चविष्ट ख्मेर भोजनाचा आस्वाद घेऊन मी रेस्टॉरंटच्या बाहेर येतो. समोरच्याच बाजूला असलेला हा जलाशय जगातील सर्वात मोठा पोहण्याचा तलाव म्हणून ओळखला जातो. याचे नाव आहे स्रा स्रान्ग(Sra Srang). या नावाचा अर्थ होतो शाही स्नानगृह. सातवा जयवर्मन या राजाने स्वत:च्या स्नानासाठी व ध्यानधारणेसाठी शांत जागा पाहिजे म्हणून याची निर्मिती केली होती. या जलाशयात आजही भरपूर पाणी दिसते आहे. तलावाच्या मध्यभागी एक छोटेसे बेट ठेवून तेथे एक छोटी झोपडी बांधली होती. त्या झोपडीत राजा ध्यानधारणा करत असे. तलावाच्या एका बाजूला स्नानाची जागा म्हणून घाट बांधलेला आहे. त्यावरची कलाकुसर अजुनही बर्याच प्रमाणात टिकून आहे. या तलावामुळे हा भाग मोठा रमणीय झाला आहे हे मात्र खरे! त्याच्या काठावर ख्मेर जेवण देणारी बरीच रेस्टॉरंट्स दिसतात. एकूणच स्पॉट मस्त आहे.
![]() |
स्रा स्रॉन्ग जलाशय, जगातील सर्वात मोठा पोहण्याचा तलाव |
![]() |
शाही स्नानगृह |
भोजन झाल्यावर आता मी माझ्या ठरवलेल्या कार्यक्रमापैकीचे शेवटचे देऊळ बघायला चाललो आहे. ता प्रॉम (Ta Prohm.) या नावाने ओळखल्या जाणार्या या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. या मंदिरावर, मधल्या काळात(इ.स.1400 ते 1800) आजुबाजुला वाढणार्या जंगलाच्या आक्रमणामुळे जो विध्वंस झाला तो बर्याचशा प्रमाणात तसाच जतन करून ठेवण्यात आलेला आहे. निसर्ग जसा पृथ्वीचे वर्धन करत असतो तसाच तो आक्रमण करून मानवनिर्मित बांधलेल्या सर्व कृत्रिम वस्तू नष्टही करत असतो. मानवाने बांधलेली मंदिरे ही कितीही भव्य व विशाल असली तरी शेवटी कृत्रिमच म्हणावी लागतात. त्यांची देखभाल बंद झाल्याबरोबर निसर्गाने ही कृत्रिम मंदिरे कशा पद्धतीने उध्वस्त करण्यास आरंभ केला होता हे येथे छान जपून ठेवण्यात आले आहे.
![]() |
ता प्रॉम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी भारत-कंबोडिया एकत्रित प्रकल्प |
माझी गाडी मंदिराच्या पूर्व प्रवेश द्वाराजवळ मला सोडते. प्रवेशद्वारावरचे गोपुर आता जवळपास नष्ट झाल्यासारखे आहे. द्वाराजवळ लावलेल्या एका बोर्डवर भारताच्या ध्वजाचे चित्र बघितल्याने जवळ जाऊन मी तो बोर्ड मुद्दाम बघतो. भारत सरकार व कंबोडियाचे सरकार यांनी ता प्रॉम मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम एकत्रित हातात घेतलेले आहे असे हा बोर्ड सांगतो आहे. या साठी भारत सरकार आर्थिक मदत करते आहे. मला हा बोर्ड बघून मनातून बरे वाटते. भारतीय संस्कृतीचे पुरातन वैभव काय होते याची जपणूक करणार्या या अंगकोरच्या परिसराचे जतन करण्यात भारत सरकारचा कुठे तरी हातभार लागतो आहे ही माझ्या दृष्टीने खरोखर आनंदाची बाब आहे.
या द्वारातून प्रवेश करून मी पुढे जातो आहे. मोठमोठ्या वृक्षांच्या घनदाट छाया असलेल्या एका रस्त्यावरुन पुढे गेल्यावर, समोरचे दृष्य बघून माझी पाय एकदम थबकतातच. समोर एक पडकी वास्तू दिसते आहे. हे बहुदा मंदिराचे प्रवेश गोपुर असावे. या वास्तूच्या डोक्यावर एक मोठे झाड चक्क उगवल्यासारखे दिसते आहे. फोटो काढायला शिकणारे शिकाऊ उमेदवार, जसे समोरच्या माणसाच्या डोक्यातून उगवलेला एखादा खांब किंवा नारळाचे झाड या सारखे फोटो काढतात, तसेच हे समोरचे दृष्य आहे. जर मी याचा नुसता फोटो बघितला असता तर ही काहीतरी फोटोग्राफीची ट्रिक आहे असे समजून त्यावर कधीच विश्वास ठेवला नसता. आता समोर हे दृश्य दिसतच असल्याने त्यावर विश्वास ठेवणे भागच आहे.
![]() |
अशक्य कोटीतील ता प्रॉम |
ता प्रॉम मंदिराचा सर्व परिसर या असल्या अजस्त्र व अवाढव्य वृक्षांच्या छायेखाली सतत झाकलेला असल्याने अगदी टळटळीत दुपारी सुद्धा इथली हवा थंड व हवेशीर असते. या पडक्या गोपुरातून प्रवेश करून मी आतल्या बाजूला जातो. समोरचे दृश्य फक्त ‘इंडियाना जोन्स‘ किंवा त्या सारख्या तत्सम चित्रपटातच फक्त शोभणारे आहे. मी समोरून बघितलेल्या झाडाने आपली मुळे या वास्तूच्या सर्व बाजूंनी पसरवून अगदी आवळत आणली आहेत. हॉलीवूडच्या अनेक चित्रपटात ता प्रोम मंदिरातील ही गळा आवळणारी झाडे दाखवलेली आहेत. ऍन्जेलिना जोली या सुप्रसिद्ध नटीने लारा क्रॉफ्ट ही व्यक्तीरेखा सादर केलेल्या ‘टूम्ब रेडर‘ या चित्रपटातील काही भागाचे चित्रीकरण या ठिकाणीच केले गेले होते. मी लहान असताना 20000 Leagues under the Sea.या नावाचा एक चित्रपट बघितला होता. त्या चित्रपटात दाखवलेल्या एका महाकाय ऑक्टोपसची, मला ही झाडाची मुळे बघून आठवण होते आहे.
![]() |
गळा आवळणारी मुळे |
पुस्तके आणि गाइड्स यात दाखवलेल्या आराखड्याप्रमाणे ता प्रॉम बघताच येत नाही. ही महाकाय झाडे इतकी वेडीवाकडी आणि कशीही वाढलेली आहेत की त्यांच्यातून मार्ग काढतच मंदिर बघावे लागते. मंदिर व्यवस्थापनाने यासाठी एक मार्ग आखून दिला आहे त्यावरूनच चालावे लागते. हा मार्ग इतका वेडावाकडा आहे की माझे दिशांचे सर्व ज्ञान आता नष्ट झाले आहे. पूर्णपणे गोंधळलेल्या स्थितीत मी दिलेल्या मार्गावरून चालतो आहे.
हत्तीचा पाय?
![]() |
नर्तकी कक्षाची चालू असलेली देखभाल |
ता प्रॉम मंदिर सातवा जयवर्मन (1181-1220)या राजाने आपल्या आईच्या स्मृतीसाठी बांधले असे शिलालेखावरून समजते. हे बुद्धाचे मंदिर आहे असे समजले जाते. पण काही तज्ञ हे मंदिर देवांचा जन्मदाता ब्रह्मा याचेच हे मंदिर आहे असे मानतात. माझ्या मार्गावर एका वास्तूची देखभाल करणारे लोक मला दिसतात. एक मोठी क्रेनही उभारलेली दिसते आहे. ही वास्तू नर्तकी हॉल म्हणून ओळखली जाते. काही काळापूर्वी शेजारील एक मोठे झाड, वीज कोसळल्याने या वास्तूवर पडले व त्याची मोडतोड झाली. आता भारतीय व कंबोडियाचे तज्ञ ही वास्तू पुन्हा ठीकठाक करत आहेत. माझ्या मार्गावर मला अगदी अंधार्या बोळकंड्यांतून सुद्धा जावे लागते आहे. जवळच्या भिंतींना मोठमोठे तडे गेलेले दिसत आहेत. त्यामधून पावसाचे पाणी झिरपल्यामुळे सर्वत्र हिरवे शेवाळे वाढले आहे. तरीही कुठेतरी मधूनच, कानाकोपर्यातून, सुंदर भित्तिशिल्पे डोकावताना दिसत आहेत. एक ब्रम्हा-विष्णू-महेश यांचे शिल्प मला दिसते. डोक्यावर नर्तकी नाच करत आहेत, खालच्या बाजूस भक्तगण आहेत. दुर्दैवाने मधली विष्णूची मूर्ती कोणीतरी चोरून नेलेली आहे. या मंदिरातून जाताना मधेच अगदी रहस्यमय किंवा भीतिदायक वाटू लागते . तेथून जरा पुढे गेले की अचानक एखादी सुंदर अप्सरा तुम्हाला दिसते.
![]() |
मंदिराचा एक कळस |
![]() |
ब्रह्मा- विष्णू – महेश, वर अप्सरा, खालच्या बाजूस भक्तगण ( शिव मूर्ती चोरीस गेलेली आहे.) |
भित्तिशिल्पाचा एक नमुना, प्रत्येक वर्तुळातील डिझाईन निराळेच आहे.
ता प्रॉम मधली एक अप्सरा
मंदिराच्या अंतर्भागातील शेवाळे चढलेल्या भिंती
ता प्रॉम हे एकेकाळी अत्यंत सधन आणि श्रीमंत असे संस्थान होते. येथे सापडलेल्या एका संस्कृत शिलालेखाप्रमाणे, या मंदिराच्या मालकीची 79365 लोक रहात असलेली 3140 गावे होती. 500 किलोहून जास्त वजन असलेली सोन्याची पात्रे, 35 हिरे, 40620 मोती, 4540 रत्ने, 876 रेशमी अवगुंठने, 5121 रेशमी पलंगपोस आणि 523 रेशमी छत्रे एवढी संपत्ती या मंदिराच्या मालकीची होती. त्या काळातले हे एक तिरूपती मंदिरच हे होते असे म्हणले तरी चालेल.
पश्चिम प्रवेश द्वाराकडून दिसणारे ता प्रॉम मंदिर
मी मंदिराच्या पश्चिम द्वारामधून बाहेर पडतो. या द्वाराजवळ जीर्णोद्धाराचे बरेच काम चालू दिसते. अगदी बाहेरच्या तटाजवळ, बायॉन मंदिरावर बघितलेले जयवर्मन राजाचे चार चेहरे मला परत एकदा दर्शन देतात.आज मला हे चेहेरे “परत नक्की या हं!” असेच सांगत आहेत असा भास होतो.
पश्चिमेकडचे प्रवेश गोपुर
सातव्या जयवर्मन राजाचा चेहरा
माझी गाडी परतीच्या मार्गावर निघाली आहे. माझ्या मनाला मात्र काहीतरी अपूर्णता जाणवते आहे. गेले तीन दिवस मी एवढी भव्य व विशाल मंदिरे बघितली तरी कोठेतरी काहीतरी राहिले आहे, Missing आहे असे मला सारखे सारखे वाटते आहे. हे असे वाटण्याचे कारण माझ्या एकदम लक्षात येते. ही सर्व मंदिरे मी बघितली आहेत खरी! पण ती सर्व एखाद्या पोकळ शिंपल्यासारखी आहेत. ती मंदिरे आहेत असे मानले तर ज्या देवांसाठी किंवा बुद्धासाठी ती बांधली त्या मूर्तीच कोठे दिसल्या नाहीत. जर या वास्तू, राजांच्या समाधी आहेत असे मानले तर निदान त्या राजांच्या मूर्ती किंवा समाधी तरी तिथे आवश्यक होत्या. एखाद्या उत्सवाचा मांडव बघावा पण त्यात उत्सवमूर्तीच असू नये असा काहीसा प्रकार येथे होतो आहे.
एके काळी या मूर्ती तिथे नक्कीच होत्या. परंतु लोभ या मानवी दुर्गुणामुळे, अंगकोरच्या मंदिरातील मूर्ती व भित्तिशिल्पे यांची अनेक शतके चोरी होत राहिलेली आहे. शेवटी उरलेल्या सर्व मूर्ती या मंदिरातून उचलून संग्रहालयात सुरक्षित जागी ठेवण्यात आलेल्या आहेत. हा सगळा खुलासा ठीक आहे हो! पण माझ्या मनाला जी अपूर्णता वाटते आहे त्याचे काय करायचे असा माझ्यापुढे आता खरा प्रश्न आहे.
माझ्या मनाला आलेली ही अपूर्णतेची भावना घालवण्यासाठी, मी आता अंगकोर राष्ट्रीय संग्रहालयाला भेट देण्याचे ठरवतो. या म्युझियमचे नाव जरी राष्ट्रीय संग्रहालय असले तरी प्रत्यक्षात ते बॅन्कॉक मधील एक ट्रस्ट, Vilailuck International Holdings यांच्या मालकीचे व एक कमर्शियल संस्था म्हणून चालवले जाणारे संग्रहालय आहे. या प्रदर्शनातील सर्व एक्झिबिट्स, नॉम पेन्हचे राष्ट्रीय संग्रहालय व कंबोडियन सरकारच्या आता ताब्यात असलेली एक मूळ फ्रेंच संस्था Ecole Française d’Extrème Orient (French School of Asian Studies) यांच्याकडून भाडेतत्वावर आणलेली असल्याने, सर्व एक्झिबिट्स मात्र अस्सल किंवा ओरिजिनल आहेत. सियाम रीप मधले हे म्युझियम, नॉम पेन्ह मधल्या मुझियमपेक्षा बरेच लहान आहे असे म्हणतात. परंतु हे म्युझियम फक्त अंगकोर बद्दलच असल्याने मला तरी ते पुरेसे वाटते आहे. म्युझियम मधल्या पहिल्या हॉल मधे बुद्धाच्या 1000 मूर्ती आहेत पण या प्रकारच्या बुद्धमूर्तींचे दालन मी बर्याच ठिकाणी बघितले आहे. सिंगापूर मधल्या राष्ट्रीय संग्रहालयात अशा बुद्धाच्या मूर्ती आहेत किंवा भारतात कर्नाटकमधल्या कूर्ग जिल्ह्यातल्या बायलाकुप्पे या गावाजवळ एक मोठा तिबेटी मठ आहे त्यातही बुद्धाच्या अनेक मूर्तीं आहेत. अंगकोर संग्रहालयाच्या पुढच्या सात दालनांत मात्र मला अपेक्षित असलेली बहुतेक एक्झिबिट्स मोठ्या आकर्षक पद्धतीने मांडून ठेवलेली मला दिसत आहेत. ख्मेर राजांचे अर्ध पुतळे, त्यांचा इतिहास, त्यांच्या लढाया व त्यांनी बांधलेली मंदिरे या संबंधी सर्व माहिती येथे मिळते आहे. अंगकोरची मंदिरे ज्या देवांच्या मूर्तींसाठी बांधली गेली त्या विष्णू , ब्रह्मा, शंकर यांच्या मूर्ती व शिवलिंगे ही येथे बघता येत आहेत. पुढच्या एका दालनात अंगकोर मधले सापडलेले अनेक शिला लेख ठेवलेले आहेत. या ठिकाणी काही शिला लेख संस्कृतमधे आहेत असे खालची पाटी वाचल्याने, ते शिलालेख मी वाचण्याचा निष्फळ प्रयत्न करतो. मात्र माझी निराशाच होते कारण भाषा संस्कृत असली तरी लिपी पाली किंवा ख्मेर आहे. ही लिपी खूपशी थाई लिपी सारखीच दिसते. नंतरच्या दालनात अनेक अप्सरांचे मस्तक विरहित पुतळे आहेत. त्यांच्या अंगावरचे अलंकार किंवा कपडे हे त्या काळातल्या परिधान केल्या जात असलेल्या अलंकार किंवा कपडे यासारखे हुबेहूब असल्याने त्या वेळची वेशभूषा, कपडे या संबंधीची माहिती येथे दिसते आहे.
सातवा जयवर्मन राजा (फोटो पॅरिस म्युझियम)
म्युझियम मधून बाहेर पडल्यावर माझ्या लक्षात येते आहे की माझ्या मनाला वाटणारी अपूर्णता आता पार नाहीशी झाली आहे. अंगकोरची माझी भेट पूर्ण झाली आहे.
अंगकोर मधे हजार वर्षापूर्वीची भारतीय संस्कृती व धर्म (हिंदू व बुद्ध) यांची ही गौरवशाली परंपरा बघितल्यावर प्रत्यक्ष भारतात त्या काली ही संस्कृती किती वैभवशाली असली पाहिजे असे माझ्या मनात येते आहे. भारतापासून 2000 मैलावरचा हा एक देश, आपल्या देशातील लोकांचा मूळ पुरुष भारतीय आहे असे नाते अजून सांगतो. भारतीय धार्मिक परंपरा काय होत्या हे आपल्या देशातील पुरातन मंदिरे, संग्रहालये यातून जतन करतो आहे व या परंपरांबद्दल अजून अभिमान बाळगतो आहे. सियाम रीप मधले गाईड्स त्यांच्या रोजच्या कामात हजारो नव्हे लाखो जगभरच्या लोकांना भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगताना ऐकून त्यावर काय बोलणार असे मनात येते आहे. मात्र या देशाबरोबरचे भारताचे संबंध मैत्रीचे असले तरी जिव्हाळ्याचे नाहीत. भारतीय पर्यटकांना सियाम रीप बद्दल पुरेशी माहितीच नाही. भारतातून थेट विमान सेवा सुद्धा सियाम रीपला नाही. या सगळ्या गोष्टी झाल्या तर भारतीय पर्यटकांचा ओघ अंगकोरकडे सुरू झाल्याशिवाय रहाणार नाही हे नक्की.
सातवा जयवर्मन राजा (फोटो पॅरिस म्युझियम)
सॉमरसेट मॉम या लेखकाचे एक वाक्य मी आधी उध्द्रुत केले होते. तो म्हणतो की “अंगकोर वाट बघितल्या शिवाय कोणी मरणाचा विचार सुद्धा करू नये.” मी या विधानात थोडासा बदल करून एवढेच म्हणेन की भारतीय वंशाच्या प्रत्येकाने अंगकोर वाट मंदिराला आवर्जून भेट दिलीच पाहिजे.
28 नोव्हेंबर 2010