मुलांचा चित्रमय महाराष्ट्र -विद्याधर अमृते (पुस्तक परिचय)

बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।

श्री.कृ.कोल्हटकरांचे हे गीत अलिकडेच बोर्डी येथे भरलेल्या मराठी विज्ञान परिषदेच्या ४५व्या अधिवेशनात ऐकायला मिळाले. तीसेक, लहान-लहान मुलांनी एका सुरात म्हटलेले हे गाणे ऐकून मला खरोखरीच महाराष्ट्राची महती पटली अन अंगावर रोमांच उभे राहिले.
विशेष म्हणजे ही मुले जवळच्या एका आदिवासी पाड्यामधली होती. संपन्न महाराष्ट्रातील ह्या अधिवेशनात गवसलेली आणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे जवळच्याच कोसबाड येथील एक हरहुन्नरी शिक्षक-श्री. विद्याधर अमृते यांनी साकारलेले पुस्तक "मुलांचा चित्रमय महाराष्ट्र"! नावावरुन जरी हे मुलांचे पुस्तक असले तरीही मोठयांनाही चाळावेसे वाटेल असे हे पुस्तक आहे.

नेहमीच्या एटलासमध्ये राजकीय, नैसर्गिक, रेल्वे-रस्ते असे ठराविक नकाशे व त्यांची सूची असते. सर्वसामान्य मुलांना असे नुसतेच नकाशे वाचून फारसा बोध होत नाही. नकाशा हा फक्त भूगोलातच अभ्यासला जावा व त्यातील माहिती ही केवळ पाठ करून परीक्षेत लिहिता यावी ह्या कल्पनेला इथे छेद दिला आहे. ह्या पुस्तकातील नकाशे अतिशय बोलके आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासाची, संस्कृतीची, उद्योगांची, शेती-फळबागांची सचित्र माहिती दिलेली आहे. विषयानुरूप प्रत्येक पानावर एका प्रसिद्ध कवितेची ओळ दिलेली आहे. भूगोलाबरोबर भाषा, इतिहास, चालू घडामोडी, जनजीवन, ग्रामीण-शहरी भाग अशा अनेक गोष्टी या लहानशा पुस्तकाद्वारे शिकवता येतील. अगदी प्रत्येक नकाशा चित्रांनी नटलेला आहे. वेचक माहिती व त्याखालचे प्रश्न, शब्दकोडी, नकाशा भरण्याच्या कृतींमधून मुलांना हसत-खेळत शिकता येईल.

मुखपृष्ठावरचे महाराष्ट्रातील फ़ळांचे फ़ृटसॅलड बघून तोंडाला पाणीच सुटते
मुखपृष्ठावरचे महाराष्ट्रातील फ़ळांचे फ़ृटसॅलड बघून तोंडाला पाणीच सुटते.

जी मुले वाचण्याचा कंटाळा करतात त्यांचेही मन ह्या पुस्तकात रमेल. कारण ह्यात शास्त्र, काव्य, चित्रकला आणि छायाचित्रांचा सुंदर मेळ घातलेला आहे. मुखपृष्ठावरचे महाराष्ट्रातील फ़ळांचे फ़ृटसॅलड बघून तोंडाला पाणीच सुटते. पन्नास रंगीत, गुळगुळीत पानांचे हे पुस्तक म्हणजे माहितीची मोठी खाणच आहे. अमृते सरांच्या शब्दांत म्हणायचे तर जितके खणाल तितकी अधिक माहिती मिळेल!

गौरी दाभोळकर

संदर्भ- मुलांचा चित्रमय महाराष्ट्र, कर्ता व रचनाकार विद्याधर अमृते, नकाशाकार डॉ. प्रसाद गोगटे, मनन प्रकाशन, मुंबई ४०००५७ फोन ०२२-२६१७०९०८, २६१८२१२४ मूल्य- १०० रु.

Comments

पुस्तकाची जाहीरात

मी एक सत्यकथा दिली होती, ती उपक्रम प्रशासनाने काढून टाकली. का काढली ते कळवले पण नाही. येथे सरळसरळ एका पुस्तकाची जाहीरात केलेली आहे, ती कशी नियमात बसते?

जाहीरात?

मी एक सत्यकथा दिली होती, ती उपक्रम प्रशासनाने काढून टाकली. का काढली ते कळवले पण नाही. येथे सरळसरळ एका पुस्तकाची जाहीरात केलेली आहे, ती कशी नियमात बसते?

याला पुस्तक परिचय म्हणतात. जाहीरात नाही.गौरीताईंनी एका चांगल्या आणि उपयुक्त पुस्तकाची माहिती करून दिली. विद्याधर अमृत्यांचे कौतुक वाटते.

मला या नकाशांची संकल्पना फार आवडली. मला स्वतःला अशाप्रकारचे नकाशे पाहण्यास आवडतात.

अवांतरः आपली कथा काढलेली नसून स्थानांतरित झाली असे दिसते. तसेही उपक्रमावर कथा या प्रकाराला स्थान नाही.

छान

पुस्तकपरिचय आवडला. लहान मुलांसाठी अशा वेगळ्या स्वरूपाचं, वेगवेगळ्या क्षेत्रांतली माहिती सोप्या भाषेत एकत्र देणारं पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल असं वाटतं.

अवांतर - या लेखात पुस्तकाची जाहिरात केली आहे असं वाटत नाही. या न्यायाने सारेच समीक्षात्मक लेख, चित्रपटांची परीक्षणं रद्दबातल करावी लागतील.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

+१

असेच म्हणतो.

बाकी हे पुस्तक विक्रीसाठी सर्वत्र (महाराष्ट्रात) उपलब्ध आहे का?

ग्रामिण भागात उपयोगी

श्री. विद्याधर सरांचा मुलांसाठी काहीतरी छान करण्याचा संकल्प पुरा झाला, हे वाचून बरे वाटले. पुस्तक छानच असेल. पण आत्ताच्या मुलांना संगणक, दुचिवामुळे 'न वाचताच' केवळ 'पाहून, ऐकून' बरीच माहिती मिळत आहे. आत्ताच्या काळात मुलांसाठी काही करायचेच म्हटले तर, 'तुम्ही किती 'चिकीत्सक होवून पाहू व ऐकू शकता' व ते 'लक्शात ठेवू शकता'' अशा प्रकारचे कार्यक्रम आखावे लागतील.

संगणक नाही तेथे.....

शहरातील मुलांना एवीतेवी माहिती भरपूर मिळतच असते. पण महाराष्ट्रातील कितीतरी गावांत संगणक व दूरचित्रवाणी संच पोचले तरी वीजपुरवठाच जेमतेम ५-६ तास असतो. हातात चित्राचे पुस्तक मिळणे केव्हाही छानच!

ता.क. पुस्तकाची जाहिरात करण्याचा हेतू मुळीच नाही. आवडलेल्या पुस्तकाबद्दल सांगावेसे वाटले इतकेच.

गौरी

पुस्तक परिचय आवडला

मुखपृष्ट छान दिसले. चित्रमय भुगोल बघायला निश्चित चांगला वाटेल.

प्रमोद

उत्तम ओळख

कारण ह्यात शास्त्र, काव्य, चित्रकला आणि छायाचित्रांचा सुंदर मेळ घातलेला आहे.

अशा बहुपैलवी * पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. नकाशांचा कल्पक वापर - निव्वळ भौगोलिकच नाही तर ऐतिहासिक व सांस्कृतिक ज्ञान देण्यासाठी करण्याची कल्पना आवडली. माझे वडील कायम म्हणत असत की इतिहास व भूगोल हे एकमेकांशी जोडले गेलेले आहेत.

पुस्तक परिचयाला जाहिरात म्हटलं तर तळमळीने वाचन करून इतरांबरोबर तो आनंद लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अनाठायी गदा येईल.

(*हा मी तयार केलेला शब्द आहे. अनेक पैलू असलेला, मल्टीफॅसेटेड या अर्थाने. शब्द संग्राह्य किंवा संग्रहणीय वाटला तर खुशाल वापरा.)

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

अवांतरः बहुपैलवी

बहुपैलवी हा मी तयार केलेला शब्द आहे. अनेक पैलू असलेला, मल्टीफॅसेटेड या अर्थाने. शब्द संग्राह्य किंवा संग्रहणीय वाटला तर खुशाल वापरा

पण मग बहुपैलवान हा शब्द का नाही चालणार? ;-)

पैलूदार पुस्तक!

'बहुपैलवी' हा शब्द एखाद्या 'पैलवाना'शी संबंधित वाटतो.
'बहु' हा शब्द 'मल्टी' चे भाशांतर वाटते.
'पैलूदार' हा शब्द वापरता येईल. 'पैलूदार पुस्तक'

बहुपैलवी

"बहुपैलवी" हा शब्द वाचल्यानंतर तुम्हाला लेखिका काय सांगत आहेत ते कळाले नव्हते?

पार्डन

तुमच्या प्रतिसादात लिहीलेले मला काहिच कळाले नाही. कृपया, विस्ताराने समजवा. म्हणजे 'लेखिका' कोण? 'बहुपैलवी' हा शब्द पहिला कोणी लिहीला आहे? इत्यादी.

नकाशे

नकाशावाचन ही जगाशी ओळख होण्यातली पहिली पायरी आहे. या पुस्तकामुळे नकाशावाचनाची आवड लहानपणीच निर्माण होण्यास मदत होईल.

मुखपृष्ठावर फृटसॅलड नसून महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कोणती फळे पिकवली जातात याची माहिती नकाशास्वरुपात देण्याचा प्रयत्न आहे असे वाटते.

अवांतरः बहुपैलवान हा शब्द कसा वाटतो. ;-)

अभिजित यादव
ता. कर्‍हाड जि. सातारा

मुखपृष्ठ आणि फळे- बहुआयामी

धन्यवाद् अभिजित! कोकणातला आंबा, घोलवडचे चिकू, नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री ....अशी सगळी रचना त्या नकाशात आहे.

मल्टी फॅसेटेड म्हणजे बहुआयामी....

गौरी

घासकडवींनी सुचविलेला पर्यायच सुधारून स्विकारायला हवा

दाभोळकर बाई,

घासकडवींनी 'मल्टीफेसेटेड' ला बहुपैलवी अशा शब्द सुचवला होता.
तुम्ही त्या शब्दाला 'मल्टी फॅसेटेड म्हणजे बहुआयामी....' असे म्हटले ते खरचं अचूक आहे का?

मल्टी - बहु - फेस-(ई सायलेंट टी ईडी साठी निर्माण झाला असावा, ईडी कृती पूर्ण झाली असे सांगत आहे.) म्हणजे मुळ शब्द 'अनेक पृश्ठभाग दर्शवणारा' हाच आहे.
मराठीत असलेला 'पैलू' हा शब्द (पहलू) हिंदी वा उर्दू मधून आलेला आहे. 'पहलू' म्हणजे ई. - ऍस्पेक्ट
त्याच अर्थावर आधारलेला, 'अश्टपैलू' - 'विविधांगी कौशल्ये असलेली व्यक्ती' हा शब्द मराठीत प्रचलित ही आहे.
तसे असताना, आपण 'बहूआयामी' हा शब्द हिंदीकडून थेट दत्तक का घेतला? मराठी भाशा देखील शब्द जन्माला घालू शकते.
(हि.)आयाम म्हणजे (ई.) डायमेंशन, डायमेंशन म्हणजे मराठीत 'आकारमान' मग बहुआकारमान हा शब्द विशेशण म्हणून एका पुस्तकाला कसा शोभणार? मी आधी सुचवलेला 'पैलूदार' हा शब्द ही ह्या अंगाने चूकिचा आहे.
हिर्‍याला, मौल्यवान खड्याला अनेक पैलू असतात. त्यामुळे तो हिरा आकर्शक दिसतो. अगदि तसेच एखाद्या गोश्टीमधून अनेक विशयांचे एकसाथ ओझरते दर्शन लाभते तिथे जो 'अबक' शब्द हवा आहे, तो शब्द ते सुचवत आहेत.
'मल्टी डायमेंशन' हा शब्द चूकीचा आहे. हिंदीत 'बहुआयामी' शब्द 'अबक' म्हणून वापरत आहेत ते ही मला चूकिचे वाटते.
बहु-पैलू-__-'ई चा स्वर' - असा शब्दच होवू शकतो.
घासकडवींकडून 'लू' चा 'ल' चूकून झाला असावा. रिकाम्या जागेत कोणता तरी वर्ण यायला हवा, जो 'अनेक पैलूंचे 'दर्शन' घडवणारा' म्हणून योजता येईल.

मिती

डायमेन्शन म्हणजे मराठीत मिती. आयाम म्हणजे ऍम्प्लिट्यूड.
बहुआयामी, बहुपेडी असे शब्द मराठीत प्रचलित आहेत.

जेवण वाढणं आणी उश्ट-खरकटं टाकणं यात काय फरक असतो?

वरदाबाई,
आपल्याकडील माहिती खरंच जर कोणाच्या तरी उपयोगाची व्हावी असे वाटते तेंव्हा ती, एखादी उत्तम गृहीणी जशी घरी आलेल्या पाहुण्यांना जेवण वाढते, तशी माहिती द्यायला हवी. तुम्ही तुम्हाला असलेली माहिती देताना, काही बायका खिडकीतून उश्ट-खरकटं जसे टाकतात, तशी दिली आहे. अशा माहितीचा कोणास काय उपयोग?
आयाम म्हणजे मराठीत काय?
बहुआयाम म्हणजे मराठीत काय?
बहुआयामी म्हणजे मराठीत काय?
ऍम्प्लिट्यूड म्हणजे मराठीत काय?
- हे तुम्ही कुठे सांगितले आहे? एखाद्या उदाहरणातून ते पटवण्याचा प्रयत्न तुम्ही केला आहे का?

पुस्तक, चित्रपट, नाटक, भाशण, प्रदर्शन, एखादे सादरीकरण इत्यादी गोश्टींना 'अनेक पैलूंचे 'दर्शन' घडवणारे' म्हणून योजता येईल असा शब्द हवा आहे.
'अनेक पैलू असणारे' नको आहे.

'बहुआयामी' हा शब्द वाचला, ऐकला कि मला तरी 'उघडबंब सुमो पैलवान' दिसतो.

पैलू

तुम्ही आयाम म्हणजे डायमेन्शन म्हटलेत म्हणून मी डायमेन्शन म्हणजे आयाम नव्हे तर मिती असा प्रतिसाद दिला. तसेच तुम्ही बहुआयामी हा शब्द हिंदीतून घेतला आहे असे म्हटल्याने मी तो मराठीतही प्रचलित आहे असे सांगितले.

तुम्ही आधी सुचवलेला पैलूदार शब्द चांगला आहे. ’चित्रदर्शी’प्रमाणे पैलूदर्शी (पैलूंचे दर्शविणारा) असाही शब्द वापरता यावा.

आयाम हा शब्द मराठीत length, stretch, extent ह्याअर्थी वापरतात. शास्त्रीय परिभाषेत तो amplitude, magnitude ह्या शब्दांसाठीचा पारिभाषिक शब्द म्हणून वापरतात. विषयाची व्याप्ती, आवाका,लांबी ह्याअर्थी आयाम वापरता येईल. एका पुस्तकात विविध बाबींची माहिती असेल, वा एकाच विषयाच्या विविध अंगांची माहिती असेल तर त्यास बहुआयामी पुस्तक म्हणता येईल का ह्याबद्दल मात्र मला खात्री नाही.

'पैलूदर्शी' हा शब्द कसा वाटतोय?

वरदा बाई, प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

मल्टी साठी बहू हा शब्द योग्य नाही असे मला आधि पासूनच वाटत होते.

मल्टी हा शब्द 'मल्टीपल' असा असल्यामुळे 'गुणोत्तर प्रमाण' दाखवणारा असतो. बहु म्हणजे बहुत, अनेक. तो शब्द 'गुणोत्तर' म्हणून घेता येत नाही.

तुम्ही सांगितलेला 'पैलूदर्शी' हा शब्द ही 'अबक'* च्या बराचसा जवळचा वाटतोय.
*'अनेक पैलूंचे 'दर्शन' घडवणारे/रा'
राजेश घासकडवी साहेब तुम्हाला व अन्य उपक्रम सदस्यांना,
'पैलूदर्शी' हा शब्द कसा वाटतोय?
या संकेतस्थळावर कौल घेण्याची सुविधा नाही म्हणून प्रतिसादात हा प्रश्न विचारत आहे.

आहे तसाच काय वाईट आहे?

बहुआयामी हा योग्य शब्द आहेच. पण बहुपैलवी शब्द वापरण्याबद्दलचे आक्षेप कळले नाहीत.

'बहूआयामी' हा शब्द हिंदीकडून थेट दत्तक का घेतला?

मी म्हणतो काय हरकत आहे घ्यायला? जर भाषेचं घर समृद्ध होत असेल तर घ्यावं दत्तक, घरच्याप्रमाणेच वागवावं. शेवटी आपल्या भावाच्याच घरातनं दत्तक घेतला आहे.

मराठी भाशा देखील शब्द जन्माला घालू शकते.

घालू शकते ना. त्यासाठी तिचा संग कधी संस्कृतशी होईल, कधी हिंदीशी होईल, कधी इंग्रजीशी. जन्माला येणारे शब्द सुस्वभावी असतील तर द्यावं प्रेम त्यांना. शेवटी बीजक्षेत्र न्यायाप्रमाणे ते आपल्याच मालकीचे होतात. आता 'भाशा' हा शब्द नक्की कुठून आला? त्याला नाही आपण 'आपला' म्हणत?

बहु-पैलू-__-'ई चा स्वर' - असा शब्दच होवू शकतो. घासकडवींकडून 'लू' चा 'ल' चूकून झाला असावा.

अमुकच होऊ शकतं असं भाषेबाबतीत ठामपणे म्हणून तुम्ही निव्वळ उष्टं-खरकटं टाकत आहात का? निदान काही उदाहरणं तरी द्यावी. अनेक शब्दांना प्रत्यय लागताना इकार व उकार गळताना दिसतात.
जसे
उंदिर - (अरे) उंदरा
वाळू - वाळवी
लघु - लघवी
हळू - हळवी

ई लावायचा असेल तर बहुतेक वेळा त्याआधी आ कार येतो.
साफ - सफाई
तरुण - तरुणाई

या उदाहरणांत वी किंवा ई लावून जो अर्थ होतो त्यापेक्षा आधीचा स्वर कसा बदलतो हे स्पष्ट करायचं आहे. अर्थाच्या दृष्टीने मात्र इथे ई लावणं योग्य होत नाही. कारण बहुपैलाई मध्ये 'अनेक पैलू असणेपणा' असा अर्थ येतो. म्हणून पैलू - पैलवी ठीक वाटतं.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

एक डाव माफ!

घासकडवी,

तुमच्या प्रतिसादातील स्पश्टीकरणात व्याकरणाचे जे दाखले तुम्ही दिलेत त्यावरून 'तुम्हाला व्याकरणाची जाण नाही' हे मानण्यास जागा आहे. तसेच आजपर्यंच्या अनुभवानुसार तुम्हाला 'माझ्या लिखाणातील भाव समजतात' असे मी समजतो. ह्या दोन गोश्टी ध्यानात घेवून मी तुमच्याशी येथे 'ढिशूम-ढिशूम' करणार नाही. तुम्हाला 'एक डाव माफ'!

'बहूपैलूदर्शी' हा शब्द 'विविध पैलूंचे दर्शन घडवणारा'/ 'विविध पैलू उघड करणारा' ह्या अर्थासाठी योग्य शब्द आहे.
बहूआयामी हा शब्द त्यासाठी योग्य नाही. लघू पासून लघवी होणार्‍या (तर्कावर) बहूपैलवी ची तर बातच सोडा.

मी ब्रह्मदेव नाही.
ब्रह्मदेव असतो तर तुम्हाला, "राजेश घासकडवी साहेब तुम्हाला व अन्य उपक्रम सदस्यांना, 'पैलूदर्शी' हा शब्द कसा वाटतोय?" असे अदबीने विचारून तुमचे मत विचारात घेतले तरी असते का?

एका विचाराचे बीज एकाच क्शणी अनेक व्यक्तींच्या मनात पेरले जाते.
पेरले गेलेल्या विचाराचे पुढे काय होणार? हे ज्या व्यक्तीच्या डोक्यात/ मनात विचार पेरले जातात त्या व्यक्तीच्या योग्यतेवर व कार्यक्शमतेवर अवलंबून असते. तुम्ही संधी गमावली.

'बहुआयामी' हा शब्द तुम्हाला योग्य वाटत असता तर तुम्हाला 'बहूपैलवी' हा शब्द घडवावासा वाटलाच नसता. तो तुम्हाला सुचला नव्हता म्हणून तुम्ही नवीन शब्द घडवला असे नक्कीच नसावे. नवा शब्द तुमच्या कडून व्यवस्थित घडवला गेला नाही. आणि म्हणूनच तो सादर* होण्यातही चूक झाली. *( मी तयार केलेला शब्द आहे, संग्राह्य किंवा संग्रहणीय वाटला तर खुशाल वापरा.)

'बहूपैलूदर्शी' हाच शब्द येत्या काळात एखाद्या मराठी माणसाकडून आपसूकच वापरला जाण्याची शक्यता आहे. ती व्यक्ती अशी असेल की तिने 'उपक्रम' हे संकेतस्थळ पाहीले नसेल, येथील चर्चा वाचली/ऐकली नसेल. कारण, 'एका विचाराचे बीज एकाच क्शणी अनेक व्यक्तींच्या मनात पेरले जाते. '

'आहे तसाच वाईट काय आहे?' या प्रश्नाचे उत्तर आधीच (अनेकांच्या विडंबनातून) मिळालेले आहे.

प्रियाली बाई अमेरीकेत राहतात.
मी मुंबई, महाराश्ट्रात राहतो.
माझी त्यांचे ओळख नाही.
त्यांनी तुम्ही दिलेल्या येथील सर्वात पहिल्या प्रतिसादाला उपप्रतिसाद दिला त्यात त्यांनी तुम्ही सुचवलेल्या शब्दाचे विडंबन केले. माझा प्रतिसाद त्या खालोखाल आहे. त्यात मीही तशाच प्रकारचे विडंबंन करायचे टाळत योग्य शब्द शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. कृपया त्या 'प्रियाली व माझ्या प्रतिसादांची' वेळ पहा. लेडीज फर्स्ट या न्यायामुळेच प्रियाली बाईंचा प्रतिसाद माझ्या आधी दिसत आहे.

--------------------------------------
गब्बर के ताप से कोई बचा सकता है,
तो है वो सिर्फ.....खुद..गब्बर!

पुस्तक परिचय आवडला

पुस्तक परिचय आवडला.

हे असे काही वाचले की बरे वाटते. "पुढच्या पिढीसाठीसुद्धा मराठी भाषा जिवंत आहे" या आशावादाला जागा मिळते. कल्पक, उपयोगी, आठवणीत राहातील अशा यासारख्या पुस्तकांना जर चांगला खप असला, तर आशावाद बळावेल.

तोंडाला पाणी सुटणे

>>महाराष्ट्रातील फ़ळांचे फ़ृटसॅलड बघून तोंडाला पाणीच सुटते. >>

फळांमुळे तोंडाला पाणी सुटणे जरा अतिच वाटते. चिंचेमुळे तसे होऊ शकते.

कैच्या कै प्रतिक्रिया

नवीन शब्दाला आलेल्या मराठी लोकांच्या कैच्या कै प्रतिक्रिया वाचून मजा आली.

 
^ वर