देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 6

चविष्ट ख्मेर भोजनाचा आस्वाद घेऊन मी रेस्टॉरंटच्या बाहेर येतो. समोरच्याच बाजूला असलेला हा जलाशय जगातील सर्वात मोठा पोहण्याचा तलाव म्हणून ओळखला जातो. याचे नाव आहे स्रा स्रान्ग(Sra Srang). या नावाचा अर्थ होतो शाही स्नानगृह. सातवा जयवर्मन या राजाने स्वत:च्या स्नानासाठी व ध्यानधारणेसाठी शांत जागा पाहिजे म्हणून याची निर्मिती केली होती. या जलाशयात आजही भरपूर पाणी दिसते आहे. तलावाच्या मध्यभागी एक छोटेसे बेट ठेवून तेथे एक छोटी झोपडी बांधली होती. त्या झोपडीत राजा ध्यानधारणा करत असे. तलावाच्या एका बाजूला स्नानाची जागा म्हणून घाट बांधलेला आहे. त्यावरची कलाकुसर अजुनही बर्‍याच प्रमाणात टिकून आहे. या तलावामुळे हा भाग मोठा रमणीय झाला आहे हे मात्र खरे! त्याच्या काठावर ख्मेर जेवण देणारी बरीच रेस्टॉरंट्स दिसतात. एकूणच स्पॉट मस्त आहे.

sra srang lake
स्रा स्रॉन्ग जलाशय, जगातील सर्वात मोठा पोहण्याचा तलाव
royal bath
शाही स्नानगृह

भोजन झाल्यावर आता मी माझ्या ठरवलेल्या कार्यक्रमापैकीचे शेवटचे देऊळ बघायला चाललो आहे. ता प्रॉम (Ta Prohm.) या नावाने ओळखल्या जाणार्‍या या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. या मंदिरावर, मधल्या काळात(इ.स.1400 ते 1800) आजुबाजुला वाढणार्‍या जंगलाच्या आक्रमणामुळे जो विध्वंस झाला तो बर्‍याचशा प्रमाणात तसाच जतन करून ठेवण्यात आलेला आहे. निसर्ग जसा पृथ्वीचे वर्धन करत असतो तसाच तो आक्रमण करून मानवनिर्मित बांधलेल्या सर्व कृत्रिम वस्तू नष्टही करत असतो. मानवाने बांधलेली मंदिरे ही कितीही भव्य व विशाल असली तरी शेवटी कृत्रिमच म्हणावी लागतात. त्यांची देखभाल बंद झाल्याबरोबर निसर्गाने ही कृत्रिम मंदिरे कशा पद्धतीने उध्वस्त करण्यास आरंभ केला होता हे येथे छान जपून ठेवण्यात आले आहे.

india cambodia coop ta prom
ता प्रॉम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारत-कंबोडिया एकत्रित प्रकल्प

माझी गाडी मंदिराच्या पूर्व प्रवेश द्वाराजवळ मला सोडते. प्रवेशद्वारावरचे गोपुर आता जवळपास नष्ट झाल्यासारखे आहे. द्वाराजवळ लावलेल्या एका बोर्डवर भारताच्या ध्वजाचे चित्र बघितल्याने जवळ जाऊन मी तो बोर्ड मुद्दाम बघतो. भारत सरकार व कंबोडियाचे सरकार यांनी ता प्रॉम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम एकत्रित हातात घेतलेले आहे असे हा बोर्ड सांगतो आहे. या साठी भारत सरकार आर्थिक मदत करते आहे. मला हा बोर्ड बघून मनातून बरे वाटते. भारतीय संस्कृतीचे पुरातन वैभव काय होते याची जपणूक करणार्‍या या अंगकोरच्या परिसराचे जतन करण्यात भारत सरकारचा कुठे तरी हातभार लागतो आहे ही माझ्या दृष्टीने खरोखर आनंदाची बाब आहे.

या द्वारातून प्रवेश करून मी पुढे जातो आहे. मोठमोठ्या वृक्षांच्या घनदाट छाया असलेल्या एका रस्त्यावरुन पुढे गेल्यावर, समोरचे दृष्य बघून माझी पाय एकदम थबकतातच. समोर एक पडकी वास्तू दिसते आहे. हे बहुदा मंदिराचे प्रवेश गोपुर असावे. या वास्तूच्या डोक्यावर एक मोठे झाड चक्क उगवल्यासारखे दिसते आहे. फोटो काढायला शिकणारे शिकाऊ उमेदवार, जसे समोरच्या माणसाच्या डोक्यातून उगवलेला एखादा खांब किंवा नारळाचे झाड या सारखे फोटो काढतात, तसेच हे समोरचे दृष्य आहे. जर मी याचा नुसता फोटो बघितला असता तर ही काहीतरी फोटोग्राफीची ट्रिक आहे असे समजून त्यावर कधीच विश्वास ठेवला नसता. आता समोर हे दृश्य दिसतच असल्याने त्यावर विश्वास ठेवणे भागच आहे.

wierd ta prom
अशक्य कोटीतील ता प्रॉम

ता प्रॉम मंदिराचा सर्व परिसर या असल्या अजस्त्र व अवाढव्य वृक्षांच्या छायेखाली सतत झाकलेला असल्याने अगदी टळटळीत दुपारी सुद्धा इथली हवा थंड व हवेशीर असते. या पडक्या गोपुरातून प्रवेश करून मी आतल्या बाजूला जातो. समोरचे दृश्य फक्त ‘इंडियाना जोन्स‘ किंवा त्या सारख्या तत्सम चित्रपटातच फक्त शोभणारे आहे. मी समोरून बघितलेल्या झाडाने आपली मुळे या वास्तूच्या सर्व बाजूंनी पसरवून अगदी आवळत आणली आहेत. हॉलीवूडच्या अनेक चित्रपटात ता प्रोम मंदिरातील ही गळा आवळणारी झाडे दाखवलेली आहेत. ऍन्जेलिना जोली या सुप्रसिद्ध नटीने लारा क्रॉफ्ट ही व्यक्तीरेखा सादर केलेल्या ‘टूम्ब रेडर‘ या चित्रपटातील काही भागाचे चित्रीकरण या ठिकाणीच केले गेले होते. मी लहान असताना 20000 Leagues under the Sea.या नावाचा एक चित्रपट बघितला होता. त्या चित्रपटात दाखवलेल्या एका महाकाय ऑक्टोपसची, मला ही झाडाची मुळे बघून आठवण होते आहे.

ta prohm  trees 1
गळा आवळणारी मुळे

पुस्तके आणि गाइड्स यात दाखवलेल्या आराखड्याप्रमाणे ता प्रॉम बघताच येत नाही. ही महाकाय झाडे इतकी वेडीवाकडी आणि कशीही वाढलेली आहेत की त्यांच्यातून मार्ग काढतच मंदिर बघावे लागते. मंदिर व्यवस्थापनाने यासाठी एक मार्ग आखून दिला आहे त्यावरूनच चालावे लागते. हा मार्ग इतका वेडावाकडा आहे की माझे दिशांचे सर्व ज्ञान आता नष्ट झाले आहे. पूर्णपणे गोंधळलेल्या स्थितीत मी दिलेल्या मार्गावरून चालतो आहे.
elephant foot
हत्तीचा पाय?

repairs to dancers hall
नर्तकी कक्षाची चालू असलेली देखभाल

ता प्रॉम मंदिर सातवा जयवर्मन (1181-1220)या राजाने आपल्या आईच्या स्मृतीसाठी बांधले असे शिलालेखावरून समजते. हे बुद्धाचे मंदिर आहे असे समजले जाते. पण काही तज्ञ हे मंदिर देवांचा जन्मदाता ब्रह्मा याचेच हे मंदिर आहे असे मानतात. माझ्या मार्गावर एका वास्तूची देखभाल करणारे लोक मला दिसतात. एक मोठी क्रेनही उभारलेली दिसते आहे. ही वास्तू नर्तकी हॉल म्हणून ओळखली जाते. काही काळापूर्वी शेजारील एक मोठे झाड, वीज कोसळल्याने या वास्तूवर पडले व त्याची मोडतोड झाली. आता भारतीय व कंबोडियाचे तज्ञ ही वास्तू पुन्हा ठीकठाक करत आहेत. माझ्या मार्गावर मला अगदी अंधार्‍या बोळकंड्यांतून सुद्धा जावे लागते आहे. जवळच्या भिंतींना मोठमोठे तडे गेलेले दिसत आहेत. त्यामधून पावसाचे पाणी झिरपल्यामुळे सर्वत्र हिरवे शेवाळे वाढले आहे. तरीही कुठेतरी मधूनच, कानाकोपर्‍यातून, सुंदर भित्तिशिल्पे डोकावताना दिसत आहेत. एक ब्रम्हा-विष्णू-महेश यांचे शिल्प मला दिसते. डोक्यावर नर्तकी नाच करत आहेत, खालच्या बाजूस भक्तगण आहेत. दुर्दैवाने मधली विष्णूची मूर्ती कोणीतरी चोरून नेलेली आहे. या मंदिरातून जाताना मधेच अगदी रहस्यमय किंवा भीतिदायक वाटू लागते . तेथून जरा पुढे गेले की अचानक एखादी सुंदर अप्सरा तुम्हाला दिसते.

ta prohm tower
मंदिराचा एक कळस
btahma vishnu mahesh
ब्रह्मा- विष्णू – महेश, वर अप्सरा, खालच्या बाजूस भक्तगण ( शिव मूर्ती चोरीस गेलेली आहे.)

ta prohm carvings
भित्तिशिल्पाचा एक नमुना, प्रत्येक वर्तुळातील डिझाईन निराळेच आहे.
ta prohm apsara
ता प्रॉम मधली एक अप्सरा
inside taprohm
मंदिराच्या अंतर्भागातील शेवाळे चढलेल्या भिंती

ता प्रॉम हे एकेकाळी अत्यंत सधन आणि श्रीमंत असे संस्थान होते. येथे सापडलेल्या एका संस्कृत शिलालेखाप्रमाणे, या मंदिराच्या मालकीची 79365 लोक रहात असलेली 3140 गावे होती. 500 किलोहून जास्त वजन असलेली सोन्याची पात्रे, 35 हिरे, 40620 मोती, 4540 रत्ने, 876 रेशमी अवगुंठने, 5121 रेशमी पलंगपोस आणि 523 रेशमी छत्रे एवढी संपत्ती या मंदिराच्या मालकीची होती. त्या काळातले हे एक तिरूपती मंदिरच हे होते असे म्हणले तरी चालेल.
Ta prohm from west entrance
पश्चिम प्रवेश द्वाराकडून दिसणारे ता प्रॉम मंदिर

मी मंदिराच्या पश्चिम द्वारामधून बाहेर पडतो. या द्वाराजवळ जीर्णोद्धाराचे बरेच काम चालू दिसते. अगदी बाहेरच्या तटाजवळ, बायॉन मंदिरावर बघितलेले जयवर्मन राजाचे चार चेहरे मला परत एकदा दर्शन देतात.आज मला हे चेहेरे “परत नक्की या हं!” असेच सांगत आहेत असा भास होतो.
west  side gopur
पश्चिमेकडचे प्रवेश गोपुर
rajendravarman face
सातव्या जयवर्मन राजाचा चेहरा

माझी गाडी परतीच्या मार्गावर निघाली आहे. माझ्या मनाला मात्र काहीतरी अपूर्णता जाणवते आहे. गेले तीन दिवस मी एवढी भव्य व विशाल मंदिरे बघितली तरी कोठेतरी काहीतरी राहिले आहे, Missing आहे असे मला सारखे सारखे वाटते आहे. हे असे वाटण्याचे कारण माझ्या एकदम लक्षात येते. ही सर्व मंदिरे मी बघितली आहेत खरी! पण ती सर्व एखाद्या पोकळ शिंपल्यासारखी आहेत. ती मंदिरे आहेत असे मानले तर ज्या देवांसाठी किंवा बुद्धासाठी ती बांधली त्या मूर्तीच कोठे दिसल्या नाहीत. जर या वास्तू, राजांच्या समाधी आहेत असे मानले तर निदान त्या राजांच्या मूर्ती किंवा समाधी तरी तिथे आवश्यक होत्या. एखाद्या उत्सवाचा मांडव बघावा पण त्यात उत्सवमूर्तीच असू नये असा काहीसा प्रकार येथे होतो आहे.

एके काळी या मूर्ती तिथे नक्कीच होत्या. परंतु लोभ या मानवी दुर्गुणामुळे, अंगकोरच्या मंदिरातील मूर्ती व भित्तिशिल्पे यांची अनेक शतके चोरी होत राहिलेली आहे. शेवटी उरलेल्या सर्व मूर्ती या मंदिरातून उचलून संग्रहालयात सुरक्षित जागी ठेवण्यात आलेल्या आहेत. हा सगळा खुलासा ठीक आहे हो! पण माझ्या मनाला जी अपूर्णता वाटते आहे त्याचे काय करायचे असा माझ्यापुढे आता खरा प्रश्न आहे.

माझ्या मनाला आलेली ही अपूर्णतेची भावना घालवण्यासाठी, मी आता अंगकोर राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देण्याचे ठरवतो. या म्युझियमचे नाव जरी राष्ट्रीय संग्रहालय असले तरी प्रत्यक्षात ते बॅन्कॉक मधील एक ट्रस्ट, Vilailuck International Holdings यांच्या मालकीचे व एक कमर्शियल संस्था म्हणून चालवले जाणारे संग्रहालय आहे. या प्रदर्शनातील सर्व एक्झिबिट्स, नॉम पेन्हचे राष्ट्रीय संग्रहालय व कंबोडियन सरकारच्या आता ताब्यात असलेली एक मूळ फ्रेंच संस्था Ecole Française d’Extrème Orient (French School of Asian Studies) यांच्याकडून भाडेतत्वावर आणलेली असल्याने, सर्व एक्झिबिट्स मात्र अस्सल किंवा ओरिजिनल आहेत. सियाम रीप मधले हे म्युझियम, नॉम पेन्ह मधल्या मुझियमपेक्षा बरेच लहान आहे असे म्हणतात. परंतु हे म्युझियम फक्त अंगकोर बद्दलच असल्याने मला तरी ते पुरेसे वाटते आहे. म्युझियम मधल्या पहिल्या हॉल मधे बुद्धाच्या 1000 मूर्ती आहेत पण या प्रकारच्या बुद्धमूर्तींचे दालन मी बर्‍याच ठिकाणी बघितले आहे. सिंगापूर मधल्या राष्ट्रीय संग्रहालयात अशा बुद्धाच्या मूर्ती आहेत किंवा भारतात कर्नाटकमधल्या कूर्ग जिल्ह्यातल्या बायलाकुप्पे या गावाजवळ एक मोठा तिबेटी मठ आहे त्यातही बुद्धाच्या अनेक मूर्तीं आहेत. अंगकोर संग्रहालयाच्या पुढच्या सात दालनांत मात्र मला अपेक्षित असलेली बहुतेक एक्झिबिट्स मोठ्या आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेली मला दिसत आहेत. ख्मेर राजांचे अर्ध पुतळे, त्यांचा इतिहास, त्यांच्या लढाया व त्यांनी बांधलेली मंदिरे या संबंधी सर्व माहिती येथे मिळते आहे. अंगकोरची मंदिरे ज्या देवांच्या मूर्तींसाठी बांधली गेली त्या विष्णू , ब्रह्मा, शंकर यांच्या मूर्ती व शिवलिंगे ही येथे बघता येत आहेत. पुढच्या एका दालनात अंगकोर मधले सापडलेले अनेक शिला लेख ठेवलेले आहेत. या ठिकाणी काही शिला लेख संस्कृतमधे आहेत असे खालची पाटी वाचल्याने, ते शिलालेख मी वाचण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. मात्र माझी निराशाच होते कारण भाषा संस्कृत असली तरी लिपी पाली किंवा ख्मेर आहे. ही लिपी खूपशी थाई लिपी सारखीच दिसते. नंतरच्या दालनात अनेक अप्सरांचे मस्तक विरहित पुतळे आहेत. त्यांच्या अंगावरचे अलंकार किंवा कपडे हे त्या काळातल्या परिधान केल्या जात असलेल्या अलंकार किंवा कपडे यासारखे हुबेहूब असल्याने त्या वेळची वेशभूषा, कपडे या संबंधीची माहिती येथे दिसते आहे.
jmhullot-qrOGDLYOKrs- jayavarman vii
सातवा जयवर्मन राजा (फोटो पॅरिस म्युझियम)

म्युझियम मधून बाहेर पडल्यावर माझ्या लक्षात येते आहे की माझ्या मनाला वाटणारी अपूर्णता आता पार नाहीशी झाली आहे. अंगकोरची माझी भेट पूर्ण झाली आहे.

अंगकोर मधे हजार वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती व धर्म (हिंदू व बुद्ध) यांची ही गौरवशाली परंपरा बघितल्यावर प्रत्यक्ष भारतात त्या काली ही संस्कृती किती वैभवशाली असली पाहिजे असे माझ्या मनात येते आहे. भारतापासून 2000 मैलावरचा हा एक देश, आपल्या देशातील लोकांचा मूळ पुरुष भारतीय आहे असे नाते अजून सांगतो. भारतीय धार्मिक परंपरा काय होत्या हे आपल्या देशातील पुरातन मंदिरे, संग्रहालये यातून जतन करतो आहे व या परंपरांबद्दल अजून अभिमान बाळगतो आहे. सियाम रीप मधले गाईड्स त्यांच्या रोजच्या कामात हजारो नव्हे लाखो जगभरच्या लोकांना भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगताना ऐकून त्यावर काय बोलणार असे मनात येते आहे. मात्र या देशाबरोबरचे भारताचे संबंध मैत्रीचे असले तरी जिव्हाळ्याचे नाहीत. भारतीय पर्यटकांना सियाम रीप बद्दल पुरेशी माहितीच नाही. भारतातून थेट विमान सेवा सुद्धा सियाम रीपला नाही. या सगळ्या गोष्टी झाल्या तर भारतीय पर्यटकांचा ओघ अंगकोरकडे सुरू झाल्याशिवाय रहाणार नाही हे नक्की.
jayavarman_big
सातवा जयवर्मन राजा (फोटो पॅरिस म्युझियम)

सॉमरसेट मॉम या लेखकाचे एक वाक्य मी आधी उध्द्रुत केले होते. तो म्हणतो की “अंगकोर वाट बघितल्या शिवाय कोणी मरणाचा विचार सुद्धा करू नये.” मी या विधानात थोडासा बदल करून एवढेच म्हणेन की भारतीय वंशाच्या प्रत्येकाने अंगकोर वाट मंदिराला आवर्जून भेट दिलीच पाहिजे.

28 नोव्हेंबर 2010

Comments

शाही स्नानगृह

वा! शाही स्नानगृहाचे स्थळ आणि शिल्पकला भारी आवडली. सिंधुदुर्गावरील राणीची वेळा आठवली परंतु तिथे असे शिल्पकाम नाही. लारा क्रॉफ्टच्या चित्रपटातील नेमके देऊळ कोणते हा प्रश्न मला होताच त्याचे उत्तर आज मिळाले. हत्तीच्या पायासारखे दुसरे झाड म्हणजे प्रचंड राक्षसी पक्ष्याचा पंजा वाटतो (ज्याला तुम्ही गळा आवळणारी मुळे म्हटले आहे.) एकदम सिंदबादच्या सफरीत सिंदबादला उचलून घेऊन जाणार्‍या पक्ष्याची आठवण झाली ते झाड बघून. केवळ अप्रतिम!

ही झाडे कसली आहेत?

भारत सरकार व कंबोडियाचे सरकार यांनी ता प्रॉम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम एकत्रित हातात घेतलेले आहे असे हा बोर्ड सांगतो आहे. या साठी भारत सरकार आर्थिक मदत करते आहे. मला हा बोर्ड बघून मनातून बरे वाटते. भारतीय संस्कृतीचे पुरातन वैभव काय होते याची जपणूक करणार्‍या या अंगकोरच्या परिसराचे जतन करण्यात भारत सरकारचा कुठे तरी हातभार लागतो आहे ही माझ्या दृष्टीने खरोखर आनंदाची बाब आहे.

हे वाचून मलाही आनंद झाला.

ता प्रॉम मधली झाडे

या झाडांचे जेनेरिक नाव फिग ट्री असेच आहे. मला बॉटनीमधले फारसे ज्ञान नाही परंतू वड पिंपळ वगैरे सर्व झाडे याच कुटुंबातील असतात असे वाटते. या झाडाचे ख्मेर भाषेतले नाव "Chheuteal" असे आहे व लॅटिनमधले नाव Dipterocarpus alatus हे आहे असे येथे असलेल्या पाटीवर वाचले. जास्त खुलासा कोणी बॉटनीस्ट उपक्रमी असले तर करू शकतील असे वाटते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

ख्मेर जेवण

वरला प्रतिसाद राखून ठेवला आहे पण हा किंचित अवांतर प्रतिसाद -

  • ख्मेर जेवणात काय जेवलात? शाकाहारी जेवण मिळाले का?
  • कोणत्या प्रमुख भाज्यांचा वापर दिसला?
  • चीनी खाद्यसंस्कृतीशी मेळ खाणारे जेवण वाटले की थाई खाद्यसंस्कृतीशी? (म्हणजे नारळाच्या रसाचा वापर वगैरे दिसला का?)
  • भारतीय खाद्यसंस्कृतीशी काही मेळ जमवता आला का?
  • काही खास कंबोडियन पाककृती/ मिठाया/ न्याहरी किंवा स्नॅक्सचे पदार्थ चाखावयास मिळाले का?

ख्मेर भोजन

1. कंबोडियामधे बौद्ध भिख्खूंच्या प्रभावामुळे शाकाहारी जेवण सहजपणे मिळते. मी गेली काही वर्षे एगेटेरिअयन असल्यामुळे मला तसे जेवण हवे होते व ते सहज मिळाले. या जेवणात भात आणि करी हे दोन मुख्य पदार्थ दिसले. टोनले साप व मेकॉन्ग नद्यांच्यात मिळणारे मासे त्याशिवाय प्रॉंन्स, खेकडे, चिकन वगैरे पदार्थ असतातच. जेवणात मसाल्याऐवजी प्रॉन्स सॉस वापरले जाते.
2. सर्व नेहमीच्या भाज्या मिळतात. मात्र सर्व कुकिंग नारळाच्या दुधात बहुदा केले जाते. दाण्याच्या कुटाचा वापर भरपूर असतो.

3. जेवणावर थाई जेवणाची छाया होती. थोडे चिनी पद्धतीचे पदार्थ मिळतात.
4. भारतीय खाद्यसंस्कृतीशी साधर्म्य म्हणजे भात व रस्सा यांच्या सारखे पदार्थ. बाकी फारसे नाही. गव्हाचे पदार्थ जवळ जवळ नाहीतच नूडल्स मिळतात.
5. काही खास कंबोडियन पदार्थ, तळलेले केळ्याचे काप, गोठवलेले नारळाचे दूध वापरून केलेली डेझर्ट्स मिळाली. बाकी फ्रेंच प्रभाव खूप असल्याने केक्स, पेस्ट्रीज, फ्रिटर्स वगैरे सहज मिळतात.
एकूण जेवणाची आणि सामिष जेवणार्‍यांची चंगळ आहे. भारतीय रेस्टॉरंट्स पण आहेत.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

वर्णन आणि छायाचित्रे आवडली

तुमच्या सहा लेखांचा पुरेपूर आस्वाद घेतला. आम्ही केलेल्या प्रवासात काय काय राहिले याची नोंद करत होतो. आमचा दिनक्रम आणि तुमचा यात फारसा फरक नव्हता. प्रत्यक्षात हे दिवस कमी पडल्याचे मला जाणवले होते. आम्ही बघताना फारसा अभ्यास करून गेलो नव्हतो. तसेच कुणा वाटाड्याची मदत घेतली नव्हती. त्यामुळे तुम्ही जे शिल्पातील बारकावे टिपले ते आमच्या कडून राहून गेले.

(मी असे धरून चालतो की ही लेखमाला पूर्ण झाली.) (जमल्यास पुढ्च्या माहितीतले फोटो अपलोड करीन.)

आमच्या भेटीत मला काही अजून गोष्टी जाणवल्या. कंबोडिया/कांपुचिया हा देश अगदी गरीब. त्यात त्यांच्या कडे प्रदीर्घ युद्ध झाले आणि जालीम हुकुमशहा यामुळे देश अगदी गांजून गेला आहे. (जगात एवढा जालीम हुकुमशहा झाला नसावा. अगदी हिटलरला लाज येईल अशी याची कृष्णकृत्ये.) वियेटनाम युद्धात अनेक भूसुरुंग या देशात टाकले होते. कित्येक अजूनही जिवंत आहेत. एखादा माणूस पायी जात असेल तर अचानक पायाखाली येऊन तो फुटतो. तो माणूस मरत नाही. पण एक पाय गमावून बसतो. अशा पाय गमावलेल्यांची खूप मोठी संख्या या देशात आहेत. (मी असे ऐकले होते की रशियात असे अनेक माजी सैनिक आहेत की ज्यांनी अफगाण युद्धात पाय गमावले आहेत. आणि भिकेला लागले आहेत.) कित्येक मंदिरात अशा पाय गमावलेल्यांचे पथक वाद्य पथक चालू असते. पर्यटक यांना मदत (भीक) करतात.

येथील मुले शाळेत जातात (सायकलवरून शाळेत जाणारी मुले खूप दिसतात.). मोडके तोडके इंग्रजी बोलतात. छोट्या छोट्या वस्तु विकायला उभी असतात. विक्रेते आणि गाईड हे अगदी आपल्या देशातील (गरीब भागातील) पर्यटनस्थला सारखे असतात.

देशातील रस्ते अगदी वाईट असावेत. माझ्या मनात बँकॉक वरून रस्त्याने सियाम रिप ला जायचे होते. पण विसा (रस्त्यावरील केंद्रात मिळत नाही.) आणि खराब रस्ते (१०० कि.मि. ला ६ तास अंदाजित वेळ) यामुळे तो रहित केला. सियाम रिप आणि आसपास मात्र रस्ते चांगले होते.

येथील एक वाहन म्हणजे टुकटुक मोटर सायकलच्या मागे छानशी बग्गी. या वाहनाच्या प्रेमात मी पडलो. अगदी उघडया टपातून (बरेसे शॉकॅप्सॉर्बर्स) आजुबाजुचे बघत हळू हळू (वेग थोडा कमी) आपण जातो. लोकांनी या वाहनाने निर्धोक जावे. मजा येते. (टॅक्सी ऐवजी हे बरेच स्वस्त आहे.)

येथील स्थानिक चलन जवळपास वापरले जात नाही. (पर्यटकांसाठी) सर्वांना अमेरिकन डॉलर कळतात.

आम्ही कुठल्याही टूर सोबत गेलो नाही. आपले हॉटेलचे रिजर्वेशन इंटरनेटवरून केले. याचा बिलकूल पस्तावा झाला नाही.

आम्ही इंडोनेशियाला गेलो होतो. तेथील बोरोबद्दुर यास्थळाला भेट दिली होती. त्या ठिकाणची हिंदू मंदीरे (प्रंबानन) आणि बुध्द मंदिर (बोरोबद्दुर) ही याच प्रमाणे भेट देण्या सारखी आहेत. अगदी सॉमरसेट मॉमने सांगितल्या प्रमाणे. यातील बोरोबद्दुर येथे दहालाख शिल्पे असलेले दगड सुटे करून युनेस्कोने परत जागच्या जागी ठेवले. याच धर्तीवर अंगकोर (आणि आसपास) येथील प्रत्येक मंदिराचा जिर्णोद्धार सुरु आहे. भारताने यातले एक मंदीर करायला घेतले आहे. जे दगड हरवले आहेत मिळत नाही त्याबदल्यात तसेच कॉन्क्रिटचे दगड करून ठेवले जातात. (भारताच्या या कारखान्याची काही चित्र माझ्या कडे आहेत.) अगदी हळू पण निश्चित दिशेने हे काम सुरु असल्याचे जाणवते. हे सर्व बघून मात्र मला बरीचशी लाज वाटली. महाराष्ट्रातील रायगडासारख्या ठिकाणी असे काहीच प्रयत्न सुरु असल्याचे जाणवत नाहीत. भग्नावशेषातून परत सृष्टी उभारता येते. पण आपल्याला तशी इच्छा नाही असे राहून राहून वाटले.

देवांच्या बाबतीत बरेच काही जाणवले पण कदाचित तो वेगळा चर्चेचा विषय होईल.

प्रमोद

आपली निरिक्षणे

माझी निरिक्षणे आपल्या निरिक्षणांशी खूपशी जुळतात. मला असे कळले की मागच्या दोन वर्षात कंबोडियामधे खूप फरक पडला आहे. त्यामुळे कदाचित माझी निरिक्षणे थोडी निराळी असावीत. आता थाई सीमेवरून सहजपणे सियाम रीपला जाता येते असे म्हणतात. मला अनुभव नाही.
बांते स्त्राय च्या रस्त्यावर मी भू-सुरूंग संग्रहालय बघितले होते. त्याचे वर्णन माझ्या या ब्लॉगपोस्टवर आहे. या संग्रहालयात कंबोडियाच्या यादवी युद्धात जी पाशवी कृत्ये केली गेली त्यांची बर्‍यापैकी कल्पना येते.
आम्ही फक्त सियाम रीपची टूर प्लॅन केली होती. त्यामुळे बर्‍याच बारकाईने सर्व बघता आले. बोरोबुदुरला जाण्याचा प्लॅन पुढच्या वर्षी आहे. बघू कसे जमते ते. आम्ही सुद्धा आंतरजालावरूनच प्लॅन केले होते. टूर किंवा गाईड घेतला नाही. मात्र जाण्या आधी बराच अभ्यास करून गेलो त्यामुळे काय बघायचे ते नेमके माहीत होते. चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

बोरोबुदुर

बोरोबुदुरला जाण्याचा प्लॅन पुढच्या वर्षी आहे. बघू कसे जमते ते.

शुभेच्छा! अवश्य प्लॅन करा. फक्त ते प्रवासवर्णन उपक्रमावर टाकण्याची वाट बघू नका. ;-) जाऊन आलात की लगेच टाका.

लेख मालिका वाचनीय

ज्यांना इतिहासाबद्द्ल रुची आहे त्यांनी नक्कीच जावे असे हे ठिकाण दिसतेय. तुमची ही लेख मालिका वाचनीय आहे.
मी मात्र पर्यटनात पैसे घालवायचेच असेल तर एखाद्या सायन्स म्युझियमला भेट देइन.

फार फार आभारी

एका अद्भुत दुनियेची अतिशय अतिशय उत्तम ओळख, आणि तीही मराठीतून, करून दिल्याबद्दल फार फार आभारी आहे. अंगकोरला जायलाच हवे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अप्रतिम

अप्रतिम माहिती, चित्रे. लेखमालेबद्दल धन्यवाद.

सुरेख

पूर्ण लेखमाला वाचली. वाचताना माझी पण आभासी सहल झाल्यासारखे वाटले.
माहिती आणि चित्रे छानच. अंगकोरची सुरेख ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

सुंदर लेखमाला

आता आमचे बोडोबुदूरचे बुकिंग घ्या :-)

लेखमालिका

'देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही)' ह्या मालिकेतील लेखांना एकत्र गोवून लेखमालिका संग्रहात समावेश करण्यात आला आहे. ह्याशिवाय अन्य काही लेखमालिकांतील लेखांना लवकरच असे एकत्र गोवण्यात येईल.

 
^ वर