख लिहिताना अधिक मार्गदर्शन दिवाळी अंकावरील आवाहनात सापडतात त्याचा दुवा येथे देते. दिवाळी अंकातील लेखनाव्यतिरिक्त इतर लेखांतही हे मार्गदर्शन मला उपयुक्त वाटते.

हे लेखन माहितीपूर्ण असले तरी ललित लेखनाच्या अंगाने जाणारे वाटले." मला ललित लेखन आणि माहितीपूर्ण लेखन ह्यातील फरक समजुन् घ्यायला आवडेल.

हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे आणि यापूर्वीही लोकांनी याबाबत शंका उत्पन्न केल्या आहेत, तेव्हा यावर वेगळी चर्चा सुरु करता येईल. माझेही प्रबोधन होईल. :-)

तूर्तास, जसे पतंगावरील लेखाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिले तसे या लेखाला दिले नाहीत यावरून लोकांना काही खटकले असे म्हणता येईल का? मला वाटते जे उपक्रमावर सातत्याने येणारे सदस्य आहेत त्यांनी तरी मत प्रकट करायला हवे होते, त्यामुळे भागवतांसारख्या चांगल्या लेखकाला वाचकांचे मन कळण्यास मदत होईल.

* सर्वच ललित लेखन कथित आणि कल्पित असेल असे सांगायचा हेतू नाही.

अनेक मतभेद आहेत

अनेक मतभेद आहेत. त्याची येथे जाहीर चर्चा करुन माझा व इतरांचा वेळ खर्ची घालण्यात मला अजिबात स्वारस्य नाही. उपक्रमाच्या नियमीत लेखनप्रकारात हा लेख बसत नसेल तर काढून टाकावा अशी विनंती.

लेख आवडला व जूनी गोश्ट आठवली.

लेख वेगळा आहे. आवडला.
मी कुत्र्यांना घाबरतो. लहानपणी मराठीच्या पुस्तकातील कुत्र्याची गोश्ट माझ्या काळजाला चटका देवून गेली होती. ती गोश्ट तितकी लक्शात नाही पण त्यावेळी जी चित्रे मनात निर्माण झाली होती ती अजून डोळ्यासमोर दिसतात. ती गोश्ट साधारण अशी होती, एका घरात आई-वडील व लहान भावडे असतात. त्या घरात एक पाळलेला कुत्रा असतो. बहुदा त्याचे नाव मोती असते. तो सफेस रंगाचा असतो आणि त्यावर पिवळे टिपके ही असतात. तो खूप हुशार असतो. एकदा त्या गावात कोणीतरी डोंबारी वा चोरी करणारे येतात. मोती त्यांच्यावर भुंकतो. घरातल्यांना सावध करतो. त्यानंतर ती चोर / वा भटकी जमात त्या कुत्र्याला काहितरी खायला देतात. तो कुत्रा त्यांच्या सोबत जातो. ते त्याला बांधुन ठेवतात. त्या कुत्र्याला त्यांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लोखंडाची सळई तापवून चटके देतात, त्याचे कान कापतात, त्याला खूप मारतात, खायला ही देत नाही. तोपर्यंत ते त्या कुत्र्याला आपल्या सोबत घेवूनच गावोगाव फिरत असतात. एकदा तो कुत्रा शिताफिने सुटतो. व शोधत, शोधत बरेच दरमजल करीत आपल्या मुळ मालकांकडे नव्हे आपल्या घरी येतो. खरेतर तो बर्‍याच वर्शाने आलेला असतो. त्या कुटुंबातील मुले मोठी झालेली असतात. तो कुत्रा दारात उभा राहतो, पण त्याचा घाणेरडा, अशक्त अवतार, अंगावरच्या चिघळलेल्या जखमा यांमुळे घरातली मंडळी त्याला ओळखतही नाहीत. त्या घरातील मुलगा आपल्या आईला घरात जावून दारात कुत्रा आलेला आहे असे सांगतो, त्याची आई त्या मुलाला त्या घाणेरड्या कुत्र्याला दुध- चपाती घाल असे सांगते. आपल्याला या घरातले कोणीच ओळखत नाहीत हे पाहून कुत्र्याला वाईट वाटते. तो दिलेली दुध-चपाती खावून त्या घरापासून दूर जावून उभा राहतो. मग ती चोर / भटकी जमात त्या गावात येते व त्या कुत्र्याला आपल्या सोबत पुन्हा घेवून जाते.

गोष्ट

रावले साहेब आपल्या गोष्टीत प्रक्षिप्त भाग वाटतो. मी मराठीच्या क्रमिक पुस्तकात वाचली होती त्यात मुलांची आई त्या कुत्र्याला ओळखते." अरे हा तर आपला मोती ( किंवा असेच काहीतरी) त्या भटकी जमातीचा मनुष्य शोधत येतो तेव्हा हा भेदरुन जातो. मुलाच्या वडिलांनी त्याला तूच आमचा कुत्रा चोरलास असे सांगुन मागील आठवण करुन देतात व पोलिसात तक्रार करण्याची धमकी देतात.
यावरुन आजुन एक पुस्तक आठवले. "मी जेनी" या त्या भुभीने लिहिलेले आत्मचरित्र आहे. शब्दांकन अं अ कुलकर्णी . कॉन्टिनेंटल प्रकाशनचे पुस्तक आहे.
'भुभु लोक' आवडण वा न आवडण हे जेनिटिक असाव अस उगीचच मला वाटत. आदिमानव गुहेत असल्या पासुन कुत्रा हा माणसाचा मित्र आहे. तो परस्पर पुरक सहजीवनाचा भाग असावा.
एकदा फुटपाथवर राहाणार्‍या एका बाईकडे रुबाबदार कुत्रा होता. त्याचा पट्टा साखळी उत्तम होती. ती त्याला रोज प्रेमाने न्हाउ व खाउ घालायची. एक स्टोव्ह एक ट्रंक व ताडपत्रीचे छोटे छप्पर हा तिचा संसार. स्वतःची खायची मारामार पण कुत्र्याला बिस्कीट घालायची. मला ती बाई खुप श्रीमंत वाटे
लहानपण कुत्र्यांच्या सहवासात गेल्यामुळे त्यांच्याविषयी ममत्व आहे. आजही मी व माझी मुलगी गल्लीतल्या भुभ्यांशी खेळतो.
प्रकाश घाटपांडे

हि गोश्ट पाचवीतल्या पाठ्य पुस्तकातली होती का?

माझ्या मनात ती गोश्ट जशी ठसली होती तशीच लिहीली. तुम्हाला ती स्पश्ट आठवली हे चांगले झाले. त्यामुळे माझ्या मनातील ती प्रतिमा आता बदलले. आभारी आहे! शालेय जीवनात मी खूप स्वप्नाळू होतो, मला त्यामुळे शिक्शकांचा मारही खूप मिळायचा. मराठीच्या बाई त्यांचं नाव नाही आठवत, पण ज्या वर्णाने गोर्‍या, व डोळ्यांनी घार्‍या होत्या, त्यांचा आवाज गोड होता, त्यां बाईंचा सगळ्यात जास्त मार खाल्ला होता.

हि गोश्ट पाचवीतल्या पाठ्य पुस्तकातली होती का?

माहिती, अनुभव आणि आख्यायिकांचा लेख

कुत्र्यांच्या तोकड्या नखाबद्दल (ड्यू क्लॉ बद्दल) माहिती नवीन कळली. धन्यवाद.

आणखी कुतूहल : भारतातल्या देशी जाती कुठल्या? भारतात जातिवंत देशी कुत्र्यांची पैदास करण्याची परंपरा आहे काय?

उभ्या कानांबद्दल स्पष्टीकरण मागे रेडियोवर ऐकले होते. कानांना ताठ करणारी कूर्चा (कार्टिलेज) असते, तिच्या पेशी भ्रूणपिंडाच्या (एम्ब्रियोच्या) "न्यूरल क्रेस्ट" भागातून उत्पन्न होतात, आणि भ्रूण आकार घेत असताना भावी कानाच्या ठिकाणी पोचतात. याच "न्यूरल क्रेस्ट" मधल्या पेशी ऍड्रीनल मेड्युला या ग्रंथीसही बनवतात. (भ्रूण आकार घेण्यापूर्वी अशा लांब पल्ल्याचे प्रवास करणार्‍या बर्‍याच वेगवेगळ्या पेशी असतात. एकदा का भ्रूणाने आकार घेतला, की पेशी लांब पल्ल्याचा प्रवास करत नाहीत.)

ऍड्रीनल मेड्युला ग्रंथीमध्ये जी संप्रेरके (होर्मोन) तयार होतात (मुख्यतः ऍड्रेनलीन) ती संप्रेरके झटा-किंवा-हटा प्रसंगात कामी येतात. जनावर जितके पाळीव तितके ते झुंजतही नाही, पळतही नाही. अशा प्रकारे ज्या लांडग्यांमध्ये (तसेच कोल्ह्यांमध्ये) ऍड्रीनल मेड्युलाच्या बाबतीत कमतरता होती, ते झुंजा-पळा प्रेरणेतही मवाळ होते, आणि ते अधिक "पाळीव" झाले. (कुत्रे हे पूर्वाश्रमीचे लांडगेच होत.) मात्र ऍड्रीनल मेड्युला ग्रंथीत न्यूरल क्रेस्ट पेशींची त्रुटी असता त्या न्यूरल क्रेस्ट पेशींच्या अन्य गंतव्य इंद्रियांतही पेशींची कमतरता होते. म्हणजे कानात कूर्चा कमकुवत असते - कान उभे राहाण्याऐवजी पडेल असतात. हीच बाब श्री. भागवत यांनी सांगितलेली आहे. (त्याबरोबर पोटाकडील भाग सफेत असतो - केसांना रंगीत करणार्‍या पेशीसुद्धा भ्रूणपिंडाच्या न्यूरल क्रेस्टमधल्याच.)

लांडग्यांपासून पाळीव कुत्र्यांची पैदास प्रागैतिहासिक काळातली आहे. कोल्ह्यांच्या बाबतीत हे संशोधन २०व्या शतकात झालेले आहे.
http://courses.bio.indiana.edu/L104-Bonner/Sp10/imagesSp10/L26/Foxes.htm

- - -
आता लेखाच्या शैलीबद्दल टीकाटिप्पणी :

माहिती, अनुभव आणि आख्यायिकांचा मिळून लेख लिहिलेला आहे.

शैली बघता शालेय विद्यार्थ्यांच्या निबंधांची आठवण आली. लालित्यासाठी लालित्य आणि माहितीप्रद लालित्य या संतुलनात थोडा बिघाड झाला आहे असे वाटते. आणि अजय भागवत यांचा मूळ पिंड "माहितीसाठी लालित्य" या दिशेचा असल्यामुळे "लालित्यासाठी लालित्य"सुद्धा तितके उत्कृष्ट वठलेले नाही.

एकूण जाल-लेखकांच्या एकूण-सर्व लेखांशी तुलना केली तर या लेखाचा दर्जा सरासरीपेक्षा अधिकच येतो. हे खरे आहे. पण ज्या लेखकाला सरस लेखन जमते, त्याच्याकडून वाढीव अपेक्षा केल्या जातील, लेखकाला आश्चर्य वाटू नये.

(अवांतर गंमत : लेखातील जातिवंत पाश्चिमात्य कुत्र्यांची चित्रे बघितली, आणि क्षणभर वाटेले - "नगरमध्ये बेवारस कुत्री एवढी प्युव्वरब्रेड!" - मग चित्रांचे श्रेय विकिपेडियाला दिले आहे, ते वाचले.)

- - -

मिळालेली पावती

>>"शैली बघता शालेय विद्यार्थ्यांच्या निबंधांची आठवण आली.">>

ही मी ह्या लेखाला मिळालेली पावती समजतो कारण लेखन करतांना त्याशी संबंधीत भुमिका असल्यास त्यात शिरुन ते करावे असे माझे तरीमत आहे, त्यानुसार झाले आहे.
तुमच्या इतर मतांची नोंद घेतली आहे. माझ्या लेखनाबद्दलच्या चांगल्या मताबद्दल खूप आभारी आहे. ह्या लेखाला इतरत्र मिळालेल्या प्रतिसादामुळे मी आनंदीत आहे.

 
^ वर